"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण पहिले, भाग-३ "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण पहिले, भाग-३
"परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

आपण सुखलोलुप आहोत, म्हणून भ्रष्ट आहोत, म्हणून यशस्वी व्यावसायिक आहोत?
एकाद्या समाजाने "आपण कसे आहोत किंवा कसे असायला हवे" याबद्दलच्या कांहीं कल्पना आधीपासूनच बनविलेल्या असतात. अशा समाजाच्या स्वभाववैशिष्ट्यांचे केलेले चित्रण त्या कल्पनांशी तंतोतंत जुळत नाहीं म्हणून त्या चित्रणातली टीका चुकीची ठरत नाहीं.
समाजाची स्वभाववैशिष्ट्यें कांहीं एकाद्या जादूगाराच्या पोतडीतून बाहेर काढता येत नाही, मग त्या जादूगाराचा हेतू कितीही चांगला असो! या उलट राष्ट्राची खरी शक्ती आणि चिकाटी बर्‍याचदा आपल्या स्वत:बद्दलच्या अशा अतिरंजत कल्पनांच्या बाहेरील स्वभाववैशिष्ट्यांतच असते. कुठलेही एक स्वभाववैशिष्ट्य बाकीच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून अलग करून पहाता येणार नाहीं, सगळी स्वभाववैशिष्ट्ये एकत्रच पाहिली पाहिजेत. उदाहरणार्थ भारतातील ऊतू जाणारा प्रचंड भ्रष्टाचार! मूलभूतपणे पाहिल्यास भ्रष्टाचार नकारात्मकच आहे पण भारतीयांनी भौतिक ऐश्वर्याला इतके महत्व दिले नसते (आणि त्यापायी भ्रष्टाचार केला नसता) तर ते कल्पक व्यावसायिक बनूच शकले नसते. या उलट ते जर इहलोकापलीकडील स्वर्ग-नरकाच्या कल्पनात रमले असते आणि त्या पायी अति सज्जनपणे वागून अंतिम यश मिळविण्यासाठी कांहींही बरे-वाईट करणारे ’व्यवहारी’ बनले नसते तर ते नक्कीच भ्रष्टाचारी नसते!

