गुरुविण कोण लावितो वाट?

गुरुविण कोण लावितो वाट? (समस्त गुरुभक्तांची क्षमा मागून)
(गुरुविण कोण दावितो वाट? असे एक गुरुगीत ऐकले.त्यात किंचित् बदल करून लेखाला शीर्षक दिले आहे.)
बर्‍याच वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या वर्गावर पहिल्या तासाला येणार्‍या गुरुजींना फुलें देऊन नमस्कार करीत असू.सर्व गुरुजींचा पहिला तास कुठल्या ना कुठल्या वर्गावर असायचा. त्यामुळे त्यादिवशी सर्व गुरुजनांचे पुष्पपूजन होई. तसेच गायन,वादन,नृत्य अशा कला क्षेत्रांतील गुरूंचे त्यांचे शिष्य पूजन करीत.त्याकाळी गुरुपौर्णिमेचा संबंध शिक्षकांच्या, कलातपस्वींच्या, ज्ञानमहर्षींच्या सन्मानाशी होता.
आज गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या पूजनाचा आणि त्या गुरूंनी भक्तांकडून दक्षिणा लाटण्याचा दिवस असा अर्थ रूढ झाला आहे.पूर्वी दैवी शक्तीचे चमत्कार करून दाखविणार्‍या बुवा,महाराज,स्वामी,बाबा यांची संख्या मोठी होती. पुढे अनेक बुवा-बाबांच्या "लीला" उघड झाल्या.त्यांचे दैवी चमत्कार म्हणजे हातचलाखीचे प्रयोग हेही लक्षात येऊ लागले.त्यामुळे चमत्कारी बुवा बदनाम झाले.पण एखादी दहशतवादी संघटना जशी जुने नाव बदलून नव्याने आपली स्फोटक कृत्ये चालू ठेवते, त्याप्रमाणे बुवा--बाबांनी आध्यात्मिक गुरू हे नाव धारण करून, आपली कार्यपद्धती बदलून, श्रद्धाळूंना फसवण्याचे आपले मूलभूत मह्त्कार्य पुढे चालू ठेवले."हृदयीं गुरु नांदे। फसवुनी घेऊं आनंदे॥" या मनोवृत्तीचे श्रद्धाळू भक्त त्यांना मोठ्या प्रमाणात लाभले.गुरुबाजी का फोफावते यासंबंधी "उदासबोध" या कवितासंग्रहात मंगेश पाडगावकर म्हणतात,:

" प्रत्येकासी येथे हवा । कोणीतरी जबरा बुवा।
जो काढील सार्‍या उवा । मनातल्या चिंतेच्या।
आपण शोधायचे नाही । आपण लढायचे नाही।
आपण भिडायचे नाही । आयुष्याला।
........ येक गुरू फार मोठा । अध्यात्मधंद्या नाही तोटा।
तो आपुल्या धोतरा कासोटा । वर्ज्य मानी।

