मराठी संस्थळाचे प्रयोजन काय?

मराठी संकेतस्थळांची संख्या वाढत्येय. पण ही संकेतस्थळे की बघितली की

  1. अशुद्धलेखन
  2. कंपूबाजी
  3. एकमेकांची उणीदुणी काढणे
  4. कमरेखालचे विनोद
  5. आपल्या मित्रमंडळाला मोठे करणे
  6. टुकार विडंबने
  7. टुकार चर्चा
  8. ......
  9. ......
  10. ......

ह्यापुरती बहुतेक संस्थळे उरली आहेत असे दिसते. मग मीवडापाव डॉट कॉम घ्या, मीमठ्ठा डॉट कॉम किंवा ऐसीकोथिंबिरवडी डॉट कॉम घ्या. सगळीकडे तोच प्रकार. अभ्यासू लेखनाला आणि लेखकांना कुठे प्रोत्साहन मिळताना दिसत नाही.

तरीही ह्या वाढत्या संस्थळामुळे मराठीचे संवर्द्धन होईल असे अनेक आदरणीय जालीय महानुभावांना वाटते. तुमचं काय मत आहे? अशाने मराठीचे संवर्द्धन होणार आहे किंवा होते आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

भर घालावी

8........
9........
10........
इथे कृपया सदस्यांनी भर घालावी.

सदर चर्चा

सदर चर्चेसारख्या जगातील सर्वात महत्त्वाच्या चर्चांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

-Nile

दिलगीर

सदर चर्चेसारख्या जगातील सर्वात महत्त्वाच्या चर्चांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

कुठल्या तरी असलेल्या नसलेल्या विनोदावर उगाच फिदी फिदी हसणारे उथळ सदस्य सर्वच संकेतस्थळांवर वाढले आहेत. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगीर आहे.

अशुद्धलेखन(?)

मीमठ्ठा डॉट कॉम

हे अशुद्धलेखन आहे का? ;-)

बाकी चालू द्या. चर्चेत सावकाश भाग घेईन.

नाही

हे अशुद्धलेखन आहे का? ;-)

नाही. वडापाव आणि कोथिंबीरवडी सोबत एक गिलास छास किंवा मठ्ठा हवाच.

फालतू

फालतू आणि चर्वितचर्वण होऊन शिळा झालेला विषय. बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे 'कंड' हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

सदाबहार विषय

फालतू आणि चर्वितचर्वण होऊन शिळा झालेला विषय.

असहमत. हा सदाबहार विषय आहे. सदस्य मात्र शिळे झाले आहेत. 'माझा मऱ्हाटाचि बोलु कौतुके । परि अमृतातेंहि पैजासि जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन' असे म्हणत संकेतस्थळे प्रॉमिसिंगली सुरू होतात. पण पुढे दिसते काय तर सांसारिक पाककृतींचे चाळे, टुकार विडंबने आणि टुकार-रटाळ कविता.

अभ्यासू ?

अभ्यासू लेखनाला आणि लेखकांना कुठे प्रोत्साहन मिळताना दिसत नाही.

आपल्या ह्या चर्चेला प्रोत्साहन मिळाल्यास आपण अभ्यासू नाही असा निष्कर्ष निघतो काय?

इतरही काही संस्थळे

गाईबैल.कॉम पहा म्हणजे तुम्हाला असे वाटणार नाही.

नितिन थत्ते

गायवासरू डॉट कॉम

थत्ते, मूळचे गायवासरू डॉट कॉम वाले ना तुम्ही. तुम्हाला गाईबैलच आठवणार. पण ते तर क्लॉजेटेड संस्थळ आहे. दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे.

हि संकेतस्थळे कुठली?

मी गायबैल किंवा गायवासरू संकेतस्थळांबद्दल् कधी ऐकले नाहि. का आपण कोड्यात् बोलता आहात?
>पण ते तर क्लॉजेटेड संस्थळ आहे. दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे.
म्हणजे काय?

मराठीचे संवर्धन

सर्वच मराठी संकेतस्थळांवर मराठीचे संवर्धन होते असे मला वाटत नाही. सदस्यांचे संवर्धन मात्र होत असावे. :-) जेथे मराठीचे संवर्धन होते तेथे सदस्यांचे संवर्धन झालेले दिसत नाही. ;-)

असो. चर्चा करायचीच असेल तर ती भलतीकडे नेत राहण्यापेक्षा योग्य मुद्द्यांवर करणे बरे दिसेल. चर्चाप्रस्तावकाने ते नीट मांडावेत.

अनुस्वार राहिला का?

तुमच्या शीर्षकावरून सकृत्दर्शनी असं वाटलं की तुम्हाला 'मराठी' नावाच्या संस्थळाविषयी चर्चा करायची आहे. पण त्यात मराठी शब्दाभोवती अवतरण चिन्हं (की चिह्वं ?) नसल्यामुळे थोडा गोंधळ झाला. कारण अवतरण चिन्हांशिवाय (अथवा चिह्नांशिवाय) 'मराठी' हा शब्द आला की मराठी भाषेविषयी असतो. चर्चा वाचल्यावर एकंदरीत चर्चेच्या ओघावरून तुम्हाला सर्वसाधारणपणे मराठी संस्थळांविषयी बोलायचं आहे असा अंदाज आला. त्यासाठी माझ्या मते शीर्षकात संस्थळांची (ळा वर अनुस्वार) असा शब्द वापरायला हवा होता.

