१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - ३

पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे काही बदल करण्यात आले होते का ? माझ्या मते, भाऊ व त्याचे सरदार यांनी असे बदल केले होते. शत्रू सैन्याने जर आपल्या गोलावर हल्ला केला तर, आपल्या जवळ पुरेसे बंदुकधारी पायदळ नसल्याने त्याला आपण गोलाजवळ येण्यापासून रोखू शकत नाही हे मराठी सरदार जाणून होते. आपल्या सैन्यात घोडदळ अधिक संख्येत असल्यामुळे, आपण गोलाच्या बाहेर पडून शत्रूवर चालून जायचे व त्याचा पराभव करून परत गोलात येऊन उभे राहायचे असे त्यांनी ठरवले होते. गोलाच्या रचनेमुळे सर्व सैन्य एकवटून चालणार असल्याने, प्रसंगी कोणत्याही मोर्च्यावर अल्पावधीत कुमक पाठविणे शक्य होणार होते. सारांश, शेजवलकर यांनी मराठी सरदारांनी गोल फोडल्याचे जे विधान केले आहे ते साफ चुकीचे आहे हे स्पष्ट होते. प्रसंग पडल्यास मराठी सरदार गोलातून बाहेर पडणार हे एकप्रकारे पूर्वनियोजित होते. खुद्द भाऊच्या नेतृत्वाखालील हुजुरातसुद्धा गोलातून बाहेर पडून अफगाण सैन्यावर चालून गेली होती. त्यावरून भाऊने गोल फोडला असे म्हणायचे का ? तात्पर्य, मराठी सरदारांनी गोल फोडला म्हणून पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला असे जे अलीकडे सांगितले जाते ते साफ चुकीचे आहे. विंचूरकर, पवार हे सरदार जरी गोलातून बाहेर पडले असले तरी परत ते आपल्या जागी येऊन उभे राहिले होते हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे, ते गोलातून बाहेर का पडले असावेत हे पाहाणे देखील गरजेचे आहे.
( या ठिकाणी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि, प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या प्रसंगी जमिनीचे चढ - उतार कसे होते किंवा कोणत्या फौजा चढावर होत्या अथवा उतारावर होत्या / सपाटीवर होत्या याची माहिती उपलब्ध नसल्याने व अशी माहिती आता उपलब्ध होणे जवळपास अशक्य असल्याने याविषयी अंदाजे किंवा तर्काने देखील लिहिणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. )

