शिळावर्तुळे आणि लोहयुग
शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते. बरेचदा यात मध्यभागी एकाचे किंवा अनेकांचे दफन केलेले असते. भारतातही शिळावर्तुळे अनेक ठिकाणी दिसतात. थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांवर हा लेख जालावर मिळाला. महाराष्ट्रात माहूर येथे ती आहेत असे मी पु.नी फडक्यांच्या पुस्तकात वाचले होते. त्यांच्या मते ही पद्धत शकांची आहे. या शिळावर्तुळांमुळे त्यांची ठिकाणे निश्चित होतात.
नागपूर पासून उमरेड कडे जाणार्या रस्त्यावर काही शिळावर्तुळे आहेत. त्यात डेक्कन कॉलेज पुणे यांनी उत्खनन केले होते. उत्त्खननात मृतांचे अवशेष मिळाले. कार्बन डेटिंग मुळे त्यांचा काळ समजला तो साधारण इ.स.पूर्व ५०० असावा. (याबाबतचा दुवा वा संदर्भ मिळाला नाही. माहिती पु.नि. फडक्यांनी दिली.) याच ठिकाणी एका वर्तुळात एक भट्टी सापडली. ही भट्टी सध्या डेक्कन कॉलेज मधे आहे. या भट्टीत लोखंड तयार होत होते.
लोहयुग येणे हा तंत्रयुगातील एक मोठा टप्पा. तत्पूर्वी ताम्रयुगाचा मोठा काळ होता (? ब्रॉन्झ). पण लोहयुगानंतर लढाई(हत्यारे), शेती (लोखंडी नांगरामुळे कठीण जमिनीत शेती करता येणे.), मूर्तिकला इत्यादिंवर मोठा परिणाम झाला. मध्य भारतात लोखंडाचे खनिज आणि दगडी कोळसा असल्याने या भागात लोखंड बनवणे जास्त सोपे होते. इ.स.पूर्व १२०० मधे लोहयुग आले. कर्नाटकात या काळातले लोहयुगाचे अवशेष सापडतात. (विकीची माहिती.)
नागपूरच्या अगदी जवळ म्हणजे १०-१२ कि.मि.मधे काटोल रोड ला जुना पानी नावाचे ठिकाण आहे. काटोलरोड वर टोल नाका आहे हा टोल नाका पार केल्यावर साधारण ३ कि.मि. अंतरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांना या ठिकाणाची कसलेसे (शंकराचे?) मंदिर असल्यामुळे ओळख आहे. या मंदिराच्या फाट्या समोर माळरान आहे. या माळरानावर शिळा वर्तुळे आहेत. पु.नि. फडक्यांविषय काढला, आणि इतक्या जवळ असल्याने ताबडतोब जाण्याचा निर्णय घेतला. (साधारण पणे सव्वा तासात आम्ही घरी परतलो देखिल.) या ठिकाणी कुठलेही उत्खनन झाले नाही. या जागेवर शेती होत नव्हती. याचे कारण कदाचित पुरातन दफनक्षेत्रामुळे रीतीरिवाजा पैकी हा एक भाग असेल. स्थानिकांना मात्र शिळावर्तुळांबद्दल काही माहिती नव्हती. (देवळात जाणार्या एका दोघांना आम्ही विचारले त्यावरून हा अंदाज.)
रस्ता ओलांडल्यावर जवळपास लगेचच ही शिळा वर्तुळे दिसायला लागतात. आम्ही नीट वेळ काढून गेले नसल्याने आणि चिखल असल्याने सर्व भाग नीटसा धुंडाळला नाही. (परत जाऊन किती वर्तुळे, काय मापे अशी मोजमाप करण्याचा विचार आहे.) याशिवाय सोबत कॅमेरापण नेला नव्हता. तेव्हा छायाचित्रे मोबाईल कॅमेरातूनच काढता आली. जमीनीवर दीड दोन फूट उंच (आत किती माहित नाही.) अशा शिळा वीस फुटाच्या व्यासात मांडून ठेवल्या होत्या. दगड एवढे मोठे की काही कारण नसले तर कोणी त्यांना हलवणार नाही. एवढ्या वर्षांनंतर त्यांचा आराखडा बदलला नव्हता. दगडातच भोके करून तेल (चरबी) आणि वात लावण्याचे ठिकाण होते. या ठिकाणा बद्द्ल माहिती सांगताना पु.नि.फडके रंगून गेले होते.
