गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन

दि बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या मते जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे. त्यातील फ्लशसाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या पार्टची "S", "U", "J", वा "P" आकारातून उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला ती पोचलेली आहे. एक ऑप्टिमाइजड डिझाइन म्हणूनच त्याकडे पाहिले जात आहे. कळ दाबली की पाणी बाहेर; विष्टा आत कुठेतरी पाताळात 'गायब'. तोपर्यंत पुन्हा पाण्याची टाकी भरलेली. रोज 5 -10 वेळा व वर्षानुवर्षे अखंडपणे कार्यरत असणाऱ्या या टॉयलेट्सच्या डिझाइनमध्ये करण्यासारखे काही नाही असेच आपल्याला वाटत आले आहे. फौंडेशनला गरीबांच्याबद्दल खरोखरच कळवळा वाटत असल्यास अविकसित देशातील गरीब जनतेसाठी घरटी एक 'फ्लश' टाइप संडास बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावी; आणि आमच्या गुळगुळीत, संगमरवरी फ्लश टॉयलेट्सना 'हात' लावू नये असे वाटण्याची शक्यता आहे.

मुळात आपले हे सिरॅमिक 'सिंहासन' फारच खर्चिक आहे. त्याची कार्यप्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. पाताळात जाणाऱ्या विष्टाचा संडासानंतरच्या पुढील वाटचालीसाठी समाजाला पाण्याच्या, देखभालीच्या व दुरुस्तीच्या स्वरूपात जबर किंमत मोजावी लागत आहे. थोडासा जरी हलगर्जीपणा दाखविल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे असले लाड फक्त अतिविकसित श्रीमंत देशांनाच परवडण्यासारखे आहेत. आपल्यासारख्या विकसनशील वा अविकसित देशांसाठी काही पर्याय शोधणे गरजेचे ठरत आहे, असे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे विष्टा गायबची 'ट्रिक' शक्य होइनासे झाले आहे. जगातील सुमारे 40 टक्के लोकांना शौचविधीसाठी कुठलेही सुविधा नाहीत. उघड्यावरील शौच व त्यामुळे होत असलेल्या वायु व जल प्रदूषणातून दर वर्षी सुमारे 15 लाख मुलं मृत्युमुखी पडतात, असा एक अंदाज आहे. इतर प्रौढसुद्धा कायमचेच कुठल्याना कुठल्या तरी आजारपणाच्या विळख्यात अडकलेले असतात. उघड्यावरील शौचाला काही पर्याय शोधणे अत्यंत गरजेचे वाटत आहे.

जगभरातील जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन गेट्स फौंडेशनने संडासाच्या रचनेत आमूलाग्र बदल करून सर्वांना ही सोय उपलब्ध करून देता येईल का हा विचार केला. यासंबंधीचे एक वर्किंग मॉडेल करून दाखविल्यास डिझाइनचे गुणदोष लक्षात येऊ शकतील, असे फौंडेशनला वाटल्यामुळे त्याने मॉडेलसाठी निधी उपलब्ध करून दिली. जगभरातील तंत्रज्ञांना यासंबंधी आव्हान केले. नवीन शौचकूपाच्या विनिर्देशामध्ये पाइपमधून पाण्याचा वापर न करणे, वेगळी मल नि:सारण यंत्रणा नसणे व विजेचा वापर न करणे या महत्वाच्या अटी अंतर्भूत होत्या. संडासातून वाहून जाणाऱ्या कचऱ्यातून ऊर्जा, खत यासारख्या काही उपयुक्त वस्तूंचे उत्पादन शक्य असल्यास उत्तम. याशिवाय याच्या वापराचा खर्च 5 सेंट्स (50 पैशा)पेक्षा जास्त असू नये, अशी अट घातली. अशा प्रकारच्या स्पेसिफिकेशन्स प्रमाणे केलेल्या उत्क्रृष्ट डिझाइनला 1 लाख डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले. खरे पाहता तंत्रज्ञांना हे एक फार मोठे आव्हान होते. टेक्निकल स्पेसिफिकेशन्स प्रमाणे जगातील कुठल्याही वैज्ञानिक समस्येला उत्तर शोधणे ही वेगळी गोष्ट ठरू शकेल. परंतु डिझाइनची सांगड किमतीशी घातल्यास समस्येचे स्वरूपच पूर्णपणे बदलून जाईल.

