उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी अंक २०१२ प्रकाशित झाला आहे. सदस्यांनी या धाग्यावर आपले प्रतिसाद व प्रतिक्रिया नोंदवाव्यात. यंदाच्या वर्षी दिवाळी अंकाच्या लेखांना फेसबुक, गुगल प्लस आणि ट्विटर मार्फत शेअर करण्याची सोय तसेच फेसबुक आयडी वापरून प्रतिसाद देण्याची सोय देण्यात आलेली आहे. सर्व सदस्यांनी आणि वाचकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती.
दिवाळी अंकाच्या संपादकीयातून
उपक्रम दिवाळी विशेषांकाचे यंदा पाचवे वर्ष. गेली चार वर्षे अविरत चालू असलेली ही परंपरा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढे चालवू शकलो त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत. यावर्षीचा दिवाळी विशेषांकही, उपक्रम सदस्यांच्या योगदानाने, उपक्रमच्या लौकिकाला साजेसा असाच झाला आहे. या विशेषांकातील लेख वाचकांना निश्चितच दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण वाटतील, त्यांच्या ज्ञानात, माहितीत ते भर टाकतील आणि म्हणूनच त्यांना ते आवडतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
उपक्रम दिवाळी अंक २०१२
http://diwali.upakram.org/
Comments
सुंदर अंक
वाह!
दिवाळी अंकाच्या प्रोसेसचे विच्छेदन न करणारे आटोपशीर, अल्पाक्षरी संपादकीय आणि उल्लेखनीय लेखविषय. हार्दिक अभिनंदन.
असेच म्हणतो
सुंदर आटोपशीर अंक.
ह्या दिवाळी अंकातील शुद्धलेखन.
हा प्रतिसाद कोठे लिहावा अशा विचारात होतो पण अन्य योग्य जागा न सुचल्याने अखेर येथे लिहायचे ठरवितो.
ह्या दिवाळी अंकात माझा 'संस्कृत काव्यामधील काही कविसंकेत' असा लेख प्रकाशित झाला आहे. त्या प्रकाशित लेखाची माझ्याजवळील मूळ प्रतीशी मी तुलना केली आणि मला असे दिसले की माझ्या लेखनात अनाहूतपणे काही 'शुद्धलेखना'चे बदल करण्यात आले आहेत आणि ते सर्व बदल शासनपुरस्कृत १८ नियमांना धरून केलेले आहेत. ह्या करण्याला असलेले माझे आक्षेप ह्यापुढे नोंदवीत आहे.
१) 'उपक्रमा'तील लेखन ह्या नियमांना धरून असेल किंवा असावे असे कोठलेहि प्रकटन मला ह्या संस्थळावर दिसत नाही.
२) जरी असे नवे धोरण प्रत्यक्षाप्रत्यक्ष मार्गाने आणण्याचा 'उपक्रम'चा हेतु असला तरी एखाद्या लेखकाला त्याबाहेरील लेखन करण्याचे स्वातन्त्र्य असले पाहिजे. फारतर 'उपक्रम'ने 'हे लेखन आम्हांस मान्य असलेल्या नियमांच्या बाहेरचे आहे' अशा अर्थाची टिप्पणी सोबत जोडावी.
३) कोठल्याहि परिस्थितीत लेखकाला पूर्वसूचना न देता असले वादग्रस्त बदल परस्पर घडवून आणणे अप्रशस्त आहे.
अन्य काही संस्थळे आपले शुद्धलेखनविषयक धोरण आधीच स्पष्ट करतात - उदाहरणार्थ 'मनोगत' - आणि त्यानंतरहि ज्या लेखकास हे नियम मान्य नाहीत त्याचे लेखन त्याला हवे तसे प्रकाशित करतात. ('मनोगत'च्या चालू दिवाळी अंकातील सत्त्वशीला सामंत ह्यांच्या 'शब्दानंदो'त्सव ह्या लेखाची प्रस्तावना पहा. तेथे माझाहि लेख आहे आणि शुद्धलेखन कसे असावे ह्याबाबत संपादकांनी माझ्याशी चर्चा केली होती. त्यांच्या इच्छेनुसार आणि केवळ त्याच कारणाने माझे शुद्धलेखन बदलण्याचे मी मान्य केले होते.) अशी काही प्रक्रिया येथे झाली असती तर मला अधिक आवडले असते.
