फाशीचा वड
सातार्यातले आमचे वडिलार्जित घर गावाच्या अगदी उत्तर सीमेवर होते. तेथून पुढे उत्तरेकडे गेंडामाळ नावाचा माळ होता. छत्रपतींच्या शिकारखान्यापैकी एक गेंडा कधीकाळी तेथे ठेवला होता म्हणून माळास हे नाव पडले असे बोलले जात असे. एकूण भाग संपूर्ण ओसाड होता आणि रात्रीबेरात्री तिकडे जायला कोणी धजावत नसे.
ह्या मालावरच जी काही थोडीफार झाडे होती त्यामध्ये एक जीर्ण वड होता. मूळ झाड मोठेच असले पाहिजे पण आमच्या आठवणीमध्ये त्याचा केवळ बुंधा आणि एक फांदीच काय ती उरली होती. त्याला म्हणत असत फाशीचा वड. ह्या नावामागे १८५७ च्या उठावाची एक आठवण आहे.
१८५७ चा उठाव प्रामुख्याने उत्तरेत झाला, दक्षिणेत त्याचे थोडेच पडसाद उठले. सातार्यात रंगो बापुजीचा मुलगा सीताराम आणि काही साथीदारांनी थोडी गडबड केली पण इंग्रजांनी ती लवकरच निपटून काढली आणि सीताराम आणि साथीदारांना मृत्युदंड सुनावला. गेंडामाळावरल्या वडावर त्यांना फाशी देण्यात आले आणि त्यामुळे झाडाला 'फाशीचा वड' असे नाव पडले.
कालांतराने वड जुना होऊ लागला आणि त्याचा विस्तार जाऊन केवळ एक फांदीच काय ती २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत शिल्लक उरली. १९५७ साली जो उठावाचा शताब्दि सोहळा झाला त्याचा एक भाग म्हणून वडखाली एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. सातार्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी त्याच्या उद्घाटनासाठी तेथे आणण्यात आले होते.
नंतर हळूहळू स्मृतिस्तंभाचे दगड सुटू लागले. तोहि काही वर्षात होत्याचा नव्हता झाला. त्याभोवतीचे कुंपण साध्या काटेरी तारांचेच होते. लोकांनी थोड्याथोड्या करून सर्व तारा पळविल्या. ओसाड गेंडामालावर नवनवीन कॉलनीज उभ्या राहू लागल्या. नवीन आलेल्या उपर्या रहिवाशांना फाशीच्या वडाशी काही देणेघेणे नव्हते. तो तसाच कसाबसा आपला जीव धरून उभा होता.
एक दिवशी दुपारी सोसाटयाचे वळवाचे वादळ झाले आणि वड भुईसपाट झाला. त्याची लाकडे आसपासच्या लोकांनी सरपणासाठी तोडून नेली. एकेकाळी फाशीचा वड म्हणून काही गोष्ट तेथे होती हेहि असेच विस्मृतीत जाईल.
सातार्यात छत्रपति शिवाजी नावाचे एक मराठी इतिहासास वाहिलेले संग्रहालय आहे. वडाच्या लाकडाचा एखादा तुकडा तेथे आठवणीसाठी संभाळून ठेवता आला असता पण तसे कोणासच सुचले नाही. इतिहासाची एक खूण पुसली गेली.
Comments
इतिहासाच्या खुणा
इतिहासाच्या खुणा जतन करायला हव्यात हे जितके खरे आहे तितकेच इतिहासाच्या खुणा पुसल्या जातात हेही खरे आहे. इतिहासात या वडाच्या झाडापेक्षाही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध वास्तु लयाला गेल्या आहेत. ऐतिहासिक ठेव्यांची कदर नसणार्यांनी कधीच त्यांची वासलात लावली आहे. मस्तानीची कबर जेथे चोरीच्या उद्देशाने उद्ध्वस्त केली जाते तेथे भुईसपाट झालेल्या वडाचे सरपण लोक करतील यात शंका नाही.
इथे एक अवांतर वाटावे पण नुकताच घडलेला किस्सा लिहिते.
