वैदिक संस्कृतीतील व्यापार

भारताला धार्मिक आणि सामाजिक इतिहासाइतकाच प्राचीन व समांतर असा व्यापारी इतिहासही आहे. त्याच्या पाऊलखुणा अगदी वैदिक संस्कृतीपासून आढळतात.

आर्य हे बाहेरुन आले होते, की इथलेच होते, या मुद्याला बगल देऊन आपण थेट आदिवेद ऋग्वेदाकडे वळू.

व्यापारात पडण्यापूर्वीची सामाजिक स्तरावरील पहिली पायरी म्हणजे संपत्ती मिळण्याची आकांक्षा निर्माण होणे. वेदांच्या सुरवातीच्या काळात समाजाची याबाबतची अनुकूल भूमिका तयार होत असल्याचे दिसते. वेदांतील बहुतेक ऋचा या विविध ऋषींनी आणि वेगवेगळ्या काळात रचलेल्या असल्या तरी त्यात तत्कालीन देवतांकडे काही ना काही मागणे समाजाच्या वतीने केलेले दिसून येते. उदाहरणार्थ - अदितीपुत्र भग ही देवता संपत्ती देणारी आहे, हे मानून तिच्याकडे दिवसाची पहिली प्रार्थना केली आहे. सकाळी उठल्यावर प्रथम म्हणण्याच्या प्रातःस्मरण सूक्तात म्हटले आहे (ऋग्वेद मंडल ७)

भग प्रणेतर्भग सत्यराधो भगेमां धियमुदवा ददनः
भग प्र णो जनय गोभिरश्वैर् भग प्र नृभिर्नृवन्तः स्याम्

(हे भगदेवा, तू थोर नेता आहेस. स्थिरधन आहेस. तू ही आमची स्तुती फलदायी कर. आम्हाला गाई-घोड्यांनी संपन्न कर आणि हे भगदेवा, परिवार जनांनी आम्ही प्रजावत्सल व लोकसंग्रही होऊ असे कर.)

ही ऋचा वाचल्यावर स्पष्टपणे जाणवते, की तत्कालीन वैभव म्हणजे गोधन-अश्वधन मानले आहे. यात इतर धनसंपत्तीचा उल्लेख नाही कारण हा काळ समाज स्थिरावण्यापूर्वीचा आहे. याच काळात वस्तुविनिमय प्रचलित होता आणि चलन म्हणून गाई व घोड्यांचा वापर होत असे. (बैल, गाढवे, बकरे आणि कुत्रे पाळले जात. मृगयेला (शिकारीला) महत्त्वाचे स्थान होते. पण त्यांचा वापर विनिमयासाठी होत नसावा.) गृह्यसूत्रातील बहुतेक सूत्रांमध्ये 'आम्हाला भरपूर गोधन प्राप्त होऊ दे' अशा ऋचा आहेत. वैदिक समाजात प्रथम तीनच वर्ण होते. ते परस्पर सहाय्यक आणि एकमेकांचा योगक्षेम चालवणारे होते. यातील तिसर्‍या म्हणजे वैश्य वर्णाकडे शेती व व्यापार ही कामे सोपवली होती. त्या काळात व्यापार होता, याचा पुरावा आपल्याला गृह्यसूत्रातच पाहायला मिळतो. 'व्यापारात यश प्राप्त व्हावे', यासाठीचा यज्ञविधी आणि प्रार्थना या गृह्यसूत्रात आहेत. वैदिक समाजाला लोह धातू ठाऊक होता आणि त्याचा वापरही ते करत असत. ऋग्वेदातच लोहशस्त्रयुक्त रथाचा उल्लेख सापडतो. ज्याअर्थी दुसरा क्षत्रिय वर्ण घोडे, रथ आणि लोहशस्त्रे वापरत होता त्याअर्थी ही शस्त्रे तयार करणारेही कारागीर असलेच पाहिजेत. (जसे वस्त्र होते म्हणजे विणकर असणारच, रथ होते म्हणजे सुतार असणारच) त्यामुळे वैदिक संस्कृतीत वस्तुविनिमयाप्रमाणेच उद्योगशीलताही होती, हे समजून येते.

वैदिक समाज सुपीक प्रदेशात स्थिरावल्यावर शेती करु लागला आणि गाई व घोड्यांच्या चलनात धान्य व भूमिजन्य उत्पादनांची भर पडली. शेतीप्रमाणे खनिकर्म हेही वैश्यांकडे सुपूर्द केल्याने तसेच वैश्यांचा अन्य संस्कृतींशी व्यापार असल्याने इतर धातूंची ओळख याच वर्णाकडून पहिल्या दोन वर्णांना झाली असावी. सुवर्ण हा मौल्यवान धातू आहे आणि त्याचा उपयोग चलन म्हणून करता येईल, हे वैदिक संस्कृतीने लवकर ओळखले. त्यामुळे गाई-घोडे-धान्य याबरोबरच सुवर्ण हेही विनिमयाचे साधन ठरले. 'निष्क' हे यातील सुवर्णनाणे प्रसिद्ध होते. शतपथ ब्राह्मणात व महाभारतात चलनी नाणे व संपत्तीच्या मोजमापाचे साधन म्हणून 'निष्का'चा उल्लेख बर्‍याचदा येतो. अर्थात त्याचवेळी मना, हिरण्य, सुवर्ण, शतमान आणि पण ही अन्य सुवर्णनाणीही प्रचलित होती, असे भारतीय संस्कृतीकोश म्हणतो. यातून घेण्याचा बोध म्हणजे व्यापारासाठी आवश्यक तो चलन विनिमयही वैदिक संस्कृतीत प्रचलित होता. व्यापारामध्ये येथून प्रसाधन द्रव्ये, चंदन व हस्तिदंताची निर्यात होई तर उत्तम जातिवंत घोडे व आभूषणे आयात होत.
वैदिक समाजाला शेती, पाऊस, जलसाठे, शुद्ध जल यांचे महत्त्व ठाऊक होते. पावसाचा अधिपती इंद्र, जलाचा अधिपती वरुण यांना प्रार्थनांमध्ये आवाहन केले जाई. वेदांतील जी राष्ट्रीय प्रार्थना आहे त्यात 'निकामे निकामे न पर्जन्य वर्षतु' असे मागणे मागितले आहे. पाऊस कोरडा जाऊ नये, हे मागणे केवळ शेतीसाठी नव्हे, तर शेतकरी (वैश्य वर्ण) व त्यांवर अवलंबून असलेले इतर वर्ण (समाजघटक) यांच्या कल्याणासाठी मागितलेले आहे.

Comments

चौथा वर्ण

वैदिक समाजात प्रथम तीनच वर्ण होते.

चौथा शूद्र वर्ण नेमका कधी उदयास आला असावा?
प्रकाश घाटपांडे

उत्तम...

थोडेस्से अधिक विस्तृत लिहिले असतेत तर बरे वाटले असते.
भाग् मोठा हवा होता.
ह्या भागाबद्दलः-
व्यापारासाठी जे दोन स्थिर समाज लागतात देवाण-घेवाण करणारे ते अजूनही पूर्ण स्थिरस्थावर व्हावयाच्या काळातील हे वर्णन वाटते.
हे लोकईस्टॅब्लिश झाल्यावर अधिक गरजा वाढतील व व्यापार वाढेलसे वाटते.
--मनोबा

ऋग्वेदात लोखंड?

वैदिक समाजाला लोह धातू ठाऊक होता आणि त्याचा वापरही ते करत असत. ऋग्वेदातच लोहशस्त्रयुक्त रथाचा उल्लेख सापडतो.

ऋग्वेदात सोने, तांबे आणि कास्याचा उल्लेख आहे. पण लोखंडाशी ओळख बहुधा1 उत्तर वैदिक काळात झाली. या काळातल्या साहित्यात टिन, शिसे, चांदी इत्यादी धातूंचा उल्लेख आढळतो.

ऋग्वेदात नमूद झालेल्या पेशांची संख्या कमी आहे. पण उत्तर वैदिक काळात पेशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. सुवर्णकार, धातुकाम करणारे, विणकर, रंगारी, टोपल्या बनविणारे, सुतार आणि कुंभार अशा अनेक कारागिरांचा आणि पेशांचा उदय ह्या काळात झाला. एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीचे ह्या काळात बऱ्यापैकी अस्तित्व असावे. कारण डोंबारी, सामुद्रिक, बासरीवादक, नर्तकांचा उल्लेख आहे. तसेच सावकारांचाही उल्लेख आहे. व्यापार वाढला असला तरी त्या काळात नाणी 2 आढळत नाहीत.

असो. तूर्तास एवढेच. चूभूदेघे. विषय चांगला आहे.

1. त्या काळात लोखंडाचा वापर होता हे सिद्ध करणारे पेंटेंड ग्रे वेअर मात्र आढळलेले नाही.
2. 'निष्क' चा दुसरा अर्थ दागिन्यांशी संबंधित आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

निष्क, द्रम्म

निष्क, द्रम्म ही मू़ळची ग्रीको रोमन नाणी. द्रम्मवरून दाम, दमडी ही एकके/ नाणी आली. त्यांच्याविषयी पूर्वी येथे चर्चा झाली होती. या चर्चेशी संबंधित ती चर्चा वाटल्याने दुवा देते.

द्रम, दिनार

निष्क, द्रम्म ही मू़ळची ग्रीको रोमन नाणी.

निष्क ही संज्ञा फार सैलपणे वापरतात असे वाटते. त्यात सुवर्णमुद्राही आल्या आणि दागिनेही आले. पण निष्कचा संबंध ग्रीकांशी नसावा.

द्रम्मवरून दाम, दमडी ही एकके/ नाणी आली.

द्रम्मवरून आठवले की दिनार हा शब्दही ग्रीक भाषेद्वारा आला आहे. मूळ शब्द ' दिनेरियस' लॅटिन आहे.

