जगन्मातेची प्रतिमा

नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरल्या एका ग्रुपमध्ये एक प्रसंग त्या निमित्ताने घडला. तेथे अनेक उपक्रमी असल्याने त्यांनी या चर्चेत भाग घेतलाच पण इतर उपक्रमींचे मत यावर जाणून घेणे महत्त्वाचे वाटले म्हणून चर्चा प्रपंच. लज्जागौरीचे चित्र टाकून त्या जग्नमातेला नमस्कार करणार्‍या एका गुणी इतिहास तज्ञाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या भावना आईला/ मातेला अशा स्वरूपात दाखवल्याने दुखावल्या.

लज्जागौरीचे चित्र येथे देत आहे. ते उपक्रमींना नवे नसावे. हा मातृकेचा प्राचीन फॉर्म आहे.

हे चित्र पाहणार्‍याला अश्लील का वाटू शकते याची कल्पना आहे पण चित्राचा उद्देश स्पष्ट केल्यावर वेगळ्या नजरेने या चित्राकडे पाहणे अशक्य होते का हे जाणून घ्यायचे आहे. अशक्य होत असल्यास का अशक्य होते ते जाणून घ्यायचे आहे.

महाराष्ट्रातही शक्तीची पूजा होते किंबहुना महाराष्ट्र हा मूळचा शक्तीचा पुजारी असे रा. चिं. ढेरे म्हणतात. शक्ती ही सार्‍या जगाची आई. ती कधी पृथ्वी, कधी धरित्री तर कधी आदिमाया पण तिचं उद्दिष्ट एकच. ती जननी आहे. वरच्या चित्रात ती ज्या स्थितीत आहे त्यात दोनच गोष्टी दाखवता येतात. १. ती नवे बीज धारण करण्यास तयार आहे किंवा २. ती संतती जन्माला घालण्यास तयार आहे.

शिवलिंग, योनीपूजा या आदम चालीरिती असल्या तरी काळाच्या ओघात लज्जागौरीच्या शिल्पांची विटंबना करून किंवा तिला बाजूला सारून तिचे महत्त्व नष्ट केलेले दिसते. याला बहुधा सांस्कृतिक जडणघडण कारणीभूत असावी.

या विषयावरील लोकप्रभेत आलेला एक लेख येथे वाचा.

असो. तर आईच्या स्वरूपात आम्ही वरील चित्र बघू शकत नाही अशी अनेकांची तक्रार होती कारण मातेचे स्वरूप हे यापेक्षा वेगळे आहे. ते कसे ते खाली पाहू -

देवीची प्रतिमा साधारणतः नऊवारी जरी काठाची साडी ल्यालेली, घट्ट शिवलेला ब्लाऊज घातलेली दिसते. ही प्रतिमा बहुधा राजा रविवर्मांनी धनाढ्यांच्या दिवाणखान्यात शोभण्यासाठी तयार केलेली असावी. पुढे तीच प्रतिमा वापरून या मातेला कॅलेंडर-लेडीचा दर्जा प्राप्त झाला असावा.

३६-२४-३६ या कमनीय बांध्याची आई कितीजणांची होती याची मला कल्पना नाही पण सहसा अनेक मुलांना जन्म देणार्‍या आया या बांध्याच्या दिसत नाहीत.

ज्यांना आईचे उघडे वाघडे स्वरूप अश्लील वाटते त्यांना आई लोकांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवते हे अयोग्य का वाटत नाही? या मागे नेमकी कोणती मानसिकता असावी. भावना प्रधानता बुद्धीवादाला विरोध करते असे सूचित होते का यातून?

Comments

चर्चेसाठी योग्य विषय

माझे मत -
१) मुळात नग्न स्त्री/पुरुष प्रतिम अश्लील नस्ते. केवळ नग्नता सहजासहजी समोर येत नाहि - म्हनून नग्न प्रतिमा अश्लील म्हणणे योग्य वाटत नाही. ज्या लोकांना हे अश्लील वाटत असेल ते लोक वस्तुनिष्ठ विचार करत नाहीत असे म्हणावे लागेल. आपण निसर्गाचाच घटक आहोत आणि नागडेच जन्म घेतो हे ज्याला पटते त्याने/तिने या स्वरूपाचा सहज स्वीकार करायला हरकत नाही.

