चालविली भिंती मृत्तिकेची
" सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का?"
.
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
.
"नामदेवांनी--ज्ञानराज माझी योग्यांची माऊली--असे म्हटले आहे.म्हणजे ज्ञानेश्वर सिद्धयोगी होते.रेड्याच्या मुखातून वेदमंत्र वदविणे,भिंत चालविणे असे चमत्कार त्यांनी केले नसतील काय?"
.
"ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात जे विवेचन केले आहे त्यावरून त्यांना योगमार्गाचे परिपूर्ण ज्ञान होते हे स्पष्ट आहे.त्यांची असामान्य बुद्धिमत्ता,अलौकिक काव्यप्रतिभा,अद्वितीय शब्दप्रभुत्व यांविषयी दुमत नाही.त्यासाठी ज्ञानेश्वरी हे प्रमाण आहे."
.
"मग त्यांनी वरील चमत्कार केले असे मानण्यात काय चूक आहे?"
.
"गणेशमूर्ती दूध पिऊ शकत नाही तद्वतच भिंत चालू शकत नाही, हे कॉमनसेन्सने समजते. या गोष्टी निर्जीव आहेत.रस्त्यावरून पळणारे स्वयंचलित वाहन निर्जीव असले तरी त्यांत इंजीन असते. तिथे इंधनाचे ज्वलन होऊन त्या ऊर्जेवर वाहन पळते. योगसाधनेमुळे निर्जीव वस्तूंना चालविता येते हे अद्यापि कोणीही सिद्ध केलेले नाही. तसे असते तर वैज्ञानिकांनी त्याची दखल घेतलीच असती."
.
"पण योगसाधनेने अष्टसिद्धी प्राप्त होतात ना?"
.
"--अणिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा । प्राप्ति: प्राकाम्यमीशत्वं वशित्वं चाष्ट सिद्धय:।---त्या प्राप्त झाल्यास चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.मात्र चमत्कार केल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा नाही."
.
"अष्टसिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांचा वापर करू नये असा दंडक आहे. कारण योगसाधनेचे अंतिम उद्दिष्ट मोक्ष हे आहे. सिद्धिप्राप्ती हे नव्हे."
.
"म्हणजे सिद्धी प्राप्त झाल्या याची चाचणी घ्यायचीच नाही का? आपण यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पायर्या ओलांडल्या म्हणजे अष्टसिद्धी मिळाल्या असे गृहीत धरायचे का?"
.
"तसे नव्हे.सिद्धींचा उपयोग स्वार्थासाठी,प्रसिद्धीसाठी करू नये असे म्हटले आहे."
.
"आता आपण ऐतिहासिक सत्य घटना पाहू.ज्ञानेश्वरीत म्हटले आहे--शके बाराशे बारोत्तरे टीका रचिली ज्ञानेश्वरे---शके १२१२ त ७८ मिळ्वून इ.स.१२९० हा ज्ञानेश्वरी रचनेचा काळ.त्यावेळी रामदेवराय यादव याचे राज्य होते.त्याचाही उल्लेख --तेथ यदुवंशविलासु। जो सकलकला निवासु न्यायाते पोषी क्षितिशु रामचंद्रु।---असा आहे. इ.स.१२९४ मध्ये अल्लाद्दिन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले.त्या संदर्भात स्वा.सावरकर लिहितात---अल्लाउद्दिन खिलजी अवघ्या पंधराहजार सैन्यानिशी कोट्यवधी हिंदूंनी गजबजलेल्या दक्षिणेत,बकर्यांच्या कळपात लांडगा शिरावा तसा, घुसला. देवगिरीवर चढाई केली.रामदेवराय यादवाच्या अफाट हिंदूसेनेचा त्या यवनाने चक्काचूर केला. हिंदुराज्य बुडविले. ते परत स्थापू पाहाणार्या परमशूर शंकरदेव यादवाला जिते पकडून अंगाचे कातडे सोलून ठार मारले.
त्यावेळी ज्ञानेश्वरांपुढे अष्टसिद्धी हात जोडून उभ्या होत्या. तरी राज्यावर परचक्र येत आहे अशी सूचना ते राजास देऊ शकले नाहीत. त्यांनी निर्जीव भिंत चालविली.पण खिलजीचा मार्ग रोखण्यासाठी काही करू शकले नाहीत.---
याच संदर्भात प्रा.द.के.केळकर, बुद्धिवादाचा ध्रुवतारा या पुस्तकात लिहितात--अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी इ.स.१२९४ तली.त्याकाळी ज्ञानेश्वर होते.तसेच चांगदेव आणि त्याचे अष्टसिद्धिप्रशिक्षित सव्वाशे शिष्य होते. त्यांच्या नावांची यादीच दिली आहे. पण आक्रमणाविषयी बेसावध असलेल्या रामदेवरायाला कोणीही जागे केले नाही. इस्लामी आक्रमणाच्या वेळी हे सर्व योगिराज खाली माना घालून का बसले होते?--यावरून अष्टसिद्धींचे चमत्कार केवळ ग्रंथात लिहिण्यापुरतेच आहेत हे स्पष्ट होते."
.
"हा इतिहास मला ठाऊक नव्हता.योगी चमत्कार करू शकतात यावर माझी श्रद्धा होती."
.
