हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा

महाराष्ट्रात वृत्तपत्रांची मोठी परंपरा आहे. सुरुवातीला अनेक असणारी वृत्तपत्रे व्यावसायिक गणित न जमल्याने बंद पडली. आता हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच प्रमुख वृत्तपत्रे उरली आहेत. सकाळ हे त्यातील अग्रगण्य (सर्क्यूलेशननुसार) वर्तमानपत्र म्हणता येईल. इतक्या मोठ्या प्रमाणावर खपणार्‍या वृत्तपत्राचा अनेक लोकांवर असणारा प्रभाव पाहता, तसेच वृत्तपत्रात येणारी प्रत्येक गोष्ट खरे मानणार्‍या लोकांची संख्या पाहता वर्तमानपत्रांवर मोठी सामाजिक जबाबदारी आहे.

स्वतःला "भविष्यपत्र" वगैरे म्हणवून स्वतःची पाठ थोपटणे, गुळमुळीत/कणा नसलेली पत्रकारिता, विशिष्ट पक्षाला (कोणता तो सांगायला हवे का?) अनुकूल बातम्या छापणे आणि प्रतिकूल बातम्या न छापणे, विशिष्ट उद्योगांना अनुकूल अश्या (पुरस्कृत, पेड न्यूज प्रकारच्या) बातम्या देणे, फर्निचर, टुरिस्ट कंपन्या, घरांची वगैरे प्रदर्शने भरवणे वगैरे या सगळ्याचे उपद्रवमूल्य तसे बरेच आहे पण तरीही काही लोक दुर्लक्ष करण्यायोग्य म्हणू शकतील. पण ज्यांच्यावर सामाजिक प्रबोधनाची जबाबदारी आहे त्यांनी त्याच्या उलट जे प्रकार सुरू केले आहेत त्याकडे सुशिक्षित लोकांनी बारकाईने पाहणे आवश्यक झाले आहे.

'ज्येष्ठ आयुर्वेदाचार्या'पासून 'ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु' पर्यंत सर्व पदे भुषवणार्‍या 'आधुनिक व्यासा'शी (जुन्या व्यासांना वैद्यकशास्त्राविषयी आणि संगीताविषयी काही ज्ञान होते की नाही ते मला ठाऊक नाही) सूत जमल्यापासून तर सकाळचे 'संतुलन' बिघडले आहे असे दिसते. अशास्त्रीय माहितीने भरलेली साप्ताहिक पुरवणी, व्हिडीओ कॉन्फरन्सने सुसंवाद, गीतेवरील 'व्हर्जन कंट्रोल्ड' प्रवचने इथपर्यंत सहन करण्याजोगे होते, पण गेल्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीने "उदय भविष्यपत्राचा" वगैरे गोडगोजिर्‍या स्वस्तुतीमागचा खरा चेहरा उघड केला असे वाटते.

गेल्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीला सर्नच्या 'वन्स इन अ लाइफटाइम' शोधाची पार्श्वभूमी होती. पण सप्तरंगचा पहिला लेख होता "जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची" (http://www.esakal.com/esakal/20120708/5563943479780979803.htm). सदर लेखकाची लेखनशैलीच्या (पुढच्या वाक्याचा मागील वाक्याशी संबंध नसणे, वाक्यातून/परिच्छेदातून अर्थबोध न होणे, सर्वज्ञपणाचा आव वगैरे) दोषांकडे दुर्लक्ष केले तरी असा लेख सर्वप्रथम देण्याचे औचित्य समजत नाही. त्यात पुन्हा सदरहू लेखकाच्या लवकरच प्रकाशित होणार्‍या पुस्तकाचे (प्रकाशक/वितरक कोण हे सांगायलाच हवे का?) मुखपृष्ठ आहे, त्यात इलेक्ट्रॉनिक सर्किटस्, डीएनए, ॐ, अवकाश वगैरेंचा 'कल्पक' वापर केला आहे. लेखाच्या शेवटी पुन्हा 'भौतिकवाद्यांचे' पित्त शमवण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर(ख्यातनाम शास्त्रज्ञ) यांच्या कॉमेंटचा 'उतारा' दिला आहे. जिज्ञासूंनी मुळातून वाचावा असा हा लेख आहे :)))

हे कमी की काय म्हणून पुढे "शोधिशी मानवा" (http://www.esakal.com/esakal/20120708/5074728044383876914.htm) हा उत्तम कांबळे यांचा लेख आहे. उगाच काही लिहायचे म्हणून लिहिल्यासारखा वाटणारा हा लेख तद्दन सुमार वाटू शकतो. त्यानंतर बौद्ध, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांची विश्वाच्या उत्त्पत्ती बद्दल असणार्‍या 'थिअरीज' दिल्या आहेत.

आपल्या वाचकांमध्ये काही विज्ञानवादी, किंवा विज्ञानाची आवड/समज असणारेही काही लोक आहेत हे जाणवल्याने बाळ फोंडकेंचा लेख (http://www.esakal.com/esakal/20120708/5052972079814378656.htm) आणि आणखी एक वैज्ञानिक वळणावर जाणारा एक लेख दिला आहे.

---------------------------------------

याविषयी आणि लिंक्स दिलेल्या लेखांविषयी उपक्रमींना काय वाटते ते जाणून घेण्याची इच्छा आहे.

