'डार्विन' ची वंशावळ

मानवाच्या उत्क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्कांचे फवारे गेली कित्येक वर्ष ' बुद्धीजीवी ' लोक उडवत आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय झालेले आणि बहुतांशी सर्वांनी मान्य केलेले तर्क म्हणजे "डार्विन चे सिद्धांत" !!! डार्विनच्या या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, " या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात". या नियमाला इंग्रजीमध्ये "Natural Selection" असे संबोधण्यात येते. यानुसार, नैसर्गिक बदलांना स्वीकारून या पृथ्वीवरील अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक प्राण्याच्या शरीररचनेत घडलेल्या बदलाचे सबळ पुरावेही शास्त्राकडे आहेत.

एकोणिसाव्या शतकात याच सिद्धांताचा आधार घेवून एका नव्या विचारसरणीने डोके वर काढले आणि ती म्हणजेच "सोशल डार्विनीझम ". हर्बर्ट स्पेन्सर या एका ब्रिटीश तत्वावेत्याने डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या जीवशास्त्रिय सिद्धांतांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने मांडले. या सिद्धांतानुसार "जो मनुष्य शक्तिशाली असेल तो नेहमीच कमजोर माणसांवर कुरघोडी करणार" असा अन्वयार्थ काढला गेला. याच तत्वाला त्याने " Survival of the fittest" असे नाव दिले. डार्विनच्या नियमाची अश्या चुकीच्या पद्धतीने केली गेलेली अर्थउकल म्हणजे जागतिक पातळीवर मानवी नैतिक मूल्यांना दिले गेलेले एक आवाहनच होते. ही व्याख्या पहिली तर आपल्या असेल लक्षात येईल की येथे मानवी नितीमुल्यांना काडीचेही महत्व नाही. ज्याच्याकडे आर्थिक आणि राजकीय बळ असेल तोच "शक्तिशाली" आणि इतर सगळे "कमजोर". सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, नाझी लोकांनी हिटलरच्या नेतृत्वाखाली केलेला अमानवीय नरसंहार म्हणजे "सोशल डार्विनीझम " चा एक भाग होता असे शास्त्रीय समर्थन देखील नाझी लोकांकडून केले गेले होते. सोशल डार्विनिझमचे असे अंधानुकरण करणार्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की खुद्द डार्विन ने सुद्धा त्याच्या सिद्धांतांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मापदंडापर्यंत ताणले नव्हते. डार्विनचे सिद्धांत हे फक्त या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी जीवजंतूंनी आपल्या शरीर रचनेत कसे बदल केलेत यांवर आधारित होते. ते फक्त जगण्याचे शास्त्र होते. इथे कुठेही उच्चभ्रू राहणीमान, कृत्रिम गोष्टींचा हव्यास, गरजेपेक्षा अधिक साधन संपत्तीचा हव्यास अशा संकल्पनांचा विचार नव्हता. जी समाजव्यवस्था संस्कृती आणि नितीमुल्यांवर उभी राहिलेली असते तेथे "सोशल डार्विनीझम " सारख्या काल्पनिक आणि तथ्यांवर आधारित नसलेल्या संकल्पनांना थारा नसतो. याचाच अर्थ असा की आजपर्यंत मानवी इतिहासात निरागस लोकांवरील केले गेलेले अमानुष अत्याचार म्हणजे निसर्गाचा नियम होते असा तर्क लावणे मूर्खपणाचे ठरेल.

आजची भारतीय व्यवस्था पाहून जर "सोशल डार्विनीझम " आणि भारत या दोन्हीचा एकत्र विचार केला तर या संकल्पनेचा जन्म भारतातच झाला होता की काय असा संशय आल्याशिवाय राहणार नाही. एक चाचणी म्हणून आपण जर ""सोशल डार्विनीझम " ची वरील व्याख्या घेतली आणि आपल्या आजूबाजूच्या समाजात चाललेल्या गोष्टीशी याचा संबंध लावला तर असे लक्षात येईल की या डार्विनच्या वंशावळीने अक्षरश समाजात हैदोस माजवला आहे. आपल्या भारतीय व्यवस्थेत तर हा सिद्धांत अगदी तंतोतंत पाळला जातो यात कुणाचेही दुमत असू शकत नाही. दादा, भाऊ, साहेब, भाई, डॉन ई. शक्तिस्थान मुजोर भांडवलशहांच्या आर्थिक पाठबळावर भारतीय व्यवस्थेची लक्तरे उघड्यावर पाडण्यात गुंग आहेत. भारतातील "सोशल डार्विनीझम" चे ठळक उदाहरण म्हणजे भारतात रुजलेली जातीव्यवस्था आणि त्यालाच जोडून आलेला 'जातीभेद' . या जातीव्यवस्थेत अशा कितीतरी पूरक गोष्टी आहेत ज्या सोशल डार्विनीझमचा उघडपणे पुरस्कार करतात (उदा. उच्च-नीच, स्पृश-अस्पृश, इ. ). जातीभेदाला धर्मांमध्ये सुद्धा कुठलेही तर्कशुद्ध स्पष्टीकरण नसतांना केवळ सामाजिक व्यवस्था नियोजनाच्या नावाखाली वेगवेगळ्या जातीमध्ये समाजाला विभागून एका प्रकारे 'शक्तिशाली' आणि 'कमजोर' गट तयार करण्याचा मोठा 'कटच' या व्यवस्थेत शिजला होता की काय अशी शंका येते. यासाठी ठराविक समाजाला शिक्षण, पैसा, युद्धनीती, इ. गोष्टींपासून कितीतरी वर्षे दूर ठेवले गेले. जातीव्यवस्था हा आपल्या भारतीय व्यवस्थेला लागलेला एक मोठा कलंक आहे हे आता जवळपास सिद्धच झालेले आहे. याच धर्तीवर नितीमुल्याची रचना करतांना सुद्धा पारदर्शकतेचे निकष पाळले गेलेले दिसत नाहीत. स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान देवून 'कमजोर' गटात भर घालण्याचे काम केले गेले. शिक्षणापासून दूर ठेवलेल्या समाजाच्या बौद्धिक क्षमतेचा विकास न झाल्यामुळे त्याचा कल साहजिकच अंधश्रद्धा, गुन्हेगारी आणि उच्च समाजाने घालून दिलेल्या पोकळ रूढी आणि परंपरांकडे वळू लागला. या गोष्टीचा एक हत्यार म्हणून वापर करून 'शक्तिशाली' समाजाने 'कमजोर' समाजावर अत्याचार सुरु केले. आणि मग साहजिकच या स्वतला "शक्तिशाली" म्हणवून घेणाऱ्या गटाकडे आर्थिक आणि राजकीय प्रभुत्व आले आणि कमजोर समाज कायमस्वरूपी गरिबीच्या, निरक्षरतेच्या खाणीत ढकलला गेला. या अर्थाने कमजोर गटाच्या व्यवस्थेला तो स्वतः नाही तर ती व्यवस्था बहुतांशी जबाबदार असते. आणि म्हणून "सोशल डार्विनीझम" ही संकल्पना नैसर्गिक नसून कृत्रिम आहे हे सिद्ध होते आणि याच मुळे "सोशल डार्विनीझम" ही एक संकल्पना नसून ती एक कुप्रवृत्ती आहे असे येथे अधोरेखित करावेसे वाटते.

