पुस्तक परिचय - 'आज भी खरे है तालाब'

आजवर झालेल्या वेगवेगळ्या चर्चांमधून आणि सामान्य निरीक्षणातून पूर्वीची अनेक भारतीय गावे आणि शहरे तलावांनी बहरलेली (+ भरलेली) होती असे दिसते. उदा. कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, हैदराबाद, दिल्ली इ.इ. परंतु या तलावांच्या निर्माणामागची माहिती एकत्रपणे सापडत नाही.

'आज भी खरे है तालाब' नावाचे हिंदी पुस्तक वाचनात आले. ते तसे बरेच जुने आणि प्रसिद्ध पुस्तक (प्रथम प्रसिद्धी इ.स.१९९३) आहे. आजवर अनेक भाषांमधून त्याची भाषांतरेही झालेली आहेत. कदाचित काही उपक्रम सदस्यांनी ते वाचले असेल. पुस्तक एका वेगळ्या विषयाची ऐतिहासिक आणि काही प्रमाणात मिथक स्वरुपात ओळख करून देते.
पुस्तकातील माहिती मध्ययुगीन भारताची छबी एका वेगळ्या संदर्भातून रंगवते. वाचनीय आहे.
या पुस्तकाचे मराठी भाषांतर झालेले आहे. परंतु मी मूळ हिंदी पुस्तक वाचले आहे. मूळ पुस्तकात श्री. दिलीप चिंचाळकर यांची विषयानुरूप अनेक सुंदर रेखाचित्रेही आहेत. या हिंदी पुस्तकातील काही संदर्भ (उदा. अनपूछी ग्यारस = विष्णूचा निद्रेतून जागे होण्याचा दिवस = दिवाळीनंतर येणारी एकादशी) आज चटकन समजत नाहीत.

पुस्तकाबद्दल आणि त्याच्या मराठी भाषांतराबद्दल श्री. अरुणचंद्र पाठक यांनी रविवार १३ जुलै २००३ रोजी दै. लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या 'वाचावे असे काही' या सदरात उत्तम लेख लिहिलेला आहे.
तो येथे जसाच्या तसा देत आहे. ('सुयोग्य वापर' किंवा फेअर यूज कलमाखाली कॉपीराईटचा भंग होऊ नये असे वाटते.)
श्री. अरुणचंद्र पाठक आणि लोकसत्तेचे आभार.

तलावांच्या मिथाकथा

'तलावांची भारतीय परंपरा' हे अनुपम मिश्र यांच्या 'आज भी खरे है तालाब' या हिंदी पुस्तकाचे भाषांतर आहे. या देशात शेकडो- हजारो तलाव अचानक शून्यातून प्रगट झाले नाहीत. सांस्कृतिक जीवनाचा एक भाग म्हणून स्वाभाविकपणे स्वयंपूर्ण असणारे ग्राम स्वत:च्या गरजेसाठी उत्स्फूर्तपणे तलाव बनवत होते. तलावनिर्मिती ही सामूहिक जीवनाची एक अभिव्यक्ती होती. निसर्गाबरोबर सुसंवाद साधण्याच्या ऊर्मीतून स्वीकारलेले आव्हान आणि केलेल्या संघर्षाचे सृजनात्मक प्रतीक म्हणून या तलावाकडे बघितले गेले. भारतामध्ये, निसर्गत: ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे अशा ठिकाणचा, प्रामुख्याने राजस्थानमधील तलाव निर्माणकार्याचा कालैघातील वाटचालीचा आढावा लेखकाने घेतला आहे. जलाशयनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या विविध समाज-घटकांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची, वेगवेगळ्या राज्यांत असलेल्या समूहांची आणि त्यांच्या कामाची अचूक नोंद केली आहे. गावगाड्यामधील कुठल्या घटकांनी कशा पद्धतीचे योगदान तलावाच्या निर्मितीसाठी दिले याची अचूक नोंद या पुस्तकात केली आहे. तलाव निर्मितीचे तंत्र, त्यातील बारकावे, पाणलोट- क्षेत्राची निवड, सांडव्याची उंची, वाळूचे बांधकाम, जलाशयनिर्मितीची प्रक्रिया, तिच्या विकासित होत जाणार्‍या अवस्था, अत्यंत सोप्या पद्धतीने कुठलीही किलष्टता न येऊ देता बारीकसारीक तपशील (शकय तिथे तारीखवार) नोंदवत सांगितली आहे. तलावांची निगा प्रतिवर्षी कशी आणि केव्हा ठेवली जाईल, त्याची सफाई आणि गाळ काढण्याचे काम कसे होईल, हे नोंदवताना कोठेही बोजडपणा आलेला नाही. गोंड, कोहली, ओढिया, अगरिया, दुसाध, नैनिया, परधान, कोल, धीवर, भोई इतकेच काय सारस्वत ब्राह्मण हेही या प्रक्रियेत कसे सहभागी होते, हे त्यांनी नोंदवले आहे.

