गणितातील 'पाय्' (π) ची सुरस कथा!

10 वी 12 वीपर्यंत शाळा शिकलेल्यांनासुद्धा पाय् (π) ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. ( निदान एवढे तरी बहुतेकांना माहित असण्याची शक्यता आहे. ) परंतु या संज्ञेबद्दल अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे म्हणून हा लेखन प्रपंच.

ग्रीक मूळाक्षरातील 'प' साठी वापरात असलेली ही संज्ञा आता जवळ जवळ अंक म्हणूनच ओळखला जात आहे. या अंकाचे मूळ शोधणे तितकेसे कठिण नाही. पुरातन काळच्या इजिप्त, भारत, बॅबिलोनिया व ग्रीक येथील भूमितीचे जाणकार कुठल्याही वर्तुळाचा परिघ व त्याचे व्यास यातील गुणोत्तर स्थिर असते असे ढोबळमानाने ओळखत होते. काही इतिहासकारांच्या मते ग्रीक येथील अर्किमिडिस यानी π चे मूल्य शोधण्यासाठी परिघ - व्यास गुणोत्तराऐवजी वेगळी पद्धत वापरली. म्हणूनच याला अर्किमिडिस स्थिरांक असेसुद्धा म्हटले जाते. प्लुटोसारख्या प्रचंड आकाराच्या ग्रहापासून बोटात मावणार्‍या आंगठीच्या बारीक सारीक वर्तुळाकार वस्तूंचे परिघ/क्षेत्र मोजण्यासाठी हा एकमेव गुणोत्तर असून त्याचे मूल्य सुमारे 3.14 (22/7) आहे हे जगन्मान्य झालेले आहे. यावरून वर्तुळाचा परिघ त्याच्या व्यासाच्या तिप्पटीपेक्षा थोडेसे जास्त असते हे लक्षात येते. आपल्याला जमीनीवर 10 मी परिघ असलेले वर्तुळ काढायचे असल्यास दोरी, खुंटी व खडूच्या सहाय्याने व या गुणोत्तराच्या मदतीने सहजपणे काढता येईल. 10 मी परिघ असल्यास
10 = 3x 3.3 (व्यास) = 3 x 2 x 1.65 (त्रिज्य)
1.65 मी लांबीच्या दोरीचे एक टोक खुंटीला व दुसरे टोक खडूला बांधून दोरी ताठ करून खुंटीभोवती फिरविल्यास 10 मी लांबीचा परिघ असलेला वर्तुळ काढता येईल.

परंतु वर्तुळाचा परिघ जास्तीत जास्त अचूकपणे मोजण्याचा प्रयत्न केल्यास गुणोत्तर π सुद्धा जास्तीत जास्त अचूक असणे आवश्यक आहे. इजिप्शियन्स π चे मूल्य म्हणून 25/8 व बॅबिलोनियन्स 256/81 ही संख्या वापरत होते. भारतातील शुक्ल यजुर्वेदातील शतपथ ब्राम्हण मध्ये ही संख्या 339/108 (= 3.139) आहे. 2009 साली संगणकाच्या मदतीने π चे मूल्य 1,240,000,000,000 अंशापर्यंत मोजला गेला. गंमत म्हणजे 0 ते 9 आकडे असलेल्या या अपूर्णांकात कुठल्याही संख्येची पुनरावृत्ती झाली नाही. संख्या पुन्हा पुन्हा आल्या नाहीत. जर या गुणोत्तराचे मूल्य अनंत (infinity) अंशापर्यंत काढत गेल्यास या अपूर्णांकात कुठे ना कुठे तरी आपल्यातील प्रत्येकाचा मोबाइल क्रमांक, क्रेडिट कार्ड क्रमांक वा जन्मतारीख नक्कीच मिळेल. यासारखे वैशिष्ट्य इतर कुठल्याही साध्या अपूर्णांकात मिळणार नाही. एखाद्याची उंची जास्तीत जास्त अचूकपणे मोजण्याचे ठरवल्यास कदाचित ती 170.236283945 सें मी असे काही तरी असू शकेल व यानंतर ते तेथेच थांबून जाईल. किंवा यात आणखी काही आकडे जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्या बहुतेक 00000.... असतील. इजिप्शियनांचा 25/8 = 3.125 नंतर आकडे थांबतील. फार फार तर आपल्याला 3.125000000 असेही लिहिता येईल. हे शून्य हजारो कोटी वेळा लिहूनही मूल्यात काही फरक पडणार नाही. कितीही प्रयत्न केले तरी नंतरच्या भागात शून्यव्यतिरिक्त दुसरा कुठलाही आकडा तेथे दिसणार नाही.

