ताईत, गंडे, दोरे, खडे, रुद्राक्ष, कवच इत्यादींच्या विळख्यात.....

तुम्ही मध्यरात्रीनंतर टीव्ही चॅनेल्सवर (चुकून!) सर्फिंग करत असाल तर जरा संभाळूनच सर्फिंग करा. काऱण तुमच्या 'सुरक्षितते'ची काळजी घेण्यासाठी कवच विकणार्‍यांच्या जाहिरातींच्या भाऊगर्दीत तुम्ही नक्कीच हरवून जाल. तुमच्यावर आदळणार्‍या संकटापासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी कवच विकणार्‍या आजी - माजी टीव्ही-चित्रपट तारकांची फौज आपल्या दिमतीला येईल. अनेक सेलिब्रिटींचे चेहरे तुम्हाला दिसतील. गोड गोड लाडे लाडे बोलून या नटनट्या जाहिरात करत असलेले त्यांचे उत्पादन किती परिणामकारक आहे हे पटवून देण्यासाठी पुढे सरसावतील. आपल्या दुखण्यावर बोट ठेवतील. नको ते प्रश्न विचारतील.
"तुमच्या घरात कायम कुणीतरी आजारी पडत आहेत का?"
"तुमचं लाडकं बाळ रडत असते का?"
"तुमच्या सुंदर सुशिक्षित तरूण मुलीला योग्य नवरा मिळत नाही का?"
"तुम्हाला तुमच्या व्यवसायात खोट आली आहे का?"
"तुम्हाला वेळेवर पदोन्नती मिळत नाही का?"
"तुमच्या यशाबद्दल कुणाला तरी हेवा वाटतो का?"
"या वर्षी तुमच्या शेतात पीक आले नाही का?"
"तुमच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही का?"
"(अभ्यास न करता) तुम्हाला प्रथम श्रेणीत पास ह्वायचे आहे का?"
"तुम्हाला स्वाइन फ्ल्यू, एड्स, सांधेदुखीचा त्रास होतो का?" (घुटनोंके दर्दसे चल नही सकती और पीठ के दर्दसे सो नही सकती | परेशान हो गयी हूं मैं |)

अशा प्रकारच्या हजारो समस्यावर आमच्यापाशी अक्सीर इलाज आहे व त्यासाठी आम्ही सांगतो ते कवच , (विकत) घेवून गळ्यात लटकवा असे आवर्जून सांगणारे आपले लक्ष वेधून घेत असतात. आजकाल यात नाल, आंगठी यांचाही समावेश होत आहे. पांढरे शुभ्र वा भगव्या रंगांचे कपडे घातलेल्या या एकेकाळच्या नट-नट्यांना टीव्हीवर दाखवून हे चॅनेलवाले आपण किती असुरक्षित जीवन जगत आहोत याची आठवण करून देत असतात. टीव्ही पडद्याच्या एका बाजूला अक्राळ विक्राळ अशा भूत राक्षसांच्या प्रतिमा, त्याला पूरक असा कर्कश आवाज व त्याच्या/तिच्या तळहातातून किरण बाहेर पडत असताना "ये शैतानी ताकत और ये इसकी काली कारनामे" असे ओरडत आपल्याला भीती दाखवत असतात. नंतर ती नटी आपल्यासमोर येऊन "यासाठीचे रामबाण उपाय आमच्या अमुक अमुक पदकात असून तुम्ही गळ्यात बारा महिने 24 तास लटकवून ठेवल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतील" असे म्हणत एखादे ताईत पुढे करते व "त्याची किंमत 5000 रु असून तुमच्यासाठी फक्त 2375 रु. आताच फोन उचला किंवा online खरेदी करा" असा तिचा आग्रह असतो.

