शब्दसंग्रह- खेळांची नावे

नमस्कार मंडळी,

उपक्रमींना आठवत असल्यास, साधारण वर्षभरापूर्वी आपण 'भांड्यांची नावे' असे विविध विषय घेऊन शब्दसंग्रह केले होते. आपणा सर्वांस हे सांगताना मला आनंद होत आहे, की या शब्दसंग्रहांचा सध्या चालू असलेल्या एका विश्वविद्यालयीन प्रकल्पासाठी 'प्राथमिक सर्वेक्षण' म्हणून उपयोग होत आहे. या प्रकल्पाचा उपयोग पुढे जाऊन समस्त मराठी भाषकांना होणार आहे. या प्रकल्पासंबंधी अधिक माहिती यथावकाश उपक्रमावर दिली जाईलच. दरम्यान आपण अधिक विषय घेऊन शब्दसंग्रह करुया.

आताचा विषय आहे, लहानपणीचे खेळ आणि त्यांची नावे. या उपक्रमाचा उद्देश आहे खेळांसाठीचे मराठी शब्द व त्यांचे अर्थ, त्यांच्याशी संबंधित समजुती, प्रथा गोळा करणे. उदाहरणार्थ- 'पत्ते' हा खेळ आपण घेतला, तर त्यासंबंधाने 'उतरी करणे' वगैरे शब्द येतील. त्याचप्रमाणे काही भागांत पत्ते खेळणे अशुभ मानले जाते, तर काही विशिष्ट सणांना शुभशकुन म्हणून मुद्दाम पत्ते खेळले जातात असे समज, रुढी आपल्याला नोंदवता येतील. शब्द गोळा करण्याखेरीज लहानपणच्या आठवणींना उजाळाही या निमित्ताने मिळेल. चला तर मग, खेळांशी संबंधित शब्द गोळा करुया.

राधिका

Comments

शुभेच्छा

शुभेच्छा.

गोट्या - शब्द - गल (खेळायसाठी खणलेला छोटा खड्डा) , बंटा (मोठी गोटी), वीत
विटी-दांडू
लंगडी
लगोरी
अप्पा-रप्पी
रुमाल-पाणी

- जसे आठवतील तसे टाकत राहीन.

बंटा

मोठ्या गोटीला (चुन्याच्या) डफ/ढप असाही शब्द होता. किंवा सरळ "गोटा"ही म्हटले जायचे.

नितिन थत्ते

बंटी

आम्च्या कडे त्याला आट्टू असे संबोधतात.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

धन्यवाद

अप्पा-रप्पी आणि रुमाल-पाणी हे खेळ कसे खेळतात ते सांगू शकाल का?

राधिका

आठवण

अप्पा - रप्पी - हा खेळ दुपारची शाळा सुरु होण्याआधी खेळत असू, ह्यात ज्याचा हाती चेंडू येईल त्याने तो दुसऱ्याला (पळणाऱ्या खेळाडूला) फेकून पाठीवर मारायचा, पळणारयाने तो चुकवायचा, ज्याला सापडेल त्याने तो परत उचलून इतरांना मारायचा. फारसा विधायक खेळ नव्हता म्हणूनच खूप फेमस होता, एके-दिवशी प्राचार्यांना चेंडू लागला आणि आमचा खेळ बंद झाला, मग आम्ही रुमाल पाणी खेळायला लागलो..बहुदा चेंडू सगळ्यांच्या खिशातील रुमालाचा असत असे.

रुमाल पाणी - ह्यामध्ये ज्याचावर राज्य असते त्याच्या पायाजवळ रुमाल ठेवलेला असतो, बाकीचे सर्व गाडी तो रुमाल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणार, राज्य असलेला गाडी रुमाल जागेवरून हलू देणार नाही, पण बाकीचे रुमालाला हात लावताना ज्याचावर राज्य आहे तो त्यांना फटकावू शकतो. रूमला घेऊन जाताना पकडल्यास जायच्या हातात रूमला त्याच्यावर राज्य, पळून जाणारा राज्य असणारा शिवण्याआधी रूमला जमिनीवर टाकू शकला तर त्याचावर राज्य नाही. एकंदर फटकेबाजी करायला मिळते म्हणून हा पण फेमस झाला होता.

ह्याव्यतिरिक्त काही असल्यास बाकीच्यांनी त्यांचे व्हर्जन सांगावे.

