ईश्वराची करणी अगाध!
(मागच्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील विपरीत सामाजिक परिस्थितीतही स्वेच्छेने निवडलेले समाजकार्य शेवटपर्यंत एकाकी अवस्थेत नेणार्या काही मूठभर व्यक्तींत 'समाजस्वास्थ्य' हे मासिक चालविणारे र. धों. कर्वे यांचे नाव सर्वात वरचे असेल. 26 वर्षे चाललेल्या या मासिकातील काही निवडक लेखांचा संग्रह पद्मगंधा प्रकाशनानी अलिकडेच प्रसिद्ध केला आहे.
रधोंची वैचारिक बैठक, समाजसुधारणेविषयीची कळकळ, त्यांच्या तल्लख बुद्धीचा आवाका, बहुश्रुतता, हजरजबाबीपणा इत्यादी गुणवैशिष्ट्ये निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. पुस्तकाच्या संपादकांनी ईश्वरवादाविषयी निवडलेल्या लेखातील काही भाग उपक्रमींचा वैचारिक खाद्य (कडू वा गोड) होऊ शकेल! त्यांनी त्या काळी मांडलेले विचार वेगळ्या स्वरूपात अजूनही मांडावे लागतात यावरूनच आपला समाज कितपत ' विवेकी ' झाला आहे याचा नक्कीच अंदाज येईल! )
दयाळू आणि सर्वशक्तिमान असा एकच परमेश्वर मानल्याने अनेक अडचणी उत्पन्न होतात. ईश्वराच्या अंगी सर्व उत्तम गुण असले पाहिजेत आणि त्याची शक्तीही प्रचंड असली पाहिजे, अशा दोन वेगवेगळ्या कल्पना मनात आल्या; पण त्या एकत्र करताना, त्यांचा मेळ बसत नाही हे कोणी पाहिले नाही आणि तो न बसल्यामुळेच ईश्वराची करणी अगाध झाली!
मेळ बसत नाही या गोष्टीकडे एकदा डोळेझाक केली, की मनुष्य ईश्वरासंबंधी पाहिजे ते बकण्यास मोकळा होतो आणि धार्मिक लोकांना तर मान तुकवणे भागच पडते. उदाहरणार्थ 'चित्रमय जगत' मध्ये 'ईश्वर आहे काय?' या विषयावर एका लेखकाने पुढील विधाने केलेली आहेत:
- ईश्वर आहे.
- ईश्वर व आत्मा एकच आहेत.
- ईश्वर आनंदस्वरूपी असून विश्वव्यापी आहे.
- ईश्वर स्वर्गादिक कोणत्याही विशिष्ट स्थळी राहत नाही.
- प्रत्येक भूतमात्र ईश्वराचा अवतार आहे. ह्या अर्थाखेरीज कोणत्याही अर्थाने ईश्वर अवतार घेत नाही.
- ईश्वर प्राणीमात्राच्या पाप-पुण्याचा झाडा घेत नाही. कर्मतत्वाने ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ त्यास आपोआप मिळत असते.
- ईश्वराची भक्ती करता येत नाही; परंतु त्याच्या साक्षात्काराचा आनंद अनुभविता येतो.
- मंदबुद्धीच्या लोकांनी अव्यक्त ईश्वराच्या साक्षात्काराकडे जाण्याकरता म्हणून काल्पनिक सगुण ईश्वराची उपासना केल्यास चुकीचे नाही, परंतु तो एक केवळ टप्पा आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
- अपरोक्ष अनुभवाखेरीज ईश्वराचे अस्तित्व कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही.
- अपरोक्ष अनुभव येईपर्यंत तर्कशुद्ध श्रद्धेने साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही
या बकण्याचा काही अर्थ होतो, असे आम्हास वाटत नाही.
- ईश्वर व आत्मा दोन्हीही काल्पनिक आहेत; पण हे दोन्ही एकच याचा अर्थ काय?
- ईश्वर आनंदस्वरूपी आहे याचा अर्थ काय? आनंद हे जर ईश्वराचे स्वरूप असेल, तर आनंद विश्वव्यापी कसा असू शकतो? दु:खी मनुष्यदेखील आनंदीच असतो काय? ही दु:खी मनुष्याची चेष्टा आहे. भुकेलेल्याला सांगावे 'अरे, तुला भूक लागलेली नाही, तुझे पोट भरलेलेच आहे', तसे हे आहे.