एके काळी रस्त्यावर गर्दी जमविण्यासाठी जादू वा गारुड्याचे खेळ करून पोट भरून घेणारे व खेळ बघणार्‍यांना गंडे दोरे विकून गंडविणारे आता हायटेक् होत आहेत. अशा वस्तूंच्या विक्रीसाठी टीव्हीवर जाहिराती झळकू लागल्या आहेत. जाहिरातीत चित्रपटाप्रमाणे ट्रिक सीन्स वापरून भोळ्या-भाबड्या टीव्ही वीक्षकांना आश्चर्यचकित (की भयभीत!) केले जात आहे. लेसरसदृश प्रकाशकिरण वापरून दैविशक्तीची चुणुक दाखविले जात आहे. प्रत्यक्ष परमेश्वराच्या डोळ्यातून बाहेर पडणारे किरण ताईतात प्रवेश करून दुष्टशक्तींना नष्ट केल्यामुळे संशयाला जागाच नाही, असेच बघणार्‍यांना वाटत असावे. टेलीमार्केटींगच्या अनेक कंपन्या बिनदिक्कतपणे अंधश्रद्धेला खत पाणी घालणार्‍या अशा वस्तूंच्या विक्रीसाठी पुढे सरसावल्या असून त्यांचा धंदा नक्कीच तेजीत असला पाहिजे. अनेक चॅनेल्सवर या कंपन्यांची मक्तेदारी असावी. काही काळ टीव्हीवर सर्फिंग करून या चॅनेल्सवर जाहिरात होत असलेल्या उत्पादनांचा आढावा घेतल्यास त्याची यादी किती लांबलचक आहे याची कल्पना येईल:
भैरव रक्षा कवच, सर्व कार्य सिद्धी यंत्र कवच, नारायण कवच, रक्षा यंत्र कवच, कालिका कवच, बाल रक्षा कवच, नजर दोष रक्षा कवच, दुर्गा कवच, शनी कवच, रामरक्षा कवच, पंचमुखी हनुमान कवच, माता का कवच, धनलक्ष्मी कवच, साई कवच....
कदाचित पुढील काही महिन्यात 33 कोटी देव-देवतांचे कवच आपल्या संकटविमोचनासाठी सज्ज होतील. "फक्त तुम्ही तुमचा खिसा रिकामा करून घेण्याच्या तयारीत रहा. ही कवच-कुंडले संकटापासून मुक्त करतील व सर्व काही ठीकठाक होईल" अशी हमी या कंपन्या देत आहेत.

जाहिरात करणारी प्रत्येक कंपनी स्वत:च्या उत्पादनाची शंभर टक्के खात्री देत असते. इतर कंपन्यांच्या तावीजपेक्षा आमच्या कंपनीचे तावीज कसे सर्वश्रेष्ठ आहे हेही सांगण्यास कंपनी विसरत नाही. कंपनीच्या दाव्यानुसार त्याची सर्व उत्पादनं ऋषी-मुनींच्या मंत्रशक्तीतून तयार झालेले असतात. त्यांच्यात विशेष 'ऊर्जा' भरलेली असते. त्यामुळे त्या इष्ट परिणाम देतात. एका कुठल्या तरी कंपनीने त्यानी बनविलेले निळे चप्पल घातल्यानंतर "आपोआपच उंची वाढत जाते; उंची वाढविण्यासाठी हार्मोन्स इंजेक्शन वा अस्थी लांब करणार्या खर्चिक ऑपरेशनची गरज नाही", अशी जाहिरात करत होती. आम्ही शिफारस केलेल्या विशिष्ट रंगाची खड्याची आंगठी घातल्यानंतर स्वाइन फ्ल्यूला घाबरण्याचे काही कारण नाही व डॉक्टरी इलाज करण्याचीसुद्धा गरज नाही, असे पुण्यातील एक फलजोतिषी ऐन फ्ल्यूच्या साथीच्या वेळी बिनदिक्कतपणे फेकत होता. त्यानी केलेले हे पोरकट विधान कुणीही गंभीरपणे घेतले नाही ही गोष्ट वेगळी.

श्री सिद्ध साई कवच म्हणून तयार केलेल्या ताईतावर 24 कॅरेट सोन्याचा लेप दिला आहे म्हणे. या ताईताच्या एका बाजूला साईबाबांचे चित्र व दुसर्‍या बाजूला अगम्य व दुर्बोध लिपीत लिहिलेली अक्षरं व आकडे. यालाच यंत्र म्हणतात. कंपनीच्या जाहिरातीनुसार या यंत्राला प्रत्यक्ष साईबाबांचे आशिर्वाद लाभलेले असून या आशिर्वादाची प्राण प्रतिष्ठा ताईतात केलेली आहे. "वेदोक्तपणे ओम् श्री सद्गुरू साईनाथाय नम: हे मंत्र म्हटले असून हे लाकीट गळ्यात घातल्यास आपल्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील; शनीची पीडा टळेल, उद्योगात यश प्राप्त होत जाईल; धनसंपत्तीची लयलूट होईल; जादू टोण्यापासून, वैरीच्या अघोरी कृतीपासून संरक्षण मिळेल; लॉटरी, रेस (व मटका!) यात जिंकण्याच्या शक्यतेत भरघोस वाढ होईल...." असे दावे केले जातात. कंपनी कुठलीही असू दे वा उत्पादन कुठलेही असू दे वा कवचाचे नाव कुठलेही असू दे, दाव्यांचा मतितार्थ नेहमीच वर उल्लेख केल्याप्रमाणेच असतो.