"रामदेवरायावरील विजयाने उन्मत्त झालेल्या यावनी सेनेने देवगिरीच्या हिंदूप्रजेवर किती अनन्वित अत्याचार केले असतील ते आपण कल्पनेने जाणू शकतो. तो जनआक्रोश ज्ञानेश्वरांच्या कानी गेला असेल.त्यांचे वय तेव्हा १८/१९ वर्षे होते.त्यांनी मनोविजय मिळविला असला तरी ते संवेदनशील होतेच. त्यांना किती विषाद वाटला असेल? किती खिन्नता आली असेल! आपण काहीच करू शकलो नाही. जो परब्रह्म परमात्मा भगवान् श्रीकृष्ण तोही आपल्या यदुवंशातील राजाला आणि त्याच्या प्रजेला वाचवू शकला नाही. अन्यायाने आक्रमण करणारा क्रूरकर्मा विजयी आणि --न्यायातें पोषी क्षितिशु। असा राजा पराभूत! मग जगन्नियंत्या ईश्वराला न्यायी कसे म्हणावे ? अशा विषण्ण विमनस्क अवस्थेत त्यांनी संजीवनी समाधीचा (इ.स.१२९६) निर्णय घेतला असेल का ? असा एक विचार मनात येतो."
.
"सात शतकांपूर्वी काय कशामुळे घडले याची आपण केवळ कल्पना करायची. दुसरे काय? तुम्ही जे शेवटी सांगितले ते मात्र पटत नाही. अलौकिक व्यक्तींना सर्वसामान्यांच्या पंक्तीत बसवू नये."
.
"ठीक आहे. मनात आलेला विचार बोललो एवढेच."
Comments
ओकार्या
युक्तिवादाला अनावश्यक आणि केवळ द्वेषबुद्धीने केलेल्या टीकेस (सावरकर , केळकर असोत की यनावाला) ओकार्या म्हणू नये तर दुसरे काय म्हणावे?
द्वेष अं? कोणाचा? कशासाठी?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"युक्तिवादाला अनावश्यक आणि केवळ द्वेषबुद्धीने केलेल्या टीकेस (सावरकर , केळकर असोत की यनावाला) ओकार्या म्हणू नये तर दुसरे काय म्हणावे? "
श्री.विनायक गोरे यांचा प्रतिसाद
स्वा.सावरकरांनी विज्ञाननिष्ठ निबंधांत जे लिहिले ते द्वेष व्यक्त करण्यासाठी का? कुणाचा द्वेष?कशासाठी द्वेष? त्यांनी त्याच पुस्तकात लिहिले आहे,"सोळाव्या शतकानंतर युरोपखंडाने धर्मसत्ता झुगारून विज्ञानाची कास धरली म्हणून तो त्रिखंडविजयी झाला.भारताला तसे होणे असेल तर श्रुति-स्मृति-पुराणोक्त गुंडाळून ठेवून विज्ञानाचे नवे पान उलटले पाहिजे"यावरून आपल्या देशाची प्रगती व्हावी या तळमळीतून त्यांनी हा लेखनप्रपंच केला हे स्पष्ट होते.
संतद्वेष
सावरकरांच्या लेखनातून ज्ञानेश्वर, तुकाराम या भक्तिमार्गी संतांबद्दलचा द्वेष जाणवतो. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाबद्दल सिद्ध ज्ञानेश्वरांनी पूर्वसूचना राजाला दिली नाही या तर्कातील फोलपणा इथे माझ्यासह अनेकांनी दाखवला आहेच. असा तर्कदुष्ट युक्तिवाद करण्यामागे देवगिरीच्या पाडावासाठी बळीचा बकरा शोधणे हाच एक हेतू दिसतो. न्यूटन - तुकारामाच्या बाबतीतल्या युक्तिवादातला दोषही मी दाखवलेलाच आहे. आता आमोद शिदे म्हणतात मथितार्थ पहा. युक्तिवाद साफ चुकीचा ठरल्यानंतर अश्या लोकांच्या पाठीराख्यांचे हे पेटंट वाक्य आहे.
पण न्यूटन शोध लावत होता म्हणजे अख्खा इंग्लंड देशच शास्त्रीय संशोधन करत होता का? आणि तुकाराम अभंग रचीत होते तेव्हा सर्व महाराष्ट्र/भारत अभंग रचीत होता का? असे जर नाही तर ही उदाहरणे कशाला? भारत देश इंग्लंड - युरोपापेक्षा वैज्ञानिक प्रगतीत मागे पडला हे म्हणणे वेगळे आणि सावरकरांनी केली तशी अतार्किक विधाने करणे वेगळे. सावरकरांकडून तरी इतक्या ढिसाळ युक्तिवादाची अपेक्षा नव्हती.
गैरसमज
श्री. यनावाला म्हणतातः हा समज पूर्णतया चुकीचा आहे. असे दूरान्वयानेसुद्धा लेखात कुठेही म्हटलेले नाही अथवा सुचवलेले नाही. आपल्याला वाटेल तो समज करून घेणे आणि तदनुसार प्रतिसाद लिहिणे अशोभनीय आहे.
याच्याशी पूर्णपणे असहमत. हा आपला गैरसमज आहे. एकदा का कोणी काही लिहीले की त्याचा वाच्यार्थ, रूढार्थ, भावार्थ, मतितार्थ वगैरे वगैरेने विश्लेषण करणे, टिका करणे हे ओघाने येते. मग लिहीणारे व्यास असोत, शंकराचार्य असोत, ज्ञानेश्वर असोत, अथवा उपक्रमासंदर्भात यनावाला असोत का विकास असोत. त्यात अशोभनीय वगैरे काही नाही कारण मी त्यात काही व्यक्तीगत निंदानालस्ती केलेली नाही, तशी कधी करत देखील नाही. वर म्हणल्याप्रमाणे, टिकात्मक विचार आहे. तो सिलेक्टीव्हली करायचा नसतो आणि करत देखील नाही. आपल्याला तसे वाटले कारण कदाचीत, "स्वतःसी चिमोटा घेतला, नेणे जीव कासावीस झाला..." असे काहीसे झाले असावे.
