लाल परी कलंदर (उत्तरार्ध)

'धमाल'
सेहवान शरीफच्या दर्ग्याला भेट देणारे तेथील दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करत असतात. एक, धमाल व दुसरे लाल परी मस्तानी या महिला फकीराचे दर्शन. उरुसाच्या काळातील संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर रात्रभर सूफी फकीर व इतर भक्त भक्तीगीत, कव्वाली, नाचगाणी यांचा मनमुराद आनंद घेतात. या प्रकाराला धमाल म्हणतात. लाल परी कलंदर भडक तांबडे कपडे घातलेली, हातात एक जाडजूड काठी घेतलेली, गलेलठ्ठ असलेली फकीरा त्या गर्दीत सहजपणे ओळखली जाते.

उरुसाच्या दिवशी नखशिखांत काळे वा तांबडे कपडे घातलेले दाढी वाढवलेले (व काही न वाढवलेले) गळ्यात तावीज घातलेले, हातात मंतरलेले अंगठे घातलेले अनेक फकीर, मलंग येथे जमतात. घुंगरू बांधलेल्या काठीने आवाज काढत नाचाच्या तयारीत असतात. पूर्ण माहोल एखाद्या युरोपियन बॅले नृत्यासारखा वाटू लागतो. काही क्षणातच धमालचा ठेका चालू होतो. मलंग, पीर, साधू, सन्यासी बाहेर पडत ठेका धरू लागतात. वयाचे बंधन नाही; कपड्याचे भान नाही; स्त्री - पुरुष भेद नाही; आकाशाकडे डोळे लावून हसत, खिदळत, एकेक पाऊल पुढे सरकत, काही वेळा एकाच ठिकाणी पळाल्यासारखे पदन्यास करत ढोलकीच्या तालावर नाचू लागतात. दमा दम मस्त कलंदर, जियो झुलेलाल, सारख्या गाण्यांचा आवाज घुमत जातो. रात्र सरकत असताना हा आवाज असाच वाढत जातो. नाचणारे (व बघणारेसुद्धा!) बेहोश झाल्यासारखे दिसू लागतात. नाचगाण्याची नशा चढलेली असते. चहू बाजूने गुलाबी फुलांच्या पाकळ्यांची उधळण होत असते. ऊदबत्तीचा (व त्याचबरोबर अफू गांजांचा) धूर अवकाशात पसरत असतो.

जाणकारांच्या मते हा धमालचा प्रकार हातात डमरू घेऊन नाचणार्‍या शंकराची व शिवभक्तांची आठवण करून देते. ही एक डमरूच्या तालावर नाचणार्‍या नटराजाशी जवळीक साधणारी प्रथा वाटते. 6व्या शतकातील चीनचा प्रवासी हुएन त्सांगच्या मते हे ठिकाण शाक्त पंथीयांचे मुख्य ठिकाण होते. हे 'पशुपती' नाच करत करत शंकराच्या चरणी विलीन होत असत. शंकरनृत्याचे काही अंश अजूनही येथील सूफी पंथात ठळकपणे दिसतात.

धमालमध्ये सहभागी होण्याचे नवस बोलले जातात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तावर लाल शाहबाज प्रसन्न होऊन त्यांची मनोकामना पूर्ण करतो यावर भक्तगणांची पूर्ण श्रद्धा आहे. परंतु बहुतेक महिलांचे नाच भूत पिशाच्च अंगात संचारल्यासारखे वाटतात. भोवतालच्या खेडोपाड्यातील मनोरुग्ण महिलांना उपचार करण्यासाठी म्हणून येथे आणतात. अंगात आलेल्या भुताला प्रश्न विचारतात. कदाचित मारझोडही होत असेलच.