उपविषय : शाळांधून 'विश्वनिर्मिती'च्या संकल्पनेविषयी शिकवतात का? (अमेरिकेत कोणता सिद्धांत शिकवावा याविषयी वाद सुरू असल्याचे वाचले होते.) आमच्यावेळी तरी शाळेत काही शिकवले नव्हते. असे असेल तर बहुसंख्य लोकांना याविषयी शास्त्रीय माहिती असण्याची शक्यता किती असेल?

Comments

संपूर्ण सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"जोडी जमवली देवानं विज्ञान आणि अध्यात्माची" (रवि.सकाळ,सप्तरंग, ८ जुलै) या लेखाचे श्री. नवीन यांनी केलेले मूल्यमापन आणि नोंदविलेली निरीक्षणे या सर्वांशी मी संपूर्ण सहमत आहे.ते लिहितात

,...."पुढच्या वाक्याचा मागील वाक्याशी संबंध नसणे, वाक्यातून/परिच्छेदातून अर्थबोध न होणे, सर्वज्ञपणाचा आव वगैरे"...

शंभर टक्के अचूक. डॉ.तांबे यांचा तो लेख अथ ते इति संपूर्ण असंबद्ध आहे.असत्य तसेच अर्थहीन विधानांनी तुडुंब भरलेला आहे.हा लेख वाचून श्री. नवीन यांची जी प्रतिक्रिया झाली तशीच माझी झाली असे म्हणतो.
..प्रस्तुत (जोडी जमवली...) लेखातील विचारांशी डॉ.रघुनाथ माशेलकर पूर्णत: सहमत आहेत.असे लिहिले आहे.ते वाचून सखेदाश्चर्य वाटले.अतीव दु:ख झाले.[माझी ही भावना मी डॉ.माशेलकर यांना पत्राने कळविली आहे....डॉ.रघुनाथ माशेलकर, वर्षा पार्क,बाणेर रोड,बाणेर.पुणे ४११०४५) अन्य संपर्क साधन मिळाले नाही.]
..
श्री.उत्तम कांबळे यांचा

उगाच काही लिहायचे म्हणून लिहिल्यासारखा वाटणारा हा लेख

तो लेख वाचल्यावर माझी प्रतिक्रिया नेमक्या याच शब्दांत उमटली होती.कधी कधी श्री. कांबळे चांगले लिहितात हे मान्य आहे.
श्री.शरद देशपांडे यांचा लेख सर्वोत्तम आहे.
..

त्यानंतर बौद्ध, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांची विश्वाच्या उत्त्पत्ती बद्दल असणार्‍या 'थिअरीज' दिल्या आहेत.

...
हे सिद्धान्त विनोदी असल्याने वाचनीय आहेत.अवश्य वाचावे.करमणूक होते.

सहमत ... आणखी

डॉ.तांबे यांचा तो लेख अथ ते इति संपूर्ण असंबद्ध आहे.असत्य तसेच अर्थहीन विधानांनी तुडुंब भरलेला आहे.

सहमत आहे.

"गॉड पार्टिकल' म्हणजे "देव कण' असे वैज्ञानिकांनी म्हटलेले नाही, पण हे विश्‍वनिर्मितीचे रहस्य व "गॉड पार्टिकल' म्हणजे मानवासाठी अति कठिण म्हटले आहे. म्हणून त्याला "गॉड पार्टिकल' संबोधणे उचित ठरू शकते. शिवाय प्रयोगात वापरलेले चुंबकत्व हे निसर्गाचे म्हणजेच देवतत्त्वाचेच प्रकटीकरण आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.

अशी वाक्ये. मध्येच शंखाचे शाकाहारी नॅनो चूर्ण, पुढे 'मेंदूत होणार्‍या हालचाली (?)', 'सुंदर मूर्तीला नटवून दर्शन' वगैरे काहीही हास्यास्पद घसरगुंडी आहे.

अजून प्रत्यक्षात सापडले नसले तरी जे सत्य सापडेल असे विज्ञानाला वाटायला लागले आहे तेच सत्य ठामपणे उद्धृत करून, त्यावर सर्व वेदवाङ्मयाची निर्मिती करून त्याच तत्त्वाच्या आधारे सृष्टीचा व्याप कसा चालतो हे दाखवून, त्याद्वारे पुराणातील वेगवेगळ्या कथा सांगून विश्‍वनिर्मितीचे गूढ व एकूण हा विश्‍वपसारा आपल्या भारतीय ऋषिमुनींनी कसा शोधून काढला व तो समाजापुढे कशा तऱ्हेने ठेवला हे एक गहन कोडे आहे. हे चिरंतन साहित्य आजही आपल्याला उपलब्ध आहे. हे साहित्य इतके वर्षे कसे टिकवून ठेवले हीही आश्‍चर्याची गोष्ट आहे.

या दाव्याला काय आधार आहे? सदर लेखकाला समजलेले विश्वनिर्मितीचे गूढ नक्की काय आहे? की ते समजण्यासाठी आपण त्यांचे येणारे पुस्तक विकत घ्यावे लागेल? :)

विश्‍वाची व्याप्ती एवढी मोठी आहे की जर विश्‍वाच्या उत्पत्तीचा वा विश्‍वसंबंधीचा काहीही शोध लावायचे म्हटले तर अफाट खर्च होणार हे नक्की. त्याएवजी पिंड-ब्रह्मांड न्यायाने संपूर्ण विश्‍व एका अणूत सामावलेले आहे हे लक्षात घेऊन मनुष्याने स्वतःच्या शरीरात पूर्ण विश्‍वरचनेचा वा त्याच्या उगमाचा शोध घ्यायचा ठरविणे नक्कीच सोपे होईल.

