मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था

माणसाचा मेंदू जसा त्याच्या प्रत्येक अंगापेक्शा श्रेश्ठ असतो अगदी तसेच ‘समाजपुरुश' (ऍज ऍन एंटीटी) हा समाजातील सर्व घटकांपेक्शा श्रेश्ठ असतो. मेंदूपेक्शाही खुद्द मेंदूतून उपजणारी 'विचार यंत्रणा' अफलातून असते.

देवाने म्हणा की निसर्गाने म्हणा, 'सेल्फ अपग्रेडेशन' हि सुविधा देखील मानवाला पूरवली आहे. मेंदू जरी सगळे शरीर, भाव, भावना, विचार, विकार, सवयी नियंत्रणात ठेवून त्याचा कारभार चालवतो पण 'सजगता प्राप्त झाली' कि अगदी त्याच कार्यपद्धतीच्या उलट मेंदूलाच 'आपण' वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रणात ठेवू शकतो.
जसे की,
-) आपल्या सवयी बदलून, सुधारून मेंदूला तशा सुचना देऊन
-) 'विकारांचा निचरा' करून, याबाबतच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून
-) विचारांकडे त्यांच्या योग्यतेनुसार लक्श देऊन वा दुर्लक्श करून
-) भाव-भावना त्यांच्या उगमाच्या टप्प्यावरच योग्य प्रकारे हाताळून
-) शरीराची योग्य निगा घेत, शरीरास प्रमाणात इंद्रियसुख पूरवून, आहार-निद्रा-व्यायाम यांचा ताळमेळ घालत त्यांचा अवलंब करून.

पण हे झालं एका व्यक्तीचं. समाजपुरुशाला देखील मेंदू असतो, जो कसा काम करतो हे जाणून त्यातहि 'सेल्फ अपग्रेडेशन'च्या मदतीने सुधारणा करता येऊ शकते.

समाजपुरुषाच्या मेंदूचं अस्तित्त्व हे लिखित रुपात असलेले नियम, ठराव, कायदा, अंमलबजावणी ह्या अशा पायरीने व्यक्त होत असते.

सामाजातील प्रत्येक व्यक्ती म्हणूनच एकत्रित समाजरूपी देहाचे एक-एक छोटे अंग असते. आणि म्हणूनच त्यांना लिखीत रुपात प्रकट झालेल्या कायद्यांना 'अंमलबजावणीची कृती करून' मान देणं भाग असतं.

आपण ' आपल्या मेंदूचा वापर कसा करायचा?' हे जसे आपल्या नियंत्रणात आणता येऊ शकते, अगदी तसेच आपण म्हणजे ' 'जागरूक जनता' इच्छाशक्ती असेल तर, आपल्या 'समाजपुरुशाचे गुणदोश जाणून घेऊ शकतो, ते सुधारू शकतो, त्यात
हवा तसा बदल घडवू शकतो.'

समाज पुरुशाचे अस्तित्त्व हे लिखित रुपातील
1) नियम
2) ठराव
3) 'ठराव' मंजुर करण्याची पद्धत
4) 'मंजूर झालेला ठराव' - कायदा
इथून स्तर बदलला कि वरील मुद्द्यांचे चक्र नव्या स्तरावर नव्या रूपात कार्य करू लागते.
- ) कायद्याची अंमलबजावणी कोणी कशी करायची? याचे नियम
-) ....इत्यादी
ह्या प्रक्रियेतून होत जाते.

व्हर्टीकली पहायचं झालं तर -
- 'नियम तयार करणे' हा स्तर ठरवतो - कसे नियमन करायचे? (how to control) ह्या बाबतची वैचारीकता
- 'ठराव' व 'तो मंजूर करण्याची पद्धत' हा स्तर ठरवतो - नियमन करण्याची पद्धत कशी असायला हवी? (ways to control) हे ठरवण्याबाबतची वैचारीकता.

पण व्हर्टीकली वैचारीकतेचे केवळ हे दोनच स्तर नाहित. ह्यावरही एक स्तर असतो.

'हे जग सरळ रेशेत चालत नाही.' बदल तर घडतच असतात. पण मग बदल कसे व कुठे घडतात? हे कसे समजून घ्यायचे?
त्याकरताच सगळ्यात वरती अजून एक स्तर असतो. तो स्तर ठरवतो - 'नियमन कशाचे करायचे?' what to control?

हा स्तर असतो 'तत्त्व-चिंतनाचा'.

अश्टांग योग समजून सांगण्यासाठी जी परिभाशा वापरली जाते त्या परिभाशेत ज्या संव्द्न्या प्रचलित आहेत त्यांचा वापर करीत म्हणता येवू शकते कि
यम म्हणजे 'ज्यांचे नियमन करायचे आहे त्या पूर्वचिंतनातून स्पश्ट झालेले मुद्धे' (predefined things to be controled)
नियम: हा स्तर असतो - 'कसे नियमन करायचे?' (how to control) या बाबतचा
प्राणायाम: हा स्तर असतो - 'नियमन करण्याच्या विविध पद्धती' (ways to control) या बाबतचा
धारणा: हा स्तर असतो - 'विशिश्ठ कामा संदर्भातील जीवनकाल कोणत्या ध्येयावर लक्श ठेवत व्यतित करायचा ते?' (goal to achieve of
specific job in a timespan ') या बाबतचा
ध्यान:हा स्तर असतो - 'जाणिवेच्या स्तरावरील एक शून्य अवस्था' (focusing on something or nothing) या बाबतचा
समाधी:हा स्तर असतो -'अंतिम अंमलबजावणी व त्याकाळातील अवस्था' (state at the time of execution of what is being asked to execute) या बाबतचा

आता ह्या सगळ्या गोश्टीचा संदर्भ (इं.:कॉन्टेक्स्ट) मी आपणांस 'मराठी भाशेचे व्याकरण' ह्या विशयाशी जोडून तुमच्या समोर सादर करीत आहे.

जिला सध्याची मराठी म्हणता येईल अशा मराठी भाशेच्या व्याकरणाची पार्श्वभूमी काय आहे ते आता समजून घेवूया. -

आपला राज्यकारभार सुरळीत चालावा, या हेतूने भारती (हिंदी- प्रचलित: भारतीय) लोकांना पाश्चात्य द्न्यान देण्यासाठी ब्रिटिशांनी शाळा काढल्या. हे द्न्यान ज्या देशी भाशांतून द्यावयाचे, त्या देशी भाशांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा, यासाठी त्या
आभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तके लिहिली जाणे आवश्यक होते. हा प्रयत्न हैंदशाळा मंडळी’ (1822) या संस्थेमार्फत सरकारने केला. मराठीला आवश्यक असलेले असे शालेय पातळीवरील व्याकरण जॉर्ज जार्विस याने चार पंडितांकडून (जे संस्कृत भाशा व तिचे व्याकरण यांमधले विद्वान होते) 1824 मध्ये लिहवून घेतले. मराठीचे व्याकरण इंग्रजांच्या आणि इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावी सहवासातून प्रथम रचले गेले आणि इंग्रजांच्या ‘अनुद्न्येने म्हणा वा आदेशाने’ संस्कृत-पंडितांनी मराठीला व्याकराणाच्या मांडणीत बसवण्याचा प्रयत्न केला. हे चार पंडित जगन्नाथ क्रमवंत, रामचंद्रशास्त्री जान्हवेकर, बाळाशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके हे
होते. त्यापैकी जान्हवेकरांनी इतर कामांत गुंतले असल्यामुळे ह्या कामात लक्श घातलेले नव्हते.'

हा वरील परिच्छेद हे माझे मत नसून ऐतिहासिक सत्य आहे.

ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळेच ' मराठीच्या व्याकरणाचा' म्हणा कि शुद्धलेखनाबाबतचा नियमांचा' म्हणा कि 'नव-नवे शब्द सृजित करण्याबाबतच्या वैचारीक आरखड्याचा' म्हणा, अगदी बोजवारा उडाला आहे. कारण 'यम' ह्या स्तरावर ('प्रीडिफाईंड थिंग्ज टू कंट्रोल' 'ज्यांचे नियमन करायचे आहे त्यांचे स्पश्ट मुद्धे') चूक घडलेली आहे. कारण वैचारीकतेचा हा जो वरचा स्तर असतो, जो तत्त्व-चिंतनाचा असतो, म्हणजे ' नियमन कशाचे करायचे?' what to control? ह्या बाबतचा असतो, तिथं, त्या स्तरावर 1822 च्या काळात मराठी समाज पोहचला नव्हता.

काळ आता खूप पुढे सरकला आहे, नाही कां?

मराठी भाशेच्या आभ्यासाबाबत म्हणायचे झाले तर 'यम' ह्या स्तरावर चूका झाल्या आणी म्हणूनच 'नियम' ह्या स्तरावर देखील चूका झालेल्या आहेत. नियम चूकीचे लिहीले गेल्यामुळे मंजूर झालेले ठराव देखील चूकीचे झालेले आहेत. १९६० साली चूकीचा कायदा झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी मराठी जनते कडून देखील व्यवस्थित होत नाही आहे, कायद्याची हेळसांड होत आहे. ज्या मंडळींना मुळात 'यम' ह्या स्तरावरच चूक झालेली होती/आहे हे माहित नाही त्यापैकी काही मंडळी मराठी जनतेतील 'शुद्धलेखनाबाबतची अनास्था' पाहून हळहळ व्यक्त करीत होते / आहेत. तर काही जे उत्साही होते/आहेत त्यांनी नव-नवे बोजड शब्द सृजित केले वा करीत आहेत. या अशा शब्दांचा 'वापर करण्याची अंमलबजावणी' सामान्य जनते कडून होत नव्हती / होत नाही. उलट थेट इंग्रजीचेच शब्द अपभ्रंशीत होवून तरी वापरले जात होते वा अगदी तसेच वापरले जात आहेत.

