अंगारकी चतुर्थी

कृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून तो अंगारक. एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्या दिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान. म्हणून अंगारकीची संभवनीयता सात चांद्रमासांत एकदा. म्हणजे साधारणपणे तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी चतुर्थी येते. अंगारकी पौर्णिमा तसेच अंगारकी अमावास्या येण्याची संभवनीयता तेवढीच (३ वर्षांत पाचदा) असते. अंगारकी अधिक मासात येण्याचा योग (संभव) वरच्या संभवनीयतेच्या एक तृतीयांश. म्हणजे ९ वर्षांत ५ वेळां.ती अधिक दुर्मीळ म्हणून श्रद्धाळूंना अधिक महत्त्वाची वाटते.ते म्हणतात "अधिकस्याधिकं फलम्" (कशाला काहीही जोडायचे झाले.) अधिक दुर्मीळ ते अधिक मौल्यवान म्हणायचे तर प्रत्येक दिनांक सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो.कारण तो पुन्हा कधीच येणार नसतो ! आणि ते खरेच आहे.प्रत्येक दिवस,किंबहुना प्रत्येक क्षण ,महत्त्वाचा असतोच.आला क्षण-गेला क्षण.आणि जो गेला तो गेलाच.तो पुन्हा येणे नाही. असो. आपण मंगळवारी येणार्‍या कृष्णचतुर्थीचा पुन्हा विचार करू.

