भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ

पितळखोरे लेणी Google Earth
पितळखोरे लेणी Google Earth

चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते.

माना वाकडया करून पाहिल्यास दरीच्या कडेवरून जवळच खाली आम्हास लेणीहि दिसत होती पण दरीत उतरायचे असेल तर प्रथमच पंधरावीस फूट उघडया खडकावरून खा्ली उतरणे भाग होते. कोरडया दिवसात तेहि अवघड गेले नसते पण खडक ओला आणि शेवाळलेला होता, आम्ही दोघे आणि आमची गाडी ह्याशिवाय आसपास दोनतीन किमी अंतरात कोणी माणूस नव्हता. पाय घसरून अपघात झाला असता तर आडनिडया जागी अडकलो असतो म्हणून ’य: पलायते स जीवति’ हे वचन स्मरून आम्ही लेण्यापर्यंत जाण्याचे टाळले आणि निराशेने माघारी फिरलो.

आमच्या त्या दिवशीच्या योजनेत अजूनहि एक बघण्याची जागा होती आणि तिच्याबद्दल हे पुढील वर्णन आहे.

आल्या रस्त्याने तसेच पुढे चाळिसगावकडे निघाले की एक बर्‍यापैकी मोठा घाट लागतो. घाटाचे जुने वा चालू नाव मला आता स्मरत नाही पण कोठेकोठे त्याला कन्नड ह्या जवळच्याच गावावरून ’कन्नड घाट’ असे म्हटले आहे. ह्या घाटाने सुमारे हजार फूट खाली उतरून चाळिसगावकडे जाऊ लागले म्हणजे चाळिसगावच्या थोडे अलीकडे डाव्या हाताला फुटलेला एक रस्ता दिसतो. तो रस्ता पाटण नावाच्या गावाकडे जातो. ह्या गावात एक भवानीदेवीमंदिर आहे आणि तिला पाटणदेवी म्हणतात असे स्मरते. (२०.३२३९° उ ७४.९८०६° पू)

पाटणदेवी मंदिर Google Earth
पाटणदेवी मंदिर Google Earth

पाटण आज एक खेडेवजा गाव आहे पण एकेकाळी ते जास्ती मोठे आणि भरभराटीचे असावे ह्याचा पुरावा म्हणजे गावात अनेक जागी दिसणारी जुनी भग्न मंदिरे आणि उद्ध्वस्त मूर्ति. पाटण हा ’पत्तन’ चा अपभ्रंश. ह्यावरूनहि असा तर्क करता येतो की आजचे हे कुग्राम एकेकाळी ’पत्तन’ पातळीचे मोठे गाव वा शहर असावे. पाटणदेवीच्या मंदिराचीहि बरीच पडझड झाली आहे तरीहि मंदिर वापरात आहे. पितळखोर्‍यापासून येथे यायला चारचाकीने आम्हास बराच वळसा पडला होता पण पितळखोर्‍याच्या दरीतील नाला दरीतून बाहेर पडल्यानंतर ह्या देवळाशेजारूनच जातो आणि दरीतून पायी उतरायचे ठरविल्यास लेण्यांपासून मंदिराचे अंतर फार नाही हेहि लक्षात येते.

देवळच्या आसपास भरपूर झाडी आणि गौताळा संरक्षित वन असून मागेच सातमाळ्याची डोंगरांची रांग उभी आहे.

मंदिर पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम गेलो होतो कारण ह्या जागी प्रसिद्ध गणिती द्वितीय भास्कराचार्य ह्याचा नातू चंगदेव ह्याने चालविलेली पाठशाळा होती आणि भास्कराचार्याचा सिद्धान्तशिरोमणि हा ग्रंथ आणि भास्कराचार्याच्या काही पूर्वजांचे ग्रंथ ह्यांचे अध्ययन तेथे केले जात असे.

ह्या देवळातील एका शिलालेखाचे वाचन डॉ. भाऊ दाजी ह्यांनी केले आणि ते Journal of the Royal Asiatic Society, New Series, Vol. I येथे प्रकाशित केले. तेच वाचन प्रोफ़ेसर कीलहॉर्न ह्यांनी संपादित केले ते Epigraphia Indica, Vol. I येथे पान ३३८ येथे उपलब्ध आहे. ( जिज्ञासूंना हे पुस्तक DLI मध्ये मिळेल.) २६ ओळींच्या ह्या लेखात पहिल्या २१ श्लोकबद्ध संस्कृतमधे आणि उरलेल्या ५ गद्य मराठीमधे आहेत. संस्कृत श्लोकात चंगदेवाची पूर्ण वंशावळ आहे ती अशी:

शाण्डिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोऽभूत्तनयोऽस्य जात:।
यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा॥ १७.
तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसन्निभः।
प्रभाकरः सुतस्तस्मात्प्रभाकर इवापरः॥ १८.
तस्मात्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः।
श्रीमान्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः॥ १९.
तत्सूनुः कविवृन्दवन्दितपदः सद्वेदविद्यालता-
कन्दः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्यासदः।
यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचि-
च्छ्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः॥ २०.
लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमुख्यो वेदार्थवित्तार्किकचक्रवर्ती।
क्रतुक्रियाकाण्डविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत्॥ २१.
सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः।
जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः॥ २२.
तस्मात्सुतः सिङ्घणचक्रवर्तिर्दैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेव:।
श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३.
भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः।
तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४.

ही वंशावळ (कविचक्रवर्ती) त्रिविक्रम - (भोजराजाश्रय - विद्यापति) भास्कर - गोविंद - प्रभाकर - मनोरथ - (कवीश्वर) महेश्वर - भास्कर (लीलावती इ.) - (जैत्रपालाश्रय) लक्ष्मीधर - (सिंघणाश्रय) चंगदेव मठकर्ता अशी आहे. ह्या श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला देवगिरीचा राजा जैत्रपाल ह्याने आपला प्रमुख पंडित म्हणून नेमले होते आणि स्वत: चंगदेव हा जैत्रपालाचा मुलगा सिंघण (सन १२१० - १२३३) ह्याचा ज्योतिषी होता. लेखातीलच अन्य काही माहितीवरून असेहि कळते सिंघणाचा मांडलिक निकुंभवंशीय सोइदेव आणि त्याचा भाऊ हेमाद्रि ह्यांनीहि शके ११२९ (सन १२०७) मध्ये मठाला काही नेमणूक करून दिली होती.