धमाल हा एका प्रकारे सेफ्टी व्हाल्वसारखे काम करत असावे. शारीरिक व्याधीची लक्षणं भूत, प्रेत, पिशाच्च अंगात शिरल्यामुळेच दिसत असून त्याला शरीराबाहेर काढण्यासाठीच ढोल, गाणीं, नाच, कव्वाली, यांच्या आधारे उपचार करण्याची प्रथा रूढ झाली असावी. यासर्व प्रकारामुळे त्रस्त महिला बधिरावस्थेत पोचून तिच्यातील वेदना, चिंता कमी होत होत शेवटी ती पूर्ण बरी होईल यावर त्यांचा विश्वास असतो. घागरा चोळी घातलेल्या बायकांच्या थवेच्या थवे येथे दर्शनासाठी लोटतात.

लाल परी कलंदर
या सर्व पुरुषप्रधान धार्मिक उन्मादात 50 -55 वयाची गलेलठ्ठ लाल परी कलंदर उठून दिसत होती. अंगावरील लाल भडक कपडे, कांकणभर चांदीच्या बांगड्या, बंगाली बायकाप्रमाणे भांगेत सिंधूर, गळ्यात एक भली मोठी साखळी या वेशात ती नाचताना एखाद्या दरवेशासारखी दिसत होती. लाल शाहबाज कलंदर अंगात आल्यासारखे तिचे नाचणे, घुमणे होते. धमालमध्ये नाचताना " अली व हसन बरोबरच लाल शाहबाज कलंदरही माझ्याजवळ पास असतो". लाल परीचा विक्षिप्तपणा व दरारा तिच्या वागण्या बोलण्यात ठळकपणे दिसत होता. पवित्र मूर्खांच्या (holy fools) सदरात ती फिट्ट बसली असती. निरक्षर असूनही तिच्या साध्या व सरळ वागण्यामुळे तिच्यात दैवी शक्ती व चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे अशी समजूत होती.

मुळात ती तीन वेळा विस्थापित झालेली बाई होती. प्रथम मुस्लिम कुटुंबातील मुलगी म्हणून 1960 साली भारतातून पूर्व पाकिस्तानात तिला जावे लागले. 1971 च्या युद्धात बिहारी मुस्लिम म्हणून बांगलादेशमधून तिची हकालपट्टी पाकिस्तानात झाली. शेवटी एकटीच बाई म्हणून ती या दर्ग्याच्या आश्रयाला आली. तालीबानीकरण झालेल्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सूफी पंथीय म्हणून ती येथे राहू लागली. एकीकडे टोकाचा विद्वेश व हिंसाचार व दुसरीकडे प्रेम, दया, सहानुभूती व कणव या कात्रीत ती सापडलेली होती.

बिहारमधील सोनेपूर येथे जन्माला आलेली लाल परी एका मुस्लिम शेतकर्‍याची मुलगी. कुरेशी कुटुंबातील या मुलीचे बालपण इतर हिंदू मुस्लिम मुलींबरोबर खेळण्यात, बागडण्यात गेले. तिच्या बालपणातच क्षयरोगाने तिच्या वडिलाचा बळी घेतला. तिच्या आईने दुसरे लग्न केले. सावत्र बाप तिला मारझोड करत तिला उपाशी ठेवायचा. आई चोरून तिला खायला देई. त्याच काळात हिंदू -मुस्लीम दंग्यांना ऊत आला होता. एकदा मशीदीत जमलेल्यांची कत्तल केली. यात तिचा सावत्र बाप मेला. या दंगलीच्या काळात तिच्या आईने या भाऊ - बहिणींना जंगलातील एका खड्ड्यात झाकून ठेऊन वर पाला पाचोळ्यांनी खड्डा बुजवला. अशा प्रकारे 15 -20 दिवस काढल्यानंतर येथून पूर्व पाकिस्तानातील तिच्या मामाकडे जाण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. भारत - पूर्व पाकिस्तानच्या सीमेवरील हवालदाराला लाच दिल्यानंतर त्यानी नदीपार करून जाण्यास या कुटुंबाला मदत केली. सर्वांना पळण्यास भाग पाडले. कसेबसे ते मुक्कामी पोचले. काही दिवस ती तेथील शाळेत शिकतही होती. बांबूच्या झोपडीवजा घरातील जीवन तिला सुखकर वाटू लागले. नदीला महापूर आल्यानंतर कुठेतरी आसरा शोधायचा व पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा झोपडी बांधून शेती करायचे व जीवन जगायचे याची त्यांना सवय लागली होती.