ह्या १८ नियमांवर 'उपक्रम'मधे पूर्वी http://mr.upakram.org/node/3681 येथे चर्चा झाली आहे आणि माझे खालील विचार त्यामध्ये वाचता येतीलः
आता प्रश्न राहिला नियम ५ चा. मला स्वत:ला हे कळत नाही की थोडा प्रयत्न केल्यावर मति (मती नाही), कवि (कवी नाही) कुलगुरु (कुलगुरू नाही) हे लक्षात ठेवणे अवघड का वाटावे? उच्चारानुसारित्वानुसार मति, कवि, कुलगुरु हे शब्द आपओआपच तसे लिहिले जातात आणि हे उच्चार प्रयत्नसाध्य आहेत. ज्यांना हे उच्चार अवघड वाटतात त्यांना ’थोडा बुद्धीला अजून ताण द्या’ असे सांगण्याऐवजी ज्यांना हे सहजसाध्य वाटते त्यांनाहि ’कवि नाही, कवी’ असे unlearning का करायला सांगितले जात आहे?
मला असे दिसते की ’ब्राह्मण’ आणि ’अन्य जातीचे’ अशा सर्वांना लागू पडेल असे शुद्धलेखन निर्माण करण्याचा हा प्रयत्न ’गाढवहि गेलं आणि ब्रह्मचर्यहि गेलं’ असा फसला आहे. तत्सम शब्द हे तत्समच राहणार आणि त्या मार्गानेच त्यांचे लिखाण झाले पाहिजे असा सोपा नियम केला असता आणि लोकानुरंजनाचा मार्ग टाळला असता तर जातिभेदाचे हे पातक घडले नसते.
शिक्षण हे प्रयत्नानेच घ्यावे लागते असे ठामपणे म्हणायला आपण कधी सुरू करणार? शिक्षण हे ’ब्राह्मण’च असते आणि प्रयत्न करणार्याला ते प्राप्त करणे अवघड नसते असे का नाही आपण म्हणू शकत? सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्?
अमुकएक उच्चार वा नियम बहुसंख्यांना समजत नाही म्हणून तो प्रमाणभाषेतून वगळूनच टाकावा अशी मागणी इंग्रजी वा अन्य पाश्चात्य भाषांमध्ये कानावर पडत नाही. आपल्याकडेच ही सवलत का मागितली जाते?
एका वाक्यात लिहायचे तर शुद्धलेखनाचे नियम घालून देणे हा 'अव्यापारेषु व्यापार' शासनाने करण्याचे काहीच कारण नाही आणि बहुमताने ठरविण्याचा हा विषय नाही असे मला वाटते. त्या 'नियमां'नुसार लेखन करण्यास मी बांधील नाही.
संपादकांनी माझ्या लेखाच्या भाग १ मध्ये पुढील बदल केले आहेत. अन्य भागांतहि असे बदल आहेत पण वानगीदाखल केवळ भाग १च पाहू.
(प्रथम माझा शब्द आणि नंतर 'सुधारित' असा क्रम आहे.)
कवि - कवी, रुचि - रुची, पति - पती, विद्वान् - विद्वान, मयूरांकडून - मयुरांकडून, स्तुति -स्तुती, अर्थात् - अर्थात. चातकालाहि - चातकालाही, निगडित - निगडीत. (येथे 'निगड' म्हणजे हत्तीच्या पायातील साखळदंड, त्यापासूनचे धातुसाधित विशेषण 'निगडित'.)
लेख पूर्ववत करण्यास काहीच हरकत नाही
उपक्रम दिवाळी अंकासाठी आलेल्या सर्व लेखनाची सर्वसाधारण शुद्धिचिकित्सा होते आणि त्यात आवश्यक ते बदल केले जातात.
उपक्रम दिवाळी अंक संपादकांचे शुद्धलेखनविषयक असे काही विशिष्ट धोरण नाही. तुम्हाला हवे असल्यास लेख पूर्ववत करण्यास आमची काहीच हरकत नाही.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
लेख पूर्ववत् करावा...
