भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र

(Original Alms-Bowl of Buddha)
इ.स.1880-81 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन मुख्य, मेजर जनरल ए. बकिंगहॅम यांनी बिहारच्या उत्तर व दक्षिण भागांचा एक दौरा केला होता. या दौर्‍यात बकिंगहॅम यांनी त्या वेळेस बेसार (Besarh) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका गावाला भेट दिली होती. हे गाव म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेले वैशाली नगर आहे हे बकिंगहॅम यांनी लगेच ओळखले होते. वैशाली येथे जरी बकिंगहॅम यांना फारशा पुराण वस्तू सापडल्या नसल्या तरी त्यांना वैशाली या स्थानी भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र पुरातन कालापासून जतन करून ठेवलेले होते अशी माहिती समजली. य़ा भिक्षा पात्रा बद्दलची बरीच माहिती बकिंगहॅम यांनी संकलन करून ठेवलेली आहे.
बौद्ध कथांमध्ये या भिक्षा पात्राबद्दल अशी कथा दिलेली आहे की गौतमाला महाब्रम्हाने दिलेले मूळ भिक्षा पात्र, गौतमाला जेंव्हा बुद्धत्व प्राप्त झाले तेंव्हा नाहीसे झाले. त्यामुळे इंद्र, यम, वरूण व कुबेर या चारी दिक्‍पालांनी पाचू पासून बनवलेली चार भिक्षा पात्रे बुद्धांना आणून दिली. परंतु भगवान बुद्धांनी ती घेण्याचे नाकारले. नंतर या दिक्पालांनी आंब्याच्या रंगाच्या दगडाची चार पात्रे बुद्धांना आणून दिली. कोणाचीच निराशा करायची नाही म्हणून बुद्धांनी ही चारी पात्रे ठेवून घेतली आणि त्या चार पात्रांपासून चमत्काराने एकच पात्र बनवून घेतले. चार पात्रांपासून हे भिक्षा पात्र बनवले असल्याने वरच्या कडेजवळ या चारी पात्रांच्या कडा या भिक्षा पात्रात स्पष्टपणे दिसत राहिल्या.
वैशाली गावाच्या ईशान्येला साधारण 30 मैलावर असलेले केसरिया हे गाव (बकिंगहॅमच्या मताप्रमाणे), मगध देशाच्या सीमेवर होते. भगवान बुद्धांच्या अखेरच्या कालात, वैशालीच्या लच्छवी लोकांनी या गावात बुद्धांचा निरोप घेतला होता. त्या वेळेस बुद्धांनी हे भिक्षा पात्र त्यांना परत पाठवताना, आपली आठवण म्हणून दिले होते. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी फा-शियान (AD 400) व ह्युएन त्सांग किंवा शुएन झांग (AD 520) या दोन्ही प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनात ही आख्यायिका नमूद करून ठेवलेली आहे.या लच्छवी लोकांनी हे भिक्षा पात्र, वैशाली गावात मोठ्या आदराने जपून ठेवलेले होते. पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात, सम्राट कनिष्क किंवा त्याच्यानंतर गादीवर आलेला सुविष्क यापैकी कोणीतरी, हे पात्र आणि बुद्धाचा प्रसिद्ध चरित्रकार अश्वघोष, यांना वैशालीहून गांधार राज्यातील पुष्पपूर (पुरुषपूर, पेशावर) येथे मगध देशाचा युद्धात पराभव करून नेले. बौद्ध मुनी तारानाथ याच्या ग्रंथात, सम्राट कनिष्क याच्या कारकीर्दीमध्ये झालेल्या तिसर्‍या बौद्ध महासभेचे नियंत्रक, पार्श्व या बौद्ध मुनींचा अश्वघोष हा शिष्य असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