पाटणदेवी मंदिर १
पाटणदेवी मंदिर १

अशा रीतीने भास्कराचार्याशी जवळचा संबंध असलेले ते देऊळ आणि तो शिलालेख डोळ्यांनी पाहण्याची आमची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही तेथे गेलो होतो. देऊळ पुष्कळसे भग्नावस्थेत होते आणि अनेक मूर्ति, कोरीव दगड, कलाकुसर कोरलेले अनेक दगड एका बाजूस रचून ठेवलेले होते. पुजार्‍याने दिलेल्या माहितीनुसार शिलालेखहि त्यांमध्येच होता पण सुरक्षिततेच्या कारणाने पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी तो पुष्कळ खाली आणि तोंड उलटे करून ठेवला होता. त्या कारणाने आम्हांस तो पाहायला मिळाला नाही ह्यामुळे हळहळ वाटली. शिलालेखाला एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखी सुरक्षित जागा मिळेपर्यंत तो आहे तसा टिकून राहो ही इच्छा!

पाटणदेवी मंदिर २
पाटणदेवी मंदिर २

लेखाच्या अखेरीस चंगदेवाच्या मठाच्या निर्वाहासाठी लावून दिलेल्या देणग्यांचा तपशील जुन्या मराठीत आहे. कीलहॉर्न ह्यांचे Epigraphia Indica मधील वाचन सदोष वाटते आणि बरेच शब्द निरर्थक वाटतात पण तुळपुळे-फेल्डहाउसकृत जुन्या मराठीच्या कोषाच्या मदतीने मी बराचसा भाग सुधारून लावू शकतो तो पुढे देत आहे. ( शं.गो. तुळपुळे-संपादित ’प्राचीन मराठी कोरीव लेणी’ ह्या ग्रंथात हा लेख निश्चित असेल पण त्याची जालीय प्रत उपलब्ध नाही असे दिसते.)

श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहापरैश्च।

भूम्यादि सर्वं प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहु पुण्य??॥ २५.

स्वस्ति श्रीशाके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावणमासे पौर्णमास्यां चंद्रग्रहणसमये श्रीसोइदेवेन सर्वजनसंनिधौ हस्तोदकपूर्व्वकं निजगुरुमठाया(?)स्थानं दत्तं॥ तद्यथा॥

सोइदेव हेमाडि आणि काही अन्य अशांनी मठाला दिलेली जमीन इत्यादि पुढील काळातील राजांनी चालू ठेवावी.

श्रीशक ११२८ प्रभवसंवत्सर श्रावणपौर्णिमा चंद्रग्रहणसमयी सोइदेवाने सर्व जनांच्या समक्ष हातावरून पाणी सोडून आपल्या गुरूच्या मठास दिले ते असे:

इयां पाटणी जे केणें उघटे तेहाचा जो असिआउ जो राउला होता ग्राहकापासी तो मठा दीन्हला॥ ब्राह्मणा जे विकतेयापासी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले॥ ग्राहकापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥ तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि .... (पुढील अक्षरे नीट कळत नाहीत.)

(शब्दार्थ: केणे - विक्रीचा माल, उघटणे - विक्रीसाठी मांडणे, असिआउ - शासकीय हिस्सा, उत्पन्न, राउल - देऊळ, विकता - विकणारा, ब्रह्मोत्तर - ब्राह्मणाचा वाटा, वीसोवा - विसावा भाग, आसु - एक प्रकारचे सोन्याचे नाणे, गिद वा गिधवे - एक माप. वाहणे - चालू असणे, मवणे - मोजणे, मापउ/मापाउ - मोजलेले, मापहारी - माप करणारा, सूंक - कर. कामत - मालकाने स्वत:ची अवजारे आणि जनावरे देऊन मोलाने कसवलेले शेत, )

ह्या पाटणात जो माल विक्रीसाठी मांडला असेल त्यातील शासकीय हिश्श्यापैकी देवळांकडे द्यायचा भाग मठाला दिला. विक्रेत्यांनी जो ब्राह्मणांच्या साठी भाग बाजूस काढायचा आहे तो ब्राह्मणांकडून मठाला दिला. प्रति आसु नाण्याच्या व्यवहारात विक्रीचा जो विसावा भाग नगराकडे द्यायचा आहे तो नगराने मठाला दिला. (तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ - ह्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ कळत नाही.) पहिल्या घाण्याच्या तेलापैकी एक लोटी मठाला दिली. नंतर जितके घाणे होतील त्यांमधून एक एक पळी तेल (मठाला दिले.) जे मोजावयाचे ते मठाच्या मापाने मोजावे. मोजलेल्यापैकी अर्धे मठाचे आणि अर्धे मोजणार्‍याचे. जमिनीवरील कर आणि जमीन...

पाटणदेवी मंदिर ३
पाटणदेवी मंदिर ३

भास्कराचार्यांचे मूळ स्थान कोणते असावे ह्याचा आता विचार करू. त्याविषयी भास्कराचार्य स्वत: सिद्धान्तशिरोमणि - गोलाध्याय येथे म्हणतात:

आसीत्सह्यकुलाचलाश्रितपुरे त्रैविद्यविद्वज्जने
नानासज्जनधाम्नि विज्जडविडे शाण्डिल्यगोत्रो द्विज:।
श्रौतस्मार्तविचारसारचतुरो नि:शेषविद्यानिधि:
साधूनामवधिर्महेश्वरकृती दैवज्ञचूडामणि:॥
तज्जस्तच्चरणारविन्दयुगलप्राप्तप्रसाद: सुधी-
र्मुग्धोद्बोधकरं विदग्धगणकप्रीतिप्रदं प्रस्फुटम्।
एतद्व्यक्तसदुक्तियुक्तिबहुलं हेलावगम्यं विदां
सिद्धान्तग्रथनं कुबुद्धिमथनं चक्रे कविर्भास्कर:॥