सर्नचे वैज्ञानिक तेच करायचा प्रयत्न करत आहेत हे बहुतेक सदर लेखकाला जाणवले नसावे :) मनुष्याच्या शरीराचा इथे काय उपयोग आहे? मानवी शरीरात अंदाजे 7,000,000,000,000,000,000,000,000,000 (७ वर २७ शून्ये) अणू असतात म्हणे.

तसे माणसाच्या समजण्याच्या वा मोजण्याच्या टप्प्यात न येऊ शकणारा अति सूक्ष्म कण असला व त्याचा जर स्फोट घडविला तर किती विध्वंसक शक्‍ती निर्माण होईल व असलेल्या विश्‍वाला धोका पोचेल याचाही विचार करावाच लागेल. म्हणूनच हा छोटासा प्रयोग भूमीच्या खाली 330 फुटांवर करावा लागला. पहिला स्फोट झाला त्यावेळी संपूर्ण विश्‍व निर्माण झाले, कुठल्याही प्रकारे विनाश झाला नाही हा भेद लक्षात घेण्यासारखा आहे. अफाट खर्च करून केलेल्या भौतिकी प्रयोगाने केलेल्या स्फोटानंतर विध्वंसक शक्‍ती बाहेर पडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.

परमेश्‍वराने स्फोट घडवून ज्यावेळी विश्‍वाची निर्मिती केली तेव्हा तो त्याच्या जाणिवेतून झालेला विस्फोट होता, त्याला कल्पना स्फुरली होती, स्फुट झाली होती. उगमापाशी असलेली गंगा थेंबाथेंबाने बाहेर येते व तिचाच पुढे गंगासागर होतो व तोच गंगासागर पुढे सागराला मिळतो तशा पद्धतीने हा स्फोट झाला असावा. हा स्फोट मुळात एवढा मोठा नसावा की ज्यातून संपूर्ण विश्‍वाचा नाश होऊ शकेल. आपल्याला विश्‍वाला निर्मितीकडे न्यायचे आहे. परमेश्‍वरी शक्‍ती कार्यरत होऊन जेव्हा ही निर्मिती झाली तेव्हा एका बाजूला शक्‍ती होती तर दुसऱ्या बाजूला त्याच शक्‍तीला विशिष्ट मर्यादेपर्यंत बदलत नेल्याने तयार झालेले वस्तुमान (marr) होते. म्हणून वस्तुमान शक्‍तीत रूपांतरित होते व शक्‍ती वस्तुमानात रूपांतरित होते. या एकाच सिद्धांतातून सृष्टी कशी तयार झाली, मनुष्याचे शरीर कसे तयार झाले, या संपूर्ण सृष्टीचा व्यवहार कसा चालतो याबद्दलचे तत्त्वज्ञान विकसित झालेले दिसते.

अतिशय विनोदी आणि हास्यास्पद! :)) मि. माशेलकार हॅव यू सीन धिस?!!

आज भौतिक विज्ञान अध्यात्मिक वाटेने चालायला लागले आहे कारण विज्ञानाचा शोध देव कणापर्यंत आलेला आहे.

:) आय रेस्ट माय केस युअर ऑनर! या बिनतोड युक्तिवादाला माझ्याकडे तरी उत्तर नाही.

(असंबद्ध, असत्य, अर्थहीन ... विशेषणांचा तिय्या आवडला:))

लेखात संदर्भ असलेले वृत्तपत्र

सदरहू वर्तमानपत्र वाचणे म्हणजे स्वत:चा मानसिक छळ करून घेणे हे लक्षात आल्याने मागील 3 महिन्यांपूर्वी हे वर्तमानपत्र घेणे मी बंद केले आहे..तेंव्हापासून मानसिक संतुलनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. (हाहा) इतरांनी हा उपाय करून बघण्यास हरकत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पर्याय काय?

सदरहू वर्तमानपत्र वाचणे म्हणजे स्वत:चा मानसिक छळ करून घेणे हे लक्षात आल्याने मागील 3 महिन्यांपूर्वी हे वर्तमानपत्र घेणे मी बंद केले आहे..तेंव्हापासून मानसिक संतुलनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. (हाहा) इतरांनी हा उपाय करून बघण्यास हरकत नाही.

सहमत आहे. पण करमणुकीसाठी का असेना दुवे दिलेले लेख वाचाच :)

सकाळ पुणे आणि इतर विभागात सर्वात जास्त खपणारे वृत्तपत्र आहे. त्यामुळे अश्या लेखांचा लोकांवर पडणारा प्रभाव पाहायला हवा. पुन्हा आता इतर पर्याय काय आहेत हेही पाहायला हवे.