२) दुसरा मुद्दा - मानसिकतेबद्दल विचारला गेलाय. हा खरोखरच विचार करण्याजोगा आहे. भारतीय समाज हा स्त्री-पुरुष संबंधाना सहज स्वीकारणारा होता. या बद्दलची मानसिकता नेमकी कधी बदलली आणि बुरसटलेपणा (जो अजूनही आढळतो) केंव्हा आला हा प्रश्न मलाही पडलाय. तज्ञांनी जरूर स्पष्टीकरण द्यावे.

३) या संदर्भात सुचलेला विचार असा - लाज्जागौरीची वरील स्वरुपात पूजा करणारा समाज जास्त पुरोगामी कि या प्रतिमेलाच अश्लील म्हणून बाजूला सरणारा?

उपक्रमवर स्वागत

उपक्रमवर स्वागत आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद. या विषयावर लोक अधिक मते मांडतील अशी आशा करू.

मोहेन जो दारो नर्तकी

दहा-पंधरा वर्षांपूर्वीची घटना आठवली. सरकारतर्फे भारताची सांस्कृतिक विविधता आणि समृद्धी दाखवणारे एक पुस्तक (बहुधा खासदारांसाठी डायरी) प्रकाशित केले गेले होते. त्यात मोहेन्-जो-दारो येथे सापडलेल्या त्या सुप्रसिद्ध नर्तकी अथवा बाहुलीचे चित्र छापले होते. तीच ती एक हात कमरेवर आणि हातांत भरपूर बांगड्या घातलेली मूर्ती जी शाळेत असल्यापासून सिंधुसंस्कृतीचे प्रतीक म्हणून नुसती परिचितच नाही तर मनात ठसली होती. पण त्या मूर्तीची प्रतिमा का छापली म्हणून एकाएकी संसदेत गदारोळ झाला. ती मूर्ती नग्न आहे आणि त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते वगैरे. तेव्हा प्रथम कळले की जी मूर्ती आपण वर्षानुवर्षे निर्विकल्प मनाने बघत आलो, ती नग्न आहे.
नंतर मग ते पुस्तक मागे घेतले गेले / घ्यावे लागले वगैरे.

नक्कीच

भावना प्रधानता बुद्धीवादाला विरोध करते असे सूचित होते का यातून?

या प्रश्नाचे उत्तर नक्कीच हो असे आहे. खास करुन समाज हा भारतीय अथवा मुस्लिम असेल तर. चर्चा जरी फक्त चित्रा बद्दलची असली तरी या चर्चेत अनेक प्रश्न दडले आहेत. खास करुन भारतीयांची (सर्व नाही पण बरेच) स्त्री बद्दलची मानसिकता हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा आहे.
याच बरोबर मला या भावूक लोकांना हा प्रश्न विचारयचा आहे कि यांच्यामधले किती जण दुसर्‍यांना आया/बहिणी वरुन अत्यंत हिन दर्जाच्या शिव्या हासडतात? त्यावेळी हेच शब्द आपल्याला लागू करुन घ्यायची मानसिकता आहे का?
मध्ये असेच कुठे वाचले का ऐकले होते की स्त्रीला वस्त्रहिन पहायचा अधिकार तिच्या पतीला आणि अपत्याला आहे. याबद्दल वर लिहिलेच आहे की माणूस / प्राणी जन्मतःच वस्त्रहिन आहे. किंबहुना वस्त्र आले कधी हाच एक चर्चेचा मुद्दा आहे.
तुर्तास एवढे म्हणता येईल की ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्या भावनाच कच्च्या आहेत. त्यांना आपण असे ही विचारू कि तुम्हाला कोणाला वस्त्रहिन पहायला चालेल? त्यावरुन त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येईल.

अवांतरः स्त्रीयांची वस्त्रे हा भारतातला एक चर्चा मुद्दा आहे. मुसलमानांच्यात पुर्ण झाकणे हे धर्माचे काम आहे. पण इतरत्र भारतापेक्षा जास्त फॅशन केलेली आढळते आणि तेथे सर्वसामान्य स्त्रिया कोणत्याही भितीशिवाय असे कपडे वापरतात.