खऱ्या अर्थाने " सोशल डार्विनीझम " ह्या विचारप्रणालीचा उगम पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. आणि त्याची सर्वाधिक झळ ही त्या देशातील कृष्ण-वर्णीय (Black) लोकांना बसली. भांडवलशाहीच्या भस्मासूराने त्या त्या देशातील मजुरांवर अतोनात अन्याय केले. आपण केलेले हे अन्याय म्हणजे निसर्ग नियमाचाच एक भाग आहे अशी कोल्हेकुई केली जावू लागली. बहुतांश कारखानदारी व्यवसायांमध्ये कृष्णवर्णीय मजूरच असत. पाश्चिमात्य देशांमध्ये जातीव्यवस्था जरी अस्तित्वात नसली तर तितक्याच तोलामोलाची आणि अमानवीय व्यवस्था आणि ती म्हणजे 'वर्णभेद' आणि "वंशभेद" आधीच आपले बस्तान बांधून बसली होती. या व्यवस्थेमुळे कृष्णवर्णीय लोकांना मूळ प्रवाहात सामावून न घेता खऱ्या अर्थाने शिक्षण, पैसा आणि सामाजिक प्रगती यांपासून दूर ठेवले गेले. या गोष्टीचा थोडक्यात आढावा प्रसिद्ध शास्त्रज्ञ "कार्व्हर" यांनी आपल्या "एक होता कार्व्हर" या पुस्तकात मांडला आहे. आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता तिथेही पुन्हा एकदा धार्मिक स्पष्टीकरणाचा आधार घेतला गेला. कुठल्याही धर्माचा मुळ इतिहास पहिला तर हे लक्षात येईल धर्माचा उगम हा मानवी नीतीमूल्यांची जपणूक करण्यासाठी आणि त्यातूनच चांगला समाज घडविण्यासाठी झाला होता. असे असताना सुद्धा धर्मांचे अस्तित्व टिकविण्याच्या नावाखाली त्यातील मुलभूत संकल्पांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. आजची ढासळलेली समाजव्यवस्था हे त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे. आणि मग या अश्या व्यवस्थांमध्ये जगतांना पोटाच्या भूकेपुढे नीतीमूल्यांची कवाडे कधी गळून पडतात हे कळत सुद्धा नाही. आणि मग हळू हळू हा समाज गुन्हेगारीकडे वळू लागतो. आफ्रिकन देशांमधील वाढते गुन्हेगारीकरण हे याचेच द्योतक आहे. आधुनिकीकरणाचे कवाडे उघडी करून देणाऱ्या आणि मुक्त विचारसरणीचा पुरस्कार पाश्चिमात्य मुलुखांमध्ये आजही वर्णभेद आणि वंशभेदाची भुते कधी कधी डोकी वर काढतांना दिसतात. तरी देखील पाश्चिमात्य देश या समस्सेतून काही प्रमाणात बाहेर पडलेले दिसतात. पण भारतात खोलवर रुजलेल्या जातिव्यवस्थेमुळे भारतीय समाज आजही त्याची झळ सोसत आहे.

वरील काही परिच्छेदामध्ये आपण विविध व्यवस्थेमध्ये " सोशल डार्विनीझम " ने कसा शिरकाव केला आहे हे पहिले. पण " सोशल डार्विनीझम " ही केवळ एक विचारप्रणाली नसून ती एक प्रवृती आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. या प्रवृतीच्या माणसांमध्ये कुठल्याही मार्गाने जिंकण्याची इच्छा इतकी प्रबळ असते की त्यासाठी ते सर्व नितीमुल्यांना चिरडून पुढे जातात. आपल्याला असे कितीतरी लोक समाजात उघडपणे वावरतांना दिसतील. अशी लोक गुन्हेगारी प्रवृतीने वागून एका प्रकारे कृत्रिम 'कमजोर' गट तयार करण्यात अहोरात्र गुंतलेली असतात. याठिकाणी कमजोर म्हणजे खऱ्या अर्थाने कमजोर नसून नितीमुल्यांवर विश्वास ठेवून त्या प्रमाणे वागणारा समाज असतो. आणि खऱ्या अर्थाने अशा नितीमुल्याशी चिकटून राहिलेल्या समाजावरच कुठलीही सामाजिक व्यवस्था सशक्तपणे उभी राहते. ज्या समाजात नितीमुल्यांचे प्रभुत्व ऱ्हास पावत चाललेले आहे तो समाज कधीही सर्वांगाने सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ शकत नाही.

या अशा सगळ्या व्यवस्था आणि प्रवृत्ती अप्रत्यक्षरित्या "सोशल डार्विनीझम" चे समर्थन करतांना दिसतात. आणि जेव्हा या सगळ्या अमानवीय कृत्यांना धार्मिक आधार देवून समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तेव्हा या नितीमुल्य शिकविणाऱ्या ढोंगी धर्मांची कीव येते. कोणत्याही धार्मिक साहित्यामध्ये लिहिल्या गेलेल्या जातीभेद, वंशभेद, वर्णभेद इ. भ्रामक संकल्पांना खरच जर दस्तुरखुद्द देवाने लिहिले असेल तर "देवाने ही अक्षम्य चूक केली आहे" हे म्हणण्याचे धाडसही येथे करावेसे वाटते. नितीमुल्यांवर आधारित धार्मिक व्यवस्थांना "सोशल डार्विनीझम" चे डोहाळे लागल्यामुळे संपूर्ण धार्मिक व्यवस्थाच मोडीत निघाली.

