लाल परी कलंदर (पूर्वार्ध)

सिंध प्रांत
पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ग्रामीण भाग हा नेहमीच बाहेरच्या देशातील पर्यटकांसाठी अगदीच वेगळा मामला आहे. मातीची कच्ची घरं, निळ्या फरश्यानी सजवलेले सूफी संतांचे दर्गे, त्यावर उभे असलेले पांढरे मिनार, दोन खेड्यामध्ये काही ठिकाणी वाळवंट व काही ठिकाणी कापूस, भात व उसाचे पीक असलेली शेतं, सिंधू नदीच्या तीरावरील सुपीक जमीन, अशा प्रकारे विविध अंगाने नटलेला हा प्रदेश सिंधू नदीच्या अरबी समुद्रातील संगमापर्यंत विखुरलेला आहे. काही पर्यटकांना हा प्रदेश इजिप्तची आठवण करून देतो. फक्त येथे असलेल्या जमीनदारीचे वर्चस्व, त्यांच्याकडील शस्त्रास्त्राचा साठा, खासगी सैन्य, स्वतंत्र तुरुंग, त्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेले गुलामी जीवन जगणारे वेठबिगार शेतमजूर, यावरून येथे कायदे - कानून, पोलीस व्यवस्था, न्यायालय आहे की नाही असा संशय येऊ लागतो. गावची गावे रातो रात लुटल्या जातात. लुटारूंना शिक्षा होत नाही; त्यांच्यांवर कुणाचाही वचक नाही. कायद्याचे राज्य नाही.

मुळात सिंध प्रांतात कायदा व सुव्यवस्था राखणे पुरातन काळापासूनच अत्यंत जिकिरीचे होते. डोंगराळ दुर्गम भाग, रणरणते ऊन, पाण्याचे दुर्भिक्ष, इत्यादीमुळे हा प्रदेश नेहमीच भटक्यांची, लुटारूंची, चोर- दरोडेखोरांची, निराश्रितांची, भणंगांची लपून राहण्यासाठी अत्यंत सोईचा होता. याचबरोबर या प्रदेशाने भारतातील हिंदू साधू - सन्याशांना व मध्य एशियातील मुस्लिम फकीर, पीर इत्यादींनासुद्धा आकर्षित केले. गांजा, अफू, भांग या व्यसनांची, एकट्याने मुक्तपणे राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यास येथील भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे कालांतराने हा प्रांत हिंदू-मुस्लिम यांचे ऐक्याचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्धीस आला. येथील रहिवाश्यात हिंदूंचे काही रीती-रिवाज व मुस्लिमांचे काही रीती- रिवाज यांचा सुरेख संगम बघण्यास मिळतो. यातूनच सूफी पंथाचा जन्म झाला. सूफी पंथियांनी ही परंपरा पुढे नेली. या प्रदेशातील बहुतेक खेड्यात सूफी संतांच्या दर्ग्यांचे अवशेष सापडतात. काही गावात अजूनही या दर्ग्यांची देखभाल केली जाते. दरवर्षी त्या संतांचे उरुस साजरे केले जातात.

सूफी पंथ
सूफी पंथीयाने येथील गोर गरीबांची काळजी घेतली. त्याना मानसिक आधार दिला. सूफी संतांचे चमत्कारसदृश (मानसिक) रोगोपचार, त्यांची सन्यस्त वृत्ती, परमेश्वराच्या चरणी लीन होण्याचा ध्यास इत्यादीवरून हा पंथ हिंदू धर्माच्या अगदी जवळचा होता की काय अशी शंका येते. सर्व धर्मांची नाळ एकच असून परमेश्वरापाशी जाण्यासाठीचे ते वेगवेगळे मार्ग आहेत, यावर सूफी संतांचा विश्वास होता. त्यांच्या मते देवळात किंवा मशीदीत जावून बाष्कळ कर्मकांड करण्यापेक्षा अंतर्मनातील परमेश्वराशी संवाद साधल्यास स्वत:तच स्वर्ग दिसेल. खुदाचा शोध अंतर्मनातूनच घेतल्यास धर्मग्रंथ, धार्मिक रूढी व परंपरा यांची गरजच भासणार नाही. त्यांच्या याप्रकारच्या प्रबोधनामुळे हिंदू व मुस्लिम धर्मातील सामाऩ्यांना सूफी पंथाचे आकर्षण वाटू लागले. सूफी संतानी त्यांच्या पंथातील बारीक सारीक गोष्टी गाण्याच्या स्वरूपात (व कव्वालीत गात!) असल्यामुळे अती सामान्यांना त्या कळण्यास सोपे झाले. त्यांची गाणी फक्त तुर्की वा पर्शियन मुस्लिमांसाठीच नव्हत्या तर सिंधी, पंजाबी वा हिंदीतूनही असल्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या. त्या गाण्यातील उदाहरणं धूळीने माखलेले रस्ते, वाहते पाणी, वाळवंटातील तहान, वाळलेली झाड - झुडप, पाऊस, वारा इत्यादींशी जोडलेले असल्यामुळे कळण्यास त्या फारच सोप्या होत्या व त्यातील आशय ऐकणार्‍यांच्या मनापर्यंत पोचत होता. सूफी पंथाची ही शिकवण केवळ त्या प्रांतातील मुस्लिमासाठी नव्हती तर भारतातील मुस्लिमांना हिंदुत्वाबद्दल आपुलकी निर्माण करणारी होती. सूफी पंथीयांना हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ पवित्र वाटत होत्या. त्यांच्यातील अनेक जण योग, ध्यान, तपस्या यांचा अभ्यास करत असत. भर उन्हात तास न तास ध्यान करणार्‍यांची संख्या कमी नव्हती.

