वैदिक संस्कृतीतील व्यापार

भारताला धार्मिक आणि सामाजिक इतिहासाइतकाच प्राचीन व समांतर असा व्यापारी इतिहासही आहे. त्याच्या पाऊलखुणा अगदी वैदिक संस्कृतीपासून आढळतात.

आर्य हे बाहेरुन आले होते, की इथलेच होते, या मुद्याला बगल देऊन आपण थेट आदिवेद ऋग्वेदाकडे वळू.

व्यापारात पडण्यापूर्वीची सामाजिक स्तरावरील पहिली पायरी म्हणजे संपत्ती मिळण्याची आकांक्षा निर्माण होणे. वेदांच्या सुरवातीच्या काळात समाजाची याबाबतची अनुकूल भूमिका तयार होत असल्याचे दिसते. वेदांतील बहुतेक ऋचा या विविध ऋषींनी आणि वेगवेगळ्या काळात रचलेल्या असल्या तरी त्यात तत्कालीन देवतांकडे काही ना काही मागणे समाजाच्या वतीने केलेले दिसून येते. उदाहरणार्थ - अदितीपुत्र भग ही देवता संपत्ती देणारी आहे, हे मानून तिच्याकडे दिवसाची पहिली प्रार्थना केली आहे. सकाळी उठल्यावर प्रथम म्हणण्याच्या प्रातःस्मरण सूक्तात म्हटले आहे (ऋग्वेद मंडल ७)

भग प्रणेतर्भग सत्यराधो भगेमां धियमुदवा ददनः
भग प्र णो जनय गोभिरश्वैर् भग प्र नृभिर्नृवन्तः स्याम्

(हे भगदेवा, तू थोर नेता आहेस. स्थिरधन आहेस. तू ही आमची स्तुती फलदायी कर. आम्हाला गाई-घोड्यांनी संपन्न कर आणि हे भगदेवा, परिवार जनांनी आम्ही प्रजावत्सल व लोकसंग्रही होऊ असे कर.)

ही ऋचा वाचल्यावर स्पष्टपणे जाणवते, की तत्कालीन वैभव म्हणजे गोधन-अश्वधन मानले आहे. यात इतर धनसंपत्तीचा उल्लेख नाही कारण हा काळ समाज स्थिरावण्यापूर्वीचा आहे. याच काळात वस्तुविनिमय प्रचलित होता आणि चलन म्हणून गाई व घोड्यांचा वापर होत असे. (बैल, गाढवे, बकरे आणि कुत्रे पाळले जात. मृगयेला (शिकारीला) महत्त्वाचे स्थान होते. पण त्यांचा वापर विनिमयासाठी होत नसावा.) गृह्यसूत्रातील बहुतेक सूत्रांमध्ये 'आम्हाला भरपूर गोधन प्राप्त होऊ दे' अशा ऋचा आहेत. वैदिक समाजात प्रथम तीनच वर्ण होते. ते परस्पर सहाय्यक आणि एकमेकांचा योगक्षेम चालवणारे होते. यातील तिसर्‍या म्हणजे वैश्य वर्णाकडे शेती व व्यापार ही कामे सोपवली होती. त्या काळात व्यापार होता, याचा पुरावा आपल्याला गृह्यसूत्रातच पाहायला मिळतो. 'व्यापारात यश प्राप्त व्हावे', यासाठीचा यज्ञविधी आणि प्रार्थना या गृह्यसूत्रात आहेत. वैदिक समाजाला लोह धातू ठाऊक होता आणि त्याचा वापरही ते करत असत. ऋग्वेदातच लोहशस्त्रयुक्त रथाचा उल्लेख सापडतो. ज्याअर्थी दुसरा क्षत्रिय वर्ण घोडे, रथ आणि लोहशस्त्रे वापरत होता त्याअर्थी ही शस्त्रे तयार करणारेही कारागीर असलेच पाहिजेत. (जसे वस्त्र होते म्हणजे विणकर असणारच, रथ होते म्हणजे सुतार असणारच) त्यामुळे वैदिक संस्कृतीत वस्तुविनिमयाप्रमाणेच उद्योगशीलताही होती, हे समजून येते.

