जमातनिहाय नागरी कायद्याविषयी डॉ. भी. रा. आंबेडकरांचे धोरणात्मक संकेत

जमातनिहाय नागरी कायद्याच्या बाबतीत अधूनमधून चर्चा होते, आणि अजून भारतात समान नागरी कायदा का नाही? याबाबत रुखरुख व्यक्त होते.

या बाबतीत १९५१ साली लोकसभेत डॉ. भी. रा. आंबेडकरांनी काही धोरणात्मक मुद्दे मांडले होते. त्या काळात आंबेडकर कायदेमंत्री होते, आणि शिवाय राज्यघटनाही नुकतीच त्यांच्या देखरेखीखाली तयार झाली होती. शिवाय व्यवहार्य राजकारणाबाबत आंबेडकरांना जाण होती असे त्यांचे खुद्द मत होते (आणि माझे [धनंजयचे] मतही तसेच आहे.) त्यामुळे याबाबतीत आंबेडकरांची धोरणात्मक मते ही विचार करण्यालायक आहेत असे मला वाटते.

पुढील परिच्छेद "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतनात्मक लेख" या पुस्तकातून घेतलेले आहेत. (प्रकाशक : राजेश रमेश रघुवंशी, पुणे). विशेष करून त्या पुस्तकातील दोन लेखांतली ही उद्धरणे आहेत : (१) हिंदू कोड बिलाच्या टीकाकारांना उत्तर, पृष्ठ ५८-५९, आणि (२) हिंदू कोड बिलानेच हिंदूंचा उद्धार होईल पृष्ठ ८२-८४.
आंबेडकरांचा मूळ युक्तिवाद लोकसभेत इंग्रजी भाषेत झालेला असावा. पण येथे दिलेले उतारे "जनता" मासिकात छापून आलेले आहेत. बहुधा आंबेडकरांना मान्य असाच मराठी अनुवाद असावा.

- - -

जे हिंदू कोडाला विरोध करीत होते, नि सध्याचाच हिंदू कायदा कायम ठेवा, असे प्रतिपादीत होते तेच आज अखिल भारतीय स्वरूपाचे सिव्हिल कोड तयार करा, असे सांगत असतांना पाहून मला अतिशय आश्चर्य वाटते. इतके दिवस या बिलावर वाघांसारखे तुटून पडणारे हे लोक* आता इतके क्रांतिवादी झाले हे मोठे आश्चर्य आहे.

(*टीप : लेखांत अन्यत्र [श्यामाप्रसाद] मुखर्जींचा नामोनिर्देश आहे. - धनंजय)

...
निधर्मी राज्य धर्म नष्ट करू पाहात नाही. त्याचा अर्थ एवढाच की सरकार एखादा धर्म जनतेवर लादू शकत नाही व म्हणून सरकार धार्मिक भावना दुखविणार नाही. हिंदू-दोड-बिल इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा अव्यवहार्य आहे.
...
काही सभासद म्हणतात की हे कोड भेदभाव करते. आपल्या घटनेच्या २५व्या कलमाची आठवण केल्यास यावर बराच प्रकाश पडेल. त्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास परवानगी आहे. भारतात धर्माचाराबरोबर कायदाही येतोच. तेव्हा घटनेप्रमाणे मुसलमानांना ज्याअर्थी धर्म-स्वातंत्र्य देतो, त्याअर्थी त्यांचा कायदा पाळण्याचे स्वातंत्र्य आपण त्यांना दिलेच पाहिजे. अशा स्थितीत मुस्लिम जमातीला वेगळे म्हणून भेदाभेद होत् नाही.

हे असले तरी या देशातील कोणत्याही जमातीच्या कायद्यात हस्तक्षेप करायचा अधिकार सरकारला आहे. ... आमच्या कायद्यात हस्तक्षेप करायचा अधिकार लोकसभेला नाही, असे कोणतीही जमात म्हणू शकणार नाही. कारण या लोकसभेला तसे संपूर्ण अधिकार आहेत.
...
हे बील भारताच्या प्राचीन ध्येयवादावरही नाही, किंवा पाश्चात्त्यांचेही अनुकरण नाही. ... या घटनेच्या प्रास्ताविक भागातच स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या कल्पना आहेत. आणि त्या निकषांवर या देशात असलेली प्रत्येक सामाजिक संस्था घासून बघितली पाहिजे.

---------------
टिप्पणी :
डॉ. आंबेडकरांनी सिद्धांत आणि व्यवहार्यता यांचे जोड करून काही धोरणे सांगितलेली दिसतात.
(१) लोकसभेला कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार आहे. परंतु धोरण म्हणून धार्मिक भावना न-दुखावण्याकडे कल असावा.
(२) घटनेचे २५वे कलम मुद्दामून या कारणासाठी घटनेत आहे, की जेणेकरून केवळ वेगळे सिव्हिल कोड असल्यामुळे निधर्मी तत्त्वाखाली भेदाभेद मानला जाऊ नये. म्हणजे निधर्मी तत्त्वाच्या मर्यादा २५व्या कलमात आहेत.
(३) समान नागरी कायदा व्यवहार्य नसला, तरी प्रत्येक जमातीचे कायदे आधुहिक-भारतीय-मान्यतेच्या स्वातंत्र्य-समता-बंधुता तत्त्वावर घासून वेगवेगळे बदलणे कदाचित व्यवहार्य असेल, असे आंबेडकरांचे मत असावेसे वाटते.

उपटिप्पणी :
त्या काळात समान नागरी कायदा मागणार्‍यांबाबत राजकारण-विश्लेषणही आंबेडकरांनी दिलेले आहे. वरच्या "क्रांतिवादी झाले हे आश्चर्य" हे काहीचे शालजोडीतले हाणले असले, तरी याच लेखांत हे स्पष्ट शब्दांतही सांगितले आहे.

ज्यांनी सिव्हिल कोडच हवे अशी मागणी केली आहे, ती एक चांगला कायदा देशात हवा अशा कळकळीने केली आहे काय? (श्री. सौंधी मध्येच म्हणाले : त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा, त्यावर बाबासाहेब म्हणाले) मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू शकणार नाही. कारण मी त्यांना चांगले ओळखतो. सोव्हिल कोडाची कल्पना मला विचारार्ह वाटत नाही. याचे कारण तीत काही कणखरपणा किंवा गांभीर्य आहे, असे मला वाटत नाही.

एखादे क्रांतिकारी टोकाचे आणि अव्यवहार्य तत्त्व होऊ घातलेल्या कायद्यात जोडून काय होते? थोडी-पण-व्यवहार्य-प्रगती करणारा कायदा विधिमंडळात पसार होऊ शकत नाही. हा डावपेच हा लोकशाहीमध्ये नेहमीचा आहे. इंग्रजीत कधीकधी याला "पॉयझन पिल अमेंडमेंट" असे म्हणतात. आंबेडकरांनी थोडक्यात या अंगाने राजकीय विश्लेषण केलेले आहे.

१९५१ साली आंबेडकरांनी मांडलेली धोरणे आज लागू असतीलच असे नाही. बाबावाक्यं प्रमाणं म्हणून ती मी येथे दिलेली नाहीत. बाबावाक्य म्हणून नव्हे, तर त्यांचे युक्तिवादही दिसतात, म्हणून उद्धरणे दिलेली आहेत. यातील काही युक्तिवाद आजही लागू आहेत काय? असा हा चर्चाप्रस्ताव आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

युक्तिवाद पटले नाहीत

इतके दिवस या बिलावर वाघांसारखे तुटून पडणारे हे लोक* आता इतके क्रांतिवादी झाले हे मोठे आश्चर्य आहे.

त्या लोकांचे धोरण शेपूट तुटलेल्या कोल्ह्याप्रमाणे ("मला नाही तर इतरांनाही नाही") होते, किंवा मुस्लिमांची ढाल करून आपल्यावरील कायदा टाळणे असे होते, असा आरोप असल्यास तो मला पटतो.

निधर्मी राज्य धर्म नष्ट करू पाहात नाही.

सरकारला न्याय्य वाटणारा कायदा लादणे म्हणजे धर्म नष्ट करणे असेल तर त्याचा अर्थ असा की डॉ आंबेडकर हिंदू धर्माला नष्ट करू इच्छित होते.

त्याचा अर्थ एवढाच की सरकार एखादा धर्म जनतेवर लादू शकत नाही व म्हणून सरकार धार्मिक भावना दुखविणार नाही.

दुसर्‍या शब्दांत, मुस्लिम पुरुष त्यांची धार्मिक मते त्यांच्या मुलांवर/पत्न्यांवर लादू पहातात आणि त्या पुरुषांच्या भावना सरकार दुखविणार नाही. हिंदू पुरुष असंघटित असल्यामुळे (आणि त्यांच्यामध्ये गद्दार पुरोगामी लोक अधिक असल्यामुळे) त्यांच्या भावना दुखवू धजेल.

हिंदू-दोड-बिल इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा अव्यवहार्य आहे.

लांगूलचालन.

आमच्या कायद्यात हस्तक्षेप करायचा अधिकार लोकसभेला नाही, असे कोणतीही जमात म्हणू शकणार नाही. कारण या लोकसभेला तसे संपूर्ण अधिकार आहेत.

मधाचे बोट.

कायद्याचा विकास, कायदा करण्यामागच्या हेतूचा विकास

भांडण्यास पूरक असा चर्चा विशय छानपणे, मुद्देसूदपणे मांडला आहे. त्याबद्दल श्री. धनंजय यांचे अभिनंदन!

मला स्वतःला कायद्याचे व वरील कायद्याच्या पार्श्वभूमीच्या इतिहासाचे विशेश द्न्यान नाही. तरीही मला 'कॉमनसेंस' आहे असे मी समजतो म्हणून मी ह्या चर्चेत सहभागी होत आहे.