वरील प्रतिसादात सुचविल्याप्रमाणे माझे लेखन पूर्ववत् केल्यास मला आनंद होईल.
"अती" शुद्ध लेखनाचा आग्रह नकोच
प्रिय कोल्हटकर साहेब,
खरं म्हणजे, ह्या सगळ्याच्या पलीकडे असतं ते म्हणजे लेखकाला काय सांगायचंय ते- नाही का ? तरी ह्या सगळ्या वाद-आग्रहात , मूळ "ते" जे सांगायचंय ते राहून जायला नको, किंवा त्याच्यावरचं लक्ष उडून जायला नको.
तारतम्याने [दोन्ही बाजूंनी] घेतलं म्हणजे झालं.
शेवटी तुम्ही-मी आणी इथले तमाम वाचक , वाचनाच्या एका सुंदरशा "अनुभवा" करिताच इकडे येतो-येत राहतो , काय ?
थोडास्सा डिप्लोम्याटिक सल्ला वाटतोय का ? पन त्यो खर्रच तसा न्हाई
शुभेच्छा !
------
०
एका वाक्यात लिहायचे तर शुद्धलेखनाचे नियम घालून देणे हा 'अव्यापारेषु व्यापार' शासनाने करण्याचे काहीच कारण नाही आणि बहुमताने ठरविण्याचा हा विषय नाही असे मला वाटते.
लोकशाहीतील निर्णय बहुमतानेच घ्यायचे असतात.. लोकाना एकत्र आणणारी एक भाषा ठरवणं हे शासनाच्ण कर्तव्यच आहे... आता शासनाच्या आणि बहुजनांच्या बंधनात तुम्हाला बांधून घ्यायचं नसेलच , तर तुम्ही वाट्टेल ते लिहायला मोकळे आहातच.. खुशाल तुमच्या पद्धतीने लिहावे.
०
शिक्षण हे ’ब्राह्मण’च असते --- फारच भिक्कारडा विचार..
माणसाला जातीत घालून पोट तुंबलं नाही, आता शिक्षणालाही जाती करायच्या का?
शिक्षण हे शिक्षण असते. त्यात कसले आहे ब्राह्मण आणि वैश्य?
आर्यभटीयातील अक्षरचिन्हे आणि खगोलशास्त्र - प्रमोद सहस्रबुद्धे.
वर उल्लेखिलेल्या लेखाच्या संदर्भात असे सुचवितो की आर्यभटाची अक्षरचिह्ने, तसेच आर्यभटाला सूर्यकेन्द्रित ग्रह सुचवायचे होते का पृथ्वी स्थिर आणि नभोमंडल तिच्याभोवती फिरते असे नसून नभोमंडल स्थिर असून पृथ्वी स्वतःभोवती फिरते इतकेच सुचवायचे होते अशा विषयांची शं.बा. दीक्षितांच्या पुस्तकाच्या आधाराने केलेली चर्चा आर्यभट आणि पृथ्वीचे भ्रमण आणि ’अङ्कानां वामतो गति:’ इत्यादि येथे वाचावयास उपलब्ध आहे. त्यावर अवश्य नजर टाकावी.
संस्कृतातील काव्यसंकेताबाबत लेख आवडला
श्री. कोल्हटकर यांचा संस्कृतातील काव्यसंकेतांवरील लेख आवडला.
काव्यसंकेतांबाबत माझी धारणा दोन वेगवेगळ्या प्रकारांची आहे.
पहिला प्रकार : खरोखरच्या नैसर्गिक घटनेला मानवी भावना जोडणारे संकेत मला आवडतात. उदाहरणार्थ, लेखात कोकिळांबाबत दिलेली पद्ये. कोकीळ-कोकिळा खरोखर अन्य पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी घालतात. आंब्याच्या मोहोराच्या ऋतूमध्ये गातात. मग या वागणुकीला मनुष्यस्वभावांशी जोडले तर गंमत वाटते. "पिले दुसर्यांकडून वाढवणे=लबाडपणा", "बाळपणीचे कावळ्याचे दरिद्री खाद्य विसरून मोठेपणी आंब्याची रुची मिरवणे = भंपकपणा"वगैरे.
