आंद्रे साखारॉव्ह: विश्वशांतीचा ध्यास घेतलेला अणुशास्त्रज्ञ


'नेचर' या विज्ञानविषयक साप्ताहिकातील 'मिलेनियम एस्सेज' या सदर लेखनात एका वैज्ञानिकाने आंद्रे साखारॉव्हच्या (1921 - 1989) कार्याची तुलना महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याबरोबर करता येते असा उल्लेख केला होता. कुशाग्र बुद्धिमत्ता, आसाधारण मानसिक धैर्य व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर कुठल्याही राजकीय वा लष्करी दबावाला वा विरोधाला न जुमानता, प्रसंगी स्वत:चे जीवन धोक्यात घालून आपले उद्दिष्ट साधणारे विसाव्या शतकातील हे दोन महान नेते होते. पाशवी शक्तीविरुद्ध एकाकी लढताना लोक जागृती हेच ध्येय समोर ठेवून त्यानी आयुष्यभर लढा दिला. कारण या दोघानाही भविष्यकाळात मानव वंशावर कोसळणाऱ्या संकटांची पूर्ण कल्पना होती. माणूस म्हणून स्वत:वरील जबाबदारी टाळणे वा ऐन मोक्याच्या क्षणी निष्क्रीय राहणे ही एका प्रकारे स्वत:शीच केलेली प्रतारणा आहे, असे त्यांना वाटत होते.

गांधीजींच्या हत्येनंतरच्या काळात प्रत्येक छोट्या मोठ्या जातीय, धार्मिक वा राजकीय दंगलीनंतर उध्वस्त झालेल्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी गांधीजींच्या तोडीचा एकही नेता आपल्यात नसणे हे या देशाचे दुर्दैव आहे, असे वाटत आले आहे. व अशा दुर्धर प्रसंगी त्यांची आठवण येत राहते. तशाच प्रकारे जगाच्या पाठीवर वा जमिनीच्या खाली किंवा समुद्राच्या पाण्यात, कुठेही अण्वस्त्र चाचणीचे प्रयोग झाल्यास राजकीय वा लष्करी सत्तेच्या अरेरावी वा रोषापुढे मान न तुकविता आपले मत निर्भीडपणे मांडणाऱ्या आंद्रे साखारॉव्हची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

आंद्रे साखारॉव्हचा जन्म 21 मे 1921 रोजी मास्को येथे झाला. वडील भौतिकशास्त्राचे शिक्षक होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांचे लेखन केले होते. 1941 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सक्तीच्या सैनिक शिक्षणासाठी साखारॉव्ह यांना बोलविण्यात आले होते. परंतु वैद्यकीय चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना परत पाठविण्यात आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश न घेता एका शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात निरीक्षक म्हणून ते काम करू लागले. तेथेही त्यांनी अनेक सुधारणा केल्या. युद्ध समाप्तीनंतर 1945 साली पदव्युत्तर शिक्षणासाठी मास्को येथील सोवियत अकॅडेमी ऑफ सायन्समध्ये त्यांनी प्रवेश मिळविला. या शिक्षणाच्या काळातच साखारॉव्हची बुद्धिमत्ता व अभियांत्रिकी समस्या हाताळण्याची हातोटी वरिष्ठांच्या लक्षात आल्या. साखारॉव्हला मात्र भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन करण्याची इच्छा होती. त्यामुळेच पदव्युत्तर शिक्षणानंतर अण्वस्त्र निर्मितीच्या प्रकल्पात सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला. पुढील तीन वर्षे 'ज्युनियर रिसर्च फेलो' म्हणून ते संशोधन करू लागले.

शीत युद्धाच्या त्या कालखंडात साखारॉव्ह अमेरिकेत चाललेल्या अण्वस्त्र निर्मितीतील अद्ययावत संशोधनाचा अभ्यास करत होते. अमेरिकेसारख्या महत्वाकांक्षी राष्ट्राकडे अण्वस्त्र निर्मितीची मक्तेदारी असल्यास पृथ्वीला त्यापासून फार मोठा धोका आहे, असे वाटल्याने साखारॉव्ह उद्विग्न होऊन मायदेशातील बॉम्ब निर्मितीच्या प्रयत्नात सामील झाले.