- कर्मतत्त्वाने कर्माचे फळ मिळत असते, याचा अर्थ इतकाच होतो की ईश्वर कोणत्याही गोष्टीत ढवळाढवळ करीत नाही. मग ईश्वर मानायचा का?
- साक्षात्कार म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणे किंवा कोणत्याही इंद्रियाचे द्वारा अनुभव मिळणे, केवळ मनात कल्पना येणे याला साक्षात्कार म्हणता येणार नाही. मग तो अनुभव कसा मिळतो? तो मिळतो याला प्रमाण काय? की कोणीही साक्षात्कार झाला असे म्हटले की तो खरे मानावे? कोणीतरी म्हणतो हे प्रमाण पुरेसे नाही, मग तो मनुष्य कितीही विश्वासास पात्र असो; कारण तो भ्रम असण्याचा संभव असतो.
- ईश्वर निर्गुण असतो असेच या लेखकाचे म्हणणे आहे; परंतु सगुण ईश्वराची उपासना करणे चूक नाही असे ते सांगतात. ईश्वराला जर गुण नाहीत, तर ते कल्पिणे ही चूकच आहे, नाही कशी? चुकीची कल्पना टप्पा कसा काय होऊ शकतो? दक्षिणेकडे जाताना काही अंतर उत्तरेकडे जाणे हा कधीही टप्पा होणार नाही. त्याने खरी कल्पना येणे कठिणच होईल.
- पुरावा कशाला म्हणतात, याची या गृहस्थांना कल्पनाच नाही. म्हणूनच ते अपरोक्ष अनुभव येईपर्यंत साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास सांगतात. निदान ठेवण्यास हरकत नाही असे सांगतात. श्रद्धा कधीही तर्कशुद्ध असू शकत नाही. काही बाबतीत श्रद्धा ठेवणे कदाचित सोयीचे होईल, पण ते शास्त्रीय प्रमाण नव्हे. आणि हे साक्षात्कारी ब्रह्मवेत्त्ये ओळखले कसे? ते फसवीत नाहीत किंवा त्यांना भ्रम झाला नाही कशावरून? अमेरिका खंड पाहिले नसले तरी ते आहे असा आपण विश्वास ठेवतो; कारण ते नसताना आहे असे सांगण्यात कोणाचाही फायदा नसतो आणि अमेरिकेच्या अस्तित्वाची पाहिजे तितकी प्रमाणे व्यवहार दृष्ट्या मिळतात म्हणून आपण जरूर तर तशी श्रद्धा ठेवून वागतो. पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा म्हणणारे लोक श्रद्धा असल्याप्रमाणे कधीच वागत नाहीत. ते फक्त श्रद्धा ठेवा असे सांगतात आणि ईश्वर आहे या थापेवर आज कितितरी लोकांचे - भट, हरिदास, पुजारी, फसवे साधू, धार्मिक व्याख्याने देऊन झोळी फिरवणारे वगैरे लोकांचे - पोट भरते. तेव्हा त्यांचे म्हणणे खरे कसे मानावे? मनुष्य कितीही प्रामाणिक असला तरी त्याला भ्रम होणे शक्य असते आणि भ्रम याचा अर्थच हा, की तो भ्रम आहे हे त्याचे त्याला ओळखत नाही. तेव्हा हे साक्षात्कारवाले लोक प्रामाणिक असले तरीही या बाबतीत त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि वरील लेखकच म्हणतात, की याशिवाय त्याला दुसरा पुरावा नाही. एक स्वत:ला साक्षात्कार झाला पाहिजे किंवा दुसर्यावर विश्वास ठेवला पाहिजे!