पुढेही लेखात 'वाढत्या संस्थळामुळे' असा उल्लेख येतो. त्या वाक्यात शिवाय 'या वाढत्या संस्थळामुळे' असा उल्लेख असल्यामुळे जास्तच गोंधळायला होतं. या हा शब्द वापरताना तुम्ही उपक्रमाविषयी बोलत आहात असा भास होतो. की इथेही अनुस्वार राहिलेला आहे व तुम्हाला एकंदरीत सर्व, बहुतांश संस्थळांविषयी बोलायचं आहे? नक्की काय ते स्पष्ट करावं ही विनंती. त्यातही वाढत्या हा शब्द संदिग्ध आहे. तुम्हाला आकाराने, सदस्यसंख्येने वाढत्या म्हणायचं आहे की 'संस्थळांची संख्या वाढत्या' अशा अर्थाने वाढत्या असं म्हणायचं आहे?

संवर्द्धन हा शब्द बरोबर आहे की संवर्धन? याविषयी उपक्रमावरील तज्ञांनी मार्गदर्शन करावं.

पण ही संकेतस्थळे की बघितली की

इथे तुम्हाला की हा शब्द एकदाच वापरायची इच्छा होती असा अंदाज आहे.

माझ्या मते उपक्रमावर लेखन करताना आपल्या लेखनातून गैर अर्थ येणार नाहीत इतपत तरी शुद्धलेखनाची पातळी ठेवावी असा इथल्या सदस्यांचा आग्रह असतो. तेव्हा काळजीपूर्वक लेखन करावे ही विनंती. तुम्ही जर नक्की काय बदल हवे आहेत हे स्पष्ट केलंत तर संपादन मंडळ निश्चितच लेख शुद्ध करून देईल असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हाऊ टू फीड द ट्रोल्स

हाऊ टू फीड द ट्रोल्स हे कुणी तुमच्याकडूनच शिकावे. संवर्द्धन हा तत्सम शब्द शुद्धच आहे. धनंजय ह्यांना विचारावे. आता राहता राहिले विसरलेले अनुस्वार. टायपो चुका होणे आणि शुद्धलेखनाची ऐसी की तैसी करणे ह्यात फरक आहे. काळजीपूर्वक लेखन करावे असे तुम्ही मला सुचवले आहे. आभारी आहे. पण तुम्ही टाकताय ना एखादे फालतू विडंबन किंवा एखादी सांसारिक पाककृती?

सब घोडे बारा टक्के

तो लेख प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स... असा आहे.

संवर्धन बाबत तुम्ही दिलेला दुवा पाहिला. पण तरीही तो शब्द कानाला बरोबर वाटत नाही. तिथे टायपो झाला असण्याची शक्यता आहे का? असो, तूर्तास मोल्सवर्थ प्रमाण मानतो.

टायपो कुठे संपतात आणि शुद्धलेखनाची ऐसी की तैसी कुठे सुरू होते हा विवाद्य मुद्दा असावा. वरील ८१ शब्दांच्या लेखात मी ६ टायपो, २ अप्रमाण मराठीचे वापर, २ कानाला खटकणारे शब्द मोजले. १२% हे चालून जाण्यासारखं, क्षम्य आहे का? चुका व्हायला काहीच हरकत नाही. शेवटी आयडी ही माणसंच असतात. व्यवस्थापनाला त्या दुरुस्त करण्याची विनंती करावी ही विनंती. इतर लोक घाण करतात म्हणून माझाही कचरा चालून जावा ही भूमिका योग्य नव्हे.

उपक्रमावर विडंबन किंवा पाककृती टाकायला मनाई आहे बहुधा. फालतू लिहायला तर ठारच मनाई असावी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

संवर्धन वि. संवर्द्धन

ह्यावरील माझा प्रतिसाद चुकून खाली पुढे पडला आहे. वाटल्यास तेथे वाचावा.

मुळीच मनाई नाही.

माहितीपूर्ण गोष्टी टाकण्यासाठीच हे संकेतस्थळ आहे असे सांगण्यात् येते.
पाकृ ह्या माहितीपूर्ण लिखाणातच मोडायला हव्यात. लिहिणारे का लिहित नाहित् हे आजवर् मला न उलगडलेले कोडे आहे.
आगदि साध्या साध्या गोष्टीही नोंदवून् ठेवल्याने, साठवत् गेल्याने, कालसुसंगत मांडल्याने त्याचे उपयुक्त,बहुमूल्य असे एक् संग्रहित रूप बनते. ब्रिटिशांच्या गॅझेटिअर ह्या संकल्पनेच्या ते जवळ जाते.
अगदि उकडलेले अंडे कसे बनवावे? दूध किती वेळ आटवत् ठेवल्याने चवीला चांगले व् उत्तम पोषणमूल्याचे राहते ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत; तसेच नियमित ह्या स्वतः हे न् करण्यार्‍यांसाठी माहितीपूर्णही आहेतच.
ऋषिकेश ने "आजी आजोबांच्या गोष्टी" व त्यानंतर "नातवाच्या गोष्टी" नावाची एक् सुरेख मालिका अगदि साध्या सरळ भाषेत लिहिली होती. साध्या साध्या गोष्टींचे वर्णन करणारी. उत्तमोत्तम,पौष्टिक पदार्थांच्या पाकृंचा संग्रहही बनवला तर् तो त्याच तोडीचा बनणार् नाही का? त्याला कोण कशाला नाही म्हणेल?
विडंबनही माहितीपूर्ण असेल तर प्रकाशित करायला कुणाची मनाइ आहे? खुद्द आपणच रावले साहेबांच्या कुठल्यातरी धाग्यावर एक भन्नाट तसाच धागा काढला होतात. धनंजयानं "कूट लिपी" बद्दल हैयोहैयेयो ह्यांच्या लेखाचे झोकात विडंबन् केले होते*.
तस्मात, पाकृ व् विडंबन माहितीपूर्ण असतील तर इथे चालायला हवीत.