रशियातील कम्युनिस्ट राजवटीने साखारॉव्हना अण्वस्त्र निर्मितीच्या प्रकल्पात सहभागी करून घेण्याचे ठरविले. थोड्याशा नाखुशीनेच साखारॉव्ह या कामावर रुजू झाले. अमेरिकेच्या अनिर्बंध सत्तेपुढे मान तुकवता कामा नये या उद्देशाने प्रेरित होऊन त्यानी या प्रकल्पात भाग घेण्याचे ठरवले. ते बॉम्बच्या निर्मितीविषयी संशोधन करू लागले. अमेरिकेच्या अण्वस्त्र प्रयत्नांना त्यांचा विरोध असला तरी रशियन कम्युनिस्ट पक्षाचे ते साधे सदस्यही नव्हते. कारण या राजवटीच्या काळ्याकुट्ट इतिहासाची कल्पना त्यांना होती.

प्रकल्पात रुजू होण्यासाठी मार्च 1950 मध्ये साखारॉव्ह व त्याच्या एका मित्राला एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले. अण्वस्त्राचे संशोधन व निर्मितीसाठी मास्कोपासून 500 किमी दूर असलेल्या 'सारोव्ह' या प्राचीन प्रार्थनास्थळाची निवड करण्यात आली होती. प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी म्हणून या स्थळाची माहिती सर्व कागदपत्रातून, नकाशातून काढून टाकण्यात आली होती. प्रकल्पाच्या कामासाठीच्या इमारती, रस्ते इ. सुविधा कैद्यांचा छळ करून त्यांच्या श्रमातून बांधल्या होत्या. संपूर्ण क्षेत्र संरक्षक ताऱ्यानी वेढलेले होते.अर्झमास - 16 या नावाने ते ठिकाण शासकीय पातळीवर व कागदपत्रात ओळखले जात होते.

1952 साली अमेरिकेने थर्मो-न्युक्लिअर बॉम्बची चाचणी यशस्वीपणे करून दाखवली. त्यामुळे रशियातील अण्वस्त्र निर्मितीच्या प्रयत्नांना वेग आला. स्लोइका या नावाने हा बॉम्ब ओळखला जात होता. चाचणीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु चाचणीच्या वेळी होणाऱ्या किरणोत्साराचा परिणाम दूरवर पसरण्याच्या भीतीमुळे अनेक किलोमीटरचा प्रदेश सक्तीने निर्मनुष्य करण्यात आला. हजारो रशियन्स विस्थापित झाले. किमान 25 -30 लोक प्राणाला मुकले.

'स्लोइका'ची चाचणी यशस्वी झाली. हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा स्लोइकाची संहारक शक्ती 20 पट जास्त होती. 32 वर्षाच्या साखारॉव्हवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यांना अनेक पारितोषके मिळाली. रशियन राजवट साखारॉव्हच्या प्रयत्नाबद्दल संतोष व्यक्त करत होती. त्यांच्या सहकाऱ्याप्रमाणे साखारॉव्ह ज्यू वंशज नव्हता. हेही त्याचे एक कारण असावे. राजकीयदृष्ट्या साखारॉव्ह 'क्लीन' होते.

स्लोइकात अनेक दोष राहून गेले होते. त्याच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर आंद्रे साखारॉव्ह व त्यांचे सहकारी बॉम्बच्या नवीन डिझाइनवर संशोधन करू लागले. त्यात अणूंवर फिशन व फ्युजन या दोन्ही आण्विक प्रक्रियांचा वापर करण्यात आला. 1955 मध्ये याची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाली. परंतु या बॉम्बच्या स्फोटक क्षेत्राच्या तीव्रतेचा नीटसा अंदाज न आल्याने फार लांबवर असलेली एक बहुमजली इमारत कोसळून काही जण मरण पावले. साखारॉव्हना चाचणीच्या यशाच्या आनंदापेक्षा जीवित हानीबद्दल दु:ख झाले. चाचणीनंतरच्या एका पार्टीत बोलताना आपली चाचणी निर्मनुष्य ठिकाणीच यशस्वी व्हायला हवी. जीवहानी होता कामा नये असे उद्गार त्यांनी काढले. तेथे जमलेल्या नोकरशाहीला व लष्करशाहीला त्यांचे हे उद्गार आवडले नाहीत. 'वैज्ञानिकांनी फक्त बॉम्बची निर्मिती करावी. इतर गोष्टीत त्यांची लुडबुड नको' असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला. साखारॉव्ह यांनी यापूर्वी अर्झमास - 16 च्या कौन्सिल ऑफ पीपल्स डेप्युटी या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत संघटनेसाठी काम करण्यास नकार दिल्यामुळे आधीच त्यांच्यावर राग होता.