कुमुदे रात्री उमलतात, आणि कमळे दिवसा उमलतात.* हा निव्वळ काल्पनिक संकेत नसून तथ्य आहे. हे माहीत असले, तर चांगलेच. मग ती उपमा वापरून सूर्य-चंद्राची त्या-त्या फुलांशी एकनिष्ठता सांगणेसुद्धा गमतीदार आहे. मला आवडते. (*कुमुद : Nymphaea प्रजाती ; कमल : Nelumbium प्रजाती)
हे संकेत वापरणारा कवी माझ्या अनुभवातील वसंत, माझ्या अनुभवातील तळी मनात जिवंत करतात. रचना नुसती घोकवत नाहीत, अंगांगाने जाणवून देतात. मुळातले बावनकशी सोने, त्याची या कलाकाराने बनवलेला कुशल अद्वितीय अलंकार.
दुसरा प्रकार : अचाट काल्पनिक प्राणिकथा स्वतंत्रपणे मला आवडतात. याबाबत गैरसमज नको. परंतु अचाट प्राणिकथेचा संकेत बनवला तर वेगळी गोष्ट आहे. मग काही कवी तो संकेत उपमा म्हणून वापरतात, आणि त्यावरून मनुष्यस्वभावाबाबत बोलतात. तसले शून्य-कॅरट बेगडी अलंकार मला आवडत नाही. राजहंसाकडून नीरक्षीरविवेक, मोत्यांचा चारा खाणे वगैरे उपमा मला कुचकामी वाटतात. कवी स्वतः निसर्गात रमून एकरूप झाला नाही, आणि मला त्या निसर्गात रमवत नाही. फक्त नक्कल करून कविता लिहाणारा कोणी आळशी व्यक्ती आहे. मुळात भेसळ पदार्थ, त्याची साच्यात बनवलेली भद्दाडी नक्षी.
- - -
या दुसर्या प्रकारच्या नावडणार्या उपमांबाबत नाक मुरडायचा आनंद, आणि पहिल्या प्रकारच्या आवडत्या उपमांमुळे निखळ आनंद, असे दोन्ही प्रकारचे आनंद लेखातून मला मिळाले!
मस्त
अंक एकदम आटोपशीर झाला आहे. सविस्तर वाचून प्रतिसाद देईनच. ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. छायाचित्रे आणि व्यंगचित्रे खुप आवडली.
माहिती
दिवाळीच्या व अंकाच्या शुभेच्छा. दिवाळी अंक प्रसिद्ध झाला व त्याबरोबर माझा (मी काढलेला) फोटोही. आनंद झाला. सहज मेल चेक करुया म्हटलं तर, अर्रर्र...... उपक्रमचा मेल येउन पडलेला कि फोटोसंबंधित माहिती कळवावी. आधि कळलं असतं तर मी दिली असती ओ माहिती... मी मेल वारंवार उघडुन पाहत नाही. उपक्रम पाहते. उपक्रम वर आपण सुचना दिली असती तर मी लगेच माहिती पुरवली असती...जाउदे देर आए दुरुस्त आए म्हणुन......
Camera Model Name- Canon EOS 1100D
Shooting Date/Time -10/06/2012 10:22:00
Tv(Shutter Speed)- 1/50Sec.
Av(Aperture Value)- F11
Metering Modes-Split metering
Exposure Compensation - 0
ISO Speed- 3200
Lens-कॆनन मॆक्रो १००एमेम युएसेम
Focal Length- 100.0 mm
तसेच हा फोटो ऎडोब वर पोस्ट प्रोसेस केलेला आहे. आणि हा फोटो मस्त पाउस पडुन गेल्यावर उन्हाने पेटलेल्या जंगलात काढला आहे.पाउस पडल्यावर मुंग्या लगेच कामाला लागल्या होत्या, वाटेत अडकलेल्या पाण्याचीही त्याना पर्वा नव्हती.
अंक वाचते आहे.
पायची सुरस कथा आवडली.
प्रक्षिप्त ओवीचा लेख वाचला. एक प्रश्न पडला. ज्ञानेश्वरीत एकच प्रक्षिप्त ओवी आहे का?
अभिनंदन!
अतिकार्यव्यग्रतेमुळे सध्या वाचन करणेही दुरापास्त आहे पण अंकासाठी अभिनंदन. वेळ होईल तसा वाचेनच.
