पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत

मन उद्विग्न झाले आहे. असणारे काम, मिळणारे वेतन, कामाचे समाधान याबाबत फारशा काही तक्रारी नाहित. परंतु लोकांच्या विचारधारा, जगाच्या जाऊ देत (निदान सध्या तरी) पण जवळच्या माणसांची बंद असलेली विचारांची झापडे अनुभवास आली की जीवाची नुस्ती काहिली होते. आज आजूबाजूला विचार करणारे कुणी दिसतच नाही. हा आपल्या मनोवृत्तीचा तर दोष नाही ना. असेही स्वतःला विचारून बघितले. पण नाही. जगाला विचार न करता मुर्खपणाच्या सुरक्षिततेतच जगायला आवडतांना दिसत आहे. देवाचे अस्तित्व नाकारायचे ठरवल्यावर स्वतःवरचा विश्वास शतपटींनी वाढवायला हवा. किंबहूना असा आत्मविश्वास वाढल्यावरच पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत उतरू शकते. मग जगायचे कुणाच्या आशेवर. संकटकाळी बघायचे कुणाकडे. याचे उत्तर म्हणून आपण स्वतः उरतो. व अगदीच असहायतेच्या क्षणी आपली माणसे उरतात. अशावेळी आपल्या माणसांनी हिंमत द्यायला हवी. पण हे लोक जेव्हा आपल्या भल्यासाठी पून्हा देवाची करूणा भाकतात तेव्हा त्यांची कीव करावी की आपली हा प्रश्न पडतो. या आंधळ्यांना आत्मविश्वास कधी मिळेल. पूजा, व्रत, उपवास, नवस, भविष्य, वास्तूशास्र, भूत-प्रेत कल्पना यासारख्या गोष्टींचा हिरीरीने प्रचार करणा-या विद्वान (प्रश्नार्थक) लोकांना सामाजिक जबाबदारी अथवा प्रज्ञेला जाणवणा-या शरमेची काहीच जाणीव होत नसावी का. भविष्य ऐकायला येणारा हा किमान मुर्खाच्या नंदनवनात वावरत असतो पण भविष्य सांगणा-याला नक्की माहित असेते की हे जे की मी सांगतोय याची घटीतक्षमता अतिशय बेभरवशाची आहे. भविष्य सांगून झाल्यावर तो हे खरं ठरो व माझा धंदा वाढो यासाठी पून्हा प्रार्थना करत असतो. या प्रार्थनेतला फोलपणाही त्याला माहित असतोच. दूस-याचा फायदा घेणारी ही मनोवृत्ती सामाजिक संवेदनशीलतेत केव्हा बदलणार आहे. घरी महालक्ष्मीचे आगमन साजरे होते. का. तर नातू व्हावा म्हणून नवस केला होता म्हणे. म्हणजे हे कर्तृत्व गेलेच हातातून. पून्हा वर आईची श्रद्धा, वेड्या तुला समजत नाही जे काही चांगले होते ते यामूळेच. यावर विचार केला कुठेतरी जाऊन जीव द्यावा. आणि मग आईला म्हणाव बघ किती चांगले झाले ते. पण लगेच डोळ्यासमोर दृश्य आले. मी जीव देण्याच्या प्रयत्नात अयशस्वी होतो. आई दवाखान्यात म्हणते, बघ बाबा तुला विश्वास नाही. पण आज लक्ष्म्यांमूळे तुझा जीव वाचला. किंवा मी मरतोच आणि आई तिच्या सुनेला म्हणते, बाई काही दूःख करू नकोस. ऐन लक्ष्म्या बसल्या असतांना गेला. त्याला नक्की स्वर्ग मिळेल बघ.
या सगळ्या गराडयातून सुटका करण्यासाठी अवघं आयुष्यच या खुळ्या देवभोळेपणाला घालवण्यासाठी वाहून घ्यावं हे ठरवलं आहे. घरी पंचपक्वानांचा बेत असतांना मी घरी थांबलो नाही त्यामुळे माझी मनस्थिती ठिक आहे ना, अशा चौकशा करणारे एक महाभाग भेटलेच. आता याचीही सवय करून घ्यायला हवी. शेवटी नासलेले नारळ देवाला सगळे वाहणारे व चांगल्या खोबरेदार नारळाचा नखाएवढा तुकडा त्या दगडाजवळ ठेवणा-या श्रद्धाळू लोकांचे हे जग आहे. हे कदाचित बदलणारही नाही. कारण या व्यवस्थेवर पोटे भरणारे लोक विचारांना चालना मिळणार नाही यासाठी कायम कार्यरत असतात. पण मी स्वतः, वाटल्यास माझ्या अगदी जीवलग माणसांना सोडून, असलं आंधळेपणाचं, आत्मनाशाचं, दडपणाचं जीवन कदापिही जगणार नाही. आता भीती आहे ती स्वतःच्या प्रज्ञेची आणि श्रध्दा आहे ती फक्त मानवी मूल्यांवर. आता साथ फक्त दया दूःखितांची, द्वेष दांभिकांचा, प्रहार अप्पलपोटेपणावर आणि हार निर्भयतेच्या गळ्यात. माझ्या तथाकथित पुण्याईचा आणि पापांचाही मीच हिशेबनीस, मीच न्यायाधिश. कारण जे काही आहे ते माझ्याच कार्याची फळे असतील. चुकलो तर माफी मागायला दुसरी कडे जायला नको. गंगेत न्हाऊन, देवदर्शन घेऊन पापे धूतल्यावर पून्हा नवीन पापे करायला सिद्ध व्हायला नको. देवाच्या नावाने देणगी द्यायला नको. कारण करायचाच नाही कुठला भ्रष्टाचार की देवालाही लाच द्यावी लागेल. कमवायचं घामाचं आणि जगायचं स्वाभिमानानं.
माझं स्वच्छ, नितळ, हलकं मन.

