उपक्रमात मला भासलेली एक त्रुटि

ह्या उपक्रमात मी अजून नवखाच आहे पण अन्य काही चर्चागटांचा मला चांगला अनुभव आहे. त्यांच्या तुलनेवरून मला पुढील गोष्ट जाणवली.

येथे मुख्य पॄष्ठावर सर्वात नवा धागा सर्वप्रथम दिसतो आणि त्याआधी प्रारंभ झालेले धागे कालानुक्रमे त्याखाली दिसतात. मुख्य पॄष्ठावर सुमारे ३० धाग्यांना स्थान मिळते आणि त्यातहि अर्ध्याहून थोड्या कमी धाग्यांना वरच्या, सहज दॄष्टीस पडणार्‍या जागा मिळतात. अधिक वादग्रस्त वा अधिक चर्चा होऊ शकेल अशा सकस धाग्यांना प्राधान्य देण्याची येथे सोय नाही. परिणामतः असे धागे केवळ जुने झाले म्हणून मागेमागे पडू लागतात आणि नवे, तुलनेने कमी कसदार धागे, केवळ नवे आहेत म्हणून महत्वाच्या जागा अडवून बसतात. नव्या सदस्यांना जुने पण सकस धागे लक्षात येण्याची शक्यता कमीकमी होऊ लागते. एखाद्या जुन्या सदस्याने अशा धाग्यावर काही नवा प्रतिसाद दिला तर तो प्रतिसादहि कोठेतरी तळागाळात पडून इतरांच्या पुढे येतच नाही आणि अशा अर्थाने तो फुसका बारच ठरतो. Out of site, out of mind हा न्याय येथे लागतो

इतर काही चर्चासमुदायांमध्ये (उदाहरणार्थ गूगल ग्रुप्स) आलेले प्रतिसादांचे त्या त्या निरोपांच्या निर्मितीच्या क्रमानुसार दाखविले जातात. कोठल्या धाग्यामध्ये तो प्रतिसाद पडतो ह्यापेक्षा तो किती नवा आहे हा निकष निरोप सर्वांच्या दॄष्टीस पडण्याचा निकष ठरतो. सहा महिन्यापूर्वी प्रारंभ झालेला एखादा धागा मध्ये कोणताच प्रतिसाद नसल्याने मागे पडला असला तरी नव्या प्रतिसादामुळे तो पुन: पुढे येतो आणि त्याच्या सकसतेनुसार त्यावर नवी चर्चा होऊ शकते.

ह्या पद्धतीमध्ये प्रत्येक धाग्याला तो नव्याने सुरू होताच स्वतःची 15 minutes of fame मिळतात. तदनंतर मात्र त्याला मिळणारे प्राधान्य केवळ त्याच्या चर्चानिर्मितिक्षमतेवर अवलंबून राहाते. चर्चा हेच raison d'etre असलेल्या उपक्रमात हे आवश्यक आहे असे मला वाटते.

ह्यावर अन्य सदस्यांचे काय मत आहे आणि असा बदल घडवून आणणे तान्त्रिकदॄष्ट्या शक्य आहे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

हे पहा

http://mr.upakram.org/tracker/discuss
हा दुवा पहावा. मी तोच पाहतो.

या दुव्यावर एक टॅब लेख असा दिसतो त्यावर गेले तर लेख या क्याटेगरीत आलेले धागे लेटेस्ट प्रतिसादक्रमाने दिसतात.

नितिन थत्ते

सहमत

मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या लेख आणि चर्चा या टॅब्सवर टिचकी मारली असता लेटेष्ट प्रतिसादांच्या क्रमाने धागे दिसतात.

बाकी, प्रतिसाद अधिक असले म्हणजेच चर्चा चांगली असते असे नाही. कधी कधी १०० गाठणार्‍या चर्चा पण जेथे वादविवाद, मारामार्‍या या खेरीज फारसे काही नाही त्या मागे पडाव्यात आणि लपून जाव्यात हे योग्य वाटते.

असो, इतर संकेतस्थळाच्या मानाने उपक्रम साधेच आहे आणि साधेच आहे म्हणून वेगवान आहे आणि म्हणून बहुधा अनेकांना प्रिय आहे. कोल्हटकरांना उपक्रमाच्या साधेपणाची सवय लवकरच होईल असे मानते.