मध्ययुगीन भारतामध्ये झालेल्या तलावांच्या निर्मितीचा आणि त्याच्या बारकाव्यांचा परिचय हा ग्रंथ वाचताना होतो. इतकेच नव्हे तर त्या अनुषंगाने विकासित झालेल्या सांस्कृतिक जीवनाचीही ओळख होते. जलाशय आणि त्याची बहुविध नावे, इंग्रजांनी गॅझेटारिमध्ये केलेल्या तटस्थ नोंदी...सारे उदाहरणांसह स्पष्ट केले आहे. जैसलमेरचे राजा महारावल घडसी यांनी विक्रम संवत १३९१ म्हणजे सन १३३५ मध्ये तलाव बनविला. तो तीन मैल लांब आणि एक मैल रुंद होता. त्याचे पाणलोट क्षेत्र १२० चै. मैल होते. तेथे काम पाहत असताना महारावल घडसीवर प्राणघातक हल्ला झाला. पण राणी विमला सती गेली नाही. तिने जिद्दीने राजाचे स्वप्न पूर्ण केले. असे कितीतरी तलाव या पुस्तकात नोंदवले आहेत. जैसलमेरच्या शिल्पकारांनी सुंदर तलाव बनविला. पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याच्या ऊर्मीतून तलावाच्या तळात सात सुंदर बारवा बनविल्या, ज्याला बेरी, बाह, बाय, बावडी, पगबाब असे म्हणत. बारवांच्या वर सुंदर ओटे, स्तंभ आणि छत्र्या व खाली उतरण्यासाठी कलात्मक पायर्‍या आहेत. जलाशयाची निर्मिती करताना जास्तीचे पाणी सांडव्यावरुन पुढे त्याखालील बांधलेल्या लहान-मोठया तलावात साठवत.

तलावांची निर्मिती सुखदु:खाच्या प्रसंगी करत. तलावाची प्राणप्रतिष्ठापना होई. हा उत्सव तलावाचे समाजजीवनातील स्थान स्पष्ट करीत असे. तलावांच्या निर्मितीबाबतची अनेक मिथके या पुस्तकात दिली आहेत. त्यामुळे पुस्तक रंजक तर होतेच; शिवाय तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचा एक नवा पैलू, जो रोजच्या जगण्याचा एक अनिवार्य हिस्सा होता, तो उलगडतो.

पुस्तकाच्या शेवटी आज एका महत्त्वाच्या परंपरेची आम्ही उपेक्षा करीत आहोत, ही उपेक्षा आम्हाला खूप महाग पडते आहे, याविषयीची यथार्थ खंत व्यक्त केली आहे. तत्कालिक फायदा न पाहता या प्रदीर्घ परंपरेची योग्य ओळख करुन घेतली, तर आजही आमच्या आणि आमच्या भावी पिढीचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हे जलाशय सहाय्यभूत ठरु शकतात.

"आज भी खरे है तालाब"
मूळ लेखक - श्री. अनुपम मिश्र
प्रकाशक - पर्यावरण कक्ष, गांधी शांती प्रतिष्ठान, नवी दिल्ली
मराठी अनुवाद - "तलावाची भारतीय परंपरा"
अनुवादकर्ता - श्री. प्रदीप भलगे
प्रकाशक - साकेत प्रकाशन , औरंगाबाद.
किंमत रु. ६०

(या पुस्तकाबद्दल पूर्वी काही चर्चा उपक्रमावर झालेली असेल तर माझ्या वाचनात आलेली नाही. असे असेल तर हा लेख काढून टाकावा.)

Comments

हे पुस्तक प्रताधिकारमुक्त आहे.

आनंदाची गोष्ट अशी की हे हिंदी पुस्तक आंतरजालावर प्रताधिकारमुक्त उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी हा दुवा पहावा.

