'उपक्रम' - काल, आज आणि उद्या
उपक्रम हे संकेतस्थळ सुरु होऊन आता दोनएक महिने होतील. पहिल्यापहिल्यांदा उपक्रम या स्थळाकडे 'मनोगत' ची प्रतिकृती या उत्सुकतेनेच पाहिले जात असे. उपक्रमवर सदस्य होणारे पहिले काही लोक सक्रीय मनोगती, मनोगतशी मतभेद झाल्यामुळे तिथे असंतुष्ट असणारे तरीही तिथले सदस्यत्व आणि तिथला वावर कायम ठेवलेले मनोगती , "बहुत बेआबरु होकर तेरे कूचे से हम निकले" असे आणि 'मनोगत' ला पर्याय म्हणून स्वतःचे संकेतस्थळ स्थापण्याच्या प्रक्रियेतले माजी मनोगती असे एकंदर मनोगत परिवारातीलच लोक होते. मग हळूहळू त्यात उपक्रमचे स्वतःचे सदस्य (आणि मनोगतचे सदस्य पण उपक्रम वर वेगळ्या नावाने लिहिणे पसंत करणारे लोक) यांची भर पडली. मनोगतसारखा प्रशासकीय जाच नसणे, प्रतिसाद तात्काळ प्रसिद्ध होणे अशा जुन्या मनोगतवरील काही वैशिष्ट्यांची उपक्रमवर असणारी उपलब्धता हे या आकर्षणाचे प्रमुख कारण होते. मग लिहायवाचायला दोन व्यासपीठे उपलब्ध झाल्यामुळे दोन्हीकडे लिहिणारे - वाचणारे असाही एक वर्ग तयार झाला. दरम्यान उपक्रमवर कसलेच धरबंध न राहिल्याने प्रशासकीय बंधने घालावीच लागली. हा सगळा बहुतेकांना माहिती असलेला इतिहास इथे परत देण्याचे कारण गेल्या काही दिवसांत उपक्रम वर जाणवण्याइतपत आलेली मरगळ. नवीन लिखाण, प्रतिसाद आणि आलेले सदस्य यांच्या संख्येत घट झालेली आहे. (याचा कोणत्याही प्रकारचा संख्याशास्त्रीय विदा माझ्याजवळ नाही, हे माझे सर्वसामान्य निरीक्षण आहे) याच दरम्यान 'मनोगत' वर प्रसिद्ध् झालेले लिखाण, प्रतिसाद आणि 'मनोगत' वर आलेले सदस्य याच्या तुलनेत ही गोष्ट फारच प्रकर्षाने जाणवते. अशी दोन संकेतस्थळांची तुलना करणे योग्य नाही हे खरे असले तरीही.
कुणी जाहीरपणे मान्य करो वा ना करो, पण मनोरंजन हाच संकेतस्थळांवरील वावराचा प्रमुख हेतू असतो. माहितीची देवाणघेवाण, चर्चा, ज्ञानात भर हे सगळे दुय्यम. केवळ ज्ञानवर्धन या हेतूने एखादे संकेतस्थळ सुरु केले तर ते किती काळ टिकेल, त्याचे काही काळानंतर स्वरुप काय असेल किंवा त्यावर वावर करणार्या सदस्यांची संख्या किती असेल याविषयी काही अंदाज बांधणे कठीण आहे. उपक्रमची सध्याची धोरणे लक्षात घेता केवळ ज्ञानवर्धन या हेतूने इथे येऊन टिकून रहाणार्या सदस्यांची संख्या किती असेल? एखाद्या संकेतस्थळावर वावरणार्या सदस्यांची संख्या हे त्या स्थळाच्या यशाचे मोजमाप नाही असे जरी मानले, तरी सध्याच्या स्वरुपातले उपक्रम इथे उत्साहाने सदस्य झालेल्या वाचक -लेखकांच्या अपेक्षा पूर्ण करते का? याबाबत उपक्रमच्या चालकांचे काय धोरण आहे? काही काळ धीर धरावा, म्हणजे उपक्रम अधिक रोचक होईल असे काही वाचकांचे म्हणणे आहे, ते तसे खरेच होईल का?