कायदा म्हणजे 'एखाद्या अधिकृत यंत्रणेद्वारे अधिकृतपणे पारीत केलेले नियम'! पण ह्या नियमाला कालावधीची अट स्पश्टपणे त्याच नियमांत दिली गेली असते कां? बर्‍याच बाबतीत नवीन समस्या प्रखरतेने भेडसावत नाही, ती समस्या स्वतःच एक उग्र स्वरूप घेवून प्रकट होत नाही नाही तोपर्यंत, 'तो कायदा चालू ठेवावा' असे गृहितक असते. येथे कायदा व त्याचा विशय कोणताही असू शकतो.

प्रस्तुत चर्चाविशयामध्ये 'जमातनिहाय नागरी कायदा' हा केंद्रबिंदू आहे.
मला स्वतःला 'समान नागरी कायदा' ही तीन शब्द व त्यातून तयार झालेले एक वाक्य हा चर्चाप्रस्ताव वाचेपर्यंत छान वाटायची. पण आंबेडकरांची जी उद्धरणे श्री. धनंजय यांनी दिली ती वाचून माझे समजपरिवर्तन झाले -
आपल्या घटनेच्या २५व्या कलमाची आठवण केल्यास यावर बराच प्रकाश पडेल. त्यात प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास परवानगी आहे. भारतात धर्माचाराबरोबर कायदाही येतोच. तेव्हा घटनेप्रमाणे मुसलमानांना ज्याअर्थी धर्म-स्वातंत्र्य देतो, त्याअर्थी त्यांचा कायदा पाळण्याचे स्वातंत्र्य आपण त्यांना दिलेच पाहिजे.

धर्माधारीत-देश व निधर्मी-देश ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांतला नेमका भेद मला वरील दोन वाक्ये वाचून कळला. मुसलमानांना त्यांनी मागितला तसा वेगळा देश फाडून दिला मग त्यांना परत येथे त्यांचा धर्म मिरवत भारतांत का रहावे? हा सल बहुतेक हिंदुंमध्ये आंबेडकरांच्या काळात असावा. त्यानुसारच जातीनिहाय कायद्याला विरोध व समान नागरी कायद्याचा पुरस्कार असे दोन विचारप्रवाह निर्माण झाले असावेत.

परंतु निसर्ग आपला विकास प्रकृतीतून करीतच असतो. लहान मुलगा मोठा झाला कि त्याचा आवाज बदलतो, त्याला मिशी येवू लागते. म्हणजे विकासाचा, वाढीचा प्रकार बदलतो. अगदी तसेच कायद्याच्या विशयाबाबत भारतीय विद्वानांनी आता विकासाचा प्रकार बदलावयास हवा. 'समान नागरी कायदा' ह्या विचारांचे पुरस्कर्ते काळाच्या प्रवाहात आपले विचार भारतीय संविधानात आणू शकले नाहीत. आणी म्हणून तो प्रवाह 'पुरस्कर्त्यांचा मार्ग चूकला' या कारणास्तव विस्मरणात न्यायला हवा. परंतु त्या विचारामध्ये असलेली देशहीताबाबत असलेली सदप्रेरणा शाबूत ठेवायला हवी. त्यासाठी -
प्रत्येक जमातीच्या कायद्यामुळे त्या-त्या जमातीला कोणकोणता त्रास होत आहे, अडचणी येत आहेत?
तसेच त्या जमातीवर झालेल्या प्रचलित कायद्यामुळे देशहितावर कोणकोणता परिणाम झालेला आहे? ते विचारांत घेतले जायला हवे. ढोबळ उदा. - पारशी जमातीला जास्तीत जास्त अपत्ये जन्माला घालण्यांहेतू कायद्याने प्रेरीत केले जायला हवे. म्हणजे जास्तीत जास्त अपत्ये असलेल्या पारशी समाजातील व्यक्तींना करामध्ये सूट दिली जायला हवी. ह्याचे कारण हि जमात शांत स्वभावी, कर्मोद्योगी असते.

भारतीय घटना

समान नागरी कायदा व्यवहार्य नसला, तरी प्रत्येक जमातीचे कायदे आधुहिक-भारतीय-मान्यतेच्या स्वातंत्र्य-समता-बंधुता तत्त्वावर घासून वेगवेगळे बदलणे कदाचित व्यवहार्य असेल, असे आंबेडकरांचे मत असावेसे वाटते.

याची खात्री नाही. कारण घटनाकार आंबेडकरांनी भारतीय घटनेत मग, डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल ऑफ् स्टेट पॉलीसी "the state shall endeavour to secure for the citizens, a Uniform Civil Code, throughout the territory of India" (पृ. १८ कलम/मुद्दा ४४) म्हणले असते असे वाटत नाही.

जे हिंदू कोडाला विरोध करीत होते, नि सध्याचाच हिंदू कायदा कायम ठेवा, ...इतके दिवस या बिलावर वाघांसारखे तुटून पडणारे हे लोक* आता इतके क्रांतिवादी झाले हे मोठे आश्चर्य आहे. (*टीप : लेखांत अन्यत्र [श्यामाप्रसाद] मुखर्जींचा नामोनिर्देश आहे. - धनंजय)

श्यामा प्रसाद मुखर्जींचे नक्की काय म्हणणे होते याची आत्ता कल्पना नाही... पण धनंजय कीर यांच्या पुस्तकात दिलेल्या संसदीय संदर्भाप्रमाणे, बाबासाहेब (कायदा मंत्री म्हणून) संसदेत उत्तर देताना म्हणाले होते की, "डॉ. मुखर्जींच्या (हिंदू कोड बिलास असलेल्या) विरोधाला मी महत्व देत नाही. कारण मंत्रीमंडळात असताना त्यांनी या बिलास कधीच विरोध केला नव्हता. आता ते विरोधासाठी विरोध करत आहेत असे वाटते."
त्या व्यतिरीक्त, जे काही आधी वाचले होते त्याप्रमाणे हिंदू कोड बिलास काँग्रेसमधूनच अंतर्गत अधिक विरोध होता. त्यात राष्ट्रपती राजेन्द्र प्रसाद देखील होते. म्हणूनच नेहरूंना ते बिल बरेच डायल्यूट करायला लागले आणि शेवटी आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला.

निधर्मी राज्य धर्म नष्ट करू पाहात नाही. त्याचा अर्थ एवढाच की सरकार एखादा धर्म जनतेवर लादू शकत नाही व म्हणून सरकार धार्मिक भावना दुखविणार नाही. हिंदू-दोड-बिल इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा अव्यवहार्य आहे.

श्यामाप्रसाद अथवा इतर कोणी "हिंदू कोड बिल" इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा केली असे तुम्हाला म्हणायचे आहे का, "समान नागरी कायदा" करण्याची भाषा केली?

१९५१ साली आंबेडकरांनी मांडलेली धोरणे आज लागू असतीलच असे नाही.
आंबेडकर अथवा इतर कोणीही व्यक्तीने काय म्हणले आहे त्यापेक्षा भारतीय राज्यघटनेत काय आहे (पक्षी: व्यक्रीनिरपेक्ष) हे बघणे महत्वाचे वाटते.

यातील काही युक्तिवाद आजही लागू आहेत काय?असा हा चर्चाप्रस्ताव आहे.
१९५१ साली झालेल्या चर्चेस १९४७-४८ च्या प्रत्यक्ष फाळणीची आणि त्याच्या आधीच्या-नंतरच्या दंगलींची पार्श्वभूमी आहे असे मला वाटते. त्यामुळे हा विषय केवळ हिंदू-मुसलमान अशा पद्धतीने तेंव्हा हाताळला गेला होता. आत्ता त्याच नजरेने बघायची गरज आहे का? मला नाही वाटत. म्हणूनच, "भारतात धर्माचाराबरोबर कायदाही येतोच. तेव्हा घटनेप्रमाणे मुसलमानांना ज्याअर्थी धर्म-स्वातंत्र्य देतो, त्याअर्थी त्यांचा कायदा पाळण्याचे स्वातंत्र्य आपण त्यांना दिलेच पाहिजे." हे जर बाबासाहेबांनी म्हणले असले तरी ते मला पटले नाही असे म्हणेन, त्यात मुसलमान या शब्दाऐवजी हिंदू - ख्रिश्चन, निधर्मी वगैरे काही शब्द असला तरी ते पटणार नाही. त्याचे प्रमुख कारण असे आहे की जर धार्मिक कायदे मानायचे असले तर "मानवी हक्कांसंबधातील" कायदे मानता येतील असे वाटत नाही. किंबहूना "मानवी हक्क संरक्षणांच्या" कायद्यामधून सहज धार्मिकतेच्या नावाखाली पळवाटा काढता येऊ शकतात. त्या व्यतिरीक्त धर्म-आचार-विचार यातील वैविध्य जरी लक्षात घेतले आणि मानले तरी एका देशाचे नागरीक असूनही जर कायद्याने वेगळे ठरवणे आणी तसे वेगळे समजणारा समाज तयार करणे हे कुठल्याही देशाला घातक आहे असे वाटते.

घातक

>>त्या व्यतिरीक्त धर्म-आचार-विचार यातील वैविध्य जरी लक्षात घेतले आणि मानले तरी एका देशाचे नागरीक असूनही जर कायद्याने वेगळे ठरवणे आणी तसे वेगळे समजणारा समाज तयार करणे हे कुठल्याही देशाला घातक आहे असे वाटते.

