गॅस-गणराज

गॅस गणराज
तात्या कामत हे एक उत्साही देवभक्त आहेत.आता निवृत्तीनंतर त्यांचा उत्साह दुणावला आहे. आठवड्याच्या प्रत्येक वारी ते वेगवेगळ्या मंदिरात जातात.सोमवारीं सिद्धेश्वराचे दर्शन. मग सबंध दिवस ॐ नम: शिवाय दुसरा जप नाही.मंगळवार हा तात्यांसाठी गणपतीचा वार.त्या दिवशी तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेऊन मग दिवसभर "गणराssज रंगी नाचतो नाssचतोss।". हे त्यांचे आवडते गाणे.(म्हणजे मंगळवारी आवडते.) स्वर्गातील ती भरगच्च देवसभा,शिशुकौतुकासाठी आलेले शंकर-पार्वती; रंभा-मेनका-ऊर्वशी अशा नृत्यनिपुण अप्सरांचे ते परीक्षक मंडळ, याचे साग्रसंगीत,रसभरित वर्णन तात्या उत्साहाने करतात. बालगणपतीच्या अरंगेत्रम् नृत्याचा हा कार्यक्रम खरोखर प्रत्यक्षात झाला अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे . तात्यांच्या मते बुधवार हा पांडुरंगाचा वार. त्या दिवशी "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल".गुरुवार उजाडला की दत्तमंदिराकडे धाव घेऊन मग दिवसभर "दत्त दिगंबर दैवत माझे." शुक्रवारी अन्य सगळे देव विसरून,चतु:शृंगीच्या आदिशक्तीचे दर्शन घेऊन ,"अंबे तुज वाचोनी कोण पुरविल आशा "अशी आळवणी.शनिवारी मारुतिमंदिरात जाऊन " नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छाया-मार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम्।"या ओळी अडीच तास ऐकत बसणे.तात्या कामत रविवारीं सुट्टी घेत नाहीत.त्या वारासाठी त्यांनी एक विशिष्ट देऊळ शोधले आहे.तिथे स्वामीसमर्थ,गजानन महाराज आणि साईबाबा या तिघांच्या मूर्ती आहेत.तिथे प्रती रविवारी ""श्रीssस्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थss|,गण गण गणाssत बोते। आणि सबका मालिक एक है।" आळी-पाळीने.याप्रमाणे तात्यांचा भक्तिसप्ताह भरगच्च असतो.उत्साह दांडगा .कधी खंड नाही.
तात्या कामत माझ्या मित्र-परिवारातील नसले तरी ओळखीचे आहेत.कधी भेटले तर भरभरून बोलतात.तो त्यांचा स्वभाव आहे.बर्‍याच दिवसांनी परवा भेटले.ते बोलू लागले,"तीनेक महिन्यांपूर्वी मी एका जुन्या, पेशवेकालीन वाड्यात गेलो होतो.तिथे एक सर्वांगसुंदर गणेशमूर्ती दृष्टीस पडली.प्रथमदर्शनीच माझी श्रद्धा बसली.आज मंगळवार.त्याच वाड्यात गणराजाच्या दर्शनाला जात आहे.येणार का?" त्यांनी हा प्रश्न डोळे मिचकावत गमतीने विचारला.माझी नास्तिक मते त्यांना चांगली ठाऊक आहेत.
"पण मंगळवारी तुम्ही तळ्यातल्या गणपतीला जाता ना?"
"जात होतो.पण लिमये वाड्यातील गणराजाचा मला चांगला अनुभव आला.म्हणून आता प्रत्येक मंगळवारी इथे येतो."
"गणपती इथला काय तिथला काय एकच ना?"
" असे कसे? स्थान माहात्म्य असतेच. कुठलातरी गल्ली बोळातील गणपती आणि वरळीचा सिद्धिविनायक सारखेच म्हणायचे का? वेगवेगळे अष्टविनायक आहेतच ना? त्या सर्वांचे दर्शन आपण --म्हणजे तुम्ही सोडून--घेतोच ना?"
"मला हे पटत नाही.स्थानिक लोकांच्या सोईसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती स्थापल्या.गणपतीची अनेक नावे असल्याने त्या मूर्तींना गजमुख,मोरेश्वर,बल्लाळ, सिद्धिविनायक अशी नावे दिली.पण मूळ गणपती एकच असला पाहिजे.हे स्थानमाहात्म्य, नाममाहात्म्य,मूर्तिमाहात्म्य,मंडळमाहात्म्य,पीतांबर माहात्म्य,शुंडा(दक्षिण-वाम)माहात्म्य असे प्रकार बुद्धीला न पटणारे आहेत.समजा दिलीप प्रभावळकर यांचा हसवा-फसवी हा कार्यक्रम रंगमंचावर चालू आहे.त्यांना एक तातडीचा निरोप ....."
मला मधेच तोडत तात्या म्हणाले,"तुम्हाला कसे पटणार? तुम्ही नास्तिक.श्रद्धा ठेवा.भक्तिभावाने दर्शन घ्या.अनुभव निश्चित येईल.मग पटेल. "
"श्रद्धेला आमच्या डोक्यात स्थानच नाही.ती कुठे ठेवायची? आणि पटते ते बुद्धीमुळे.न पटता खरे मानायचे ते श्रद्धेने. ते राहूं द्‍या.त्या वाड्यातील गणपतीचा तुम्हाला काय अनुभव आला ते सांगा."
"अनुभव साधा आहे.पण प्रचीती रोकडी आहे.पूर्ण पटणारी आहे.जे घडले ते त्याच्या कृपेनेच यात शंका नाही.तुम्हीसुद्धा तेच म्हणाल.आमच्या घरी दोन सिलिंडर आहेत."
"कसले? सैपाकाच्या गॅसचे का?"
"हो.आम्हाला एक सिलिंडर सहा आठवडे पुरतो. भरलेला लावला की आठवड्याभरात नवीन नोंदवतो.तो ८/१० दिवसांत मिळतो.इतके दिवस कधी अडचण आली नाही.पण तीनेक महिन्यांपूर्वीची गोष्ट.भरला सिलिंडर लावला आणि पाहुणे आले.त्य़ा गडबडीत गॅस नोंदवणे राहिले.दोन आठवड्यांनी नोंदवला.नेमकी त्याच वेळी गॅसटंचाई निर्माण झाली.आणखी दोन आठवडे गेले.सिलिंडर येईना.फोन केले,खेटे घातले."दोन दिवसांत येईल" असे सांगत.पण नाहीच.तळ्यातल्या गणपतीची करुणा भाकली. उपयोग झाला नाही.लावलेला गॅस आता संपेल.मग काय करायचे? असे संकट उभे राहिले.संकटकाळी खर्‍या देवाची आठवण होते.मंगळवारी लिमयेवाड्यातील गणराजाला साकडे घातले.तुम्हाला खरे वाटणार नाही.पण दुसर्‍याच दिवशी म्हणजे बुधवारीं गॅस आला.अगोदरचा शुक्रवारीं संपला.हे देवाघरचे सत्य आहे.त्या गणराजाच्या कृपेने थोडक्यात वाचलो.घरचीं सांगत होती वरच्या अधिकार्‍याला भेटा.मी थेट सर्वोच्च अधिकार्‍याला गाठले." ते हसत म्हणाले.
"आश्चर्य वाटते!" मी म्हणालो.
"वाटते ना? वाटणारच ! अनुभव आहेच तसा."
"त्या अखिलविश्वनिर्मात्याने एका भक्ताच्या वैयक्तिक कामात इतके बारकाईने लक्ष घालावे याचे आश्चर्य वाटले.:"
"अहो,त्याला कठिण ते काय ! सगळे सहज लीलया होते.नुसते मनात आणले की झाले.नाहीतर इतके दिवस न आलेला सिलिंडर नेमका बुधवारी यावा हे कसे? जरा श्रद्धेने विचार करा ना.श्रद्धा असणे महत्त्वाचे."
"इतके दिवस न आल्यामुळे त्या दिवशीं आला, हे उघड आहे.ते असो.ती अचानक गॅसटंचाई तुमच्या त्या गणराजानेच निर्माण केली असणार. आता हा अनुभव लिहून तुम्ही वर्तमानपत्रात द्या.छापून येईल.तो गणपती गॅस-गणराज म्हणून प्रसिद्धी पावेल.तुम्ही आद्यप्रवर्तक ठराल.लोक गॅस एजंसीपुढे रांगा न लावता गॅस-गणरायापुढे लावतील." हे ऐकल्यावर तात्या विचारमग्न झाले.ती संधी साधून मी त्यांचा निरोप घेतला.
"-श्रद्धेने विचार करा.-हे त्यांचे वाक्य गमतीचे वाटले.विचार करता येतो तो बुद्धीने.श्रद्धेने नव्हे.श्रद्धा ठेवली की विचार खुंटतो.ठप्प होतो.मूर्तीने मनात आणले की सारे काही होते.असे या श्रद्धाळूंना वाटतेच कसे? निर्जीव मूर्तीला मन असू शकते का? बरे.प्राणप्रतिष्ठा करताना काही मंत्र पुटपुटतात आणि मूर्तीच्या छातीच्या डाव्या बाजूला दूर्वांनी पाणी लावतात, म्हणून मन असते असे मानू.मूर्तीत काही सामर्थ्य असते का? गझनीच्या मुहमदाने सोरटी सोमनाथाची मूर्ती फोडली. मुस्लिम आक्रमकांनी अनेक देवमूर्तींचे भंजन केले.कुठल्या मूर्तीने कधी काही प्रतिकार केल्याची नोंद इतिहासात नाही."मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली.देवीच्या अंगावरील दागिने चोरले.मुकुट पळविला.दिवे आगरच्या देवळात चोरटे घुसले.प्रतिकार करू पाहाणार्‍या रक्षकाला जिवे मारले.आपल्या निष्ठावंत सेवकाला देव वाचवू शकला नाही.चोरट्यांनी सुवर्ण गणेश पळवला.तो त्यांच्या बरोबर निमूटपणे गेला." या सर्व सत्य घटनांवर हे तात्या कामत बुद्धीने विचार का करत नाहीत? की श्रद्धेने विचार करू जातात? मला वाटते श्रद्धाळू माणसे अशा वास्तविक घटनांवर विचार करायला घाबरतात.कारण बुद्धीने विचार केला तर मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुली हे त्यांच्या सहज लक्षात येईल.मग इतकी वर्षे उराशी बाळगलेल्या श्रद्धेचे काय? आपले श्रद्धास्थान निरर्थक ठरले तर कसे व्हायचे? श्रद्धेविना आपण उघडे पडूं.अशी भीती त्यांना वाटते.याविषयी एक किस्सा आहे.
...परवा लक्ष्मी रस्त्यावर भाऊ नेने भेटले.अस्वस्थ दिसले. "काय कसल्या चिंतेत आहात ?" त्यांना विचारले.म्हणाले,
"अहो, घरून निघताना खरेदीसाठी ५००रु.च्या सहा नोटा घेतल्या होत्या.त्यातील एकही आता दिेसत नाही."
"सगळे खिसे,पाकिटे तपासली का?"
"हो. हा पु्ढचा,पट्ट्याजवळचा लहानसा खिसा तेव्हढा राहिलाय."
"त्यात त्या नोटा असण्याची शक्यताच नाही काय?"
"आहे.तशी शक्यता आहे."
"अहो,मग बघा की!"
" आणि त्यात नोटा नसल्या तर काय करूं? त्या तिथे असतील या आशेवर मी आहे."
"म्हणजे नोटा त्या खिशात आहेत अशी तुमची श्रद्धा आहे.तिचा खरे-खोटेपणा तपासायला म्हणजे चिकित्सा करायला तुमचे मन धजावत नाही."
"तसे म्हणा हवे तर.पण मी काय करूं?"
आपल्या श्रद्धेची चिकित्सा करण्याचे धैर्य श्रद्धावंतांना नसते.श्रद्धा खोटी ठरली तर काय करायचे? अशी भीती त्यांना असते."देवावर माझी श्रद्धा आहे.तो संकटात धावून येईल.मला तारून नेईल " अशा श्रद्धेच्या अवगुंठनात राहाणे त्यांना सुरक्षित वाटते.देवाने काहीच केले नाही (तो कधी काही करत नाहीच) तरी त्यांची श्रद्धा ढळत नाही.देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहातो आहे असे काहीतरी मानून ते ती श्रद्धा अधिक दृढ करतात.शेवटी अनेकांना नैराश्य येते.काही जणांचे मानसिक संतुलन बिघडते.पण तर्कबुद्धीने विचार करून, निष्कर्ष काढून ते स्वीकारण्याचे धैर्य त्यांच्यापाशी नसते.बालपणापासून मनावर ठसवलेल्या देवश्रद्धेच्या संस्कारांचा विळखा काही सुटत नाही.
**********************************************************************************************

