स्मृती आड झालेले काही खेळ

स्मृती आड झालेले काही खेळ

आज काल घरा-घरांमधुन लहान मुलांबद्दल एकच गार्‍हाणे कानावर पडतात. "सारखा टिव्ही समोर बसतं कार्टून पाहात बसतो/बसते. जेवायचे सुद्धा भान राहात नाही. आमच्या वेळेस तर आम्ही मस्तपैकी मित्रमैत्रिणी सोबत बाहेर खेळत होतो." इत्यादी आमच्या लहानपणी घरी टिव्ही होते कुठे? "कार्टून" ह्या शब्दाची ओळख पण नव्ह्ती. "कार्टून" हा शब्द आमच्या शब्दकोशात नव्हता.

खेळायला सोबत भावंडे होती. मित्रमैत्रिणी होते. घरात आणि घराबाहेर खेळायला भरपूर जागा होती. जागा कमी असली तरी पण, जेवढी जागा असेल तेवढया जागेत आम्ही खेळत होतो. आमच्या जवळ खेळायला महागडया खेळाची रेलचेल नव्हती. कमीत कमी खेळण्याचे सामान घेऊन आम्ही खेळत होतो. खेळण्याचे सामान तरी काय? तर फुटका डब्बा, रबरी चेंडू, फुटके खापर, झाडाची फांदी तोडून तयार केलेली विटी दांडू, मोडका पाट, छोटे दगड इत्यादी...

कोणते बरे ते खेळ होते? नाव आठवण्याचा प्रयत्न केला. कोणते खेळ होते ते?

मला आठवलेल्या खेळांची ही थोडक्यात माहिती.

डब्बा गूलः खेळणार्‍या मुलामुलींचा एकच गट असायचा. गटातल्या एका मुलावर राज्य असायचे. ह्या खेळात वापरण्यात येणारे खेळाचे साहित्य म्हणजे एक फुटका डब्बा. चांगला डब्बा खेळाला चालायचा पण तो मिळणे महाकठीण काम. तर हा डब्बा खेळायच्या जागी मधे ठेवायचा, ज्याच्यावर राज्य असेल त्या मुलाने/मुलीने त्या डब्ब्या वर पाय ठेवायचा आणि बाकी मुलामुलींनी डब्ब्या भोवती फेर धरायचा. फेर धरणार्‍या एकाने राज्य असलेल्या मुलाचे लक्ष नाही असे बघून डब्बा उडवायचे. तो वर बाकीच्या मुलामुलींनी लपायला जायचे. राज्य असलेल्या मुलाने डब्बा आधीच्या जागी परत आणत ठेवायचा. आणि लपलेल्या मुलामुलींना शोधून काढायचे. तो वर परत कोणी तरी डब्बा उडवायचे आणि "ज्या मुलावर राज्य असेल त्या मुलाचे नाव घेऊन डब्बा गूल" म्हणत परत लपायला जायचे. हा खेळ खेळतांना खूप मज्जा येत होती.

वीषांमॄत: किती मुलेमुली मिळून हा खेळ खेळायचा ह्याला मर्यादा नसायची. वयोगटातला काही मर्यादा नसायची ज्यांना खेळायचे ते सर्वजण खेळात सामील केले जायचे. खेळणारे सगळेजण मावतील आणि त्यांना धावायला थोडी जागा लागेल हे लक्षात घेऊन एक गोल किंवा चौकोन आखण्यात येत असे. सर्वानुमते एका मुलावर राज्य ठरवले जायचे व एका खेळाडूला पळायला लावायचे. खाली बसायला सांगताना अंमृत म्हणायचे. उभे राहायला सांगताना वीष म्हणायचे. सुरवातीला सगळ्यांनी आखलेल्या भागाच्या आत खाली बसायचे. ज्याच्यावर राज्य आहे त्याने आखलेल्या भागाच्या बाहेर राहायचे. खेळ सुरू झाला की राज्य असलेल्या खेळाडूने आखलेल्या भागात उभ्या असलेल्या मुलाला हात लावून बाद करायचे. पळत असलेल्या मुलाने शिताफीने एका खाली बसलेल्या मुलाला वीष म्हणायचे आणि बसलेल्या खेळाडूने त्याला अंमृत म्हणायचे. ज्याला अंमृत म्ह्टलं त्यानी खाली बसायचे. ज्याला वीष म्हटले त्याने धावायला लागायचे. तो वर ज्याच्यावर राज्य आहे त्याने पळणार्याल खेळाडूला बाद करायचे. नविन राज्य बाद झालेल्या मुलावर आणि ज्याने त्याला बाद केले तो आणि आता पळणारा गडी असा पुढे खेळ चालू राहात असे. सर्वानुमते कंटाळा आल्यावर किंवा वडिलधारी माणसांकडून ओरडा खाल्ल्यावर हा खेळ थांबवला जात असे.

