फळणीकरांचं आपलं घर

रात्री उदरभरण-नोहे-(?)चा कार्यक्रम यथास्थित पार पडल्यानंतर मुखशुध्दीसाठी दोनेक चमचे बडीशेप तोंडात टाकली आणि रवंथ करत नेहमीप्रमाणे टी. व्ही. समोरच्या कोचावर आडवा झालो. अहाहा! संध्याकाळच्या जोरदार पावसाने वातावरण कसे थंडगार झाले होते. साधा पंखा दोनवर ठेवला तरी वातावरण वातानुकुलीत झाल्यासारखे वाटत होते. उन्हाळ्याच्या काहिलीनंतर कित्येक दिवसांनी असे मस्त लोळत टी.व्ही. बघण्यातला आनंद काही औरच होता. हातात तीन रिमोट कंट्रोल्स - एक टी.व्ही. चा , एक सेट-टॉप-बॉक्सचा आणि एक डी.व्ही.डी. प्लेयरचा! मनोरंजनाची साधनं कशी बोटाच्या इशार्‍यावर नाचत होती.

पोटात गेलेल्या सुग्रास अन्नाची धुंदी डोळ्यांवर चढत आहे, तोंडात बडीशेप घोळत आहे आणि पुढ्यात मनपसंत मनोरंजन सुरू आहे - मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात सुख-सुख म्हणतात ते हेच असावे.

चॅनल्स् सर्फ करता-करता मराठी चॅनल्सची रांग सुरु झाली. झी, ई, मी आणि सह्याद्री -इथे ही चारच चॅनल्स् दिसतात.झी -ई वर नेहमीची झिलई होती. पुढे सरकलो.'मी'वर मराठीत डब केलेली हिंदी मालिका सुरू होती.पुढे सरकलो. सह्याद्रीवर एक नेहमीप्रमाणे दूरध्वनी मुलाखत सुरू होती. मुलाखतकर्तीच्या प्रश्नांना उभा नाम कपाळावर ओढलेला एक दाढीवाला उत्तरे देत होता. त्याचा तो नाम आणि दाढी बघून हा एक शिवसैनिक असावा असे वाटून गेले.पण त्याचा भाषेतला साधेपणा आणि मार्दव ऐकून तो शिवसैनिक नाही - एक साधा माणूस आहे हे कळले. वर उजव्या कोपर्‍यात "Recorded" असा शब्द स्वच्छ दिसत होता. तेंव्हा फोनवरून उगीचच आगाऊ प्रश्न विचारून आपली फुकट प्रसिध्दी करण्याची संधीही नव्हती. मग इथे काय ठेवलय म्हणून पुढच्या चॅनलकडे जाण्यासाठी बटन दाबणार इतक्यात तो दाढीवाला म्हणाला, "माझा मुलगा गेल्यानंतर काय करायचं हा प्रश्न समोर उभा होता. मी ठरवलं - आपला मुलगा नसला म्हणून काय झालं? जगातल्या अनेक मुलांना आई-बाप नसतात. आता आपणच त्यांचे आईबाप होऊ. आपणच त्यांना घर देऊ - आपलं घर!"...आणि माझ्या बोटानं रिमोटचं बटन दाबायचं नाकारलं.

मुलाखत ऐकत-बघत राहिलो तसतशी डोळ्यातली धुंदी उतरली.हा माणूस म्हणजेच - पुण्याचे श्री. विजय फळणीकर - आपलं घर या अनाथालयाचे संस्थापक , संचालक.
मुलाखत ऐकली आणि माझ्या गुलगुलीत सुखाला बोचणी लागली. मग त्यांच्याविषयी कांही लिहावं असं वाटलं. त्या मुलाखतीतून त्यांचं एक समर्थ व्यक्तिमत्व प्रकट झालं. तेच मांडण्याचा हा प्रयत्न!!