1971च्या युद्धाच्या भडक्यात बांगला मुस्लीम उपर्‍या मुस्लिम बिहारींना हाकलून द्यायला लागले. पाकिस्तान शासनाने या उपर्‍यांची पाकिस्तानात राहण्याची, कामधंदा देण्याची सोय केली. आईव्यतिरिक्त इतर कलकत्ता ते दिल्ली व दिल्ली ते लाहोर असा प्रवास करत पोचले. मुलतानमधील सूतगिरणीत तुटपुंज्या पगारावर भाऊ नोकरी करू लागला. बंगाल - बिहारमध्ये असताना भात व मासे खाणार्‍यांना मांस - गहू खाण्याचा कंटाळा आला. लाल परी रिकामीच असल्यामुळे दिवसभर ती त्या गावातील दर्ग्यांना भेट देऊ लागली. तेथील फकीरांशी तिची गट्टी जमली. आपणही सूफी फकीर व्हावे असे तिला वाटू लागले.

तिचा भाऊ चांगला होता परंतु त्याच्या मृत्युनंतर त्याची बायको हिचा छळ करू लागली. भांडू लागली. या रोजच्या भांडणाला कंटाळून तिला घरातून पळून जावेसे वाटू लागले. एके रात्री मुलतान येथील सूफी संत शेख बहाउद्दीन झकारिया तिच्या स्वप्नात आला व त्यानी तिला मार्गदर्शन केले. तिच्या स्वप्नात एक लांब दाढीवाला म्हातारा समोर दिसत असलेल्या गाडीत बसून येण्यास सांगत होता. ती मुलतान स्टेशनला पोचली व समोर दिसत असलेल्या गाडीत जाऊन बसली. गाडी सिंध प्रांतातील हैदराबादला जात होती. तिला कुणीही तिकीट विचारले नाही. उलट गाडीतील टीसीने तिला खायला घातले. डब्यातील बहुतेक यात्रिक दमादम मस्त कलंदर हे गाणे म्हणत होते. एका फकीराने तिच्या हातात तावीज देत हे तुझे रक्षण करेल असे सांगून गेला. त्या तावीजवर तिला स्वप्नात दिसलेल्या वृद्ध माणसाचे चित्र होते. हाच तो लाल शाहबाज कलंदर. सगळे यात्रिक उरुसाला चालले होते. ती पण त्यांच्यात मिसळली. स्वप्नात दिसल्यासारखाच तो दर्गा होता. 20 वर्षापूर्वी आलेली लाल परी तेथेच रुळली. हातातील सोटा गुंडांपासून तिचा रक्षण करत होता. शांत स्थळ. लतीफची गाणी म्हणण्यात व ऐकण्यात तिला समाधान मिळत होते. फक्त तेथील मुल्ला - मौलवींची व वहाबींची आजकाल तिला भीती वाटत होती.

वहाबींची भीती
वहाबींची भीती फक्त तिलाच नव्हे तर सर्व सूफी पंथीयांना वाटत आहे. पाकिस्तानमधील मुल्ला, मौलवी, वहाबी व तबलिघी सूफी संतांचा द्वेश करतात. अलिकडेच खैबर पासजवळ असलेल्या 17व्या शतकातील पुष्तू कवी संत रहमान बाबाचा दर्गा डायनामाइट पुरून फोडला गेला. रहमान बाबाचा दर्गा कवी व संगीतकारांचे पवित्र स्थान होते. पुष्तू भाषेतील या संताच्या कविता लोकप्रिय होत्या. या दर्ग्याच्या वाटेवरच वहाबीने एक मदरसा बांधून इस्लामचे शिक्षण देऊ लागले. मदरश्यातील तालिबान्यानी एके दिवशी दर्गा उडवून टाकला.