अनेक वर्षांनी माझे वसईच्या किल्ल्यात जाणे झाले. माझ्या लहानपणी वसईचा किल्ला म्हणजे पडझड झालेली, रान माजलेली एक पुरातन वास्तु (तिथे रात्री टापांचे आवाज येतात.. पासून रात्री भुते दिसतात वगैरे पोरकट कथांचा धनी) लोक किल्ल्याच्या तटबंदीचे दगड खुश्शाल नेऊन आपल्या घरांना आणि घराच्या कुंपणाला/कोटाला लावत. किल्ल्याच्या काही भागात माजलेल्या जंगलामुळे जाताही येत नसे. एकदा तर किल्ल्यातला चक्री जिना शोधून काढल्यावर पुढल्यावेळी त्यापर्यंत कसे पोहोचायचे हेच विसरलो होतो, इतकं रान तिथे माजलं होतं, जायला नीट वाट नाही. साप वगैरे निघायची भीती. किल्ला माणसाने आणि निसर्गाने पोखरला होता.
यावेळेस गेले असता लक्षात आले की पुरातत्त्व खात्याने हे सर्व साफ करून घेतले आहे. किल्ल्याच्या अनेक भागांना आता प्रवेश आहे. प्रत्येक ऐतिहासिक वास्तुपर्यंत जाण्यासाठी कच्ची सडक केली आहे परंतु ज्या इमारतींची पडझड दुरुस्त करण्यात आली आहे तिथे चक्क सिमेंटच्या भिंती* बांधून टाकल्या आहेत. पाहून मला तो प्रकार फारसा आवडला नाही कारण बाहेरून ४-५०० वर्षे जुने दगडांचे काम आणि आतमध्ये चक्क हे असे खाली दाखवल्याप्रमाणे. हे पुरातन चर्च आहे. मला पूर्वी आठवते त्यानुसार त्याच्या भिंतींची पडझड झाली होती. आतमध्ये काही पोर्तुगिजांच्या कबरी आहेत. तिथपर्यंत पोहोचणे मुश्किल होत असे. त्यातील एक कबर १६४४ ची आहे. म्हणजे किमान त्या सुमारास हे चर्चही होते असे मानता येईल. हा भाग आता खाली दाखवल्याप्रमाणे साफ करून सभोवती भिंती उभ्या केल्या आहेत आणि जे दृश्य आहे ते १७व्या शतकातले नक्कीच वाटत नाही. :-(
पण मी ठीक आहे म्हटले. पडझड होऊन नामशेष होण्यापेक्षा जे केले जाते आहे ते बरे आहे (नाहीतरी जेव्हा मंदिरांचे वगैरे जीर्णोद्धार केले जात तेव्हा बांधकामे नव्याने होत होतीच.) परंतु नंतर माझ्या एका नातेवाईकांकडून कळले की त्यांना हा प्रकार अजिबात पसंत नव्हता आणि त्यांनी आणि काहीजणांनी या सरळसोट, अविचारी सिमेंट-काँक्रिटीकरणाला विरोध दर्शवला होता, वेगळ्या सुचवण्या केल्या होत्या, मदतीचा हात पुढे केला होता पण अर्थातच त्यांना कोणी जुमानले नाही. उलट कार्यात बाधा म्हणून पुरातत्त्वखात्याने या लोकांविरुद्ध केस केली.
तेव्हा वास्तु जतन करणे ठीक आहे पण वास्तु जतन करताना त्याचे ऐतिहासिक सौंदर्य लयाला जाऊ नये असे वाटते.
* लोथलच्या बांधकामाबद्दल मागे नितिन थत्त्ते यांनीही अशीच माहिती पुरवली होती आणि त्यांचीही पुरातन भिंतींसोबत सिमेंटच्या भिंती पाहून नाराजी दिसली होती असे आठवते.
ऐतिहासिक सौंदर्य
सुंदर चित्र आहे!
तुमच्या किस्स्यावरून सांचीची आठवण झाली. सांचीचे स्तूप १९व्या शतकात मोठ्या प्रमाणात दुरुस्त करण्यात आले. तेथील संग्रहालयात डागडूजीच्या आधीची, व नंतरची छायाचित्रे व तपशील आहेत. चांगले व्यापक बांधकाम केले गेले, व ते चालू असताना "मूळ" आराखड्यास ते धरून होत आहे की नाही यावर पुरातत्त्व खात्यात वादही उठले होते - मूळ आराखड्याच्या तपशीलांवरच एकमत नव्हते, व बांधकामाच्या वेळी इंजिनियरने स्वतः चे डोके चालवून त्यात भरही घातली होती.
