देव,धर्म आणि गाजरचित्रे

देव,धर्म आणि गाजरचित्रे
काठीच्या टोकाला गाजर लटकावून गाढवाला ते सहजपणे मिळणार नाही
अशा बेताने काठी गाढवासमोर धरून चालू लागल्यास गाजर खायला मिळेल या आशेने ते काठीमागून चालू लागते हे बहुतेकांना ठाऊक आहेच.
त्या गाढवाला वाटते की लटकणारे गाजर यदाकदाचित् खाली पडेल किंवा काहीतरी घडून आपल्याला ते खायला मिळेल.त्याची ही अपेक्षा अवास्तव आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.गाजर काल्पनिक नाही.ते खरे आहे. ते खायला मिळण्याची संभवनीयता कमी असली तरी शून्य नाही.गाजर मिळणे अशक्यप्राय नाही.म्हणून गाढवाचे काठीमागून चालणे समर्थनीय आहे.
त्या काठीला खरे गाजर लटकवण्या ऐवजी जर गाजराचे रंगीत चित्र टांगले तर
गाढव काठीमागून चालत येत नाही.कारण जे पुढे दिसते आहे ते आपल्याला माहीत असलेले गाजर नव्हे.खोट्या गोष्टीमागे लागण्यात अर्थ नाही.आपले श्रम आणि वेळ वाया जातील एव्हढे त्या गाढवाला कळते.
पण धार्मिक श्रद्धाळूचे तसे नाही.त्याच्यापुढे स्वर्गाचे केवळ शाब्दिक चित्र असते.ते वेदांत वर्णिले आहे,पुराणात सांगितले आहे म्हणून खरेच असणार अशी त्याची श्रद्धा असते.
स्वर्गात केवळ सुखच सुख आहे.तिथे कल्पतरूंच्या बागा आहेत.कामधेनूंची खिल्लारे आहेत.मनात आणावे ते तत्काळ मिळते.नंदनवनात विहार करावा.गंधर्वांचे गायन ऐकावे.अप्सरांचे नृत्य पहावे.मनसोक्त अमृत प्यावे.आराम करावा. नैसर्गिक आपत्ती,दु:ख,कष्ट काही नाही.श्रद्धाळूला स्वर्गाचे हे वर्णन खरे वाटते.जे मृत्यूनंतर प्राप्त होईल असे सांगतात त्या काल्पनिक स्वर्गसुखप्राप्तीच्या मागे तो आयुष्यभर लागलेला असतो.यज्ञयागादि अनेक कर्मकांडे करतो. तीर्थक्षेत्रांना जातो.तिथे पवित्र दिवशी स्नान करतो. त्याच्या समजुतीप्रमाणे पुण्य जोडतो. व्यवहारात"आज रोख उद्या उधार" असे त्याचे तत्त्व असले तरी देवा धर्माची गोष्ट असली की काहीही पटते. जो झाल्याचे कुणाला कधी आठवत नाही त्या पुढच्या जन्माचा वायदा चालतो.
स्वर्गाचे हे चित्र अगदीच बटबटीत आणि ढोबळ आहे.काही धार्मिक व्यक्तींनाही ते पटत नाही.खरे वाटत नाही.शिवाय "क्षीणे पुण्य़े मर्त्यलोकं विशन्ति।" हे आहेच.म्हणजे स्वर्गसुख शाश्वत नव्हे.म्हणून काही जणांसाठी मोक्षाचे चित्र निर्माण झाले.
प्रत्येक सजीव शरीरात आत्मा असतो.तो आत्मा परमात्म्यात विलीन होणे म्हणजे मोक्ष.तो मिळाला की प्राणी जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला.अशी आध्यात्मिक कल्पना आहे.हे सर्वश्रुत आहे.
स्वर्ग म्हणजे सुखच सुख तर मोक्ष म्हणजे ब्रह्मानंद, परमानंद,महदानंद, सच्चिदानंद, केवलानंद.सगळा आनंदी आनंद!! मोक्षप्राप्तीचे मार्ग बिकट आहेत.पण"शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोSभिजायते" असे मधाचे बोट लावले आहे्.सर्वसामान्यांसाठी भक्तिमार्गाचे गाजरचित्र आहे. केवळ नामसंकीर्तन करा,विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि मोक्षाचे अधिकारी व्हा.मात्र मृत्यूनंतर ! अशा या भ्रामक मोक्षाच्या गाजरचित्राकडे बघत अनेक आध्यात्मिक लोक आयुष्यभर वाटचाल करत असतात.
देव ,धर्म यांच्या आधारे कसलेही भ्रामक चित्र निर्माण केले,त्याला वेद,शास्त्रे,पुराणे,परंपरा, संस्कृती यांचा आधार आहे असे म्हटले,ते त्रिकालज्ञ ऋषींनी निर्माण केले आहे असे ठोकून दिले,की भोळसट श्रद्धाळू त्या चित्रामागे चालू लागतात. ही मानसिकता लक्षात आल्यावर समाजातील धूर्त,चाणाक्ष,लबाड आणि स्वार्थी लोकांनी अशी अनेकानेक गाजर चित्रे निर्माण केली.त्यांच्याद्वारे भोळसट श्रद्धाळूंची लुबाडणूक चालू आहे.