बाकी चालु द्या. काय् कशासाठी आहे हे शोधीत बसण्यापेक्षा मला जे काही उपलब्ध आहे त्यात् माझ्या आवडीचं काय आहे ते शोधण्यात् वेळ घालवायला जास्त आवडेल.

* ते विडंबन् असल्याचे नंतर धनंजयाने नाकारले होते. पण मला ते विडंबनच वाटते.

--मनोबा

पाककृती

पाककृती माहितीपूर्ण ठरू शकतात याच्याशी सहमत आहे परंतु अंडे कसे उकडावे वगैरे पाककृतींसाठी अनेक साइट किंवा ब्लॉग मिळतील. तेव्हा पाककृती किंवा पाकक्रियेसाठी येणार्‍या लेखांमध्ये वेगळेपणा हवा.

उत्तमोत्तम,पौष्टिक पदार्थांच्या पाकृंचा संग्रहही बनवला तर् तो त्याच तोडीचा बनणार् नाही का? त्याला कोण कशाला नाही म्हणेल?

त्यापेक्षा उत्तमोत्तम पण विस्मरणात जाणार्‍या पाककृतींचा संग्रह आवडेल.

मागे मी एकदा भाकरीचा चंद्र हा लेख टाकला होता आणि तो सर्वसाधारण असूनही लोकांना आवडला होता असे आठवते. याचप्रमाणे एक अतिशय उत्कृष्ट लेख मायबोलीवर वाचला होता. त्यात वेदकाळापासून भारतीय अन्नाची उत्क्रांती कशी झाली यावर सुरेख विवेचन होते. असे काहीसे लेख वाचायला नक्की आवडतील.

वा!

भाकरीचा चंद्र हा लेख फारच मस्त आहे. पुन्हा एकदा वाचला. अशा आणखी सकस पाककृती उपक्रमावर यायला हव्यात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विडंबन आणि समांतर युक्तिवाद : फरक

समांतर युक्तिवाद आणि ललित विडंबन यांतील फरक गढूळ करण्यात तोटा आहे, असे माझे मत आहे.

युक्तिवादाचा साचा सयुक्तिक आहे की नाही? असा विचार करताना वेगवेगळे युक्तिवाद तंतोतंत समांतर असण्याबाबत शिस्त ठेवावी लागते. अनोळखी तपशिलांमुळे एका युक्तिवादात तर्कदोष हरवतात. ओळखीच्या उदाहरणामुळे दुसर्‍या युक्तिवादात ते स्पष्ट होतात.

ललित विडंबनात मात्र रंजकता ही आधी येते. मूलपाठ्यातील युक्तिवादाचे स्वरूपही राहिले नाही, तर चालते. उदाहरणार्थ "आम्ही कोण" ही केशवसुतांची कविता घ्या. शूरवीरांची ओळख वाचकाला कशाला असली पाहिजे, म्हणून केशवसुत वेगवेगळी महत्त्वाची कारणे देतात. ललित कविता आहे, त्यामुळे अतिशयोक्ती अलंकार वगैरे आहे. पण अतिशयोक्ती व्यंग्यपूर्ण नाही, प्रशंसेची आहे. अत्र्यांच्या "आम्ही कोण" विडंबनात कविकिरडू क्षुल्लक आणि न-पटणारी कारणे सांगतो (दुवा, पृष्ठ २७ बघा). त्यातले लालित्य असे, की वृत्त सांभाळले आहे, आणि हास्यरस एकजिनसी आहे. पण केशवसुतांच्या धाटणीची अतिशयोक्ती नाही. व्यंग्यपूर्ण हीनोक्ती आहे. जे अप्रशंसनीय तेच वाढवून सांगितलेले आहे. म्हणूनच केशवसुतांचा युक्तिवाद बरोबर, तर अत्र्यांचाही बरोबर असला पाहिजे, असे म्हणता येत नाही. कारण युक्तिवाद समांतर नाही. परंतु दोन्ही उत्तम ललित कृती आहेत.

साखळीपत्रावरील लेखाखाली "हे ललित विडंबन आहे" अशी फार चर्चा झाली. त्यामुळे "या लेखातील युक्तिवाद तर्कशुद्ध आहे का? संशोधनाच्या तत्त्वांना अनुसरून आहे का? नसल्यास का नाही?" या कळीच्या चर्चेची मोठी हानी झाली. जोपर्यंत त्या लेखाच्या तर्कशुद्धतेबाबत (किंवा जर तर्कदोष असतील तर त्यांच्याबद्दल) चर्चा होत नाही, तोवर तो लेख स्वतःहून माहितीपूर्ण आहे, असेच मानावे लागेल. वाटल्यास सदस्य मनोबा यांनी त्या लेखातील तर्कदोष त्या लेखाखाली द्यावे, आणि चर्चा घडवून आणावी. आणि मनोबा यांनी तर्कदोष नीट समजावून सांगितल्यास "संशोधनात कुठले तर्कदोष धोकादायक असतात" ही तर्कशास्त्राची आणि संशोधनप्रक्रियेची माहिती त्या लेखाच्या अनुषंगाने मिळेल.