सारांशाने अर्थ की सह्य पर्वतापाशी वसलेल्या विज्जडविड नावाच्या गावी शाण्डिल्य गोत्रातील महेश्वर दैवज्ञ राहात होता. त्याचा पुत्र भास्कर ह्याने सिद्धान्ताचे ग्रथन केले. हे विज्जडविड नावाचे गाव कोठले ह्याविषयी कोणीच काही निश्चितीने सांगू शकत नाही. बीडपासून बिदर, बिजापूरपर्यंत तर्क करण्यात आले आहेत पण ती गावे ’सह्यकुलाचलाश्रित’ अशी सह्य पर्वतानिकटची नाहीत. भास्कराचार्यांचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला जैत्रपालाने ’ह्या नगरातून’ (पुरादतः) बोलावून नेऊन आपला मुख्य पंडित बनविले असे लक्ष्मीधराचा पुत्र चंगदेव शिलालेखात म्हणतो. ह्याचा अर्थ लक्ष्मीधर पाटणातच राहात होता आणि त्याचा पुत्र चंगदेव हा तर निश्चितच तेथे राहात होता. हे गाव ’सह्यकुलाचलाश्रित’हि आहे ह्यात शंका नाही. शेजारचे चित्र तेच दर्शवीत आहे.

भास्कराचार्यांचे अन्य वंशीयहि चाळिसगावच्या आसपास राहात होते ह्याला पुरावा आहे. चाळिसगावच्या उत्तरेस १० मैलांवर बहाळ नावाचे गाव आहे आणि तेथील सारजा देवीमंदिरात शके ११४४ चा एक शिलालेख कोरलेला आहे. डॉ. कीलहॉर्न-संपादित हा शिलालेख Epigraphia Indica Vol. 3 येथे पान ११० येथे उपलब्ध आहे. शिलालेख अनंतदेव नावाच्या व्यक्तीने कोरविला असून हा अनंतदेव सिंघणाच्या पदरी मुख्य दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी म्हणून होता. लेखात अनंतदेवाने आपली जी कुलपरंपरा दिली आहे ती शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर - श्रीपति - गणपति - अनंतदेव अशी आहे. वर दिलेल्या चंगदेवाच्या वंशपरंपरेमध्येहि शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर आहेत आणि तेथून भास्कर - लक्ष्मीधर - चंगदेव अशी परंपरा आहे. ह्यावरून हे उघड आहे की अनंतदेव आणि चंगदेव ह्यांची घराणी चुलत घराणी आहेत आणि भास्कर हा अनंतदेवाचा चुलत आजा दिसतो.

ह्यावरून असे म्हणता येते की विज्जडविड अथवा विज्जडविडपत्तन ह्या गावी भास्कराचार्यांचा जन्म आणि निवास झाला. कालौघात विज्जडविडपत्तन ह्या लांबलचक नावातून विज्जडविड गळून पडले आणि पूर्ण विस्मृतीत गेले आणि गावाचे नाव केवळ पत्तन आणि कालौघात पाटण असे ओळखले जाऊ लागले. हे गाव एकेकाळी मोठे असावे असे वर म्हटलेच आहे कारण कुग्रामाला कोणी पाटण असे नाव देणे अशक्य वाटते. भास्कराचार्यांचे वास्तव्य आजच्या पाटणमध्येच होते आणि त्याचे विज्जलविड हे नाव मात्र कालौघात लुप्त झाले आहे असा तर्क सहजशक्य वाटतो. भास्कराचार्यांचे कुटुंब मराठीभाषिक होते त्यातून ओघानेच निघते. अशा रीतीने भास्कराचार्यांचे महाराष्ट्रीयत्व हाहि आपणास एक अभिमानाचा विषय!

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख द्वार समुद्र

सुरेख संकलन. ह्या सर्व गोष्टी आम्ही मूळातून वाचायची सुतराम शक्यता नव्हती. सरांशाने मांडलित म्हणून नजरेखालून तरी घालायला मिळताहेत. आभार.
.
बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि
ही बाराव्या शतकातली अस्सल प्राकृत/महाराष्ट्री(किंवा आजच्या मराठीची जी कुणी गंगोत्री असेल ती) वाटते. दहावीचा मराठीचा धडा आठवला:- "नरिंद्रबासां भेंटि अनुसरण" त्यातल्या काही ओळी :-
देवाचिया दादुलेपनाचा उबारा न सहावेचि साताहि सागरा |
भेणें वोसरोनि राजभरा दीधलि द्वारावती ||
यादवांच्या पदरिच असलेल्या न्रिंद्राच्या ह्या ओळी आहेत.
.
.
.
भास्कराचार्य ह्यांचे वास्तव्य बुलडाण्याला होते असे ऐकले होते. आमच्याकडचे ज्येष्ठ त्यास चूक म्हणताना,भास्कराचार्यांचा चंपावतीनगरीमधील वाडाही दाखवायचे.(चंपावतीनगर = बीड जिल्हा.त्यांचा समजला जाणारा वाडा बीड शहरात चोर गल्लीत अगदि १९८८-१८८९ पर्यंत उभा होता. खरे तर तो वाडा त्या काळात त्यांचा गोठा होता म्हणतात. नंतर मागच्या दोनेकशे वर्षात लोकांनी तिथे वाडा बांधला.)
.
बुलडाणा, पाटण की बीड?
.
.
.
.
पाटण बद्दलः- आज् कित्येक आडगावाकडली मानली जाणारी, कोपर्‍यातली किंवा फार फार तर तालुका पातळीवर भासणारी गावे त्याकाळी इतरांच्या मानाने मोठी होती, पेठ् म्हणून मान्यता पावली होती, तर काही राजधानी म्हणता यावीत अशी होती.
इसवीसनापूर्वी प्रबळ मगध सत्तेची मूळ राजधानी राजगृह आज निव्वळ् एक छोटेसे खेडे आहे.
जुन्नर आज् फक्त् तालुका असला तरी एकेकाळी ते व्यापारी मार्गावरचे महत्वाचे ठिकाण होते.
बंटम् हे दक्षिणेत मोठे बंदर होते.(आज् ह्याचे नावही ऐकू येत् नाही.) कनौज हे सांस्कृतिक् केंद्र नि भोजराजाचे ठिकाण् होते, आज् तो फक्त लहान् तालुका तेवढा दिसतो कानपूरजवळ.
बदामी, श्रवणबेळगोळ हे महत्वाचे सत्ताकेंद्र होते. भोकरदन हे छोटेसे खेडेगाव् कुणाला ठाउकही नसेल. पण् इथला कोणे एकेकाळचा शासक, आसपसच्या भूभागावरही वचक् ठेवून् असावा. त्याची "भोगवर्धन्" ही राजधानी असल्याचे उल्लेख लोकांच्या गप्पांत येतात. आज एम् पी मधील मांडूगड हे इवलेसे दिसते, पण् पूर्वी ते त्या भागातील regional headquarter होते माळवा वगैरे भागाचे.
आज ही ठिकाणे कुठेच नाहीत. त्यांचे प्रशासकीय, लष्करी महत्वही नाही. एकेकाळचे वैभवी पण आज उजाड पडलेले खंडहर(मराठी??) अशी त्यांची अवस्था आहे.
आजचे चेन्नै, कोलकाता, मुंबै इंग्रज येण्यापूर्वी अस्तित्वातच नव्हते असे म्हणण्याइतपत लहान् होते. अगदि दिल्लीचेही महत्व शहाजहानने तिथे राज्धानी पुनः वसवल्यानंतरच आले. तोवर मुघल सत्तेचे केंद्र आग्रा होते. आज वैभवात असणारी ठिकाणे कधी उद्या विस्मरणात् जातील काय? सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? मानवी शरीराची आधी जशी वाढ होते आणि मग जर्जर् वार्धक्य येते तसेच मानवी वस्ती/ शहरांचे होते काय?
.
.
.
.
--मनोबा

