भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

भारत-पाक मैत्रीसाठी हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज!

लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती. मग ते ती कशी सोडतील?

या दिवशी मी भारतात होतो व या भेटीचे वृत्त देणार्‍या एका भारतीय चित्रवाणीवर हमीद मीर नावाच्या एका सुप्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकाराची घेतली जाणारी मुलाखत पहात होतो. भारतीय वृत्तनिवेदिकेने भारताच्या दृष्टीने महत्वाचा पण मीर यांना अडचणीत टाकणारा एक प्रश्न विचारला. तिने विचारले कीं पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ही हाफीज महंमद सईद याला गुप्तपणे समर्थन् देवून त्याचा भारताविरुद्धच्या कारवायांत एक शस्त्र म्हणून वापरत आहे हे खरे आहे ना? या प्रश्नाचे थेट "होय" किंवा "नाहीं" असे उत्तर न देता मीरसाहेबांनी नेहमीप्रमाणे अमेरिकेला दोष दिला. "सोविएत संघराज्याने अफगाणिस्तानचा ताबा घेतलेला असताना त्यांना हुसकून काढण्य़ासाठी CIA या अमेरिकन गुप्तचर संघटनेने मुजाहिदीनना (म्हणजेच अतिरेक्यांना) मदत केली होती" अशी कोल्हेकुईच त्यांनी केली!

हे उत्तर ऐकून मी तर थक्कच झालो! लहान मुले घाबरली कीं जशी आईच्या पदराआड लपतात तशी या नामांकित पत्रकाराला अशी CIA च्या "पदरा"आड लपायची काय गरज होती? रेगन यांनी अमेरिकन हितसंबंधांच्या फायद्यासाठी झियांना उद्युक्त केले होतेच, पण झियांना त्यांचे ऐकायची काय गरज होती? आणि झियांनी एकदा पाकिस्तानच्या (किंवा स्वत:च्या वैयक्तिक) हितांसाठी रेगन यांचे ऐकायचे ठरविले असेल तर त्याबद्दल अमेरिकेला आता कशाला दोष द्यायचा? अगदी हुबेहूब अशीच कारवाई ९/११ नंतर मुशर्रफ यांनीही केली होती व आज तेही अमेरिकेलाच दोष देतात. पण अमेरिकेची साथ देण्याचे त्यांच्यावर मुळीच बंधन नव्हते.

अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी आणि स्वत:चे खिसे भरण्यासाठी हे पाकिस्तानी नेते डोळे उघडे ठेऊन अमेरिकेच्या कच्छपी लागले मग आता अमेरिकेला दोष कशाला? अशा धोरणामुळे पाकिस्तानने स्वत:ला एकाद्या भाडोत्री गुलामाच्या पातळीवर उतरविले आहे हे नक्की. पकिस्तान आज कुठल्याही सदसद्विवेकबुद्धीच्या टोचणीकडे दुर्लक्ष करून अशी कुणाचीही युद्धे "चार कवड्या खिशात पडाव्यात" म्हणून लढत आहे हेच चित्र डोळ्यासमोर उभे रहाते! खरे तर मीरसाहेबांनी या संधीचा उपयोग करून घेऊन हे खरे पण काळेकुट्ट चित्र लोकांसमोर ठेवायला हवे होते.

पाकिस्तान जोपर्यंत आपला खर्च स्वत: कमावलेल्या पैशातून करत नाहीं आणि जोवर तो अमेरिकेच्या (आणि आता चीनच्याही) मदतीवर अवलंबून रहातो तोपर्यंत तिची परिस्थिती आज आहे तशीच राहील किंवा ती आणखीच बिघडेल.

पाकिस्तानचे मुलकी सरकार जेंव्हां आपले सरकार पूर्णपणे स्वत:च्या हिमतीवर करेल, आपल्या सैन्याला त्यांच्या बराकीत पाठवेल, मुल्ला-मौलवींना मशीदींत किंवा मद्रासांत पाठवेल व त्यांच्या कारवाया धर्मापुरत्याच मर्यादित करेल आणि लष्कराच्या दादागिरीविरुद्ध हिमतीने उभे राहून देशाचा कारभार पाकिस्तानी जनतेच्या हितासाठी आणि भरभराटीसाठी हाकेल तेंव्हांच पाकिस्तानचा उत्कर्ष होईल. भारत अशा बदलाची आशेने वाट पहात आहे आणि हे बदल शक्य व्हावेत म्हणून लागेल ती मदत भारत नक्कीच करेल यात शंका नाहीं.

"जकार्ता पोस्ट" या येथील इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या (http://www.thejakartapost.com/news/2012/04/10/letter-why-hide-behind-cia...) माझ्या याच अर्थाच्या पत्राला फराज आणि पीटर या दोन वाचकांनी दिलेला प्रतिसाद खालील दुव्यावर वाचता येईल.

http://www.thejakartapost.com/news/2012/04/12/letter-on-pakistan-and-ind... .

खरे तर माझ्या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदातील माझ्या पाकिस्तानबद्दलच्या मित्रत्वाच्या भावना त्यांच्या लक्षातच आलेल्या दिसत नाहींत. भारत व पाकिस्तान हे "स्वाभाविक भाऊ-भाऊ" असून त्यांनी आपापसातले मतभेद मिटवून प्रगतीच्या आणि भरभराटीच्या मार्गाने पुढील प्रवास करावा या माझ्या भावना त्यांना जाणविल्याच नाहींत असे खेदाने म्हणावेसे वाटते. याच भावनेपोटी मी "भारताला शत्रू समजणे पाकिस्तानी जनतेने थांबवावे" या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याची तरफदारी मी माझ्या "जकार्ता पोस्ट"मधील पत्रात केली होती. (http://www.thejakartapost.com/news/2011/05/27/letter-india-pakistan-have...) सध्याचे मुलकी सरकार भारताशी मैत्रीचे संबंध स्थापण्यास उत्सुक आहे पण ज्या लष्कराची खोटी ऐट भारताबरोबरच्या शत्रुत्वावरच अवलंबून आहे व ज्या लष्कराला (त्याने अद्याप एकही युद्ध जिंकले नसूनही) स्वत:ला "पाकिस्तानचे पालनहार" असे म्हणवून घेताना कसलाच संकोच वाटत नाहीं असे हे पाकिस्तानी लष्कर व त्याची गुप्तचर संघटना (ISI) भारतची आणि पाकिस्तानची मैत्री सद्य परिस्थितीत कदापीही होऊ देणार नाहीं.

जरदारी आणि नवाज शरीफ हे दोघेही पाकिस्तानचे द्रष्टे नेते आहेत. पण स्वत:ला रोमेल किंवा गुडेरियन[१] समजणार्‍या पाकिस्तानी लष्करशहांना भारताबरोबरचे वैर चालूच ठेवावेसे वाटते. पाकिस्तानी लष्करशहांच्या व अतिरेक्यांच्या हस्ते जरदारींनी खूप सोसले आहे. पाकिस्तानी लष्करशाहांनी जरदारींना अनेक वर्षें कैदेत टाकले होते तर त्यांच्या पत्नी बेनझीर यांचा तर अतिरेक्यांच्या गोळीने मृत्यू घडला. जरदारी हे एक चांगल्या स्वभावाचे गृहस्थ वाटतात. २६/११ च्या "मुंबई शिरकाणा"नंतर जरदारींनी आपल्या ISIच्या मुखियाला त्या शिरकाणाचा नीट तपास करून, त्यामागच्या पाकिस्तानी हस्तकांना वेचून काढून शिक्षा करविण्यासाठी दिल्लीला जायची आज्ञा दिली होती. पण त्याने ही आज्ञा धुडकावून लागली असावी कारण जरदारींना त्याबद्दल मखलाशी करून आपली आज्ञा बदलावी लागली होती. पाकिस्तानमध्ये खरोखर राज्य कोण करतो याची कल्पना मात्र या घटनेवरून सार्‍या जगाला पुन्हा एकदा दिसली.

इतकेच काय पण ISI चे त्यावेळचे मुखिया पाशा यांनी सध्या सुरू असलेल्या कुप्रसिद्ध "मेमोगेट" प्रकरणात आपल्या सांविधानिक बॉस असलेल्या जरदारींचा हात होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारची परवानगी न घेता लंडनला भरारी मारली होती! जय हो!

पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी मुलकी सरकार किती दिवस टिकेल हे त्यांचा सेनाप्रमुख ठरवतो तर आपल्याकडे आपले संरक्षणमंत्री आपल्याच सेनाप्रमुखाच्या वयाचे भूत विनाकारण उभे करून त्यांना एक वर्ष आधीच सेवानिवृत्त करतात. किती फरक आहे या दोन देशांत!