आंतरजालावर एक लेख माझ्या वाचनात आला. तो लेख वाचून मला, मी जे काम करायचे योजले आहे त्यास उपयुक्त असा 'एक अभ्यासू जोडीदार' मला मिळाला असे मी समजतो. ह्या स्वार्थापोटी मी तो लेख प्रस्तुत लेखकाची परवानगी घेवून आपल्या समोर वाचनास ठेवू इच्छितो. लेख पीडीएफ फाईल मध्ये आहे. लेखकाकडे युनिकोड मध्ये टंकीत केलेले लिखाण नव्हते व मला पीडीएफ फाईल युनिकोडमधे आणता आले नाही. त्यामुळे पीडीएफ फाईलचा दुवा इथे जोडत आहे. असे असले तरीही आपण तो लेख जरूर वाचावा हि आपणांस विनंती.

लेखकाचे नांव = श्री. राजेश मुखेडकर
शिक्शण = मराठी घेऊन एम.ए.
मुख्य लेख : 'मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था' , संदर्भासाठी सोबत दुसरा लेख : 'मराठी शुद्धलेखनाचे प्रचलित नियम'

Comments

सुखार्थिन: कुतो विद्या...

’मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था’ हा लेख वाचला. तेथील दुवा वापरून शुद्धलेखनाचे नियमहि पाहिले. अन्य जागीहि ते आधीच पाहिलेले होते.

लेख वाचताच जाणवले की लेखाचे शीर्षक अन्वर्थक नाही. संपूर्ण लेखातील विवेचन हे मराठी साहित्य महामंडळाने निर्माण केलेल्या आणि राज्यशासनपुरस्कृत अशा १८ शुद्धलेखनाच्या नियमांपैकी काही वादग्रस्त नियमांविषयी आहे आणि ह्या वादग्रस्त नियमांमध्ये ’तत्सम’ (संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे मराठीत आलेले) असे ज्यांना म्हटले जाते त्या शब्दांसाठी केलेल्या विशेष नियमांमुळे हे ’चातुर्वर्ण्य’ निर्माण झाले आहे असा लेखाचा रोख आहे. तदनुसार ’मराठी भाषेच्या शासनपुरस्कृत शुद्धलेखनातील चातुर्वर्ण्य व्यवस्था’ हे शीर्षक अधिक अर्थपूर्ण झाले असते.

तद्भव, देशी आणि परभाषी शब्दांना जे नियम घालून देण्यात आले आहेत ते तत्सम शब्दांना लावण्यात आलेले नाहीत, त्यांच्यासाठी संस्कृतच्या अंगाने जाणारे वेगळे नियम करण्यात आलेले आहेत आणि ह्यामुळे ’चातुर्वर्ण्य’ निर्माण झाले आहे असा ह्या लेखाचा मथितार्थ मला दिसतो.

लेखकाने तसे कोठेहि म्हटलेले नाही पण ’तत्सम शब्दांना एक ’ब्राह्मण’ वागणूक आणि अन्य तीन जातींच्या शब्दांना अन्य वागणूक असे का’ अशा भाषेत मी लेखकाने वापरलेल्या ’चातुर्वर्ण्य’ ह्या शब्दाचा अर्थ लावू शकतो. ’चातुर्वर्ण्य’ हा loaded शब्द लेखकानेच वापरल्यामुळे मला असे म्हणायचे स्वातन्त्र्य मिळाले आहे.

नियम ५
नियम ५

लेखकाच्या मते तत्सम शब्दांना ही ’ब्राह्मण’ वागणूक मुख्यत्वेकरून नियम ५.१ ते ५.६ ह्यांमधून दिसून येते. ५.१ आणि ५.३ प्रमाणे सर्वच इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द (तत्सम आणि अन्य तीन जातींचे) दीर्घ ई आणि दीर्घ ऊ ह्यांनी दाखवावेत. जसे ’कवी, बुद्धी, गती, हरी, मनुस्मृती, पद्धती, कुलगुरू आणि अर्थातच पट्टी (तद्भव) गाडी (देशी), जबरी (परभाषिक). (ह्याला अपवाद म्हणजे ’परंतु, यथामति’ अशाप्रकारची तत्सम अव्यये - ५.२.) हे एकदा घालून दिल्यानंतर ५.५ आणि ५.६ ला लेखकाचा आक्षेप आहे. ५.५ प्रमाणे बुद्धी पण बुद्धिवैभव, विद्यार्थी पण विद्यार्थिमंडळ असे का? हेहि बुद्धीवैभव, विद्यार्थीमंडळ असे का नाही?

नियम ६ भाग १
नियम ६ भाग १
नियम ६ भाग २
नियम ६ भाग २

लेखकाच्या मते तत्सम शब्दांना दिलेली ही ’ब्राह्मण’ वागणूक अन्य जागीहि दिसते. उदा. नियम ६. येथे अन्य तीन जातींसाठी नियम आहे शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपान्त्य इ अथवा उ ह्रस्वच लिहावा. जसे किडा, विळी इत्यादि. पण तत्सम शब्दांना ह्यातून वगळले आहे जसे गीता (गिता नाही), पूजा (पुजा नाही). हा भेदभाव का? (येथे माझे अवान्तर: शुद्धलेखनाचे नियम निर्माण करतांनाच येथे शुद्धलेखनाचा खून पाडला आहे. ’ह्रस्व’ हा तत्सम शब्द ’र्‍हस्व’ अशा चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे. नियमाचे चित्र पहा. येथे ह्रस्व-दीर्घाचा काहीच प्रश्न नाही, शब्द सरळसरळ संस्कृत आहे. तो तसाच का लिहिलेला नाही? अवान्तर संपले.)

नियम ७
नियम ७

ह्याच्या पुढचे चातुर्वर्ण्य नियम ७.२ मध्ये दिसते. अनुस्वार विसर्ग आणि जोडाक्षर ह्यांपूर्वीचे इकार आणि उकार ह्रस्व लिहावेत हा नियम अन्य जातींवर लादण्यात आला आहे (जसे चिंच, डाळिंब) पण तत्सम ’ब्राह्मणांना’ त्यातून वगळण्यात आले आहे (जसे नावीन्य़, पूज्य, शून्य - नाविन्य, पुज्य, शुन्य नाही.)

नियम ८.१
नियम ८.१

चातुर्वर्ण्याचे अखेरचे उदाहरण म्हणजे नियम ८.१. ह्यानुसार उपान्त्यी दीर्घ ई अथवा ऊ असलेल्या अन्य जातींच्या शब्दांचा दीर्घ ई-कार वा दीर्घ ऊ-कार सामान्यरूपांमध्ये ह्रस्व होतो, जसे गरीब पण गरिबाला, मूत पण मुताला, फूल पण फुलाला. गरीब हा शब्द परभाषिक तर मूत आणि फूल हे तद्भव आहेत. अर्थात् दोघेहि अब्राह्मण. पण ’ब्राह्मण’ असलेले शब्द, उदा. दूत दूताला, परीक्षा परीक्षेला, ह्या नियमापासून मुक्त आहेत.

मला असे दिसते की नियम ६, ७ आणि ८ मध्ये दिसणारी ’भिन्न’ वागणूक केवळ अनावश्यक नियम निर्माण केल्यामुळे भासमान होत आहे. नियम ६ मध्ये ’किडा’ हा शब्द ’किडा’ असाच लिहावा हा जावईनियम उगीचच उत्पन्न केला आहे. मुळात ’किडा’ हा शब्द उच्चारानुसार ’किडा’ असाच लिहू जाऊ शकत असल्याने उच्चारानुसारित्व हा default नियमच त्याला पुरेसा आहे. तरीहि त्यासाठी खाजवून खरूज काढल्यासारखा नियम ६ निर्माण केला आहे आणि मग त्यातून तत्सम ब्राह्मणांचा सवतासुभा वेगळा निर्माण केल्यासारखे भासत आहे. तोच उच्चारानुसारित्वाचा default नियम ७ आणि ८ साठी लक्षात ठेवला असता तर ’चींच’, ’डाळींब’ ’गरीबाला’ असे लिहू नका असे सांगण्यासाठी नियम निर्माण करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. (Do not fix it if it is not broken! हे तत्त्व ध्यानात ठेवायला हवे होते.)

आता प्रश्न राहिला नियम ५ चा. मला स्वत:ला हे कळत नाही की थोडा प्रयत्न केल्यावर मति (मती नाही), कवि (कवी नाही) कुलगुरु (कुलगुरू नाही) हे लक्षात ठेवणे अवघड का वाटावे? उच्चारानुसारित्वानुसार मति, कवि, कुलगुरु हे शब्द आपओआपच तसे लिहिले जातात आणि हे उच्चार प्रयत्नसाध्य आहेत. ज्यांना हे उच्चार अवघड वाटतात त्यांना ’थोडा बुद्धीला अजून ताण द्या’ असे सांगण्याऐवजी ज्यांना हे सहजसाध्य वाटते त्यांनाहि ’कवि नाही, कवी’ असे unlearning का करायला सांगितले जात आहे?

