१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस ! - २

पानिपतपासून सुमारे सहा ते सात किलोमीटर्स अंतरावर अब्दालीची छावणी सीवा व दिमाना या गावांच्या दरम्यान साधारण पूर्व - पश्चिम अथवा नैऋत्य - ईशान्य अशी तीन ते चार किलोमीटर्स अंतरावर किंवा सहा किलोमीटर्स अंतरापर्यंत पसरली असावी. मराठी सैन्य पानिपतमधून बाहेर पडल्याची जरी बातमी अब्दालीला मिळाली असली तरी ते सैन्य यमुनेकडे जात आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्या दृष्टीने मराठी फौजा त्याच्या छावणीवर चालून येत होत्या. मराठे आपल्यावर चालून आले तर ते गनिमी पद्धतीने म्हणजे दोन ते तीन टोळ्या बनवून आपल्यावर हल्ला करणार अशी अब्दालीची खात्री होती. त्यानुसार, मराठी लष्कराला रोखण्यासाठी त्यानेही आपल्या लष्कराची तीन टोळ्यांमध्ये विभागणी केली. पहिली टोळी, उजव्या बाजूला रोहिला - अफगाण सरदारांच्या सोबतीने पाठवली. रोहिला सरदारांचे तळ उजव्या बाजूला म्हणजे, यमुनेच्या दिशेला असल्याने त्या बाजूने मराठ्यांचा हल्ला आल्यास तो रोखण्याची जबाबदारी साहजिक त्यांची होती. रोहिल्यांच्या मदतीला म्हणून त्याने आपल्या काही अफगाण तुकड्या देखील सोबत दिल्या होत्या. छावणीच्या मधोमध अब्दालीच्या सैन्याचा तळ होता. त्यामुळे आघाडीच्या मध्य भागाची जबाबदारी अब्दालीने आपल्या वजीरावर सोपवली. छावणीच्या डाव्या बाजूला सुजा , नजीब यांचे गोट होते. साहजिकचं त्यांची नेमणूक आघाडीच्या डाव्या फळीवर झाली. त्यांच्या मदतीला म्हणून अब्दालीने काही अफगाण पथके नेमलेली होती. वास्तविक, या हिंदुस्थानी मुस्लिमांचा त्याला अजिबात भरवसा नव्हता ! ऐन युद्धात हे लोक कच खाऊन किंवा आपल्या व आपल्या सैन्याला मराठ्यांच्या दाढेला देऊन पळून जातील याविषयी त्याच्या मनी तिळमात्र शंका नव्हती !! यासाठीच मदतीच्या नावाखाली त्याने आपली काही अफगाण पथके या हिंदुस्थानी मित्रांच्या आजूबाजूला व मागच्या बाजूला उभी केली होती. मराठी फौज बुधवारी बाहेर पडणार असल्याची बातमी यापूर्वीच अब्दालीला मिळालेली होती. पण ते बुधवारी बाहेर पडतीलचं असेही नव्हते. तेव्हा लष्कराला सावध व तयारीने राहाण्याचा इशारा देण्यापलीकडे अब्दालीने काही केले नव्हते. अब्दालीच्या या कृत्यामुळे त्याचा काहीसा फायदा झाला. लष्कराला सज्जतेचे आदेश आधीच दिल्याने, मराठी सैन्य बाहेर पडत असल्याची बातमी मिळताच, त्याचे सैन्य त्वरेने रणभूमीकडे जाऊ शकले. शक्य तितक्या जड, लांब पल्ल्याच्या तोफा आघाडीवर जाणाऱ्या पथकांनी सोबत घेतल्या. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो कि, मैदानी युद्धात वापरल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या जड तोफांच्या माऱ्याची रेंज किती किलोमीटर असावी ? याविषयी स्पष्ट असे उल्लेख मिळत नाही. नोव्हेंबर महिन्यात जेव्हा मराठे - अब्दाली आमनेसामने होते, त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये साधारण पाच ते सहा किलोमीटर्सच्या दरम्यान अंतर असावे. त्यावेळी मराठ्यांच्या तोफांनी अफगाण लष्कराची व अफगाणी तोफांच्या माऱ्याने मराठ्यांची बरीच हानी होत असे. ते पाहता, अशा तोफांचा पल्ला साधारण दहा किलोमीटर्सच्या आसपास असावा असे अनुमान बांधण्यास काहीचं हरकत नसावी. त्याशिवाय आणखी एका मुद्द्याकडे मी अभ्यासू वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो व तो मुद्दा असा कि, जयपूरच्या किल्ल्यावर असलेल्या एका मोठय तोफेची रेंज ३५ किलोमीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. या तोफेची रेंज मोठी असल्याने तिचे वजन देखील जास्त आहे. म्हणजे यावरून असे म्हणता येते कि, मैदानी युद्धातील लांब पल्ल्याच्या तोफांची रेंज हि गडावरील तोफांच्या तुलनेने कमी असल्याने त्यांचे वजन देखील तितकेसे जास्त नसावे. याचाच अर्थ असा कि, पानिपतावर मराठ्यांनी ज्या जड व लांब पल्ल्याच्या तोफा वापरल्या त्या वाहून नेण्यासाठी तीनशे - साडेतीनशे बैलांच्या दोन किंवा तीन माळा लावण्याइतपत फारशा जड नसाव्यात. अर्थात, या मुद्द्यावर अजून संशोधनाची गरज आहे. माझा मुद्दा याक्षणी तरी तर्कावर आधारीत आहे. परंतु, ज्याअर्थी मराठी सैन्याने साधारण तीन ते चार तासांत साडेचार - पाच किलोमीटर्सचे अंतर पार केले ते पाहता, तीनचारशे बैलांच्या दोन - तीन माळा लावून ओढायच्या तोफा मराठी सैन्यात नव्हत्या हे सहज सिद्ध होते असे माझे मत आहे.