अमेरिकेच्या CIA संघटनेने अमेरिकेच्या राष्ट्रीय हितापोटी पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने अतिरेकी कारवायांना मदत देऊ करून एक विषवृक्ष लावला यात शंका नाहीं. जुल्फिकार अली भुत्तोंना लुटपुटीच्या खटल्याच्या आधाराने फासावर चढविलेल्या झियाला अख्या जगात कुणीही चाहता उरला नव्हता! म्हणून त्यांने या संधीचा फायदा घेऊन आपली प्रतिमा उजळ करून घेतली व रेगन यांच्या मांडीला मांडी लावून "व्हाईट हाऊस"मध्ये पुख्खाही झोडला! शिवाय स्वत:ची सत्ता बळकट करण्यासाठी झियाने लष्करातील व लष्कराबाहेरील धर्मवेड्या जिहादी वृत्तीच्या अतिरेक्यांना जवळ करून पाकिस्तानी राजकारणात प्रथमच धर्म आणला. यामुळेच आज झिया हे पाकिस्तानातील सर्वात जास्त तिरस्कृत नेते मानले जातात!

आज हेच अतिरेकी आपल्या जन्मदात्या ISI च्या मुख्यालयांवर हल्ला करायला मागे-पुढे पहात नाहींत!

माझ्या "एक्सपोर्ट सरप्लस" या शीर्षकाच्या जकार्ता पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात मी हाच मुद्दा अधोरेखित केलेला आहे. (http://www.thejakartapost.com/news/2009/12/15/letters-export-surplus039....) ISIच्या मुख्यालयावरील हल्ला आणि मेहरान नाविक तळावरील अतिरेक्यांचा हल्ला ही याचीच उदाहरणे आहेत!

अफगाणीस्तानातील युद्ध थांबल्यावर मुशर्रफ यांनी याच प्रशिक्षण मिळालेल्या, कडव्या जिहादींना जम्मू-काश्मीर विभागात मोकाट सोडले व आपल्या सैन्याला खूपच हैराण केले. या बद्दलचा वृत्तांत Nuclear Deception या पुस्तकात वाचायला मिळेल. (मी हे पुस्तक कोळून प्यालेलो आहे!)

हाफिज सईद ही आता एक "व्यक्ती" राहिली नसून ती एक "विचारसरणी" झालेली आहे व तिने पाकिस्तानचा संपूर्ण विनाश करण्याआधी पाकिस्तानने स्वत:च त्या विचारसरणीचा कायदेशीर मार्गाने विनाश करायची गरज आहे. त्यासाठी भारताकडे पुरावे मागणे हास्यास्पद आहे. भारताच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता म्हणून जरी भारत त्याला शिक्षा करण्याची मागणी करत असला तरी स्वत:च्या हितासाठी अशा व्यक्तीलाच नव्हे तर या विचारसरणीला मुळापासून उपटून टाकण्याची पाकिस्तानलाच गरज आहे. पण लष्कराचा भक्कम पाठिंबा असलेल्या सईदला बोट लावायचीही हिंमत पाकिस्तानचे मुलकी सरकार दाखवेल असे वाटत नाहीं.

शेवटी राहिला पाकिस्तानने भारताला "सर्वात जास्त प्राधान्य असलेला देश (Most Favoured Nation or MFN)" हा दर्जा देण्याबाबतचा करार. हा दर्जा भारताने पाकिस्तानला १९९६ सालीच देऊ केलेला आहे! पण पाकिस्तानला आतापर्यंत तो स्वीकारायचा धीर होत नव्हता कारण त्यांना पाकिस्तानी बाजारपेठ भारतीय मालाने भरून जाईल व पाकिस्तानच्या उद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती वाटत होती. पण आज या दोन देशातील चलनाच्या (१ डॉलरला ९१ पाकिस्तानी रुपये विरुद्ध ५१ भारतीय रुपये) विनिमयाच्या दरातील फरक पहाता हा करार स्वीकारण्यात पाकिस्तानचाच जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. मग त्यात पाकिस्तानने तोरा मिरविण्याचे काय कारण?

आता पीटरसाहेबांच्या मुद्द्यांकडे वळू या. काश्मीरच्या बाबतीत मी एवढेच म्हणेन कीं तिथल्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याच्या गीलानीसारख्या फुटीरवादी नेत्यांच्या आवाहनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून काश्मिरी जनता प्रत्येक निवडणुकीत हिरीरीने भाग घेत आलेली आहे. तिथल्या अगदी अलीकडील मतदानाच्या टक्केवारीचे प्रमाण भारताच्या इतर प्रांतातील टक्केवारीच्या दीडपट असलेले दिसून आलेले आहे. आता काश्मिरी जनतेच्या इच्छा काय आहेत याबाबत आणखी काय आणि कशाला बोलायचे? खरे तर पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI ने जर काश्मीरमध्ये लुडबुड करणे सोडून दिले तर दोन्ही देशांत शांतता नांदेल. पण मग पाकिस्तानी लष्कराचा "पाकिस्तानचा पालनहार" म्हणवून घ्यायची ऐटच संपेल व स्वत:चे असे अवमूल्यन झालेले पाकिस्तानी लष्कर स्वीकारेल काय?

मी तर फराज आणि पीटर यांना कामरान शफी व आयाज अमीर यांचे लेखन आणि "न्यूक्लियर डिसेप्शन" हे पुस्तक वाचायचा सल्ला देईन.

आपण आदर्श लोकशाही राबवतो असा दावा भारताने कधीच केलेला नाहीं. पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून-इंदिरा गांधींनी दीड-एक वर्षांसाठी लादलेली आणीबाणी वगळता-भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणून राहिला आहे याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे आणि पाकिस्तानही एक लोकशाही राष्ट्र म्हणून अभिमानाने उभे राहील आणि भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवील अशी आशाही आहे. भारताने लोकशाही राबविली आहे फक्त ६० वर्षांसाठी. भारत अजूनही लोकशाही मार्गाने सरकार कसे सुसूत्रपणे चालवायचे हे शिकतोच आहे. म्हणून भारताच्या लोकशाहीची अमेरिका किंवा इंग्लंडच्या लोकशाहीशी तूलना करणे अयोग्यच ठरेल.

भारताची राज्यघटना भारतीय न्यायसंस्थेला संपूर्ण स्वातंत्र्य देते हे पीटरसाहेबांना माहीत असेल अशी मला आशा आहे. आम्हाला या गोष्टीचा अभिमानही आहे. पाकिस्तानचे सध्याचे सरन्यायाधीश चौधरी यांनी मुशर्रफ यांच्या हुकुमशाहीविरुद्ध दाखविलेल्या धैर्याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे, पण त्यांच्यासमोर ज़रदारींच्या स्विस बॅंकेतील पैशावरून पंतप्रधान गिलानींविरुद्ध चाललेला खटला किंवा ’मेमोगेट’ खटला हे तर त्या न्यायसंस्थेचे वाभाडेच आहेत.

शेवटी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते! जरदारींनी अजमेरच्या दर्ग्याला पाच कोटी (पाकिस्तानी) रुपयांची देणगी जाहीर केली. ही संपत्ती त्यांनी आपल्या लागोपाठ दोन वर्षे "न भूतो न भविष्यति" अशा पुराने ग्रस्त झालेल्या आपल्या जनतेच्या कल्याणार्थ वापरायला हवी होती असे मला वाटते. अजमेरचा दर्गा घातपाती कारवायात नक्कीच सामील नसेल, पण परोपकारार्थ (charity) जमा केले गेलेले पैसे अतिरेकी कारवायांसाठी वापरण्याची प्रथाच पाकिस्तान, अफगाणिस्तान य देशांत रूढ झालेली आहे! त्या पार्श्वभूमीवर या पैशांचा विनियोग नको त्या कामात होणार नाहीं ना अशा शंकेची पाल प्रत्येक भारतीयाच्या मनात नक्कीच चुकचुकेल!

-----------------------------------------------------

[१] रोमेल व गुडेरियन हे दुसर्‍या जागतिक महायुद्धात गाजलेले जर्मन सेनानी! या सुप्रसिद्ध सेनानींचे नांव देऊन पाकिस्तानी लष्करशहांची अशी रेवडी माझे आवडते पाकिस्तानी स्तंभलेखक कामरान शफी अनेकदा करतात.

-----------------------------------------------------

लेखनविषय: दुवे:

Comments

पकिस्तानातील मतमतान्तरे

डॉन वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे आणि यूट्यूबवरच्या पकिस्तानी दूरदर्शन वाहिन्यावरच्या चर्चाहि मधूनमधून ऐकत असतो.

भारताविरुद्ध निर्णायक झगडा करण्याच्या वल्गना करणारे कार्यक्रम त्यात असतात तसेच पाकिस्ताननेच आत्मपरीक्षण करावयास हवे असे सांगणारे सांगणारेहि असतात. पहिल्या प्रकारात झईद हमीदसारखे लोक मोडतात. मुंबईचा हल्ला चालू असतांनाच हे महाशय 'हिंदुस्तान भग्न व्हावयाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे' असे जाहीर करत होते. मुसलमानांनी १००० वर्षे हिंदुस्तानावर राज्य केले आहे आणि ह्यापुढे त्याच इतिहासाची पुनरावृत्ति लवकरच होणार आहे असल्या हास्यास्पद घोषणाहि हे महाशय मधूनमधून करत असतात. सर्व प्रकारच्या वर्गांमधून त्यांना मानणारे प्रेक्षक आहेत असे जाणवते.