बाके वाजवतो

तुमच्या ह्या लेखाशी मी पूर्णपणे सहमत आहे. विसंगती आणि विरोधाभास आजकाल प्रत्येक वृत्तपत्रात किंवा चॅनेलवर दिसतात. म्हणजे कसे एकीकडे विज्ञानविषयक लेख असतात आणि दुसरीकडे असल्या भंपकपणालाही थारा दिलेला असतो. एकीकडे शुक्रावर जाणाऱ्या मोहिमेवर एखादा रिपोर्ट किंवा बातमी असते. तर दुसरीकडे ग्रहांच्या युतीमुळे वाचकांच्या/प्रेक्षकांच्या जीवनात काय स्थित्यंतरे येऊ घातली आहेत ह्यावरही कार्यक्रम असतात. पण ह्या महाप्रयोगाशी धर्माचा/अध्यात्माचा काय संबंध? तांब्याच्या आणि हिग्ज यांचे काही नाते आहे काय? असो. माशेलकरांचा प्रतिसाद बघून मला भटकरही आठवले. असो. असो. तेही तूर्तास घाईत एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मते

१. डॉ. बालाजी तांबे - या माणसाला नक्की काय म्हणायचंय तेच कळत नाही.
२. बाळ फोंडके - 'अनादि अनंत आहे हा ज्ञानसंपादनाचा प्रदेश!' - असेच मला वाटते. पण त्यांनी दिलेले सेलेब्रिटी वगैरे उदाहरण अगदीच बाळबोध आहे. त्याला विज्ञानाचा जराही वास नाही.
३. धर्म आणि विश्वनिर्मिती :
"बायबलमध्ये विश्‍वाच्या निर्मितीचं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. विश्‍वाची निर्मिती मूळ देवापासून झाली. विश्‍वाच्या उत्पत्तीआधी काहीच नव्हतं. फक्त परमेश्‍वर होता. त्यानं पहिल्यांदा प्रकाश निर्माण केला. नंतर ग्रह-तारे निर्माण केले. नंतर पाणी-समुद्र, सरोवरं, नद्या यांची निर्मिती केली. नंतर वनस्पती निर्माण केल्या. नंतर प्राणिमात्रांची निर्मिती केली आणि शेवटी आदम आणि ईव्ह यांना निर्माण केलं. ही मानवाची पहिली जोडी होय." - सात (की सहा) दिवसात?

WMAP found that the universe is 13.7 billion years old.
या सात दिवसांना हिंदू धर्माचा आधार देत येईल का? ;) ब्रह्मदेवाचा एक दिवस पण मग हिंदू आणि ख्रिश्चन धर्म एकत्र करावे लागतील. १५,५५,२१,९६,०८,५३,११३ वर्षे म्हणजे काही शून्यांचाच फरक.

"सकाळ"ला ई-पत्र

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना लिहितात

;"डॉ.बालाजी तांबे या माणसाला नक्की काय म्हणायचंय तेच कळतच नाही."

..कसे कळणार? त्यांना काही म्हणायचेच नाही आहे.या संदर्भात मी संपादक सकाळ यांना पुढील प्रमाणे मेल पाठविली आहे:
...
प्रति: संपादक महाशय

रविवार सकाळ

माननीय महोदय,

"जोडी जमवली देवानं.......",सप्तरंग पुरवणी ८जुलै, हा लेख वाचला.माझ्यामते हा लेख अवैज्ञानिक आहे.लेखात जे परिच्छेद लिहिले आहेत त्यांची लेखाच्या विषयाशीं,शीर्षकाशीं तसेच परस्परांशी काहीच संगती लागत नाही.संपूर्ण लेख असंबद्ध वाटतो."सकाळ" वृत्तपत्राची प्रतिष्ठा,आणि वाचकांच्या मनात असलेली विश्वासार्हता यांना अशा छद्मवैज्ञानिक लिखाणामुळे तडा जाऊ शकतो असे मला वाटते.आपण सर्व जाणताच!

कळावे,

आपला विश्वासू,

[ईपत्ता:editor@esakal.com]

सहमत पण फॉलोइंग वाढतच आहे

डॉ. बालाजी तांबे - या माणसाला नक्की काय म्हणायचंय तेच कळत नाही.

सहमत पण असे असूनही त्यांचे फॅन फॉलोइंग वाढतच आहे. विशेष म्हणजे शहरी, सुशिक्षित, मध्यमवर्गीयांमध्ये त्यांचे अनुयायी वाढत आहेत.

अवांतर : गर्भसंस्कार पुरस्कार आणि गीता टॅरो कार्ड

थोडेसे अवांतर आहे पण नुकताच डॉ. श्री. बालाजी तांबेंचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा झाला. त्यावेळी "गर्भसंस्कार पुरस्कार" (!) आणि डॉ. श्री. बालाजी तांबे यांनी 'सिद्ध' केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. (इतर मर्त्य मानवांप्रमाणे 'लिहिलेली' नसून ही पुस्तके 'सिद्ध' केलेली आहेत. देवकणाशपथ सांगतो हा शब्द माझा नाही, सकाळचा आहे.)

गीता निरुपण, आरोग्याचे मंत्र यासोबत "श्री गीता टॅरो कार्डस्‌ (प्रश्‍न सर्वांचे, उत्तर श्रीकृष्णांचे)" (!!) हे पुस्तक प्रकाशित झाले. (किंवा 'सिद्ध' ला जोडून 'प्र-सिद्ध' झाले असे म्हणूया :०)

या पुस्तकांचे प्रकाशक कोण आहेत हे ओळखा पाहू?