गारदी सैन्याची चाल ज्या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणाहून सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर दक्षिणेच्या बाजूला शत्रूसैन्याची निशाणे दिसू लागली. शत्रू सैन्याची निशाणे दृष्टीस पडल्यावर गारदी पथकांनी पूर्वेचा रोख सोडून दक्षिणेकडे, म्हणजे उजवीकडे आपला मोहरा वळवला. गारद्यांची चाल थांबताच, पाठोपाठ येणारे मराठी सैन्य देखील जागच्याजागी थांबले. गारद्यांनी आपल्या तोफांचे मोर्चे शत्रू सैन्याच्या रोखाने, दक्षिणेकडे तोंड करून उभारले. दरम्यान, याच सुमारास कधीतरी अफगाण वजीर शहावलीखान हा आपल्या लष्करासह हुजुरातीच्या अंगावर धावून आला.
गारदी - रोहिला सैन्याची लढाई :- सकाळी दहाच्या आसपास गारद्यांचा तोफखाना सुरु झाल्यावर गारद्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले विंचूरकर, गायकवाड, पवार हे सरदार गोलातून बाहेर पडून रोहिल्यांवर चालून गेले. यांच्यासोबत उभे असलेले माणकेश्वर व समशेर बहाद्दर हे दोघे या वेळी गोलात उभे होते कि तेसुद्धा इतर सरदारांसोबत गोलातून बाहेर पडले याची माहिती मिळत नाही. गारद्यांच्या उजव्या अंगाला उभ्या असलेल्या मराठी सरदारांना गोलातून बाहेर पडण्याची गरज का भासली असावी ? ते गोलातून कधी बाहेर पडले असावेत ?
आपणांस गारदी सैन्याचा मुकाबला करावा लागेल अशी रोहिला सरदारांना, आरंभी तरी अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या अपेक्षेनुसार गारदी सैन्य एकतर दिल्लीकडे जाणाऱ्या राजरस्त्याने चालून येईल किंवा शहावलीच्या दिशेने जाईल. आपणांस फारतर मराठ्यांच्या घोडदळाशी सामना करावा लागेल अशी त्यांची कल्पना होती. परंतु, जेव्हा ते गारदी सैन्यापासून दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर पोहोचले तेव्हा त्यांना थोडा आश्चर्याचा धक्का बसला. दूर अंतरावर गारद्यांची निशाणे दिसल्यावर ते काहीसे हादरले. बहुतेक आहे त्याच ठिकाणी ते काही काळ उभे राहिले. सोबत ज्या काही लांब पल्ल्याच्या तोफा उपलब्ध होत्या त्यांचे मोर्चे उभारून ते लांबूनचं युद्ध करण्यास सिद्ध झाले. काही वेळाने दोन्ही बाजूंकडून तोफांचा मारा होऊ लागला. गारदी तोपची प्रशिक्षित असल्याने, त्यांच्या तोफांचा मारा बराचसा अचूक असा होता. त्याउलट, रोहिल्यांच्या तोफांचे गोळे गारदी सैन्यावर पडत होतेचं असे नाही. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले अमीरबेग व बरकुरदारखान यावेळी पुढे सरकले होते कि नाही याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, याच सुमारास केव्हातरी हाजी जमालखान हा काही हजार अफगाण स्वारांसह व बहुतेक जड तोफांसह, रोहिल्यांच्या मागे सुमारे एक - दीड किलोमीटर्सच्या अंतरावर येऊन उभा राहिला होता.
अब्दालीने आपल्या लष्कराची रचना करताना मुद्दाम डाव्या व उजव्या फळीच्या मागे आपली पथके उभी केली होती. सर्व लष्कर रवाना झाल्यावर तो स्वतः, डाव्या व उजव्या फळीच्या मागे उभ्या असलेल्या सैन्य पथकांना जवळपास समांतर येईल अशा पद्धतीने राखीव फौज, तोफखाना घेऊन उभा राहिला. अब्दालीकडे दुर्बीण असल्याचा उल्लेख शेजवलकर करतात. परंतु काशीराज, नुरुद्दीन, शिवप्रसाद किंवा महंमद शाम्लू यांनी आपापल्या लेखांत असा उल्लेख केलेला आढळून येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा, पानिपत युद्धाच्या वेळी अब्दालीकडे दुर्बीण असल्याचा जो उल्लेख केला जातो तो साफ चुकीचा आहे. जर अब्दालीकडे दुर्बीण आहे असे जर गृहीत धरले तर भाऊकडे पण दुर्बीण होती असेच म्हणावे लागेल. अशा तऱ्हेच्या वस्तू इकडे बनत नसल्या तरी त्या मुद्दामहून मागवल्या जात होत्या हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु भाऊकडे, पानिपत प्रसंगी दुर्बीण असल्याचा उल्लेख मिळत नसल्याने त्याच्याकडे ती नसावी असे मानले जाते. मग हाच न्याय अब्दालीला का लावला जात नाही ? केवळ, पानिपतचे युध्द अब्दाली जिंकला म्हणून त्याचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी या दुर्बिणीच्या भाकड कथा सांगितल्या जातात, असेच म्हणावे लागेल !

गारद्यांच्या तोफांमुळे रोहिला सैन्याची भयंकर हानी होऊ लागली तेव्हा रोहिला सरदारांनी हळूहळू पुढे सरकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सहेतुक असा होता. जर शत्रूच्या तोफा तुमच्या लष्कराची नासाडी करत असतील तर दोन प्रकारे तुम्हाला स्वतःच्या फौजेचा बचाव करता येतो. शत्रूच्या तोफांच्या पल्ल्याबाहेर जाऊन, म्हणजे मागे जाऊन उभे राहाणे किंवा तसेच पुढे चालत जाणे. पुढे निघून गेल्यास शत्रूच्या पल्लेदार तोफांचे गोळे आपोआप तुमच्या सैन्याच्या पिछाडीच्या मागे जाऊन पडतात. या दरम्यान काही प्रमाणात तुमच्या सैन्याचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकवटलेल्या सैन्याला विखरून उभे केले तर हि हानी काही प्रमाणात कमी होऊ शकते. १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण - रोहिल्यांनी याच पद्धतीचा वापर करून मराठ्यांचा तोफखाना एकप्रकारे निष्प्रभ केला.
रोहिल्यांची फौज जसजशी पुढे सरकू लागली तसतसे गारद्यांच्या तोफांचे गोळे, आरंभी त्या सैन्याच्या मध्यभागी व नंतर पिछाडीला पडू लागले. आपल्या तोफांचे गोळे फुकट जात आहेत हे लक्षात आल्यावर गारद्यांनी आपल्या पल्लेदार तोफा बंद केल्या. गारद्यांच्या पल्लेदार तोफांचा मारा निष्प्रभ करण्यासाठी रोहिला सैन्य जेव्हा पुढे सरकत होते तेव्हा, ते आपल्या गोलाला भिडण्यापूर्वीचं त्याचा संहार करावा या हेतूने मराठी सरदार गोलातून बाहेर पडले असावेत. हि शक्यता जर गृहीत धरली तर विंचूरकर, गायकवाड, पवार यांनी लष्कराचा गोल अजाणतेपणी किंवा गारद्यांच्या ईर्ष्येने अथवा गोलाची रचना समजून न घेता फोडला असा जो आरोप त्यांच्यावर केला जातो तो साफ चुकीचा ठरतो.

