१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १

(दिनांक १४ जानेवारी रोजी, पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो व सूर्यास्त संध्याकाळी, ५ वाजून २० मिनिटांनी होतो अशी, शेजवलकरांची नोंद आहे. याविषयी अधिक माहिती मिळत नसल्याने, पानिपत युद्धाच्या विवेचानासाठी मी, शेजवलकरांच्या नोंदीचा आधार घेतलेला आहे.)

उभय सैन्याची दृष्टादृष्ट :- १४ जानेवारी १७६१ रोजी, सूर्योदयापूर्वी मराठी सैन्य, पानिपत गाव सोडून पूर्वेला असलेल्या यमुना नदीच्या दिशेने जाऊ लागले. खंदक पार करून फौज जसजशी पुढे मोकळ्या मैदानात जाऊ लागली, तसतशी लष्कराची गोलाची रचना बनत गेली. तत्कालीन रिवाजानुसार, लष्कराचे कूच होत असताना किंवा फौज प्रवासाला निघण्यापूर्वीचं सूचक अशी वाद्ये वाजवली जात. परंतु, आज शत्रू सैन्याच्या नकळत जमेल तितके अंतर वेगाने कापायचे असल्याने, अशी वाद्ये वाजवली गेली नाहीत. अर्थात, याचा अर्थ असा कोणी घेऊ नये कि, मराठी सैन्यावर भीतीचे सावट पसरले होते अथवा औदासिन्याची छाया पसरली होती ! मराठ्यांनी आपल्या बाजूने कितीही काळजी घेतली तरी त्या दिवशी निसर्ग देखील काहीसा शत्रूला अनुकूल असाच होता. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने, उत्तर भारतात विलक्षण थंडीचे असतात. विशेषतः दिल्लीच्या उत्तरेकडील भागात तर कल्पनातीत थंडी असते. त्यातही जानेवारी महिन्यात थंडी व धुके यांचा प्रभाव विशेष असा असतो कि, सकाळी दहा - अकरानंतर देखील धुक्याचा पडदा फारसा विरळ होत नाही, तर कधी - कधी धुके फारसे पडतचं नाही ! जानेवारी महिन्यात पडणाऱ्या दाट धुक्याचा भाऊला बराच अनुभव आला असावा. या दाट धुक्याचा फायदा घेऊन, भल्या पहाटे जर आपण छावणी सोडून निघालो, तर दुपारपर्यंत, शत्रूच्या नकळत कमीतकमी दोन कोस अंतर तरी पार करून जाऊ असा त्याचा विचार असावा. किंवा असेही असू शकते कि, नैसर्गिक परिस्थितीचा अशा प्रकारे फायदा घेण्याचा सल्ला त्याला सरदारांनी दिला असावा. ते काहीही असले तरी, जानेवारी महिन्यात पडत असलेल्या दाट धुक्याचा फायदा घेण्याचे मराठी लष्कराने ठरवले नव्हतेचं असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! पानिपत ते यमुना नदीचा किनारा यादरम्यान जवळपास ५ कोसांचे अंतर आहे. त्यातील दोन - सव्वा दोन कोसांचे अंतर जर शत्रूच्या नकळत पार करता आले तर मोठीच मजल मारल्यासारखे होणार होते. त्यानुसार भाऊने १४ जानेवारी रोजी सुर्योदयापूर्वी, बहुतेक पाच ते सहाच्या दरम्यान केव्हातरी पानिपतहून आपला मुक्काम हलवला. भाऊचे दुदैव म्हणा किंवा निसर्गाचा लहरीपणा म्हणा, त्या दिवशी धुक्याने अब्दालीला साथ दिली ! नेहमीपेक्षा, त्या दिवशी धुके फार कमी पडले व सूर्योदय होतांच, मराठी सैन्याप्रमाणे त्यानेही आपला मुक्काम गुंडाळण्यास आरंभ केला !!