डप्पर व गोटा

गोट्या - शब्द - गल (खेळायसाठी खणलेला छोटा खड्डा) , बंटा (मोठी गोटी), वीत

मोठ्या गोटीला जर ती काचेची असली तर आम्ही तीला 'डप्पर' म्हणायचो, सिमेंट सारखी दिसणारी (थत्ते म्हणतात त्याप्रमाणे चून्याची असली) तर तीला 'गोटा' म्हणायचो.

खेळून-खेळून खडबडीत झालेल्या गोटीला 'खडबूडी' म्हणायचो.

खेळ खेळताना डप्पर वा गोटा वापरायला आम्ही विरोध करायचो. कारण मोठ्या गोटीमुळे, खेळताना इतर गोट्या ज्या त्यापुढे लहान असल्यामुळे फुटून जायच्या. नव्या गोट्या आणायला घरच्यांकडे पैशासाठी विनंती करावी लागायची, याचमुळे ती कटकट टाळण्यासाठी तो विरोध असायचा. तरीही समोरचा खेळाडू डप्पर वापरण्याबाबत आग्रही असला तर म्हटले जाई - 'गोटी भरचूक'. म्हणजे 'माझी गोटी फुटली तर मला नवीन गोटी देण्याची तूला अट आहे.'
'नो भरचूक' म्हणजे 'नवी गोटी देण्याची अट अमान्य!'

परिभाषा

गोट्यांची एकूणच परिभाषा फार मनोरंजक आहे. धन्यवाद. आणखी आठवल्यास जरूर कळवा.

राधिका

गोट्यांचा असाही खेळ!

प्रकाश नारायण संत यांच्या 'लंपन'च्या एका कथेत त्यानी खालील किस्सा सांगितला आहे.

कुणी कुणाची गोटी मारली तर एकदम तो दहा पायऱ्या वर. मग हा मंत्र म्हणायचा:
"पंचापांडू - सह्यादांडू - सप्तपोपडे - अष्ट जिंकिले - नऊनऊ किल्ले - दश्श्यापेडा - अकलकराठा - बाळू मराठा - तिरंगी सोटा - चौदा लंगोटा - पंधराशी परिवळ - सोळी घारिवल - सतरम सीते - अठरम गरुडे - एकोणीस च्यकच्यक - वीस पकपक - एकवीस कात्री - बावीस रात्री - तेवीस त्रिकामफूल - चोवीस चोर - पंचवीस मोर "

या मंत्रांनी पोरांच्या समोर एक जादूची गुहाच उघडली....
(अवांतरः जुन्या बेळगांवकरानी हा अनुभव कदाचित घेतला असेल!)

हाडक्या

>>>>सिमेंट सारखी दिसणारी (थत्ते म्हणतात त्याप्रमाणे चून्याची असली) तर तीला 'गोटा' म्हणायचो.<<<<

आम्ही त्याला हाडक्या म्हणायचो.

ज्याच्यावर राज्य येईल त्याला गलीपर्यंत कोपराने हाडक्या ढकलावा लागे.

||वाछितो विजयी होईबा||

डबा

लहानपणी आम्ही "डबा ऐसपैस" नावाचा लपाछपीचा खेळ खेळत असू. त्यात "डबा उडवणे" आणि "बाटली फुटणे" (राज्य असलेल्याने चुकीच्या मुलाचे नाव पुकारणे) असे शब्द होते. गोट्यांच्या खेळात "एकलम खाजा" पासून खूपच अर्थहीन शब्द असत.

नितिन थत्ते

डबा उडवणे

म्हणजे काय?
राधिका

डबा उडवणे

राज्य असलेला मुलगा शोधकार्याला गेलेला पाहून डबा उडवणे. म्हणजे गेम रीस्टार्ट. पण डबा उडवण्याच्या आत राज्यवाला येऊन डब्यावर पाय ठेवून डबा वाचवू शकतो. आणि डबा उडवायला आलेला आऊट होऊ शकतो.

खेळाची पद्धत: राज्य आलेल्याने एका ठराविक जागी डबा ठेवायचा असतो. खेळ सुरू करताना डबा दूर फेकला जातो. राज्य आलेल्याने तो तेथून आणून ठरलेल्या जागी ठेवायचा. तेवढा वेळ इतरांना लपण्यासाठी उपलब्ध. म्हणून डबा शक्य तितका दूर फेकायचा. डबा घेऊन आल्यावर राज्यवाल्याने शोध मोहीम सुरू करायची. तो डब्यापाशी उभा राहून अनंतकाळ वाट पाहू शकतो. :-) किंवा साहस करून इकडे इकडे जाऊन शोध घेऊ शकतो.

