चालविली भिंती मृत्तिकेची

" सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का?"
.
"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."
.
"नामदेवांनी--ज्ञानराज माझी योग्यांची माऊली--असे म्हटले आहे.म्हणजे ज्ञानेश्वर सिद्धयोगी होते.रेड्याच्या मुखातून वेदमंत्र वदविणे,भिंत चालविणे असे चमत्कार त्यांनी केले नसतील काय?"
.
"ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात जे विवेचन केले आहे त्यावरून त्यांना योगमार्गाचे परिपूर्ण ज्ञान होते हे स्पष्ट आहे.त्यांची असामान्य बुद्धिमत्ता,अलौकिक काव्यप्रतिभा,अद्वितीय शब्दप्रभुत्व यांविषयी दुमत नाही.त्यासाठी ज्ञानेश्वरी हे प्रमाण आहे."
.
"मग त्यांनी वरील चमत्कार केले असे मानण्यात काय चूक आहे?"
.
"गणेशमूर्ती दूध पिऊ शकत नाही तद्वतच भिंत चालू शकत नाही, हे कॉमनसेन्सने समजते. या गोष्टी निर्जीव आहेत.रस्त्यावरून पळणारे स्वयंचलित वाहन निर्जीव असले तरी त्यांत इंजीन असते. तिथे इंधनाचे ज्वलन होऊन त्या ऊर्जेवर वाहन पळते. योगसाधनेमुळे निर्जीव वस्तूंना चालविता येते हे अद्यापि कोणीही सिद्ध केलेले नाही. तसे असते तर वैज्ञानिकांनी त्याची दखल घेतलीच असती."
.
"पण योगसाधनेने अष्टसिद्धी प्राप्‍त होतात ना?"
.
"--अणिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा । प्राप्‍ति: प्राकाम्यमीशत्वं वशित्वं चाष्ट सिद्धय:।---त्या प्राप्‍त झाल्यास चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.मात्र चमत्कार केल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा नाही."
.
"अष्टसिद्धी प्राप्‍त झाल्या तरी त्यांचा वापर करू नये असा दंडक आहे. कारण योगसाधनेचे अंतिम उद्दिष्ट मोक्ष हे आहे. सिद्धिप्राप्‍ती हे नव्हे."
.
"म्हणजे सिद्धी प्राप्‍त झाल्या याची चाचणी घ्यायचीच नाही का? आपण यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पायर्‍या ओलांडल्या म्हणजे अष्टसिद्धी मिळाल्या असे गृहीत धरायचे का?"
.
"तसे नव्हे.सिद्धींचा उपयोग स्वार्थासाठी,प्रसिद्धीसाठी करू नये असे म्हटले आहे."
.
"आता आपण ऐतिहासिक सत्य घटना पाहू.ज्ञानेश्वरीत म्हटले आहे--शके बाराशे बारोत्तरे टीका रचिली ज्ञानेश्वरे---शके १२१२ त ७८ मिळ्वून इ.स.१२९० हा ज्ञानेश्वरी रचनेचा काळ.त्यावेळी रामदेवराय यादव याचे राज्य होते.त्याचाही उल्लेख --तेथ यदुवंशविलासु। जो सकलकला निवासु न्यायाते पोषी क्षितिशु रामचंद्रु।---असा आहे. इ.स.१२९४ मध्ये अल्लाद्दिन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केले.त्या संदर्भात स्वा.सावरकर लिहितात---अल्लाउद्दिन खिलजी अवघ्या पंधराहजार सैन्यानिशी कोट्यवधी हिंदूंनी गजबजलेल्या दक्षिणेत,बकर्‍यांच्या कळपात लांडगा शिरावा तसा, घुसला. देवगिरीवर चढाई केली.रामदेवराय यादवाच्या अफाट हिंदूसेनेचा त्या यवनाने चक्काचूर केला. हिंदुराज्य बुडविले. ते परत स्थापू पाहाणार्‍या परमशूर शंकरदेव यादवाला जिते पकडून अंगाचे कातडे सोलून ठार मारले.
त्यावेळी ज्ञानेश्वरांपुढे अष्टसिद्धी हात जोडून उभ्या होत्या. तरी राज्यावर परचक्र येत आहे अशी सूचना ते राजास देऊ शकले नाहीत. त्यांनी निर्जीव भिंत चालविली.पण खिलजीचा मार्ग रोखण्यासाठी काही करू शकले नाहीत.---
याच संदर्भात प्रा.द.के.केळकर, बुद्धिवादाचा ध्रुवतारा या पुस्तकात लिहितात--अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी इ.स.१२९४ तली.त्याकाळी ज्ञानेश्वर होते.तसेच चांगदेव आणि त्याचे अष्टसिद्धिप्रशिक्षित सव्वाशे शिष्य होते. त्यांच्या नावांची यादीच दिली आहे. पण आक्रमणाविषयी बेसावध असलेल्या रामदेवरायाला कोणीही जागे केले नाही. इस्लामी आक्रमणाच्या वेळी हे सर्व योगिराज खाली माना घालून का बसले होते?--यावरून अष्टसिद्धींचे चमत्कार केवळ ग्रंथात लिहिण्यापुरतेच आहेत हे स्पष्ट होते."
.
"हा इतिहास मला ठाऊक नव्हता.योगी चमत्कार करू शकतात यावर माझी श्रद्धा होती."
.
"रामदेवरायावरील विजयाने उन्मत्त झालेल्या यावनी सेनेने देवगिरीच्या हिंदूप्रजेवर किती अनन्वित अत्याचार केले असतील ते आपण कल्पनेने जाणू शकतो. तो जनआक्रोश ज्ञानेश्वरांच्या कानी गेला असेल.त्यांचे वय तेव्हा १८/१९ वर्षे होते.त्यांनी मनोविजय मिळविला असला तरी ते संवेदनशील होतेच. त्यांना किती विषाद वाटला असेल? किती खिन्नता आली असेल! आपण काहीच करू शकलो नाही. जो परब्रह्म परमात्मा भगवान् श्रीकृष्ण तोही आपल्या यदुवंशातील राजाला आणि त्याच्या प्रजेला वाचवू शकला नाही. अन्यायाने आक्रमण करणारा क्रूरकर्मा विजयी आणि --न्यायातें पोषी क्षितिशु। असा राजा पराभूत! मग जगन्नियंत्या ईश्वराला न्यायी कसे म्हणावे ? अशा विषण्ण विमनस्क अवस्थेत त्यांनी संजीवनी समाधीचा (इ.स.१२९६) निर्णय घेतला असेल का ? असा एक विचार मनात येतो."
.
"सात शतकांपूर्वी काय कशामुळे घडले याची आपण केवळ कल्पना करायची. दुसरे काय? तुम्ही जे शेवटी सांगितले ते मात्र पटत नाही. अलौकिक व्यक्तींना सर्वसामान्यांच्या पंक्तीत बसवू नये."
.
"ठीक आहे. मनात आलेला विचार बोललो एवढेच."

लेखनविषय: दुवे:

Comments

बिनतोड

संवाद भारी आहे. स्वा. सावरकर आणि प्रा. केळकर ह्यांची मते पटण्यासारखीच आहेत. बिनतोड. इतर प्रतिसादांची वाट पाहात आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

योग्य असा घाला

सावरकरांच्या दाखल्याने ज्ञानेश्वरांच्या (तथाकथित) चमत्कारांवर (योग्य असा) घाला घातल्याचे बघुन अंमळ आनंदही झाला आणि तथाकथित 'हिंदू श्रद्धावंतां'च्या प्रतिक्रीयेबद्दल उत्सुकताही जागी झाली :)

कोणी आहे का 'ज्ञानेश्वर'वादी हे सिद्ध करू शकणारा की त्यांनी भिंत चालवली होती? नसल्यास त्यांच्या पोकळ बातांकडे का लक्ष द्यावे?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

एक दुरुस्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*लेखात "तसेच चांगदेव आणि त्याचे अष्टसिद्धिप्रशिक्षित सव्वाशे शिष्य होते. "
त्यातील अष्टसिद्धिप्रशिक्षित हा शब्दप्रयोग कंसात घालायला हवा होता.कारण तो प्रा.द.के.केळकर यांनी योजलेला नाही.लिहिता लिहिता मला वाटले म्हणून तो टाकला.
*स्वा.सावरकर यांचे विचार दिले आहेत ते आंतरजालावर "विज्ञाननिष्ठ निबंध" पृष्ठ १७ वर आहेत.

सिद्धीप्रशिक्षण

सिद्धी प्राप्त होतात. त्यांचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अष्टसिद्धिप्रशिक्षित हा शब्दप्रयोग योग्य वाटत नाही.

योगशिक्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"सिद्धी प्राप्त होतात. त्यांचे प्रशिक्षण दिले जात नाही." असे श्री.आ_रा म्हणतात ते ठीक आहे.
पण त्यासाठी योगमार्गाच्या यम,नियम,आसन,प्राणायाम,प्रत्याहार,धरणा,ध्यान आणि समाधी या आठ पायर्‍या ओलांडाव्या लागतात. त्याकरिता गुरूच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागते.

थोडी भर

आठ पायर्या .. हे ही पूर्णपणे बरोबर नाही. तो हटयोगमार्ग. त्या शिवाय अन्य योगमार्ग आहेत. शिवाय अन्य अध्यात्मिक मार्गातही (उदा. भक्ती, अजपा जप, नामस्मरण, शक्तीपात इ.) सिद्धी , अतीन्द्रिय अनुभूती, अतिमानस प्रचिती वगैरे मिळू शकतात अशी उदाहरणे सन्त साहित्यात आहेत.