त्यानंतरही अनेकदा, अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. प्रत्येक वेळी साखारॉव्ह अस्वस्थ होत असत. किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास ते त्याकाळी करत होते. त्याच्या गंभीर परिणामांची त्यांना पूर्ण कल्पना होती.

1957मध्ये अमेरिकन प्रसार माध्यमांनी अमेरिका एक 'क्लीन' बॉम्ब विकसित करत असून, त्यामुळे किरणोत्सर्गाचा उपद्रव होणार नाही, असा प्रचार करण्यास सुरुवात केली. या दाव्यातील फोलपणा साखारॉव्हच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कारण एक मेगाटन (10 लाख टन) टीएनटीच्या स्फोटाएवढी क्षमता असलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे कार्बन - 14 या मूलद्रव्याचे विघटन होऊन किमान 6600 लोक मृत्युमुखी पडतील व या किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम पुढील 8000 वर्षापर्यंत जाणवतील, असा साखारॉव्ह यांचा अंदाज होता. 1958मध्ये प्रकाशित केलेल्या या लेखामुळे अमेरिकन प्रसार माध्यमांची हवाच निघून गेली. रशियाचे त्यावेळचे सर्वेसर्वा क्रुश्चॉव्ह यानी या लेखाच्या प्रसिद्धीस अनुमती दिली होती. कारण ती त्यांची राजकीय खेळी होती. त्याच राजकीय डावपेचाचा भाग म्हणून, जणू जगावर फार मोठे उपकार करत आहोत असे दाखविण्यासाठी क्रुश्चॉव्ह यांनी अण्वस्त्र निर्मितीला बंदी घातल्याची एकतर्फी घोषणा केली. साखारॉव्ह या पाताळयंत्री राजकारणाशी परिचित नव्हते. त्यांच्या मते बलाढ्य राष्ट्रे विस्तवाशी खेळत असून त्यांचे हे प्रयत्न एखाद्या गुन्हेगाराला साजेसे आहेत. हे देश करत असलेल्या बॉम्बस्फोटामुळे होणाऱ्या किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम जगातील बहुसंख्य लोकांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

अमेरिका मात्र आपल्या अण्वस्त्र यूद्धप्रयत्नांची तरफदारी करत होता. किरणोत्सर्गामुळे फार तर माणसांच्या आयुष्यातील फक्त दोन दिवस कमी होऊ शकतात. त्या तुलनेने सिगारेटचे दुष्परिणाम हजार पट आहेत, असा दावा अमेरिका करू लागली. मानववंशाचे जीवन सुखाचे व्हावे यासाठी सर्व संबंधितांनी व्यवहार्य भूमिका घ्यायला हवी, या नेहमीच्याच मुद्द्याभोवती चर्चा घोळत होती. साखारॉव्ह यातील तर्कविसंगतीवर बोट ठेवत होते. लाकूड फोडताना तुकडे उडणारच असे म्हणत रशिया स्वत:च्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालत असे. साखारॉव्ह मात्र किरणोत्सर्ग व बॉम्बस्फोट यामुळे होत असलेल्या दुष्परिणामांबद्दल स्वत:ला दोषी ठरवत असत. अमेरिकेच्या तोडीची थर्मोन्यूक्लिअर बॉम्बची निर्मिती त्यानी 1953 साली करून त्याची यशस्वी चाचणीही करून दाखविली. पुढील काही काऴातच त्यांचे अण्वस्त्रनिर्मितीविषयी मनपरिवर्तन झाले.

त्यांच्या मतपरिवर्तनाबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकानुसार चाचणीनंतर चाचणी रेंजच्या ठिकाणाहून जात असताना किरणोत्सर्गामुळे पंख गळून पडलेल्या, तडफडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे बघून साखारॉव्हच्या मनाचा थरकाप उडाला. मन विरघळले. त्याक्षणी त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला. युद्धप्रयत्नातील फोलपणा प्रकर्षाने जाणवू लागला. विश्वशांतीची गरज भासू लागली.