Comments

पण तात्यांनी चाचणी केलीच ना?

तळ्यातल्या गणपतीला साकडे घातल्यानंतर जितपत विघ्ने निस्तरतात त्यापेक्षा अधिक विघ्ने लिमयेवाड्यातल्या गणपतीला साकडे घातल्यानंतर निस्तरतात. इतपत चाचणी कथेतील तात्यांनी केलीच म्हणावे!

(टीप: "साकडे घातल्यानंतर" असा शब्दप्रयोग केलेला आहे. साकडे घातल्यामुळे" असा नव्हे.)

*"मूर्तीमधला देव कधीकधी पावतो, आणि कधीकधी पावत नाही" असे ठरवल्यानंतर दरोड्याची बातमी तर्काला बाधा देत नाही. *

स्थानमाहात्म्याची चिकित्सा

श्री.धनंजय म्हणतात,

पण तात्यांनी चाचणी केलीच ना?

देवतेच्या स्थानमाहात्म्यावर तात्यांची श्रद्धा आहे.त्या श्रद्धेची त्यांनी चिकित्सा केली असे म्हणता येईल. निष्कर्ष नकारात्मक आला असता तर "गणराज माझ्या श्रद्धेची कसोटी पाहात होता." अशा समर्थनाची शक्यता होती.