उदा. भक्ती (योगसुखाचे सोहळे, सेवका तुझेनी स्नेहाळे, सोहमसिद्धीचे लळे, पाळिसी तू .... असे बाराव्या अध्यायात आहे. या पुढे मन पवनाची खेळणी करून, सतरावियेचे स्तन्य देऊन, अनुहताचा हल्लरू वाजवून शक्ती (कुन्डलिनी) आपल्या बाळाचे कौतुक करते अशा अर्थाचा विस्तार आहे. प. पू. बाबा महाराज आर्वीकर - दिव्यामृतधारा ही या अध्यायावरची 'प्रतिपद टीका' हे अलीकडच्या काळातील एक मोलाचे स्वानुभवसिद्ध सिद्धभाष्य आहे. हा सगळा शास्त्रीय सन्गीतासारखाच श्रद्धेने, निष्ठेने आणि गुरूपदिष्ट होऊन अभ्यासण्याचा आणि आणि निव्वळ तात्विक पातळीवरही पुरेपूर आकळण्यासाठी एखादा जन्म अपुरा पडावा असा विषय आहे. असो.

कचरा

शिवाय अन्य अध्यात्मिक मार्गातही (उदा. भक्ती, अजपा जप, नामस्मरण, शक्तीपात इ.) सिद्धी , अतीन्द्रिय अनुभूती, अतिमानस प्रचिती वगैरे मिळू शकतात अशी उदाहरणे सन्त साहित्यात आहेत.

ज्या साहित्यात असे उल्लेख आहेत ते सर्व साहित्य कचरा आहे.

श्रद्धेने, निष्ठेने आणि गुरूपदिष्ट होऊन अभ्यासण्याचा आणि आणि निव्वळ तात्विक पातळीवरही पुरेपूर आकळण्यासाठी एखादा जन्म अपुरा पडावा असा विषय आहे. असो.

दर शुक्रवारी रात्री दोन पेग मारुन जपाला बसा सगळे आकळून बाहेर येइल. सगळे बोळे निघतील आणी पाणी वाहते होइल.

धन्यवाद

'टू द पॉइन्ट' कसे लिहावे याचा उत्तम नमुना आहे हा. त्याबद्दल धन्यवाद.

युथिफ्रो ची समस्या?

१. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरीसाठी (तत्सम रचना) पूजले जाते (वय लक्षात घेता), त्या भिंतीची पूजा किंवा दर वर्षी भिंत-उत्सव साजरा केला जात नाही, तेंव्हा ज्ञानेश्वरांवर तलवार व्यक्तिगत नकारात्मक भावनेतून चालाविल्यासारखे वाटते.

२. तुम्ही सावरकरांचा दाखला हिंदुत्ववाद्यांचे तोंड बंद करण्यासाठी वापरला आहे कि तुमचा सावरकरांवर विश्वास आहे म्हणून वापरला आहे? की, फक्त ह्याच बाबतीत तुम्हाला सावरकरांचे विचार पटतात? अर्थात कसेही असल्यास काही गैर नाही, एक शंका म्हणून विचारले.

युथिफ्रो ची समस्या ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न असफल पण स्तुत्य.

लेखाचा विषय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजूनकोणमी यांच्या प्रतिसादाच्या संदर्भातः
*युथिफ्रो च्या समस्येविषयी मी अनभिज्ञ आहे.प्लेटोच्या संवादलेखनाशी (डायलॉग) युथिफ्रोचा संबंध असावा असे वाटते.
*"तलवार चालविणे" हा शब्दप्रयोग इथे अगदी अनुचित आहे.लेखाचा विषय कोणता या विषयी काही गैरसमज झाला असावा असे वाटते.योगसाधनेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यांच्यायोगे अनेक चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.तसा समजही रूढ आहे.हा दावा तथ्यहीन आहे. निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वीही कोणी केले नाहीत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे हा लेखाचा विषय आहे.त्यासाठी दिलेले ऐतिहासिक आधार सत्य आहेत.
*स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "विज्ञाननिष्ठ निबंधात'' मांडलेले विचार मला पटतात. कोणाच्याही आहारी न जाता (प्रभावाखाली न येता)आपल्या बुद्धीला पटेल तेच सत्य मानणे हा विवेकवाद आहे.स्वा.सावरकरांचे विचार या लेखाला पूरक आहेत म्हणून इथे दिले.कुणाची तोंडे बंद करण्याशी संबंध नाही.

खुलासा

युथिफ्रो बद्दल इथे वाचता येईल. "ज्ञानेश्वर चमत्कारी नव्हते हे मान्य करा किंवा चमत्कारी असून स्वार्थी होते हे मान्य करा" अशा प्रकारचा तो युक्तिवाद असू शकेल असे वाटले.

*"तलवार चालविणे" हा शब्दप्रयोग इथे अगदी अनुचित आहे.लेखाचा विषय कोणता या विषयी काही गैरसमज झाला असावा असे वाटते.योगसाधनेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यांच्यायोगे अनेक चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.तसा समजही रूढ आहे.हा दावा तथ्यहीन आहे. निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वीही कोणी केले नाहीत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे हा लेखाचा विषय आहे.त्यासाठी दिलेले ऐतिहासिक आधार सत्य आहेत.

या व पुढील वेळी शब्द तुमच्या शिष्ठाचाराला धरून असतील. (पण बहुदा अनुचित शब्द विज्ञान-निष्ठ लोकांच्या देखील भावना दुखावतात असे दिसते).
चमत्कार होतात हा दावा निरुपद्रवी आहे, होता, निसर्ग नियमाचे उल्लंघन म्हणजे अज्ञात गोष्टींचा शोध असे देखील असू शकते, ज्याला काही लोक प्लेसहोल्डर म्हणतात. ते चमत्कार कोणी करू शकतो का ह्यावर प्रमाण नसताना ठेवलेला विश्वास जोपर्यंत तुम्हाला अकार्यक्षम करत नाही तोपर्यंत श्रद्धा असतो, करत असेल तर अंधश्रद्धा असते. तसे ज्ञानेश्वरांबाबत असलेल्या विचारांमधून होताना दिसत नाही.

*स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "विज्ञाननिष्ठ निबंधात'' मांडलेले विचार मला पटतात. कोणाच्याही आहारी न जाता (प्रभावाखाली न येता)आपल्या बुद्धीला पटेल तेच सत्य मानणे हा विवेकवाद आहे.स्वा.सावरकरांचे विचार या लेखाला पूरक आहेत म्हणून इथे दिले.कुणाची तोंडे बंद करण्याशी संबंध नाही.

ठीक. खाली विनायक ह्यांनी सावरकर ह्यांच्या लेखांबद्दल मत मांडले आहेच, मी त्याचाशी सहमत आहे.

थोडी वेगळी आठवण...

ञानेश्वरांना ज्ञानेश्वरीसाठी (तत्सम रचना) पूजले जाते (वय लक्षात घेता),
सहमत

त्या भिंतीची पूजा किंवा दर वर्षी भिंत-उत्सव साजरा केला जात नाही,
उत्सव साजरा केला जात नाही ह्याच्याशी सहमत. लहानपणी एकदा आळंदीला गेलो होतो तेंव्हाच्या आठवणीप्रमाणे: तेथे एक दगडी भिंत, भिंत कसली लांबट चौथराच होता. त्यावर चांगदेव वाघावर बसून येत आहेत आणि दुसरीकडून निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताई असे सगळेजब भिंतीवरून येत आहेत अशा प्रकारच्या लहानशा मुर्ती होत्या. तेंव्हा तिथल्या एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की आत एक अतिशय जिर्णावस्थेतील जुनीपुराणी भिंत आहे, जी ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत आहे असे भाविकांना वाटते. माझ्यामते तिथपर्यंत ठीक आहे. पण मग ती ज्ञानेश्वरांची भिंत आहे म्हणून ती थोडी थोडी टवके काढून, ओरबाडून प्रसाद म्हणून घेत खाऊ लागले. सरतेशेवटी तसे काही होत ती नष्ट होऊ नये म्हणून त्याच्या भोवताली ही दगडी भिंत घातली गेली.

तेंव्हा ज्ञानेश्वरांवर तलवार व्यक्तिगत नकारात्मक भावनेतून चालाविल्यासारखे वाटते.
यनावालांनी त्यांसंदर्भात त्यांचे मत मांडले आहेच. तरी देखील... आता ज्ञानेश्वरांना होऊन देखील ७००+ वर्षे झाली. त्या काळात महाराष्ट्रातच काय अवघ्या देशभरात परकीय तलवारी चालल्या. तरी देखील अजून त्यांचे नाव आणि अक्षर वाड्मय, हे त्यांच्या समाधीपेक्षाही अधिक संजीवन ठरले आहे. अर्थात असे म्हणताना, माझ्या दृष्टीने त्यात काही चमत्कार नाही. पण त्यांचे लेखन आणि बुद्धीमत्तेचा प्रभाव इतकी वर्षे टिकली नसती तर चमत्कार ठरला असता असे वाटते. अर्थात चमत्कारांवर माझा विश्वास नाही. ;)

सावरकरांच्या संदर्भात

नुसतेच टाळकुटे झालेल्या समाजाच्या स्वभावावर घणाघाती टिका करत त्याला जागॄक करणारे सावरकरांनी ज्ञानेश्वरांनी साधे पोस्टमनचे काम देखील केले नाही असे नुसते म्हणले नाही. तर स्वातंत्र्योत्तर काळात जेंव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारी ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे (अत्रे, ना.ग. गोरे, एसएम जोशी, कॉ. डांगे वगैरे) जेंव्हा त्यांचे त्या लढ्यात आशिर्वाद मागायला पन्नासच्या दशकात गेली , तेंव्हा, "राज्याच्या सीमांपेक्षा देशाच्या सीमा आधी सांभाळा, त्या नेहरूंना सांगा त्या चाउमाओ कडे लक्ष द्या, तो विश्वासघात करत आहे" या अर्थी बोलून स्वतःचे कर्तव्य पार पाडले होते. पण अर्थातच निधर्मी असलेल्या विज्ञानवादी अधुनिक नेहरूंच्या पण काही सामाजीक आणि राजकीय अंधश्रद्धा होत्याच ज्याचे परीणाम नंतर देशाप्रमाणे त्यांना स्वत:ला देखील दुर्दैवाने भोगायला लागले... तात्पर्यः राजनिती, देशाचा स्वार्थ बघण्याची वृती, समाजाचे रक्षण करण्यासाठीचा डोळसपणा हे सगळे केवळ धार्मिक भाविकतेपोटीच जाते अथवा अंधश्रद्धेनेच जाते असे नाही, त्याचा अष्टसिद्धींशी काही संबंध देखील नाही. केवळ भिंतच मातीची नसते तर कधी कधी पाय देखील असतात...ते जेंव्हा राज्यशकट चालवणार्‍या नेत्याचे असतात तेंव्हा देश धोक्यात येतो. असो.