व्याख्या आणि सापेक्षता

सौंदर्य बघणार्‍याच्या डोळ्यातच असते तद्वत अश्लीलता किंवा बीभत्सपणाही बघणार्‍याच्या डोळ्यातच आरोपावा लागेल. किंबहुना, कार्यमग्न डॉक्टर आणि पॉर्न बघणारा तोच डॉक्टर यांची मतेही एकमेकांपेक्षा भिन्न असू शकतील. (परंतु, असतीलच असेही नाही. अन्यथा, हिप्पोक्रेटिसला त्याच्या शपथेत "रुग्णाच्या घरातील स्त्री/पुरुषांशी लैंगिक व्यवहार करणार नाही" अशी अट घालावी लागली असती काय? दिवाणखान्यात छायाचित्र लावण्याविषयी: "मी शिवलेली पहिली एपिझिओटॉमी" असे छायाचित्र कोणा स्त्रीरोगतज्ञाने स्वतःच्या दिवाणखान्यात लावल्याचे माझ्या माहितीत नाही.)
मूळ अर्थानुसार, वल्गर म्हणजे मुबलक, बाजारू, सामान्य.
तर, अश्लील म्हणजे नेमके काय? लैंगिक उद्दीपक/ आवाहक असा अर्थ आहे काय? बॅड टेस्ट असे तरी सार्वत्रिक काही असते काय?
--
माझे मत असे की वरील मूर्ती अश्लीलपेक्षा बीभत्स वाटते. ( मोहेंजोदाडो येथील नाचणारी मुलगी ही मूर्ती अश्लील किंवा बीभत्स वाटली नाही.) त्वचेचा रंग आणि अधिक रिझोल्यूशनचा (नितळ, इ.) दगड असल्यास अधिक बीभत्स वाटली असती.
--
बघणार्‍याच्या डोळ्यातच अश्लीलता असते म्हटल्यावर ते ठरविण्याचा हक्क प्रत्येकालाच प्राप्त होतो. तसे चित्र प्रसिद्ध करू द्यावे की नाही तो वेगळा मुद्दा आहे आणि माझे मत अभिव्यक्तीस्वातंत्र्यालाच आहे. अन्यथा, जुने ते सोने किंवा परंपरेचा अभिमान, इ. मानसिकता नसलेल्यांनी, केवळ, 'ऐतिहासिक ठेवा' इतक्याच कारणास्तव मूर्तीला सूट देऊ नये असे मला वाटते.
--

सहसा अनेक मुलांना जन्म देणार्‍या आया या बांध्याच्या दिसत नाहीत.

सहसा दुर्मिळ असला (पाश्चिमात्य अभिनेत्री तशा असू शकतात) तरी तो वांछनीय गुण असू शकतो आणि म्हणूनच, परिपूर्ण अशा देवीच्या ठायी तो गुणही कल्पिणे ही लज्जागौरीच्या तुलनेत उत्क्रांती असू शकेल.

ज्यांना आईचे उघडे वाघडे स्वरूप अश्लील वाटते त्यांना आई लोकांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवते हे अयोग्य का वाटत नाही?

ज्या अर्थाने त्यांना ती 'आई' वाटते त्या अर्थाने त्यांना 'इतर लोक' हे 'भाईबंद'च वाटत असावेत. त्यामुळे, ती परक्याच्या दिवाणखान्यात नसून सख्ख्या भावाच्या दिवाणखान्यात असल्याचेच त्यांना वाटत असावे.

सवयीचा प्रश्न?

अश्लील म्हणजे नेमके काय? लैंगिक उद्दीपक/ आवाहक असा अर्थ आहे काय?

होय. अगदी असाच अर्थ आहे. वरील मूर्तीस एखाद्याने बीभत्स म्हणणे मला ठीक वाटते. अगदीच माझे मत लक्षात घ्यायचे झाले तर ही मूर्ती मला अंगावर आल्यासारखी वाटते पण मग या आणि अशाच इतर मातृकांच्या मूर्तीही वाटतात. याचा अर्थ, मी या मूर्तीचे तुकडे करावे, तिला अंगभर कपडे घालून मिरवावे असे वाटत नाही.

जर अश्लीलता पाहण्यात असेल आणि तो ठरवण्याचा हक्कही ज्याचा त्याचा असेल तर मग सदर मूर्तीला मातृस्वरुप म्हणण्याचा अधिकारही काढून घेता येत नाही.

अन्यथा, जुने ते सोने किंवा परंपरेचा अभिमान, इ. मानसिकता नसलेल्यांनी, केवळ, 'ऐतिहासिक ठेवा' इतक्याच कारणास्तव मूर्तीला सूट देऊ नये असे मला वाटते.

