गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?
नमस्कार वाचकांनो,
आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
यानिमित्ताने वाचकांना प्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते हे सांगायचा हा अल्पसा प्रयत्न
शके १९३४ या वर्षाचे नाव आहे नन्दन. तर दरवर्षी शक संवत्सराचे नेमके नाव कसे ठरवले जाते? हे पाहण्यापूर्वी हिंदू पंचांगपद्धतीत कालगणना नेमकी कशी मोजली जाते ते उलट्या क्रमाने पाहूयात, म्हणजे हा ६० नावांचा गुंता सुटायला सोपा पडेल.
१ महामाया निमिष म्हणजे १००० शिवनिमिषे मानली जातात.
१ शिवनिमिष म्हणजे विष्णूच्या १००० घटिका
१ विष्णूची घटका म्हणजे १००० ब्रह्माची आयुष्ये
१ ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य म्हणजे ३६००० कल्पे
१ कल्प अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे १४ मनु
१ मनु म्हणजे ७१ महायुगे
१ महायुग म्हणजे ४ युगे
१ कृत युग म्हणजे ४८०० दिव्य वर्षे
१ त्रेता युग म्हणजे ३६०० दिव्य वर्षे
१ द्वापर युग म्हणजे २४०० दिव्यवर्षे
१ कलि युग म्हणजे १२०० दिव्य वर्षे
१ दिव्य वर्ष म्हणजे ३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे
१ संवत्सर चक्र म्हणजे ६० वर्षे (संवत्सरे)
(ही माहिती पुराणांतून दिलेली आहे)
हे गणित लक्षात आले म्हणजे एका संवत्सर चक्रात येणार्या ६० वर्षांच्या ६० नावे का ठरवली गेलीत याचे उत्तर मिळते. नेमकी हीच ६० नावे का? याचे उत्तर मात्र माझ्याजवळ सध्या नाहिये. त्यावर कधीतरी सवडीने अभ्यास करुन लिहिन.
शके १९३४ चे संवत्सरनाम नंदन आहे. जे मी पुढील यादीत ठळक केले आहेच. एकदा ही ६० नावे माहिती झाली की पुढील वर्षाचे म्हणजे शके १९३५ साठी कोणते संवत्सरनाम असेल हे तुम्ही स्वतःच ओळखू शकाल :)
६० वर्षांचे चक्र : संवत्सर नामे
१. प्रभव
२. विभव
३. शुवल
४. प्रमोद
५. प्रजापति
६. अंगिरा
७. श्रीमुख
८. भाव
९. युवा
१०. धाता
११. ईश्वर
१२. बहुधान्य
१३. प्रमाथी
१४. विक्रम
१५. विश्व
१६. चित्रभानु
१७. सुभानु
१८. तारण
१९. पार्थिव
२०. व्यय
२१. सर्वजित्
२२. सर्वधारी
२३. विरोधी
२४. विकृत
२५. खर
२६. नन्दन
२७. विजय
२८. जय
२९. मन्मथ
३०. दुर्मुख
३१. हेमलम्ब
३२. विलम्ब
३३. विकारी
३४. शर्वरी
३५. प्लव
३६. शुभकृत्
३७. शोभन
३८. क्रोधी
३९. विश्वावसु
४०. पराभव
४१. प्लवंग
४२. कीलक
४३. सौम्य
४४. साधारण
४५. विरोधकृत्
४६. परिधावी
४७. प्रमादी
४८. आनन्द
४९. राक्षस
५०. नल
५१. पिंगल
५२. कालयुक्त
५३. सिद्धार्थ
५४. रौद्र
५५. दुर्मति
५६. दुन्दुभि
५७. रुधिरोद्गारी
५८. रक्ताक्ष
५९. क्रोधन
६०. क्षय
लेखात काही चूक असेल तर ती अवश्य लक्षात आणून द्यावी ही वाचकांना नम्र विनंती
धन्यवाद,
- सागर
Comments
मराठी नव वर्ष दिन
मराठी नव वर्ष दिनाच्या निमित्ताने संवत्सरांची नावे देण्याची व ही नावे साठच का आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आवडला. माझ्या मनात आलेले काही प्रश्न. उत्तरे मिळाल्यास आवडेल.
१. गुढी पाडवा व त्यापासून चालू होणारे नववर्ष फक्त महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या ठिकाणी मुख्यत्वे (आणखी काही राज्ये असू शकतील, बाली बेटावर याच दिवशी नव वर्ष दिन मानला जातो.) मानले जाते. उत्तर भारतात या दिवशी नववर्ष दिन मानला जातो असे वाटत नाही. तो विक्रम संवत्सराप्रमाणे पोर्णिमेनंतर येणार्या प्रतिपदेला येतो. त्यामु़ळे ही संवत्सर नावे कोठून आली? या नावांचा उल्लेख गेल्या हजार वर्षातील हिंदू ज्योतिर्विद्या विषयातील आद्य ग्रंथ 'सूर्य सिद्धांत' यात ही नावे दिलेली आहेत का? वगैरे गोष्टींचा खुलासा व या नावांचा उगम कळणे महत्वाचे ठरते.