bpositive78@gmail.com

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगले विचार

लेखांतील विचार चांगले व त्याप्रमाणे आचरण ठेवणार्‍याला सक्षम बनवणारे आहेत. मात्र ज्यांना या विचारांची भीति वाटते आणि जे कुठल्यातरी भ्रामक बाह्य शक्तीचा सतत आधार शोधत असतात त्यांचा राग किंवा उपहास न करता त्यांना वाटणारे भय समजून घ्यावे आणि आपल्या आचरणाने त्यांना धडा घालून द्यावा.

सहमत आहे

लेखातील विचार वा शरदरावांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच

असेच म्हणतो. हे वैफल्य, ही उद्विग्नता अनेकदा अनुभवली आहे, अनुभवतो आहे. तरीही अद्याप कुठे शरण जावे असे वाटले नाही, हे त्यातल्या त्यात बरे.
सन्जोप राव

"माझं स्वच्छ, नितळ, हलकं मन"

असा समारोप करून बरे केलेत.

सुरुवात आणि मध्य उद्विग्न क्लेशाने भरलेला होता, म्हणून वाईट वाटू लागले होते.

शुभेच्छा.

सहमत

लेख आवडला.

अजुन लेखन येउ द्या.

देवाचे भूत

मराठी असे आमुची मायबोली ***********************************
श्री.बाबासाहेब जगताप यांचे आत्मचिंतन वाचले.त्यांत थोडा निराशेचा सूर दिसतो. आज देशभर अंधश्रद्धांचा महापूर आला आहे.हा साथीचा रोग झपाट्याने पसरत आहे. अशा वेळी कोणाही संवेदनशील विवेकवादी व्यक्तीला नैराश्य येणे स्वाभाविक आहे.पण ते प्रयत्नपूर्वक दूर ठेवले पाहिजे.
ज्याला श्री.जगताप "पिढ्यान् पिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत" म्हणतात, तेच या अंधश्रद्धांचे प्रमुख कारण आणि हे भूत मानगुटीवर बसण्याचे कारण म्हणजे लहानपणी मनावर होणारे संस्कार. देवाच्या मूर्तीसमोर उभे करून "देवबाप्पाला नमो कर. तो तुला बुद्धी देईल. तोच सगळे करतो. तोच आपले रक्षण करतो. बाप्पाची मनोभावे प्रर्थना केलीस तर तुला यश मिळेल. नमो केले नाहीस तर तुला पाप लागेल..देव तुला शिक्षा करील. " असे सारखे ब्रेन वॉशिंग चालू असते. मोठी माणसे देवाचे भजनपूजन करताना, मागणे मागताना,नवस करताना लहान मूल पाहाते. त्या निर्जीव बाहुलीत काहीतरी शक्ती असली पाहिजे असे त्याला वाटते. लहानपणी झालेले हे संस्कार मेंदूच्या एक कप्प्यात कोरलेले राहातात. ते सहजी पुसता येत नाहीत. मोठेपणी तो श्रद्धाळू होतो. या श्रद्धेचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करून घेणारे धूर्त आणि लबाड लोक समाजात असतातच. ते बुवा, बाबा, बापू, स्वामी, आनंद, गुरू, महाराज, अशा विविध नांवांनी आपापली दुकाने चालवतात आणि या श्रद्धाळूंना गंडवतात. गंमत म्हणजे आपला बुवा तेव्हढा खरा, बाकीचे लबाड असे प्रत्येकाला वाटते.