राहता राहीला "आपल्याला वाटेल तो समज करून घेण्याचा" प्रश्न. जणू काही प्रत्येक सश्रद्ध म्हणजे मठ्ठ, अज्ञानी, नाकर्ता (तरी बरं शिवाजी पासून गांधींजींपर्यंत सगळेच सश्रद्ध होते...) आणि अधुनिक, विज्ञानवादी म्हणजेच फक्त शहाणे असे काहीसे तत्वज्ञान आपल्या लेखनातून सातत्याने आढळते, त्यावरून माझा समज हा वाटेल तो आहे असे वाटत नाही. आणि म्हणूनच देवगिरीच्या संदर्भातील उदाहरण हे एकतर्फी वाटले आणि त्या संदर्भात नेहरूंचे उदाहरण दिले. दोन्हीच्या पराभवाचे कारण हे श्रद्धा नव्हते अथवा विज्ञानवाद नव्हता. एकाच्या दारूच्या कोठारात मिठाची गोणी भरणारे रक्षक होते तर दुसर्याच्या संरक्षण मंत्रालयाने शस्त्रेच कशाला, संरक्षणाची तयारीच कशाला, साधे सैनिकांना थंडीसाठी लागणे बूटही दिले नव्हते आणि हिमालयाच्या सीमेवर लढायला पाठवले...
योगसाधनेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यांच्यायोगे अनेक चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.तसा समजही रूढ आहे.चमत्कारांविषयींचा हा दावा तथ्यहीन आहे. निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वीही कोणी केले नाहीत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे हा लेखाचा विषय आहे.त्यासाठी मान्यवरांनी दिलेले ऐतिहासिक आधार सत्य आहेत.
लेखाचे उद्दिष्ट तेवढेच आहे.
...चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वीही कोणी केले नाहीत... हे दाखवण्यासंदर्भात असहमती नाही. मात्र त्याचा संदर्भ हा सावरकरांच्या एका वाक्याशी लावणे पटले नाही. त्याच लेखात अस्पृश्यता जात आहे म्हणून बिहार मध्ये भूकंप झाला असे म्हणणारे सश्रद्ध तसेच अस्पृश्यता आहे म्हणून बिहारमध्ये भूकंप झाला असे म्हणणारे ढोंगी सुधारक हे दोन्ही खूळचट असे ते म्हणाले. हा लेख लिहायचे त्यांचे कारण ही खालील ओवी होती:
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे
परंतू तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहीजे
ही ओवी शिवाजीला माहीती होती असे गृहीत धरून देखील अर्थ लावला तर काय दिसते तर त्याने हरीनामाचा जप केला नाही आणि त्याने तसे केले नाही म्हणून रामदासांचा रोष ओढवून घेतला नाही. तर उलट शिवराज्य आल्याचे पाहून रामदासांना "आनंदवनभूवनी" दिसले आणि संभाजीस चार शब्द सुनावताना "शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप" असेच म्हणावेसे वाटले. थोडक्यात त्यांच्या डोक्यात देखील "भगवंताच्या अधिष्ठाना"चा अर्थ वेगळाच असावा असे म्हणायला जागा आहे. पण दुर्दैवाने नंतर जनता नुसतीच भगवंताच्या अधिष्ठानाच्या मागे लागली आणि जपमाळा ओढत बसू लागली. त्या संदर्भात लोकजागृतीच्या उद्देशाने ज्ञानेश्वरच नाही तर कृष्णाची द्वारका बुडणे, येशूला क्रुसिफाय करणे, मदीनेच्या मशिदीची घोडशाळा बनणे, जेहोवांचे सुवर्णमंदीर भंगणे अशा अनेक ऐतिहासिक दाखले देत सावरकर शेवटी म्हणतातः
दुद्रैवाने आज एकीकडे नको इतकी अंधश्रद्धा दिसत आहे तर दुसरीकडे स्वागतार्ह असे वैज्ञानिक वारे पण देशात वाहताना दिसते. तरी देखील या दोन्हीच्या मधे देशाची अवस्था - संरक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण वगैरे वगैरेच्या विचारात निराशाजनकच दिसते. कारण सामर्थ्य देखील नाही आणि चळवळ देखील नाही, एखाद्या अण्णांचा अपवाद सोडला तर...
असो.
+१
सन्तुलित आणि विचाराना योग्य दिशा देणारा प्रतिसाद.
वाच्यार्थ, रूढार्थ, भावार्थ, मतितार्थ
हे अति-अवान्तर होणार आहे पण प्रसंगोपात्त असल्यामुळे करतो.
'मतितार्थ' ह्याच्याऐवजी 'मथितार्थ' असे हवे. अंतःकाल, अंधःकार, धूम्रपान ह्यासारखाच हाहि एक अंगवळणी पडलेला अयोग्य उच्चार आहे.
(हा प्रतिसाद येथेच असायला हवा होता, तो चुकून खाली पडल्यामुळे येथे पुनः देत आहे.)