मला असे दिसते की ’ब्राह्मण’ आणि ’अन्य जातीचे’ अशा सर्वांना लागू पडेल असे शुद्धलेखन निर्माण करण्याचा हा प्रयत्न ’गाढवहि गेलं आणि ब्रह्मचर्यहि गेलं’ असा फसला आहे. तत्सम शब्द हे तत्समच राहणार आणि त्या मार्गानेच त्यांचे लिखाण झाले पाहिजे असा सोपा नियम केला असता आणि लोकानुरंजनाचा मार्ग टाळला असता तर जातिभेदाचे हे पातक घडले नसते.

शिक्षण हे प्रयत्नानेच घ्यावे लागते असे ठामपणे म्हणायला आपण कधी सुरू करणार? शिक्षण हे ’ब्राह्मण’च असते आणि प्रयत्न करणार्‍याला ते प्राप्त करणे अवघड नसते असे का नाही आपण म्हणू शकत? सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्?

मी येथे मांडलेल्यापैकी काही विचार अधिक विस्ताराने दिवाकर मोहोनींच्या ’भाषा आणि जीवन’च्या हिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ह्या लेखात वाचायला मिळतील.

विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद!

श्री. अरविंद कोल्हटकर यांनी लेख वाचल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

श्री. मुखेडकर यांच्या लेखावरील आपल्या प्रतिसादाला मुखेडकर यांनीच उत्तर देणे योग्य होईल. मी श्री. मुखेडकरांना उपक्रम संकेतस्थळाचे सदस्य होण्याचे सुचवले आहे.

मला आशा आहे की ते लवकरच येथील सदस्यत्व स्विकारून येथे लेखांच्या/ प्रतिसादांच्या माध्यमातून त्यांच्या आभ्यासाची, विचारांची येथील वाचकांशी भेट घडवतील.

मराठी भाषा

नियम समजत नाहीत किंवा क्लिष्ट आहेत म्हणून नव्हे तर विसंगत आणि सदोष आहेत म्हणून त्यांत दुरुस्ती करावी,असा माझ्या लेखाचा हेतू आहे.

दिवाळी अंकाच्या निमित्ताने

दिवाळी अंक २०१२च्या निमित्ताने वरील प्रतिसादाचा उल्लेख आला होता. म्हणून श्री. कोल्हटकरांचा प्रतिसाद पुन्हा वाचला....

"गाढवहहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलं" : ही भावना कदाचित वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये वेगवेगळी असावी. माझे पूर्ण शिक्षण या शुद्धलेखन-सुधारानंतर झाले आहे. त्यामुळे वरील भावना माझ्यापाशी नाही. उलट "गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले" असे लिहिताना मला काही नुकसान झाल्यासारखे चुकचुकत नाही. (ब्रम्हचर्य-उपमेची वस्तू गेली आहे, खरी. परंतु ब्रम्हचर्य गेल्याबाबत शोक करणारा जिवंत माणूस मला आजतागायत भेटलेला नाही. त्यामुळे उपमेचा अर्थवाही परिणाम माझ्यावर होत नाही.)

(अवांतर : हा वाक्प्रचार कुठल्याशा मजेदार लोककथेवरून आला असावा. त्याबाबत फार कुतूहल वाटते. परंतु कथा माहीत नसताना जर मी वाक्प्रचार वापरला, तर अर्थ धारदार होण्याऐवजी बोथट होतो. कोणाला कथा माहिती असेल, आणि माझा वापर उपमा म्हणून गैरलागू असेल तर? वाक्प्रचारामुळे अर्थ स्पष्ट होण्याऐवजी गोंधळ होईल. म्हणून मी खुद्द हा वाक्प्रचार वापरत नाही.)

वरील प्रतिसादातील भावनेचा मी समर्थक नसलो, तरी विरोधक नाही. जुनी सवय उगाच कोण्या महामंडळाच्या आदेशाने बदलली तर गैरसोय होणारच. आणि त्या गैरसोयीबाबत तक्रार करणे योग्यच आहे. तरी काही विवक्षित मुद्द्यांबाबत मी असहमत आहे :

> ’ह्रस्व’ हा तत्सम शब्द ’र्‍हस्व’ अशा चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे. नियमाचे चित्र पहा.
> येथे ह्रस्व-दीर्घाचा काहीच प्रश्न नाही, शब्द सरळसरळ संस्कृत आहे.
ह्रस्व हा संस्कृत आणि तत्सम शब्द आहे, खरा. परंतु तो मराठीत प्रचलित नाही. तद्भव "र्‍हस्व" (चित्रातल्यासारखा लिहिलेला, आणि जोडाक्षर-नव्हे-तर-महाप्राण उच्चारलेला) शब्द मराठीत अधिक प्रचलित आहे. संस्कृतात ह्+व्यंजन अशी जोडाक्षरे पुष्कळदा दिसतात. प्राकृत-आधुनिक भाषांमध्ये या वर्गातली जोडाक्षरे बहुधा वर्ज्य आहेत. या सर्वांत वर्णविपर्याय होऊन व्यंजन+ह् असे जोडाक्षर आलेले आहे. लेखनाच्या संकेतांत ही जोडाक्षरे श्रवणप्रत्ययी लिहिण्याचा संकेत महामंडळाच्या आधीपासून आहे. म्हणजे चिन्ह, ब्राम्हण, र्‍हस्व, मध्यान्ह, र्‍हस्व, वगैरे. बहुधा दामल्यांच्या पुस्तकातही हा तपशील सापडतो. "ब्रह्म" हा शब्द मंगलार्थक संदर्भात उच्चारभिन्न संस्कृतासारखा लिहिण्याचा प्रघात आहे. प्रयोगशरणा नियामका: । म्हणून तो तसाही लिहायची मुभा आहे.

> मला स्वत:ला हे कळत नाही की थोडा प्रयत्न केल्यावर मति (मती नाही),
> कवि (कवी नाही) कुलगुरु (कुलगुरू नाही) हे लक्षात ठेवणे अवघड का वाटावे?
> उच्चारानुसारित्वानुसार मति, कवि, कुलगुरु हे शब्द आपओआपच तसे लिहिले
> जातात आणि हे उच्चार प्रयत्नसाध्य आहेत.
येथे "उच्चार प्रयत्नसाध्य आहेत" ही बाब महत्त्वाची. पतंजलि म्हणतो :

(पस्पशाह्निक) यल्लोके ... शब्दान् प्रयुञ्जते । न एषाम् निर्वृत्तौ यत्नम् कुर्वन्ति । ... घटेन कार्यम् करिष्यन् कुम्भकारकुलम् गत्वा आह कुरु घटम् । कार्यम् अनेन करिष्यामि इति । न तद्वत् शब्दान् प्रयोक्ष्यमाणः वैयाकरणकुलम् गत्वा आह । कुरु शब्दान् । प्रयोक्ष्ये इति ।

(ढोबळ अनुवाद) जसे लोकांत शब्द वापरतात... हे (शब्द) पुरेपूर वापरायला यत्न करत नाहीत. ... घड्याने कार्य करू जाणारा कुंभाराघरी जाऊन म्हणतो "घडा बनव. याने कार्य करेन." त्याप्रमाणे शब्दांचा उपयोग करणारा वैयाकरणाच्या घरी जाऊन म्हणत नाही. "बनव शब्द. (मग) मी वापरेन."

उच्चाराच्या बाबतीत यत्न होत नाही - प्रयत्ननैव साध्य असे काही नसते. हे पतंजलीचे म्हणणे आजही तितकेच खरे आहे. लिपी आणि लेखन मात्र प्रयत्नसाध्य आहेत. त्यांचे संकेत परिश्रम घेऊन कोणी शिकावेत असे कोणी म्हटल्यास ठीक आहे. परंतु तुमचा उद्धृत मुद्दा उच्चार प्रयत्नसाध्य असण्याबाबत आहे. तो ठीक नाही.

>(पर्याय अ) ज्यांना हे उच्चार अवघड वाटतात त्यांना ’थोडा बुद्धीला अजून ताण द्या’ असे सांगण्याऐवजी
> (पर्याय आ) ज्यांना हे सहजसाध्य वाटते त्यांनाहि ’कवि नाही, कवी’ असे unlearning ... करायला
> (का) सांगितले जात आहे?
पर्याय अ जवळजवळ अशक्य आहे, हे पतंजलीपासून आधुनिक भाषा अभ्यासक ओळखेल. पर्याय आ बाबत ज्यांना unlearning करावे लागते आहे, ते लोक तक्रार करणार, हे मी समजू शकतो. म्हणूनच मी प्रतिसादातल्या भावनेचा विरोधक नाही. परंतु मागल्या पिढीत प्रयत्नसाध्य कित्ता गिरवल्यामुळे उच्चारावेगळे लिहायला शिकलेल्यांकडून unlearning शक्य कोटीतला पर्याय आहे. वाटेल त्या कसरती करून काही यादृच्छिक संकेत ते शिकू शकतात, हे त्यांनी दाखवून दिलेलेच आहे. अशक्य पर्याय आणि शक्यता सिद्ध झालेला पर्याय असे समोर ठेवल्यास शक्य पर्याय निवडणे साहजिक आहे.

> शिक्षण हे प्रयत्नानेच घ्यावे लागते असे ठामपणे म्हणायला आपण कधी सुरू करणार?
स्मितहास्य करून म्हणतो : प्रयत्नाने unlearning करू लागणे हिताचे आहे.