कैच्याकै

>>त्या चाउमाओ कडे लक्ष द्या, तो विश्वासघात करत आहे

चीन विश्वासघात करतो/चीनने विश्वासघात केला ही १९५९ पासून सांगितली गेलेली पब्लिक ष्टोरी असली तरी प्रत्यक्षात सीमेवर काअ चालू होते हे आपण एका दुसर्‍या धाग्यात पाहिलेच आहे. तरीसुद्धा चीन काय करत आहे आणि आपण काय करत आहोत हे नेहरूंना कळत नव्हते (आणि सावरकरांना बरोब्बर कळले होते) हा समज बाळगायचा असेल तर खुशाल बाळगावा.

(या धाग्यावरच्या अवांतराला तसाच एक अवांतर प्रतिसाद)

नितिन थत्ते

?

हा हा हा! आपला प्रतिसाद अपेक्षित होताच आणि अपेक्षित प्रतिसादच मिळाला...

हे आपण एका दुसर्‍या धाग्यात पाहिलेच आहे.
असा एका धाग्यावरून स्वर्ग गाठायचा असतो का? निदान मी तरी तसे करत नाही...

तरीसुद्धा चीन काय करत आहे आणि आपण काय करत आहोत हे नेहरूंना कळत नव्हते
१९६२ ला जे काही झाले त्यावरून नेहरूंना कळत होते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर अवश्य म्हणा.

या धाग्यावरच्या अवांतराला तसाच एक अवांतर प्रतिसाद

आपला प्रतिसाद अवांतर आहे ह्यात काही वाद नाही! कारण त्यात आपण आपल्या चष्म्याने नको तिथे लक्ष दिले आहे... माझा प्रतिसाद आणि त्यातील आपल्याला ठसका लागलेला भाग हा काही अवांतर नाही तर मूळ चर्चा/लेखावर केलेला टिकात्मक विचार (क्रिटीकल थिंकींग) आहे. श्री. यनावालांच्या इतर सर्व लेखनाप्रमाणेच या लेखनातूनही भक्तीमार्ग, धर्म, वगैरे मुळे कसे सगळे चुकते हे दाखवताना ज्ञानेश्वरांमुळेच जणू काही देवगिरीचे साम्राज्य बुडाले असे म्हणले गेले आहे. त्यावर उपरेल्लेखित उदाहरण देत मी स्पष्ट केले होते:

तात्पर्यः राजनिती, देशाचा स्वार्थ बघण्याची वृती, समाजाचे रक्षण करण्यासाठीचा डोळसपणा हे सगळे केवळ धार्मिक भाविकतेपोटीच जाते अथवा अंधश्रद्धेनेच जाते असे नाही, त्याचा अष्टसिद्धींशी काही संबंध देखील नाही. केवळ भिंतच मातीची नसते तर कधी कधी पाय देखील असतात...ते जेंव्हा राज्यशकट चालवणार्‍या नेत्याचे असतात तेंव्हा देश धोक्यात येतो.

असो.

चालू द्या

श्री. यनावालांच्या इतर सर्व लेखनाप्रमाणेच या लेखनातूनही भक्तीमार्ग, धर्म, वगैरे मुळे कसे सगळे चुकते हे दाखवताना ज्ञानेश्वरांमुळेच जणू काही देवगिरीचे साम्राज्य बुडाले असे म्हणले गेले आहे.

काहीतरीच. असे मला अजिबात वाटत नाही. इथल्या अनेक मान्यवर सदस्यांना असे वाटत नाही आहे. चालू द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

>>आपला प्रतिसाद अवांतर आहे ह्यात काही वाद नाही! कारण त्यात आपण आपल्या चष्म्याने नको तिथे लक्ष दिले आहे...

आपल्या ज्ञानेश्वर-सावरकर चर्चेत नको तिथे नेहरू चीन विषय काढल्याने प्रतिसाद देणे भाग पडले.

नितिन थत्ते

नको तिथे नेहरू

आपल्या ज्ञानेश्वर-सावरकर चर्चेत नको तिथे नेहरू चीन विषय काढल्याने प्रतिसाद देणे भाग पडले.

सावरकर आणि ज्ञानेश्वर ह्यामधे गोची झाल्याने नेहरू आणि चाओमाओ ह्यांना पाचारण करावे लागलेले दिसते.

सहमत

सहमत.

धन्यवाद, भिंतीबद्दल नवीन माहिती कळली.

नुसतेच टाळकुटे झालेल्या समाजाच्या स्वभावावर घणाघाती टिका करत त्याला जागॄक करणारे सावरकरांनी ज्ञानेश्वरांनी साधे पोस्टमनचे काम देखील केले नाही असे नुसते म्हणले नाही. तर स्वातंत्र्योत्तर काळात जेंव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारी ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे (अत्रे, ना.ग. गोरे, एसएम जोशी, कॉ. डांगे वगैरे) जेंव्हा त्यांचे त्या लढ्यात आशिर्वाद मागायला पन्नासच्या दशकात गेली , तेंव्हा, "राज्याच्या सीमांपेक्षा देशाच्या सीमा आधी सांभाळा, त्या नेहरूंना सांगा त्या चाउमाओ कडे लक्ष द्या, तो विश्वासघात करत आहे" या अर्थी बोलून स्वतःचे कर्तव्य पार पाडले होते. पण अर्थातच निधर्मी असलेल्या विज्ञानवादी अधुनिक नेहरूंच्या पण काही सामाजीक आणि राजकीय अंधश्रद्धा होत्याच ज्याचे परीणाम नंतर देशाप्रमाणे त्यांना स्वत:ला देखील दुर्दैवाने भोगायला लागले... तात्पर्यः राजनिती, देशाचा स्वार्थ बघण्याची वृती, समाजाचे रक्षण करण्यासाठीचा डोळसपणा हे सगळे केवळ धार्मिक भाविकतेपोटीच जाते अथवा अंधश्रद्धेनेच जाते असे नाही, त्याचा अष्टसिद्धींशी काही संबंध देखील नाही. केवळ भिंतच मातीची नसते तर कधी कधी पाय देखील असतात...ते जेंव्हा राज्यशकट चालवणार्‍या नेत्याचे असतात तेंव्हा देश धोक्यात येतो. असो.

पूर्ण सहमत.

नक्की मुद्दा काय?

नुसतेच टाळकुटे झालेल्या समाजाच्या स्वभावावर घणाघाती टिका करत त्याला जागॄक करणारे सावरकरांनी ज्ञानेश्वरांनी साधे पोस्टमनचे काम देखील केले नाही असे नुसते म्हणले नाही.

ह्या वाक्याचा नक्की अर्थ काय आहे? "जागॄक करणारे सावरकरांनी ज्ञानेश्वरांनी साधे पोस्टमनचे काम देखील केले नाही" ह्या भागाचा काहीच अर्थ लागत नाही.
सावरकर हे द्वेषबुद्धीने लिहायचे ह्या विनायक गोर्‍यांच्या दाव्याविषयी आपणास काय वाटते?

सावरकर आणि केळकरांचे विचार

इथे दिल्याबद्दल आभार.

-Nile

चांगला लेख - वृत्तपत्र वाचक हे लक्ष्य?

शैलीवरून वृत्तपत्रातील लघुनिबंधांचा वाचक हे लक्ष्य असावे, असे वाटले. चांगले लेखन.

रोख इतिहासचर्चा किंवा तत्त्वचर्चेकडे नाही. पण व्यक्तीच्या मनात वेगवेगळ्या वेळी अनायासे बिंबलेल्या ज्या धारणा आहेत, त्यांच्यातला अंतर्विरोध दाखवण्याबाबत आहे.