Π बद्दल थोडे अधिक.
Π बद्दलच्या लेखातील उत्तम माहितीत अजून थोडी भर घालू इच्छितो.
भारतामध्ये आर्यभटापासून भास्कराचार्यांपर्यंत Π चे मूल्य ठरविण्याचे प्रयत्न झाले होते. भास्कराचार्यांच्या लीलावतीमधील पुढील श्लोक पहा:
व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते
खबाणसूर्यै: परिधिः सुसूक्ष्मः।
द्वाविंशतिघ्ने विहृतेऽथ शैलै:
स्थूलोऽथवा स्याद्व्यवहारयोग्य:॥
भ (२७), नन्द (९) अग्नि (३) (३९२७) ने व्यासाला गुणून ख (०), बाण (५), सूर्य (१२) (१२५०) ने भागल्यास परिघाचे सूक्ष्म मान मिळते. अथवा व्यासाला २२ ने गुणून पर्वतांनी (७, ७ कुलपर्वत मानले जातात त्यावरून) भागले तर सर्वसाधारण व्यवहारास पुरेसे मान मिळते. (Π = ३९२७/१२५० अथवा २२/७ अंदाजे.)
ह्याहि पलीकडे बरीच प्रगति १५-१६व्या शतकापासून केरळी गणितज्ञांनी केली होती आणि Infinite Series च्या मार्गे Π चे मूल्य, तसेच त्रिकोणमितीतील sine, cosine इ. गुणोत्तरे ठरविण्याचे एकाहून एक सूक्ष्म मार्ग त्यांनी शोधून काढले होते.
चार्ल्स एम् व्हिश नावाच्या एका अभ्यासकाने केरळी गणिताचा अभ्यास केला होता आणि त्यावरील एक निबंध त्याने मद्रास लिटररी सोसायटीच्या सभेत १८३२ साली वाचून दाखविला होता, जो नंतर १८३४ सालच्या लंडनस्थित एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन ऍंड आयर्लंडच्या जर्नलमध्ये १८३४ साली पुन:प्रकाशित झाला होता. एखाद्या ग्रंथालयातून Jstor मध्ये प्रवेश मिळत असेल तर जिज्ञासूंना तो लेख पाहता येईल. भारतातील काही पुस्तकांमधूनहि तो अलीकडे प्रसिद्ध झाला आहे. त्याचा शीर्षलेख पाहिला की त्याच्यामधील साहित्याची कल्पना येईल:
"XXXIII. On the Hindú Quadrature of the Circle, and the infinite Series of the proportion of the circumference to the diameter exhibited in the four S'ástras, the Tantra Sangraham, Yucti Bháshá, Carana Padhati, and Sadratnamála"
व्हिशबाबत अधिक माहिती येथे आहे. तसेच केरळी हिंदु गणिताबाबत येथे पहा.
चार्ल्स एम व्हिश आपल्या निबंधवाचनानंतर थोडयाच दिवसांनी बेल्लारी येथे मृत्यु पावला, जेथे त्याची कबर अजूनहि आहे.
लेखात Π चे जनकत्व विल्सन जोन्स ह्यांना दिलेलेच आहे. त्यांचा आपल्या दृष्टीने मनोरंजक तपशील म्हणजे संस्कृत विद्येकडे लक्ष देणारे पहिले इंग्रज गृहस्थ कलकत्त्याचे विल्सन जोन्स हे त्यांचे पुत्र.
धन्यवाद!
Π बद्दलच्या माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद!
जादू-इ-चिराग
असे आठवते की कित्येक वर्षांपूर्वी गणिताच्या वर्गात आमच्या प्राध्यापकांनी जादू केल्यासारखे e^iΠ = -1 हे फळ्यावर काढून दाखवले होते. ते सर्व मी पूर्णपणे विसरलो आहे पण त्यावेळी वाटलेले thrill अद्यापि स्मृतीत आहे. गणिताच्या कोणी जाणकाराने थोडक्यात पुनः समजावून सांगितले तर वाचावयास आवडेल.
स्पष्टीकरण
इथे गणितीय चिन्हे वापरून आणि मराठीत स्पष्टीकरण देणे जरा कटकटीचे वाटत आहे, म्हणून आपल्याला ते ई-मेलने पाठवले आहे.