18व्या शतकातील शाह अब्दुल लतीफ हा सूफी संत सिंध व राजस्थान मध्ये भटकत असताना नाथ पंथीयांच्या संपर्कात आला. त्याच्या मते हे साधू व सिद्ध पुरुष श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्यात निष्णात असल्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली व त्यांच्यातील या अलौकिक शक्तीमुळे ते जमिनीपासून काही अंतरावर तरंगू शकतात, भविष्याचा वेध घेऊ शकतात, मैलो न मैल दूरचा संवाद ऐकू शकतात. या सर्व शक्तीमुळे ते 'महासिद्ध' होतात. हे महासिद्ध हिंदू देव - देवतांच्यापेक्षा जास्त प्रभावशाली असतात. शाह अब्दुल लतीफच्या परिक्रमातील अनुभवांचे पद्यस्वरूपातील लेखन त्याच्या सूर रामकली या संग्रहात सापडतात. लतीफच्या मते हिंदू व मुस्लिम धर्मात मुळातच काही फरक नाही. फक्त त्यांच्यातील काही परंपरावाद्यामुळे व त्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांच्यातील दरी वाढत आहे.

लाल शाहबाज कलंदर
शाह अब्दुल लतीफच्या दर्ग्याच्या ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात उरुस साजरा होतो. इस्लाम धर्माने जे जे काही नाकारलेले आहे त्या सर्व गोष्टी उरुसाच्या वेळी येथे जमलेले करतात. संगीत, नाचगाणे, प्रेम व विरह गीतांची मेहफिल, स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग, भांग-गांजा-अफू यांची नशापाणी, आणि मशीदीतील अल्लाऐवजी एका मृतव्यक्तीला शरण जाणे या गोष्टी इस्लामात निषिद्ध असूनही येथे जाहीरपणे त्या केल्या जातात. म्हणूनच या सिंधी मुस्लिमावर वहाबी मुल्लांचा राग आहे. परंतु सूफी पंथियांच्या मते ही मुल्ला मंडळी दांभिक व ढोंगी आहेत. कारण आयुष्यात प्रेमाशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. पैगंबराच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून मुल्ला-मौलवी सामान्यांची फसवणूक करतात. मुल्लांना फक्त आपले हित कळते. त्यांना तुरुंगातच कोंबले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सूफी पंथीय व्यक्त करतात.

भित शाह येथील शाह अब्दुल लतीफच्या दर्ग्याच्या ठिकाणापासून जवळच अजून एक असाच भन्नाट लाल शाहबाज कलंदर याचा दर्गा सेहवान या ठिकाणी आहे. लाल शाहबाज कलंदरचे वर्णन लाल ससाणा म्हणूनही केला जातो. सेहवान हे गाव एके काळी शैव पंथीयांचे मुख्य ठिकाण होते. या गावाचे या पूर्वीचे नाव शिवस्तान असून त्याचे अपभ्रंश होत होत आज सेहवान म्हणून ओळखले जात असावे. भारत - पाकिस्तान व हिंदू - मुस्लिम यांच्यातील गेल्या 60 वर्षाच्या धुमश्चक्रीतसुद्धा या दर्ग्याचा प्रमुख - सजदा नशीन - एक हिंदूच आहे. व त्याच्यावरच उरुसाची जबाबदारी असते. त्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून हिंदू साधू, सन्यासी या दर्ग्याला भेट देतात. हिंदू - मुस्लिम भक्त नवस फेडतात. 1970 पर्यंत दर्ग्याच्या बाहेरच्या आवारात दगडी शिवलिंगही येथे होता. तोडफोड होण्याच्या शक्यतेमुळे व भीतीमुळे आता ते शिवलिंग एका खोलीत बंदिस्त आहे.