सूरपारंब्या: हा खेळ झाडांच्या फांद्यांना लटकत खेळला जाणारा हा खेळ. घरा जवळच्या झाडांवर हा खेळ खेळला जायचा. सगळयांचा मिळून एकच गट असायचा. गटातल्या एकावर राज्य. बाकीच्यांनी एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जमिनीला पाय न लागता जायचे. जमिनीला पाय टेकला की गडी बाद व्हायचा. ज्याच्यावर राज्य आहे त्याने झाडावरच्या मुलांना हात लावून बाद करायचे. नविन डाव बाद झालेल्या मुलावर. फांद्यांना पकडून, एका झाडावरून दुसर्याय झाडावर जाताना मारलेल्या सूरा वरून ह्या खेळाचे नाव सूरपारंब्या असे पडले असावे.

लगोरी: १०-१२ फरश्यांचे तुकडे किंवा खापराचे तुकडे एकावर एक ठेवून, रबरी चेंडू फेकून एकावर एक मांडलेल्या खापरा फोडायचे दोन गटात खेळला जाणारा हा खेळ. नंतर फरश्यांच्या तुकड्यांची जागा बाजारात मिळणार्‍या लाकडी ठोकळ्यांनी घेतली. आम्ही एकावर एक ठेवलेल्या फरशीच्या तुकडयांना लगोरी म्हणायचो. एका गटाने मांडलेल्या लगोरी दुसर्‍या गटाने रबरी चेंडूच्या साह्याने फोडायच्या आणि दुसर्‍या गटाने त्या परत एकावर एक ठेवायच्या. हे ठेवत असतांना ज्या गटाकडे चेंडू आहे त्या गटाने लगोरी रचनार्‍याला फेकून मारल्यास परत दुसरा डाव सुरू होत असे. लगोरी नीट रचली गेली की गटातल्या सगळ्यांनी "लिंगोरच्या" असे म्हणून ओरडायचे.

विटी-दांडू: झाडाच्या फांदीचा कडक लाकडी भाग घेऊन त्या पासून विटी आणि दांडू बनवले जात असे. विटी आणि दांडू बनवायची कला सगळ्यांनाच अवगत नसायची. ज्यांना येत असे ते खूप भाव खात असे. हा खेळ बहूतेक मुलांनी खेळायचा खेळ होता. मुलींना खूप कमी वेळा खेळात सामील करुन घेण्यात येत असे. हा खेळ दोन गटात खेळला जातो. एका गटाच्या हाती विटी-दांडू असे तर दुसर्‍या गटाला टोलवलेली विटी पकडण्याचे काम. जमिनीवर एक छोटा निमुळता खड्डा खणून त्यावर विटी ठेवायची आणि ती विटी दांडूने टोलववायची / हवेत उडवायची. दुसर्‍या गटाने ती टोलववलेली विटी पकडायची. विटी पकडल्यास त्यांना विटी टोलवावयाला मिळायचे.

चेंडू-फळी: एका खेळाडूच्या हातात लाकडी फळी तर दुसर्‍या खेळाडूच्या हातात चेंडू. चेंडू लाकडी फळीवर फेकून मारायचा आणि फळीवर लागून उडालेला चेंडू पकडायचा. दोन पेक्षा अधिक सवंगड्यांबरोबर सुद्धा हा खेळ खेळता येतो.

सागर गोटे: ७-९-११ अशा विषम संख्येत छोटे छोटे दगड/गोटे जमा करायचे. एक एक करत हवेत उडवत ते हातात पकडत खेळायचे. हवेत फेकलेला दगड खाली पडला की दुसर्‍या खेळाडूच्या हातात सगळे दगड द्यावयाचे. असे कंटाळा येईल तो वर खेळायचे.

काचा पाणी: फुटलेल्या बांगड्यांची तुकडे जमा करुन ठेवायचे. ज्याच्या कडे जास्त तुकडे असेल त्याचे खेळातले पारडे थोडे जास्त असायचे. जेवढ्या जास्त काचा तेवढे चांगले. एका हाताच्या मुठीत मावतील तेवढया काचा घ्यायच्या. त्या हवेत उडवत त्या हाताच्या उलटया तळव्यावर झेलायचे. त्या तशाच ठेवत, खाली न पडू देता, हवेत काचा उडवताना ज्या काचा खाली पडल्या असेल त्या काचा उचलायच्या. काचा उचलतांना उलटया तळव्या वरच्या काचा खाली पडू द्यायच्या नाही. खालच्या काचा सगळया नीट उचलल्या तर उलटया तळव्यावरच्या काचा त्या खेळासाठी त्या खेळाडूच्या, आणि पुढचा खेळ उरलेल्या काचांनी पुढे सुरू राहात असे.

आबाधाबी: चेंडू फेकून मारण्याचा खेळ. एका खेळाडूच्या हाती चेंडू असायचा आणि बाकी खेळाडू पळायचे. ज्याच्या हातात चेंडू असायचा त्याने तो एका पळणार्‍या खेळाडूला नेम धरून फेकून मारायचा. चेंडू पाठीवर मारल्या गेल्यावर "धब' असा आवाज येतो. कदाचित त्या वरून ह्या खेळाचे नाव "आबाधाबी" असे पडले असावे.