अब्दालीच्या फौजा मुख्य छावणीतून साधारणतः सात - आठच्या दरम्यान आघाडीकडे रवाना झाल्या असाव्यात. अफगाण लष्कराची उजवी बाजू सांभाळणाऱ्या रोहिल्यांच्या सैन्यात मुख्यतः घोडेस्वारांचा भरणा अधिक होता. त्याशिवाय काही प्रमाणात पायदळ देखील होते. रोहिल्यांच्या या फौजेचे नेतृत्व हाफिज रहमत खान, दुंदेखान, फैजुल्लाखान इ. सरदार करत होते. रहमत खान आजारी असल्याने पालखीत बसला होता तर त्याचा मुलगा इनायतखान व चुलत भाऊ दुंदेखान हे रहमत खानाच्या सैन्याचे नेतृत्व करीत होते. रोहिल्यांची मुख्य शस्त्रे तलवार, ढाल, धनुष्य - बाण, भाले, कट्यारी इ. असून बंदुका फार क्वचित लोकांकडे असाव्यात. या सैन्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या कि नाही याची माहिती मिळत नाही. कदाचित असाव्यात अथवा असल्यास त्यांचे प्रमाण नगण्य असेच असावे. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला अमीरबेग, बरकुरदारखान यांची अफगाण पथके होती. यात सर्व घोडेस्वार असून यांच्याकडे देखील तलवारी, कट्यारी अशीचं शस्त्रे होती. या अफगाण पथकासोबत बहुतेक हलक्या अशा तोफा असव्यात अथवा नसाव्यात.