आकाशातील मंगळ ग्रह आणि पृथीवरील मंगळवार यांचा काही संबंध आहे का? तर केवळ नावापुरताच आहे. अन्य कशाही तर्‍हेने नाही. महाभारतातील कुंतिपुत्र अर्जुन आणि आजचा सचिनपुत्र अर्जुन यांचा जसा नाममात्र संबंध आहे असे म्हणता येईल तसा. यावरून दिसून येते की अंगारकी चतुर्थीचा अंगारकाशी म्हणजे मंगळ ग्रहाशी अर्थाअर्थी सुतराम संबंध नाही. तेव्हा "नासाची कुतूहल शकटिका (क्युरिऑसिटी रोव्हर) मंगळावर अलगद उतरून तिथे फिरते आहे.मंगळाविषयी नवनवीन माहिती पृथ्वीकडे पाठविते आहे.आणि आपणमात्र अजून इथे अंगारकी चतुर्थीचा उपास धरत आहोत." असे लिहिण्यात फारसा अर्थ नाही. म्हणून ते वाढवत नाही.
आता कृष्णचतुर्थी या तिथीला अन्य तिथ्यांहून काही वेगळे महत्त्व असू शकते का? त्या तिथीला पृथ्वीवरून चंद्राचा काही विशिष्ट आकाराचा भाग प्रकाशित दिसतो हे खरे.पण ते केवळ दिसणे आहे. पण दिसते तसे नसते.म्हणजे नाहीच.खरे काय आहे? सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे उपग्रह हे दगड,माती,खनिजे,वायू यांचे निर्जीव गोलाकार पिंड (स्फेरिकल बॉडीज्) आहेत.त्यांना स्वत:चा प्रकाश नाही. ते सूर्याच्या प्रकाशात तरंगत नियत मार्गांनी फिरत असतात.त्यांच्या अर्ध्या भागावर प्रकाश असणार तर अर्ध्यावर अंधार हे उघड आहे. .(ग्रहणाचा कालावधी सोडून.)
यावरून प्रत्येक तिथीला (ग्रहणकाल वगळून) चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित तर अर्धा अंधारित असतो. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र,तसेच चतुर्थीचा,अष्टमीचा,संकष्टीचा, अमावास्येचा हे सर्व चंद्र सारखेच.अर्धा आणि अर्धाच भाग प्रकाशित असलेले.चंद्र पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याच्या प्रकाशित भागातील कमी-अधिक भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो एवढेच.त्याला आपण चंद्राची कला(कोर) म्हणतो.म्हणजे चतुर्थीच्या चंद्राचे कोणतेही अंगभूत (इन्ट्रिन्झिक) वैशिष्ट्य नाही.
बरें.आठवड्यातील मंगळवाराला इतर वारांच्या तुलनेत काही वेगळे महत्त्व आहे काय? तर तसे मुळीच दिसत नाही.आकाशाचा अर्धगोलाकार दिसणारा घुमट पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.म्हणून त्यावर बसवलेले खगोल पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात अशी काहीशी त्याकाळी माणसाची समज होती. अधिक निरीक्षणान्ती त्यांना आढळले की सात खगोल असे आहेत जे आकाशाच्या घुमटासह फिरतातच पण स्वतंत्रपणे त्या घुमटावरही फिरतात.त्यांना ग्रह म्हटले आणि सूर्य,चंद्र,बुध,शुक्र,मंगळगुरू आणि शनी अशी नावे दिली.
प्रतिदिनी सूर्य उगवला की नवा दिवस सुरू होतो.त्याला नाव कसे आणि कशाला द्यायचे? पण जेव्हा बाजार-हाटासाठी सात दिवसांचे चक्र ठरले तेव्हा व्यावहारिक सोईसाठी बाजारचक्राच्या सात दिवसांना नावे द्यायचे कालान्तराने सुचले. योगायोगाने ग्रहांची संख्याही सातच. तेव्हा त्या काळच्या काही विचारवंतांनी तीच नावे, कोण्या एका दिवशी सात वारांना दिली.ती जगभर रूढ झाली.आजही तीच प्रचलित आहेत. हे नामकरण दोन दिवस आधी अथवा तीन दिवस नंतर झाले असते तर ४/९/२०१२ हा दिवस मंगळवार नसता. त्यादिवशी अंगारकी चतुर्थी नसती.(मात्र ४/९/२०१२ ला कृष्णचतुर्थी असती.) म्हणजे कोणत्याही वाराला अंगभूत असे काही महत्त्व असणे शक्य नाही. सोमवार शिवाचा,गुरुवार दत्ताचा याला काहीच अर्थ नाही. हे केवळ मानीव आहे.हे सहज लक्षात येते.
यावरून सिद्ध होते की अंगारकी चतुर्थी या दिवसाला कोणतेही वेगळे आगळे महत्त्व नाही.इतर कोणत्याही दिवसासारखा तो एक दिवस. मग या दिवशी सिद्धिविनायकच्या मंदिरासमोर सहस्रावधी माणसे रांगा लावून तासन्-तास का तिष्ठत राहातात? या दिवशी उपास केला,देवाला फुले,नारळ,पैसे वाहिले,त्याची स्तुती केली की तो विशेष संतुष्ट होतो. प्रसन्न होतो.आपल्यावर कृपा करतो.त्यामुळे संकटे दूर होतात.समृद्धी लाभते.असे श्रद्धाळूंना वाटत असावे.तसेच रूढी,परंपरा,गतानुगतिकता यांचा पगडा असतोच.त्यामुळे रांगा लागतात.या रांगांत सुशिक्षित,विज्ञान पदवीधर,डॉक्टर,इंजीनियर सुद्धा असतात. ते सर्व श्रद्धावंत असतात.त्यांनी अंगारकी विषयी स्वबुद्धीने थोडा जरी विचार केला तरी या दिवसाला कोणतेही वेगळे महत्त्व नाही हे त्यांच्या ध्यानी येईल.पण सत्य काय आहे ते जाणून घेण्यास नकार देणारी मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. आपल्या श्रद्धाविषयाची चिकित्सा करण्याचे धैर्य श्रद्धाळूपाशी नसते. सुधारककार आगरकर यांनी लिहिले आहे,"आपल्या प्राप्‍तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहाण्याचे धैर्य ज्याप्रमाणे एखाद्या दिवाळखोर कर्जबाजार्‍यास होत नाही त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती आणि त्यावर अवलंबणारे आचार बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.तसे केले तर त्या समजुतींची धडगत नाही अशी भीती त्याला वाटते." या विधानाची सत्यता पटते.
***********************************************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

मेलो

वारलो.तुमच्या चिकाटीला सलाम. तुमच्या तोडीची चिकाटी फक्त नाडीवाल्या काकांचीच आहे बुवा.
महाभारतातील कुंतिपुत्र अर्जुन आणि आजचा सचिनपुत्र अर्जुन यांचा जसा नाममात्र संबंध आहे
हे भारीच. अगदि मार्मिक. अर्थात ज्यांना तुमचे पटते ते तसेही वाचतातच्. ज्यांना पटत नाही, ते तसेही वाचतच नाहीत.
नक्की उपयोग किती?
पण तुमची जिद्द पाहून दंडवत घालावा वाटला; पण बुद्धीवाद्यांना तेही चालत नाही म्हणे.