झुडुप झोडपणी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विकास यांनी लिहिले:"श्री. यनावालांच्या इतर सर्व लेखनाप्रमाणेच या लेखनातूनही भक्तीमार्ग, धर्म, वगैरे मुळे कसे सगळे चुकते हे दाखवताना ज्ञानेश्वरांमुळेच जणू काही देवगिरीचे साम्राज्य बुडाले असे म्हणले गेले आहे."
यावर मी लिहिले:"हा समज पूर्णतया चुकीचा आहे. असे दूरान्वयानेसुद्धा लेखात कुठेही म्हटलेले नाही अथवा सुचवलेले नाही. आपल्याला वाटेल तो समज करून घेणे आणि तदनुसार प्रतिसाद लिहिणे अशोभनीय आहे."
.
आता श्री विकास यांना जर आपल्या मुद्याचे(उपरिनिर्दिष्ट) समर्थन कारायचे असेल तर त्यांनी मूळ लेखातील असा भाग/वाक्य समूह/वाक्यांश निदर्शनाला आणून द्यायला हवा की जो वाचून त्यांनी वरील निष्कर्ष काढला.हे तर्काला धरून झाले असते. पण ते पूर्णतया टाळून त्यांनी जो नवा प्रतिसाद लिहिला तो म्हणजे मुख्य मुद्दा बाजूल टाकून उगीचच इकडे तिकडे केलेली झुडूप झोडपणी आहे.बरेचसे अवांतरच आहे.
झुडूप झोडपणी
हे श्री.विकास ह्यांना बर्याच जणांनी सांगुन झालेले आहे. (हिंदू कोण? वगैरे चर्चांमधे) तरीही श्री. विकास हे थेट (टू द पॉइंट) सहसा लिहित नाहीत असे एक निरिक्षण आहे. त्यामुळे तुमच्या मागणीप्रमाणे तर्काला धरुन प्रतिसाद येणे इथे तरी शक्य वाटत नाही.
व्यक्तीगत
हे श्री.विकास ह्यांना बर्याच जणांनी सांगुन झालेले आहे. (हिंदू कोण? वगैरे चर्चांमधे) तरीही श्री. विकास हे थेट (टू द पॉइंट) सहसा लिहित नाहीत असे एक निरिक्षण आहे. त्यामुळे तुमच्या मागणीप्रमाणे तर्काला धरुन प्रतिसाद येणे इथे तरी शक्य वाटत नाही.
ह्या प्रतिसादात मुळ चर्चाविषयाविषयी अथवा त्यात मी केलेल्या भाष्याविषयी काही न लिहीता असंबद्ध संदर्भ देत निष्कर्ष काढत केवळ व्यक्तीगत लिहीले गेले आहे, याची येथे नोंद करत आहे. (विशेष म्हणजे ज्या "हिंदू कोण" असे नाव घेत चर्चा म्हणले आहे त्या बहुतेक करून माझ्या या चर्चेच्या मध्ये किमान पक्षी या आयडी कडून भाग देखील घेतलेला नव्हता!)
पुन्हा अमान्य
ह्या प्रतिसादात व्यक्तिगत काही नाही. यनावाला ह्यांनी चर्चेला धरुन केलेल्या निरिक्षणास मी सहमती दाखवुन त्यांना माझे निरिक्षण सांगितले आहे.
आणि तुम्ही टू द पाँइंट लिहित नाही हे कळायला तुमच्या प्रत्येक चर्चेत सहभाग कशाला घ्यायला लागतो?
व्यक्तिगत?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जे लेखन सर्वांच्या वाचनासाठी मुक्त असते (सशुल्क वा विनामूल्य) त्यावर टीका टिप्पणी /मतप्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक वाचकाला असते.
समजा श्री. आमोद शिंदे यांनी लिहिले असते ;( माफ करा हं ); " ते विकासराव ना? असेच आहेत.त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्यांची हीच तक्रार असते.काही विचारले तर ते खूप सांगतात.पण शंकेचे नेमेके उत्तर त्यांतून कळत नाही." तर ती व्यक्तिगत टीका म्हणता आली असती.
विवेकवाद
समजा श्री. आमोद शिंदे यांनी लिहिले असते ;( माफ करा हं ); " ते विकासराव ना? असेच आहेत.त्यांच्या कार्यालयीन कर्मचार्यांची हीच तक्रार असते.काही विचारले तर ते खूप सांगतात.पण शंकेचे नेमेके उत्तर त्यांतून कळत नाही." तर ती व्यक्तिगत टीका म्हणता आली असती.
चर्चाविषयासंदर्भात आपले मुद्दे कसे मांडावेत याबाबतचा आपल्याला अपेक्षित असलेला विवेकवाद आपल्या प्रतिसादातून समजला. :-)
रोचक विरोधाभास
सावरकरांनी ज्ञानेश्वरांना देवगिरीच्या राजाला मुसलमानी परचक्राबदल सावध केले नाही म्हणून दोष दिला आहे. आता "आपले" विचारवंत महात्मा जोतिराव फुल्यांचे पुढील वाक्य बघा "ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज हे दोघे भोंदू साधु होते कारण त्यांनी इथल्या सामान्य लोकांना मुसलमानी आक्रमकांविरुद्ध लढायला प्रवृत्त करून महाराष्ट्रात येऊ पाहणारे पवित्र महंमदी पाऊल थोपवले (अडवले)."
माझे मत असे की ज्ञानेश्वरांवर टीका करण्याच्या बाबतीत सावरकर आणि फुले दोघेही भोंदू आहेत.
