संपादकांवर अंकुश कुणाचा?

मराठी संकेतस्थळांबाबत उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणार्‍या 'रोचक' चर्चा वाचून बरेच दिवस मनात वळवळत असलेला हा विषय प्रकाशात आणावासा वाटला. आज अस्तित्वात असलेल्या मराठी संकेतस्थळांचे (बर्‍याचशा, सर्व की काय हे मला माहिती नाही) नियंत्रण संकेतस्थळांच्या मालकांनी नेमलेल्या संपादक मंडळाकडे आहे. या संपादक मंडळाने तथाकथित लोकशाही पद्धतीने, सारासार विचार करुन, विवेकाने व सद्सद्विवेकबुद्धी वापरुन संकेतस्थळांवरील साहित्याचे व प्रतिसादांचे संपादन करावे, अशी अपेक्षा असते. पण असे करत असताना संपादक मंडळाला प्रत्येक वेळी वस्तुनिष्ठपणा सांभाळता येतोच का? 'सम आर मोर इक्वल दॅन अदर्स' असे खुद्द संपादकांच्या बाबतीतही होत असते का? (हे स्वीपींग स्टेटमेंट नाही, हा प्रश्न आहे.) 'संकेतस्थळांचे संपादन हा एक 'थँकलेस जॉब' आहे, त्यामुळे संपादक मंडळाला एवढे तरी झुकते माप द्यायलाच हवे' असे सर्वच संकेतस्थळांचे अलिखित धोरण आहे काय? आणि तसे असले तर ते एकदा लिखित स्वरुपात जाहीर करुन का टाकले जात नाही? ('लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर आमचा अधिक विश्वास' -बाळासाहेब ठाकरे). म्हणजे मग संकेतस्थळांवरील लोकशाही या विषयाकडे 'शब्द बापुडे केवळ वारा' असे म्हणून दुर्लक्ष तरी करता येईल!

लेखनविषय: दुवे:

Comments

?

येथील (सध्याच्या) चर्चांमध्ये 'लोकशाही' हा शब्द उल्लेखिला गेला होता काय?

स्वानुभवावरून

सांगतो. संपादकांबद्दलचे धागे टिकत नाहीत. त्यातून तुम्ही (माझ्यासारखेच) "आम्ही असू देवाचे लाडके" या क्याटेगरीतले. तेव्हा सांभाळून.

कैच्या कै

१- संपादकावर "मालक" हे संकेताक्षर असलेला व्यक्ती किंवा संस्थेचा अंकुश असतो.
२- "मालक" हे संकेताक्षर असलेल्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर देशातील कायद्यांचा अंकुश असतो.
३- देशातील कायदे ही नियमावली आहे - अंकुश ठेवण्यासारखी व्यक्ती किंवा संस्था नाही. तरी कायदे बदलण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या संस्था आहेत (शासन-न्यायालये-विधानसभा), वगैरे त्यांच्याबद्दल तपशील देशाच्या राज्यघटनेत दिलेले आहेत.

हे सगळे सर्वश्रुत असताना या चर्चाप्रस्तावातून काय माहिती मिळवायची आहे ते कळले नाही.

मराठी संकेतस्थळांवरची संपादकमंडळे मालकाच्या इच्छेविरुद्ध कारवाई करतात, किंवा मराठीसंकेतस्थळांचे मालक देशाच्या कायद्याविरुद्ध कारवाई करतात, असे तुम्हाला माहीत असेल, तर त्याबद्दल तुम्ही काही करू शकता. पहिल्या परिस्थितीत मालकाला सजग करा, दुसर्‍या परिस्थितीत शासकीय अधिकार्‍यांना सजग करा.

सहमत

सहमत
गेल्या काही दिवसात नवे संकेतस्थळ निघण्याची चिन्हे दिसत आहेत. :) निदान चर्चा करुन धुरळा तरी उडत आहे. मराठी संवंर्धन आणि कंडशमनासाठी चांगले आहे.






हे बघा

संपादकावर "मालक" हे संकेताक्षर असलेला व्यक्ती किंवा संस्थेचा अंकुश असतो.