साहित्य महामंडळाने केलेले सुधार अर्धवट आहेत. काही बाबतीत मागच्या पिढीच्या सवयींना राखले आहे, आणि काही बाबतीत वर्तमान पिढीची सोय साधली आहे. श्री. कोल्हटकरांच्या मते यामुळे दोन्ही हेतू असफल झाले आहेत. त्यांचे असे म्हणणे कोड्यात पाडणारे आहे. आदली आणि वर्तमान दोन्ही पिढ्यांची अर्धी-अर्धी सोय झाली, म्हणजे कोणाची काहीच सोय झाली नाही, असे थोडेच असते? उलट समाजातील बदलांमध्ये असे समन्वय साधणारे टप्प्या-टप्प्याचे बदल आपल्याला पुष्कळदा दिसतात. मागच्या पिढीचे समूळ उच्चाटन करून पुढच्या पिढीचेच सर्व साधणारी क्रांती क्वचित दिसते. त्यामुळे "गाढवहि गेलं आणि बह्मचर्यहि गेलं" या उपमेचा ढोबळ अर्थ मी समजून घेतला, तरी मला उपमा गैरलागू वाटते. सर्वांचे सर्व नुकसान झालेले नाही, तर काही अंशी सर्वांची सोय झालेली आहे.

- - -
प्रतिसादातील काही मुद्दे मला पटलेले आहेत. उदाहरणार्थ, मराठीमध्ये समास हा प्रकार नीट अभ्यासला गेलेलाच नाही. आणि त्यामुळे समासांच्या लेखनाचे संकेत घडवण्याबाबत गोंधळ होणे प्राप्तच होते. हे ठीक नाही. वगैरे. परंतु सहमतीच्या मुद्द्यांपेक्षा असहमतीच्या मुद्द्यांबाबत अधिक स्पष्टीकरण देणे मला प्रशस्त वाटले.

राजेश देबडवार

राजेश देबडवार यांच्या लेखातील बहुतेक मुद्दे मुद्दे अगदी पटण्यासारखे आहेत. कुठलीही भाषा तिच्या शक्य तितक्या मूळ स्वरूपात व्यक्त व्हायला हवी; याचा अर्थ भाषेची प्रगती रोखावी असा नव्हे. सद्य काळात सर्वच भाषांची- विशेषतः प्रसारमाध्यमांतून- जी हेळसांड सुरु आहे ती पाहून विषाद वाटतो.
हे विचार केवळ उपक्रमावरील चर्चेपुरते मर्यादित राहू नयेत यासाठी काय करता येईल?

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

धन्यवाद

श्री. वामन देशमुख यांचे लेख वाचल्याबद्दल मी आभार मानतो.

लेखकाचे नांव श्री. राजेश मुखेडकर असे आहे. ते नांदेड येथे राहतात. इमेलचा पत्ता त्यांचा नाही. त्यांना अजून संगणक व्यवस्थित हाताळता येत नाही. ते संगणकाचा सराव करीत आहेत. अजूनतरी, ते इतरांची मदत त्याबाबत घेत असतात.

मराठी भाषा

प्रसारमाध्यमातील मराठी सुधारल्यास आपोआपच वाचकांची भाषाही सुधारेल.

चांगला लेख

मुखेडकरांचा लेख वाचते आहे. जितका वाचला तितका आवडला आणि बराचसा पटण्यासारखा आहे. वर कोल्हटकरांनी म्हटल्याप्रमाणे दोष मराठी भाषेला न लावता मराठी भाषेतील "शुद्ध"* नव्हे प्रमाणलेखनाला लावायला हवा.

इंग्लीश शब्दांबाबतचा घोळ तर नेहमीचा आहे. इमेल हा शब्द पुल्लिंगी की स्त्रीलिंगी? काही जण 'तुमचा इमेल आला' म्हणतात तर बरेचजण 'तुमची इमेल आली' म्हणतात. इमेल ही बायकी किंवा पुरुषी आहे हे कसे ठरवले? खुद्द इंग्रजीत 'सेंड इट टू माय जीमेल आयडी' हा शब्द पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी नाही. मराठीत का म्हणून 'इमेल आलं/ आले' म्हणू नये? असे प्रश्न आहेतच.

* शुद्ध हा शब्दच ब्राह्मणी आहे असा आक्षेप येथे घेता येतो. आम्ही बोलतो ते शुद्ध आणि बाकीचे अशुद्ध ही विचारसरणी सोडून प्रमाण आणि अप्रमाण असे वापरण्यास सुरुवात केल्यास वर्णव्यवस्थेचा जहालपणा कमी होईल काय?

अर्ध-मुर्ध थँक्यू!

लेख वाचायला घेतलात त्याबद्दल मी आपला आभरी आहे. त्या लेखाचे वाचन आपल्याकडून पूर्ण व्ह्यावे, हि इश्वरचरणी प्रार्थना करतो.

मुंबईत म्हणा कि महाराश्ट्रात म्हणा, 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!' हा चित्रपट पाहून अनेकांनी आपले पडके वाडे, घरे, चाळी बिल्डरशी संधान बांधून, मोडीत काढत त्या जागी नवीन, नव्या सुखसुविधांनी सजलेली घरकुले, इमल्यावर इमले चढवत बांधून घेण्याचा सपाटा लावला आहे. मराठी असो वा इंग्रजी ह्या भाशांच्या व्याकरणाच्या मांडणीचे देखील तसेच होवू लागले आहेत. ह्या मांडण्या जून्या वळणाच्या, जिर्ण होत चाललेल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन मांडण्या आरेखीत होवून त्यांच्या जागा घेतल्या गेल्या पाहिजेत.

रोगाचे निदान योग्य झाले की त्यावर उपचार देखिल योग्य होवू शकतो.

मुखेडकरांचा लेख वाचला, पटला

मुखेडकरांचा लेख वाचला. सर्व मुद्दे पटण्यासारखे वाटले.

मराठी बोलण्यात "तत्सम" असे काही वेगळे कळून येते, याबाबत मी साशंक आहे. त्यामुळे "तत्सम" शब्दांकरिता वेगळे नियम ही फक्त ऐतिहासिक नियमांशी केलेली तडजोड आहे. तडजोडी या सुरुवातीला सोयिस्कर असतात, आणि आवश्यकही असतात. ऐतिहासिक काळातले नियम जसे आता दोन पिढ्या मागे पडले आहेत, तर त्यांच्याशी केलेली तडजोड आता गैरसोयीची झाली आहे, आणि तडजोडीची आवश्यकता चिंत्य आहे.

श्री. रावले आणि श्री. मुखेडकर यांची मते जुळतीलच असे काही वाटत नाही. मुखेडकर सध्याच्या शुद्धलेखन नियमांतील अनेक दोष सांगून अनेक सुधारणा सुचवतात. पण त्यानंतर ते म्हणतात :

मराठी महामंडळाचे नियम सदोष आहेत, त्यात संदिग्धता आहे, वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळा न्याय आहे व त्यामुळे लिहिणार्‍याच्या मनात संभ्रम निर्माण होतो आहे, ही बाब खरी असली, तरी त्यात दुरुस्ती होईपर्यंत ते काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

यापुढे श्री. मुखेडकर हिरिरीने हे मत विशद करतात - म्हणजे हे त्यांचे मत सखोल रुजलेले आहे. श्री. रावले यांचे मत याच्या विपरित आहे, आणि नव्या, दोष-कमी-केलेल्या शुद्धलेखनांचे नियम स्वतः वापरून लेखन करण्यात त्यांचा प्रामाणिकपणासुद्धा अगदी स्पष्ट आहे.

सर्वश्री रावले आणि मुखेडकर यांची जोडीदारी जमली, तर काही विलक्षण आणि सकारात्मक कृती होऊ शकेल - सहमत आहे.

तत्सम शब्द

माझ्यामते ज्याला संस्कृतची फारशी ओळख नाही त्याला तत्सम शब्द कळून येत नाही. किंबहुना, म्हणूनच शुद्धलेखनात हा वेगळेपणा असावा. किंवा वेगळ्या वळणाने, ज्याला तत्सम शब्द कसा लिहायचा तो कळतो तो तथाकथित भाषा-ब्राह्मण असे दाखवणे शक्य असावे.

अरबी-फारसी शब्द मराठीत रुळलेले आहेत. त्या शब्दांना नुक्ता लागतो. असा नुक्ता वापरणे हा शुद्धलेखनाचा नियम मराठीत नाही. त्यामुळे अनेक परदेशी शब्दांचे उच्चार करताना नवशिक्यांची (विशेषतः ज्यांना भारतीय भाषांची खूप जवळून ओळख नाही) तारांबळ उडते असा अनुभव आहे.

मराठी भाषा

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.जोपर्यन्त नियमांत दुरुस्ती होत नाही तोपर्यन्त आहेत तेच नियम काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे,याचा अर्थ नियमांत विसंगती नाही असा नाही .नियम सदोष आहेतच. परंतु,भाषा नियमबद्ध नसेल तर प्रत्येक जण मनाप्रमाणे लिखाण करील व त्यामुळे आणखीनच गोंधळ उडेल.

धन्यवाद

श्री. धनंजय, लेख वाचून आपण प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

माझी जोडीदारी (हिं:सांझेदारी) कोणत्या व्यक्तीशी होते? त्यांच्याशी मते जुळतात कि नाही? हे मला महत्त्वाचे वाटत नाही. मराठी भाशेच्या विकासासाठी मराठीच्या लिपी तसेच व्याकरणाच्या मांडणीत सुधारणा व्हावी असे मनापासून वाटणार्‍या व त्या हेतूने प्रामाणिकपणे आभ्यास करणार्‍या मंडळीं सोबत मला माझा अभ्यास तपासून पहायचा आहे. अशी मंडळी माझ्या नजरेस पडली तर मी स्वतःहून अशा लोकांशी मैत्री करू इच्छितो.