असल्या आध्यात्मिक गुरूंचे स्तोम आज सर्वत्र माजलेले दिसते. भक्तांची संख्या अमाप आहे.
बहुतेक आध्यात्मिक गुरु हे प्रच्छन्न ठकसेन असतात.शिष्यांना फसवून, आपल्या भजनी लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. सत्यसाईबाबा,आसारामबापू,नित्यानंद,निर्मलबाबा,पॉल दिनकरन,वेंकट सर्वानन अशा अनेक गुरूंचे ढोंग उघड झाले. खरे स्वरूप समजले. तरी ठकसेन गुरूंच्या कच्छपीं लागणारे भोळसट भाविक आहेतच.परब्रह्म,परमात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म, मोक्ष, ब्रह्मलोक, असे शब्द कानी पडल्यावर ते श्रद्धाळू भारावून जातात.त्यांना भुरळ पडते.गुरूवरील श्रद्धा दृढ होते.
अध्यात्मशास्त्राचा आपला परिपूर्ण अभ्यास आहे, आपण साक्षात्कारी आहो, आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, आपल्यापाशी दिव्य अलौकिक शक्ती आहे, भक्ताच्या डोक्यावर हात ठेवून आपण शक्तिपात करू शकतो, ज्ञानसंक्रमण करू शकतो, अशा कल्पनेच्या राज्यात जे वावरतात ते भ्रमसेन गुरू होत.कुणाला फसवण्याचा त्यांचा हेतू नसतो.अशा भ्रमसेन गुरूंत काहीजण सज्जन,सदाचारी, सत्पुरुष असू शकतात.मात्र दिव्य ज्ञान, अलौकिक शक्ती कुणापाशी नसते.खरेतर अशा शक्तीला अस्तित्वच नाही.निसर्गनियमांचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही.
काही गुरू निष्पाप,अश्राप,निरिच्छ, निर्मोही असतात.त्यांचे भक्त त्यांना विदेही, जीवन्मुक्त, देहातीत, अवलिया, पहुंचा हुवा आदमी असे समजतात. त्यांच्या भजनी लागतात. त्या गुरूंना आपल्या शरीराचे, कपड्यांचे, खाण्या-पिण्याचे, स्वच्छतेचे भान नसते..."हे इतके लोक माझ्यापुढे असे हात का जोडताहेत? गाणे कसले म्हणताहेत? समोरच्या पेटीत पैसे का टाकताहेत?..." हे त्यांना काही समजत नसते. खरे तर ते मतिमंद असतात. काही धूर्त लोकांनी त्यांना गुरू बनवून मठात बसवलेले असते. हे मूढसेन गुरू होत. अशा या आध्यात्मिक गुरूंच्या तीन तर्‍हा दिसतात.
गुरू ठकसेन असो, भ्रमसेन असो वा मूढसेन असो प्रत्येकाचा भक्तवृंद असतोच. त्यांत ठकसेन गुरू साधनशुचिता गुंडाळून ठेवून आपल्या धंद्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे करत असल्याने भाविकांवर त्यांचा प्रभाव अधिक पडतो आणि त्यांना मोठ्या संख्येने शिष्य लाभतात.सर्व गुरूंचे शिष्य आपली बुद्धी गुरुचरणी वाहातात आणि गुरूंना सर्वभावे शरण जातात.अशा भक्तांविषयी पु.ल.देशपांडे यांनी एक अप्रतिम भक्तिगीत लिहिले आहे. बहुतेकांनी ते वाचले असेल. ते दत्तगुरूंविषयी असले तरी सर्वच गुरुभक्तांना आवडेल आणि मुखोद्गत करावेसे वाटेल म्हणून इथे दिले आहे.

गुरुराज मन्मनीं बसले । हृदयात माझिया ठसले ।
श्वान सुलोचन अहा गोजिरे
जवळी बसता दिसे साजिरे
झोळीमधला प्रसाद मिळता
स्वपुच्छ हलवित हसले। गुरुराज मन्मनीं बसले ।..
त्या श्वानाचा वाटे हेवा
कधी सुखाचा मिळेल ठेवा
गुरुचरणांच्या ठायीं मजला
सात स्वर्गही दिसले । गुरुराज मन्मनीं बसले ।...
म्हणे सुभद्रासुता सुभगिनी
नित्य असो गुरुराज मन्मनी
गुरुसेवेचे व्रत आचरिता
उरेल भवभय कसले । गुरुराज मन्मनीं बसले।...