अमेरिका व ब्रिटन या देशांनी आपल्या चाचण्यांच्या प्रयत्नात खंड पडू दिले नाहीत. क्रुश्चॉव्हसुद्धा वैतागून पुन्हा चाचणीचा आग्रह धरू लागले. साखारॉव्ह मात्र या प्रयत्नांना विरोध करू लागले. सर्वशक्तीनिशी ते एकाकी लढा देत होते. प्रत्यक्ष स्फोटाऐवजी सैद्धांतिक स्वरूपात संगणकावरून बॉम्बच्या संहार क्षमतेचा अंदाज घेता येईल, असा त्यांचा दावा होता. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची चाचणी घेतल्यानंतर ते आपल्या खोलीत टेबलावर डोके टेकवून रडत होते.

साखारॉव्हच्या प्रयत्नांना थोडे यशही मिळाले. त्यांच्या सूचनेप्रमाणे जमिनीवर मोकळ्या वातावरणात अण्वस्त्र चाचणी करू नये याबाबत बड्या राष्ट्रांचे एकमत झाले. 1963मध्ये मास्को येथे बंदीच्या करारावर सह्या झाल्या. त्यामुळे साखारॉव्ह यांना समाधान वाटले.

साखारॉव्ह यांना अण्वस्त्रांची टांगती तलवार पूर्णपणे बाजूला सरकलेली नाही याची कल्पना होती. वैज्ञानिक संशोधन, त्यातून नीतीमत्ता व तेथून थेट राजकारण असा त्यांचा जीवन प्रवास होता. बॉम्ब प्रकल्पाला आता त्यांची गरज नव्हती. परंतु शस्त्रास्त्रांच्या घाणेरड्या राजकारणावर योग्य उपाय शोधण्यासाठी प्रशासन व्यवस्थेत मोक्याच्या पदावर असणे गरजेचे असते. त्यामुळे साखारॉव्ह आपल्या पदाचा राजीनामा न देता आपल्या आवडीच्या संशोधन क्षेत्रात काम करू लागले. विश्वरचनाशास्त्र, गुरुत्वाकर्षण, मूळद्रव्यातील घटक, इत्यादी विषयांवर त्यांनी काही नवीन मुद्दे मांडले. या संशोधन कार्यात त्यांना भरपूर समाधान मिळे.

डिसेंबर 1966 मध्ये मानवी हक्कासाठी लढणाऱ्या मोर्च्यात ते सामील झाले. रशियन राज्यकर्त्यांना उद्देशून यासंबंधात त्यांनी एक पत्र लिहिले. त्यामुळे रशियन राज्यकर्त्यांनी चिडून साखारॉव्हच्या वेतनात कपात केली. त्यांचे अधिकार कमी करण्यात आले. या सर्व घटनामुळे मास्कोतील क्रियाशील भूमिगत कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध आला. साखारॉव्हच्या मनातील विश्वप्रेम त्यांना ठोस कृती करण्यास भाग पाडत होती. त्यांनी शासनाला 10 पानी पत्र लिहिले. त्यात अमेरिकेचा आंतरखंडीय प्रक्षेपी क्षेपणास्त्रबंदीचा प्रस्ताव रशियाने मान्य करावा, क्षेपणास्त्र निर्मिती थांबवावी, कारण क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान मानवी सर्वनाशाकडे नेणारा आहे, असे म्हटले होते. या मागणीच्या पुष्ट्यर्थ सैद्धांतिक पुराव्याची मांडणी त्यात होती. पत्रातील मजकुराला प्रसिद्धी दिल्यास अमेरिकन वैज्ञानिकांना व तेथील जनतेला खरी परिस्थिती कळू शकेल, असेही त्यांनी सुचविले. परंतु वरिष्ठांनी साखारॉव्हच्या सर्व सूचनांना केराची पेटी दाखवली.