उपक्रम यांना विनंती: सदर लेखन मार्गदर्शक तत्वांत बसत नसेल तरीही काही काळ तरी इथे असू द्यावे. यातून उपक्रमच्या भल्यासाठीच काहीतरी निघेल अशी मला आशा आहे.
Comments
हो
"काही काळ धीर धरावा, म्हणजे उपक्रम अधिक रोचक होईल असे काही वाचकांचे म्हणणे आहे, ते तसे खरेच होईल का?"
हो असे खरोखर वाटते. ललित लिखाण माहितीपूर्ण लिखाणाच्या तुलनेत जास्त लोकप्रिय असले तरी "मानवी प्रतिसाद असलेला आणि खर्या विकीपीडीयापेक्षा जरा जास्त जवळचा वाटणारा विवीधविषयज्ञानकोष" हे उपक्रमाचे रुप जसजशी त्यातील विवीध विषय माहितीत वाढ होत जाईल तसतसे आणखी उपयुक्त आणि रोचक होत जाईल असे माझे तरी मत आहे.
(अवांतरः म च्या वाढत्या लिखाण संख्येत लोकांची टीपी आणि ललिताची आवड याबरोबरच मनोगताची सुंदर सोयीस्कर टंकनप्रणाली, शु. चि., आणि मनोगताची तीन वर्षे जुनी ओळख यांचाही सिंहाचा वाटा आहे असे वाटते.)
(मनोगत,उपक्रम आणि मराठीप्रेमी) अनु
आवडले..
(मनोगत,उपक्रम आणि मराठीप्रेमी) अनु
हे आवडले! ;)
आपला,
(मनोगत हेच 'first love' असे आजही मानणारा एक उपक्रमी!) तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
हेच..
कारण गेल्या काही दिवसांत उपक्रम वर जाणवण्याइतपत आलेली मरगळ. नवीन लिखाण, प्रतिसाद आणि आलेले सदस्य यांच्या संख्येत घट झालेली आहे.
हेच म्हणतो!
कुणी जाहीरपणे मान्य करो वा ना करो, पण मनोरंजन हाच संकेतस्थळांवरील वावराचा प्रमुख हेतू असतो. माहितीची देवाणघेवाण, चर्चा, ज्ञानात भर हे सगळे दुय्यम.
सहमत आहे..
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
संजोपजींशी सहमत!
सद्याचे उपक्रम काय अथवा मनोगत काय ? एकूण सगळीकडेच मरगळ जाणवतेय! असे का ह्याचा जाणकारांनी शोध घ्यावा असे माझे जाहीर आवाहन आहे. लेखन मात्र उदंड दिसतेय! विषयांचे वैविध्यही आहे.मात्र प्रतिसादांच्या नावाने (काही सन्माननीय अपवाद वगळून) एकूणच आनंदी आनंद आहे. पूर्वी असे नव्हते(शिशूविहार ते वैकुंठधाम... सगळीकडे हेच उद्गार!)!
मरगळ का?
अपेक्षेप्रमाणे असा लेख आलाच....
खरतर मरगळ आहे का नाही हा विदा हाताशी असल्या शिवाय न बोललेले बरे. पुर्वी सर्किटरावांनी असा विदा जाहीर केला होता. आकडेवारी हाताशी असेल तर बोलणे योग्य.
आता मुद्दा आपण लिहिलेली संकेतस्थळे मरगळल्यासारखी का वाटतात?
१. मुळातच तंत्रज्ञान वापरून असे काही उभे करणे हे कोणासाठी तरी स्वप्न आहे. तसेच खर्च सुद्धा (वेळ = पैसा).
२. असे संकेतस्थळ आपल्यासाठी फुकट असताना आपल्यातल्या काहिंनी अतिरेक केला. त्याची परीणीती २ गोष्टीत झाली. एक म्हणजे, संकेतस्थळाची तत्वे कायम ठेवण्यासाठी जाचक नियम घालावे लागले. त्याने ज्यांना हे रुचले नाही त्यांनी काढता पाय घेतला वा गरळ ओकली. दुसरे म्हणजे, एकुणच पहिल्या लिहिलेल्या गोष्टीमुळे असे सदस्य जे काही चांगले साहित्य वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी वा ज्ञानात भर घालण्यासाठे येतात. त्यांना याचे नक्किच दु:ख झाले अन त्यांनी आपला वावरच कमी केला.