जाता-जाता: वैदिक काळ आणि व्यापार म्हटले की 'पणि' हा शब्द आठवतोच. हा व्यापारांचा वर्ग होता. 'पणि'वरूनच 'पणन' हा शब्द आला आहे हे जाणकारांना माहीत असेलच.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

निष्क

निष्क ही संज्ञा फार सैलपणे वापरतात असे वाटते. त्यात सुवर्णमुद्राही आल्या आणि दागिनेही आले. पण निष्कचा संबंध ग्रीकांशी नसावा.

माझी गफलत झालेली दिसते किंवा पूर्वी वाचलेले आता आठवत नाही. बघते.

'पणि' हा शब्द आठवतोच. हा व्यापारांचा वर्ग होता.

या वर्गाची वैशिष्ट्ये कोणती?

टोळीही असावी काय?

पणि लोकांकडची (चोरलेली? त्यांच्या मालकीची?) गुरे इंद्राकरिता आणण्यासाठी सरमा नावाची दुती जाते. (ती कुत्री आहे, असे मानतात.) पणि आणि सरमां यांच्यातला संवाद ऋग्वेदातल्या १०.१०८ सूक्तात आहे.

त्या एका सूक्तात तरी पणींच्या व्यापाराबद्दल उल्लेख नाही. त्यामुळे गुरे बाळगणारी एक "पणी" टोळीदेखील असावी.

अन्यत्र मात्र त्यांचा व्यापारी म्हणून उल्लेख आहे.

पण हे एकक

१६ पण= १ द्रम्म. पण हे एकक या पणिंशी संबंधित तर नव्हे? पण्य म्हणजे वस्तु ना?

(अंदाजपंचे)प्रियाली.

कार्षापण

कार्षापण म्हणजेच पण. शतमान, कार्षापण, माशा, काकिणी ही नाणी ख्रिस्तपूर्व 6 व्या शतकापासून काही शतके अस्तित्वात होती. ही पंच मार्क्ड नाणी कोरीव नव्हती.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

यांचा तपशील भारतीय नाणकशास्रात आहे...

वैदिक काळापासूनच्या नाण्यांचा तपशील, वेळोवेळी त्यांचे बदललेले मूल्य आणि अन्य चलनांच्या तुलनेतील विनिमय मूल्य, हा तपशील भारतीय नाणकशास्त्राच्या इतिहासात आहे. अर्थात तोही बराच सविस्तर आहे.

पणी ही छोटी टोळी किंवा जमात नसून व्यापार्‍यांचा संघ असावा आणि 'पण' हे चलन त्यांनी रुढ केले असावे. अर्थात हा माझा तर्क आहे कारण त्या काळात वैश्यांना व्यापाराच्या सोईसाठी स्वतःची नाणी पाडण्याची मुभा होती.

कयास

'पणि' धनवान होते, पण पुरोहितांचे कधी आश्रय-अनुग्रह देण्यास नकार देत आणि वरून आर्यांची गाईगुरेही पळवीत. पण असे असले तरी ते आर्यांसाठी 'दास' लोकांएवढे द्वेष्य नव्हते. 'पणि' हे सेमिटिक वंशाचे व्यापारी होते असा कयास आहे.

प्राचीन भारतातील आर्थिक संस्था

प्राचीन भारतातील आर्थिक संस्थांवर एक लेख इथे मिळाला. त्याचे संदर्भ तपासलेले नाहीत.

दुवा

माझ्या वरल्या प्रतिसादात दुवा उमटलाच नाही. तो दुवा येथे देते.

छान.. काही प्रश्न

चांगली माहिती.
१. मला अनेक दिवस एक प्रश्न आहे. सुवर्ण 'मोहरा' म्हणजे 'नाणी'च का इतर काहि चलन होते?
२. शिवाय वर व्यक्त केलेला काळ साधारणतः कुठला असावा. ?
३. सुरवातीला व्यापार हा 'लाभा'साठी होता का सोय म्हणून?

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

मला वाटतात अशा शक्यता

मला वाटतात अशा शक्यता :

१. शिक्का असलेल्या धातूच्या तुकड्याला "मोहर" म्हणत असावे. सोन्याचीच असण्याची गरज सर्व देशांत किंवा सर्व काळात नसावी.
२. ...
३. "लाभ" आणि "सोय" यांत नेमका फरक काय आहे? "सोयी"ची पुन्हा देवाणघेवाण करता येत नाही (विनिमय नाही), आणि "लाभा"ची पुन्हा देवाणघेवाण करता येते, असा अर्थ आहे काय?

व्यापाराच्या विकासाचा काळ..

ऋषिकेश,
१) सुरवातीला फक्त वस्तुविनिमय (बार्टर) होता. वैदिक संस्कृतीत गोधन आणि अश्वधनाचे महत्त्व असल्याने प्रारंभीचा विनिमय गाई व घोड्यांच्या बदल्यात होई. ब्राह्मणांना यज्ञात दक्षिणा म्हणून गाई दिल्या जात. क्षत्रिय व वैश्य यांना तर गोपालनाचा हक्कच होता. एकमेकांचे गोधन पळवणे हेही चालत असे. पणि या वैश्य जमातीने इंद्राचे गोधन पळवणे किंवा महाभारतात विराटाचे विपुल गोधन कौरव-पांडवांनी लुटणे यावरुन गाईंना विनिमयासाठी महत्त्व होते. त्याखालोखाल अश्वांना. पण अश्वांचा उपयोग केवळ क्षत्रियांना असल्याने घोडे हे सार्वत्रिक चलन नव्हते. बाकी बैल, मेंढे, खेचरे व कुत्रे पाळले जात. त्यात बैल शेती व ओझे वाहण्यासाठी, मेंढा (बकरा) हा बळी देण्यासाठी व खाण्यासाठी, खेचरे वैश्यांना माल वाहून नेण्यासाठी व कुत्रे हे प्रामुख्याने गोधनाचे रक्षण करण्यासाठी व शिकारीत उपयुक्त म्हणून असत. पुढे शेतीचे तंत्र अंगवळणी पडल्यावर आणि धान्योत्पादन सुरु झाल्यावर हा विनिमय धान्याच्या रुपात सुरु झाला. सुवर्णनाणी खूप नंतर विनिमयात आली. पण लेखात लिहिल्याप्रमाणे अन्य चलनेही अस्तित्वात होती. कवड्या हे सर्वसामान्यांचे चलन असू शकेल. (कवड्यांची नेमकी सुरवात कधी झाली, हे माझ्या वाचनात नाही)

२) हा काळ वैदिक समाज सुपीक प्रदेशात स्थिरावण्याचा आहे.

३) व्यापारात कोणत्याही काळात (अगदी आजही) 'इतरांची सोय, स्वतःचा लाभ' हे तत्त्व पाळले जाते. (लाभ आणि लोभ यातील मर्यादा ज्याने त्याने आखावी) वैदिक समाजात संपत्ती प्राप्तीची इच्छा निर्माण झाल्यावर त्याला अनुकूल लाभाचे व्यवसायही नैसर्गिकरीत्या विकसित झालेले आढळतात. ज्यांच्याकडे अतिरिक्त धन साचले त्यांनी ते कर्जाऊ द्यायला सुरवात केली व सावकार ही संस्था उदयाला आली. रात्रिसूक्तात म्हटले आहे, की
उप मा पेपिशत्तमः कृष्णं व्यक्तमस्थित, उष ऋणेव यातय
(जणू देहाला चिकटणारा काळाकुट्ट अंधार मला वेढून राहिला आहे. हे उषादेवते असह्य असे कर्ज फेडावे तसे त्याला घालवून टाक.)

यावरुन कर्ज देणे, त्याची फेड करणे हे व्यापाराला आवश्यक असलेले साधनही रुढ होते, इतके लक्षात येते.

लाभ ऐवजी नफा

लाभ शब्द चुकला (असे म्हणता यावे). मला 'नफा' म्हणायचे होते.

त्याकाळी व्यापार हा 'नफा मिळविण्यासाठी' (हा उद्देश) होता की बार्टर असल्याने एकमेकांची सोय (हा उद्देश) अन् त्यायोगे झालाच तर नफा (हे बायप्रोडक्ट) अश्या दृष्टीकोनातून प्रश्न होता.
हा प्रश्न यासाठी पडला की जर सोय हा उद्देश असेल तर नफा मिळवणे हा उद्देश आपोआप झाला की याची समज भारतीयांना 'बाहेरील' व्यापार्‍यांबरोबर व्यापार केल्यावर आली? म्हणजे शेती ही भूक भागवण्यासाठी केली जात होती की विक्रीचे उद्दीष्ट ठेऊन?

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

गरज प्रथम भागवली जाते, नफा शिलकीतून येतो..

<<शेती ही भूक भागवण्यासाठी केली जात होती की विक्रीचे उद्दीष्ट ठेऊन?>>

अर्थातच शेतीची सुरवात, ही समाजाची भूक भागवण्याची गरज म्हणूनच झाली होती. पण शेतीत पिकणारे धान्य गरजेपेक्षा जास्त येते, ते साठवता येते आणि अन्य गरजूला वस्तू/सेवांच्या मोबदल्यात देताही येते, हे लक्षात आल्यावर हे धान्य आणि भूमिजन्य इतर उत्पादने (फळे/फुले/औषधी वनस्पती) हे विनिमयाचे (विक्रीचेही) साधन बनले. शिलकी उत्पादनांमधून नफा कमवणे, हे पुढचे पाऊल ठरते. जसे सावकार हा घटक रुढ झाला कारण त्यांच्याकडे शिलकी साठा (धान्य/धनाचा) अधिक होता. इथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे.