संकेताक्षर म्हणजे सदस्यनाम काय? तसे असल्यास माझा संपादकांवर काहीही अंकुश नाही. संकेताक्षर म्हणजे पासवर्ड असल्यास तेही बदलून बघेन संपादकांवर अंकुश ठेवता येतो का ते.

आपला
मालक

आयपी ऍड्र्स शोधकाची गरज नाही. मी विनायक

+१

सहमत आहे.

^

"सिर्फ नाम बदलनेसे तकदीर नही बदलती" हा शिनमातला डायलॉग आठवला. :-)

-Nile

मी विनायक

आहे.
विनायक नावाने बेसनलाडू आहेत. हे मिसळपावावरचे बेसनलाडू नव्हेत, दुसरेच आहेत. आधीच असलेल्या सदस्याचे नावही घेता येते हे नव्याने समजले.

विनायक

विनायक मै हू...मार्क इधर है!

उपक्रमाला हास्याचे वावडे नाही.

वरील उपसंवाद भीषण हसवणारा आहे.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

पत्ते बिछा दिये!

सहमत.
येथे पहेली हा चित्रपटही आठवला ;)
अवांतर: बौद्धिक ह्क्क या लेखमालेत सायबरस्क्वॉटिंग या विषयावर एक माहितीप्रद लेख लिहिता येईल.

किंचित फरक

येथे पहेली हा चित्रपटही आठवला ;)

किंचित फरक वाटला.

पहेली या चित्रपटात एकजण माणूस आणि दुसरा भूत असल्याने त्याला शरीर नाही म्हणजे दोन एन्टीटीज एका पातळीवर नाहीत. त्यापेक्षा फेस/ऑफ चालेल असे वाटते. अर्थात इथे एकमेकांशी अदलाबदल झाली नाही. फेस/ऑफची स्वस्त कॉपी अक्सही चालेल, ते पहेली प्रमाणेच होईल.

मालक म्हणून सेवादात्याकडे पंजीकरण असलेली व्यक्ती किंवा संस्था

मालक म्हणून सेवादात्याकडे पंजीकरण असलेली व्यक्ती किंवा संस्था अशी काही असते. आंतरजालीय सेवा (स्मृतिपटल, आयपी ऍडरेस वगैरे ज्या काय सेवा मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात) या व्यापारी तत्त्वावर कायदेशीर कराराने मिळतात.

सेवादात्याशी करार करणारी कुठलीशी व्यक्ती किंवा संस्था असते. या विवक्षित व्यक्तीला किंवा संस्थेच्या अधिकार्‍याला ओळखायला सेवादाता संकेताक्षराची सोय करते. संकेताक्षर वेळोवेळी बदलता येते, पण ते बदल नोंदवलेली साखळी अव्याहत असते. सेवादात्याशी करार करणार्‍या व्यक्तीला किंवा संस्थेला पंजीकृत नाम ("सदस्यनाम") बदलता येईल अशी सोयही करता येते. मात्र हे बदल नोंदवलेली साखळीही अव्याहत असते. कुठल्याही एका वेळी सेवादात्याशी करार करणारा कोण ते ओळखता येईल अशी नाम-संकेताक्षर जोडणी असंदिग्ध असते.

ही नाम-संकेताक्षर जोडणी त्या मालक व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून त्यांच्या नकळत हस्तगत करणे म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे.

या सर्व गोष्टी आंतरजालावर व्यवहार करणार्‍या लोकांना चांगल्या माहीत आहेत. मग "मालक सदस्यनाम बदलू शकतो की नाही", किंवा "संकेताक्षर बदलू शकतो की नाही" असले वायफळ प्रश्न काय म्हणून विचारले जात आहेत?

आंतरजालावर शोधता असे दिसते की "उपक्रम" संकेतस्थळ पंजीकृत (रजिस्टर्ड) आहे. हे पंजीकरण करणारे कुठलेच एकक नाही असा काही तुमचा मुद्दा आहे काय? मग भाडे कुठल्या मार्गाने भरले जाते?