तसेच जर पुरेसा अभ्यास न करता, मन शुद्ध व व्यापक न करता मराठीच्या नावाने केवळ प्रसिद्धीला हपापलेली मंडळी माझ्या संपर्कात आली, समोर आली तर मराठीच्या प्रेमाखातर मी त्यांचा पाणउतारा करून त्यांना हतोत्साही करायला देखील मागे पुढे पहायचो नाही.

प्रमाणलेखन

माझा वरचा प्रतिसाद मी अधिक 'टोकदार' करतो.

नियम ५.१ नुसार 'कवि', 'गुरु' हे मूळचे संस्कृत भाषेतील शब्द हे मराठी प्रमाणलेखनात 'कवी', 'गुरू' असे लिहायला हवेत.

मला हे मान्य नाही कारण मी 'कवि'चा उच्चार 'कवि' असाच करतो, 'कवी' असा कधीहि करत नाही. हा उच्चार मला संपूर्णतया नैसर्गिक वाटतो आणि हा उच्चार नियम ५.५ लाहि मान्य आहे. असे असता मी नियम ५.१ साठी तो योग्य उच्चार का सोडावा हे मला कळत नाही.

कोणी नियम ५.१ मागची प्रेरणा मला स्पष्ट करून सांगू शकेल काय?

अमुकएक उच्चार वा नियम बहुसंख्यांना समजत नाही म्हणून तो प्रमाणभाषेतून वगळूनच टाकावा अशी मागणी इंग्रजी वा अन्य पाश्चात्य भाषांमध्ये कानावर पडत नाही. आपल्याकडेच ही सवलत का मागितली जाते?

ओल्ड स्कूल

मला हे मान्य नाही कारण मी 'कवि'चा उच्चार 'कवि' असाच करतो, 'कवी' असा कधीहि करत नाही.

ओल्ड स्कूलनुसार कवि वगैरे उच्चार होत असावे परंतु मी नेहमी कवी आणि गुरू असेच उच्चार करते आणि बहुसंख्य त्याप्रमाणेच उच्चार करत असावे कारण माझ्या शिक्षणात आणि वाचनात हे शब्द दीर्घान्तच लिहिले गेले आहेत.

अमुकएक उच्चार वा नियम बहुसंख्यांना समजत नाही म्हणून तो प्रमाणभाषेतून वगळूनच टाकावा अशी मागणी इंग्रजी वा अन्य पाश्चात्य भाषांमध्ये कानावर पडत नाही.

इतर भाषांचे माहित नाही आणि मी जाणकारही नाही तेव्हा चू. भू. द्या घ्या पण इंग्रजीतील उच्चार देशागणिक बदलतात. उच्चारांसोबत स्पेलिंग बदलही होतात. इंग्लीशमध्ये देशानुसारस्पेलिंग बदल आहेत आणि ते मान्यही झालेले आहेत.

सुशिक्षितांचे लेखन हेच प्रमाण लेखन

<इतर भाषांचे माहित नाही आणि मी जाणकारही नाही तेव्हा चू. भू. द्या घ्या पण इंग्रजीतील उच्चार देशागणिक बदलतात. उच्चारांसोबत स्पेलिंग बदलही होतात. इंग्लीशमध्ये देशानुसारस्पेलिंग बदल आहेत आणि ते मान्यही झालेले आहेत.>

मी येथे दिलेल्या शीर्षकाकडे पाहून आपल्या ध्यानात आलेच असेल की मी चर्चाविषयाच्या केंद्रस्थानी भाषेऐवजी लेखनाला स्थान दिले आहे. भाषेच्या उच्चारणामध्ये देशपरत्वे आणि शिक्षणपरत्वे बदल असतोच पण तो लिखाणात कितपत उतरावा, शुद्धलेखन (अधिक अन्वर्थक शब्द प्रमाणलेखन) कसे असावे हा चर्चेचा खरा मुद्दा आहे. भाषेचे उच्चारण बोलत्या क्षणीच नष्ट होते आणि ते बोलल्या जाण्याच्या स्थानापुरतेच मर्यादित असते पण लेखन हे स्थलकालनिरपेक्ष असते आणि म्हणून त्याला काही प्रमाण असणे आवश्यक आहे.

इंग्रजी आणि रशियन ह्या दोन भाषांची मला बर्‍यापैकी ओळख आहे. इंग्रजीत neighbour-neighbor, colour-color, aluminium-aluminum अशा प्रकारचे predictable आणि अगदी मोजके फरक अमेरिकन आणि इंग्लिश लिखित इंग्रजीमध्ये आहेत. असे अपवाद सोडता इंग्लंड आणि अमेरिकेतील सुशिक्षितांच्या लिखाणात काहीहि वेगळेपणा दिसत नाही. (लंडन टाइम्समधील लेख जसाच्या तसा उचलून न्यूयॉर्क टाइम्समध्ये टाकला आणि त्यात colour-color सारखे अपवादात्मक भेद अनुपस्थित असले तर अमेरिकन वाचकांना तो लेख मूळचा लंडनमध्ये लिहिलेला आहे हे कळणार नाही.) त्यांचे उच्चार marginally वेगळे असतात हे खरे पण त्या वेगळेपणाचा लिखित इंग्रजीवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.

रशियन भाषेमध्ये १९१७च्या क्रान्तिपूर्व काळात असलेले काही स्वर आणि व्यंजने सुलभीकरणासाठी काढून टाकण्यात आली. तदनंतर ही भाषा जुन्या सोवियत संघामध्ये आणि मंगोलियासारख्या रशियन छत्राखालच्या देशामध्ये अधिकृत भाषा म्हणून पसरली. सर्वत्र मॉस्कोचे रशियन हेच प्रमाण मानले जात असे/जाते.

क्यूबेकचे फ्रेंच पॅरिसच्या फ्रेंचपेक्षा बोलण्यात वेगळे असते तरीहि दोन्ही ठिकाणच्या लिखित फ्रेंचमध्ये फरक नाही.

ह्या सर्व उदाहरणांमध्ये सुशिक्षितांच्या लेखनालाच प्रमाण लेखनाचा दर्जा आहे. ते सुशिक्षित इंग्लंडमध्ये असले काय किंवा अमेरिकेत असले काय, एकच प्रमाणलेखन करतात. शिक्षणाच्या प्रारंभीच्या काळात खूप नवशिक्यांना इंग्रजी स्पेलिंग्ज अवघड वाटतात. हे इंग्लंड-अमेरिकेतहि खरे आहे. तरीहि ती स्पेलिंग्ज त्यांना शिकावीच लागतात, सोपीकरणासारखी काहीहि सवलत त्या बाबतीत मिळत नाही. शिक्षण आणि वाचन-लेखन वाढले की तीच अवघड स्पेलिंग्ज अंगवळणी पडतात हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे.

प्रतिसाद

इंग्रजीत neighbour-neighbor, colour-color, aluminium-aluminum अशा प्रकारचे predictable आणि अगदी मोजके फरक अमेरिकन आणि इंग्लिश लिखित इंग्रजीमध्ये आहेत. असे अपवाद सोडता इंग्लंड आणि अमेरिकेतील सुशिक्षितांच्या लिखाणात काहीहि वेगळेपणा दिसत नाही.

मी वर दुवा दिला आहे त्यातून असे शब्द किती त्याचा अंदाज लागेल. ते मोजके असावेत हे खरेच पण मराठीतही आपण १०-१५ हजार शब्दांचाच विचार करत आहोत. त्यापैकीही अनेकजण आता कवि हा शब्द कवी असा लिहितात (कारण तो तसाच शिकवला गेला आहे) तर गीता हा शब्द गीता असाच लिहितात.

मराठीत उच्चारानुसार लेखन चालते हे खरे असल्यास चंद्र-चमचा, जीव-जहाज आणि अशाप्रकारच्या अनेक शब्दांचे उच्चार वेगळे आहेत. त्यांच्यातील फरक दाखवण्यासाठी कोणत्याही प्रमाणचिन्हांचा वापर केला जात नाही. माझ्यामते इंग्रजी असो किंवा मराठी दोन्ही भाषा १००% उच्चारांप्रमाणे लिहिता येत नाहीत. इंग्रजीत हा फरक प्रामुख्याने जाणवतो तर मराठीत त्यामानाने कमी जाणवतो इतकेच.

ह्या सर्व उदाहरणांमध्ये सुशिक्षितांच्या लेखनालाच प्रमाण लेखनाचा दर्जा आहे. ते सुशिक्षित इंग्लंडमध्ये असले काय किंवा अमेरिकेत असले काय, एकच प्रमाणलेखन करतात. शिक्षणाच्या प्रारंभीच्या काळात खूप नवशिक्यांना इंग्रजी स्पेलिंग्ज अवघड वाटतात. हे इंग्लंड-अमेरिकेतहि खरे आहे. तरीहि ती स्पेलिंग्ज त्यांना शिकावीच लागतात, सोपीकरणासारखी काहीहि सवलत त्या बाबतीत मिळत नाही. शिक्षण आणि वाचन-लेखन वाढले की तीच अवघड स्पेलिंग्ज अंगवळणी पडतात हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे

याच्याशी सहमती आहेच परंतु हे होताना तत्सम शब्दांचे सुलभीकरण करूच नये आणि परदेशी शब्दांना मात्र त्या-त्या प्रमाणचिन्हांनुसार लिहू नये हे पटत नाही.