- - -

ऋषिकेश यांच्या लेखमालेबाबत म्हणा किंवा बालसाहित्य विभागाबाबत म्हणा, किंवा गणितातल्या कोड्यांबाबत म्हणा. या सर्व प्रकारांना वाव आहे, असे उपक्रमाच्या इतिहासात दिसते. संपादकांनी बहुधा असे कुठेतरी स्पष्ट म्हटलेही आहे. या प्रकारांसाठी एखादा कथाप्रसंग देण्यास वाव आहे. हा कथाप्रसंग वास्तविक किंवा गणिती माहिती देण्यासाठी उपयुक्त असावा, अशी माफक अपेक्षा आहे. काळ-काम-वेग सोडवण्यासाठी गणिताच्या पाठ्यपुस्तकात पुष्कळदा एखादा कल्पित कथाप्रसंग असतो. यातून माहितीची हानी होत नाही, उलट माहिती समजणे सोपे जाते.

माहितीचा हेतू स्पष्ट असला, तर "हे ललित आहे की नाही" ही चर्चा सुसंदर्भ नाही. लालित्य हा दोष नाही. (माहितीला लालित्याचे वावडे आहे, हा माहितीबाबत तुच्छता वाटणार्‍यांनी पसरवलेले बालंट आहे.) माझ्यासारख्या काही लोकांना माहिती देताना लालित्य जमत नाही. हा माझ्या कौशल्याचा अभाव आहे. माहिती देण्याचा हेतू, किंवा गणित/तर्कचर्चा करण्याचा हेतू साधताना काही लेखकांना लालित्यही जमते. त्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे.

मान्य

माहितीचा हेतू स्पष्ट असला, तर "हे ललित आहे की नाही" ही चर्चा सुसंदर्भ नाही. लालित्य हा दोष नाही. (माहितीला लालित्याचे वावडे आहे, हा माहितीबाबत तुच्छता वाटणार्‍यांनी पसरवलेले बालंट आहे.)
हे मान्य.

माझ्यासारख्या काही लोकांना माहिती देताना लालित्य जमत नाही. हा माझ्या कौशल्याचा अभाव आहे. माहिती देण्याचा हेतू, किंवा गणित/तर्कचर्चा करण्याचा हेतू साधताना काही लेखकांना लालित्यही जमते. त्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे.
प्रामाणिकपणा कौतुकास पात्र आहे.

--मनोबा

आम्ही = कलावंत

धनंजय म्हणतात-

उदाहरणार्थ "आम्ही कोण" ही केशवसुतांची कविता घ्या. शूरवीरांची ओळख वाचकाला कशाला असली पाहिजे, म्हणून केशवसुत वेगवेगळी महत्त्वाची कारणे देतात.

'आम्ही कोण' ही कविता आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होती, आणि माझ्या आठवणीप्रमाणे ती कविता शूरवीरांची ओळख सांगत नाही तर 'कलावंतांची' ओळख/प्रशस्ती सांगते.
चूक भूल देणे घेणे.

बरोबर - चूक सुधारायला हवी

योग्य निरीक्षण आहे. कवितेत उत्तम क्लावंताची ओळख आहे. (मला वाटते की या धर्तीची कविता मराठी शूरवीरांबाबतही आहे - तिच्याशी गल्लत झाली. गल्लत व्हायला नको होती.)

माझ्या उदाहरणातील चूक सुधारायला हवी.

खाद्यकोश

@ मनोबा
विष्णू मनोहर हे २४ हजार पाक कृती असलेला एक खाद्यकोश करीत आहेत ... दुवा

असहमत

उपक्रमावर विडंबन किंवा पाककृती टाकायला मनाई आहे बहुधा. फालतू लिहायला तर ठारच मनाई असावी.
असहमत आहे. प्रस्तुत लेख / प्रस्ताव जे काही आहे ते अद्याप प्रकाशात आहे यावरुन असे लिहिता येते हे सिद्ध होत नाही काय?
हां, आता काय 'उपक्रमा'वर ठेवण्याजोगे आहे आणि काय नाही याबाबत संपादक मंडळाची धोरणे 'सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स' अशी आहेत, हा भाग वेगळा.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

आपले लेख

आपले हे आणि हे आणि हे लेखन इथे असताना वरील प्रतिसाद देणे गंमतीशीर वाटते. गेल्या उन्हाळ्यात आपण काय केले हे विसरलो नाहीच.

म्हणजे?

मी जे तुम्ही प्रयत्नपूर्वक शोधून काढलेल्या हे हे व हे मध्ये म्हटले आहे, तेच पुन्हा म्हटले आहे. आपणांस माझे उन्हाळे काय पण पावसाळेपण लक्षात असतील. आपल्या स्मरणशक्तीचे कौतुक आहे. सो व्हॉट?
आय मे बी राँग, बट ऍट लीस्ट आयम कन्सिस्टंट.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

नव्या संकेतस्थळांचे स्वागत करायला हवे

अधिकाधिक लोकांनी आंतरजालावरही मराठी लिहिली, वाचली, वापरली पाहिजे. तरच ती वाढेल. त्यामुळे प्रयोजन काही का असेना नवीन संकेतस्थळांचे स्वागतच करायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रतिसाद

मराठी संस्थळांमुळे मराठी भाषेचे संवर्धन होते - १००% सहमत. अनेक टुकार लेख येतात पण ते विसरवून टाकायला लावणारा एखादा सुरेखसा लेख, जबरदस्त चर्चाविषय, रम्य कविता येऊन जाते.
फार खोलात शिरायचे नाही कारण वैयक्तिक आहे परंतु जोपर्यंत मला असे संस्थळ सापडले नव्हते, माझे आयुष्य अतिशय उदास आणि एकाकी होते. मराठी ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, कोणाशीतरी मराठीमधून "संवाद" साधण्यासाठी तगमग होत असे.
ही संस्थळे माझ्याकरता शब्दशः "लाईफसेव्हरस" आहेत.
___________________
ज्यांना हे सर्व टुकार आहे, कमरेखालचे विनोद वगैरे असे वाटते त्यांच्यावर कोणाची सक्ती नाही येथे यायची. इतरांना आस्वाद घेऊ द्यात एवढीच माफक अपेक्षा आहे.