मराठी घोडदळ जेव्हा रोहिला सैन्यावर चालून गेले त्यावेळी गारद्यांनी आपला तोफखाना बंद केला. गारद्यांच्या बंदुकधारी पलटणी, रोहिल्यांवर गोळीबार करण्यासाठी बाहेर कधी पडल्या असाव्यात ? मराठी सरदार रोहिल्यांचा पराभव करून त्यांना पळवून लावतील अथवा माघार घेऊन परत येतील या दोन्ही शक्यतांचा विचार करून इब्राहिमने आपले बंदुकधारी पायदळ गोलाच्या बाहेर आणले. हीच शक्यता अधिक ग्राह्य अशी वाटते. कारण, गारदी पलटणी जर अशा गोलाच्या बाहेर आधीच येऊन तयारीने उभ्या राहिल्या नसत्या तर मराठी स्वारांचा पाठलाग करत आलेले रोहिले थेट गोलात शिरले असते व त्या ठिकाणी रोहिल्यांचा सामना करणे गारद्यांना अवघड असे गेले असते. त्यावेळी बंदुकधारी पलटणींची गोळीबाराची पद्धत कशी असावी ? एक पलटण खाली गुडघ्यावर बसलेली असे तर दुसरी तिच्या मागे उभी असे. एका पलटणीने गोळीबार केला कि, लगेच दुसरी पलटण बंदुकीच्या फैरी झाडत असे. तोवर पहिल्या तुकडीने आपल्या बंदुका ठासून भरलेल्या असत. अशा प्रकारे शत्रूवर गोळ्यांचा अविरत वर्षाव करता येई. या ठिकाणी आणखी एका मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे व तो म्हणजे तत्कालीन बंदुकांना संगिनी / Bayonet लावण्याची पद्धत होती का ? याविषयी निश्चित अशी माहिती मिळत नाही. बंदुकींना संगीन जोडण्यास नेमका आरंभ कधी झाला असावा ? हिंदुस्थानात या प्रकारच्या बंदुका कधी वापरात आल्या असाव्यात याची नेमकी व विश्वसनीय माहिती मिळत नसल्याने पानिपत प्रसंगी गारदी सैन्याकडे अशा प्रकारच्या बंदुका होत्या कि नव्हत्या याविषयी काहीही लिहिणे चुकीचे ठरेल.

विंचूरकर, पवार प्रभूती सरदार रोहिल्यांवर चालून गेले. मराठी घोडेस्वार वेगाने धावून येत असल्याचे पाहिल्यावर रोहिले देखील मोर्च्यातून बाहेर पडले. रोहिल्यांच्या फौजेत स्वार किती होते व पायदळ किती होते याची निश्चित आकडेवारी मिळत नाही पण, त्यांच्या सैन्यात घोडेस्वारांचे प्रमाण अधिक असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांच्याकडे पायदळ होते पण त्याचे प्रमाण एकूण सैन्याच्या मानाने किती होते हे सांगता येत नाही. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे, रोहिला पायदळ हे बंदुकधारी असल्याचे जे सांगितले जाते ते अर्धसत्य आहे ! सर्वचं रोहिला शिपायांकडे बंदुका होत्याचं असे नाही.