सांचीला जाण्याआधी हा इतिहास मला माहित होता. आज उभे असलेली इमारत या स्वरूपात १०० वर्षांपूर्वीही नव्हती हे माहित असूनही प्रथम स्तूप डोळ्यांसमोर आल्यावर "वा! इतकी जुनी इमारत, काय मस्त टिकली आहे!" असा विचार माझ्या मनात आलाच. नंतर संग्रहालयातली छायाचित्रे पाहून उगीचच काहीसे अपेक्षाभंग झाल्यासारखे वाटले.
मग वाटले, हे सगळेच काही प्रमाणात निरर्थक आहे - "मूळ" आराखड्याचा, प्रतिमेचा अट्टाहास तशी आधुनिक, नवीनच कल्पना आहे. या उलट इमारती, त्यांची मरम्मत, पुनर्वापर, त्यांना वाढविणे इ. फार जुन्या प्रथा. पुनर्स्थापना (रेस्टोरेशन्), दुरुस्ती (रिपेअर) आणि नूतनीकरण (रिनोवेशन्) यातले धागेदोरे सोडविणे खूप कठीण. पण तो चकचकीत, "पुनर्स्थापित" स्तूप पाहून जसे त्या क्षणी प्रसन्न वाटले, तसे पडझड, विटा, शेवाळे आलेल्या भिंती बघून वाटले नसते, हे ही मनोमन मी मान्य केलं. टूरिझम् ने तयार केलेल्या ही काही ठराविक अपेक्षेत आपण खेचले जातो का, कुणास ठाउक.
शेजारच्या विदिशातल्या "हिलियोडोरस" खांबासमोर असेच झाले. पुरातन कालात, "वासुदेव" या दैवताला एका इंडो-गग्रीक सरदाराने अर्पण केलेला, व वासुदेव चा शिलालेखावर सपडलेला सर्वात जुना उल्लेख असे मी ऐकले होते. तिथले स्थानिक लोक त्याला "खाम-बाबा" म्हणून पूजतात. मला तिथे १०-१२ गावकर्यांसमोर खांबाचा फोटो काढताना उगाच मूर्खासारखे वाटले. पण इतक्या लांबून आले होते, आणि चक्क हिलियोडोरस खांबासमोर उभी होते - फोटो न काढता पाय ही निघत नव्हता. शेवटी एखादा काढून, पुन्हा थोडेसे निराश वाटून परतले.
इतिहासाशी समाधानकारक संबंध साधणे फार कठीण आहे!
हे सुंदर चित्र नाही :-(
रोचना, तुम्ही म्हणता हे ही ठीक. पुनर्स्थापना करावीच लागते आणि ती करावीही. पूर्वी जीर्णोद्धाराच्या संज्ञेखालीही अशाच प्रकारची बांधकामे झाली असावीत. किल्ल्यांच्या तटांचे युद्धात किंवा नैसर्गिक उत्पातात नुकसान झाले तेव्हा त्यांचे ऐतिहासिक सौंदर्य राखत डागडुजी झाली नसावी परंतु पुरातत्त्व खाते जेव्हा बांधकाम करते तेव्हा त्यांनी पूर्ण विचारांती तो करावा, कदाचित (शहाण्या) स्थानिक लोकांचे विचार आणि मतेही जमेस घ्यावीत असे वाटते. वरील फोटो सुंदर आहे असे मला म्हणता येत नाही. हे संपूर्ण बांधकाम गेल्या १०-१५ वर्षांतील असावे. हा खालील फोटो बघा म्हणजे मू़ळ चर्चची वास्तु आणि त्यावर बांधलेला नवा डोलारा कसा दिसतो ते कळून येईल. किल्ल्यात इतरत्र असे बांधकाम झालेले दिसत नाही पण फक्त चर्चला का करावे? ते एका धर्माचे प्रार्थनास्थळ आहे म्हणून? पण ते तर गेले कित्येक शतके वापरात (ऍक्सिसिबलही) नव्हते असे अनेक प्रश्न मनात आले.
पण हे खालचे काही फोटो बघा. त्यांची पडझड झाली आहे तरी मूळ स्वरूपात आहेत. ते मला अधिक सुंदर वाटले.
बाकी गरुडध्वजावर (हेलिओडोरसचा खांब) विसुनानांनी लिहिलेले लेख तुम्ही वाचले होते का? तुमच्याकडे त्यात भर घालण्याजोगे नक्कीच काहीतरी असावे.