वस्तुत्वाशी अधिक मिळत्या चर्चाहि मधूनमधून पाहाण्यात येतात. पाकिस्तानाचे चालू असलेले अरबीकरण काही जणांना अयोग्य वाटते कारण त्यांच्यामते अरबांच्यापेक्षा हिंदुस्तानच भाषा, संस्कृति, अन्न, संगीत, सिनेमा अशा अनेक अंगांनी पाकिस्तानला जवळचा आहे आणि पाकिस्तानने हे अरबी संस्कृतीचे उदात्तीकरण विसरून जावे. महम्मद घोरीसारख्या आक्रमकांनी आपल्याच पूर्वजांच्या कत्तली केल्या, त्यांची नावे कसली आपल्या शस्त्रास्त्रांना देता असे प्रश्न ते विचारतात. काश्मीर प्रकरण लष्करानेच आपले वर्चस्व राखण्यासाठी जळते ठेवले आहे आणि बंगालमधल्या मुस्लिमांना त्यावर शक्ति खर्च करण्यात स्वारस्य नसल्यानेच ते वेगळे झाले असे ते म्हणतात, पाकिस्तानी लष्कराच्या वल्गना काहीहि असल्या तरी आतापर्यंत प्रत्येक युद्धात त्यांचा पराभवच झाला आहे असेहि ते आवर्जून सांगतात. भारताशी जुळवून घेण्यातच पाकिस्तानचे हित आहे असे ते म्हणत असतात.

ह्या सर्व मतमतामन्तरांमध्ये भडक भारतविरोधी मतांनाच अधिक सहानुभूति मिळते असे जाणवते. दोन्ही पक्षांसाठी अनिष्ट असली तरी ही वस्तुस्थिति आहे असे वाटते.

वारे मैत्रीच्या दिशेने वहात आहेत

कोल्हटकरसाहेब,
मीही 'डॉन' नियमितपणे वाचतो. तसेच 'ट्रिब्यून'ही. त्यातील कांहीं पत्रकारांचे स्तंभ आवर्जून वाचतो. उदा. कामरान शफी, इरफान हुसेन, हुमा युसुफ, इत्यादी. हे पत्रकार एक संयमित दृष्टिकोन वाचकांपुढे मांडतात. खासदार असलेले आयाज अमीर तर खुल्लमखुल्ला पाकिस्तानी सेनेच्या धोरणांची खिल्ली उडवतात व भारत-पाक मैत्रीची भलावण करतात. सलीम शहजादसारख्या पत्रकाराचा निर्घृणपणे खून झाला. तो ISI नेच केला असे मानले जाते. तरीही पत्रकार निर्भयपणे लिहितात याचे कौतुक वाटते.
पण मी वाचतो ती आंग्ल वृत्तपत्रे. उर्दू भाषिक वृत्तपत्रांत काय गरळ ओकली जाते हे कुणास ठाऊक? कधी-कधी उर्दू शिकण्याचा मोह होतो, पण ते "लई भारी" वाटते!
झैद हमीदप्रमाणेच ले.ज. हमीद गुलसुद्धा गरळ ओकत असतात. जिहादी शिबिरांना गुल जातीने मदत करतात असेही मानले जाते.
पण गेल्या दहा वर्षांच्या पाक वृत्तपत्रांच्या वाचनावरून मला तरी असे वाटते कीं वारे मैत्रीच्या दिशेने वहात आहेत. त्यात थोडासा मत्सराचा भाग नक्कीच आहे. पण एक तर्‍हेचा आपले उदाहरण गिरविण्याचाही मोह त्यांना होत आहे यात शंका नाहीं!
एक नवी आपत्ती आहे इम्रान खान. हा सरड्यासारखा रंग बदलताना दिसतो. त्याला पाक जनता किती भाव देते हे कळायचे आहे. घोडा-मैदान जवळच आहे!
----------------
सुधीर काळे

तू मारल्यासारखं कर...

पाकिस्तान आणि अमेरिका मला 'तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो ' प्रमाणे वाटतात.

नक्कीच

पाकिस्तान आणि अमेरिका मला 'तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो ' प्रमाणे वाटतात.

नकीच असे वाटते. पण हे ही खरेच आहे कि पाकिस्तानने जर मनापासून भारतासोबत मैत्रीचे नाते जोडले तर दोघे मिळून व्यापार आणि इतर क्षेत्रात बरेच मोठे होतील.
भारत आणि पाकिस्तानात खरे देशप्रेमी ज्यांच्यामध्ये राष्ट्रियत्वाची भावना आहे असे नागरिक बनण्याची गरज आहे. बाकी दोन्हीकडे आपलेच खिसे भरणारे राज्यकर्ते आहेत. भारतातले जनतेचे ओरबाडून खातात आणि पाकिस्तानात अमेरिकेचे. एवढाच काय तो फरक.
परव कुठे तरी बिलाल भुट्टोचे वक्तव्य वाचले कि भारत आणि पाकिस्तानला आपल्या युद्ध सामग्रीवरच्या खर्चाची लाज वाटली पाहिजे. वाक्य योग्य आहे. पण हाच बिलाल उद्या सत्ता उपभोगायला लागला की रंग बदलेल. नाही का?

वारे मैत्रीच्या दिशेने वहात आहेत

वारे मैत्रीच्या दिशेने वहात आहेत
????
ते तसे प्रत्येक युद्धापूर्वी,युद्धानंतर, बॉम्बस्फोटांपूर्वी आणी बॉम्बस्फोट हळूहळू विस्मरणात गेल्यानंतर वहातच असतात.
मैत्रीचे वारेही वाहतात आणि तिकडे जीवघेणे हल्ले,स्फोटही होतात.
अजब आहे.

मारल्यासरखे-रडल्यासारखे ह्याबद्दल् प्रियालींशी सहमत.
फक्त आम्ही ते युतीच्या काळातल्या मनोहर जोशी- सेनाप्रमुख संबंधासंदर्भात बोलताना म्हणत् असू.
--मनोबा

स्पर्धा

मैत्रीचे वारेही वाहतात आणि तिकडे जीवघेणे हल्ले,स्फोटही होतात.
अजब आहे.

पुस्तकी मैत्री वगैरे शब्द सोडून एकमेकांशी स्पर्धा करणार्‍या देशांची मैत्री वगैरे होऊ शकते काय? किंबहुना देशांतर्गत राजकारणांत मैत्री हा शब्द योग्य आहे काय? अमेरिका-पाकिस्तान मैत्री असू शकते. भारत-नेपाळ मैत्री असू शकते. अमेरिका कॅनडा मैत्री असू शकते पण ही मैत्री केवळ आपापला स्वार्थ पाहण्यापुरती मर्यादित आहे आणि त्या "मैत्री"च्या पाठची कारणेही ज्ञात आहेत.

भारत-पाकिस्तानमध्ये फारतर ट्रूस, ट्रिटी, तह वगैरे वगैरे होऊ शकतो असे वाटते.

भारत-पाकिस्तान मैत्री?

अमेरिका-कॅनडा ह्यांच्यामध्ये जसी 'मैत्री' आहे तशी भारत-पाकिस्तानातहि होऊ शकेल असे वाटते कारण दोन्ही बाबतीत इतिहास आणि 'मैत्री'ला समर्थन देणारी कारणे समानच आहेत.

अमेरिका आणि कॅनडा ह्यांच्यामध्येहि पूर्वी निकराच्या लढाया झालेल्या आहेत आणि सुरुवातीच्या दिवसात कॅनडाचा प्रदेश ताब्यात घेण्याचे प्रयत्नहि नवनिर्मित अमेरिकेत करण्यात आले होते. जसजसे दिवस गेले तसतसे दोघांनाहि जाणवायला लागले की आपली भाषा एक, संस्कृति एक, नद्या-पाणी अशी आर्थिक बलस्थाने समान. अशा परिस्थितीत आपण एकमेकांशी सहकार्याने वागणे दोघांच्याहि हिताचे आहे. हे पटल्यापासून दोन्ही देशांमध्ये संपूर्ण शान्तता आहे, हजारो कि.मी. लांबीच्या सीमेवर संरक्षणासाठी एकहि सैनिक लागत नाही. ९/११ नंतर अमेरिकेने पासपोर्ट धोरण जास्त काटेकोर करेपर्यंत इकडून तिकडे जायला केवळ ड्रायविंग लायसेन्सची ओळख पुरत असे आणि 'उत्तर अमेरिका' अशी दोघांची सामायिक ओळख अजूनहि आहे.

भारत आणि पाकिस्तानची अगदी अशीच स्थिति आहे. मी वर म्हटल्यानुसार भाषा, रीतिरिवाज, अन्न, संगीत, इतिहास, हवामान, ऋतु हे सर्व सारखे आहे. इकडच्याच नद्या तिकडे जातात. दोघांनी शान्ततेत राहण्याचे ठरविले तर त्याच्या आड येऊ शकेल असे कोठलेच कारण नाही. भारत सर्व धर्मांच्या लोकांना सारखीच सुरक्षितता देतो हा गेल्या साठ वर्षांचा इतिहास आहे तेव्हा 'इस्लाम खतरेमे' हीहि भीति नाही.

अशा शान्ततेचे अपरिमित लाभ दोन्ही राष्ट्रांना मिळतील. ते सर्वपरिचित आहेत.