कांदा फोड: ह्या खेळात पहिल्यांदा एक खेळाडू खाली जमिनीवर पाय पसरून बसतो. आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडतात. त्याचा पाय ओलांडताना जर एखाद्याचा पाय चुकून खाली बसलेल्या खेळाडूच्या पायाला लागला तर, ज्याचा पाय लागला तो खेळाडू आता खाली बसणार. खाली बसणारा पहिल्यांदा पाय पसरून, नंतर पसरलेले पाय एका हाताने पकडून, असे हळूहळू उडी मारायची उंची आपल्या शरीराच्या वेगवेगळे आकार बनवत समोरच्या खेळाडूला आपले शरीर ओलांडायला लावावयाचे. ह्या खेळात खेळाडू किती उंचीवरील वस्तू ओलांडू शकतो ह्याचे कौश्यल्य पणाला लागायचे.

तुम्हाला पण काही खेळांची नावे नक्कीच आठवली असतील!!! ह्या खेळांना तुम्ही वेगळ्या नावांनी सुद्धा ओळखत असणार. आठवा बरे ती स्मृती आड झालेल्या खेळांची नावे.

Comments

टिपी टिपी टॉप टॉप/लोखंड का माती/दगड का माती

टिपी टिपी टॉप टॉप या नावाचा एक खेळ खेळायचो हे आठवले. खेळण्याची पद्धत अशीः

ज्याच्यावर राज्य असेल तो म्हणायचाः टिपी टिपी टॉप टॉप
तो सोडून बाकीचे भिडूः व्हॉट कलर युव्व्वर
ज्याच्यावर राज्य असेल तोः माझा रंग सांगू का?
तो सोडून बाकीचे भिडूः सांग सांग
ज्याच्यावर राज्य असेल तोः नी-ईळा

असे झाले की निळ्या रंगाच्या वस्तूला हात लावण्यासाठी भिडूंनी पळायचे. आणि राज्य असलेला प्राणी त्यांना पकडण्यासाठी पळणार. ज्याच्या हात निऴ्या रंगाच्या वस्तूला लागलेला असेल तो वरप्राप्ती झालेल्या हिरण्यकश्यपूप्रमाणे सुरक्षित. बाकीच्यांनी नुसती पळापळ करायची. एकाच वस्तूला दोघांनी हात लावायचा नाही, किंवा स्वतःच्या अंगावरील कपड्यांचे रंग हे बेरजेत धरले जाणार नाहीत ही त्यातली अट.

याच धर्तीवर दगड का माती किंवा लोखंड का माती असे खेळही खेळता यायचे. मातीवर पाय असला की आऊट करता यायचे अन्यथा नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पिंकी पिंकी वॉट कलर

टिपी टिपी टॉप टॉप ह्या खेळाला आम्ही , पिंकी पिंकी व्हॉट कलर असे म्हणत होतो.

रुतणी

खास पावसाळ्यात खेळल्या जाणार्‍या या खेळात सायकलच्या चाकाचे स्पोक्स चिखलात रुतवीत राज्य असणार्‍या भिडूला घरापासून दुर नेले जाते. जिथे स्पोक्सची तार रुतून उभी राहणार नाही तेथुन घरापर्यंत त्याला पायाच्या अंगठ्याने तार पकडून लंगडी घालीत परत यायचे असते.

खुपणी

मोठा खिळा, किंवा झाडणीच्या मधे असलेल्या पोकळ काडीला खाली टाचणी खोचून, "खुपणी" तयार करायचो. ती खुपणी घेऊन आम्ही हा खेळ खेळत होतो. ह्या खेळाला "खुपणी" असे म्हणत होतो.

तळ्यात मळ्यात, चिमणी भुर्र्रर्र, वाघ - शेळी

एका रेषेच्या या बाजुला तळे, दुसरीकडे मळा.
तळ्यात म्हटले की तळ्यात ऊडी मारायची किंवा तळ्यातच असले तर तिथेच थांबायचे.
मळ्यात म्हटले की मळ्यात ऊडी मारायची किंवा मळ्यातच असले तर तिथेच थांबायचे.
त्यात आनखिन पुढचा भाग म्हणजे खळ्यात.
मग तो तळ्यात मळ्यात खळ्यात असा खेळ होतो.

चिमणी भुर्रर्र - कावळा भुर्रर्र
सर्वांनी एकमेकांना दिसेल अश्या जागा घ्यायच्या. (गोलात बसा)
भुर्रर्र असेल तर बोट किंवा हात वर करुन भुर्रर्र म्हणायचे
म्हशीला भुर्रर्र म्हणले की बाद

वाघ - शेळी
गावकर्‍यांनी गोलाकार एकमेकांचे हात धरुन उभे जितके मोठे वर्तुळ करता येईल तितके मोठे करायचे.
वाघाने शेळीला पकडायचे. शेळीला वर्तुळात फ्री एंट्री एक्सिट. वाघाला अडवायचे (हात न सोडता).