मदरश्यातील शिकवणीप्रमाणे गाणी, कविता, नाच इस्लामच्या विरोधातील गोष्टी आहेत, व स्त्रियांनी बुरखा घालून घरीच बसायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. अशा प्रकारच्या मदरश्यांची संख्या अफगाण युद्धानंतर मोठ्या प्रमाणात वाढू लागली. 1947 मध्ये फक्त 245 मदरसे असलेल्या पाकिस्तानात आता सुमारे 8000 मदरसे आहेत. देवबंदी व वहाबींचे त्यावर पूर्ण नियंत्रण आहे. वहाबींना थडग्याची पूजा करणे पसंत नाही. मेलेल्या माणसाच्या प्रार्थनेला कुराणात विरोध आहे. जी काही प्रार्थना करायची ती मशीदीतच अल्लासाठी करायला हवी, इतर ठिकाणी नव्हे, यावर त्यांचा जोर आहे. वहाबींच्या मते सूफी हा धर्मच नव्हे; ती एक जादू आहे, ती एक अंधश्रद्धा आहे. सूफी संत, फकीर, पीर जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेतात, असा त्यांचा आरोप आहे.

लाल परीच्या मते मुल्ला, मौलवी कितीही आरडा ओरडा, विध्वंस करत असले तरी सूफी पंथ कधीच मरणार नाही. तिचे हे शब्द खरे ठरवण्याची जबाबदारी आता लाल शाहबाज कलंदरवरच आहे!

.......समाप्त

संदर्भ: Nine Lives: In Search of the Sacred in Modern India by William Delrymple

लेखनविषय: दुवे:

Comments

छान ओळख....

पण मुळात इस्लामचा प्रसार दक्षिण आशियात सूफींमुळेच अधिकाधिक झाला हे खुद्द पाक सरकारचे अधिकृत म्हणणे आहे.
तिथले elites देखिल म्हणतात की इस्लामचा प्रसार तलवारी कीम्वा जबरदस्तीने अत्यल्प्/नगण्य झाला आहे. खर प्रसार हा सूफीप्रभावानेच झालाय.
सरकारचे विधान इतके स्पष्ट असूनही त्या देशात सूफींवर् हल्ले होतात हे आश्चर्यजनक आहे.
असो. पण आपण प्रतिसादांची दखल घेतलित तर बरे वाटेल. केवळ लेख लिहून गायब होत राहिल्याने प्रतिसाद द्यायचाही कंटाळा येतो.

--मनोबा

सहमत

पण आपण प्रतिसादांची दखल घेतलित तर बरे वाटेल. केवळ लेख लिहून गायब होत राहिल्याने प्रतिसाद द्यायचाही कंटाळा येतो.

याच्याशी सहमत आहे पण ती लेखकाची मर्यादा आहे हे एव्हाना लक्षात आले असेलच.
प्रकाश घाटपांडे

"मर्यादा आहे" म्हणजे?

नक्की समजले नाही.
--मनोबा

पिंड

व्यक्तिमत्वाच्या असलेल्या मर्यादा. व्यक्ति म्हणुन प्रत्येकाची काही बल स्थाने असतात तशा मर्यादाही असतात. लेखक सहसा चर्चांमध्ये भाग घेत नाही. काही महत्वाच्या ठिकाणी खुलासा आवश्यक वाटल्यास तेवढ्यापुरता चर्चेत सहभागी होतो. हे नानावटींच्या आतापर्यंतच्या लेख व प्रतिक्रिया यावरुन लक्षात आले असेलच. असे मला म्हणायचे आहे.
प्रकाश घाटपांडे

लेखकाचे आडनाव

Delrymple ऐवजी Dalrymple असावे.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!.

टाइप करतानाची चूक

अगदी बरोबर. Dalrymple हवे.
चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद!

 
^ वर