म्हणूनच π या संख्येला अपरिमेय अंक (irrational number) असे म्हटले जाते. (जी संख्या पूर्णांकाच्या रूपाने अवा दोन पूर्णांकाच्या भागाकाराने, म्हणजेच अपूर्णांकाच्या रूपाने, व्यक्त करता येत नाही ती संख्या. उदा - π, √2, √3..इ.इ ) याचा अर्थ ही संख्या पूर्ण संख्येच्या गुणोत्तराच्या स्वरूपात मांडता येत नाही. अशा प्रकारच्या संख्या गणित क्षेत्रात विपुल प्रमाणात वापरात आहेत.

आपण गणित विषय शिकत असताना π चे मूल्य साधारणपणे 3 1/ 7 वा 3.14 एवढे पकडत होतो. खरे पाहता π चे मूल्य 3.14159265358462643832795 .... एवढेसुद्धा असण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा हे मूल्यांकन पूर्णपणे अचूक नाही. π च्या मूल्यातील 3. नंतरचे अंक अनंत (infinite) अंकापर्यंत जाऊ शकतील व यातील काही अंकांचा मिळून गट केल्यास त्या गटाची पुनरावृत्ती होणार नाही. समीकरणाच्या स्वरूपात π चे मूल्यांकन π = 4(1/1 - 1/3 + 1/5 -1/7 + 1/9 - 1/11 +1/13 - 1/15 +.....) असे करता येईल. पहिल्या काही अपूर्णांकापर्यंत बेरीज - वजाबाकी करत गेल्यास π चे मूल्य तेवढे अचूक असणार नाही. परंतु जितके जास्त अपूर्णांकातील आकडे तितकी अचूक π ची किंमत. π च्या मूल्यातील अंशाच्या बाजूला 39 आकडे असले तरी त्यावरून पृथ्वीचे परिघ वा हायड्रोजन अणूचा व्यास जास्तीत जास्त अचूकपणे निर्धारित करता येईल. गेल्या 2000 वर्षात π चे मूल्य निर्धारित करण्यासाठी अनेक अल्गॉरिथम्स सुचविलेले आहेत. 14 व्या शतकात केरळ येथील संगमग्रामच्या माधव याने π च्या मूल्यांकनासाठी infinite series of approximations चा शोध लावला. यानंतरही अनेकाने याविषयी प्रयत्न केले आहेत. तरीसुद्धा गणितज्ञ आणखी जास्त बिनचूक मूल्याच्या शोधात आहेत. 1996 मध्ये संगणकांचा वापर करून 600 कोटी आकडे असलेले मूल्य शोधून काढले. आज हा आकडा 1 ट्रिलियनच्या (10^12) जवळपास गेला आहे. काही तज्ञांच्या मते विश्वातील यच्चावत ऊर्जा संगणकांसाठी वापरूनसुद्धा π ची बिनचूक किंमत काढणे शक्य नाही. म्हणूनच π चे मूल्य शोधणार्‍या अर्किमिडिसला अजूनही गणित विश्वात मानाचे स्थान आहे. सोबतच्या चित्रात π चे 1500 आकडे असलेले मूल्य दिलेले आहे.