मराठी घोडदळ जेव्हा रोहिल्यांवर चालून गेले तेव्हा त्यांचा मुकाबला प्रथम कोणी केला असावा ? रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी कि पायदळ शिपायांनी ? तेव्हाची हल्ल्याची किंवा बचावाची पद्धत कशी असावी ? शत्रूवर चालून जाताना आक्रमक सैन्य, विशेषतः घोडदळ हे एकमेकांना काहीसे बिलगून, फळी धरून जात असे. पायदळ सैन्य असेल तर काही एक अंतरापर्यंत ते शिस्तीने चालत जात असे व त्यानंतर पुढे धावून जाताना मात्र सैन्याची शिस्त बिगडून ते काहीसे विस्कळीत होत असे. बचाव करणारे सैन्य, जर घोडेस्वार असतील तर, मोर्च्याच्या बाहेर येऊन काही एक अंतरावर फळी धरून उभे राहात किंवा ते देखील शत्रूवर चालून जात. परंतु बचावाची जबाबदारी जर पायदळावर असेल व घोडदळ त्यांच्यावर चालून येत असेल तर पायदळ सैनिक आपले भाले रोखून घोडेस्वारांचा मुकाबला करत. भाल्यांची लांबी सामान्यतः सात - आठ फूट असे. त्यामुळे भालाईत सैनिक आपल्या भाल्याच्या लांबीचा फायदा घेऊन स्वार अथवा घोड्यास लक्ष्य करत असे. एकदा स्वार घोड्यावरून खाली आला कि तो सावरेपर्यंत त्याचा निकाल लावता येई अथवा सरळ स्वारास लक्ष्य करता येत असे. त्यावेळी लढाईची देखील एक विशिष्ट पद्धत असे. आक्रमण करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या सैन्याच्या लागोपाठ अशा रांगा असत. जोवर पुढील रांगेतील सैनिक / स्वार मृत वा जखमी होऊन खाली पडत नसे तोवर मागच्या रांगेत उभे असलेल्या सैनिकाला पुढे जाता येत नसे. आघाडीच्या फळीतील सैन्य लढत असे तेव्हा मागील रांगांतील शिपाई आरोळ्या ठोकून आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवीत असत. आघाडीवर ज्या ठिकाणी सैन्य लढत असे त्या ठिकाणी हातातील शस्त्रांचा पुरेपूर वापर करण्याइतपत फारशी मोकळी जागा उपलब्ध नसे. त्यामुळे कित्येकदा तलवार, भाले बाजूला राहून कट्यारी, सुरे यांचा वापर केला जात असे किंवा मग सरळ गुद्दागुद्दी सुरु होत असे. लढाईत माघारीचा जेव्हा प्रसंग येई, तेव्हा मागचे सैनिक प्रथम पळत असत व पाठोपाठ आघाडीचे सैनिक येत असत. सैन्याची माघार कधी शिस्तबद्ध अशी असे तर कधी बेशिस्तपणे ! सैन्याने कच खाऊन माघार घेतल्यास त्याला पळाचे स्वरूप येत असे. कित्येकदा सैनिक हातातील शस्त्रे टाकून पळ काढत असत. सारांश, तत्कालीन युद्धपद्धतीचे स्वरूप काहीसे असे होते.