या प्रकारचा अंतर्विरोध दोन टोकाच्या विरुद्ध पद्धतींनी वाचक घालवू शकतो.
(१) प्रथम प्रकार असा की ज्ञानेश्वराबद्दल उत्तम कवी आणि तत्त्ववेत्ता असा आदर कायम ठेवून चमत्कारी व्यक्ती म्हणून कल्पना लोक मनातून काढून टाकतील. हे लेखकाचे प्रयोजन आहे, आणि माझीही अशीच आशा आहे.
(२) दुसरा प्रकारही लोकप्रवादांच्या इतिहासात आपल्याला दिसतो. या प्रकारात त्या संताने राजकीय-सामाजिक बाबतीत कुठलासा चमत्कार केल्याची कथा उद्भवू शकते. उदाहरणार्थ अशी कथा उद्भवली आहे, की तुकारामाने चमत्कार करून शिवाजीराजा मुसलमान फौजेच्या हाती पडू दिला नाही. कदाचित अशी कुठलीशी कथा ज्ञानेश्वराबाबतही निर्माण होऊ शकेल. या दोन्ही कथांची सांगड घालून लोक अंतर्विरोधाची समेट करू शकतात. एकीकडे चमत्कारही शाबूत राहातात, आणि ऐतिहासिक शल्याबाबत चीडही कायम राहाते.

हम्म

सिद्ध, नाथ, दत्त सम्प्रदायातल्या थोर साक्षात्कारी विभूतीना 'ज्येष्ठ समाजवादी विचारवन्त/ कवि/ साहित्यिक ' इ. ठरवणे हे एका प्रकारचे अवमूल्यन आहे आणि ते अपमानास्पदही आहे असे मला वाटते. एखाद्याला रागदारी, लयकारीतले काडीचे गम्य नाही, त्यामुळे त्याने उ. झाकिर हुसेन हे एक निर्व्यसनी, सुस्वभावी, विनम्र, हसतमुख सदगृहस्थ आहेत्, त्या पलीकडे काही नाही . बाकी सगळे सोडून द्या आणि निर्व्यसनीपणा, विनम्र वृत्तीचे एक उदाहरण इतकेच उ. झाकिर हुसेन स्वीकारा असे ठरवण्यासारखाच हा प्रकार आहे असा माझा ग्रह झाला. माझ्या आकलनात काही उणिव असल्यास चू. भू. दे. घे.

सिद्ध दत्त नाथ

सिद्ध, नाथ, दत्त सम्प्रदायातल्या थोर साक्षात्कारी विभूतीना 'ज्येष्ठ समाजवादी विचारवन्त/ कवि/ साहित्यिक ' इ. ठरवणे हे एका प्रकारचे अवमूल्यन आहे आणि ते अपमानास्पदही आहे असे मला वाटते.

ह्या विभुती एक नंबरच्या लबाड भोंदू व्यक्ती आहेत असे मला वाटते. आणि त्यांना मानणारे बुद्धी गहाण टाकलेले किंवा जन्मजात निर्बुद्ध आहेत असेही मला वाटते.

ठीक आहे

याच न्यायाने आपण माझ्यापेक्षा कैक पटीने बुद्धीमान आहात असे मलाही वाटते. मी आपल्या अल्पबुद्धीने चार शब्द लिहीले. बाकी चू. भू. दे. घे.

विषयःइतिहास|तत्त्वज्ञान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितात,"रोख इतिहासचर्चा किंवा तत्त्वचर्चेकडे नाही."
अगदी खरे आहे. पण तिथे जी सूची दिली आहे त्यात अपेक्षित असलेल्या सर्व विषयांची नावे असतात असे नाही.त्यामुळे कुठेतरी टिचक्या मारल्या झाले.
*"अशी कथा उद्भवली आहे, की तुकारामाने चमत्कार करून शिवाजीराजा मुसलमान फौजेच्या हाती पडू दिला नाही. '' श्री.धनंजय यांच्या प्रतिसादातून.
तुकाराम महाराजांचे कीर्तन चालू असताना एकदा परचक्र आले होते असे पुढील अभंगांवरून दिसते.

न देखवे डोळां ऐसा हा आकांत परपीडे चित्त दु:खी होते|
काय तुम्ही येथे नसलासे जाले आम्ही न देखिले पाहिजे हे|
परचक्र कोठे हरिदासाच्या वाटे न देखिजेत देशे राहातिया|
तुका म्हणे माझी लाजविली सेवा हीनपणे देवा जिणे झाले|
.
भीत नाही आता आपुल्या मरणा दु:खी होता जना न देखवे|
आमची तो जाती ऐसी परंपरा कां तुम्ही दातारा नेणां ऐसे|
भजनी विक्षेप तेची पै मरण न वजावा क्षण एक वाया |
तुका म्हणे नाही आघाताचा वारा ते स्थळी दातार ठाव मागे|
.
काय म्या मानावे हरिकथेचे फळ तरिजे सकळ जन ऐसे|
उच्छेद तो असे हा गा आरंभिला रोकडे विठ्ठला परचक्र|
पापाविण नाही पाप येत पुढे साक्षीसी रोकडे साक्ष आले|
तुका म्हणे जेथे वसतील दास तेथे तुझा वास कैसा आता|

(या अभंगाचा अर्थ मला समजत नाही)

ज्ञानेश्वरी - अमृतानुभव ग्रंथ हेच खरे चमत्कार

आहेत. असे असताना त्यांनी मातीची भिंत चालवली, रेड्यामुखी वेद म्हणवले असल्या चमत्कारांचा हा विषय बिनमहत्त्वाचा आहे. या गोष्टी खर्‍या आहेत असे ज्यांना समजायचे आहेत त्यांनी खुशाल समजावे, या समजुती निरुपद्रवी आहेत. मुद्दाम त्या खोट्या आहेत असे ज्यांना ठासून सांगायचे आहे त्यांना आपले अंधश्रद्धानिर्मूलनाचे दुकान चालवायचे आहे, त्यामुळे तेही योग्यच आहेत.

प्रसिद्ध व्यक्तींबद्दल चमत्कारिक समज प्रसृत होतात त्यात नवीन काही नाही. उदा. शिवाजी हवेत १४ - १५ फूट उडी मारू शकतो (कदाचित फूट हे परिमाण त्या काळात प्रचलित नसल्याने दोन- तीन पुरुष उंच असे म्हणत असावेत), तात्या टोपे बघता बघता अदृश्य होऊ शकतो , तुकारामांच्या वह्या नदीत तरल्या वगैरे.

बाकी सावरकरांच्या संतद्वेष्टेपणाबद्दल बरेच काही लिहिता येण्यासारखे आहे, मी मनोगतावर पूर्वी लिहिलेही आहे. जेव्हा न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावत होता तेव्हा तुकाराम अभंग लिहीत होता असे त्यांनी म्हटले आहे. एक म्हणजे हे साफ चुकीचे आहे. तुकारामांचे निर्वाण १६४९ मधले आणि न्यूटनचा जन्म १६४२ मधला. त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध १६८७ च्या सुमारास लावला. दुसरे म्हणजे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी आणि अध्यात्मासाठी वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसे लागतात. ओव्या अभंग असे अध्यात्मिक लेखन न केल्याबद्दल न्यूटनला दोष द्यावा का? त्याच धर्तीवर १९०५ मध्ये जेव्हा आईनस्टाईन सापेक्षतेच्या सिद्धांताचा शोध लावत होता तेव्हा सावरकर आणि टिळक विदेशी कपड्यांची होळी करत होते असे आम्ही म्हणावे का? (अर्थात् इथले ज्ञानी उपक्रमी सापेक्षतेच्या सिद्धांताचा शोध न लावल्याबद्दल एकट्या टिळकांना दोष देतील हे इथल्या पुरोगामी प्रथेला धरूनच होईल) तेव्हा असले युक्तिवाद निरर्थक आहेत.

जाता जाता - सावरकरांना वि़ज्ञानवादी वगैरे म्हणायची प्रथा आहे. तुकारामाच्या वह्या का तरल्या याचे एक भले मोठे स्पष्टीकरण त्यांनी एका निबंधात दिले आहे. तुकारामाच्या वह्या पुठ्ठा छाप बाईंडिंगच्या असल्याने पाण्यात टाकल्या तरी पाणी पुठ्ठा पूर्ण भिजवून आतील कागदांपर्यंत जाऊ न शकल्याने त्यांचे अभंग कायम राहिले असे काहीसे म्हटले आहे. मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की त्यांनी एखादा प्रयोग करून आपले म्हणणे सिद्ध करून का दाखवले नाही? तसे केले असते तर त्यांचे स्पष्टीकरण प्रभावी झाले असते. पुढे थोर समीक्षक म. वा. धोंड यांनी तुकारामाच्या काळी वापरात असलेले निरनिराळ्या प्रकारचे कागद आणि शाया वापरून कागद पाण्यात भिजवण्याचे प्रयोग केले होत, एका विशिष्ट प्रकारचे शाई- कागद काँबिनेशन वापरून लिहिलेले पाण्यात टिकले होते, फक्त प्रदूषित पाण्याने कागद पिवळा पडला असे त्यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते.

मथितार्थ पाहा

जेव्हा न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावत होता तेव्हा तुकाराम अभंग लिहीत होता असे त्यांनी म्हटले आहे.

ह्याचा अर्थ असा होतो की पाश्चात्य जगात विज्ञानाची प्रगती/रेनसांन्स होत असताना भारतात लोक भक्तिमार्गाला लागले होते. न्युटन आणि तुकाराम ही वानगीदाखल घेतलेली नावे आहेत. अजूनही भारतामधे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तितका प्रसार झालेला नाही. एकिकडे रसायनशास्त्रात संशोधन वगैरे करणारे दुसरीकडे फल जोतिष्यासारख्या अवैज्ञानिक गोष्टींना खतपाणी घालतात हे आपल्या लोकांच्यात सर्रास दिसते.