सूट देऊ नये म्हणजे मूर्तीचे फोटो काढावे? ढेर्‍यांचे लज्जागौरी हे पुस्तक पिवळ्या वेष्टनात घालून विकले तसे विकावे की लज्जागौरी आणि इतर मातृकांना कपडे चढवावे?

सहसा दुर्मिळ असला (पाश्चिमात्य अभिनेत्री तशा असू शकतात) तरी तो वांछनीय गुण असू शकतो आणि म्हणूनच, परिपूर्ण अशा देवीच्या ठायी तो गुणही कल्पिणे ही लज्जागौरीच्या तुलनेत उत्क्रांती असू शकेल.

कॉस्मेटिक सर्जरी किंवा काही आजारांशिवाय हे अशक्य वाटते. तो वांछनीय गुण असू शकतो हे ठीक.

ज्या अर्थाने त्यांना ती 'आई' वाटते त्या अर्थाने त्यांना 'इतर लोक' हे 'भाईबंद'च वाटत असावेत. त्यामुळे, ती परक्याच्या दिवाणखान्यात नसून सख्ख्या भावाच्या दिवाणखान्यात असल्याचेच त्यांना वाटत असावे.

खरेच? विशेषतः अठरा पगड समाजाने एकमेकांना भाईबंद मानले असते तर कित्ती प्रॉब्लेम्स कमी झाले असते. :-)

बीभत्स म्हणावे अशी इतर चिन्हे (शिवलिंग वगैरे) आपल्या संस्कृतीत राजरोस चालतात. येळकोट म्हणताना "येळ"चा अर्थ नग्न असतो हे चालते. नग्न साधूंच्या झुंडी चालतात पण स्त्रीची नग्नता अश्लील वाटते तर मग घट्ट चापूनचोपून नेसलेली साडी आणि टाइट्ट फिटिंगचा ब्लाउज घालणारी बाई फक्त "मातृस्वरूपच" का वाटू शकते हे जाणून घ्यायचे आहे. (हे लिहिण्यात कोणाची रेवडी उडवायची नाही. मानसिकता जाणून घ्यायची आहे.) हा सवयीचा प्रश्न असावा का?

खुलासा

सदर मूर्तीला मातृस्वरुप म्हणण्याचा अधिकारही काढून घेता येत नाही.

नक्कीच. अभिव्यक्तीस्वातंत्र्याला माझा पाठिंबाच आहे.

सूट देऊ नये म्हणजे मूर्तीचे फोटो काढावे? ढेर्‍यांचे लज्जागौरी हे पुस्तक पिवळ्या वेष्टनात घालून विकले तसे विकावे की लज्जागौरी आणि इतर मातृकांना कपडे चढवावे?

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावे सूट मिळावी हे तर मान्यच आहे. मात्र, अन्यथा, केवळ 'जुने आहे, प्रचलित होते' इतक्याच सबबीमुळे त्यापेक्षा अधिक सवलत मिळू नये. एखाद्या नव्या चित्रकाराने असेच काही चित्र काढले तर त्याला जो न्याय मिळेल (म्हणजे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, इ.) तितकाच या मूर्तीलाही मिळावा. सध्या प्रतिमा बेदीच्या तुलनेत 'परंपरा' या नावाखाली नग्न साधूंना सूट मिळते (ती चूक आहे).

हा सवयीचा प्रश्न असावा का?

ही धर्माची उत्क्रांती/प्रगती आहे असे मला वाटते. काही काळाने नग्न साधूंवरही बंदी येऊ शकेल. उलट दिशेने, आयफेल टॉवर हेही मूलतः लिंगाचेच प्रतीक असले तरी ते मूळ लिंगाच्यापेक्षा पुरेसे वेगळे दिसत असल्यामुळे समाजात स्वीकृतही झालेले आहे. पिंडीचेही तसेच झाले असावे.