" alt=""> |
" alt=""> |
" alt=""> |
" alt=""> |
पु.नि.फडक्यांनी लिहिलेल्या शकांसंबंधीच्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी लिहिले होते. त्यांच्या लेखांचा दुवा त्यांनी मला यावेळी दिला. लोखंडाच्या खनिजापासून लोखंड तयार करण्यासाठी जास्त तापमान आणि हवेशी संपर्क टाळणे या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. (तांब्यासाठी या अडचणी कमी असतात.) लोहखनिज आणी दगडी कोळशाची पूड मातिच्या कुपीत भरून भट्टीत टाकायची. आणि तापमान वाढले की लोहखनिजातील ऑक्सिजन कार्बनशी संयोगित होतो आणि लोहाचा रस आणि कर्बद्विप्राणिद बाहेर पडतो. असे काहीसे ते वर्णन करीत होते. या काळातील भारतीय लोखंड जगभर (तेव्ह्याच्या जगाच्या व्याप्तित) जात असे. आणि ते अतिशय प्रसिद्ध होते. शिळावर्तुळातल्या शिळेवरच्या पणत्यांच्या भोकांमधे लोखंडी हत्यार वापरले असणार. एवढेच नाही तर या शिळांना कदाचित तासून (एकसारख्या आकाराच्या होईपर्यंत) ठेवले होते. या दोन्ही लोहयुगाच्या खुणा येथे होत्या.
थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांबाबत वाचताना हे जाणवले की अशी ठिकाणे असली तरी त्याचे उत्खनन होत नाहीत. कारण आर्किऑलॉजिकल विभागाकडे एवढा पैसा नाही. जुनापानी येथील शिळावर्तुळे देखिल उत्खननास कधी येतील हे माहित नाही. स्थानिक आख्यायिकांमुळे कदाचित ही अद्याप टिकून आहेत. पण पुढील काळात वाढत्या शहराच्या गरजांमुळे लुप्त देखिल होऊ शकतात.
प्रमोद
Comments
उत्खनन
अतिशय उत्तम माहिती आणि छायाचित्रे. युरोपात आणि मध्य आशियात अनेक 'मेगॅलिथ्' माहीत आहेत तसेच काहीसे हे दिसत आहे. लेखातील दुवे वापरून अधिक वाचन करेनच. (मेगॅलिथबाबत प्राथमिक माहितीसाठी पहा http://en.wikipedia.org/wiki/Megalith)
तदनुषंगाने माझ्या डोक्यातील एक विचार माडण्याची ही संधि मी घेतो. काही वर्षांपूर्वी वरंध घाटच्या पायथ्यापाशी असलेल्या शिवथर घळीला मी जाऊन आलो. दासबोधाच्या लिखाणाची जागा म्हणून ती सर्वांस ठाऊक आहेच. मला असे वाटले की आदिमानवांना वसती करण्यासहि घळ अतिशय योग्य जागा आहे. पन्नास-शंभर माणसे सहज राहू शकतील अशी प्रशस्त गुहा आणि शेजारीच पाण्याचा मुबलक पुरवठा करणारा धबधबा/ओढा, आसपास भरपूर सपाट जागा ह्यांमुळे आदिमानवांची तेथे प्रदीर्घ काळ वसती असणे सहज शक्य आहे आणि तेथे उत्खनन केले तर महराष्ट्रातील आदिमानवाच्या अस्तित्वाचा दुवा तेथे सहज मिळू शकेल असे वाटते.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्यामध्ये उत्खनन केले जाणे आवश्यक आहे. सुमारे हजार-पंधराशे वर्षे सतत वापरात राहिलेल्या अशा किल्ल्यांच्या जमिनीखाली कायकाय मिळू शकेल ह्याची कल्पनाच करवत नाही.