लेखाचे यश

ज्यांना तुमचे पटते ते तसेही वाचतातच्. ज्यांना पटत नाही, ते तसेही वाचतच नाहीत.

हममम ... पटत नसले तरी वाचणारेच काय प्रतिसाद देणारेही असतात :) आणि हेच या लेखनाचे आणि लेखनशैलीचे यश आहे :)

नक्की उपयोग किती?

नक्कीच उपयोग आहे. खरा मुद्दा पटण्या न पटण्याचा नसून खरे/योग्य काय हा आहे. उदा. भ्रष्टाचार न करणे, नैतिकतेला धरून वागणे या गोष्टी काही लोकांना "न पटणार्‍या" असू शकतील म्हणून या चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करू नये असे नाही. समाजात जागरूकता निर्माण करणे यासारखा थँकलेस जॉब नाही. दुर्दैवाने आजकाल बरेचसे सुशिक्षित लोक छुप्या अंधश्रद्धांच्या आहारी चालले आहेत. आत कुठेतरी त्यांना त्याबद्दल लाज वाटत असते म्हणून त्याला कोठून तरी वैज्ञानिक आधार शोधण्याचा प्रयत्न ते करत असतात. अश्या लोकांसाठी इंटरनेटवर सोप्या भाषेत अश्या थोतांडांचा पर्दाफाश करणारे 'स्ट्रेट टॉक' फारच उपयोगाचे आहे.

असेच

वारलो.तुमच्या चिकाटीला सलाम. तुमच्या तोडीची चिकाटी फक्त नाडीवाल्या काकांचीच आहे बुवा.
महाभारतातील कुंतिपुत्र अर्जुन आणि आजचा सचिनपुत्र अर्जुन यांचा जसा नाममात्र संबंध आहे

सचिनपुत्र अर्जुन आणि अर्जुना रणतुंगा हे दोघेही डाव्या हाताने खेळणारे फलंदाज आहेत, हे एक महान दैवी आश्चर्यच नाही काय? ;-)
बाकी ट्रॅफिक अडवून लागलेल्या देवळापुढील रांगा, शनिवारी मारुतीच्या मूर्तीवर वाया जाणारे तेल, नदीत फेकला जाणारे निर्माल्य , दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून सण 'दणक्यात'सादर करा असे एका वर्तमानपत्रात आलेले आवाहन, अधिक महिन्यातील अनारशांची वाणे, 'आम्ही येतो आहोत' म्हणून गावभर लागलेले 'श्रीं'च्या आगमनाचे फलक, नव्वदीतल्या आजींचे गोकुळाष्टमीतल्या दहीहंडीत सामिल होतानाचे छायाचित्र आणि न्यायालयाच्या कालच्याच निर्णयामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत या वर्षी रात्रभर घुमणारा पारंपारिक वाद्यांचा दणका या गोष्टींवर बोलून-लिहून काही उपयोग नाही या मतापर्यंत मी आलो आहे. ती चिकाटी यनावाला सरच धरु जाणोत. मी मात्र उरलेले आयुष्यभर हे सगळे जमेल तसे सहन करायचे, असे ठरवले आहे.

निराशावादाचा त्याग करावा

श्री.मन यांनी निराशावादाचा त्याग करावा.आशावाद नको. पण वास्तववाद अंगीकारावा.चढ-उतार दिसले तरी
माणसाची प्रगतीकडे वाटचाल होत आहे हे निश्चित.त्यामुळे सर्व अंधश्रद्धा आज ना उद्या नामशेष होतील. सत्याचा
विजय होणारच. माझ्या आयुष्यात नाही पण तुमच्यासारख्यांच्या आयुष्यात याची स्पष्ट लक्षणे दिसू लागतील असे मला
वाटते. जगभर विवेकवादी विचारांचा अभ्युदय वेगाने होत आहे हे निश्चित.