याच काळात साखारॉव्ह प्रगती, शांतीयुक्त सहजीवन व बौद्धिक स्वातंत्र्य या विषयावर दीर्घ निबंध दीर्घ निबंध लिहित होते. त्यात अण्वस्त्र युद्ध, अण्वस्त्र चाचणी, प्रदूषण, पर्यावरण, वाढती लोकसंख्या, बौद्धिक स्वातंत्र्य, मानवी हक्क इत्यादी अनेक समस्यांवर विस्तृतपणे मूलभूत विचारांची मांडणी केली होती. भांडवली व साम्यवादी व्यवस्था यातील चांगल्या गोष्टींचा वापर करून एका नव्या व्यवस्थेतून सामाजिक विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

कुठलीही गुप्तता न पाळता आंद्रे साखारॉव्ह हा निबंध टाइप करून घेत होते. त्याची कार्बन कॉपी केजीबी या गुप्तचर संस्थेच्या हातात पडणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. व त्याचे काय दुष्परिणाम होतील याचाही त्यांना अंदाज होता.

एप्रिल 1968 च्या शेवटच्या आठवड्यात हे पत्रक छापण्यात आले. त्याची एक प्रत अध्यक्ष ब्रेझनेव्ह यांना पाठवण्यात आली. परंतु केजीबीने त्या निबंधाचा मूळ मसूदा त्याअगोदरच ब्रेझनेव्हला दाखविला होता! बीबीसी व न्यूयार्क टाइम्सने या निबंधाला भरपूर प्रसिद्धी दिली. वैज्ञानिक जगात खळबळ माजली. या निबंधाचे जगातील सर्व प्रमुख भाषात भाषांतर झाले. सुमारे 2 कोटी प्रती छापल्या गेल्या.

रशियन राज्यकर्त्यांना साखारॉव्हचा हा उद्धटपणा सहन करण्यापलीकडचा वाटला. त्यांना मास्कोबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. जवळजवळ त्यांना नजरकैदेतच ठेवले होते. यापूर्वी हीरो ऑफ सोशॅलिस्ट लेबर ही अत्युच्च पदवी तीन वेळा देवून त्यांचा मानसन्मान केला होता. परंतु त्या कुठल्याही गोष्टींचा आता उपयोग नव्हता. याच काळात त्यांची पत्नी, क्लाव्हा, कर्करोगाने मृत्युमुखी पडली. त्याही परिस्थितीत साखारॉव्ह यांनी वैज्ञानिकांची सामाजिक बांधिलकी ओळखून सोव्हिएत रेड क्रॉस या संस्थेला फार मोठी देणगी दिली. याच सुमारास विश्वशांतीसाठी प्रयत्न करणारा म्हणून त्यांना नोबेल पारितोषक प्रदान करण्यात आले. रशियन राजवटीला याचे काहीही सोयरसुतक नव्हते.

आंद्रे साखारॉव्ह यांचे कार्य अण्वस्त्रबंदीपुरतेच मर्यादित नव्हते. मानवी हक्क समितीचे ते संस्थापक सदस्य होते. राजकीय कैद्यांना सन्माननीय वागणूक व संरक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते. अशा कैद्यांचा मनोदोष चिकित्सेच्या निमित्ताने उपचाराच्या नावाखाली त्यांचा अनन्वित छळ केला जात होता. त्यावर बंदी आणावी यासाठी ते प्रयत्नशील होते. या कैद्यांची पुनर्वसन करण्याची पूर्ण जबाबदारी शासनाची आहे, असे त्यांना वाटत होते. लोकशाहीचे ते कट्टर पुरस्कर्ते होते.

1980 मध्ये अफगाणीस्तानात रशियन सैन्य घुसल्यावर साखारॉव्ह यांनी ही एक फार मोठी, अस्वस्थ करणारी चूक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने त्यांना मास्कोपासून 500 किमी अंतरावरील गॉर्की या शहरात नजरकैदेत ठेवण्यात आले. न्यायालयीन चौकशी न करता त्यांना तेथे डांबून ठेवण्यात आले. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क तुटला. सरकारी टीव्ही, रेडिओ व प्रसारमाध्यमांनी त्यांच्या विरोधात भरपूर आग ओकली. त्यांच्या प्रत्येक कृतीचा व वक्तव्याचा विपरीत व अनर्थ करून त्यांच्यावर दोषारोप करण्यात आले. साखारॉव्ह यांना यामुळे तीव्र मनस्ताप सोसावा लागला.