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१
गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२
हेच म्हणणार होतो
- +१. गरुडध्वजाचे हल्लीचे फोटो असले तर पहायला आवडतील.तसेच आपल्याकडून एखादा लेखही यावा ही अपेक्षा आहे.
गरुडध्वज
पुरातत्त्व खाते
मला फोटो चांगला घेतला आहे असे म्हणायचे होते :-) - पण तुमचे म्हणणे ठीक आहे. असे ओबडधोबड नूतनीकरण करण्यापेक्षा न केलेलेच बरे. दुसर्या सेट मधले दुसरे चित्र खरोखरच सुंदर आहे!
पुरातत्त्व खात्याचा उगम हा भारतीयांना त्यांचा इतिहास स्वतः जपून ठेवता येत नाही, व त्याची अधिक प्रगत ऐतिहासिक विचार व पद्धतींतून त्यांच्याच उद्धारासाठी राखण करावी, या कल्पनेतून झाला. आधी हे पॅटर्नलिस्टिक धोरण ब्रिटिशांचे होते, पण भारतीय तज्ञ खात्यात आल्याने त्यांनीही बहुतेक हाच कित्ता गिरविला आहे. त्यामुळे स्थानिक लोक आणि त्यांचा एखाद्या ऐतिहासिक इमारतीचा वापर/संबंध हा संशयास्पद म्हणून घेतला गेला, आणि जातो. इमारतींची मरम्मत व डागडुजी झाली, तरी स्थानिक लोकांची त्यांच्याच परिसरातल्या इतिहासाशी घडून आलेल्या संबंधांना तेवढे महत्त्व राहत नाही. उलट, भारतीय इतिहासाच्या (कधी कधी जागतिक) हेरिटेजच्या समृद्धीसाठी वास्तूंचा या लोकांपासून राखण (बचाव) करणे हेच खात्याचे धोरण राहिले आहे असे मला वाटते. कधी काळी कोणी ब्रिटिश इतिहासकाराने लिहीलेल्या रटाळ पुस्तकातला गोषवारा इमारतीच्या समोर निळ्या फळ्यावर लावला जातो - इमारतीला इजा पोचवल्यास कार्रवाई करण्यात येईल या कायद्याच्या नोटीसा शेजारी. तिथला इतिहास मग स्थानिक गाइड्स् आसपासच्या दंतकथा गोवून रंगवून रंगवून सांगतात. त्यात व निळ्या फळ्यावरच्या माहितीत बरीच विसंगती असते. यात काही खात्याचे अधिकृत गाइड्स असतात, पण त्याने माहितीत फारसा फरक पडत नाही. पर्यटक लोक चणे खात खात या गोष्टी ऐकतात, आणि फळाही जाता जाता चाळतात. शेवटी कुठल्या कथानकाकडे जास्त झुकतात, आणि तिथल्या वास्तूत घडून गेलेल्या इतिहासाशी जास्त प्रामाणिक कथानक कोणते, हे कोण जाणे. शेवटी राखणही होत नाहीच, कारण पप्पू लव्स प्रिया हे लोकांना इमारतींवर कोरावसं वाटतंच.
हे अर्थातच स्वीपिंग गेनेरलाइजेशन आहे. पण मला शेवटी असंच वाटत राहतं, की कंडहर को कंडहर ही रहने दो कोई नाम न दो!
बायदवे, मी सदस्यत्व दिवाळी अंकाच्यावेळी घेतले होते, पण बॅकबेंचर सारखे खूप दिवस पाट्या टाकून आता सगळे पोर्शन एकदाच वाचून काढावा, तसे मी आता आधीचे धागे वाचत आहे. विसुनानांचे लेखही आता वाचते!
हीच ती लोथलची भिंत
या फोटोतली डाव्या बाजूची भिंत सिमेंटने लिंपलेली दिसते. (ते प्लास्टरच आहे कारण त्यातली रेती डोळ्यांना-फोटोत नाही- स्पष्ट दिसते).
फोटो दिसला नाही तर येथे पाहता येईल.