मस्त संकलन

वा! मस्त लेख आणि संकलन!..अजून एक आठवणारा खेळ म्हणजे खांबोळ्या.. काही जण याला खांब-खांब देखील म्हणत असत . एकूण भिडुंची संख्या वजा एक इतक्या खांब/झाडे/पार्किंगमधील वाहने अश्या कोणत्याही वस्तुंना खांब म्हटले जायचे.
ज्याच्यावर राज्य आहे त्याने मधे थांबायचे व इतरांनी खांब बदलत रहायचे.. जर राज्य असणार्‍याला रिकामा खांब सापडला तर ज्याच्याकडे खांब नाही त्याच्या वर राज्य.
तासन् तास चालणारा खेळ आहे हा!

दुसरा खेळ म्हणजे पॅसेज/ग्यालरी क्रिकेट :) .. इथे सर्वसाधारण क्रिकेटचे नियम लागु नसतात. एक टप्पा आऊट पासून थेट भिंती/खिडक्यांवर फटका मारल्यास आऊट होणे वगैरे अत्यंत किचकट ;) असे अनेक नियम आहेत.. शिवाय हा सांघिक खेळ नाहि तर वैयक्तीक खेळ आहे. इथे रन न काढता फक्त एखादा खेळाडू किती बॉल खेळले यावर त्याचे गुण ठरत (दिसत) ;)

बाकी भोवरे, गोट्या, पतंग उडवणे असे साथीचे खेळही खेळलेले आठवतात

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

पॅसेज / ग्यालरी क्रिकेट, पुस्तकी क्रिकेट...

दुसरा खेळ म्हणजे पॅसेज/ग्यालरी क्रिकेट :) .. इथे सर्वसाधारण क्रिकेटचे नियम लागु नसतात. एक टप्पा आऊट पासून थेट भिंती/खिडक्यांवर फटका मारल्यास आऊट होणे वगैरे अत्यंत किचकट ;) असे अनेक नियम आहेत.. शिवाय हा सांघिक खेळ नाहि तर वैयक्तीक खेळ आहे. इथे रन न काढता फक्त एखादा खेळाडू किती बॉल खेळले यावर त्याचे गुण ठरत (दिसत) ;)

पॅसेज / ग्यालरी क्रिकेटचे नियम खेळाडूप्रमाणे बदलतात असे वाटते. (लिंबूटिंबू आणि वयाने लहान पण केवळ नाइलाज म्हणून समाविष्ट कराव्या लागणार्‍या खेळाडूंसाठी 'तीनदा बाद म्हणजेच बाद, तोपर्यंत नाबाद' असाही एक नियम असल्याचे आठवते.) हा खेळ वैयक्तिक आहे खरा.

शिवाय यात चेंडूही सर्वसाधारण क्रिकेटमधला वापरला जात नाही असे वाटते. कागदाच्या लगद्याभोवती प्रथम पुडी बांधण्याचा दोरा गच्च बांधून त्यावर सायकलच्या ट्यूबच्या काटछेदांतून बनवलेल्या जाड रबरबँडचे वेष्टन देऊन बनवलेल्या चेंडूपर्यंत वाटेल ते चेंडू म्हणून वापरले जाऊ शकते, असे वाटते. तसेच खुर्चीला पाट टेकवून त्याची विकेट वगैरे.

याव्यतिरिक्त, 'पुस्तकी क्रिकेट' या नावाचा (क्रिकेटशी केवळ दूरान्व्ययाने संबंध असलेला) एक बैठा खेळ असे. हा दोन खेळाडूंत - किंवा प्रसंगी एकट्यानेसुद्धा - खेळता येत असे. यात दोन काल्पनिक संघ (जसे भारत आणि वेस्ट इंडीज, त्यात्या संघांतल्या चालू घडीतल्या खेळाडूंसह) बनवून एकएक खेळाडू काल्पनिक 'मैदाना'त खेळायला उतरवायचा. नंतर एक पुस्तक - कोणतेही पुस्तक - घेऊन त्यातले मधलेच कोणतेही पान उघडायचे, आणि डावीकडील (सम क्रमांकाच्या) पानाचा क्रमांक बघायचा. या क्रमांकाचा अर्थ काय लावायचा याचे वेगवेगळ्या आवृत्त्यांत वेगवेगळे नियम होते, परंतु हा क्रमांक ० (शून्य) निघाल्यास तो गडी बाद आणि २, ४ किंवा ६ निघाल्यास त्या (काल्पनिक) खेळाडूच्या नावावर तितक्या धावा जमा, हे नियम सर्वसंमत होते. तो क्रमांक ८ (आठ) निघाल्यास त्याचा अर्थ लावण्याबद्दलचे नियम हे खेळाच्या आवृत्तीप्रमाणे संदिग्ध होते असे वाटते. (शून्य धावा / एक धाव यांपैकी काहीही.) याप्रमाणे एका संघाचे सर्व खेळाडू बाद झाले, की दुसरा संघ खेळावयास येत असे. अशी एक इनिंग की दोन इनिंग्ज़ हे खेळणार्‍यांवर अवलंबून. आणि मग सर्वसाधारण क्रिकेटच्या नियमांप्रमाणे कोणता संघ जिंकला हे धावसंख्येवरून ठरवायचे. (सर्वसाधारण क्रिकेटमध्ये मर्यादित-षटक सामना वगैरे सुधारणा येण्यापूर्वीच्या कसोटीसामन्यांच्या दिवसांतली ही कथा आहे. पुढे या पुस्तकी आवृत्तीच्या नियमांतही बदल झाले असल्यास कल्पना नाही.)