अब्दालीच्या उजव्या आघाडीवर असलेली फौज पानिपतच्या रोखाने म्हणजे वायव्येकडे न वळता काहीशी उत्तर - ईशान्य दिशेने पुढे सरकत गेली. यामागील कारण काय असावे ? या सैन्याचा रोख सरळ उत्तरेस असायला हवा होता पण यांचा मोहरा ईशान्य दिशेकडे वळत गेला. यामागील कारण माझ्या मते असे आहे कि, मराठी सैन्य गनिमी काव्याने हल्ला करणार हे निश्चित होते. अशा स्थितीत त्यांचा अब्दालीच्या छावणीवर हल्ला आलाचं तर त्यांची एक तुकडी छावणीच्या उजव्या बाजूवर येऊन आदळणार, म्हणजे ती थेट उत्तरेकडून न येता ईशान्येकडून येणार हे निश्चित ! अर्थात, दिशांचे हे भान त्याकाळी लोकांना फारसे नव्हते. परंतु रोहिला सैन्य व त्यांच्या डावीकडे असलेले अफगाण वजीराचे सैन्य, यांमध्ये दीड ते दोन किलोमीटर्सचे अंतर असावे. किंवा याहून कमी. हे जर लक्षात घेतले तर रोहिला सैन्याचा रोख ईशान्येकडे का वळला असावा याचे उत्तर मिळते. आपल्या व वजीराच्या तुकडीत फार कमी अंतर आहे, याचा अर्थ मराठी सैन्य आपल्या दोघांच्या मधून लढाई न देता तरी जाऊ शकत नाही पण उजव्या बगलेवरून निसटून गेले तर ? बहुतेक याच भयाने, रोहिल्यांची फौज काहीशी ईशान्येकडे सरकली. नऊ - साडेनऊच्या सुमारास हि फौज, मराठी सैन्याच्या गोलाच्या आघाडीवर असलेल्या गारदी पथकांच्या नजीक जाऊन पोहोचली. माझ्या मते या दोन सैन्यांच्या दरम्यान कमीतकमी एक ते दीड किलोमीटर्सचे अंतर असावे. अब्दालीच्या छावणीचा पसारा पूर्व - पश्चिम असा चार - सहा किलोमीटर्स अंतरावर पसरला होता असे जर गृहीत धरले तर, छावणीच्या उजव्या अंगाला असलेल्या या रोहिला फौजेला, गारदी सैन्याच्या अंगावर चालून जाण्यासाठी कमीतकमी तीन - साडेतीन किलोमीटर्सचे अंतर तुडवावे लागले असावे. रोहिला सैन्याने सात - आठच्या दरम्यान मुख्य छावणी सोडली असे जर गृहीत धरले तर तीन - साडेतीन किलोमीटर्सचे अंतर कापायला त्यांना सुमारे दीड - दोन तासांचा अवधी लागला असावा. सकाळी नऊ - साडेनऊच्या सुमारास गारदी सैन्याच्या उजव्या हाताला, सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर शत्रू सैन्याची निशाणे दिसू लागली. बहुतेक याच वेळेस अफगाण वजीर हुजुरातीच्या उजव्या बाजूनजीक येऊन पोहोचला असावा. त्यामुळेचं मराठी सैन्यात चौघडा - नौबत वाजवण्यास सुरवात झाली असावी.

पानिपतच्या युद्धाला आरंभ प्रथम कधी झाला असावा ? :- भाऊची कैफियत, भाऊची बखर, काशिराजची बखर, नुरुद्दीनकृत नजीब चरित्र, महंमद जाफर शाम्लू, शिवप्रसादची बखर, अब्दालीचा पानिपत विजयाचा जाहीरनामा, पानिपतच्या युद्धानंतर अब्दालीने जयपूरच्या सवाई माधवसिंगास लिहिलेलं पत्र, नाना फडणीसचे आत्मवृत्त इ. मधील पानिपतच्या लढाईचा आलेला वृत्तांत पाहिला असता असे दिसून येते कि, पानिपतच्या युद्धाला नेमकी कोणत्या पक्षाकडून सुरवात झाली असावी याविषयी माहिती वरीलपैकी एकाही संदर्भ साधनांत आलेली नाही. त्यामुळे युद्धाला आरंभ नेमका गारदी - रोहिला या मोर्च्यावर झाला कि भाऊ - शहावली यांच्या मोर्च्यावर झाला हे निश्चित करणे अवघड होऊन बसले आहे. रोहिला सैन्य वेगाने पुढे सरकून गेल्यामुळे त्यांची व गारद्यांची लढाई जुंपली असे म्हणावे तर मग शहावलीखान जेव्हा हुजुरातीच्या दिशेने चालून आला त्यावेळी, तोफांची लढाई सुरु असताना हुजुरातीने गोलातून बाहेर पडून त्याच्यावर स्वारी का केली असावी ? गारदी - रोहिले यांच्यात संघर्ष सुरु झाल्यावर विंचूरकर, गायकवाड हे सरदार गोलातून बाहेर पडले कि तत्पूर्वीच त्यांनी रोहिल्यांवर चाल केली होती ? सारांश, पानिपतच्या लढाईचे शक्य तितके बिनचूक वर्णन करण्यासाठी या व अशा इतर अनेक प्रश्नंची उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे. अर्थात, या प्रकरणाविषयी मला जितकी संदर्भ साधने उपलब्ध झाली त्यांच्या आधारे आणि तर्काच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यानुसार पानिपतच्या लढाईचे वर्णन खाली देत आहे.