या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी पुन्हा एकदा काळानुरूप बदललेल्या सामाजिक व्यवस्थेनुसार नितीमुल्यांवर आधारीत समाजव्यवस्थेची नव्याने बांधणी करणे आवश्यक आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

बळी तो कान पिळी

बळी तो कान पिळी ही म्हण बरीच जुनी आहे. तेव्हा सोशल डार्विनिझम वगैरे भानगड नव्हती. शोषक व शोषित यांची साखळी अनेक क्षेत्रात दिसते. ती थांबेल अस वाटत नाही. पण आपण म्हणता तसे या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी पुन्हा एकदा काळानुरूप बदललेल्या सामाजिक व्यवस्थेनुसार नितीमुल्यांवर आधारीत समाजव्यवस्थेची नव्याने बांधणी करणे आवश्यक आहे या मताशी सहमत आहे. सर्वेपि सुखिनः संतु हे शक्य नसले तरी जास्तीत जास्त लोकांनी सुखी व्हावे असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. असो.
उपक्रमावर आपले स्वागत.

सामाजिक नितीमूल्ये

सर्वप्रथम उपक्रमवर स्वागत. लेखाची मांडणी आवडली.

सामाजिक नितीमूल्ये या फक्त गप्फा वाटतात. सबळांनी नितीमूल्ये पाळावी अशी दुर्बळांची इच्छा असते इतकेच. पारडे बदलले की मूल्येही बदलतात आणि नितीही. सवडीने नंतर.

ह्याला काही अर्थ नाही

एकोणिसाव्या शतकात याच सिद्धांताचा आधार घेवून एका नव्या विचारसरणीने डोके वर काढले आणि ती म्हणजेच "सोशल डार्विनीझम ". >> ह्याला काही अर्थ नाही. चंगेजखान, तिमुरलंग, अरबी रानटी टोळ्यांना कोणी शिकवला होता "सोशल डार्विनीझम ".?

नाही

चंगेजखान, तिमुरलंग, अरबी रानटी टोळ्यांना कोणी शिकवला होता "सोशल डार्विनीझम "

पण अशा गोष्टींना एक (कितीही ठिसूळ) तात्विक बैठक आली की कितीही अयोग्य असलं तरी डिफेंड करणं जड जातं.

अर्थ

प्रथम आपले खूप खूप धन्यवाद. माझ्या पहिल्या वहिल्या लेखावर आपण प्रतिक्रिया दिलीत. आपले म्हणणे रास्त आहे. पण आपण जर हा लेख जर काळजीपूर्वक पाहिला ते लक्षात येईल कि येथे जात , धर्म इ वरही भाष्य केले आहे. पूर्वीच्या काळात धर्मांचा आणि आजच्या काळात विज्ञानाचा आधार घेवून हि स्वयंघोषित "शक्तीथान" आपली पोळी भाजून घेत आहेत. "सोशल डार्विनीझम" हि संकल्पाना त्या अर्थाने आपल्या नकळत सर्वांमध्ये रुजलेली जाणवते. चंगेजखान, तिमुरलंग, इ. नि केलेले अत्याचार याचाच एक भाग होते...

विज्ञानातील सिद्धांत विज्ञानाच्या जगातच ठेवावेत

या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात". . . . . . . डार्विनचे सिद्धांत हे फक्त या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी जीवजंतूंनी आपल्या शरीर रचनेत कसे बदल केलेत यांवर आधारित होते.

डार्विनचा सिद्धांत समजण्यात आपल्या काही चुका झालेल्या आहेत. मनुष्य सोडून कोणताही जीव -प्राणी आपल्या शरीर रचनेत बदल घडवून आणू शकत नाही. जसे, जिराफ आपली मान उंच करण्या करता काहीही करू शकत नाही. पण जरी कोणी असे बदल घडवून आणले तरी ते पुढच्या पिढी कडे जात नाहीत. विज्ञानाच्या भाषेत acquired traits (म्हणजे घडवून आणलेला बदल) can not be inherited. प्रख्यात शास्त्रज्ञ आईझक असिमोव याने त्याच्या Guide To Sciences या पुस्तकात दिलेले छान उदाहरण - काही धर्मांत सुंता करण्याची प्रथा आहे पण हजारो वर्षे तसे करून सुद्धा नवीन पिढी जन्माला येते तेंव्हा ती सुन्ता झालेली जन्माला येत नाही.
पण काही वेळा reproductive process मध्ये चूक होते (mutation) व जन्माला येनार्या प्राण्यात काही तरी वेगळे असते. जर हे "काही तरी वेगळे" असे असेल ज्याने तो प्राणी जगायला कमजोर आहे तर त्याचे वेगळे पण जोपासले जात नाही कारण निसर्गात जगणे सोपे नसते. बहुतेकदा तो प्राणी reproductive वयाला पोहोचायच्या आतच मरून जातो. परत आईझक असिमोव याने दिलेले उदाहरण - सिकल सेल अनिमिया, थेलेसेमिया, इत्यादी प्रकारचे दोष असलेला प्राणी जन्माला आला तर तो लौकरच मरून जातो. साधा रन्गान्ध (कलर ब्लाइन्ड) असलेला प्राणी फार काळ जगू शकत नाही, कारण आपले भक्ष्य, व आपला भक्षी , दोन्ही ओळखण्या करता रन्ग महत्वाचे आहेत. मनुष्यच फक्त त्यांना कृत्रिम उपायांनी जिवंत ठेवून ते दोष pass on होउ देतो.

पण जर "काही तरी वेगळे" बदल त्या प्राण्याला जगायला जास्त सक्षम करत असेल तर दोन गोष्टी होउ शकतात. जर मूळ प्रजाती व बदल असलेली प्रजाती एकाच environmental niche करता compete करत असतील तर मूळ प्रजाती नामशेष होते व त्याची जागा जास्त सक्षम नवीन प्रजाती घेते. पण जर नवीन प्रजातीला दुसरी unoccupied environmental niche सापडली तर दोन्ही प्रजाती जगतात. हे सगळे निसर्गात आपोआप होत असते, म्हणून तर त्याला natural selection असे म्हणतात. घडवून आणले तर ते artificial selection होईल. हे सर्व 'बुद्धीजीवी' लोकांनी उडविलेले तर्क-वितर्कांचे फवारे नसून विज्ञान आहे. व याला "सर्वात लोकप्रिय" हे विशेषण पण चुकीचे आहे. संगीत, पोशाख, खाद्य पदार्थ इत्यादींचे प्रकार लोकप्रिय किंवा un-लोकप्रिय असू शकतात. विज्ञानातील सिद्धांत हे at any given time मान्य असतात किंवा under discussion असतात.