पण आज ना उद्या हे सगळे संपेल. माणूस खर्‍या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करील. काळाच्या ओघांत अनेक लोकभ्रम नष्ट झाले आहेत. भुताखेतांवरचा विश्वास बर्‍याच प्रमाणात संपला आहे.
तेव्हा निराश न होता आपल्या हातून होईल तेव्हढे करीत राहायचे. डॉ. नरेन्द्र दाभोळकर, श्याम मानव आणि त्यांच्या संघटना यांचा अंधश्रद्धांविरुद्धचा लढा चालू आहे.हळू हळू जागृती होते आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रिचर्ड डॉकिन्स्,सॅम हॅरिस,ख्रिस्तोफर हिचिन्स असे अनेक बुद्धिवादी नास्तिकवादाचा हिरीरीने प्रचार करीत आहेत. विवेकवाद्यांची संख्या वाढत आहे. तेव्हा नैराश्य नको.

लेख आवडला... असाच प्रतिसाददेखील

लेख आवडला... असाच हा प्रतिसाददेखील.
श्री. यनावाला यांचा प्रतिसाद वाचून २ जुने प्रश्न उसळी घेऊन वर आले
१. माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला विज्ञान आणि देव या दोन्हि संकल्पनांबद्दल काहिच शिकवले नाहि तर तो कशाला प्रमाण मानेल? कारण माणसाने जसजशी वैज्ञानिक प्रगती केली आहे त्याच वेगाने त्याने नवेनवे देव शोधले आहेत. कधी अग्नीला देव मानले तर कधी पुस्तकाला, कधी व्यजक्तीला तर कधी दगडाला... तेव्हा तो विज्ञानवादी होत गेला का दैववादी?

२. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतवर? अनेक गोष्टींमधे तो सश्रद्ध भक्ताला आधार देताना रंगवला जातो .. मात्र अश्या गोष्टींद्वारे ती गोष्ट सांगणारा ती गोष्ट ऐकणार्‍याच्या मनात देवाबद्दल श्रद्धा निर्माण करत असतो का (त्याच्या असामान्य शक्तीबद्दल) भीती?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मूलभूत प्रश्न

काही चार अगदी मूलभूत प्रश्न जे विचारी माणसाला पडू शकतात यातलाच तुमचा एक प्रश्न आहे आणि तुम्हीच म्हटल्याप्रमाणे या प्रश्नाचा विचार करकरून आणि उत्तर मिळवण्याच्या तगमगीनं एवढा त्रास होतो की आत्महत्या करण्याच्या इराद्यापर्यंत विचार येऊन ठेपतात. आणि मग लक्षात येतं की त्यानंही उत्तर मिळणार नाहीच . त्यामुळे तर तगमग, उद्विग्नता अजूनच वाढते. हे सारं अगदी असह्य होऊन जातं.