π चे 1500 आकडे असलेले मूल्य

भूमितीच्या संदर्भात π संख्या रूढ असली तरी विज्ञानाच्या इतर क्षेत्रातही या संख्येचा वापर होत आहे. गिझा येथील पिरॅमिड्स बांधणार्‍यांना π चे मूल्य माहित होते, असा दावा केला जातो. क्वांटम भौतिकीतील प्लाँक स्थिरांकाच्या संदर्भात याचा वापर होतो. वर्तुळाच्या क्षेत्राएवढा क्षेत्र असलेला चौकोन काढणे (squaring the circle) हे आव्हान आजपर्यंत कुणी स्वीकारले नाही. आइन्स्टाइनने याचा वापर नदीच्या लांबीच्या संदर्भात करता येतो असे शोधून काढले आहे. वाकडेतिकडे वाहणार्‍या नदीचे वास्तविक अंतर व नदीच्या उगमापासून संगमापर्यंतचे थेट अंतर याचे गुणोत्तरसुद्धा π एवढे असते, असे त्यानी पहिल्यांदा सुचविले. नदीचा बाक जास्त असल्यास किनार्‍यावरील मातीची धूप होण्याची शक्यता जास्त. जास्त धूप होत असल्यास नदी जास्त वेगाने वाहणार. जास्त वेगामुळे धूप होतहोत नदीचा बाक वाढत जाणार. या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी निसर्गाने काही मर्यादा आखून दिल्यासारखे नद्या वाहतात, असे वाटते. व ही मर्यादा π गुणोत्तरात आहे, असे आइन्स्टाइनला वाटले. ब्राझिल व सैबेरिया मधील समपातळीवरून वाहणार्‍या नद्यांच्या बाबतीतील आकडेवारी या गृहितकाला पुष्टी देत आहे. π च्या मूल्याचा आधारावरून अनेक सिद्धांत व प्रमेय गणित विश्वात वापरात आहेत. π शी संबंधित शीर्षकांची यादी येथे वाचता येईल.

गणिताशी संबंध येत नसलेल्यांना या सर्व गोष्टी कंटाळवाणे वाटतील. रोजच्या वापरातील गोल गोल नाणी, कारमधील स्टिअरिंग व्हील, आकाशात दिसणारे सूर्य - चंद्र वर्तुळाकारात असूनही त्यांचे व्यास अचूकपणे ओळखता येत नाही हे सांगूनही खरे वाटणार नाही.

या अपरिमेय अंकाच्या घोळातून सुटका करून घेण्यासाठी अमेरिकेतील इंडियाना राज्य शासनाने नामी युक्ती शोधली. π चे मूल्यच सेनेटमध्ये ठराव करून निर्धारित करण्याचा तो बेत होता. 1888 मध्ये डॉ. एड्वर्ड जॉन्सन गूड्विन या विक्षिप्त, हौशी गणितज्ञाने एका आश्चर्यकारक पद्धतीने π चे मूल्य निर्धारित केल्याचा दावा केला. त्याच्यातील अतींद्रिय शक्तीमुळे हे साध्य झाले असून कुठल्याही वैज्ञानिकाच्या आवाक्याबाहेरचा हा विषय आहे असे तो सांगत होता. (π चे भूत कित्येक शतकापासून अशा तर्‍हेवाइकांच्या मानगुटीवर बसलेले आहे.) परंतु याचा तर्‍हेवाइकपणा केवळ बढाया मारण्यापुरते मर्यादित न राहता या पठ्ठ्यानी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया व स्पेन या देशात π च्या मूल्यासाठीच्या स्वामित्व हक्कासाठी अर्ज पाठविले. पेटंट ऑफिसने यात नवीन काही तरी आहे या मुद्द्यावरून पेटंट बहाल केले. याचा गणिताशी संबंध आहे याचे त्यांना सोयर-सुतक नव्हते. यानंतर या पेटंट बहाद्दुराने 1893मध्ये शिकॅगो येथे भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात π विषयी शो करण्यासाठी शैक्षणिक दालनाची मागणी केली. परंतु संयोजकानी एखाद्या गणितविषयक पत्रिकेत अगोदर प्रसिद्ध करण्याचे सुचवून त्याची बोळवण केली. या गृहस्थाने American Mathematical Monthly या मासिकात आपला शोधनिबंध छापवूनही आणले. त्यातील लेखामध्ये π चे 2.56 पासून 4 पर्यंत आठ वेगवेगळे मूल्य आहेत. व त्याची स्वत:ची निवड मात्र 3.2 होती.

हे प्रकरण येथेच न थांबता गुड्विनने आपल्या पोसी कौंटीतील टी. आय. रेकॉर्ड या प्रतिनिधीशी संधान साधून π च्या मूल्याविषयी बिल् पास करण्यासाठी गळ घातली. गुड्विनकडे पेटंट्स होत्या, जर्नलमध्ये लेख छापून आला होता, यावरून रेकॉर्ड याला सर्व काही खरे वाटून त्यानी तसा ठराव मांडला. रेकॉर्डच्या मते बायबलमध्येसुद्धा याचा उल्लेख असून परमेश्वरानेच π चे मूल्य 3 म्हणून आदेश दिला आहे. काही तांत्रिक क्लिष्टतेमुळे हा ठराव एका समितीद्वारे छाननीसाठी पाठविण्यात आला. इंडियानातील जनतेला π चे मूल्य 4 असावे की 3.2 असावे अशी निवड करण्याची मुभा दिली होती. काही कारणामुळे शेवटी हा ठराव बारगळला. त्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रातील राजकारण्यांची लुडबुड थांबली.