इथे देशाला/समाजाला घातक म्हणण्यात गल्लत होत आहे. एक मुस्लिम आणि एक हिंदू एकमेकांशी काही व्यवहार करत असतील तर त्यांच्या व्यवहाराला सारखेच कायदे लागू असतात. मुस्लिम धर्मात व्याज देणे घेणे अमान्य आहे म्हणून मुस्लिम ऋणको मुस्लिमेतर धनकोला व्याज देण्यास नकार देऊ शकत नाही. समाजातील इतर धर्मीयांशी वागणुकीबाबत/व्यवहारांबाबत असा कोणताही कायदा मुस्लिमांसाठी (किंवा इतर कोणत्याही धर्मीयांसाठी) वेगळा नाही. परस्पर व्यवहारांबाबत सर्वांना एकच कायदा लागू आहे. वेगळा कायदा फक्त एक मुस्लिम (किंवा ख्रिश्चन वगैरे) व्यक्ती दुसर्‍या मुस्लिम (किंवा ख्रिश्चन वगैरे) व्यक्तीशी विवाहाचा व्यवहार करते त्याबाबतच लागू आहे. किंवा मुस्लिम (किंवा ख्रिष्चन) व्यक्तीची मालमत्ता तिच्या मुस्लिम (किंवा ख्रिश्चन) वारसांत कशी संक्रमित व्हावी याबाबतच वेगळा कायदा लागू आहे. विवाहविषयक वेगळा कायदा असल्याने देशाचे कुठल्या प्रकारे अहित होते ते कळत नाही.

@धनंजय
>>लोकसभेला कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करायचा अधिकार आहे.

सहमत आहे. आणि रोचक बाब ही की मुस्लिम कायद्यात असा हस्तक्षेप लांगूलचालनाचे उदाहरण म्हणून अत्यंत बदनाम झालेल्या (करण्यात आलेल्या?) कायद्याने करण्यात आलेला आहे. राजीव गांधींच्या काळात शहाबानो प्रकरणानंतर मुस्लिम महिला विषयक कायदा करण्यात आला. या कायद्याने हे ठसवले गेले की संसद मुस्लिम व्यक्तिगत बाबींमध्ये कायदा करू शकते आणि तो कायदा मुस्लिमांना बंधनकारक आहे. शरियामध्ये काहीही लिहिले असले तरी मुस्लिम महिलांना घटस्फोट प्रकरणात कोणते अधिकार असतील हे संसदेने कायदा करून सांगितले*.

*त्या कायद्याचा मसुदा आणि मुस्लिम स्त्रियांना त्यामुळे काय फायदा तोटा झाला हा वादग्रस्त मुद्दा असू शकतो. तो येथे चर्चेचा मुद्दा नाही.

एक प्रश्न : गोव्यात समान नागरी कायदा आहे असे ऐकले आहे. म्हणजे हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तकविधान कायदा, हिंदू वारसा कायदा हे गोव्यातील हिंदूंना लागू नाहीत का?

नितिन थत्ते

गोव्यात समान नागरी कायदा - बरोबर

गोव्यात समान नागरी कायदा - बरोबर.

गोव्यात हिंदूंनाही समान नागरी कायदाच लागू होतो. (काही कारणासाठी एका परिचिताच्या वारसा-तंट्याबाबत गोव्यातील वकिलाशी [अधिकृत, फी भरून] चर्चा झाली, तेव्हा त्या वकिलाने असे सांगितले.) समान नागरी कायदा पोर्तुगीज अमलाच्या काळातला आहे.

अर्थात तो आज अमलात असण्याचे कारण पोर्तुगीज सरकारचा अधिकार नव्हे. भारताच्या संसदेने गोवा दमण आणि दीव कायद्यानुसार आदल्या कायद्यांपैकी कुठले चालू ठेवायचे ते ठरवले. त्यामुळे गोव्यात समान नागरी कायदा आहे तो भारतीय घटनेने भारतीय संसदेला दिलेल्या अधिकारामुळे आहे.

गल्लत

इथे देशाला/समाजाला घातक म्हणण्यात गल्लत होत आहे.

अजिबात गल्लत होत नाही आहे. आणि का होत नाही याचे उत्तर तुमच्याच प्रतिसादात शहाबानो प्रकरणाच्या उल्लेखाने आले आहे.. फक्त ते उदाहरण देताना तुमची मोठी गल्लत झाली आहे असे वाटते...

आणि रोचक बाब ही की मुस्लिम कायद्यात असा हस्तक्षेप लांगूलचालनाचे उदाहरण म्हणून अत्यंत बदनाम झालेल्या (करण्यात आलेल्या?) कायद्याने करण्यात आलेला आहे. राजीव गांधींच्या काळात शहाबानो प्रकरणानंतर मुस्लिम महिला विषयक कायदा करण्यात आला. या कायद्याने हे ठसवले गेले की संसद मुस्लिम व्यक्तिगत बाबींमध्ये कायदा करू शकते आणि तो कायदा मुस्लिमांना बंधनकारक आहे. शरियामध्ये काहीही लिहिले असले तरी मुस्लिम महिलांना घटस्फोट प्रकरणात कोणते अधिकार असतील हे संसदेने कायदा करून सांगितले

शहाबानो प्रकरणाची राजकीय सुरवात ही संसदेमुळे झाली नसून सुप्रिम कोर्टाने घेतलेल्या निर्णयामुळे झाली ज्यात कलम १२५ क्रिमिनल प्रोसिजर कोड वापरले गेले होते. वास्तवीक तेच कलम, ती केस सेशन कोर्ट, हायकोर्टात असल्यापासूनच वापरले गेले होते. आधी निकाल विरोधात जाऊनही कोणीच आक्षेप घेतला नव्हता, पण सुप्रिम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यावर मुस्लीम समाजातील धार्मिक नेत्यांचा आक्षेप आला. त्यामुळे राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली The Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act 1986 संसदेने संमत केला. (ज्याला त्यांच्याच मंत्रीमंडळातील अरिफ महंमद खान यांनी विरोध केला आणि काँग्रेस पक्ष सोडला) ह्या कायद्यामुळे तुम्ही म्हणलात तसे, "संसद मुस्लिम व्यक्तिगत बाबींमध्ये कायदा करू शकते", हे सिद्ध झाले नाही तर संसदेने देखील मुस्लीम महीलांना अन्य धर्मिय महीलांना असलेल्या अधिकारांपासून दूर केले आणि केवळ "मुस्लीम लॉ" ने जे काही दिले आहे तेच चालेल असे सांगितले. संदर्भासाठी तुर्तास केवळ एकच वाक्यः "an amount equal to the sum of mahr or dower agreed to be paid to her at the time of her marriage or at any time thereafter according of Muslim law;"

थोडक्यात जे "ठसवले गेले" ते बरोब्बर तुम्हाला वाटले त्याच्या उलट होते आणि असे स्वतःच्या धर्मास-धर्माधारीत समाजास देशाच्या घटनेपेक्षा वेगळे मानणे हे घातक आहे असे माझे म्हणणे आहे.

तीच कथा थोड्याफार फरकाने हिंदू कोड बिलाच्या मूळ चर्चेदरम्यान (१९५०-५१) दिसू शकेल. त्या वेळेस देखील कारणे काहीही असली तरी एक प्रमुख विरोध हा महीलांना मिळणार्‍या हक्कांसंदर्भात होता. अर्थात सुदैवाने ते मान्य केले गेले नाही. त्याच संदर्भात मी आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, नागरी कायदे हे एका अर्थाने मानवी हक्कांचे संरक्षण देखील करत असतात. एका अर्थाने हिंदू कोड बिलातील हिंदू स्त्रीयांसंदर्भात काही हक्क मिळाले आणि (अजून बराच पल्ला गाठायचा असला तरी) खूप प्रमाणात सुधारणा झाली. पण The Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act 1986 ने तसे घडले असे वाटत नाही. किंबहून उलटच घडले असे वाटते...

पण परत मुद्दा हा हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन-ज्यू-नास्तिक वगैरे नसावाच. म्हणूनच समान नागरी कायदा म्हणजे हिंदू कोड बिलाचेच प्रसरण समजण्याचे कारण नाही. जसे गोव्यात असलेला "समान नागरी कायदा असतो", पोर्तुगिजांनी तयार केलेला "ख्रिश्चन कायदा" म्हणून सर्वांना समान नसतो आणि तसे कोणी मानत देखील नाही, तसे... तरी देखील प्रस्तावात, तसे धनंजय यांनी म्हणले आहे खरे, (हिंदू-दोड-बिल इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा अव्यवहार्य आहे), पण असे कोणी म्हणल्याचे माझ्या तरी वाचन-माहितीत नाही. त्यांच्या कडे तशी माहिती असली तर येथे अवश्य सांगावी.

असहमत

मुस्लिम धर्मात व्याज देणे घेणे अमान्य आहे म्हणून मुस्लिम ऋणको मुस्लिमेतर धनकोला व्याज देण्यास नकार देऊ शकत नाही.

"अमुक मान्य, तमुक अमान्य" अशी यादी बनविण्यात वाईट असे आहे की 'मुस्लिम धर्मगुरू/वक्फ/देवबंद' असे सरकारमान्य पद बनविले जाते आणि मग त्यातून धर्मातून बहिष्कार, इ. कल्पना उद्भवतात. "मी मुस्लिम आहे, मी अल्ला मानत नाही" असे जाहीर करण्याचा अधिकार धर्मस्वातंत्र्यात आहे परंतु सनाकाशिवाय तो नाकारला जातो.

विवाहविषयक वेगळा कायदा असल्याने देशाचे कुठल्या प्रकारे अहित होते ते कळत नाही.

काही नागरिकांना विशेष वागणूक देऊन कलम १४ दुखते.

या कायद्याने हे ठसवले गेले की संसद मुस्लिम व्यक्तिगत बाबींमध्ये कायदा करू शकते आणि तो कायदा मुस्लिमांना बंधनकारक आहे. शरियामध्ये काहीही लिहिले असले तरी मुस्लिम महिलांना घटस्फोट प्रकरणात कोणते अधिकार असतील हे संसदेने कायदा करून सांगितले*.