+१

लेख आवडला.

धन्यवाद

@चन्द्र्शेखर
आपल्या अनुकूल प्रतिसादाप्रीत्यर्थ मनःपूर्वक धन्यवाद

तर्कबुद्धी

देवाने काहीच केले नाही (तो कधी काही करत नाहीच) तरी त्यांची श्रद्धा ढळत नाही.

देवाने काही केले नाही कारण आपल्या प्रार्थनेत काहीतरी कमी राहिली असे सहसा मानले जाते. :-)

तर्कबुद्धीने प्रश्न सुटत नसतात. श्रद्धेनेही सुटत नाहीत पण काहीतरी आधार असल्याच्या कल्पनेत माणूस राहतो. हे असेच चालत राहील.

बाकी, एक गोष्ट लक्षात आली की गुरुद्वारात झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन देवळांमध्येही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे.

तर्कबुद्धीने प्रश्न सुटत नसतात?

जगातले बरेच प्रश्न आजवर तर्कानेच सुटले आहेत. जे आजवर सुटलेले नाहीत ते पुढे कधीतरी तर्कानेच सुटतील अशी माझी श्रद्धा आहे!
हे असेच चालत राहील.
यनावालांच्या लेखात हा निराशावादी प्रतिसाद खटकला. 'आर्य टिळा का लावतात?' किंवा 'समाजरचनेला अर्थ आहे' अशा भंपक चर्चाविषयांमध्ये यनावाला निष्ठेने वर्षानुवर्षे तर्काची, विवेकाची बाजू लावून धरत आले आहेत. वर उल्लेख केलेले लेख लिहिणार्‍या व्यक्ती यनावाला सरांपेक्षा वयाने लहान असाव्यात (अशी माझी श्रद्धा आहे!). तरीही ते असले जुनाट, बुरसटलेले काहीतरी लिहीत असतात. या पार्श्वभूमीवर यनावालांसारख्यांकडूनच काही आशा आहेत. सदर प्रतिसाद अशा आशांवर विरजण टाकणारा वाटला.
गुरुद्वारात झालेल्या गोळीबारानंतर अमेरिकन देवळांमध्येही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे
अमेरिकेतल्या देवळांमध्ये खजिने नाहीत वाटते. नाहीतर सुरक्षाव्यवस्थेशिवाय देवालाही आपल्या संपत्तीचे रक्षण स्वतः करता येत नाही हे तितल्या सुरक्षाव्यवस्थेला कळाले असतेच!

मतितार्थ

जगातले बरेच प्रश्न आजवर तर्कानेच सुटले आहेत. जे आजवर सुटलेले नाहीत ते पुढे कधीतरी तर्कानेच सुटतील अशी माझी श्रद्धा आहे!

चला या श्रद्धेवर माणुस जगतो. जे प्रश्न आज तर्काने सुटत नाहीत ते उद्या सुटतील पण उद्या नव्याने प्रश्न निर्माण होतील. ते ही परवा सुटतील . परत तेरवा नव्याने निर्माण होतील . हे असच चालायच. सगळे प्रश्न सुटलेली असतील अशी स्थिती उद्भवेल असे वाटत नाही. बाकी यनावालांच्या निष्ठेबाबत दुमत नाही.

बरोबर

. जे प्रश्न आज तर्काने सुटत नाहीत ते उद्या सुटतील पण उद्या नव्याने प्रश्न निर्माण होतील. ते ही परवा सुटतील . परत तेरवा नव्याने निर्माण होतील . हे असच चालायच. सगळे प्रश्न सुटलेली असतील अशी स्थिती उद्भवेल असे वाटत नाही.

हेच.

सर्व प्रश्न तर्काने सुटत नसतात. एखाद्याची बायको Cancer ने मारणार हे कळल्यावर मुलांच्या जबाबदारीचे प्रश्न तर्काने सुटत नाहीत. व्यवसायात कोणी फसवले आणि कसे फसवले हे तर्काने कळले तरी नुकसान तर्काने भरून निघत नाही. दर वेळेस मित्र आणि नातेवाईक मदतीला येतात असेही नाही आणि डॉक्टरचे पैसे भरण्याएवढी परिस्थिती असते असेही नाही. समस्या अनेक असतात आणि तर्काने चुटकीसरशी त्यांची उत्तरे मिळतील हा केवळ भाबडेपणा झाला. माणूस जेव्हा हतबल होतो, दुसरे काही मिळत नाही, समोर दिसत नाही तेव्हा श्रद्धेचा आधार घेतो हा नकारात्मक किंवा निराशावादी सूर नसून किंवा उपाय किंवा हेच बरोबर असे नसून दुर्दैवाने ती सत्यपारीस्थिती आहे. त्यात यनांच्या विरोधात काही नसून जे सर्वसाधारण जगात चालते ते सांगितले आहे.

आयुष्यात जसे प्रश्न वाढू लागले, टेन्शन वाढले तसे श्रद्धेच्या बाजारातून, बाबा बुवांच्या विळख्यातून माणूस सुटण्यापेक्षा अधिक गुरफटत चालला आहे हे सहज दिसते आहे.

अमेरिकेतल्या देवळांमध्ये खजिने नाहीत वाटते. नाहीतर सुरक्षाव्यवस्थेशिवाय देवालाही आपल्या संपत्तीचे रक्षण स्वतः करता येत नाही हे तितल्या सुरक्षाव्यवस्थेला कळाले असतेच!

पिट्सबर्ग मधील व्यंकटेशमंदिराकडे तिरुपतीच्या खालोखाल संपत्ती असल्याचे सांगितले जाते. देवालाही आपल्या संपत्तीचे रक्षण स्वतः करता येत नाही हे तिथल्या सुरक्षाव्यवस्थेला कळण्यापेक्षा भाविकांना कळायला हवे. सुरक्षारक्षक बहुधा अमेरिकन असतात. चीज बर्गर वगैरे खाऊन ड्युटीवर येणारे.

तर्कबुद्धी

चला! मला जे काय लिहायचे होते ते श्री.सन्जोप राव यांनी लिहून टाकले हे फार छान झाले! ज्याप्रमाणे नवीन ज्ञान मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीविना अन्य कोणताही मार्ग(गुरुकृपा,शक्तिपात इ.) नाही तसेच समस्येच्या सोडवणुकीसाठी (सोल्यूशन) तर्कबुद्धीने विचार करण्याशिवाय दुसरा कोणताही विश्वासार्ह मार्ग नाही. बहुतेकजण तसे करतात. समस्येचे विश्लेषण करून सोडवणुकीचे संभाव्य मार्ग शोधावे लागतात.त्यांवर साधक-बाधक विचार करून योग्य मार्ग निवडावा लागतो. प्रसंगी मित्रांचे/नातेवाईकांचे मार्गदर्शन/सहकार्य घ्यावे लागते.एवढे करून समस्येचे निराकरण होईलच असे नाही.शक्य ते प्रयत्न करावे.मग जे असेल त्याला धैर्याने सामोरे जावे.जीवन हे असे आहे.त्यासाठी यदृच्छेचे तत्त्व- प्रिन्सिपल ऑफ रँडमनेस (दैवं चैवात्र पंचमम्) जाणून घ्यावे.मात्र असे पावलो-पावली होत नाही.विचारपूर्वक योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश लाभण्याची संभवनीयता शतप्रतिशताप्रत जाणारी-टेंडिंग टु १००%- असते.