इ.स. नंतरच्या चौथ्या शतकात चिनी प्रवासी फा-शियान याने हे भिक्षा पात्र, गांधार देशाची राजधानी असलेल्या पुष्पपूर (पुरुषपूर, पेशावर) येथे बघितल्याचे नमूद केलेले आहे. मात्र या नंतर हे पात्र पेशावर येथून हलवले गेले कारण इ.स. नंतरच्या सहाव्या शतकात आलेले दोन चिनी प्रवासी शुएन- झांग आणि सॉन्ग युन या दोघांच्याही प्रवास वर्णनात हे पात्र बघितल्याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. फा-शियान याच्या वर्णनात तिसर्‍या शतकामध्ये हे पात्र बाल्ख किंवा काबूल येथे नेण्यासाठी गांधार देशावर यू-चि या राज्याकडून मोठे परकीय आक्रमण झाल्याचा उल्लेख आहे. फा-शियान च्या भेटीनंतर गांधारवर परत एकदा हे पात्र मिळवण्यासाठी यू-चि राज्याकडून मोठे आक्रमण होणार अशी चिन्हे दिसू लागल्याने बहुदा AD 425-450 मध्ये गांधारच्याच लोकांनी हे पात्र अफगाणिस्तान मधील कंदहार शहराच्या जवळ असलेल्या ठिकाणी नेले व या ठिकाणाला आपल्या देशाचेच म्हणजेच गांधार असे नाव दिले. कालांतराने गांधारचे कंदाहार झाले. सध्या या ठिकाणाला 'जुने कंदहार' या नावाने ओळखले जाते. हे पात्र अगदी अलीकडे म्हणजे मोहंमद नसिबुल्ला याच्या कारकीर्दीपर्यंत कंदहार मध्ये होते व त्यानंतर ते काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आले आहे. तालिबान राजवटीत अतिरेक्यांनी काबूल संग्रहालयावर 3 किंवा 4 वेळा तरी हल्ले चढवले होते. त्यातून हा ठेवा बचावला हे आपले सुदैव आहे असेच म्हणावे लागेल.
हे पात्र दिसण्यास आहे तरी कसे या बद्दलचे फा-शियान याने केलेले वर्णनच फक्त आज उपलब्ध आहे. फा-शियानच्या मूळ चिनी वर्णनाची तीन भाषांतरे आहेत. या तिन्ही भाषांतरात हे पात्र संमिश्र रंगाचे असले तरी प्रामुख्याने काळे आहे असे वर्णन आहे. त्याच बरोबर अंदाजे 8 किंवा 9 लिटर क्षमता असल्याचाही उल्लेख आहे. त्याच प्रमाणे चार कडा स्पष्टपणे दिसून येतात असाही उल्लेख आहे. मात्र हे पात्र अपारदर्शी आहे का पारदर्शक या बद्दल या तिन्ही वर्णनात मतभेद आहे. डॉ.बेल्यु या संशोधकाच्या वर्णनाप्रमाणे कंदाहार येथील (आता काबूल संग्रहालयात असलेले) भिक्षा पात्र हे गडद हिरवट, काळसर किंवा एखाद्या सापाच्या रंगाचे असून त्यावर अरेबिक भाषेतील सहा ओळी कोरलेल्या आहेत.
या दोन्ही वर्णनांवरून काबूल संग्रहालयातील भिक्षा पात्र मूळ पात्र असण्याची बरीच शक्यता वाटते. पात्राच्या तळाचा भाग एखाद्या कमळाच्या आकाराचा बनवलेला असल्याने हे पात्र बौद्ध कालातील असण्याची खूपच शक्यता आहे. त्यावर अरेबिक भाषेत असलेल्या ओळी नंतरही कोरलेल्या असू शकतात. त्याच प्रमाणे हे पात्र एवढे मोठे आहे की ते हातात घेऊन भिक्षा मागण्यास जाणे कोणासही शक्य नाही. त्यामुळे हे पात्र बहुदा आपल्या देवळात हुंडी किंवा दान पेटी जशी ठेवलेली असते तसे बौद्ध विहारात ठेवलेले असावे. त्या काळात भिक्षा ही धान्य,सोने या स्वरूपातच दिली जात असणार. त्यामुळे एवढे मोठे पात्र असणे असंभवनीय वाटत नाही.
भगवान बुद्धांच्या भिक्षा पात्राची ही कहाणी मोठी विलक्षण आहे हे मात्र कोणीही नाकारणार नाही.
25 डिसेंबर 2011
संदर्भ :-
1. Report of Tours in north and south Bihar in 1980-81 By Maj.General A, Cunningham
2. Fa-Xian's record of Buddhistic Kingdoms By James Legge
(कनिंगहॅम यांनी बनवून घेतलेले या पात्राचे रेखाचित्र व काबूल संग्रहालयातील पात्राचे छायाचित्र या दुव्यावर बघता येईल.)