निबंधाचा विषय
>>माझे मत असे की ज्ञानेश्वरांवर टीका करण्याच्या बाबतीत सावरकर आणि फुले दोघेही भोंदू आहेत.
सहमत आहे.
पण भोंदू म्हणण्याबाबत थोडा खुलासा करतो. ज्यामुळे सावरकरांचे हे लिखाण योग्य पर्स्पेक्टिव्हमध्ये दिसण्यास मदत होईल.
सावरकरांनी सदर युक्तिवाद विज्ञाननिष्ठ निबंधांमध्ये "साधुसंतांचे बोलपट कसे पहावे" या निबंधात केला आहे. (हे लेखन दूरान्वयानेही इतिहासलेखन नाही आणि सावरकरांचाही तसा क्लेम नाही). त्यात ज्ञानेश्वर (किंवा इतर संत) चमत्कार करत किंवा कसे याचा उहापोह करताना "खरेच या संतांना सिद्धी प्राप्त असती तर....." अशा प्रकारचा युक्तिवाद आहे. त्यात ज्ञानेश्वरांनी रामदेवरायास सावध केले नाही असा आरोप वगैरे केलेला नाही. किंवा 'रामदेवरायांच्या पराभवाची कारणे' सांगताना हे कारण म्हणून सांगितलेले नाही. तर अशी सिद्धी कोणाला प्राप्त नसते; तशीच ज्ञानेश्वरांनाही नव्हती असे प्रतिपादन आहे.
त्याच निबंधात पुढे रामदास स्वामींविषयी अशाच स्वरूपाचे लेखन आहे. रामदासांनी कुणा मृतास योगसामर्थ्याने चितेवरून उठवले या घटनेस अनुसरून 'त्यांनी शिवाजी महाराजांना का उठवले नाही?' असा प्रश्न केला आहे. निबंधाचा विषय भाविक वाचतात/मानतात ती संतांची चरित्रे हा आहे.
नितिन थत्ते
विज्ञाननिष्ठ निबंध
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अल्लाउद्दिन खिलजीच्या देवगिरीवरील आक्रमणाच्या संदर्भात स्वा.सावरकर यांनी काय लिहिले आहे ते येथे पृ.क्र. १७ आणि १८ वर वाचावे.
विज्ञाननिष्ठ
निबंध अलमोष्ट पाठ आहेत. तसाही तो दुवा उघडत नाहीये.
नितिन थत्ते
पृ.१७ येते
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
@नितिन थत्ते
..
येथेवर टिचकी मारून पाहिली.थेट पृ.१७ येते.त्यावरील "हाय हाय! काय दुष्ट योगायोग पाहा ...पासून पृ.१८ शेवटपर्यंत वाचावे.हे निबंध संत महात्म्यांवरील चित्रपट कसे पाहावे या संबंधी लिहिले आहेत असे वाटत नाही. एखाद्या निबंधात संतपटाचा उल्लेख असेल.
:(
दुवा माझ्याकडे अजुनही उघडत नाही. मी वाचलेले विज्ञाननिष्ठ निबंध कागदी पुस्तकात आहेत. त्यात साधुसंतांचे बोलपट कसे पहावे अशा शीर्षकाचा निबंध आहे. त्यात चित्रपटांबरोबरच संतांच्या चरित्रांमधले अवास्तव दावे वगैरे विषय आहेत.
निबंध पाठ आहेत याचा अर्थ कोणत्या विषयात काय युक्तिवाद केलेला आहे हे डोक्यात पक्के बसलेले आहे.
नितिन थत्ते
ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?
हा भाग त्यांच्या "ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?" या लेखा मध्ये आहे. (हा दुवा पीडीएफचा आहे)
कृपया संदर्भ द्यावा.
विनायकजी,
फुले यांनी हे वाक्य केंव्हा, कुठल्या संदर्भात म्हटले आहे त्याचा संदर्भ द्यावा यांना नम्र विनंती. तसेच आपण महात्मा फुले यांना विचारवंत मानत नाही का? त्यांना त्यांचे विचारवंत असे म्हणण्यामागे काय आहे?
-स्वधर्म
संदर्भ
जोतिराव फुले समग्र वाङ्मयात हे वाक्य पूर्वी वाचले होत. सध्या माझ्याकडॅ ते पुस्तक नाही. पण यापूर्वीही एका चर्चेत वाक्य मी उद्धृत केले असताना काही लोकांनी संदर्भाची मागणी केले होती आणी त्यावेळी श्री. धनंजय यांनी संदर्भ तपासून माझे वाक्य बरोबर असल्याचे सांगितले होते. ती चर्चा इथे वाचता येईल.
यनावालांचा मुद्दा
मी वरील प्रतिसादांमध्ये यनावालांनी ज्ञानेश्वरांना दोष दिला आहे, त्यांचे ऐतिहासिक कार्य लक्षात न घेता त्यांना भलत्याच जबाबदारीत अडकवून ते त्यांनी केले नाही, असे म्हणून त्यांचे अवमूल्यन केले आहे, असे म्हटले आहे. मला वाटते यनावालांना थोडा संशयाचा फायदा मिळायला हवा. असे म्हणायचे आहे का, की ज्ञानेश्वर खरेच महान संत होते, आणिशक्य असते तर् त्यांनी आपल्या सिद्धी वापरल्याच असत्या, आणि ज्याअर्थी त्यांनी त्या वापरल्या नाहीत, त्याअर्थी त्यांच्याकडे अशा सिद्धी नव्हत्या, आणि कुणाकडेच नसतात.