नितिन थत्ते

अच्छा

इतके दिवस मला 'डबा ऐसपैस' म्हणजे काय हे माहित नव्हते. नीट स्पष्ट करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

राधिका

बाटली फुटणे

राज्य आलेला ज्याला शोधेल त्याचा पुकारा करतो. उदा. "नितीन डबाऐसपैस-घारेकाकांच्या ऍम्बेसेडरमागे". म्हणजे नितिन आऊट. मधल्या काळात नितिनने आपला शर्ट सतीश रावलेला घालायला दिलेला असतो. तो 'शर्ट पाहून' अंदाजाने राज्य आलेला नितिनच्या नावाचा पुकारा करतो तेव्हा सतीश रावले ऍम्बेसेडरमागून बाहेर येतो आणि "बाटली फुटली" असे ओरडतो. म्हणजे डाव पुन्हा पहिल्यापासून... डबा फेकणे..........

नितिन थत्ते

परफेक्ट

परफेक्ट. एकदम लहानपणात गेलो राव :)

"ऐसपैस" इंग्रजी व्युत्पत्ती आहे म्हणे

खेळाच्या नावातील "ऐसपैस"ची व्युत्पत्ती इंग्रजीमधील "I spy" आहे, असे ऐकले होते.

इंग्रजीभाषक देशांत "आय स्पाय" प्रकारचे खेळ बैठे असतात.

पिक् पिक्

'आय् स्पाय्' वरून आठवले. माझ्या लहानपणी मुख्यतः मुली एक खेळ खेळत असत. त्यातली एकजण एकादा अगदी सोपा प्रश्न विचारे आणि "पिक् पिक्" म्हणे. प्रश्न संपला रे संपला की लगेच (पिक् पिक् म्हणेपर्यंत) कोणीतरी त्याचे उत्तर सुरू करून देत असे. बराच विचार आणि चर्चा केल्यानंतरतासे लक्षात आले की मुळात तो शब्द "बी क्विक्" असा होता.

थप्पा-थप्पा

लहानपणी आम्ही मुंबईतील काळाचौकी-लालबाग विभागातील चाळीतच लहानाचे मोठे झालो. तीथे अशा पळापळीसाठी जागा कमी असायची. 'डब्बा ऐसपैस' हा शब्द व खेळ वेगळ्या पद्धतीने खेळायचो.

डब्या ऐवजी नारळाची (रीकामी) करटी वापरत असू. राज्य आलेल्या खेळाडूने करटीवर पाय ठेवून उभे रहायचे. करटी देखील उपलब्ध नसली तर ज्या मुलावर/मुलीवर राज्य आलं असेल त्याने/तीने भींती कडे पाठ करून एक ते पन्नास अंक मोठ्ठ्याने म्हणायचे. तेवढ्या वेळेत इतरांनी लपायचे. अंक म्हणून झाल्यावर राज्य आलेल्या खेळाडूने इतर खेळाडूंना हडकून काढायचे. हडकून काढले की त्या खेळाडूचे नांव घेत, आधी वापरलेल्या भींतीवर थाप मारत म्हणायचे, 'अमूक-तमूकचा थप्पा'.

:)

>>डब्या ऐवजी नारळाची (रीकामी) करटी वापरत असू.

हा हा हा.

आमच्याकडे डबा म्हणून हे सुद्धा चालत असे.

नितिन थत्ते

थोडे अधिक

एकेक खेळ आनि त्याची वर्जन घेणे सोयीस्कर वाटते. नाहितर शब्द सुचणे कठीण व्हायचे:

अनेक खेळांतील सामायिक शब्दः
राज्य, 'सुटणे' (हे सुटणे म्हणजे पहिले राज्य कोणावर यावे हे ठरविणे, याच्या पद्धती अनेक आहेत), भिडु, संघ, गट

खेळ: लपंडाव
काहि नावे / वर्जन्सः लपाछुपी, स्टॉप-स्टॉप, डबाऐसपैस
संबंधित शब्दः थप्पा/धप्पा, डबा फेकणे, बाटली फोडणे, स्टॉप

खेळः साखळी
काहि प्रकारः सोनसाखळी, अख्खी साखळी

खेळः कबड्डी / हुतुतु
संबंधित शब्दः पकड, कैची, पलटी, दम

खेळः खोखो
प्रकारः उभा खोखो, बैठा खोखो
संबंधित शब्दः खो, बॅक खो, पोल

खेळ: मल्लखांब
प्रकारः मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब
संबंधित शब्दः खांब, सरक, पकड, (खांबाच्या टोकावर उभे रहाणे याला एक खास शब्द आहे, कोणाला आठवतोय?)