+१

+१
या वाक्यातील मतितार्थ लक्षात न घेता सावरकरांना (हिरीरीने की घाईने?) संतद्वेष्टे म्हणून झोडपण्याने हसे कोणाचे होते हे वेगळे सांगायला नकोच ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मथितार्थातील विसंगती

पाश्चात्य ज्यावेळी रेनेझास मधून जात होते, आणि विज्ञानाची उपासना करीत होते त्यावेळी आपण भारतीय भक्तीमार्गाला लागलो होतो, आणि या सगळ्या असल्या प्रकारामुळेच आपण एकंदर भौतिक प्रगतीमध्ये मागे पडलो, सामाजिक उणीवा वाढीला लागल्या, राजकीय गुलामगिरी पदरी आली, आणि याचे कारण म्हणजे "टाळकुटे संत", आणि त्यांची "अंधश्रद्ध, अवैज्ञानिक भक्ती", हा जर इथे मथितार्थ असेल, तर तो विसंगतींनी भरलेला आहे.

विज्ञानाचा अभ्यास करणे, आणि वैज्ञानिक विचारसरणी असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. विज्ञानाचा अभ्यास करणार्‍या प्रत्येकाची विचारसरणी वैज्ञानिक असेलच असे काही नाही. आणि वैज्ञानिक विचारसरणीचा माणूस म्हणजे त्याने विज्ञानाचा अभ्यास केलेला असलाच पाहिजे असे काही नाही. कार्यकारण भाव नीट समजून घेऊन वास्तवाशी सांगड घालीत समाजाला आणि राष्ट्राला पुढे नेणारे शिवाजीसारखे नेतृत्व हे वैज्ञानिक विचारसरणीचे उत्तम उदाहरण आहे. त्याचवेळी पास्कल, न्यूटनसारख्या वैज्ञानिकांची अल्केमीची ओढ, गूढ अनुभवांप्रती त्यांना असणारे आकर्षण हे वैज्ञानिक विचारसरणीत बसत नाही. तुकाराम जरी एका बाजूला म्हणत असले, की झाडाचे पानही ईश्वराची इच्छा असल्याखेरीज हलत नाही, तरी त्याच वेळी ते हेही म्हणत असतात, की जर देवाला नवस करुन मूल होत असते, तर स्त्रीला नवरा करायची गरजच काय?

सावरकर संतद्वेष्टे होते असे त्यांचे लिखाण वाचून मला तरी वाटलेले नाही. संतांचे बोलपट कसे पहावे या निबंधात त्यांनी आजगावकरांच्या नामदेवप्रणित चमत्कार वर्णनाची जी धमाल खिल्ली उडवली आहे ती वाचून हसता हसता पुरेवाट होते. त्यात नामदेवांची टवाळी नाहीच आहे मुळी. खुद्द नामदेवांनीदेखील आपले असले वर्णन करणार्‍याला चांगले झाडले असते. सावरकरांचा रोख् वैज्ञानिक विचारसरणीवर आहे. संतांचे चमत्कार त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या बाबतीत "इर्रिलेव्हंट" आहेत, एवढाच मी त्यांच्या टीकेचा अर्थ घेतो. यनावालांनी/ किंवा त्यासारखाच इतरांनी काढलेला वर नमूद केलेला मथितार्थ मला पटत नाही. आणि सावरकरांनाही तसेच म्हणायचे असले, तर मला त्याबाबतीत सावरकरांचेही पटत नाही असे नम्रपणे नमूद करतो.

युरोपात विज्ञानाची उपासना सुरु असताना विच हंट होत होती त्याचे काय? खुद्द वैज्ञानिकच गूढ आध्यात्मिक पंथांचे लपून छपून सदस्य होत होते त्याचे काय? आणि अध्यात्म परंपरा भरात असतानाही त्याच काळात भारतात दीड हजार वर्षे न गंजणारा लोहस्तंभ उभा करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले होते, गणित भरात आलेले होते, अशक्यप्राय वाटणार्‍या अचूकतेने विराट इमारती बांधल्या जात होत्या. या सर्वांच्या आड कधी भक्तीपरंपरा आली नाही ते?

कशाचाही कशाला संबंध लावायचा आणि ज्या विषयातले आपल्याला काही गम्य नाही त्यावर सुधारणेच्या नावाखाली तोंडसुख घ्यायचे हा एक अज्ञ अहंकाराचा एक प्रकार आहे.

+१

सहमत

माझं मत

सावरकर संतद्वेष्टे होते असे एखाद-दुसरा निबंध वाचून वाटले नाही. परंतु एखाद्याने पुढे येऊन सावरकरांनी सतत संतांचा द्वेष केला आणि तसा प्रचार केला असे सांगितले तर मत बदलता येईल.

कालच मिपावर वाचलेली म्हण सावरकरांच्या लेखनाच्या बाबत चपखल बसते असे वाटते. 'You cannot win an argument just by being right' सावरकरांचे लेखन अभिनिवेशपूर्ण आहे हे नक्कीच परंतु त्यांचा टार्गेट ऑडियन्स* लक्षात घेता त्यांनी त्या श्रोत्यांना/ वाचकांना कळेल किंवा त्यांच्या मनावर घण बसतील या रोखाने लेखन केले असावे.

असे असले तरीही, त्या वाक्यांचा जसाच्या तसा उपयोग इतर श्रोते/ वाचकांवर केला तर त्यातील तृटी बाहेर पडतीलच असे वाटते.

* मराठी माणसाला मराठी चांगली कळते, अरबाला अरबी आणि मूर्खांना मूर्खांची भाषा लवकर कळते असे काहीसे.

प्रॉब्लेम ऑफ् इव्हिल

"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे."

चमत्कार म्हणजे अजून माहीत न झालेल्या निसर्गनियमांचे उदाहरण असा अर्थ असेल तर असे चमत्कार होऊ शकतात असे माझे नम्र मत आहे.

बाकी ज्ञानेश्वरांबद्दलची अपेक्षा रास्त नाही. राज्यावर परचक्र येते आहे हे समजायला कुठल्या सिद्धीची काय आवश्यकता आहे? जे काही घडले ते एक राजकीय अपयश होते. ज्ञानेश्वरांनी यादव राजवटीसाठी काही केले नाही असे म्हणणे आणि फुले, आंबेडकर ही मंडळी इंग्रजधार्जिणी होती असे म्हणणे यात एक साम्य आहे. शिवाय, शोषितांचा आक्रोश कानावर पडूनही ज्ञानेश्वरांनी काही केले नाही, काही करू शकले नाहीत, नैराश्याने जीव दिला असेल हा युक्तीवाद मजेशीर आहे. "प्रॉब्लेम ऑफ् इव्हिल" थोड्या वेगळ्या शब्दांत मांडला आहे, एवडेच. शिवाय, खिलजी यायच्या अगोदरही काही रामराज्य होते अशातला भाग नाही. त्यामुळे ज्ञानोबांना नैराश्याने ग्रासायला परचक्राची काही आवश्यकता नव्हती.

बाकी ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती की नाही याचा काही पुरावा नसल्यामुळे आणि चालणारी भिंत पाहण्यात नसल्याने तसे मानणे हे तर्कविसंगत आहे हे सांगायला बाकीच्या तर्कविसंगत मांडणीची काही गरज नव्हती.

अष्टसिद्धी वगैरे

काही प्रश्न पडले -

१. अष्टसिद्धीन्चा समाजवादी/ राष्ट्रवादी/ तथाकथित मानवतावादी विचारसरणीने कुणी वापर केला नाही यामुळे त्या असूच शकत नाहीत हे विधान तर्कशुद्ध आहे का?

२. कृष्णाने त्याच्या योगमायेने कौरवान्चा विनाश न करता (जे सहज शक्य होते) अर्जुनालाच कर्तव्यतत्पर होऊन स्वार्थ, ममत्व, भीती त्यागून नियत कर्म करायचा, कर्तव्यतत्पर होण्याचा उपदेश का केला याचा विचार करायला हवा. बसायला पाट द्यावा पण पुढ्यात फुकटचे ताट ठेवू नये अशी काहीतरी म्हण आहे. तसेच अधिदैविक सामर्थ्याने युक्त सन्त करत नसतील हे कशावरून?

३. अष्टसिद्धी वगैरे असणार्या व्यक्तीचा 'मी' पणा लोपलेला असल्याने ती फक्त ईश्वरेच्छेने चालते असे रमण महर्षी, रामकृष्णादि थोरामोठ्यान्चे चरित्र वाचून सहज लक्षात येते. प्रत्येक जीवाने आपला स्वधर्म पाळून 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' वाला व्यापक धर्म प्रस्थापित करावा अशी ईश्वरी योजना असल्यास सगळ्याच सिद्ध व्यक्ती सर्वसामान्य लोकाना बसायला पाट देतील (स्वधर्माने प्रत्येक व्यक्ती जगू शकेल असे एक 'फ्रेमवर्क' घडवण्यात स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या सापेक्षतेत योग्य ते योगदान देतील. व्यक्तिगत आशा अपेक्षा न ठेवता सर्वस्व पणाला लावून त्यासाठी प्रयत्न करतील, अथवा कल्याणाच्या धर्माने जाग्या असलेल्या वैश्विक चैतन्यशक्तीची कृपा त्यान्च्या माध्यमातून् तसे करून घेईल.) पण पुढ्यात फुकटचे ताट ठेवणार नाहीत हे उघड आहे. असे फुकटचे ताट पुढ्यात मिळाल्याने व्यक्तीचे/ समाजाचे पुढे काय होते हे तर व्यावहारिक जगात पावलोपावली दिसून येते. असो.