Comments

कुठे नक्की

--भयंकर गंडलेला लेख आहे.--

कुठे नक्की गंडला आहे?

पुरावे नाहीत

--भयंकर गंडलेला लेख आहे.--
कुठलेही पुरावे नसतांना असे विधान केले आहे.

भारतीयच पहिले

न्युटनच्या आधीच भारतीय गणितद्न्यांनी त्याच्या नावाने खपवलेले गेलेले नियम शोधले होते. वाचा.. साहेबांच्याच देशातून आलेला लेख असल्यामुळे लगेच स्वीकारला जावा अशी आशा आहे. केवळ हेच नियम नव्हे तर पायथागोरसचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध पावलेला सिद्धांत असो किंवा क्याल्क्युलस असो, हे सगळे सिद्धांत साहेबांनी चक्क ढापले आहेत. हे वाचा

आता तुम्ही फक्त गंमत बघा. हे असे नाहीच असे सिद्ध करण्याची अहमह्मिका लागेल. कारण तसा विश्वासच आहे की हे सगळे तिकडचे. भारतीयांनी शोधलेले, लिहिलेले, ते सगळे वांगले. (संत साहित्यावर् टिका करणे, हिंदू धर्मावर आसुड ओढणे, हे आम्हाला करावेच लागते; ह्याशिवाय आम्हाला विचारवंत कुणी म्हणणार नाही. )

शक्य आहे

शक्य आहे पण जरा बरे दुवे दिले तर फायद्याचे होईल. तुम्ही दिलेल्या दुसर्‍या दुव्याच्या अंतर्गत असलेल्या दुव्यावर खालील वाक्य आहे.

Both Arab and Indian scholars made discoveries before the 17th century that are now considered a part of calculus.[10] However, they were not able to, as Newton and Leibniz were, to "combine many differing ideas under the two unifying themes of the derivative and the integral, show the connection between the two, and turn calculus into the great problem-solving tool we have today

युक्तिभाष नावाचा दुवा आहे त्यात इ स १५३० हे वर्ष दिले आहे. पायथागोरसचा सिद्धांत तरी इ स् पूर्व काळात इ स् १५३० मधल्या ग्रंथामधून ढापलेला नसावा.

उत्तर दिले नसते तर तुमचे म्हणणे सिद्ध झाले असे तुम्हास वाटले असते म्हणून उत्तर द्यावे लागले.

नितिन थत्ते

उत्तर्

दोन्ही दुवे वाचले, उत्तर देणार् होतो पण् स्वतः ला थांबवले. उत्तराऐवजी खरंतर त्यांनाच, आपणच पहिले कसे यावर संशोधनात्मक एखादा लेख लिहा, त्यात दुवे आणि तुम्हाला असे का वाटते ते लिहा तिथेच् चर्चा करू असा प्रस्ताव मांडणे सर्वात् इष्ट असे वाटले. गिरिश एकतर अत्यंत अज्ञानी आहेत किंवा तसा आव आणत आहेत, त्यामुळे प्रतिसादातील स्पष्टीकरणाने त्यांचे समाधान होईल असे दिसत नाही, असे त्यांचे इतके प्रतिसाद वाचून् माझा समज झालेला आहे. म्हणून, त्यांनी स्वतः संशोधन+विचार् केला तर त्यांच्या मतात बदल होऊ शकतो अन्यथा, दरवेळेला त्यांच्या प्रीऑक्युपाईड आणि हास्यास्पद आक्षेपांना उत्तर देण्याचे श्रम घेण्यापेक्षा त्यांनी थोडी(जास्त) मेहनत घेउन त्यांचे आक्षेप मांडले तरच उत्तर द्यायला हरकत नाही असे माझे मत झाले आहे.

-Nile

"अत्यंत अज्ञानी"

"अत्यंत अज्ञानी"- उपक्रमावर प्रथमच मला उद्देशुन योग्य ते विषेशण लावले गेले- आभारी आहे. रिकामटेकडे ह्यांनी अनेक उपाधी लावल्या पण त्यांचे प्रतिसाद सभ्यतेला अनुसरुन नसल्यामुळे काढले गेले.