वैदिक समाजात मनुष्यबळाची गरजही तीव्र होती. म्हणूनच ऋग्वेदातील प्रार्थनांमध्ये गाई-घोडे याप्रमाणे आमचे कुटूंब वाढो आणि आम्ही प्रजावत्सल व लोकसंग्रह करणारे होवोत, असे मागणे मागितले आहे. असो. प्रारंभीच्या ऋचांमध्ये बाहेर जाण्याचा उल्लेख आढळला नाही म्हणजे व्यापाराचा विकीसही प्रथम समाजांतर्गत विनिमय (इंटर्नल ट्रेड) आणि नंतर अन्य संस्कृतीतील वैश्य गटांशी संपर्क आल्यावर बाह्य विनिमय (एक्स्टर्नल ट्रेड) या दिशेने झालेला दिसतो.

मला गंडिवलं...

धागा सुरु करा आसं सांगून मनोबा पळून गेले.
उपक्रमी मित्रबी यकाद् दुसरा प्रतिसाद दिऊन गप्प बसल्याती. काई शेअर करीनासं झाल्यात.
प्रवचन फुडं चालवायचं का ?

गेलो नाही....

आहे इथेच. वाचतो आहे. मालिका पुढे जाईल तेव्हा माझ्याकडे असेल ते इथे ओतत जाइन.सध्यातरी अधिकची माहिती नाही.
पण हो, वाचण्यात रस आहे. बर्‍याच शंका होत्या; काहिंबद्दल माहिती मिळते आहे.

--मनोबा

तसं नाही

मनोबा येतील. ते प्रश्न देऊन गेले आहेत. चर्चा थंडावत असेल तर त्यांच्या प्रश्नातील पुढला प्रश्न निवडा. चर्चा सुरू झाली की बाकीचे येतील.

तूर्तास तुम्ही भारतीय नाणकशास्त्राच्या इतिहासाविषयी अधिक सांगा. हा इतिहास डॉक्युमेंन्टेड (म्हणजे सद्य काळात कोणी लिहिला) आहे का?

हो पुस्तक आहे त्यावर..

'भारताचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास' या पुस्तकात एक अख्खे दीर्घ प्रकरण भारतीय नाणकशास्त्रावर आहे. त्याखेरीज कोश व अन्य पुस्तकांतून संकलित केलेल्या नोंदी माझ्याकडे आहेत. नाणी, मुद्रा, शिलालेख, दानपत्रे, लेण्यांतील शिल्पे आणि उत्खननात सापडलेल्या वस्तू हे इतिहासाच्या जवळ जाण्याचे विश्वासार्ह साधन आहे. त्याबद्दलही लिहीन.

एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्व चलनांच्या इतिहासाची माहिती देणारे एक इंग्रजी पुस्तक माझ्या संग्रहात आहे, पण त्यात भारतीय प्राचीन नाणी (अगदी रुपयाचाही अलिकडच्या काळातील इतिहासाचा उल्लेखही नाही)

भारतीय प्राचीन नाणी

रुपया नको तो तसा पुढला पण प्राचीन नाण्यांवर अधिक माहिती द्या. निष्कांचा एक फोटो जालावर मिळाला. हे चलन म्हणून वापरत की दागिने म्हणून ते मात्र कळत नाही.

वैदिक संस्कृतीचा काल

श्री योगप्रभू यांना वैदिक संस्कृती म्हणजे काय म्हणायचे आहे ते नेमके समजू शकले नाही.
कालखंडाप्रमाणे वैदिक संस्कृतीची व्याख्या करण्याचा प्रयत्न असेल तर इ.स. पूर्व ३५०० ते १३०० हा कालखंड सिंधू खोरे संस्कृती काल समजला जातो. या कालाच्या पूर्व कालामध्ये भारतीय उपखंडात शेतीवर उपजिवीका करणारा समाज नव्हता फक्त शिकारी समूह रहात होते. त्यामुळे व्यापार चालू असणे कठिण आहे. (सिंधू खोर्‍यातील मोहेंजोदारो सारख्या वसाहतींचा मध्य पूर्वेबरोबर व्यापार चालत असे.) इ.स. १३०० च्या पूर्व कालाला वैदिक संस्कृती काल असे म्हणणे शक्य नाही. या पुढील कालखंडालाच फक्त या पद्धतीने वैदिक कालखंड म्हणणे शक्य आहे.
या शिवाय दुसर्‍या एका पद्धतीनेही वैदिक संस्कृतीची व्याख्या करणेही शक्य आहे. वेद हे धर्मग्रंथ मानणारी आर्य संस्कृती ती वैदिक संस्कृती असा अर्थही लावणे शक्य आहे. या पद्धतीमध्ये कालखंड व ज्या स्थानावर किंवा प्रदेशात ही संस्कृती अस्तित्वात होती तो प्रदेश हे विचारात घेता येणार नाहीत कारण इ.स. पूर्व ४००० ते इ.स. १००० एवढा मोठा कालखंड व मध्य एशिया ते इराण व भारत एवढा मोठा भू प्रदेश विचारात घ्यावा लागेल व कोणतेच निष्कर्ष काढता येणार नाहीत.
तरी श्री. योगप्रभू यांना वैदिक संस्कृती म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे हे कळणे त्यामुळेच महत्वाचे ठरते.
Learning is not compulsory... neither is survival.

आला..आला... वादग्रस्त मुद्दा आला

मी लेखाच्या सुरवातीलाच लिहिले होते, की 'आर्य बाहेरुन आले, की इथलेच होते' या वादात न पडता आपण थेट आदिवेद ऋग्वेदाकडे जाऊ. याचे कारण पाश्चात्य विद्वानांनी आपल्या माथ्यावर थोपलेले 'आर्य-अनार्य-द्रवीड-सिंधु' असे सांस्कृतिक भेद चुकीचे असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. आर्य अशी कोणतीही जात/समूह नव्हता. आर्य हे एक भाषिक संबोधन असून ते 'सर्वश्रेष्ठ/आदरणीय' अशा अर्थाने वापरले जात असे. खरे तर ही एकच वैदिक संस्कृती होती जिच्याअंतर्गत भिन्न उपासक/पंथ/वांशिक गट एकत्र नांदत होते आणि प्रसंगी एकमेकांशी संघर्षही करत होते.
सिंधु संस्कृती हा वैदिक संस्कृतीचाच एक भाग होता. वैदिक संस्कृती ही फार मोठ्या भूप्रदेशात विस्तारली होती. जिथेजिथे उत्खनने झाली आहेत तिथे यज्ञकुंडे सापडली आहेत. (तुर्कस्तानात अलिकडेच झालेल्या उत्खननात यज्ञकुंड व डोक्यावर शेंडी रुळणारा ब्राह्मणाचा पुतळाही सापडला आहे.)
वेद हे कुणा एकाची निर्मिती नाही. अनेक ऋषींनी त्यांना स्फुरलेल्या ऋचांचे ते एक संकलन आहे. त्यात वेदकालातील स्त्रियांचेही योगदान आहे. पुन्हा हे संकलन एकाच काळात झालेले नाही. शतकानुशतके त्यात भर पडत गेली आहे. अखेर या संकलनाचे स्वरुप एवढे व्यापक झाले, की ते लक्षात ठेवण्यास अवघड पडू लागले म्हणून व्यासांनी त्याचे सोयीसाठी चार वेदांत विभाजन केले आणि ओघानेच ब्राह्मणांचेही चार वर्गात विभाजन झाले. वेदांचे कर्ते ऋषी हे विविध भूप्रदेशात राहिलेले असल्याने त्या त्या स्थानिक संस्कृतींची/उपास्यदैवतांची आणि चालीरीतींची वर्णने वेदांमध्ये आढळतात. वैदिक समाज हा यज्ञप्रधान होता. आपल्या इष्टदैवताला यज्ञात हविर्भाग देऊन संतुष्ट करणे व त्याद्वारे संरक्षण व समृद्धीची कामना करणे, हे त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान होते. हा यज्ञांचा पसारा पुढे इतका वाढला, की अगदी प्रत्येक व्यक्तीला त्याची अडचण वाटू लागली. त्यातूनच आपली एक उपास्यदेवता आणि तिच्या अनुषंगाने ठराविक यज्ञ करणारे गट उदयाला आले. वैदिक संस्कृतीत एकाचवेळी सूर्यपूजक, अग्निपूजक, वरुणपूजक, इंद्रपूजक, रुद्रपूजक, मातृदेवता (अदिती)पूजक, असुर, नाग, गंधर्व, पिशाच्च, यक्ष असे अनेक समूह होते. त्यांचे भूप्रदेशही वेगळे होते. अविकसित समूहांना श्रेष्ठ संस्कृती शिकवण्यासाठी (कृण्वन्तो विश्वमार्यम) जे संघर्ष झाले त्यातूनच या विविध समूहांत युद्धेही झाली. अनेक ठिकाणी अभिसरण/देवाणघेवाण झाली.
सिंधु नदीच्या काठांवर राहाणारा समाज सिंधु नदी, जलाचा स्वामी वरुण यांचा पूजक होता. आजही सिंधी लोकांमध्ये या जलाधिपती वरुणाची (झुलेलाल) पूजा केली जाते. वरुण ही वेदांमधील एक प्रमुख देवता आहे. त्यामुळे सिंधु संस्कृती ही वैदिक संस्कृतीचाच एक भाग होती. सिंधुपलिकडील प्रदेशात अग्निपूजक समूह होते. (इराणमधील लोक आजचे पारशी)

थोडेसे अलिकडच्या काळाचे उदाहरण देऊन असे म्हणता येईल, की पाश्चिमात्य विद्वानांनी वेदांचा/संस्कृतचा स्वतःच्या स्वार्थासाठी हवा तसा अर्थ लावून चुकीचा इतिहास आपल्या डोक्यावर थोपला आणि गुलाम म्हणून आपण तो मान्य करत गेलो. समजा उद्या कुणी आपल्याला सांगू लागले, की भारतात हिंदी आणि हिंदेतर अशा भाषा बोलणारे दोन समाज आहेत, तर ही विभागणी ढोबळ ठरते. इथे राहणार्‍याला माहीत असते, की प्रत्यक्षात इथे २१ प्रमुख भाषा बोलणारे समाज आहेत आणि हिंदी त्यापैकी एक आहे. तरीही हे सगळे भारत या एकाच राष्ट्रात नांदत आहेत. वैदिक संस्कृतीबाबत असाच घोळ झाला आहे. वैदिक या एकाच बृहत्संस्कृतीमध्ये अनेक समूह संस्कृती नांदत होत्या. काही एकमेकांत सहज मिसळल्या, काहींच्यात रक्तरंजित संघर्ष झाले.

सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती?

सिंधु संस्कृती हा वैदिक संस्कृतीचाच एक भाग होता. वैदिक संस्कृती ही फार मोठ्या भूप्रदेशात विस्तारली होती.

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा हा निष्कर्ष अल्पमतात आहे. कारण कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. आर्यांच्या टोळ्या भारतात थोड्या थोड्या काळाने येत गेल्या. भारतात येण्यापूर्वी काही टोळ्या इराणात घुसल्या, तर काही मेसोपोटेमियात वगैरे वगैरे, ही अगदी जवळपास सर्वमान्य थिअरी आहे.

सिंधु नदीच्या काठांवर राहाणारा समाज सिंधु नदी, जलाचा स्वामी वरुण यांचा पूजक होता. आजही सिंधी लोकांमध्ये या जलाधिपती वरुणाची (झुलेलाल) पूजा केली जाते. वरुण ही वेदांमधील एक प्रमुख देवता आहे. त्यामुळे सिंधु संस्कृती ही वैदिक संस्कृतीचाच एक भाग होती.

वरुण वेदांतील प्रमुख देवता होती हे खरे आहे. हा सर्वज्ञ वरुण नैतिकतेचे पालन होते आहे की नाही ह्यावर लक्ष ठेवून असायचा. पण सिंधी लोकांमध्ये झुलेलालाची पूजा केली जाते हा त्या संस्कृतीच्या वैदिक असण्याचा कसा काय पुरावा होऊ शकतो हे कळले नाही. आणि देवांची देवाणघेवाण ही होतच असते. सिंधू संस्कृतीची लिपी अजूनही उकलली गेलेली नाही. त्यासाठी एखादा रोजेटा स्टोन सापडायला हवा. त्यानंतर बरीच कोडी सुटतील. असो. माया आणि रामसे ह्या शब्दांवरून आपली थोर हिंदू/वैदिक संस्कृती मेक्सिको आणि इजिप्तपर्यंत होती, ह्या दाव्याइतका उपर्युक्त दावा नक्कीच हास्यास्पद नाही, एवढे मात्र खरे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

तर्कालाही थोडेफार स्थान दिले पाहिजे...

जेव्हा निसंदिग्ध पुरावे नसतात, उपलब्ध पुरावे स्पष्ट उकल करु शकत नाहीत आणि नवे पुरावे शोधण्याचे प्रयत्न व्यापक पातळीवर होत नाहीत, अशा संभ्रमाच्या स्थितीत तर्काधारे दुवे जुळवावे लागतात.

सिंधु संस्कृतीची लिपी अद्याप उकलली गेली नाही, यावर किंचित किरण पडण्याची आशा आहे. मध्यंतरी पुण्यातच एका महोदयांनी आपण सिंधु लिपीचे रहस्य उलगडले असून त्यावर पुस्तक लिहिल्याचे मला सांगितले. त्यावेळी मी लक्ष दिले नव्हते, परंतु आता ते पुस्तक मिळवण्याच्या मागे लागतो. पाहूया काही नवे हाती लागते का?

असो. श्री. चित्त,
सिंधु संस्कृती ही सिंधु नदीच्या काठाने व खोर्‍यात नांदली. तिचा अभ्यास करायचा आणि वैदिक संस्कृतीशी तिची नाळ तपासायची तर सिंध प्रांतातील विशेषतः हिंदू सिंधी रहिवाशांच्या चालीरीती आणि जीवन पद्धतीचा विचार केला पाहिजे. सरस्वती नदी आटल्यावर जसे तीरावरील सर्व सारस्वत ब्राह्मण विस्थापित झाले तसे सिंधुबाबत झाले नव्हते, पण फाळणीनंतर सिंधी समाज (विशेषतः पारंपरिक संपन्न हिंदू व्यापारी, सावकार व जमीनदार) भारतात आला. सिंधु संस्कृतीच्या पाऊलखुणा व जीवनशैली आजही त्या समाजाच्या प्रथा परंपरांतून अभ्यासता येते. यास्तव झुलेलाल या जलदेवाचे उदाहरण दिले.
आताची सिंधु नदी रोडावली असली तरी त्या काळात ती एक महानदी होती. (प्रचंड जलौघ वाहून नेणार्‍या तिच्या ७ उपनद्या लक्षात घेता) सिंधु नदीतून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. सिंधु संस्कृतीमधील समाज हा मुख्यत्वे व्यापारी समाज होता. कृषी, गोपालन, वस्तू वाहतूक, जलमार्गाने परदेशांशी व्यापार हे वैश्यांचे कर्म. वरुण हा जलाचा अधिपती असला तरी जलवाहतूक, जलसाठे, पर्जन्य, जलवाहतूक यांचे आधिपत्यही वरुणाकडेच दिले आहे. वैदिक संस्कृतीत वैश्यांकडे सोपविलेल्या वणिज् कर्मामुळे त्यांना यज्ञयाग व इतर धार्मिक कर्मकांडात फारसे गुंतून राहण्याचे बंधन नव्हते. (ब्राह्मणाच्या मुलाला उपनयन ८ वर्षांपर्यंत, क्षत्रियाला १२ वर्षांपर्यंत, तर वैश्याला २४ वर्षांपर्यंत करता येत असे, हे एक उदाहरण) त्यामुळे या समाजावर ब्राह्मणांची मजबूत पकड नव्हती. ब्राह्मणांशी संबंध न येता वैश्यांचा अन्य कौशल्याची कामे करणार्‍या समाजांशी, तसेच अन्य प्रांतातील वैश्यांशी जास्त संपर्क आला. परिणामी वैश्य समाज हा काळाच्या कुठल्याही टप्प्यात धार्मिक बंधनांपासून शिथील व नवकल्पनांचा पुरस्कर्ता राहिला. हे विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे सिंधी हिंदूंमध्ये जातिभेद फारसे नाहीत. ते ब्राह्मण अथवा धर्मगुरुंच्या आदेशांनुसार चालत नाहीत आणि व्यापाराची अंगभूत प्रेरणा त्यांना वारसाहक्काने मिळते.
त्यामुळे वरीलप्रमाणे तर्क केला तर सिंधु संस्कृतीतील व्यापारी समाज, गोपालन, शेती, बैलांचा/बैलगाड्यांचा वापर, मुद्रांवर बैल अंकित असणे, वरुणपूजन अशी बरीच साम्यस्थळे ल़क्षात येतात. (घोड्याच्या फारशा मुद्रा नाहीत, हे मान्य. तस्मात् घोडा बाजूला ठेऊया.)

'पटता तो टेक. नही तो रामटेक' असा काही माझा निर्वाणीचा संदेश नाही. 'कल्पनांशी खेळत राहा, मजा येते' इतकंच आम्ही म्हणणार (ह. घ्या.) :)

मुद्द्याचे बोलू

आपण मुद्द्याचे बोलू. सध्याचा सिंधी समाज सोडल्यास वरुणाची पूजा फारशी कुणी करत नाही. पण हे लक्षात घ्यायला हवे की सिंध्यांचा झूलेलाल इस्लामोत्तर आहे. वरुण ह्या वैदिक देवतेचा झुलेलाल हा एक अवतार मानला जातो असे फार तर म्हणता येईल. पण मध्ययुगीन झूलेलालाला वैदिक वरुणासोबत 1. जोडल्याबरोबर सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती आहे, हे कसे सिद्ध होते हे कळत नाही. वरुण आणि यूरेनस हे शब्द सजातीय (कॉग्नेट) आहेत आणि काहींच्या मते ग्रीकांचा यूरेनस म्हणजे आपला वरुण. आता ह्यावरून कुठला निष्कर्ष काढायचा ते सांगा? ग्रीक संस्कृतीदेखील वैदिक संस्कृतीचा भाग होता असे म्हणायचे का?

तसेच सिंधू संस्कृती ताम्रपाषाणयुगीन(चॅल्कोलिथिक), तर वैदिक संस्कृती लोहयुगीन आहे. वैदिक संस्कृतीच्या आगमनानंतर ख्रिस्तपूर्व 11व्या शतकाच्या आसपास 2भारतात लोखंडाचा वापर सुरू झाला असे म्हणतात. पण सिंधू संस्कृतीत लोखंडाचा वापर नाही, हे तुम्हाला मान्य आहे काय?

(घोड्याच्या फारशा मुद्रा नाहीत, हे मान्य. तस्मात् घोडा बाजूला ठेऊया.)

फारशा मुद्रा नाहीत असे तुम्ही म्हणता. ह्याचा अर्थ 1-2 तरी अश्वमुद्रा असतील. त्या मुद्रा दाखविल्यास आभारी राहीन.

1 वैदिक वरुणाचे महत्त्व नंतर कमी झाले. सुरवातीच्या वैदिक काळात तो ऋताचा काळजीवाहू होता.
2 काही ठिकाणी ख्रिस्तपूर्व 8 वे शतक म्हटले आहे.

ठीक आहे तर मग...