टोरोंटोला सगळा मिळून (युरोपीय संपर्कानंतरचा) इतिहास दीडदोनशे वर्षांचाच आहे. पण कोठलीहि पुरेशी जुनी इमारत पाडुन नवी बांधायची असेल तर प्रथम उत्खनन करून जुने अवशेष शोधले जातात आणि मगच नव्या बांधकामाला मंजुरी मिळते.
+१
सहमत. नेहमीप्रमाणेच उत्तम व नाविन्यपूर्ण माहिती.
माहितीपूर्ण
उत्तम माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
चांगला
माहितीपूर्ण लेख.
शिळावर्तुळांचे दगड फार मोठे दिसत नाहीत. यांचा काळ इसपू ५०० असेल तर अडीच हजार वर्षांत ते निसर्गाच्या तडाख्यात जमिनीत पुरले जाऊन दिसेनासे झाले नाहीत हे ही एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
नितिन थत्ते
वेगळी माहिती
वेगळी माहिती लेख आवडला. श्री फडके यांचे इतर लेखन मराठीत आणण्याला प्राधान्य द्यावे ही विनंती.
मी असे 'ऐकले' होते की हे लोखंड तलवारी बनवण्यासाठी उत्तम असत असे. असे लोह मोरोक्कोला निर्यात केले जात असे तेथे त्याची तलवारी सारखी शस्त्रे बनत. हीच शस्त्रे घेऊन मुस्लीम आक्रमक भारतावर आक्रमणे करत. ही माहिती ऐकीव आहे. जाणकारांनी यावर अजून प्रकाश टाकावा.
-निनाद
"येमेन" असावे.
"असे लोह मोरोक्कोला निर्यात केले जात असे तेथे त्याची तलवारी सारखी शस्त्रे बनत"
~ कदाचित 'येमेन' असावे. छोट्यामोठ्या इस्लामिक राष्ट्रांच्या सीमारेषांचे अवलोकन केल्यास त्या सर्वांना शस्त्रांसाठी येमेन हे मोरोक्कोपेक्षा जवळचे होते. शिवाय इस्लाम वा त्या पूर्वकाळात येमेनच्या तलवारीविषयी संग्राहक आणि प्रवासी यानी तारीफ केल्याचे उल्लेख आढळतात. ऍलन जोन्सच्या "अर्ली अरेबिक पोएट्री" मध्ये येमेनी तलवारीचा उल्लेख सापडतो :
"ही रोड् टेरर अलोन्, अकम्पनीड् ओन्ली बाय अ नॉच्ड् येमेनी स्वोर्ड"
'येमेन' वरील काही प्रवासवर्णनात असेही आढळते की, हा देश म्हणजे केवळ जिराफ आणि माकडे यांच्यासाठीच प्रसिद्ध नसून तिथल्या तलवारींच्या ऐटदारपणासाठीही त्या काळात प्रसिद्ध होता. हिंदुस्थानातील शुद्ध पोलाद आणि त्यापासून तलवारी तयार करण्यातील येमेनी खासियत सर्व लढवय्यांसाठी हवीहवीशी वाटणारी बाब होती. [अर्थात हिंदुस्थानासमवेत सिलोन आणि इराणमधून आयात केल्या जाणार्या लोखंडाचाही इस्लाम राष्ट्रांत तलवारी आणि तत्सम शस्त्रे तयार करण्यासाठी वापर होत असे.]
दमास्कस
अशा तलवारी दमास्कसला बनत असाव्यात. हा दुवा पहावा.