खेळः पत्ते
संबंधित शब्दः उतरी, ट्र्म/जोकर, हात, गुलाम/गुल्ल्या, राणी/बेगम
प्रकार१: झब्बु / गाढवडाव / बेरीज झब्बु
संबंधित शब्दः कटाप् , झब्बु, गाढव
प्रकार२: रम्मी
संबंधित शब्दः सिक्वेन्स, प्युअर सिक्वेन्स, हँड रमी

तुर्तास इतकेच .. पुन्हा मोकळा वेळ मिळाला की भर घालतो :)

इतर काहि खेळः आंधळी कोशिंबीर, कांदाफोडी,

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कांदाफोडी

म्हणजे काय?
राधिका

कांदाफोडी

कांदाफोडी: एकाने जमिनीवर पाय समोर पस्रून बसायचे. इतरांनी एकेक करून त्याच्या पायावरून उडी मारायची. अशी एक फेरी झाली की, त्याने (बसूनच) एका पायाची टाच दुसर्‍या पायाच्या अंगठ्यावर ठेवायची (म्हणजे थोडी उंची वाढते.), इतरांनी त्यावरून उडी मारायची. मग त्याने(राज्य असणार्‍याने) वरच्या पायाच्या अंगठ्यावर एका हाताची वीत उभी ठेवायची (उंची अजून वाढते.)...असे करत करत राज्य असणार्‍यने ओणवा व्हायचे, इतरांनी त्यावरून उडी मारायची. कोणत्याही क्षणी जर उडी मारणाराचा स्पर्श खाली बसलेला(ज्याच्यावर राज्य आहे), त्याला लागला की त्यावर राज्य.

||वाछितो विजयी होईबा||

अच्छा

धन्यवाद.
राधिका

आणखी काही खेळ

विटी दांडूमध्ये दूर कोलवलेली विटी जमिनीवर पडली रे पडली की 'हलचुल-साफसुफ नो' असे धेडगुजरी शब्द मोठ्याने ओरडत असू. कधी कधी विटी सपाट जमिनीवर पडली की तिच्या टोकावर दांडू आपटून ती कोलवणे कठिण जाई.तेव्हा काही डोकेबाज मुले विटीच्या टोकाखालची माती फुंकर घालघालून किंवा आजूबाजूला बोटांनी उकरून दूर करीत.विटीच्या टोकाखाली खळगा निर्माण झाल्यावर ती कोलवणे सोपे जाई. त्याला प्रतिबंध म्हणून असे आधीच ओरडायचे.
छप्पापाणी,तळ्यात-मळ्यात,सूरपारंब्या,खांब-खांब-खांबोली,राम-लक्ष्मण-सीता(ईनमीनतीन),या आधीच उल्लेख केला गेलेला आबादुबी,लगोरी असे आणखी काही खेळ असत. ठिकरी,सागरगोटे असे खास मुलींचे खेळही होते.

व्हेरिएशन्स्

विटी दांडूमध्ये आपली पाळी आल्यावर २ की ३ चान्स मिळतात. त्यातला एक सॅक्रिफाइस करून विटी हाताने उचलून सोयिस्करपणे ठेवण्याची सोय असे. त्याला 'काडा घेणे' असे काहीतरी म्हणत. दांडूने विटी मारताना बाकीच्यांनी मध्ये पाय घालून दांडू विटीला लागू न देणे अशी पद्धत देखील पुण्यात पाहिली आहे.

अप्पारप्पी हे आबाधुबीचे पुण्यातले नाव आहे.

डबा ऐसपैस सारखा 'स्टॉप-पल्टी' हा खेळ माझी पुण्याची भावंडे खेळत. त्यात डबा उडाला ऐवजी राज्य असलेल्याच्या पाठीत धपाटा घालून पल्टी असे ओरडत.