मार्च 14 तारीख π दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या तारखेत 3, 14 या संख्या π च्या मूल्यातील संख्येशी जुळतात. π अप्रॉक्झिमेट डे म्हणून जुलै 22 तारीख साजरा केला जातो. कारण हा दिवस 22/7 अपूर्णांक सुचवतो.

अशी आहे ही π ची सुरस कथा!

संदर्भ: Fermat's Last Theorem, Simon King
Boffinology , Justin Pollard
The Hair of the Dog , Karl Sabbagh

लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीपुर्ण

माहितीपुर्ण लेख. विकीवरील ही जेपेग छान आहे.

जीआयएफ्?

माहितीपुर्ण लेख. विकीवरील ही जेपेग छान आहे.
जीआयएफ् असं म्हणायचं होतं का?

२२/७ काही ग्रह :

π ची किंमत (३.१४१५९२.... अनंत) आणि २२/७ = ३.१४२८५७ १४२८५७ १४२८५७...... (अनंत)
ह्या मुळे बर्‍याचदा अशी गफलत होते की २२/७ म्हऩजेच π होय.

खरे पाहता २२/७ ही फक्त २ डेसीमल प्लेसेस पर्यंत बरोबर असलेली π ची किंमत होय.

बाकी लेख छान जमला आहे.

"स्टोरी ऑफ पाय " नावाचं खूप छान पुस्तक आहे. वेळ मिळाल्यास जरूर वाचा.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

शंका

प्लुटोसारख्या प्रचंड आकाराच्या ग्रहापासून

"प्लुटोसारख्या प्रचंड"?

काही तज्ञांच्या मते विश्वातील यच्चावत ऊर्जा संगणकांसाठी वापरूनसुद्धा π ची बिनचूक किंमत काढणे शक्य नाही.

"काही"?

शंका-२

प्लुटोसारख्या प्रचंड आकाराच्या ग्रहापासून

"प्लुटोसारख्या प्रचंड"?

प्लुटो हा लौकिकार्थाने ग्रह आहे?

---

लेख अद्याप वाचला नाही, वाचला की वेगळा प्रतिसाद देईन.

पूर्वग्रह

सिमॉन सिंग यांनी ते पुस्तक लिहिले तेव्हा (१९९७ साली) त्याला ग्रहच म्हटले जाई. २००६ साली त्याला बटुग्रह ठरविण्यात आले.

ठीक

सिमॉन सिंग यांनी ते पुस्तक लिहिले तेव्हा (१९९७ साली) त्याला ग्रहच म्हटले जाई. २००६ साली त्याला बटुग्रह ठरविण्यात आले.

स्पष्टीकरण ठी क पण २०११ मध्ये संदर्भ पडताळून वाक्ये टाकायला हवीत.

बाकी, पायची गोष्ट खरेच सुरस आहे. आवडली हेवेसांन त्याबद्दल नानावटींचे धन्यवाद.

दुरूस्ती :

>>वर्तुळाच्या क्षेत्राएवढा क्षेत्र असलेला चौकोन काढणे (squaring the circle) हे आव्हान आजपर्यंत कुणी स्वीकारले नाही

चौरस म्हणायचे आहे काय इथे ?

---------------------
-धनंजय कुलकर्णी

फरक नाही

चौकोन काढता आला असता तर चौरसही काढता आला असता. (शब्दशः भाषांतरासाठी चौरस असेच म्हणावे लागेल हे मान्य.)

चौकोन

चौकोन काढता आला असता तर चौरसही काढता आला असता....

चौकोन् काढता येतोच. वर्तुळाला चार साइडला खेचला तर चौकोन तयार होतो.
---------------------
-धनंजय कुलकर्णी

?

क्षेत्रफळ वर्तुळाइतकेच राहणार नाही.

छान

लेख छान जमला आहे.

(१) वाकडेतिकडे वाहणार्‍या नदीचे वास्तविक अंतर व नदीच्या उगमापासून संगमापर्यंतचे थेट अंतर याचे गुणोत्तरसुद्धा π एवढे असते... (२) नदीचा बाक जास्त असल्यास किनार्‍यावरील मातीची धूप होण्याची शक्यता जास्त. जास्त धूप होत असल्यास नदी जास्त वेगाने वाहणार. जास्त वेगामुळे धूप होतहोत नदीचा बाक वाढत जाणार. या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी निसर्गाने काही मर्यादा आखून दिल्यासारखे नद्या वाहतात, असे वाटते.