खरेतर हे सर्व आध्यात्मिक गुरू म्हणजे सामान्य माणसे असतात. त्यांतील कोणापाशी दैवी शक्ती, अलौकिक सामर्थ्य, दिव्य ज्ञान असले काही नसते. गीतेतील श्लोक,धर्मग्रंथांतील वचने,पुराणांतील दाखले, संतसाहित्यातील अभंग, ओव्या यांतील काही गोष्टी हे गुरू (मूढसेन सोडून) तोंडपाठ करतात. बरेचसे वाचलेले,ऐकलेले असते.वक्तृत्व प्रभावी असते...."ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भूत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहे. तो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे. त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त होऊन अर्चिरादिमार्गे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला." असले गुरुमुखातून येणारे अगम्य बोल ऐकले की श्रद्धाळू भक्त मंत्रमुग्ध होतात. माना डोलावू लागतात. गुरुवचन सत्य मानायचे. त्याची चिकित्सा करायची नाही."गाईचे मुख महन्मंगल कसे? " अशी शंका विचारायची नाही. भक्तांच्या या श्रद्धाळू वृत्तीमुळे जटाधारी-गोटाधारी,टिळाधारी-माळाधारी,कफनीधारी-लुंगीधारी असे सर्व गुरू इथे प्रभावी ठरतात.
गुरूमुळे भक्तांची आर्थिक हानी होते. वेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतो. पण सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धी पांगळी होते. भक्त आपल्या गुरूला सर्वभावे शरण जातो. गुरूचा शब्द प्रमाण मानतो. गुरू जे सांगेल ते पूर्ण सत्य असणार हे गृहीत धरतो. गुरुवचनांची चिकित्सा करणे,त्यांवर शंका घेणे पाप समजतो. गुरूचे विचार हे आपलेच विचार आहेत असे त्याला वाटते. तो स्वबुद्धीने स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. आपली बुद्धी गुरूच्या पायी गहाण ठेवतो. दुसर्‍याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणे. दास्य स्वीकारणे. हा माणूसपणाचा अपमान आहे. पण भक्तांना त्यात धन्यता वाटते. माणसाने अशी शरणागती पत्करणे,त्याचे अशी अवनती होणे म्हणजे त्याची वाट लागणे होय.
मूढसेन गुरूचे भक्त त्याच्या कृपा कटाक्षासाठी आसुसलेले असतात.गुरूने त्यांच्याकडे पाहिले,आशीर्वाद दिल्यासारखा हात वर केला की भक्ताला धन्य धन्य वाटते. गुरूने कधी थप्पड मारली तर आता आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला असे वाटून भक्त कृतार्थ होतो. म्हणजे अशा मतिमंद गुरूपुढे भक्ताची पूर्ण शरणागती असते. गुरुपायाशी बुद्धी गहाण असते.
....
आध्यात्मिक गुरुविषयीं एक जुना किस्सा आहे.मुळात तो एक संस्कृत श्लोक आहे.त्याला कुणी मराठी संवादरूप दिले. त्या आधारे हा किस्सा लिहिला आहे.
...

"नमस्कार यती महाराज! आपल्या या कफनीला मोठा झोळ पडलेला दिसतो.तसेच त्यात लहान लहान छिद्रेही पडली आहेत."
" खरे आहे.नदीत आंघोळ करताना अशा कफनीचा उपयोग मासे पकडण्यासाठी करतो."
"मासे? म्हणजे तुम्ही मासे खाता? मत्स्याहारी आहांत? "
"हो. तळलेले छोटे मासे दारूबरोबर छान लागतात. आपला काय अनुभव?"
"दारू? म्हणजे मद्यपानसुद्धा करता?"
"व्यसन नाही. पण कधी बाईकडे जायचे तर आधी एखादी बाटली पिणे बरे. आपला काय अनुभव?"
"बाप रे! बाई? म्हणजे वेश्यागमन?"
"आश्चर्य कसले त्यात? अहो, जुगारात एखादे वेळी एकदम घबाड लागले तर मौज मजा करावीशी वाटणारच ना?"
"तुम्ही जुगारी अड्ड्यांवर पण जाता? "
" क्वचित कधीतरी.बाकी वेळ कुणाला असतो. आमच्या मठात सतत गर्दी असते भक्तांची. त्यांना दर्शन देण्यात आणि मार्गदर्शन करण्यात खूप वेळ जातो."
" म्हणजे तुम्ही आध्यात्मिक गुरू आहांत तर ! नमस्कार. निघतो मी."
..