सूर्योदय झाल्यावर, भाऊच्या लक्षात वस्तुस्थिती आली असावी. मराठी सैन्य, छावणीतून बाहेर पडल्याची बातमी शत्रूला समजून, तो कधीही चालून येण्याची शक्यता होती. एकूण, शत्रूच्या नकळत जास्तीत जास्त अंतर कापून पुढे निघून जाण्याचा बेत आता फार काळ गुप्त राहाण्याची शक्यता नव्हती. असे असले तरी भाऊवर किंवा मराठी सैन्यावर त्याचा फारसा विपरीत परिणाम झाला नाही. यामागे काही कारणे आहेत. पहिले म्हणजे, मराठी लष्कराने अफगाण सैन्याची अजिबात दहशत खाल्लेली नव्हती. दुसरे म्हणजे, पानिपत सोडण्याचे निश्चित झाले होते. धुके असो वा नसो, पण पानिपत सोडून जायचे हा मराठ्यांचा बेत पक्का होता. पहाटे पडणाऱ्या धुक्याचा फायदा घेऊन, शत्रू सैन्यापासून त्यांना काही काळ आपले अस्तित्व लपवायचे होते. या काळात शक्य तितक्या वेगाने त्यांना पानिपतपासून लांब व यमुनेच्या जवळ जाऊन पोहोचायचे होते. परंतु, धुक्याचा पडदा जवळपास अदृश्य झाल्याने, बहुतेक लवकरचं आपणांस शत्रू सैन्याच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल याची जाणीव मराठी लष्कराच्या सेनापतीला व त्याच्या सरदारांना झाली असावी.
भाऊची कैफियत, बखर सांगते त्यानुसार सूर्योदयानंतर सकाळी सहा / सात- आठ घटका उलटून गेल्यावर, हत्तीवर निशाणे देऊन नौबत व चौघडा सुरु केला. यावेळपर्यंत मराठी सैन्य पानिपतपासून दीड कोस पुढे निघून आले होते. शेजवलकर यांच्या मते, १४ जानेवारी रोजी पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो. कैफियत व बखर सांगते कि सुर्योदयानंतर सुमारे सहा ते आठ घटका उलटून गेल्यावर लष्करातील नौबत व चौघडा वाजू लागले. १ घटका म्हणजे २४ मिनिटे हे प्रमाण गृहीत धरले असता ६ घटका म्हणजे १४४ मिनिटे किंवा ८ घटका म्हणजे १९२ मिनिटे. याचा अर्थ असा कि, सूर्योदय झाल्यावर साडे नऊ ते सव्वा दहाच्या सुमारास मराठी सैन्यात नौबत, चौघडा वाजू लागले. लष्करात नौबत, चौघडा वाजल्याची नेमकी वेळ शोधून काढण्याच्या प्रयत्नामागील मुख्य कारण म्हणजे, अफगाण सैन्य दृष्टीक्षेपात आल्यावर लष्कराला युद्धाच्या तयारीने सज्ज राहण्याचा इशारा देण्यासाठी नौबत, चौघडा वाजवण्यात आला. हत्तींवर निशाणे देण्यात आली. या ठिकाणी हत्तींवर निशाणे देणे किंवा नौबत व चौघडा वाजवण्यामागील कारण काय असावे हे समजून घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी हजारो - लाखोंच्या संख्येने लोकं लढायांमध्ये सहभागी होत. एवढ्या मोठ्या जनसमुदायास किंवा दूर अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या सेनाधिकाऱ्यांना व्यक्तीशः आज्ञा देणे मुख्य सेनापतीला शक्य नसे. तसेच, आजच्या काळी उपलब्ध असलेली संपर्कसाधने देखील त्यावेळी अस्तित्वात आलेली नव्हती. अशा स्थितीत लष्कराला आदेश कशा प्रकारे दिला जात असेल ? शांततेच्या वेळी, म्हणजे युद्धापूर्वी किंवा मुक्कामाहून कूच करतानाच्या वेळी लष्कराला मार्गदर्शन करण्यास भरपूर वेळ उपलब्ध असतो पण प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी हे कार्य कसे केले जात असावे ?