+१

सहमत. विशेषतः पहिल्या दोन वाक्यांशी तर् अधिकच.
काही का असेना ह्या लेखाच्या निमित्ताने "भाकरीचा चंद्र" पहायला मिळाला; धागा वाचणयचे कष्ट वसूल झाले.(पिच्चर् पाहण्याचे पैसे वसूल होतात तसे.)

--मनोबा

संवर्धन संवर्द्धन - थोडे अवांतर

पाणिनीचा अभ्यास मी केलेला नाही परंतु शाळेत शिकलेल्या व्याकरणाच्या स्मृतीवरून लिहितो.

वृध् (१ आ) (वर्धते) = वाढणे ह्या धातूपासून वर्धन = वाढणे हे नाम निर्माण होते आणि 'त' प्रत्यय लागून वृद्ध = वाढलेला हे भूतकालवाचक धातुसाधित विशेषण निर्माण होते. त्याच मार्गाने वृत् वरून वर्तन आणि वृत्त, नृत् वरून नर्तन आणि नृत्त [नृत्य नव्हे, तो संबंधितच पण अन्य शब्द आहे - महार्हाणि च पानानि यानानि शयनानि च | गीतं नृत्तं च वाद्यं च लभ मां प्राप्य मैथिलि -सुन्दरकांड १८(१०)], शुध् वरून शोधन आणि शुद्ध असे शब्द निर्माण होतात. (नृ अक्षरातून नर् आणि शु अक्षरातून शो कसे होतात हा वेगळाच विषय आहे, त्यात येथे शिरत नाही.)

त्यामुळे 'वर्धन' हेच शुद्ध आहे असे दिसते. मोल्सवर्थने वर्द्धन असा केलेला वापर हा केवळ त्याला माहीत असलेला usage दाखवतो. प्रांताप्रांताच्या उच्चरणवैविध्यामुळे हा अपपाठहि थोडा रूढ आहे - विशेषतः दक्षिण भारतात, पण शुद्ध आणि व्याकरणपूत शब्द 'वर्धन'च आहे

मोनिअर विल्यम्सने केवळ 'वर्धन' हाच शब्द 'वृध्' ह्या धातूशी संबंधित असा दाखविला आहे. 'वर्द्धन' असा काही शब्द त्याने पर्याय म्हणूनहि दाखविलेला नाही.

संस्कृतात द्वित्व योग्य, पण मराठीत अप्रमाण लेखन

वर्द्धन आणि वर्धन ही दोन्ही रूपे संकृतात साधुरूपे आहेत. पाणिनीच्या "अचो रहाभ्यां द्वे । पा. सू. ८.४.४६" असे या द्वित्वाचे वर्णन केलेले होते. संधिनियमानुसार झालेले सर्व साधुपर्याय संस्कृतात लेखनासाठी योग्य मानले जातात. पाणिनीच्या काळात तरी "वर्द्धन" हे रूप अधिक प्रचलित असावे. (पाणिनीने "वा" शब्दाने सांगितलेले पर्याय अधिक प्रचलित. "विभाषा" शब्दाने सांगितलेले पर्याय कमी प्रचलित. "अन्यतरस्याम्" शब्दाने सांगितलेले पर्याय समसमान प्रचलित. [बहुधा कात्रे यांचे संशोधन])

परंतु मराठीत संधीमुळे द्वित्व झालेली रूपे प्रमाणलेखनात नाहीत. ("महत्त्व" हे प्रमाण - कारण मुळातच दोन "त्" आहेत, संधिनियमामुळे नव्हेत. मात्र "लघुत्व" येथे द्वित्व करत नाहीत. या नियमाचा फायदा म्हणजे मराठीत "सत्त्व" आणि "सत्व" यांत फरक होतो. "सत्-त्व"चा अर्थ ठाऊकच असेल. "स-त्व" म्हणजे "स" असण्याचे भाववाचक नाम.) "रहाभ्यां द्वे" नियमानुसार द्वित्व झालेली रूपे मी छापील/अधिकृत मराठीत कधीच वाचलेली नाहीत.

हे सर्व या धाग्यात थोडे अवांतर आहे. धागा मौजमजेचा आहे, असे वाटते.

संस्थळांचा आनंद

इथल्या अनेक सदस्यांच्या तुलनेत मी काहीसा नवखा आहे या जालीय दुनियेत पण आता इतपत अनुभवी झालो आहे की श्री.बंडलबोर यानी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे देण्याइतपत माझ्या अंगी धाडस निर्माण झाले आहे.

(अ) मराठी संकेतस्थळांची संख्या वाढत्येय : माझ्या नजरेत उपक्रम, मिसळपाव, मी मराठी, मायबोली, मनोगत, पुस्तकविश्व आणि नुकताच महिना पूर्ण केलेले ऐसी अक्षरे अशी एकूण ७ स्थळे आली असून यापैकी 'पुस्तकविश्व' च्या घडामोडी थंडावलेल्या दिसतात तर मी मिपा आणि मनोगतचे सदस्यत्व घेतलेले नाही. मायबोलीवर फक्त वाचनमात्र असल्याने माझ्या दृष्टीने तीन संस्थळे म्हणजे फार होत नाहीत. अन्य सदस्यांचेही अशाच प्रकारचे सदस्यत्व असेल.