भाडे भरणार्‍या व्यक्ती किंवा संस्थेला ओळखण्यासाठी नाम-संकेताक्षर पद्धत नव्हे, तर वेगळी कुठली पद्धत वापरतात, हे तुम्हाला माहीत आहे का? असेल अशी कुठली पद्धत. मग तुम्ही म्हणता ती वेगळी पद्धत वापरून "मालक कोण" हे सांगता येईल.

संकेताक्षर शब्दाच्या वापराने गोंध़ळ झाला

सदस्य प्रवेशसदस्यनाम: *

संकेताक्षर: *

वरील मजकूर मिसळपावावरून कॉपी - पेस्ट केला आहे. इथे संकेताक्षर = पासवर्ड असा आर्थ आहे.
आपण लिहिलेत.
१- संपादकावर "मालक" हे संकेताक्षर असलेला व्यक्ती किंवा संस्थेचा अंकुश असतो.

मला इथे वाटले संकेताक्षर = सदस्यनाम किंवा पासवर्ड. म्हटले बघू बदलून. बरे आपला प्रतिसाद वाचून गैरसमज झालेला मी एकटाच नाही तर नितिन थत्ते यांचाही झाला. परिणामी आमच्या दोघांची आयडी चोरीला गेले.

संकेतस्थळावरच्या (आमच्यासारख्या) सामान्यबुद्धी मनुष्यालाही जो संकेतस्थळाचे पैसे भरतो तो मालक आणि या मालकाचा संपादकांवर अंकुश असतो इतके माहिती असते. म्हणजे मनोगताचे मालक महेश वेलणकर. उपक्रमाचे शशांक जोशी. अर्थात् हेही ढोबळमानानेच. कारण पलीकडच्या संकेतस्थळाच्या मालकीबद्दल बराच गुंतागुंतीचा प्रकार झाला आहे असे समजते.
असो.

विनायक
काही मजकूर संपादित. वावड्या पसरवण्यासाठी उपक्रमाचा वापर करू नये.

माहीत होते तर उगाच शब्दांचा कीस काय पाडत आहात?

संकेतस्थळावरच्या (आमच्यासारख्या) सामान्यबुद्धी मनुष्यालाही जो संकेतस्थळाचे पैसे भरतो तो मालक आणि या मालकाचा संपादकांवर अंकुश असतो इतके माहिती असते.

माहीत होते तर उगाच शब्दांचा कीस काय पाडत आहात?

मालकाला संकेतस्थळ संकेताक्षर देऊनच ओळखते ना? "मालक" हे सदस्यनाम नसून मालक जे ठरवेल ते सदस्यनाम आणि त्याचे संकेताक्षर हेसुद्धा त्याच सामान्य उपयोगाच्या बुद्धीने कळायला हवे होते.

तुमचे सदस्यनाम तुम्ही वार्‍यावर सोडले असताना अन्य कोणी घेतले, त्याचा संबंध माझ्या कथनाशी काय म्हणून लावत आहात?

राव साहेब

रावसाहेब... काय हे? तुम्हासा संपादक व्हायचे आहे? काढा एक संकेतस्थळ. असो...
संपादकांवर कोणा अंकुश असो वा नसो, पण सदस्यांवर हवा असे माझे वैयक्तिक मत आहे. मुळात मराठी संकेतस्थळांवर संपादक लागतात ते मोकाट सदस्यांना आवरायला. ज्यांना संपादकांचा त्रास होतो त्यांना तो का होतो या बद्दल जाणून घ्यायला सुद्धा आवडेल. तुम्ही अनेक संकेतस्थळे जवळून पाहिली आहेत. जर एखाद्या संकेतस्थळाचा मालक ठरवत असेल कि संपादक बनण्यासाठी रानटी शिव्या येणे गरजेचे आहे, तिथे तुम्ही त्या संकेतस्थळावर, संपादकांकडून हार तुर्‍याची अपेक्षा करता का? (माझा कोणा एका स्थळावर् अथवा माणसावर रोख नाही. फक्त उदाहरण देतो आहे.)
तुमचा हा चर्चा विषय म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये सीबीआय चा गैरवापर होतो असे तुम्हाला वाटते काय? असल्यास सीबीआयमध्ये गांधी घराण्याचा संबध असतो का? असल्यास तसे सांगून टाका म्हणजे आम्ही घोटाळे होणारच असे अपेक्षीत धरतो असे म्हटल्यासारखे वाटते.