गेले वर्षभर जगातील वेगवेगळ्या तंत्रज्ञान संस्था व विद्यापीठ यांनी संडास सुधार संशोधनावर परिश्रम घेत होत्या. व त्या संस्थानी काही पथदर्शी प्रारूप तयार केले. ऑगस्ट 12 मध्ये सीअ‍ॅटल येथे या प्रारूपांचे प्रदर्शन भरवले होते. उसाच्या चिपाड्यापासून आफ्रिकेतील काळ्या माशीपर्यंत वापरलेल्या विविध प्रकारचे डिझाइन्स प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यापैकी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (CIT) या संस्थेच्या प्रारूपाला एक लाख डॉलर्सचे प्रथम पारितोषक देऊन गौरविण्यात आले. CITच्या डिझाइनमध्ये विष्टेवर विद्युत रासायनिक प्रक्रियेचा वापर केला असून त्यातून हायड्रोजन व वीज निर्माण होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचे पॅनेल वापरण्याची शिफारस केली आहे. हायड्रोजनचा साठा फ्युएल सेलमध्ये करून त्या ऊर्जेचा वापर आपत्कालीन परिस्थितीत करण्याची तजवीज या डिझाइनमध्ये केलेली आहे. चकचकित, गुळगुळीत दिसणारे हे प्रारूप प्रेक्षकांना आकर्षित करणारे ठरले. सर्वात महत्वाचे म्हणजे फौंडेशनच्या सर्व अटींचे पालन या डिझाइनने केले आहे. पाणी, स्वच्छता व आरोग्य यांचे योग्य प्रकारे संतुलन साधण्यात हे डिझाइन यशस्वी झाले आहे. डिझाइनमध्ये कुठल्याही प्रकारच्या महागड्या वस्तूंचा वा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा टॉयलेटची running cost आपोआपच कमी होण्याची शक्यता आहे.

प्रदर्शनातील इतर डिझाइन्सकडे बारकाईने पाहिल्यास CITच्या डिझाइन अप्रोचपेक्षा कितीतरी चांगल्या कल्पना वापरल्या आहेत. म्हणूनच फौंडेशनने स्विस डिझाइनला 40000 डॉलर्सचे विशेष पारितोषक घोषित केले. एका डिझाइनमध्ये मायक्रोवेव्ह ऊर्जेचा वापर करून विजेचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. अजून एका डिझाइनमध्ये लघवीचाच वापर फ्लश करण्यासाठी सुचविलेला आहे. एका डिझाइनमध्ये विष्टा कोळश्यात रूपांतरीत व्हायची सोय आहे. एका संस्थेने पशुखाद्याच्या निर्मितीची कल्पना मांडलेली आहे. त्यासाठी काळ्या सोल्जर माशींचा लार्व्हा शौचकूपामध्ये सोडावे लागणार आहे. जैविक प्रक्रियेतून उच्च प्रतीचे व इको फ्रेंड्ली पशुखाद्य तयार होण्याचा दावा त्यानी केला आहे. CITच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान या डिझाइनमध्ये नसेलही; परंतु डिझाइन नक्कीच टाकावू नाही.

गेट्स फौंडेशनचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होतील याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. ज्या प्रकारे सर्व प्रकारचा मालमसाला खच्चून भरलेला एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये हिट् होईल की नाही याचा अंदाज चित्रपट रिलीज होण्यापूर्वी करता येत नाही, त्याच प्रमाणे बहुतांश लोक तंत्रज्ञान स्वीकारतील की नाही हेही सांगणे तितकेच कठिण होत आहे. तंत्रज्ञान वापरणाऱ्यांची मानसिकता व त्यांच्या वर्तनातील सातत्य यांचा विचार केल्यास अनेक तंत्रज्ञान व गॅजेट्स धूळ खात पडल्याचे लक्षात येईल. प्रदूषण विरहित स्वयंपाकाच्या शेगडीचा वापर कितीही डोकेफोड करूनही होत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वस्तातील स्वस्त किंमत, भरपूर सबसिडी शेगडीत असूनही वापरणाऱ्यांची मानसिकता जोपर्यंत स्वीकारण्यास तयार होत नाही तोपर्यंत तंत्रज्ञ काहीही करू शकत नाहीत. लॅबमध्ये तंत्रज्ञान अत्यंत उत्कृष्ट व फँटास्टिक वाटत असतात. परंतु वास्तव फार वेगळे असते.