मराठी घोडेस्वार जेव्हा रोहिल्यांच्या मोर्च्यावर चालून गेले तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी रोहिला घोडेस्वार पुढे सरसावले. आरंभी रोहिला स्वारांनी नेटाने झुंज दिली खरी पण लवकरचं त्यांना माघार घ्यावी लागेल अशी चिन्हे दिसू लागली. अशा स्थितीत रोहिल्यांचे पायदळ, आपल्या स्वारांच्या मदतीला धावून आले. रोहिला स्वारांना नवीन कुमक आल्यामुळे त्यांचा जोर वाढला. तुलनेने मराठी सैन्याची संख्या कमी असल्याने त्यांना माघार घेणे क्रमप्राप्त होते. मुळात, या मराठी सैन्याची संख्या साधारणतः पाच - सहा हजारांच्या आसपास असावी. समशेरबहाद्दर, अंताजी माणकेश्वर या हल्ल्यात सहभागी होते कि नव्हते याची माहिती मिळत नाही. हे जर अशा हल्ल्यात सहभागी असतील तर मराठी सैन्याची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास जाते. परंतु यांचा सहभाग असल्याबद्दल निश्चित माहिती मिळत नसल्याने हे यावेळी गोलात उभे होते असेच गृहीत धरावे लागते. असो, सुमारे पाच - सहा हजार मराठी स्वारांनी, अठरा ते वीस हजार रोहिल्यांवर चाल करून आरंभी जरी थोडेफार यश मिळवले असले तरी, शत्रूचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांना माघार घेणे एकप्रकारे भाग पडले. रोहिला पायदळ सैन्याने, मराठी स्वारांवर बंदुकींचा मारा केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असे जे सांगितले जाते त्यात फारसे तथ्य नाही. याचे कारण म्हणजे, रोहिल्यांपैकी फक्त नजीबाकडे अशा तऱ्हेचे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख मिळतो. इतर रोहिला सरदारांकडे अशा धर्तीची बंदुकधारी पलटणे असल्याचा उल्लेख आढळत नाही. अर्थात, ज्या रोहिला पायदळ सैनिकांकडे बंदुका होत्या त्यांनी, मराठी स्वारांवर गोळीबार केलाच नसेल असे म्हणता येत नाही पण, रोहिल्यांच्या गोळीबारामुळे मराठी घोडेस्वार मागे फिरले असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! त्याचप्रमाणे, मराठी घोडेस्वार माघार घेऊन आपल्या गोलाकडे निघाले तेव्हा रोहिला सैन्याने त्याचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चाल केली असे म्हणता येत नाही ! वस्तुस्थिती लक्षात न घेता आपल्या इतिहासकारांनी या घटनेचे बरेच अतिरंजित वर्णन केले आहे. समजा, काही क्षण असे गृहीत धरू कि, मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलात परत निघाले असताना रोहिला सैन्य त्यांच्या पाठी लागले व गारदी पलटणींवर तुटून पडले. आता अशा प्रकारचे वर्णन लिहिण्यास फक्त कल्पनाशक्तीची गरज आहे, पण असे काही वास्तवात घडू शकते का ? पाच ते सहा हजार मराठी स्वारांशी आरंभी आठ - दहा हजार रोहिला घोडेस्वार लढत होते. नंतर जवळपास तीन - चार हजार पायदळ शिपाई त्यांच्या मदतीस आल्याने मराठी घोडदळ मागे फिरले. याचा अर्थ असा कि, रोहिल्यांचे पायदळ व घोडदळ एकमेकांत मिसळून गेले असल्याने एकाचवेळी, मराठी स्वारांवर शत्रूच्या घोडेस्वाराशी व पायदळ सैनिकाशी झुंज देण्याचा प्रसंग ओढवला. अशा स्थितीत माघार घेण्याशिवाय त्यांच्यासमोर इतर पर्याय नसल्याने त्यांनी काढता पाय घेतला. मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलाच्या दिशेने परत जात आहेत हे पाहिल्यावर, लगेचचं रोहिल्यांचे घोडेस्वार आणि पायदळ, सरमिसळ झालेल्या स्थितीत, एकप्रकारे धावत त्यांच्या पाठी लागून गेले असे म्हणायचे तर रोहिला शिपाई आपल्या स्वारांच्या बरोबरीने धावत गेले असे गृहीत धरावे लागेल. त्याशिवाय, ज्या सैनिकांना आपल्या स्वारांच्या सोबत धावायला जमले नाही अथवा जे धावता - धावता तोल जाऊन किंवा ठेच लागून पडले त्यांना मागच्या बाजूने येणाऱ्या पायदळ सैनिकांनी / स्वारांनी तुडवले असेही मग गृहीत धरावे लागेल. याचा अर्थ असा होतो कि, अशा घाई - गडबडीच्या स्थितीत रोहिल्यांचे सर्वसाधारण हजार - दोन हजार शिपाई तरी निकामी झाले असावेत. आता प्रश्न असा निर्माण होतो कि, त्यावेळचे रोहिला सरदार किंवा त्यांचे अधिकारी काय मूर्ख होते ? आपल्या सैन्याला असे स्वतःच्या लष्कराच्या व जनावरांच्या पायाखाली तुडवून मारण्याची त्यांना हौस होती ? लढायांची काल्पनिक वर्णने देताना कमीतकमी वस्तुस्थितीची जाणीव ठेवण्याचे भान, निदान इतिहास लेखकांनी तरी बाळगण्याची गरज आहे ! वस्तुतः, मराठी सैन्याचा निर्णायक पराभव झाला नसून त्यांनी फक्त माघार घेतली होती. त्यांचे मुख्य लष्कर अजून कायम होते. मराठी स्वारांच्या माघारीला पळाचे स्वरूप आले नव्हते. या कारणांमुळे रोहिला सैन्य, मराठी स्वारांचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चालून गेले नाही. उलट, मराठी लष्कर मागे फिरताच, रोहिल्यांनी प्रथम आपल्या सैन्याची शिस्त बांधली. पायदळ - घोडदळ जे एकत्र झाले होते, ते वेगवेगळे होऊन उभे राहू लागले. दरम्यान रोहिला सरदार व अफगाण सरदार अमीरबेग, बरकुरदारखान यांच्यात चढाई विषयी चर्चा किंवा सल्ला मसलत घडून आली. त्यानुसार रोहिल्यांनी, गारदी पलटणींवर समोरून हल्ला करायचा तर अफगाण सरदारांनी, गारद्यांच्या डाव्या बगलेवर चालून जायचे असे ठरवण्यात आले. अमीरबेग व बरकुरदार सोबत साधारणतः चार - पाच हजार स्वार असावेत. या सैन्याजवळ तोफखाना बहुतेक नसावा, आणि असल्यास त्या तोफा फारतर लहान व वजनाला हलक्या अशा असाव्यात. त्यामुळेचं या सैन्याला अल्पावधीत, गारद्यांच्या डाव्या अंगावर चालून जाता आले.