--प्रीऑक्युपाईड आणि हास्यास्पद----

यनावाला ह्यांचा वरील लेख कोणत्या वर्गात मोडतो?

:-)

युक्तिभाष नावाचा दुवा आहे त्यात इ स १५३० हे वर्ष दिले आहे. पायथागोरसचा सिद्धांत तरी इ स् पूर्व काळात इ स् १५३० मधल्या ग्रंथामधून ढापलेला नसावा.

नक्कीच.

पायथॅगोरस विद्यावर्धनासाठी इजिप्त ते भारत यामधील अनेक देशांत येऊन गेल्याचे सांगितले जाते. अर्थातच याला ठोस पुरावा नाही परंतु तशी धारणा आहे. मी इतरत्र वाचलेल्या काही संदर्भात पायथॅगोरस भारतात शिकून इथे नंतर अध्यापनही करून गेला. त्याला भारतात यवनाचार्य म्हटले जाई आणि पायथॅगोरसचा उच्चार पितरगुरु असा केला जाई. ;-) अर्थातच, वरील वाक्याचा पुरावा माहित नाही. गिरीश यांच्यासारख्या कोणा भयभिताचे ते वाक्य असल्यास कल्पना नाही. परंतु पायथॅगोरसचे चरित्र लिहून काढणार्‍या ग्रीक लेखकाचा पायथॅगोरस भारतापर्यंत जाऊन आला होता यावर विश्वास दिसतो.

आता पायथॅगोरियन थिअरम मूळ भारतातून आली किंवा नाही यावर आता वाद घालून फारसा उपयोग आहे असे वाटत नाही. जेव्हा पुरावे धूसर असतात तेव्हा "बेनिफिट ऑफ डौट" पायथॅगोरसलाच जाईल.

नियम नाही.

--गिरीश यांच्यासारख्या कोणा भयभिताचे ते वाक्य असल्यास कल्पना नाही.--

तुमचा मुद्दा मांडण्यासाठी माझी निंदा केलीच पाहिजे असा नियम नाही. किंवा तुमच्या मुद्द्याला ग्राह्य धरले जाणार नाही असेही नाही.

--आता पायथॅगोरियन थिअरम मूळ भारतातून आली किंवा नाही यावर आता वाद घालून फारसा उपयोग आहे असे वाटत नाही. जेव्हा पुरावे धूसर असतात तेव्हा "बेनिफिट ऑफ डौट" पायथॅगोरसलाच जाईल.---

शेवटी काय तर वरती मी लिहिल्याप्रमाणे घडले.

सोयीचा

ती माहिती खरी अशी समजुत तुम्ही ज्यावेगाने करुन घेतली त्याच वेगाने इतर भारतीयांच्या बाजुने झुकणार्‍या माहितीबद्दल का नाही होत हा प्रश्न आहेच. शिवाय तुम्ही संदर्भीलेला माहितीचा तुकडा तुम्हाला सोयीचा होता.

मुद्दा

गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सांगितला कि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक नाही. या नियमाची उपपत्ती कशी झाली हे समजण्यासारखे आहे
हा मुद्दा मी मांडलाहोता. न्यूटन अणि सफरचंदाचा उल्लेखसुद्धा न करता गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे हे कळ्ते. त्यात अंधविश्वासाचा भाग नाही.
त्याबद्दल जे काय म्हणायचे असेल ते सांगावे. उगाच हे वाचा ते वाचा असे न लिहिता तुम्ही जर ते वाचले असेल आणि त्यात जर माझ्या मुद्द्याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल तर तेवढे द्यावे. तुम्ही दिलेल्या दुव्यावरील लेखात गुरुत्वाकर्षणाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. अर्थातच हा लेख तुम्हाला समजलेला नाही.
मी स्वतः लिहिलेल्या लेखाबद्दलसुद्धा कधी तो वाचा असे सांगत नाही. ज्यांना जे वाचावेसे वाटेल ते ते वाचतील आणि त्यातले जेवढे त्यांना पटेल तेवढे ग्राह्य मानतील.

आऊटसोर्स

--त्याबद्दल जे काय म्हणायचे असेल ते सांगावे. उगाच हे वाचा ते वाचा असे न लिहिता तुम्ही जर ते वाचले असेल आणि त्यात जर माझ्या मुद्द्याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल तर तेवढे द्यावे. तुम्ही दिलेल्या दुव्यावरील लेखात गुरुत्वाकर्षणाचा साधा उल्लेखसुद्धा नाही. अर्थातच हा लेख तुम्हाला समजलेला नाही.
--

ते समजावुन घेणे वगैरे असली कामे मी आऊटसोर्स केली होती. तुम्हाला नसतील वाचायचे तर नका बुवा वाचू.