८ = वाईड बॉल, पेन फाईट, वहीवरचे फुटबॉल :)

:)

आम्ही हा खेळ तासिका चालु असताना सांघिक रुपात खेळत असू . वर्गातील ओळ १ व २ मधील डाव्याबाजूला बसणारे विरुद्ध १व २ मधील उजव्या बाजूला बसणारे.. शेजारचा स्कोरवर लक्ष ठेवायचा तासिका संपली की सगळ्या डाव्या बाजुच्यांचे रन एकत्र व्हायचे ;)
(आमच्याकडे ८ आला की वाईडबॉल धरत ;) व संघाला गुण मिळत)

दोन तासिकांच्यामधे वही व खडूने खेळलेले (वर्ग) क्रिकेट हा ही मजेशीर प्रकार आठवतो ;) इथे खेळाडुंबरोबरच दारवर लक्ष ठेवायला एक व्यक्ती लागे..

याशिवाय पेन फाईट ह्या प्रकाराने तर आमचे अख्खे कॉलेजजीवन व्यापले आहे. २ ते कीतीही जणांमधे ही फाईट खेळता येते. एका वर्गातील शिक्षकांचे टेबल/कोणतेही बाकडे/कॅंटीनचे मेज/वर्गातील बाक यावर याचे महासामने रंगत असत. सगळ्यांनी आपापली पेने (लेखण्या) टेबल वर ठेवायच्या व कॅरमच्या स्ट्रायकर प्रमाणे इतरांचे पेने खाली पाडायची.. ज्याचे शेवटपर्यंत टिकेल तो जिंकला :)

याशिवाय वहीवरचे फुटबॉल हा देखिल तास चालू असताना खेळायचा प्रकार. इथे वहीवर मैदान आखायचे.आपले खेळाडुंच्या व्युहरचना करून जागांच्या खुणा करायच्या. मग पेन गोलरक्षकाच्या इथे ठेवायचे आणि फक्त टोकावर हात ठेऊन सोडून द्यायचा जिथे रघ उमटेल त्यादिशेने बॉल गेला असे समजायचे आणि तासिका संपल्यावर ज्याचे अधिक गोल झाले तो जिंकला

(अ-"वर्गा"तील आघाडीचा खेळाडू ;))ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

पुस्तकी खेळाची गंमत/रिकर्सिव अल्गोरिदम

पुस्तकी खेळावरुन एक पुस्तकी गंमत आठवली. पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्या पुस्तकाच्या मालकाचे नाव, इयत्ता व तुकडी लिहिण्याची प्रथा असे. मात्र या प्रथेविरुद्ध बंडखोरी करण्याची टूम निघाली होती.

बंडखोरीचे वर्णन साधारण याप्रमाणेः

पहिल्या पानावर - जेथे सामान्यपणे मालकाचे नाव लिहिले जाते तेथे - "माझे नाव पान १० वर पाहा" असे लिहा.
पान १० वर "माझे नाव पान २० वर पाहा" असे.
पान २० वर "माझे नाव पान 3० वर पाहा" असे.
असे करत करत....
शेवटचे पान आले की "अरे गाढवा (किंवा वयानुसार/संस्कारांनुसार/शब्दसंग्रहानुसार/लाजेनुसार योग्य तो अपशब्द) माझे नाव पान १ वर पाहा."

रिकर्सिव अल्गोरिदमचे आम्ही पाहिलेले हे पहिले उदाहरण.

एकदा मास्तरांना असे प्रयोगशील पुस्तक सापडले. पुस्तकाच्या मालकाचे नाव पुस्तकातच शोधण्याचा नंतर त्यांनी केलेला प्रयत्न, पुस्तकमालकाचा रसाळ शब्दसंग्रह आणि मास्तरांनी दंडुकशाहीने मोडून काढलेले आमचे बंड या गोष्टी विसरु म्हणता विसरता येत नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बालादपि...

रिकर्सिव अल्गोरिदमचे आम्ही पाहिलेले हे पहिले उदाहरण.

कित्येकदा ('रिकर्सिव अल्गोरिदम'सारख्या) मोठमोठ्या, शब्दबंबाळ संकल्पनांचे मूळ रोजच्या आयुष्यातल्या, लहानसहान गोष्टींत असते (आणि उलटपक्षी, मोठमोठ्या, शब्दबंबाळ संकल्पनाचा वापर - application -रोजच्या आयुष्यातल्या, लहानसहान गोष्टींत प्रभावीपणे होऊ शकतो, केवळ योजकस्तत्र दुर्लभः) हे दाखवून देणारे उत्तम उदाहरण!