हा किस्सा जुना झाला. आता या गुरूंची जीवन पद्धती(लाईफ स्टाईल) खूप बदलली आहे. तरी मूळ मनोवृत्ती तशीच आहे.अशा या गुरूंचे श्रद्धाळू भक्त व्यासपौर्णिमेला पूजन करतात हे आपल्या समाजाचे दुर्भाग्य होय. *******************************************************************************

Comments

निर्मलबाबा वगैरे

गुरुपायाशी बुद्धी गहाण असते.

बर्‍याचदा बुद्धी गहाण आधी टाकलेली असते नंतर गुरु शोधला जातो पण आयुष्यातील चॅलेंजेस स्वीकारणे अनेकांना शक्य नसते. कुठेतरी आधार हवा असतो.

आजकाल टिव्हीवर इतके गुरू-बाबा, बुवांच्या कार्यक्रमाचे प्रदर्शन केले जाते की पूर्वी मर्यादित प्रसिद्धी असणारे बाबा-बुवा या माध्यमांमुळे उच्च"कोटीला" पोहोचले असावे.

लेख आवडला

तुमच्या खास शैलीतला हाही लेख आवडला.

धम्मकवाणी: गुर फार शिकलासवरला असायलाच हवे असे नाही. ज्याच्याकडून आपण शिकतो तो आपला गुरू असे हे माझे साधे तत्त्व आहे. त्यामुळे गुरू असो वा गाढव दोहोंत मी तरी भेद करीत नाही. गाढवात गुरुत्व आणि गुरुतही गाढवत्व असू शकते. किंबहुना असतेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

धम्मकवाणीशी सहमत आहे.
रोज सहा गुरू करावेत असे म्हटले आहे ते त्याच अर्थाने.

नेहमीप्रमाणेच छान लेख

गुरुपौर्णिमेच्या सुमारास आलेला हा अतिशय समयोचित लेख. बर्‍याचदा माणुस एखाद्या प्रचंड तणावातुन /संकटातुन जात असतो अशा वेळेस काही वेळा योगायोगाने चमत्कार वाटावा असे नशिब पालटते.पण निव्वळ रँडमनेस मधे पॅटर्न शोधणारे माणसाचे मन मात्र लगेच ह्याचा संबध कुणा गुरू/बाबा ह्याच्याशी साधते. आणि ह्या भारावलेल्या अवस्थेत केलेला प्रचार ह्या तथाकथित गुरुंचे स्थान भक्कम करतो.

सहमत.

लेख छान. वरील तिन्ही प्रतिसादांशी सहमत.

गुरुवाणी !

यनावालांची गुरुवाणी आवडली. खुशीने मान डोलावतो आहे. :)

सत्यसाई, निर्मलाबाबा, अनिरुद्ध बापू वगैरे या क्षेत्रातली मोठी नावं आहेत. पण याखेरीजही अगदी स्मॉल स्केल गुरुंचे प्रमाणही मधल्या काळात बरेच वाढलेले दिसते. अशा गुरुंचे कार्यक्षेत्र एक-दोन जिल्ह्यांपुरतेच असते. ठराविक पन्नास-शंभर कुटुंबे अनुग्रहीत असतात. तेच प्रचारकही असतात. लहानसाच मंदिरवजा मठ असतो. एकंदर कार्य फार गाजावाजा न होता व्यवस्थित चालत असते. अशा स्मॉल स्केल गुरुंना शरण गेलेल्यांची संख्याही प्रचंड आहे/ असावी.

वाहवा आणि तोचतोचपणा

तोचतोचपणा लेखात आहे का? -- हो.
तरीही मला येउन मुद्दाम वाहवा कराविशी वाटली का? -- हो
का कराविशी वाटली?
कारण पुढील लायनी हायक्लास आहेत. त्या आमचा वैताग यथार्थ मांडतातः-

ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भूत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहे. तो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे. त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त होऊन अर्चिरादिमार्गे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला.