तरीसुद्धा साखारॉव्ह यांनी मनाचा समतोल ढळू दिला नाही. इतर राजकीय कैद्यावर अन्याय होत आहे हे कळल्यानंतर ते उपोषणांला बसत. त्यामुळे वरिष्ठांना त्यांची मागणी पूर्ण करावी लागत असे. राज्यसत्ता कुठल्याही थराला जाऊ शकते, आपले पाशवी बळ वापरू शकते, याची पूर्ण कल्पना असूनसुद्धा साखारॉव्ह अन्यायाविरुद्ध लढत होते. तेथील तथाकथित 'डॉक्टर' हात पिरगळून 'इंजेक्शन' देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु हे सर्व ते सहन करत होते.

जवळजवळ सात वर्षे ते नजरकैदेत होते. रशियात नवीन 'परिस्राइकाचे राजकीय वारे' वाहू लागले. गोर्बाचेव्हच्या आज्ञेवरून त्यांची सुटका करण्यात आली व मास्कोला परत जाण्यास परवानगी मिळाली. त्यावेळीसुद्धा इतर कैद्यांचीसुद्धा सुटका व्हावी यासाठी गोर्बाचेव्हपाशी त्यांनी आग्रह धरला.

मास्कोला परतल्यानंतरही त्यांनी विश्वशांती व मानवी हक्कासंबंधीचे प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांचा हा लढा त्याच्या मृत्युपर्यंत चालूच होता (1989) . शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनात हेच विषय होते. मानवी मूल्यांनाच ते मार्गदर्शक समजत होते. कुठल्याही तत्वज्ञानाची वा धर्मसंस्थेची त्यांना गरज भासली नाही. विज्ञानातील प्रगती व विश्वरचना यावरील विश्वास आणि जीवनाबद्दल व समाजाबद्दल आशावाद, हेच त्यांना महत्वाचे वाटत होते. कुठल्याही कसोटीच्या क्षणी मी का म्हणून अशी पळवाट त्यांना पसंत नव्हती.

रशियातील कम्युनिस्ट राजवटीच्या पतनानंतर रशियाने आंद्रे साखारॉव्हबद्दलची सर्व माहिती त्यांचे लेखनसाहित्य यांचे एक संग्रहालय उघडले असून ते सर्वांसाठी खुले केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या आख्यायिकांची आणि साखारॉव्ह यांनी स्वत: नोंद करून ठेवलेल्या लेखनांची शहानिशा करता येते. त्यावरून अण्वस्त्र निर्मितीच्या प्रकल्पावर कार्य करत असतानाच त्यांचे मनपरिवर्तन झाले होते, हे कळते. हा बदल शस्त्रास्त्रे व त्यांचे राजकारण यांच्या प्रत्य़क्ष अनुभवाचे फलित होते.

साखारॉव्ह ज्यासाठी प्रयत्न करत होते ते उद्दिष्ट अजूनही सफल झालेले नाही. उलट सुरुवातीच्या चार - पाच आण्विक राष्ट्रांच्या पंक्तीत भारत, पाकिस्तान, कोरिया, इराण यासारखी विकसनशील राष्ट्रे बसले आहेत. या राष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठी वैज्ञानिक पुढे आले नाहीत, हीच या देशांची शोकांतिका आहे. विकास प्रक्रियेत अडथळा आणू पाहणाऱ्या अस्त्रशस्त्र निर्मिती, युद्ध याविरुद्ध जनमत तयारी करण्याची गरज आहे. युद्धप्रयत्नांतून आजवर कुठल्याही समस्या सुटल्या नाहीत, याला इतिहास साक्षी आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी संघटितपणे लढा देण्याची आवाज उठविण्याची गरज आहे. परंतु याविषयी ज्यांना जास्त कळते तेच मूग गिळून बसले आहेत. अण्वस्त्राबरोबरच रासायनिक व जैविक शस्त्रास्त्रांचा साठाही वाढत आहे. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अजून एखाद्या साखारॉव्हची वाट पाहावी लागेल!

संदर्भ

Comments

दीर्घ निबंध

लेखातील दुव्यात फक्त पहिले एकच पान वाचता येते. त्याऐवजी
दीर्घ निबंधाचा पूर्ण मसूदा येथे वाचता येईल.

चांगला परिचय

आंद्रे साखारॉव यांचा परिचय आवडला. अमेरिका-सोविएत युनियनच्या शीतयुद्धाचे वर्णन आणि साखारॉव यांच्यविषयी वाचताना एखाद्या बाँडपटाची कथा वाचते आहे असे वाटले. जुलमी सत्ताधिशांविरुद्ध सोबत कोणतेही संघटन नसताना दिलेला लढा स्पृहणीय आहे.