उत्तम चर्चाविषय

गेले कित्येक दिचस माझ्या मनात या विषयावर लिहावे असे होते. प्रियाली ताईंनी लिहिलेले वाचल्यावर विनासायास आपलेच विचार प्रगट झाल्यासारखे वाटले. २ वर्षांपूर्वी दिलीच्या संग्रहालयाला मी भेट दिली होती. त्या वेळेस तेथील सिंधू संस्कृतीवरील दालनाला भेट दिली होती. या भेटीत हे लक्षात आले होते की या संस्कृतीतील लोकांची फक्त दोन आराध्यदैवते होती. एक म्हणजे प्रजननक्षमतेची देवता. या देवतेच्या अनेक प्रतिमा या वस्तू संग्रहालयात आहेत.या सर्व प्रतिमांचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी जननक्षमतेसाठी जी स्त्री इंद्रिये महत्त्वाची असतात अशी इंद्रिये या प्रतिमांच्यात ठळकपणे दर्शवली जात होती. या लोकांचे दुसरे महत्त्वाचे आराध्यदैवत म्हणजे पुरुष जननेंद्रिय.याची प्रतिमा या संग्रहालयत एका पुरुषाच्या मूर्तीत बघायला मिळते.

सिंधू संस्कृतीतील ही मूळ आराध्यदैवते कालांतराने सर्व भारतीय समाजानेच बहुदा स्वीकारली. पुरुष जननेंद्रियाच्या आराधनेचे स्वरूप पिंडीच्या आराधनेत बदलले तर प्रजननक्षमतेच्या दैवतेचे स्वरूप देवीच्या स्वरूपात बदलले. भारतीय समाज जसजसा विकसित होत गेला तसतसे या आराधनेला जास्त सॉफिस्टिकेटेड बनवले गेले. आर्यांच्या रूद्र या देवतेला मानवी स्वरूप न देता बहुदा पिंड हे स्वरूप कोणीतरी दिले व ते सर्वमान्य झाले. सध्याच्या पिंडीच्या स्वरूपात,मधल्या लंबगोलाच्या खाली जो पसरट बशीसारखा आकार असतो त्याला योनी असे म्हटले जाते हे लक्षात घेतले पाहिजे.

थोडक्यात म्हणजे आताचा समाज, पूजत असलेल्या आराध्यदैवतांचे बाह्य स्वरूप व रंग यांना कितीही सॉफिस्टिकेटेड बनवत असला तरी स्त्री व पुरुष यांची जननेंद्रिये हीच मुळात आराध्यदैवते होती हे लक्षात घेतले पाहिजे. समाजाच्या रूढ कल्पना,अभिरुची या बदलत रहातात त्यामुळे लज्जागौरीचे स्वरूप आता अंबाबाई किंवा समाजाला अधिक भावेल अशा इतर स्वरूपात बदलले आहे. आताच्या समाजात कोणी सिंधू संस्कृतीतील दैवतांची पूजा करू बघेल तर समाजाला ते रूचणार नाही. याचप्रमाणे लज्जागौरीची प्रतिमा सध्याच्या काळात घरात लावणे शक्य नसल्याने आधुनिक फॅशनची वेशभूषा केलेली देवी आमच्या घरात बसलेली आम्हाला रुचते.

मला पडलेला प्रश्न थोडा निराळाच आहे. 4000 वर्षापूर्वीच्या मानवाच्या दृष्टीने पुनरुत्त्पती हा सर्वात मोठा चमत्कार असल्याने त्या मानवाने या पुनरुत्त्पत्तीला सहाय्यक ठरणार्‍या मानवी इंद्रियांना आपली आराध्यदैवते मानले. या जगाचे स्वरूप शोधत असताना आता आपण शक्तीचे पदार्थात रूपांतर करू शकणार्‍या हिग्ज बोसॉन पर्यंत पोहोचलो आहोत.ज्या मूळ चैतन्यामुळे हे विश्व अस्तित्वात येऊन टिकून राहिले आहे (फ़ेनमन याला नेचर म्हणतो) त्या चैतन्याला आराध्यदैवत न मानता स्त्री पुरुष जननेंद्रिंये ही या विश्वातील सर्वात महान चमत्कृती आहेत असे मानून ज्या जननेंद्रिंयांची आराधना 4000किंवा 5000 वर्षांपूर्वी मानवाने सुरू केली त्या जननेंद्रिंयांच्या जास्त सॉफिस्टिकेटेड स्वरूपातील अवतारांना आपली आराध्यदैवते असे आपण आणखी किती काल मानणार आहोत?

चांगला प्रश्न

जननेंद्रिंयांच्या जास्त सॉफिस्टिकेटेड स्वरूपातील अवतारांना आपली आराध्यदैवते असे आपण आणखी किती काल मानणार आहोत?

चांगला प्रश्न आहे.