भाबडेपणा

एवढे करून समस्येचे निराकरण होईलच असे नाही.शक्य ते प्रयत्न करावे.मग जे असेल त्याला धैर्याने सामोरे जावे.जीवन हे असे आहे.

हे सर्वांना पटेल असे वाटणे हा भाबडेपणा झाला. :-) श्रद्धा आणि सबुरी असे तर साधुसंतांनीही सांगितले आहे. त्यात आणि यात काही फरक नाही, उलट असे सांगणार्‍यांची मंदिरे बांधून त्याच लोकांनी बाजार केला आहे.

मेंदूच्या मनात

सध्या सुबोध जावडेकरांचे मेंदूच्या मनात पुस्तक वाचतो आहे.
मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अनेक प्रयोगांची मनोरंजक मांडणी लेखकाने केली आहे. त्यात अंधश्रद्धा व मेंदू विज्ञान हे देखील प्रकरण आहे.
श्रद्धेची चिकित्सा झाली कि श्रद्धा ही श्रद्धा रहात नाही. श्रद्धा ही माणसाला जगण्याचे बळ देते. कदाचित या कारणामुळे माणुस चिकित्सा करण्यास धजावत नसावा.
बाकी गणपतीचे स्थानमहात्म्य मस्तच. सकाळीच रेडिओ सिटीवर भक्तिसंगीत लागते त्यावर दगडू शेट गणपती नवसाला पावतो असे सांगणारे गाणे ऐकले.

कारण बुद्धीने विचार केला तर मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुली हे त्यांच्या सहज लक्षात येईल.

अहो ते त्यांना माहित असतेच कि! श्रद्धावान लोकच म्हणतात ना मानला तर देव नाहीतर दगड.

प्रियाली म्हणतात " तर्कबुद्धीने प्रश्न सुटत नसतात. श्रद्धेनेही सुटत नाहीत पण काहीतरी आधार असल्याच्या कल्पनेत माणूस राहतो. हे असेच चालत राहील. " या मताशी सहमत आहे. समजा असे असू नये असा विचार जरी मांडला तरी अनिश्चितता पचवायला शिका हा संदेश देणे हा पुस्तकी विचार रहातो. प्रत्यक्षात अनिश्चितता वाट्याला आल्यानंतर त्यांच्या मेंदुत काय रसायने स्त्रवतील आणि तो कसा वागेल या अंदाज अगोदर येत नाही.
बाकी श्रद्धा-अंधश्रद्धा-अश्रद्धा हा एव्हर ग्रीन विषय आहे. तो कैक शतके चघळण्यात येतो व येत राहिल. काही अंधश्रद्धांचे निर्मूलन होत राहील तर काही नव्याने निर्माण होत राहतील.

अनिश्चितता

प्रत्यक्षात अनिश्चितता वाट्याला आल्यानंतर त्यांच्या मेंदुत काय रसायने स्त्रवतील आणि तो कसा वागेल या अंदाज अगोदर येत नाही.>> अनुमोदन.
थोडे अवांतर होईल पण लिहितो. १० वर्षांपूर्वी वडील कर्करोगाने गेले. ९ वर्ष कर्करोग झाल्यापासून ६.५ वर्षे बरी गेली उर्वरित २.५ वर्षे अंगावर कट आणणारी होती. अनंत अडचणी अनुभवल्या . कितीही तार्किकदृष्ट्या पटत असले तरीही मनाला उभारी कशी मिळेल आणि ह्याच्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग काय ह्याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. ज्याचे त्यालाच भोगावे लागते आणि त्यातून शिकलात तर देवावरच विश्वास उडतो तरी किंवा अजून गाढ होतो. माझ्याबाबतीत उडाला नुसता देवावरचाच नव्हे तर ज्योतिष आणि डॉक्टर ह्यांच्यावाराचा पण उडाला. जितक्या प्रमाणात ज्योतिष आणि अंधाश्राधांवर घाव घातला जातो तितका डॉक्टर लोकांच्या कंपूबाजीवर आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या मनस्तापावर होत नाही. उदाहरणार्थ कर्करोग दुसर्यान्न्दा उफाळून आल्यावर वाचणे कठीणच असते. सध्या कदाचित अजून प्रगती झाली असल्याने ह्या परिस्थितीत सुधारणा झाली असेल तर माहिती नाही. निदान १०-१३ वर्षांपूर्वी तरी सेकंडरीज आल्यावर वाचणे कठीणच मानले जायचे. तेंव्हा नेहमीचे डॉक्टर युरोप दौऱ्यावर होते म्हणून दुसऱ्या नामवंत तज्ञाकडे गेलो. त्यांनी लगोलग ऑपरेशन करून अजून ९-१० महिने फार तर जगतील असे अगदी छातीठोकपणे सांगितले. ३-४ महिन्यात जास्त त्रास झाल्यावर नेहमीच्या डॉक्टरकडे गेलो तेंव्हा आधी त्यांनी शिव्या घातल्या की हा हा डॉक्टर माझा विध्यार्थीच आहे त्याच्याकडे का नाही गेलात. मग पुन्हा एकदा ऑपरेशन झाले. त्यातून ३-४ महिने बरे गेले. आता सगळे मिळून १० महिने झाले आणि आपण अजून जिवंत आहोत ही आपल्या नेहमीच्या डॉक्टरांची कृपा अशी आमची समजूत. थोडे दिवस गेले पुन्हा येरे माझ्या मागल्या आता नेहमीचे डॉक्टर म्हणाले आता फक्त देवच वाचवू शकेल. आता आला का यक्ष प्रश्न. डॉक्टरच असे म्हणाल्यावर सामान्य लोकांनी काय करायचे.
आता पुन्हा किडनी मध्ये डायल्यासीस करणारा वेगळा आणि किडनीमधून कापेलरी ट्यूब घालून लाघवी काढणारा वेगळा डॉकटर, परत कर्करोग तज्ञ आणि किडनी स्पेशालिस्ट ह्यांचे एकमत होईना की ओपेराशन करावे वा करू नये. मग म्हणे तुमचे वडील अजून लोजीकली विचार करू शकतात त्यांचे निर्णय तुम्ही म्हणजे तुमच्या घरातल्यांनी घेऊ नयेत आणि तो अधिकार फक्त रुग्णाचा आहे असे आह्माला सांगितले . मग वडिलांना आह्मी कोणीही नसताना किडनी तज्ञाने विचारले की आपण असे असे ओपेराशन करू तुम्ही सहा महिने अजून जगाल. वडील ठीकाआहे म्हणाले. ओपेराशन झाले मग २-३ दिवसांनी लक्षात आले की अरे हे जसे घडायला पाहिजेल तसे घडतच नाहीये. मग पुन्हा ओपेराशनची तयारी. आता मी वैतागलो. किडनी तज्ञाला म्हणालो आता १४ महिने झाले आहेत. हा माणूस आता धड उठुही शकत नाहीये. सगळे काही बिछान्यातच चालू आहे अजून काय प्रयोग करणार आहात. वडील कधीही जातील ह्या चिंतेत १४ महिने काढले आणि आमची आता मानसिक तयारी झाली आहे की कारभार कधीही आटोपेल. तेंव्हा कृपा करा आणि अजून काही काढू नका. त्यांच्या वेदना मला दिवसभर बघ्याव्या लागता आहेत. माझ्याजवळ आता फक्त घर गहाण टाकून नवीन ऑपरेशन साठी पैसे उभे करणे हाच एकमेव पर्याय आहे. पण आईकेल तर किडनी तज्ञ कसला, पुन्हा एकदा कर्करोग तज्ञ आणि किडनी तज्ञ ह्यांच्यात वाद झाला. शेवटी किडनी तज्ञाने पुन्हा हळूच आह्मी नसताना वडिलांना विचारून घेतले. पण आता वडील पण वैतागले होते. म्हणाले मी आपला आता जातो. सोडवा मला ह्या त्रासातून. आता रुग्ण तयार नाही म्हणून त्याला ओपेराशन करता येईना. मग त्याने अजून एकाला भरीस पाडून विचारून बघितले पण आता वडील एकदम ठाम राहिले. माझे जे काय व्हायचे ते होऊ देत मला इथून जाऊ द्यात. हो नाही हो नाही करता एक दिवस हॉस्पिटलमधून सुटका झाली . अश्या तऱ्हेने जवळपास ६ महिने सतत हॉस्पिटल मध्ये राहून वडील घरी आले आणि पुढे जवळपास ८ महिने घरीच बरेच बरे होते. ह्याच कालावधीत किमान ३-४ वेग वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. तिथले एक एक अनुभव म्हणजे कठीणच होते. एक कुटुंब पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. पण पोटाचा पोरगा मारायला टेकल्याने आई वडील काय वाटेल ते करत होते. तर्क चालत नाही अश्यावेळी.