जिज्ञासूंसाठी आयुर्वेदीय गर्भसंस्काराची तोंडओळख:

मानवजातीला उन्नतीकडे नेणारी पिढी तयार करण्यासाठी मुले जन्माला येण्याच्या दृष्टीने गर्भसंस्कारांना भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे ... गर्भसंस्कार झालेल्या मुलांची आयुष्याची ध्येये खूप वेगळी असतात. त्यांचा बौद्धिक विकास व प्रतिकारक्षमता खूप चांगली असते. गर्भसंस्कारित मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा तेजस्वीपणा दिसतो. अशा मुलांनी प्रगतीचे टप्पे सरासरीपेक्षा लवकर ओलांडलेले दिसतात ...

या संगीतामध्ये ... आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे आणि चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा सुरेख वापर केलेला आहे. अमिताभ व डॉ. श्री बालाजी यांच्या आवाजात एक प्रकारची शक्‍ती, गंभीरता, वेगळेपणा व परिणामकारकता आहे. गर्भवती स्त्री जेव्हा हे आवाज ऐकते तेव्हा पोटातील बाळ प्रतिसाद देते. हे बाळ जन्माला आल्यानंतर रडत असेल आणि टीव्हीवर जर एखादा अमिताभ यांचा चित्रपट लागला असेल तर बाळ नक्कीच तो आवाज ओळखीचा असल्यासारखे ऐकते, त्या आवाजाकडे विशेष लक्ष देते असा अनुभव अनेक मातांनी सांगितला आहे. डॉ. श्री बालाजी तांबे यांचा आवाज कुठेही ऐकला, त्यांना पाहिले तर तीन- चार महिन्यांचे बालकही त्यांच्याकडे न घाबरता जाते असाही अनुभव येतो, कारण त्यांचा आवाज बाळाच्या ओळखीचा असतो. यावरून या संगीताचा खूप चांगला उपयोग होतो हेच सिद्ध होते.

एल ओ एल

'गर्भसंस्कार' उतारे वाचल्यापासून हसणे थांबतच नाहीये..! धन्यवाद, ओळख करून दिल्याबद्दल.

हे बाळ जन्माला आल्यानंतर रडत असेल आणि टीव्हीवर जर एखादा अमिताभ यांचा चित्रपट लागला असेल तर बाळ नक्कीच तो आवाज ओळखीचा असल्यासारखे ऐकते, त्या आवाजाकडे विशेष लक्ष देते असा अनुभव अनेक मातांनी सांगितला आहे.

हे क्लास आहे.
पुस्तक मिळवून वाचले पाहिजे.

बाकी तांबे म्हटले की आम्हाला आवर्जून हा लेख आठवतो- http://www.manogat.com/node/17319
आणि आम्ही "ओ सजना.. बरखा बहार आयी" हे गाणे लावतो. ;)

असभ्यपणा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

या संगीतामध्ये ... आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे आणि चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा सुरेख वापर केलेला आहे. अमिताभ व डॉ. श्री बालाजी यांच्या आवाजात एक प्रकारची शक्‍ती, गंभीरता, वेगळेपणा व परिणामकारकता आहे. गर्भवती स्त्री जेव्हा हे आवाज ऐकते तेव्हा पोटातील बाळ प्रतिसाद देते. हे बाळ जन्माला आल्यानंतर रडत असेल आणि टीव्हीवर जर एखादा अमिताभ यांचा चित्रपट लागला असेल तर बाळ नक्कीच तो आवाज ओळखीचा असल्यासारखे ऐकते, त्या आवाजाकडे विशेष लक्ष देते असा अनुभव अनेक मातांनी सांगितला आहे. डॉ. श्री बालाजी तांबे यांचा आवाज कुठेही ऐकला, त्यांना पाहिले तर तीन- चार महिन्यांचे बालकही त्यांच्याकडे न घाबरता जाते असाही अनुभव येतो, कारण त्यांचा आवाज बाळाच्या ओळखीचा असतो.

...
"आपुली आपण करी स्तुती" प्रकारातील ही दे दडप विधाने वाचून,श्री.धम्मकलाडू यांच्या शब्दात सांगायचे,तर शिसारी आली.असली आधारहीन विधाने करणे शिष्टाचारात बसत नाही.हा असभ्यपणा आहे.श्री.ज्ञानेश म्हणतात त्याप्रमाणे ती हास्यास्पदही आहेत.

धन्यवाद

तुम्ही दिलेल्या लेखाबद्दल धन्यवाद! हा तीन वर्षे जुना लेख असूनही ताजा वाटतो (कदाचित हा लेख लिहिताना (लेखाचे) तारुण्य टिकवणारे कोणते तरी गाणे लेख ऐकत असावा :)) आता नव्याने लिहिण्याचे मनावर घेतल्यास भरपूर कच्चा माल उपलब्ध आहे असे वाटते.

याशिवाय जिज्ञासूंनी मूळ चर्चेत लिहिल्याप्रमाणे 'व्हर्जन कंट्रोल्ड गीतायोग' वाचावा किंवा शक्य असल्यास टीव्हीवर पाहावा.

गर्भसंस्कार - थोडे अवान्तर.

गर्भसंस्कार ह्यावरून सुचलेले थोडे अवान्तर.