मग या तीन ठिकाणी माझ्यावर १. अशुद्धलेखनाचा कधी प्रसंग आला नाही. किंबहुना मी स्वतःच शुद्धलेखनाचा पुरस्कर्ता असल्याने एखाद्या लेखावर अशुद्धलेखन दिसलेच तर मी दुसर्‍या वाचनासाठी तिकडे जातही नाही.
२. कंपूबाजी, ३. उणीदुणी, ४. कमरेखालचे विनोद ~ या तीन प्रकारापासून मी अलिप्त आहे. त्यामुळे त्रास संभवत नाही. कुठे कंपूबाजी आहे का ? हे पाहण्याचेही मी कष्ट घेतलेले नाहीत. गरजही भासत नाही.
५. मित्रमंडळ मोठे करणे : लागू नाही. मित्रच नाहीत (शत्रूचा तर प्रश्नच नाही) त्यामुळे कुणीकुणाला मोठे करण्याचा प्रश्न गैरलागू.
६. विडंबन : डेव्हिल टेक देम्. परत लागू नाही.
७. टुकार चर्चा : असे क्लासिफिकेशन करणार्‍याच्या वृत्तीवर अवलंबून असते. उद्या 'पेट्रोलचे रेशनिंग' या विषयावरील चर्चा 'अ' ला टुकार वाटू शकते तर त्याचवेळी 'ब' ला ती काळाची गरज वाटू शकते. त्यामुळे चर्चांची डीग्री ठरविणे हा ज्याचा-त्याचा हक्क आहे.

(ब) असो. माझ्या नजरेत मराठी संस्थळांचे फार मोठे महत्व आहे आणि मी इथल्या प्रत्येक संस्थळाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असतानाच लेखन आणि वाचन दोन्हीचा मनमुरादपणे आनंद घेत आहे, इतके नक्की म्हणू शकतो.

अशोक पाटील

संकेतस्थळांची संख्या

>>माझ्या नजरेत उपक्रम, मिसळपाव, मी मराठी, मायबोली, मनोगत, पुस्तकविश्व आणि नुकताच महिना पूर्ण केलेले ऐसी अक्षरे अशी एकूण ७ स्थळे आली असून...<<
दोन वर्षांपूर्वी मी मराठी संस्थळांची यादी केली होती. जेव्हा ती संख्या पाचशेच्या वर गेली, तेव्हा मी यादी करणे थांबवले. संगणकाचे फॉरमॅटिंग होऊन यादी पुसली जाऊ नये म्हणून त्यावेळी मी ती मलाच ई-मेलने पाठवली होती. शोधल्यावर नक्की सापडेल. आजमितीला काही संकेतस्थळे बंद पडली असली तरी एकूण मराठी संस्थळांची संख्या हजाराच्या घरात असावी. अजूनही दर महिन्याला किमान तीस-चाळीस स्थळांनातरी माझी भेट असते....वाचक्नवी

५०० ?

बाप रे ! पाचशेच्या वर ? असे असेल तर मग नक्कीच मी जालीय दुनियतील के.जी.स्कूलचा विद्यार्थी आहे.

आता विषय तुम्ही छेडला आहेच तर मग हे देखील तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की अशा ५०० संस्थळावर आपण इथल्या 'उपक्रम' [तसेच माझ्या परिचयाच्या वरील चारपाच] वर ज्या पद्धतीने विविध विषयांवर चर्चा करतो, प्रतिसाद देतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो, त्याच पद्धतीने कामकाज चालते की केवळ मराठी ब्लॉग्ज धर्तीचे लेखन आणि प्रतिसादाशिवाय वाचन ?

प्लीज एज्युकेट मी, वाचक्नवी.

अशोक पाटील

भाषा हे माध्यम

मी (एक सर्वसामान्य माणूस, म्हणून माझ्या मताला फारशी किंमत नाही) असे समजतो कि भाषा हे मनातील विचार व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. शुध्द अशुध्द हे गौण आहे. दुसरे मराठीत टंकलेखन किचकटच आहे. लिपीकर या बहुभाषीक प्रणालीत बरीच चांगली सुविधा आहे कारण टंकलेखन करतानाच बटणावर कोणती अक्षरे आहेत हे खाली दिसते. बाकी संकेतस्थळावरील लिखाण महा किचकट वेतागवाणेच आहे. वेगाने करता येते. येथे फारच वेळ लागतो. हे एक महत्वाचे कारण आहे चुकिचे लिहिले जाण्यामागे.
समजून घ्यावे. बाकी मनातील विचार व्यक्त करण्याचे हे प्रभावी माध्यम आहे.

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundmarathi.com

लिहीत राहा

बाकी संकेतस्थळावरील लिखाण महा किचकट वेतागवाणेच आहे.

लिहीत राहा. सरावाने वैतागवाणे कामही सोपे होते.

अनुभव: काही दिवसांनी तर काही लोक इतके लिहू लागतात की वाचणार्‍यांना वैताग होतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सवय होईल

बाकी संकेतस्थळावरील लिखाण महा किचकट वेतागवाणेच आहे. वेगाने करता येते. येथे फारच वेळ लागतो. हे एक महत्वाचे कारण आहे चुकिचे लिहिले जाण्यामागे.

येथे लिहिण्याची हळूहळू सवय होईल नंतर किचकट वाटणार नाही. आम्हालाही हळूहळूच सवय झाली. आपण लिहित राहावे. उपक्रमावर शुद्धलेखनाचे नियम काटेकोर नाहीत परंतु ते पाळावे अशी अपेक्षा ठेवली जाते.

एक सर्वसामान्य माणूस, म्हणून माझ्या मताला फारशी किंमत नाही

इथे सर्वच सामान्य आहेत तेव्हा असे काही मानू नये.