निराशावाद

श्री. यनावाला यांनी मन यांच्या निराशावादाचा उल्लेख केला आहे, पण तो टंकनदोष असावा, असे मी मानतो. या बाबतीत मी निराश झालो आहे हे खरे आहे. यनावाला सरांचे लेख मध्येच मनाला उभारी देतात. 'स्वर्गात देवबीव काही नाहीत, पण एकंदरीत सृष्टीचे बरे चालले आहे' असे वाटून जाते. पण ते वाटणे अल्पजीवी असते. म्हणून यनावालांच्या चिकाटीला आणि आशावादाला सलाम.

आशावाद

माणसाची प्रगतीकडे वाटचाल होत आहे हे निश्चित.त्यामुळे सर्व अंधश्रद्धा आज ना उद्या नामशेष होतील

वा! काय हा दुर्दम्य आशावाद! असे झाले तर किती बरे होईल. पण जोपर्यंत मानवी मन हे भावनाप्रधान आहे तो पर्यंत अंधश्रद्धा राहणार. आजच्या अंधश्रद्धा दूर होउन नवीन अंधश्रद्धा निर्माण होतील इतकेच. तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाच्या प्रसारासाठी जसा होतो तसाच अंधश्रद्धेच्या प्रसारासाठी पण होतोच की!

सहमत

तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाच्या प्रसारासाठी जसा होतो तसाच अंधश्रद्धेच्या प्रसारासाठी पण होतोच की!

हे खरे बोललात. अंधश्रद्धा कशाला म्हणणार? देवा धर्माची एकवेळ चालेल. पण प्रत्येक राजकिय पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या नेत्यांवर श्रद्धा असतात कि अंधश्रद्धा? गांधी आडनावावर असंख्या भारतीयांची श्रद्धा आहे कि अंधश्रद्धा? थोडक्यात काय? जोपर्यंत मानवी मन हे भावनाप्रधान आहे तो पर्यंत अंधश्रद्धा राहणार. हेच खरे. तुम्ही इथे अंगारकीवरच्या लेखा पेक्षा भारतीयांना राजकिय अंधश्रद्धे कडून राजकिय साक्षरतेकडे नेणारा लेख असता तर जास्त आनंद झाला असता. आता यावरून लेखकाला अथवा इतर सदस्यांना मी आकसापोटी प्रतिसाद दिला असा वाटत असेल तर ती त्यांची या विषयावर एकांगी लेखन करण्याची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल नाही का? :)

+१

अंधश्रद्धा संपाव्यात म्हणून मी ही देव पाण्यात घालून बसलोय!
.
अंधश्रद्धा संपवाव्यात म्हणून आताच नजीकच्या मारुतीला नारळ फोडायचा नवस कबूल केलाय.
शक्य तितक्या लवकर अंधश्रद्धा संपवू देत म्हणावं मारुतिरायाला. ;)

हॅहॅ

मला यावरुन व्यंगचित्र सुचले आहे. दाभोलकर गणपतीला पाण्यात घालून अंधश्रद्धा नामशेष व्हाव्यात असं साकडं घालताहेत.

बाबा महाराज

बाबा महाराज दाभोलकर :) दाभोलकर हिंदुत्ववादी असावेत. त्यांच्या हिंदू अंधश्रद्धांवर विषेश लोभ आहे.

अंगारकी

अंगारकीवरील लेख आवडला.
वारांच्या नावाची जागतिकता पाहिल्यावर ती नावे एका संस्कृतीतून आली असणार हे कळते. बहुदा ती भारतीय नसावी. कारण बायबलात वाराचे उल्लेख आहे (रविवारी विश्रांती घेतली) तर भारतीय प्राचीन ग्रंथात ते दिसले नाहीत.) वार आणि देवता यांचा संबंध अधिक आधुनिक असावा असे वाटते. गणपतीचा स्वतःचा वार पूर्वी नसावा पण हल्ली तो मंगळवार झाला आहे. पण हे साधारणपणे कधी पासून झाले हे जाणण्याची उत्सुकता आहे.