येथे तो कायदा वाचता येईल, येथे असे दिलेले दिसते की घटस्फोटानंतर पालकांनी स्त्रीला पोसावे आणि त्यांना शक्य नसल्यास वक्फ बोर्डाने पोसावे, इद्दतच्या लॉकिंग कालावधीनंतर पतीचे उत्तरदायित्व नाही, लग्नादरम्यान मुस्लिम कायद्यानुसार कबूल केलेली मेहेर पतीने घटस्फोटात द्यावी.
माझ्या माहितीनुसार, संसदेने असे ठसविले की मुस्लिम समाज मागेल तो शरिया कायदा मुस्लिम लोकांवर बंधनकारक करण्यासाठी संसद कटिबद्ध राहील.

असहमत

>>"मी मुस्लिम आहे, मी अल्ला मानत नाही" असे जाहीर करण्याचा अधिकार धर्मस्वातंत्र्यात आहे परंतु सनाकाशिवाय तो नाकारला जातो.

मुळीच नाही. अल्ला मानण्याचा/न मानण्याचा सनाकाशी काही संबंध नाही. मी मुस्लिम आहे असे म्हटले (पक्षी-मुस्लिम पद्धतीने दुसर्‍या मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला) की मी अल्ला मानत नसलो तरी मुस्लिम वैयक्तिक कायदा मला लागू होतो.

हीच गोष्ट हिंदूंबाबतही लागू आहे.

अजून एक प्रश्न : हिंदू पुरुष अहिंदू स्त्रीशी हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करू शकतो का? की स्पेशल मॅरेज ऍक्टनुसारच करू शकतो?

>>संसदेने असे ठसविले की मुस्लिम समाज मागेल तो शरिया कायदा मुस्लिम लोकांवर बंधनकारक करण्यासाठी संसद कटिबद्ध राहील.

हिंदूंच्या कायद्याबाबतही तसेच घडलेले नाही का? इन अदर वर्ड्स - हिंदू समाजाने मागितला तो कायदा हिंदू समाजावर बंधनकारक केला गेला. मग त्यात स्त्रियांना समान वारसाहक्क नसणे इत्यादि अनेक अन्याय असले तरी.

सनाकाबाबत आग्रही असणारे हिंदुत्ववादी लोक जणू सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंचा कसलाच विचार न घेता एक कायदा हिंदूंवर लादला अशी मांडणी करतात. प्रत्यक्षात हिंदूंमधील समाजधुरीणांचीच मागणी होती त्यानुसार हिंदूंसाठी कायदा करण्यात आला. त्यांनी ज्या प्रकारच्या कायद्याची मागणी केली त्या सगळ्याच तरतुदी काही हिंदू कायद्यात आल्या नाहीत. हो नाही करत, दोन पावले पुढे दोन पावले मागे अश्या रीतीनेच तो कायदा अस्तित्त्वात आला. हिंदुत्ववाद्यांप्च्या भाषेत सांगायचे तर नवा कायदा करण्याचे आश्वासन देणार्‍या हिंदू पुढार्‍यांना जनतेने 'एकगठ्ठा' मते दिली. ;-) धर्मात ढवळाढवळ आहे असे म्हणणार्‍या लोकांना दिली नाहीत. म्हणून तो कायदा अस्तित्वात आला.

नितिन थत्ते

तरीही

"अमुक मान्य, तमुक अमान्य" अशी यादी बनविण्यासाठी कोणत्यातरी धर्मपीठाला मान्यता द्यावीच लागते ना? त्यामुळे त्यांना एक समाजात अधिष्ठान मिळते ते वाईट नव्हे काय?

हिंदू पुरुष अहिंदू स्त्रीशी हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह करू शकतो का? की स्पेशल मॅरेज ऍक्टनुसारच करू शकतो?

येथे दिले आहे की, "A marriage may be solemnized between any two Hindus...". किंबहुना, या कायद्यानुसार विवाहित व्यक्तीने धर्मांतर केले तरी विवाहकराराचे उल्लंघन ठरते. ते मला योग्य वाटते. (दुसरी पत्नी ठेवण्यासाठी धर्मांतर करणार्‍यांविरुद्ध या तरतुदीचा वापर पहिली पत्नी का करीत नसावी?)

हिंदू समाजाने मागितला तो कायदा हिंदू समाजावर बंधनकारक केला गेला. मग त्यात स्त्रियांना समान वारसाहक्क नसणे इत्यादि अनेक अन्याय असले तरी.

सध्याच्या हिंदू कायद्यात समान हक्क आहे.

हिंदूंमधील समाजधुरीणांचीच मागणी होती त्यानुसार हिंदूंसाठी कायदा करण्यात आला.

वाटाघाटींमध्ये जितके जमले तितके हिंदूहित त्यांनी मिळविले, पुरोगामी असलेल्या तरतुदी त्यांनी मागून घेतल्या नाहीत असेही घडले असू शकेल.

फरक

हिंदूंच्या कायद्याबाबतही तसेच घडलेले नाही का? इन अदर वर्ड्स - हिंदू समाजाने मागितला तो कायदा हिंदू समाजावर बंधनकारक केला गेला. मग त्यात स्त्रियांना समान वारसाहक्क नसणे इत्यादि अनेक अन्याय असले तरी.

हिंदू समाजाने धर्मग्रंथाआधारीत कायदा मागितला आणि तो बंधनकारक केला गेला असे झाले का? तसे करताना कोर्टाला बाजूस सारले गेले का? "हो नाही करत, दोन पावले पुढे दोन पावले मागे अश्या रीतीनेच तो कायदा अस्तित्त्वात आला", असे म्हणताना जो काही विरोध झाला असेल तो सरकारने पचवला आणि कायदा पुढेच नेला. पण तुम्ही वर सांगितलेल्या राजीव गांधींच्या उदाहरणात तसे झाले नव्हते.

सनाकाबाबत आग्रही असणारे हिंदुत्ववादी लोक जणू सरकार नावाच्या बाह्य शक्तीने हिंदूंचा कसलाच विचार न घेता एक कायदा हिंदूंवर लादला अशी मांडणी करतात.

यात एक आपल्याच आधीच्या वाक्याशी विसंगती आहे. जेंव्हा कोणिही सनकाबाबत आग्रही असतात तेंव्हा त्यांना अगदी स्वतःच्या धर्माशी निगडीत कायदे देखील नकोच असतात. थोडक्यात सनकाबद्दल आग्रही असलेले हिंदूत्ववादी हिंदू कोड बिल सर्वांना लागू करा असे म्हणलेले नाहीत, तर सगळ्यांनाच समान नागरी कायदा करा असे म्हणतात. मात्र त्याच बरोबर त्यांचा असा देखील आक्षेप असतो की जर एका धर्मात ढवळाढवळ करायची नसेल तर ती कुठल्याच धर्मात तशी करू नये - यात ती (सरकारी ढवळाढवळ्) चांगली आहे का वाईट हा प्रश्नच नाही, तर प्रश्न पिसिडन्सचा आहे, जो घातक ठरू शकतो आणि तसा तो ठरला देखील आहेच... असो.

:)

थोडक्यात सनकाबद्दल आग्रही असलेले हिंदूत्ववादी हिंदू कोड बिल सर्वांना लागू करा असे म्हणलेले नाहीत, तर सगळ्यांनाच समान नागरी कायदा करा असे म्हणतात.

,

अच्छा!

मला हे स्थानिक (जालीय) आणि वर्तमान संदर्भ माहितच नव्हते... :-) धन्यवाद.

माझे वाक्य हे चर्चाप्रस्तावातील, "हिंदू-दोड-बिल इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा अव्यवहार्य आहे." या वाक्यासंदर्भात होते.

शाहा बानो

हे असले तरी या देशातील कोणत्याही जमातीच्या कायद्यात हस्तक्षेप करायचा अधिकार सरकारला आहे. ... आमच्या कायद्यात हस्तक्षेप करायचा अधिकार लोकसभेला नाही, असे कोणतीही जमात म्हणू शकणार नाही. कारण या लोकसभेला तसे संपूर्ण अधिकार आहेत.

शाहा बानोच्यासाठी (अरेरे चूकलो...मुस्लीम मतांसाठी) दोन तिहाय बहूमत असताना (म्हणूनच म्हणा हवेतर) काय कोलांट्या खाल्ल्या सर्वजण जाणतातच.

चर्चेपूर्वी एक मुलभूत शंका

सर्वप्रथम 'सिविल कोड' आणि 'पर्सनल लॉ' हे वेगळे आहेत असा माझा समज आहे*. सध्या असलेला 'सिविल कोड' (समाजात वागायचे नियम) हा बराचसा समान आहे (अपवाद जम्मु-काश्मिर या नंतर व वेगळ्या तहाद्वारे भारतात सामावलेल्या भागाचा). भेद आहे तो केवळ पर्सनल लॉ मधे. तेव्हा 'युनिफॉर्म सिविल कोड' यावा/येऊ नये असे म्हणताना 'युनिफॉर्म पर्सनल लॉ' यावा असे का समजले जाते ते समजत नाही. का माझा समज ( 'सिविल कोड' आणि 'पर्सनल लॉ' हे वेगळे आहेत ) चुकीचा आहे?

*माझ्या समजानूसार पर्सनल लॉमधे एखाद्या व्यक्तीने कोणत्या धर्माप्रमाणे आचरण करावे, कसे लग्न करवे, आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कोणत्या धर्मानूसार करावी, वैयक्तीक आयुष्यात कोणत्या धर्माचे/निधर्माचे संस्कार करावे वगैरे येते. तर सिविल कोड मधे एकमेकांशी वागतानाचे नियम, आर्थिक/सामाजिक (सार्वजनिक)/राजकीय वगैरे व्यवहाराचे नियम वगैरे येते.