हे सर्व लिहिण्याचे कारण असे कि याचा संबंध तुम्ही पुढे जे काही लिहिले आहे त्यात अनेकदा येतो. जसे, आपण केलेले हे अन्याय म्हणजे निसर्ग नियमाचाच एक भाग आहे अशी कोल्हेकुई केली जावू लागली. in a sense अगदी बरोबर, ही कोल्हेकुईच म्हणावी लागेल कारण जे मनुष्याने केले ते निसर्ग नियमाचा भाग असूच शकत नाहीत. म्हणून "केलेले" व "घडलेले" यातला फरक maintain करणे जरूरी आहे. मनुष्याने केलेल्या अन्यायांचा डार्विनच्या सिद्धांतान्शी काहीही संबंध नाही. त्याला कोणी सोशल डार्विनीझम वगैरे लेबल चिकटविल्यास ते चुकीचे आहे. विज्ञानातील सिद्धांत विज्ञानाच्या जगातच meaningful असतात. ते त्या context च्या बाहेर वापरू नयेत.

पाश्चिमात्य देशांमध्ये जातीव्यवस्था जरी अस्तित्वात नसली तर तितक्याच तोलामोलाची आणि अमानवीय व्यवस्था आणि ती म्हणजे 'वर्णभेद' आणि "वंशभेद" आधीच आपले बस्तान बांधून बसली होती.
मान्य. पण सांभाळून. हेच मी नुकतेच दुसर्या धाग्यात लिहिले होते. मुद्दा तोच होता जो तुम्ही लिहिला आहे, फक्त शब्द वेगळे. लोकशाही, मानवी हक्क इत्यादी संकल्पना समाजात येण्या आधी, कुठलातरी parameter वरून आपला एक गट बनवून समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करणे हे सर्वच धर्मात व संस्कृतीत होते व आज पण आहे. मी लिहिले तेंव्हा मला "हे लॉजिक वेडगळपणाचे आहे. . . . स्वच्छता करायला सांगितली तर शेजारच्या घरातला संडास धुवायला आपण धावत नाही. सुरुवात स्वतःपासून होते." वगैरे ऐकविण्यात आले. तेन्व्हा, सांभाळून.
नितीमुल्य शिकविणाऱ्या ढोंगी धर्मांची कीव येते. Excellent, 'र्मा' वर अनुस्वार आहे, म्हणजे बहुवचनी. म्हणून no arguments.

तुमचे दोन मुद्दे मात्र अमान्य. एक, जाता येता भांडवलशाहीला लाथा. आज पाश्चिमात्य देशात जी social support यंत्रणा आहे, किंवा welfare state आहे, ते फक्त भांडवलशाही मुळेच शक्य आहे. भांडवलशाही नाकारलेल्या कोणत्याही देशाला ते जमलेले नाही. आपण सुद्धा आता थोडे फार social sector spending करू शकतो, जसे रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा योजना, कर्ज माफी इत्यादी, ते १९९२ पासून अवलंबिलेल्या आर्थिक उदारीकरणा मुळेच. त्या आधी ते शक्य नव्हते. दुसरे, स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान देवून 'कमजोर' गटात भर घालण्याचे काम केले गेले. आपल्या पुरते अमान्य. पण या करता एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

काही शंका???

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि आजही चारच वर्ण अजूनही अस्तित्वात आहेत ते पुढील प्रमाणे १) नोकरी=शुद्र, २) धंदा=वैश्य, ३) राजकारण=क्षत्रिय व ४) समाजकारण=ब्राम्हण काही शंका???

शंकेचे निरसन

प्रथम आपले खूप खूप धन्यवाद. माझ्या पहिल्या वहिल्या लेखावर आपण प्रतिक्रिया दिलीत. आपले म्हणणे रास्त आहे. पण आपल्या शंकेला माझे एकच उत्तर असेल कि कुठला मार्ग निवडावा याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला असावे. त्यावर कुठल्याही नियमांचे (उदा. जात, धर्म, वर्ण इ. ) बंधन नसावे. हे बंधन पूर्वी जर जास्त प्रमाणात असल्यामुळे तितकेसे स्वतंत्र मिळाले नाही...इतकेच ......आपले पुनश्च धन्यवाद !!!

इतिवाक्य पटण्यासारखे, पण प्रवाहात नाही

स्वागत आहे.

हे इतिवाक्य ढोबळमानाने पटण्यासारखे आहे :

या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी पुन्हा एकदा काळानुरूप बदललेल्या सामाजिक व्यवस्थेनुसार नितीमुल्यांवर आधारीत समाजव्यवस्थेची नव्याने बांधणी करणे आवश्यक आहे.

परंतु उर्वरित निबंधाशी काहीसे असंबद्ध वाटते.

वर्णभेदाचा आणि वंशभेदाचा (चुकीचा) संबंध डार्विनच्या सिद्धांताशी लावतात, हे खरे आहे. परंतु हा संबंध लावणार्‍या लोकांचा हेतू सद्यस्थितीबाबत समाधान वाटणे, असा असतो. वंशभेद आणि वर्णभेद निर्माण होण्याकरिताच्या ऐतिहासिक आणि सामाजिक घडामोडी कित्येक शतकांपूर्वीच्या आहेत. "सोशियल डार्विनिझम" शब्दाचे आणि कल्पनेचे फॅड होण्याआधीच्या आहेत. अन्यायकारक भेदभाव असण्याकरिता या शब्दांची आणि संकल्पनेची गरज नाही.
- - -
> कुठल्याही धर्माचा मुळ इतिहास पहिला तर हे लक्षात येईल धर्माचा उगम हा
> मानवी नीतीमूल्यांची जपणूक करण्यासाठी आणि त्यातूनच चांगला समाज
> घडविण्यासाठी झाला होता.
याची उदाहरणे देता येतील काय? धर्मग्रंथांच्या अंतर्गत उगम "अतिमानवी संदेश" अशा प्रकारचा पुष्कळदा दिसतो. म्हणजे बायबल किंवा कुरान हे त्या-त्या धर्मातल्या देवाने प्रेषितांना दिलेले आहेत. वैदिक संहिता अपौरुषेय किंवा दिव्यदृष्टी असलेल्या ऋषींनी रचले असे धर्मा-अंतर्गतचे मत आहे. धर्मग्रंथांच्या अंतर्गत वैयक्तिक अमृतत्वाकरिता निर्देश दिलेले असतात. अमृतत्वाच्या मानाने समाज हा क्षणभंगुर आहे.
आता अनेक धर्मांचा "बाहेरून" तौलनिक अभ्यास केला तर धर्म मानवनिर्मित आहेत, आणि ऐहलोकिक हेतूंनी उत्पन्न झाले असे म्हणता येईल. परंतु अगदी बंडखोर धर्म सुद्धा निर्मितीच्या काळी "मानवी नीतिमूल्यांची जपणूक करण्याकरिता उपजले" अशी उदाहरणे थोडीच सापडतील.
(कदाचित बौद्ध धर्म - त्यातल्या त्यात थेरवादी - अपवाद म्हणून सांगता येईल. अमृतत्वाबबत उदासीन आहे, आणि ऐहलोकिक नीतिमूल्यांबाबत निर्देश देतो. पण हा एक अल्पसंख्याक धर्म आहे.)