तुम्ही कधी लष्कराची किंवा पोलिसांची परेड पाहिली आहे का ? Marching Band च्या तालावर, पावले उचलत जाणाऱ्या लष्करी पथकाची किंवा पोलिसांची सर्व हालचाल हि त्या Band च्या सुरावर, तालावर होत असते. अर्थात, परेड प्रसंगी ऑर्डर देणारा अधिकारी आघाडीवर असतो, नाही असे नाही, पण परेड करणाऱ्या लोकांना त्याचा आवाज ऐकू नाही आला तर निदान Band चा आवाज तरी ऐकू येतोच कि, त्यामुळे परेड करताना जरी त्यांना तुकडी प्रमुखाचा आवाज ऐकू नाही आला तरी Band च्या सुरावटीवर त्यांना आपल्या हालचालींत बदल करता येतात ! सध्याच्या काळात Marching Band चा वापर परेड प्रसंगी होत असला तरी, त्यावेळी मात्र त्याचा उपयोग हा लष्करी तुकड्यांना आदेश देण्यासाठी होत असे. आजच्या काळात, परेड प्रसंगी लष्कराच्या प्रत्येक विभागाची किंवा पथकाची वाद्यांची एक विशिष्ट सुरावट ठरलेले असते. त्याकाळात देखील घोडदळ, पायदळ, धनुर्धारी इ. पथकांसाठी विशिष्ट अशी एक वाद्यांची सुरावट ठरलेली असे. त्याचप्रमाणे, आजच्या काळात जसे लष्कराच्या विविध विभागांना एक विशिष्ट निशाण दिलेले असते, त्याचप्रमाणे तेव्हाही लष्करातील विविध पथकांना त्यांची निशाणे ठरवून दिलेली असत. लढाईप्रसंगी वाद्ये व निशाणे या दोन्हींचा वापर केला जात असे. मुख्य सेनापतीने आदेश दिल्यावर जवळ जे निशाणाचे हत्ती असत, त्यांवर विशिष्ट आज्ञेचे निशाण फडकवले जाई. दूर अंतरावरील जे लष्करी अधिकारी असत, त्यांचे किंवा त्यांच्या हस्त्कांचे त्या निशाणाकडे लक्ष असे. निशाण घेऊन बसलेली व्यक्ती, त्या निशाणाची, सेनापतीच्या आज्ञेनुसार, पूर्वसंकेतानुसार निश्चित केलेली सांकेतिक हालचाल करीत असे. दूर अंतरावरील लष्करी अधिकारी त्या सांकेतिक हालचालीनुसार आपापल्या पथकांना हल्ल्याच्या किंवा माघारीच्या सूचना देत. या सेनाधिकाऱ्यांच्या हाताखाली विविध पथकांतील असे हजारो सैनिक असत. या पथकांचे प्रमुख, त्या सैन्याधिकाऱ्याच्या आसपास उभे असत. युद्ध प्रसंगी ज्या वेळी, ज्या पथकाची गरज असेल, त्यावेळी त्या पथकाच्या प्रमुखास तशी आज्ञा दिली जात असे. लगेच तो आपल्या पथकाजवळ जात असे. त्या पथकाला एक विशिष्ट निशाण असे. ते निशाण घेतलेली व्यक्ती हत्ती अथवा घोड्यावर बसलेली असे किंवा जमिनीवर उभी असे. पथक प्रमुखाचा आदेश मिळताच ती व्यक्ती निशाणाची पूर्व संकेतानुसार हालचाल करत असे. त्या अनुरोधाने, या विशिष्ट पथकातील सैनिक एकत्र येत असत. प्रत्येक पथकाला जसे निशाण असे त्याचप्रमाणे वाजंत्री पथक देखील असे. या वाजंत्री पथकाचे काम म्हणजे, लष्कराचे नीतिधैर्य, उत्साह वाढवणे व लष्कराला मार्गदर्शन करणे ! युद्धातील प्रत्येक हालचालीसाठी ज्या प्रमाणे निशाणाची सांकेतिक हालचाल केली जाई, त्याचप्रमाणे त्या निशाणाच्या अनुरोधाने वाद्ये देखील वाजवली जात असत. दरवेळी सैनिक, निशाण ज्या ठिकाणी फडकावले जात आहे त्या ठिकाणी पाहू शकत नाहीत, पण वाद्यांचे आवाज तरी ऐकू शकतात ना ! एकूण, तत्कालीन युद्धपद्धती आपण समजतो तशी मागास किंवा गोंधळाची नसून, ती अतिशय विचारपूर्वक व नियोजनबद्ध असलेली दिसून येते. अर्थात, याविषयीचे माझे विवेचन काहीसे अपुरे आहे हे मला मान्य आहे. याचे कारण म्हणजे मी काही यातील तज्ञ नाही. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करणे हे माझे काम आहे व हे कार्य पार पाडत असताना, इतिहास संशोधकांनी किंवा अभ्यासकांनी आजवर ज्या ज्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले ते मुद्दे प्रकाशात आणणे मला गरजेचे वाटते.( तत्कालीन लष्करांत होणारा वाद्यांचा व निशाणांचा उपयोग, याविषयीचा थोडा तपशीलवार उल्लेख ना. वि. बापट यांच्या ' पानपतची मोहीम ' या कादंबरीत आलेला आहे. )