बंटम् ते बंटवाळ

>>बंटम् हे दक्षिणेत मोठे बंदर होते.<<

माझ्या मते इतिहास काळातील बंटम् बंदर आता बंटवाळ या नावाने ओऴखले जात असावे.

बुलढाणा, पाटण की बीड?

भास्कराचार्यांचे गाव कोणते? बुलढाणा, पाटण की बीड?

बीडविषयीचा तर्क समजण्याजोगा आहे कारण भास्कराचार्यांनी आपले गाव 'विज्जलविड' असल्याचे लिहून ठेवले आहे. ह्यातील 'विड' हे 'बीड'शी उच्चाराने जुळते असल्याने तेच 'विज्जलविड' असे सकृद्दर्शनी वाटू शकेल. पण अन्य कोठे 'विज्जलविड' म्हणजे 'बीड' असा संदर्भ आहे काय? बीड हे सह्याद्रीच्या निकट आहे असेहि कोणी म्हणू शकत नाही, जे विज्जलविडाचे भास्करकृत वर्णन आहे. ह्या दोन आक्षेपांसमोर केवळ उच्चरणसाम्य विज्जलविडाला बीड करण्यास पुरेसे वाटत नाही, विशेषतः पाटणच्या बाजूने मी वर उल्लेखिलेले दोन स्पष्ट पुरावे आणि पाटण एकेकाळचे भरभराटीचे गाव असावे हा विचार लक्षात घेता. (भास्कराचार्यांचा मुलगा आणि नातू तेथे प्रत्यक्ष राहत होते - पुरादतः - आणि अन्य चुलत घराणेहि जवळच राहात होते.) पाटण हे सह्याद्रीच्या निकट तर आहेच.

बुलढाणा ह्या चर्चेत कसा येतो हे कळत नाही - अर्थात् स्थानिक चलनाच्या गोष्टी सोडल्यास. बुलढाण्याच्या बाजूने काही पुरावा आहे काय? बुलढाणहि सह्याद्रीच्या निकट नाही.

(अवान्तर - आपल्या प्रतिसादातील 'सुरेख द्वारसमुद्र' ह्याचा संदर्भ समजला नाही.)

अरविंद कोल्हटकर.

विज्जडविड = विजापूर?

भास्कराचार्यांनी आपले गाव 'विज्जलविड' असल्याचे लिहून ठेवले आहे.

विज्जलविड (की विज्जडविड) याची इंटरनेटवर अनेक ठिकाणी उकल कर्नाटकातील विजापूर अशी केली आहे. भास्कराचार्यांचा जन्म विजापूर येथील असे म्हटले आहे. तेथेही सह्याद्रीच्या निकट असा उल्लेख दिसतो.

--

अरे हो! तसा उल्लेख कोल्हटकरांनी लेखात केला आहेच. मी गाळला होता.

लयास जातीलही

आज वैभवात असणारी ठिकाणे कधी उद्या विस्मरणात् जातील काय? सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय?

नक्कीच जातील. शहरे/ राज्ये उदयास का आली आणि अस्तास का गेली याला कारणे नक्कीच असतात. महत्त्वाची कारणे म्हणजे, राज्यसत्तेत बदल, हवामानात आणि पर्यावरणातील बदल, लोकांनी शहराचा केलेला दुरुपयोग (लोकांनी शहराची लावलेली वाट. उदा. मुंबई*) ,सर्वायवल (मराठी गंडलं)साठी असणार्‍या उपलब्धींमध्ये झालेले उतार या सर्वांवर वस्ती/ शहर/ राज्यांचे उदयास्त अवलंबून असतात. (कदाचित अधिक कारणेही असतील. सध्या डोक्यात येत नाहीत.)

मानवी शरीराची आधी जशी वाढ होते आणि मग जर्जर् वार्धक्य येते तसेच मानवी वस्ती/ शहरांचे होते काय?