४. 'मी देह आहे' ही देह तादात्म्य भावना लोपलेली , मन आणि बुद्धीच्या कुठल्याही लिप्तता आणि चकव्याच्या पलीकडे गेलेली व्यक्ती आपले नियत कार्य झाले एवढीच जाणीव झाल्याने योगबळाने देहत्याग करू शकेल ही शक्यताच विचारात घ्यायची नसेल, तर समाधी घेणे याविषयी वाट्टेल तितकी तर्कटे बसल्याजागी मान्डता येतील. आणि तशी मान्डण्याच्या व्यक्तिस्वातन्त्र्याविषयी विनम्रपणे आदरभाव व्यक्त करून हे चार शब्द सम्पवतो.

अवान्तरः (बहुधा अनादि, अनन्त असणार्या) आणि अत्यन्त गुन्तागुन्तीच्या अशा अस्तित्वातली सगळी प्रमेये सरळरेषेत चालणार्या तर्क आणि सीमीत बुद्धीच्या परिघातच सोडवली जाउ शकतात. अतिन्द्रिय अनूभूती, अपरोक्ष ग्यान असे काही असूच शकत नाही. व्यक्तिगत (सब्जेक्टिव्ह नॉलेज) अनुभूती सरसकट नाकारायला हव्यात, जे प्रत्येक व्यक्तीमात्राच्या अनुभवकक्षेत तर्काने आणि बुद्धीने येते (ऑब्जेक्टिव्ह नॉलेज) तेवढेच स्वीकारार्ह.
या विधानान्चे वर्गीकरण कुठल्या कॅटेगरीत करावे - ढोबळ गृहीतक/ निर्विवाद सत्य/ एकान्गी हट्टाग्रह/ अन्धश्रद्धा / अन्य काही.

सिद्ध वाचक

अतिंद्रिय, लिप्तता, तादात्म्य, योगबल इ.इ.... तुम्ही कोणाचा अवतार आहात हे कळू लागले आहे.

चुकीचा समज

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विकास यांनी म्हटले आहे,"श्री. यनावालांच्या इतर सर्व लेखनाप्रमाणेच या लेखनातूनही भक्तीमार्ग, धर्म, वगैरे मुळे कसे सगळे चुकते हे दाखवताना ज्ञानेश्वरांमुळेच जणू काही देवगिरीचे साम्राज्य बुडाले असे म्हणले गेले आहे.''
.
हा समज पूर्णतया चुकीचा आहे. असे दूरान्वयानेसुद्धा लेखात कुठेही म्हटलेले नाही अथवा सुचवलेले नाही. आपल्याला वाटेल तो समज करून घेणे आणि तदनुसार प्रतिसाद लिहिणे अशोभनीय आहे.
.
योगसाधनेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. त्यांच्यायोगे अनेक चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.तसा समजही रूढ आहे.चमत्कारांविषयींचा हा दावा तथ्यहीन आहे. निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे चमत्कार कोणीही करू शकत नाही.पूर्वीही कोणी केले नाहीत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे हा लेखाचा विषय आहे.त्यासाठी मान्यवरांनी दिलेले ऐतिहासिक आधार सत्य आहेत.
लेखाचे उद्दिष्ट तेवढेच आहे.

अधून्मधून् सहमत!

आपल्याला वाटेल तो समज करून घेणे आणि तदनुसार प्रतिसाद लिहिणे अशोभनीय आहे.
१००% सहमत!
शिवाय आपल्याला वाटेल तो समज करून घेणे आणि तदनुसार ज्ञानेश्वरांबद्दल लिहिणेदेखिल अशोभनीय आहे.

योगसाधनेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात.
योगसाधना म्हणजे काय् हे माहित् आहे का?
यम्-नियम म्हणजे नक्की काय हे माहित् आहे का?
अवांतरः सिद्धिंमध्यी अडकणे योग्य् नाही असे योगेश्वरानीच् एका प्रसिद्ध ठिकाणी सांगितलेले आहे.

त्यांच्यायोगे अनेक चमत्कार करता येतात असे ग्रंथात लिहिले आहे.
कुठल्या???
तसा समजही रूढ आहे.चमत्कारांविषयींचा हा दावा तथ्यहीन आहे.
ज्ञानेश्वरांनी 'मी भिंत् चालवली' असा दावा केला आहे काय्??
आणि केला असल्यास् त्याला आक्षेप् आपण् कसा काय् घेणार्??...आपली बुद्धी, समज्, योग्यता, करुणा, प्रेम त्यांच्याइतके नाही!

निसर्गनियमांचे उल्लंघन करणारे चमत्कार कोणीही करू शकत नाही.
१००% सहमत!
प्रत्येक् गोष्ट् निसर्गनियमांनुसारच होते. त्यात वाद नाहीच.
पण् 'भिंत चालवणे' ही गोष्ट् आपल्याला (मनुष्यप्राण्याला) या क्षणी माहित् असलेल्या निसर्गनियमात शक्य होत नाही, इतकेच्!
पण अतापर्यन्त् यंत्रशास्त्रात् व शरीरशास्त्रात मानवानी केलेल्या प्रगतीच्या आधारावर मनुष्याला सगळे निसर्गनियम् कळले असे मत् मांडणे मात्र धाडसाचे ठरेल.
तसे असेल् तर्, ताबडतोब् जगातले सर्व् संशोधन बंद् करावे आणि उगाच् पैसा त्यात् वाया घालवु नये, असा निष्कर्ष् निघतो, जो साफ् चुकीचा आहे!
माणसाला अजूनही बरेच् काही कळायचे बाकी आहे......
त्यातले एक् महत्त्वचे म्हणजे 'आपल्याला फारसे काही कळत् नाहीये' हे देखिल् कळायचे बाकी आहे! :)
आणि त्याहून् महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरांना स्वतःला जे जे काही कळले ते त्यांनी ज्ञानेश्वरीत् आपल्यासाठी लिहून् ठेवले आहे.
त्यापलिकडच्या गोष्टींबद्दाल् भुई धोपटत् मुख्य ज्ञानेश्वरीचा अभ्यास् मात्र् बायपास् करायचा हे काही योग्य् नाही!
तेंव्हा 'ज्ञानेश्वरांनी भिंत् चालवली की नाही?' या निरर्थक् चर्चेपेक्षा ..................................
असो!

कविता

फालतूपणा

शिवाय आपल्याला वाटेल तो समज करून घेणे आणि तदनुसार ज्ञानेश्वरांबद्दल लिहिणेदेखिल अशोभनीय आहे.

यनावालांनी ज्ञानेश्वरांबद्दल वाट्टेल ते लिहिले आहे असा वाट्टेलसा समज काही मूर्खांनी करून घेतला असल्यास काय करावे?

योगसाधना म्हणजे काय् हे माहित् आहे का?
यम्-नियम म्हणजे नक्की काय हे माहित् आहे का?
अवांतरः सिद्धिंमध्यी अडकणे योग्य् नाही असे योगेश्वरानीच् एका प्रसिद्ध ठिकाणी सांगितलेले आहे.

हेहेहे. कोण योगेश्वर हे? असो. चालू द्या तुमचा फालतूपणा! मूकवाचक, कविता 11 वगैरे आयडी अचानक कुठून उपटले हे कळत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तरी तुम्हाला सांगितलं होतं

>>मूकवाचक, कविता 11 वगैरे आयडी अचानक कुठून उपटले हे कळत नाही.

योगेश्वरांवर विश्वास ठेवला असता तर हा चमत्कार कळला असता तुम्हाला, पण नाही...! ;-)

-Nile

संतांचे कार्य.

मूकवाचक,आळश्यांचा राजा आणि विनयक गोरे यांच्याशी १००% सहमत.
संतांनी नक्की काय करावे अशी अपेक्षा ठेवावी? त्यांनी हवेतून तलवारी/बंदुका/रणगाडे/क्षेपणास्त्रे/अणुबाँब् बनवून लोकांच्या हातात द्यावे आणि अशा शस्त्रसज्ज लोकांना शत्रूवर/सीमेवर चाल करून पाठवावे?(नुसते शस्त्रसज्ज होऊन विजय मिळवता येतो किंवा कसे हा वेगळा प्रश्न.) की स्वतःच अदृश्य रूपाने शत्रूच्या गोटात/सीमेवर जाऊन त्यांना सिद्धिसामर्थ्याने ठार करावे?
कोणता शत्रू? कोणती सीमा? काय शत्रू आणि सीमा शाश्वत असतात? योरप् मधल्या देशांच्या सीमा एका शतकामध्ये तीनतीन चारचार वेळा बदलल्या. बांगलादेशमध्ये इंग्रज्,पाकिस्तान आणि आता स्वतंत्र अश्या तीन राजवटी बघताबघता आल्या.त्या त्या देशातल्या नागरिकांची निष्ठा काय एकाच ठिकाणी स्थिर राहिली असेल? अफ्घानिस्तान् मध्ये तर दर काही महिन्यांनी शत्रूमित्रत्व बदलते आहे. स्थिर समजल्या गेलेल्या अमेरिका, भारत इ. मध्येही राजवटी बदलतात,कालच्यांची सद्दी आज नाही आणि आजच्यांची उद्या नाही अशी स्थिती असते.कोण आपले, कोण परके?
खर्‍या संतांना सामान्यमानवी मापदंडाने मोजणे यासारखी दुसरी चूक नाही. 'हे विश्वचि माझे घर', ,विश्व स्वधर्मसूर्यें पाहो' असा वैश्विक विचार करणार्‍यांना जिल्हा,तालुका पातळीवर आणून ठेवण्यासारखे हे आहे.संत हे तटस्थ असतात. तटस्थ पेक्षा अलिप्त शब्द योग्य होईल.'तृषार्ताची तृष्णा हरूं,व्याघ्रा विष होऊनि मारूं,ऐसें नेणेंचि बा करूं,तोय जैसें.' ही संतांची धारणा असते. बहुतेक सर्व संतांच्या घरची परिस्थिती दुर्घट असते. त्यांना स्वतःला आणि त्यांच्या नातेवाईकांनाही दु:खात आणि कष्टात दिवस काढावे लागल्याची उदाहरणे आहेत. ह्याचे कारण खर्‍या संतांत स्वार्थबुद्धी नसते.किंबहुना त्यांचा 'स्व' इतका विस्तारलेला असतो की त्यात अखिल विश्व सामावलेले असते. ते सर्वांचे हित पाहातात,पण तुलनात्मक रीत्या.
अगदी साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास संत, त्यांच्या सान्निध्यात येणार्‍या प्रत्येकाचे उन्नयन करू पाहातात. त्याची क्षमता आणि विवेकबुद्धी जागृत करणे आणि ती वाढविणे,जेणेकरून तो स्वतःया जीवनकलहास तोंड देण्यास समर्थ होईल असे करणे हे त्यांचे गृहीतकार्य असते.'शहाणे करून सोडावे सकल जन' याचा अर्थ तोच आहे.
खर्‍या संतांच्या जीवनचरित्रात चमत्कार हा प्रकार त्यांच्या अन्य कर्तृत्वाच्या मानाने अत्यंत क्षुल्लक आणि गौण असतो. तो असला काय,नसला काय त्यांच्या महत्त्वात काहीच फरक पडू नये.

