भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)

भारताची 'अग्नि'परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

परवा यशस्वी चांचणी केलेले प्रक्षेपणास्त्राला अग्नि-५ या नावाने ओळखले जाते! या आधी आग्नि-१ ते अग्नि-४ अशा संज्ञांच्या चार प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती या लेखाच्या दुसर्‍या भागात तक्ता-१ मध्ये दिलेली असून विस्तृत माहितीसाठीचे दुवे तक्ता-२ खाली दिलेले आहेत.

या यशस्वी चांचणीवर अनेक देशांच्या सरकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी Stratfor या नियतकालिकातील भारत चीन यांच्यातील कडवी स्पर्धा हा रॉबर्ट काप्लान यांचा लेख उल्लेखनीय वाटला म्हणून त्या लेखाचा स्वैर अनुवाद खाली देत आहे.

चीनच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्याा आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या भारताच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रमुख देश आहेत.

ही स्पर्धा केवळ अत्युच्च तंत्रज्ञान आणि भौगोलिक राजकारणावर (geopolitical) आधारित असून त्यातून या दोन महासत्तांमधील स्पर्धेत पायाभूत विसंगती आहे हे दिसून येते. आजवर या दोन मोठ्या राष्ट्रांच्या भौगोलिक विस्ताराच्या सीमा कधीच एकमेकांना ओलांडत नव्हत्या किंवा त्यांच्यात कुठल्याही तर्‍हेचा वाद नव्हता. ५० वर्षांपूर्वी हिमालयाच्या सीमारेषेवर मर्यादित लढाई झाली असली तरी तिच्यामागे पूर्वापार चालत आलेला ऐतिहासिक किंवा वांशिक खुन्नस नव्हता.

भारत आणि चीन यांच्यामधील भौगोलिकदृष्ट्या लक्षवेधक गोष्ट म्हणजे त्यांच्यामधील हिमालयाची अभेद्य भिंत! बुद्ध धर्माचा प्रसार जरी भारतामधून चीनमध्ये झालेला असला तरी तो श्रीलंका व म्यांमारमार्गे दक्षिण चीनच्या युनान प्रांतामधून झाला. (नकाशा पहा) एरवी या दोन देशात सांस्कृतिक अशी देवाणघेवाण अपवादानेच झालेली आहे.

पश्चिमेकडील काश्मीरपासून ते पूर्वेकडील अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या सीमा आखणीवरून दोन्ही देशात तणाव असला तरी या नव्याने सुरू झालेल्या स्पर्धेच्या मुळाशी हा सीमावाद आहे असे वाटत नाहीं. या नव्या स्पर्धेच्या कारणाचे मूळ आहे शस्त्रास्त्रांबाबतच्या नव्या तंत्रज्ञानामुळे या दोन देशांतील प्रत्यक्ष अंतर बदलले नसले तरी "परिणामकारक" अंतर अचानक कमी झाले हे आहे.

तिबेटच्या विमानतळावरील चिनी लढाऊ जेट विमाने भारतावर हल्ले करू शकतात हे खरेच आहे. भारतीय उपग्रहसुद्धा अंतराळातून चीनवर पाळत ठेऊन असतात. या खेरीज हिंदी महासागरात चीन अनेक ठिकाणी अद्ययावत बंदरे विकसित करीत असताना भारत आपल्या नौदलाच्या लढाऊ नौका दक्षिण चिनी समुद्रात पाठवू लागला आहे. म्हणजेच भारत व चीन एकमेकांचे दक्षतापूर्वक निरीक्षण करीत आहेत.दिल्ली आणि बीजिंग येथील युद्धाचे डावपेच आखणारे विशेषज्ञ आता संपूर्ण आशियाखंडाचे नकाशे उलगडून बसले आहेत. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि वेगात लष्करीकरण करत असलेले हे दोन आशियाई देश एकमेकांच्या प्रभावक्षेत्रांवर अतिक्रमण करीत आहेत हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आणि ही प्रभावक्षेत्रे पूर्वी कधीही नव्हती इतकी आता स्पष्ट, रेखीवपणे दिसू लागली आहेत.

केनया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यांमार येथील बंदरविकासाच्या प्रकल्पांतून चीनच्या आर्थिक प्रभावक्षेत्राची होत असलेली वाढ त्या देशाच्या हिंदी महासागर क्षेत्रातल्या वाढत्या प्रभावाची द्योतक आहे आणि याचीही भारताला चिंता आहे.