नितिन थत्ते
(छायाचित्राचा दुव्याच्या शेवटी .jpg, .gif, किंवा .png हे एक्सटेन्शन असायला हवे. तुम्ही आणि रोचना ह्यांनी फोटोसेटचा दुवा दिल्याने फोटो दिसला नाही. -- संपादन मंडळ)
ऐतिहासीक वास्तू
अमेरीकेत याचा उलट अतिरेक होताना पाहीला/अनुभवला आहे. एकदा चांगले क्रिएटीव्ह पद्धतीने फंडींग मिळवले. ते एका (कौलारू) सार्वजनीक इमारतीवर सोलार पॅनेल्स घालण्यासाठी वापरण्यात येणार होते. त्याचे अनेक फायदे होते इतकेच तुर्तास म्हणतो. पण जेंव्हा प्रपोजल तयार केले तेंव्हा लक्षात आले नाही की ही ऐतिहासीक वास्तू म्हणून नोंद केलेली वास्तू आहे का. मला वाटते ५०+ का ७५+ वर्षे जुन्या वास्तूंना अशी नोंद करता येते. ह्या वास्तू संदर्भात त्याहून अधिक काही ऐतिहासीक घटना असल्याने ते होणे साहजीक होते. पण तो प्रांत माझा नसल्याने तेंव्हा लक्षात आले नाही. मग नंतर आम्हाला समितीच्या खेपा माराव्या लागल्या. वास्तवीक समोरून बघताना त्या वास्तूत काहीच फरक दिसणार नव्हता. तरी देखील आमची मागणी मान्य केली गेली नाही आणि प्रकल्प त्या वास्तूपुरता बासनात बांधून ठेवावा लागला. मग इतरत्र तसे केले पण ताक फुंकून पिऊनच...
चेहरामोहरा
मला वाटतं इथे फरक असा आहे की ऐतिहासिक वास्तुची डागडुजी करणे, सफाई करणे, दिव्यांची आणि इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था करणे, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी सडका बांधणे इ. इ. तसे करणे आवश्यकही असावे पण त्या मुळे वास्तुचा चेहरा मोहरा बदलत नाही.
खरे आहे..
वास्तुचा चेहरामोहरा बदलत नाही हे खरे आहे. पण माझ्या अनुभवात तसा तो बदलत नसतानाही काही करून दिले गेले नव्हते. त्यांच्याबाजूने विचार करायचा झाला तर कारण असे होते की एकदा का एकासाठी मान्य केले तर ती घसरगुंडी प्रत्येक ठिकाणीच नियमाचा अपवाद करायला मागू शकेल.
बॉस्टनमधे बिकन हील हा जो स्टेट हाऊस (विधान भवन) च्या जवळचा भाग आहे तसेच अजून काही जुना जवळपासचा भाग आहे. तिथल्या इमारतींचा चेहरामोहरा आजही तसाच ठेवला आहे. तो बदलायला बंदी नाही. पण आतून अर्थातच सगळे अधुनिकीकरण केले गेले आहे. वरून सगळे ऐतिहासिक... तेच रस्त्यांवरील दिव्यासंदर्भात. तसेच मिणमिणते जुने दिवे.
बॉस्टनच्या ऐतिहासिक इमारती
एकेकाळी बॉस्टन जवळ सॉमरविल गावात राहत असताना, आमच्या घर मालकिणीने बंगल्याच्या मागच्या "डेक्"ची गॅलरी नवीन बसवायचे ठरवले. बंगला १९व्या शतकातला होता, त्यामुळे सगळे प्लॅन्स समितीला दाखवावे लागले. पण हे त्या काळच्या बांधकामाला धरून आहे, हे पटवून द्यावे लागले. त्या साठी पुस्तकं चाळणे, कैफियत तयार करणे - एका कोर्टकेससाठी करावी तशी तयारी त्यांना करावी लागली होती. शेवटी परवानगी मिळाली, पण (शिव्या देत देत) पुन्हा काही रिपेरिंग करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतलेली आठवतंय!
कालाय तस्मै नमः
कालाय तस्मै नमः !
जुन्या वस्तु, जुन्या वास्तु, जुनी माणसे, जुने व्यवसाय, जुनी गावे, जुनी शहरे, जुन्या नद्या, जुने समुद्र, जुने देश, जुने खंड, जुने ग्रह, जुने तारे वगैरे वगैरे जुने झाले की नामषेश होणारच हे जितके खरे आहे तितकेच आपण वापरलेल्या वस्तु, पाहिलेल्या महत्त्वाच्या/ऐतिहासिक/मजेशीर वगैरे वगैरे वस्तु/स्थळे/वास्तु इ. पुढल्या पिढीला पहायला मिळणार नाहीत ही हुरहुरही तितकीच शाश्वत आनि चिरंतन असावी.
लेख, माहिती + आठवण आवडली
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?