या जाहिरातींना फसणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नसावी. गोवर्धन पवार काही आर्थिक अडचणीत होता. महालक्ष्मी कवचाची टीव्हीवरील जाहिरात बघितल्यानंतर आपल्या आर्थिक अडचणी लवकर दूर होतील या आशेने 3400 रु भरून त्याने कवच विकत घेतले. कवच गळ्यात घातल्यानंतरही त्याच्या अडचणीत काही फरक पडला नाही. उलट तो आणखी कर्ज बाजारी झाला. हे लोक आपल्याला फसवतात हे विधान त्याला उशिरा सुचलेले शहाणपण ठरले.

अशा प्रकारच्या जाहिरातीत नेहमीच आमचे दावे खोटे ठरल्यास सर्व पैसे परत अशी एक पुष्टी जोडलेली असते. पसंतीस न उतरलेली वस्तू 15 दिवसाच्या आत परत पाठविल्यास पैसे मिळतील हे वाक्य वाचून धोका पत्करणारे अनेक असतात. वस्तू परत पाठवण्यासाठीचा पत्ता (पो. बॉ. नं ...), फोन, मोबाइल क्रमांक इत्यादींचा उल्लेखही जाहिरातीत असतो. परंतु जेव्हा आपण वस्तू परत करण्यासाठी फोनवर विचारपूस करतो तेव्हा तेथील मंडळी दुसर्‍या एखाद्या फोनवर संपर्क साधण्यासाठी क्रमांक देतात, त्या क्रमांकावर फोन केल्यास आणखी तिसरीकडे... अशी टोलवा टोलवी केली जाते. यामुळे ग्राहक हैराण होऊन पैसे परत मिळण्याची आशा सोडतो व अक्कलखाती जमा करतो. कदाचित आपण त्या कंपनीच्या संस्थळावर गेल्यास disclaimer या कलमाखाली वकीली भाषेतील 10 -15 पानी टिप्पणी दिसेल. त्यामुळे त्यांना न्यायालयात खेचला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिवाय आपण मागितलेली वस्तूच आपल्याला मिळेल वा व्यवस्थितपणे ती आपल्यापर्यंत पोचेल याचीसुद्धा खात्री देता येत नाही. उमेश पाटीलला आपल्या आईसाठी हनुमान रक्षा कवच हवे होते. त्यानी online 3600 रु भरल्यावर पुढील 24 तासात कंपनीकडून पार्सल पाठवण्यात आले. पार्सल उघडल्यावर हनुमान रक्षा कवचाऐवजी शिव कवच आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यानी कंपनीला तक्रार केल्यावर फोन उचललेली एक हुशार बाई याने काय फरक पडतो, दोन्ही देवच आहेत की म्हणत फोन खाली आपटली. यात देव कुठला का असेना, कंपनीला धंदा करायचा असतो, व ग्राहकाला लुबाडायचे असते.

या कवच उत्पादनातील काही कवच केवळ स्तोत्र वा मंत्राच्या सीडीज आहेत. जाहिरातदारांच्या मते त्यातील मंत्रशक्तीमुळे सर्व संकटे दूर होऊन इच्छापूर्ती होईल. यापूर्वी गायत्री मंत्राचे असेच एक फॅड पसरले होते. सात-आठ शब्दांच्या या मंत्राचे तेच तेच वाक्य दोन दोन तास ऐकणे एका प्रकारची शिक्षाच ठरत होती. आता कवचवाल्यांचे हे फॅड जनमानसात रुजत आहे. 20 - 30 रुपयाची सीडी वा काचेच्या तुकड्याला नजर सुरक्षा कवच म्हणून 4-5 हजाराला गंडा घालणाऱ्यांच्या चलाखीपेक्षा अशा वस्तू विकत घेणार्‍या महाभागांच्या मूर्खपणावर हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे.