वा, वेगळाच विषय

वेगळा पण अगदी कालसुसंगत विषय. मूळ पुस्तक वाचायला उद्युक्त करणारा परिचय.
आमच्या गावात दोन तळी होती. त्यांना धाकले तळे व थोरले तळे असे म्हणत असत. थोरल्या तळ्याची कित्येक वर्षांनी साफसफाई केली तेंव्ह्या त्याच्या तळाला जिवंत झरे असल्याचे आढळून आले. धाकले तळे लोकांनी केलेल्या आक्रमणांमुळे आकसत आकसत गेले. आता त्या जागेवर सहकारी संघाची इमारत उभी आहे.

सन्जोप राव

वैसे तो तुम्हीनें मुझे बरबाद किया है
इल्जाम किसी और के सर जाये तो अच्छा.

सगळ्यांनी वाचायला हवे

गावोगावी तलाव बुजवून कॉलन्या होत आहेत. नैसर्गिक झऱ्यांना, नाल्यांवर अतिक्रमणे होत आहेत. असो. पुस्तक डाउनलोड केलेले आहे. वाचायला सुरवात केली आहे. चांगली माहिती आहे. सगळ्यांनी वाचायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला. डाउनलोड केले आहे. वर-वर चाळले असता कुतूहलजनक वाटले.

उतरवले

चांगला परिचय. उतरवून घेतले आहे. दुव्यासाठी धन्यवाद.

परिचय

आवडला. मागच्याच महिन्यात धाबेपवनीच्या माधवराव पाटील आजोबांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या नातवाने ह्या पुस्तकाची प्रत दाखवली होती. त्यांच्या दिवाणखान्यात मागील तीन - चार पिढ्यांच्या तसबीरी लावलेल्या होत्या. तसबीरीतल्या महिलांचे दागिने व साडी नेसण्याच्या पध्दतीवरुन ते परप्रांतीय (उत्तर भारतीय) वाटले. भीमसेनने (माधवराव पाटीलांचा नातू) सांगितले की ते मूळचे राजस्थानचे. महाराष्ट्रात स्थायिक झालेली ही त्यांची तेरावी पिढी आहे. ह्यांची जमात तलाव खोदण्यात एक्सपर्ट. त्यामुळेच ह्या भागात बरेच तलाव आहेत. प्रत उतरवून घेतली. धन्यवाद!

राजस्थान

मी लहान असतांना अनेक राजस्थानी लोक ट्रॅक्टरवर बोअरवेलची उपकरणे लादून विहिरी खोदण्याचे काम करत ते आठवले. म्हणजे पाणी शोधण्याचा व्यवसाय अजुनही सुरू असावा.

अवांतर: धाबेपवनी कुठे आहे?

धन्यवाद

चांगला विषय. पुस्तक वाचले पाहीजे.

वैयक्तिक पातळीवर पावसाच्या पाण्याची साठवण कशी करावी किंवा केली जायची यावर काही माहीती आहे का?

सन्दर्भ पूस्तक

वाटर हार्वेस्टीन्ग वर मी लिहिलेल्या पूस्तकात यावर माहिति आहे.

पुस्तकाची पूर्ण माहिती द्यावी

आपण लिहिलेल्या पुस्तकाची कृपया पूर्ण माहिती द्यावी ही विनंती.

धाबेपवनी

विदर्भ - साकोली पासून २० किमी अंतरावर नवेगाव बांध (राष्ट्रीय उद्यान ) तिथून् ५ किमी धाबेपवनी

वाचायला पाहिजे

पुस्तक वाचायला पाहिजे.
(हिंदी पुस्तकाची पी.डी.एफ संगणकावर उतरवली आहे. धन्यवाद.)

जलसन्चयन

याच लेखकान्चे- राजस्तान की रजत की बुन्दे- या नावाचे अतिशय वाचनीय पुस्तक आहे. जुन्या वेळे पासून पावसाचा प्रत्येक बिन्दु साचवण्याच्या बर्याच पद्धति मरुभूमीत वापरल्या जातात. त्यान्चे सुरेख व सचीत्र वर्णनआहे.

अनुपम मिश्र - प्रत्यक्ष

वाळवंटातील जलसंधारण विषयावर अनुपम मिश्र बोलतात.

 
^ वर