पोथ्यांचा अमूल्य खजिना

पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे. अभ्यासकांना त्याची मदत होईल अशी आशा आहे. लेखाच्या शेवटी लेखिकेचा संपर्कही आहे.

---

अमूल्य खजिन्याची देखभाल
18 Sep 2011, 0112 hrs IST
- अश्विनी गोर्‍हे

एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात सुमारे ५००वर्षांपासूनच्या पोथ्या उपलब्ध असून त्या भूजपत्रावर , ताडपत्रावर लिहिलेल्या आहेत . यातील काही पोथ्यावर अतिशय सुंदर चित्रे काढलेली असून त्यामध्ये सुर्वणरेखांचा वापरही केलेला आढळून येतो . या पोथ्यांचा अमूल्य खजिना सुस्थितीत आणण्याचे कष्टप्रद प्रयत्न येथील संस्कृत अभ्यासिका निरूपमा कुलकर्णी यांनी केले . त्याची ही अद्वितीय कामगिरी आता त्यांच्या स्मृतीच्या स्वरूपात आपल्याला या कॉलेजमध्ये पाहण्यास मिळते .
नव्वदच्या दशकांमध्ये निरूपमा कुलकर्णी यांनी या अमूल्य खजिन्याची एका नोंदवहीत नोंद करून ठेवली आहे . सुमारे दोन हजार पोथ्यांचा खजिना या कॉलेजच्या एका विशिष्ट पद्धतीच्या ' डेटाशीट ' मध्ये साठवला आहे . त्यात पोथ्यांचा काळ , शक , धर्मशास्त्र , वैदिक शास्त्र इ . तसेच काव्य असल्यास खंडकाव्य , चंपूकाव्य , दर्शन यांच्या तपशीलवार नोंदी , पोथ्यांची पाने किती , त्यातील काही गहाळ पाने असल्यास त्यांची नोंद व मुख्य म्हणजे या पोथ्या कोणाकडून उपलब्ध झाल्या आहेत त्याची नोंद या ' डेटाशीट ' मध्ये आढळते . संदर्भ ग्रंथालयप्रमुख बाळासाहेब पोटे यांच्या सुंदर हस्ताक्षरांमध्ये प्रत्येक पोथीचे संपूर्ण चित्र या डेटाशीट मध्ये आपल्याला बघायला मिळते .
पोथ्यामध्ये व्याकरण , तत्त्वज्ञान , वेद , वेदान्त , ज्योतिषशास्त्र , आयुर्वेद , पुराण , न्याय वैश्विक दर्शन , स्मार्थ पोथ्या , व्रत - वैकल्य , काव्यशास्त्र , चंपूकाव्य , खंडकाव्य , पूजाविधी , उदकविधी यांसारखे विषयांवरील पोथ्यांचा समावेश आहे . दुर्मिळ ग्रंथामध्ये तत्त्वबोध हा वेदान्त शास्त्रावरील ग्रंथ , भक्तीस्रोतमधील इंद्राक्षी व अश्विन स्रोत आयुर्वेदातील रसेंद्रमंगल आणि वीरसिंह ग्रंथ , चंपूकाव्यामधील विष्णुगुणादर्शचम्पू , प्राकृत व्याकरणामध्ये प्राकृतलक्षणसुत्र ग्रंथ अशा दुर्मिळ ग्रंथाचा समावेश आहे .
कॉलेजच्या लायब्ररीमध्ये लाकडी कपाटामध्ये या पोथ्यांचे जतन केलेले आहे . मिठाच्या पाण्यात धुऊन खळ पूर्ण निघालेल्या लाल फडक्यात ही पोथी बांधलेली आहे . लाल रंगाचे कापड वापरण्यामागेही विशिष्ट कारण आहे . पूर्वी हळद आणि गुगुळ एकत्र करून त्या रंगात कापड बुडवले जात असे , त्यातील हळद ही जंतूनाशक म्हणून काम करीत असल्याने वाळवी , झुरळांपासून या हस्तलिखित पोथ्याचे संरक्षण होते . या कपाटांना हॅण्डमेड पेपर लावलेला आहे . हॅण्डमेड पेपरमुळे हवेतील आर्द्रतेपासून रक्षण होते , अशी माहिती अनिता जोशी यांनी दिली . ' नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स ' या केंद्र सरकारच्या प्रकल्पावर या पोथ्यांची डिजिटल स्वरूपात नोंद केल्याची माहिती लिना हुन्नरगीकर यांनी दिली . भारतात संदर्भग्रथांची तशी प्राचीन परंपरा आहे . या सर्व पोथ्यांसाठी वापरलेली शाई बिब्बा किंवा बाजरीचे कणीस जाळून त्या काजळीत तिळाचे तेल व डिंक घालून केलेली असल्याने लिहिलेला कागद पाण्यात बुडवला तरी शाई ओघळत वा पसरत नाही . पोथ्यांसाठी वापरलेला कागद हा कापसाच्या लगद्यापासून किंवा भुर्जपत्राच्या भुगा करून त्यात तुरटीचे पाणी घालून तयार केला जायचा . त्यामुळे तो फाटत नसे .
ताडपत्राच्या ज्या पोथ्या या लायब्ररीमध्ये आहेत त्या सर्व उडिया स्क्रिप्टमध्ये आढळतात . त्यामुळे या पोथ्यांचा वेदांन्तशी संबंध असावा , असे मानले जाते . ताडाच्या झाडांची कोवळी पाने दोन - तीन दिवस चिखलात बडवून ठेवली जात असे . त्यानंतर ती पाने सुकवून त्यावर अक्षरे कोरली जाऊन त्यात शाई भरली जात असे . ताडपत्रावर आर्द्रतेचा परिणाम होत नसल्यामुळे ती योग्यरीत्या जतन केल्यास टिकतात . अशा पाचशेहून अधिक ताडपत्रावरील पोथ्यांचा संग्रह येथे आहे . या सर्व पोथ्यांमधील अक्षर हे सुबक , नेटके , खाडाखोड नसलेले असून अक्षरांचा आकारही सारखाच आढळतो . मोत्यांची माळ गुंफावी तशा सरळ ओळी व दोन्हीकडील समास मोजून - मापून सोडलेल्या दिसतात . कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पुस्तकासोबत अशाही अमूल्य पोथ्याची जपवणूक केली आहे , तोही आपण नजरेखालून घ्यायला हरकत नाही .
ashwini.gorhe@timesgroup.com

मूळ दुवा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-10020407,prtpage...

Comments

छान माहीती !!!

छान माहीती !!!

:)

मायबोली स्टाईल प्रतिसाद. (इथे शोभत नाही.)

 
^ वर