वर्ण, जात, धर्म...

वर्ण, जात, धर्म... समाज व्यवस्था जन्मावर नसुन कर्मावर आधारीत आहे. खरे तर हिंदू नावाचा धर्मच मुळचा नव्हता काही लोकांनी तो निर्माण केला. आजही दोनच धर्म आहेत. एक स्त्रि व दुसरा पुरुष, नाटक बस झाले. आजच्या सामजाने हे मान्यही केले आहे.
कोणाला कोण कोणत्या गोष्टींपासून वंचित करायचे? हा प्रश्नच नाही. या करता एक स्वतंत्र लेख लिहीला आहे.

डार्विन सगळा च पटत नाही

मी जरी नास्तिक असलो तरी डार्विन सगळाच्या सगळा पटत नाही.

नुस्त्या रसायनांनी भरलेल्या ग्रहा वर, अगदि कोटीच्या कोटी वर्ष गेली तरी एक पेशीय जीव तयार होईल हे पटत नाही. जरी अगदी चुकुन माकुन असे काही तयार झाले तर त्या एकपेशिय जीवाला दुसरा जीव तयार करावा असे का वाटावे.

जिराफाची मान उंच का ह्याचे डार्विन चे उत्तर अजिबात पटत नाही. तसे असते तर जिराफ आणि छोटे मान असलेले प्राणी ह्यांच्या मधले पण प्राणी तयार झाले असते.
आणि जिराफाची मान उंच होयला लाखो वर्ष लागणार असतील तर तेव्हड्या काळात ते अन्न न मिळाल्या मुळे extinct नसते का झाले?
ह्या जगात कित्येक चमत्कारीक प्राणी आहेत, जसे कांगारु, ते तसे का झाले ह्याचे उत्तर डार्विन कडे नाही.

आपले शरीर बघा, त्यात लाखो छोटी छोती यंत्र आहेत, ती आपोआप तयार होण्याचे काही कारण दिसत नाही.

चेतन शी सहमत

भांडवलशाही ला जाता येता शिव्या घालण्याची जगातल्या सगळ्या समाजवाद्यांना सवय आहे. त्यांच्या कडे दुसरा कुठला पर्याय आहे? जो पर्यंत दुसरा पर्याय सिद्ध होत नाही तो पर्यंत भांडवलशाही हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
जर भांडवलशाही नीट चालत नसेल तर त्याचे मुळ कारण त्या त्या समाजाच्या समाज व्यवस्थेत आणि जनतेत आहे. समाजातले दोष कमी केले की भांडवलशाही सारखा उत्तम पर्याय नाही.

उदाहरणार्थ - विजय मल्ल्या सारखी उदाहरणे हे भांडवलशाही चे failure नसुन भारतातल्या Lowlessness चे उदाहरण आहे.

ताकाला जाताना भांडे लपवणे

श्री.संदीप यांचे उपक्रमवर स्वागत. लेख वाचल्यावर प्रकर्षाने जाणवले की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय औद्योगिक चित्रात एका विविक्षित समाजाच्या लोकांची असलेली मगरमिठी लेखकाला खुपते आहे.परंतु त्यावर थेट लिहिण्याऐवजी त्याने जडबंबाल नवे शब्द निर्माण करून अपरोक्ष लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बिचार्‍या त्या डार्विनला कशाला हो मधे आणत आहात?

कोणत्याही समाजात कोणत्याही काली असा एक गट असतोच की जो समाजातील आपल्या स्थानाचा गैरफायदा घेऊन आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यात विशेष असे काही नाही. कालानुरुप हेही दिवस जातील व सध्याच्या वर्चस्व गाजवणार्‍या समाजाच्या जागी दुसरे कोणी लोक येतील.

अघोरी समर्थन

प्रिय चंद्रशेखर जी , प्रथम आपण आली प्रतिक्रिया नोंदाविल्याबद्दल धन्यवाद ...आपण नमूद केलेले निरीक्षणं चुकीचे वाटते. हे चित्रण फक्त महाराष्ट्रापुरते आहे हे साफ चुकीचे आहे. लेख पुन्हा वाचवा हि विनंती. आणि आज हे दिवस जातील आणि दुसरे दिवस येतील म्हणजे जे सर्व चालले आहे ते बरोबर आहे असा अर्थ कृपया मुळीच काढू नये. या अर्थाने सर्व काही आहे ते बरोबर आहे असे अघोरी समर्थन कृपया करू नये...आणि राहिला विषय "मगरमिठी" चा तर ती आपल्या समाज व्यवस्थेची झालेली घसरण पाहून लगेच लक्षात येईल...डार्विन ला मध्ये का आणले आहे याचे उत्तरही लेखातच आहे...

समर्थन

तुमच्या लेखात जरी तुम्ही देशाबद्दल लिहिता आहात असे तुमचे म्हणणे असले तरी लेख वाचल्यावर तो महाराष्ट्रासाठीच आहे असे मला तरी वाटले. असो. आणि महाराष्ट्रात आहे तेच देशात घडते आहे. मी सध्या चालले आहे त्याचे समर्थन करत नसून मानव समाज करून एकत्र राहिल्या लागल्या पासून जे सतत घडत आहे तेच सध्याही चालूही आहे एवढेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.

तुम्ही नास्तिक का श्रद्धाळू ते एकदा नक्की ठरवा

मी जरी नास्तिक असलो तरी डार्विन सगळाच्या सगळा पटत नाही. नुस्त्या रसायनांनी भरलेल्या ग्रहा वर, अगदि कोटीच्या कोटी वर्ष गेली तरी एक पेशीय जीव तयार होईल हे पटत नाही.