क्रमश:...

इतर भाग:
१. ४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस -२
२. ४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस -३

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख प्रसिद्ध करण्यात काही अडचणी येत आहेत.

मी इथे माझा लेख कॉपी पेस्ट करत आहे पण तो दिसत नाही. याविषयी काही करता येईल का ?

शब्दमर्यादा

नमस्कार संजय,

आपला लेख कमाल शब्दमर्यादेची पातळी ओलांडत असल्याने उपक्रमावर दिसत नव्हता. अशावेळी लेखाचे दोन तीन भाग करून ते उपक्रमावर प्रकाशित करावे. सध्या असा बदल करून देण्यात आला आहे. प्रत्येक भागात शब्दमर्यादा १००० ते १२०० पर्यंत असावी.

कृपया, आपल्या लेखाच्या सर्व भागांची पडताळणी करून लेखातील परिच्छेद किंवा मजकूर कॉपीपेस्ट करतेवेळी गाळले गेले आहेत का हे येथे प्रतिसादातून किंवा संपादन मंडळ या आयडीला व्य. नि. करून कळवावे.

धन्यवाद,
संपादन मंडळ.

२रा संजय

युद्धाचे वर्णन करणारा हा २रा संजय...
सध्या लेख ओझरता वाचलाय, पण पानिपत हा माझा प्रिय विषय असल्याने (कोणावरही टीका करणारा नसेल तर) असे लेख मी सोडत नाही.

||वाछितो विजयी होईबा||

छान...

लेख सध्या फक्त वरवर चाळलाय.
पानिपतासंबंधी बरीच माहिती http://www.evivek.com/12dec2010/index.html इथे मिळेल.
सदानंद् मोरे, विश्वास पाटिल,निनाद बेडेकर,पांडुरंग बलकवडे, उदय कुलकरणी, मोरवंचीकर मंडळिंचे एकाहून् एक लेख आहेत.
काही लहान्, काही मोठे आहेत, सुसंगत विदा शोधून संगती लावण्याचे काम वाचकालाच करावे लागेल.

--मनोबा

निशाणांचे विश्लेषण

पहिला भाग वाचला. हत्तीवरील निशाणांचे केलेले विश्लेषण आवडले आणि पटण्यासारखे वाटले. या युद्धाशी अवांतर परंतु ज्या सैन्यांकडे हत्ती नसत ते युद्धप्रसंगी निर्णय बदलायची वेळ आल्यावर सूचना कशा पोहोचवत या बद्दल कुतूहल वाटले.

उदा. ग्रीक सैन्यात फॅलन्क्स (चौकोनी तुकड्या) असत. त्यांची रुंदी खूप नसे तेव्हा युद्धापूर्वी सेनापती घोड्यावरून दौडत जाऊन सैन्याला सूचना देत असे. युद्धप्रसंगी सूचना बदलायची असेल तर वॉर-क्राइज (एक विशिष्ट प्रकारचा ओरडा) केला जात असे. यामुळे नेमका कोणता पावित्रा घ्यायचा याची कल्पना तुकडीला येत असे. एवढी त्रोटक माहिती मला आहे. अधिक माहिती शोधायला हवी.

संजय, तुमचे लेखन रोचक आहे. पुढील भाग नक्की वाचते.

 
^ वर