... असलं आंधळेपणाचं, आत्मनाशाचं, दडपणाचं जीवन कदापिही जगणार नाही. आता भीती आहे ती स्वतःच्या प्रज्ञेची आणि श्रध्दा आहे ती फक्त मानवी मूल्यांवर.
तुम्ही घेतलेला हा निर्णय शंभर टक्के योग्य निर्णय आहे. भविष्यात कित्येक प्रसंग येतील, कित्येक ज्ञानी, विज्ञानी लोक भेटतील , चर्चा-वाद-विवाद अगदी हमरी तुमरी पर्यंत होतील. तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही बुध्दीवादाची कास धरली आहे आणि बुध्दीवाद हा कायम जाळतच जाणारा असतो. तो सोडू नका. याला जोड प्रज्ञेची द्या. तत्वज्ञानात तुमच्या प्रश्नांची उत्तरं सापडण्याची शक्यता खूप असते त्यामुळे तुमच्या विचारांना तत्वज्ञानाची जोड द्या. भगवद् गीता, बुध्द तत्वज्ञान, ओशो, झेन, कृष्णमूर्ती... तुमच्या प्रश्नांची उत्तरं कुठे सापडतील हे तुम्हालाच शोधावं लागेल. आणि कदाचित एवढं सारं पालथं घालूनही हाती काहीच गवसणार नाही, पण याचीही मानसिक तयारी ठेवा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

देवकल्पना

मराठी असे आमुची मायबोली
***********************************
श्री.ऋषीकेश यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.
१. माणूस निसर्गतः सश्रद्ध असतो का बुद्धीवादी?
२. देव हा श्रद्धेवर उभा आहे का भीतीवर?

....
उत्तरः
भीतीच्या भावनेमुळे आदिमानवाला देवाची कल्पना सुचली.भुकेची भीती ( अन्न मिळेल की नाही याची शंका.)साप,विंचू इ.ची भीती,जंगली श्वापदांची भीती,रोगाची भीती आणि सर्वांत मोठी मृत्यूची भीती.त्याकाळी माणसापाशी शिकारीची तसेच आत्मसंरक्षणाची साधने अगदी तुटपुंजी होती. कोणती तरी सर्व समर्थ अशी अदृश्य शक्ती आहे. ती हे सर्व धडवून आणते (अन्न मिळणे न मिळणे, साप चावणे त्यातून मरणे न मरणे, इ.) असे आदिमनवाला वाटले. त्यातून देवाची निर्मिती झाली. तेव्हा झालेले संस्कार पुढे पिढान् पिढ्या चालत आले.
...पालकांनी जर मुलांवर देवाविषयींचे संस्कार केले नाहीत तर समज आल्यावर अनेक मुलें बुद्धिवादी होतील. माझा वैयक्तिक अनुभव तसा आहे.
निसर्गतः माणूस बुद्धिवादी असतो असे मला वाटते.

पटले नाही

मला पकिस्तानची भीती वाटते. (भारतीयांना पाकिस्तान बद्दल चिड आहे. पण त्यापेक्षा भीती जास्त हे मात्र कोणीही मान्य करणार नाही. काही करायची हिम्मत नाही म्हणून पाकिस्तानला दुषणे देण्याशिवाय कोणी करणार मात्र काही नाही.) पण देव येऊन पाकिस्तानचा बंदोबस्त करणार नाही हे मला चांगलेच माहित आहे. भीती हा मुद्दा पटत नाही. अनाकलनीय म्हणा हवं तर!!
जाता जाता प्रश्नः पुस्तकांना लाथाडलेले अथवा तुडवलेले आपल्या पैकी किती जणांना पहावते? कितीजण पुस्तकाला पाय लागल्यास नमस्कार करतात?

काहीच्या काही!

काहीही लिहिले म्हणजे आम्ही ऐकुन घेऊ असे?
आरे छ्याट्!!
भविष्य ऐकायला येणारा हा किमान मुर्खाच्या नंदनवनात वावरत असतो
अच्छा? कसे काय कळले बॉ आपल्याला? भेट झाली की काय वनात?

पण भविष्य सांगणा-याला नक्की माहित असेते की हे जे की मी सांगतोय याची घटीतक्षमता अतिशय बेभरवशाची आहे.
असं कोण म्हणालं?
कशावरून?
तुम्ही स्वतः पण पाहता काय भविष्य?
काय अभ्यास आपला या विषयावर?
कोणत्या अधिकाराने ही विधाने म्हणे?