ही तेढ त्यांच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आणि युरोप-आशियाच्या नकाशावरील त्यांच्या परस्पर भौगिलिक स्थानामुळे निर्माण झालेली असून त्यात भावनेच्या पोटतिडिकेचा लवलेशही नाहीं. या दृष्टिकोनातून पाहिल्यास भारत-चीन स्पर्धेची तूलना अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धकालीन भावनारहित स्पर्धेशी करता येईल.

भारत-चीनमधील त्यामानाने काबूत ठेवलेल्या स्पर्धेबद्दलचे निराळेपण तिची तूलना भारत-पाकिस्तान स्पर्धेबरोबर केल्यास लक्षात येईल. भारतातील भरपूर लोकसंख्या असलेले गंगा नदीचे खोरे पाकिस्तानच्या भरपूर लोकसंख्या असलेल्या सिंधू नदीच्या खोर्‍यापासून केवळ ५०० किमीवर आहे. अशा तर्‍हेची जी भौगोलिक जवळीक भारत-पाकिस्तान स्पर्धेत दिसते ती भारत-चीन स्पर्धेत नाहीं. धार्मिक घटकामुळे जणू भारत-पाकिस्तान स्पर्धेच्या आगीत तेल घातल्यासारखे होते. उत्तर भारताच्या इतिहासातील भारतावर केलेल्या मुस्लिम चढायांतून पाकिस्तानचा एका आधुनिक अवताराच्या रूपात पुनर्जन्म झालेला आहे असा समज पाकिस्तानात आहे. त्यात भारतीय उपखंडाच्या फाळणीच्यावेळी झालेल्या रक्तपातामुळे ही स्पर्धा आणखीच उत्कट आणि भावनावश बनली आहे.

भारत-चीन स्पर्धेत अशा तर्‍हेची अनेक शतके चाललेली भावनोत्कटता नसल्यामुळे या स्पर्धेमुळे धोरण आखणारे दिल्लीतील उच्चभ्रू लोक एका बाजूने खुष आहेत कारण चीनसारख्या एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर असलेल्या राष्ट्राबरोबर भारताची तूलना करण्यात येऊ लागल्यामुळे भारताची शान वाढली आहे असे त्यांना वाटते. आधी भारताबरोबर नेहमी दरिद्री आणि अराजकतेने बजबजलेल्या पाकिस्तानचे नाव जोडलेले असायचे. भारतीय उच्चभ्रूंच्या मनात चीनबद्दल झपाटल्याची भावना आहे. त्या मानाने चीनच्या उच्चभ्रूंना भारताचे इतके महत्व वाटत नाहीं. हे सहाजीकही आहे कारण ही स्पर्धा दोन तोडीच्या राष्ट्रांमधील स्पर्धा आहे व त्यात कमी ताकतीच्या राष्ट्राला बलवान राष्ट्राबद्दल झापटल्यासारखे वाटतेच. ग्रीस व तुर्कस्तानमध्ये अशाच तर्‍हेची असमान स्पर्धा आहे.

भारताच्या संदर्भात चीनची स्वाभाविक, अंगभूत ताकत ही केवळ चीनची भक्कम आर्थिक कुवत किंवा जास्त कार्यक्षम चिनी सरकार नसून त्यात भूगोलाचाही अंतर्भाव होतो. वंशाने "हान" जातीची बहुसंख्य चिनी प्रजा चीनच्या शुष्क पठारी भागात वसलेल्या आणि "हान" नसलेल्या अल्पसंख्य चिनी प्रजेने वेढलेली आहे. त्यात आतला (Inner) मंगोलिया, उइघूर तुर्क आणि तिबेट येथील जनतेचा समावेश होतो. त्याचबरोबर चीन सध्या आपल्या सीमेवरील त्याला धोकादायक वाटणार्‍या राष्ट्रांबरोबरचे तंटे सोडविण्याच्या मागे आहे आणि म्हणूनच चिनी सरकारने अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवर नियंत्रण रहावे म्हणून या (हान नसलेल्या) अल्पसंख्यांकाना चीनमध्ये सामावून घेतले आहे.