लाल शाहबाजच्या आशिर्वादासाठी वाळवंटी प्रदेशातील हिंदू येथे जमतात. दर्ग्याची देखभाल करणारे, पाण्याची सोय करणारे हिंदूच असतात. हिंदूंच्या मते लाल शाहबाज कलंदर हा पूर्वजन्मी संस्कृत कवी भर्तृहरी होता. चौथ्या शतकातील हा सन्यासी उज्जैन दरबारातील सुख-ऐश्वर्य यांचा त्याग करून या शिविस्तानमध्ये अंगभर राख फासून तपश्चर्या करू लागला. याच लाल शाहबाजला अनेक सिंधी हिंदू 'झुलेलाल' या नावानेसुद्धा ओळखतात. त्यंच्या मते झुलेलाल हा सिंधू नदीचा रक्षणकर्ता आहे. मात्र मुस्लीम भक्तसाठी लाल शाहबाज कलंदरच सिंधू नदीचा नियंत्रक असतो.

सेहवान शरीफच्या दर्ग्याला भेट देणारे तेथील दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करत असतात. एक, धमाल व दुसरे लाल परी मस्तानी या महिला फकीराचे दर्शन. उरुसाच्या काळातील संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर रात्रभर सूफी फकीर व इतर भक्त भक्तीगीत, कव्वाली, नाचगाणी यांचा मनमुराद आनंद घेतात. या प्रकाराला धमाल म्हणतात. लाल परी कलंदर भडक तांबडे कपडे घातलेली, हातात एक जाडजूड काठी घेतलेली, गलेलठ्ठ असलेली फकीरा त्या गर्दीत सहजपणे ओळखली जाते.

....अपूर्ण
लेखनविषय: दुवे:

Comments

दमा दम मस्त कलंदर

रुना लैला यांनी गायलेल्या "दमा दम मस्त कलंदर" ह्या कव्वालीत झुलेलाल उर्फ कलंदर यांचे वर्णन केले गेले आहे.

छान माहिती. चांगला लेख.

दमा दम मस्त कलंदर

दमा दम मस्त कलंदर ही कव्वाली बाबा बुले शाह यांची असून ती रेश्मा, अबीदा परवीन, रुना लैलापासून नुसरत फते अली खां पर्यंत सर्वांनी गायली आहे असे वाटते. पैकी दमदार रुना लैलाने त्याला पॉप स्वरूप दिल्याने ती अधिक प्रसिद्ध झाली.

लेखातील माहिती आवडली. पुढे वाचण्यास उत्सुक.

मला शंका आहे...

दमादम मस्त कलंदर ही कव्वाली बाबा बुले शाह यांची असेल तर एक शंका मनात येते. त्यांचा जन्म १६८० चा व मृत्यू १७५७ चा. रुना लैलाने गायलेल्या गाण्यातले पुढील शब्द आहेत. (ऐकण्यात गल्लत झाली असेल तर दुरुस्त करावे)

ओ लाल मेरी पत रखियो बला झुलेलालण
सिंदडी दा सेहवण दा सखी शाहबाज कलंदर
दमा दम मस्त कलंदर, अली दम दम दे अंदर
दमा दम मस्त कलंदर, अली दा पहिला नंबर

पुढे एका कडव्यात म्हटले आहे
हिंद सिंद पीरा तेरी नौबत बाजे
नाल वाजे घडियाल बला झुलेलालण

मग नंबर व घडियाल हे शब्द बुले शाहच्या काव्यात कसे आले असतील?

रुना लैला

मी ऐकलेल्या रेश्माच्या दमा दममध्ये अली दा पैला नंबर हे शब्द नव्हते असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. ऐकून बरीच वर्षे झाली. यूट्यूबवर मिळते का पाहिले पाहिजे.