प्रमोद
तलवार
धन्यवाद प्रमोदजी ~ छान माहिती मिळाली 'दमास्कस' च्या दुव्यातून. माझी माहिती ढोबळमानाने जोन्सच्या कवितेच्या अनुषंगाची आहे. शिवाय जपानच्या 'समुराई' परंपरेतील फार प्रसिद्ध असलेल्या 'कट्टाना' नामक तलवारींचा स्त्रोत येमेनमध्ये आहे असे मानले जाते. पुढे अर्थात जपान स्टीलनेही त्यात जबरदस्त आघाडी घेतली आणि मग तो तेथील [जपानमधील] घरगुती व्यवसायही बनला. उच्च दर्जाच्या पोलादापासून तयार केल्या जाणार्या कट्टानाची आश्चर्य वाटावी अशी आजही २० ते २५ हजार अमेरिकन डॉलर्स इतकी किंमत असते.
जगभर प्रचंड व्यवसाय केलेल्या 'हिडन ड्रॅगन एण्ड् क्रॉऊचिंग् टायगर' मधील ती दैवी मानली गेलेली 'ग्रीन डेस्टिनी' नामक लांब पल्लेदार तलवार मात्र पूर्णतया चीनी परंपरेतील आहे; जी तयार करताना मानवी हाडांचाही रसायनात वापर करण्याचे तिथले शास्त्र आहे.
[असो. काहीसे अवांतर झाले आहे तुमच्या मुख्य धाग्याच्या विषयापासून, तरीही एक रंजक आणि पूरक माहिती म्हणून या 'तलवार' नोंदीकडे आपण पाहावे.]
रोचक
माहिती रोचक तर आहेच शिवाय भारतात या अभ्यासाकडे होणार्या दुर्दैवी दुर्लक्षालाही अधोरेखित करणारे आहे. माहितीबद्दल आभार. दुवे देखील माहितीपूर्ण आहे. श्री. फडके यांनाही उपक्रमचे सभासदत्व घेण्यास सांगावे.
प्रस्तुत उदा. नागपूर जवळचे आहे. अगदी मुंबईत (राजधानीत) परिस्थिती तितकीच -किंबहुना अधिकच- भयावह आहे.
गुप्त काळातील चार महत्त्वाच्या गुंफांपैकी (एलिफंटा गुंफा, महाकाली गुंफा, जोगेश्वरी गुंफा, आणि मंडपेश्वर गुंफा) केवळ एलिफंटा (भभौगोलिक दृष्ट्या वेगळी असल्याने व वर्ल्ड हेरिटेज झाल्याने असेल) तुलनेने सुरक्षित आहे. बाकी तीनही भयाण अवस्थेत आहे.
दहिसरमधील मंडपेश्वर गुंफेच्या तर छतावरच ख्रिस्तीचर्च आणि त्याचे ग्रेवयार्ड आहे. खुद्द राजनधानीत ही व्यथा तर अन्यत्र काय बोलावे.
तुमच्या एका दुव्यातून ही माहिती मिळाली. ही तुम्ही गेलेल्या ठिकाणाचीच आहे ना? त्याचे नाव दृगधाम असे वाचावे का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अमरावती रोड
मी काटोल रोडला गेलो होतो. अमरावती रोड वरील शिळावर्तुळे बघितली नाहीत. दुव्यातील माहिती बहुदा दुसरीकडची असावी.
प्रमोद
चांगला विषय आणि लेख
या विषयावर अधिक माहिती मिळाली तर उत्तम. श्री. पु.नी.फडके यांना उपक्रमावर आमंत्रित करता येईल काय?
द हिंदू या दैनिकात शेवटच्या पानावर बर्याचवेळा अशा विषयांवरचे लेख येतात. त्यांतील एका लेखात
आंध्रातील एका शिळावर्तुळावर मोठा प्रस्तर ठेवल्याचे प्रकाशचित्र पाहिले होते.(मानवनिर्मित गुहा.)
काही टन वजनाचा सपाट प्रस्तर त्याकाळी (इ.स्.पूर्व) लोकांनी उंच टेकाडावर कसा
चढवला आणि त्या शिळांच्यावर कसा ठेवला? असा अचंबा वाटला होता.