लोकशाही

<बाकी, प्रतिसाद अधिक असले म्हणजेच चर्चा चांगली असते असे नाही. कधी कधी १०० गाठणार्‍या चर्चा पण जेथे वादविवाद, मारामार्‍या या खेरीज फारसे काही नाही त्या मागे पडाव्यात आणि लपून जाव्यात हे योग्य वाटते.>

१०० सदस्यांना जेथे काही लिहावेसे वाटते तो धागा मागे पडण्याच्या लायकीचा आहे असे मला वाटणे हे माझा वैयक्तिक मूल्यनिर्णय आहे आणि त्या धाग्यातले काहीहि न वाचण्याची क्षमता माझ्यापाशी आहेच. बहुसंख्यांना तसे वाटत नाही हे गॄहीतकॄत्यावरूनच स्पष्ट आहे. तो धागा का लपविला जावा?

अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.

१०० सदस्य नव्हे

बहुसंख्यांना तसे वाटत नाही हे गॄहीतकॄत्यावरूनच स्पष्ट आहे. तो धागा का लपविला जावा?

१०० सदस्य नव्हे. १०० प्रतिसाद असे धरावे. कदाचित ते प्रतिसाद दोनच सदस्य देत असावे. तेथे हमरीतुमरीवर येणार्‍या मारामार्‍या किंवा काहीतरी अनावश्यकही लिहिले जात असावे अशावेळी असे धागे मागे पडत असतील तर त्याविरुद्ध कोणाची तक्रार असेल असे वाटत नाही. धागे मुद्दाम लपविले जात नाहीत. ते मागे पडल्याने आपोआप लपतात. खणून काढले तर सहज मिळण्याजोगे असतात.

धाग्यातले काहीहि न वाचण्याची क्षमता माझ्यापाशी आहेच.

हो, परंतु असे म्हणणे किंवा "तुम्हाला वाचायचे नसेल तर तुम्ही दुर्लक्ष करा" असे म्हणणे नेहमीच सयुक्तिक असते असे नाही. संकेतस्थळाच्या नियमांना धरून न चालणारे धागे किंवा कोणतीही माहिती न पुरवणारे धागे सदस्यांना नकोसे होऊ शकतात.

त्रुटि

केवळ वितंडवाद असलेले किंवा वैयक्तिक पातळीवरील आरोप असलेले धागे संपादक केव्हांहि थांबवू शकतात.

दोनच सदस्य केवळ तेच तेच मुद्दे रोजच मांडत असतील तर केवळ त्याच कारणाने तो धागा मागे पडण्याऐवजी उलटा कायमच शीर्षस्थानी राहील - जर संपादक डुलक्या घेत असतील तर. हाच तर माझा मुद्दा आहे. सध्याच्या पद्धतीत निकस धागे केवळ 'अलीकडचे आहेत' ह्या एकाच कारणासाठी पुढेपुढे येत राहतात आणि सकस पण जुन्या धाग्यांना दाबून धरतात.

अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.

त्रुटि

Out of site नाही Out of sight.

यद्यपि बहु नाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम्|
स्वजनो श्वजनो माऽभूत्सकलं शकलं सकॄत्शकॄत्||

अरविंद कोल्हटकर, २२ जुलै, २०११.

अ संस्कृत्

इथे 'अ'संस्कृत लोकही भटकत असतात. श्लोकाचा अर्थ कळला नाही

अर्थ

स्पेलिंगची अक्षम्य चूक केल्याने मी स्वतःवर मारलेला हा ताशेरा आहे. अर्थः मुला, जरी फार शिकला नाहीस तरी व्याकरणाचा जरूर अभ्यास कर, जेणेकरून स्वजनाऐवजी श्वजन, सकलाच्या ऐवजी शकल आणि सकृत् ऐवजी शकृत् अशी गल्लत होणार नाही. (सकृद् = एकदा, शकृत् = शेण.)

अरविंद कोल्हटकर, जुलै २५, २०११.