२. सूर्य सिद्धांतातील तत्वांप्रमाणे, आकाशातील चित्रेच्या तार्यापासून १८० अंशावर सूर्य आला की हिंदू नव वर्ष चालू होते. प्रत्यक्ष नव वर्ष दिन महाराष्ट्रात अमावास्येनंतर येणार्या प्रतिपदेला येतो तर उत्तर हिंदुस्थानात पोर्णिमेंतरच्या प्रतिपदेला. ही संवत्सर नावे विक्रम संवत्सराची आहेत की शालीवाहन संवत्सराची याचा खुलासा करणे आवश्यक आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
संवत्सर आणि कालगणना - एक गुंता.
<मुख्यकरुन मराठी वार, महिने आणि वर्षे इंग्रजांच्या अगोदर प्रचलित होतीच. पुन्हा ती वापरायला सुरुवात करणे आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अवघड आहे याची मलाही कल्पना आहे. पण वापर करणे सोपे असेल तर काय हरकत आहे एवढेच निदर्शनास आणून द्यायचा प्रयत्न होता.>
<पण सर्वांनी या कालगणनेचा वापर सुरु केला तरच ही अवघड वाटणारी कालगणना सोपी वाटू लागेल. पुढे कधीतरी मराठी महिने व ऋतूंचा आढावा घेईन, तेव्हा या कालगणनेचा वापर रोजच्या जीवनात किती सोपा आहे हे सांगण्याचा अवश्य प्रयत्न करेन.>
सागर ह्यांनी हा धागा प्रारंभ करण्यामागची प्रेरणा त्यांच्या वर उद्धृत केलेल्या दोन विधानांवरून दृष्टीस येते असे मला वाटते म्हणून त्या अनुषंगाने पुढील लिखाण केले आहे.
कालगणना पद्धति आणि त्यांचा इतिहास हा एक गहन विषय आहे. मला त्यात फार गति आहे असे नाही. तरीहि शंकर बाळकृष्ण दीक्षितलिखित 'भारतीय ज्योति:शास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास' ह्या उत्कृष्ट ग्रंथावरून आणि अन्यहि अनेक पुस्तकांवरून ह्या विषयाच्या गुंतागुंतीची आणि आवाक्याची थोडी कल्पना करता येते. येथे पुन: भारतीय आणि अन्य संस्कृतींमधील कालगणना, भारतीय कालगणनेमध्ये पुनः भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काळी प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या कालगणना हे अन्य गुंते आहेतच. त्या सर्वांकडे पाहता असे वाटते की 'इंग्रजांच्या अगोदर प्रचलित असलेली मराठी वार, महिने आणि वर्षे' ह्या वर्णनाला पात्र असे काही नव्हतेच. जे काय होते ते मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातले सणवार आणि धार्मिक संस्कार ह्यांच्यापुरतेच मर्यादित होते आणि त्या मर्यादित अर्थाने त्याचा आजहि उपयोग चालू आहेच. बाकीच्या व्यावहारिक जीवनात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर व्यापारी हिशेब, सारा आणि अन्य प्रकारची करवसुली, अन्य दरबारांशी पत्रव्यवहार ह्यांसाठी अन्य प्रकारच्या कालगणना (उदा. विक्रमसंवत, मुघल पद्धतीची फसली कालगणना) ह्यांचाहि मुबलक वापर होत होता. (पेशवेकालीन पूष्कळ पत्रांमधील तारीख फसली पद्धतीची असते.) तसेच ही तथाकथित 'मराठी' कालगणना ’इंग्रजपूर्व काळात वापरात होती’ हे क्षणभर चर्चेपुरते मान्य केले तरीहि तिचा आजच्या रोजच्या जीवनात वापर करणे हेहि ’सोपे’ आहे हे त्याच्यापुढील विधान मान्य करणे अवघड वाटते. ती 'मराठी' गणना आजच्या व्यवहाराच्या दृष्टीने गैरसोयीची आहे असे मला वाटते.