सहमत

प्रत्येक् वेळा शेवटी अ टाईप् करावा लागणे. हे त्रासदायक् नाही काय्? हा किचकटपणा काढून् टाकणे टेक्निकली इतके कठीण् नसावे असे वाटते.

प्रत्येक वेळी अ टाइप करावा लागतो?

संकेतस्थळावर त्यांचेच फ़ॉन्ट वापरले पहिजेत अशी सक्ती थोडीच आहे? जे फ़ॉन्ट वापरताना शब्दान्‍तीचा अकार टाइप करावा लागत नाही ते फ़ॉन्ट वापरावेत. संस्कृतमधून लिखाण करताना मात्र हलन्त शब्द कामाला येतात. इन्स्क्रिप्टचा कळफलक वापरला तर अधल्यामधल्या अक्षरांचे अकारसुद्धा ‘अ’ न टंकता उमटवता येतात.
---वाचक्नवी

अक्षरे कशाला दिसायला हवीत?

>>लिपीकर या बहुभाषिक प्रणालीत बरीच चांगली सुविधा आहे कारण टंकलेखन करतानाच बटणावर कोणती अक्षरे आहेत हे खाली दिसते.<<

अक्षरे कशाला दिसायला हवीत? क्यूडब्ल्यूईआरटी हे आपल्याला पाठ असते. मराठीचे जरा काळजीपूर्वक इंग्रजी स्पेलिंग करून कळफलकाकडे न पाहता टंकलेखन केले की आपोआप शुद्ध मराठी उमटते.--वाचक्नवी

संवर्धन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?

माझ्या समजाप्रमाणे बहुतेक मराठी चर्चा-संकेतस्थळे हि मराठीचे संवर्धन करण्यासाठी अस्तित्वात आलेली नसून 'मराठी भाशेच्या प्रेमाखातर' अस्तित्वात आलेली आहेत.

'संवर्धन' व 'विकास' ह्या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत.
माझे पूर्वी अस्तित्वात असलेले एक,'मराठी शब्द' व 'श्री.गांगलांची विविध संकेतस्थळे' हि (आपाआपल्या विचारधारेनुसार) संवर्धन व विकास ह्या हेतूने निर्माण झालेली होती.

चर्चा संकेतस्थळांवर शाळेतली शिस्त लादण्यात मुर्खपणा वाटतो. मनोगत हे संकेतस्थळ हे त्या वर्गात मोडते. तिथे एकाच कंसात दोन सर (दाटीवाटीने व छडी घेवून, चूका काढत तर कधी सुधारत) बसलेले असतात. उदा.: (दोन्ही सर)

मराठीचे संवर्धन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? हा एक मोठा प्रश्न आहे. ह्या प्रश्नालाच पैलू आहेत. तुम्हाला ह्या प्रस्तावातून भाशेच्या संवर्धनाच्या कोणता पैलू मांडायचा आहे.

मी स्वत:ला आभ्यासू लेखक मानतो. (आभ्यास व्यवस्थित मांडता येत नाही हा भाग वेगळा!) पण आभ्यासू लेख संकेतस्थळांवर मांडून मला काय फायदा? हा विचार माझ्या मनात येतोच. परदेशातील काही मंडळी 'प्राणवायू' हवा असतो म्हणून संकेतस्थळांवर येतात तर काही वासरांमध्ये गाय बनून लंगडत येतात. महाराश्ट्रातील मंडळी 'नव्याची नवलाई' म्हणून संकेतस्थळांवर येतात अन इथेच गुरफटून बसतात.

अभ्यास करून लेख मांडायला संकेतस्थळांपासून काही दिवस लांब तरी रहायला हवे. तसे कोणी करताना दिसत नाही. दरदिवशी, तासनतास काही मंडळी अशा संकेतस्थळांवर ठाण मांडून बसून असतात. त्यांच्याकडून आपण वर मांडलेल्या बाबीच व्यक्त होवू शकतात. हि बाजू झाली सदस्यांची.

संकेतस्थळ चालवणारे देखील केवळ टेक्नोलॉजीकल प्रेझेंटेशनमधून आपल्या संकेतस्थळाचे वेगळेपण दाखवू इच्छीतात. चर्चेच्या माध्यमाचा उपयोग करण्यासाठी संकेतस्थळासाठीचा निश्चित हेतू, एक आखलेली योजना दिसून येत नाही. जसे मुंबईत 'अत्रे कट्टा' चालवला जातो. तिथे एक विशय दिला जातो त्या विशयावर कुणीही आप-आपल्यापरीने सगळ्यांसमोर आपल्या शब्दात आपले विचार मांडायचे असतात. असे कोणत्याही संकेतस्थळावर होताना दिसत नाही.
ह्या जगात मोफत मिळालेल्या गोश्टीचा मान राखला जात नाही. तसेच कोणतेही कार्य पैश्याशिवाय पुढे सरकत नाही. आभ्यासपर लेख लिहीले जावेत असे वाटत असेल तर तसेच ते लेख इतरांनी वाचावेत असे वाटत असेल तर वार्शिक फि सदस्यांकडून घेतली जायला हवी. ज्यांना संकेतस्थळांवरील ऍंकर, एखादी संकल्पना तपासणारे, नवख्यांना व्यक्तीगत स्तरावर खरडवहीतून सुचना/ सल्ला देणारे असे कार्य करावेसे वाटते, असे सदस्यांना त्या कामात जोडून घ्यावे.

असेच व्हावे असे नाही. पण अशा प्रकारचा सदस्यांना बांधुन ठेवण्यासाठी संपादकांचा, संचालकांचा प्रयत्न दिसून येत नाही.