एकदा मास्तरांना असे प्रयोगशील पुस्तक सापडले. पुस्तकाच्या मालकाचे नाव पुस्तकातच शोधण्याचा नंतर त्यांनी केलेला प्रयत्न, पुस्तकमालकाचा रसाळ शब्दसंग्रह आणि मास्तरांनी दंडुकशाहीने मोडून काढलेले आमचे बंड या गोष्टी विसरु म्हणता विसरता येत नाहीत.

चालायचेच! मास्तरमंडळींना (यात मास्तरणीही आल्या.) विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक ज्या दिवशी वाटू लागेल, त्या दिवशी एक तर १. भारतवर्षाचे नशीब पालटेल, किंवा २. जगबुडी होईल.

मास्तरमंडळींविषयीची ही बोंब सनातन आहे. (अर्थात हे सरसकट विधान झाले, कधीकधी काही चांगले नमुनेही सापडतात, पण तरीही...) आमच्या काळीही (म्हणजे आम्ही शाळेत जात असतानाच्या दिवसांत) याहून फार वेगळी परिस्थिती नव्हती. मागच्या बाकावर बसून फुल्लीगोळा (tic-tac-toe - याबद्दल सविस्तर वेगळ्या प्रतिसादात, नंतर सवडीने.) आणि तत्सम पारंपरिक खेळ खेळायचा कंटाळा आल्यावर, रुचिपालट म्हणून काही दिवस घरून बुद्धिबळाचा पट आणून (हत्ती सरळ, उंट तिरपा तर घोडा अडीच घरे जातो एवढ्या जुजबी ज्ञानाच्या आधारावर) तास चालू असताना मागच्या बाकावर सामने खेळण्याचा प्रघात सुरू केला होता. आणि बुद्धिबळ हा नैसर्गिकतः सांघिक खेळ असल्यामुळे (म्हणजे दोघेजण खेळणारे आणि बाराजण फुकटचा सल्ला देणारे, असे सात-सातचे दोन संघ.), दुसर्‍याच दिवशी पकडले गेलो होतो. आणि बाईंनी 'आज तासाला बुद्धिबळे खेळताय, उद्या पत्ते खेळाल!' असे (साभिनय) म्हणून बुद्धिबळाचा पट जप्त केला होता. (बाईंच्या आमच्यावरील विशेष मर्जीमुळे दिवसाअखेर तो पट परत मिळाला, ही गोष्ट वेगळी. आणि तशीही पत्ते खेळण्याबद्दलची सुचवण अगदीच वाईट नव्हती. सात-आठ किंवा भिकारसावकारचे सामने मस्त रंगले असते. रमीचाही प्रयोग करून पहायला हरकत नव्हती. पण आमची वर्गातली बुद्धिबळे त्यामुळे बंद झाली ती कायमची. आणि अशा रीतीने भारत एका भावी विश्वनाथन आनंदला कायमचा मुकला.)

आणखी काही

लपाछुपी, मामाचं पत्र, डॉग ऍंड बोन, खांब खांब खांबोळी, अटक-मटक चवळी चटक (ह्याला खेळ म्हणायचं का?), मधलं बोट ओळखा पाहू, चोर-पोलीस, चिप्पी (चौकोन आखून टाईल्सच्या एखाद्या तुकड्याच्या सहाय्याने लंगडी घालत किंवा उड्या मारत खेळायचा खेळ), साखळी, कानगोष्टी (हा खेळ फार इंटरेस्टिंग आहे).
कपाळावर टिचकी मारायचाही एक खेळ होता बहुधा- पण तो कसा खेळायचा ते आठवत नाही.

राधिका

खेळ

जुन्या कळी खेळलेल्या खेळांची ले़ख वाचून आठवण जागी झली. आट्या पाट्या, हुतू..तू, लंगडी असे अनेक खेळ इतिहास जमा झाले. कारणे अनेक पण महत्वाची एक म्हणजे आपण मुलांवर जरा जास्तच अभ्यासाचा बोजा टाकतो दुसरे म्हणजे दुरदर्शन. असो. कालय तस्मै नमः

सदानंद ठाकूर
आम्हाला येथे भेट द्या http://www.mutualfundconsultantindia.com

नवरंग

नवरंग हा खेळ रबरी चेंडूने खेळला जाणारा असे. ह्या खेळात एका वेळेस एक टप्पा मारुन चेंडू पकडायचा, नंतर एका वेळेस २ टप्पे मारुन चेंडू पकडायचा, नंतर एका वेळेस ३ असे एक एक करून ९ टप्प्यापर्यंत वाढवत जायचे. ९ वेगवेगळ्या प्रकाराचे चेंडूचा टप्पे जमिनीवर किंवा भिंतीवर मारून खेळला जायचायचे. ह्या खेळा मुळे लक्षकेंद्रित करण्याची सवय लागायची व चांगला हातांना पायांना व्यायाम होत असे.