ह्याच कालावधीत माझा जवळचा एक मित्र ट्रक खाली येवून मेला. त्याची काहीही चूक नव्हती. बिचारा रस्त्याने चालला होता आणि मागून ट्रकने धडक दिली. त्याच्या आईची भयानक मनस्थिती पुढे ३-४ वर्षे जवळून पहिली. एकुलता एक मुलगा हात तोंडाशी आलेला गेल्याचे दुख वेगळेच. अश्यावेळी जर का आर्थिक स्तिथी चांगली असेल तर माणूस थोडातरी सावरतो. पण आर्थिक स्तिथी खालावली आणि त्याच्या जोडीला बाकीची संकटे आली की माणूस कसा वागेल काहीही सांगता येत नाही.

जोपर्यंत आपण घेतलेले निर्णय बरोबर निघत आहेत, पूर्ण नाहीतरी ७०% यश येत आहे. बाकी कुठून तरी मदत मिळून आपण पुढे जातो आहोत तोपर्यंत माणूस तर्काने वागतो. सभोवतालच्या परिस्थितीनुसार त्याचे मत बनवतो आणि मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यांचा मागे लागतो. परिस्थिती सुधारली तर माणूस पुन्हा तर्काने वागू लागतो परंतू एक एक निर्णय चुकत गेले की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि शेवटी माणूस देवाला किंवा बरेचदा साधुबबाला शरण जातो. मग त्यातून बाहेर येणे कठीणच असते.

फार कमी लोकांना आपल्याला काय पाहिजेल हे नक्की उमगलेले असते आणि त्यांच्यात निर्णय घेण्याची आणि घेतलेल्या निर्णयामधून होणाऱ्या बिकट परिस्थितीशी सामना करायची हिम्मत असते. अशी लोक देवाच्या मागे लागताना पहिली नाहीत बाकी ९०% लोक एकावर एक होणाऱ्या आघातांनी खचून जातात. त्यांना अपयश आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे बाळ नुसते तर्काने मिळत नाही. असो फारच लांबला प्रतिसाद

इन्स्टन्ट मन परिवर्तन

असे म्हणतात कि विमान पस्तीस हजार फूट उंची वर अटलांटिक महासागरा वरून उडत असताना पायलट ने घोषणा केली "लोक हो, आपली चारी इंजिने बंद पडली आहेत" कि भले भले नास्तिक एका सेकंदात श्रद्धाळू होतात. मी श्रद्धाळू नाही. पण जर उद्या मला किंवा त्याही पेक्षा माझ्या कुटुंबियांना काही असा दुर्धर रोग झाला कि डॉक्टरांनी "या वर आमच्या कडे उपाय नाही" असे सान्गितले, तर माझ्यातला विचारवंत जिवंत राहील का, याची खात्री देता येत नाही.

?

>>असे म्हणतात कि विमान पस्तीस हजार फूट उंची वर अटलांटिक महासागरा वरून उडत असताना पायलट ने घोषणा केली "लोक हो, आपली चारी इंजिने बंद पडली आहेत" कि भले भले नास्तिक एका सेकंदात श्रद्धाळू होतात.

हा विदाबिंदू आहे की कन्जेक्चर?

>>पण जर उद्या मला किंवा त्याही पेक्षा माझ्या कुटुंबियांना काही असा दुर्धर रोग झाला कि डॉक्टरांनी "या वर आमच्या कडे उपाय नाही" असे सान्गितले, तर माझ्यातला विचारवंत जिवंत राहील का, याची खात्री देता येत नाही.

शक्य आहे. पण पर्यायी उपायाचा खर्च किती यावरही ते अवलंबून राहील.

डॉक्टरांनी सांगितले "उपाय आहे, वीस लाख लागतील" आणि भगताने सांगितले "उपाय आहे, वीस लाख लागतील" तर विचारवंत जागा राहील असे वाटते.

डॉक्टरांनी सांगितले "उपाय नाही" आणि भगताने सांगितले "उपाय आहे, वीस लाख लागतील" तरी विचारवंत जागाच राहील असे वाटते.

डॉक्टरांनी सांगितले "उपाय नाही" आणि भगताने सांगितले "उपाय आहे, दोनशे रुपये लागतील" तर विचारवंत कदाचित जागा राहणार नाही. त्यावेळी त्याने झोपी जायला हरकत नाही.