सुसंस्कृत

असंस्कृताला सुसंस्कृत करत असल्याबद्दल धन्यवाद. :)
अजूनही काही शंका- श्वजन म्हणजे श्वान, अधिषे म्हणजे शिकणे का? आणि शकल चा मराठी सारखाच अर्थ लावायचा का?

सुसंकृत

मीहि काही जाडा संस्कृत विद्वान् नाही पण शाळेत आणि कॉलेजात शिकलेले संस्कृत चांगले आठवते. त्यावरून लिहितो:

श्वजन=श्व+जन. श्वन् (कुत्रा) हा शब्द समासात वापरायचा असल्यास त्याचे रूप श्व.
शकल=तुकडा
नाधीषे= न+अधीषे. अधि+इ (२ आ.)=(शब्दश: जवळ जाणे) अध्ययन करणे, शिकणे, ह्याचे द्वितीयपुरुषी एकवचन.

ह्याच मार्गाने अध्यापन हा शब्द अधि+इ च्या प्रयोजक रूपावरून निर्माण झाला आहे. इ.इ.

अरविंद कोल्हटकर, जुलै २७, २०११.

बहुतेक मागध-प्राकृतांची टर उडवण्यासाठी

हे कडवे बहुधा मागधी-प्राकृत बोलणार्‍यांची टर उडवण्यासाठी कोणीतरी लिहिलेला असावा. दोन्ही उदाहरणांत स्->श् असा फरक दिसतो. हा फरक मागधी प्राकृतामध्ये विशेषकरून होत असे.

या ठिकाणी श्री. कोल्हटकर यांनी केलेले उद्धरण ठीकच आहे - त्यांनी सुद्धा खरोखरी "व्याकरणा"ची* चूक केलेली नाही, तर - त्यांच्या टंकनदोषानेसुद्धा शब्दकोशातील दोन शब्दांची आदलाबदल झालेली आहे (site/sight) आणि हा प्रकारही श्लोकातील उदाहरणांसारखाच (सकल/शकल) आहे.

(*शब्दकोशातील दोन शब्दांमध्ये आदलाबदल करून झालेला अर्थबदल झाला, तर हा प्रकार साधारणपणे "व्याकरण"शास्त्राच्या क्षेत्रातला मानला जात नाही. व्याकरणाच्या दृष्टीने शब्दकोशातले उतारे गृहीतके असतात. व्याकरण अगदी नीट शिकूनसुद्धा अनोळखी शब्दांच्या आदलाबदलामुळे झालेले फरक समजण्यात काहीच फायदा होत नाही. मात्र शब्दकोशातले जे शब्द माहीत आहेत, त्यांची जी विविध रूपे असतात, त्यांचे वाक्यातील जे-जे काय स्थान असते, त्यांच्याबाबत यच्चयावत ज्ञान व्याकरण शिकल्यामुळे मिळते. [संस्कृताच्या] व्याकरणाचा सिद्धांत आहे की रूढार्थ हा व्याकरणाने बनवलेल्या यौगिक अर्थापेक्षा प्राथमिक असतो. संदेह असल्यास तोच ग्राह्य असतो. श्लोक रचणार्‍याच्या "पुत्रा"ने व्याकरण नीट शिकले, तर त्याला हा सिद्धांतसुद्धा कळेल. त्याच्या आजूबाजूच्या मागधी लोकांपैकी संस्कृत शिकलेले लोक जर "शकल" उच्चार करून "सगळे" असाच अर्थ समजत असतील, तर तो रूढार्थ श्लोककाराचा पुत्र व्याकरणाच्या सिद्धांतानुसार रूढार्थ म्हणून मान्य करेल. त्यामुळे श्लोककाराचा "व्याकरण शीक रे बाळा" सल्ला व्यर्थ आहे. त्याऐवजी "तुला दोन अर्थ आहेत हे मी सांगतो : मग उच्चार करताना काळजी घे रे बाळा!" असा सल्ला अधिक समर्पक राहील.)