***

फळणीकर सांगत होते, "मी मूळ नागपुरचा. आमच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य! आई लोकांघरी धुणी -भांडी करून आमचे घर चालवे. मीसुद्धा तिच्याबरोबर जाई. तिथे आईने घासलेली भांडी विसळत असे. मग त्या घरात उरलेले अन्न एखाद्या परातीत वाढून देत. ते घरी आणून आम्ही जेवत असू. अठरा विश्वे दारिद्र्य!" कुठेही 'मी'पणा नाही. अत्यंत प्रांजळ शब्द! -- 'मी किती भोगले आहे' हा अहंभाव नाही. -- "पण सोसण्याला मर्यादा असतात हो. मग एके दिवशी सरळ पळून गेलो - मुंबईला. तिथे महालक्ष्मीच्या देवळासमोर भीक मागू लागलो. भीक मागणंसुद्धा अवघड असतं, बरं का! पोलिसांच्या काठया खाऊन पळायचो. मग चौपाटीवर जाई. तिथे लोकांनी फेकून दिलेल्या भेळीच्या कागदांवर उरलीसुरली भेळ खाऊन पोट भरत असे." -- ऐकताना अंगावर काटा आला. ते मुंबईला गेले तेंव्हा त्यांचे वय होते अवघे ९ वर्षे!
पुढे यशवंतराव काळे गुरुजींनी त्यांना उमरवाडी डोंगरीच्या चिल्ड्रन एड अनाथालयात दाखल केले. तिथेच त्यांनी प्रथम भांडार सहाय्यक आणि नंतर कार्यालय सहाय्यकाचे काम केले. त्यांचे सुंदर अक्षर, गायन आणि अभिनयकला यांना खतपाणी मिळाले. इतके की त्यांनी राजस्तरीय एकांकिका स्पर्धेत अभिनयासाठी प्रथम क्रमांक मिळाला आणि आकाशवाणीवर मुलाखत झाली. अनाथालायात वाढत असताना काळेगुरुजींनी त्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधला आणि फळणीकर पुन्हा नागपुरला परतले. तिथे त्यांनी उर्वरीत शिक्षण पूर्ण् केले. आणि मग पुण्याला दूरचित्रवाणीमध्ये रंगमंच व्यवस्थापक म्हणून कामाला लागले. यथावकाश लग्न करून स्थिर जीवन जगू लागले.
इतके भोगल्यावरही ही कहाणी 'साठा उत्तरी सुफळ संपूर्ण' मात्र झाली नाही...

***

ते बोलतच होते," हे असं जगलो पण काही झालं नाही मला. पण बदाम-पिस्ते खाऊन वाढलेला माझा मुलगा मात्र काही कारण नसताना गेला." फळणीकरांच्या ११ वर्षांच्या वैभवला ल्युकेमिया झाला होता त्याचे निदान वेळीच झाले नाही आणि निदान झाल्यावर तीनच दिवसात १८ नोव्हेंबर २००१ ला तो हे जग सोडून निघून गेला. हे ऐकून मी हेलावूनच गेलो.
त्यांच्या जागी दुसरा कुणीही कोसळून गेला असता.
पण फळणीकरांनी मात्र मन खंबीर केले. आपला मुलगा नसला म्हणून काय झाले? त्यांना आपले बालपण आठवले, त्यांचे काळे गुरुजी आठवले.त्यांनी निर्णय घेतला - नोकरी सोडायची आणि पूर्णवेळ समाजसेवा करायची.जगात अशी अनेक मुले आहेत की ज्यांना आई-बाप नाहीत, ज्यांची जबाबदारी घेणारे पालकही नाहीत. अशा मुलांचे पितृत्व स्विकारायचे. त्या मुलांना आपले घर द्यायचे. त्यांच्या असेही लक्षात आले की रुग्णवाहिका नसल्यामुळे पुण्याच्या कोथरूड भागातल्या लोकांची खूपच गैरसोय होते. मग वैभवच्या इन्शुरन्सच्या पैशातून त्यांनी एक रुग्णवाहिका घेऊन ती स्वतःच चालवायला सुरुवात केली.या सार्‍या प्रयत्नांना तितकीच समर्थ साथ होती त्यांच्या पत्नी - साधना फळणीकर यांची.
त्यांचे सुहृद प्रसिद्ध गायक श्री. सुरेश वाडकर यांनी फळणीकरांच्या या संकल्पाला मूर्त स्वरूप देण्याचे मनावर घेतले. पुण्यात वाडकरांचा 'सुरमयी शाम' हा कार्यक्रम करून मिळालेल्या रकमेतून त्यांनी स्व. वैभव फळणीकर मेमोरियल ट्रस्ट्ची स्थापना केली. याच ट्रस्टकडून एक अनाथालय सुरू करण्याची प्रेरणा त्यांना दिली ती त्यांचे गुरू - काळे गुरुजींनी! आणि फळणीकर झपाटल्यासारखे त्या कार्याला जुंपले. समाजातल्या कित्येक लोकांना भेटून त्यांनी ही संकल्पना मांडली. अगदी एक रुपयापासून ते लाख रुपयांपर्यंत कितीही रकमेच्या देणग्या गोळा केला. अपमान सहन केले. "वाईट अनुभव आले हो. ते येतातच. संस्था चालवायची म्हणजे चांगले - वाईट अनुभव घ्यावेच लागतात." संस्था या शब्दाचा त्यांचा उच्चार हिंदी 'संस्था' सारखा होता."पण वाईट अनुभव कशाला सांगायचे?फक्त चांगले सांगितले पाहिजेत. " तोच प्रांजळपणा!