निंद्य स्वभाववैशिष्ट्येच भारताला उपयुक्त?
एकाद्या समाजाचे व्यक्तिमत्व हा खूपच गुंतागुंतीचा आणि परस्पर जुडलेला विषय आहे हेच खरे. त्याचे आपल्या पसंतीनुसार तुकडे करता येणार नाहींत. भारतीयांची पूर्वीच्या काळची कांहींशी ’निंदात्मक’ स्वभाववैशिष्ट्येच भारताला उपयोगी पडली होती असे सिद्ध करण्याचा हे पुस्तक प्रयत्न करणार आहे. उदाहरणार्थ पाश्चात्य विचाराप्रणालींनी प्रभावित झालेले घटना परिषदेतील कांहीं सभासद मानत कीं समाजातील प्रत्येक घटकाला समानता देण्यासाठी सांसदीय लोकशाही हीच एक जादूची कांडी आहे. ज्या भारतीयांना त्यावेळी खरोखरच जर असे वाटले होते त्यांचा आज पार भ्रमनिरास झाला असता आणि जसा इतर विकसनशील देशानी हुकुमशाहीचा अवलंब केला तसा भारतानेही केला असता. पण इंग्लंडहून आयात केलेले हे नुकतेच उडायला शिकलेले नवजात ’कलमी रोपटे’ इथे जगले कारण बहुतेक भारतीयांना लोकशाही म्हणजे स्वत:ची उन्नती करून घेण्याचा राजरोस आणि परिणामकारक मार्ग आहे हे लक्षात आले होते. भारतातील लोकशाहीच्या वाढीच्या दृष्टीने ही सुदैवी घटना होती असेच म्हणावे लागेल. पुरेसा वेळ दिल्यानंतर हे लोकशाहीचे फुलपाखरू आपल्या सदोष कोषावस्थेमधून बाहेर पडायला आता तयार झाले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या स्वाभाविक मोहाने लोकशाहीच्या प्रक्रियेत भाग घेण्यात जास्त-जास्त मातब्बर लोकांना (आणि त्यांच्या ’कळपा’तल्या अनुयायांना) एक तर्‍हेची प्रेरणाच मिळाली. निरंकुश अस्थिरतेच्या जन्मजात भीतीचे बाकी कितीही दोष असोत पण त्या भीतीने ’कुदेता’सारख्या हिंसापूर्ण पद्धतीने भारतातील सरकार बदलले गेलेले नाहीं. आर्थिक फायद्याला मिळणारा अस्थानी आदर आणि त्यातून मिळणारी ऐहिक सुखे यामुळे व्यापारी वर्ग दिवाळखोरीपासून दूर राहिला व त्यांच्यातील उद्योजकतेला खतपाणी मिळाले. उदाहरणार्थ "बर्कीना फासो" सारख्या आफ्रिका खंडातील एका देशाच्या ’वागाडूगू’ या राजधानीतले एकुलते एक डिपार्टमेंटल स्टोअर निर्धन अवस्थेत हातात फक्त एक लोटा घेऊन कांहीं वर्षांपूर्वी आलेल्या एका भारतीयाच्या मालकीचे आहे. जिथे जीवावरच बेतते तिथे वीरोचितपणे शेवटच्या सैनिकापर्यंत लढण्यापेक्षा तडजोड करून परस्पर मदतीने जगण्याकडे जात्याच असलेल्या कलामुळेच हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज दोन्ही एका पाठोपाठ आलेल्या आणि जबरदस्तीने धर्मांतर करविणार्‍या आक्रमकांपेक्षा जास्त लाळ जगल्या आणि त्यांच्या सहवासाने त्यांनी कांही चांगल्या गोष्टी उचलल्यासुद्धा!

महत्वाच्या तीन आगामी घटना; पहिली अखिल-भारतीयत्व
या पुस्तकात नजीकच्या भविष्यकाळात होऊ घातलेल्या तीन घडामोडींची चर्चा केलेली आहे. येत्या कांहीं वर्षात या घडामोडींचा भारतीयांच्या व्यक्तिमत्वावर खूपच प्रभाव पडणार आहे. पहिली घडामोड आहे सकल-भारतीयत्वाबद्दल (pan-Indianness). भारताच्या सांस्कृतिक ऐक्यावर खूप लिखाण झालेले आहे आणि ते योग्यच आहे. पण या लिखाणांतून एकमेकांपासून दूर गेलेल्या आणि खूप विविधता असलेल्या भारतीयांच्या संस्कृतील बारीक-बारीक साधर्म्य ओळखण्याचा प्रयत्न होता. इतिहास, संस्कृती, परंपरा याच्यामुळे भारतीयांचे स्वत:चे ओळखू येण्यासारखे व्यक्तित्व घडविले गेले आहे आणि त्यात भारतीय मानसिकतेतील स्पष्ट छटाही आहेत. पण या ऐक्याला सकल-भारतीयत्वाचे व्यक्तित्व आलेले नव्हते. वाराणसीतील भारतीय आणि त्रिचुर येथील भारतीय संस्कृतमधले तेच धडे गिरवत असले किंवा दोघेही तेच सण साजरे करत असले तरी एकमेकांबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती. आपापसात फारसा संपर्क नसल्यामुळे या भारतीयांची आपापसात अनुभवांची देवाण-घेवाणही नव्हती. १९४७ सालानंतरच्या दशकांत यात हळूहळू बदल होत गेला व अलीकडच्या कांहीं वर्षांत हा बदल नाट्यपूर्ण वेगाने घडलेला आहे!