मिश्टेक

म्हणजे स्पेलींग मिष्टेक आणि व्याकरण या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत तर.
पण sight चा site होणे याला टंकन दोष कसे काय म्हणता येईल त्याला स्पेलिंग विस्मरण म्हणु शकतो फ़ार तर. आपल्याला योग्य स्पेलिंग माहिती असताना कळफ़लकावरिल कळा उलटसुलट किंवा दुस-याच टंकल्या गेल्या तर त्याला टंकनदोष म्हणता येईल. पण इथे तर त्यांना (बहुदा) योग्य स्पेलिंग आठवले नव्हते. नाहितर एवढा मोठा टंकनदोष(जी एच ऐवजी टी टंकणे, त्यानंतर टी ऐवजी इ टंकणे) कसा होऊ शकेल?

त्रुटि

'चर्चा' टॅबमुळे इष्ट ते घडवून आणता येते हे ठीक. पण by default ही सोय मुख्य पॄष्ठावर असायला हवी असे वाटते कारण तेच पॄष्ठ सर्वप्रथम पुढे येते. Out of sight, out of mind...

अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.

उपाय

यावर उपाय म्हणजे थोड्या थोड्या दिवसांनी तेच विषय, किंचित् फेरफार करून परत चर्चेला आणायचे. यनावाला, धम्मकलाडू, वसुलि , नानावटी या लोकांचे लेखन पाहिलेत तर ही खुबी लक्षात येईल.

त्रुटि

ह्याला काही मी happy solution म्हणणार नाही. ह्यामुळे चर्चा तुटक तुटक होऊन तिचा आत्माच हरवेल. आपल्या ह्या सार्‍या उद्योगाचे मूळ कारण काय आहे?

अरविंद कोल्हटकर, टोरोंटो, २२ जुलै २०११.

मी त्यांच्यापैकी नाही

आपल्या ह्या सार्‍या उद्योगाचे मूळ कारण काय आहे?

"मी"हा उद्योग कधीही केला नाही आणि मला तो पसंतही नाही. माझा उपरोध आपल्या लक्षात आला नाही हे दुर्दैव. यापुढे उपरोधिक/औपरोधिक लिहिताना ते लोकांना समजेल अशी काळजी घेईन. जे लोक हे उद्योग करतात त्यांची नावे आधीच्या प्रतिसादात दिली आहेत. तेव्हा त्यांनाच विचारावे. बहुतेक उत्तर मिळणार नाही. पण "त्यांच्या" उद्योगाचे मला समजलेले कारण "आपल्या लाडक्या मतांचा प्रचार आणि नावडत्या लोकांची नालस्ती" हे असावे.

असो.

आपल्याशी सहमत

पुर्णपणे सहमत

खिचडी पॅनल

आम्ही पण खिचडी पॅनलचे.

सकसतेचे निकष

कुठला धागा सकस आहे हे व्यक्तिसापेक्ष आहे. उदा. जुन्या काळातील किल्ल्यांची किंवा हिर्‍यांची माहिती एखाद्याला (चर्चा करण्यास) सकस वाटू शकते परंतु दुसर्‍या कोणास त्या माहितीत काहीच सकसता जाणवणार नाही. तेव्हा सर्व उपक्रमींना मान्य होऊ शकणारे निकष ठरवता येणे कठिण आहे.

त्रुटि

का ह्यांचे मत मला पूर्ण मान्य आहे. धाग्याची सकसता ही व्यक्तिसापेक्ष आहे हे खरेच पण ज्या धाग्यावर अनेक सदस्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे (किंवा ह्यापुढे नोंदवतील) तो धागा आपोआपच सार्वजनीन महत्त्वाचा आणि म्हणून व्यक्तिनिरपेक्ष सकस आहे हे उघड आहे.

मी सुचविलेल्या (आणि अन्य अनेक ठिकाणी वापरात असलेल्या) default पद्धतीचे हेच सामर्थ्य आहे की ती बहुसंख्यांना स्वारस्य नसलेले विषय आपोआपच मागे टाकते आणि बहुसंख्यांना स्वारस्य असलेले विषय शीर्षस्थानी किंवा त्याच्या जवळ ठेवत राहते, जेणेकरून त्यांची चर्चा चालू राहते. जुने किल्ले हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असला आणि त्यामध्ये इतरांना स्वारस्य नसले तर तो प्रतिसादांच्या अभावी आपोआपच मागे पडत जाईल. त्यासाठी वेगळे काहीच करण्याची गरज नाही. Natural selection and survival of the fittest हेच त्याला उत्तर.