- शास्त्रीय पद्धतीच्या विचारात एकट्याच्या मतावर कोणतीही गोष्ट खरी मानीत नाहीत. ती अनेकांनी प्रयोग करून खरी ठरावी लागते. साक्षात्कारवाल्या लोकांत एकमत कधीच होत नाही. प्रत्येकाचा साक्षात्कार वेगळा. तेव्हा शास्त्रीय मन:प्रवृत्तीच्या मनुष्याला त्यावर कधीही विश्वास ठेवता य़ेणार नाही. ज्याला साक्षात्कार झाला असे वाटेल, तो कदाचित ते खरे मानील आणि त्याला त्याबद्दल दोषही देता येणार नाही. वेड्याच्या इस्पितळातल्या एखाद्या मनुष्याला आपण अखिलब्रह्मांडनायक आहोत असे वाटले तर त्याला दोष देण्यात अर्थ नाही. एखादा उपासनीमहाराजही आपणाला अखिलब्रह्मांडनायक म्हणवून घेतो आणि बावळट लोक त्याचे नादीही लागतात; पण समंजस लोकांनी तसे करण्याचे कारण नाही. भ्रमिष्टांच्या बडबडीला किंवा आपमतलबी साधूच्या वटवटीला जर कोणी पुरावा समजू लागला, तर तो वेडाच्या सीमेवरच आहे. अशा लोकांना नेहमी वेड लागतेच असे नाही. कधीकधी ते जन्मभर तसेच अर्धवट राहतात, पण ती वेडाची पायरी आहे.
(पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत आपल्या मानगुटीवर बसलेले असल्यामुळे ते इतके सहजासहजी जाणार नाही, हे मात्र निश्चित!)
साभार: 'समाजस्वास्थ्य' मधील निवडक लेख, संपादक:अनंत देशमुख. पद्मगंधा प्रकाशन, पा. क्र. 256-257
Comments
मजेदार
पत्रलेखक स. वि. बर्वे हे ईश आपटे ह्यांचे आजोबा दिसतात.
मजकूर फारच मजेदार आहे. इतकी दशके उलटूनसुद्धा काही फरक पडलेला आहे असे वाटते नाही. नव्या शतकात बकणाऱ्यांची संख्या फक्त वाढली असावी. आणि बकणाऱ्यांजवळ नवीन माध्यमे, साधने आली आहेत.
अवांतर:
ईश्वराबद्दल हे धादांतवादी किंवा विवेकी लोक संकेतस्थळांवर काहीबाही बोलत असतात. ईश्वर (रजनीकान्तसारखा) इंटरनेट का डिलीट करत नाही?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ईश्वर
ह्यावरुन आठवले,
रिकी जर्वेस: "जर देव खरंच असेल तर त्याने मला नास्तिक का बनवले?" :)
काय फरक पडतो?
जोपर्यंत ती श्रद्धा इतरांना त्रासदायक(शारीरिक इजा वगैरे) ठरत नाही तोपर्यंत कोणी काही श्रद्धा ठेवल्याने काय फरक पडतो?
दुसऱ्या धाग्यात कलाम ह्यांचा संदर्भ घेऊन - कलाम ह्यांनी त्यांची वयक्तिक श्रद्धा ठेऊन देशाच्या प्रगतीसाठी काम केल्यास त्यांनी कोणती वयक्तिक श्रद्धा ठेवावी ह्यावर कोणाला आक्षेप असायचे कारण नसावे.
बाकी मानसिक इजा/त्रास झाल्यामुळे हा त्रागा होत असेल तर तो मान्य आहे.
आक्षेप
बरोबर. त्या वैयक्तिक श्रद्धेवरुन कुणी टोमणा मारल्यासही आक्षेप असायचे कारण नसावे.
आक्षेप नाही.
भावना दुखावली गेली, किंवा वेळ जात नाही..दोन्ही कारणांमुळे लेख लिहिला असेल तर त्याचे समर्थन आहेच.
श्रद्धाळू की 'गिर्हाईक'?
जोपर्यंत श्रद्धाळू हा 'गिर्हाईक' आणि श्रद्धा हे विक्रीचे (कसल्याही) विक्तीचे साधन होत नाही तोपर्यंत काही फरक पडत नसावा मात्र असे प्रत्यक्षात दिसते का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
देवाचे भूत
लेख अतिशय आवडला. समाजस्वास्थ्य मधील निवडक लेख हे पुस्तक मिळवायचा प्रयत्न करीन.
देवाचे भूत हा शब्दप्रयोग मजेदार आहे.
प्रमोद
थोडसं अवांतर...असंच, सहज
लोकप्रभेच्या या आठवड्यातल्या मुख्य लेखांपैकी हा लेख उपक्रमींनी वाचला का?
'लोकप्रभे'तील लेख
धन्यवाद!