हे त्या शहराच्या अस्तास काय कारणीभूत झाले यावर अवलंबून आहे. शत्रूच्या हल्ल्यात संपूर्ण गावाचे शिरकाण झाले, नगरवासियांना गुलाम म्हणून ताब्यात घेण्यात आले. शहराला आग लावून ते बेचिराख केले असा इतिहास दिसतो. अशा ठिकाणी पुन्हा शहर उभारण्यास लोक धजावत नसावे. जेथे हवामान किंवा पर्यावरणात बदल झाले तेथे लोक स्थलांतर करतात. शहरे ओस पडतात. (उदा. सिंधू संस्कृतीतील शहरे) ओस पडलेल्या शहरांना आगी लावण्यात शत्रूला इंटरेष्ट नसतो पण नैसर्गिक उत्पातात त्यांची पडझड होते. तिसरा प्रकार, जेथे माणसांना स्थलांतर करणे शक्य नसते तेव्हा शहरातील माणसे सर्वायवलसाठी एकमेकांच्या जिवावर उठतात. अगदी, शेवटी माणूस माणसाला खाण्यापर्यंत मजल जाऊ शकते. (असे होणे सध्या कठीण असले तरी असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात नमूद आहेत.)

अवांतरः

सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय?

हा काय प्रश्न झाला, मनोबा? "गोरे रंगपे ना इतना गुमान कर", "ढलता सूरज धीरे धीरे" वगैरे गाणी ऐक बघू एकदा. सर्व उत्तरे मिळतील. ;-)

* काल परवाच फिल्म इंडस्ट्रीने मुंबई सोडून जाण्याची धमकी दिल्याचे वाचले होते. एवढी मोठी इंडस्ट्री जर इतरत्र स्थायिक झाली तर शहराला किती मोठा तोटा आहे हे लक्षात घ्यावे.

+१

लेख व प्रवासवर्णन आवडले.

चन्द्रशेखर

खंडहर (मराठी??)

भग्नावशेष

उत्तम आणि माहितीपूर्ण लेखन

उत्तम आणि माहितीपूर्ण लेखन
श्री कोल्हटकरांनी इथे दिलेली माहिती- संकलन एरवी वाचण्याची शक्यता नव्हती या मन यांच्या मताशी सहमत. भर घालण्याइतका अभ्यास नाही.
अनेक आभार!

------------------
ऋषिकेश
------------------

अनुमोदन

हेच म्हणतो.

भास्कराचार्य

भास्कराचार्यांचा हा उल्लेख त्रोटक रूपाने ह्या पुस्तकात येतो. ते पुस्तक घेतले तेव्हापासून म्हणतोय्, एकदा जावे-कधी योग येईल काय माहिती. पण तुम्ही त्याची प्रत्यक्ष सफर घडवून आणलीत त्याबद्दल तुमचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत. पुस्तकात असे म्हटले आहे की अगदी शिलालेखाइतका निश्चित पुरावा अन्य कुणा प्राचीन भारतीय गणितीबद्दल सापडल्याचे ऐकिवात नाही. नक्की वाक्य मागाहून चिकटवतो, सध्या स्मरणाने लिहीत आहे. बाकी महाराष्ट्र सारस्वतात "भास्कराचार्य हा महाराष्ट्र भाषा बोलणारा होता" असा उल्लेख जाता जाता आला आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

चांगला लेख आणि काही प्रश्न

उत्तम लेख आणि हवीशी वाटणारी नवी माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

सिंघणाच्या काळातही हेमाडी होते यावरून हेमाड किंवा हेमाद्रि ही यादवांकडील एखादी पदवी/उपाधी तर नसावी? (अर्थातच, ते तत्कालीन प्रचलित नावही असू शकते.) निकुंभवंशीय हेमाड हे स्थापत्त्यशास्त्री हेमाडपंत नसावे कारण हेमाडपंत सिंघणाच्या काळी नसून रामचंद्राच्या वेळेस होते. हे जर खरे मानले तर हेमाडपंती मंदिरे तेव्हा प्रचलित नसावी. पाटणच्या मंदिराचे बांधकाम कसे आहे?

तसेच, यादवांची राज्यभाषा कोणती होती? कन्नडला प्राधान्य होते की मराठीला? विचारायचा मुद्दा असा की गावाचे नाव "कन्नड" असे आहे. चंगदेव हे कन्नड कवी असल्याचे वाचले होते. भास्कराचार्यांचा जन्मही कर्नाटकातील असे विकीवर म्हटले आहे. हेमाडपंतांचा जन्मही कर्नाटकातीलच. यावरून कर्नाटकातून येथे येऊन स्थायिक होणारे (राज्याश्रय मिळतो म्हणून) अनेक असावेत. तेव्हा भास्कराचार्य मराठी की कन्नड हे कसे ठरवायचे?

भास्कराचार्य मराठी का कन्नड या वादात मला रस नाही. मी कुतूहल म्हणून प्रश्न विचारला आहे. भास्कराचार्य मराठी किंवा कन्नडपैकी कोणीही असले तरी मला त्यांचा अभिमानच वाटतो.

यादवांची राजभाषा मराठीच.

यादवांची राजभाषा मराठी होती हे तर प्रसिद्धच आहे. कितीक मराठी कवींना त्यांनी प्रोत्साहन दिले. वेंगीचे चालुक्यांनी तेलुगु, मान्यखेटातील राष्ट्रकूटांनी कन्नड तर देवगिरीच्या यादवांनी मराठीला प्रथम राजाश्रय दिला. आता हे सर्व राजे त्या त्या भाषिक प्रदेशांत स्थानिक भाषेत शिलालेख लिहीत असत, पण त्यांनी प्रामुख्याने आश्रय देऊन वाढवलेल्या भाषा म्हणजे वरती सांगितलेल्याच होत. हा युक्तिवाद व ही माहिती या पुस्तकात दिलेली आहे. दक्षिण आशियातील व्हर्नाक्युलरायझेशनबद्दल बोलताना लेखकाने ही माहिती दिलेली आहे. शिवाय तो शिलालेख ज्या काळातला आहे (इ.स.१२०७) त्या काळात औरंगाबाद वगैरे भागात मराठीचा वरचष्मा नक्कीच होता. (याला काही अंशी आधार आधीच्या पुस्तकाचाच आहे.)