काही वर्षापूर्वी बांगलादेशातील 2300 कुटुंबांना प्रदूषण कमी करू शकणारे धूर विरहित शेगड्या अक्षरश: फुकट वाटण्यात आल्या. त्यापैकी सुमारे 98 टक्के शेगड्या धूळ खात पडून राहिल्या. बांगलादेशी महिलांना जुन्या पद्धतीच्या शेगडीतील धुराचा अडसर वाटत नसल्यामुळे धूरविरहित शेगड्यांची कितीही तरफदारी केली तरी त्या धूळ खात पडणार, हे नक्की. जोपर्यंत त्यांच्या डोक्यात अशा धुराच्या शेगड्यांचे धोके डोक्यात शिरत नाहीत तो पर्यंत ही स्थिती अशीच राहणार. कारण त्याच्या मते प्रदूषण हे दूरगामी दुष्परिणाम करणारे असते. व गरीब तातडीच्या छोट्या मोठ्या आजारांना अग्रक्रम देत असतात.

एक मात्र खरे की स्वयंपाकाच्या शेगडीशी शौचालयाची तुलना करता येत नाही. कदाचित गेट्स फौंडेशनचे टॉयलेट्स लोकांच्या पसंतीस उतरतीलही. परंतु दारिद्र्यात खितपत पडलेले आहार, कपडे व औषधपाण्याच्या चिंतेने ग्रस्त असतात. त्यांना भर उघड्यावर संडास केल्यास तू आजारी पडशील असे सांगण्याचा प्रयत्न केल्यास ते हसण्यावारी नेईल. पिढ्यान पिढ्या आम्ही उघड्यावरच शौचविधी उरकत आहोत व आम्हाला कधीच काहीही झाले नाही. आमच्या येथील चलते फिरते सॅनिटरी इन्स्पेक्टर (डुक्कर) आमची काळजी घेत आहेत. तुम्ही येथे येवून काही तरी बडबड करत आहात. याची आम्हाला गरज नाही. या विधानाला आपल्यापाशी, प्रशासनापाशी वा गेट्स फौंडेशनपाशी उत्तर नसेल. मारून मुटकून सक्ती करून अशा टॉयलेट्स त्यांच्या माथी मारल्यास शेळी - कोंबड्यांसाठी वा अडगळ ठेवण्यासाठी याचा वापर होईल. महाराष्ट्रातील हगणदारीमुक्त गाव हा प्रशासकीय उपक्रम या मानसिकतेचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. गंमत अशी आहे की विकसित केलेले तंत्रज्ञान अत्यंत उत्कृष्ट असले तरी ते विकसित करताना समाज मानसिकता लक्षात न घेतल्यामुळे या समस्या उद्भवत आहेत. व ही मानसिकता देश - प्रदेश, संस्कृती, धर्म इत्यादींशी निगडित असते.

मुळात सामाजिक आरोग्याविषयी विचार करताना गरीबांचा स्वच्छतेविषयी असलेला दृष्टिकोन, शहरी व ग्रामीण भागात असलेल्या वेगवेगळ्या गरजा व व्यक्तीपेक्षा समाजासाठी उपयुक्त ठरणारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांकडे लक्ष द्यावे लागेल. जेव्हा यासंबंधात आपण निर्णय घेत असतो तेव्हा यूजर म्हणून आपल्या डोळ्यासमोर व्यक्तीचे वर्तन व त्याच्या आवडी निवडी असतात. खरे पाहता व्यक्ती म्हणून पर्यावरण रक्षणाची भलावण करत असली तरी ती इतरांनी करावी व मला त्यात ओढू नये अशी मानसिकता असते. रांगेत उभे राहण्याचे फायदे सर्वांना माहित असतात. फक्त मला ते पाळण्याची सक्ती करू नका अशीच प्रत्येकाची इच्छा असते. समाजातील प्रत्येकाने असाच विचार केल्यास तंत्रज्ञान व पर्यावरण रक्षण धूळ खात पडणार हे मात्र नक्की.

तंत्रज्ञ म्हणून एक फँटास्टिक गॅजेट विकसित करण्यास कदाचित फार श्रम लागणार नाहीत. परंतु लोकापर्यंत ते पोचवून ते त्यांच्या पचनी पडावे यासाठी मात्र फार कष्ट सोसावे लागतात.