ही 'मराठी' पद्धति सौरवर्षाशी जोडून दिलेल्या चान्द्रमासांची आहे. शं.बा.दीक्षितांनी म्हटल्यानुसार दिवसाचे मान ठरविण्याचे सर्वात नैसर्गिक साधन म्हणजे दोन सूर्योदयांमधील कालाचे मान, मासाचे मान ठरविण्याचे सर्वात नैसर्गिक साधन म्हणजे एका पूर्णचन्द्रापासून दुसर्या पूर्णचन्द्रापर्यंतच्या कालाचे मान आणि वर्षाचे मान ठरविण्याचे सर्वात नैसर्गिक साधन म्हणजे ऋतुचक्र पूर्ण होते त्या कालाचे मान. ह्या तीन मानांमध्ये नैसर्गिक गुणोत्तर - एकाच्या अमुकपट दुसरा - असे गणिताला सोपे वाटणारे काहीच नाही तरीपण त्यांची एकमेकांत काही तरी प्रकारची सांगड घालण्याची आवश्यकता तर आहे. ह्या तारेवरच्या कसरतीमधून देशकालानुसार अनेक कालगणनापद्धति निर्माण झाल्या आहेत आणि त्यांमध्ये अमुक एक पद्धति अधिक 'सोपी' आहे असे निश्चयपूर्वक म्हणता येत नाही. (येथे दोन प्रकारची सौर वर्षे - सांपातिक tropical सौर आणि नाक्षत्र sidereal सौर ह्यांमधील फरकाचा आणि तसेच लीप गणनेचा विचार करीत नाही. अयनचलनामुळे निर्माण होणारे गुंतेहि येथे मोजत नाही.)
आपण सांप्रत वापरत असलेली कालगणना, जिला आपण सोयीसाठी ख्रिश्चन कालगणना असे म्हणू, ही सुमारे १५०० वर्षांच्या प्रयत्नांमधून आणि सुधारणांमधून विकसित झाली आहे. आजहि ती पूर्णपणे अचूक आहे असेहि नाही. उदाहरणार्थ, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गति कमी होत असल्याने लीप सेकंद घालण्याची गरज भासते (http://en.wikipedia.org/wiki/Leap_second), तसेच लीप दिवस घालण्याची चालू पद्धति (चारने भागले जाणारे वर्ष लीप पण शंभराने भाग जाणारे नाही, तरीहि चारशेने भाग जाणारे वर्ष लीप) हीहि काही दशसहस्र वर्षांनी अपुरीच पडणार आहे. ह्या मर्यादा मान्य करूनहि असे दिसते की सध्याच्या आणि पुढच्या काही हजार पिढयांच्या जीवनाला सध्याची ख्रिश्चन पद्धति हीच सर्वात योग्य आहे. 'मराठी' पद्धति 'आपली' असली तरीहि ती 'चान्द्र' आहे. ऋतु आणि त्यांतून निर्माण होणारी अर्थव्यवस्था ही 'सौर' असणारच म्हणून ही 'आपली' गणना तिच्या सध्याच्या कार्यापुरतीच, सणवार ठरविणे, लग्नाचे मुहूर्त काढणे एवढयापुरतीच मर्यादित राहणार आणि तशीच ती राहावी.
'महामायानिमिष', 'शिवनिमिष', विष्णुघटिका' अशी एक भारतीय कालगणना धाग्याच्या प्रारंभी दिली आहे. तिचा मूळ स्रोत कोठे आहे? ह्याच प्रकारची पण काही वेगळ्या संज्ञा वापरणारी आणि जवळजवळ तसेच कोष्टक असलेली कालगणना मनुस्मृतीमध्ये आहे आणि ती प्राचीन ग्रंथांमधून आणि भारतीय ज्योतिर्गणितात अधिक प्रचलित आहे हे येथे नुसते नमूद करून ठेवतो.
<अवांतरः गुरुच्या ५ व शनिच्या २ प्रदक्षिणा यांची बेरिज करुन सप्ताहाची (आठवड्याचे दिवस ७) निर्मिती झाली काय?> अशी विचारणा सागर ह्यांनी वर केली आहे. आठवडयाचे सात दिवस आणि त्यांची नावे ह्यांची उपपत्ति पुढीलप्रमाणे आहे:
मराठीत ’होरा’ म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक ’होराभूषण’ असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील ’दिवसाचा २४ वा भाग अशा अर्थाचा हा शब्द ग्रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह ’होरेश’ मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. ’होरा’ शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला ’भविष्य’ हा अर्थ चिकटला. ह्याविषयी श्लोक:
मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय.