महत्वाची दुसरी घटना-समाजरचनेतील मोठे बदल
माझ्या यादीतील दुसरी आगामी घटना आहे पूर्वीच्या काळी अत्यंत पवित्र समजल्या जाणार्‍या समाजरचनेचा (social hierarchy) हळू-हळू पण लक्षात येण्याइतका झालेला र्‍हास. भारतीय लोकांना आपल्या समाजरचनेची, पदक्रमाबाबतची (hierarchy) खूपच जाणीव असते. त्यात आपापल्या जातीवरील निष्ठा आजही व्यापकप्रमाणात शिल्लक आहे. पण आतापर्यंत शांत असलेले आणि सामाजिक वर्णपटाच्या शेवटच्या पायरीवर समजले जाणारे दलित लोक ही बंधने झुकारून टाकायला पूर्वी कधीही नव्हते इतके उत्सुक झालेले आहेत. देशाच्या संपत्तीतील मोठा हिस्सा आपल्याला मिळण्याबद्दलची त्यांची महत्वाकांक्षा आता दडपणे किंवा दडविणे आता शक्य नाहीं. लोकशाहीच्या राजकारणाचे असले ’अनिष्ट’ परिणाम प्रस्थापित उच्चपदस्थांना अभिप्रेत नसतील पण लोकशाहीने टप्प्याटप्प्याने बहाल केले अधिकार आणि त्यातून ठिबकत खाली आलेली आर्थिक सुबत्ता यामुळे जास्त-जास्त भारतीयांमध्ये त्याबद्दलच्या महत्वाकांक्षा आणि अपेक्षा पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या जागृत झाल्या. अशा तर्‍हेने नव्याने अधिकार मिळविलेले आणि प्रगतीच्या दिशेने निघालेले भारतीय एकविसाव्या शतकात भारताचे परावर्तन कसे करतील? समाजात शतकानुशतके चालत येऊन प्रस्थापित झालेल्या चालीरीतींची प्रत्यक्ष व्यवहारात नव्याने कसून चौकशी केली जाऊन त्यांना जेंव्हां आव्हान देण्यात येईल-तेसुद्धा राजकीय नेत्यांच्या शाब्दिक अवडंबरापलीकडे जाऊन-तेंव्हां कसल्या तर्‍हेचा आगडोंब उसळेल? जुन्या समाजरचना आणि त्या समाजरचनांतून उद्भवलेली मानसिक प्रवृत्ती यांचे नव्याने जोषात आलेल्या आणि हिरीरीने बदल घडवू पहाणार्‍या सुधारकांकडून संपूर्ण उच्चाटन होईल? कीं हे सुधारक जुलुमी प्रवृत्तीचा नाश करण्याऐवजी त्यांच्यावर एकेकाळी अन्याय करणार्‍यांचे अनुकरण करून फक्त आपल्या पोळीवर ओढता येईल तितके तूप ओढण्यातच दंग होतील?