दगा

या बाबतीत तुमच्या आऊटसोर्सने दगा दिलेला असावा. संबंधच नसलेला दुवा दिल्याने तुमची विश्वासार्हता तेवढी कमी झाली .
एकदा वाचले, यापुढे नाही वाचणार.

नो प्रॉब्लेम.

--तुमची विश्वासार्हता तेवढी कमी झाली .--

ऍक्च्युअली, तसे झाले असेल तर, झाले. नो प्रॉब्लेम.

ठीक

ठीक.

बाकीची गाढवे चित्रामागे जात नाहीत वाटते.

शंका

गाढवाला गाजर आवडते असे सिद्ध झाले आहे काय?

काही उपक्रमींना ही चर्चा गाजरासारखी वाटू शकते. म्हणजेच ते काही उपक्रमी गाढव आहेत असे म्हणता येईल काय?

* उत्तर हो असल्यास मी अधिक गाढवपणा करणार नाही. ;-)

हो

त्यांना गाढवाप्रमाणे दोन कान, चार पाय, एक शेपूट असेल तर

तुलना एवढी योग्य नाही.

गाढवासमोर् असलेल्या गाजराने गाढवाला माहित आसते की त्यानी जास्तीत जास्त एकावेळची भूक भागते.

मोक्ष वगैरे जरी गाजरचित्र असले तरी त्याची किंमत जास्त असते. त्यातून मिळनारा फायदा / उपभोग हा खूप-खूप जास्त आहे.

त्यामुळे गाजरचित्र आणि मोक्ष ही तुल्ना तेवढीशी ठीक नाही वाटत.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

न जमलेला शेवट

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजकुमार लिहितातः बरं मग !
.
त्यांचा हा प्रतिसाद योग्य आहे.कारण लेखाचा परिणामकारक शेवट करणे मला जमले नाही. लेख मधेच तुटल्यासारखा वाटतो.हे मलाही उमगले होते. पण वेळे अभावी अधिक विचार करणे शक्य झाले नाही.शेवट तसाच ठेवला.तो श्री.राजकुमार यांना खटकला.

ज्ञानेश्वरी अध्याय: ९ मधील ओव्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायक गोरे यांनी नवव्या अध्यायातील ज्या ओव्या दिल्या आहेत त्यांनी लेखातील विधानांना पुष्टी मिळते. वेदोक्त यज्ञादि कर्मकांडे यथासांग केल्यास माणसाला स्वर्ग प्राप्त होतो.तिथे सर्व सुखच सुख असते असेच ज्ञानेश्वरीत लिहिले आहे. हे सुख शाश्वत नाही. पुण्यसंचय संपला की मृत्युलोकी परत यावे लागते.गर्भवासाचे दु:ख भोगावे लागते असे म्हटले आहे. गीतेत "क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति" असे आहे त्याचाच हा अनुवाद.ज्ञानेश्वरांनी स्वर्गसुखाला हीन लेखले आहे. गीतेत मात्र तसे स्पष्ट म्हटलेले नाही.
नवव्या अध्यायात अंधश्रद्धांवर कुठेही टीका नाही.
२/श्री.गोरे यांनी १३व्या अध्यायातील ज्या ओव्या उद्धृत आहेत त्या लेखातील विषयाशी असंबद्ध आहेत.

असंबद्ध ?

श्री.गोरे यांनी १३व्या अध्यायातील ज्या ओव्या उद्धृत आहेत त्या लेखातील विषयाशी असंबद्ध आहेत.

हाहाहा.

आम्ही पोरं सोरं मनातल्या मनात म्हणायचो की विनायक काका नेहमीच असंबद्ध लेखन करतात म्हणून पण आज आदरणीय यना सरांनी असं म्हणावं ! छ्या, विनायक काका मला लैच वाईट वाटलं हं...!

-दिलीप बिरुटे

लेखातील मूळ वाक्ये आणि १३ व्या अध्यायातील ओव्या

यनावालांचे मूळ वाक्य

यज्ञयागादि अनेक कर्मकांडे करतो. तीर्थक्षेत्रांना जातो.तिथे पवित्र दिवशी स्नान करतो. त्याच्या समजुतीप्रमाणे पुण्य जोडतो.

१३ व्या अध्यायातल्या ओव्या
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥ ८१२ ॥
तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥ ८१३ ॥
प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥ ८१४ ॥
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥ ८१५ ॥
नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे । पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥ ८१६ ॥
माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥ ८१७ ॥
एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥ ८२१ ॥
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे उगा क्षणभरी । अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥
अर्थ - असे अखंड भजन करतो, क्षणभरही शांत राहत नाही, गावाच्या वेशीवर पाल ठोकून बसलेली वेश्या जशी सर्व गावाच्या कृपेने सुखी असते तसे याचे असते.