चर्चेचा दुसरा टप्पा

श्री. कोल्हटकरांचा वरील (शुक्र, 03/09/2012 - 04:20) प्रतिसाद आल्यानंतर चर्चा दुसर्‍या टप्प्यात सरकली आहे असे आपण म्हणू शकतो.

मी मुखेडकरांचा लेख येथे वाचनास सादर करताना त्यासाठी एक व्यापक पार्श्वभूमी तयार करून सादर केली होती. त्या पार्श्वभूमीच्या रेखाटनात मराठी भाशेच्या व्याकरणाचा इतिहास काय होता, हे सांगत आजच्या काळातील त्रूटी नेमक्या कोणत्या बाबींवर बेतलेल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मुखेडकरांचा लेख हा १९६० साली जो शुद्धलेखनाच्या कायद्यासंदर्भातील आहे. त्या कायद्यातील नियम विसंगत आणि सदोष आहेत म्हणून त्यांत दुरुस्ती व्हावी, असा त्यांच्या लेखाचा हेतू आहे. नियमातील विसंगती व सदोशपणा कशामुळे आला असावा हे जाणून घेण्याची इच्छा श्री. कोल्हटकरांची आहे. पण हे सांगत असताना त्यांनी मात्र स्वतःच त्या प्रश्नाचे उत्तर नकळत देऊन ठेवले आहे.

ते म्हणतात....
"अमुकएक उच्चार वा नियम बहुसंख्यांना समजत नाही म्हणून तो प्रमाणभाषेतून वगळूनच टाकावा अशी मागणी इंग्रजी वा अन्य पाश्चात्य भाषांमध्ये कानावर पडत नाही. आपल्याकडेच ही सवलत का मागितली जाते?"

श्री. कोल्हटकर हे कोल्हटकर नसते ते
श्री. रफिक मुजावर असते तर त्यांनी कसा प्रतिसाद दिला असता....
"ह्या भारतवर्शावर एकेकाळी उर्दुने राज्य केले होते. भारतातील् अनेक भाशांवर उर्दुचा प्रभाव देखील आहे. मग उर्दुचे जे वेगवेगळे अल्फाज आहेत, ते मराठीत का बरे येवू नये? तसेच लिखाणात देखील त्यांचे स्पश्टरीत्या वेगळेपण दाखवण्याची सोय का बरे असू नये? आमच्या संस्कृतीचा देखील मराठी भाशेवर, लिपीवर ठसा उठायला नको कां? अमुकएक उच्चार वा नियम...."

जर ते श्री. बुद्धभुशण गायकवाड असते तर त्यांनी कसा प्रतिसाद दिला असता....
"पाली हि एक प्राचिन व प्रगत भाशा होती. ती आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. तिच्यातील ज्या काही चांगल्या गोश्टी आहेत त्या मराठी भाशेतून, व्याकरणाच्या नियमातून व्यक्त व्हायलाच हव्यात. अमुकएक उच्चार वा नियम..."

कोल्हटकर हे एखाद्या आदिवासी बोली असलेल्या कुटुंबातील असते, ते मालवणातले असते, ते अहिराणी बोलीभाशा असलेले असते तर त्यांनी कसा प्रतिसाद दिला असता?????

हा सगळा फाफटपसारा ह्यासाठी लिहीला कि, मराठी भाशेच्या व्याकरणाच्या विशयात 'यम' ह्या स्तरावर चूका झालेल्या आहेत हे सांगायचे आहे. अश्टांग योगात यम हा स्तर असतो - 'ज्यांचे नियमन करायचे आहे त्या पूर्वचिंतनातून स्पश्ट झालेले मुद्धे' ध्यानात घेण्याबाबतचा असतो.
(keeping focused on predefined points to be controled)
लफडा इधरीच है| त्यावर आधारलेले नियम त्यामुळे चूकीचे झालेले आहेत.
कारण...
नियम: हा स्तर असतो - 'कसे नियमन करायचे?' (how to control) या बाबतचा

भाशेच्या व्याकरणाचे नियम कशासाठी ठरवले जायला हवेत?
- हा एक प्रश्न मला यम ह्या स्तरावरचा सापडलेला आहे. आपण चर्चेच्या ह्या दुसर्‍या टप्प्यात यम ह्या स्तरावरचे अजून काहि प्रश्न शोधून काढुया कां?

मराठी भाषा

माझ्या लेखाचा मूळ उद्देश नियमांतील विसंगती व त्यामुळे होणारे लेखनदोष,हा आहे.चर्चेचा केंद्रबिंदू तोच असावा,ही अपेक्षा.परभाषेतील कोणताही शब्द मग तो तत्सम असो वा इंग्रजी,अरबी,तेलगू,फारसी;त्य सर्व शब्दांना मराटीचे नियम लागू झाले पाहिजेत,तरच नियमांचा योग्य वापर करता येईल.वेगवेगळ्या भाषांतील शब्दांसाठी वेगवेगळे नियम असतील तर त्या शब्दांवर शुद्धलेखनाची प्रक्रिया चालविण्यासाठी त्या शब्दांच्या उत्पतीपर्यंत जावे लागेल.म्हणजेच शुद्ध मराठी शिकण्यासाठी आधी अन्य काही भाषा शिकाव्या लागतील.त्यासाठी एक करावे लागेल,शाळेत पहिली ते दहावीपर्यंत अन्य विदेशी भाषा शिकवाव्या लागतील आणि त्यानंतर मग मराठी शिकवावी लागेल.

काहि गोश्टी गृहित धरलेल्या...!

माझ्या लेखाचा मूळ उद्देश नियमांतील विसंगती व त्यामुळे होणारे लेखनदोष,हा आहे.चर्चेचा केंद्रबिंदू तोच असावा,ही अपेक्षा.

सामुहिक स्तरावर जेंव्हा आपण कोणत्याही विशयावर चर्चा करतो, तेंव्हा त्या चर्चेला एक दिशा, कालावधी व एक चौकट या गोश्टींची मर्यादा अदृश्यपणे लागू असते. मी फक्त एवढ्यावरच बोलेन, चर्चेसंदर्भात माझी हिच अपेक्शा आहे, ती नाही, अशी भुमिका घेणे ती चर्चा फलद्रूप होण्यास उपयोगी नसते.

श्री. कोल्हटकर यांनी संस्कृतला आधारभूत मानून अमुक एक उच्चार, अमुक एक नियम जो संस्कृतला लागू होतो तो प्रमाण मानला जावा असे अप्रत्यक्श म्हटले आहे. 'संस्कृत' चा सदर्भ त्यांच्याकडून गृहित धरला असावा असे मी गृहित धरून चर्चा दुसर्‍या स्तरावर सरकली आहे असे म्हटले.

श्री. मुखेडकर म्हणतात,

इंग्रजी,अरबी,तेलगू,फारसी;त्य सर्व शब्दांना मराटीचे नियम लागू झाले पाहिजेत,तरच नियमांचा योग्य वापर करता येईल.

येथे मराठीचे नियम म्हणजे कोणते नियम? हे त्यांनी स्पश्ट केले नाही. मी 'मराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था' हा त्यांचा लेख मराठी भाशेच्या समस्यांमधील अजून एक समस्या मुखेडकरांना समजली ती येथील वाचकांना कळावी ह्या हेतूने तो लेख वाचण्यास विनंती केली होती. तो लेख सादर करताना इतिहासाचा एक तुकडा देखील मी सादर केला होता. त्या तुकड्यावरून 'मराठी भाशेच्या व्याकरणाचे नियम, त्यांची मांडणी' हे इंग्रजीच्या त्या काळातील व्याकरणाच्या नियमांच्या उपलब्ध पुस्तकावरून बेतलेले होते हे सांगू पाहत होतो. ज्यांनी हि कारागारी केली, सुतारकाम गेले, गंवडीकाम केले ती मंडळी संस्कृत भाशेचे जाणकार होते. ह्या गवंड्यांकडून केवळ एका छोट्या घराचा पाया रचला गेला होता, स्वातंत्र काळानंतर त्याच छोट्या घराच्या पायावर दुमजली घर बांधण्यात आले. मात्र दुमजली घर बनवताना त्याच्या पाया बदलला गेला नव्हता.

वरच्या मजल्यावर नव्या काळातील गवंड्यांकडून ज्या चूका झाल्या केवळ तेवढ्याच चूकांबद्दल येथे बोलावे अशी अपेक्शा सामुहिक चर्चा करताना, ती चर्चा पुढे सरकली असताना धरणे योग्य आहे कां?

भाषा

चुकीचे व विसंगत नियम लेखनदोषांचे मूळ कारण आहे.नियमांत दुरुस्त्या झाल्या तर बहुतांश चुका टळतील.त्यामुळे या मुद्द्यावर प्राधान्याने चर्चा व्हावी,या माझ्या म्हणण्याचा हेतू इतर मुद्द्यांवर चर्चा होऊ नये,असा अजिबात नाही हे स्पष्ट करतो.कृपया गैरसमज होऊ देऊ नये.या निमित्ताने भाषेच्या विविध पैलूंवर ऊहापोह होत असेल तर ती आनंदाचीच बाब आहे. दुसरा मुद्दा:मराठी शुद्धलेखनाचे जे नियम आहेत ते तत्सम,तद्भव,देशी व परभाषी शब्दांना समान आदेशाने लागू होत नाहीत.बहुतांश नियम तत्सम शब्दांना लागू होत नाहीत.मी त्या नियमांबद्दल बोललो होतो.माझ्या मूळ लेखात हा मुद्दा सविस्तरपणे मांडलेला आहे.