अडचण केवळ पाकिस्तानातील आंधळ्या आणि स्वार्थी भारतद्वेषाची आहे. सौदी अरेबिया आणि चीनपुढे लांगूलचालन न करता भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हा साधा स्वार्थ त्यांना दिसत नाही. (आपल्याकडे आंधळे पाकिस्तानद्वेष्टे आणि इस्लामद्वेष्टे नाहीतच असे नाही पण मधूनमधून बुभु:कार करण्यापलीकडे त्यांना जाऊ दिले जाणार नाही ह्याची शाश्वती वाटावी इतकी राजकीय परिपक्वता भारतीय समाजाने आजपर्यंत दाखविली आहे.)

पाकिस्ताननिर्मितीनंतर जिना जवळजवळ लगेचच वारले. पाकिस्तानला पहिली आठदहा वर्षे त्यांचे मार्गदर्शन मिळाले असते तर कदाचित् इतिहास वेगळा घडला असता असे वाटते.

जुनी आठवण

सुरेख प्रतिसाद, अरविंद-जी!
मी जकार्तास्थित एका पाकिस्तानी गृहस्थाबरोबर बोलत होतो. त्याने माझे नवाज शरीफ यांच्या भाषणाचे स्वागत करणारे पत्र वाचले होते व ते त्याला आवडले होते. मी त्याला म्हटले कीं वातावरण सुधारते आहे ही चांगली गोष्ट आहे. तो उत्तरला कीं हळूहळू दोन्ही देशांच्या लोकांच्या लक्षात एक गोष्ट येऊ लागली आहे कीं आपण शेजारी आहोत व काहींही झाले तरी शेजारीच रहाणार आहोत! मग प्रेमाने का राहू नये?
आपण वर कॅनडा-अमेरिकेच्या सख्ख्याबद्दलचा मुद्दा लिहिला आहे त्यावरून ही जुनी आठवण झाली!!
----------------
सुधीर काळे

हळूहळू अर्थकारण राजकारणावर कुरघोडी करत आहे!

हळूहळू अर्थकारण राजकारणावर कुरघोडी करत आहे!
---------------
सुधीर काळे

भाबडा आशावाद

अमेरिका आणि कॅनडा ह्यांच्यामध्येहि पूर्वी निकराच्या लढाया झालेल्या आहेत आणि सुरुवातीच्या दिवसात कॅनडाचा प्रदेश ताब्यात घेण्याचे प्रयत्नहि नवनिर्मित अमेरिकेत करण्यात आले होते. जसजसे दिवस गेले तसतसे दोघांनाहि जाणवायला लागले की आपली भाषा एक, संस्कृति एक, नद्या-पाणी अशी आर्थिक बलस्थाने समान. अशा परिस्थितीत आपण एकमेकांशी सहकार्याने वागणे दोघांच्याहि हिताचे आहे. हे पटल्यापासून दोन्ही देशांमध्ये संपूर्ण शान्तता आहे, हजारो कि.मी. लांबीच्या सीमेवर संरक्षणासाठी एकहि सैनिक लागत नाही. ९/११ नंतर अमेरिकेने पासपोर्ट धोरण जास्त काटेकोर करेपर्यंत इकडून तिकडे जायला केवळ ड्रायविंग लायसेन्सची ओळख पुरत असे आणि 'उत्तर अमेरिका' अशी दोघांची सामायिक ओळख अजूनहि आहे.

याचे मुख्य कारण कॅनडा हा अमेरिकेच्या स्पर्धेत पुरेसा नव्हता हे नव्हे काय? किंवा अमेरिका-कॅनडा मैत्रीत अमेरिका हा "दादा" आहे हे मान्य करणे नव्हे काय? ९/११ नंतर अमेरिकेने बदललेले धोरण आपल्या नागरिकांसाठी मान्य करताना कॅनडाने खळखळ केली असे ऐकीवात आले काय? पाकिस्तानचे सोडून द्या पण भारत-पाकिस्तान मैत्रीत पाकिस्तान "दादा" बनलेला तुम्हाला चालेल काय? दहशतवाद हा शब्द अमेरिका-कॅनडाला भेडसावतो असे वाटत नाही. अमेरिका आणि त्याचा दुसरा शेजारी मेक्सिको यांची अशी मैत्री का होऊ शकत नाही? तेथे ही अमेरिकन पासपोर्टधारक ये-जा करू शकतो पण मेक्सिकन पासपोर्टधारकाला तशी सुविधा दिसत नाही. मेक्सिको आणि अमेरिकन द. भाग यांचे ऋतू, हवामान वगैरे सारखे नव्हे काय? तेथे तर धर्माधिष्ठीत राजकारणही नाही आणि स्पर्धाही नाही पण केवळ एका तिसर्‍या जगातील अंदाधुंदी, घुसखोरी, गुन्हेगारी आणि अशी अनेक कारणे त्यांच्या "तथाकथित मैत्री"च्या आड येत असावी. कदाचित मेक्सिकोने स्वतःच्या प्रश्नांवर ताबा मिळवला आणि अमेरिकेला "दादा" म्हणून स्वीकारले तर तेथेही मैत्री होईल कारण मग हवामान, ऋतू, नद्या, भूभाग वगैरे समान असतील आणि स्पर्धा नसेल.

पाकिस्तानची मुख्य अडचण भारतद्वेष हीच नसून भारतापासून फुटून वेगळा झालेला देश ही ओळख असणे ही आहे. आपले अस्तित्व दाखवून देणे आणि आपण भारतापेक्षा सरस आहोत हे दाखवणे ही धडपड आहे. पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे आणि भारत सहिष्णू असण्याशी त्यांचा काही संबंध नाही. तुर्कस्तानसारख्या पुरोगामी देशातही इस्लामिक शक्ती डोके वर काढू पाहतात तेथे पाकिस्तान या धर्मवेडातून सहीसलामत सुटेल अशी आशा भाबडी वाटते. ज्या देशांचे नेते स्वतः बंद बुलेटप्रूफ गाड्यांतून, संपूर्ण संरक्षणात वावरतात. ज्या नेत्यांच्या आप्तांना रस्त्यावर दहशतवादामुळे मरण आले आहे त्यांनी इतरांना मैत्रीचे पाठ पढवणे फक्त राजकीय चाल असते.

तेव्हा, मैत्री वगैरे उदात्त शब्दांआधी दोन्ही देशांत शांती करार होणे महत्त्वाचे आहे. मैत्री फार लांब राहिली.

कोल्हटकरसाहेबांनी याला उत्तर द्यावे ही विनंती

कोल्हटकरसाहेबांनी याला उत्तर द्यावे ही त्यांना माझ्यातर्फे विनंती!
----------------
सुधीर काळे

आशावाद आहे पण तो भाबडा नाही

पाकिस्तानातील दहशतवाद आणि तेथील पुष्कळ मोठया समाजगटाला आकर्षित करू शकणारे इस्लामचे कडवे स्वरूप हा आजचा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यामागचा सर्वात मोठा अडथळा आहे हे प्रियालींचे म्हणणे मान्यच करावे लागेल. साहजिकच भारत-पाकिस्तानात अमेरिका-कॅनडा प्रकारची 'मैत्री' निकटच्या भविष्यात निर्माण होईल हेहि शक्य नाही.

तरीपण ते सर्वकालीन अशक्य आहे इतका निराशाजनक विचारहि बाळगायचे कारण नाही. स्पर्धेची कारणे दूर केली किंवा झाली म्हणजे आपोआपच राष्ट्रे आपली धोरणे बदलतात आणि जुने प्रतिस्पर्धी आपसात 'मैत्री' निर्माण करतात. दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत ब्रिटन आणि फ्रान्स एकमेकांच्या विरोधात असत कारण दोघेहि व्यापारासाठी वसाहती निर्माण करण्याच्या बाबतीत एकमेकांचे स्पर्धक होते. वसाहती निर्माण करण्याने वसाहत निर्माण करणार्‍या देशातील जनतेचा लाभ होतो हे त्या त्या वसाहत-निर्मात्या देशातील लोकांना पटविण्यात त्या त्या देशांचे नेते यशस्वी होत होते. जास्ती व्यापार, जास्ती नोकर्‍या असे वसाहतवादाचे palpable आर्थिक लाभ दोन्ही देशांतील जनतांना प्रत्यक्ष दिसत होते.आणि म्हणून त्या त्या देशांतील जनतांचाहि वसाहत-निर्मितीला विरोध नव्हता आणि आपल्या नेतृत्वांच्या मागे उभे राहण्यास त्या त्या जनता तयार होत्या.

कालान्तराने 'मार्गदर्शक तत्त्व' म्हणून वसाहतवाद मागे पडला आणि ब्रिटन आणि फ्रान्स हे एकेकाळचे स्पर्धक पहिल्या महायुद्धापर्यंत 'मित्र' झाले होते.

भारत आणि पाकिस्तानामधील स्पर्धेमागे अशा प्रकारचे palpable समर्थनहि नाही. भारतद्वेष, मत्सर आणि इस्लामी अंमल भारतात पुन: निर्माण करता येईल असली मध्ययुगीन दिवास्वप्ने ह्यावरच ती स्पर्धा टिकून आहे.