नास्तिक असण्यात काही पुरुषार्थ नाही, व देवावर श्रद्धा असण्यात काही लाजिरवाणे नाही. पण एकादी व्यक्ती नास्तिक असते तरी किंवा नसते तरी. धर्म या सन्कल्पनेची टीका करायची असल्यास तुम्ही नास्तिक, डार्विनच्या थियरीची टीका करायची असल्यास "कोणी तरी आहे, त्या शिवाय का हे प्राणी निर्माण झाले" म्हणायचे, असला दुटप्पीपणा राजकारण्यांनाच शोभतो (निवडणूक फॉर्म भरण्या पासून ते शपथविधी सर्व मुहूर्त पाहून करायचे, व अंधश्रद्धा निर्मूलनच्या पण समर्थनात बोलायचे) असे नका करू. एक तिसरा पर्याय असा पण आहे - "तसा मी नास्तिकच आहे. पण समजा देव असलाच तर उगाच रिस्क नको. म्हणून शुक्रवारी मी एक पोथी वाचून पूजा करतो. इतर वेळी मात्र नास्तिक असतो", हे पण चालेल. पण काय ते नक्की ठरवा.

मानव व इतर पण सर्व प्राणी डार्विनच्या उत्क्रांतीच्या थियरी प्रमाणे निर्माण न होता कोण्या super being ने design करून निर्माण केले असतील तर तो designer अगदीच incompetent आहे असे म्हणावे लागेल. (design as in engineering design, NOT aesthetic design) काही ठळक design flaws खाली देत आहे.

१: दांत काढायला गालाला चीर द्यावी लागत नाही व दांत काढून झाल्यावर गालाला टांके घालावे लागत नाहीत. आ आ केला, दांत काढला, तोंड मिटले. झाले. तसेच पोटाचे पण हवे होते. अपेंडिक्स काढायला पोट फाडण्याची गरज न पडता पोटाला तोंडा सारखे समोरून उघडण्याची सोय हवी होती.

२: खर म्हणजे सर्वच अवयव easily reachable हवे होते.

३: spinal कॉलम चे design फारच अकार्यक्षम आहे, ज्या मुळे कंबर दुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पोन्डीलायटीस एवढेच नव्हे तर पराप्लेजिया पण होतात. यात सुधारणेला खूपच वाव आहे. जसे दंत काढून सहज कवळी लावता येते तसे डिस्क पण सहज काढली-लावली अशी सोय हवी होती.

४: तोल सांभाळण्याची यंत्रणा मध्य कानात काय ठेवली आहे? काहीही रिपेयर करता येत नाही. विमानाचा Gyroscope व ऑटो पायलट बघा कसा easily reachable असतो.

५: front wheel drive कारचा समोरच्या चाकाचा joint किंवा rear wheel drive कारच्या propellar शाफ्टच्या universal joint चे design हे गुढग्याच्या joint च्या design पेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे.

६: मला रोज सकाळी दाढी का करावी लागते? चेहेर्याच्या केसांना disable करण्याची सोय का नाही?

इतर पण काही महत्वाचे सुझाव आहेत, पण public forum वर लिहिता येण्या सारखे नाहीत. पण एक मात्र नक्की, कोणत्याही प्राण्याच्या शरीराचा इंजीनियरींग design च्या अंगाने विचार केला तर डार्विनच्या थियरी वर चटकन विश्वास बसतो.

माझे काय ते पक्के ठरलेले च आहे

<<नास्तिक असण्यात काही पुरुषार्थ नाही, व देवावर श्रद्धा असण्यात काही लाजिरवाणे नाही. पण एकादी व्यक्ती नास्तिक असते तरी किंवा नसते तरी. धर्म या सन्कल्पनेची टीका करायची असल्यास तुम्ही नास्तिक, डार्विनच्या थियरीची टीका करायची असल्यास "कोणी तरी आहे, त्या शिवाय का हे प्राणी निर्माण झाले" म्हणायचे, असला दुटप्पीपणा राजकारण्यांनाच शोभतो (निवडणूक फॉर्म भरण्या पासून ते शपथविधी सर्व मुहूर्त पाहून करायचे, व अंधश्रद्धा निर्मूलनच्या पण समर्थनात बोलायचे) असे नका करू. एक तिसरा पर्याय असा पण आहे - "तसा मी नास्तिकच आहे. पण समजा देव असलाच तर उगाच रिस्क नको. म्हणून शुक्रवारी मी एक पोथी वाचून पूजा करतो. इतर वेळी मात्र नास्तिक असतो", हे पण चालेल. पण काय ते नक्की ठरवा.>>

माझे काय ते पक्के ठरलेले च आहे, आणि गेली २५ वर्ष त्यात बदल झालेला नाही, त्यामुळे आता बदल होईल असे वाटत नाही. नास्तिक असण्याचा रेफरन्स देण्याचे जे कारण होते. तेच तुम्हाला समजले नाही.

डार्विन आणि तथाकथित धर्मात सांगीतले - दोन्ही पद्धतीने प्राणी, जीवन निर्मीती चे पूर्ण आकलन होत नाही. डार्विन ची थेओरी कदाचीत १०% स्पष्टीकरण देउ शकत असेल.
मी नास्तिक आहे हे पहिल्यांदा च सांगायचे कारण म्हणजे, डर्विन ची thoery पटत नाही म्हणल्यावर direct bible ची किंवा ब्रम्हदेवाची theory पटते असा होऊ शकतो. म्हणुन माझ्या नास्तिक असण्याचा उल्लेख केला.
ना मी राजकारण्यांसारखा नास्तिक आहे ना तुमच्या तिसर्‍या पर्याया सारखा.
तुमच्या पाहण्यात कदाचित सगळीच लोक थातुरमातुर प्रकारातली आली असतील, त्यामुळे तुमची विचार पद्धती अशी झाली असेल.

स्वागत

लेखकाचे उपक्रमावर स्वागत. अर्थपूर्ण लेखाच्या निमित्ताने चांगली चर्चा झालेली दिसली.

लेखातील डार्विनची वंशावळ म्हणजे सोशल डार्विनिज्म वरील विचार पटण्यासारखे आहेत. 'मानव अनेक वंशात विभागला गेला आहे आणि त्यातील काही वंश हे इतर वंशापेक्षा वरचढ आहेत. त्यामुळे कमजोर वंशांना नाहिशे होण्यापासून पर्याय नाही' असा काहीसा सोशल डार्विनिज्मचा दावा आहे. हा दावा करण्यासाठी डार्विनच्या सिद्धांताची गरज नाही. 'मात्र डार्विनने असे दाखवून दिले आहे की गतकाळात हे नेहमीच घडले आहे.' हा त्यापुढीलचा दावा डार्विनच्या सिद्धांताचा आधार घेतो.