युद्धाला प्रथम आरंभ गारदी - रोहिला यांच्या बाजूला झाला असावा असे भाऊची कैफियत, काशीराजची बखर व नुरुद्दीनकृत नजीब चरित्र यांवरून दिसून येते. अर्थात, या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, गारदी - रोहिला मोर्चा ज्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी वरील तिन्ही ग्रंथांचे लेखक हजर नव्हते. कैफियतकार यावेळी हुजुरातीच्या आसपास, म्हणजे मुख्य सैन्याच्या मागे गोलाच्या आत असावा. याचा अर्थ असा होतो कि, युद्धाला आरंभ नेमका कुठे झाला याविषयी त्याच्याकडे नेमकी माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे. पण, कैफियत नाना पुरंदरे याने लिहिलेली आहे असे जर धरून चालले तर प्रथम हे बघावे लागेल कि, गोलाच्या रचनेत तो नेमका कुठे होता ? माझ्या मते, तो हुजुरातीच्या उजव्या बाजूला असावा. कारण, नाना पुरंदरेच्या पत्रात, तो व होळकर एकाच सुमारास व बहुतेक सोबतीनेचं पानिपतहून निघाल्याचा उल्लेख आहे. हे लक्षात घेतले असता, युद्धाला प्रथम आरंभ गारद्यांच्या बाजूला झाला असल्यास त्याची बातमी नाना पुरंदरेला माहिती असणे शक्य आहे. परंतु, नाना पुरंदरे हाच भाऊच्या कैफियतीचा लेखक आहे, हे अजूनही निश्चित न झाल्याने कैफियतीवर पूर्णतः भरवसा ठेवता येत नाही !

काशीराज पानिपत युद्धाच्या वेळी आघाडीवर असला तरी तो सुजासोबत, शिंदे - होळकरांच्या समोर उभा होता. त्यामुळे त्याला, शहावलीच्या पलीकडे उभ्या असलेल्या रोहिल्यांच्या हालचालींची फारशी माहिती असणे शक्य नाही. नजीबचा चरित्र लेखक यावेळी नजीबसोबत रणभूमीवर हजर होताच असे म्हणता येत नाही. एकूण, भाऊ कैफियतीचा लेखक, नुरुद्दीन व काशीराज हे त्रिकुट, युद्धाला प्रारंभ झाला त्या ठिकाणी हजर नव्हते हे सिद्ध होते. परंतु, तरीही या तिघांनी पानिपतच्या लढाईला आरंभ गारद्यांच्या बाजूला झाल्याचा उल्लेख केलेला आहे. यामागील कारण काय असावे ते माहिती नाही, पण या तिघांचे या विशिष्ट मुद्द्याविषयी झालेले एकमत पाहता, त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवण्याशिवाय इतर पर्याय नाही. अर्थात, जोवर अधिक विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही तोवर या तिघांच्या लेखनावर थोडाफार विश्वास ठेवावाचं लागेल !