छान पूरक लेख!
जोशीकाकांची ही प्रांजळ कबूली फार कमी लोकांना जमते:
माझ्या विचारामध्ये आमूलाग्र बदल होत होता. नव्हे माझा वैचारिक पुनर्जन्म होत होता. आजपर्यंत ज्या गोष्टी योग्य समजून चालत होतो, त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या याची मला जाणीव होत होती. वीस वष्रे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना आपण त्यांची फसवणूक करतोय असं वाटायचं. मात्र लोकांकडून मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून आलेलं देवपणाचा मनाला चटका लागला होता. त्यामुळे त्याची जाणीव होऊनही त्यातून बाहेर पडत नव्हतो. लोक अंधळेपणाने खोटय़ा गोष्टींवर विश्वास टाकत गेले आणि मी त्यांना फसवत गेलो. ती फसवणूक केवळ दुसऱ्यांचीच नव्हती तर ती स्वत:ची देखील होती, हे कळायला लागलं. काही ठोकताळ्यांचा आधार घेऊन, लोकांच्या भावनांशी खेळलो ही मनाला झालेली जाणीव छळत होती. खोटय़ा गोष्टींनाच खरं मानून आयुष्य जगत होतो. मला माझीच लाज वाटायला लागली.
चांगला दुवा
दुव्यावरील लेख वाचला. प्रामाणिक मनोगताचे उत्तम शब्दांकन. धन्यवाद.
उत्तम लेख
उत्तम लेख. शशिओककाका आणि हैय्योकाका अशी प्रांजळ कबुली कधी देऊन समाजप्रबोधनाचे काम सुरू करतील का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
+१
लेख फारंच प्रेरणादायी आहे विशेषतः ओक/हैय्यो सारख्यांसाठी. आशा आहे तेही एक दिवस ह्यातुन प्रेरणा घेतील.
धन्यवाद
आवडले. शंतनू अभ्यंकरांच्या आत्मकथनाचे स्मरण झाले.
अर्थात, ग. प्र. प्रधान/अँटनी फ्ल्यू ही उलट, दु:खद उदाहरणेही आहेतच.
प्रबोधन करणाराची अंधश्रद्धा
दुवा उत्तम आहे. छान लेख. प्रांजळ कबुली. फक्त एकच अडचण आहे. ती म्हणजे या समाजसुधारकावर काही अंधश्रद्ध लोकांचा पगडा अजूनही आहे/ किंवा नव्याने बसला आहे.
तुकाराम विठ्ठल नावाच्या काल्पनिक देवाला मानीत असे स्पष्ट उल्लेख आहेत, एवढेच नव्हे, तर त्याच्या रुपाचे "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" असे (जणू काही स्वत: पाहिलेच आहे असे) वर्णनही करीत.
गाडगेमहाराजांचे "गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा" हे देवावरील आंधळा विश्वास दाखवणारे भजन/ कीर्तन प्रसिद्ध आहे.
महात्मा फुले "निर्मीक" नावाची भंपक कल्पना वापरताना दिसतात.
डॉ. आंबेडकर बुद्धाच्या भ्रामक अध्यात्मावर तसेच ध्यानपद्धतीवर विश्वास ठेऊन होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी "धर्म" या अत्यंत धोकादायक कल्पनेला खतपाणी घालत आपल्याला मानणार्या अज्ञ मंडळींना नव्याने धार्मिक दीक्षा घ्यायला प्रवृत्त केले होते.
त्यामुळे सदर महाशयांच्या डोक्यातून अंधश्रद्धा पूर्णपणे गेलेली आहे असे अजूनही म्हणता येत नाही.
:-)
सत्यवचन !
लेख वाचला, आवडला हेवेसांनल.
फरक
विद्वान व समाजसुधारक यात फरक केला पाहिजे. ज्या समाजात बदल घडवुन आणायचा आहे त्याच्याशी तडजोड करण्यासाठी कमीपणा न मानणारे समाजसुधारक आणी तत्वनिष्ठ हस्तिदंती मनोर्यातील विद्वान यात फरक दिसणारच आहे
प्रकाश घाटपांडे
बरंबरं...