वरील दाव्यांची भरपूर चाचणी वैज्ञानिक रित्या घेण्यात आली. मानववंशशास्त्र हा विभाग त्यातून आला असावा. मानववंश हे भिन्न दिसले तरी ते फारसे भिन्न नाहीत. किंबहुना ते एकाच ठिकाणातून (अफ्रिकेतून) जगभर पसरले म्हणून वंशभिन्नता फारशी नाही. डोक्याची मापे शरीराची मापे घेऊन ही भिन्नता शोधण्याचा प्रयत्न एकोणिसाव्या शतकापासून केला गेला. पहिल्यांदा काळ्या गोर्‍यांच्या फरकाचा अभ्यास केला गेला. त्यातही फरक आढळला नाही.

परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आणि एकाने दुसर्‍यावर मात करण्याची क्षमता या भिन्न असतात. त्यामुळे एका वरचढ प्राणीमात्र नामशेष होऊ शकतात तर कमजोर प्राणी हे तगून राहतात. (महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. ) हे डायनोसोर इत्यादी उदाहरणावरून स्पष्ट होते. तेव्हा सोशल डार्विनिज्मचा वरचढ वंशांनी तेव्हढे जगावे या दाव्याला फारसा अर्थ नाही.

सामाजिक स्तरावर मात्र आपल्या करणीला कसलातरी आधार यावा म्हणून लोक वैज्ञानिक सिद्धांतांचा वापर करित असतात. हा वापर निश्चितपणे निषेधार्ह आहे. लेखकाच्या एकंदर म्हणण्याला माझा पाठिंबा आहे.

प्रमोद

आभार

प्रमोदजी प्रथम आपले आभार, आपली सविस्तर आणि अभ्यासू प्रतिक्रिया वाचून बरे वाटले. मला या माझ्या पहिल्या-वहिल्या लेखात काय सुचित करायचे आहे ते आपल्यापर्यंत योग्यरीत्या पोहोचेले आहे असे वाटते.

डायनोसोरच्या उदाहरणावरून काय स्पष्ट होते?

परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आणि एकाने दुसर्‍यावर मात करण्याची क्षमता या भिन्न असतात. त्यामुळे एका वरचढ प्राणीमात्र नामशेष होऊ शकतात तर कमजोर प्राणी हे तगून राहतात. (महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. ) हे डायनोसोर इत्यादी उदाहरणावरून स्पष्ट होते.

येथे डायनोसोरचे उदाहरण काय आहे? डायनोसोरांना बिचार्‍यांना बर्‍याच ठिकाणी ओढले जाते. या ठिकाणी थोडा विस्तार व्हावा, म्हणून कुतूहल आहे.

बाकी प्रतिसादाच्या भावनेशी सहमत आहे. मानववंशाबाबतच्या मुद्द्यांशी सहमत आहे.

डायनोसोर

डायनोसोरांचे नेमके काय झाले मला माहित नाही. पण इतर प्राण्यांपेक्षा जास्त शक्तिशाली असणारे प्राणी नामशेष झाले. याचा अर्थ मी एवढाच मानतो की अशी कुठलीशी परिस्थिती आली की ज्यात या प्राण्यांना तग धरता आली नाही. सोशल डार्विनिज्म मधील तत्त्वानुसार बलशाली (वा बुद्धीशाली) मानववंश इतरांवर मात करतील. पण हे डायनोसारांच्या बाबतीत घडले नाही. अशी अनेक उदाहरणे असावीत. (वाघ संपत चालले पण मांजरे मात्र वाचताहेत हे उदाहरण असू शकेल.)

डायनोसोरांची उत्क्रांती होऊन आज पक्षी वा मगरी सारख्या प्राण्यांमधे रूपांतर (?) झाले. हे रूपांतर धरल्यास ते नामशेष झाले असे म्हणण्याऐवजी उत्क्रांत झाले असे म्हणणे योग्य ठरेल. मात्र ही उत्क्रांती एका मोठ्या प्राण्याचे (जास्त शक्तिशाली) लहान प्राण्यात (कमी शक्तिशाली) झाली आहे. म्हणजेच कुठेतरी परिस्थितीत जास्त बलशाली प्राण्यांना नाकारत होती असे वाटते.

मानवाच्या बाबतीतही असा काही रोग उद्बवू शकतो की ज्यात विशिष्ठ जनुके असलेले जास्त तग धरतील तर त्याविना इतर मात्र बळी पडतील. यात शक्ति वा बुद्धी यांचा काहीच सहभाग नसेल. (यावरचे ऐकलेले उदाहरण म्हणजे अल्ट्राव्ह्यायोलेट वाढले तर काळ्यांना कमी प्रमाणात कर्क रोग होतो तर गोर्‍यांना जास्त प्रमाणात. हवामान बदलात ओझोन कमी झाला तर त्याचा फटका गौरवर्णीयांना जास्त बसेल.)

प्रमोद

तसा ठीक दृष्टांत, पण ओढूनताणून

तसा ठीक दृष्टांत, पण ओढूनताणून.

परिस्थितीत कसला गुण आवश्यक होता, याच्याकडे दुर्लक्ष केले आणि वेगळाच कुठला गुण टिकाऊ मानला, तर तसले जीव निर्वंश झालेले दिसतात. हे खरे आहे.

आकारमानाने मोठे असे काही जीव निर्वंश झाले आहेत, आणि काही सूक्ष्म जीव निर्वंश झालेले आहेत. काही प्रचंड जीव तगले आहेत, आणि काही सूक्ष्म जीव तगले आहेत. "मूर्ख अपेक्षा फसतात" या सूज्ञ सार्वत्रिक सल्ल्याकरिता "डायनिसॉर निर्वंश झाले पण झुरळे निर्वंश झाली नाहीत" हा दृष्टांत सर्वात सयुक्तिक नव्हे. कारण "निळा देवमासा तगला पण डच आल्कॉन फुलपाखरू निर्वंश झाले" असे प्रतिउदाहरणही देता येते.

ओढूनताणून "टिकाऊपणाची अपेक्षा अयोग्य नाही मोठे देवमासे वगैरे या दृष्टांतापुरते वगळून, टिकाऊपणाची अपेक्षा जिथे अयोग्य आहे आहे असे मोठाले डायनोसॉर ग्राह्य धरल्यास मोठे प्राणी निर्वंश झालेले दिसतात..." वगैरे दृष्टांत चालवून घेता येतो. पण ओढाताण केलेला असा दृष्टांत सल्ल्याला पुष्टी देण्याऐवजी सल्ल्याकडूनच आश्रय घेतो.

(पिवळे आंबे या दृष्टांतापुरते विसरून, पिवळी लिंबे या दृष्टांतापुरती ग्राह्य धरून असे दिसते, की पिवळी फळे गोड नसतात.)