अन्तरमहाल ह्या ऋतुपर्ण घोष-दिग्दर्शित चित्रपटात १९व्या शतकातील बंगाली जमिनदार भुवनेश्वर चौधरी (जॅकी श्रॉफ) ह्याला मूल होत नसते. त्याच्या पदरचा उपाध्याय पुत्रोत्पादनसमयी मन्त्रपठन कानावर पडत असल्यास सुदृढ अपत्याची प्राप्ति होते असा सल्ला देतो. तदनुसार शयनगृहात पुत्रोत्पादन चालू असता बाहेरच्या खोलीत बसून उपाध्याय मन्त्रपठन करीत आहे असा देखावा आहे.

सहमत

सकाळने बालाजीला विकत घेतले आहे की बालाजीने सकाळला हाच उलगडा मला झालेला नाही. बाकी लेखाशी सहमत.

गर्भसंस्कार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"जरा शहाणे होऊ या " या पुस्तकात डॉ.शरद अभ्यंकर लिहितात;

".....हे गर्भसंस्कार म्हणजे केवळ फसवणूक आहे.आपले अपत्य कुशाग्र बुद्धीचे,सद्गुणी सात्विक वृत्तीचे व्हावे असे माता-पित्याना वाटणे साहजिक आहे.....पण या संस्कारांचा खरोखर काही फायदा झाला की नाही हे मोजायला काहीच साधन नसते.मूल अभ्यासात ढ आहे हे समजायला ५-६ वर्षे लागणार.मग कोण जाईल त्या गर्भसंस्कारवाल्याशी भांडायला?

गर्भधारणा होते तेव्हा गर्भ टाचणीच्या डोक्या्एवढा असतो .बाळाच्या मेंदूत विचार करण्याची प्रक्रिया सहाव्या महिन्यात सुरू होते.तोपर्यंत कितीही मंत्र म्हटले,टेपा लावल्या तरी बाळाला त्यातील अक्षर ऐकू जात नाही.गर्भाभोवती असणार्‍या मोठ्या रक्तवाहिन्यांतील प्रवाहामुळे जवळपास ८५ डेसिबलचे आवाज पोटातल्या परिसरात चालू असतात.त्याला बाहेरचे आवाज कसे ऐकू येतील?"

हॅ हॅ हॅ

हे काही सकाळमध्येच असतं असं नाही.

हे पण वाचून पहायचा प्रयत्न करा.

नितिन थत्ते

हो ... पण

तुम्ही दिलेला लेख मजेशीर आहे. मला तर तो लेख निरुपद्रवी ललित लेखासारखा दुर्लक्ष करण्यायोग्य वाटला. तांब्यांच्या लेखाइतका 'उपद्रवकारक' (इफ आय मे यूज दॅट वर्ड) वाटला नाही. उदा. त्यात खाली दिल्यासारखी स्विपिंग स्टेटमेंट्स तरी नाहीत. कदाचित त्या लेखकाचा तितका 'अभ्यास' नसावा :)

"अजून प्रत्यक्षात सापडले नसले तरी जे सत्य सापडेल असे विज्ञानाला वाटायला लागले आहे तेच सत्य ठामपणे उद्धृत करून, त्यावर सर्व वेदवाङ्मयाची निर्मिती करून त्याच तत्त्वाच्या आधारे सृष्टीचा व्याप कसा चालतो हे दाखवून, त्याद्वारे पुराणातील वेगवेगळ्या कथा सांगून विश्‍वनिर्मितीचे गूढ व एकूण हा विश्‍वपसारा आपल्या भारतीय ऋषिमुनींनी कसा शोधून काढला व तो समाजापुढे कशा तऱ्हेने ठेवला हे एक गहन कोडे आहे. हे चिरंतन साहित्य आजही आपल्याला उपलब्ध आहे. हे साहित्य इतके वर्षे कसे टिकवून ठेवले हीही आश्‍चर्याची गोष्ट आहे."

शिवाय मला अधोरेखित करायचा आणखी एक मुद्दा म्हणजे वर्तमानपत्रांचा (आता 'माध्यम समूह'); कदाचित व्यावसायिक हितसंबंधांवर आधरित; अजेंडा. लोकसत्तेच्या लोकरंगचा हिग्ज बोसॉन आणि डॉ. आशुतोष कोतवाल यांच्यावरचा मुख्य लेख तसा बरा आहे.

सुमारसद्दी

ही चर्चा आणि बाजूची सुमारसद्दीची चर्चा मिळत्याजुळत्या वाटल्या. :-)

-----

या गोष्टींवर फक्त चर्चा करण्याऐवजी यनांनी केल्याप्रमाणे संपादकांना इमेल करून नाराजी व्यक्त करायला हवी असे वाटते.

अंतःस्थ हेतू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली सुचवतात

,:"या गोष्टींवर फक्त चर्चा करण्याऐवजी यनांनी केल्याप्रमाणे संपादकांना इमेल करून नाराजी व्यक्त करायला हवी असे वाटते."

»
..
पत्रातील मजकूर आणि पत्ता देण्यात माझा तोच हेतू होता."आपण पत्र पाठवावे" असे प्रकटपणे मात्र मी लिहिले नाही.अनेकांची पत्रे गेली तर काही सुपरिणाम होऊ शकतो.

सहमत आहे, करूया सुरुवात

सहमत आहे. चर्चा टाकण्याचा माझा उद्देश हे विचार अधिक लोकांपर्यंत पोचावेत असा होता. या चर्चाप्रस्तावातले आणि प्रतिसादातले विचार सकाळ व्यवस्थापनापर्यंत पोचले तर सोन्याहून पिवळे. पण माझ्यामते इमेल पाठवण्यापेक्षा ऑनलाइन प्रतिक्रिया (इसकाळ.कॉम वर) दिलेली अधिक चांगली. जेणेकरून (प्रकाशित झाल्यास) इतर सर्व वाचकांना ती दिसेल.