-मीरा फाटक
सहमत..
मी पण एक-दोन ओळी लिहायचा प्रयत्न केला पण फक्त क्रियापदं मराठीत होती त्यामुळे सोडून दिला.
अवांतरः ही ऑयलर आयडेंटीटी काय किंवा e ची किंमत एव्हडीच का अश्या अनेक प्रश्नांची उत्तरांवर मी परवा-परवा विचार केला. त्याआधी तंत्रनिकेतनमध्ये असताना मी , i ची किंमत रूट(-१)च का असते असं विचारलं होतं असला प्रश्न पडल्याबद्दल प्राध्यापकांनी मलाच वेड्यात काढलं होतं. :)
हातपंप पान 3
वरील आकृतीत दाखविलेल्या हात पंपाचा वापर भारतात कधी सुरु झाला असेल यास्म्बन्धी कुतूहल आहे.
उमरावजान अदा या नावाचे दोन हिंदी चित्रपट निघाले आहेत .उमरावजान या खर्या अथवा काल्पनिक व्यक्तीचे जीवन सन १८५० च्या आसपासचे लखनौ शहरातले दाखवले आहे.उमरावजान हि लखनौ जवळच्या गावात राहणारी मुलगी पळवली जाते आणि नंतर तिचे व्यावसाईक नर्तकी व गायीकेत रुपांतर होते असे तिच्यावर निघालेल्या दोन चित्रपटात दाखवले आहे. एकात रेखा व दुसर्यात ऐश्वर्याची भूमिका आहे.
हि प्रस्तावना जरा जास्त करावी लागली कारण त्याशिवाय मूळ प्रश्न विचारणे अवघड वाटले.
दोन्ही सिनेमात उमरावजान च्या गावाच्या हद्दीत एक हातपंप दाखविला आहे व लोक त्याचा वापर करताना दाखविले आहे. माझा प्रश्न असा आहे कि सन १८५० च्या सुमारास लखनौ च्या ग्रामीण भागात असे हातपंप होते का ? त्या अनुषंगे दुसरा प्रश्न हा आहे कि हातपंप याचा वापर भारतात केंव्हा सुरु झाला ?
रमेश आठवले उपक्रम सदस्य
पंप
इंग्रजांच्या संपर्कात आल्यापासून येथील लोकांनाहि पंपांसारख्या गोष्टींचा परिचय होऊ लागला होता असे दिसते. शनिवारवाड्यात एकदा आग लागली असता इंग्रज पलटण, जी पुण्याच्या आसपास तैनात असे, तिच्याकडून आग विझवण्याचा 'कळीचा बंब' आणल्याचे मी वाचलेले आहे असे स्मरते.
ब्राउटन नावाचा एक इंग्रज शिंद्याच्या सैन्यात होता. त्याने लिहिलेले Letters from a Mahratta Camp हे पुस्तक १८०९ च्या पुढेमागच्या काळाची बरीच मनोरंजक माहिती देते. त्यात खालील वर्णन दौलतराव शिंदे ह्यांच्या होळीच्या सणाचे आहे आणि त्यात शिंद्यांच्या सैन्यातहि आगीचा बंब होता असे नमूद केलेले आहे.
नक्की उत्तर सापडणे कठीण
सन १८५० च्या सुमारास लखनौ च्या ग्रामीण भागात असे हातपंप होते का ? त्या अनुषंगे दुसरा प्रश्न हा आहे कि हातपंप याचा वापर भारतात केंव्हा सुरु झाला ?
सिनेमा-नाटक यात कधी कधी पटकथेच्या काळात अस्तित्वात नसलेली वस्तू वापरण्याची चूक होते. एका ऐतिहासिक नाटकात औरंगझेब चुकून चष्मा लावून रंगभूमी वर आल्याचा उल्लेख एका रंगकर्मीन्च्या (probably प्रभाकर पणशीकर) आत्मचरित्रात आहे. १८५० मध्ये उत्तर प्रदेशात हातपम्प होते का, हा इन्टरेस्टीन्ग प्रश्न आहे व याचे नक्की उत्तर सापडणे कठीण आहे. खालील मुद्द्यां वर विचार केल्यास काही अंदाज करता येईल.