थोडे विनोदी उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो. माझा गांडुळे ह्या प्राण्यांचा खास व्यासंग आहे आणि मी त्यावर आज काही लिहिले आणि त्यावर शून्य वा अत्यल्प प्रतिसाद आले तरी माझी गांडुळे, केवळ ती नवी आहेत एव्हढ्या एकाच कारणासाठी प्रथमत: शीर्षस्थानी आणि तदनंतर कित्येक दिवस पहिल्या पानावरची जागा अडवून बसतील. त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे आणि सकस जुने विषय आतल्या कोठल्यातरी पानावर अडगळीसारखे पडून राहतील आणि सदस्यांच्या त्यांवर चर्चा करण्याच्या संधीचा संकोच होईल.

मला वाटते हे पुरेसे स्पष्ट आहे.

अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.

प्रतिसादांची संख्या वा इतर निकष

उपक्रमावर सध्या बातम्यांमध्ये असलेले विषय, हिंदुत्व, आस्तिक-नास्तिक यावरील चर्चा विशेष जोमाने होतात, असे माझे निरीक्षण आहे. (उदा. , ) बहूसंख्यांना स्वारस्य असलेल्या चर्चा वर ठेवायच्या झाल्यास अशा अनेक चर्चा वर राहतील. यातील अनेक चर्चा या सकसतेच्या - प्रतिसादांची संख्या - या एकमेव निकषावर सकस ठरतील. उपक्रमावर अनेक विषयांवर (बहूसंख्यांनी इतरत्र दुर्लक्षित केलेल्या) विषयांवर चर्चा होतात. या चर्चा/लेखांमध्ये प्रतिसादांची संख्या कमी असली तरी त्या अतिशय दर्जेदार असतात. यात लेखकाने अनेक संदर्भ तपासून लेखन केलेले असते . (उदा ) पण केवळ प्रतिसादांची संख्या कमी आहेत म्हणून अशा प्रकारचे लेखन अडगळीत जावे असे वाटत नाही. थोडक्यात, लेखन सकस (किंवा वर रहावे) यासाठी केवळ प्रतिसादांची संख्या हा निकष योग्य असे वाटत नाही.

तुम्हाला जाणवणार्‍या काही मुद्द्यांवर उपक्रमावर आधी चर्चा झालेली आहे. दुवे: ,

त्रुटि

<पण केवळ प्रतिसादांची संख्या कमी आहेत म्हणून अशा प्रकारचे लेखन अडगळीत जावे असे वाटत नाही.>

पूर्णपणे मान्य. कमी प्रतिसाद असलेला पण दर्जेदार धागा अडगळीतून बाहेर काढण्याचाच मार्ग मी सुचवत आहे. त्यावर एक नवीन प्रतिसाद लिहा, तो धागा अडगळीतून एकदम शीर्षस्थानी येऊन पोहोचेल. प्रचलित पद्धतीत मात्र दर्जेदार धागा एकदा जुना होऊन अडगळीत पडला की त्यावरील नवीन दर्जेदार प्रतिसादहि त्याच्यासह त्याच अडगळीत जाऊन पडत आहेत.

अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.

मुखपृष्ठाबाबत प्रयोग

मला वाटते, डीफॉल्ट (व्याख्येप्रमाणे) एकच असू शकते पण प्राथमिकतेचे निकष परस्परविरुद्ध असू शकतात.
निकष १. ज्याला एकही प्रतिसाद आलेला नाही, पण नवीनच लिहिलेला आहे, असा लेख प्रथमतः दिसावा.
निकष २. ज्याला नवनवीन प्रतिसाद येऊन चर्चा रंगात आहे, असा लेख प्रथम दिसावा.
निकष ३. ज्या विषयावर उपक्रमाच्या इतिहासात कधी का असेना, दर्जेदार चर्चा झालेली आहे, ते लेख प्रथम दिसावे.

हे तीन निकष परस्परखंडन करणारे आहेत.