अशीच मला आठवत असलेली अजून काही वाक्ये:-

पाप्-पुण्य, जन्म मरण हे अनादि आहे, अनंत आहे. त्यात पहिलं असं काही नाही. जे पाहिलं तुम्ही समजाल त्याच्याहूनही आधी काहीतरी आहे, जे शेवटचं समजाल त्याच्याही पलीकडे काही आहे, बालिके.
भौतिक दु:ख हे अपादान कारण तसेच उपादान कारनातुन होते. यष्टी समष्टी आणि परदृष्टी ह्यासमाधी लावुन पाहिल्या की सृष्टीचे गूढ उकलत जाते. चित्तभ्रांती दूर होउन जिवात्म्याला शिवाचे दर्शन होते. दर्शनमात्रे वेदनलवणसागर पार करणारा भगवंत मग तुमच्यावर प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यावर तुम्हाला कळते की जो प्रसन्न झालाय तो वस्तुतः कुणीच नाही, तुम्ही स्वतः आहात. ह्या गोष्टीवरही तुम्ही बेहद्द खुश झालात की कळते की तुम्हीही नाही आहात आणि भगवंतही नाहिये! ("नेति नेति" , "हेही नाही हेही नाही" असे हे वेदांताचे अद्भुत सार आहे!) ह्यालाच अद्वैत सिद्धांत म्हणतात. एकदा "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या" हे शंकराचार्यांच्या सुप्रसिद्ध अद्वैतसिद्धांताप्रमाणे मान्य केलं की घडणारे अत्याचार आणि किळसवाण्या गोष्टींचा त्रास अगदि दूर होतो; कारण मुळात तसं काही घडतच नाहिये हे समजु लागतं. म्हणजे हा धागाही खोटा, त्यातल्या घटनाही खोट्या, माझं लिहिणंही खोटं, तुझं वाचणं त्याहुनही मिथ्या---खोssssssटंच. मुळात असं काही होतच नाहिये, सगळाच भ्रम आहे.

खरेतर यनावालांकडे स्वतःच श्री श्री महाराज यनावालानाथाचार्य बनण्याचे पुरेपूर मटेरिअल तयार आहे. त्यांनी लोकांना अध्यात्माचे मार्गदर्शन करायचे सोडून हे भलताच हितोपदेश वाटायचे उद्योग का आरंभलेत (यनावालंचा विश्वास नसलेला ) देव जाणे ;)

--मनोबा

यनाबाबा

या एका जुन्या चर्चेत यनाबाबांविषयी भाकित पूर्वीच केले होते.

२०१० साली यनाबाबांचे शिष्यत्व स्वीकारण्यास नाराज असणारे अनेकजण उपक्रमावर होते. २०१२ साली ते दिसेनासे झाले किंवा यनाबाबांनी सर्वांचे ब्रेनवॉश केले असे म्हणता येईल.

अरेरे! तीन पानी चर्चा. दुवा नीट चालत नाही म्हणून येथेच टाकते..

चर्चा माझा भक्त टाकणार | समर्थ यनाबाबा मूळ आधार |
मी अंधश्रद्धानिर्मूलक साचार |गोंधळ घालणार निश्चित ||

प्रतिसाद हलकेच घ्यावा.

-----------

यावरून आठवलं, मध्यंतरी (आणि आताही असेल) गुरू बदलायची फॅशन आली होती. म्हणजे गुण आला नाही तर लोक डॉक्टर किंवा हेअरस्टायलिस्ट बदलतात तसा हा गुरू ट्राय करून पाहिला, आवडला नाहीतर दुसरा गुरू पकडला असे प्रकार आमच्या इमारतीतील काही बडीधेंडे व्यक्ती करत.

मस्त

तुम्ही दिलेली वाक्ये खरंच मस्त आहेत :)

लेखन आवडले. मात्र..

लेखन आवडले.
मात्र 'समस्त गुरुभक्तांची क्षमा मागून' हे खटकले. इतके नेमके लेखन असताना कोणाचीही क्षमा का मागावी? क्षमा मागावी असे काहीही लिहिले आहे असे वाटत नाही.