बाकी भास्कराचार्य मराठी भाषक होते हा तर्क महाराष्ट्र सारस्वतात मांडलेला आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

हेमाडपंत

माझ्या माहितीप्रमाणे हेमाड्पंत ही उपाधी यादव कालापेक्षा बरीच जुनी आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी येथील मधुकेश्वर देवालय हे जखनाचार्य या हेमाड्पंतानी बांधले होते असा संदर्भ मिळतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हेमाडपंत

मला वाटते की आपण 'हेमाडपन्त' ह्या नावाचा चर्चेत उगीचच अडकून पडत आहोत. 'हेमाड' हे 'हेमाद्रि' ह्याचे मराठी/प्राकृत रूप आहे आणि ते एक नाव आहे. ते कोणालाहि कोठल्याहि प्रदेशात ठेवले जाऊ शकते. कर्नाटकात एक हेमाड सापडला म्हणजे महाराष्ट्रातला कोणी दुसरा हेमाड हा कर्नाटकातून तेथे आला असेल काय किंवा कर्नाटकाशी त्याचा काही संबंध असेल काय ही शंका अनाठायी आहे. जसे शंकर, राम, कृष्ण ही नावे कोठेहि भारतभर दिली जाऊ शकतात तसेच काहीसे.

हेमाडपन्ती देऊळबांधणी शैलीचा आरंभक, अभिलषितार्थचिन्तामणि ह्या ग्रंथाचा लेखक हेमाद्रि हा बहुतेक रामदेवराव यादवाचा प्रधान होता. 'हेमाद्रि-हेमाड' हे नाव आता प्रचारात नाही त्यामुळे आपणास त्याचे थोडे आकर्षण आहे इतकेच. पण म्हणून एका हेमाद्रीचा काही विशेष दुसर्‍यास चिकटेल असे नाही.

पाटणच्या मंदिराचे बांधकाम

हेमाड/ हेमाद्री ही उपाधी असू शकते आणि हेमाडपंत रामचंद्राचे प्रधान होते हे मी वर म्हटले आहेच. तो प्रश्न मला पडलेला नाही किंवा महाराष्ट्रातून कोणी आले म्हणून विशेष अभिमानही नाही आणि ते कर्नाटकातून आलेले नव्हतेच असे सांगण्याइतपत सज्जड पुरावेही नाहीत.

मी वरील प्रतिसादात प्रश्न स्पष्ट विचारला आहे असे वाटते. तरीही पुन्हा एकदा -

पाटणदेवी मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीत आहे का?

जुनीच शंका...

हेमाडपंती बांधकाम म्हणजे नक्की काय?
जिथं जिथं आठेकशे तफजार-बाराशे वर्षापूर्वी सत्तास्थाने होती, राजांचा निवास होता, त्या सर्व ठिकाणी विविध मंदिरे पहायला मिळतात. वर्तमानपत्रातून त्याचे सरसकट वर्णन "अमुक ठिकाणी हेमाडपंती मंदिर आहे" असेच येते.
महाराष्त्रात प्रत्येक जुने मंदिर बाय डिफॉल्ट हेमाडपंती असते, त्याच्या शेजारी धबधबा असेल तर ती बायडिफॉल्ट सीता न्हाणी असते, सीता -राम् वगैरें॰ए तिथे वास्तव्य असते, किंवा तिथे डबके/तळे/कुंड/विहीर असेल तर ते मंदिर पांडवकालीन असते , तिथले पाण्याचे कुंड म्हणजे कुंतीला तहान लागली भीमाने बमारलेल्या बुक्कीतून तयार झालेले किंवा अर्जुनाच्या बाणाने तयार झालेले असते. एखाद्या ठिकाणी काही उगवत नसेल तर तो तिथे सीता रमायणच्या शेवटी भूगर्भ प्रवेशित झाल्याचा बाय् डिफॉल्ट परिणाम/शाप असतो.

तर अशी हेमाडपंती मंदिरे कुठली? माझ्या औरंगाबादम्धील घरासमोरुन थेट सरळ दक्षिणेकडे चालत गेल्यास तीन एक किलोमीटरवर "सातारा"नावाचे छोटेसे गाव लागते, दोनेकशे च्या वस्तीचे, बीडबायपास च्या शेजारी. तर तिथले खंडोबा मंदिर, पुण्याबाहेर पस्तीसकिलोमीटरवर दिसणारे भुलेश्वर(http://misalpav.com/node/12558,http://www.misalpav.com/node/15601) आणि बीड शहरातील सुप्रसिद्ध, प्राचीन कनकालेश्वर(http://www.misalpav.com/node/4678) हे कनकालेश्वर.
तर विचारयचं हेच की "हेमाडपंती म्हणजे काय"? हेमाडपंताच्या आधी किंवा नंतर कुणी काहीच बांधले नाही का?

--मनोबा

माझीही जुनीच शंका...

हेमाडपंती बांधकाम म्हणजे नक्की काय?
जिथं जिथं आठेकशे ते हजार-बाराशे वर्षापूर्वी सत्तास्थाने होती, राजांचा निवास होता, त्या सर्व ठिकाणी विविध मंदिरे पहायला मिळतात. वर्तमानपत्रातून त्याचे सरसकट वर्णन "अमुक ठिकाणी हेमाडपंती मंदिर आहे" असेच येते.
महाराष्त्रात प्रत्येक जुने मंदिर बाय डिफॉल्ट हेमाडपंती असते, त्याच्या शेजारी धबधबा असेल तर ती बायडिफॉल्ट सीता न्हाणी असते, सीता -राम् वगैरेंचे तिथे वास्तव्य असते, किंवा तिथे डबके/तळे/कुंड/विहीर असेल तर ते मंदिर पांडवकालीन असते , तिथले पाण्याचे कुंड म्हणजे कुंतीला तहान लागली भीमाने बमारलेल्या बुक्कीतून तयार झालेले किंवा अर्जुनाच्या बाणाने तयार झालेले असते. एखाद्या ठिकाणी काही उगवत नसेल तर तो तिथे सीता रमायणच्या शेवटी भूगर्भ प्रवेशित झाल्याचा बाय् डिफॉल्ट परिणाम/शाप असतो.