मी माझी भुमिका बदलत आहे.

श्री. मुखेडकर,
मी आपल्या मताचा मान राखत माझी ह्या चर्चेपूरती स्वतःच स्वतःहून स्विकारलेली भूमिका बदलत आहे. मी माझी 'कॅप्टन ऑफ द शीप' हि भुमिका सोडून 'एक अभ्यासक समन्वयी' अशी भूमिका स्वीकारतो.

ह्या कारणास्तव, माझा 'चर्चेचा दुसरा टप्पा (शुक्र, 03/09/2012 - 18:59) हा प्रतिसाद ह्या चर्चेतून 'अस्थानी असल्यामुळे' बाद ठरवला जावून त्याकडे दुर्लक्श व्हावे, अशी वाचकांना विनंती करतो.

मला न समजलेलं, मला कोणी समजवेल कां?

श्री. मुखेडकरांनी त्यांच्या लेखाद्वारे शुद्धलेखनाच्या नियमांबाबत आपले विचार मांडले. त्या लेखावर येथील वाचकांकडून प्रतिसाद देखील मिळाला.
'चर्चा करणे' म्हणजे केवळ 'स्वतःचे सांगणे' नसते. 'दुसर्‍याचे ऐकणे' हा भाग ही त्यात येतो. मला स्वतःला मात्र काहि गोश्टी कळल्या नाहीत त्या मी जाणून घेवू इच्छितो.

ज्या प्रतिसादांमधल्या ज्या गोश्टी किंवा वाक्यांमधला अर्थ, त्या वाक्यांमागचा संदर्भ मला कळला नाही ते मी बटबटीत करून पुन्हा मांडत आहे. कृपया त्या प्रतिसादकांकडून व श्री. मुखेडकरांकडून मला त्यांचा अर्थ विशद करून सांगितला जावा हि विनंती मी करित आहे!

१) श्री. धनंजय (गुरू, 03/08/2012 - 14:57)
-मराठी बोलण्यात "तत्सम" असे काही वेगळे कळून येते, याबाबत मी साशंक आहे. त्यामुळे "तत्सम" शब्दांकरिता वेगळे नियम ही फक्त ऐतिहासिक नियमांशी केलेली तडजोड आहे. तडजोडी या सुरुवातीला सोयिस्कर असतात, आणि आवश्यकही असतात. ऐतिहासिक काळातले नियम जसे आता दोन पिढ्या मागे पडले आहेत, तर त्यांच्याशी केलेली तडजोड आता गैरसोयीची झाली आहे, आणि तडजोडीची आवश्यकता चिंत्य आहे.
----
ऐतिहासिक नियम म्हणजे कोणते नियम? १८२२ आधी मराठी भाशे संबंधित ऐतिहासिक नियम लिहीले गेले होते का? लिहीले तर ते कोणी लिहीले होते?

२) अरविंद कोल्हटकर (शुक्र, 03/09/2012 - 04:20)
मला हे मान्य नाही कारण मी 'कवि'चा उच्चार 'कवि' असाच करतो, 'कवी' असा कधीहि करत नाही. हा उच्चार मला संपूर्णतया नैसर्गिक वाटतो आणि हा उच्चार नियम ५.५ लाहि मान्य आहे. असे असता मी नियम ५.१ साठी तो योग्य उच्चार का सोडावा हे मला कळत नाही.
---
लिखाण/ टंकन हे उच्चारानुसारच व्हायला हवे असे येथे म्हटले आहे का? जर ते तसे आहे तर मग उच्चार कोणाचे आधारभूत म्हणून घ्यायचे? कोणाचे म्हणजे कोणत्या भूभागात राहणार्‍या व्यक्तीचे? कोणत्या बोलीभाशेत बोलणार्‍या व्यक्तीचे? कोणत्या प्राचिन भाशा जाणणार्‍या व्यक्तीचे? आणि तेच कां?

३) राजेश मुखेडकर (रवि, 03/11/2012 - 04:43)
चुकीचे व विसंगत नियम लेखनदोषांचे मूळ कारण आहे.नियमांत दुरुस्त्या झाल्या तर बहुतांश चुका टळतील.
--- ह्या प्रतिसादावरून चर्चा संपली, उत्तर सापडले असे म्हणावे कां? पण नियमांत दुरुस्ती करायची कशी, हे तर सांगितलेच नाही. जे विसंगत वाटते ते सुसंगत कसे करता येईल? सुसंगत करायचे म्हटले तर अनेकांची मते भिन्नभिन्न मते व्यक्त होतील. मग भिन्नभिन्न मतांमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी कोणती मोजपट्टी स्वीकारायची ते वरील प्रतिसादात दिलेच नाही आहे.

शुद्धलेखनाचे सध्याचे नियम कितपत आवश्यक आहेत?

<:मराठी शुद्धलेखनाचे जे नियम आहेत ते तत्सम,तद्भव,देशी व परभाषी शब्दांना समान आदेशाने लागू होत नाहीत.बहुतांश नियम तत्सम शब्दांना लागू होत नाहीत.मी त्या नियमांबद्दल बोललो होतो.>

मराठी भाषेचे देवनागरी लिपीतून मिळालेले एक सामर्थस्थळ असे आहे की मराठी लिखाण हे बहुतांशी ध्वन्यनुकारी आहे, जसे बोलतो तसेच आपण लिहितो. इंग्रजीसारखा but आणि put मधील u चा गोंधळ मराठीत नाही. (हेहि अर्थात् शंभर टक्के खरे नाही, कपाट मधल्या क आणि ट ह्यांच्या उच्चारात थोडा फरक आहेच पण सांप्रत चर्चेत हा मुद्दा विचारात नाही म्हणून त्याला बाजूस ठेऊ.) आता जर मराठी लेखन ध्वन्यनुकारी असले तर तोच 'डिफॉल्ट' असा अध्याहृत नियम असे मानून त्याच्याविरुद्ध जेथे काही अपेक्षित असेल तेव्हढयापुरतेच स्पष्ट नियम करायला हवेत. उदा. चेंडू वर फेकला की तो 'डिफॉल्ट' नियमाने खालीच येतो. त्याला वरच तरंगत ठेवायचे असले तरच काही खास व्यवस्था करावी लागते. चेंडूने खाली यावे, वर तरंगत राहू नये असा 'नियम' करण्याची आवश्यकता नसते.

हे एकदा मान्य झाले तर असे दिसेल की काही तथाकथित 'नियम' हे केवळ 'डिफॉल्ट'चे पुनरुच्चारण करीत आहेत, ते स्वतः काहीच नवीन निर्माण करीत नाहीत. उदा. नियम ६.१ म्हणतो की अन्त्य अक्षर दीर्घ असेल तर उपान्त्य अक्षर ह्रस्व हवे, जसे 'किडा', 'कीडा' नव्हे. येथे मला हे कळत नाही की 'किडा' हा शब्द 'किडा' असा लिहावा, 'कीडा' असा लिहू नये हे सांगायला नियम ६.१ ची गरज आहे का? कोणीही मराठी भाषिक हा शब्द 'कीडा' असा उच्चारतच नाही. उच्चारानुसार लिखाण करणारा कोणीहि मनुष्य तो शब्द 'किडा' असाच लिहील. तसे करतांना तो केवळ ध्वन्यनुकारित्व हा मार्गदर्शक त्याला पुरेसा ठरेल. तेथे तो नियमांचे पुस्तक उघडून नियम ६.१ काय सांगत आहे हे शोधण्याचा दीर्घसूत्री व्यापार करणार नाही. असे असेल तर नियम ६.१ चे अस्तित्व कशासाठी?

पण हा जावईनियम ६.१ निर्माण केल्यामुळे असाहि पुढील अपवाद नियम ६.२ घालावा लागतो की नियम ६.१ हा 'गीता', 'पूजा' ह्या तत्सम शब्दांना लागू नाही (कारण कोणीच 'गिता', 'पुजा') असे म्हणत नाही. आता हा संपूर्ण अनावश्यक नियम ६.१ आणि त्याचा अपवाद नियम ६.२ निर्माण केल्यामुळे मुखेडकरांना असे म्हणायची संधि मिळते की तत्सम शब्दांसाठी वेगळे नियम तयार केले जात आहेत! मुळातच नियम ६.१ चे बांडगूळ उगवू दिले नसते तर 'किडा' आणि 'गीता' हे शब्द उच्चारानुसारच 'किडा' आणि 'गीता' असेच लिहिले गेले असते, ते 'कीडा' आणि 'गिता' असे लिहू नयेत ही तंबी भरण्याची आवश्यकताच पडली नसती.

नियम ७.२ आणि ८.१ ही अशीच बांडगुळे निर्माण केली आहेत. त्यांची काहीहि आवश्यकता नव्हती आणि त्यामधून तत्सम शब्दांचे अपवाद बाजूस काढल्यामुळे तत्सम शब्दांसाठी काही वेगळी सोय लावली जात आहे असा आरोपहि निर्माण झाला नसता.

शुद्धलेखनाचे 'नियम' घालून देण्याच्या ह्या अव्यापारेषु व्यापारामधून हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. ह्या नियमांना दोन्ही बाजूंनी शिव्या पडत आहेत आणि मी वर म्हटल्याप्रमाणे 'गाढवहि गेलं आणि ब्रह्मचर्यहि गेलं' अशी स्थिति निर्माण झाली आहे. ह्या सतराशेसाठ नियमांऐवजी ऐवजी 'उच्चारानुसार जे लिखाण आहे ते शुद्ध' हा सरळधोपट नियम घातला असता तर सर्व वाद संपला असता.