बाकी या माहितीपूर्ण धाग्याबद्दल धनंजय यांचे आभार

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

सहमत

+१

हेच म्हणतो.

अभिजीत राजवाडे

किंचित फरक

सध्या असलेला 'सिविल कोड' (समाजात वागायचे नियम) हा बराचसा समान आहे... *माझ्या समजानूसार पर्सनल लॉमधे एखाद्या व्यक्तीने कोणत्या धर्माप्रमाणे आचरण करावे, कसे लग्न करवे, आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कोणत्या धर्मानूसार करावी, वैयक्तीक आयुष्यात कोणत्या धर्माचे/निधर्माचे संस्कार करावे वगैरे येते. तर सिविल कोड मधे एकमेकांशी वागतानाचे नियम, आर्थिक/सामाजिक (सार्वजनिक)/राजकीय वगैरे व्यवहाराचे नियम वगैरे येते.

हे म्हणणे बरोबर असले तरी किंचित फरक आहे. तुम्ही म्हणता त्यामध्ये जास्त "सिव्हिक कोड" (नागरीक शास्त्र) बसेल असे वाटते. सनाका आणि पर्सनल लॉ यामधे जो समान भाग येतो जो वादग्रस्त ठरतो, तो म्हणजे: लग्न, घटस्फोट, मालमत्ता अधिकार (इनहेरीटन्स), दत्तक विधान. त्याच बरोबर समान नागरी कायद्याने धर्मसंस्थांच्या संदर्भात असलेले कायदे देखील समान होतील. आत्ता हिंदू - मुस्लीम - ख्रिश्चन धर्मसंस्थांना असलेली वागणूक यात फरक आहे, तो देखील समान होऊ शकतो. मालमत्ता अधिकारासंदर्भातील हा खटला आणि न्याय रोचक आहे. थोडक्यात सांगायचे तर Section 118 of the Indian Succession Act 1925 नुसार भारतीय (फक्त) ख्रिस्ती व्यक्तीस त्याची / तिची मालमत्ता ही धार्मिक संस्थांना देण्याचा अधिकार नव्हता. तशी देयची असेल तर तसे इच्छापत्र/मृत्यूपत्र हे मरणाच्या आधी १२ महीने तयार करून कायद्याने मान्य असलेल्या ठिकाणी ठेवलेले असले पाहीजे वगैरे... आता सुप्रिम कोर्टाने ते अमान्य करून ख्रिस्ती व्यक्तीसही मालमत्ता स्वेच्छेने देण्याचा हक्क असल्याचे सांगितले आहे तसेच नक्की जवळचे नातेवाईक कोण हे पण स्पष्ट केले आहे. (सगळे वाचले नाही, पण मला वाटते या संदर्भात भाचा-भाचींचे पण मालमत्तेवर अधिकार येत होते, पण ते "जवळचे" धरले गेले नाहीत असे वाटते.). १९२५ साली असा कायदा करताना ब्रिटीश सरकारचे उदेश आणि काळजी काय होती, ते बरोबर होते का नव्हते हा प्रश्न वेगळा पण केवळ धर्मामुळे ख्रिस्ती व्यक्तींना मिळणारे नागरी हक्क हे हिंदू-मुसलमानांपेक्षा वेगळे होते. हा मुद्दा आहे. त्यात "पर्सनल लॉ" चा संबंध नाही. तेच इतर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मानवी हक्क (विशेष करून स्त्रीयांचे हक्क) संदर्भात ठरू शकेल....

त्या व्यतिरीक्त उदाहरण म्हणून हिंदूंचे पर्सनल लॉ कसे ठरवणार? त्यात जर कोणी जातीनिहाय व्यवस्था ही हिंदूंच्या पर्सनल लॉ मधे येते असे म्हणले तर? अशीच उदाहरणे इतर धर्मियांची देखील असू शकतात. म्हणून नागरी कायद्यांमध्ये धर्माची ढवळाढवळ असूच नये, ते घातकच ठरू शकेल, ठरत आले आहे...

-१

समान नागरी कायद्याने धर्मसंस्थांच्या संदर्भातील कायदे समान होतील

प्रत्येक प्रकारच्या संस्थांचे वेगळे नियम आहेत. आर्थिक संस्थांचे, राजकीय संस्थांचे, सामाजिक संस्थांचे वगैरेंचे नियम त्या-त्या क्षेत्राच्यादृष्टीकोनातून बनविलेले असताना केवळ धर्मक्षेत्रातील संस्थांना समानतेच्या नावाखाली त्यांच्यातली अंगभूत वेगळेपण का नाकारावे? एकट्या आर्थिक क्षेत्रात बँकिंग नियम वेगळे, इन्श्युरन्स वेगळे, म्युच्युअल फंड, शेअर्स,इ. प्रत्येक क्षेत्राचे नियम वेगळे आहेत. (ते हवेतच, ते मुळातच वेगळे आहेत, त्यांचे नियम पूर्णतः वेगळे आहेत) तर धर्मक्षेत्रात ते एकच का हवेत (धर्मदेखील मुळातच वेगळे आहेत, त्यांचे आचरण, समजुती, नियम सारे काही वेगळेच आहे)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

-२

एकट्या आर्थिक क्षेत्रात बँकिंग नियम वेगळे, इन्श्युरन्स वेगळे, म्युच्युअल फंड, शेअर्स,इ. प्रत्येक क्षेत्राचे नियम वेगळे आहेत. (ते हवेतच, ते मुळातच वेगळे आहेत, त्यांचे नियम पूर्णतः वेगळे आहेत) तर धर्मक्षेत्रात ते एकच का हवेत (धर्मदेखील मुळातच वेगळे आहेत, त्यांचे आचरण, समजुती, नियम सारे काही वेगळेच आहे)

अर्थसंस्था आणि धर्मसंस्था यातील तुलना गंमतीशीर वाटली पण वास्तवास धरून वाटली नाही. (ढोबळ मानाने) बॅंकामध्ये कर्ज देणे, ठेवी ठेवणे होते, म्युच्युअल फंडात आपल्या वतीने कोणीतरी पैसे अनेक कंपन्यात गुंतवते पण आपण धोका पत्करायला (स्वेच्छेने) तयार असतो, शेअर बाजारात आपणच पैसे एखाद्या कंपनीत पैसे गुंतवत असतो. या प्रत्येक अर्थसंस्थांचे पैसे हाताळणे वेगळे असते - कारण आणि पद्धती...

धर्मसंस्था ह्या विशिष्ठ धर्मपद्धती, देव, संस्कार, इत्यादी मानत असल्या तरी जमीन घेणे, भाविकांकडून पैसा घेणे आणि त्याचा एकतर धार्मिक कारणासाठी अथवा ते + सेवाभावासाठी उपयोग करणे करत असतात. त्यातील पैसा हाताळणे हे धार्मिक काम नसून व्यावहारीक काम आहे जे सर्वांसाठी सारखेच असते. एखाद्याने त्याच्या धार्मिक संस्थेस पैसे द्यावेत का नाही, ते पैसे संस्थाचालकांनी कसे वापरावेत, त्यात जर गैरव्यवहार झाले तर ते कसे हाताळावेत हे काय धर्मग्रंथात अथवा आचरण, समजुती, धार्मिक नियम यांनी प्रत्येकाला वेगळे ठरवायचे का?

वरच्या प्रतिसादात ख्रिश्चनांसंदर्भातील उदाहरण दिले आहेच. ब्रिटीशांना कॅथलीक धर्मसत्तेकडून जमिन आणि पर्यायाने मालमत्ता तयार करण्याबद्दल काळजी होती. त्याला कारण त्यांचे युरोपातील राजकारण होते. त्याशिवाय मृत्यूशय्येवर असताना बाजूला पाद्र्याने बसून भान नसताना काहीतरी म्हणून घेयचे आणि जमीन-संपत्ती चर्चसाठी हडप करायची हे टाळण्याचा उद्देश होता. तो मुद्दा मला देखील पटतो, पण जर इतर धर्मियांना त्यांच्या धर्मसंस्थांना शेवटच्या इच्छेनुसार संपत्ती दान करता येत असेल तर ती (कॅथलीक) ख्रिश्चन धर्मियांना देखील करता आली पाहीजे असे म्हणेन. जर धर्मसंस्था ह्या धर्मसत्ता होण्याची काळजी वाटत असेल तर त्याला समान कायद्याने सर्वांनाच नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.

अंतुल्यांच्या काळात असेच सिद्धीविनायक मंदीराबाबत झाले होते. तेथे सरकारी ट्रस्टी बसवून मंदीराचे आणि पर्यायाने मंदीरातील पैशावर नियंत्रण आणले गेले होते. त्यावेळेस मुंबई सकाळमधील "रविवारच्या दृष्टीक्षेप" या तत्कालीन प्रसिद्ध सदरात माधव गडकरी यांनी, "अंतुल्यांच्या साडूच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी, सिद्धीविनायका तूच सिद्ध हो" असे म्हणत लेख लिहून मोठा गहजब केला होता. (त्यावरून का अशाच अंतुले विरोधी लेखावरून त्यांना हक्कभंग ठरावाला देखील सामोरे जावे लागले होते).

नक्की डिटेल्स माहीत नाही. पण करांच्या संदर्भात दक्षिणेत धंद्यामध्ये तिरूपतीस पण एक षष्टमांश भागिदार समजता येते (आणि कर कमी करता येतो). ह्याला काय म्हणायचे? (कर कसे वापरले जातात, जास्त-कमी, वगैरेचा याच्याशी संबंध नाही. तो वेगळा मुद्दा आहे.)