असो.

साखारॉव यांची तुलना गांधींशी करताना सुरुवातीला लेखात आलेली वाक्ये किंचित मेलोड्रामॅटिक वाटली पण ओवरऑल लेख आवडला.

+१

प्रतिसादातील दोन्ही मुद्द्यांशी सहमत.

नितिन थत्ते

छान परिचय

साखारोव यांचा परिचय आवडला.

मिहिर कुलकर्णी

कल्पनारम्य?

उत्तम परिचय ..

परंतु अशा कथा वाचल्यावर आजकाल एक प्रश्न मनात येतो.. कदाचित उत्तर तितके सरळ नसेल पण.. पण जेव्हा हुकुमशाहीमध्ये, एकाधिकारशाहीमध्ये जेव्हा असे काही लोक विरोधी आवाज उठवतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध दगा फटका कसा नाही होत.? म्हणजे अगदी मृत्युदंड नाही देऊ शकले तरी पण अपघाती मृत्यू तितकासा अवघड नसावा.. (आमच्या इथे RTI कार्यकर्तेच काय पण सरकारी अधिकारी पण रस्त्यावर मारले जातातच की..)
वरून ते दीर्घ निबंध लिहित असताना जर तो मंजूर नसेल तर आणि गुप्तचर संस्थेकडे सगळी माहिती असताना तो निबंध प्रसिद्ध कसा होऊ दिला.. माणसे गायब होतात तिथे असा निबंध राजरोस प्रसिद्ध होतो हे कसे..

या लोकांचा लढा वगैरे म्हणतो तेव्हा नेहमीच या गोष्टी जास्त fantacy (यथायोग्य शब्द सापडत नाहीये, कल्पनारम्य? की आणखी काही? ) अशा काही वाटत राहतात. म्हणजे त्यात काही तरी पचत नाही असे काहीसे वाटत राहते..

(साखारोव्ह यांच्याबद्दल पूर्ण आदर आहेच, पण बाकी आपल्याला तिआनमेन चौकातला Tank Man नेहमीच भारी वाटतो.. मूर्तिमंत धैर्य..)

tank man

हे सर्व कुठून येते?

पाशवी राजकीय सत्तेचा वापर करून साखारॉव्हसारख्यांना चिरडून टाकणे रशियन सत्तेला नक्कीच जमले असते. (व त्यांनी तसे इतर अनेकांचे केलेही असेल!) परंतु साखारॉव्ह आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक व या निमित्ताने अमेरीका कुरघोडी करणार याची खात्री असल्यामुळे साखारॉव्ह यांना कैदेत असताना वा बाहेर, जिवेनिशी मारणे शक्य झाले नसावे. त्याकाळी सोल्झेनित्सिनच्या प्रकरणामुळे रशियन राजवट अगोदरच बदनाम झाली होती, हेही एक कारण असावे.

त्याचबरोबर राजकीय सत्तेला भविष्याचा नीटसा अंदाज आला नसावा. केजीबी, सीआयए, मोसाद या गुप्तचर संस्था अशाच दुष्कृत्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. महात्मा गांधी ब्रिटिश सत्तेला आव्हान दे्ण्याइतपत डोईजड होऊ शकतील याचा अंदाज पूर्वीच आला असता तर दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या राजवटीने रेल्वे प्लॅटफॉर्मवरच गोळी घालून त्यांना ठार केले असते. कदाचित भविष्यकाळातील डोकेदुखीचा नीटसा अंदाज न आल्यामुळे पाशवी राजकीय सत्तेला उघड आव्हान देणार्‍या साखारॉव्हसारख्या मूठभरांचे कतृत्व जगासमोर येत असावे.

म्हणूनच साखारॉव्ह यांच्या नावाने युरोपियन पार्लिमेंट युनियनने मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्यासाठी असहिष्णुता, धर्मांधता व जुलुम जबरदस्तींच्या विरोधात लढणार्‍या व्यक्ती व संघ -संस्था यांना दर वर्षी साखारॉव्ह पारितोषक प्रदान करून सन्मान करते. 2002 पासून सुरु झालेल्या या पारितोषकांच्या मानकऱ्यामध्ये नेल्सन मंडेला, तस्लीमा नसरीन, कोफी अन्नान, ह्यू जिया, अलेक्झांडर मिलिन्केविच, रिपोर्टर्स बिहैंड बॉर्डर्स, अरब स्प्रिंग, लेडीज इन व्हाइट इत्यादी असामान्य व्यक्ती व संघ - संस्थांचा समावेश आहे.