डायनोसॉरबद्दल गुळगुळीत उपमा तोंडाशी आली, तर ती प्रयत्नपूर्वक न वापरण्याकडे माझा आजकाल कल असतो. :-) जैव उत्क्रांतीच्या संदर्भात तर बहुधा उपमा चुकलेली असते.

असहमत

ही व्याख्या पहिली तर आपल्या असेल लक्षात येईल की येथे मानवी नितीमुल्यांना काडीचेही महत्व नाही.

मुळात जीवशास्त्रातच मानवी नीतीमूल्यांना जागा नाही. ती शोधणे फोल आहे आणि ते मानवकेंद्रित विश्वरचनेच्या श्रद्धेचे लक्षण आहे. त्याउलट, नैसर्गिक ते चांगले अशा प्रकारे मानवी वागणुकीचे समर्थन करणेही चूक आहे.

इथे कुठेही उच्चभ्रू राहणीमान, कृत्रिम गोष्टींचा हव्यास, गरजेपेक्षा अधिक साधन संपत्तीचा हव्यास अशा संकल्पनांचा विचार नव्हता.

या विधानातसुद्धा नॅचरॅलिस्टिक फॅलसी आहे. 'प्राण्यांमध्ये नाही म्हणून आपणही नको करूया' हा युक्तिवाद निराधार आहे. शिवाय, प्राण्यांमध्ये नाही हे मतसुद्धा निराधार आणि काहीसे चूकही आहे. मुंगीचे वारूळ, मधमाशीचे पोळे, उंटाची मदार हेही हव्यासच आहेत. मोराचा पिसारा भपकेबाज आहे. अभयारण्यातील पाणवठ्यावर ठेवलेले (=कृत्रिम) मीठ सर्वच प्राणी हावरटपणे चाटतात.

आजपर्यंत मानवी इतिहासात निरागस लोकांवरील केले गेलेले अमानुष अत्याचार म्हणजे निसर्गाचा नियम होते असा तर्क लावणे मूर्खपणाचे ठरेल.

का बरे? माणूस निसर्गाचाच भाग आहे की!

भारतातील "सोशल डार्विनीझम" चे ठळक उदाहरण म्हणजे भारतात रुजलेली जातीव्यवस्था आणि त्यालाच जोडून आलेला 'जातीभेद'

सोशल डार्विनिजम असो वा जातिव्यवस्था, मूलतः त्या स्थितीवादी व्यवस्था आहेत. म्हणजे, "ठेविले अनंते तैसेचि रहावे" या तुकारामांच्या सल्ल्याचे स्पष्टीकरण म्हणून त्या व्यवस्था निर्माण झाल्या. "वंचित हे दुबळे असतात म्हणूनच ते वंचित राहिलेले असतात" असा सोशल डार्विनिजमचा युक्तिवाद असतो. "वंचित हे पूर्वजन्मीचे गुन्हेगार असतात म्हणूनच ते वंचित राहिलेले असतात" असा जातिव्यवस्थेचा युक्तिवाद असतो. हे दोन युक्तिवाद भिन्न आहेत.

धर्माचा उगम हा मानवी नीतीमूल्यांची जपणूक करण्यासाठी आणि त्यातूनच चांगला समाज घडविण्यासाठी झाला होता.

कोणत्या धर्माचा?
----
"वंचित हे दुबळे असतात म्हणूनच ते वंचित राहिलेले असतात" या युक्तिवादात सोशल डार्विनिजमची खरी चूक नाही. ते तर स्वयंसिद्ध विधानच (टॉटॉलॉजी) आहे. "वंचितांना मदत करू नये" हे धोरण जरी दुष्ट असले तरी तीही त्यांची मोठी चूक नव्हे, नीतीमत्ता जीवशास्त्रातून शोधू नयेच. "आजचे सक्षम लोक हे सर्वकालचे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनाच मदत मिळावी" हा युक्तिवाद ही त्यांची खरी चूक आहे. बाकी वेळी फ्री मार्केटच्या गप्पा मारणारे मंदी आली की बेलआऊट मागतात तो खरा सोशल डार्विनिजम आहे.
----

ही केवळ एक विचारप्रणाली नसून ती एक प्रवृती आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे.

हे विधान निरर्थक तर आहेच परंतु ते "आमचा विरोध ब्राह्मण्याला आहे" प्रकारच्या विधानांवरून रचलेलेसुद्धा आहे.

सही

हे विधान निरर्थक तर आहेच परंतु ते "आमचा विरोध ब्राह्मण्याला आहे" प्रकारच्या विधानांवरून रचलेलेसुद्धा आहे.

पुर्वार्ध राहिला कि!
'आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे' असे ते गुळगुळीत झालेले विधान आहे. ब्राह्मण्य म्हणजे काय तर शोषण करणे, अज्ञानाचा फायदा घेणे वगैरे...

वंचित ≠ दुबळे

वंचित हे दुबळे असतात म्हणूनच ते वंचित राहिलेले असतात हा सोशल डार्विनिझमचा युक्तिवाद स्वयंसिद्ध सत्य नाही.

(ऐतिहासिक काळापासून) बलवान प्रत्येकवेळी नव्याने ठरवला जाऊ नये अशी समाजव्यवस्था (त्या त्या काळातल्या बलवानांनी) केलेली असते. बलवानाच्या दुबळ्या वंशजांना अस्तित्वाची लढाई लढावी लागू नये अश्या प्रकारे व्यवस्था निर्माण होत असतात.

?

वंचित हे दुबळे असतात म्हणूनच ते वंचित राहिलेले असतात हा सोशल डार्विनिझमचा युक्तिवाद स्वयंसिद्ध सत्य नाही.

Fitness ची 'properties of those who survive' अशी व्याख्या योग्य ठरेल. त्यामुळे survival of the fittest ही टॉटॉलॉजी ठरते. जेत्यांनी काही का व्यवस्था केली असो, तिला झुगारून देता आले नाही म्हणूनच जित हे जित राहिले ना? यात 'झुगारून देता आले नाही' म्हणजे ते कायमच दुबळे होते असे म्हणावे लागते.

(ऐतिहासिक काळापासून) बलवान प्रत्येकवेळी नव्याने ठरवला जाऊ नये अशी समाजव्यवस्था (त्या त्या काळातल्या बलवानांनी) केलेली असते. बलवानाच्या दुबळ्या वंशजांना अस्तित्वाची लढाई लढावी लागू नये अश्या प्रकारे व्यवस्था निर्माण होत असतात.

"ते दुबळे आहेत, त्यांच्यामुळे मानवजात अशुद्ध होते आहे इतक्याच कारणाने त्यांना ठेचा" असा युक्तिवाद आधी कोणी केला होता काय?

 
^ वर