या उलट केवळ अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तानच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश यासारख्या कमजोर राष्ट्रांबरोबरच्या खूप लांबीच्या आणि असुरक्षित अशा सीमांचा भारताला उपद्रव आहे. कारण या राष्ट्रांकडून भारताला निर्वासितांच्या रूपाने उपद्रव होतो. या खेरीज पूर्व आणि मध्य भारतात माओवादी नक्षली बंडाळीची डोकेदुखीही आहेच. परिणामत: भारत आपल्या नौसेनेद्वारे हिंदी महासागरात जरी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत असला व चीनविरुद्ध एक तर्‍हेची तटबंदी उभी करत असला तरी भारतीय लष्कराला वर उल्लेखलेल्या देशांबरोबरच अंतर्गत समस्यांमुळे एक तर्‍हेची बंधने आहेतच.

नेपाळ, बांगलादेश, म्यांमार आणि श्रीलंका या देशावरील प्रभावासाठी चीन आणि भारत आपापसात एक प्रकारे खेळत असतातच. तसे पाहिल्यास हे सर्व देश भारतीय उपखंडात मोडतात म्हणजेच चीन आपला संघर्ष भारताच्या अंगणात आणू पहात आहे.

अफगाणिस्तानचे भवितव्य ज्याप्रमाणे भारताच्या दृष्टीने एक निर्णायक कसोटी ठरणार आहे त्याचप्रमाणे उत्तर कोरियाचे भवितव्य हे चीनसाठी निर्णायक कसोटी ठरणार आहे. हे दोन्ही देश भारताच्या आणि चीनच्या शक्तीला आणि साधनसंपत्तीला एक प्रकारची सततची गळतीच आहेत. पण इथे भारताची अफगाणिस्तानबरोबर सीमा नसल्यामुळे तो सुदैवी आहे. या उलट चीन आणि उत्तर कोरिया यांच्यात सामायिक सीमारेषा आहे. अमेरिकेने सैन्य बाहेर काढल्यावर जो हलकल्लोळ अफगाणिस्तानात माजेल त्याचा भारतावर कमी परिणाम होईल पण उत्तर कोरियाच्या सत्तेचा गुंता सोडविताना चीनवर प्रचंड परिणाम होईल कारण कोट्यावधी निर्वासित चीनच्या मांचूरिया भागात घुसण्याची शक्यता आहे.

२०३०च्या सुमारास भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल पण भारतीय लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण चीनपेक्षा जास्त असेल. त्यामुळे भारताचे भवितव्य जास्त उज्ज्वल वाटते. भारताची लोकशाही कितीही अकार्यक्षम असली तरी तिला मूलभूत कायदेशीर "औरसपणा"च्या समस्येला तोंड द्यावे लागत नाहीं. पण चिनी सरकार हुकुमशाही मार्गाने सत्तेवर आलेले असल्यामुळे चीनला औरसपणाच्या मूलभूत समस्यांना तोड द्यावे लागू शकेल.

शेवटी प्रश्न रहातो तिबेटचा. भारत आणि चीन यांच्यातील टक्कर हिमालय पर्वताच्या सीमेवर भिडली आहे व त्यात तिबेट भारतीय उपखंडाच्या सीमेवर एकाद्या धक्काशोषकासारखा (buffer, shock-absorber) उभा आहे. त्याचा भौगोलिक फायदा भारताला मिळतो.

चीनचा तिबेटवरील प्रभाव कमी झाल्यास त्याचा भौगिलिक आणि राजकीय फायदा भारताला मिळेल. भारताने तिबेटच्या दलाई लामाला राजाश्रय दिलेला आहे. तिबेटमधील चीनविरोधी उघड असंतोष चीनच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे तर त्याचा भारताला फायदा आहे. जर चीनला तिबेटमध्ये गंभीर उठावाला तोंड द्यावे लागले तर भारताचा तेथील प्रभाव दिसू येण्याइतका सुधारेल. थोडक्यात चीन आज जरी जास्त मोठी सत्ता वाटत असला तरी या स्पर्धेत भारताच्या बाजूनेसुद्धा अनेक अनुकूल घटक आहेत.

भारत आणि अमेरिका आज औपचारिक रीत्या मित्रराष्ट्रे नाहींत. समाजवादकडे झुकणारे आणि राष्ट्रवादी असलेले भारतीय राजकीय नेतृत्व असे कधीही होऊ देणार नाहीं. पण युरोप आणि आशियाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हिंदी महासागराच्या किनार्‍यावरील भारताच्या स्थानामुळे भारताची लष्करी आणि आर्थिक वाढ अमेरिकेच्या दृष्टीने फायद्याची ठरते कारण भारत चीनला प्रतिशह देऊ शकतो. आज अमेरिका पश्चिम गोलार्धात एक प्रभावी महासत्ता आहे आणि म्हणूनच पूर्व गोलार्धात दुसर्‍या एकाद्या महासत्तेचा उदय तिला नको आहे. भारत चीनला तोडीस तोड बनल्यास एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावरील बोजा कमी होईल व ही एक भारत-चीन स्पर्धेतील जमेची गोष्ट आहे! (पुढील मजकूर भाग-२ मध्ये दिलेला आहे.)