शत्रू सैन्याचा एक विभाग, मुख्य फळी पासून अलग होऊन पुढे सरकत असल्याचे गारद्यांच्या लक्षात आले. शत्रूचा बेत आपल्या डाव्या बगलेवर चालून यायचा असल्याचे गारदी अंमलदारांनी हेरून, डाव्या बाजूने चालून येणाऱ्या शत्रू सैन्याला रोखण्यासाठी त्यांनी, त्या बाजूला दोन पलटणी तैनात केल्या.

रोहिला फौज आक्रमणासाठी सिद्ध होताच सरदारांच्या आज्ञेने इशारतीची निशाणे फडकली, वाद्ये वाजू लागली व पाठोपाठ रोहिल्यांची फौज गारद्यांच्या दिशेने पुढे सरकू लागली. गारदी पलटणींवर प्रथम रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी हल्ला केला असावा कि पायदळाने ? पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, आरंभी रोहिल्यांचे घोडदळ, गारदी पलटणींवर चालून गेले. याचा परिणाम म्हणजे, शेकडो स्वार जखमी मरण पावले तर कित्येक जखमी झाले.

शत्रूसैन्य एका विशिष्ट अंतरावर येताच गारद्यांनी गोळीबारास आरंभ केला. तत्कालीन बंदुकांची रेंज काय असावी ? माझ्या मते ती काही मीटर्स पर्यंत मर्यादित असावी, पण नेमकी किती हा प्रश्न शिल्लक राहतोच ! अमेरिकेच्या यादवी युद्धांत ज्या बंदुका वापरण्यात आल्या, त्यांची रेंज ३०० यार्ड, अर्थात सुमारे पावणे तीनशे मीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. जर हि रेंज गृहीत धरली तर, स. १७५- ६० च्या काळातील बंदुकांची रेंज १०० - १५० मीटर्स इतकी तरी असावी असा अंदाज बांधता येतो. या ठिकाणी हे मान्य करतो कि, या आकडेवारीस याहून अधिक सबळ पुरावा, निदान या क्षणी माझ्याकडे नाही. तसेच याशिवाय इतरत्र कोठून माहिती मिळत नसल्याने, मला हीच आकडेवारी गृहीत धरून चालणे भाग आहे.

गारद्यांच्या गोळीबारामुळे रोहिला घोडेस्वार हतबल झाले. रोहिल्यांकडे किती प्रमाणात पायदळ होते याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, घोडदळाच्या मानाने ते फारचं कमी असावे हे निश्चित ! या रोहिला सैनिकांची शस्त्रे सामान्यतः तलवार, भाले, जंबिये, कट्यारी, सुरे इ. होती. त्याशिवाय काही जणांकडे बंदुका देखील होत्या. परंतु, नजीब वगळता इतर कोणत्याही रोहिला सरदाराकडे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख आढळत नाही ! रोहिला घोडेस्वार, गारद्यांची फळी फोडण्यास अपयशी ठरत आहेत हे पाहून बहुतेक, रोहिला सरदारांनी आपल्या घोडदळास मागे बोलावले असावे व पायदळ विभागाला गारद्यांवर चालून जाण्याचा आदेश दिला असावा. किंवा असेही असू शकते कि, रोहिल्यांचे घोडदळ जेव्हा गारद्यांवर चालून गेले, त्याचवेळी त्यांचे पायदळ देखील पाठोपाठ पुढे सरकले असावे. रोहिला स्वार, गारद्यांच्या गोळीबारामुळे अथवा सरदारांच्या आदेशाने बाजूला सटकले असावे किंवा मागे निघून गेले असावेत. घोडदळ बाजूला सरकताच / मागे हटताच रोहिला पायदळ गारदी पलटणींवर तुटून पडले असावे. गारदी सैन्यावर, रोहिल्यांनी कशा प्रकारे हल्ले केले असावेत याविषयी कसलाच अंदाज किंवा तर्क करता येत नाही अथवा केल्यास, अमुक एक प्रकारे हल्ला झाला असावा असेही ठासून सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे व ती म्हणजे, गारद्यांची फळी फोडण्याचे कार्य रोहिला पायदळाने केले ! रोहिल्यांच्या पायदळाने, गारद्यांची फळी फोडून हातघाईची लढाई आरंभली. गारद्यांनी देखील शक्य तितक्या ताकदीने शत्रूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. अखेर, दुपारी एकच्या आसपास गारदी - रोहिला सैन्याची हि भयंकर झुंज संपुष्टात आली. प्रचंड प्रमाणात नुकसान सोसून रोहिले मागे हटले.