आता स्पर्धेच्या ह्या 'मनोनिर्मित' प्रेरणा सुकवणे हे सोपे आहे का अवघड आहे ह्यावर मतमतान्तरे असू शकतात. सामान्य मनुष्य अखेरीस आर्थिक विचारांना प्राधान्य देतो का तात्त्विक - ideological - ह्या प्रश्नाचे उत्तर त्यासाठी शोधायला हवे आणि ते उत्तर प्रत्येकाच्या लेखी वेगळेवेगळे असू शकते.

मला स्वत:ला असे वाटते की अन्ततोगत्वा आर्थिक प्रेरणा ही अन्य सर्व प्रेरणांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. प्रसारमाध्यमे आणि शिक्षणाचा प्रसार आर्थिक प्रेरणांनाच उपोद्बलक असतात. ह्या आर्थिक प्रेरणा जेव्हा पाकिस्तानात अधिक सामर्थ्य मिळवितील तेव्हा भारत-पाकिस्तानातील सध्याची निरर्थक तेढ शमायला लागून आर्थिक-स्वार्थप्रेरित सहकार्य सुरू होईल.

ह्यात भारताने 'दादागिरी' करण्याचीहि जरूर नाही. अशा 'Great Power complex' मुळे आपलेच नुकसान होते कारण छोटया देशांना आपली उगीचच भीति वाटू लागते. 'Gun-boat diplomacy' केव्हाच कालबाह्य झालेली आहे कारण guns कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच उपलब्ध आहेत. आर्थिक आणि अन्य प्रकारची soft-power हेच कोठल्याहि देशाचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी पुरेसे आणि इष्ट साधन आहे.

+१ -१

ह्यात भारताने 'दादागिरी' करण्याचीहि जरूर नाही.
ह्याला
ह्यात भारताने उघडउघड 'दादागिरी' करण्याचीहि जरूर नाही.
असे लिहिले तर सहमत आहे.

कारण guns कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच उपलब्ध आहेत.
+१ हे मान्य. बराच जणांकडे आहेत.
आर्थिक आणि अन्य प्रकारची soft-power हेच कोठल्याहि देशाचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी पुरेसे आणि इष्ट साधन आहे.
-१. इराक, लिबिया हे समृद्ध देश होते. ताकद कमी पडली म्हणून विनाकारण त्यांचे वाट्टोळे चालवले आहे. पैशालाच सॉफ्ट् पॉवर म्हणत असतील तर ती त्यांच्याकडे बर्‍यापैकी होती.

--मनोबा

गरज

>>हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज

तशीच गरज दुसर्‍या वाजूस पण आहे ना?

नितिन थत्ते

भारतात काही वेगळे घडत नाही

@ सुधीर काळे जाकार्ता
पण मी वाचतो ती आंग्ल वृत्तपत्रे. उर्दू भाषिक वृत्तपत्रांत काय गरळ ओकली जाते हे कुणास ठाऊक?
अगदी हेच भारताबद्दलदेखिल म्हणता येईल.

असेच दिसून येईल की, सहसा इंग्रजी पत्रे (उदा. हिंदू) बरेच समतोल असतात (निदान गरळ ओकीत नसतात). याउलट काही प्रादेशिक पत्रे (मराठीतील उदाहरणे द्यायलाच हवीत?) गरळ ओकताना दिसतात. भारतातदेखिल प्रदेशिक पत्रे वाचणारा वर्ग संख्येने बराच मोठा आहे.

@ नितिन थत्ते
>>हाफिज सईद या "विचारसरणी"चा विनाश करण्याची नितांत गरज

तशीच गरज दुसर्‍या वाजूस पण आहे ना?

सहमत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भारतात हिंदुत्वाचा उदय सरकारच्या अल्पसंख्याकांच्या अनुनयामुळे!

सुनिल-जी आणि नितिन-जी,
माझ्या मते भारतात कडव्या हिंदुत्वाचा उदय आपल्या सरकारच्या अल्पसंख्याकांच्या उघड अनुनयामुळे झालेला आहे! एरवी त्यांना इतके महत्व आलेले नव्हते. उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यांच्या पक्षाचा विजय हेच दर्शवितो.
सुनिल-जी, मला पाकिस्तानी उर्दू वृत्तपत्रांत काय लिहिलेले असते ते माहीत नाहीं त्यामुळे मराठीतील 'सामना'सारख्या पत्रांत जे छापलेले असते त्याच्याशी तूलना करणे मला सध्या तरी शक्य नाहीं!
----------------
सुधीर काळे

-१

असहमत आहे.

असहिष्णु हिंदुत्वाचा उदय भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या बराच आधीपासून झालेला आहे. मध्यंतरी गांधींच्या खुनामुळे त्या शक्तींना तोंड लपवून रहावे लागले. ३० एक वर्षात त्यांनी प्रचार करून करून पुन्हा डोके वर काढले. त्यानंतर सोप्या सिंबॉलिझमचा (मशीद, मंदिर, राम) वापर करून समाजातील खालच्या वर्गाला यात ओढले.

कडव्या हिंदुत्ववाद्यांना अनुनयाची उदाहरणे विचारली तर चार बायकांच्या पलिकडे काही सांगता येणार नाही.

नितिन थत्ते

प्रकाटाआ

प्रकाटाआ
----------------
सुधीर काळे

हाफिज सईद यांच्या 'लायकी'ची कोणती व्यक्ती आपल्याला भारतात दिसते?

नितिन-जी,
केवळ कुतुहल म्हणून विचारतो कीं हाफिज सईद यांच्या 'लायकी'ची कोणती 'कर्तबगार' व्यक्ती आपल्याला भारतातील कट्टर हिंदुत्ववाद्यांमध्ये दिसते जिला भारतीय सैन्याचे पाठबळ आहे व ज्या व्यक्तीला भारतीय सैन्य (व सरकार) त्यांच्या युद्धाच्या डावपेचातील मोहरा (strategic asset) म्हणून वापरते व जिने परदेशात (पाकिस्तानात) २६/११ सारखा भयंकर नरसंहार घडवून आणला आहे?
मीही सहिष्णु आहे, पण तरी मला अशी व्यक्ती आज तरी भारतात दिसत नाहीं. तरी ती असल्यास त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवायला मी उत्सुक आहे.
पण परिस्थिती अशीच राहिली व असेच 'मुलायम' निवडून येऊ लागले तर ती नक्कीच निर्माण होईल.
----------------
सुधीर काळे

?

मुलायम निवडून येणे याचा इतका बाऊ करण्याची गरज काय?

तशी व्यक्ती आपणास ठाऊक असणे इतके सहज शक्य वाटते का? शेवटी हफीज सईदला पाक सरकार नॉन स्टेट ऍक्टरच म्हणते.

नितिन थत्ते

नाव माहीत असल्यास सांगणे

नाव माहीत असल्यास सांगणे. मला माहीत नाहीं म्हणून विचारले आहे. अगदी आपल्याकडचा "नॉन स्टेट ऍक्टर" सुद्धा चालेल. पण हाफीज सईदच्या तोडीचा पाहिजे.
मुलायम निवडून आला याचा बाऊ करत नाहीं पण कसा निवडून आला याचा बाऊ प्रत्येकाने केला पाहिजे.
----------------
सुधीर काळे

आता असे वाटणार्‍यांची संख्या लाखोपटीने वाढली आहे

स्वातंत्र्याआधी अशी भावना असणारे हिंदू नगण्य होते. महात्माजींचा खून व्हायला नको होता पण तोही त्यांच्या अनुनयाच्या धोरणामुळेच झाला. पण त्यानंतरच्या सतत चाललेल्या अनुनयामुळे आता असे वाटणार्‍यांची संख्या लाखोपटीने वाढली आहे व त्याला सरकारच जबाबदार आहे.
कडव्या हिंदुत्ववाद्यांना अनुनयाची उदाहरणे विचारली तर चार बायकांच्या पलिकडे काही सांगता येणार नाही. अगदी परवाच्या निवडणुकीत यातले अनेक थेर पहाणार्‍यांना दिसले. पण सरकारने अद्याप समान मुलकी कायदा कां नाहीं केला? सगळ्या नागरिकांना सारखा कायदा कां नाहीं?
ते राहू दे बाजूला, पण आपण जशी 'समझौता एक्सप्रेस'बाबत कारवाई करत आहोत (त्यातल्या संशयितांना आपण कैदेतही टाकले आहे) तशी कारवाई हाफीज सईदवर व्हायलाच हवी असे आपल्याला वाटत नाहीं कां? याबद्दल कांहीं स्पष्ट मतप्रदर्शन कराल काय?
----------------
सुधीर काळे

चार बायकांच्या पलिकडे ठाऊक नसते

>>तशी कारवाई हाफीज सईदवर व्हायलाच हवी असे आपल्याला वाटत नाहीं कां? याबद्दल कांहीं स्पष्ट मतप्रदर्शन कराल काय?

असे मला वाटतेच.

>>सरकारने* अद्याप समान मुलकी कायदा कां नाहीं केला? सगळ्या नागरिकांना सारखा कायदा कां नाहीं?