लोकशाही?

उपक्रमावर 'लोकशाही' असल्याचे मला गेल्या वर्षभराहून अधिक काळातील वावरात आढळलेले नाही. पुर्वी असा उल्लेख करणार्‍या चर्चा-लेख, मालकांकडून, मायक-नियुक्त संपादकांकडून केलेले निवेदन उपलब्ध असल्यास कृपया दुवा द्यावा. तसे नसल्यास या चर्चेचे काहीच प्रयोजन उरत नाही.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

लय भारी

आधीच असलेल्या सदस्याचे नावही घेता येते हे नव्याने समजले.

हाहाहाहा! इतकी विनोदी चर्चा उपक्रमावर कधीच आली नव्हती. हे विनायक-मालकसारखे प्रकरण मागे एकदा आमचे जुने स्नेही सर्किट यांच्या बाबत झाले होते.

ह. ह. पु. वा. विनायक-मालक डॉयलॉगाचा स्क्रीनशॉट घेतला आहे. जेव्हा कधी हसण्याची इच्छा होईल तेव्हा तो बघता येईल.

संपादक.कॉम

संपादक.कॉम असे मराठी संकेतस्थळ काढावे काय? तिथे प्रत्येकजणच संपादक असेल. प्रगल्भ असेल. काय म्हणता रावसाहेब? म्हणजे प्रत्येक सदस्य संपादक बनल्यावर प्रत्येकालाच जबाबदारीची जाणीव होईल अथव सगळे संपादक ईक्वल होतील. काय विचार आहे? असे चर्चा विषय टाकून गप्प राहू नका राव...






तर इकडेसुद्धा?

सध्या देशात-राज्यात 'कित्येकां'ना हकलण्याचं काम जोरावर आहे. संपादकांचे 'खुपणारे' संपादन-बदल आपल्या तोंडचे पाणी तर पळवणार नाही ना, अशी भिती 'उपक्रम'च्या मालकांना वाटत असावी. (जशी मनमोहन सिंगना वाटत असणार!) माझ्यामते बहुतेक 'उपक्रमी' संपादकांना पाय-उतार करण्यासाठीची ही अनधिकृत चेतावणी असावी. :P

पळवाट: मी सुद्धा एका संस्थळाचा संपादक आहे, पण 'उपक्रम'चे संपादकत्व अजून माझ्या वाट्याला आलेले नाहीये, त्यामुळे मला घाबरण्याचे काहीएक कारण नाही! ;)

:)

मी कुठे ही संपादक नाहीये तरीपण काहींना वाटते मी आहे म्हणून :)






कदाचित नावामुळे

चाणक्य नावामुळे घोळ होत असावा. कूटनीती राजनीतीचे जनक ना चाणक्य. ;-)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

पारदर्शिता हवी

वाहिन्यांवरील वित्तीय सल्लागारांना समभाग संबंधी चर्चांमध्ये त्यांनी गुंतवणूकीस योग्य सुचविलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे का नाही हे सेबीच्या नियमानुसार उघड करणे बंधनकारक आहे. बातम्यांच्या स्वरुपातील जाहिरातींच्या खाली "जाहिरात" असा उल्लेख करणे वृत्तपत्रांना बंधनकारक आहे (पेड न्यूजचा मुद्दा प्रलंबित आहे). काही (बरेचदा इंग्लिश) वृत्तपत्रे आपल्या कंपनी किंवा सहयोगी कंपनी संबंधी वृत्त देताना आपल्या संबंधाचा बातमीमध्ये उल्लेख करतात. याच पद्धतीने मराठी संकेतसस्थळांवर पारदर्शिता राखण्यासाठी प्रयत्न का होऊ नये.

१. एखाद्या संकेतस्थळांवर कोण संपादक आहेत हे सदस्यांना कळविणे ही संकेतस्थळ व्यवस्थापनाची नैतिक जवाबदारी बनत नाही का?
२. एखाद्या चर्चेत एखादा संपादक भाग घेत असेल तर त्याने/तिने तसे त्या चर्चेत नमूद करावे.
३. संकेतस्थळाचे संपादकीय धोरण व संपादकांचे अधिकार याची सदस्यांना माहिती द्यावी.