टिचकी

राधिकाने लिहिलेला खेळ टिचकी आम्ही पण खेळायचो. ह्या खेळात दोन गट करायचे. दोन्ही गट आपआपल्या गटांच्या प्रत्येक गड्यांना फळ,फुले किंवा भाज्यांची नावे देणार. दोन्ही गट समोरासमोर साधारण ८-१० फुटावर समोरासमोर बसतील. एका गटातल्या भिडुने विरुध्द गटातील गड्याचे डोळे झाकायचे आणि आपल्या गटातील एकाला त्याचे जे नाव ठेवले असेल त्यानावाने बोलवायचे. 'गुलाबाने यावे टिचकी मारुन जावे' असे गाऊन म्हणायचे. डोळे झाकलेल्या गड्याने कोण टिचकी मारुन् गेलं ते ओळखायचे. बरोबर ओळखलं तर एक गुण. असंच विरुध्द् गट खेळेल. ज्या गटाचे जास्त गुण तो गट जिंकला.
ऋषीकेशने सांगितला खांब-खांब खेळ आम्ही पण खेळायचो त्याला आम्ही भिकारी म्हणायचो. आई, दे मला भाकर खांबापाशी उभा असलेला म्हणेल ज्या त्या घरी. दोरीवरच्या उड्या, शिवाजी म्हणतो...., उभा खो-खो .... अंजली म्हणते ते खरंय चेंडुच्या खेळात् लक्षकेंद्रित करण्याची सवय लागते त्याचप्रमाणे सागरगोट्यात डोळ्यांना छान् व्यायाम होतो तर टिचकीच्या खेळात लक्षकेद्रित तर होतेच श्रवणशक्ति तीक्ष्ण होते.

संस्कार

ह्या खेळांमुळे गोडीगुलाबीने खेळायची सवय लागायची... मुलांवर नकळत भरपूर संस्कार व्हायचे.

डबा ऐसपैस, गोटे

१) डबा ऐसपैस, चोरपोलिस
२) भोवरे आणि त्यातली पोचवापोचवी
३) गोटे (पूर्वी सिमेंटचे ढप यायचे त्यांना आम्ही गोटे म्हणायचे!) :)

या गोट्यांच्या खेळातली भाषा फार मजेशीर असे. हलचूल, सबकुछ, इत्यादी. एकलम् आणि अक्कलची गल्ली कम्पलसरी असे आणि बक्कलचा टोला दिला की सुटला. शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी! :)

आम्ही या खेळात लहानपणी फार माहीर होतो. लांबलांबचे गोटे नेम धरून बिनचूक मारायचो. बारा ठोक्यांची भाषा अशी होती,

१) एकलम् खाजा
२) धोबी राजा
३) तिराण बोके
४) चारी चौकटे
५) पंचल पांडव
६) सैय्या दांडव
७) सप्तक टोले
८) अष्टक नल्ले
९) नवे नवे किल्ले
१०) दस्सी गुलामा
११) अक्कल खराटा
१२) बाल मराठा.

:)

आपला,
(नॉस्टॅल्जिक) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बारा ठोक्यांची भाषा

बारा ठोक्यांची भाषा

ही भाषा मी विसरले होते. आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
अशी परवली ची भाषा प्रत्येक खेळात वेगळीच मज्जा आणत असे.

डबा ऐसपैस ह्या खेळाला आम्ही डब्बा गूल म्हणत होतो.

अफलातून विषय आहे हा!

वाह् हा धागा मस्तच् आहे ! वर नमूद केलेलेच् खेळ आम्ही खेळायचो! उन्हाळ्याच्या सुट्टीत आमरस चापून बिल्डींगमागच्या झाडाच्या सावलीत पत्त्यांचा डाव टाकायला, किंवा कोणाच्या तरी घरी कंटाळा येईस्तोवर कॅरम खेळायला काय मजा यायची!

डबा ऐसपैस या खेळाच्या नावाबद्दल मला एक गंमतशीर माहीती मिळाली होती, ती मी इथे लिहीली आहे..
थोडक्यात सांगायचे तर असे:

पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच ! त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या ज्ञ्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. ! हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy..

राहवत नाही म्हणून असाच विषय असलेली मायबोलीवरची लिंक देत आहे. तिथेही बर्‍याच खेळांची नोंद झाली आहे..

वा !

अभ्यासपूर्ण प्रतिसाद. बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या.

--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

डबा ऐसपैस

डबा ऐसपैस या खेळाच्या नावाची गंमतशीर माहिती आवडली. ह्या माहिती बद्दल धन्यवाद.

हा विषयच असा आहे की याच्यावर कितीही बोलले तरी कमीच. आपल्याला आपल्या बालपणाच्या भावविश्वात घेऊन जातो.

धन्यु!

वा! अतिशय रोचक आणि गमतीदार माहीती :)
धन्यु!

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

ऐसपैस / धपांडी / लंडन लंडन लंडन

'डब्बा ऐसपैस' (किंवा 'ऐसपैस'वाला इतर कोठलाही खेळ) यातील 'ऐसपैस'चा उगम 'आय स्पाय'पासून असावा याची थोडीफार कल्पना होती. 'डब्ब्या'बद्दल नव्याने कळले.