भारतात सगळ्या नागरिकांना सारखा वैयक्तिक कायदा नाही ही गोष्ट खरी आहे. [क्रिमिनल आणि सिव्हिल** कायदे समानच लागू आहेत].
तसा समान वैयक्तिक कायदा असावा हे तात्विक दृष्ट्या मान्य आहे पण तपशील समजल्याशिवाय त्याला सरसकट पाठिंबा देणे शक्य नाही. समान नागरी कायद्यात आम्हाला मुस्लिमांचा कायदा लागू होणार की कसे? आम्हाला लागू असणार्‍या कायद्यात वडिलोपार्जित मालमत्तेत आम्ही जन्मतः वारसदार होतो. ते बदलून ख्रिश्चनांप्रमाणे/मुस्लिमांप्रमाणे/पारशांप्रमाणे वारसा हक्क ठरणार की कसे? याची डिटेल्स कळल्यानंतर पाठिंबा द्यायचा की कसे याचा विचार करता येईल.

आम्हाला लागू असलेले कायदे म्हणजे हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तकविधान कायदा हे सर्वांना लागू करावे अशी मांडणी असेल तर ती ऍरोगंट मांडणी आहे. कारण हे कायदे निर्दोष तर नाहीतच; पण हिंदू चालिरीतींनुसार बनवलेले आहेत. ते इतरांवर लादण्यात अन्यायच आहे.

*कायदे सरकार करत नाही, संसद करते. आणि हिंदू कायदे सुद्धा सुखासुखी झालेले नाहीत. मूळचा एकच असलेला कायदा तोडून त्याचे चार भाग करावे लागले. त्यासाठीही स्वातंत्र्यानंतर आठ वर्षे लागली होती.

**सिव्हिल कायदे म्हणजे कराराचा कायदा, व्यवसायविषयक कायदे, इतरांबरोबर व्यवहार करण्यासंबंधित कायदे.

नितिन थत्ते

सर्वांना सारखा कायदा व्हायलाच हवा

एकाद्या जमातीला पटो वा ना पटो, सर्वांना सारखा कायदा व्हायलाच हवा!
आणि लोकशाही राबविणार्‍या प्रत्येक राष्ट्रात बहुजनांना मान्य असा कायदा सर्वांना लागू व्हायला हवा.
----------------
सुधीर काळे

पुनर्विचार....

राष्ट्रात बहुजनांना मान्य असा कायदा सर्वांना लागू व्हायला हवा.
ह्यावर पुनर्विचार व्हावा. प्रागतिक,पुढारलेल्या विचारसरणीचे, सुधारक हे कित्येकदा अत्यल्पसंख्यच असतात. लोकक्षोभाच्या भयास पचवून/बाजूस सारून ते काम करतात.
बहुजनांच्या मनासारखे करणे ह्याचा एक अर्थ "झुंडशाही"कडे जाणे असाही होतो. अल्पसंख्यांकाचे सुखासुखीचे जीवन हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे.

ककोणीकेकाळी फुले-शाहू हे अल्पसंख्य होते. तर कधी काळी घाशीराम साठी तेंडुलकर आदी गँगला धमक्या देण्यात आल्या. बहुसंख्या त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात आले.
खुद्द पाकिस्तानात हळूहळू बहुसंख्यांकांचे जनमत कट्टरतावादाकडे झुकते आहे. तिथल्या गैरमुस्लिमांवर सक्ती होते आहे. शरियाचे नाव घेउन "बहुसंख्यांकां"साठी सक्तीच्या धर्मांतराचा कायदा केला तर ते "बहुजनांच्या हिताचे" म्हणत समर्थनीय होइल काय? तिथे कित्येक अल्पसंख्य प्रागतिक विचारसरणीचे लोक मोठी महिम्मत करून मिडियात परखड,स्पष्ट आणी आंधळ्या,द्वेषाधारित राजकारणाबद्दल बोलताना दिसतात. असे बरेच काही अरबस्थानाबद्दलही लिहिता येइल. ते नंतर.
पाकचे उदाहरण का दिले? चर्चा भारतावर सुरु आहे ना? असे म्हणल्यास उत्तर एकचः- अशाच काही धर्तीवरचे भारतासही लागू होउ शकेल, पण ते थेट लिहिले तर चर्चा उगाच लांबत जाइल. पाकिस्तान तेवढे वाइट्ट्, नीच वगैरे आहे हे इकडे सर्वमान्य असल्याने वाइट,नकारात्मक उदाहरण तिथले देणे सोपे.

अनुनय अल्पसंख्यांकांचा नको, तसा बहुसंख्यांकांचाही नकोच.
समान नागरी कायदा आल्यास मला नक्कीच आवडेल हे नक्की.

--मनोबा

समान म्हणजे कोणता कायदा?

>>एकाद्या जमातीला पटो वा ना पटो, सर्वांना सारखा कायदा व्हायलाच हवा!

मान्य आहे. त्या कायद्याचे स्वरूप काय असेल/असावे याचा विचार समान नागरी कायद्याविषयी "विशेष आग्रही" असणार्‍यांनी पुढे ठेवायला हवा.

नितिन थत्ते

आर्थिक बाजू

ह्या प्रश्नाला आर्थिक बाजूदेखिल आहे आणि ती देखिल पहायला हवी.

आज एखाद्या चौकोनी कुटुंबालाही Hindu Undivided Family असा दर्जा देऊन कर वाचवता येतो. परंतु ही सवलत फक्त हिंदूंनाच घेता येते. सनाका आल्यावर ही सवलत जाणार की राहणार याचाही विचार व्हायला हावा.

(जर ही सवलत जाणार असेल तर सनाकाला सर्वाधिक विरोध कुठल्या समाजाकडून होईल हे सांगायची गरज नाही!!!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ह्म्म

समान कायदा सोडाच... सर्वधर्म समभाव एकिकडे म्हणायचे आणि प्रत्येक धर्माचे कायदे, सवलती वेगवेगळ्या करायच्या याला काय म्हणायचे?

यालाच अनुनय म्हणतात.

यालाच अनुनय म्हणतात.
----------------
सुधीर काळे

समान नागरी कायदा कशासाठी?

असे दिसते ती समान नागरी कायदा (सनाका) हे हिंदू-मुस्लिम तेढ जळती ठेवण्यात स्वारस्य असलेल्या गटांच्या हातातील एक कोलीत आहे.

घटनेच्या ४४व्या कलमानुसार सनाका हा Directive Principles of State Policy चा एक भाग आहे हे खरे आहे पण घटना निर्माण करतेवेळच्या काळातील स्थिति आणि त्या काळी साध्य वाटली ती ध्येये आज तशी आहेत काय हेहि आज विचारात घ्यायला हवे. तसेच पाहिले तर कलम ४८ अनुसार वैद्यकीय आवश्यकतेबाहेरच्या मद्यपानावर एव्हांना सर्वत्र बंदी यायला हवी होती पण गांधींच्या शिकवणीतील मद्यपाननिषेध त्या काळी घटनाकारांना कितीहि आदर्श वाटला असला आणि म्हणून त्याचा समावेश Directive Principles of State Policy मध्ये झाला असला तरी तो प्रत्यक्षात आणण्याजोगा नाही आणि हटातटाने आणलाच तर त्याचे दुष्परिणाम 'आजारापेक्षा औषध वाईट' असे असल्याने राज्य/ केन्द्र सरकारे त्याला विसरून गेलेली आहेत. ह्याचा अर्थ असा की कोणतेहि Directive Principle of State Policy प्रत्यक्षात आणतांना आजच्या काळात आणि परिस्थितीत तसे करण्याचा लाभालाभ काय आहे हे पाहावेच लागते.

ही चाचणी आता 'सनाका'ला लावून पाहू.

पहिली गोष्ट म्हणजे व्यक्ति आणि व्यक्तीच्या भोवतालचा समाज ह्यांच्या परस्परसंबंधाविषयीचे सर्व कायदे आता 'सनाका' ह्या वर्णनाचेच आहेत. अपराध आणि अपराध्यांना मिळणार्‍या शिक्षा, न्यायालयापुढे दावा चालवायच्या पद्धतीचे नियम, व्यापारी आणि आर्थिक व्यवहारांना लावण्याचे कायदे, समाजात करावयाच्या वर्तणुकीचे कायदे हे इंग्रजांच्या काळापासूनच समान करण्याची प्रक्रिया सुरू खाली आणि अजूनहि ती यावच्छ्क्य चालूच आहे. मनुस्मृति, नारदस्मृति, याज्ञवल्यसंहिता अशा ग्रंथांतून प्राचीन काळातील कायद्यांचे दर्शन मिळते पण आजच्या जमान्यात त्यांना खूपच मुरड घालण्यात आली आहे. जुन्या काळातील अपराधांच्या शिक्षा (वध, हातपाय तोडणे येथपासून खालच्या खालच्या शिक्षा, अपराधी ब्राह्मण असल्यास शिक्षा थोडी सौम्य) साक्ष कशी नोंदवायची ह्याचे नियम, दिव्य करणे हा निरपराधित्व सिद्ध करण्याचा एक मार्ग, ठेवींबाबतचे नियम, अशा अनेक गोष्टीतील मनु-नारद-याज्ञवल्क्य ह्यांच्या नियमांना आजच्या न्यायप्रणालीत काहीहि स्थान नाही. ह्या बाबींचे कायदे सर्व नागरिकांना धर्मनिरपेक्ष पद्धतीने समान लागू पडतात. कुराणप्रणीत शारिया कायद्याची तीच स्थिति आहे.