संदर्भ:

Comments

संडास रचनेत सुधारणेविषयीची चित्रफीत

उपलब्धता

भारतासारख्या ठिकाणी शौचालयाची उपलब्धता हाच मोठा मुद्दा आहे. सुधार ही त्यानंतरची बाब आहे. गेट्स फाउंडेशनची ही कल्पना ही उत्तम आहे यात शंकाच नाही.
हागीनदारी मुक्त गाव ही संकल्पना जरी प्रत्यक्षात आली तरी भारतात खूप मोठी कार्यसिद्धी आहे. जयराम रमेश यांनी उघड्यावर शौचास बसणार्‍यास १ वर्षे तुरुंग वासाची शिक्षा असा प्रस्ताव मांडला आहे. अर्थातच तो व्यवहार्य नाही. भारतीय जनमानसाशी नाळ असणारी शौचालय सुधारणा ही बाब सामाजिक संस्थांनीच पुढे आणली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला सर्व्हे त्यांनी घेतला पाहिजे.
भारतात किती ग्रामपंचायत कार्यालयात वापरता येईल असे शौचालय उपलब्ध आहे याचा सर्व्हे देखील मनोरंजंक ठरावा. सर्व शासकीय संस्थांमधे तरी शौचालय उपलब्ध आहे का? 'आधी केले मग सांगितले' अशी परिस्थिती असली तर प्रबोधनाचा प्रभाव पडेल.
शौचालयाच्या प्रारुपांचे प्रदर्शन भारतात कधी झाले आहे का?

कदाचित

शौचालयांच्या रचनेत सुधारणा केल्यास (कमी खर्चात) अधिक शौचालये उपलब्ध होऊ शकतील.

भारतात प्रदर्शनच नव्हे, तर संग्रहालय आहे

शौचालयाच्या प्रारुपांचे प्रदर्शन भारतात कधी झाले आहे का?

आहे. प्रदर्शनच नव्हे, तर संग्रहालय आहे, दिल्ली येथे. (प्रदर्शन काही दिवसांपुरते असते. संग्रहालय कायम असते) "शौचालय" या विषयाला वाहिलेले जगातले एकमेव (माझ्या माहिती प्रमाणे) संग्रहालय सुलभ international या संस्थेने भारतात दिली येथे अनेक वर्षां पूर्वी स्थापित केले आहे. तुम्हाला जर दिल्लीची माहिती असेल, तर पालम विमानतळ येथून द्वारका कॉलोनी मार्गे उत्तम नगर कडे येण्याच्या रस्त्यात डाव्या बाजूला आहे. संकेत स्थळ http://www.sulabhtoiletmuseum.org/pg01.htm पाहावे. पण दिल्लीला गेल्यावर सर्व लोक कुतुब मिनार, लाल किल्ला, लोटस टेम्पल, झालच तर अनके "मानानीयांची" समाधी स्थळे इत्यादीच बघायला जातात. दिल्लीला रेल्वे संग्रहालय व वायू सेना संग्रहालय पण आहेत, दोन्ही अप्रतीम आहेत. पण ही सुद्धा कोणी बघायला जात नाहीत, तेथे शौचालय संग्रहालय कोण बघणार? शौचालयाची आठवण आपल्याला फक्त "घाईची लागल्यावर" च येते.

मल-मूत्र विसर्जन या "त्याज्य" विषयात सुलभ international या संस्थेने भरपूर संशोधन तर केले आहेच, पण त्या बरोबर देशाभरात अनेक ठिकाणी त्यांच्या संस्थे तर्फे सार्वजनिक शौचालये चालविण्यात येतात. घरा बाहेर तुम्हाला शौचालयाची गरज भासल्यास जर जवळ पास सुलभ शौचालय असेल तर त्यातल्या त्यात स्वच्छ सुविधांची खात्री असते. या कार्या करता सुलभ international चे संस्थापक डॉ. बिन्देश्वरी पाठक यांना २००९ मध्ये Stockholm Water Prize या जल व्यवस्थापन क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या कार्याची कोणतीही हेटाळणी व कुचेष्टा करण्याचा हेतू नाही, पण शेवटी श्रीखंडाची सिद्धता खाण्यात असते. (हा हा, हे म्हणजे proof of the pudding is in eating चे भाषांतर). बिल गेट्स यांच्या प्रयत्नातून तयार झालेले शौचालय त्यांनी तयार केलेल्या (बत्थड) Operating System पेक्षा तरी चांगले असेल अशी आशा करूया.

छान

छान माहिती.

(दुर्दैवाने सुलभ जागोजागी जी शौचालये चालवते ती पारंपरिक प्रकारची भरपूर पाणी वापरणारीच असतात).

लेख आणि प्रतिसाद

लेख आणि प्रतिसाद दोन्ही उत्तम.