बरंबरं.... वरील महात्म्यांनी अंधश्रद्धाविरोधी विचारही मांडले आहेत. सदर महाशयांनी तुकोबा, गाडगेबाबा, फुले-आंबेडकर ह्यांचे वाङ्मय वाचून त्यातले अंधश्रद्धाविरोधी विचार त्यांनी घेतलेले असावेत.
अवांतर: बुद्धाचे भ्रामक अध्यात्म म्हणजे काय ते सांगितल्यास बरे होईल. एखादी वेगळी चर्चाही चालून जाईल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सोयीस्कर निवड
अंधश्रद्धा जोपासणार्यांनीच अंधश्रद्धाविरोधी विचार मांडले आहेत असे म्हणणे जरा चमत्कारिक वाटते. आणि "आत्मा" हा शब्दच बकवास असल्याने "महात्मा" शब्दही निरर्थक ठरतो. आपल्यासारख्या "सत्यसाईपणावर" टीका करणार्याकडून हा शब्दप्रयोग व्हावा याचे आश्चर्य वाटते. असो.
जर कलाम हे सत्यसाईबाबांना नमस्कार केल्याने "जोकर" ठरत असतील तर त्याच न्यायाने ही "महात्मा" मंडळीही ईश्वर-आत्मा इत्यादि बकवास करीत असल्याने "जोकर" ठरावीत, नाही का? एका बाजूला त्यांना महात्मा म्हणायचे, आणि दुसर्या बाजूला त्यांनीच मांडलेल्या विचारांना बकवास म्हणायचे ही काय रीत आहे? मग म्हणायचे, आम्ही त्यांची बकवास सोडून देतो, आणि त्यांचे "ग्राह्य" विचार तेवढे घेतो. असेच कलाम यांच्या बाबतीत का नाही? त्यांच्या काहीतरी गोष्टी/ विचार ग्राह्य असतीलच की नाही? मग त्या गोष्टी घ्यायच्या सोडून नेमका सत्यसाईबाबांसोबतचा फोटो टाकायचा. आणि सत्यसाईबाबांसोबत त्यांनाही (कारण नसताना) झोडायचे. चांगला विवेकवाद आहे. ज्या न्यायाने कलाम यांना झोडताय, तोच न्याय या (तुमच्याच शब्दांत) महात्म्यांनापण लावा ना. जे जे देवाला मानतात, अध्यात्माला मानतात, ते ते सर्व लोक, त्यांचे विचार सगळेच अग्राह्य धरा. पुन्हा त्यांना महात्मा कशाला म्हणताय?
खाली रिटेंनी उत्तर दिलेले आहेच. अध्यात्म हेच मुळात भ्रामक असल्याने बुद्धाचे अध्यात्म भ्रामक म्हणणे ही द्विरुक्ती आहे खरी. बाकी अध्यात्म भ्रामक असते यावर वेगळी चर्चा करण्याची काय गरज? उपक्रम असल्या चर्चांनी भरलेले आहे.
कालानुरूप
कलाम यांना ज्यान 'उपलब्ध' असूनही नाकारले आहे, तुकोबांना आधुनिक ज्ञान मिळाले असते तर?
अन्यथा, इतिहासातील अनेकांची मते आज हास्यास्पद आहेतच!
कलाम यांचे सत्यसाईबाबाप्रेम (==अविरोध) हे उंटाच्या पाठीवरील 'केवळ एक बोचके' आहे, संपूर्ण ओझे नव्हे.
मुळात
मुळात बुद्धाने आत्मा, देव ह्या गोष्टीच नाकारल्या आहेत हे तुम्हाला माहीत असण्याची थोडीफार शक्यता आहे हे गृहीत धरून तुम्हाला युक्तिवादाची संधी दिली होती. पण असो... ह्या गोष्टी नंतर आल्या बौद्ध धर्मात.
चमत्कारिक काही नाही. पटेल ते घ्यावे. जे पटत नाही ते सोडून द्यावे किंवा टीका करावी. वेळ असल्यास किंवा तेवढी ताकद असल्यास.