राडीया बरखागेट प्रकरणात पत्रकारांची, संपादकांची उरली सुरली विश्वासार्हता धूळीस मिळाली आहे. लेखाचा विषय काय असावा असे वीर संघवी राडीयाला विचारतो. समाजवादी पत्रकार निळू दामले लवासाची बाजू मांडतात. अशा परिस्थितीत किमान संकेतस्थळांवर तरी पारदर्शितेची अपेक्षा ठेवणे गैर आहे का?

जयेश

काय संबंध

हे एक खासगी मालकीचे संस्थळ आहे. वृत्तपत्रे, वाहिन्या, इ.ना परवाना देताना काही जवाबदार्‍या टाकल्या जातात तशा संस्थळांवर टाकण्याचा कायदा नाही. ज्यांना मालकांचे सार्वभौमत्व मान्य नसेल त्यांनी चपला घालाव्या.

कंटेन्ट इज किंग

ज्यांना मालकांचे सार्वभौमत्व मान्य नसेल त्यांनी चपला घालाव्या

मंत्रालयात मंत्र्यांपेक्षा केबिनबाहेरच्या बाकडावर बसलेले प्यूनच स्वतःला मंत्री समजतात्. मिळेल हो तुम्हाला संपादकपद :)

असो...
कोणतेही प्रकाशन खाजगी वा सरकारी असो त्याची यशस्वीता ही दर्शक/वाचकांच्या प्रतिसादावर/सहभागावर अवलंबून असते. विशेषत: सोशल मिडिया प्रकारातील संस्थळामध्ये ती अधिकच असते. अशा संस्थळांची किंमत/महत्त्व त्याची सदस्यसंख्या व त्यातील मजकूरावर (कंटेन्ट) अवलंबून असते. उपक्रमाचे आजचे स्वरूप त्याच्या सदस्यांच्या योगदानामुळेच आहे. मजकूरास मूल्य आहे, डोमेन नेम, वेब स्पेसला नव्हे! रिकामटेकडेराव गैरसमज दूर करा.

मालक संबोधून स्वतःस नोकराच्या पातळीवर आणू नका हो! संस्थापक (फाउंडर) शब्द कसा वाटतो. वेबस्टार्टप्स मध्ये त्यांचे 'मालक' स्वतःस 'संस्थापक' असेच संबोधतात.

बाकी मालकांच्या सार्वभौमत्वाबद्दल म्हणाल तर ते तुम्ही मान्य करा इतरांना रिकामटेकडे सल्ले देऊ नका. उपक्रम संस्थापकांकडुन अशी जेंव्हा केंव्हा अधिकृत घोषणा होईल तेंव्हा कदाचित तुम्हिच एकटे सदस्य उरलेले असाल.

जयेश

पुन्हा विचारतो: काय संबंध?

मंत्रालयात मंत्र्यांपेक्षा केबिनबाहेरच्या बाकडावर बसलेले प्यूनच स्वतःला मंत्री समजतात्. मिळेल हो तुम्हाला संपादकपद :)

मालकांना सार्वभौमत्व नाही असे तुम्हाला का वाटते?

कोणतेही प्रकाशन खाजगी वा सरकारी असो त्याची यशस्वीता ही दर्शक/वाचकांच्या प्रतिसादावर/सहभागावर अवलंबून असते. विशेषत: सोशल मिडिया प्रकारातील संस्थळामध्ये ती अधिकच असते. अशा संस्थळांची किंमत/महत्त्व त्याची सदस्यसंख्या व त्यातील मजकूरावर (कंटेन्ट) अवलंबून असते. उपक्रमाचे आजचे स्वरूप त्याच्या सदस्यांच्या योगदानामुळेच आहे. मजकूरास मूल्य आहे, डोमेन नेम, वेब स्पेसला नव्हे! रिकामटेकडेराव गैरसमज दूर करा.