मनु-नारद-याज्ञवल्क्य कोठे अजून उरले असले तर ते केवळ विवाह, घटस्फोट, वारसा अशा संपूर्ण वैयक्तिक आणि अन्य समाजावर ज्यांचा काहीहि परिणाम होत नाही अशा बाबींपुरतेच उरले आहेत.

हिंदु आणि मुस्लिम हे दोन्ही समाज गेली हजार-बाराशे वर्षे ह्या बाबींतील आपापले पारंपारिक कायदे मानत आलेले आहेत आणि त्यांबद्दल त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या भावना तोडून त्यांच्या घशाखाली समान कायदा उतरवण्याने कोणता लाभ होणार आहे? अमेरिकेमध्ये किंवा ब्रिटनमध्ये सनाका आहे म्हणून येथेहि तो हवा असे म्हणण्यात काही अर्थ नाही कारण ब्रिटन-अमेरिकेची जडणघडण आणि भारताची जडणघडण एकसारखी नाही त्यामुळे 'one size fits all' हे तत्त्व येथे लावता येणार नाही.

शारियानुसार मुसलमान चार बायका करू शकतात हे खरे आहे आणि पुष्कळ हिंदुत्व-कट्टरांना हे जाचते. त्यांना सनाकामार्गे काय मिळवायचे आहे? त्यांना चार बायका करण्याची मुभा हवी आहे काय? प्रत्यक्षात भारतात काय अथवा भारताबाहेर काय किती मुसलमानांना चार बायका आहेत किंवा परवडतात? अनुभव असा आहे की शारियाच्या प्रभावाखाली असलेल्या अरब देशांमध्येदेखील एकाहून अधिक बायका असलेला पुरूष अभावानेच आढळू लागला आहे. वाढती सामाजिक जाणीव आणि आर्थिक विचार ह्या दोहोंचा तो सामायिक परिणाम आहे. भारतातहि स्थिति तशीच आहे.

मला असे वाटते की सनाका आहे तेथे पुस्तकात राहू द्यावा, सहज जमेल तेव्हढाच त्याचा पाठपुरावा करावा. त्याला ऐरणीवरचा मुद्दा बनविण्यामुळे काहीहि साध्य होणार नाही.

अज्ञान किंवा गैरसमज

सहमत.

पुष्कळ हिंदुत्व-कट्टरांना हे जाचते. त्यांना सनाकामार्गे काय मिळवायचे आहे? त्यांना चार बायका करण्याची मुभा हवी आहे काय?

खरे म्हणजे भारतात बहुपत्नीत्वाची प्रथा मुस्लिमांपेक्षा हिंदूंमध्येच जास्त आढळते. HUF च्या आर्थिक मुद्द्याबाबत वर लिहिले आहेच.

सनाकासाठी आग्रही असणारे बहुधा अज्ञान किंवा गैरसमजातून तसे वागत असावेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उपयुक्तता

विवाह, घटस्फोट, वारसा अशा संपूर्ण वैयक्तिक आणि अन्य समाजावर ज्यांचा काहीहि परिणाम होत नाही अशा बाबींपुरतेच उरले आहेत.

कुटुंब प्रकारच्या समाजावर होत असलेला परिणाम (अन्याय) दुर्लक्षू नये असे मला वाटते.

त्या भावना तोडून त्यांच्या घशाखाली समान कायदा उतरवण्याने कोणता लाभ होणार आहे?

खाप, देवबंद, इ. ना राजकीय महत्व नसल्याचे दाखवून दिल्यास त्यांच्या समर्थकांची संघभावना खच्ची करणे शक्य होईल असे मला वाटते. प्रादेशिकता ही सध्याच्या भारतातील एक मोठीच अडचण आहे.
सारीच डायरेक्टिव तत्त्व चांगली नाहीत. दारूबंदी, गोहत्याबंदीसारखी वेडपटही आहेत आणि मूलभूत कर्तव्यांसारखी चांगलीही. विवेकवादात 'एको देवः केशवो वा...' तत्त्व (=one size must fit all) आवश्यक असते म्हणून सनाका आवश्यक आहे.

उ त्त म

उ त्त म प्रतिसाद!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

एका देशाच्या नागरिकांना एकच कायदा लागू केला पाहिजे

भला-बुरा कसाही असो, पण एका देशाच्या नागरिकांना एकच कायदा लागू केला पाहिजे.
----------------
सुधीर काळे

भलाबुरा कसाही नको

अश्या कायद्याचे स्वरूप स्पष्ट करावे. हिंदूंचा कायदा जसाच्या तसा अहिंदूंना लागू करावा हे चालणार नाही. त्याला आडमुठेपणा म्हणावे लागेल.

समान नागरी कायदा ही हिंदूंना लागू असलेल्या कायद्यात सुधारणा करण्याची संधी म्हणूनही पाहता येईल.

नितिन थत्ते

कायदे आणि भारतीय

मला हा प्रतिसाद सुद्धा आडमुठेपणाचाच वाटतो आहे.

कायदे आणि भारतीत? भारतीयांना कायद्याचे किंबहुना सामाजिक जाणीवेचे काही ज्ञान असते का? हा खरा चर्चेचा मुद्दा असायला हवा. सनाका म्हणजे काय? तो कोणासाठी हवा? कसा हवा? त्यावर राजकारण कसे चालते हे काही नवे आहे का? जबाबदार भारतीय म्हणून मी म्हणेन कि क्षणभर धर्म-जात संबंधीत कायदे बाजुला ठेवा. कायदे आणि नियम कोणासाठी असतात हे पहिले भारतीयांना समजवा. मग कोणाला कसा हवा याची चर्चा करा.

समानता म्हणजे काय? पहिला धर्म मग जात मग लिंग असा भेद कुठे आणि कधी करायचा? समान कायदा हवा ना? मग अगदी घटस्फोटाचा कायदा स्री - पुरुषांसाठी समान हवा? अलिकडे या कायद्याचे गैरवापर दिसले आहेत.

उगाच तुला योग्य उत्तर माहित नाही ना? मग प्रश्नच विचारु नको असे म्हणणे अयोग्य वाटते. शंका असेल अथवा प्रश्न विचारणार्‍याला हे कळाले नसेल की आपण पुर्ण ज्ञानी नाही तर त्याला सज्ञान करायचे प्रयत्न करा.

सहमत, परंतु

हे तत्त्व योग्य आहे. किंबहुना, घटनेच्या कलम १४नुसार ते आवश्यकच आहे. परंतु, काही वस्तुस्थिती लक्षात घेणेही आवश्यक आहेतः

  • कोणताही खासदार कायदा मांडू शकतो, त्यासाठी बहुमत असणे किंवा स्वतःच्या पक्षाचे सरकार असणे आवश्यक नसते.
  • तेरा दिवस किंवा तेरा महिने किंवा पाच वर्षे कालावधीत वाजपेयी सरकारनेही संसदेत तो कायदा मांडला नाही.
  • खासदाराने अमुक मसुदा कायदा म्हणून मांडावा अशी मागणी कोणीही व्यक्ती करू शकते.
  • सत्यरंजन साठे यांच्याव्यतिरिक्त इतर कोणी मसुदा बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
  • "सनाका हवा, काँग्रेस लांगूलचालन करते" असे रडगाणे गप्पा/भाषणे, वृत्तपत्रांतील लेख/पत्रे, जालावर ईमेल/ब्लॉग/चर्चांमध्ये मांडण्यापलिकडे अधिक कष्ट घेण्याची इच्छा लोकांना नाही.
  • गेलाबाजार, हिंदू कायद्यांवरच "आमचा सनाकाचा मसुदा" असा शिक्का मारण्याची तसदीही कोणी घेतलेली नाही.
  • पुरोगामी म्हणविणारे पक्ष सनाका टाळतात त्याचे कारण म्हणजे त्यांना वोट बँकची काळजी वाटते हेच आहे.
  • ही काळजी अनाठायी आहे हेही सत्य आहे.

परखड बोलायची हल्ली फॅशन नाहींय्!

आपला देश लोकशाहीनुसार चालतो. मग हिंदू बहुसंख्य असलेल्या या देशात हिंदू कायदा लागू करायला काय हरकत आहे? त्याबद्दल हिंदूंना दोषी कां वाटावे?
जिझिया करही आपण सोसला आणि इतके मिंधे होऊन गेलो कीं एकाद्या बादशहाने तो जिझिया कर रद्द केला तर आपण त्याचे गोडवेही गायलो! आणि आता लोकशाही आली तरी आपला हिंदू कायदा सर्वांना लागू करायलाही आपण कचरतो! आपण धन्य आहोत.
असो. असे परखड बोलायची हल्ली फॅशन नाहींय्! पण रहावत नाहीं म्हणून मी बोलतोय्.
मागे लाल बहादुर शास्त्रींच्या काळात ६५च्या युद्धात आपली फौज लाहोरच्या वेशीवर पोचली होती त्याचे वर्णन "टाईम" या नियतकालिकाने केले होते कीं Mild and meek Hindu seems to have changed!" स्वतःला "Mild and meek Hindu" म्हणवून घेणे मला तरी नक्कीच खुपले!
शेवटी मुद्दा राहिला लोकांना कायद्याने वागायला शिकवण्याबद्दलचा. या मुद्द्याशी मात्र १०० टक्के सहमत. ते शिकविण्याची व लोकांना कायद्याने वागायला लावायची सक्ती करण्याची गरज नक्कीच आहे. खास करून नेत्यांना.....
----------------
सुधीर काळे

अजूनही

अरेरे! कुणीच कसा काय अजून निषेध केला नाही?
हिंदू बहुसंख्य असलेल्या या देशात हिंदू कायदा लागू करायला काय हरकत आहे?
असा प्रश्न विचारायची हिम्मत कशी काय केली काळे साहेब? ;)

अरे अजूनही तुमच्या प्रतिसादावर, बुप्रावादी, सेक्युलर आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांची नजर पडली नाही?
आश्चर्यच आहे!
-निनाद

अभिव्यक्तिस्वातंत्र्य

उत्तर श्री. काळे देत नाहीत, पण एक आपला कयास... हिम्मत होण्याचे कारण "अभिव्यक्तिस्वातंत्र्य" असू शकेल.