भविष्य सांगून झाल्यावर तो हे खरं ठरो व माझा धंदा वाढो यासाठी पून्हा प्रार्थना करत असतो.

तुम्ही करत असाल हो!
आम्हाला नाही करावे लागत असले काही! कारण मी लोकांना फुकटच सल्ला देतो! हा हा हा!!!

एकुणच देव या संकल्पने शिवाय माणूस अपूर्णच आहे. सामान्य माणसाला जितका देवाचा आधार वाततो तितका कोणाचाही वाटत नाही. अगदी त्या तथाकथित बुद्धीवाद्यांचाही, 'हे असे का'
यावर काही विचार का नाही सूचले मग?

आपला
गुंडोपंत

विनाकारण चीडचीड नको

आदरणीय गुंडोपंत,
तुमचा प्रतिसाद वाचला. मध्यंतरी काही कौटूंबिक अडचणींमुळे उपक्रमला भेट देऊ शकलो नाही म्हणून तुमच्याशी संवाद साधायला थोडासा उशीर झाला. असो. भविष्य ऐकण्यात रस असणा-या आणि विनाकर्तृत्व आपल्या पदरात कशी गोड फळे पडणार आहे ते ऐकूण खुश होणा-या किंवा कसल्या पापकर्माची फळे आपल्याला कशी भेटणार आहेत आणि देवदरबारी थोडीशी लाचखोरी त्याच्या दलालांमार्फत केली की पून्हा आपण लोकांच्या माना मोडायला मोकळे असा विचार करणा-या लोकांना मुर्खाच्यानंदनवनात वावरणारे म्हटलो तर तुमचा माथा खुपच भडकलेला दिसतो. भविष्य हा प्रकार खरच सत्याला धरून असेल तर त्याचा तुमच्या माझ्या सर्वांच्या कल्याणासाठी कुठे उपयोग होतोय का यावर चर्चा करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. आजपर्यंत जगात सांगितली गेलेली सर्व भविष्ये ही फक्त ढोबळ मानाने खरी ठरतांना दिसतात. या ढोबळ परिणामांचा भविष्यसमर्थक इतका गाजावाजा करतात की खोटी ठरलेली बाकीची सर्वच भविष्ये सोयीस्करपणे दूर्लक्षित केली जातात. भविष्य सांगण्याची पद्धत म्हणजे विविध क्लृप्त्या वापरून मनाला येईल ते मोघमपणे (हे मात्र आवश्यकच ) ठोकून देणे होय.

निश्चित सांगणारा कोणी च नाही. उदा. तुमचे आजचे भविष्य पहा. वरिष्ठांकडून कौतूक होईल. तरी मनात काहीशी अस्वस्थतता राहील. सायंकाळ पर्यंत वातावरण निवळेल. कुटुंबसौख्य लाभेल. असेच काही शेकड्यात नमुने तयार केले की झाले तुम्ही भविष्यवेत्ते.
आता देवाविषयी. तुमच्या आणि सर्वच श्रद्धाळू लोकांच्या भावभावनांचा मला पूर्णत आदर आहे.पण सर्वच विवेकी लोकांना शेवटी सगळ्या कर्तेनाकर्तेपणाला आपणच जबाबदार असू याची जाणीव ठेवायलाच हवी. देवावर गोष्टी सोडल्या तर हे पाप करतांना मला देव पाहिल ही भीती जशी ठेवता येते. तसे तोच सगळा कर्ताकरविता मी तर निमित्तमात्र असेही म्हणता येत. आणि देवाच्या नावावर चाललेला भूतांचा खेळ तुम्हाला पहावतोच कसा. आणि आपण सोडा सामान्य माणसे पण देवाला हे कसे पहावते.( असलाच तर).
असो. चुकभूल देणे घेणे. नविन वर्षाच्या शुभेच्छा.

काही मजकूर संपादित. वैयक्तिक स्वरुपाच्या टिप्पणीकरता खरडवही किंवा व्य. नि. सुविधेचा उपयोग करावा. - संपादन मंडळ.

 
^ वर