- - -

संकेतस्थळाची पहिली दोन-तीन वर्षे मुखपृष्ठ वेगळे होते. वरील निकष ३प्रमाणे होते. संकेतस्थळ-चालकांना दर्जेदार वाटत होते असे वीसेक धागे मुखपृष्ठावर दिसत (डीफॉल्ट). परंतु त्यामुळे नवीन धागे बघण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत. (किंवा वाचनखूण म्हणून वेगळा दुवा साठवावा लागे.)

संकेतस्थळचालकांनी ठरवलेले दिसते, की दर्जाची गुणवत्तायादी लावायची जबाबदारी त्यांना नको.

आता डीफॉल्ट वेगळे आहे. निकष १ प्रमाणे आहे. श्री. अरविंद कोल्हटकर यांना निकष २ प्रमाणे डीफॉल्ट हवा आहे. निकष २ हा निकष १ पेक्षा उजवाच आहे, असे म्हणणे धाडसाचे आहे.

काय सकस

ज्या धाग्यावर अनेक सदस्यांनी प्रतिसाद नोंदविला आहे (किंवा ह्यापुढे नोंदवतील) तो धागा आपोआपच सार्वजनीन महत्त्वाचा आणि म्हणून व्यक्तिनिरपेक्ष सकस आहे हे उघड आहे

नुडलांचे उकडलेले भेंडोळे सर्वाधिक लोकांना आवडते पण ते सकस आहे का? पण गांडुळे संपुर्ण शेताची इको सिस्टीम सुधारतात त्यामुळे आपल्याला सकस अन्न मिळते.

तांत्रिक कारण

माझ्या माहितीनुसार कारण तांत्रिक आहे. उपक्रम ड्रूपल ६ वर गेले की आधीसारखे मुखपृष्ठ बनवता येईल. मुखपृष्ठाचे काम ड्रूपल ६ मुळे प्रतीक्षेत खोळंबले आहे. ऊर्ध्वश्रेणीकरणासाठीच्या तांत्रिक चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. संकेतस्थळाची तांत्रिक बाजू बघणाऱ्यांना ऊर्ध्वश्रेणीकरणासाठीचा शेवटचा धक्का देण्यासाठी एकत्र वेळ द्यावा लागेल. तसा वेळ उपलब्ध झाला की हे काम मार्गी लागेलसे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

त्रूटी आहेत कि आधिच्या सवयींमुळेची 'रिजीड मानसिकता' म्हणायचे?


इतर काही चर्चासमुदायांमध्ये (उदाहरणार्थ गूगल ग्रुप्स) आलेले प्रतिसादांचे त्या त्या निरोपांच्या निर्मितीच्या क्रमानुसार दाखविले जातात. कोठल्या धाग्यामध्ये तो प्रतिसाद पडतो ह्यापेक्षा तो किती नवा आहे हा निकष निरोप सर्वांच्या दॄष्टीस पडण्याचा निकष ठरतो. सहा महिन्यापूर्वी प्रारंभ झालेला एखादा धागा मध्ये कोणताच प्रतिसाद नसल्याने मागे पडला असला तरी नव्या प्रतिसादामुळे तो पुन: पुढे येतो आणि त्याच्या सकसतेनुसार त्यावर नवी चर्चा होऊ शकते.


कोल्हटकर काय म्हणतायत तेच मला कळले नाही.
उपक्रमवर वरील त्यांच्याच म्हणण्यानुसार जे हवे ते दिसते की..ह्या पद्धतीने.http://mr.upakram.org/tracker/comments

मी तरी माझ्या ब्राउजरवर हिच लिंक बुकमार्ककरून ठेवली आहे. माझ्यासाठी तरी प्रत्येकवेळी हाच उपक्रमचा मुखडा (मुखपृश्ठ) असतो. जेंव्हा कुणी नवा लेख वा चर्चा प्रस्ताव ठेवला असेल व त्याला अजून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे वरील दुव्यावर दिसत नसेल असे वाटते तेंव्हाच उजव्या हाताला अगदी वरती, कोपर्‍याला 'नवे लेखन' असे लिहीले आहे तिथे पॉंईन्टर नेवून टिचकी देतो.

एक उपाय :

सध्याच्या मु.पृ. मधे ५ कॉलम्स* आहेत : शीर्षक , लेखक , प्रकाशन , प्रतिसाद , शेवटचे लेखन.
खरे पाहता शीर्षक आणि लेखक हे दोनच महत्वाचे आहेत. बाकी तीन कॉलम कोणी पाहत असेल असे वाटत नाही.