इथे गंमत आहे की या प्रतिमांची आपल्याला इतकी सवय झाली आहे की शंकराच्या पिंडीला नमस्कार करताना आपण जननेंद्रियांना नमस्कार करतो आहोत ही भावना अनेकांच्या मनात येत असेल असे वाटत नाही. हेच शक्तीपीठांच्या बाबत म्हणता येईल. येथे काही प्रमाणात अज्ञानही सामील आहेच.

चौकट

आदर्श स्वरुप ठेवताना त्यात कमीपणा दाखवून कसा चालेल? अशा व्यवस्थित बांध्याच्या देवतांचे चित्र पाहून कोणाचे मन विचलित झाल्याचे एकिवात नाही. मुळ छायाचित्रातील प्रतिमा हा नविन प्रकार नाही, आक्षेप घ्यायचाच झाल्यास हातात शीर घेतलेली कालीमाता देखिल आहेच, पण श्रद्धाळूंना आक्षेपार्ह काही वाटत नाही व इतरांना नाहीच नाही, पण नग्नतेच्या सद्य भावना/विचारांच्या पार्श्वभुमिवर हे छायाचित्र कदाचित काही लोकांना आक्षेपार्ह वाटू शकेल, पण त्याला नग्नतेच्या सद्य विचारांची कडक चौकट आहे हे ध्यानात ठेवायला हवे.

हम्म!

अशा व्यवस्थित बांध्याच्या देवतांचे चित्र पाहून कोणाचे मन विचलित झाल्याचे एकिवात नाही.

स्वतःच्या बहिणींना आणि मुलींना बघून विचलीत होणारे महाभाग जेथे वावरतात तेथे कमनीय बांध्याच्या देवीला पाहून विचलीत होणारे नसतीलच असे म्हणता येत नाही.

सोज्वळीकरण

भारतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात साहित्य/ संस्कृती यांचे बरेच सोज्वळीकरण* (आणि त्या मार्फत स्त्रियांच्या सार्वजनिक व्यवहाराचे नियंत्रण) झाले अशा अर्थाचे एक पुस्तक वाचले आहे. राजा रविवर्मा त्याच काळातला का?

*तत्कालीन (व्हिक्टोरियन संस्कृतीतले) इंग्रज स्त्रीपुरुष सार्वजनिक व्यवहारात जसे वागतात ते पाहून तसे वागण्याची संस्कृती (उच्चभ्रू समाजात आणि त्यांचा अनुकरणाने इतर समाजात) रुजवली गेली. उदा विवाहप्रसंगी स्त्रीपुरूष वरातीत नाचत असत. पण तसे नाचणे हीन आहे असे रुजवले गेले. मग उच्चभ्रू लोक तसे नाचायचे बंद झाले वगैरे.

महत्त्वाचा प्रतिसाद

भारतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात साहित्य/ संस्कृती यांचे बरेच सोज्वळीकरण*

हा विषय किंचित अवांतर असला तरी याबद्दल मला बरेच कुतूहल आहे की या सोज्ज्वळीकरणादरम्यान आपण किती गमावले याचा हिशेब आहे का? यावर अधिक माहिती असेल (त्या पुस्तकातील) तर द्या, थत्ते!

अवांतर मुद्दा

सोज्ज्वळीकरणादरम्यान अथवा आधी मुसलमान आक्रमणाचा आणि संस्कृतीचा प्रभाव कितपत असेल? मुसलामन आपल्या बायंकांना पुर्णपणे झाकतात. पुरुष अनेक लग्ने करतात आणि अपत्ये सुद्धा अनेक असतात. भारतात काही अचानक कपड्यांचा शोध लागला नसेल. मग कपड्यांनी देवतांना झाकण्याचा प्रकार कधी सुरु झाला असेल?
गंमत म्हणजे पौराणिक मालिकांमध्ये पात्रे ज्या प्रकारे उघडी दाखवली जातात त्यावेळी आक्षेप घेतला जात नाही. खास करुन देवता, राण्या इत्यादी स्त्री पात्रे तर खास करुन खाली जास्त झाकलेले पण वर उत्तान असतात. त्यावर ओरड करुन अगदी पुर्ण अंग झाकलेली पात्रे पहायला नाही मिळाली.
पुढचा मुद्दा फारच अवांतर आहे या चर्चेत पण या बदलांचा विचार केल्यास अस्पृष्यता मला स्वच्छतेचा एक भाग वाटला आणि मग पुढे त्याचा अतिरेक. हे असे का झाले असावे? अज्ञान कि आणखी काही?