एकदा एका सद्गृहस्थांनी त्यांना फोन केला. "फळणीकर, मी तुमच्या संस्थेला देणगी देऊ इच्छितो. त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावे लागेल." फळणीकर म्हणाले," हो, नक्की येईन!" तर ते गृहस्थ म्हणाले, "पण माझी एक अट आहे. कुणालाही मी फक्त १० रुपये देणगी देतो. माझ्याकडे येण्यासाठी तुमचे ५० रुपयांचे पेट्रोल खर्च होईल. बघा, तुम्हाला परवडतंय का!" फळणीकर म्हणाले,"ठीक आहे. १० रुपयांसाठीही मी येईन!"
फळणीकर त्यांच्या घरी गेले. ते गृहस्थ एक निवृत्त वयस्कर होते. त्यांच्या पत्नीने फळणीकरांना चहापाणी केले. सद्गृहस्थांनी चेकबुक काढले. ते पाहून फळणीकर थंड! "अहो, चेक कशाला? रोखच द्या. मी पावती देईन इथेच." त्यावर त्या गृहस्थांनी चेक लिहिला, त्यावर स्वाक्षरी केली आणि ते म्हणाले," ते पावतीचं मागाहून पाहू. मी देणगी चेकनेच देणार." एका पाकिटात त्यांनी तो चेक घातला, पाकीट चिकटवले आणि फळणीकरांच्या हातावर ठेवले.."या आता, चेक पास झाल्यावर पावती पाठवायचे विसरू नका."
फळणीकर संस्थेत परतले, त्यांनी पाकीट उघडले आणि पाहतात तो काय - चक्क पाच हजार रुपयांचा चेक! फळणीकरांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले," साहेब, पाच हजार रुपयांचा चेक? तुम्हालाही पैशांची गरज असणार!" त्यावर गृहस्थ एका खास शैलीत म्हणाले, " मला अक्कल शिकवू नका. गेली सात वर्षे मी अनेक संस्थांना असाच फोन करत आलोय. पण कोणीही फिरकला नाही. आजपर्यंत १०-१० रुपये दिले असते तर इतके नक्की झाले असते. ते सारे मी तुम्हाला दिले. त्यांच्या वाटणीचे तुम्हाला. आणि पावती पाठवायला विसरू नका!" अनुभव सांगताना फळणीकरांचा स्वर हळवा झाला होता.

***

या आणि अशा अनेक दात्यांच्या लहान-मोठ्या देणग्यांमुळे बघता-बघता संस्थेचा कल्पवृक्ष बहरू लागला. संस्थेचे कार्यालय आणि वसतीगृह निर्माण झाले. 'आपले घर' संस्थेत ४ ते १५ वयाची अनाथ मुले येऊ लागली.
आज तिथे मुलांच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागतातच. पण त्यांच्यासाठी त्यानीच जोपासलेले उद्यान आहे, त्यांच्यासाठी निरनिराळी वाद्ये आहेत, सकस आणि ताजे दूध मिळावे म्हणून गायी आहेत (फळणीकरांच्या शब्दात ," आणि मुलांना वरण-भातावर तूप मिळावे म्हणून") , खेळण्यासाठी अनेक खेळांचे साहित्य आहे, तंत्रज्ञान शिकण्यासाठी यंत्रे आहेत, १५ संगणक आहेत. त्यांना वेळच्या वेळी शाळेत पाठवले जाते. त्यांचे छंद जोपासले जातात. इतकंच काय?, फळणीकरांनी त्यांना विमानयात्राही घडवून आणली. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ उपलब्ध आहेत. (कारण ज्यांच्या जीवनात अनेक दुर्धर प्रसंग इतक्या कोवळ्या वयात होतात त्यांचे बालपण आणि पुढचे आयुष्य मानसिकदृष्ट्या निकोप असले पाहिजे.) मुलांना ते फक्त माणूसकी शिकवतात. आपल्या घरात जात, धर्म असले भेदभाव शिकवले जात नाहीत.
या 'आपल्या घरातली' सारी मुलं आपलं हरवलेलं बालपण पुन्हा जगू लागलीत.
'आपले घर' पहायला अनेक लोक येतात, मुलांशी गप्पा मारतात, त्यांच्याशी खेळतात. असे लोक हे सारं पाहून कौतुकानं म्हणतात की, "अरे, हे तर मुलांचं छान रेझॉर्टच आहे!" यापेक्षा पसंतीची पावती ती काय असणार?