Comments

लेख आवडला...

निष्कर्षाच्या शेवटच्या पाच वाक्यांशीही सहमत.
इशान्य पाकिस्तान, पश्चिम काश्मीर ह्यांना लागून् असलेल्या अफगाणिस्तान व इतर भागात अगदि शतकभरापूर्वीपर्यंत इस्लाम पूर्व संस्कृती टिकून् होती. त्याभागास् "काफिरिस्तान" त्यामुळेच म्हणत असावेत.
१८९६ नंतर मात्र एकदम जबरदस्तीने संस्कृतीचे समूळचौच्चाटन झाले असले तरीही कित्येक पुरातन वस्तू काबूल संग्रहालयात पोचल्या.
आपण सांगितलेले भिक्षापात्रही असेच फकाफिरिस्तान मध्ये जपले गेले की काय् असे वाटले.

--मनोबा

लेख आवडला.

या भिक्षापात्राविषयी अधिक माहिती गोळा करण्यासाठी गूगल सर्च मारता नुकतीच टाइम्समधील हे भिक्षापात्र परत आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न नजरेस पडले. त्या व्यतिरिक्त बातमी मिळाली नाही तरी हा ठेवा अमूल्य असण्याबद्दल शंका नाही. तूर्तास, अलेक्झांडर कनिंगहॅम हा माहितीचा खजिना हाती लागल्याने आनंद झाला.

भिक्षापात्र आहे का?

हे भिक्षापात्रच आहे किंवा नाही कळले नाही. बहुदा भि़क्षापात्रापेक्षा नाणेघाटातल्या रांजणाप्रमाणे असावे का काय? हुंडी किंवा दानपात्राप्रमाणेच या पात्राचा टोलनाक्यावर वापर होऊ शकतो असे वाटते.

अर्थात ते काहीही असो, बाकी लेख आवडला. हे असे सर्व जपून ठेवले आहे याचे कौतुक वाटते.

भिक्षा पात्र

भिक्षा पात्र या शब्दाचा अर्थ हातात घेऊन फिरण्याचे भांडे इतक्या मर्यादित स्वरूपात घेऊ नये असे वाटते. ज्या पात्रात दान किंवा भिक्षा ठेवली जात असे ते पात्र असा याचा अर्थ घ्यायला हवा असे माझे मत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

योग्यच

तुमचे मत योग्यच आहे. हे पात्र आहे हे धनसंचय, वस्तूसंचयासाठीच. पण बुद्धाने पोटापुरतीच भिक्षा मागावी, वस्तूंचा संग्रह करू नये असे म्हटल्याने हे मोठे पात्र त्याचे असेल असे नाही. गांधारकलेचा काळ म्हटला तर तुम्ही म्हणता तसे अगदी शक्य आहे. खाली धनंजय म्हणत आहेत त्याचे कारणही हेच असावे असे वाटते.

मागे मी http://www.misalpav.com/node/19737 येथे बौद्धांच्या त्रिरत्नाचे चिन्ह कुठून आले असेल यावरून थोडी चर्चा सुरू केली होती. कधीकधी काही वस्तूंना किंवा चित्रांना, ते ज्यांच्याशी संलग्न आहेत अशा व्यक्तींप्रमाणेच महत्त्व प्राप्त होते. पुढेपुढे त्या चिन्हांमागचे अर्थ पुढील पिढ्यांच्या लक्षात राहत नसावेत अशी माझी समजूत आहे. याअर्थाने वरील भिक्षापात्र देवळातील दक्षिणेच्या पात्राप्रमाणेही (अलिकडे जाळी असलेली पेटी असते तसे) असू शकते असे वाटले.