आता हे उच्चार कोणाचे असा प्रश्न मला विचारला तर माझे उत्तर सरळ आहे. वर तो प्रश्न विचारलाहि गेला आहे. पुरेसे ग्रान्थिक लिखाण मराठीत उपलब्ध आहे. त्यात पाहून योग्य उच्चार कळतात. आपण येथे शुद्ध'लेखना'बाबत चर्चा करीत आहोत, स्थलकालपरत्वे बदलणार्‍या उच्चारांबाबत नाही. उपलब्ध ग्रान्थिक सामुग्रीमधून शुद्ध उच्चार पुरेसे स्पष्ट झालेले आहेत. येथे लोकशाहीला स्थान नाही. ज्याला शुद्ध लेखन करायची इच्छा आहे त्याने प्रयत्नाने हे ग्रान्थिक सामुग्रीत उपलब्ध असलेले उच्चार शिकूनच घ्यायला हवे, 'असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी' अशा मार्गाने हे साध्य होणार नाही. इंग्रजी मातृभाषा नसलेले कोटयवधि भारतीय गुंतागुंतीच्या इंग्रजी स्पेलिंगवर मात करून पूर्ण आत्मविश्वासाने इंग्रजी लिहू शकतात, तेथे कसलीहि सवलत मागत नाहीत. त्यांना तत्सम म्हणजे मूळच्या संस्कृत शब्दांचे उच्चार थोडया अभ्यासाने आत्मसात् का करता येऊ नयेत?

(जाता जाता पुढील विचारांनाही थोडा स्पर्श करतो, यद्यपि त्याला मुख्य मुद्दा बनवीत नाही कारण ती वेगळीच चर्चा ठरेल. आजचे मराठी व्याकरण 'इंग्रजधार्जिणे' आणि 'पंडिती' आहे असा एक सूर मला रावलेंच्या लिखाणात जाणवतो. इंग्रजांनी काही नवी दिशा आपणास दाखविण्यापूर्वी आपण एतद्देशीयांनी येथे मराठीचे व्याकरण निर्माण करण्यासाठी एक बोटहि उचलले नव्हते. तरीहि इंग्रजांनी आपल्याला काही नवा सन्मार्ग दाखविला ह्यासाठी आपण त्यांनाच शिव्या घालणार हा खासा न्याय आहे! 'अ'पंडिती आणि संस्कृतकडे न बघता केलेले मराठी व्याकरण कसे असू शकेल ह्याबाबत काहीहि विचार रावलेंनी मांडलेले नाहीत. 'पंडिती' परंपरेच्या बाहेर असलेले व्याकरण कसे असू शकेल ह्याबद्दल रावलेंनी ठोस मार्गदर्शन केले तर त्यावर काही मत व्यक्त करता येईल.)

अवांतर...

मी माझी भूमिका ह्या चर्चेपूरती बदलली आहे. मी आता समन्वयक आहे.

चर्चेच्या दुसर्‍या टप्प्यात हाणामारी होते. जी व्यक्ती ह्या टप्प्यात पहिली मुसंडी मारते त्या व्यक्तीला दुसर्‍या टप्प्यात 'धुडगूस घालण्याचा परवाना' मिळतो.

हे आणि असे काहि नियम मला उपक्रमवरील बर्‍याच वास्तव्यामुळे माहित झाले आहेत. श्री. मुखेडकर हे नवखे असल्यामुळे अजूनही केवळ 'लेखात मी एवढेच लिहीले त्यामुळे तेवढेच बोलू यां.'असे पालूपद वाजवत असल्यामुळे त्यापुढे ते त्यांचे विचार, आभ्यास व्यक्त करण्याचे धजताना दिसत नाहीत. त्यांचा लेख मी सादर करून प्रतिसाद मागविला असल्यामुळे मला त्यामुळे धक्के सहन करावे लागतील हे मी मान्य करतो. पण जर मला एवढे कळतं तर मला ते धक्के ही सहन ही करता येवू शकतात, नाही का?

व्याकरण म्हणजे काय? हे महाराश्ट्रातील सामान्य जनतेला इंग्रजांमुळेच कळले. तोपर्यंत पंडित, शास्त्री बुवा मराठीसाठी काय करीत होते? माझा राग कोणावरही नाही, पण मराठीवर प्रेम मात्र आहे. काही गोश्टी पुढे रेटण्यासाठी धक्का दिला जातोच. नाही म्हटले तरी, काहि अंशी स्वार्थाच्या आधारावर मराठीचे व्याकरण आकारले गेले हे ऐतिहासिक सत्य आहे. इंग्रजांचा सगळाच हेतू शुद्ध वा अशुद्ध होता असेही नव्हते. तसेच पंडित, शास्त्रीबुवा 'पैशाच्या मोबदल्यात' आपण 'मराठी व्याकरणाचे घर' इंग्रजी पुस्कात लिहील्याप्रमाणे बांधले तर संस्कृतभाशा व त्यायोगे समाजावरील आपली पकड ढिली होईल, ह्याबाबत दूरदर्शी नव्हते. तुम्ही त्याच मुशीत घडलेले असल्यामुळे तुमच्याकडून नकळतपणे, 'माझा वरचा प्रतिसाद मी अधिक 'टोकदार' करतो. नियम ५.१ नुसार 'कवि', 'गुरु' हे मूळचे संस्कृत भाषेतील शब्द हे मराठी प्रमाणलेखनात 'कवी', 'गुरू' असे लिहायला हवेत.' असा प्रतिसाद दिला गेला.

त्याऐवजी, 'मी व्यापक असेल असा प्रतिसाद देतो.' , 'अमुक एक नियम असा करता येऊ शकेल.' अशी वाक्यरचना तुमच्याकडून झाली असती. असं का नाही झालं?

बीकॉज, चर्चेच्या दुसर्‍या टप्प्यात हाणामारी होते. व ह्या संपलेल्या चर्चेचं फलित होतं- कोण किती जाणतो - स्वत:ला?, स्वत:च्या भाशेला? ह्या टप्प्यात स्वत:कडे माहिती किती आहे हे महत्त्वाचं नसतं.

ह्या चर्चेचे फलद्रूप 'ओपनिंग ऑफ हार्ट्स' असे असेल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. 'क्लीनिंग ऑफ हार्टस' हा टप्पा पुढच्या कुठल्याशा चर्चेत येणे क्रमप्राप्त असेल.

(ता.क.- तुमचा पूर्वीचा प्रतिसाद वेगळा होता)

शुद्धलेखनाच्या नियमांचा इतिहास - जुने आणि नवे.

१९७२ पूर्वी मराठी साहित्य महामंडळपुरस्कृत १४ नियम होते आणि १९७२ मध्ये त्यात आणखी चारांची भर घालण्यात आली असे मुखेडकरांच्या लेखाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले आहे. हे नवे ४ नियम कोणते हे कळू शकेल काय? मुखेडकरांच्या अभ्यासातून असे वाटते की ते ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील.

हे नवे नियम कळले तर ५.१, ७.२, ८.१, १४ असे कलागत लावणारे नियम केव्हा आणि का निर्माण झाले ह्यावर काही प्रकाश पडू शकेल.

ह्या संदर्भात मो.रा.वाळंबेलिखित 'सुगम मराठी वाचन लेखन' हे पुस्तक आणि त्यांची अन्य लेखने पहायला मिळाली तर विषयावर अधिक प्रकाश पडेल. कोणापाशी असे काही उपलब्ध आहे का?

थोडे वैयक्तिकः सातारा न्यू इंग्लिश स्कूलमधे मी विद्यार्थी असतांना मो.रा.वाळंबे (ऊर्फ मोरावळा) हे आमचे उप-अधीक्षक होते. शिस्तीवर त्यांचा खास भर असे आणि मधल्या सुट्टीत तिसर्‍या घंटेनंतरहि धावपळ चालू ठेवल्याने सर्व शाळेतून दिसेल अशा 'असेंब्ली हॉलमध्ये' एक तास त्यांनी मला उभे केले होते!

आम्हाला ते शिकवीत नसत पण एका शिक्षकांच्या अनुपस्थितीत ते एकदा आमच्या वर्गावर आले होते. तेव्हा बटाटेवडयाची (त्यांच्या भाषेत 'बटाटवडा') उपमा देऊन त्यांनी अनेक अवयवांमधून भाषा कशी निर्माण होते हे त्यांनी आम्हाला सांगितले होते.

आम्हालाही सांगा

आम्हाला ते शिकवीत नसत पण एका शिक्षकांच्या अनुपस्थितीत ते एकदा आमच्या वर्गावर आले होते. तेव्हा बटाटेवडयाची (त्यांच्या भाषेत 'बटाटवडा') उपमा देऊन त्यांनी अनेक अवयवांमधून भाषा कशी निर्माण होते हे त्यांनी आम्हाला सांगितले होते.

हे उपक्रमींनाही सांगावे ही विनंती.

भाषा

उपक्रम'वर सर्व १८ नियम प्रकाशित केलेले आहेत तसेच नियमांमध्ये काय बदल करायला हवा,हेही माझ्या लेखात नमूद केलेले आहे,हे प्रांजळपणे श्री कोल्ह्टकर व श्री रावळे यांना सांगू इच्छितो.

 
^ वर