अधोरेखित वाक्य बहुधा चुकलेले आहे. चक्रातून सुटका वगैरे होत नाही. बाक वाढतवाढत नदीचे पात्र स्वतःला छेद देते. यातून निर्माण होणार्‍या बाकदार सरोवरांना "ऑक्सबो लेक" म्हणतात.

ओढून-ताणून

लेख आवडला, एकदम रोचक झाला आहे.

इंग्रजीत पायची किंमत लक्षात ठेवण्यासाठी त्यातील प्रत्येक अंकासाठी तितक्या अक्षराचे शब्द वापरून अनेक वाक्ये तयार केली गेली आहेत. उ.दा. ""Can I have a Pepsi? Carbonate it please. Right now!" 3.141592653". त्यावरून थोडेसे ओढून ताणून खालील किंमतीपुरते वाक्य तयार केले आहे. त्यात जोडाक्षरे आली तरी ते एकच अक्षर मानले आहे. इतर उपक्रमींना वाक्ये करता येतील म्हणून एक प्रयत्न म्हणून दाखवत आहे. जरा निवांतपणा मिळाला तर योग्य आणि नेटके वाक्य तयार करता येईल असे वाटते.

3.141592653

मदीरा ही सातत्याने का घेतलीतर नशिलेबाजपणामुळे डोके हलकेहलके गरगरत रहाते.

अभ्यास कमी?

३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१०
(खरोखरीच लक्षात ठेवण्याची अपेक्षा असेल तर ती कविता किती सोपी ठरेल ते मला माहिती नाही.)

आवडले..

दुव्यातील कवितेचा प्रकार आत्ताच वाचला आणि आवडला.

खरोखरीच लक्षात ठेवण्याची अपेक्षा असेल तर ती कविता किती सोपी ठरेल ते मला माहिती नाही

मला वाटते कधीकधी सुरवात तशी होत असेलही पण एकूणच असे प्रकार, नंतर मजा म्हणून करत असावेत. उ.दा. ट्रिग्नॉमेट्रीतील क्वांड्रंट्स हे आधी "ऑल, साईन, कॉस, टॅन" या पद्धतीने घन असतात वगैरे शिकतो, ते लक्षातही रहाते. तरी देखील ते लक्षात ठेवायला एक प्राध्यापक म्हणाले, "ऑल सिल्व्हर टी कप्स" असे सोपे जाते, तर दुसरे मित्राकडून त्याच्या शाळेत सांगितलेले ऐकले ते, "ऑल सरदारजी टिकीट चेकर्स" (अर्थात दोन्हीतील पहीले अक्षर हे साईन-कोसाईन-टॅन शी लक्षात ठेवायचे वगैरे)...

पाय आठवा सप्तपदीं |

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
|श्रीराम|हे रघुवर तू सीतारमणा दशरथकुलभूषणा रामा कौसल्यानंदना......(३.१४१५९२६)

मस्त

श्रीराम|हे रघुवर तू सीतारमणा दशरथकुलभूषणा रामा कौसल्यानंदना

मस्तच! ओढून ताणून नसल्याने एकदम आवडले!

छान

रोचक माहीती

अवांतर : भुमिती मधे असंख्य संज्ञा असताना पाय बद्दल जास्त चर्चा का होते ? अचुक माहीती नसल्यामुळे ?

सुरस आणि चमत्कारिक

π ची महती आणि माहिती आवडली.

माहितीपूर्ण, पण...

माहितीपूर्ण लेख. विशेषतः अपरिमेयत्वाची चर्चा आणि पायचं पेटंट घेण्याची कल्पना...

पण काही विधानं थोडी भोंगळ वाटली.

खरे पाहता π चे मूल्य 3.14159265358462643832795 .... एवढेसुद्धा असण्याची शक्यता आहे.

म्हणजे नक्की कळलं नाही. पायची किंमत पहिल्या अमुक अमुक दशमस्थळांपर्यंत लिहिली तर ती इतकी आहे असं म्हणता येतं. शक्यतेचा संबंध येत नाही.