हे सारे मान्य आहे, काहीही गैरसमज नाही. मुद्दा असा आहे की कोणाच्या योगदानाला किंमत द्यावयाची आणि कोणाच्या योगदानाला कचर्‍यात टाकावयाचे त्याचे निर्णय घेण्यास संस्थळाचे मालक पूर्णपणे मुक्त आहेत. येथे आधीच प्रकाशित साहित्य 'घेऊन जाण्याचा' हक्क सदस्यांना नाही. सदस्यत्व स्वीकारताना अशी अट असते की सदस्य गेला/हाकलला तरी त्याचे साहित्य प्रकाशितच ठेवण्याचा हक्क मालकांना आहे.
वेगळे उदाहरण द्यावयाचे तर अभ्यास न करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असते, तो भले पुढे परिक्षेत अनुत्तीर्ण होईल. "अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने तो अभ्यास करतो" हे विधान मला मान्यच आहे परंतु त्या विधानाने "त्याला अभ्यास न करण्याचे स्वातंत्र्यच नाही" हे विधान सिद्ध होत नाही.

मालक संबोधून स्वतःस नोकराच्या पातळीवर आणू नका हो! संस्थापक (फाउंडर) शब्द कसा वाटतो. वेबस्टार्टप्स मध्ये त्यांचे 'मालक' स्वतःस 'संस्थापक' असेच संबोधतात.

मालक म्हटले तर काय करणार आहात? मालक आणि ग्राहक असे दोन शब्द वापरता येतील, मालक आणि सेवक असे नाही.

बाकी मालकांच्या सार्वभौमत्वाबद्दल म्हणाल तर ते तुम्ही मान्य करा इतरांना रिकामटेकडे सल्ले देऊ नका.

देणार. काय करता? सल्ला म्हटले की तो नाकारण्याचा तुमचा हक्क मान्यच आहे.

उपक्रम संस्थापकांकडुन अशी जेंव्हा केंव्हा अधिकृत घोषणा होईल तेंव्हा कदाचित तुम्हिच एकटे सदस्य उरलेले असाल.

मालकांचे सार्वभौमत्व तपासणे/सिद्ध करणे खूपच सोपे आहे. तुम्हाला रस असेल तर प्रतिसादात आव्हान द्या, मी प्रतिसादात पद्धत सांगेन.