बाकी, रुना लैलाने मू़ळ भक्तीपर कव्वालीला पॉपचे स्वरूप दिले असे म्हटले आहेच.

गूगलल्यावर कव्वालीचे भाषांतर मिळते. त्यात अली दा पहिला नंबर हे शब्द नाहीत आणि घडयालचा अर्थ रात्रीचा रखवालदार(?) असा दिला आहे आणि तसाही घड्याळ/ घडियाल शब्दावरची शंका कळली नाही. घड्याळे बुले शहापेक्षा जुनी आहेत. ती काट्यांवर चालणारी होती असे नाही.

घडियालचा दुसरा अर्थ सुसर. तो इथे अभिप्रेत नसावाच.

खुलासा

नंबर हा इंग्रजी शब्द आहे आणि घड्याळ, चष्मा या गोष्टींचा परिचयही भारतीयांना इंग्रजांशी संपर्क वाढल्यावर झाला. त्याआधी कालगणनेसाठी घटिकापात्र वापरत असत. त्यामुळे माझ्या मनात क्षणभर शंका डोकावली, की १७५७ ला मृत्यू झालेल्या बुलेशाहच्या काव्यात या बाबी कुठून आल्या? पण घडयाल म्हणजे रात्रप्रहरी किंवा मराठीत 'जागल्या' असे असेल तर मग त्याचा आणि घड्याळाचा संबंध नाही.

घड्याळ

घड्याळ हा शब्द मी सुशान्त यांनी दिलेल्या शब्दकोशाच्या दुव्यात चाळला. तेथे खालील वाक्य मिळाले -

स्वराज्यात घड्याळ वाजविण्याचा मान सरकारकडून मिळे, स्वारीमध्ये तासें, वाजंत्रीप्रमाणें घड्याळही वाजवीत.

यावरून घड्याळ ही वेळ मापन आणि आवाज करण्याची गोष्ट वाटते. यावर अधिक खुलासा झाल्यास आवडेल. गाण्यातही केवळ जागल्या या अर्थाने म्हटले आहे की रात्री घड्याळाचा आवाज करणारा जागल्या ते नक्की माहित नाही पण तसेच काहीसे असू शकेल.

माझ्यामते, पूर्वी घंटानादाने (मुघलांमध्ये) वेळ सांगितली जाई. वाळूची घड्याळे आणि सूर्यघड्याळेही ब्रिटिशांपूर्वी होतीच. मुघलांचे आता संदर्भ आठवत नाहीत. सहज मिळाले तर बघेन.

अवांतरः चष्मा, घड्याळाप्रमाणेच घंटा देशी की परदेशी हा ही प्रश्न मला आहे.

घडयाळ

मोल्सवर्थमध्ये (पा. २५२) 'घडयाळ' ह्याचा अर्थ An hour-glass. 2 A plate of metal on which the hours are struck, a gong. 3 A watch असा दिला आहे. तुळपुळे फेल्डहाउसमध्ये (पा.२१५) 'घडयाळ' असा शब्द नाही पण ह्याच अर्थाचा 'घडिवट\टे' असा शब्द दाखविला आहे आणि त्याचा अर्थ 1 घटिकापात्र, a water clock 2 वेळ दाखवण्यासाठी वाजवायचे झेंगट, a bell indicating the time असा दिला आहे. दुसर्‍या अर्थाच्या उपयोगाचे उदाहरण भास्करभट्ट बोरीकरविरचित 'शिशुपालवध' (तंव घडिवटें पिटिलें : मध्यरात्रीचें) असेहि दाखविले आहे.

वाजविण्याची गोष्ट अशा अर्थाने क्र. २ चा अर्थ लागू पडतो.

नस्तं झेंगट?

a water clock 2 वेळ दाखवण्यासाठी वाजवायचे झेंगट

झेंगट म्हणजे काय? मला फक्त "नस्तं झेंगट आपल्या मागे नको बुवा!" असं झेंगट = लचांड या अर्थी केलेला शब्दप्रयोग माहित आहे पण झेंगट वाजते म्हणजे काय?

शब्दार्थांमुळे अवांतराचे झेंगट नानावटींच्या लेखाच्या मागे लागले असले तरी रोचक आहे.

झेंगट

मोल्सवर्थ पा.३३४.