------------------
ऋषिकेश
------------------

भावना दुखावतात

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋषिकेश विचारतात

,"मात्र 'समस्त गुरुभक्तांची क्षमा मागून' हे खटकले. इतके नेमके लेखन असताना कोणाचीही क्षमा का मागावी? क्षमा मागावी असे काहीही लिहिले आहे असे वाटत नाही."

..
लेख वास्तवावर आधारित असला,लेखातील विधाने सत्य असली तरी काही श्रद्धावंतांच्या भावना दुखावल्या जातात.कारण गुरुविषयींच्या श्रद्धेत त्यांची भावनिक गुंतवणूक असते. लेख लिहिणार्‍याने क्षमा मागितली आहे हे वाचल्यावर त्यांना बरे वाटते.भावनांच्या दु:खाची तीव्रता थोडी कमी होत असावी.यास्तव क्षमा मागणे योग्य वाटले.

छान लेख!

भामट्या गुरूंची आणि त्यांच्याकडून गुरूमंत्र घेणार्‍यांची संख्या खूप वाढलिये.

+१

सहमत आहे.

आह आणि कत्ल

यनावाला सरांच्या विचारांशी छत्तीस गुण जुळत असल्याने लेख आवडला हे वेगळे लिहायला नकोच. यनावाला गुरुजी (!) नशीबवान! त्यांना अशा लेखांचे कौतुक करणारे भेटतात. हम आह भी भरते है, तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होता....
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

फीलगुड

निराशाजनक वातावरणात 'आपल्या' लोकांना दिलासा देणारा चांगला लेख. मात्र, मतपरिवर्तन करणारे काही मुद्दे सापडले नाहीत (अर्थात, लेखाचा उद्देश मतपरिवर्तन नाहीच असे वाटते त्यामुळे ठीकच आहे). श्रद्धाळूंची माफी मागणे पटले नाही.
शोलेतील संवादाचे मूळ संस्कृत असल्याची माहिती रोचक आहे. मूळ श्लोक आणि संदर्भ जाणण्याचे कुतूहल आहे.
--
पॉल दिनकरनचे नावसुद्धा घेतल्यामुळे 'केवळ हिंदूंवरच टीका' हा आरोप होणार नाही, हे चांगले आहे.
वेंकट चतुर्वेदी सर्वानन हे नाव मला अपरिचित होते म्हणून जालावर शोधले, इतरांच्या माहितीसाठी दुवे , .
--
बाकी, यनावालांना विडंबन मोडमध्ये पाहून आश्चर्य वाटले :D

शिसारी

समर्पक शीर्षक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धम्मकलाडू यांनी लिंक दिली तो अल्बम पाहिला. पं.वसंतराव गाडगीळ दिसले. मात्र श्रीकांत देशपांडे यांना ओळखू शकलो नाही. श्री.धम्मकलाडू यांनी दिलेले "शिसारी" हे शीर्षक अगदी समर्पक आहे.आणखी प्रतिशब्द असे:किळस,उबग,तिटकारा,घृणा,वीट,चिळस,ओखट. पण शिसारी याच शब्दाने इथे आपली प्रतिक्रिया समर्पकपणे व्यक्त होते.

हा दुवा

आधीच्या प्रतिसादात तो दुवा चुकला आहे. हा दुवा बघावा

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विनोदी

शिसारी वगैरे ठीकच पण फोटो भयंकर विनोदीही वाटले.

विशेषतः सुटाबुटातल्या स्वामींच्या हातातील भरगच्च खडे, ग्रहांच्या अंगठ्या पाहिल्यावर इतर लोक संकटनिवारणासाठी या अशा स्वामींकडे जातात या कल्पनेने हसू आले

निरीक्षण आणि निष्कर्ष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

"विशेषतः सुटाबुटातल्या स्वामींच्या हातातील भरगच्च खडे, ग्रहांच्या अंगठ्या पाहिल्यावर इतर लोक संकटनिवारणासाठी या अशा स्वामींकडे जातात या कल्पनेने हसू आले"

»
..
स्वामीच्या हातातील खडे आणि ग्रहांच्या अंगठ्या प्रियाली यांच्या निरीक्षणातून निसटल्या नाहीत.त्यावरून त्यांनी निदर्शनाला आणून दिलेला मुद्दा बिनतोड आहे.