तुम्ही मागच्या वसंतात काय केले ते मला अजूनही माहिती आहे

सन्जोप राव
मंगळ, 03/24/2009 - 22:03

नवल नाही. तो चर्चाप्रस्ताव असा होता:
मराठी संकेतस्थळांवर 'लोकशाही तत्वांवर चालवलेले स्थळ' हे एक गर्दीखेचू 'युनिक सेलिंग प्रपोझिशन' झालेले आहे. संकेतस्थळावर व्यक्त होणार्‍या विचारांवर त्या संकेतस्थळाच्या मालकांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी कोणतेही निर्बंध न घालणे ही खरे तर फार आकर्षक कल्पना. पण लगेचच 'अहो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळावा इतका आपला लेखक / वाचक वर्ग प्रगल्भ कुठे आहे?' या पांघरुणाखाली कळत नकळत असे काही दरवाजे बसवण्याची प्रक्रिया सुरु होते. अशा चाळण्या बसवायच्या झाल्या की त्या चाळण्यांच्या रखवालदारांना त्यांची मते, पूर्वगृह आणि आवडीनिवडींसकट स्वीकारावे लागते. धार्मिक प्रसंगी जानव्यातील लोखंडी किल्ली काढून ठेवावी तसे आपले पूर्वगृह बाजूला ठेवून (या उपमेचा स्त्रोत अन्य) पूर्णपणे निर्हेतुक राखण करणे कुणाला शक्य आहे? अशा धोरणांतूनच मग 'ऑल पीपल आर इक्वल, सम मोअर इक्वल दॅन अदर्स.' असे स्वरुप त्या संकेतस्थळाला प्राप्त होते. लोकशाहीची खरी शोकांतिका ती हीच. लोकशाहीचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य. आणि अव्यस्वा म्हणजे तरी काय? तर लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडण्याची मुभा असणे. तथापि संकेतस्थळांवर लोणकढी तुपातले शुद्ध साजुक वातावरण असणे आवश्यक असल्याने 'मर्यादित लोकशाही' ही एक नवीन कल्पना रुजलेली आहे. अर्थात 'मर्यादित लोकशाही' यातील विरोधाभास नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. तिरका विचार करणार्‍यांना तर ही हुकुमशाही पद्धतीने चालवलेली लोकशाही आहे, असे वाटल्यास नवल वाटू नये.
मराठी संकेतस्थळांवरील ही 'मर्यादित लोकशाही' एक अपरिहार्यता म्हणून - 'नेसेसरी एव्हिल' म्हणून स्वीकारावी का? तराजूच्या काट्याच्या मध्यभागी उभे राहून निर्विकार भावनेने कात्री चालवणार्‍या अशा रखवालदाराच्या नाकाखाली बोटभर रुंदीच्या मिशा फुटल्याचा आणि त्याच्या / तिच्या गणवेशावर उलटे स्वस्तिक उमटल्याचा भास काही लोकांना झाला तर ते फक्त त्यांच्या मनाचे खेळ समजावेत का? 'क्रांती' चित्रपटात गोरा सोजीर 'भारत' मनोजकुमारला म्हणतो, "हम बकवास सुनने के आदी नही हैं" त्यावर मकु त्याला विचारतो, "बकवास करने के आदी हो?" तद्वतच संकेतस्थळांवर विचारांत थैलर्य नको, कृतीत चालेल असे काही संकेत रुढ होऊ पहात आहेत काय? अशा धारदार कात्र्यांवर लखलखणारे किरण डोळ्यांत जाऊन क्षणभर अंधत्व आलेल्यांनी ग्राम्य भाषेत 'ही तर डिलिट बटणाची मस्ती' असे म्हटले तर त्याकडे दुर्लक्षच करावे काय?
अवांतरः 'अपयशी कसे व्हावे' हे पुस्तक बाजारात अपयशी ठरले तर ते त्या पुस्तकाचे यश समजावे काय? हा चर्चाप्रस्ताव इथून उडाल्यास / अप्रकाशित झाल्यास ते या प्रस्तावाचे यश मानावे काय?

हे लिखाण बहुदा माझा उपक्रमावरील 'एपिटाफ' ठरेल असे वाटते. 'एपिटाफ' ही अप्रकाशित ही फारच मोठी पावती आहे असे मला वाटते.

संदर्भ
'संस्थळांवर लोकशाही नाही' हे वास्तव स्वीकारणे इतके अवघड असते काय? कुणाच्या घरी पाहुणे म्हणून बोलावले जाते तेव्हा तेथे लोकशाही असते काय?

सदसदविवेक

संपादकांवर अंकुश कुणाचा?

स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीचाच अंकुश असू शकतो.
उपक्रमाचे मालक वा संपादक अज्ञात राहिले तरी काय फरक पडतो?

प्रकाश घाटपांडे

अज्ञाताचा धूसर पडदा...

उपक्रमाचे मालक वा संपादक अज्ञात राहिले तरी काय फरक पडतो?
..

सगळाच आनंदी-आनंद
मालक अज्ञात, संपादक अज्ञात आणि डुप्लिकेट आयडी घेऊन वावरत असल्याने बहुतेक वाचकही परस्परांना अज्ञातच असतात.
म्हणजे सगळा कसा अज्ञाताचा धूसर पडदा.

छापील प्रसारमाध्यमांत कायद्यानेच एक तरतूद असते. प्रत्येक अंकात मालक, प्रकाशक, मुद्रक, यांच्या नावाबरोबरच संपादक या व्यक्तीचे नाव छापून त्यापुढे कंसात 'पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांच्यावर आहे' असे नमूद करणे अनिवार्य असते. याच कायद्यानुसार प्रत्येक प्रकाशकाला वर्षातून एकदा आपल्या प्रकाशनाची मालकी, भागधारक याबाबतचा तपशील विहित नमुन्यात सादर करावा लागतो. आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतरच्या पहिल्याच अंकात म्हणजे एप्रिलमध्ये बहुतेक वर्तमानपत्रे, मासिके व नियतकालिकांत या चौकटी छापाव्या लागतात. वाचकांचा पत्रव्यवहार अथवा प्रतिसाद छापताना सामान्यतः त्यांचे नाव जाहीर करावेच लागते. प्रतिक्रियेमुळे त्या व्यक्तीला धोका, मानसिक त्रास होणार असेल किंवा काही अपवादात्मक स्थिती असेल तरच त्याचे नाव वगळून प्रतिक्रिया प्रसिद्ध केली तरी चालते. उद्या वर्तमानपत्रातील वाचकांची पत्रेही डुप्लिकेट आयडीने प्रसिद्ध होऊ लागली तर कोण विश्वास ठेवेल?