लेख आवडला, पण शंका

लेख आवडला. पण ही शंका आहे : हे पात्र कुठल्याशा बौद्ध वास्तूमधले असू शकेल खरे. पण गौतम बुद्धाच्या काळातले आहे, असे का वाटावे?

का वाटावे

या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. फक्त एक उप प्रश्न आहे. का वाटू नये? :-)
चन्द्रशेखर

:-) त्या काळातला फारसा ऐवज उपलब्ध नाहीत म्हणून

:-) त्या काळातला फारसा ऐवज उपलब्ध नाहीत म्हणून.

गौतम बुद्धाच्या काळात बहुधा पाषाणाचे स्थापत्य फारसे होत नसे. राजगिरचा प्रचंड राजवाडा लाकडी होता, असे वाचलेले आहे. बौद्ध स्थापत्य दिसू लागते, शिल्प दिसु लागते, ते गौतम बुद्धानंतर काही शतकांच्या नंतरचे.

हे भले मोठे पात्र बनवले, तेव्हा पाषाणाची भलीमोठी शिल्पे बनू लागली होती. म्हणून हे शिल्प बहुधा गौतम बुद्धाच्या अनेक शतकांनंतरचे असावे.

शक्यता आहे

धनंजय म्हणतात ती शक्यता आहेच. परंतु इ.स्.पूर्व ६०० मध्ये पाषाण पात्रे बनत नव्हती असे म्हणणे मला कठिण जाईल.

दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात इ.स्.पूर्व २००० मधला पाटा वरवंटा आहे. त्यामुळे यानंतर १४०० वर्षांनी पाषाण पात्रे बनवता येत नव्हती हे पटत नाही.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कमळ

धनंजय म्हणतात त्यात तथ्य वाटते पण शक्यता नाकारता येत नाहीच. पात्राचे बूड कमळाच्या आकाराचे आहे. प्रत्यक्ष बुद्धाच्या हयातीत कमळाला किती धार्मिक महत्त्व होते यावर प्रकाश टाकता येईल का? बरचसं बौद्ध साहित्य आणि धार्मिक चिन्हे ही बुद्धाच्या नंतरची असावी. चू. भू. द्या. घ्या.

पाटे-वरवंटे प्राचीन, चित्र दिसत नाही

पाटे-वरवंटे हे फार प्रचीन आहेत. मात्र मोठी आणि कोरीव दगडी शिल्पे कितपत जुनी आहेत? मेगालिथिक काळात मोठाले दगड रचून (न कोरता) शिल्पे बनवली जात. दामोदर कोसंबींनी महाराष्ट्रातील अशी मेगालिथिक स्थळे (पाटा-वरवंट्यासह) दाखवलेली आहेत.

(का कोणास ठाऊक - वरील चित्र दिसत नाही.)

भारतातली सर्वात जुनी पाषाणशिल्पे शोधता मला अशोकाच्या काळातली शिल्पे सापडली.

पाट्या वरवंट्याचे चित्र

उपक्रमवर चित्र टाकणे ही मला कधीही यशस्वी रित्या न जमलेली गोष्ट आहे. मी हे छायाचित्र तुम्हाला हवे असले तर इ-मेलने पाठवू शकतो. चन्द्रशेखर

उपक्रमावर चित्र टाकणे

तुम्ही बहुधा तुमच्या ब्लॉगवरून येथे डिरेक्ट लिंक दिली असावी. पाट्या वरवंट्याचे चित्र आधी दिसत होते आणि नंतर दिसेनासे झाले. तेव्हा हे काही डायनॅमिक दुवे वगैरे असतील तर कल्पना नाही परंतु उपक्रमावर चित्रे टाकताना फ्लिकर किंवा पिकासा वगैरे साइटस्चा वापर करणे उपयुक्त ठरेल.

दगडी पाटे वरवंटे, शस्त्रे वगैरे पाषाणयुगापासून अस्तित्वात असावी परंतु शिल्पकला ही बहुधा ग्रीक आक्रमणानंतर भारतात रुजली असावी असा अंदाज आहे.

 
^ वर