नितिन थत्ते

इस्टॉप आणि पल्टी

"इस्टॉप-पल्टी' हा खेळ माझी पुण्याची भावंडे खेळत."

~ कोल्हापूरातही शांत काळात [अर्थात रात्री दहा नंतर] हा इस्टॉप-पल्टीचा खेळ मुलांमध्ये विलक्षण लोकप्रिय होता. प्रतिपक्षातील एखादा खेळाडू अमुक एका झाडाच्या वा रस्त्यावर लावलेल्या ट्रकच्या मागे लपलेला दिसला की अगदी बेंबीच्या देठापासून ज्याच्यावर डाव आहे तो किंचाळे "ईस्टॉप". ते शाळेचे दिवस असल्याने 'इस्टॉप' मधील फक्त 'स्टॉप' चा अर्थ समजला होता. पुढे कॉलेज विश्वात गेल्यावर कुतुहलाने तसल्या खेळांतील शब्दांची जननी शोधली तर इस्टॉपचा खरा उच्चार "यू स्टॉप' असा तर 'पल्टी' हे 'पल्ट = रबिश्' अशा अर्थाचा शब्द असल्याचे कळले. म्हणजे ज्याच्या पाठीत धपाटा जातो तो 'येडा' या अर्थाने.

विटी दांडूच्या खेळातील आणखी काही टर्म्स

विटी दांडूमध्ये विटी दूर कोलवल्यानंतर अधांतरीच विटी पकडल्यास विरुद्ध बाजूच्या पार्टीकडे डाव येणार. अधांतरी न पकडल्यास गलीपासून विटीपर्यंत दांडूने अंतर मोजले जात होते. मोजताना पाव, चिट्ठी, मुष्टी, घोडा, पूक, डोळा, जिल असे मोट्ठ्याने ओरडत असत. ज्या पार्टीचे जिल जास्त होतील ती पार्टी जिंकणार.
विटीचे अंतर काही जिलनंतर

  • पाव आल्यास एका पायाच्या बोटावर विटीला ठेवून,
  • चिट्ठी आल्यास तळहातावर विटीला ठेवून,
  • मुष्टी आल्यास हाताच्या मुठीवर विटी ठेवून,
  • घोडा आल्यास हाताच्या दोन बोटांना पुढे करून त्यावर विटी ठेवून,
  • पूक आल्यास हाताच्या आंगठ्यावर विटी ठेवून,
  • डोळा आल्यास डोळ्यावर ठेवून विटीला ठेवून,

दांडूने मारावे, असे नियम होते.
जिल आल्यास पुन्हा कोलवले जात होते.

अच्छा

पाव, चिट्ठी, मुष्टी, घोडा, पूक, डोळा, जिल यांचा अर्थ सांगता येईल का/

राधिका

शिवाजी म्हणतो ...

या नावाचा एक बैठा खेळ आम्ही खेळत असू. त्याला कोणतेही साधन लागत नाही. दोघात सुद्धा हा खेळ खेळता येतो, पण चार पाच किंवा जास्त लोक असल्यास मजा येते. ज्याच्यावर राज्य असेल त्याने आज्ञा करायची. उदाहरणार्थ "हसा", " डोक्याला हात लावा" असे काहीही. पण त्याच्या मागे "शिवाजी म्हणतो" जोडलेले असेल तरच इतरांनी ती पाळायची. नाही तर तिकडे दुर्लक्ष करायचे. यात जो चूक करेल त्याच्यावर राज्य. त्यानंतर दुसरा कोणी चुकेपर्यंत त्याने हुकूम करायचे (आपला घसा सुकवायचा).

भोवरा आणि नक्का दुव्वा

वर काही प्रतिसादकांनी ज्या दोन लिंक्स दिल्या आहेत त्याचा उपयोग करून मी तिथल्या खेळ-आठवणी वाचल्या. फार मोहरून गेलो, जुने दिवस आठवले तसेच आज पोटापाण्यासाठी आठी दिशांना भरकटलेले [काही वरही गेलेले] त्यावेळेचे सवंगडीही आठवले. गॉश्श्...काय दिवस होते ते...टोटल मॅजिक, आय बेट.

अजूनही उल्लेख न झालेले एकदोन फुटकळ खेळ आठवतात.