काही तज्ञांच्या मते विश्वातील यच्चावत ऊर्जा संगणकांसाठी वापरूनसुद्धा π ची बिनचूक किंमत काढणे शक्य नाही. म्हणूनच π चे मूल्य शोधणार्‍या अर्किमिडिसला अजूनही गणित विश्वात मानाचे स्थान आहे.

पुन्हा बिनचूक म्हणजे काय? पाय हा अपरिमेय आहे हे सिद्ध झालं की बिनचूक या शब्दाला अर्थच रहात नाही. वीस दशमस्थळांपलिकडे किंमत काढणं हे गणिती व्यायाम म्हणून ठीक आहे, पण कुठच्याही भौतिक राशीसाठी उपयुक्त नाही.

गंमत म्हणजे 0 ते 9 आकडे असलेल्या या अपूर्णांकात कुठल्याही संख्येची पुनरावृत्ती झाली नाही. संख्या पुन्हा पुन्हा आल्या नाहीत.

हे बरोबर नाही. पहिल्या पन्नास दशमस्थळांतच ३८ हा आकडा दोनदा येतो. संख्या अर्थातच पुन्हा पुन्हा येणार. मात्र कुठचीही विशिष्ट संख्या (तितक्याच डिजिट्स असलेल्या) इतर संख्यापेक्षा अधिक वारंवारतेने येणार नाही.

गिझा येथील पिरॅमिड्स बांधणार्‍यांना π चे मूल्य माहित होते, असा दावा केला जातो.

मोठी बांधकामं करणाऱ्या इंजिनियरांना पायची साधारण माहिती होती याचं आश्चर्य/कौतुक का व्यक्त केलं जातं हे मला आत्तापर्यंत न उलगडलेलं कोडं आहे. कोणालाही एक तास मोकळा वेळ, साधारण सपाट जागा, दोरी, खुंट वगैरे गोष्टी वापरून पायची किंमत ९९.५%+ अचूकपणे काढता येते. बहुतेक सामान्य कामांसाठी तेवढी पुरते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

थोडी ढील दिली होती

गंमत म्हणजे 0 ते 9 आकडे असलेल्या या अपूर्णांकात कुठल्याही संख्येची पुनरावृत्ती झाली नाही. संख्या पुन्हा पुन्हा आल्या नाहीत.

हे बरोबर नाही. पहिल्या पन्नास दशमस्थळांतच ३८ हा आकडा दोनदा येतो.

मीसुद्धा या वाक्यावर अडखळलो होतो, पण "समजून घ्या, समजून घ्या" म्हणून ढील दिली होती. दशमानपद्धतीत पाय संख्या लिहिल्यास पहिल्या ३-४ दशमस्थळातच "१" हा आकडा दोनदा येतो.
येथे "पुनरावृत्ती" म्हणजे "रिकरिंग फ्रॅक्शन" म्हणजे "अखंड पुनरावृत्ती" असे म्हणायचे असावे, असा अर्थ मी लावून घेतला. पण हा अर्थ लावल्यानंतरही वाक्याच्या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा संबंध लागला नाही. कुठलाका घातांक वापरून पाय लिहायला घेतले (म्हणजे द्विमान पद्धतीत गंमत म्हणजे ० आणि १ हे इतकेच आकडे असले) तरी अखंड पुनरावृत्ती होत नाही.

अपरिमेय (इर्-रॅशनल) संख्या म्हणजे काय - फक्त पाय नव्हे तर सगळ्या - हे समजावून सांगायचे होते, त्यात हे सैलसर वाक्य पडले असावे.

लेख चांगलाच आहे...

पायचे अपरिमेयत्व

लेख रंजक झाला आहे त्यामुळे आवडला. भारतातही पायची किंमत अमुक धरा असे ठराव झाल्याचे आढळतात. कुठेतरी वाचले होते (अंताजीची बखर?) की पेशवाईत पायची किंमत तीन घ्या म्हणून हुकुम निघाला होता.

पायचे अपरिमेयत्व या लेखातून नीटसे मांडले गेले नाही. मुख्यतः इतकी उलटसुलट विधाने आहेत (इतरांनी त्यावर लिहिले आहेच) की अपरिमेयत्व संकल्पना धुळीस मिळते.

राजेश घासकडवी यांनी ऐलपैलवर पायच्या अंकांची त्यांची एक सुंदर कविता प्रकाशित केली आहे. त्यात कित्येक अंक अगदी येणारे शून्य देखिल येते.