वैदिक समाज सुपीक प्रदेशात स्थिरावल्यावर शेती करु लागला आणि गाई व घोड्यांच्या चलनात धान्य व भूमिजन्य उत्पादनांची भर पडली. शेतीप्रमाणे खनिकर्म हेही वैश्यांकडे सुपूर्द केल्याने तसेच वैश्यांचा अन्य संस्कृतींशी व्यापार असल्याने इतर धातूंची ओळख याच वर्णाकडून पहिल्या दोन वर्णांना झाली असावी. सुवर्ण हा मौल्यवान धातू आहे आणि त्याचा उपयोग चलन म्हणून करता येईल, हे वैदिक संस्कृतीने लवकर ओळखले. त्यामुळे गाई-घोडे-धान्य याबरोबरच सुवर्ण हेही विनिमयाचे साधन ठरले. 'निष्क' हे यातील सुवर्णनाणे प्रसिद्ध होते. शतपथ ब्राह्मणात व महाभारतात चलनी नाणे व संपत्तीच्या मोजमापाचे साधन म्हणून 'निष्का'चा उल्लेख बर्‍याचदा येतो. अर्थात त्याचवेळी मना, हिरण्य, सुवर्ण, शतमान आणि पण ही अन्य सुवर्णनाणीही प्रचलित होती, असे भारतीय संस्कृतीकोश म्हणतो. यातून घेण्याचा बोध म्हणजे व्यापारासाठी आवश्यक तो चलन विनिमयही वैदिक संस्कृतीत प्रचलित होता. व्यापारामध्ये येथून प्रसाधन द्रव्ये, चंदन व हस्तिदंताची निर्यात होई तर उत्तम जातिवंत घोडे व आभूषणे आयात होत.
वैदिक समाजाला शेती, पाऊस, जलसाठे, शुद्ध जल यांचे महत्त्व ठाऊक होते. पावसाचा अधिपती इंद्र, जलाचा अधिपती वरुण यांना प्रार्थनांमध्ये आवाहन केले जाई. वेदांतील जी राष्ट्रीय प्रार्थना आहे त्यात 'निकामे निकामे न पर्जन्य वर्षतु' असे मागणे मागितले आहे. पाऊस कोरडा जाऊ नये, हे मागणे केवळ शेतीसाठी नव्हे, तर शेतकरी (वैश्य वर्ण) व त्यांवर अवलंबून असलेले इतर वर्ण (समाजघटक) यांच्या कल्याणासाठी मागितलेले आहे.

Comments

कठीण ठिकाणी लोखंडी फाळ

कठीण ठिकाणी लोखंडी फाळ??
हे नवीनच.
हा प्रकार मागच्या शतकभरात भारतात किर्लोस्करांनी आणल्याचे ऐकले होते.
लोखंडी फाळ हा अपशकुनी वगैरे मानणार्‍या प्रचलित समजुतींचा त्यांना अगदि मागच्या शतकातही विरोधच झाला होता.right?

--मनोबा

सुंदर चर्चा

सुंदर चर्चा चालू आहे. मी सुरवातीला या चर्चेसाठी विनंती केली होती मात्र काही वैयक्तीक कारणाने जास्त जालावर येणे शक्य होत नाहिये. क्षमस्व!
मात्र चर्चा वाचतो आहेच

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

अप्रतिम, सुरेख, सुंदर, छान

अप्रतिम, सुरेख, सुंदर, छान. विशेषणांखेरीज माझ्याकडे भर घालण्यासारखे काही नाही. क्षमस्व.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वैश्य - व्यापारी - सिंधी, गुजराथी आणि मारवाडी

असे लक्षात येत आहे की सिंधू संस्कृतीतून मेसोपोटेमिया-आफ्रिका-अरब दुनिया यांच्याबरोबर समुद्रमार्गे बराचसा व्यापार होत असे आणि त्याची सूत्रे आजच्या गुजराथ आणि राजस्थान (सिंधसुद्धा) भागातल्या लोकांकडे होती. ती अगदी 'सूरत'पर्यंत पुढे आलेली दिसतात. आजही या भागातले लोकच भारतीय व्यापार्‍यांत आघाडीवर आहेत. याचे कारण इतक्या प्रचंड कालावधीत (इ.स्.पू. ४५०० ते इ.स्. २०१२) त्यांच्या जनुकातच व्यापार करण्याचे कौशल्य 'प्रोग्रॅम' झाले आहे की काय? असे नमूद करावेसे वाटले.

थोडा हलकाच घ्या अशा स्वरूपाचा हा प्रतिसाद आहे. ;)

मित्रांनी कृपया हा दुवा पाहावा..

या धाग्यात काही उपविषयांबाबतही चर्चा झाली. विचार प्रवर्तनासाठी काही सुचवतो.

१) तुर्कस्तानात नेविल कोरी येथे १९८३ ते १९९१ या काळात झालेल्या उत्खननाचा शोध गुगल्यावर घ्यावा.
२) हा दुवा बघावा.

 
^ वर