महत्वाची तिसरी घटना-माहिती तंत्रज्ञानातील जागतिक शक्ती भारत
माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक "जागतिक शक्ती" या नात्याने झालेला भारताचा उदय ही माझ्या यादीतील तिसरी घटना आहे. जगातल्या सर्वात जास्त अशिक्षित लोक असलेल्या देशाकडे असे माहिती-तंत्रज्ञानाचे नेतृत्व यावे हा एक विरोधाभास आहे, पण शिक्षणाला भारतातील उच्चभ्रू (Elite) समाजाने-त्यातही ब्राह्मण समाजाने-आपले प्रस्थापित श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी नेहमीच अनन्यसाधारण महत्व दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्राथमिक शिक्षणाची जपमाळ बळेबळे ओढता-ओढता उच्च शिक्षण देणार्‍या संस्था उभारून त्या चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतविणे सत्ताधार्‍यांनी सातत्याने चालू ठेवले. या दुटप्पी धोरणाचे गेल्या पन्नास वर्षांत भाकितानुसार झालेले परिणाम दिसून येत आहेत. तंत्रज्ञानात प्राविण्य असलेला जगातील एक सर्वात मोठा समाज आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि संगणकाच्या तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण देऊ शकणार्‍या अनेक संस्था भारतात उदयास आल्या. राजकारणाच्या ’व्यवसाया’प्रमाणेच उच्च शिक्षणाने विभूषित असणे ही झटपट प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी एक गुरुकिल्लीच ठरली. माहितीतंत्रज्ञानाच्या या क्रांतीतील तरुण भारतीयांच्या सहभागाकडे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. भारतातील ’सॉफ्टवेअर’मध्ये तज्ञ असलेल्या व्यावसायिकांना जागतिक स्तरावर मागणी आहे. ***आज भारताच्या ’सॉफ्टवेअर’ उद्योगाच्या निर्यातीची तूलना अरब देशांच्या तेलनिर्यातीशी केली जाऊ लागली आहे. ’कॉल सेंटर’ उद्योगात भारताला एक जागतिक शक्ती (Superpower) समजले जाऊ लागले आहे. जगातील ५०० सर्वात मोठ्या उद्योगातील ४० टक्के उद्योग त्यांचे हिशेब-ताळेबद ठेवणे, डिझाईन-ड्रॉइंगचे काम, गिर्‍हाइकांबरोबर संपर्क ठेवण्याचे काम वगैरे आज भारतात करत आहेत. ही चढती कमान अशीच टिकून राहील काय? भारतीयांना या क्षेत्रात उपजत कौशल्य आहे काय? या क्रांतीत किती भारतीय सहभागी होतील आणि या क्रांतीचा फायदा घेतील? ’सिलिकन व्हॅली’तील नव्याने लक्षाधीश झालेल्यांच्या या नवीन उपक्रमाचे किती प्रमाणावर अनुकरण केले जाईल? कीं आपण ’सॉफ्टवेअर’ क्षेत्रातले हमाल रहाण्यातच समाधान मानू? याही पुढे जाऊन हे पाहिले पाहिजे कीं या नव्या प्रथेचा भारतीयांच्या प्रतिमेवर कसा परिणाम होईल? उदाहरणार्थ सायप्रसमध्ये घरकामाला येणार्‍या मोलकरणी आणि नोकर-चाकर श्रीलंकेतून आणि फिलिपीन्समधून येतात तर ’सॉफ्टवेअर’ क्षेत्रातले तंत्रज्ञ भारतातून येतात. अशा तर्‍हेच्या जागतिक अपेक्षानुसार भारतीय तंत्रज्ञ स्वतःला बदलतील काय? आणि कुठल्या बाबतीत ते न बदलता आहेत तसेच रहातील?

भारतीय समाज बदलेल?
समाज बदलत रहातो पण बदल किती घडेल यालाही सीमा असते. शतकानुशतके अंगवळणी पडलेली कांहीं स्वभाववैशिष्ट्ये, लकबी बदलणार नाहींत. आणि ही न बदलणारी स्वभाववैशिष्ट्येच समाजाच्या व्यक्तिमत्वाला एक स्पष्ट आणि स्वतःचे असे सांस्कृतिक ’चिन्ह (label)’ देतात. बाकीची स्वभाववैशिष्ट्ये सौम्य होऊ शकतात किंवा बदलता येऊ शकतात. आधी नसलेल्या स्वभाववैशिष्ट्यांची भर घालता येते पण अशा तर्‍हेने भर घालण्याने आलेली स्वभाववैशिष्ट्ये म्हणजे एकाद्या भव्य इमारतीवर काम करताना कामगारांना उभे रहाण्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या आधारफळ्यासारखीच (scaffolding) असतात आणि या आधारफळ्यामुळे मूळ इमारतीवर कांहींही परिणाम होत नाहीं. आणि या नव्या-जुन्या स्वभाववैशिष्ट्यांच्या संयोगातून होणारी सांस्कृतिक घडणच प्रत्येक मनुष्याला आयुष्यभर साथ देते आणि भविष्यकाळाकडे घेऊन जाते.

Comments

धाग्याला एकही प्रतिसाद नाही

जकार्तावाले काळेसाहेब, सनविवि.