मागे एकदा व्हिलिंगला स्वामी प्रभुपाद यांचा सोन्याचा महाल (भक्तांनी बनवलेला) बघायला गेलो होतो. तेव्हा मी भोचकपणे त्यांचा "कमोड"ही सोन्याचा आहे का असे विचारून घेतल्यावर गाइड जरा वैतागला होता. :-)

असतो बरं!

सोन्याचा संडास असतो. अन तिथे 'जायचे' भक्कम पैसेही घेतात.

पाणी

टॉयलेटच्या वापरासाठी पाणी हेच आजतरी सर्वात स्वस्त क्लीनिंग एजंट वाटते.

टॉयलेटच्या इन्व्हेंशन मधे हे एक बघा. तासंतासांच्या ट्रॅफिक जॅम्स मधे जिथे दोन्हीबाजूनी गाड्या उभ्या आहेत व दार उघडून बाहेर यायचीही सोय नाही अशा ठिकाणी किती सोयीचे ठरेल?

भारी आयडीया

ही नक्कीच भारी आयडिया आहे. पण काय हो वोलव्हो वगैरे सुखद प्रवासी गाड्यांमधे अजून टॉयलेट का उपलब्ध नाहीत ?

गरज

अहो भारतात मुळातच हे विधी रस्त्याच्या कडेला करायला भारतीयांनाच एवढा आनंद आहे आणि काही सुविधा दिल्यास स्वच्छतेचा आनंद आहे. त्यामुळे आम्हा भारतीयांना गरजच नाही वाटत. रेल्वेत असतात ना? होते का वापरायची इच्छा? बाकी स्वानुभवावरुन सांगायच तर बहुतेक १४-१५ वर्षापुर्वीच कोंडुसकरच्या पुणे - कोल्हपुर आणि मुंबई - कोल्हपुर बसमध्ये हि व्यवस्था होती आणि त्या बद्दल लोकांचा चांगला अभिप्राय सुद्धा होता. सोय तर होतीच पण प्रवासाचा वेळ पण वाचत होता. सध्याची स्थिती काय आहे माहित नाही.

अवांतर

हायवेच्या कडेने असलेल्या हॉटेल्समध्ये, किंवा हॉटेल्स बाहेर्/बाजूला 'टॉयलेट' अन विशेषतः लेडीज टॉयलेट असे लिहून किमान एक आडोसा तयार केलेला असल्यास त्या हॉटेल/ढाब्याचा धंदा किमान डबल होतो, असे निरिक्षण आहे. तुम्हीही खासगी वाहनातून रस्त्यावरून जाताना असे ठिकाण शोधतच जात असणार असा माझा दावा आहे.

छान विषय

मला तांत्रिक दृष्ट्या कमोड, भारतीय पारंपारीक डिझाइनपेक्षा चांगला वाटतो. जागा कमी लागणे, विष्ठा थेट पाण्यात पडणे, बसायला सोईचा (वृद्धांना, गरोदर बायकांना) वगैरे अनेक गोष्टी सांगता येतील. बहुतेक इस्पितळात याच कारणासाठी कमोड पद्धतीचे संडास असतात. काही ठिकाणी (उदा. मुंबई विमानतळावर) दोन्ही प्रकारचे संडास बांधण्याचा आचरटपणा का केलेला असतो हे कळत नाही.

बाकी एक सनातन प्रभात टाईप फॉरवर्डमेल बहुतेकांनी वाचला असेलच. त्यात शौचाला बसायला भारतीय पद्धतच कशी श्रेष्ठ हे सांगितलं होतं. 'तसं' बसल्यामुळे (कोणतंतरी आसन) कुठलीशी शीर दाबल्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि अस्थिदोषाचा त्रास ८९%नी कमी होतो म्हणे. तसेच दुसर्‍यांच्या पार्ष्वभागाचा थेट (?) संबंध न आल्यामुळे खरूज वगैरे होत नाही म्हणे.

"म्हणे" ?

कमोड, . . . बसायला सोईचा (वृद्धांना, गरोदर बायकांना)

मान्य.

काही ठिकाणी (उदा. मुंबई विमानतळावर) दोन्ही प्रकारचे संडास बांधण्याचा आचरटपणा का केलेला असतो हे कळत नाही.

भारतातच नव्हे, तर सिंगापूरच्या चांगी विमानतळा वर नक्कीच, व बहुतेक जकार्ता विमानतळा वर पण हाच "आचरटपणा केलेला" आहे.