भाऊची कैफियत, काशीराज व नुरुद्दीन यांची माहिती गृहीत धरून असे म्हणता येईल कि, पानिपतच्या लढाईला आरंभ प्रथम गारद्यांच्या बाजूला झाला. साधारणतः नऊ - साडेनऊच्या दरम्यान गारदी - रोहिला फौजा समोरासमोर आल्या असाव्यात. आपल्या उजव्या बाजूने शत्रू सैन्य चालून येत आहे हे लक्षात येतांच, यमुनेच्या दिशेने निघालेली गारदी फौज जागीच थांबली. पानिपत लढाईच्या वेळी गारदी पथके नेमकी कुठे असावीत ? कैफियतकाराच्या मते, पानिपत सोडून दीड कोस म्हणजे साडेचार - पावणेपाच किलोमीटर्स अंतर पार करून मराठी लष्कर पुढे निघून आले त्यावेळी शत्रू सैन्य त्यांच्या दृष्टीस पडले. कैफियतकार कोण होता हा मुद्दा बाजूला ठेऊन, तो हुजुरातीच्या सोबत होता हे लक्षात घेतल्यास, दीड कोसांचे अंतर पार केल्याचा जो उल्लेख त्याने केला आहे तो हुजुरातीला अनुलक्षून आहे हे उघड आहे. याचा अर्थ असा होतो कि, सध्याचे जे पानिपतचे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या आसपास हुजुरातीची फौज येऊन उभी राहिली असावी. हुजुरात जर स्मारकाच्या आसपास उभी होती असे गृहीत धरले तर गारदी फौज तेथून एक - दीड किलोमीटर्स पुढे उभी असणार हे उघड आहे. पानिपतपासून सुमारे पाच - सहा किलोमीटर्स अंतर चालून आल्यावर गारद्यांना आपल्या उजव्या बाजूला शत्रू सैन्याची निशाणे दिसू लागल्यावर त्यांची चाल थांबली. शत्रू सैन्य सुमारे एक - दीड किलोमीटर्स पेक्षाही लांब अंतरावर उभे असावे. गारदी पथके ज्या ठिकाणी उभी होती, ती जागा उंचवट्यावर होती कि सपाटीला होती ते समजणे आता अशक्य आहे. उंचवट्यावर जर ते उभे असतील तर त्यांना लांबून, दक्षिणेच्या बाजूने येणाऱ्या शत्रूसैन्याच्या रांगा दृष्टीस पडल्या असण्याची शक्यता आहे. असे असेल तर त्यांनी तातडीने आपल्या तोफांचे मोर्चे दक्षिणेच्या बाजूला तोंड करून उभारले असावेत. जर ते सपाटीला असतील तर दुरून दिसणारी शत्रू सैन्याची निशाणे पाहून ते जागीच थांबले असावेत पण मग त्यांनी तोफांचे मोर्चे उभारण्याची घाई केली असावी कि नसावी ? कारण, फक्त निशाणांवरून समोरून येणारी शत्रूच्या सैन्याची एखादी लहानशी तुकडी आहे कि मोठी फौज आहे हे समजून येत नाही. पण अधिक माहिती उपलब्ध नसल्याने या मुद्द्यावर जास्त चर्चा करणे चुकीचे आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो कि, भाऊच्या कैफियतीनुसार प्रथम विंचूरकर, यशवंतराव पवार, माणिकराव कापरे हे सरदार पुढे सरकले. रोहिल्यांशी त्यांचा संघर्ष झाला व एकप्रकारे पराभूत होऊन हे लोक परत गोलात येऊन उभे राहिले. याविषयी विरुद्धपक्षीय बखरींमध्ये कसलाच उल्लेख मिळत नाही.

मराठी सरदारांनी गोल फोडला असे शेजवलकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. शेजवलकरांच्या विधानाचा आधारे सरदारांनी गोल फोडल्याचे वर्णन, विश्वास पाटलांनी आपल्या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी रंगविले आहे. परंतु, या ठिकाणी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे कि, मराठी सरदारांनी गोल फोडला होता का ? माझ्या मते, विंचूरकर प्रभूती सरदारांनी गोल फोडला नाही. पहिली गोष्ट अशी कि, या लोकांनी गोल फोडला असे कैफियतकार अजिबात लिहित नाही. भाऊचा बखरकार हा सरदारांचा पक्ष घेऊन लेखन करणारा आहे व भाऊचा विरोधक आहे तर कैफियतकार हा भाऊचा पक्षपाती आहे असे सर्वसामान्यतः मानले जाते. जर हे खरे असेल तर कैफियतकाराने पवार, विंचूरकर इ. सरदारांनी गोल फोडला असे स्पष्टपणे का लिहिले नसावे हा प्रश्न निर्माण होतोचं.