कालच्या सप्तरंग मध्ये काही 'निवडक' ऑनलाइन प्रतिक्रिया समाविष्ट केलेल्या आहेत. त्यात एकही प्रतिकूल प्रतिक्रिया नाही हे सांगायला नकोच.

मी http://www.esakal.com/esakal/20120708/5563943479780979803.htm इथे खालील प्रतिक्रिया दिली आहे. ती प्रकाशित होण्याची शक्यता कितपत आहे कोणास ठाऊक.

गेल्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीला सर्नच्या 'वन्स इन अ लाइफटाइम' शोधाची पार्श्वभूमी होती. पण त्यावर एखादा माहितीपूर्ण वैज्ञानिक लेखाऐवजी सप्तरंगचा पहिला लेख होता "जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची". लेख अनेक निराधार दाव्यांनी आणि हास्यास्पद विधानांनी भरलेला आहे. 'सकाळ'ने अशास्त्रीय, अवैज्ञानिक लेख सर्वप्रथम देण्याचे औचित्य समजत नाही.

माशेलकरांनी हा लेख खरोखर वाचला आहे का?

ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे आणि फेसबुक पानावर ( https://www.facebook.com/saptrang?sk=wall ) प्रतिक्रिया द्यावी.

प्रतिसाद दिला आहे

सकाळच्या लेखावर खालील प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध झाल्यास बघू. तशी मला काही प्रतिकूल मते तेथे दिसली.

हास्यास्पद विधाने आणि निराधार दावे करणे ही एक गोष्ट आणि ते प्रकाशित करणे ही दुसरी. या दोन्ही गोष्टींची जोडी या लेखाद्वारे सकाळने जमवून दिली आहे. या लेखातील दाव्यांना वैज्ञानिक सोडाच पण वैचारिक बैठकही नसावी असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

माझ्यामते इमेल पाठवण्यापेक्षा ऑनलाइन प्रतिक्रिया (इसकाळ.कॉम वर) दिलेली अधिक चांगली. जेणेकरून (प्रकाशित झाल्यास) इतर सर्व वाचकांना ती दिसेल.

लेख तसा थोडासा जुना झाला आहे. सकाळच्या व्यवस्थापनापर्यंत जाहीर प्रतिक्रिया आता पोहोचतीलच असे नाही त्यामुळे इमेलही लिहिणे उत्तम.

वाहवा! साधु साधु!

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

"हास्यास्पद विधाने आणि निराधार दावे करणे ही एक गोष्ट आणि ते प्रकाशित करणे ही दुसरी. या दोन्ही गोष्टींची जोडी या लेखाद्वारे सकाळने जमवून दिली आहे. या लेखातील दाव्यांना वैज्ञानिक सोडाच पण वैचारिक बैठकही नसावी असे खेदाने नमूद करावेसे वाटते."

...प्रियाली यांचे उत्कृष्ट पत्रलेखन. अशी काही पत्रे गेलीं तर सकाळ समूहाला आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल असे वाटते.
"या लेखातील दाव्यांना वैज्ञानिक सोडाच पण वैचारिक बैठकही नसावी असे खेदाने नमूद करावेसे वाटते."

हे अंतिम वाक्य अगदी मर्मग्राही आहे.

अजूनही प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या नाहीत

अपेक्षेप्रमाणे अजूनही प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या नाहीत :)

मला त्यांचे फेसबुकचे पान उघडले नाही. तिथे या चर्चेची लिंक देणे कोणाला शक्य आहे का?

ते होणारच होते

अपेक्षेप्रमाणे अजूनही प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या नाहीत :)

हे होणारच होते. त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा अशा विषयांना वाचा फोडण्यासाठी स्वतःचे (किंवा साइटचे) पेज हवे आणि त्याची लिंक इतरत्र देता यावी.

सप्तरंगच्या संपादकांना

सप्तरंगच्या संपादकांना आणि उत्तम कांबळे ह्यांना ह्या धाग्याची लिंक पाठवल्यास उत्तम. मी एका संपादकांना ही लिंक पाठवली आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ह्यांना डॉक्टर कोणी केले?

पुढीलप्रमाणे प्रतिसाद मी http://www.esakal.com/esakal/20120708/5563943479780979803.htm येथे पाठविला आहे. बघू छापला जातो का.

"माझ्या समजुतीनुसार तथाकथित ’डॉ.’ श्री बालाजी तांबे हे कसलेहि पदवीप्राप्त डॉक्टर नसून आयुर्वेदाचे वैद्य आहेत. ते जर खरे आयुर्वेदाभिमानी असले तर स्वत:च्या नावामागे अभिमानाने ’वैद्य’ अशी उपाधि लावण्याऐवजी ’डॉ.’ हे बेगड का चिकटवून घेत आहेत? भोळ्या जनतेची ही फसवणूक नाही काय?

अशा खोटयानाटय़ा दाव्यांना मान्यता देऊन ’सकाळ’ स्वत:ची पत्रकारितेची प्रतिष्ठा घालवत नाही काय? संपादक महाशय, जरा विचार करा..."