संतांचे कार्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
@राही
.
संतांच्या कार्याविषयी विद्रोही ब्राह्मण भाग २ हालेख वाचावा.

आपला मुद्दा

ज्ञानेश्वरांपुढे अष्टसिद्धी हात जोडून उभ्या होत्या. तरी राज्यावर परचक्र येत आहे अशी सूचना ते राजास देऊ शकले नाहीत. त्यांनी निर्जीव भिंत चालविली.पण खिलजीचा मार्ग रोखण्यासाठी काही करू शकले नाहीत

आपला मुद्दा पटवण्यासाठी असल्या दृष्टांतांची गरज नक्की आहे का? परचक्र येत आहे अशी सूचना देण्यासाठी अष्टसिद्धींच्या असण्या नसण्याशी काहीच संबंध नाही. सदर सूचना परराज्यात जाऊन आलेली सामान्य व्यक्तीही तेथील परिस्थिती किंवा बातम्या पाहून देऊ शकते. परंतु त्या व्यक्तीकडे राजापर्यंत पोहोचण्याचे आणि राजाला आपले म्हणणे पटवून द्यायचे मार्ग असतीलच असे नाही. यादव राजाने ज्ञानेश्वरांची भेट घेतली असती, त्यांना राज्याश्रय देऊन देवगिरीला नेले असते, स्वतः येऊन भेटी दिल्या असत्या, अकाली समाधी न घेण्यासाठी त्यांचे मन वळवले असते तर गोष्ट वेगळी असती. त्यातून ते राजाच्या संपर्कात आणि विश्वासात होते हे सिद्ध झाले असते. अन्यथा, परकीय आक्रमणाचा आसभासच नसताना कोणीतरी उठून चमत्कार/जादू करून मार्ग वगैरे रोखतो आहे हे कदाचित यादव राजाला चमत्कारिक किंवा भीतीदायक वाटून त्याने ज्ञानेश्वरांना कैदेतही टाकले असते. ;-) गोष्ट एकदा रचायचीच झाली तर ती कोणत्याही प्रकारे ट्विस्ट करता येते.

असो. बाकी चमत्कारांच्या मुद्द्याशी सहमती आहे.

परचक्राची सूचना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
" परचक्र येत आहे अशी सूचना देण्यासाठी अष्टसिद्धींच्या असण्या नसण्याशी काहीच संबंध नाही." प्रियाली यांच्या प्रतिसादातून.
.
रामदेवरायाचे सैन्य मोठे होते. सेनापती शंकरदेवराय परमशूर होता.तयारीनिशी लढले असते तर खिलजीचा पराभव अटळ होता.राजा बेसावध राहिला म्हणून पराभव झाला अशी मीमांसा आहे.
अष्टसिद्धी प्राप्त झालेला सिद्धयोगी त्रिकालज्ञ होतो.त्याला वर्तमान,भूत ,भविष्याचे सम्यक ज्ञान होते.अशा चमत्कारसामर्थ्याचा उपगोग स्वार्थासाठी करू नये हे ठीक. पण राजाला आणि प्रजेला परचक्रापासून वाचविण्यासाठी उपयोग केला तर त्यात काही दोष आहे असे वाटत. नाही. म्हणून ज्ञानेश्वर,चांगदेव, अशा त्रिकालज्ञ योगिराजांनी रामदेवरायाला परचक्राची पूर्व कल्पना द्यायला हवी होती अशी अपेक्षा. पण देऊ शकले नाहीत त्या अर्थी असे चमत्कारसामर्थ्य कुणाजवळ नसते असा निष्कर्ष निघतो.त्यासाठी स्वा.सावरकरांनी हा दाखला दिला आहे.तो योग्य आहे.

बाळबोधपणा

रामदेवरायाचे सैन्य मोठे होते. सेनापती शंकरदेवराय परमशूर होता.तयारीनिशी लढले असते तर खिलजीचा पराभव अटळ होता.राजा बेसावध राहिला म्हणून पराभव झाला अशी मीमांसा आहे.

अहो मी काय म्हणते आणि तुम्ही काय म्हणताय! शिवाजीचे मावळे कमी होते पण गनिमी काव्याने त्यांनी सरशी मिळवली होती. मोठे-लहान सैन्य वगैरेचा संबंध नाही. राजाला जाऊन भेटणे, सल्ले देणे आणि राजाने ते मानणे हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणे, त्यांना राज्यकारभारातले सल्ले देणे आणि मुख्यमंत्र्यांनी ते मानणे याप्रमाणेच कठीण आहे. हे आज अमिताभला कठीण आहे, विंदांना कठीण असते, पु.लंनाही कठीण असते आणि बाबा आमट्यांनाही कठीण असते, अनिरुद्धबापूंनाही कठीण आहे आणि श्री श्री रविशंकर यांनाही.

एखादा प्रसिद्ध माणूस काहीतरी सुचवतो म्हणून राज्यकर्ते ते ऐकून घेते आणि अंमलबजावणी करते तर बघायलाच नको. :-)

तेव्हा तुम्हाला जे सांगायचे आहे त्यासाठी वापरलेले उदाहरण चुकीचे वाटते.

आश्रयदाता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
@प्रियाली
.
स्वा.सावरकरांनी विज्ञाननिष्ठ निबंधात काय लिहिले आहे ते येथे पृ.१७ (हाय हाय! काय दुष्ट योगायोग पाहा पासून) आणि पृ.१८ वर वाचावे.त्यात रामदेवराय यादव ज्ञानेश्वरांचे आश्रयदाते होते असे म्हटले आहे.

सावरकरांचे कथन आणि आश्रयदाते

त्यात रामदेवराय यादव ज्ञानेश्वरांचे आश्रयदाते होते असे म्हटले आहे.

तो संपूर्ण परिच्छेद ज्याप्रमाणे कथन केला आहे तो इतिहास सांगण्याची पद्धत नव्हे. तरीही, माझ्याकडे इतकी माहिती नाही की ज्यावरून रामदेवरायाने ज्ञानेश्वरांना आश्रय* दिल्याचे दिसते. तसे काही ऐतिहासिक संबंध आहेत का? (हे चॅलेंज नाही, कुतूहल आहे.) कोणाकडे अधिक माहिती असल्यास कृपया पुरवावी.

* आश्रय म्हणजे ज्ञानेश्वर रामदेवरायाच्या राज्यात राहत होते. त्यांना कधी हाकलले गेले नाही म्हणजे आश्रय होताच असा युक्तिवाद कृपया नको.

उद्विग्नतेतून ...

सावरकरांचा तो लेख आधीच वाचला होता. देवगिरीचे हिंदू साम्राज्य अल्लाउद्दीन खिल्जीने बुडवल्यामुळे आलेल्या उद्विग्नतेतून बळीचा बकर्‍याचा शोध घेणे सुरू झाले आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर सापडले. ज्ञानेश्वर देवगिरीच्या राज्याच्या पदरी होते याला माझ्या अल्प माहितीनुसार कसलाही पुरावा नाही. सावरकरांच्या लेखनात नेहमी इतिहास कमी आणि अभिनिवेश जास्त दिसतो.

मूळ मुद्दा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखातील मूळ मुद्दा काय आहे तो कृपया लक्षात घ्यावा.रामदेवरायाचा पराभव का झाला हा मुद्दाच नाही.ज्ञानेश्वर हे या पराभवाला कारणीभूत आहेत असे म्हणण्याचा वेडेपणा कोणीही केलेला नाही.स्वा.सावरकरांच्या लेखात तसे दूरान्वयानेही सूचित केलेले नाही.
*त्याकाळी रामदेवरायाच्या राज्यात ज्ञानेश्वर, चांगदेवादि अष्टसिद्धीप्राप्त असे अनेक योगी होते.
*अष्टसिद्धींमध्ये प्रपत्ति नामक सिद्धी आहे.तिच्या प्राप्तीने त्रिकालाचे ज्ञान होते.
*सिद्धींचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी करू नये हे खरे.पण अशा प्रसंगी परचक्र येत आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून राजाला तशी पूर्वसूचना देण्यात काही दोष नसावा.
*त्याकाळी चांगदेव,ज्ञानदेव यांची कीर्ती दूरवर पसरली होती.ती राजाच्या कानी गेलीच असणार.तेव्हा पूर्वसूचना देणे बिकट नव्हते.
*एवढेच कशाला, 'वशित्वम्' सिद्धीने कोणालाही आपल्या नियंत्रणाखाली आणता येते.त्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टान्त देता येतो.
*अनुमान असे की सिद्ध योगिराजांतील कोणाहीपाशी असे सामर्थ्य नव्हते.असते तर त्यांनी आगामी परचक्राचे वृत्त राजाच्या कानी घातले असते.
*अंततः निष्कर्ष असा की अष्टसिद्धी आणि त्यांयोगे प्राप्त होणारे चमत्कारसामर्थ्य या गोष्टी भ्रामक आहेत.
लेखातील मूळ मुद्दा हाच आहे.