लेखात अधिक मासातील अंगारकी बद्दल छोटीशी तृटी आहे. २१ वर्षात एकदा (९ वर्षात ५दा नाही) अशी अधिक अंगारकी येते. म्हणजे हा योग अधिक दुर्मिळ आहे.

प्रमोद

वार

भारतात वारांचा उपयोग सधारणतः अलेक्झांडरच्या स्वारीनंतर सुरू झाला असे मानले जाते. तत्कालीन ग्रीक समाजात वार होते. ह्या स्वारीपश्चात ग्रीक आणि भारतीय संस्कृतींमध्ये जे आदान्-प्रदान झाले, त्यातच फलज्योतिष्य आणि वार ह्या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या, असे मानले जाते.

धन्यवाद!

अधिक मासातील अंगारकीच्या संभवनीयतेविषयी लेखात झालेली चूक प्रमोदजींनी निदर्शनाला आणून दिली
त्याबद्दल धन्यवाद.! अंगारिका सर्वसाधारणपणे नऊ वर्षांतून पाचदा येते.अधिक मास तीन वर्षांनी एकदा येतो.
म्हणून अधिक मासातील अंगारकी २७ मिहिन्यांतून ५ वेळां यावी असे वाटते.प्रमोदजी २७ महिन्यांत एकदा .
म्हणतात.त्यावर विचार करावा लागेल.

सात अधिक मासात एक

मंगळवारी चतुर्थी येण्याचा योग (प्रॉबॅबिलिटी) ही १/७ एवढी आहे. २१ वर्षात साधारणपणे सात अधिक महिने येतात. (३३ महिन्यात एकदा अधिक मास येतो) त्यात सात चतुर्थ्या असतील. त्यातील एक सरासरीने मंगळवारी येणार. ३ वर्षात ५ (१२*३+१/७ = ५.४) हा हिशोब मात्र बरोबर आहे. ९ वर्षात ५ हा हिशोब मात्र समजण्यासारखा नाही. अधिक भाद्रपदातील अंगारकी अशाच सरासरीच्या गणिताने २१*१२ = २५२ वर्षात एकदा येईल.

प्रमोद

चांगले

तिथी, वार वगैरे मानवनिर्मित संकल्पनांना अवास्तव महत्व देऊन श्रद्धेचा बाजार माडण्याच्या प्रवृत्तीमागे काहीही शास्त्रीय विचार नाही हे चांगल्या प्रकारे पटवून दिले आहे.

काही परिचितांना या लेखाचा दुवा पाठवावा म्हणतो.

पॅटर्न

शेअर मार्केटमध्ये पॅटर्न जसे असतात तसेच हे देखील असते.. एकदा पॅटर्न बनला की सर्वसामान्यपणे मार्केट तो पॅटर्न फॉलो करते, तसेच हे असेल असे नाही का वाटत?

-आनन्दा

सिद्धीविनायकासमोरील रांगा

कोणाला अंगारकी करायची असल्यास, उपासतापास करायचे असल्यास माझे काही म्हणणे नाही. मी दुपारी मस्त चमचमीत बार्बेक्यू चिकन बर्गर मटकावला आहे.

वैताग येत असे तो प्रभादेवीला सिद्धीविनायकासमोर लावलेल्या रांगा पाहून. या लोकांना इतरांना रस्त्यावरून चालण्यास त्रास होतो, ट्रॅफिक अडते याचीही तमा नसते. कळतनकळत असे इतरांचे शिव्याशाप घेणारे देवाचे आशीर्वाद मिळवत असावे काय कोणजाणे.