या चढाईने रोहिल्यांच्या पदरात काय पडले ? युद्धाच्या आरंभी रोहिल्यांची फौज अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान होती. यातील हजार - पाचशे लोक आरंभी गारद्यांच्या तोफांमुळे निकामी झाले असावेत. पुढे काहीजण, मराठी स्वारांशी लढताना ठार वा घायाळ झाले तरी अशांची संख्या पाचशेपेक्षा कमी किंवा हजारपेक्षा जास्त असणे शक्य नाही. सारांश, जवळपास सतरा - अठरा हजार रोहिले गारद्यांवर चालून गेले असे म्हणता येईल. त्यापैकी तीन ते पाच हजाराच्या आसपास लोक, गारदी सैनिकांच्या बंदुकींना बळी पडले असतील. पुढे गारद्यांशी झालेल्या हातघाईच्या लढाईत देखील जवळपास पाच ते सहा हजार मनुष्य जखमी / मृत झाले असतील. याचा अर्थ असा होतो कि, दुपारी एकच्या सुमारास रोहिला सैन्य जेव्हा परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले, त्यावेळी त्याची संख्या आठ - दहा हजारांच्या दरम्यान असावी. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर आपली माणसे मारून घेण्यापलीकडे, रोहिला सरदारांच्या पदरात फारसे यश पडले नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. परंतु अधिक विचार करता, रोहिल्यांना या चढाईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असावे असे वाटते.

पानिपत मोहिमेत सहभागी झालेल्या गारदी सैन्याची संख्या एकूण किती होती याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. उदगीर मोहिमेत गारद्यांचे पथक पाच हजारांचे होते असा उल्लेख शेजवलकर करतात. पुढे उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरल्यावर त्यात आणखी भर घालून ते आठ हजाराचे बनवण्यात आले. पुढे या सैन्यात आणखी भरती झाली असल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या सैन्याचे स्वरूप देखील फारसे स्पष्ट होत नाही. कवायती पलटणे म्हटल्यावर त्यासोबत काही हजार स्वारांचा रिसाला असतो. इब्राहिमच्या पलटणींसोबत असा रिसाला होता का ? काशीराजच्या मते, इब्राहिमकडे दोन हजार स्वार होते. परंतु कैफियतीमध्ये असा उल्लेख आढळत नाही. पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, इब्राहिमजवळ दोन हजार स्वारांचा रिसाला असावा असे वाटत नाही. एखादवेळेस, त्याच्याकडे स्वारांचे लहानसे पथक असू शकते. जर काशीराजच्या मतानुसार, इब्राहिमकडे दोन हजार स्वारांचा रिसाला असता तर, रोहिला सैन्य सहजासहजी माघार घेऊ शकले नसते. गारद्यांच्या घोडदळ पथकाने त्यांची कत्तल उडवली असती. परंतु, असे काही झाल्याचा उल्लेख नसल्याने व रोहिला सैन्य देखील यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभी राहिल्याने, गारदी पलटणींसोबत दोन हजार स्वारांचा रिसाला नसल्याचे सहज सिद्ध होते. पानिपत युद्धाच्या वेळी इब्राहिमकडे सामान्यतः आठ ते नऊ पलटणी असाव्यात. त्यातील दोन त्याने अफगाण सैन्याच्या समाचारासाठी डाव्या बाजूला ठेवल्या होत्या तर उर्वरीत सात पलटणींच्या मदतीने त्याने रोहिल्यांच्या सामना केला. रोहिला फौजेचा सामना करून त्यांना पळवून लावण्यात गारदी यशस्वी झाले. पण या संघर्षात त्यांच्या जवळपास पाच पलटणी निकालात निघाल्याने त्यांचे सामर्थ्य देखील खच्ची झाले. फिरून लढाईला उभे राहण्याचा प्रसंग उद्भवला तर अवघ्या तीन - चार पलटणी हाताशी असल्याने, त्यांना शत्रूचा मुकाबला करणे तितकेसे सोपे जाणार नव्हते. याचा अर्थ असाही होतो कि, मराठी सैन्याची डावी बाजू यावेळी निकालात निघाली नसली तरी पक्षाघात झाल्याप्रमाणे ती काहीशी लुळी पडू लागली होती. गारदी सैन्याची हि स्थिती पाहता, रोहिल्यांची चढाई पूर्णतः नसली तरी अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येते. जरी गारद्यांनी, रोहिला सैन्याला पळवून लावले असले तरी त्यांचा मोर्चा कायम होता. आपल्या मोर्च्याच्या आधाराने त्यांना फिरून फळी बांधून, गारद्यांवर चढाई करण्यास मोकळीक राहिली.