सोयीचे मुद्दे

लेखातील मूळ मुद्दा काय आहे तो कृपया लक्षात घ्यावा.रामदेवरायाचा पराभव का झाला हा मुद्दाच नाही.ज्ञानेश्वर हे या पराभवाला कारणीभूत आहेत असे म्हणण्याचा वेडेपणा कोणीही केलेला नाही.

असे मी तरी म्हटलेले तुम्हाला दिसले का, तर मग वरच्या वाक्याचे प्रयोजनच नाही.

तुम्ही जे या वाक्याखाली मुद्दे लिहिलेत त्यापैकी

त्याकाळी चांगदेव,ज्ञानदेव यांची कीर्ती दूरवर पसरली होती.ती राजाच्या कानी गेलीच असणार.तेव्हा पूर्वसूचना देणे बिकट नव्हते.

हे फक्त गृहितक आहे. त्यांच्या किर्ती राजाच्या कानी गेली होती किंवा नव्हती याबाबत ऐतिहासिक दाखल्यांशिवाय भाष्य आणि त्यावरून काढलेले अनुमान सयुक्तिक नाही. अद्यापही इतरांना आवाहन आहे की रामदेवराय हा ज्ञानेश्वरांचा आश्रयदाता होता याबाबत काही दाखले असतील तर द्यावेत. अन्यथा, त्याने किर्ती ऐकली असेल वगैरेला महत्त्व राहत नाही. अनेक बाबाबुवांना आम्ही भोंदू मानतो. अनेक विद्वानांना राजांनी राज्याश्रय न देता हाकलून दिल्याची उदाहरणेही आहेत. उदा. चाणक्य-नंद संबंध. रामदेवराय वेगळा होता असे का मानावे!

अनुमान असे की सिद्ध योगिराजांतील कोणाहीपाशी असे सामर्थ्य नव्हते.असते तर त्यांनी आगामी परचक्राचे वृत्त राजाच्या कानी घातले असते.

तुमच्या अनुमानासाठी दिलेले उदाहरण पोरकट आहे. मी तुम्हाला वर उदाहरण दिले. अमिताभची प्रसिद्धी जगभर आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कानी गेली असणारच तर मग अमिताभने राज्यकारभाराविषयक किंवा परकीय आक्रमणाविषयी काही सूचना (सूचनाच, अण्णांसारखे आंदोलन नाही.) दिल्या तर पंतप्रधान, मुख्यमंत्री त्या मानणार का?

एवढेच कशाला, 'वशित्वम्' सिद्धीने कोणालाही आपल्या नियंत्रणाखाली आणता येते.त्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टान्त देता येतो.

अशा कोणत्याही सिद्धींवर माझा विश्वास नाही तरीही तुम्ही वरचे ठोस वाक्य केलेत तेव्हा ते करण्यासाठी वशिकरणासाठी त्या व्यक्तीची काही वस्तू सोबत बाळगावी लागते का? किती अंतरात ती व्यक्ती असेल तर वशीकरण घडते? त्याचा अंमल किती काळ टिकतो? याबाबत तुमच्याकडे माहिती आहे का? मला वाटते नसावी. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नाही (आणि हे तुम्हाला आणि तुमचे मित्र जर वशीकरणाचा अष्टसिद्धी म्हणून उदोउदो करत असतील तर त्यांनाही) तर उगीच त्यावर लेख कशाला पाडायचे?

तर्कदुष्ट

त्याकाळी रामदेवरायाच्या राज्यात ज्ञानेश्वर, चांगदेवादि अष्टसिद्धीप्राप्त असे अनेक योगी होते.
*अष्टसिद्धींमध्ये प्रपत्ति नामक सिद्धी आहे.तिच्या प्राप्तीने त्रिकालाचे ज्ञान होते.
*सिद्धींचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी करू नये हे खरे.पण अशा प्रसंगी परचक्र येत आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून राजाला तशी पूर्वसूचना देण्यात काही दोष नसावा.
*त्याकाळी चांगदेव,ज्ञानदेव यांची कीर्ती दूरवर पसरली होती.ती राजाच्या कानी गेलीच असणार.तेव्हा पूर्वसूचना देणे बिकट नव्हते.
*एवढेच कशाला, 'वशित्वम्' सिद्धीने कोणालाही आपल्या नियंत्रणाखाली आणता येते.त्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टान्त देता येतो.

इथपर्यंत ठीक.
*अनुमान असे की सिद्ध योगिराजांतील कोणाहीपाशी असे सामर्थ्य नव्हते.असते तर त्यांनी आगामी परचक्राचे वृत्त राजाच्या कानी घातले असते.

इथे मोठ्ठा प्रॉब्लेम.

सिद्ध लोकांनी परचक्राची सूचना राजाला दिली नाही याबद्दल ऐतिहासिक पुरावा आपल्याजवळ आहे का? नुसता पराभव झाला म्हणून सिद्धांनी सूचना दिली नसलीच पाहिजे हा तर्क अपुरा आहे.

१. सिद्धांनी सूचना दिली, राजाने यथाशक्ति तयारी केली आणि तरीही पराभव झाला
२. सूचना दिली , राजाने धुडकावून लावली, गाफील राहिला आणि पराभूत झाला

या दोन शक्यता कशाच्या आधारावर चूक ठरवणार?

सिद्धांनी सूचना दिली किंवा दिली नाही अश्या कोणत्याच बाजूने ठोस पुरावा नसताना केवळ आपल्याला सोयीचे म्हणून "सूचना दिली नाही" हा निराधार तर्क स्वीकारायचा आणि त्याबद्दल सिद्धांना दोष द्यायचा हा केवळ मतलबीपणा आहे.

केविलवाणे तर्कशास्त्र

त्या अर्थी असे चमत्कारसामर्थ्य कुणाजवळ नसते असा निष्कर्ष निघतो.त्यासाठी स्वा.सावरकरांनी हा दाखला दिला आहे

श्री श्री सावरकर बाबांनी असे असे म्हटले आहे असे असेल तर ठीकच आहे.
आपल्या युक्तीवादामध्ये एका राजकीय घटनेमध्ये एका आध्यात्मिक व्यक्तीला ओढून ताणून पार्टी करताना सावरकरांनी केलेले इंटरप्रिटेशन आपण आधार म्हणून वापरले आहे. आता यात दोन दृष्टीकोन मिसळून एक कडबोळे झालेले आहे. सावरकरांचे ऐतिहासिक विश्लेषण हे त्यांच्या स्वतःच्या ऐतिहासिक कार्याच्या गरजेच्या संदर्भात होते. ते काही ऍकॅडेमिक इतिहासकार नव्हते, त्यांना तसे व्हायचेही नसेल, त्यांचा तसा उद्देशही नव्हता. ते स्वत:च एक इतिहास घडवणारे होते. स्वत:ची भूमीका ठासून मांडताना, इतिहासाचे एक राष्ट्रवादी विश्लेषण त्यांनी केले. ती त्यांची तेंव्हाची गरज होती. परंतु तटस्थपणे शक्य तेवढ्या शक्यता लक्षात घेऊन देवगिरीच्या पाडावाची कारणे शोधताना सध्याचे इतिहास अभ्यासक केवळ लष्करी सामर्थ्याची मीमांसा करून थांबत नाहीत, तर ते राज्य कोणत्या अधिष्ठानावर उभे होते, समाज राजसत्तेकडे कसे पहात होता, त्याची राजकारणात कितपत रुची होती, कितपत स्थान होते, की उदासीन होता, या सर्व बाबी लक्षात घेतात. या दृष्टीने खरेतर ज्ञानेश्वरांना श्रेयच दिले पाहिजे. ते समाजाला जागेच करत होते. देवगिरीच्या पाडावाची मूळ कारणेच दूर करत होते, समाजाला जागे करून. त्यांनी पाया घातलेल्या वारकरी पंथानेच पुढे शिवाजी महाराजांना एक उत्तम सोशल व्हेइकल दिले, आणि यशस्वी केले.

हे राहिले बाजूला आणि वेगळेच तर्कविसंगत आणि हास्यास्पद संबंध जोडत बसायचे. अंधश्रद्धांवर हल्ले जरुर करा. पण त्यासाठी महान ऐतिहासिक कार्य केलेल्या व्यक्तीचे अवमूल्यन का? सावरकरांनी केले म्हणून आपणही करुया असे काही आहे का? त्यांचा उद्देश वेगळा होता. आपला उद्देश वेगळा आहे. त्यासाठी संतांना वेठीला धरण्याअगोदर त्यांचे ऐतिहासिक कार्य लक्षात घेऊन त्याला अगोदर मान्यता देऊ, मग ते चमत्कार वगैरे बोलू.

 
^ वर