१. भोवरा ~ एक बर्‍यापैकी मोठे वर्तुळ खडूने [खडू नसला की, समोर असलेल्या कंपोस्ट खताच्या गोडाऊनमध्ये बाजूला टाकलेल्या गोणीच्या तळाला अडकलेली ती पांढरीशुभ्र खतपावडर पळवून - कोल्हापुरी भाषेत 'ढापून' - आणायची आणि सर्कल आखायचे.] काढायचे आणि 'चकायचे' - चकायचे म्हणजे चौघेजण असले की कुणाचा भोवरा वर्तुळात डोकेफोडीसाठी ठेवायचा याचा "डिसिजन्". चौघांनी एकमेकाच्या हातात - पंजे - हात गुंफून एकाच वेळी एकतर उलटे किंवा सुलटे पंजे करायचे. ज्याचे पंजे सम असतील तो बाजूला. विषम असतील् त्यानी पुन्हा तो 'चकणे' प्रकार करायचा आणि शेवटी जो हरेल त्याचा भोवरा मग त्या रिंगणात. बाकीचे तिघे "क्रूर" आनंदाने आपल्याकडील भोवर्‍याला दोरीने गुंडाळून अणुकुचीदार आर्‍याने रिंगणातल्या भोवर्‍याचा वेध घ्यायचे. ज्याच्या भोवर्‍याने पक्का वेधा घेतला असेल त्याच्या भोवर्‍याला तो भोवराहीन खेळाडू हात लावीत नसे, पण दुसर्‍या एखाद्याचा भोवरा रिंगणातल्या भोवर्‍याला स्पर्श करू शकला नाही तर तो मग रिंगणात आणि पहिल्याची सुटका. असा खेळ त्यापैकी किमान एक भोवरा 'फुटे' पर्यंत चाले. ज्याचा फुटे तो इतरांच्या दृष्टीने 'नपुसंक"....कोल्हापुरी भाषेत याला काहीसे अश्लिल विशेषण आहे, पण इथे नको.

२. नक्का-दुव्वा-तिय्या-पोगा ~
हा एक बैठा खेळ. चार मित्र-खेळाडू. एक चौकान. चौकोनाची पहिली रेघ म्हणजे 'नक्का'. दुसरी शेजारी एक जादाची रेघ...दुव्वा....तिसरीला दोन जादा रेघा...तिय्या...आणि चौथीला तीन् जादा...पोगा.

पहिल्या गड्याच्या हातात २०-२५ लहानलहान बटन्स्. [शर्टाला असतात तसले, कित्येकवेळा रंगीतही दुकानात विकत मिळायचे]. पहिला गडी सौदा पुकारणार....'हाय्य का कुणी ? लावा कित्यी लावताय तेवढं...." बटनरूपी फासे खुळखुळवले जात. मग 'बिडर्स' आपापल्या मगदुरीप्रमाणे त्या चार घरावर आपली संपत्ती जाहीर करायचे....[संपत्ती म्हणजे हनीड्यू, बर्कले, चारमिनारची पाकिटे....स्वस्त असलेली....त्यातही कॅप्स्टन, पासिंग् शो, कॅव्हेन्डर्स असेल् तर एका पासिंग शो ला दहा पिवळा हत्ती....एखाद्याने कुठून् तरी 'डनहिल' चे पाकिट पैदा केले होते, तर त्याच्याकडे जणू काही त्याने लंडनहून कोहिनूरच आणला की काय अशा असूयेने आम्ही त्याच्याकडे पाह्यचो].

जुगारच होता एकप्रकारे म्हणा. बोली होताना एक घर कायम रिकामे ठेवावे लागे. म्हणजे त्या तीन खेळाडूंनी नक्का तिय्या आणि पोगा 'रिझर्व्ह' केला तर उरलेला दुव्वा ज्याच्या हाती ते फासे आहेत त्याच्या नावे झाला. बोली झाल्यावर हा बटनधारी कॉलर जोरजोराने आपल्या हातातील बटने हलवून त्यातील अर्धी बटने [कमीजास्तही] रिंगणात टाकी आणि मग त्या बटनांचा चार-चार असा ग्रुप केला जाईल. समजा तिथे १९ बटन्स आली असतील तर प्रत्येकी ४ या प्रमाणे १६ बटन्स बाजूला जातील...मग उरलेली ३ बटन्स म्हणजे गेम 'तिय्या' चा झाला. ज्याने तिय्यावर बोली लावली असेल त्याला त्याने लावलेल्या 'इस्टेटी'च्या तिप्पट भाव मिळणार, तर नक्का आणि पोगा यावर् बोली दिलेल्यांची 'इस्टेट' जप्त.