ते तीन कॉलम काढून टाकून त्या ऐवजी एका पॅनल मधे सध्या चालू असलेल्या रंगतदार चर्चांचे दुवे देता येतील.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

यात प्रतिसाद 'कॉलम्स' .

मुख्यपृष्ठ ! लेखमालिका! समुदाय! साहाय्य !नवे लेखन!

सध्याच्या मु.पृ. मधे ५ कॉलम्स* आहेत : शीर्षक , लेखक , प्रकाशन , प्रतिसाद , शेवटचे लेखन.

यात 'प्रतिसाद' कॉलम्स कोठे आहे ? ती जागा बदलल्यास अरविंद कोल्हटकर यांनी मांडलेली त्रुटि वाटणार नाही. मी यासाठी मागचे लेखन सात्यत्याने पाहत असतो.

उदा.श्री.अरविंद कोल्हटकर यांनी 'पाय' ह्या लेखात नवीन 'प्रतिसाद' दिला आहे व तो मी वाचला आहे.

मात्र ह्यात यात मुख्यपृष्ठ ! लेखमालिका! समुदाय! साहाय्य !नवे लेखन! येथे
'प्रतिसाद' कॉलम्स असल्यास जुन्या लेखात वा चर्चेत नवीन सदस्याने 'प्रतिसाद' दिल्यास तो पाहता येईल.

काहि ऐकलेली कारणे

श्री अरविंदराव केवळ उपक्रमवरच नाहित तर एकुणच मराठी संकेतस्थळांवर नवीन आहेत का? अशी शंका आली :)
काहि गोष्टी स्पष्ट झाल्या तर त्यांचा गोंधळ संपेल या आशेने काहि गोष्टी देतो आहे :
१. उपक्रम (किंवा अन्य कोणतेही मराठी संकेतस्थळ) खाजगी मालकीचे सार्वजनिक संकेतस्थळ आहे.
२. इथले संपादक मंडळ हे हौशी स्वरूपाचे आहे. ते या संकेतस्थळाला २४ तास वाहिलेले नाही.
३. (याच अशा नाहि तर अश्या नेक धाग्यांमधील/प्रतिसादांमधील) अनेक तांत्रिक सुधारणा, सुचवण्या स्वागतार्ह असल्या तरी अनुभव असा आहे की उपक्रमाचे 'सोपे' व 'साधे' रुप खूप प्रमाणात बदलण्यात आलेले नाहि. (मी सभासद झाल्यापासून उपक्रमात दोन -तीनदाच बदल झाल्याचे आठवते)
४. अश्यकनेक चर्चा झाल्या आहेत मात्र उपक्रमरावांच्या वेळे अभावी त्याला मुर्त रूप आलेले नाहि. स्थळ खाजगी मालकीचे असल्याने 'आम्हाला ऍक्सेस द्या आम्ही करतो' वगैरे मागण्यांचा उपयोग नाहि असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

"उपक्रमात बदल"

अगदी मोजक्याच वेळेला झाले आहेत हे ऋषिकेश ह्यांचे निरिक्षण बरोबर आहे, मला आठवणारा 'अगदी अलीकडचा' बदल म्हणजे 'ऐलपैल वरुन' - हे उपक्रमरावांचे सं.स्थळ आहे काय? (वैद्यांचे असावे असा प्राथमिक अंदाज होता/आहे) - ह्याच एका संस्थळाचे फीड् देण्याचे काय बर कारण असावे ? :)

हेहेहे

'ऐलपैल वरुन' - हे उपक्रमरावांचे सं.स्थळ आहे काय? (वैद्यांचे असावे असा प्राथमिक अंदाज होता/आहे) - ह्याच एका संस्थळाचे फीड् देण्याचे काय बर कारण असावे ? :)

हेहेहे. मिप्पाची लिंक द्यायची का मग?

कुठलीही द्यावी

एकाचीच दिली आहे हे बघून थोडे आश्चर्य वाटले खरे.
मिपाची द्यायला (माझी) हरकत नसती पण तेच नीट चालत नाहीये सध्या :)

 
^ वर