यज्ञात पशुहिंसा करणार्‍या याज्ञिकांबद्दल लिहिले आहे. (१३ वा अध्याय)

तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥ २२१ ॥
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥ २२२ ॥
तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ? ॥ २२३ ॥
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥ २२४

यनांची वाक्ये आणि ओव्या यांच्यातला संबंध जर कळत नसेल तर काय बोलावे?

गाढवापुढे वाचली गीता

हा हा हा.. मार्मिक लेख!!
बाकी वरील चर्चा वाचून एक म्हण आठवली "गाढवापुढे वाचली गीता... कालचा गोंधळ बरा होता" ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

तसं नको

हे (मूळ लेख) उपक्रमींसमोर वाचले गेले आहे त्यामुळे तसे (गाढवापुढे वाचली गीता..) असे म्हणायला नको. ;)

मग असं?

ओके मग असं म्हणावे का?:
(हे वाचल्यानंतर) "स्वर्ग तर प्रत्येकाला हवा आहे मात्र त्यासाठी मरायची कोणाचीही तयारी नाही" :प्

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

संदेशात बदल होत नाही

हा परीच्छेद असाही लिहिला तरी त्यातील संदेशात बदल होत नाही ---विद्न्यानाच्या आधारे कसलेही भ्रामक चित्र निर्माण केले,त्याला शास्त्रद्न, शोध, गणित, यांचा आधार आहे असे म्हटले, ते त्रिकालज्ञ गोर्‍या शास्त्रद्नांनी निर्माण केले आहे असे ठोकून दिले, की भोळसट श्रद्धाळू त्या चित्रामागे चालू लागतात. ही मानसिकता लक्षात आल्यावर समाजातील धूर्त,चाणाक्ष,लबाड आणि स्वार्थी लोकांनी अशी अनेकानेक गाजर चित्रे निर्माण केली. त्यांच्याद्वारे भोळसट श्रद्धाळूंची लुबाडणूक चालू आहे.

कोती मनोवृत्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*श्री.गिरीश यांनी जे प्रतिसादलेखन केले आहे ते संकुचित,कोत्या,पूर्वग्रहदूषित कूपमंडूक मनोवृत्तीचे द्योतक आहे.तसेच अज्ञानमूलकही आहे.
*विज्ञानात पाश्चिमात्य-पौर्वात्य,गोरा-काळा,हिंदू-ख्रिश्चन,असा भेद कधीही केला जात नाही निसर्गनियम कोणाही व्यक्तीने शोधले तरी अंततः ते ज्ञान वस्तुनिष्ठ असते.
*विज्ञानात शब्दप्रामाण्य,ग्रंथप्रामाण्य, बाबावाक्य,अधिकारवाणी अशा गोष्टींना मुळीच स्थान नसते.
*वेदवाक्य, श्रुति-स्मृति-पुराणोक्त,एषः धर्मः सनातनः| असल्या गोष्टी धार्मिक क्षेत्रात शिरसावंद्य मानतात.विज्ञानक्षेत्रात नव्हे.

ठाम मत

मी वर जो प्रतिसाद दिला आहे- "विद्न्यानाच्या आधारे कसलेही भ्रामक चित्र निर्माण केले,त्याला शास्त्रद्न, शोध, गणित, यांचा आधार आहे असे म्हटले, ते त्रिकालज्ञ गोर्‍या शास्त्रद्नांनी निर्माण केले आहे असे ठोकून दिले, की भोळसट श्रद्धाळू त्या चित्रामागे चालू लागतात. ही मानसिकता लक्षात आल्यावर समाजातील धूर्त,चाणाक्ष,लबाड आणि स्वार्थी लोकांनी अशी अनेकानेक गाजर चित्रे निर्माण केली. त्यांच्याद्वारे भोळसट श्रद्धाळूंची लुबाडणूक चालू आहे."

ह्यात काहीही चूक नाही असे माझे ठाम मत आहे. मग ते भले तुम्ही म्हणाल्याप्रमाणे असो. द्न्यानेश्वरादी व्यक्तिंना अवमानित करणारे विचार संकुचित,कोत्या,पूर्वग्रहदूषित कूपमंडूक मनोवृत्तीचे द्योतक आहे.तसेच अज्ञानमूलकही आहे.

फरक काय?

ह्यात काहीही चूक नाही असे माझे ठाम मत आहे

फरक काय???

कशातला फरक?

कशातला फरक तुम्ही विचारला आहात ते कळले नाही.

फरक

आमचं तेच खरं म्हणणारे सनातनी आणि आपण.

बदल होणार नाही.