चिकन बर्गर

आपण चिकन बर्गर मटकावण्याच्या वेळेस भारतातील अंगारकी संपली असावी असा अंदाज आहे. त्यामुळे आपण मटकावलेला बर्गर आपणांस जिव्हातृप्तीदायक आणि उदरक्षुधाशामक ठरला असला तरी अंगारकीच्या दिवशी आपण बर्गर खाल्ला या विद्रोही कृतीचे द्योतक म्हणून त्याचे सार्थक न होता ती एक सामान्य मर्त्य कृती झाली आहे असे (अर्थातच खेदाने) नमूद करावे लागत आहे.
हलकेच घ्यालच.

अरेच्चा!

आता यांची अंगारकी त्यांच्या अंगारकीपेक्षा वेगळी असून, आमची अंगारकी हीच श्रेष्ठ आणि तिच (किंवा तिची वेळ) मानायला हवी असेही सांगायला लागतील लोक. ;-)

सातों दिन

सातों दिन भगवान के, क्या मंगल(अंगारकी) क्या पीर
जिस दिन सोये देर तक, भूखा रहे फ़क़ीर
--कबीर

वारांना ही नावे का पडली?

वारांना सध्याची रविवार, सोमवार अशी नावे आणि ह्याच क्रमाने का मिळाली ह्याचे स्पष्टीकरण माझ्या 'मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६' ह्या लेखनात काही महिन्यांपूर्वी दिलेले होते. ते असे आहे:

होरा.
मराठीत 'होरा' म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक 'होराभूषण' असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील 'दिवसाचा २४ वा भाग' अशा अर्थाचा हा शब्द ग्रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह 'होरेश' मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. 'होरा' शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला 'भविष्य' हा अर्थ चिकटला.

ह्याविषयी श्लोक:

मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय.

(सूर्यपुत्र शनिपासून खालच्या क्रमाने होरेश होऊन चौथे ग्रह ओळीने दिवसाधिप होतात.)

(पहा - http://mr.upakram.org/node/3647)

वार

होरा वाराची उपपत्ती आवडली. विशेषतः तीन स्थानाची कसरत. पत्यांच्या करमणूकीच्या चलाख्यांची आठवण झाली.

सूर्य सिद्धांताच्या वेळी सात ग्रह लक्षात घेतले जायचे का राहू केतू धरून नऊ?

प्रमोद

राहू केतू यांना ग्रह म्हणून मान्यता नाही..

राहू केतू यांना ग्रह म्हणून मान्यता नाही..

ते सुर्य आणि चन्द्र यान्च्या मार्गातले छेदबिन्दू आहेत. फल़योतिषातील त्यांच्या उपयुक्ततेमुळे त्याना ग्रह असे सम्बोधले जाते इतकेच.

~आनंदा

उकडीचे मोदक

अश्या सणांचा (मला होणारा) फायदा म्हणजे त्या त्या सणाशी/देवाशी निगडीत उत्तम पक्वान्न.
जसे काल अंगारकीच्या निमित्ताने उकडीचे मोदक स्वाहा झाले.. अंगारकी वसूल! ;)

बाकी श्री.यनावाला यांचे लेखन नेहमीच बिंदुगामी असते! यावेळी देखील आवडले

ढोंगीपणा

पाककुशल नसलेल्या व्यक्ती हेनपेक्ड असतील तर हव्या त्या दिवशी पक्वान्ने मागण्याचे धैर्य त्यांच्या ठायी होत नसावे. अन्यथा ते पदार्थ खाण्यासाठी धर्माचा आसरा घ्यावा लागणार नाही. शिवाय, या धोरणामुळे, घरातील पाककुशल अंधश्रद्ध व्यक्तीं (बहुदा स्त्रियां) चे शोषणही घडेल.
त्यापेक्षा, आवडते पदार्थ सोयीच्या दिवशी खावे, त्यासाठी व्रत/पूजा/उपास इ. किंमत चुकवू नये किंवा सणासुदीची वाटही पाहू नये. काहीच किंमत चुकविली नसेल तर 'वसूल' करण्याचा ध्यासही उरणार नाही, पक्वान्न खाणे हा निव्वळ लाभ ठरेल.