Stratforवर प्रसिद्ध झालेला मूळ इंग्लिश लेख खालील दुव्यावर वाचता येईल:
http://www.stratfor.com/analysis/india-china-rivalry-robert-d-kaplan?utm...

Comments

संपादकांना तसदी घ्यावी लागेल याबद्दल क्षमस्व!

चौथा परिच्छेद चुकला आहे, बरोबर मजकूर असा हवा
चीनच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्याा आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या भारताच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रमुख देश आहेत.
चुकीचा मजकूर
भारताच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्‍या आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रचंड देश आहेत.
स्वसंपादनाची सोय नसल्यामुळे कुणा संपादकांना तसदी घ्यावी लागेल याबद्दल क्षमस्व!
----------------
सुधीर काळे

आता बदल करून दिलेले आहेत. -संपादन मंडळ

चूक दुरुस्त केल्याबद्दल संपादकमंडळाला मनःपूर्वक धन्यवाद

चूक दुरुस्त केल्याबद्दल संपादकमंडळाला मनःपूर्वक धन्यवाद
----------------
सुधीर काळे

चांगला पूर्वार्ध

भारत आणि चीन यांच्यातील इतिहास, स्पर्धा आणि नाते याचा पूर्वार्धात चांगला आढावा घेतला आहे. पाकिस्तानचा अस्थिरपणा आणि त्याचे भारताशी संबंध यावरही लेखकाने चांगला प्रकाश टाकलेला आहे. असे असतानाही काळे पाकिस्तानशी भारताने मैत्री करावी असे म्हणतात याची गंमत वाटते.

ज्याप्रमाणे चीनला भारताशी मैत्रीची गरज नाही त्याच प्रमाणे भारताला पाकिस्तानच्या मैत्रीची गरज नाही (शांती कराराची गरज नक्कीच आहे) असे मला अद्यापही वाटते.

पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.

आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे लेखातच आहेत

प्रियाली मॅडम,
आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे लेखातच आहेत.
(१) "भारतातील भरपूर लोकसंख्या असलेले गंगा नदीचे खोरे पाकिस्तानच्या भरपूर लोकसंख्या असलेल्या सिंधू नदीच्या खोर्‍यापासून केवळ ५०० किमीवर आहे." विरुद्ध "भारत आणि चीन यांच्यातील टक्कर हिमालय पर्वताच्या सीमेवर भिडली आहे व त्यात तिबेट भारतीय उपखंडाच्या सीमेवर एकाद्या धक्काशोषकासारखा (buffer, shock-absorber) उभा आहे. त्याचा भौगोलिक फायदा भारताला मिळतो."
(२) २०३०च्या सुमारास भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल पण भारतीय लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण चीनपेक्षा जास्त असेल. त्यामुळे भारताचे भवितव्य जास्त उज्ज्वल वाटते.
(३) भारताची लोकशाही कितीही अकार्यक्षम असली तरी तिला मूलभूत कायदेशीर "औरसपणा"च्या समस्येला तोंड द्यावे लागत नाहीं. पण चिनी सरकार हुकुमशाही मार्गाने सत्तेवर आलेले असल्यामुळे चीनला औरसपणाच्या मूलभूत समस्यांना तोड द्यावे लागू शकेल.
(४) तिबेटमधील चीनविरोधी उघड असंतोष चीनच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे तर त्याचा भारताला फायदा आहे. जर चीनला तिबेटमध्ये गंभीर उठावाला तोंड द्यावे लागले तर भारताचा तेथील प्रभाव दिसू येण्याइतका सुधारेल.
शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे! चीनपर्यंत पोचणारी प्रक्षेपणास्त्रे भारताकडे आता पर्यंत नव्हतीच त्यामुळे भारताकडे कांहींसे दुर्लक्ष करणे चीनला परवडत होते, पण आता नाहीं. भाग-२ मध्ये चीनला वाटणारी अस्वस्थता खूपच स्पष्ट दिसते. एक-दोन दिवसात भाग-२ इथे देत आहे.

 
^ वर