विचारवंत

पण जर उद्या मला किंवा त्याही पेक्षा माझ्या कुटुंबियांना काही असा दुर्धर रोग झाला कि डॉक्टरांनी "या वर आमच्या कडे उपाय नाही" असे सान्गितले, तर माझ्यातला विचारवंत जिवंत राहील का, याची खात्री देता येत नाही.
येथे विचारवंत हा शब्द 'नास्तिक' या अर्थी वापरला आहे असे मला वाटते. पण असे जर असले तर तुम्ही मी श्रद्धाळू नाही असा दावा करण्याचे कारण नाही. फक्त आपण श्रद्धाळू आहोत असे मान्य करण्याचे सामर्थ्य/धाडस आपल्यात नाही असे म्हणा वाटल्यास. आणि तेही ठीकच आहे. प्रत्येकाने नास्तिक / तर्कनिष्ठ/ विचारवंत- काय हवे ते म्हणा- असलेच पाहिजे असा आग्रह नाही (प्रत्येकाने जिवंत असलेच पाहिजे असा तरी कुठे आग्रह आहे?). फक्त दुटप्पीपणा नसावा. 'मी आस्तिक आहे, मला देवळात गेल्याने, देवाला नमस्कार केल्याने, कर्मकांडे केल्याने, जपजाप्य, उपासतापास केल्याने बरे वाटते, बळ मिळते' हे मान्य करण्यात कसला आलाय कमीपणा? उलट असे जर असेल तर आपण बहुसंख्य जनतेचा भाग आहोत असे मानून त्याचा वाटला तर अभिमानच वाटायला पाहिजे.
'सकाळ' मध्ये 'मुक्तपीठ' नावाचे एक सदर येते. त्यात कुठल्याशा अपघातातून कुठल्याशा स्वामींच्या कृपेने आपण कसे वाचलो, कुठल्या देवाच्या/ देवीच्या आशीर्वादाने आपण कुठल्या संकटातून अडचणीतून कसे सहीसलामत बाहेर पडलो असे पानभर पाल्हाळ असते. त्याविरोधात कुणी कधी लिहिल्याचे (आणि ते 'सकाळ'ने छापल्याचे) माझ्या तरी बघण्यात नाही. 'मला आयुष्यात अडचणी आल्या त्या माझ्या चुकांमुळे आणि माझ्यात असलेल्या कमतरतेमुळे - आणि त्यातून मी बाहेर पडलो ते माझ्या प्रयत्नांमुळे- जर बाहेर पडलो नसेन तर तेही माझ्यामुळेच' असे म्हणायला 'Internal locus of control' असावा लागतो. त्यापेक्षा दैववादी होणे अधिक सोपे आणि सुखाचे. फक्त आपण तसे आहोत हे मान्य करण्याचे धाडस पाहिजे. फक्त खोटे वागू नये.
'कुठल्याही क्षणी सत्यसाईबाबांचे स्मरण करुन मी एकटाकी मजकूर लिहितो' असे रविंद्र पिंगे लिहितात आणि वाचणार्‍यांचे हात जोडले जातात तिथे तुमचीआमची काय कथा?

मनपरिवर्तन?

श्री.चेतन पंडित म्हणतात तसा प्रसंग माझ्यावर(स्वतःवर) आला तरी माझी तर्कबुद्धी अविचल राहील असे ठामपणे वाटते.(मात्र मेंदूत विकृती निर्माण होता नये.)माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर असा प्रसंग आला तरी अवैज्ञानिक उपचाराला माझा विरोध राहील.पीडित व्यक्तीच्या शारीरिक वेदना निश्चितपणे थांबणार असतील तर कोणताही औषधोपचार करावा.अन्यथा जे अटळ दिसते ते स्वीकारावे.

पुर्वअट

(मात्र मेंदूत विकृती निर्माण होता नये.)

ही पुर्व अट आहे. ही विकृती म्हणजे मेंदूत होणारे रासायनिक बदल असे म्हणता येईल. या बद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. केवळ तर्काच्या आधारे शक्यता विचारात घ्यावी लागते. त्यामुळे आपली तर्क बुद्धी अविचल राहील हा आपला तर्क झाला. श्रद्धाळू लोक या बाबत असा विचार करतात की हे परमेश्वरा , संकट काळी मला सुबुद्धी दे! प्रत्यक्षात त्या वेळी यदृच्छेने जे घडेल ते घडेल.

गोष्टीवेल्हाळ

लेख थोडासा पसरट वाटला. श्रद्धा-अंधश्रद्धा आणि मूर्तिपूजा या दोन मुद्द्यांची मिसळण आणि गल्लत झालेली वाटली. मुळात देव आहे किंवा नाही हा मुद्दा वेगळा. पण जर तो आहे असे मानले तर त्याला निर्गुण रूपात पहाणे बहुसंख्य हिंदूंना जमत नाही. ते देवाला मूर्तिस्वरूपात पहातात. पूर्वी झाड,डोंगर,पाषाण ही श्रद्धास्थाने असत. मूर्तिकला विकसित आणि सुलभ झाल्यावर देव मूर्तीत जाऊन बसला. आता मूर्तीतून देवाला बाहेर काढायचे तर एकतर मूर्तिभंजन केले पाहिजे नाही तर देवालाच हद्दपार केले पाहिजे. मूर्तीपूजा न मानणारा इस्लाम आणि क्रिस्टिअन धर्म आपल्याला मानवेल का? आपण बुत्-शिकन होऊं का? ते लोक एक ग्रंथ प्रमाण मानतात. आपण हिंदूंनी एकाच ग्रंथाचे प्रामाण्य कधीच मान्य केलेले नाही. त्यामुळे अमुक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे वागलो नाही तर आपण हिंदू रहाणार नाही असे आपल्याकडे नाही. मग पर्याय काय? श्रद्धेला तर पर्याय नाही. फक्त श्रद्धेच्या दुकानांना आणि बाजाराला वेळोवेळी एक्स्पोझ करीत रहाणे एव्हढेच हातांत रहाते. तसेही मूर्तिस्थळावरची गर्दी, घाण,अस्वच्छता,गैरसोय यांना कंटाळून बराचसा सुशिक्षित वर्ग तिथे जाणे टाळू लागला आहे. पण त्याचबरोबर नवसाक्षर आणि नवश्रीमंत वर्गाने या पूर्वसुशिक्षितांची जागा घेतली आहे. या वर्गाला पूर्वी जे करणे ( आर्थिक आणि सामाजिक उच्च वर्गाचे अनुकरण ) जमत नव्हते ते तो आता करू बघतो आहे. प्रवास सोपा झाला आहे, क्षेत्र/तीर्थस्थळे आवाक्यात आहेत. त्यामुळे गर्दी वाढतेच आहे. हळू हळू याही वर्गाला त्यातली निरर्थकता जाणवेल आणि हे सर्व कमी होईल. पण केव्हा? जेव्हा याचा परमोच्च बिंदू गाठला जाईल तेव्हा. जेव्हा अगदी तळागाळाच्या वर्गालाही हे आवाक्यातले होईल आणि यात्रा करून, नवस बोलून त्यांचीही हौस फिटेल तेव्हा. म्हणजे पुढील काही (अनेक) वर्षे हे वाढणारच आहे.
एक साधे उदाहरण आहे. मार्गशीर्षातले गुरुवारव्रत हे आता आर्थिक/सामाजिक उच्चवर्गीय महिला फारसे करीत नाहीत. उलट निम्न स्तरावर हे व्रत वाढते आहे. सत्यनारायणाच्या पूजेचेही असेच आहे. बंगालातल्या ब्रह्मसमाजाने सर्व वर्णिकांसाठी म्हणून हे व्रत तयार केले. यात होमहवन नाही, सोवळेओवळे नाही, मुहूर्त नाही, यज्ञसाहित्याचे,ऋत्विजांचे,अध्वर्यूचे, अगदी प्रसादाचेही अवडंबर नाही. धर्मकृत्यातली उच्चवर्णीयांची मिरासदारी मोडून काढण्यासाठी आणि सर्वांना कार्यात भाग घेता यावा या हेतूने हे व्रत प्रचारात आणले गेले. पण गेल्या दीडशे वर्षांत याचे पुन्हा स्तोमच माजले आहे. रोषणाईचा लखलखाट काय, ध्वनिवर्धक काय आणि जेवणावळी (वर्गणी काढून) काय. नव्याने मिळालेले हक्क ताळतंत्र सोडून भरपूर उपभोगावेसे वाटने हा नियम आहे.
असो. प्रतिसादही थोदासा पसरट आणि मूळ मुद्द्यापासून भरकटलेला झाला आहे, पण एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटला म्हणून हा प्रपंच.
लोक अधिकाधिक श्रद्धाळू का होत चालले आहेत हा प्रश्न मला पडत नाही. समाजातल्या सकारात्मक बदलाचे ते एक लक्षण वाटते.