असे जरी यनावालांचे म्हणणे असेल, तरी ते चूकच आहे. काही प्रतिसादकांनी हे ध्यानात आणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण ते यनावाला खुल्या मनाने ऐकून घ्यायला तयार नाहीत असे दिसते. संत सिद्धी वापरत नाहीत म्हणजे त्या नाहीत असे म्हणणे म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन केल्याशिवाय मी मानणार नाही एवढाच त्याचा अर्थ होतो. तुमच्या समाधानासाठी त्यांनी असे प्रदर्शन करावे ही हास्यास्पद अपेक्षा आहे. असो. तो वेगळा मुद्दा होतो.
कुठलेही प्रमाण नसल्याने सिद्धींवर माझा विश्वास नाही, असे साधे सरळ विधान मांडण्यासाठी चुकीचे ऐतिहासिक दाखले देणे, यातून आपल्या एकांगी विचारसरणीचे प्रदर्शन होते, बाकी काही नाही. शब्दप्रामाण्य मानणारे लोक आपल्या या असल्या तर्कशास्त्राला स्वीकारणार नाहीत, त्यामुळे आपला खटाटोप व्यर्थ आहे.
चमत्कार सामर्थ्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आ_रा. लिहितात,:"संत सिद्धी वापरत नाहीत म्हणजे त्या नाहीत असे म्हणणे म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन केल्याशिवाय मी मानणार नाही एवढाच त्याचा अर्थ होतो."
.
माझे मत असे आहे की ज्यात निसर्ग नियमाचे उल्लंघन होईल असा कोणताही चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वी कोणी केलेला नाही.हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे हाच लेखाचा उद्देश आहे.
आमच्या सहनिवासातील (सोसायटीतील) आबा काणे नित्य नेमाने ध्यान धारणा करतात.ते उद्या म्हणाले की त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अदृश्य होणे, पाण्यावरून(ते कितीही खोल असले तरी) चालत जाणे असे चमत्कार ते सहज् करू शकतात.मात्र असा कोणताही चमत्कार ते कोणालाही कधीही करून दाखवणार नाहीत.तर त्यांचे चमत्कार सामर्थ्य खरे मानायचे का?
अट्टाहास
एकएक करुन प्रतिसाद देतो.
नका मानू खरे. काय फरक पडतो? कुणी खरे मानले तरी काय फरक पडतो? हे दावे खोटे आहेत हे सांगायचा आटापिटा कशासाठी?
माझेही असेच मत आहे. फक्त थोडा फरक आहे. आपल्याला अजून माहीत न झालेले काही निसर्ग नियम असू शकतात असे मानण्याचा नम्रपणा माझ्यात आहे. अशा अजून माहीत न झालेल्या निसर्गनियमांचे उदाहरण हे चमत्कारासम वाटू शकते.
उद्देश समजला. प्रामाणिक उद्देश आहे हे पटले. पण असा उद्देश असण्याचे कारण समजले नाही. आणि ज्या पद्धतीने आपला उद्देश तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहात ती पद्धत चुकीची आहे असे माझे मत आहे. या अशा पद्धतीने आपला उद्देश कधीही तडीस जाणार नाही. म्हणूनच मी 'आपला खटाटोप व्यर्थ आहे,' असे म्हणालो. आपण ज्या पद्धतीने हे आपले मत पटवण्याचा प्रयत्न करीत आहात, ती पद्धत अशी आहे की त्यातून आपला बौद्धिक अहंकार व्यक्त होतो. देव/ अध्यात्म/ चमत्कार इ. मानणारे मूर्ख असतात असे काहीसे ध्वनित होते. आता ज्या टारगेट ऑडियन्सला तुम्ही हे ऐकवत आहात, ते कशाला असले पटवून घेतील? बरं, जे दाखले देताय तेही इतिहासाला धरुन नाहीत, सहज खोडून काढता येण्यासारखे आहेत.
ज्या गोष्टींवर विश्वास ठेवल्याने समाजाची हानी होते असे आपण मानता, ते मला मान्य नाही. असे विश्वास मोठ्या प्रमाणावर असताना, जगातील सर्वच समाजांची, प्रगतीही झालेली आहे, आणि अधोगतीही झालेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. तुमच्या म्हणण्याचे इम्प्लिकेशन असे आहे, की जगातून हे विश्वास हद्दपार झाले की जग एकदम सुखी, न्यायी, इत्यादि होईल, कारण जगातील अधिकतम समस्यांना हे असले विश्वासच कारणीभूत आहेत. तर हे असे काही नाही असे माझे मत आहे. हे असले विश्वास असल्याने जगाचे काहीही बिघडत नाही. असे विश्वास नसल्यानेही फारसा फरक पडत नाही. राहता राहिला अशा विश्वासू/ भाविक लोकांच्या फसवणुकीचा प्रश्न. तर असले विश्वास नसणार्या लोकांची कधीच कुठल्याच बाबतीत फसवणूक होत नाही असेही नाही. तेही कुठेतरी फसू शकतातच. धार्मिक बाबाच्या नादाला नसतील लागत, दुसर्या कसल्यातरी मृगजळाच्या मागे लागतील. तर या फसवणुकीच्या प्रश्नाचा देव/ अध्यात्म/ सिद्धी यांच्यावरील विश्वासाशी काही संबंध नाही. विवेकी माणूस सश्रद्धही असू शकतो, अश्रद्धही असू शकतो. आणि मूर्ख माणूस सश्रद्ध असू शकतो, अश्रद्धही असू शकतो. (आपण जग बदलू शकतो असे एखाद्या अश्रद्ध माणसाला वाटले तर तो माझ्या मते मूर्खपणा आहे.)