धैर्य

हीच गोष्ट उपवासाच्या पदार्थांच्या बाबत पण आहे. खिचडी किंवा तत्सम खाद्यपदार्थ अन्य दिवशी (ज्या दिवशी आपल्याला खायची इच्छा होईल त्यादिवशी ) पण खाता येउ शकते.
घर हे सर्वांच असत. त्यात आपल्याला न पटणार्‍या गोष्टी पण कुटुंबातल्या अन्य लोकांच्या अंधश्रद्धेपोटी पाळल्या जातात. कधी कधी त्या गतानुगतिकतेमुळे पाळल्या जातात. त्या मोडताना एक मनात हिचकिच तयार होते. त्यापेक्षा त्या पाळल्या तर नुकसान तर काही ना? असा विचार करुन लोक त्याला विरोध करीत नाहीत. अनेक कालबाह्य परंपरा रुढी देखील याच कारणामुळे टिकून आहेत.
बाजारात उकडीचे मोदक सुद्धा अंगारिका संकष्टी वगैरे दिवशीच उपलब्ध होत असतात. मागणी तसा पुरवठा या तत्वावर!

आजोबा

घर हे सर्वांच असत. त्यात आपल्याला न पटणार्‍या गोष्टी पण कुटुंबातल्या अन्य लोकांच्या अंधश्रद्धेपोटी पाळल्या जातात. कधी कधी त्या गतानुगतिकतेमुळे पाळल्या जातात. त्या मोडताना एक मनात हिचकिच तयार होते. त्यापेक्षा त्या पाळल्या तर नुकसान तर काही ना?
आजोबांची आठवण झाली. त्यांना त्यांच्या तरुणवयात काहीच पटत नव्हते. पण ह्याच धर्तीवरचा विचार करुन(आणि बहुदा आजीच्या धाकाने) त्यांनी प्रथा पाळल्या.
त्यांनी त्यांच्या ज्येष्ठांचा विचार केला.
गंमत म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांच्या ज्येष्ठांचा (माझ्या आजोबांचा, जे स्वतः धार्मिक नव्हते.) मान ठेवायचा म्हणून पद्धत/प्रथा/श्रद्धा सुरु ठेवल्या. (आईच्या धाकाचाही सहभाग असावा.)
.
आता मी पालकांचे मन मोडवत नाही म्हणून त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास काही सहाय्य लागले तर करतोच आहे.
आजोबांना पटत नव्हते, बाबांनाही नाही, आणि मला तर नाहिच नाही. पण प्रथा मात्र जोरात सुरु आहेत.
ब्राव्हो इंडिया. ;)
.
म्हटलं तर खाजगी गोष्ट आहे, जाहिर ठिकाणी सांगावी/बोलावी की नाही हे समजत नव्हते.
पण म्हटलं लिहून टाकुया. आपल्यासारखे अजुन कुणी असतील तर तेही गावतील हाताला.

सर्वत्र

मला वाटते सर्वधर्मात सर्व देशात हाच प्रकार असावा. पण गणपतीच्या बाबतीत एक गंमत पहायला मिळते. खास करुन आमच्याकडे नसतो, थोरल्या काकांकडे... हा प्रकार एकदम सोयीस्कर वाटतो. म्हणजे गणेशोत्सवाची मजा तर हवी आहे पण बाकीच्या गोष्टी नकोत. मग काकांकडे, गावाकडे इत्यादी सबबी असतातच. अर्थात कौतुकाने गणपती बसवणारे सुद्धा आहेतच. पण एकुणच गंमत वाटते.
दुसरा एक मुद्दा हा पण आहे की अनेक आजी आजोबांना इतर गोष्टीमध्ये मन रमवण्यापेक्षा देवधर्मात रमवणे सोपे वाटते त्यामुळे ते त्यामागे असतात. वेळ निघुन जातो चांगला. आता एखाद्या अजोबांना देवधर्म आवडत असेल तर एखाद्यांना रोज बार मध्ये जाऊन एक पेग आणि मग एक सिगारेट असे आवडत असेल. शेवटी चॉईसचा प्रश्न आहे.
शास्त्र आणि धर्म यांची चर्चा न संपणारी आहे. आयुष्यात अनेक गोष्टी लॉजिक पटत नसताना केल्या जातात. अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष फायदा नसताना केल्या जातात. त्यातला हा एक भाग. आता आपल्या येथे कर भरणारे किती आणि कोण? पैसा खाणारे किती आणि कोण? आरक्षणाचा फायदा घेणारे देणारे कोण? या आणि अशाच अनेक गोष्टींमध्ये अनेका काहीच लॉजिक मिळत नाही. पण आम्ही ते मान्य करतो. चालायचंच हे भारतात.