काहीही असो....

काहीही असो प्रतिसाद खुपच आवडला.

वेल्हाळ-पाल्हाळचा हेतू

राही यांनी या लेखाच्या संदर्भात "पसरट" असे समीक्षकी विशेषण वापरले आहे.तसेल "गोष्टिवेल्हाळ" असा शब्दप्रयोगही योजला आहे.लेखनात वेल्हाळ-पाल्हाळ आहे हे खरे.त्याचा हेतू लेखन वाचनीय व्हावे हा आहे.त्रयस्थपणे विचार करता हे उद्दिष्ट अंशतः का होईना साध्य झाले असावे असे वाटते.शीर्षकापासूनच औत्सुक्य निर्मितीचा हेतुतः प्रयत्न आहे.केवळ तर्ककर्कश तात्त्विक चर्चा नीरस वाटण्याचा संभव असतो.म्हणून गोष्टिवेल्हाळ पद्धतीचा अवलंब केला.त्यात श्रद्धाळूंच्या असमंजसपणाचा प्रच्छ्न्न उपहासही आहे.अर्थात श्रद्धावंतांना हा लेख पसरट,अचरट,निरर्थक,फालतू,अवाचनीय चर्‍हाट वाटणे स्वाभाविक आहे.
२/ कुठलातरी धर्म हवाच असे राही यांनी गृहीत धरलेले दिसते.ते आवश्यक नाही.कोणताही धर्म आणि कोणताच देव नको अशी विवेकवादी विचारसणी आहे.

यनाबाबा

यनाबाबांचा विजय असो. चला, सनातनवाल्यांकडून पुन्हा एकदा तर्कट्/तर्ककर्कश्/तार्किक लोकांकडे साइट येउ लागली म्हणायची.

हॅहॅहॅ

ही आंदोलन होत असतात. शिंम्पल हार्मोनिक मोशन

बर्‍याच दिवसांनी!

यनावालांचा लेख वाचला.
फ्रेश ओल्ड वाईन इन सेम ओल्ड प्याकिंग.

साधारणतः बाप गेला, की स्वतःवरची जबाबदारी कुणावर ढकलता येतेय का, याचा विचार केला, तर देव नामक कन्सेप्ट सापडते, अन मग हिरीरीने लोक देव आहेच असे म्हणू लागतात. अन तदानुषंगे त्यांचे कनिष्ठही आमचे बाबा सांगतात 'आहे' म्हणजे असावाच, असे म्हणत 'आहे' असे म्हणू लागतात. बाबा जाइ पर्यंत तो नसावा असे बर्‍यांचदा उमगून गेलेले असते, पण बाबा गेले, की परत सायकल रिपीट होते.

नास्तीक होण्यासाठी काही लागत नाही, ते नास्तिकत्व (मरेपर्यंत) टिकविण्यासाठी जबरदस्त माज अंगी असावा लागतो, हेच खरे!

"विचारवंत" व "नास्तिक" समानार्थी नाही

आस्तिक व नास्तिक हे शब्द फक्त देवा चे अस्तित्व मान्य असणे किंवा नसणे या करताच वापरतात. "विचारवंत" या शब्दात वेगळा अर्थ आहे. अमुक एक बाबा माझा रोग बरा करू शकतील, यावर विश्वास असणे/नसणे याला आस्तिक/नास्तिक तर म्हणता येत नाही, कारण बाबा माझ्या सारखेच मनुष्य आहेत, देव नाहीत. तर असा विश्वास नसणाऱ्या व्यक्तीला मी विचारवंत हा शब्द वापरला आहे. देवावर विश्वास असणे/नसणे, व बाबा लोक, चमत्कार इत्यादिं वर विश्वास असणे/नसणे या दोन गोष्टी independent आहेत. independent गणितात वापरतात त्या अर्थाने, outcome of one does not depend on the outcome of other. कारण असे कि "देव आहे" हे संस्कार आपल्यावर ज्या वयात होतात त्या वयात आपण विचारवंत नसतो. त्या वयात जे मनात पक्के ठसले ते नंतर पुसायचे म्हटले तरी सहजा सहजी पुसता येत नाही. आज माझा कोणत्याही बाबां वर विश्वास नाही. पण जर उद्या मला काही असा दुर्धर रोग झाला कि डॉक्टरांनी "या वर आमच्या कडे उपाय नाही" असे सान्गितले, व कोणी सांगितले कि अमुक एक बाबा तुझा रोग बरा करू शकतात तर मी त्यांच्या कडे जाइन का ? (= माझ्यातला विचारवंत जिवंत राहील का ?) खात्री देता येत नाही.

राहिला प्रश्न सकाळ व 'मुक्तपीठ' चा. . . . . . त्याविरोधात कुणी कधी लिहिल्याचे (आणि ते 'सकाळ'ने छापल्याचे) माझ्या तरी बघण्यात नाही.
तुमच्या बघण्यात नाही कारण सकाळ ने तसे कधी छापलेच नाही. (कोणी लिहिले असले तरी :-) मुक्तपीठ याचे नांव बदलून "मुक्ताफळे" असे ठेवावे. देवाच्या/ देवीच्या आशीर्वादाने आपण कुठल्या संकटातून अडचणीतून बाहेर पडलो हे जाऊद्या. हे वाचक लिहीत असतात. सकाळने वर्तमान पत्राने पाठपुरावा केलेल्या या पेक्षा सुरस चमत्कारिक गोष्टी तुम्ही विसरला असाल तर त्याची आठवण करून देतो.

कोणी तरी नवीन अर्थ व्यवस्था सुचवली होती ज्यात कोणालाच कोणतेही कर भरण्याची आवश्यकता नाही. सकाळने या idea ला बरेच दिवस उचलून धरले. समर्थनार्थ सायकल वरून प्रभात फेर्या काय काढल्या. इत्यादी.