ठीक आहे. मी मुद्यापासून भरकटलो, असे वाटल्यास मला माफ करा. तसाही माझा विषय 'वैदिक काळातील व्यापार' हा होता. सिंधु संस्कृती ही व्यापारी (वैश्य) वर्गाची संस्कृती होती आणि वरुण, रुद्र, मातृदेवता यांची पूजक होती. ती दैवते वेदांतील प्रमुख देवतांमध्ये आहेत. कृषी, गोपालन, उद्यम ही वैश्य वर्गाची कर्मे वैदिक संस्कृतीने निहीत केली आहेत. (त्रिवर्णांची जबाबदारी निश्चित करताना). सिंधु संस्कृतीत ते आढळते. बैल, अश्व, बकरा यांचा बळी देण्याची प्रथा वैदिक संस्कृतीत होती. हरप्पातील उत्खननात दयाराम सहानी यांना अनेक पशूंच्या (त्यात घोडाही आहे) हाडांचा ढीग मिळाला. त्यावरुन त्या प्राण्यांचा सामूहिक बळी दिला गेल्याचा तर्क मांडला जातो. अशा साम्यस्थळांवरुन सिंधु संस्कृती ही विशाल अशा वैदिक संस्कृतीचा एक उपसंच असावी, असे मला वाटते. इतकाच काय तो मुद्दा

सिंधु संस्कृतीत हत्यारे (शस्त्रे) कमी प्रमाणात सापडली आणि ती तांब्याची होती, हे खरे. पण वैदिक संस्कृतीला ताम्र, लोह, कास्य, सुवर्ण हे धातू परिचयाचे होते. तांब्याला ते अयस् व लोखंडाला कृष्ण अयस् म्हणत. सिंधू संस्कृती ही व्यापार्‍यांची असल्याने त्यांचा भर युद्धांपेक्षा शांतता आणि उद्योग यावर होता. त्यामुळे त्यांना क्षत्रियांप्रमाणे लोहशस्त्रे बाळगण्याची गरज नसावी, अशीही कल्पना करता येईल की नाही? सिंधु ही वैश्य संस्कृती असल्याने त्यांना यज्ञांचा बडीवार माजवण्याचे कारण नव्हते. त्यामुळेच मोहंजोदडो व हरप्पाच्या उत्खननात यज्ञकुंडे आढळत नाहीत, पण काही सील्सवर नौकांची चित्रे कोरली आहेत. त्यावरुन त्या प्रदेशाचा सिंधु नदीमार्गे मेसापोटेमियाशी असलेला व्यापार समजून येतो.

(बाकी अश्वाबाबत तुम्ही आणि प्रियाली यांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमत आहे. सुस्पष्ट अश्वमुद्रा दाखवता येणार नाही आणि ओढून ताणून 'होच मुळी. घोडा होताच सिंधु लोकांना माहीत' असेही मी म्हणणार नाही. नसेल तर तसे मानून पुढे जाऊया. ही चर्चा करण्याचा माझा हेतू 'पुराव्यानिशी शाबीत करेन' अशा अभिनिवेशाचा नसून 'तर्क आणि व्युत्पत्ती' असा आहे.)

वैदिक कालातील व्यापार

धन्यवाद योगप्रभू. आपण हे एकदा मान्य केले की वैदिक संस्कृती ही सिंधू संस्कृती च्या पाठोपाठ भारतात आली की खुपशा गोष्टींचा खुलासा आपोआप होतो. सिंधू संस्कृतीत पश्चिम एशिया बरोबर मोठ्या प्रमाणात व्यापारउदीम चालत असे. सिंधू नदीच्या काठावर्रील गावे ते थेट द्वारका या सर्व ठिकाणापासून समुद्रमार्गे व्यापार चालत असे व तो अतिशय भरभराटीत होता.
सिंधू संस्कृती आर्य लोकांच्या आक्रमणामुळे नष्ट झाली हा काही ब्रिटिश इतिहासतज्ञांचा तथाकथित शोध चुकीचा होता असे आता मानले जाते. वैदिक संस्कृती भारतात सर्वमान्य झाली ती बहुदा प्रथम राजमान्य झाल्याने असावी असे मला वाटते. (ज्या पद्धतीने मलेशिया व इंडोनेशिया मधे इस्लाम सर्वमान्य झाला.) परंतु भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा हा सिंधू संस्कृतीच आहे असे मला तरी वाटते. अजुनही आपल्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी (बैलगाडी, स्वयंपाकाची भांडी, दागिने) यांचे आराखडे मूळ सिंधू संस्कृतीतले आहेत. (दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात असलेल्या सिंधू संस्कृतीच्या दालनाला भेट दिल्यास हे लगेच लक्षात येऊ शकते.) काही अज्ञात कारणाने (रोगराई, पूर) सिंधू खोर्‍यातील मानव वस्ती पुढे गंगा-यमुना दुआबाकडे सरकली. ही एक सलग प्रक्रिया असल्याने आधीच्या कालातील व्यापार उदीम बंद पडण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे वैदिक संस्कृतीमध्ये हा व्यापार चालूच राहिला.
सिंधू संस्कृतीशिवाय पूर्वेकडील मलै संस्कृती भारताच्या पूर्व किनार्‍यावरून दक्षिणेकडे पसरत गेली. यामध्ये अंडमान-निकोबार -श्री लंका यामार्गे आणखी एक जन प्रवाह भारतीय द्वीपकल्पावर आला. या दक्षिणेतील संस्कृतीचे दक्षिण मध्य अशिया बरोबर अतिशय उत्तम व्यापारी संबंध होते. आपण ज्याला भारतीय संस्कृती म्हणतो त्यात सिंधू खोरे, मलै व अंडमान-निकोबार या तिन्ही ठिकाणाहून आलेल्या लोकांनी बरोबर आणलेला इतिहास, चालीरिती व धर्म समजुती यांचा समावेश आहे. व या मिलाफातूनच सध्याची भारतीय संस्कृती निर्माण झाली आहे. या भारतीय संस्कृतीला मी वैदिक संस्कृती असे म्हणणार नाही.
चंन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सिंधू खोरे संस्कृती

सिंधू नदीच्या खोर्‍यातील कोणत्याही उत्खननात माझ्या माहिती प्रमाणे वैदिक संस्कृतीची कोणतीही खूण ( प्रामुख्याने यज्ञ वेदी व घोडा या प्राण्याचे अस्तित्व) सापडल्याचे मला तरी ज्ञात नाही. योगप्रभू यांनी या बाबतीत केलेले विधान माझ्या मताने चुकीचे आहे. अर्थात त्यांनी नवीन काही संदर्भ दिल्यास मी अर्थातच माझे अज्ञान मान्य करायला तयार आहेच. त्याच प्रमाणे तुर्कस्तान व सिंधू नदी खोरे यांचा एकमेकाशी संबंध लावणे कसे शक्य आहे? ते कळले नाही. आर्य संस्कृती अर्थातच सिंधू खोर्‍यातील संस्कृतीएवढीच किंवा त्याहून जास्त जुनी असण्याचे शक्यता आहे मात्र ती इ.स पूर्व 1300 च्या आधी भारतीय द्वीपकल्पात अस्तित्वात होती असे मानणे मोठे कठिण आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

घोडा आणि बैल यांच्या मुद्रा आहेत..

सिंधु सिव्हिलायझेशन आर्टेफॅक्ट्स या नावाखाली सिंधु संस्कृतीत हरप्पा व इतर ठिकाणी झालेल्या उत्खननातील वस्तूंच्या संग्रहाची छायाचित्रे कृपया पाहावीत. बैल आणि घोड्याची आकृती असलेली जी सील्स आहेत. त्यात एक गोष्ट सामाईक आहे. ती म्हणजे या प्राण्यांच्या भोवती ज्या आकृत्या आहेत त्यात खांद्यावर शस्त्र उगारलेला माणूस दिसतो. वैदिक समाज हा यज्ञप्रधान होता आणि पूर्वी यज्ञात बैल, घोडा, मेंढा यांचे बळी देत. या मुद्रांतून प्राण्यांचे बळी देण्याचा अर्थ स्पष्ट होतो. अश्वमेध यज्ञात घोड्याचा बळी दिला जात असे. घोड्याची प्रतिमा स्पष्ट असताना श्री. चंद्रशेखर नाही दिसली कशी म्हणतात?
वैदिक संस्कृतीत गोधनाचे महत्त्व होते. गाई-बैलांचे मांस खाणे निषिद्ध नव्हते. बैलांचा शेती व दळणवळणाची साधने म्हणून वापर केला जाई. त्यामुळे सिंधु चिन्हांमध्ये बैलगाडाही आहे. पशुपती किंवा रुद्र याची प्रतिमा आहे. यालाच त्रिनेत्र/त्र्यंबक असेही म्हटले आहे. रुद्राचा समावेश वैदिक देवतांत आहे आणि रुद्रपठण सामवेदाच्या उच्चारण नियमांनुसार केले जात असे. (हाच रुद्र पुढे महादेव किंवा शिव म्हणून रुढ झाला आणि नंदीबैल हे त्याचे वाहन आहे, हेही लक्षात घ्यावे.)
बैलाच्या मुद्रेतच चौकोन व एक पाटा-वरवंटा सदृश चिन्ह दिसते. यातील चौकोन हे यज्ञवेदीचे प्रतिक आणि पाटा-वरवंटा हे सोमवल्ली कुटण्याचे साधन असू शकते. यज्ञात सोमाला खूपच महत्त्व होते.

तुर्कस्थानचा उल्लेख मी यासाठी केला, की तिथे यज्ञकुंड व ब्राह्मणाचा पुतळा उत्खननात मिळण्याचे काय कारण असावे? वैदिक संस्कृती केवळ भारतातच नव्हे, तर बाहेरही पसरली होती, याचे ते पुरावे आहेत. उत्खननाच्या अधिकाधिक जागा सापडत जातील तसे हेच सत्य अधोरेखित होईल.