झेंगट [ jhēṅgaṭa ] n A metal plate; beaten on by certain classes of mendicants: also the plate on which the hours are struck, a gong. 2 A perplexing affair or business; a difficulty or trouble: also the state induced by it; a strait, scrape, hobble. 3 A wild scheme, speculation, enterprise; as in pursuit of subsistence.
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ

हिंदूच्या अडगळीतील आत्या आठवली

महानुभावी असलेली आत्या तिथेच कुठेतरी हरवली होती.
संदर्भ : हिंदू - ले. भालचंद्र नेमाडे.

चांगली माहिती

उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत आहे.

सज्जादानशीन हवे

सजदा नशीन - एक हिंदूच आहे

सज्जादानशीन हवे. सज्जादा म्हणजे नमाजासाठी वापरण्यात येणारी चटई. सजदा म्हणजे प्रार्थनेत जमिनीला माथे लावणे, नतमस्तक होणे. सजदा करणारा तो साजिद. जिथे सजदा केला जातो ती जागा म्हणजे मस्जिद. नशीन हा शब्द निशस्तनवरून आला आहे. फारसीत निशस्तन म्हणजे बसणे. निशस्त म्हणजे सत्र (सेशन). उदा. ये बीबीसी उर्दू सर्विस की आख़री निशस्त है.

इथे सज्जादानशीनचा अर्थ त्या संताची गादी पुढे चालविणारा, वारस. ह्यावरून आठवले की, पाकिस्तानचे भूतपूर्व परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद क़ुरेशी हे मुलतानमधल्या एका दर्ग्याचे सज्जादानशीन आहेत. तसेच उर्दूतला एक बऱ्यापैकी प्रसिद्ध शेर आहे:
आके सज्जादानशीं क़ैस हुआ मेरे बाद
ना रही दश्त में खाली कोई जा मेरे बाद

(क़ैस - मजनू; दश्त - वैराण जागा/वाळवंट; जा - जगहचे कवितेत वापरले जाणारे छोटे रूप)
हा विषय आवडीचा आहे. पण तूर्तास एवढेच. चूभूद्याघ्या.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

सज्जादानशीन

चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद!
(इंग्रजीत टंकित केलेल्या sajada nashin चा मराठीत सजदा नशीन म्हणून डिट्ट्टो लिहिल्यामुळे ही चूक झाली. क्षमस्व!)

पूर्ण अर्थ

ही कव्वाली पूर्ण आणि तिचा अर्थ मिळू शकेल काय?

रोचक माहिती

उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत आहे.

घड्याळ

घड्याळ हा "ळ" हे अक्षर असलेला शब्द आहे त्या अर्थी घड्याळ हे इंग्रज येण्यापूर्वीपासूनच भारतीयांना/मराठी भाषकांना माहिती असावे. जर घड्याळाची ओळख इंग्रजी अंमला नंतर झालेली असती तर तो शब्द ळ अक्षरयुक्त नसता* असे वाटते.

* त्या केसमध्ये तो भाषाशुद्धीच्या वरवंट्यात संस्कृत भाषेतून घडवला गेला असता आणि मग त्यात ळ असण्याची शक्यता नसती. ;-)

अवांतरः या पानाच्या रुंदीमध्ये काही लोच्या झाला आहे.

नितिन थत्ते

घडी,घडा,घड्याळ इ.

घडी,घडा,घटका,घड्याळ हे सर्व शब्द प्राचीन भारतीय कालमापन पद्ध्तीत वापरल्या जात असलेल्या‍या घटिका-पात्र या जोड भांड्यावरून आले आहेत. एका मोठ्या पात्रात ठराविक आकाराची एक घटिका म्हणजे छोटा घडा पाण्यात तरंगवत ठेवीत. त्याला तळाशी एक छिद्र असे. त्यातून पाणी हळूहळू घटिकेत शिरून ती भरे व बुडे. या प्रक्रियेला लागणार्‍या कालावधीला एक घटिका(घटका) म्हणत.सुटसुटीत घड्याळे सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्यावरही अगदी अलीकडेपर्यंत पवित्र कार्य-विशेषतः लग्नप्रसंगी ही घटिका भरत ठेवलेली असे. दामूअण्णा मालवणकरांची भूमिका असलेला एक अत्यंत जुना मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी टीव्ही वर पाहात असताना त्यात एका बेकायदेशीर पण विनोदी लग्नप्रसंगी घटकापात्रात घटका बुडत असताना दामूअण्णा घाईघाईने येऊन 'अरे घटका भरली, वाजवा रे वाजवा' असा गोंधळ माजवतात असा प्रसंग पाहिल्याचे आठवते.
यावरून नंतर घडी,घटका म्हणजे वेळ, कालावधी असा अर्थ रूढ झाला असावा. उदा. जीवनात ही घडी अशीच राहू दे.दम ले ले घडीभर मुसाफिर जाएगा कहाँ इ.
घटकापात्र कालबाह्य झाले असले तरी गोवा कारवारकडे अजूनही मुलीच्या लग्नात मोठे पातेले व गडू यांचे प्रतीकात्मक घटकापात्र जावयाला इतर भेटवस्तूंसोबत भेट म्हणून पाठवण्याची प्रथा आहे. तशी रीतच आहे आणि त्याला घटकापात्रच म्हणतात.