अवांतर :
हैदराबादेत अशा शिळावर्तुळांवर नागरी वस्तीचे आक्रमण सुरूच आहे.
http://hindu.com/2010/11/30/stories/2010113062630500.htm
http://www.hindu.com/2010/02/02/stories/2010020257900300.htm
अधिक माहिती
या बातमीत ही कटोल रोडची शिळावर्तुळे कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्याने सन १९३० नंतर पुन्हा शोधली गेल्याचे म्हटले आहे.
तसेच Megalithic Pochampad: The Skeletal Biology and Archaeological Context of an Iron Age Site in
Andhra Pradesh India या आंतरजालावर उपलब्ध पुस्तकात दिलेल्या चित्रात नागपुरजवळील 'स्तायून(?) कलूर' येथील प्रस्तराच्छादित शिळावर्तुळ (तिल्लोटा - दगडी कढई) दिसते. हे चित्र इ.स्. १८७२ मधले आहे. सध्या या ठिकाणाची काय अवस्था आहे? हे वर्तुळ अस्तित्वात आहे का?
गुगल वरील चित्र
उपग्रह चित्रात शिळावर्तुळे मला अशी दिसली.
२१-११-५५.७० उत्तर (डिग्री मिनिट सेकंद) आणि ७९-००-०८.०४ पूर्व
पूर्वी चुकून रेखांशात लिहिताना चूक झाली होती. (ऋषिकेश यांचे आभार).
प्रमोद
चांगली माहिती
चांगली माहिती. प्रतिसादांतही.
प्रातिनिधिक स्थळांचे उत्खनन झाले पाहिजे : सहमत.
अवांतर १ : नवीन बांधकाम होताना जुन्या स्थळांना मुळीच धक्का पोचणार नाही, अशी अपेक्षा अतिरेकी वाटते. भारतासारख्या प्राचीन देशात ठायी-ठायी हजारो वर्षांच्या मानवी वास्तव्याचे कुठले ना कुठले अवशेष असतील. पण अर्थात कायदेशीर देखरेखही असावी.
अवांतर २ : दुव्यावर दिलेले श्री. पु. नि फडके यांचे आणखी काही इंग्रजी लेखही वाचले. माहितीचा दर्जा कमीअधिक आहे. श्री. फडके यांना उपक्रमावर आमंत्रित करावे, +१.
सुरेख आणि
सुरेख आणि माहितीपूर्ण संकलन. फक्त सर्व जगात एकाच वेळी (म्हणजे इस् १२०० नंतर वगैरे) लोहयुग् सुरु झाले अशातला भाग नसावा.
एकाच वेळी जगाच्या काही भागात लोहयुग्, कुठे ताम्रयुग सुरु होते हे नमूद करावेसे वाटते.
उदा:- अति प्राचीन इजिप्शियन लोक पिरॅमिड बांधत होते, त्याकाळात त्यांनी लोहाचा वापर सुरु केलेला होता. मात्र त्याच काळात इतरत्र् लोहयुग् अवतरले नव्हते.
इ.स्. पूर्व ५०० काळात असणार्या अवशेषांनाही शकांशी संबंधित् म्हणताय का? तसे असल्यास पटत नाही. शक हे त्याकाळाच्या कित्येक शतकांनंतर आले होते.
--मनोबा
पिरामिडच्या वेळी हत्यारे ताम्र-धातूंची
पिरामिडच्या वेळी हत्यारे ताम्र-धातूंची होती असे कुठल्याशा माहितीपटात बघितलेले आठवते.
दुरुस्तीबद्दल आभार...
पण गुगलून पाहिल्यावर लोह युगाच्या समर्थनार्थही काही लिंका मिळाल्या. आणि पिरॅमिड जरी ताम्रपाषाण युगात बनली असे मानले तरी ते एक उदाहरण होते. मुद्दा असा मांडायचा आहे की काही ठिकाणी लोह् युग सुरु होउन गेल्यावरही इतरत्र बर्याच काळ ताम्र युग होते किंवा उलट्. काही ठिकाणी ताम्र युग असताना त्याच्याच (आजकालच्या) आसपास लोहयुग होते.