घोड्याची मुद्रा

हरप्पा संस्कृतीत घोड्याची मुद्रा पाहिल्याचे आठवत नाही. त्या संस्कृतीला घोडा माहित असल्याबद्दल अनेक प्रवद आहेत. काहींच्यामते घोड्यापेक्षा खेचर किंवा गाढव माहित असावे असे वाटते. बैलांचे शिक्के/ एकशिंगी बैल मात्र सर्वत्र आहेत.

असेच

सिंधू संस्कृतीला घोडा बहुधा माहीत नव्हता. तसा कुठलाही निःसंदिग्ध पुरावा उपलब्ध नाही.

सिंधू संस्कृतीतील प्राण्यांचे काही शिक्के (सील) (हरप्पा डॉट कॉम वरून साभार)

सिंधू संस्कृतीतले शिक्के अर्थातच व्यापारासाठी वापरले जात असत. मेसोपोटेमियाशी त्यांचा व्यापार होता. आणि सिंधू खोऱ्यातून आलेल्या व्यापारांसाठी मेसोपोटेमियन भाषेत मेलुहा हा शब्द होता.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

मेलुहा/ मेल्हा

मेलुहा हा शब्द म्लेच्छ शब्दाचे रुप तर नव्हे?

चंद्रशेखर यांनी मध्यंतरी हडप्पासंस्कृतीतील प्राचीन शहरावर लिहिले होते ते मेलुहाच होते का?

(उगीच अंदाजपंचे)

+१

यु पी एस सी च्या अधिकृत मानल्याजाणार्‍या पुस्तकांतही प्राचीन भारताबद्दल दिलेल्या माहितीत् "सिंधू संस्कृतीत घोड्याचा विलक्षण अभाव जाणवतो" हे वाक्य असल्याचे आठवते.

--मनोबा

घोडा आणि मानव

हरप्पा संस्कृती, वैदिक काळ आणि ज्योतिर्वि़ज्ञान (ज्योतिष नव्हे) यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एक लेख वाचनात आला.त्यातील मतानुसार आर्य(वैदिक?)-अनार्य(द्रविड?) या संस्कृती प्रथमतः वेगळ्या असल्या तरी पहिल्या संस्कृतीचे दुसर्‍या संस्कृतीवर आक्रमण होऊन ती नष्ट झाली असे नव्हे तर कालौघात या दोन्ही संस्कृती आदानप्रदान करत एकमेकात विलय पावल्या.

सिंधू संस्कृतीला घोडा माहित नव्हता असे या लेखकाचे आणि इतर बर्‍याच ज्ञानी लोकांचे मत आहे. ते अभ्यासता त्यात तथ्य असल्याचे जाणवते.
घोडा इ.स.पूर्व ३००० च्या आसपास मध्य आशियात मानवाच्या प्रथम संपर्कात आला. घोडा हा प्राणी मानवाला माहित झाला तत्पूर्वीच हरप्पा संस्कृती स्थिरावली होती. तिच्यात घोड्याला स्थान नसावे हे ओघाने आलेच.
त्यामुळे घोड्याला अनन्यसाधारण महत्त्व देणारे वैदिक वाङ्मय इसपू. ३००० नंतर निर्माण झाले आणि ते हरप्पा/सिंधू संस्कृतीने निर्माण केले नव्हते असे मानायला प्रत्यवाय नसावा.

धन्यवाद

चांगला लेख; वाचते आहे.

लेख

विसूनाना यांनी निर्देश केलेला लेख वाचला. लेख पुष्कळ परिश्रमाने लिहिलेला आहे व उत्त्तम आहे. मात्र लेखातील निष्कर्षांशी मी सहमत नाही. सुमात्रा बेटावर झालेला टोबा ज्वालामुखीचा स्फोट या लेखात विचारातच घेतलेला नाही. या स्फोटात भारतीय द्वीपकल्पावरील बहुतेक सर्व मानववंश संपूर्ण रित्या नष्ट झाले होते असे आता मानले जाते. यामुळे आधुनिक मानवाचे भारतीय द्वीपकल्पावरील मायग्रेशन इ.स.पूर्व १०००० या नंतरच चालू झाले होते व वायव्येकडून आलेले पहिले मानव हे पाकिस्तानामधील मेहेरगढ येथे स्थायिक झाले होते.
हे विश्लेषण लक्षात घेतले तर लेखात म्हटल्याप्रमाणे हराप्पा संस्कृती प्रस्थापित करणारे मानव ६०००० वर्षापूर्वी आले व आर्य टोळ्या इ.स.पूर्व २००० मध्ये आल्या हे लेखकाचे म्हणणे पटत नाही. सिंधू संस्कृती प्रस्थापित करणारे मानव व आर्य टोळ्या या इ.स.पूर्व १०००० नंतरच भारतात आलेल्या असल्या पाहिजेत असे मला वाटते.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लेखकाशी चर्चा करता येईल

या लेखाचे लेखक श्री. मयांक वाहिया यांच्याशी व्यनिद्वारे चर्चा करता येईल. त्यांचा व्यनिपत्ता 'vahia [at] tifr.res.in' असा दिसतो*.
*[at] च्या जागी @ हे चिन्ह घालावे.

असे नसावे

या स्फोटात भारतीय द्वीपकल्पावरील बहुतेक सर्व मानववंश संपूर्ण रित्या नष्ट झाले होते असे आता मानले जाते.

उलट, भारतीय द्विपकल्पावरील काही जमाती वाचल्या असाव्यात असे नजीकच्या काळातील अभ्यास दाखवतो असे विकीवर म्हटले आहे. टोबाच्या ज्वालामुखी उद्रेकावेळी जमाती नेमक्या कुठे वस्तीकरून होत्या हे माहित नाही त्यामुळे त्या सर्वस्वी नष्ट झाल्या असे म्हणणे खात्रीशीर नाही असे वाटते.

+१

+१ म्हणावेसे वाटते पण टोबाबद्दलही माझा काहीच अभ्यास नाही.
१००% मान्वी समाज नष्ट झाला असे म्हटले गेले असेल तर ते संपूर्ण जसेच्या तसे खरे असणे कठीण ठरावे.
--मनोबा

टोबा

नक्की काय घडले हे सांगणे अशक्य आहे. एक शक्य सिनारिओ असा असू शकतो.
या उद्रेकात, टोबा ज्वालामुखीने 2500 ते 3000 घन किलोमीटर (घट्ट घनतेच्या खडकाचे घनफळाएवढा) उकळता लाव्हा रसासारखा घनपदार्थ आकाशात हेकून दिला होता. म्हणजे प्रत्यक्षात या रसाचे आकारमान कितीतरी जास्त असले पाहिजे. 50 ते 150 मीटर जाड असा लाव्हा रसाचा थर सुमात्रा बेटाच्या पूर्व ते पश्चिम किनाऱ्याच्या मधे पसरला होता. त्याचेच अंदाजलेले वस्तुमान 1000 घन किलोमीटर होते, या लाव्हा रसाचे तपमान 750 डिग्री सेल्सस एवढे होते. 800 घन किलोमीटर राख टोबाने फेकून दिली होती. या राखेचे सुमारे 15 सें.मीटर जाड आवरण सबंध पृथ्वीभोवती जमा झाले होते. 10^10 टन सल्फ्युरिक ऍसिड टोबाने आकाशात फेकले होते. हे पदार्थ टोबाने दर सेकंदाला 80 लाख टन या गतीने बाहेर फेकले होते.

टोबाने फेकून दिलेली राख, सिंगापूरच्या पूर्वेला असलेल्या ‘साउथ चायना’ समुद्रातही आढळून आली आहे. या वरून असे स्पष्टपणे दिसते की टोबाचा उद्रेक जून जुलै महिन्यात झाला असला पाहिजे. या महिन्यांच्यात दक्षिण पूर्व अशिया खंडात मान्सूनचे वारे वहात असतात. या वाऱ्यांनी टोबाने फेकून दिलेले सर्व घन पदार्थ भारतीय उपखंडाभर लीलया पोचविले. मध्य भारतात एका जागेवर या घन पदार्थाचे सहा मीटर जाडीचे थर आढळले आहेत. मलेशियाचा बहुतेक भाग, अंदमान बेटे, श्री लंका, भारतीय उपखंडाचा बहुतेक भाग या राखेच्या आवरणाखाली संपूर्ण झाकला गेला.

टोबाने आकाशात फेकून दिलेला राख व इतर पदार्थांचा लोळ तीस ते पस्तीस मैल उंचीपर्यंत पोचला असावा. आकाशातील या राखेमुळे सूर्य प्रकाश अडवला गेला आणि भारतीय उपखंड व मलेशियावर अंधाराचेच साम्राज्य पसरले. ही राख पुढच्या दोन ते तीन महिन्यात या सर्व भूभागावर पसरली गेली. टोबाने या राखेशिवाय गंधकही बऱ्याच प्रमाणात फेकले.या गंधकापासून सल्फ्युरिक ऍसिड तया र झाले व ते आकाशात पुढची काही वर्षे राहिले. या कणांनी सूर्य प्रकाश अडविल्यामुळे पुढची सहा वर्षे उन्हाळा आलाच नाही व पृथ्वीवर हिवाळा हा एकच ऋतु राहिला. एवढेच नाही तर या धक्यामुळे पृथ्वीवर एका नवीन हिमयुगाची सुरवात झाली व हे हिमयुग पुढची एक सहस्त्र वर्षे तसेच टिकून राहिले. साउथ चायना समुद्राचे तपमान एक डिग्री सेल्सस ने खाली आले तर उत्तर गोलार्धातील तपमान पाच डिग्रीने खाली आले. उत्तर धृवाजवळच्या ग्रीनलॅन्ड्चे तपमाने सोळा डिग्रीने उतरले. जगभरच्या समुद्रातील पाण्याची पातळी खाली गेली. उन्हाळयातील तपमान सुध्दा बारा डिग्रीने खाली आले.