१: जरी १८५० मध्ये उत्तर प्रदेशात हातपम्प असले तरी त्या वेळी forging, extruding, machining इत्यादी नसल्याने त्या वेळचे हातपम्प ओतीव (cast) व बाहेरून कोणतेही machining न केलेले, हे आजच्या हातपम्पां पेक्षा दिसायला खूपच वेगळे असणार. उमराव सिनेमातील हातपम्प दिसायला कसे होते याचे तुम्ही वर्णन करावे अशी अपेक्षा नाही व तेवढ्या करता त्या सिनेमाची CD आणून मी पाहणे पण शक्य नाही. पण जर तुम्हाला दृश्य आठवत असेल व पंपाची घडण तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही पंप सारखी असेल, त ती दिग्दर्शनाची चूक असेच समजावे.
२: हातपंप जरी विहीरीवर बसवण्यात काहीच हरकत नसली तरी सहसा तसे करत नाहीत. विहिरीतून पाणी काढण्या करता दोरी बांधून बादली वा कळशी आत सोडणे हीच पद्धत अगदी आत्ता आत्ता पर्यंत रूढ होती, व अजून ही आहे. हातपंप बोअर वर बसवतात. व सहा इंच व्यासाचे बोअर करण्याची technology १८५० मध्ये नक्कीच नव्हती.
एकूणच आपली संस्कृती पोकळ पांडित्य (जसे, द्वैत का अद्वैत) पाजळण्या कडेच होती. आपले यंत्र म्हणजे ताम्रपत्र्या वर काढलेल्या काही आकृती. machine या गटातल्या कोणत्याही वस्तुचे संशोधन आपल्या कडे झाले नाही. अजून सुद्धा आपला कल machine न वापरण्या कडे असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सतार, तंबोरा इत्यादी सुरात जुळविण्याची यंत्रणा. आपल्या वाद्यात खुंट्या असतात व त्या वाद्याच्या stem मध्येच भोक करून त्यात घातलेल्या असतात. या खुंट्या पिळून fine tuning करता येत नाही कारण जरा जोर लावला कि खुंटी जास्त पुढे किंवा जास्त मागे पिळली जाते. मग fine tuning करता आपण जव्हारीच्या पुढे तारेत एक मणी घालून तो पुढे मागे करतो, इत्यादी. तसेच आपले संगीतकार केवळ त्यांच्या श्रवणावर विसंबून राहून वाद्ये जुळवीतात. या सगळ्या प्रकारात वाद्य जुळविण्यास बराच वेळ लागतो.
गिटार मध्ये खुंट्याना एक गियरची यंत्रणा असते, तसेच वायोलिन मध्ये ब्रिजच्या पुढे एक स्क्रू व लिवर यंत्रणा असते ज्याने fine tuning करणे सोपे होते. पाश्चात्य संगीतात वाद्ये जुळविण्या करता प्रमाण म्हणून tunning fork वापरतात. आपण वायोलिन वाद्य आपले केले आहे, पण त्यातली tunning यंत्रणा आपण सारंगीत आणली नाही. tunning fork शाळेच्या फिजिक्स Lab मध्ये असतो. पण तो आपल्या संगीत विश्वात आणावयास आपण तयार नाही. तबला आपण वादी वर ठोकून जुळवितो. ड्रम मध्ये असलेली साधी स्क्रू यंत्रणा आपण तबल्यात आणली नाही.
अजून पण आपल्या असे वाटते कि चटणी मिक्सर मध्ये न वाटता पाट्यावरवंट्या वर वाटली पाहिजे. इत्यादी, इत्यादी. या विषया वर एक पुरता प्रबंध लिहिता येईल.
+१
खत्रा सहमत!
स्वयपाकघरात अशी असंख्य उदाहरणं सापडतील. ताटं-वाट्यांच्या कड्या धारदार असणं धोकादायक आहे. पण वरच्या उदाहरणाबाबतीत काही चटण्यांबाबतीत असहमत आहे. उ.दा. शेंगदाण्याची (पुणेरी भाषेत नुसत्या अनुनासीक दाण्याची) :). खलबत्यामुळे शेंगा ठेचल्या जातात आणि चटणी मस्त तेलकट होते, त्याचं टेक्चर जाडं भरडं होतं. पण मिक्सर मध्ये एकतर आख्या शेंगदाणा रहातो किंवा त्याची कोरडी भुकटी होते.