इतर भाग:
१. ४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस -१
२. ४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस -२

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली लेखमाला

लेखमाला वाचली आणि आवडली. येथे स्वागत, आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

या निमित्ताने तुम्ही बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. यातील काही प्रश्नांची उकल झालेली असणार असे वाटते.

काही दिवसांपूर्वी पानिपतावर जाऊन आलो. शहरापासून सात आठ कि.मि. वर काला आम नावाचे ठिकाण आहे. तिथे एक जुने स्मारक आहे. (आता नवीन यथा तथा म्युजियम बांधणे चालू आहे.) एकंदरीत सर्व जागा सपाटीवर आहे. काला आम् थोडेसे वर म्हणजे मीटर दीड मीटर एवढेच वर असल्यासारखे वाटले. अशा ठिकाणी यमुनेचा प्रश्न धरूनही कुणी कुणाची कोंडी केली होती हे मला तितकेसे पटले नाही. (जागा बघून.) पण तसे झाले असणार असे शेजवलकर लिहितात.

तुम्ही तोफा बंदुकींबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरून प्लासीची लढाई (१७५७) आठवली. या लढाईत इंग्रजांनी त्यांच्या जास्त पल्याच्या तोफांच्या बळावर अधिक मोठ्या सैन्यावर मात केली होती असे काहीसे वाचले.

तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याला नकाशाची जोड देता आली तर पहा. कित्येक युद्धकालीन रचना या नकाशातील पलटणींच्या रचनेशिवाय समजण्यास कठीण जातात.

प्रमोद

संपादन मंडळ

कृपया प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला/शेवटी इतर दोन लेखांचे दुवे द्यावेत ही विनंती.

||वाछितो विजयी होईबा||

माहितीपर लेखमाला

लेखमाला खरोखरीच माहितीपर. युद्धाविषयी बरेच गैरसमज आहेत , यात काहींचे निरसन झाले जसे बंदुका,तोफांचे पल्ले,आघाडीची / लढाईची सुरुवात इ.
पुढील लेखांची प्रतीक्षा .
प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या मताशी सहमत ,नकाशांची जोड हवी नाहीतर समजण्यास अवघड.

"अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी.....ll "

नकाशा जोडण्या संदर्भात !

प्रमोद, फिरस्ता तुमची सूचना मान्य आहे. नकाशे बनविण्याचे काम चालू आहे. अजून मी ब्लॉगवर देखील नकाशे टाकले नाहीत. जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी या ठिकाणी प्रसिद्ध करेन !

पानिपताचे नकाशे

चिं.वि.वैद्यांच्या मते पानिपत
चिं.वि.वैद्यांच्या मते पानिपत
काशीराजाच्या वर्णनानुसार पानिपत
काशीराजाच्या वर्णनानुसार पानिपत

त्यांच्या लेखनाशी अधिक मिळते असे नकाशे करून संजय ते जोडणार आहेतच. मधील काळात 'इतिहास मंजरी' ह्या १९२३ साली छापलेल्या दत्तात्रय विष्णु आपटेकृत पुस्तकातील दोन नकाशे - एक चिं.वि. वैद्यांच्या मते आणि दुसरा काशीराजाच्या वर्णनानुसार - सोबत जोडत आहे.

 
^ वर