खडे, गंडे, दोरे, ताईत, लाकीट, पदक, तावीज, तालिस्मान इत्यादीबरोबरच आजकाल नर्मदेतील दगड-गोट्यांना वनलिंग म्हणून विकण्याचा धंदा तेजीत चालला आहे. ज्याप्रकारे विष्णूच्या उपासकांना शाळिग्रामात अद्भुत शक्तीचा प्रत्यय येत असतो त्याचप्रमाणे शंकराच्या भक्तांना या वनलिंगामध्ये प्रत्यय येतो म्हणे. नर्मदेतील विविध प्रकारच्या व विविध आकारात सापडणार्‍या रंगीत दगड गोट्यांचे पुनर्नामकरण करुन हा धंदा चालतो. शंखमस्तक, पद्म, शिरोयुग्म, ध्वज, स्वयंभू, मृत्युंजय, नीलकंठ, त्रिलोचना, कालाग्नीमुद्रा, त्रिपुरारी, अर्धनारीश्वर, महाकाल इ.इ. नावाने भरमसाठ पैसे घेवून व्यवहार केला जातो. या सगळ्या प्रकारच्या वनलिंगात अद्भुत दैवी शक्ती असते; त्या जवळ बाळगल्यास सर्व दु:ख व पीडा नाहिश्या होतात; त्यातील दिव्यशक्तीमुळे इच्छापूर्ती होते.. अशा प्रकारचे दावे यासंबंधी केल्या जातात. आणि या दाव्यावर विश्वास (श्रद्धा) ठेवून या दगडांना विकत घेणार्यांची संख्या कमी नसावी.

याचप्रमाणे रुद्राक्षमाळा गळ्यात घालून मिरवणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नसावी. हिमालयाच्या पायथ्यापाशी असलेल्या राज्यात वाढणार्‍या एका प्रकारच्या झाडाचे वाळलेल्या फळात कुणालातरी शंकराचा तिसरा डोळा दिसल्याचा भास झाल्यामुळे रुद्राक्ष (रुद्र + अक्ष) हे नाव त्याला पडले. शंकराने त्रिपुरासुर या राक्षसाला आपला तिसरा डोळा उघडून जाळल्यानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रूंचे रूपांतर रुद्राक्षात झाली अशी एक आख्यायिका आहे. अशाच कुठल्यातरी पुराण कथामध्ये ब्राह्मणाने पांढरे, क्षत्रियाने तांबडे, वैश्याने पिवळे व शूद्राने काळे रुद्राक्ष घालावे असे लिहून ठेवून वर्णव्यवस्था बळकट करण्यासाठी हातभार लावला आहे. रुद्राक्षांचे वर्गीकरण रंगाप्रमाणेच नव्हे तर त्यावरील डोळ्याप्रमाणेसुद्धा केले जाते. एक मुखी, द्विमुखी ते चौदहमुखीपर्यंत रुद्राक्षाचे प्रकार असून प्रत्येक प्रकाराचे परिणामही वेगवेगळे असतात म्हणे. रुद्राक्ष या ईश्वरी नावामुळे त्याच्याभोवती आध्यात्मिकतेचे व दैवीशक्तीचे वलय उभे करण्यात धंदेवाईक यशस्वी झाले. म्हणूनच या रुद्राक्षांचीसुद्धा टीव्हीवर जाहिरात होत असते व त्यांच्या विक्रीसाठी गावोगावी प्रदर्शनं भरवली जातात.

अशा प्रकारचा खुळचटपणा फक्त आपल्याच देशात नसून अतीविकसित देशातही रूढ होत आहेत. तंत्र, मंत्र, दैवीशक्ती, चमत्कार इत्यादीवर आपल्याएवढी श्रद्धा नसली तरी क्वांटम पासून सुरू झालेल्या गोष्टींचे तेथे वेड आहे. उदा - दीपक चोप्राच्या क्वांटम हीलींगचा तेथे भरपूर गवगवा होतो. म्हणूनच क्वांटम सोलार एनर्जी पेंडंट्स या लांब लचक नाव असलेल्या ताईताला त्यांच्या देशात भरपूर मागणी आहे व आपल्या देशातही त्याचा चंचू प्रवेश होत आहे. "आपल्या भोवती विद्युत चुंबकीय किरणांचे जाळे पसरले असून त्यामुळे आपल्या शरीर-स्वास्थ्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. स्केलार (?) ऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या या पेंडेंटमध्ये विद्युतचुंबकीय किरणांना भेदून टाकणारी शक्ती आहे. व त्याचा वापर करत राहिल्यास सुख, शांती, एकाग्रता, समाधान मिळण्याची शक्यता वाढते. नकारात्मक ऊर्जा नाहिशी होते. वैश्विक ऊर्जेमुळे तरतरी येते. आलस्य व कंटाळा दूर होतात. यातील किरणांच्या कंपनामुळे चक्र व aura यांचे संतुलन साधता येते." अशा प्रकारच्या दाव्यांना व त्यातील क्वांटम वा नॅनो तंत्रज्ञान यांना कुठलाही अर्थ नाही. तरीसुद्धा याची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी होते व धंदा जोरात चालतो.