राजा मराठे नामे एकाने कृत्रिम पाउस पाडण्या करता एक "वरूण यंत्र" सुचविले. एक भट्टी पेटवायची त्यात थोडे मीठ व नौसादर टाकायचे, कि लगेचच पाउस हजर. वर त्याचे "शास्त्रीय" स्पष्टीकरण पण - मीठ व नौसादर गरम हवे बरोबर ढगात जाते व nucleation होते वगैरे. ढग किती उंचावर असतात; भट्टी मधून convection मुळे वर जाणारी गरम हवा किती उंच पर्यंत जाते; ढगात मीठ पोहोचविणे इतके सोपे आहे तर IITM विमानातून स्प्रे करण्यावर पैसे का खर्च करते; इत्यादी प्रश्न कोणालाच पडले नाहीत. अनेक दिवस अमुक अमुक गावात "वरूण यंत्र" चा प्रयोग झाला व पाउस पडला अश्या बातम्या येत होत्या. (एकदा कुणीतरी मला या बाबत विचारले असता मी त्यांना सांगितले, भट्टीत पेटवून त्यात मीठ टाकल्याने nucleation होऊन पाउस पडत असेल, तर रोज इतक्या हिंदू मृतांच्या चिता पेटतच असतात. त्यात थोडे थोडे मीठ टाकावे, म्हणजे वेगळी भट्टी पेटवायला नको. :-)

असे अनेक किस्से आहेत. हवे वर चालणारी यंत्रे तर अधून मधून येतच असतात. मराठी वर्तमान पत्रात "हवे वर चालणारी" चा अर्थ इंधन जाळून हवा गरम व under pressure करायची व त्याने piston इंजिन चालवायचे, हे कळायला मला बराच वेळ लागला.

असो, या पेपर बद्दल "काय म्या पामरे बोलावे?" माणसाने आपली पायरी ओळखून असावे हेच बरे.

आवडला

प्रतिसाद आवडला.
रोज इतक्या हिंदू मृतांच्या चिता पेटतच असतात. त्यात थोडे थोडे मीठ टाकावे, म्हणजे वेगळी भट्टी पेटवायला नको
सरणावर प्रेत व्यवस्थित जळावे म्हणून त्यावर मीठही टाकले जातेच. म्हणजे खरेतर काहीच नवीन करायला नको!

मस्तच!

लेख आवडला.

रिचर्ड फेनमन

अस्तिक नास्तिक वरुन आठवले.

From लेख

कृष्णमुर्ती पद्धत

सिलिंडर कधी येणार? लाईट गेलेले कधी येणार॑? अशा प्रश्नांसाठी ज्योतिषात कृष्ण मुर्ती पद्धत वापरतात. प्रश्नकर्त्यांने विचारलेला प्रश्न ही प्रश्नाचा जन्म मानुन ही कुंडली तयार करतात व त्या वरुन उत्तरे देतात. अजून एक सोय आहे कि प्रश्न कर्त्याने १ ते २४९ अंकापैकी एक अंक मनात धरायचा व तो सांगुन त्याची रेडीमेड कुंडली असते त्यावरुन उत्तर द्यायचे.
हा! उगाच टिंगल टवाळी म्हणुन प्रश्न विचारायचा नाही बरं का? पुर्ण श्रद्धेने विचारायचा. प्रामाणिकपणे विचारायचा.

हा हा..

मागं राशीचक्राच्या विशेष कार्यक्रमात जोतिष्य हा विषय फक्त करमणुकीचा आहे असं सुरवातीलाच सांगुन नांगी टाकणार्‍या शरद उपाध्यांना निर्मिती सांवंतांनी , 'उपाध्ये काका, नाटकाची पत्रिका कशी काढतात? माझं पुढचं नाटक यशस्वी होणार की नाही? असा लाडात येउन आपलं धूड सांभाळत प्रश्न विचारला होता. त्यावर पहिली पास-सात मिनिटे 'काका' म्हणल्याबद्दल राग व्यक्त करून काहीतरी थातुरमातुर उत्तर दिल्याचे स्मरते. :)

प्रश्न कुंडली

प्रश्न जन्मला म्हणजे त्याला कुंडली असणारच. वाळाचा जन्म सिजेरियन पद्धतीत मुहूर्त पाहून ठरवला जातो. याप्रमाणे प्रश्न कधी विचारायचा याचा वेगळा सल्ला घेण्यात यावा. त्यामुळे हवे तसे उत्तर येणारच!

लेख अतिशय आवडला. मनोरंजक तर आहेच.

प्रमोद

खूपच "प्रगत"

सिलिंडर कधी येणार? लाईट गेलेले कधी येणार॑? अशा प्रश्नांसाठी ज्योतिषात कृष्ण मुर्ती पद्धत वापरतात. प्रश्नकर्त्यांने विचारलेला प्रश्न ही प्रश्नाचा जन्म मानुन ही कुंडली तयार करतात व त्या वरुन उत्तरे देतात.

हे मला माहीत नव्हते. भविष्य वर्तन हा प्रकार मला वाटला त्यापेक्षा खूपच "प्रगत" आहे. मग याच प्रकारे, आज दाल-माखनी मस्त होणार का या प्रश्नाचे उत्तर पण देता येत असेल? फक्त एवढेच ठरवायचे आहे कि आजच्या दाल माखनीची जन्म वेळ काय धरायची. काल डाळ भिजत घातली ती का पाच शिट्ट्या झाल्या नंतर कुकर चा गस बंद केला ती. बाळाचा जन्म सिजेरियन पद्धतीने मुहूर्त पाहून ठरवून त्याचे भविष्य उज्ज्वल करता येते, ही पण छान माहिती आहे. ज्या क्षणी मारेकर्याने गोळी झाडली तो क्षण म्हणजे "खुनाचा जन्म" असे मानून मारेकरी निर्दोष सुटेल का याचे पण प्लान्निंग करता येत असावे? बिच्चारा पिस्तोरीयस, त्याने मुहूर्त न बघताच खून केला व आता पास्तावातोय.

आस्तिकचे नास्तिक होतील

नमस्कार यनावालासर, ब-याच दिवसांनी आपला लेख वाचला.

तुमचे लेख वाचून किती लोक आस्तिकचे नास्तिक होतील हे मला माहीत नाही पण बरेच लोक त्यांचा जो कोणी देव आहे ज्याने त्यांना दिलेल्या डोक्याचा ते वापर करू लागतील एवढ नक्की आणि हे ही नसे थोडके.

तुम्ही आपले लेख जास्तीत जास्त site वर प्रकाशित करावे ही विनंती जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनापर्यत तुमचे लेख पोहचावेत.

आपल्या लेखनचा एक चाहता.

धन्यवाद!

श्री.निलु लिहितात,"तुम्ही आपले लेख जास्तीत जास्त site वर प्रकाशित करावे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनापर्यत तुमचे लेख पोहचावेत."

हा लेख अन्य कोणत्याही संस्थळावर दिलेला नाही. श्री.निलु यांच्या सूचने अनुसार आता तो दुसर्‍या साईटवर टाकीन.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

धन्यवाद

यनावालासर, धन्यवाद माझया विनंतीला मान दिल्याबददल.

 
^ वर