तुम्हाला काही गोष्टी पटत नाहीत त्या दुसर्यांवर लादायचा अट्टाहास कशासाठी?
+१
विवेकवादावर अश्रद्ध आणि नास्तिक लोकान्चा जणू स्वामीत्वहक्क आहे असा विचार करणे आणि तसे उघडपणे/ अप्रत्यक्षपणे ध्वनित करत राहणे हा एक प्रकारचा अविवेकच आहे.
उपयुक्त लेख व चर्चा...
यनावाला,धम्मकलाडू,ऋषिकेश, आळश्यांचा राजा,मूकवाचक, आजूनकोनमी,विकास, नितीन थत्ते,Nile,धनंजय,विनायक गोरे, राही,प्रियाली ह्या सर्वाशी एकाचवेळी सहमत! :)
--मनोबा
+१
मी फक्त मनोबाशी सहमत. ;)
यनावालांनी वर लिहिलेल्या ओव्यांबद्दल मी (वेळ मिळताच) काही माहिती देऊ इच्छितो.
वाच्यार्थ, रूढार्थ, भावार्थ, मतितार्थ
हे अति-अवान्तर होणार आहे पण प्रसंगोपात्त असल्यामुळे करतो.
'मतितार्थ' ह्याच्याऐवजी 'मथितार्थ' असे हवे. अंतःकाल, अंधःकार, धूम्रपान ह्यासारखाच हाहि एक अंगवळणी पडलेला अयोग्य उच्चार आहे.
वडाची साल पिंपळाला
श्री. यनावाला म्हणतातः आता श्री विकास यांना जर आपल्या मुद्याचे(उपरिनिर्दिष्ट) समर्थन कारायचे असेल तर त्यांनी मूळ लेखातील असा भाग/वाक्य समूह/वाक्यांश निदर्शनाला आणून द्यायला हवा की जो वाचून त्यांनी वरील निष्कर्ष काढला.हे तर्काला धरून झाले असते. पण ते पूर्णतया टाळून त्यांनी जो नवा प्रतिसाद लिहिला तो म्हणजे मुख्य मुद्दा बाजूल टाकून उगीचच इकडे तिकडे केलेली झुडूप झोडपणी आहे.बरेचसे अवांतरच आहे.
मला वाटते त्यांचा आक्षेप हा मी, "...भक्तीमार्ग, धर्म, वगैरे मुळे कसे सगळे चुकते हे दाखवताना ज्ञानेश्वरांमुळेच जणू काही देवगिरीचे साम्राज्य बुडाले असे म्हणले गेले आहे" असे जे म्हणले त्याच्याशी आहे. ते पुढे असे देखील म्हणतात की, "असे दूरान्वयानेसुद्धा लेखात कुठेही म्हटलेले नाही अथवा सुचवलेले नाही."
मात्र त्यांचा हा खुलासा पटण्यासारखा नाही. त्याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम ज्ञानेश्वरांचे कार्य हे धर्म संकल्पनेचा वापर करून समाजाशी निगडीत होते. त्यासाठी त्यांनी भक्तीमार्गाचा पाया घातला (ज्ञानदेवे रचीला पाया) असे म्हणले तर ती अतिशयोक्ती नाही. थोडक्यात धर्माचा अणि भक्तीचा संदर्भ होता. आता जर श्री. यनावालांना केवळ त्यांनी इतरत्र प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, "योगसाधनेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यांच्यायोगे अनेक चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.तसा समजही रूढ आहे.हा दावा तथ्यहीन आहे. निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वीही कोणी केले नाहीत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे हा लेखाचा विषय आहे.त्यासाठी दिलेले ऐतिहासिक आधार सत्य आहेत", असेच म्हणायचे असते तर संपूर्ण लेख हा ज्ञानेश्वरांच्या एकाच उदाहरणावर राहीला नसता. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून ते आजच्या काळातही अनेक उदाहरणे मिळतील ज्यात कोणी तरी अष्टसिद्धी प्राप्त झाल्या असे म्हणलेले सापडेल आणि त्यावर टिपण्णी करता आली असती...
पण वर इतरांनी म्हणल्याप्रमाणे सावरकरांनी मांडलेले स्थलकालसापेक्ष उदाहरण येथे देत केवळ ज्ञानेश्वर हाच मुद्दा केल्याचे जाणवले. बरं त्याच उदाहरणावरून जायचे म्हणले तर मग इस्लामी आक्रमणे सफल होण्याचे कारण काय विज्ञानवाद होता, आक्रमक हे धार्मिक नव्हते असे म्हणायचे आहे का?
त्या व्यतिरीक्त जर श्री. यनावाला म्हणतात तसे त्यांचा उद्देश हा ज्ञानेश्वर, धर्म, भक्ती यांच्यावर टिका करायचा नसला तर ज्ञानेश्वरांचे अध्यात्मिक असणे, तसेच धर्म, भक्ती वगैरे हे किमान इतरांनी मानण्यावर त्यांचा आ़क्षेप नाही असे समजावे का, हे त्यांनी स्पष्ट केले तर बरे होईल.