मूळ संस्कृत श्लोक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री निखिल जोशी लिहितात

,"शोलेतील संवादाचे मूळ संस्कृत असल्याची माहिती रोचक आहे. मूळ श्लोक आणि संदर्भ जाणण्याचे कुतूहल आहे."

..
मुंबईच्या रुइया महाविद्यालयातील मराठीचे प्रध्यापक द.के.केळकर (१८९५--१९६९) यांनी लिहिलिले "संस्कृतिसंगम" नावाचे पुस्तक आहे.त्या पुस्तकात प्रा.केळकर लिहितात,"...या संवादाचा मूळ श्लोक रुईया कॉलेजमधील अर्धमागधीचे प्राध्यापक डॉ.जगदीश जैन यांनी शोधून दिला. तो पुढील प्रमाणे आहे:

कन्थाSचार्याघना ते ननु शफरवधे जालम् अश्नासि मत्स्यान्? |
ते मे मद्योपदंशात् पिबसि ?ननु युतो वेश्यया यासि वेश्याम्? |
कृत्वाSरीणां गलेघ्री क्वन तव रिपवो येषु संधि: छिनद्मि|
चौरस्त्वं? द्यूते हतो: कितव इति कथं येन दास्या: सुतोSस्मि|

..
यात रक्तवर्णी लेखन आहे ते गुरूची उत्तरे दाखविते.उर्वरित लेखन म्हणजे दुसर्‍या व्यक्तीचे संवाद होय.असे दोन भाग करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुधा ही विभागणी योग्य असावी.मात्र पूर्ण श्लोकाचा समाधानकारक अर्थ मला लागत नाही. श्लोकाचा अन्वयार्थ (माझ्यामते) तसेच मूळ संवाद पुढच्या प्रतिसादात.

मूळ श्लोकाचा अन्वय आणि अर्थ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कन्थाSचार्याघना ते ननु शफरवधे जालम् अश्नासि मत्स्यान्? |
ते मे मद्योपदंशात् पिबसि ?ननु युतो वेश्यया यासि वेश्याम्? |
कृत्वाSरीणां गलेघ्री क्वन तव रिपवो येषु संधि: छिनद्मि|
चौरस्त्वं? द्यूते हतो: कितव इति कथं येन दास्या: सुतोSस्मि|

..

"आचार्य,ते(तव) कन्था अघना|...गुरुदेव आपली धाबळी विरविरीत आहे."
.
"ननु शफरवधे जालम् |....खरे तर मासेमारीचे जाळेच."
.
"मत्स्यान् अश्नासि ?.....मासे खाता?"
.
"ते मे मद्योपदंशात् |...ते आपले दारू चढली तर."
.
"(मद्यं) पिबसि?....दारु पितां?"
.
"ननु युतो वेश्यया|....वेश्येबरोबर असतो तेव्हाच."
.
"वेश्यां यासि?....वेश्येकडे जाता?"
.
"अरीणां गलेघ्रि कृत्वा|... शत्रूंचे गळे दाबून आल्यावर."
.
"क्वन तव रिपवः|...तुमचे शत्रू कोण?"
.
"येषु संधि: छिनद्मि|...ज्यांची घरे लुटतो ते."
.
"चौरः त्वम् ?.... तुम्ही चोर आहात?(चोरी करता?)"
.
"द्यूते हतो: कितव|..."जुगारात हरलो तर.
.
"इति कथम् ? ..हे कसे काय?"
.
" दास्या: सुतः अस्मि|...मी दासीच्या पोटी जन्माला आलोय ना?(म्हणजे हलक्या जातीचा) म्हणून"

 
^ वर