माझा तर्क

८. एखाद्या सुरू असलेल्या चांगल्या संस्थळावर "इतर" पुण्याई वापरून अधिकाराची जागा पटकावणे.
९. नवीन नावाने (ज्याला संस्थळांवर डु.आयडी असे म्हटले जाते) आपल्या कंपूबाहेरच्या (म्हणजे सर्वच, कारण असल्यांशी कोण मैत्री करणार!) सर्व लिहीत्या सदस्यांच्या (ज्यांची संख्या शंभराच्या आसपास असावी) कधी ना कधी कुरापती, खोड्या काढणे, जेणेकरून ते इतर संस्थळांवर अधिकाधिक लिखाण करण्यास प्रवृत्त होतील.
१०. (यामुळे अर्थात आपली जळजळ होईल, पण त्यासाठी खाण्याचा सोडा, सायट्रीक आम्ल इत्यादी गुणकारी रसायने असणारे औषध घेण्याऐवजी) इतरांबद्दल अधिकाधिक तुच्छताभाव दाखवत त्यांना कोको-बियांपासून बनवलेला आबालवृद्धांना आवडणारा पदार्थ घ्या, असले सल्ले देणे.

यामुळे संस्थळे आणि मराठीतर सोडाच सर्व विश्वाचे कोटकल्याण होईल.

समजू शकतो

तुम्हाला क्लेश होणे, वाईट वाटणे साहजिक आहे. इथेच सर्वच संस्थळांच्या प्रयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. ऐसी अक्षरे हे नाव वाचल्याबरोबर काही तरी गंभीर, महत्त्वाचे, अभिजात वाचायला मिळेल असे वाटून मी तुमच्या संकेतस्थळावर गेलो होतो. पण तिथे ऐसी अक्षरे या माउलींच्या शब्दांना साजेसे साहित्य, लिखाण, प्रतिसाद अभावानेच आढळले. करेक्टिव ऍक्शन घेतल्यास बरे वाटेल. ऐसी अक्षरेला उदंड शुभेच्छा.

एवढे हळवे कशाला होता?

इवल्याश्या अवकाशात तीच ती नावे. तेच ते विषय. पण तुम्ही एवढे हळवे कशाला होता? एका लोकप्रिय संकेतस्थळावरून काही ट्रोल मंडळींनी बाहेर पडून नवे संकेतस्थळ निर्माण केले आहे असे आमच्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कथेकरी मित्राने काही दिवसांपूर्वी आम्हाला म्हटले. अर्थातच ते आम्हाला अजिबात पटले नाही. असो. शुभेच्छा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रति धम्मकलाडू आणि बंडलबोरः

नाही हो, काहीतरीच काय! मला वाईट वाटलं नाही आणि मी हळवीही झाले नाही. मराठीच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्यासाठी एकूणात दशावतारी प्रयोग केले जातात अशी काही आरपार कुजबूज कानावर येते. यामुळे मराठी संस्थळंच काय, संपूर्ण विश्वाचंच कल्याण होत असल्यामुळे मला त्यात थोडे कटू बोलच ऐकावे लागत आहेत ना... अखिल मराठी मानवजात आणि विश्वाच्या भल्यासाठी मी तर आनंदाने हौतात्म्यही स्वीकारेन.

राहता राहिला मुद्दा ट्रोलांनी बाहेर पडण्याचा इत्यादी इत्यादी ... तर आंतरजाल हे काय बापजाद्यांनी मागे ठेवलेलं मर्यादित अवकाश नव्हे, की ज्यात वाटेकरी वाढले की आपला हिस्सा कमी झाला. सगळेच ट्रोल्स दुसर्‍यांनी कमावलेल्या संपत्तीवर दौलतजादा करत नाहीत.

त्वरा करा

नाही हो, काहीतरीच काय! मला वाईट वाटलं नाही आणि मी हळवीही झाले नाही.

भावना पोचल्या.

अखिल मराठी मानवजात आणि विश्वाच्या भल्यासाठी मी तर आनंदाने हौतात्म्यही स्वीकारेन

तर मग त्वरा करा आणि हौतात्म्य स्वीकारा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आभारी आहे

नाही हो, काहीतरीच काय! मला वाईट वाटलं नाही आणि मी हळवीही झाले नाही. मराठीच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्यासाठी एकूणात दशावतारी प्रयोग केले जातात अशी काही आरपार कुजबूज कानावर येते. यामुळे मराठी संस्थळंच काय, संपूर्ण विश्वाचंच कल्याण होत असल्यामुळे मला त्यात थोडे कटू बोलच ऐकावे लागत आहेत ना... अखिल मराठी मानवजात आणि विश्वाच्या भल्यासाठी मी तर आनंदाने हौतात्म्यही स्वीकारेन.

राहता राहिला मुद्दा ट्रोलांनी बाहेर पडण्याचा इत्यादी इत्यादी ... तर आंतरजाल हे काय बापजाद्यांनी मागे ठेवलेलं मर्यादित अवकाश नव्हे, की ज्यात वाटेकरी वाढले की आपला हिस्सा कमी झाला. सगळेच ट्रोल्स दुसर्‍यांनी कमावलेल्या संपत्तीवर दौलतजादा करत नाहीत.

तुम्हाला अजिबात वाईट वाटलेले नाही आहे आणि तुम्ही मुळीच हळव्याही झालेल्या नाही आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेच अखेर. आता अखिल मराठी मानवजात आणि विश्वाच्या भल्यासाठी हौतात्म्य स्वीकारण्यापूर्वी तूर्तास ते भीषण भावानुवाद थांबवण्याची तजवीज करता आली तर चांगले होईल. बघा. माझे प्रतिसाद पॉझिटिवली घेतल्याबद्दल आभारी आहे.

 
^ वर