थोडक्यात वडाची साल पिंपळाला लावून नको तेथे समाज प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न वाटला. कदाचीत तो श्री. यनावाला म्हणत असल्याप्रमाणे, त्यांच्या बुद्धीला पटत असेलही. पण त्याचा अर्थ इतरांच्या बुद्धीस तो पटेलच असे नाही आणि त्यातील फोलपणा जाणवणारच नाही असे देखील नाही.
ताट-पाट प्रकरण
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कांही सदस्यांनी ताटा-पाटाविषयी काही लिहिले आहे.म्हणजे बसायला पाट द्यावा पण भरलेले ताट देऊ नये.इत्यादि.
.
त्याकाळींही गरिबी होतीच. मग " योगिराजांनी सिद्धींच्या योगे गरिबांना काही लाभ का मिळवून दिला नाही?" असे ''चालविली भिंती.." या लेखात कुठे एका शब्दाने तरी म्हटले आहे का? वाच्यार्थाने सोडा लक्षणार्थाने तरी सुचवले आहे का? नाही ना? मग कांही विचार न करता मनात येईल ते गृहीत धरून कळफलक बडवून ताट-पाट,ताट-पाट लिहिण्यात काय अर्थ आहे ?
मूळ लेखापासूनच सुरूवात होते.
जे काम लष्कराने, गुप्तहेर खात्याने आणि सत्ताधीशाने करायचे ते कुणा योगिराजाने फुकटात करू दिले नाही, यास्तव त्याच्याकडे सिद्धीच नाहीत असे लिहीण्याला आणि विषण्ण, विमनस्क मनोदशेपायी 'सन्जीवन समाधी' घेता येते असले काहीतरी लिहीण्याला मी मनात येईल ते गृहीत धरून कळफलक बडवणे असेच समजतो. असो.
विज्ञान आणि चमत्कार ग्रंथात वुद्धिवाद्यांच्या मताचे खंडन
मित्र हो,
तेच प्रतिपादन प्रा. अद्वायानंद गळतगे आपल्या 'विज्ञान आणि चमत्कार' ग्रंथात सडेतोडपणे म्हणतात.
ग्रंथपरीक्षण येय़े वाचायला मिळेल.
संपुर्ण ग्रंथ विज्ञान आणि चमत्कार भाग १ आणि विज्ञान आणि चमत्कार भाग २ वाचा. त्यात बुद्धिवाद्यांच्या विचारांचे संपुर्ण खंडन सडेतोडपणे केले आहे. त्यातच भाग २ च्या २५१ पानावर संत ज्ञानेश्वरांच्या भिंत चालवण्याच्या चमत्काराचे स्पष्टीकरण दिले आहे.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
डिस्क्लेमर
श्री ओक यांनी उल्लेख केलेले पुस्तक मी वाचलेले नाही. त्यामुळे त्यातील मते मला मान्य किंवा अमान्य असण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
जाम भारी पुस्तक आहे
बाकीचं सर्व जौ द्या! गळतगेंचे पुस्तक वाचण्यात माझी शुक्रवारची संध्याकाळ* एकदम मस्त गेली. जाम डेंजर/ लय भारी/ टेरर पुस्तक आहे. ;-) असा टैम पास बरेच दिवस झाला नव्हता.
* शुक्रवारी संध्याकाळी डोक्याला कोणताही ताप लावून घ्यायचा नसतो असे साधे गणित आहे.
एक प्रश्न
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
आपल्याला सर्व निसर्गनियम ठाऊक आहेत असा दावा आपण करू शकतो का?
.
अज्ञात निसर्गनियम
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद कोर्डे म्हणतात,"आपल्याला सर्व निसर्गनियम ठाऊक आहेत असा दावा आपण करू शकतो का?"
नाही.असा दावा नाही.पण ज्ञात वा अज्ञात अशा कोणत्याही निसर्ग नियमाचे उल्लंघन कोणीही करू शकत नाही असे म्हणणे आहे.
.काही कल्पना लढवून कोणी असा नियम सांगावा जो विज्ञानाला अद्यापि अज्ञात आहे.मला तरी काही सुचत नाही.
.फुलाचा रंग निसर्गतः पिवळा असेल तर योगसामर्थ्याने तो कोणीही लाल करू शकणार नाही.हे विज्ञानाच्या पुस्तकात लिहिलेले नसेल.पण आपल्याला कॉमनसेन्सने समजते.
.अष्टसिद्धींविषयी जे विवरण दिले आहे त्यावरून प्रत्येक सिद्धिचमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघनच आहे.ते होऊ शकत नाही.
>"अणुपासोनि ब्रह्मांडा एव्हढा होत जातसे"(अणिमा-गरिमा सिद्धी).ही केवळ कविकल्पना आहे.
> अहिल्येची शिळा करणे, झोळीतील टरबुजाचे धडावेगळे झालेले, रक्त ठिबकणारे मानवी शीर करणे(शनिमाहात्म्य) ,बाईचे रूपांतर मांजरीत करणे(हॅरी पॉटर) असे चमत्कार अशक्य कोटीतील आहेत.
.थोडक्यात म्हणजे दिव्य,अलौकिक,अतिमानवी अशी शक्ती कोणाकडेही नाही.पूर्वीही नव्हती. आश्चर्यकारक वाटणार्या ज्या ज्या गोष्टी माणसाला करता येतात त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येते.(उदा.उंच जागेवरून पाण्यात सूर मारताना हवेतल्या हवेत कोलांटी घेणे.)