यावरून ' दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये' याचा तंतोतंत प्रत्यय येतो. उघड उघड अंधश्रद्धेचा पुरस्कार करणार्‍या अशा जाहिरातीवर बंदी आणण्यास उपलब्ध असलेला केबल व नेटवर्क कायदा, 1994 वा खोट्या व दिशाभूल करणार्‍या जाहिरातीवरील बंदीचा कायदा पुरेशे ठरत नाहीत. कारण जाहिरात करणार्‍या एजन्सी निष्णात कायदे सल्लागारांकडून सल्ला घेऊनच disclaimer चा उल्लेख करतात. This is paid advertisement. Viewer discretion is advised. त्यामुळे आपल्या तक्रारीतील हवाच निघून जाते. मुळात आपला विरोध गंडे- दोऱ्यांना आहे की त्यांच्या जाहिरातींना, हे आपल्याला ठरवावे लागेल. जरूर पडल्यास कायद्यात दुरुस्ती करून या जाहिरातदारांना कोर्टात खेचून खटला भरता येईल.परंतु कायद्याची लढाई नेहमीच वेळखाऊ व खर्चिक असते, हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवे.

एकेकाळचा प्रसिद्ध क्रिकेटपटू 'दादा' सौरव गांगुलीला आपण खेळताना पाहिले असेलही. त्याच्या मनगटावर व गळ्यात (व दंडावर) मोठ्या प्रमाणात मंतरलेले रंगीत दोरे, ताईत असूनसुद्धा क्रिकेटविश्वामधून त्याची गच्छंती झाली. त्यामुळे अशाप्रकारचे गंडे-दोरे, ताईत, कवच इत्यादी प्रकारच्या spiritual market commodities मुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडू शकतो हा विचारसुद्धा मूर्खपणाचा कळस ठरू शकेल. परंतु काही अती बुद्धीवंत "त्यातून मानसिक समाधान मिळत असल्यास त्याचा विरोध करण्यात हशील नाही" असा बुद्धीभेदही करतील. मानसिक समाधान व वैयक्तिक अनुभव याच निकषावरून निष्कर्ष काढत असल्यास बुद्धी, तर्क, विवेक, विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना गुंडाळून ठेवावे लागेल.

मुळातच आपली मानसिकता दैवीशक्ती, दैवी चमत्कार, मंत्रशक्ती, वैदिक परंपरा, आध्यात्मिक समाधान यातच गुरफटलेली असल्यामुळे असा गोष्टींचा धंदा करणाऱ्यांचे फावते. दैवी चमत्कारातून आपली सुटका होईल याच आशेने आपण या कवच व्यवहाराला उत्तेजन देत असतो. मुळात आपल्यावर कोसळलेल्या संकटाचे मूळ आणखी कुठेतरी असते. व आपण तेथे न शोधता भलतीकडेच त्याचा शोध घेतो. त्यामुळे कवचसारख्या वस्तूंची मलमपट्टी वापरून काही तरी करत असल्याचा आव आणतो. कदाचित 3-4 हजार रुपये आपल्यासारख्यांना फार मोठी रकम वाटणार नाही. परंतु अशा प्रकारे हजारो लोक अशा फालतू गोष्टीवर खर्च करत राहिल्यास समाजात वेगळा - विज्ञानविरोधी व अंधश्रद्धा पसरविणारा - संदेश पोचतो व हे समाज हितास विघातक ठरू शकते. म्हणूनच आपण आपला तर्क व विवेक वापरून अशा गोष्टींपासून चार हात दूर राहणेच केव्हाही हितावह ठरू शकेल!