ऐतिहासिक हातपंप
दोन्ही सिनेमात दाखवलेले हातपंप विहिरीवर बसवल्या सारखे वाटत नाही.
वक्रोक्ति
प्रिय 'आंबा',
जरा समजून घ्या. शिक्षणात मी ब्राह्मण आणि अन्य असा वाद आणत नाही आहे. माझे वरचे आणि त्यात संदर्भ दिलेले लिखाण नीट वाचलेत तर 'ब्राह्मण' हा शब्द येथे का वापरला आहे आणि त्याला अवतरणचिह्नात का टाकले आहे हे तुम्हांस उमजेल. ह्यामध्ये जी वक्रोक्ति आहे ती लक्षात यायला हवी.
अवतरणातला ब्राह्मण
ब्राह्मण शब्द अवतरणात दिसला तेव्हाच त्यातला गर्भितार्थ समजला.---वाचक्नवी
यंत्र
ज्या हातपंपाचे वर्णन मी माझ्या लेखात केले आहे, त्याचे सिलिंडर, पिस्टन, व्हॉल्व्ह वगैरे भाग आणि त्याच्या तळाशी जोडलेला पाईप या वस्तूंची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पाश्चिमात्य देशांमधून आधुनिक काळात आपल्या देशात आले आहे. तशाच प्रकारचा पंप इतिहासकाळात सामान्य माणसाच्या वापरात असण्याची शक्यता नाही. तंत्रज्ञानाचा विचार करता कास्टिंग आणि फोर्जिंग करण्याची आज दिसणारी यंत्रसामुग्री आपल्याकडे पूर्वीच्या काळात उपलब्ध नव्हती, पण लहानशा मुशीमध्ये लोखंड वितळवणे आणि त्याला तापवून ऐरणीवर ठेवून घणाने ठोकण्याचे लोहारकाम फार पूर्वीपासून आपल्याकडे होत आले आहे. उसाचा चरक आणि तेलाची किंवा चुन्याची घाणी यासारखी साधने पूर्वीपासून आपल्याकडे आहेत. मोगल, मराठा आणि राजपुतांच्या इतिहासात तोफा होत्या आणि त्या सगळ्याच आयात झालेल्या नसाव्यात. तोफ बनवण्याचा एक कारखाना मी जयपूर येथील एका राजवाड्यात पाहिला आहे. बैल किंवा उंट यांच्या बळावर चालवता येणारे लेथ मशीनसारखे एक यंत्र त्यात आहे.
पुरातन काळातल्या चित्रांमध्ये होळीच्या सणामध्ये पिचकारीचा वापर केलेला दिसतो. गंगायमुना नद्यांच्या खो-यात भूगर्भातील पाण्याची पातळी (वॉटर टेबल) जमीनीलगत असल्याने ते पाणी बाहेर काढण्यासाठी खूप खोल खणावे लागत नाही. त्यामुळे ते उपसून काढण्याचे पिचकारीसारखे एकादे साधन अस्तित्वात असणे अशक्य नाही. पण त्याबद्दल निश्चित अशी माहिती मला नाही. सिनेमा तयार करतांना पूर्वीचा काळ रंगवतांना तो काळ हुबेहूब तसाच असेल असे नाही. त्यात कल्पनाविलासाचाच भाग जास्त असतो. त्यामुळे त्याबद्दल जास्त गंभीरपणे विचार करण्याची गरज नाही.
एका पत्र्यावर कोरलेल्या विचित्र चित्रांना आपल्याकडे 'यंत्र' असे म्हणत असत आणि त्याची पूजा केल्यामुळे सुख समृध्दी वगैरे मिळते अशी समजूत होती. ही प्रथा आजतागायत चालत आली आहे. 'यंत्र' या शब्दाचा 'मशीन' या अर्थाने उपयोग करण्याची सुरुवात कधीपासून झाली यावर आपल्याकडील भाषातज्ज्ञ प्रकाश टाकू शकतील.