हवामानातील या बदलाचा परिणाम साहजिकच सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्याने सर्व वनस्पतींच्यावर झाला. दक्षिण पूर्व अशिया मध्ये बहुतेक सर्व वनस्पती व त्यावर अवलंबून असलेले सर्व सजीव नष्ट झाले. अती थंड हवामानामुळे उत्तरेकडच्या वनस्पती व त्यावर अवलंबून असलेले सजीवही हळूहळू नामशेष झाले. युरोप व उत्तर चीन येथे वसाहत केलेले मानव अती शीत हवामानामुळे पूर्णपणे नष्ट झाले.इतकेच नाही तर असेही म्हणता येईल की सबंध पृथ्वीवरचीच जीवसृष्टीच नष्ट होण्याच्या अगदी जवळ आली.

पृथ्वीचा इतिहास अनेक अब्ज किंवा खर्व, निखर्व वर्षांचा आहे. या प्रदीर्घ कालात अनेक महा भयंकर ज्वालामुखींनी आपल्या मुखातील आग अवनीतलावर फेकली असली पाहिजे.मग टोबा ज्वालामुखीच्या या उद्रेकाला एवढे महत्व कां? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. टोबाच्या या उद्रेकाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण हा भयावह कालखंड आधुनिक मानवाच्या (Homo sapiens ) अस्तित्वकालामधेच येतो. असे मानले जाते की आधुनिक मानव आफ्रिका खंडातून साधारणपणे 130000 वर्षांपूर्वी प्रथम या खंडाच्या बाहेर पडला. त्यामुळे टोबाच्या प्रलयकाळात आधुनिक मानव ही सर्वात नवीनतम अशी जीवजाती होती व कोणत्याही पर्यावरणातील फरकांना तोंड देण्याची त्यांची कुवत खूपच कमी होती. आधुनिक मानवाला या उद्रेकाचे अत्यंत महा भयंकर परिणाम साहजिकच भोगावे लागले व पृथ्वीवरच्या मानवांची संख्या काही सह्स्त्र एवढीच उरली. या महाभयंकर संकटातून जे थोडेसे मानव उरले सुरले ते विषुव वृत्ताजवळील आफ्रिका खंडामध्ये काही जागांवर कसे बसे तग धरून राहिले. आधुनिक मानवासाठी हा सर्वात कठिण असा काल होता व त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले होते.

मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासकांना दोन विरोधाभासी निरिक्षणांचे समाधान देता येईल असे स्पष्टीकरण या आधी कधीच देता आले नव्हते. एक तर आधुनिक मानवांच्यात डी.एन.ए.मधील विविधता फारच कमी (virtually identical DNA.) आहे. साठ कोटी मानवांच्या समुहाच्या डी.एन.ए मधील विविधता ( genetic diversity) ही चिम्पॉन्झीच्या एखाद्या लहान समुहापेक्षाही आश्च्रयरित्या कमी आहे. याच्या उलटपक्षी जर आधुनिक मानव आफ्रिका खंडातून एकाच प्रयत्नात बाहेर पडला असे मानले तर आफ्रिका खंडाच्या बाहेर रहाणारे आपण सर्व आफ्रिका खंड रहिवाश्यांप्रमाणे कां दिसत नाही? सर्व मानव जातीत एवढी वरकरणी विविधता ( superficial diversity)कां दिसते?

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय मधील मानव वंश शास्त्र विभागात काम करणारे प्रोफेसर स्टॅनले ए. ऍम्बरोज यांनी 1998 साली ‘जर्नल ऑफ ह्युमन एव्होल्युशन’ या मासिकात आपला या विषयातला ( Human population bottlenecks, volcanic winter, and differentiation of modern humans) हा शोध निबंध प्रसिध्द केला व आधुनिक मानवी इतिहासातील या कोडयाचे उत्तर समर्थपणे दिले. टोबा ज्वालामुखीच्या या उद्रेकाचा आधुनिक मानवाच्या उत्क्रांतीवर कसा परिणाम झाला हे पाहणे लक्षवेधी आहे.

प्रोफेसर ऍम्बरोज यांच्या सिध्दांताप्रमाणे टोबाच्या उद्रेकामुळे व नंतर आलेल्या शीतयुगामुळे पृथ्वीवरील आधुनिक मानवांची संख्या 2000 पर्यंत कमी झाली होती व हे उरले सुरले मानव अत्यंत एकाकी अशा जागांच्यावर तग धरून राहिले होते. या लोकसंख्या कमी होण्याच्या प्रक्रियेला ते मानवी गळचेपी म्हणतात. या गळचेपीमुळे पृथ्वीच्या पाठीवर आजमितीला असलेले 60 कोटी मानवांचे हे फक्त 2000 मानवच पूर्वज आहेत. इतक्या कमी संख्येच्या व अतिशय एकाकी अशा गटातून मानव जातीची ही संख्यावाढ मागच्या फक्त 65000 वर्षात झालेली असल्याने आधुनिक मानवांच्यात जनुकांतील वैविध्य (genetic variation) अतिशय कमी प्रमाणात आढळते.

एक सहस्त्र वर्षांनंतर पृथ्वीचे हवामान परत एकदा समशीतोष्णझाले व आतापर्यंत ‘लोकसंख्या गळचेपी’ झालेली मानवजात परत एकदा आफ्रिकाखंडातून व दक्षिण पूर्व अशियाच्या विषुव वृत्तिय भागातून बाहेर पडली. एखाद्या स्फटिकावर पांढरा शुभ्र प्रकाश पडल्यावर त्या प्रकाशाचे जसे सात रंगात पृथ:करण होते व ते सात रंग जसे स्पष्टपणे निरनिराळे दिसतात. त्याच पध्दतीने या गळचेपीतून बाहेर आलेल्या मानव जातीची एखाद्या विस्फोटाप्रमाणे 65000 वर्षात प्रचंड वाढ झाली व त्यामुळे त्यांच्यातील विविधता प्रकर्षाने जाणवू लागली. पण ही विविधता केवळ वरकरणी आहे आणि अतिशय जलद अशा वेगाने ही वाढ झालेली असल्याने ती आपल्याला जाणवते हे लक्षात घेतले पाहिजे. याच कारणामुळे आपण आफ्रिकन लोकांपेक्षा वरकरणी निराळे दिसतो. अंतर्यामी आपण सगळे एकच आहोत.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

घोड्याची प्रतिमा

सिंधू खोर्‍यात झालेल्या उत्खननात घोड्याचे चित्र असलेले सील सापडले आहे असे श्री योग प्रभू म्हणतात. त्यांच्या या निरिक्षणाचा संदर्भ त्यांनी कृपया द्यावा. सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृतीचा भाग नव्हती हे माझे मत मी त्वरीत बदलण्यास तयार आहे.
अश्वमेध यज्ञ हा आर्य किंवा वैदिक संस्कृतीमधील, राजाने करण्याचा एक महत्वाचा विधी होता यात काहीही विवाद नाही. प्रश्न एवढाच आहे की भारतीय उपखंडात वैदिक संस्कृती केंव्हापासून प्रचलित झाली? श्री. योग प्रभू यांच्या मताने भारतात असलेल्या सर्व संस्कृतींना (सिंधू खोरे, द्रविड) वैदिक संस्कृती हेच नाव दिले पाहिजे. त्यांचे हे मत मला पटत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

श्री. चित्त यांना दिलेला प्रतिसाद वाचावा..

श्री. चंद्रशेखर,
आपण श्री. चित्त यांना दिलेला प्रतिसाद वाचावात. घोड्याचे सुस्पष्ट सील नाही त्यामुळे घोड्यावर अडून न बसता 'घोडा माहीत नव्हता, वापरात नव्हता' असे मानून आपण पुढे जाऊया, असे मी म्हटले आहे. कृपया आता 'योगप्रभूंनी संदर्भ द्यावा, मी माझे मत बदलतो' असा पवित्रा घेऊ नये. माझ्या मताशी असहमत आहे किंवा ते चुकीचे आहे, असे आपण जरुर म्हणू शकता. ज्ञान-अज्ञान, पुरावे-दावे, खंडन-मंडन यात थबकून न राहाता, पुढे जाऊया, अशी विनंती.

<<श्री. योग प्रभू यांच्या मताने भारतात असलेल्या सर्व संस्कृतींना (सिंधू खोरे, द्रविड) वैदिक संस्कृती हेच नाव दिले पाहिजे. त्यांचे हे मत मला पटत नाही.>>
पुन्हा तेच सांगतो. सिंधु संस्कृती ही बृहत् अशा वैदिक संस्कृतीचा उपसंच होती, हे माझे मत आहे. ते मी तुमच्यावर लादत नाही. असहमत होण्याचे तुमचे स्वातंत्र्य आहेच. आर्य, अशी कोणतीही स्वतंत्र जमात नव्हती (ते 'सर्वश्रेष्ठ' असे एक संबोधन आहे) त्यामुळे मला स्वतःला आर्य-द्रवीड-सिंधु अशी वेगवेगळी विभागणी पटत नाही. सिंधु संस्कृती ही वैदिक संस्कृतीतील वरुणपूजक वैश्य संस्कृती होती, हे मत मी मांडतो आहे.