प्रमोद

स्फुट लेखाचा आवाका

प्रथम या लेखाला प्रतिसाद व सूचना दिलेल्या वाचकांचे व त्याचप्रमाणे यातील (अक्षम्य!) चुका दाखवणार्‍यांचेही आभार मानतो. लेखाची शब्दमर्यादा व मुळातील त्याचा आवाकाच फारच छोटा असल्यामुळे π शी संबंधित कित्येक गोष्टी यात आलेले नाहीत. उदा: π हे दृश्यातीत (transcendental) अंक हा उल्लेख आलेला नाही. π च्या यादीतील गोष्टींच्याबद्दल थोडक्यात लिहिले असते तरी लेख लांबला असता (व कंटाळवाणा झाला असता).

प्रतिसाद वाचत असताना एक गोष्ट स्पष्ट होत आहे की अशाप्रकारच्या लेखावर कदाचित संपादकीय संस्करण झाले असते तर या चुका सुधारण्याची संधी मिळाली असती. प्लुटोसारख्या ऐवजी गुरुसारख्या ... चौकोना ऐवजी चौरस... अशी दुरुस्ती सुचवली असती.

गंमत म्हणजे 0 ते 9 आकडे असलेल्या या अपूर्णांकात कुठल्याही संख्येची पुनरावृत्ती झाली नाही. संख्या पुन्हा पुन्हा आल्या नाहीत.

हे वाक्यही आहे तसे न ठेवता स्पष्ट करण्याची संधी मिळाली असती.

π मध्ये 22/7 = 3.142857114285711428571 यासारखे 1428571 या संख्येप्रमाणे आवर्तन वा वारंवारता नाही एवढाच सांगण्याचा उद्देश होता. हे स्पष्ट झाले नसल्यास ती चूक माझी आहे. (परंतु π मध्ये ही वारंवारता वा अखंड पुनरावृत्ती अजूनही लक्षात आलेली नाही याचा अर्थ ती येणार नाही असे, (माझ्या माहितीप्रमाणे) कुणी सिद्धही केलेले नाही. कदाचित 1-2 ट्रिलियन आकड्यानंतर ती येऊ शकेल. त्यानंतर π अपरिमेय राहणार नाही. याला, फेर्माच्या शेवटच्या सिद्धांताच्या proof प्रमाणे, अजून दोनशे - तीनशे वर्ष लागतील. वेडे गणितज्ञ प्रयत्न करत राहतील!)

वर उल्लेख केल्याप्रमाणे लेखाचा उद्धेश फारच मर्यादित असल्यामुळे या लेखात अपरिमेय (irrational) वा दृश्यातीत (transcendental) संकल्पना तेवढ्या स्पष्ट झाल्या नाहीत. जाणकार उपक्रमींनी या विषयावरही लिहावे ही अपेक्षा!

अपरिमेयता

π मध्ये 22/7 = 3.142857114285711428571 यासारखे 1428571 या संख्येप्रमाणे आवर्तन वा वारंवारता नाही एवढाच सांगण्याचा उद्देश होता. हे स्पष्ट झाले नसल्यास ती चूक माझी आहे. (परंतु π मध्ये ही वारंवारता वा अखंड पुनरावृत्ती अजूनही लक्षात आलेली नाही याचा अर्थ ती येणार नाही असे, (माझ्या माहितीप्रमाणे) कुणी सिद्धही केलेले नाही. कदाचित 1-2 ट्रिलियन आकड्यानंतर ती येऊ शकेल. त्यानंतर π अपरिमेय राहणार नाही. याला, फेर्माच्या शेवटच्या सिद्धांताच्या proof प्रमाणे, अजून दोनशे - तीनशे वर्ष लागतील. वेडे गणितज्ञ प्रयत्न करत राहतील!)

एखादा आकडा (वा आकड्यांचा समूह) पुनरावृत्त/आवर्तन होत असेल तर ती संख्या अपरिमेय राहत नाही. अपरिमेय संख्येतील आकडे पुनरावृत्त होणार नाहीत याची खात्री बाळगा. २चे वर्गमूळ जसे अपरिमेय आहे याची सिद्धता आहे. तशी कदाचित पाय हा अपरिमेय आहे की नाही याची सिद्धता झाली नसेल. पायची किंमत काढण्यासाठी सिरीज मधल्या अपूर्णांकांची बेरीज केली जाते. या सिरिजची बेरीज पाय आहे हे सिद्ध करता येते. या अपूर्णांकाची बेरीज संगणकाशिवाय होणे जवळपास अशक्य आहे विशेषतः दशांश चिन्हानंतर काही (५/१०?) अंकांनंतर. या सिरिज नुसार बेरीज केल्यावर परिमेयत्व येण्याची शक्यता मला बरीच कमी वाटते.