पूर्व प्रसिद्धी : अं.नि.वार्तापत्र, जुलै 2011

लेखनविषय: दुवे:

Comments

अंधश्रद्धा - मग ती कसलीहि असो

'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये' ह्या वाक्प्रचारानुसार सगळ्या बाबींचे विक्रेते सर्वत्र असतात.

येथे नॉर्थ अमेरिकेत एकेकाळी Snake Oil ह्या सर्व रोगांवरील अक्सीर इलाज विकणार्‍यांची चलती होती. आज त्याची जागा मॅग्नेटिक शक्तीची वळी, लॉर्डस प्रेअरचे ताईत ह्यानी घेतली आहे. सर्वात उच्छाद मांडला आहे दोन गोष्टींनी - वजन कमी करण्यासाठीचे मार्गदर्शक/व्यायामाची यंत्रे/योगा (योग नाही) चे हठ-स्वयंभु-Power इ. नाना प्रकार/जेनी२० सारखे २० किलो वजन गॅरंटीड कमी करून देणारे डाएट कार्यक्रम हे एक. दुसरे म्हणजे शरीराचे वेगवेगळे भाग अधिक सौदर्यपूर्ण करण्याचे उपाय/मलमे/उपकरणे इ. एकदा मी सहज बसल्याबसल्या केलेल्या हिशेबावरून असे दिसले की तळपायाच्या मागच्या भेगांपासून प्रारंभ करून डोक्यावरच्या केसांपर्यंत सौदर्यीकरण करण्याचे ९२ उपाय उपलब्ध आहेत.

अरविंद कोल्हटकर, जुलै २८, २०११,

तर्ककर्कशता आणि भोंगळ श्रद्धा

तर्ककर्कशता आणि भोंगळ श्रद्धा या २ टोकांच्या मध्ये कुठेतरी व्यक्ती असते. मला जे रुचते (सूट होते) ते मी आचरणात आणते. पण माझ्यापेक्षा जी व्यक्ती तर्काच्या अधिक जवळ जाते तिला मी भोंगळ वाटते तर माझ्यापेक्षा जास्त श्रद्धाळू व्यक्तीस मी अति-चिकीत्सक वाटते. हे प्रत्येकाच्या बाबतीत होते.
तो नर्मदेचा गोटा माझ्याकडे आहे. पण त्याला अभिषेक घालून शिवकवच म्हणण्याने जर मला अतीव समाधान मिळत असेल तर मी ते का करू नये हा प्रश्न मी स्वतःला विचारते. प्रत्येकाचे एक आयुष्य, त्यातील अस्थिरता, असुरक्षितता असते आणि त्यावर मात करण्याचे त्या व्यक्तीचे "मानवी" प्रयत्न चालू असतात पण कधीकधी अमानवी /अतिंद्रिय शक्तीला साद घालावीशी वाटते. तुमचा तर्क भले मला दुनियेच्या नजरेत शहाणा ठरवेल पण मला जर समाधान आणि शांतीच जर तो देऊ शकत नसेल काय उपयोग?

मला आपले सर्व लेख आवडतात कारण माझ्या स्वभावाच्या विरुद्ध बाजू अतिशय ओघवत्या भाषेत मला वाचायला मिळते. मेंदूचा (माईंड) एक नवीन प्रदेश माझ्यासाठी खुला होतो.
______________
आयुष्य म्हणजे क्षणोक्षणी कोणत्या ना कोणत्या २ टोकांमधले संतुलन साधण्याची कला - अशी खात्री अगदी म्हणजे अगदी पक्की होत चालली आहे.

मध्यरात्रीनंतर

मध्यरात्रीनंतर टीव्ही चॅनेल्सवर (चुकून!) सर्फिंग करत असाल तर जरा संभाळूनच सर्फिंग करा.

मी मध्यरात्री जागी नसते, कधी चुकून असले तरी टीव्ही पाहण्यासाठी नाही. ;-) मध्यरात्री जागे राहून जे टीव्ही सर्फिंग करतात त्यातल्या अनेकांच्या आयुष्यात प्रश्न (निद्रानाश, नैराश्य, चिंता) असण्याचा संभव आहे. असे लोक या जाहीरातींना बळी पडण्याची शक्यता देखील अधिक वाटते.

असो.