हरप्पन संस्कृती आणि घोडा

हडप्पामध्ये घोड्याचे म्हणून जे सील दाखवले जाते, ते घोड्याचे नव्हे. तो एन् एस् राजाराम यांच्या मताची पूर्ण चिरफाड करणारा पेपर इथे पहा.

http://www.people.fas.harvard.edu/~witzel/RAJARAM/Har1.pdf

आत्तापर्यंत निर्विवाद असा हरप्पन संस्कृतीमध्ये सापडलेला घोड्याचा पुरावा म्हणजे गुजरातेतील सुरकोटडा इथे इ स पू १७०० च्या सुमारास मिळालेला .

http://en.wikipedia.org/wiki/Surkotada

जी हाडे सापडली ती इक्वस् कॅबॅलस् चीच म्हणजे खर्‍या घोड्याचीच आहेत असे जगप्रसिद्ध घोडा-तज्ञ हन्गेरियन् सँदोर बोकोर्न्यी म्हणतात् असे त्यात् दिलेले आहे. अजून् एक लिंक पहा. तिथे तर इ स पू १६०० मध्ये स्वात खोर्यात जे सापडले तेच भारतीय उपखंडातील घोड्याचे सर्वांत प्राचीन अवशेष असे म्हटले आहे.

http://en.wikipedia.org/wiki/History_of_the_horse_in_South_Asia

थोडक्यात, सुरकोटडा येथील चुकारतट्टू अवशेष वगळता (अजून तरी) सिंधू संस्कृतीमध्ये घोडा नै मिळाला कुठ्ठेही.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

सावधान - भूसुरुंग पुढे आहेत!

आर्य संस्कृती अर्थातच सिंधू खोर्‍यातील संस्कृतीएवढीच किंवा त्याहून जास्त जुनी असण्याचे शक्यता आहे मात्र ती इ.स पूर्व 1300 च्या आधी भारतीय द्वीपकल्पात अस्तित्वात होती असे मानणे मोठे कठिण आहे.

चंद्रशेखर, सावधान! भूसुरुंगांच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहात.

(ह्.घ्या. हे सांगणे नलगे!)

व्रात्य वगैरे

व्रात्यांचा उल्लेख ऋग्वेदापेक्षा अथर्ववेदात जास्त झाला आहे. अर्थववेदातले व्रात्य हे फर्टिलिटी कल्टवाले 1 अवैदिक पुरोहित होते. ह्या बहिष्कृत पंथाच्या कर्मकांडांत नृत्य आणि प्रतोदवशता 2 इत्यादी विधींचा समावेश असायचा. हा व्रात्य सोबत एक पुंश्चली आणि एक गायक-वादक घेऊन फिरायचा. 3 व्रात्यांचे तत्त्वज्ञान बहुधा नव्या प्रथा आणि नव्या मतांचे एक उगमस्थान होते, असे म्हणतात. असे असले तरी एकंदरच व्रात्यांबद्दलची माहिती वाचून निश्चित असे मत बनवता येत नाही.

1मराठीत फर्टिलिटी कल्टसाठी चांगला पर्याय सापडला नाही. सुफलताविधी असा एक पर्याय आहे. पण तो पटला नाही.
2 फ्लॅजलेशन, चाबकाने किंवा दोरखंडाने फटके मारून घेणे वगैरे. ख्रिश्चनांतही ही परंपरा होती. ह्यावरून ख्रिस्त एक व्रात्य होता किंवा व्रात्यांचा प्रभाव अगदी नाझरेथ-जेरूसमलेमपर्यंत होता, असे म्हणता येईल काय?
3 ह्या दोहोंचा उपयोग कर्मकांडांच्या वेळी होत असे. महाभारतात कर्णाने द्रौपदीसाठी पुंश्चली हा शब्द वापरला आहे.

व्यापार

लेखापेक्षा चर्चा चांगली होत आहे. विशेषतः व्रात्यांबद्दल आणि नाण्यांबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली.

स्थळ काळ,

चर्चेतील काही प्रश्न अडचणीचे असले तरी महत्त्वाचे आहेत. वैदिक काळ म्हणजे नेमका कुठला काळ आणि कुठले स्थळ हे स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. काळ स्थळाचा मुद्दा उत्खननातून जास्त स्पष्ट होत असतो. लेखकाच्या मते वैदिक संस्कृतीचे स्थळ हे तुर्कस्थान ते भारत हा भूभाग असावा असे चर्चेतील प्रतिसादावरून वाटते. याच बरोबर चीन, इजिप्त, दक्षिण पूर्व, युरोप, रशिया, अफ्रिका, दक्षिण अमेरिका हे भागही वैदिक संसकृतीत येतात का? लोहधातू वैदिक संस्कृतीस माहीत होती या विधानावरून वैदिक संस्कृती ही लोहयुगा नंतरची (इसपूर्व १२००-१८००) असे म्हणावे का? लोहाचा शोध लागलेला असला (तांबे बनवण्याच्या प्रक्रियेत लोहाचे कण सापडायचे) तरी त्यापासून अवजारे बनविण्याची प्रगती ही इसपूर्व ४०० च्या आसपासची मानली जाते. अशी अवजारे आल्यावर शिलालेख कोरणे सोपे गेले. कठीण दगडाच्या मूर्ती बनवणे, कठीण ठिकाणी लोखंडी फाळ वापरून शेती करणे आणि शस्त्रास्त्रे करणे सोपे होत गेले.

लेखकाचे असेही म्हणणे दिसते की वेद हे व्यापाराचा जवळपास एकमेव प्राचीन पुरावा आहेत. अन्यथा व्यापाराचे अन्य पुरावे(जे उत्खननातून आढळतात) त्यांचाही ऊहापोह झाला असता.

भारताला धार्मिक आणि सामाजिक इतिहासाइतकाच प्राचीन व समांतर असा व्यापारी इतिहासही आहे. त्याच्या पाऊलखुणा अगदी वैदिक संस्कृतीपासून आढळतात.

वैदिक समाज सुपीक प्रदेशात स्थिरावल्यावर शेती करु लागला आणि गाई व घोड्यांच्या चलनात धान्य व भूमिजन्य उत्पादनांची भर पडली.

या वाक्याचा अर्थ वैदिक समाज (आर्य नाहीत!) पूर्वी सुपीक प्रदेशात नव्हते असा होतो. भटके (घोडे, गुरे पाळणारे) नदीकाठी (सिंधु,गंगा) गेल्यावर शेती करू लागले असा धरता येतो.

यातील तिसर्‍या म्हणजे वैश्य वर्णाकडे शेती व व्यापार ही कामे सोपवली होती

हे सोपवणे कधी झाले? कुणी केले? तत्पूर्वी वैश्य मंडळी काय करत् असत?

व्यापारामध्ये येथून प्रसाधन द्रव्ये, चंदन व हस्तिदंताची निर्यात होई तर उत्तम जातिवंत घोडे व आभूषणे आयात होत.

सुरुवातीला फक्त गोधन आणि घोडे यांना संपत्ती म्हणून ओळखणार्‍यांना घोडे आयात करावे लागत. काही गडबड नाही ना?

प्रमोद

माझ्या समजुतीनुसार...

<<वैश्यांकडे व्यापार सोपवणे कधी झाले? कुणी केले? तत्पूर्वी वैश्य मंडळी काय करत् असत? >>

याला सुस्पष्ट उत्तरे नाहीत. जसे वेद हेही कुणा एकाची निर्मिती नाही. विविध भूप्रदेशांत राहाणार्‍या ऋषींना स्फुरलेल्या ऋचांचे ते संकलन आहे. हे संकलन एकाच काळात घडले नसून त्यात काळाच्या विविध टप्प्यांवर भर पडत गेली. तसेच वर्णाश्रमाची विभागणी किंवा रचना ही वैदिक समाजाचा विकास होत असताना उत्पन्न झालेल्या गरजांतून झाली असावी. ती कुणी केली, कधी केली, पुन्हा ही उत्तरे शोधू गेल्यास 'पुरुषसूक्ता'पासून ते गीतेतील 'चातुवर्ण्यं मयं सृष्ट्या'पर्यंत अनेक निरर्थक हवाले देता येतील. आपल्याला अशी समाजरचना झाली, इथपासूनच सुरवात करावी लागेल.
(अवांतर - ऋषींनी आबू पर्वतावर यज्ञ केला. वसिष्ठ ऋषींनी या यज्ञाच्या अग्निपासून चार पुरुष निर्माण केले. तेच प्राचीन भारतीय क्षत्रियांचे चार वंश, अशा कथा सांगतात. त्याऐवजी समाजाच्या संरक्षणासाठी लढाऊ असा एक वर्ग गरजेचा होता. त्यातून क्षत्रिय तयार झाले. क्षत्रिय संघटनावर आणि त्याद्वारे समाजावर नियंत्रणासाठी 'राजा' ही संस्था अस्तित्वात आली, एवढेच ध्यानात ठेवावे लागते. तेच वैश्यांबाबत म्हणता येईल.)

<<सुरुवातीला फक्त गोधन आणि घोडे यांना संपत्ती म्हणून ओळखणार्‍यांना घोडे आयात करावे लागत. काही गडबड नाही ना?>>
जातिवंत घोडे प्राचीन काळापासून आयात केले जात, हे सत्यच आहे. अगदी अलिकडच्या काळातही स्थानिकरीत्या पैदास केलेली मराठ्यांची 'भीमथडी तट्टे' किंवा गुजराथचे 'काठेवाडी' घोडे प्रसिद्ध असले तरी त्याचवेळी 'अरबी' घोड्यांचे आकर्षण तसूभर कमी झालेले नव्हते. असे घोडे विकणारे सौदागर येण्याची राज्यकर्त्यांना प्रतिक्षा असे. कदाचित वैदिक संस्कृतीत उपल्ब्ध संख्येच्या मानाने अश्व पुरेसे पडत नसतील किंवा त्यांच्या पैदाशीचे तंत्र इथे व्यापक नसेल. गांधार देशात असे जातिवंत घोडे पैदा होत असल्याचा आणि भारतात ते लोकप्रिय असल्याचा उल्लेख उत्तर वैदिक काळातील महाभारतात आहे. असो, मला काही गडबड वाटत नाही.

 
^ वर