कारण अभिव्यक्तिस्वातंत्र्य घटनेतच स्थापित केलेले आहे.

हिंदू कायदा लागू करायला त्याच घटनेत हरकत घेतलेली आहे. घटनेतच घटनाबदलासाठी तरतूद आहे. त्यामुळे श्री. काळे या अभिव्यक्तीद्वारा कदाचित घटनाबदलासाठी प्रयत्न करत असतील.

ज्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यामुळे श्री. काळे यांची हिंमत होते, त्याच अभिव्यक्तिस्वातंत्र्यामुळे त्यांचा विरोध आणि सध्याच्या घटनेचे समर्थन करणार्‍यांचा हक्क बनतो. सध्याच्या घटनेचे समर्थन करणारे सर्वच लोक "बुप्रावादी, सेक्युलर(?हा थेट घटनेतला शब्द आहे ना? की उपहासात्मक?) आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या" आहेत काय?

भाषेच्या शैलीमुळे तुमच्या प्रतिसादाचा रोख उपहासात्मक भासतो. पण त्यामागे गंभीर मुद्दा असावासा भास होतो. जोवर त्यातील गंभीर भाग कुठला, आणि उलट्या अर्थाचा भाग कुठला, ते तुम्ही खुद्द स्पष्ट करत नाही, तोवर गंभीर मुद्दा बाजूला राहील. सध्याच्या घटनेचे समर्थन करणे उपहासाच्या योग्य आहे, असा काहीसा ध्वनी भासतो. असा रोख असल्यास आश्चर्यकारक आहे. पण तुमचा गंभीर मुद्दा काय, ते तुम्हीच स्पष्ट केल्याशिवाय कळत नाही.

हिंदू बहुसंख्य = हिंदू कायदा

मी बुप्रावादी, सेक्युलर आणि कम्युनिस्ट असले कोणतेच लेबल लावून घेऊ इच्छित नाही तरीहि 'हिंदू बहुसंख्य = हिंदू कायदा' हा विचार मला मान्य नाही. ह्या आधीच त्याबाबत 'निषेध' नोंदवला नाही तो एव्हढयासाठीच असल्या वादात शिरून काही उपयोग नसतो, प्रत्येकाची मते दृढ असतात आणि ती बदललीच तर केवळ आतून पटल्यामुळेच बदलतात. दोन्ही बाजूंच्या भूमिका पूर्णपणे अनेकदा नोंदवल्या गेल्या आहेत.

विचारायचेच ठरवले तर दोनच प्रश्न. 'हिंदू कायदा' म्हणजे नक्की काय आणि 'हिंदू' म्हणजे नक्की कोण हे गेल्या दोन हजार वर्षातहि स्पष्ट झालेले नाही कारण ह्या प्रश्नांचे उत्तर जटिल आहे. ते शोधण्यात आपण आज वेळ घालवावा असे ह्या प्रश्नांच्या उत्तरांमधून काय मिळणार आहे?

हिंदू

भारताच्या सर्वधर्म समभाव भावनेने हिंदूंची गोची करुन ठेवली आहे. कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर इतर देश स्वतःचा धर्म का मिरवतात? इतर देशांमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत ते आनंदाने (अपवाद असतीलच) का राहतात? ते इतर धर्माच्या देशात आम्हाला हिंदू असल्याने वेगळा कायदा लावा असे म्हणतात का? अशा अनेक प्रश्नात आहे.
मला वाटते कि समाजहितासाठी हिंदूंनी एकपत्नीत्वाचा कायदा आनंदाने मान्य केला आहे. तिथे धर्माचा बाऊ नाही केलेला. सर्वसामान्य मत हे आहे की बहुसंख्य लोकांना मान्य होईल असा कायदा सर्वांसाठी लागू करावा. उगाच एका म्यानेत सगळ्या तलवारी ठेवण्याचा दुराग्रह का? राजकारणी लोकं स्वार्थ पाहतात हे जगजाहीर आहे. पण म्हणून सर्वांनी त्यांचीच रि ओढावी?


कुठले प्रगत देश मिरवतात?

कुठले प्रगत देश स्वतःचा बहुसंख्य धर्म मिरवतात? काही उदाहरणे मनात आली, तर मग _का मिरवतात_ असा विचार करता येईल. पण सध्या उदाहरणांच्या अभावामुळे तसा कुठला विचार करता येत नाही.

बरेचसे अप्रगत देश आपला बहुसंख्य धर्म मिरवतात. मात्र त्या देशांतील तपशिलांबाबत विचार केल्यास भारताच्या स्थितीबाबत काय नवीन दृष्टी मिळू शकेल?

प्रगत?

माझ्या प्रतिसादात प्रगत देश असा उल्लेख आहे असे मला तरी दिसत नाही. आपल्याला दिसत असल्यास सांगावे. कदाचित उपक्रम काही शब्द बदलुन दाखवत असावा कदाचित नाही का?


दिसला नाही खरा

दिसला नाही खरा.

म्हणून अप्रगत देशांशी तुलना करून काय साधणार आहे, असा परिच्छेद शेवटी जोडला होता. जर काही साधणार नसेल, तर "प्रगत" शब्द अध्याहृत मानण्यात काय चूक आहे.

आणि अप्रगत देशांशी तुलना करण्यात जर काही हशील असेल, तर ते तुम्ही सांगालच. मग "प्रगत" हे अध्याहृत मी रद्द करेन, आणि गैरसमजुतीच्या अध्याहृताबाबत माफी मागेन.

माफी मागल्यावर मग अप्रगत देशांशी साम्य साधण्यासाठी भारताने त्यांच्या दिशेने बदलावे, या तुमच्या ध्वनिताचा तीव्र विरोध करेन.

देश आणि धर्म

माझा रोख देश आणि देशाचा धर्म आणि मग तिथले कायदे या रोखाने आहे. मुळात प्रगत आणि अप्रगत देश हि तुलना कशाला हवी? मला या भुतलावरचे किती देश स्वतःला धर्म निरपेक्ष मानतात? आणि का?

विकिपेडियावरील नकाशा

धर्मनिरपेक्ष देशांबाबत विकिपीडियावरील नकाशा (विकिपानाचा दुवा):

तस्मात् जगातले बहुतेक देश राज्य-धर्म नसलेले आहेत, आणि जगातील बहुसंख्य लोक राज्य-धर्म नसलेल्या देशांत राहातात.

धन्यवाद

चित्रा बद्दल धन्यवाद. मी आज पर्यंत फक्त भारत आणि नेपाळ एवढेच धर्मनिरपेक्ष समजत होतो. असो.
तुम्ही एवढे कष्ट घेऊन एवढा नकाशा मिळवला. फक्त एकच माहिती देता येईल काय? या सगळ्या लाल रंगाच्या राज्य धर्म नसलेल्या देशांमध्ये सर्वधर्मीयांसाठी एकच कायदा आहे कि प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार कायदा? फ्रान्समध्ये मुस्लिम स्त्रियांना बुरखा वापरायला बंदी आहे आणि भारतात नाही असा फरक का आहे? यातले किती धर्म निरपेक्ष देश हज यात्रेसाठी सबसिडी देतात?

यातल्या किती देशांमध्ये विकिपिडीया हा राज्यमान्यता प्राप्त असलेला संदर्भ आहे?

नाही. :-) पण याबाबत आंबेडकरांचे मत विचार करण्यालायक

नाही. आणखी माहिती हाताशी असलेल्या वेळात मिळवता येणार नाही :-) विकिपीडिया दुवा सहजप्राप्य होता, म्हणून दिला.

भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्षता आणण्याबाबत, पण त्याच वेळी कौटुंबिक कायदा वेगवेगळा ठेवण्याबाबत राजकीय विचार आंबेडकरांनी एका निबंधात सांगितला आहे. ("हिंदू कोड बिल" असे काहीसे निबंधाचे शीर्षक असावे.) निबंधात सांगितलेले मुद्दे पटण्यासारखे वाटले होते. सध्या निबंधांचे पुस्तक हातात नाही, आणि मला आंतरजालीय स्रोतही सापडले नाहीत. परंतु निबंधांचे पुस्तक मला पुण्याच्या अप्पा बळबंत चौकात मिळाले होते (बहुधा "रसिक" मध्ये).

हेच का ते?

तुम्ही म्हणताय ते पुस्तक हे का?

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

 
^ वर