पौराणिक मालिकेतील स्त्रिया अनावृत्त दर्शवण्यामागचे कारण

पौराणिक मालिकांमध्ये पात्रे ज्या प्रकारे उघडी दाखवली जातात त्यावेळी आक्षेप घेतला जात नाही. खास करुन देवता, राण्या इत्यादी स्त्री पात्रे तर खास करुन खाली जास्त झाकलेले पण वर उत्तान असतात.

हे वाक्य वाचून अजंठ्याच्या लेण्यातील चित्रांसंबंधी एक संबंधित बाब आठवली. अजंठा लेण्यातील चित्रांतील राण्या किंवा त्यांच्या दासी यांच्या शरीराचा वरील भाग अनावृत्त असल्यासारखा दिसतो. परंतु या चित्रांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की प्रत्यक्षात चित्रकाराने या सर्व बड्या स्त्रियांनी अतिशय तलम मलमलीची वस्त्रे परिधान केलेली आहेत हे दाखवण्याचा चित्रकाराचा प्रयत्न आहे व यामुळे या स्त्रिया अनावृत्त असल्यासारखे भासत आहे.

पौराणिक मालिकांनी या गोष्टीचा उपयोग करूनघेतला नसता तरच नवल होते. अजिंठ्यातील चित्रातील स्त्रिया अनावृत्त भासत आहेत ना? मग त्या कालातील स्त्रिया अनावृत्तच रहात होत्या असे दाखवले तरी ते लोकांच्या सहज पचनी पडेल असे मानून पार पौराणिक कथांमधील स्त्रियांना सुद्धा अनावृत्त दाखवण्याची प्रथा सुरू झाली. टीआरपी वाढीसाठी ही चांगलीच फायदेशीर बाब असल्याने ही प्रथा रूढ झाली.

अवांतरः

अवांतरः
अनावृत - न झाकलेले
अनावृत्त - पुन्हा न केलेले

संस्कृतीनुसार

संस्कृतीचे आक्रमण हे पराजितांना त्यातील काही गोष्टी सक्तीने तर काही गोष्टी आपसूक अवलंबण्यास भाग पाडते. मुसलमानी संस्कृतीने पडदानशीन स्त्रिया, डोईवर पदर, वगैरे आलेच. बाकी, चंद्रशेखर यांनी बरेचसे सांगितले आहेच.

आपल्या संस्कृतीत अप्सरा, यक्षिणी आणि इतर डेमी-गॉड सदृश स्त्रिया कधीच चोळी वगैरे घालत नाहीत. तो भाग अनावृतच असतो. बहुधा उपरणे वगैरेंनी झाकला जातो.

थोडे अवांतर पाहायला गेले तर पाचवारी साडी ही ब्रिटिशांच्या काळात (बहुधा कमी वारांत वस्त्रे) रुजू झाली असली तरी तिची फॅशन पाहता ती युरोपीय वस्त्रांवरून आली वगैरे असावी का असा प्रश्न पडतो.

डोक्यावरचा पदर

डोक्यावरचा पदर हे मुसलमानी संस्कृतीमधून आले हे वाक्य योग्य वाटत नाही. इ.स.पूर्व दुसर्‍या शतकात काढलेल्या चित्रातील बायकांनी डोक्यावरून पदर घेतल्याचे या दुव्यावर बघता ये ईल.

जगन्मातेची प्रतिमा

आपन आपल्या आइचे किवा आजिचे नग्न चित्र घरात लावु का ?
कपदे घालने हा धर्म आहे.

कुबेराच्या मुलानि नग्नता झाकलि नाहि म्हनुन नारद मुनिनि त्याना शाप दिला होता.

सध्याच्या कालात नग्नता हे मागासलेपनाचे लक्शन आहे.
ऊगाच विक्रुत वीचारान्चे ऊपक्रम राबवू नका.

ऐकावे ते नवलच

सध्याच्या कालात नग्नता हे मागासलेपनाचे लक्शन आहे.

हो का? बरं बरं!

चौकशी

>>आपन आपल्या आइचे किवा आजिचे नग्न चित्र घरात लावु का ?

मग कोणाचे (न.चि.) लावू?

 
^ वर