--मनोबा
लोहयुग आणि शक
लोहयुग (वा कुठलेही युग) हे एकत्रित पणे सुरु होत नसणारच. (आजचे संगणक युग हे देखिल कधी सुरु झाले? सर्वत्र आहे का? पास्कलच्या यंत्राला संगणक म्हणायचे का? ) इजिप्त मधे लोहाचा परिचय होता की नव्हता याबद्दल मला काही माहिती नाही. मात्र तांब्याच्या खनिजापासून तांबे बनवताना कदाचित लोहाचे आंशिक परिवर्तन होत असणार. (हा माझा अंदाज.) पण हमखास लोह करणे आणि त्याचा वापर सुरु होणे यासाठी कदाचित इ.स.पूर्व १२०० उजाडले असेल.
एके काळी लोकसंख्या अतिशय कमी असल्याने भटक्या स्वरुपातील शक (जे प्रामुख्याने मेंढपाळ होते.) भारतात येऊ शकतात. भारतातील त्यांचे राज्य इ.स.पूर्व २३० ते इ.स. २३० पर्यंत असावे (हे राज्य शकांचे होते असा फडक्यांचा दावा आहे.). लोहयुगापूर्वी दख्खनच्या पठारावर शेती होणे कठीण होते. (जमीन जास्त कठीण असल्याने.) तेव्हा मध्य भारतात हे मेंढपाळ राहू शकतात.
प्रमोद
शक
शक म्हणजे Scythinan. ह्यांनाच पर्शियामध्ये क्षत्रप-सत्रप म्हणून ओळखले जात होते. ह्यांचे राज्य भारताच्या पश्चिम भागात होते आणि त्यांच्या नाणी आणि लेखांवरचे म.म. वा.वि. मिराशींचे History and Inscriptions of the Shatavahanas and the western Kshatrapas हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
हे लोक जरी भारताबाहेरून येथे आले तरी येथील अन्य राजसत्तांप्रमाणे आपल्या राजकीय सत्तेचे प्रतीक म्हणून हे आपल्या कारभारात संस्कृतचा उपयोग करत असत. जुनागढ
गावाच्या सीमेवर गिरनारची चढण सुरू होते तेथे रस्त्याच्या कडेला एक प्रदीर्घ संस्कृत शिलालेख बघावयास मिळतो. महाक्षत्रप रुद्रदामन् ह्याच्या एका अधिकार्याने तेथील नदीवर बांधलेला सुदर्शन नावाचा तलाव वादळात बांध फुटून वाहून गेल्यानंतर दुरुस्त केला आणि त्या कामाचे वर्णन त्या शिलालेखावर लिहून ठेवले आहे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
अधिकार्याचे नाव सुविशाख आणि तो स्वतःला पह्लव म्हणवून घेतो. आपल्या लेखात तो रुद्रदामनच्या पराक्रमांचे आणि त्याच्या गो-ब्राह्मण प्रतिपालनचे, तसेच दक्षिणापथाचा राजा सातकर्णि ह्याच्या पराभवाचे वर्णन करतो.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
हा लेख अशोकाचा आहे असे बर्याच जागी लिहिलेले आढळेल पण ते बरोबर नाही. लेख ब्राह्मी लिपीत आहे पण रुद्रदामनचा आहे. लेखाचे संपूर्ण भाषांतर http://www.sdstate.edu/projectsouthasia/upload/JunagadhRockInscription-o... येथे पहा.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
विक्रमादित्याने शकांचे उच्चाटन केल्याची स्मृति म्हणून शक कालगणना सुरू केली असा समज आहे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
(वरील फोटो http://indianetzone.com/ येथून Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License प्रमाणे वापरलेला आहे.)