दंतकथा

अंगारकी चतुर्थीची दंतकथा या ब्लॉगवरती सापडली.

गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला की तुझे नाव "अंगारक" हे सर्वांच्या लक्षात राहील. ज्या दिवशी गणपती देवता मंगळावर प्रसन्न झाली तो दिवस चतुर्थी होता अशी काहीशी कथा आहे.

गणपती/मंगळ नावाचा ऋषीपुत्र खरच होते यबद्दल विदा(पुरावा) नाही तसेच तो नव्हता याबद्दलही नाही. ५०-५० चान्सेस. तुम्ही पल्याडच्या ५० मध्ये पडता आम्ही अल्याडच्या.

बाकी सन्जोपरावांनी लिहीले आहे त्या सामाजिक न्युइसन्स (त्रास) बद्दल सहमती.

अधिक मासातील अंगारकी

चांद्रवर्ष (१२ चांद्रमास) ३५४ दिवसांचे असते.म्हणजे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान.सण आणि ऋतू जुळण्या
साठी चांद्र- सौरवर्षाची जुळणी आवश्यक असते. नाहीतर दिवाळी मे महिन्यातसुद्धा येईल.
हिसोब केल्यास दिसते की १००४ दिवसांत ३४ चांद्रमास तर ३३ सौरमास बसतात.म्हणून १००४ दिवसांनी एक
अधिक महिना धरतात.म्हणजे चांद्र महिने ३४ पण नावे ३३. म्हणजे प्रत्येक १००४ दिवसांच्या कालावधीत एक
अधिक महिना येतो. त्यात एक कृष्णचतुर्थी असते.त्यादिवशी सातापैकी कोणताही एक वार असू शकतो म्हणून
साधारणतः ७०२८ दिवसांत (१९ वर्षांत ) एक अधिकमास अंगारकी चतुर्थी येते.एकोणीस वर्षांत एकदा म्हणजे
दुर्मीळच.पुण्यलाभ अधिक. म्हणून अधिक मोठ्या रांगा लागतात.

यनावाला लिखते रहो, हम तुम्हारे साथ है.

हे वाक्य हिंदीत ऐकायला बरे वाटते म्हणून त्या भाषेत लिहिले आहे.
आपल्या लिहिण्याचा उपयोग काय असा निगेटिव्ह विचार करायचे कारण नाही. या निमित्याने आलेल्या प्रतिसादांमुळे अनेकांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असेलच. हा फायदा आहेच.
देवळांच्या समोर जे लोक रांगा लावतात त्यांचे मंगळ ग्रह, त्याचे अंगारक हे नाव, कृष्ण चतुर्थीला दिसणारी चन्द्रकोर वगैरेशी काही देणे घेणे नसते. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातले पेचप्रसंग सुटावेत किंवा त्यांची स्वतःची भरभराट व्हावी असा निखळ स्वार्थी विचारच त्यांच्या मनात असतो आणि तसा विचार करण्यात काहीही गैर नाही. नेमके कशामुळे हे साध्य होईल हे ठामपणे सांगणे कठीण असते. या अनिश्चिततेमुळे ते लोक उपास तापास, देवदर्शन वगैरे करत असतात. हा एक उपाय करून पहायला काय हरकत आहे. त्यात फायदा झाला तर चांगलेच आहे, नुकसान तर नाही. असा युक्तिवाद ते करतात. अनेक लोकांना त्यातून मनाचे समाधान मिळत असेल, निराशा दूर होत असेल, त्यातून आशेचा किरण दिसत असेल तर त्याचा लाभ त्यांना होतो.
तरीसुद्धा हे फसवे विचार आहेत हे आपण सांगत रहायला हवे.

 
^ वर