बाकी लेख चांगला आहे. अशा बिन्डोक जाहीराती पाहिलेल्या आहेत, नॉर्थ अमेरिकेत बहुधा दिवसाही दिसतात.

ह्म्म्

दूरदर्शनच्या जमान्यात असे होत नसे निदान प्रमाण नगण्य असावे इतकी जाहीरतबाजी नव्हती. रात्री बहुदा नऊ (का दहा) वाजुन गेल्यावर राष्ट्रीय कार्यक्रम सादर केले असायचे ते हुच्चाभ्रुंना खुराक व सामान्यांना लगेच शांत झोप लागावी असेच. अगदी सुरवातीला केबल टिव्ही आला तेव्हा फारतर रात्रीचे कार्यक्रम म्हणून विदेशी माल असायचा. दिवसा क्वचित होम शॉपींग असायचे.

हे गेल्या पाच वर्षात इतके भारतीय तोडगे जे आधी फक्त रस्त्यावर किंवा फुटकळ वृत्तपत्र, नियतकालीकांमधे एक चौकोन जाहीरात असायची ती सर्रास जनसामान्यांनी उचलून धरलेल्या चॅनेलवर यायला लागली आहे.

अंधश्रद्धा वाटेल अशी उत्पादने यांचे असे मार्केटिंग अथवा अश्रद्ध असे अनेको चंगळवादी तोडगे (फ्रेंडशीप लाईन, उपकरणे पासुन पुन्हा निद्रानाश, विविध समस्या) दोन्हीही माझ्याकरता निरर्थकच! नानावटींचे काय म्हणणे आहे? तुमच्या मते अयोग्य असलेल्या जाहीरती बाजुला काढल्या तरी त्यांची जागा चंगळवादी, भोगवादी, पर्यावरणास हानीकारक ठरू शकतील अशीच उत्पादने येणार अजुन.. निद्रानाश, मानसिक समस्या आस्तीक व नास्तीक दोघांच्यात आहे व दोघेही उपभोक्ता आहेत. भले त्यांची उपायांची निवड वेगळी पण दोघेही समाधानासाठी अन्यत्र वस्तुंचा आधार शोधत असतात. आस्तीक व नास्तीक दोघे जितका संघर्ष करतील तितके ते आपापल्या गटाची उत्पादने अजुन खपवतील आपापल्या बाजारपेठात.

जसे बालाजी तांबे जसे नियमीत साम टिव्हीवर तसे काही लोक जे अश्रद्धांच्या मार्केटींग धंद्यात आहेत त्यांचे हे असे लेख वरचेवर येतातच!

दोन्ही बाजुंचे दुकान चालू रहाते कारण बाजरपेठ व मागणी आहे. काल एक रोचक लेख वाचनात आला.

लांबलेला लेख

लेख विषय आवडला असला तरी जरा लांबलेला- प्रसंगी पाल्हाळ वाटले.

बाकी, लोकांन फसवून ताइत-गंडे विकणारे आणि लोकांन फसवून ऍमवे वा तत्सम प्रोडक्टस विकणारे यांच्यात मुळात काहिच फरक वाटत नाहि.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मार्केटिंग आणि सत्य

मार्केटिंग करणारे सगळे लोक अतीशयोक्त किंवा साफ खोटे सांगत असतात हे सगळ्या सुबुद्ध लोकांना समजत असते. तरीही ते लोकदेखील ती प्रॉडक्ट विकत घेतात. यामागे नक्की काही मानसशास्त्रीय कारण दडलेले आहे. दोरे, गंडे, ताईत विकत घेणारे त्यावर सर्वस्वी विसंबून असतात असे समजायचे कारण नाही. इतर दिशेने त्यांचे योग्य ते प्रयत्न चाललेले असतातच.
दोरे, गंडे, ताईत अशा गोष्टी विकत घेणार्‍यांचे मला समर्थन करायचे नाही, पण गोरेपणा आणणारी क्रीम किंवा कमोड धुवून निर्जंतुक करणारा द्राव विकत घेणे हे यापेक्षा फारसे वेगळे नसावे. त्यांचा किती परिणाम होतो हे तपासून पाहणे कोणालाच शक्य नसते आणि त्यांचे दुष्परिणाम पाहणे तर अधिकच कठीण असते.

थोडक्यात सांगायचे तर अशा गोष्टी चालत राहणारच, पण त्यांच्या विरोधात जनजागृतीसुद्धा करत रहायलाच हवी.