सत्यसाईबाबांना नमस्कार केल्याने कलाम जोकर ठरतात असे मी म्हटलेले नाही. साईबाबा हे फ्रॉड आहेत आणि कलाम हे जोकर असे रिटे ह्यांचे म्हणणे आहे. कलाम हे जोकर नाहीत. पण माझे मत चिंतातुर जंतू ह्यांच्या मताशी बरेचसे जुळणारे आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भंपकपणा
चिंजंचे मत काय आहे? कलाम हे भंपक आहेत असे? या जगात कोण भंपक नाही. एक वेगळी चर्चाच सुरू करूया. उपक्रमींच्या भंपकपणापासून महात्म्यांच्या, महामहोपाध्यायांच्या, भारतरत्नांच्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या भंपकपणाबद्दल. कुणीही सुटेल असे वाटत नाही. असे असताना "कलामांचा भंपकपणा" हा दम नसलेला मुद्दा उठवलाच कसा जातो बरे? त्याचे प्रयोजन काय असते? भंपकपणाच्या बुरख्याआडून जोकरपणा सिद्ध करता येतो का हे पाहणे तर नव्हे?
बाकी चालू द्या.
आव आणणे
ह्या बाबतीत मी चिंजंशी सहमत आहे. एखाद्या विषयात वकूब नसतानही आत्मविश्वासाने बॅटिंग करायला हिंमत लागते किंवा .... असो. (आणखी एक उदाहरण रामदेवबाबा) शिवाय ते ज्या कविता ऐकवतात किंवा प्रतिज्ञा वदवून घेतात त्याही मजेदार वाटतात. पण म्हणून त्यांनी ते थांबवावे असे वाटले नाही. काही जणांना प्रेरणा मिळते आहे ना काही चांगले करायची. तेवढेच बरे. (असेच काहीसे रामदेवबाबांबाबत. योगासने शिकवा. पण हे उगाच नको त्या विषयावर, ज्यातले तुम्हाला फारसे कळत नाही एवढे कळण्याइतपत अक्कल लोकांना आहे, भाष्ये कशाला?)
कलाम हे भंपक आहेत किंवा नाहीत ह्यावर काहीही बोलण्यापूर्वी मुळात आधी भंपक ह्या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. भंपक म्हणजे उचल्या, आगापिछा नसलेला मनुष्य. किंवा गावंढळ. (शब्दकोशानुसार). आता ह्यापैकी कुठल्या अर्थात कलाम फिट बसतात हे बघायला अधिक अभ्यास करायला हवा.
भंपक ह्या शब्दाची व्याप्ती निश्चित करून अशी चर्चा झाल्यास उत्तमच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आव आणणे
कलाम कुठे फिट बसतात ते माहित नाही पण फिट्ट बसवायचे झाल्यास उपक्रमींकडे उदाहरणांची वानवा नसेल इतके मात्र खरे.
भंपक या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ माहित नाही पण तो नसलेला आव आणणे, आपल्याला प्रत्येक विषयात खूप काही कळते असे दाखवणे असा असावा असे मला वाटते. किंवा फाइव स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण इथले रोजचे गिर्हाईक आहोत असे दाखवणारा रंगीला मधला मुन्ना मला भंपक वाटतो.
अवांतरः अशाच प्रकारे आधुनिकोत्तरवादावरील चर्चा काहीजणांना भंपक वाटल्याचे या निमित्ताने आठवले. असो.
निषेध
भेदनीतीचा निषेध :D (स्पष्ट खुलासा: मला चर्चा भंपक वाटली नव्हती.)
भंपक
'ऑल स्टाइल नो सबस्टन्स' अशी भंपकपणाची मी व्याख्या करतो. कलामांचे बरेच लेखन ह्या व्याख्येत बसणारे आहे असे वाटते.
श्री धम्मकलाडू यांना प्रतिसाद
आम्हाला काहीतरी माहीत असण्याची (थोडीफार) शक्यता गृहीत धरलीत हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. आम्ही आपण मोठेपणाने देऊ केलेली संधी दवडली हा आमचा करंटेपणा. काय करावे. असो.