प्रमोद

सिद्धता झालेली आहे

पाय इर्रॅशनल असल्याची सिद्धता झालेली आहे.
त्याबद्दल विकिपेडियावरील दुवा.

आणि हेसुद्धा ...|१४३८५६|१४३८५६|१४३८५६|... असे वाटेल तितक्या (पण अगणित नव्हे इतक्या) वेळा पायच्या आकड्यांमध्ये येते, याबद्दलसुद्धा खात्री बाळगता येते.

धन्यवाद

चांगला दुवा.
प्रमोद

π (पाय्) ची सुरस कथा

हिदु गणितवेत्त्यांना प्राचीन काळापासून 'पाय' च्या मूल्याचा ढोबळ मानाने अंदाज होता. आर्यभटाने असे म्हटले आहे:

चतुरधिकं शतमष्टगुणं द्वाषष्टिस्तथा सहस्राणाम्|
अयुतद्वयविष्कम्भस्यासन्नो वॄत्तपरिणाहः||

दोन अयुत (२००००) व्यास असल्यास परिधि ८ गुणिले १०४ + ६२००० (६२८३२) इतका आहे. (म्हणजे आर्यभटानुसार पायचे मूल्य ३.१४१६ आहे.)

भास्कराचार्याने लीलावतीमध्ये हे मूल्य असे दाखविले आहे:

व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते खबाणसूर्यै: परिधि: सुसूक्ष्मः|
द्वाविंशतिघ्ने विहॄतेऽथ शैलै: स्थूलोऽथवास्याद्व्यवहारसूक्ष्मः||

भ (२७) नन्द (९) अग्नि (३) ह्याने व्यासास गुणून ख (०) बाण (५) सूर्य (१२) ह्याने भागल्यास सूक्ष्म परिधि मिळतो. व्यासास २२ ने गुणून शैल (७) ने भागल्यास व्यवहारयोग्य असा स्थूलमानाने मिळतो.
(स्पष्टीकरणः अङकानां वामतो गति: ह्या मार्गाने ३९२७ भागिले १२५० म्हणजे सूक्ष्म परिधि.)

नंतरच्या काळात केरळातल्या हिन्दु अभ्यासकांनी Infinite Series च्या मार्गाने पायचे मूल्य दर्शविणारी अनेक प्रमेये शोधून काढली होती ह्याचा उल्लेख वर आलाच आहे. चार्ल्स व्हिश् नावाच्या एका अभ्यासू इंग्रज अधिकार्‍याने मलबारमधील उपलब्ध ग्रन्थांचा वापर करून 'Hindu Quadrature of the Circle' असा निबन्ध लिहिला होता, त्याची शीर्षटिप्पणी अशी आहे:

On the Hindu Quadrature of the Circle, and the infinite Series of the proportion of the circumference to the diameter exhibited in the four Sastras, the Tantra Sangraham, Yucti Bhasha, Carana Padhati, and Sadratnamala. By CHARLES M. WHISH, Esq., of the Hon. East-India Company’s Civil Service on the Madras Establishment.
(Communicated by the MADRAS LITERARY SOCIETY AND AUXILIARY ROYAL ASIATIC SOCIETY.)
Read the 15th of December 1832.>

(कोणास हवा असल्यास मजजवळ पूर्ण लेख संगणकावर उपलब्ध आहे.)

'पाय' बद्दल अजून एक मनोरंजक माहिती अशी की पायचे 'पाय' हे नामकरण विल्यम जोन्स (१६७५-१७४९) ह्या गणितज्ञाने केले. संस्कॄत भाषेचा विख्यात पहिलापहिला पाश्चात्य अभ्यासक विल्यम जोन्स (१७४६-९४) ह्याचा तो पिता. पहा:

http://en.wikipedia.org/wiki/William_Jones_(mathematician) and
http://www.gap-system.org/~history/HistTopics/Pi_through_the_ages.htm

अरविंद कोल्हटकर, जुलै १८, २०११.

खरोखरिच सुरस् आहे!!!

रोझ
बरिच रोचक माहिति मिळालि.

असेच लेख येवु द्यात्.

 
^ वर