मुस्लीम संस्था जर वक्फ बोर्डाखाली असल्या तर त्यांना व्यवहार तेच असले तरी वेगळे संरक्षण असते...

धर्म, आचरण, श्रद्धा वगैरे मला सर्व तुमच्यापेक्षाही अधिक मान्य आहे, पण ते व्यक्तीगत- (त्या त्या धर्म/श्रद्धांच्या) सामाजीक पातळीपुरतेच आणि तेथे सर्व संरक्षण, सवलती, आदर वगैरे असणे समजू शकते आणि असावे असेच मी म्हणेन... पण, त्याचा राष्ट्रगाड्याच्या व्यावहारीक जगाशी संबंध असू नये. व्यावहारीक विश्वात व्यावहारीक कायदेच असले पाहीजेत. आमच्या धर्मग्रंथात काय म्हणले आहे, आमच्या प्रेषिताने, देवाने, गुरूने काय म्हणले आहे वगैरेचा संबंध असता कामा नये - सब घोडे बारा टक्के!

-३ :)

एखाद्याने त्याच्या धार्मिक संस्थेस पैसे द्यावेत का नाही, ते पैसे संस्थाचालकांनी कसे वापरावेत, त्यात जर गैरव्यवहार झाले तर ते कसे हाताळावेत हे काय धर्मग्रंथात अथवा आचरण, समजुती, धार्मिक नियम यांनी प्रत्येकाला वेगळे ठरवायचे का?

काही प्रमाणात होय. शिवाय विषय केवळ आर्थिक नव्हे तर अनेकपदरी आहे आहे. सर्व धर्मस्थळांना सारखे नियम अनेक बाबतीत लागु शकत नाहीत.
समजा उद्या जैन मंदिराला कोणी पैसे दिले व त्यांना नियम बनवायचा आहे की कोणत्याही मांसाहार करणार्‍या व्यक्तीला किंवा प्राण्यांची कत्तल करून वस्तुंचे उत्पादन होते अश्या संस्थांना (भले त्या सामाजिक वगैरे असोत) हा पैसा जाणार नाही कारण धर्म तसे करणे नाकारतो
किंवा एखाद्या मंदिराने कायदा केला की त्या मंदीराच्या आवारात गायींच्या मांसाची विक्री करणे (आर्थिक) यास बंदी आहे कारण हिंदू धर्मास ते मान्य नाही किंवा एखाद्या मुसलमान धर्मसंस्थेच्या कार्यक्रमला मद्यविक्रीसंस्थेची देणङी यासाठी नाकारायची आहे की ती संस्था 'धर्मबाह्य' काम करते तर ते नाकारता आले पाहिजे.

तुमचा आक्षेप केवळ आर्थिक गैरव्यवहाराच्या हाताळणीसंबंधी असेल तर माझ्यामते ते नियम अजूनही सर्व धर्मियांच्या संस्थांना समान आहेत. (हा अंदाज / समज- नसल्यास ते का वेगळे आहेत हे समजून मग त्यावर मत व्यक्त करता येईल). मात्र धर्मसंस्थेला दिलेले पैसे कुठे कसे वापरावेत हे मात्र धर्मनिहाय बदलले तर मला फार चुकीचे वाटत नाही. (धर्मसंस्थांद्वारे होणारे मनी लाँडरींग व निवडणूका यांचा जवळचा संबंध आहे हेही मी जाणतो मात्र त्यासाठी धर्मसंस्थांना समान प्रमारे आर्थिक व्यवहार करण्याच्या कायद्याने फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही)

व्यावहारीक विश्वात व्यावहारीक कायदेच असले पाहीजेत. आमच्या धर्मग्रंथात काय म्हणले आहे, आमच्या प्रेषिताने, देवाने, गुरूने काय म्हणले आहे वगैरेचा संबंध असता कामा नये - सब घोडे बारा टक्के!

हे वाक्य काहीवेळा अन्यायकारक वाटतं. उद्या मी माझ्या धर्मदाय संस्थेद्वारे अनेक स्पर्धांचे आयोजकत्त्व करतो आहे मात्र मला 'धर्म म्हणतो' म्हणून मी गायींला हलाल करणार्‍या संस्थेचे प्रायोजकत्त्व असल्यास 'केवळ धार्मिक' कारणाने (माझा धर्म म्हणतो म्हणून) मी माझे प्रायोजकत्त्व रद्द करण्याचा मला हक्क असलाच पाहिजे नाहि का? जर माझी घोषित (रजिस्टर्ड) धर्मदाय संस्था आहे तर माझे पैसे कसे वापरणार हे ठरण्यासाठी मी धार्मिक आधार घेतल्यास मला चुकीचे वाटणार नाही.

--फारतर "धर्मसंस्था कशास म्हणवे" याचा क्रायटेरीया युनिफॉर्म करता येईल असे वाटते.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

गैरसमज

मुद्दा खूप साधा आहे आणि तो बौद्धिक हक्कांविषयी आहे असे मला वाटते.
स्पायडरमॅनच्या चाहत्यांच्या क्लबचे सदस्यत्व हवे असल्यास व्यक्तीने कायकाय करावे/करू नये ते ठरविण्याचा हक्क मार्वलला असू शकतो. आयबो कुत्र्याला कायकाय शिकवावे त्यावर सोनी निर्बंध घालू शकते. आजच बातमी आली आहे की, वानखेडे क्रीडांगणात शिरण्यावर शाहरूख खानला कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहे (किती दिवस टिकेल ते मला माहिती नाही).
मात्र, गणपती फॅन क्लबचे सदस्यत्व खुले आहे, गणपतीला रोज कोणता नेवैद्य ठेवला तरच गणपती फॅन क्लबचे सदस्यत्व मिळेल ते कोणीही ठरवू शकत नाही. त्याचप्रमाणे, महंमद फॅन क्लबच्या सदस्य स्त्रीने घटस्फोटित पतीकडून पोटगी मागू नये असे वक्फ बोर्डाने किंवा देवबंदने ठरवू नये असा आमचा युक्तिवाद आहे.

स्वातंत्र्य

मात्र, गणपती फॅन क्लबचे सदस्यत्व खुले आहे, गणपतीला रोज कोणता नेवैद्य ठेवला तरच गणपती फॅन क्लबचे सदस्यत्व मिळेल ते कोणीही ठरवू शकत नाही. त्याचप्रमाणे, महंमद फॅन क्लबच्या सदस्य स्त्रीने घटस्फोटित पतीकडून पोटगी मागू नये असे वक्फ बोर्डाने किंवा देवबंदने ठरवू नये असा आमचा युक्तिवाद आहे

हा उपरोध नाही अश्या गृहितकावर हा प्रतिसाद आहे.
गणपती फॅन क्लबचे सदस्यत्व खुले आहे. ही माहिती चुकीची आहे. भारतीय संविधानात 'गणपती फॅन क्लबचे' सभासदत्त्व इतर कोणत्याही क्लबचे सभादत्त्व न घेतलेल्यांना आपोआप मिळते. याचा अर्थ इतर क्लबचे सभादत्त्व असलेल्यांना या क्लबचे सभासदत्त्व मिळत नाही. या क्लबच्या मंडळींनी आपणहूनच ठरवले आही की कोणते बोर्ड / संस्था नको कारण तसा 'एकाधिकार' त्या क्लबमधे अस्तित्त्वातच नाही. याउलट महंमद फॅन क्लबच्या अंतर्गत महंमदवाणीचा एकाधिकार चालतो. जसे गणपती फॅन क्लब (खरे तर हे नावही वादग्रास्त आहे, नास्तिकांनाही इथे प्रवेश आहे, अन्य क्लबात तसे नाही पण ते जाऊ द्या अवांतर म्हणून) मधील सभासदांना देवबंदची सक्ती होता कामा नये तसेच महंमद फॅन क्लब वाल्यांनाच हवी म्हणून ती सक्ती असावी. उगाच पोटदुखी कशाला? ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

खुलासा

याचा अर्थ इतर क्लबचे सभादत्त्व असलेल्यांना या क्लबचे सभासदत्त्व मिळत नाही.

त्याविषयी वाद नाही. परंतु, स्वतःला हिंदू म्हणविण्यासाठी कोणाचेही स्वीकारपत्र मिळवावे लागत नाही. दुसर्‍या क्लबचे सदस्य कधीही या क्लबात येऊ शकतात.

याउलट महंमद फॅन क्लबच्या अंतर्गत महंमदवाणीचा एकाधिकार चालतो.

छे छे! महंमदवाणी काय ते अधिकृतपणे ठरविणारी कोणतीही संस्था नाही.

महंमद फॅन क्लब वाल्यांनाच हवी म्हणून ती सक्ती असावी.

ते स्वेच्छेने तसे करू शकतात परंतु दोन व्यक्तींच्या व्यवहारात दोन्ही व्यक्तींची अनुमती आवश्यक आहे. त्यांच्या पत्नीची अनुमती नसल्यास ती स्वतःला मुस्लिम म्हणवू शकेल परंतु देवबंदचे निर्णय तिच्यावर बंधनकारक ठरू नयेत.

नाही

>>दुसर्‍या क्लबचे सदस्य कधीही या क्लबात येऊ शकतात

नाही. या क्लबचे सदस्यत्व फक्त (सदस्याच्या कुटुंबात झालेल्या) जन्माने मिळते.

नितिन थत्ते

?

नाही समजले

दुसर्‍या क्लबचे सदस्य कधीही या क्लबात येऊ शकतात.

जोपर्यंत ते दुसर्‍या क्लबमधे आहेत तोपर्यंत ते या क्लबमधे येत नाहीत. हिंदू होण्यासाठी अन्य सर्व धर्माचा त्याग केला असला पाहिजे (हिंदू धर्माचा स्वीकार करा अथवा न करा). एकदा का इथे आलात की केवळ हिंदूंसाठीची हिंदू कोड बिले आहेतच.