त्यामुळे विजय तेंडूलकरांनी विचारल्याप्रमाणे हे सर्व कुठून येते? या प्रश्नाला उत्तर नाही.

+१

साखारॉव्ह आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक व या निमित्ताने अमेरीका कुरघोडी करणार याची खात्री असल्यामुळे साखारॉव्ह यांना कैदेत असताना वा बाहेर, जिवेनिशी मारणे शक्य झाले नसावे. त्याकाळी सोल्झेनित्सिनच्या प्रकरणामुळे रशियन राजवट अगोदरच बदनाम झाली होती, हेही एक कारण असावे.

+१ ही कारणे आहेतच पण या शिवाय समाज मन या लोकांबाबत असू शकते. त्यांना चिरडण्याने मोठ्या असंतोषाला सामोरे जाण्याची भीती सरकारला वाटू शकते. यावर उपाय म्हणून मग प्रसिद्धीमाध्यमांना हाताशी धरून या लोकांची प्रतिमा डागाळलेली आहे हे दाखवले जाते. (उदा. जुलियन असांज प्रकरण) यात त्यांना मिळणारा पाठिंबा, सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न असतो. नेहमीच जिवे मारण्याची गरज असते असे नाही.

?

हाताशी धरून या लोकांची प्रतिमा डागाळलेली आहे हे दाखवले जाते. (उदा. जुलियन असांज प्रकरण) यात त्यांना मिळणारा पाठिंबा, सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न असतो. नेहमीच जिवे मारण्याची गरज असते असे नाही.
आदमी को मारने से पहले उसकी सोच को मारना जरुरी है | सुभाष नागरे एक व्यक्ती है और सरकार एक सोच |
सरकार मधील आध्यात्मिक गुरु साकारणारा मामुटी(की मोहनलाल? )

--मनोबा

मुद्दा

उशिरा प्रतिसाद देतोय.. शिळ्या मुद्द्यावर बोलतोय..
पण हाच तर मुद्दा आहे की माध्यमे भरपूर टीका करत होती.. आणि जरी काही बरे वाईट झाले तर लोकांचा दबाव वगैरे गोष्टी एकाधिकारशाहीमध्ये तितक्याश्या matter करत नाहीत असं दिसतं.. मग दर वेळेस साराखोव्ह, स्यू की आणि तसेच छोटे मोठे नेते या वातावरणात कसे काय तग धरतात याचे आश्चर्य वाटते.. खासकरून जर प्रबंध मान्य नव्हता तर प्रसिद्ध कसा होऊ दिला ? हा आणि असे प्रश्न राहतात..

म्हणून तर...

पण हाच तर मुद्दा आहे की माध्यमे भरपूर टीका करत होती.. आणि जरी काही बरे वाईट झाले तर लोकांचा दबाव वगैरे गोष्टी एकाधिकारशाहीमध्ये तितक्याश्या matter करत नाहीत असं दिसतं.. मग दर वेळेस साराखोव्ह, स्यू की आणि तसेच छोटे मोठे नेते या वातावरणात कसे काय तग धरतात याचे आश्चर्य वाटते.. खासकरून जर प्रबंध मान्य नव्हता तर प्रसिद्ध कसा होऊ दिला ?

तुमचा मुद्दा योग्यच आहे म्हणून तर अगदी सुरुवातीलाच "जेम्स बाँडचे" कथानक वाटते असे लिहिले आहे. :-) पण बहुधा एकाधिकारशाहीवरही आंतरराष्ट्रिय राजकारणाचे दडपण येत असावे. हीच एकमेव शक्यता मला दिसते.

चांगला लेख

माहितीपूर्ण आणि चांगला लेख. इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

उत्तम माहीती.

उत्तम माहीती.
_____________________________________________________________________________________
सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्|
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्||

चांगला लेख

चांगला लेख आहे. इथे दिल्याबद्दल आभारी आहे.

 
^ वर