सनातनी तर सनातनी- काहीही विषेशण लावले तरी आहे त्यात बदल होणार नाही.

ठिक

प्रश्नच मिटला.

असंबद्ध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अहो, बिरुटेसर पुढील मुद्द्यांवर थोडा विचार करावा.
*गाजरचित्रे या लेखाचा विषय काय आहे?
*ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील ज्या ओव्या प्रतिसादात दिल्या आहेत,त्यांचा अर्थ काय आहे? विषय काय आहे?
*लेखाचा विषय आणि या ओव्यांचा अर्थ यांचा दूरान्वयाने तरी संबंध लागतो का? विचार करून ठरवावे.
...मात्र आजचेसुद्धा धार्मिक वास्तव दाखणार्‍या या ओव्यांच्या आधारे एक उत्तम स्वतंत्र लेख लिहिता येईल.तुम्ही स्वतः लिहावा.पाहा असा लेख प्रतिसादांचे शतक गाठील.

आशा करतो

श्री. यनावालांचा हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख वाचल्यावर तरी आता, समस्त उपक्रम परीवार येथे आपले लेख, प्रतिसाद, विचार मांडताना तसेच व्यावहारीक जगात वावरताना केवळ जीवनाच्या अखेरच्या स्वर्गसुखाच्या अपेक्षेने पुण्यसंचय करण्याचा पोकळ हेतू ठेवणार नाही, अशी आशा करतो. आणि तरी देखील इतके स्पटीकासारखे स्वच्छ विचार पटत नसतील तर आपापल्या नाड्या परत एकदा तपासून खात्री करून घ्यावी असा अनाहूत सल्ला देतो.

डोळे दिपलेले आहेत

--डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख वाचल्यावर तरी आता--

पण डोळे इतके दिपलेले आहेत की उघडायचे नावच घेत नाहीत त्यामुळे अंजन घालण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

अहाहा !!! अतिसुंदर...

स्वर्गात केवळ सुखच सुख आहे.तिथे कल्पतरूंच्या बागा आहेत.कामधेनूंची खिल्लारे आहेत.मनात आणावे ते तत्काळ मिळते.नंदनवनात विहार करावा.गंधर्वांचे गायन ऐकावे.अप्सरांचे नृत्य पहावे.मनसोक्त अमृत प्यावे.आराम करावा.

अहाहा !!! अतिसुंदर...

जळो जीणे लाजीरवाणे... महिनाखेर पगाराची वाट पहाणे... याचे देणे त्याचे देणे.....झुर झुर झुरणे..

ह्या लेखाचा राग येऊन तिळपापड झालेल्यांनी या स्वर्गात जायची एखादी स्पेशल पावती वगैरे फाडता येते का याची माहीती द्यावी.

लेख आवडला

लेख आवडला. आणि प्रतिसादही.

प्रमोद

भविष्याबद्दल कल्पनांचे दोन प्रकार

भविष्याबद्दल काही ठोकताळे आपण नेहमीच आखत असतो.

त्याचे दोन भेद आहेत - कदाचित सूक्ष्म आहेत - आणि दोन्हींच्या बाबतीत पारलौकिक धर्म उत्तरे सुचवतात/सांगतात/एकमेकांचे खंडन करतात...
- - -
(१)
अतिशय छोट्या पल्ल्याच्या भविष्याबाबत (पल्ला काळाच्या दृष्टीने लहान, तसा स्थळाच्या दृष्टीनेही लहान), अशा भविष्याबाबत आपण क्षणोक्षण ठोकताळे आखत असतो. इच्छाप्रयास असता क्रिया केली तर छोट्या पल्ल्याच्या भविष्यातील घटनांवरती नियंत्रण असल्यासारखे वाटते. भाकिते करता येतात. (कुडकुडणारे हात शेकोटीच्या जवळ असावी अशी इच्छा होते, तसा प्रयास करण्याची भावना होते. अशा परिस्थितीत नजिकच्या भविष्यात नजिकच्या शेकोटीजवळ हात हलवले, तर हातांच्या वेदना कमी होतात. मात्र गुंजांच्या दिशेने हात पुढे झाल्यास शीत-वेदना कमी होत नाहीत. वगैरे.)

अधिकाधिक पल्ल्याच्या भविष्यापर्यंत भाकिते करणे, त्याबद्दल कुतूहल असणे, हे वरील भावनेचे सामान्यीकरण होय. या क्षणीच्या हात पुढे करण्यास पुढच्या क्षणी उबेचे गाजर; या वर्षी अभ्यास करण्यासाठी पुढील वर्षी नोकरी लागण्याचे गाजर, या दशकात बचत करण्यासाठी म्हातारपणी आर्थिक स्वातंत्र्याचे गाजर...