चार-पाच वर्षात हे नंदनवन खूपच फुललंय. खरंच, मुलांच्या स्वप्नातलं त्यांचं घर!

फळणीकर त्यांच्या सर्व सहकार्‍यांचा आणि संस्थेतील कर्मचार्‍यांचा आवर्जून आणि अभिमानाने उल्लेख करतात," माझे मित्रमंडळ, संस्थेचे इतर संचालक आणि संस्थेतील कर्मचार्‍यांमुळेच हे सारे होते आहे. माझ्या मित्रांनी मुलांना संगीत, गायन आणि वाद्यवादन शिकवले आहे. आता त्यांचा एक वाद्यवृंदही आहे. नवी पिढीसुद्धा मला मदत करते. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यात काम करणारे युवक दर शनिवार रविवार आमच्याकडे येतात , मुलांमध्य मिसळतात आणि त्यांना संगणकाचा वापर शिकवतात. लोक म्हणतात की युवापिढीला सामाजिक बांधीलकी नाही...पण मला ते मान्य नाही - ते अर्धसत्य आहे. सारेच युवक तसे नाहीत हे मी स्वनुभवावरून सांगतो."

***

पण फळणीकर इथेच थांबलेले नाहीत. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ही मुले बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे आदर्श नागरिक म्हणून उभी रहावीत अशी त्यांची धडपड आहे. त्यासाठी ते अनेक उद्योगपतींना भेटले. त्यांना गळ घातली. आज अशा रितीने नोकर्‍यांचे अनेक मार्ग या मुलांपुढे उभे आहेत. फळणीकर म्हणतात,"माझ्या मुलांना नोकरी मिळणे सर्वसामान्य मुलांइतके किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त सुकर आहे." त्यांची मुले..., त्यांची मुले! आणि तो बापमाणूस!

***

आपलं कोचावर लोळणारं गुबगुबीत आयुष्य जगताना असुरक्षितता मनात घर करून बसते. मग मनःशांतीसाठी आपण आधार शोधत राहतो. कांही फसवे आधार सापडतात.
पण असेही काही घडते आहे , अशीही जीवने आहेत हे कळणे हाच केवढा मोठा आधार आहे. असेही जगता येते हा आदर्श समोर ठेवता येतो. कुणीसं म्हटलंय -"अशाच लोकांमुळे आकाश अजून तरी कोसळलं नाहीये!"

................

हे सारे टी. व्ही. वर पाहिले आणि याबद्दल लिहावेसे वाटले म्हणून लिहिले. आपल्यापैकी अनेकांनी ही मुलाखत पाहिली-ऐकली असेल. तिच्यातल्या आणि इतर अशा अनेक गोष्टी राहून गेल्या असतील. त्याबद्दल क्षमस्व!
काही जण फळणीकरांना जवळून ओळखत असतील. कांहीजण 'आपल्या घरात' जाऊनही आले असतील. तरीही ज्यांना माहित नाही त्यांना कळावे हा हेतू होता.- आजकाल बातम्यांमध्ये - हे आणि असे आणखी बरेच काही - फारसे येत नाही.
अधिक माहिती हवी असल्यास / माहित असावे म्हणून 'आपल्या घरा'चा पत्ता-
आपलं घर,
प्लॉट् नं. २९,गोकूळनगर,वाराणशी सोसायटीजवळ,मुम्बई - बंगळूरू महामार्ग,वारजे- माळवाडी, पुणे.
दूरध्वनी - ०२०- २१७१२२७१ /, 020-21712271
भ्रमणध्वनी-९८५०२२७०७७ / 9850227077
दुवा : http://apalaghar.org/start.html

***

Comments

जबरदस्त !

विसूनाना,
आपण हा लेख लिहून फारच चांगले काम केले आहे.
पुण्यामध्ये एक वृद्ध जोडपे आपल्या दोन खोल्यांच्या घरात अशाच अनेक मुलांना आधार देवून आहे असे टिव्ही वर पाहिल्याचे स्मरते.

"अशाच लोकांमुळे आकाश अजून तरी कोसळलं नाहीये!"
हेच खरे !
--लिखाळ.

साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे- पुल.)