आंतरजालीय संकेतस्थळे हे तुलनेने नवे प्रसारमाध्यम आहे. ते अद्याप बाल्यावस्थेत आहे, पण मग त्यालाही काही नियमावली लागू नाही का? मालकांचे नाव विचारु नका... हे त्यांनी पैसे देऊन खरेदी केलेले संकेतस्थळ आहे.... ते सार्वभौम आहेत....पटत नसेल तर इथे येण्याचा आग्रह नाही...चपला घालण्यास आपण मुक्त आहात हे युक्तिवाद (प्रतिसादकर्त्यांचे असले तरी) म्हणजे एकेकाळची उर्मटपणामुळे बदनाम झालेली पुणेरी दुकानदारांची भाषा वाटते.

संपादक किंवा संपादक मंडळ कोण हे वाचकांना माहीत असणे गरजेचे असते. संपादक या व्यक्तीवर खूप मोठी जबाबदारी असते. तो नि:पक्षपाती लागतो. अनुभवी असावा लागतो. प्रसंगी त्याला आपल्या निर्णयामागील कारणीमीमांसा स्पष्ट करता आली पाहिजे. संपादकाची तटस्थता जोपासायची असेल तर एक नियम करता येईल. दरवर्षी एकाला संपादक करायचे आणि संपादक कालावधीत त्याने सदस्य म्हणून चर्चेत भाग घ्यायचा नाही.

डुप्लिकेट आयडी घेऊन लोक वाटेल तसे वेडेवाकडे बोलत सुटतात आणि यातूनच स्कोर सेटल करण्याचे प्रकार घडतात. मराठीतील चार प्रमुख संकेतस्थळांपैकी तीनवर हे हमखास घडताना दिसून येते. केवळ एका संकेतस्थळावर प्रतिसाद प्रशासकांच्या नजरेखाली गेल्यावरच प्रसिद्ध होण्याची सुविधा आहे. बाकी ठिकाणी आधी वादग्रस्त प्रतिसाद प्रसिद्ध होतात आणि त्याची तक्रार झाल्यावर खूप काळाने मग ते उडवले जातात. तेवढ्या काळात एखाद्या व्यक्तीचा पुरेपूर अपमान झालेला असतो आणि तो सार्वजनिक वाचनातही आलेला असतो.

मला वाटते, की मालक असो, संपादक असो अथवा वाचक असो, त्याला उत्तरदायीत्व (अकाऊंटेबिलिटी ) असलेच पाहिजे.

:(

काय रावसाहेब! आता तुम्हीपण हे गल्ला.. आपलं प्रतिसादभरू धागे टाकु लागलात! :(

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

क्षमस्व

काय रावसाहेब! आता तुम्हीपण हे गल्ला.. आपलं प्रतिसादभरू धागे टाकु लागलात! :(
असे वाटत असल्यास अपेक्षाभंग केल्याबद्दल क्षमस्व. प्रतिसादांचे अप्रूप असण्याचे वय निघून गेले. आता गंभीर विचारांवर थैलर्याचा आळ येण्याचे वय आले आहे, असे वाटते.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

:)

हा हा हा ... जबरा चर्चा ... आजंच मी माझे संकेताक्षर 'मालक' ठेवतो =))

- टारझन

ना, आसं नी करु...


आजंच मी माझे संकेताक्षर 'मालक' ठेवतो

हे काय करताय तुम्ही? म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी उघड करायच्या नसतात. ;)

नावात काय आहे??

नावच टारझन असल्याने सार्वजनिक खसगी अस काही राहिलेल नाही त्यांच्या खात्यात...!

 
^ वर