फार रंगून जाण्याचे प्रसंग येत. मारामार्‍याही होत.

धन्यवाद

नक्का दुव्वा... हे फारच नवीन होते.

राधिका

नक्का-दुव्वा

धन्यवाद. पण 'नक्का-दुव्वा' बद्दल एक गोष्ट लिहायची विसरून गेलो. ती म्हणजे हा खेळ एक्स्क्ल्युसिव्हली मुलांसाठी होता, तीत मुलींना अजिबात प्रवेश नसे. मुली खेळतदेखील नसत. [कारण उघडच आहे - त्याच्या नियमाला असलेली जुगारसम किनार].

आणि काही...

जोड साखळी, खांब खांब खांबोळी, ठिकरी पाणि, नाव गाव फळ फुल, आई च पत्र, पत्ते-भिकार सावकार, गुलाम चोर, ३०४ (ऊनो), बदाम सात...

टिपरी

टिपर्‍या, किंवा हॉप्स्कॉच् चा खेळ.

टिपरी फेकताना "उठी" का "बशी" असे विचारायचे. बाकीच्यांनी उठी सांगितले तर उभे राहून चौकटात (घरात) टिपरी फेकायची; बशी सांगितल्यास खाली बसून फेकायची.

उस्केल

उस्केल अशा विचित्र नावाचा खेळ मी लहानपणी खेळलेलो आहे. नियम नक्की आठवत नाहीत. पण अनेक चौकोन आखून त्यांची दोन बाय चार किंवा अधिक अशी ग्रिड बनवायची. एका पार्टीने त्या ग्रिड्समधून जाणार्‍या लेन्स वर पहारा ठेवायचा आणि दुसर्‍या पार्टीने त्या सर्व ग्रिड्स पार करायच्या असा तो खेळ होता. त्यातील "जंपेल" ही टर्म आणि "जंपे.....ल्" असे ओरडत मोठी उडी मारत सेकंडलास्ट किंवा शेवटचा टप्पा पार करत असलेले आठवते आहे.

भवरा

खेळ - भवरा
खेळातील शब्द-
रींगन (भोवरा ठेवण्यासाठी जमिनीवरील वर्तुळ)
कोचा (रींगनातल्या भोवर्‍याला दुसर्‍या भोवर्‍याने केलेला घाव)
जाई (भोवर्‍याला फिरवण्याची जाळी)
आस (कोचा न बसता फक्त स्पर्श झाल्यास)
आर (फिरवण्यासाठी किंवा कोचा मारण्यासाठी भोवरर्‍याचे टोक)
वरील शब्द अशुद्ध वाटु शकतात पण या खेळात ते वापरले जातात.

खेळातले शब्द

१)ध SS प्पा , इस्टॉप - लपंडाव
२)विष आणि अमृत - विषामृत
३) कबड्डी कबड्डी - कबड्डी
४) हुकुम, हात करणे, पिसणे, झब्बू, नोटेठोम, भिकारसावकार, पाचतीनदोन, लॅडीज, रम्मी - पत्ते
५) एक खेळ होता, नाव आठवत नाही, सगळ्यांनी कोपर्‍यातले खांब पकडायचे आणि ज्याच्यावर राज्य येईल त्याने तो कोपरा मिळवायचा, इतरांनी अदलाबदल करायची
६) दुसरा एक खेळ ज्यामध्ये इतरांनी एखादी वस्तू (रूमाल) एकमेकांमध्ये पास करायची, राज्य येणार्‍याने पकडून दाखवायची.
७) आउट - लंगडीमध्ये इंग्रजी शब्दच वापरायचो
८) पैसापाणी, क्वीन, सोंगट्या, ब्रेक, कव्हर, चोरपोलिस, गेम - कॅरम
९)सगळ्या खेळात वापरले जाणारे शब्द- चिडीचा डाव, रडीचा डाव, रड्या, चिडकाबिब्बा

सूचना: या शब्दकोशात काही इंग्रजी शब्द सुध्दा टाकावे, कारण ते शब्द जसेच्या तसे वापरण्यातच खेळाची मजा आहे.

 
^ वर