३. काही चिकाटी न सोडणारे लोक आहेत. त्यांना हव ते मिळवायचा ते प्रयत्न करतात. मग मनोगत, त्यानंतर उपक्रम, त्यानंतर इतर काही ... हे सुरू राहणारच..
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
होईल किंवा नाही होणार
होईल किंवा नाही होणार. मनोगताचे विदागार कोसळेल असे आपल्यापैकी कोणाला आधीपासून माहित होते का? परंतु नकारात्मक दृष्टीकोण ठेवण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीकोण ठेवायला हरकत नाही. म्हणून व्यक्तीश: मला वाटते की होईल.
विदा द्यायचा झाला तर अंदाजाने, (मी संख्याशास्त्री नाही.)
१. बूलियन तर्कशास्त्र: आणि,किंवा,नाही इ.इ. या लेखाला उपक्रमावर आलेले सुमारे १५ प्रतिसाद आणि मनोगतावरील सात आठ प्रतिसाद यांची तुलना व्हावी. हे प्रमाण मनोगतावरील सुमारे ८३०० सदस्य आणि उपक्रमावरील सुमारे ६०० सदस्य यांच्याशीही संलग्न आहे.
२. माझ्या अत्यंत वैयक्तिक मतावरून 'याला जबाबदार कोण्?' हा लेख मनोगतावर दुर्लक्षिला गेला असता असे वाटते. तोच उपक्रमावर वाखाणला गेला.
माहितीप्रधान आणि माहितीपूर्ण लेख लिहीण्यासाठी मला निदान महिना किंवा दोन महिने वाचन आणि लेखन करावे लागते. (हा कदाचित माझ्या मर्यादित बुद्धिमत्तेचा दोष असावा. याचा अर्थ ललितलेखन जादूची कांडी फिरवली की तयार होते असा अजीबात नाही.) परंतु यावरून लेखाची वारंवारिता लक्षात येईल. तसेच, कमी सदस्य असल्यावर लेख कमीच यायचे असे वाटते. अधिकाधिक सदस्यांनी आपला वेळ लिखाणात घातला तर या समस्येला उत्तर मिळू शकेल असे वाटते. अर्थात, कोणाला काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
हे जाणून घ्यायला मलाही आवडेल.
बाब्बारे माझ्या! माझे मत तर मी दिले होते! ;)
आमच्या संजोपशेठच्या " 'उपक्रम' - काल, आज आणि उद्या " या चर्चेवर माझे मत मी या आधीच दिले आहे.
पण बाब्बारे माझ्या! इथे पुन्हा येऊन पाहतो तर काही कारण नसतांना मलाच काही लोकांनी या चर्चेत खेचले आहे! ;)
माधवी महोदया, आपण माझ्या फ्यॅन आहात याबद्दल मी आपला आभारी आहे. परंतु इथे माझा उल्लेख करायची काहीच आवश्यकता नव्हती असे वाटते. मनोगत या संकेतस्थळावर अनेक चांगले लिहिणारे आहेत, त्यात कदाचित माझाही नंबर असू शकेल एवढेच मला वाटते.
तात्या जो है, जैसा है वो सबको मालूम है. संजोपशेठने सुरू केलेल्या या चर्चेचा विषय "तात्या" ह्या प्रकरणाकडे उगाच वळला आहे असे वाटते. उपक्रमरावांनी हस्तक्षेप करून "तात्या" संबंधातले सर्व प्रतिसाद आंणि त्या अनुषंगाने आलेले उपप्रतिसाद उडवावेत अशी विनंती!
आपला,
(बदनाम!) तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
अगदी बरोबर!
संजोपशेठने सुरू केलेल्या या चर्चेचा विषय "तात्या" ह्या प्रकरणाकडे उगाच वळला आहे असे वाटते. उपक्रमरावांनी हस्तक्षेप करून "तात्या" संबंधातले सर्व प्रतिसाद आंणि त्या अनुषंगाने आलेले उपप्रतिसाद उडवावेत अशी विनंती!
बरोबर तात्या! एका मनापासून लिहिलेल्या चर्चा विषयाचा विचका होत चालला आहे, चालला आहे काय, झालाच आहे!