शौचाला बसायला भारतीय पद्धतच . . . अस्थिदोषाचा त्रास ८९%नी कमी होतो म्हणे. तसेच दुसर्‍यांच्या पार्ष्वभागाचा थेट (?) संबंध न आल्यामुळे खरूज वगैरे होत नाही म्हणे.

या काहीही "म्हणे" नाही. पाश्चात्य जगाच्या तुलनेत आपल्याकडे Hip Joint Replacement चे प्रमाण कमी असल्याचा संबंध आपल्या पारंपारिक squating पद्धतीशी आहे, असे वैद्यकीय संशोधन आहे. (डॉक्टर मंडळीनी confirm करावे). कालच बातमी वाचली कि डॉक्टरच्या कडे वाट बघत असताना त्याच्या वेटिंग रूम मधली पुस्तके वाचल्यास संसर्गजन्य रोगांचा धोका आहे. दोन वर्षां पूर्वी आपल्याकडे बर्ड फ्लू साथ आलेली असताना डॉक्टर मंडळीनी सांगितले होते कि हाताळले जाणारे public surfaces, जसे बस/मेट्रो मधले धरायचे दांडे, escalator वा जिन्याचा कठडा, इत्यादी स्पर्शातून बर्ड फ्लू चे विषाणू पसरतात. अनेक एयरलाईन्स मध्ये कमोडच्या सीट वर घालण्या करता एक कागदाचे disposable कवर दिलेले असते. बाजारात अश्या कवर्सची पाकिटे पण मिळतात.

कमोडचे असेही भारतीकरण!

कमोडिकरण

भारतीय शौचकुपाचे कमोडिकरण देखील झालेले आहे. शौचकुपावर एक भिंतीला सपोर्ट असलेली अटॅचमेंट मिळते ती वापरुन कमोडचा फील दिला आहे. संडासाचे भांडे बदलून कमोड बसवण्यापेक्षा वृद्धांना हे सोयीचे व कमी खर्चिक आहे.

किती वेळ?

दिवसातून तीन ते पाच मिनिटे उकिडवे बसल्याने अस्थिदोषाचा त्रास/हिप रिप्लेसमेंटची गरज कमी होते?
(की तीन ते पाच मिनिटे कमोडवर बसल्यामुळे अस्थिदोषाचा त्रास वाढतो)?

तसे असेल तर पाश्चात्यांना "तिकडच्या" ऐवजी एरवीच पाच मिनिटे उकिडवे बसून त्रास वाचवता येईल की !!!

तो व्हिडिओ

राजीव डिक्षीट स्टाईल आहे बहुतेक ;) जास्त लोड घेऊ नका.
जणूकाय बद्धकोष्ठ अन मूळव्याध भारतात नव्हतेच. (आयुर्वेदातही लिहिलेले आहे. ५००० का किती वर्षांपूर्वी. तेव्हा अ‍ॅडव्हेंट ऑफ वेस्टर्न सिविलायझेशन नव्हती.) शौचास कसे बसावे यासाठी ह्यूमन बॉडि म्हणे. सगळी बाळे जन्मतः झोपून शी करतात. That is the most natural posture. मग नंतर पॉटी ट्रेनिंग असते. धुवायची कशी हेही शिकवावे लागते. चारी बाजूस बर्फ असताना इण्डियन स्टाईलने मलविसर्जन करून मग थंड पाण्याने धुवून बघा ;) मग समजेल.

हम्म...

आपल्या (महान अतिप्राचीन भारतीय संस्कृती) सगळ्याच गोष्टी टाकाउ अन प्रगत पाश्चिमात्य गोष्टी मात्र चांगल्या असं नसतं मला मान्य आहे. खूपशा गोष्टींमध्ये काही प्रोज आणि कॉन्स असतीलही. मग अभ्यास करून योग्य गोष्ट वापरात आणावी. त्यासाठी आपण संशोधन करणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव जर माहीत नसेल तर ती गोष्ट वापरतो यात कोणताही मोठेपणा नाही. माझा मुद्दा समजला असावा अशी अपेक्षा.

हो. त्रास कमी व्हावा

आपल्याकडे हा त्रास कमी आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारण मीमांसा हा संशोधनाचा विषय आहे.
कदाचित, फक्त शौचाला उकिडवे बसल्या मुळे नव्हे, तर पूर्वी सारखेच व हल्ली कधी मधी तरी मांडी घालून बसण्याच्या आपल्या पद्धती मुळे असेल. व पाश्चात्यांनी पण तसे केल्यास त्यांना पण फायदा व्हावा.

अती-अवांतर

 
^ वर