सुरेख

विसुनाना,
लेखाबद्दल अनेक धन्यवाद. वाचताना अंगावर शहारे आले. परिस्थितीवर मात करण्याचा ठाम निर्धार असेल तर माणूस काय करू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण. अशी उदाहरणे पाहिली की आपल्या आयुष्यातील रोजच्या अडचणी फुसक्या वाटू लागतात.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

धन्यवाद

एका अनोख्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आयुष्यात इतकी दु:खे भोगल्यावर पुन्हा खंबीरपणे उभे राहून इतर मुलांना "आपले घर" देणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

असाच...

...नतमस्तक.

विसुनाना - दोन दिवसांपूर्वीच हा लेख वाचला. तेव्हापासून सारखा मनात घोळतो आहे. अस्वस्थ करणारा असा हा विषय आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

सुंदर

विसुनाना,
फळणीकरांच्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल अनेक आभार! त्याच बरोबर आपल्या कलेचा वापर अश्या थोर कामांसाठी करणार्‍या 'सुरेश वाडकर' ह्यांचाही अभिमान वाटला. असे कार्यक्रम अजुनही सादर करणार्‍या सह्याद्रीचे देखिल अभिनंदन!

लाख सलाम..

नानासाहेब,

सुंदर लेख...

फळणीकरांना लाख सलाम..

तात्या.

पटले..

पण असेही काही घडते आहे , अशीही जीवने आहेत हे कळणे हाच केवढा मोठा आधार आहे. असेही जगता येते हा आदर्श समोर ठेवता येतो. कुणीसं म्हटलंय -"अशाच लोकांमुळे आकाश अजून तरी कोसळलं नाहीये!"

शब्दश: पटले.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

मदत...

ती तातडीची घोषणा एक महिन्यापूर्वी केली होती. तातडीची निकड आता नसली तरी मदतीची अपेक्षा आहे.
आपली आर्थिक मदत (चेक/ड्राफ्ट स्वरूपात) "स्व. वैभव फळणीकर मेमोरियल ट्रस्ट" नावाने पाठवू शकता.

फोन नंबर चुकीचा?

वरील दूरध्वनी क्रमांक बहुधा चुकीचा आहे, कोणीतरी (बहुतेक वैतागलेले) काका भेटले तिकडे. भ्रमणध्वनी "स्विच्ड आफ" आहे असा मेसेज येतो आहे.

कुणाचा ह्याच नंबरवर फोन लागला होता का?

मी भ्रमणध्वनीवर बोललो...

"नमस्कार, फळणीकर" असे शब्द ऐकू आल्याने "विजय फळणीकर आहेत का?" विचारावे लागले नाही.
पुन्हा प्रयत्न करून पहावा.

सकाळ

ईसकाळ च्या साईट वर मी आपलं घर चा video बघितला होता.
छान माहिती दिलीत आपण.

आवडला लेख

विसूनाना,
आवडला लेख,

१० रु देणगीचा प्रसंग, पापण्यांच्या कडा ओलावणारा आहे.फळणीकरांच्या कार्याला आमाचाही सलाम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभारी आहे

"आपलं घर" ची ओळख करून् दिल्या बद्दल आभारी आहे, लेख् खूप आवडला.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

छान

विसुनाना,फळणीकरांच्या कार्याची ओळख उत्तमरीतीने करून देऊन तुम्ही एकाप्रकारे त्यांच्या सत्कार्याला हातभारच लावला आहे. लेख आवडला.

सकारात्मक दृष्टिकोन !

स्वत:चा एकूलता एक मुलगा गेल्यावर कोसळून न जाता सार्‍या अनाथ विश्वाचे पालकत्व पत्करणार्‍या फळणीकरांना त्रिवार वंदन ! आयुष्य आत्मकेंद्री न बनवता ' हे विश्वची माझे घर ' वृत्ती ठेवून एवढे महान कार्य उभे करणार्‍या फळणीकरांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आपण असे कार्य उभे करु शकत नसलो तरी आपल्या पैकी प्रत्येक जण अशा कार्याला मदत करू शकतो. शेवटी खारीच्या वाट्यानेच सेतू उभा राहतो.

अत्युत्तम

विसुभाऊ,
माहिती फारच छान आहे. त्यांचा पत्ता दिलात हे बरे. मला इथूनहिइ संपर्क साधता येईल.
धन्यवाद,
सुभाष

हृदयस्पर्शी

असे अनेक हात मूकपणे समाज मडके घडवत असतात.

यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर.. घडले मानवतेचे मंदिर..
परि जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती..

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

उत्तम

उत्तम लेख

 
^ वर