तुकारामाच्या रांगेत बुद्धाला आपण बसवत नाहीसे दिसते. बाकीच्यांना सोडले आणि बुद्धाला धरून आम्हाला युक्तिवादाची संधी देऊ केलीत म्हणून विचारतो. तुकाराम ईश्वर मानणारे आणि बुद्ध (आपल्या भाषेत) ‘नाकारणारा’. माझ्या माहितीनुसार बुद्धाने ईश्वर आणि आत्मा या विषयांवर मौन बाळगले होते. त्याला हे नाकारायचे होते तर सरळ “नाही” म्हणायला त्याला कुणाची पाबंदी नव्हती. अध्यात्माची सबजेक्टिव्हिटी, सापेक्षता जाणूनच बुद्धाने मौन बाळगले असावे असे आमच्या अल्पमतीला वाटते. ईश्वर आणि आत्मा सोडा. बुद्धाने अध्यात्म नाकारले होते असे म्हणायचे आहे काय? बुद्ध जडवादी होता काय? प्रतीत्यसमुत्पाद ही पुनर्जन्माला विशद करणारी संकल्पना बुद्धाने मांडलेली नाही काय? “निर्वाण” ही कल्पना बुद्धाने मांडलेली नाही काय? की या कल्पना “नंतर” आल्या बौद्ध धर्मात? या अवांतराचे कारण एवढेच, की आपण बुद्धाला इतर आध्यात्मिकांपासून वेगळे काढलेत. बाकी तो “महात्मा” शब्द शोभत नाही ब्वॉ आपल्या प्रगल्भ लेखनात.
हा “वेळ असल्यास” क्लॉज ठीक आहे. “ताकत असल्यास” म्हणजे काय? हे आव्हान म्हणायचे की डिवचणे की तुच्छता? फार ज्ञानी दिसता. आम्हाला जेवढा पगार मिळतो आणि आमचे जेवढे वाचन आहे तेवढेच आम्ही बोलतो. कुणी आमची ताकत वगैरे काढल्यास आम्ही वेळ घालवत बसत नाही. "आमची ताकत नाही" म्हणून मोकळे होतो.
ठीक आहे. सोयीस्करपणाचा अजून एक नमुना. रिटे जे बोलले ते आपल्याला मान्य नाही म्हणा ना. फोटो आपणच टाकला ना तो? असो.
द्विरूक्ती!
गोयंकांचे अध्यात्म आणि ध्यानपद्धत भ्रामक नाही का? अध्यात्म आणि ध्यान या शब्दांसोबत पुन्हा भ्रामक हा शब्द कशाला?
कन्सिस्टन्सी
आपल्या विचारांमधील सातत्याचे कौतुक वाटते. १०० पैकी १०० मार्क. बरोबर पकडले आहे. अध्यात्म/ ध्यान - कुणी का सांगेना; भ्रामकच ते. द्विरुक्ती आहे. बरोबर. तुकोबांनी सांगितले तरी भ्रामकच, बुद्धाने सांगितले तरी भ्रामकच, आणि गोयंका गुरुजींनी सांगितले तरी भ्रामकच. या मंडळींच्या विचारांतले सोयीस्कर ते घ्यायचे, बाकीचे टाकून द्यायचे असला दुटप्पीपणा आपण करत नाही. अभिनंदन.
खुलासा
"नवससायासे पुत्र होती ..." किंवा, "भले तरी देऊ ..." या विधानांत काही अध्यात्म नाही, ती सोयिस्कर असल्यामुळे आवडतातच!
सहमत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धम्मकलाडू यांच्या प्रतिसादाशी सहमत.
"उत्तम लेख. शशिओककाका आणि हैय्योकाका अशी प्रांजळ कबुली कधी देऊन समाजप्रबोधनाचे काम सुरू करतील का?"
.
वा! वा! अगदी मनातले (माझ्या) लिहिले.हे दोघे (+नागशक्ती) या सत्कार्याला कधी प्रारंभ करतात या प्रतीक्षेत आहे.
उत्तम भाष्य
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रभाकर नानावटी यांचे लेख नेहमीच मनःपूर्वक कळकळीने लिहिलेले असतात.
प्रस्तुत लेखात स.वि.बर्वे यांच्या पत्रांतील मुद्द्यांवर श्री. नानावटी यांनी केलेले तर्कशुद्ध भाष्य कोणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावे असे आहे.
दुरुस्ती
ते भाष्य कर्वे यांनी स्वतःच केलेले आहे.
गोंधळ
यनांचा गोंधळ होणे साहजिक वाटते.
असे लेख लिहिताना इतर व्यक्तींचे भाष्य वेगळ्या रंगात किंवा तिरक्या अक्षरांत दिले आणि तशी सूचना लेखात दिली तर फरक कळून येईल असे वाटते. फक्त बटबटीत रंग नकोत. ;-)