कुठला "हेतुपूर्वक" प्रयास केल्यास दीर्घ काळानंतर सुख-दु:ख मिळत राहील?

सामान्यीकरण अंततोगत्वा फसते. भविष्यकाळाचा पल्ला जसा लांबचा होत जातो, तशी भाकिते अधिकाधिक चुकत जातात. परंतु जर शाश्वती वाटली, तर बरे वाटते. म्हणून अनंत काळाच्या पल्ल्यासाठी पारलौकिक सुखाबद्दल आश्वासने लोक शोधत असावेत.

वस्तुतः भविष्याचा पल्ला जसा लांबत जातो, तसे त्यातील तपशिलांबाबत उदासीन होऊनही कुतुहलाची सोय लावता येते. असे केल्याचा मोठा फायदा हा : खूप चुकलेली असतील अशी अति-तपशीलवार भाकिते निष्कारण करण्याचे आपण टाळतो. आणि आजच्या आज प्रयास करण्यातही कुठलाच अडथळा येत नाही. अमुकतमुकच नोकरी मिळावी असे तपशीलवार गाजर आशेत न ठेवता, "कुठलातरी बरा व्यवसाय करता येईल"
असे ढोबळ भाकित असले तरी क्रिया करता येते.

- - -

(२)
आपल्या "अस्मि" भावनेच्या अभावात, इच्छाप्रयास जाणवणार्‍या एककाच्या अभावाचा आपल्याला अनुभव नसतो. हे "बाय डेफिनिशन" स्वयंसंतुष्ट वाक्य आहे; परंतु (अ) अशी "अस्मि"भावना उपजत आहे, हे विशेष. (आ) आपल्याला जी "अस्मि"भावना जाणवते ती अन्य मनुष्यांना जाणवत असावी, असेसुद्धा वाटणे उपजत आहे. मात्र अन्य मनुष्य/प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडून इच्छाप्रयास बंद होतात.
त्यामुळे (अ) आणि (आ) या उपजत भावनांत विसंवाद उत्पन्न होतो.
त्यांच्या आतली "अस्मि" भावनाही संपुष्टात येते का? याबाबत आपल्याला कुतुहल वाटते. "अस्मि"भावनेशिवाय आपल्या स्वतःला आंतरिक अनुभवच नसतो. म्हणून "अस्मि"भावना टिकून देहाकडून इच्छाप्रयास बंद होण्याची कल्पना आपण रंगवत राहातो.
मला वाटते, की हे कुतूहल, आणि ही रम्य कल्पनासुद्धा उपजत जाणिवेतून आलेली आहे.

या बाबतीत सुद्धा मला वाटते, की रम्य कल्पनेत एक तर तार्किक विसंगती आहे, नाही तर पडताळण्यासारखे काहीच नाही. कुतूहल किती का नैसर्गिक असेना, त्यामुळे कितपत मानसिक दमछाक करून घ्यायची, याबाबत तारतम्य असावे.
- - -

आणि होय. फळाची/गाजराजी आशा असणे नैसर्गिक आहे, म्हणून कोणी आपल्याला फसवून आपले नुकसान करत नाही ना? याकडे लक्ष असावे.

पाप-पुण्याचा विचार

पाप-पुण्याचा विचार आणि स्वर्ग-नरक प्राप्ती हा विचार जगातील सगळ्याच मोठ्या धर्मात मांडला आहे. पुण्य मिळवण्यासाठी लागणारा प्रोटोकॉल व त्याचे इंप्लिमेंटेशन वेगवेगळे आहे. मला असे वाटते की, विवेक आणि धर्मातील शिकवण ह्याचा जवळचा संबंध आहे. धर्म निर्माण होण्याआधी मानव योग्य-अयोग्य वागणूक म्हणजे काय हे कसे ठरवत असेल ह्याची कल्पना आपण करु शकतो. तसेच अलिकडच्या काळात - गेल्या १००० वर्षात म्हणा हवे तर - सुध्दा असे अनेक असतील की, ज्यांना खरे म्हणजे कोणत्याच धर्माची शिकवण मिळाली नाही. हे लोक आपले व्यवहार कसे करतात ते पाहणे आवश्यक ठरेल. त्यांचा विवेक त्यांना कोणत्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो व नाही हे समाजाच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे असेल. नाहीतर जनावर व प्रगत माणूस ह्यात फरक काय?

विवेकाची प्रगती धर्मामुळे (धर्ममार्तंडांमुळे नव्हे तर, तत्व) झाली, द्न्यानेश्वरादी संतांच्या प्रयत्नांनी झाली असे मी मानतो. त्यांनी लोकांना समजेल अशा भाषेत ती तत्वे मांडण्याचा प्रयत्न करुन एक दुरचे स्वप्न स्वत: पाहिले व लोकांना पहायला शिकवले.