लोच्या

अवांतरः या पानाच्या रुंदीमध्ये काही लोच्या झाला आहे.

बहुतेक, अपूर्ण् शब्दाच्या जागेमुळे फॉर्म्याटिंग गंडले आहे.

-Nile

लेख आवडल.

लेख आवडला. धमाल हाच शब्द तिथे वापरला जातो की तुम्ही त्याचे भाषांतर केले आहे?

-Nile

झुलेलाल- शाहबाज

नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरचा लेख आवडला.
दमादम मस्त कलंदर हे गाणे कुणी लिहिले आहे हे समजत नाही. पण ते अलिकडचे म्हणजे नंबर शब्द रूढ झाल्यानंतरचे आहे. (किंवा हे कडवे अलिकडचे असेल.)
असे दिसते की हे गाणे मुख्यतः शाहबाज कलंदरविषयीचे आहे. झुलेलाल आणि शाहबाज कलंदर ही दोन नावे या गाण्यात येतात. यातील झुलेलाल आणि शाहबाज कलंदर हे दोघेही एकच व्यक्ति आहेत असा काहीसा समज दिसतो.

जालीय शोधावरून दिसले की, झुलेलालची कथा आणि शाहबाज कलंदरची कथा यात खूप फरक आहे. झुलेलाल हा ११ (?)व्या शतकातला तर शाहबाज कलंदर बाराव्या-तेराव्या शतकातला दिसतो. झुलेलालच्या कथेत मिर्कशाह म्हणून राजाची गोष्ट आहे. या राजाचा काळ सापडला नाही. शाहबाज कलंदरचा बहुदा एकच दर्गा (समाधीस्थळ) असावा तर झुलेलालची पाच तरी देवळे आहेत.

या सर्वावरून असे वाटते जरी हे दोघे एकच अशी काही जणांची समजूत असली तरी दोघे वेगवेगळे होते. कुणाकडे अधिक माहिती असेल तर वाचायला आवडेल.

प्रमोद

हो.

मी हेच टंकायला आलो होतो. माझ्याकडेही अशीच् माहिती आहे.
झूलेलाल चा जन्म् ९५० च्या आसपास चा मानतात. हिंदु संत म्हणूनच त्याची स्पष्ट ओळख आहे.(ज्ञानेश्वर्, तुकाराम, तुलसीदास् ह्यांच्याप्रमाणे.)
दोन्ही कडे प्रभाव असणार्‍यांपैकी झूलेलाल वाटला नाही.(कबीर्, शिर्डीचे साईबाबा वगैरे)

लेख आवडला. माझ्या माहितीप्रमाणे सूफी प्रथा भारतीय्/दक्षिण् आशियायी उपखंडात आणण्याचे श्रेय् ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती ह्यांच्याकडे जाते. हे मुहम्मद् घोरीच्या भारतावरील् स्वारीच्या आसपास(की स्वारीसमवेत?) भारतात आले. घोरीने पृथ्वीराजाला हरवून ठार केले ही घटना ११९१ च्या आसपास तराईच्या मैदानात घडली.
त्याच् आसपास प्रथम् दिल्लीत चिश्ती आले व मग कायम अजमेर् येथे स्थायिक झाले.(आजही त्यांचा दर्गा हा आख्ख्या धार्मिक जगात प्रसिद्ध/महत्वाचा आहे.)

म्हणजे सूफी पंथाचे अधिकृत् अधिष्ठान भारतात येण्याच्या तब्बल दोन्-अडीच शतके आधी झूलेलाल ह्यांचा जन्म् होतो. तस्मात् झूलेलाल् हेच सूफी पंथातील कुणी असावेत् हे पटत नाही.

--मनोबा

 
^ वर