सन्जोप राव
मनोरंजन
कुणी जाहीरपणे मान्य करो वा ना करो, पण मनोरंजन हाच संकेतस्थळांवरील वावराचा प्रमुख हेतू असतो. माहितीची देवाणघेवाण, चर्चा, ज्ञानात भर हे सगळे दुय्यम.
मान्य नाही. मनोरंजन हा काही व्यक्तींचा प्रमुख हेतू असू शकेल अथवा काही ठरावीक संकेतस्थळांचा हेतू असू शकेल. पण म्हणून प्रत्येकाचा मनोरंजन हाच हेतू आहे असे सरसकट विधान करणे म्हणजे अट्टाहास आहे. अभ्यासाशिवाय असे विधान करणे योग्य नाही.
स्थलकालविपर्यास - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे. ( मोह आवरला नाही)
सहमत
खर आहे संजोप राव , आपली निरिक्षणे व मते आमच्यासारख्या नवोदिताला पटतात.
माहिती आणि मनोरंजन हे मला वेगळे करता येत नाही.
कुणी जाहीरपणे मान्य करो वा ना करो, पण मनोरंजन हाच संकेतस्थळांवरील वावराचा प्रमुख हेतू असतो. माहितीची देवाणघेवाण, चर्चा, ज्ञानात भर हे सगळे दुय्यम.
माझ्यापुरते बोलायचे झाले तर इथे असलेली माहिती ही मला 'भाजी-भाकरी' साठी गरज असलेल्या क्षेत्रात मदत करत नाही. मला मनोरंजनाची जेव्हा गरज असते तेव्हा ललित लेख, कविता इत्यादी वाचणे अथवा नॅशनलजिऑग्राफि, सयंटिफिकअमेरिकन, नेचर, सायन्स अशी स्थळे आणि उपक्रम, मनोगत अशा स्थळांवरील माहितीपूर्ण लेख वाचणे यातून माझे मनोरंजन होते. त्यामूळे माहिती आणि मनोरंजन हे मला वेगळे करता येत नाही. तसे कसे करावे ते समजत नाही.
तसेच मरगळ काही प्रमाणात आली आहे असे मला सुद्धा वाटते. पण काळ बदलेल आणि मरगळ जाईल असे वाटते.
ज्या त्या ठिकाणी अनावश्यक आणि भलत्याच कोट्या, शब्दांचा कीस आणि मूळ विषयापासून दूर नेणारे प्रतिसाद यांचा मला उबग आला आहे. सदस्यांनी स्वतःला याबाबतीत समजावले नाही तर संकेतस्थळाला भेट देण्यापासून इतर लोक सुद्धा परावृत्त होतील असे वाटते. यावर विवेकी सदस्य योग्य तो विचार करत असतील अशी आशा वाटते.
--लिखाळ.
सहमत आहे.
ज्या त्या ठिकाणी अनावश्यक आणि भलत्याच कोट्या, शब्दांचा कीस आणि मूळ विषयापासून दूर नेणारे प्रतिसाद यांचा मला उबग आला आहे. सदस्यांनी स्वतःला याबाबतीत समजावले नाही तर संकेतस्थळाला भेट देण्यापासून इतर लोक सुद्धा परावृत्त होतील असे वाटते. यावर विवेकी सदस्य योग्य तो विचार करत असतील अशी आशा वाटते.
मलाही.
सन्जोप राव
अहो कोण कुणाच्या जन्माला पुरलं आहे का?
ज्या त्या ठिकाणी अनावश्यक आणि भलत्याच कोट्या, शब्दांचा कीस आणि मूळ विषयापासून दूर नेणारे प्रतिसाद यांचा मला उबग आला आहे. सदस्यांनी स्वतःला याबाबतीत समजावले नाही तर संकेतस्थळाला भेट देण्यापासून इतर लोक सुद्धा परावृत्त होतील असे वाटते.
आम्हाला असं वाटत नाही. येणारे येत राहतील आणि जाणारे जात राहतील. अहो कोण कुणाच्या जन्माला पुरलं आहे का? सांगा पाहू! ;)
सहमत
मलाही आला आहे.शब्द हे शस्त्र असतं जपून वापराव लागत हे कळत पण वळत् नाही.
मलाही...
...