माझ्या मते गोलाच्या लढाईचे स्वरूप, व्यवस्थितरित्या स्पष्ट न झाल्याने हा सर्व गोंधळ निर्माण झाला असावा. त्यासाठी प्रथम गोलाची लढाई म्हणजे काय हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. गोलाच्या लढाईचा प्रसार हा युरोपियन लोकांनी हिंदुस्थानात केला. त्यांच्या सैन्याची रचना जर लक्षात घेतली तर अशा तऱ्हेची लढाई हि बचावात्मक प्रसंगी, त्यांना अतिशय उपयुक्त अशीच होती. त्यांचे सैन्य मुख्यतः बंदुकधारी पायदळ पलटणींचे असे. त्यामानाने घोडदळाचे प्रमाण, तुलनेने अल्प असेच होते. या सैन्याची मुख्य शस्त्रे तोफा - बंदुका हि असून, यांच्या सहाय्याने शत्रूशी प्रत्यक्ष न भिडता दुरूनचं त्याचा संहार करणे त्यांना सोयीचे होते. अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास या सैन्याचा पोकळ गोल बांधून व सभोवती तोफा पेरून, लढाई देत वाट चालत जायचे त्यांना यामुळे शक्य होत असे. यांच्याकडे बंदुका व तोफा असल्याने, या सैन्याच्या पोकळ गोलावर शत्रू चालून जरी आला तरी त्याच्याशी प्रत्यक्ष हातघाईचे झुंज न देता दुरूनचं तोफा - बंदुकांच्या सहाय्याने त्याची राळ उडविणे किंवा त्याची नासाडी करणे त्यांना सोयीचे जात असे. युरोपियन लोक व्यापारी कंपन्या स्थापन करून हिंदुस्थानात आले. पुढे प्रसंगानुसार त्यांना आपल्या सैन्याची उभारणी करावी लागली. स्वदेशातून इकडे सैनिक आणण्यापेक्षा इथल्याच लोकांना, आपल्या पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन, कमी खर्चात इकडेचं फौज उभारणे आपल्या फायद्याचे आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इथल्या लोकांना हाताशी धरून आपले सैन्यदल उभारले. या सैन्यदलांवरील वरिष्ठ अधिकारी हे युरोपियन असले तरी हाताखालील अंमलदार मात्र एतद्देशीय असत. या अंमलदारांना युरोपियन लोक जे लष्करी शिक्षण देत ते युरोपियन पद्धतीचे म्हणजे कवायती सैन्याच्या लढाईचेचं असे. याचा परिणाम म्हणजे, हे अंमलदार युरोपियन लढाईची पद्धती शिकले पण त्याचा इथल्या परिस्थितीत कितपत उपयोग आहे किंवा त्याचा वापर परिस्थितीनुसार कसा करायचा हे त्यांना समजू शकले नाही. गोलाची रचना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्य लष्करात तोफखाना व बंदुकधारी पायदळाची मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. जर ते नसेल तर तलवार - भाल्यांनी लढणारे लोक शत्रू सैन्याला, आपल्या गोलानजीक येण्यापासून कसे रोखणार ? तोफा जरी सोबत असल्या तरी नुसत्या तोफांचा या कमी फारसा उपयोग होत नाही. तोफांचा मारा चुकवता येऊ शकतो. तसेच अल्पावधीत तोफांच्या जागा बदलणे देखील अवघड पडते. याचा अर्थ असा होतो कि,गोलाची रचना हि एतद्देशीय फौजांसाठी उपयुक्त अशी नव्हतीच ! याच गोलाची रचना करून निजामाने, उदगीर मोहिमेत मार खाल्ला होता. त्याच्या लष्कराच्या गोलावर हल्ला करताना, जिकडे गारदी पलटणी नव्हत्या तिकडेच मराठ्यांनी जोरदार हल्ले चढवले होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गारदी सरदारांना गोलाच्या रचनेची उपयुक्तता माहिती होती पण ज्या ठिकाणी बंदुकधारी पलटणी अल्प असून घोडदळ अधिक प्रमाणात आहे, त्या ठिकाणी हि गोलाची रचना कशी वापरायची हे त्यांना बहुतेक माहिती नसावे किंवा याचा त्यांनी विचार देखील केलेला नव्हता.

क्रमश:...

इतर भाग:
१. ४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस -१
२. ४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस -३

लेखनविषय: दुवे:

Comments

भाग आवडला

हा भागही आवडला. युद्धारंभ, गोलाच्या लढाईची पार्श्वभूमी वगैरेंविषयी उत्तम माहिती मिळाली. तिसर्‍या भागात काहींनी लेखासोबत नकाशे देण्याबद्दल सांगितले होते. पानिपताच्या प्रदेशाचा भूगोल परिचयाचा नसल्याने सैन्य उत्तरेकडे न सरकता ईशान्येकडे सरकले वगैरे गोष्टी चटकन डोक्यात शिरत नाहीत. नकाशांनी आधीच उत्तम असलेल्या लेखाला अधिक उठाव आला असता.

 
^ वर