विवेकामुळेच आज दिवसभर नको ते काम करणा-याच्या मनाला टोचणी लागते व तो सल कुठेतरी त्यास कमी करायचा असतो. माणसे आपपल्या परीने तो सल कमी करण्याचा मार्ग शोधतात, कुणी हॉस्पिटले बांधतो तर कुणी दानधर्म करतो, ई. ही टोचणी ज्या विवेकामुळे होते, त्याची शिकवण धर्मामुळे होते.

एका पोलिस अधिका-याशी गप्पा मारतांना तो म्हणाला होता की, एखाद्या चोराकडून काही उगाळून घ्यायचे असेल तर अंतिम पर्याय त्यास देवाची भिती दाखवणे असतो व हे ब-याचदा इफेक्टीव्ह असते.

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली - वाईट, फायद्याची - तोट्याची, एखाद्या कुठे उभा राहून पाहत आहे त्याप्रमाणे बाजू दिसणार.

तुम्हाला काय वाट्ते? - वरील विचारात कुठे ग्याप्स आहेत?

गॅप

देव नाही असे तुम्हाला कधी ठाम पटले तर तुम्ही खून, दरोडे, बलात्कार करण्याची इच्छा बाळगण्यास लागाल.

विवेकामुळेच आज दिवसभर नको ते काम करणा-याच्या मनाला टोचणी लागते व तो सल कुठेतरी त्यास कमी करायचा असतो.

सल कमी करण्याचा प्रयत्नही होऊ नये म्हणून धर्म नष्ट व्हावा, अन्यथा टोचणी पुन्हा जमेपर्यंत तुमच्यासारखे लोक पुन्हा गुन्हे करतात.

जग सुसह्य

खरंच, तुमच्या सारखे लोक येथे आहेत म्हणूनच हे जग सुसह्य झाले आहे. डॉ. रीवर्क हिलरी, डॉकीन्स सुद्धा असेच विचार मांडतात.- त्यामुळेच ते तुम्हाला अधिक धारदार विचारशक्ति देतात.

लेख छान आहे..

संबंधितांना अंतर्मुख करणारा आहेच,पण त्यावरिल चर्चा हि छानच,
इथलं वैशिष्टय् म्हणजे सत्य हेच कसोटिवर टिकून राहते..
तर्कहिन,बेसलेस लिखाण टिकत नाहि खोडल्या जाते..(याचं कारण अशा उपक्रमींची संख्या जास्त असावी)
इतर ठिकाणी असा अनुभव फार कमी येतो..
असो..
या वरुन मला एक सुचले ते असे की त्या गाजराचे रुपांतर लोढण्यात झाले असावे काय?
(लोढणा म्हणजे गुरांच्या गळ्यात बांधण्यात येणारे जड लाकूड,गुरांनी आपला प्रदेश सोडुन दुर जाऊ नये किंवा जास्त उधळू नये यासाठी ते बांधतात)

देव ,धर्म यांच्या आधारे कसलेही भ्रामक चित्र निर्माण केले,त्याला वेद,शास्त्रे,पुराणे,परंपरा, संस्कृती यांचा आधार आहे असे म्हटले,ते त्रिकालज्ञ ऋषींनी निर्माण केले आहे असे ठोकून दिले,की भोळसट श्रद्धाळू त्या चित्रामागे चालू लागतात. ही मानसिकता लक्षात आल्यावर समाजातील धूर्त,चाणाक्ष,लबाड आणि स्वार्थी लोकांनी अशी अनेकानेक गाजर चित्रे निर्माण केली.त्यांच्याद्वारे भोळसट श्रद्धाळूंची लुबाडणूक चालू आहे.

अतीशय सहमत..

लोढणे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
उपक्रमावर स्वागत ! विचारपूर्वक लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
स्वर्ग,मोक्ष या केवळ कल्पना आहेत.तसेच भाग्यरत्नांमुळे समस्या दूर होतात,ज्यावर काही निरर्थक अक्षरे आहेत असा श्रीयंत्र नावाचा पत्रा घरात ठेवून त्याची पूजा केली तर लक्ष्मी प्रसन्न होते इ.गोष्टी सुद्धा कल्पनिकच आहेत.त्याकरिता गाजरचित्र अशी प्रतिमा वापरली.चित्र म्हणजे खरी वस्तू नसते.
लोढणे (किंवा लोढणा) ही प्रतिमाही वापरता येईल. लोढण्यामुळे प्रगती खुंटते.अंधश्रद्धांमुळे तेच होते.म्हणून अंधश्रद्धा हे माणसाच्या गळ्यातले लोढणे आहे.

 
^ वर