तर अशी हेमाडपंती मंदिरे कुठली? माझ्या औरंगाबादम्धील घरासमोरुन थेट सरळ दक्षिणेकडे चालत गेल्यास तीन एक किलोमीटरवर "सातारा"नावाचे छोटेसे गाव लागते, दोनेकशे च्या वस्तीचे, बीडबायपास च्या शेजारी. तर तिथले खंडोबा मंदिर, पुण्याबाहेर पस्तीसकिलोमीटरवर दिसणारे भुलेश्वर(http://misalpav.com/node/12558,http://www.misalpav.com/node/15601) आणि बीड शहरातील प्राचीन कनकालेश्वर(http://www.misalpav.com/node/4678) .

तर विचारयचं हेच की "हेमाडपंती म्हणजे काय"? हेमाडपंताच्या आधी किंवा नंतर कुणी काहीच बांधले नाही का?

--मनोबा
--मनोबा

हेमाडपंती म्हणजे काय ?

"हेमाडपंती म्हणजे काय" ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे द्यावे असे मला काही माहीत नाही. 'A survey of Hemadpanti temples in Maharashtra' by Omkar Prasad Verma, 1973, Nagpur University असे एक पुस्तक मला जालावर दिसले पण ते केवळ नावाच्या स्वरूपात. त्या पुस्तकात काही निष्चिअ माहिती असेल असे त्याच्या नावावरून वाटते.

शाळेत ऐकल्याप्रमाणे आणि तसेच जालावर मिळालेल्या काही त्रोटक उल्लेखांवरून असे वाटते की अशा मंदिरांची वैशिष्टये पुढीलप्रमाणे मानता येतील. ही मंदिरे काळ्या पाषाणाचे मोठे चिरे एकमेकांवर वजनाच्या दडपणाने बसविलेले असतात. त्यांच्या जोडणुकीत चुना वा तत्सम बंधकाचा उपयोग नसतो. (बांधकामाच्या टिकाऊपणाला केवळ वजन पुरेसे पडेल काय?) बांधकामात लाकडाचा उपयोग जवळजवळ नसतो आणि दारे खिडक्याहि अगदी कमीतकमी असतात. मंदिरावर विटा वापरून बांधलेला आणि निमुळता होत गेलेला कंगोरेदार कळस असतो. त्याच्या आधारासाठी त्याच्या खाली एकमेकांशी ४५ अंश कोन करून बसविलेले आणि लहान होत जाणारे लांब चिर्‍यांचे चौरस असतात.

http://mr.upakram.org/node/3478 'मराठा डिच, भास्कर राम इत्यादि' ह्या माझ्या जुन्या धाग्यात वर्णिल्याप्रमाणे वाईजवळील पांडववाडी गावात कोल्हटकर कुलाची एक पेशवेकालीन शाखा राहते. त्या घराण्याच्या एकेकाळी मालकीचे असलेले एक शंकराचे मंदिर जवळच्याच भोगाव ह्या गावात आहे. (तेथेचे शेजारी वामनपंडिताची - यमक्या वामन - समाधि आहे.) त्याचे माझ्या संग्रहातील काही फोटो येथे देत आहे. वर वर्णिलेली हेमाडपंती प्रकाराची लक्षणे त्यांत दिसतात असे वाटते.

(चित्रे घालणे सध्या होत नाही असे दिसते. संस्थळ पूर्णपणे चालू झाल्यावर तसे करीन.)

महाराष्ट्र व कर्नाटकातील देवळे

ऐतिहासिक क्रमाने बघितले तर महाराष्ट्र व कर्नाटक येथील देवळांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.

चालुक्य शैली - काल 7 वे ते ८ वे शतक - उदा. ऐहोले,पट्टडकल येथील दुर्ग किंवा लाडखान मंदिरे
राष्ट्रकूट शैली - काल 9 वे किंवा 10 वे शतक - उदा. विजयनगर येथील हेमकूट टेकडीवरील राष्ट्रकूट मंदिरे
होयसला शैली - काल 11वे ते 14वे शतक - उदा. विजयनगर येथील हेमकूट टेकडीवरील होयसला मंदिरे
हेमाडपंती शैली -काल 13 ते 14व्या शतकाच्या पुढे - उदाहरण देण्याची गरज वाटत नाही कारण महारष्ट्रातील प्रचलित मंदिरे याच शैलीत बांधलेली आहेत.

'विज्जडविड' म्हणजे पाटणच असे वाटते...

पाटण हे आजचे खेडेगाव एकेकाळचे मोठे शहर असावे असे जे मी वर उल्लेखिले आहे त्याला काही पुरावे मला मिळाले आहेत. तसेच कन्नड-गौताळा संरक्षित वन-कन्नड/गौताळा घाट इत्यादि नावांचा वर उलेख केला आहे त्यांबाबतहि अधिक माहिती मिळाली आहे. तसेच पितळखोरे लेण्यांविषयीहि ही नवी माहिती आहे.

आपल्याला हे ठाऊकच आहे की जुन्या काळातील लेणी तत्कालीन व्यापारी दळणवळणाच्या मार्गांना लागून कोरली जात. आजचे पितळखोरे लेणे मात्र कोठेतरी कोपर्‍यात पडल्यासारखे वाटते कारण ते औरंगाबादहून चाळिसगावाकडे आणि तसेच उत्तरेकडे जाण्याच्या रस्त्यापासून बरेच आत जवळजवळ निर्मनुष्य भागात आहे. मला अशी शंका आली की ते लेणे नेहमीच असे दुर्लक्षित भागामध्ये नसणार, एकेकाळी तेहि मुख्य रहदारीच्या मार्गावर असणार.