लपंडावाच्या एका आवृत्तीत, ज्या गड्यावर राज्य असेल त्याचे लक्ष नसताना, लपलेल्या गड्याने (सापडणार नाही अशा बेताने) भोज्यास हात लावण्याची (किंवा राज्य असलेल्या गड्याच्या पाठीमागून जाऊन त्याच्या पाठीत जोरदार धपाटा मारण्याची) एक पद्धत होती असे आठवते. पैकी राज्य असलेल्या गड्याच्या पाठीत धपाटा घालण्याच्या आवृत्तीत 'धपांडी' की असेच काहीसे जोराने ओरडण्याची पद्धत होती, असे वाटते.

या 'धपांडी'चा उगम कोणी सांगू शकेल काय?

तसेच 'लंडन लंडन लंडन' या (बहुधा पुणे परिसरात खेळल्या जाणार्‍या) खेळाबद्दल (आणि विशेषतः त्याच्या नावाच्या उगमाबद्दल) कोणी माहिती देऊ शकेल काय?

आंधळी कोशींबीर

आंधळी कोशींबीर हा पण एक सांघीक खेळ होता. एका खेळाडूच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि त्याने इतर खेळाडूंना पकडायचे. जो पकडला जाइल त्याच्यावर नविन डाव. वेगवेगळे आवाज काढून राज्य असणार्‍याला भांडावून सोडायच.

एक शंका...

या लेखात आणि त्याला आलेल्या प्रतिसादांत उल्लेख झालेले सर्वच खेळ हे 'स्मृतीआड झालेले' या सदरात खरोखर जमा होऊ शकतील काय?

की भारतातील लहान मुलांच्या खेळांशी आपल्यापैकी बहुतेकांचा प्रत्यक्ष (म्हणजे स्वतः खेळण्याकरिता) दैनंदिन संबंध सुटून अनेक वर्षे उलटून गेलेली असल्याने,आज ते आजूबाजूला खेळले गेले तरी आपल्या लक्षात येत नाहीत?

आणि खरोखरच हे खेळ हल्ली खेळले जात नाहीत असे जरी मानले, तरी आजसुद्धा हे खेळ लक्षात असलेले आपल्यासारखे अनेकजण सापडणार नाहीत का? की आपण स्वतःला इतके प्राचीन, इतिहासजमा, एक-पाय-थडग्यात-(किंवा-चितेवर-)वजा समजू लागलो आहोत?

'स्मृतीआड झालेले' म्हणजे नेमके कोणाच्या स्मृतीआड झालेले?

'आज प्रचलित नसलेले', 'नामशेष झालेले' किंवा अगदी 'मृत' म्हटले, तरी समजण्यासारखे आहे एक वेळ. (म्हणजे, आजच्या घडीला यांपैकी कोणताही खेळ खेळणारी एकही व्यक्ती अस्तित्वात नसेल तर. अन्यथा नाही.) पण 'स्मृतीआड झालेले' हे नामाभिधान योग्य वाटत नाही.

'स्मृतीआड झालेले'

'स्मृतीआड झालेले' म्हणजे नेमके कोणाच्या स्मृतीआड झालेले?

हे खेळ लेखिकेच्या 'स्मृतीआड झालेले' असे वाचक समजु शकतो.

अजून एक

शाळेतील बैठा खेळ म्हणजे वहीवर ४-५ ओळींत १ ते १०० आकडे काढायचे आणि मग शेजारील सहाध्यायी जसे सांगेल तसे तसे ते random (अनियमित) आकडे पेनाने रेषा काढून सलग जोडायचे. मात्र ते जोडताना पूर्वी काढलेल्या रेषांना स्पर्श न करता नवीन रेषा काढणे. असो.

आपले बालपण (घरात रु. १००००+ चा दूरचित्रवाणी संच आणि रु. ३०००+ ची केबल जोडणी नसताना सुद्धा) श्रीमंत होते हेच खरे.

--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

बरोबर

आपले बालपण (घरात रु. १००००+ चा दूरचित्रवाणी संच आणि रु. ३०००+ ची केबल जोडणी नसताना सुद्धा) श्रीमंत होते हेच खरे.

बरोबर.

आपल्या बालपणाची श्रीमंती पैश्यात मोजता येत नव्हती.

३०००!

आपले बालपण (घरात रु. १००००+ चा दूरचित्रवाणी संच आणि रु. ३०००+ ची केबल जोडणी नसताना सुद्धा) श्रीमंत होते हेच खरे.

हे जरा घाऊक विधान वाटले. घाऊक म्हणण्यापेक्षा सापेक्ष. आपले बालपण आहे त्या (भौतिक/आर्थिक/सामाजिक) परिस्थितीत आपण आनंदात घालवले.. हल्लीची मुले त्यांच्या परिस्थितीत आनंदातच आहेत..

बाकी केबलला ३०००!! कुठे रहाता तुम्हि! आमच्याकडे ५५०च घेतात :)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

 
^ वर