महंमदवाणी काय ते अधिकृतपणे ठरविणारी कोणतीही संस्था नाही.

सहमत आहे. मात्र मुस्लिम धर्माचरण करणार्‍यांचे 'पर्सनल लॉ' "रेकमेंड" करायला मुस्लिक पर्सनल लॉ बोर्ड आहे. देवबंद वगैरे कायद्याच्या दृष्टीने बाद.

ते स्वेच्छेने तसे करू शकतात परंतु दोन व्यक्तींच्या व्यवहारात दोन्ही व्यक्तींची अनुमती आवश्यक आहे. त्यांच्या पत्नीची अनुमती नसल्यास ती स्वतःला मुस्लिम म्हणवू शकेल परंतु देवबंदचे निर्णय तिच्यावर बंधनकारक ठरू नयेत

हे नाही कळले. पुढील प्रतिसात टँजटमधे असु शकतो कारण मुळातले स्टेटमेंटच कळलेले नाही.
दोन व्यक्तींच्या व्यवहारात दोन्ही व्यक्तींची अनुमती आवश्यक आहे. मात्र ही अनुमती कायद्याच्या बाहेर असु शकत नाही. जरी उद्या एखाद्या हिंदू पुरुषास दोन स्त्रीयांना पत्नी ठेवायचे आहे व ते दोघांसही मंजूर आहे तरी हिंदु मॅरेज ऍक्ट नुसार ते बेकायदेशीरच आहे. (तक्रार केल्यास दुसरे लग्न रद्द होऊ शकते) . तेव्हा "हिंदू मॅरेज ऍक्ट"खाली लग्न केलेल्यांवर निर्णय बंधनकारक आहेत

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

होय

हिंदू होण्यासाठी अन्य सर्व धर्माचा त्याग केला असला पाहिजे (हिंदू धर्माचा स्वीकार करा अथवा न करा). एकदा का इथे आलात की केवळ हिंदूंसाठीची हिंदू कोड बिले आहेतच.

याविषयीही वाद नाही. मुद्दा असा आहे की एखाद्या व्यक्तीने स्वतःला विशिष्ट धर्माचे म्हणविण्यासाठी कायकाय करणे आवश्यक आहे ते इतर कोणीही ठरवू शकत नाही. स्वतःला हिंदू म्हणविण्यासाठी कोणत्याही नियमांचे पालन करणे आवश्यक नसते. त्याचप्रमाणे देवबंदचे नियम झुगारणार्‍या व्यक्तीसही स्वतःला मुस्लिम म्हणविण्याची अनुमती मिळावी इतकेच माझे प्रतिपादन आहे.

मुस्लिम धर्माचरण करणार्‍यांचे 'पर्सनल लॉ' "रेकमेंड" करायला मुस्लिक पर्सनल लॉ बोर्ड आहे. देवबंद वगैरे कायद्याच्या दृष्टीने बाद.

नव्हे! विकिपीडियानुसार, Within the Board, Shias were a minority, as are the Barelvi Sunnis, with the Deobandi Sunnis dominating the Board.

जरी उद्या एखाद्या हिंदू पुरुषास दोन स्त्रीयांना पत्नी ठेवायचे आहे व ते दोघांसही मंजूर आहे तरी हिंदु मॅरेज ऍक्ट नुसार ते बेकायदेशीरच आहे. (तक्रार केल्यास दुसरे लग्न रद्द होऊ शकते) . तेव्हा "हिंदू मॅरेज ऍक्ट"खाली लग्न केलेल्यांवर निर्णय बंधनकारक आहेत

तो तीन व्यक्तींदरम्यानचा व्यवहार आहे आणि तिघांचीही अनुमती असल्यास शक्य आहे असे मला वाटते. किमान, तो सध्या तसा नसला तरी तो तसा अनुमत होणे योग्य ठरेल अशी माझी भूमिका आहे.

तुम्ही-मी का सांगायचे?

स्वतःला हिंदू म्हणविण्यासाठी कोणत्याही नियमांचे पालन करणे आवश्यक नसते. त्याचप्रमाणे देवबंदचे नियम झुगारणार्‍या व्यक्तीसही स्वतःला मुस्लिम म्हणविण्याची अनुमती मिळावी इतकेच माझे प्रतिपादन आहे.

तेच सांगतोय. हे तुम्ही-मी का सांगायचे? देवबंद झुगारण्याची अनुमती असावी हे तरी 'इतरांनी' का सांगायचे? ते मुसलमानांनी (अर्थात बहुसंख्येने)ठरवायचे. जर उद्या बहुसंख्य हिंदूंना, हिंदू म्हणवून घेण्यासाठी काहि नियम ठेवायचे असतील तर त्यासाठी त्यांनीही हिंदू कोड बिले बदलावीत. त्याविरूद्ध इतर धर्मियांनी ढवळाधवळ करू नये.

तो तीन व्यक्तींदरम्यानचा व्यवहार आहे आणि तिघांचीही अनुमती असल्यास शक्य आहे असे मला वाटते

दोघांचीही अनुमती म्हटलो ते दोन्ही पत्न्नींची! जोपर्यंत दुसरीपत्नी तक्रार करत नाही तोपर्यंत हे शक्य असते. मात्र तक्रार केल्यास हे बेकायदेशीर आहे. तसेच मुस्लिमांमधेही पाचव्या पत्नीबाबत आहे. तक्रार करेपर्यंत / आक्षेप घेईपर्यंत सक्ती नाही

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

?

ते मुसलमानांनी (अर्थात बहुसंख्येने)ठरवायचे. जर उद्या बहुसंख्य हिंदूंना, हिंदू म्हणवून घेण्यासाठी काहि नियम ठेवायचे असतील तर त्यासाठी त्यांनीही हिंदू कोड बिले बदलावीत. त्याविरूद्ध इतर धर्मियांनी ढवळाधवळ करू नये.

पुन्हा सांगतो, एका हिंदूने स्वतःला हिंदू म्हणविण्यासाठी कायकाय करावे ते बाकी हिंदूंचे बहुमत ठरवू शकत नाही. ती खाप पंचायत होईल.

दोघांचीही अनुमती म्हटलो ते दोन्ही पत्न्नींची! जोपर्यंत दुसरीपत्नी तक्रार करत नाही तोपर्यंत हे शक्य असते. मात्र तक्रार केल्यास हे बेकायदेशीर आहे. तसेच मुस्लिमांमधेही पाचव्या पत्नीबाबत आहे. तक्रार करेपर्यंत / आक्षेप घेईपर्यंत सक्ती नाही

पहिल्या पत्नीची अनुमती असल्यास हिंदूला दुसरा विवाह करता येतो असा उल्लेख हिंदू विवाह कायद्यात मला सापडला नाही.
तशी तरतूद असली तरी त्या मुद्याविषयी माझी काही असहमती नाही.

ठरवू शकतातच

अरेच्या! मी इथे भला मोठा प्रतिसाद दिला होता. तो उडाला किंवा प्रकाशितच झाला नाही कोण जाणे. त्यात उडण्यासारखे काहि नव्हते. असो. पुन्हा इतके टंकत बसत नाही. गोषवारा देतो

पुन्हा सांगतो, एका हिंदूने स्वतःला हिंदू म्हणविण्यासाठी कायकाय करावे ते बाकी हिंदूंचे बहुमत ठरवू शकत नाही. ती खाप पंचायत होईल.

का नाही? ते ठरवू शकताच. किंबहुना ते 'भारतातील हिंदूंच्या' बहुमतानेच ठरवलेले आहे, की कोणताही क्रायटेरीया नाही.
खाप पंचायत हे फारच कच्चे उदाहरण दिलेत. खाप हे काही 'भारतातील हिंदूंचे' बहुमत नव्हे. भारतीय हिंदूंना लागू असणारा (मते पर्सनल लॉ पुरती) कायदा भारतीय हिंदूंच्या बहुसंख्येने मान्य केलेला असावा. त्यात इतरांनी डोके घालु नये. जर उद्या 'भारतातील' बहुसंख्य हिंदूंनी 'हिंदू असण्याचा' क्रायटेरिया ठरवला (हिंदू कोड बिले) तर ते योग्यच होईल (आणि मला मान्य असेल). अन्य धर्मियांनी कोणत्याही इतर धर्मांच्या 'पर्सनल लॉ' मधे ढवळाढवळ करू नये.

पहिल्या पत्नीची अनुमती असल्यास हिंदूला दुसरा विवाह करता येतो असा उल्लेख हिंदू विवाह कायद्यात मला सापडला नाही.

तसा कायदा नाही. किंबहूना हे बेकायदेशीर असल्याचे वर म्हटले आहे. मात्र तिघांपैकी एकाने (बहुदा केवळ पहिल्या पत्नीस तो हक्क आहे) तक्रार नोंदवल्याशिवाय शासन/पोलिस त्यात (सुओ-मोटो) लक्ष घालत नाहीत.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

असहमत

का नाही? ते ठरवू शकताच. किंबहुना ते 'भारतातील हिंदूंच्या' बहुमतानेच ठरवलेले आहे, की कोणताही क्रायटेरीया नाही.

ते त्यांनी हिंदू म्हणून नव्हे तर भारताचे नागरिक म्हणून ठरविलेले आहे.

अन्य धर्मियांनी कोणत्याही इतर धर्मांच्या 'पर्सनल लॉ' मधे ढवळाढवळ करू नये.