ह्या दिशेने शोध घेण्यास लागलो तेव्हा प्रथम Itinerary and directory for Western India: being a collection of routes...अशा लांबलचक नावाच्या आणि कॅ. जॉन क्लून्सलिखित (१२वी नेटिव इन्फ़न्ट्री) ह्या १८२६ साली कलकत्त्यात छापलेल्या पुस्तकाकडे वळलो. हे पुस्तक books.google.com येथे उपलब्ध आहे. पुस्तकाच्या काळात सर्व प्रवास पायी वा घोडा, पालखी असा होत असे आणि ह्या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागातील महत्त्वाच्या स्थळांमध्ये एका जागेहून दुसर्‍या जागी जातांना वाटेत कोणती गावे, नद्या, घाट इ. लागतात, त्यांची अंतरे किती अशा प्रकारची माहिती दिली आहे. (अशा पुस्तकांना Vade Mecum असे लॅटिन नाव आहे.) त्यांपैकी मार्ग क्र. ५५ (रोमन आकडयात LV) आणि ५६ (LVI) हे अनुक्रमे From DHOOLIA by Mehoonbarra and Gowtulla Ghat to AURAGABAD आणि From DHOOLIA to AURANGABAD, via Mehoonbarra and Untoor असे दोन मार्ग आहेत, ज्यांमध्ये Gowtulla Ghat (म्हणजे गौताला घाट) ह्याचा उल्लेख आहे. मार्ग क्र. ५५ वर जी अनेक स्थाने दाखविली आहेत त्यांपैकी गिरणेच्या उत्तरकाठावरचे मेहुणबारे २०.५६९० उ. ७४.९४४८ पू. (Mehunbarra), हिवरखेडा २०.२९२४ उ. ७५.१३४० पू. (Hewurkherah) आणि हिवरखेडयाच्या लगेच दक्षिणेस असलेले कन्नड गाव मी wikimapia.org येथे पाहू शकलो. मेहुणबारे आणि हिवरखेडा ह्यांच्यामध्ये गौताळा घाट आहे असा उल्लेख आहे आणि तो घाट गाडयांना अशक्य आणि उंटांना अवघड असल्याचे वर्णिले आहे. ह्याचा अर्थ असा की क्लून्सच्या वेळी उत्तरेकडून औरंगाबादकडे येण्याचा एक मार्ग गौताळा घाटातून वर येत होता पण तो अवघड होता.

गौताळा घाटाविषयी अजून काही माहिती Historical and descriptive sketch of His Highness the Nizam's ...: Volume 1 ह्या पुस्तकात पान ३८४ वर अशा शब्दात उपलब्ध आहे:
"The Ghats between His Highness's territory and the British Province of Khandesh are pierced with numerous passes, all of which are more or less used as trade routes. The principle are the Ajanta Pass already mentioned, the Gaotala or Amba Ghat above Kanad, a very old trade route; at the foot of the ghat are the ruins of the ancient city of Patna. The road over this ghat was once so good that it was practicable for carts. It was reconstructed by the Emperor Aurangzeb during his Deccan campaign and was subsequently repaired by Outram when he was Bhil Agent."
ह्या वर्णनात स्पष्ट पाटणचा उल्लेख गौताळा घाटाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन शहर असा केला आहे. औरंगजेबाच्या काळापर्यंत तो घाट वापरात होता हेहि कळते. क्लून्सच्या वेळी मात्र तो खराब झालेला होता.

ह्या घाटाला पुन: चांगले दिवस आलेले दिसतात ते ऊट्रम नावाचा ब्रिटिश अधिकारी ’भिल्ल एजंट’ म्हणून कन्नड गावात नेमला गेला तेव्हा. अजिंठयाच्या आसपासचा सर्व भाग भिल्लांच्या टोळ्यांनी व्यापलेला होता आणि हे भिल्ल ब्रिटिश आणि निझाम दोघांचीहि डोकेदुखी होते. आजहि अजिंठयाच्या आसपासच्या बर्‍याच छोटया गावांना ’तांडा’ असे उपपद आहे हे ह्या भिल्ल दिवसांचीच आठवण देतात. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कन्नड गावात ’भिल्ल एजन्सी’ स्थापन करून एक ब्रिटिश अधिकारी भिल्ल एजंट म्हणून ठेवला गेला होता आणि त्याच्या हाताखाली काही सैनिक भिल्लांच्या बंदोबस्तासाठी दिले होते. असा एक अधिकारी ऊट्रम ह्याने ह्या घाटाची दुरुस्ती करून घेतली होती असा उल्लेख मिळतो. (ह्या घटना १८३०-४० च्या सुमाराच्या आहेत. एजन्सी १८४०त बंद करण्यात आली.) एजन्सीच्या माहितीसाठी पहा The castes and tribes of H.E.H. the Nizam's dominions: Volume 1 पान ६९.

आतापर्यंत चर्चिलेला गौताळा घाट म्हणजे आजच्या दिवसातला औरंगाबाद-चाळिसगाव ह्यांना जोडणारा तथाकथित कन्नड-घाट नव्हे. (मी ह्याच घाटाने खाली उतरलो होतो असे वर लिहिले आहे.) वर उल्लेखिलेल्या ऊट्रमच्या नावावरून ह्या घाटाला ’ऊट्रम घाट’ असे नाव होते. हा नवा गाडीरस्ता १८७० साली तयार करण्यात आला. (पहा: ’The Outram Ghat, 10 miles north of Kanhar, was provided in 1870 with a complete cart road.' Maharashtra State gazetteers, Volume 4 p. 580. 'Outram Ghat' असा शोध घेतल्यास snippet view मध्ये हे पान दिसते.

ह्या सर्व विवेचनाचा इत्यर्थ असा की भास्कराचार्यांचे ’विज्जडविड’ गाव कोणते असा प्रश्न पडल्यावर साहजिकच बीड सर्वांच्या पुढे येते, काहींना सांगोवांगीवरून विजापूर आणि बुलढाणाहि सुचतात पण सर्वात चांगला दावा असलेले आणि आज सांदीकोपर्‍यात पडलेले पाटण खेडे मात्र कोणालाच सुचत नाही. आता मला दिसते की ते एकेकाळी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले गाव होते आणि ते प्राचीन नगर आहे ही स्मृतीहि १९व्या शतकापर्यंत कोठेकोठे जागी होती. म्हणून मला असे वाटते की हे गाव मूळचे ’विज्जलविडपत्तन’ असे असून कालौघात ’विज्जलविड’ गळून पडून त्याचे साधे पाटण झाले असावे आणि भास्कराचार्यांचे वस्तीचे गाव तेच असावे.

लेख, प्रतिसाद माहितीपूर्ण

लेख, प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद.

+१

असेच म्हणतो.

प्रमोद

 
^ वर