सहमत

अनिश्चिततेला तोंड देण्याची प्रत्येकाची क्षमता निरनिराळी असते. कुणाला कशाचा आधार केव्हा वाटेल हे सांगणे कठीण.
ऋषिकेश म्हणतो तसे हे श्रद्धेचे मार्केटींग आहे यावर उपक्रमावर यापुर्वीच चर्चा झालेली आहेच. चित्राच्या श्रद्धेचे मार्केटिंग ची आठवण झाली.
[ पुर्वी काशीचा गंडा, जानवे व करगोटा (कटिदोरा) घालणारा]
प्रकाश घाटपांडे

लिंबू बिब्बा माळ

"मुळातच आपली मानसिकता दैवीशक्ती, दैवी चमत्कार, मंत्रशक्ती, वैदिक परंपरा, आध्यात्मिक समाधान यातच गुरफटलेली असल्यामुळे असा गोष्टींचा धंदा करणाऱ्यांचे फावते."

... खरंय. आणि ही मानसिकता केवळ अशिक्षित, अल्पशिक्षित यांच्यातच रुजली आहे असे बिलकुल समजू नये. उद्या शनिवारी 'अमावास्या' आहे, ती मनी ठेवून एखाद्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या (आमच्या कोल्हापुरच्या अंबाबाईच्या देवळाचा परिसर, उदाहरणार्थ) आसपास भटकले तर दिसेल की डझनावरी पोरेपोरी ' एक लिंबू, दोन हिरव्या मिरच्या आणि एक काळा बिब्बा' दोर्‍याला गुंडाळून पाच-पाच रूपयाला विकत असताना दिसतील आणि ते घेण्यासाठी सकाळी अक्षरश: पाळी लागली असते. का? तर ती माळ टू व्हीलरला लावली तर 'अमावास्येचे भूत' आपल्या आडवे येत नाही आणि मग अ‍ॅक्सिडेंट होत नाही, म्हणे. ही लिंबू-बिब्बा माळ घेणार्‍यामध्ये एमआयडीसीला जाणारा कामगार जसा असतो तसाच शिवाजी विद्यापीठात फिजिक्स विषय शिकविणारा आणि पीएच.डी. होल्डर सीनिअर प्रोफेसरही असतो (हे मी पाहिले आहे)

त्यामुळे लेखक म्हणतात त्याप्रमाणे धंदा करणार्‍याचे फावतेच. आता तर रस्त्यावरच नव्हे तर आजुबाजूच्या स्टेशनरी आणि चिल्लर किराणा आणि बेकरी विकणारेही त्या लिंबूबिब्बा माळा विक्रीला राजरोस ठेऊ लागले आहेत. आठदहा वर्षापूर्वी 'अमुक एका खड्याच्या अंगठी"च्या विक्रीने इथे असाच उच्छाद मांडला होता, आणि ती घेण्यामध्ये कॉलेजतरुणांचाही लक्षणीय सहभाग होता.

तुकाराम महाराज म्हणतात तेच खरे, "जगात गाढवांची कमतरता नाही, तस्मात कुंभाराची चलती आहे."

तुकाराम?

मला वाटले हे "असा मी असामी" मधल्या बेंबट्यांच्या वडिलांनी म्हटले होते !

असा मी असामी

"बेंबट्यांच्या वडिलांनी म्हटले होते ! ..."

~ अगदी अगदी. मी तो संदर्भ लक्षात ठेऊनच त्या वाक्याचे प्रयोजन केले आहे. या क्षणी "असा मी असामी" माझ्याजवळ नाही, पण मला नक्की स्मरते की, जोशीबुवा त्या बाबांच्या प्रवचनाला जाऊन आल्याचा वृत्तांत गोठोस्करांना [कोट परत करताना] देतात त्यावेळी आपल्या वडिलांनी 'तुकोबा म्हणून गेलेच आहेत की...." इ. इ. असे काहीसे वाक्य आहे ते उदगारतात.

वरील जे लिखाण आहे ते तंतोतंत पटले

वरील जे लिखाण आहे ते तंतोतंत पटले. बाकी घारेकाकांचा सल्ला प्रत्येक ठिकाणी आजमावता येणार नाही. कारण ती एक कसोटी आहे, जी पारखणे वाटते तितकी सोपी नाही.

- पिंगू

 
^ वर