हिंदू कोड बिल हिंदूंनी ठरविलेले नाही तर सर्व भारतीय नागरिकांच्या (प्रतिनिधींच्या) बहुमताने ठरलेले आहे, त्यात इतर धर्मियांची ढवळाढवळ आहेच. त्यामुळे, मुस्लिमांच्या आयुष्याच्या नियमनातही सर्वच नागरिकांचे बहुमत लक्षात घेणे आवश्यक आहे.
मुळात, मुस्लिम स्त्रियांवर अन्याय करण्यापासून मुस्लिम पुरुषांना रोखणे ही ढवळाढवळ कशी?

किंचित अवांतर

वरील चर्चा प्रतिसाद वाचताना एक प्रश्न डोक्यात आला... त्याचे घटने/कायद्याप्रमाणे काय उत्तर असेल?

जर मी भारतात सरकारी फॉर्म भरताना हिंदूएतर धर्मिय नसेन तर बाय डिफॉल्ट हिंदू समजून हिंदू लिहू शकतो, कोणा धर्ममार्तंडाची परवानगी लागणार नाही. पण कोणा क्लर्गी (मुल्ला, प्रिस्ट, रॅबाय्) ची परवानगी न घेता मी स्वतःला मुस्लीम/ख्रिश्चन अथवा ज्यू असे जाहीर करू शकतो का? का सिद्ध करावे लागेल?

लिहिता येईल असे वाटते

घटनेच्या २५व्या कलमाच्या पहिल्या भागानुसार तरी असे वाटते. (धर्म निवडण्याचा/बदलण्याचा हक्क व्यक्तीकडे आहे. धर्मगुरूकडे प्रचार करण्याचा हक्क आहे, पण बदलण्याचा/ठरवण्याचा हक्क व्यक्तीकडेच आहे, अशी स्पष्टीकरणात्मक चर्चा या कलमाच्या प्रसंगी कॉन्स्टिट्युएन्ट असेंब्लीमध्ये झाली होती.)

विलंब होतो आहे, क्षमस्व

चर्चाप्रस्ताव सुरू करणार्‍या सदस्याने चर्चेत भाग घेणे अपेक्षित असते. पण मला विलंब होत आहे, क्षमस्व.

"लांगूलचालन" म्हणजे काय?

श्री. निखिल जोशी यांनी आपल्या अतिशय मिताक्षर प्रतिसादात "लांगूलचालन" असा शब्द वापरला आहे :

हिंदू-कोड-बिल इतर धर्मियांना लागू करण्याची भाषा अव्यवहार्य आहे.

लांगूलचालन.

हा शब्द मी यापूर्वी ऐकला आहे. त्याचा रूपकात्मक अर्थ असा काही मी जाणत असे :
कुत्र्याने मालकाने विशेष आदेश केला नसतानाही मालकाला खुश करण्यासाठी शेपटी हलवणे.
हा अर्थ येथे नीट लागत नाही. या ठिकाणी आंबेडकरांचा मालक कोण होता? या मालकीबाबत ऐतिहासिक साधनांत काही आधार सापडतो काय?
मालक सापडला म्हणा, तरी "व्यवहार्य नाही" असे म्हणणे खोटे आहे, आणि मालकास खुश करण्याकरिता आंबेडकर निरर्थक आणि खोटे बोलले, असे म्हणणे आहे काय?
(१) आंबेडकर ज्यास अव्यवहार्य म्हणतात, ते व्यवहार्य होते आणि (२) आंबेडकरांना हे व्यवहार्य आहे असे माहीत होते, हे दोन्ही मुद्दे खरे असण्याकरिता इतिहासातल्या साधनात काय आधार मिळतो?

अथवा "लांगूलचालन" शब्दाचा दुसरा काही अर्थ असेल.

अति मिताक्षरतेमुळे श्री. निखिल जोशी यांचा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होत नाही.

- - -

त्याच प्रमाणे "मधाचे बोट" हा वाक्प्रचार. "लहान मुलाला त्याला हवे ते सर्व न देता, निरुपयोगी आणि अशी तात्पुरती वस्तू देऊन गप्प बसवणे" असे काहीसे रूपक असावे. येथे आंबेडकर बोळवण करू बघणारे लहान मूल म्हणजे कुठली ऐतिहासिक व्यक्ती/संस्था/समाज आहे? २५व्या कलमाच्या दुसर्‍या उपकलमाचे उद्धरण आंबेडकरांनी केलेले आहे : "आमच्या कायद्यात हस्तक्षेप करायचा अधिकार लोकसभेला नाही, असे कोणतीही जमात म्हणू शकणार नाही."
हे उपकलम अजूनही घटनेत शाबूत आहे. (१९५१ मध्ये हे उपकलम तात्पुरते आहे, असा आंबेडकरांचा गैरसमज असून, त्यांनी ते तात्पुरते समोर केले, असे काही ध्वनित आहे काय?)
या सर्व गोष्टी संदिग्ध असताना "मधाचे बोट" या रूपकाने पुरेसे स्पष्टीकरण होत नाही.

- - -

सरकारला न्याय्य वाटणारा कायदा लादणे म्हणजे धर्म नष्ट करणे असेल तर त्याचा अर्थ असा की डॉ आंबेडकर हिंदू धर्माला नष्ट करू इच्छित होते.

?
आंबेडकरांच्या अन्य लेखनातून कदाचित असे दिसत असेल. जातिव्यवस्था ही हिंदू धर्मात इतकी घट्ट रोवलेली आहे, की ती नष्ट केली तर हिंदू धर्म मुळापासून नष्ट होईल, असे काहीसे उद्गार शोधून कदाचित सापडतील. परंतु घटनेच्या अंतर्गत किंवा हिंदू कोडबिलाच्या अंतर्गत हिंदू धर्म नष्ट करण्याची त्यांची इच्छा क्रियाशील झाल्याचा काय आधार आहे? धर्माच्या बाबतीत काही प्रमाणात हस्तक्षेप करणे म्हणजे धर्म नष्ट करणे नव्हे, असे आंबेडकरांचे स्पष्ट मत त्यांच्या युक्तिवादात दिसते. "धर्माचा काही भाग बदलला तर धर्म नष्ट होतो" असे श्री. निखिल जोशी यांचे गृहीतक असल्याशिवाय त्यांच्या वाक्याचा अर्थ लागत नाही. असे गृहीतक असल्यास आंबेडकरांचे मत असंगत होते, खरे. पण इतिहासात मात्र धर्मांचे भाग बदलल्याची उदाहरणे खूपच आहेत. उलट कुठलाही भाग मुळीच न बदललेल्या धर्मांची उदाहरणे मला माहीत नाही. त्यामुळे श्री. निखिल जोशी यांचे गृहीतक मला स्वयंस्पष्ट भासत नाही. कदाचित "धर्म" म्हणजे कुठलाही-भाग-न-बदलणारे असे लोकविलक्षण काहीतरी त्यांना अभिप्रेत असेल. पण तसेही नाही, कारण "हिंदू", "मुसलमान" वगैरे प्रकार, विशेषकरून आंबेडकरांना अभिप्रेत असलेले "हिंदू" हे त्यांच्या "धर्म"शब्दाच्या व्याख्येत बसतात.
असे असल्यामुळे त्यांचे वाक्य मला समजलेले नाही.

खुलासा

या मालकीबाबत ऐतिहासिक साधनांत काही आधार सापडतो काय?

माहिती नाही, आवश्यकता वाटत नाही. एक स्वतंत्र विधान म्हणून पहावे ही विनंती.

दोन्ही मुद्दे खरे असण्याकरिता इतिहासातल्या साधनात काय आधार मिळतो?

खोटे असण्यासाठी काय आधार आहे? मुस्लिम जमात दंगली करेल, इ. भीतीमुळे सनाका व्यवहार्य नसेल तर मग समान नागरी कायद्यासाठीची बेगडी कटिबद्धता तरी का व्यक्त करावी? "मुस्लिम नेते वाईट्ट असल्यामुळे आमचा नाईलाज आहे, अन्यथा मुस्लिम पुरुषांना विशेष सवलत देणे चूकच आहे" अशी दीन भाषा करण्याऐवजी "अव्यवहार्य आहे" अशी मोघम भाषा का?
मुस्लिम नेत्यांच्या समर्थनाशिवाय सरकार पडण्याची भीती त्या काळात नव्हती त्यामुळे, लांगूलचालन ऐवजी पुळका असा शब्द चालणार असेल तर मला मान्य आहे.

या सर्व गोष्टी संदिग्ध असताना "मधाचे बोट" या रूपकाने पुरेसे स्पष्टीकरण होत नाही.

कागदोपत्री तरतूद करून पुरोगामींचे तोंड बंद करावयाचे परंतु, प्रत्यक्ष निर्णय घेताना त्याच्या विपरित निर्णय घ्यायचे या धोरणाला मी मधाचे बोट संबोधिले आहे.

धर्माच्या बाबतीत काही प्रमाणात हस्तक्षेप करणे म्हणजे धर्म नष्ट करणे नव्हे, असे आंबेडकरांचे स्पष्ट मत त्यांच्या युक्तिवादात दिसते.

"समान नागरी कायदा मुस्लिमांवर लादण्याची सक्ती सरकार करू इच्छित नाही कारण सरकार एखादा धर्म (=इतर धर्माचा कायदा=हिंदू कोड बिल) जनतेवर लादू शकत नाही व म्हणून सरकार धार्मिक भावना दुखविणार नाही. सनाका लादणे म्हणजे निधर्मी राज्याने त्यांचा धर्म नष्ट करणे ठरेल." असा अर्थ मला दिसतो कारण, 'मुस्लिमांवर सनाका लागू करणे शक्य नाही' या मताआधी "निधर्मी राज्य धर्म नष्ट करू पाहात नाही. त्याचा अर्थ एवढाच की सरकार एखादा धर्म जनतेवर लादू शकत नाही व म्हणून सरकार धार्मिक भावना दुखविणार नाही." असे विधान आहे. तसा अर्थ काढणे चूक आहे काय?

 
^ वर