काय सांगता?

>>श्री बालाजी तांबे हे कसलेहि पदवीप्राप्त डॉक्टर नसून आयुर्वेदाचे वैद्य आहेत

ऑ? बालाजी तांबे हे आयुर्वेदाचे वैद्य आहेत ही बातमी लेटेस्ट आणि नवी आहे. या बातमीचा काही संदर्भ आहे का?
(ते खरोखरचे वैद्य असते तर बहुधा त्यांनी अशी विधाने केली नसती असे उगाचच वाटते).

नितिन थत्ते

विंजीनेर

बालाजी तांबे हे शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनीअर आहेत, अशी माहिती आहे. इंजिनीअर असूनही ते अशी विधाने करू शकतात, तेव्हा शिक्षणाचा आणि अशी विधाने करण्याचा संबंध नसावा ! :)

बी. ए. एम. एस. हा कोर्स सुरू होण्याच्या कित्येक शतकांआधीपासून भारतात आयुर्वेदाची 'प्रॅक्टिस' केली जाते. अशा वैद्यांना 'पारंपारिक वैद्य' असे नाव आहे. तांबे हे असेच पारंपारिक वैद्य आहेत / असावेत.

तुम्ही शाळेत विश्वनिर्मिती'च्या संकल्पनेविषयी काय शिकलात?

चर्चेच्या ओघात उपविषय राहिलाच.

आम्हाला तरी शाळेत तसेच महाविद्यालयात विश्वनिर्मिती'च्या संकल्पनेविषयी काहीही अभ्यासाला नव्हते. बाहेरची पुस्तके वाचून आणि नंतर डिस्कवरी/नॅटजिओ सारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहून आम्हाला याविषयी समजले.

तुम्ही शाळेत विश्वनिर्मिती'च्या संकल्पनेविषयी काय शिकलात?

नव्हते| अद्याप नाही

तुम्ही शाळेत विश्वनिर्मिती'च्या संकल्पनेविषयी काय शिकलात?

आम्हाला शाळेत असे काही शिकवले नव्हते. शाळेतील विज्ञान ग्रंथालयात पुस्तके वगैरे होती.

अमेरिकेत काय शिकवले जाते किंवा आमच्या राज्यात काही शिकवले जाते का याची अद्याप कल्पना नाही पण इयत्ता आठवीपर्यंत काहीही शिकवलेले नाही. अर्थात, हल्लीची पोरं ६ दिवसांत विश्वनिर्मिती झाली असे वाटण्याइतपत ढ नसावीत असे आपले मला वाटते. ;-) पण ग्यारंटी नाही.

मुलांवर योग्य संस्कार व्हावेत, त्यांना योग्य धार्मिक शिक्षण मिळावे, मॉडर्नायझेशनचा विपरित परिणाम त्यांच्यावर होऊ नये म्हणून होमस्कूलिंग करणारे किंवा कॅथलिक शाळांत पाठवणारे अतिधार्मिक अमेरिकन पालक मला माहित आहेत.

प्रेषितसाहेबांची दोन उद्बोधक उदाहरणे

दै. सकाळ मध्ये फक्त डॉ. श्री. बालाजी तांबे आणि श्रीराम भट हे दोघेच वैज्ञानिक लेखन करतात असे नाही तर हल्ली रमजानच्या निमित्ताने अनीस चिश्ती यांनी सदर सुरु केले आहे. तांब्यांची बरीच "लेखनवैशिष्ट्ये" चिश्तींच्या लिखणातही दिसतात, गेल्या आठवड्यात "प्रेषितसाहेबांची दोन उद्बोधक उदाहरणे" या नावाखाली त्यांनी लिहिलेला लेख वाचनीय आहे. उपक्रमींच्या सोयीसाठी त्यातील काही भाग इथे उधृत केला आहे.

या दोन उद्बोधक उदाहरणापैकी पहिले आहे "स्वदेश त्याग". त्याच्या परिणामाविषयी चिश्ती लिहितातः
"प्रेषितसाहेबांच्या देश त्यागानंतर संपूर्ण जगात विचारपूर्वक स्थलांतराच्या एकाच चळवळीने जन्म घेतला. नवनवीन आणि द्रुतगती वाहनांचा शोध लागला. देशांच्या सीमा आखल्या गेल्या. प्रवासी परवाने आणि नंतर पासपोर्ट आणि व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली. पैगंबरसाहेबांच्या या धाडसी प्रयत्नांच्या अजून अभ्यास होणे गरजेचे आहे."

दुसरे उदाहरण आहे "सर्वसामान्य पोशाखात, काही क्षणांच्या आत परलोकगमन करून आणि अल्लाहशी सान्निध्य संवाद साधून पृथ्वीतलावर आपल्या घरी परत येणे हे होय." याविषयी चिश्ती म्हणतातः
"देवकण (गॉड पार्टिकल) च्या शोधकर्त्यांसमोर कदाचित ही घटना आली नसावी. या घटनेत आगामी वैज्ञानिकांना बरेच काही अभ्यासण्यासारखे आहे."

लेख त्याच्या साइटवर मिळाला नाही. इ-पेपरच्या खालील दुव्यावर लेख पाहता येईल.

http://72.78.249.107/Sakal/18Aug2012/Enlarge/PuneCity/Pune1Today/page10.htm

 
^ वर