(अधिक चर्चेसाठी पहा http://mr.upakram.org/node/3647)
धनंजय आणि मिहिर ह्यांच्या प्रतिसादांमधून ६० वर्षांच्या संवत्सरचक्राबाबत काही माहिती दिली आहेच. शं.बा.दीक्षितांचे ह्याविषयीचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
वेदांगज्योतिषामध्ये पाच वर्षांचे युग मानले आहे. ही वर्षे 'बार्हस्पत्य' म्हणजे गुरूची मानल्यास अशा पाच 'बार्हस्पत्य' वर्षांत अदमासे ६० सौर वर्षे बसतात. (अदमासे अशामुळे की गुरूला मध्यमगतीने एक राशि पूर्ण करण्यास सूर्यसिद्धान्ताप्रमाणे ३६१ दि. १ घ. ३६ प. इतका काळ लागतो आणि १२ राशि पूर्ण करण्यास त्याला लागणारा काळ १२ सौर वर्षांहून थोडा कमी असतो. ८५ सौर वर्षात गुरू अदमासे ८६ राशि चालतो.) ह्या ६० सौर वर्षांना प्रभवादि नावे देऊन ही कालगणना सुरू झाली. ही ७व्या-८व्या शतकापर्यंत कोठेकोठे, विशेषत: दक्षिणेकडे, चालू होती असे काही ताम्रपटांवरून वाटते पण मधूनमधून एक वर्ष लोप करण्याची आवश्यकता असल्याने ती प्रचारातून गेली असावी. सध्या पंचांगातील उल्लेखापलीकडे तिचे काही स्थान आहे असे दिसत नाही.
भारतीय चेहेरामोहोरा असलेली आणि चैत्रादि महिने, शालिवाहन शक हे टिकवून तरीहि आधुनिक भासणारी कालगणना निर्माण करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असेहि नाही. पाश्चात्य कालगणनेऐवजी भारतीय चेहेरामोहरा असणारी कालगणना हवी अशा विचारातूनच १९५७ साली भारत सरकारने मेघनाद साहा ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक Calendar Reform Committee स्थापन केली होती आणि त्या कमिटीने भारतात प्रचलित असलेल्या अनेक पंचांगांची सांगड घालणारे, सौर पद्धतीचे ३६५/३६६ दिवस असणारे आणि चैत्र-वैशाखादि १२ मासांची नामे असणारे Calendar निर्माण केले होते. प्रचलित शकगणना तशीच पुढे चालू ठेवली होती. ह्या Calendar अनुसार मार्च २२, १९५७ ला चैत्र १, १८७९ शक असे मानून कालगणना तेथून पुढे सुरू केली होती. अधिक माहितीसाठी पहा: http://en.wikipedia.org/wiki/Indian_national_calendar
पहिल्या काही वर्षात किमान सरकारी पातळीवर तरी ह्या Calendar अनुसार तारखा दाखविल्या जात. तरीहि सोयीसाठी इंग्रजी तारखाहि दाखवत. वाचक सोयीस्कर मार्गाने सरकारी तारखांकडे दुर्लक्ष करून इंग्रजी तारखाच वापरत. कालान्तराने सरकारी Calendarचा वापर हळूह्ळू सरकारातहि बंद झाला आणि आता त्या तारखा क्वचितच कोठे दिसतात. धार्मिक गोष्टींसाठी अजूनहि अनेक स्थानिक पंचांगेच वापरात आहेत. ज्या 'सुधारणांची' आवश्यकता जनतेला भासत नाही त्यांचे असेच होते!
आपणांस पटो वा न पटो, संपूर्ण जग हे अधिकाधिक connected आणि परस्परावलंबी बनत आहे आणि ह्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहू पाहणारे हळूहळू मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. ह्या कारणानेच इंग्रजी भाषा जगभर अधिकाधिक पसरत आहे. Calendar ही अशीच एक गोष्ट आहे आणि आपण कसलेहि ’मराठी’ Calendar ह्यापुढे वापरणे हे एकांडया शिलेदारासारखे होईल.
अशाच ’राष्ट्रीय’ विचारातून अरब देशांमध्ये आठवडयाची सुटी गुरुवार-शुक्रवारी देण्याची रीत काही वर्षांपूर्वी होती. पण ह्याचा अर्थकारणावर दुष्परिणाम होऊ लागला कारण गुरुवार-शुक्रवारी अरब देश बंद तर शनिवार-रविवारी अन्य जग बंद त्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी सोमवार ते बुधवार एव्हढेच दिवस शिल्लक उरले. हे ध्यानात आल्यावर अलीकडे शुक्रवार-शनिवार हे आठवडयाच्या सुटीचे दिवस करून थोडा जगाशी मिळून राहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (येथे पहा.) Calendar हे आर्थिक आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे ह्या उदाहरणावरून दिसते.
(वरील प्रतिसाद ह्याच धाग्यावर 'ऐसी अक्षरे'मध्ये मी दिला होता. तोच थोडा बदलून येथे देत आहे.)
खाल्डिया
काही सदस्यांनी विचारल्यावरूनः इइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
खाल्डियाबाबत प्राथमिक माहितीसाठी पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Chaldea
http://en.wikipedia.org/wiki/Babylonian_astronomy