ह्या सुदृढ धाग्याला एकही प्रतिसाद नसल्याचे पाहून वैषम्य वाटले. तसे का झाले असावे ते मी माझ्या बुद्धीला जितके जमेल तितके केले आहे-
ह्या धाग्यात काहीच प्रक्षोभक म्हणता येइल असे काहीच नाही. उदा- आब्दुल कलाम ह्यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला जोकर म्हणणे, अशा क्रिया केल्या की, चर्चा कशी खमंग होते.
किंवा ताज्या घडामोडी पैकी काहीच ह्यात नाही. उदा- सत्यसाइबाबा व त्यांच्याबद्द्लच्या दंतकथा- असेही काहीच नसल्यामुळे ह्या अनुवादात्मक धाग्याकडे पाहण्याची दृष्टी एखाद्या शेल्फ मधील पुस्तकांकडे जशी असते तशी होते. शेवटी वाचक त्याला जे आवडेल तेच घेतो.

नाही का?

कळावे,

("जकार्तावाले" असे काळेसाहेब का म्हणतात ते कधीही न समजलेला)
गिरीश.

केवळ

केवळ धाग्याला मिळालेले प्रतिसाद न बघता त्याची वाचनसंख्या ही बघावी. विषय रोचक असला तरी थोडा किचकट आहे. सहसा असे धागे वाचून मनाला विचार करावयास आणि त्यास प्रतिसाद देण्यास वेळ लागतो. बरे, नुकताच एकोळी प्रतिसाद देणे सुद्धा चांगले दिसत नाही. तुलनेने इतर प्रकारच्या धाग्यांना प्रतिसाद देणे सोपे असते इतकेच.

बाकी काळे साहेबांचे लिखाण आवडत आहे अशी पोचपावती देतो.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

मनापासून धन्यवाद!

राजकुमार-जी,
मनापासून धन्यवाद!
___________
जकार्तावाले काळे

कारण मी जकार्ताला रहातो!

कारण मी जकार्ताला रहातो! 'जकार्तावाला' असेही म्हणता आले असते हे मात्र खरे!!
___________
जकार्तावाले काळे

या विषयात ज्यांना मनापासून रस आहे तेच वाचक असे लेख वाचतात

गिरिश-जी,
तुमचे बाकीचे मुद्दे खरेच आहेत. या विषयात ज्यांना मनापासून (genuine) रस आहे तेच वाचक असे लेख वाचतात. त्यात भारतीय लेखकांचे इंग्लिश लिखाण 'साहेबां'च्या इंग्लिश लिखाणापेक्षा जास्त किचकट, क्लिष्ट असते. अनेक उपवाक्ये (Clauses) असलेली लांब-लांब वाक्ये, अतीशय उत्साहात उधळलेली (अक्षरशः आणि बर्‍याचदा अनावश्यक) विशेषणे या सर्व गुणांनी संपन्न असे भारतीयांचे आंग्लभाषेतील लिखाण म्हणजे भाषांतरकर्त्याची कसोटीच असते. त्या मानाने इंग्लिश व अमेरिकन लेखकांचे आंग्लभाषेतील लिखाण अवडंबररहित असते. त्यामुळे माझे भाषांतरही कांहीं लोकांना अवजड वाटत असेल. तरी मी माझे भाषांतर शक्य तितके सोपे करण्याचा प्रयत्न करत असतो!
___________
जकार्तावाले काळे

व्याख्या

--अनेक उपवाक्ये (Clauses) असलेली लांब-लांब वाक्ये, अतीशय उत्साहात उधळलेली (अक्षरशः आणि बर्‍याचदा अनावश्यक)

सहमत.

व्याख्या वगैरे पण विचारतात. २ दिवसांपुर्वी मला एका सद्गृहस्थाने शिव्या म्हणजे काय ह्याची व्याख्या विचारली होती. मान्य आहे की असे विचारणे म्हणजे विचारवंताची खूण असते. ते कोणतीही गोष्ट सामान्यपणे घेत नाहीत.

 
^ वर