यंत्र आणि मानव
कल्पनागार-२ वरील रंगलेल्या चर्चेत मी खाली दिलेला प्रतिसाद दिला होता. हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल या श्री. सर्किट यांच्या मताशी मी सहमत आहे. म्हणून पूर्ण प्रतिसाद येथे पुन्हा उद्धृत करीत आहे.
आधी प्रश्न मांडतो - विज्ञानकथांमधून आणि विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटांमधून यंत्रे मानवावर राज्य करित असल्याच्या कथा कधी-कधी पुढे येतात. असे होणे खरोखरच शक्य आहे काय?
मानवी मेंदूत १ खर्व (१०० अब्ज) चेताकेंद्रे (न्यूरॉन्स्) असतात. एक चेताकेंद्र इतर हजारो चेताकेंद्रांशी जोडलेले असते. त्यांच्या आपांपासातील एकूण जोडण्या साधारणपणे १० निखर्व (१०००० अब्ज) इतक्या असतात. भौतिकशास्त्रातील मर्यादांचा विचार करता वालुक-तंत्रज्ञानाने (सिलिकॉन) कितीही प्रगती केली तरी मानवी शरीरीच्या सारख्या आकारामानात बसेल असा, मानवी मेंदूसदृश्य संगणक तयार करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, समजा एका सेकंदास ५० अब्ज सूचना पाळणारी चिप बनवली तर तीचे आकारमान (आईन्स्टीनच्या सिद्धांनुसार प्रकाशाच्या वेगाच्या मर्यादेमुळे) ०.६ मिलीमीटरचा घन इतके असावे लागेल. व्यावहारीकदृष्ट्या त्या आकाराच्या सूक्ष्म चिपमध्ये इतकी उष्णता निर्माण होईळ की ती सुरू केल्यावर क्षणार्धात वितळेल.
त्यामुळे यंत्रे कितीही प्रगत झाली तरी (जोवर मनुष्य विचार करणे बंद करणार नाही तोवर) ती मनुष्यांवर पुढल्या दोनशे वर्षातही कुरघोडी करू शकत नाही. इतर तंत्रज्ञाने, जसे क्वांटम् संगणन वगैरेत आश्चर्यजनक प्रगती झाली तर यात बदल होऊ शकेल. परंतू, सध्या त्या तंत्रज्ञानांची बाळबोध अवस्था पाहता त्यांच्या सहाय्याने, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी साधी उत्पादने बनायला किमान शतक जावे लागेल असे वाटते. कृत्रिम हि-यांचा वापर करून वेगवान चिप बनवण्याचेही प्रयत्न झाल्याचे ऐकतो. परंतू, सध्यातरी आजचे तंत्रज्ञान आणि नजीकच्या भविष्यातील दृष्टीने विचार करता ते व्यावहारिक दिसत नाही.
दुसरा भाग म्हणजे, जरी मानवी मेंदूसदृश्य संगणक तयार झाला तरी त्यांस मानवी उस्फुर्तता असेल का हा मोठाच प्रश्न आहे. प्रगतीसाठी तर्क आणि उस्फुर्तता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अजूनही मानसशास्त्रांत, मानवी प्रज्ञा नक्की काम कशी करते आणि त्यामुळे कविता किंवा प्रमेय, संगीत इत्यादी कोणतीही नवीन रचना नक्की कशी निर्माण होते हे नीटसे ज्ञात नाही. काही वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्हचा ज्या संगणकाने पराभव केला होता त्यात मागील १०० वर्षात खेळल्या गेलेल्या बुद्धीबळाच्या विश्वस्पर्धांची माहिती भरलेली होती. म्हणजेच, संगणकाने विचार न करता अज्ञानवश आकडेमोडीतून चाली बांधल्या. परंतू, बुद्धीबळाच्या बाहेर त्या संगणकातील कृतीक्रम अगदीच कुचकामी आहेत.
एकंदरीत, समजा पुढील दोनशे वर्षात प्रगती झालीही तरी मानवी मेंदूशी अतीसामान्य पातळीवर सुद्धा बरोबरी करणारा यंत्रमेंदू बनण्यास इतका खर्च येईल की आय-रोबोट सारखी व्यवस्था खरंच होईल की नाही ही शंकाच आहे. विज्ञानकथा या दृष्टीने चित्रपटात यंत्रांनी मानवांवर राज्य या गोष्टी दाखवू शकतात, पण त्याला सत्याचा आधार नाही आणि पुढील शंभर वर्षे तरी भीती नाही, :)
आपल्याला काय वाटते?
Comments
हे कळले नाही.
"पण ३ गिगाहर्ट्झ चे एकाच चिपेत असणारे ३२ संगणक मात्र दिलेले आहेत "
म्हणजे कसे?
जरा विस्तृत माहिती देउ शकाल का?
-निनाद
उत्तम
अनेक चिपा वापरूनच हा मेंदू बनवावा लागेल. समजा हजार संगणक एकाच चिपवर बसवले तरी दोन मजेशीर प्रश्न येतात -
१. एकाच चिपवर बसवलेले हजार संगणक एकमेकांशी जाळ्याने जोडावे लागतील. मानवी मेंदूची जाळवीण संगणकीय शब्दांत सांगायचे तर तारकावीण पद्धतीत असते.
२. तारकावीण पद्धतीने चिपवर बसवलेले संगणक चिपच्या बाहेरील संगणकांशी कसे जोडणार? बहुधा त्यासाठी बहुवीण पद्धतच वापरावी लागेल (जी इथरनेटमध्ये वापरतात). म्हणजेच,
२.१ एकतर सरसकट सगळेच संगणक बहुवीण पद्धतीने जोडल्या जातील, किंवा
२.२ चिपवरील संगणक एकमेकांशी तारकावीण पद्धतीने व चिपच्या बाहेरील संगणकांशी बहुवीण पद्धतीने जोडल्या जातील.
दुसरा प्रश्न विशेष महत्त्वाचा आहे. कृतिक्रमाच्या मर्यादांचे क्षितिज कदाचित जाळवीण कशा प्रकारे आहे यावरही असू शकते.
शैलेश
युयुत्सु, फिरकी तरंग...
'फिरकी तरंग' (स्पिन वेव्ह) तंत्रज्ञान - याबद्दल माहिती द्यावी.
तसेच प्रकाश किरणांच्या साहाय्याने जाळ्याचा वेग वाढवता येतो असे ऐकले - यावर आपले मत काय?
चुका करण्याची क्षमता.
संगणक चूक करू शकत नाही, पण मानवी मेंदू चूक करू शकतो ही गोष्ट Creativity ला शास्त्रशुद्ध रूप देणार्या Edward De Bono याने 'मानवी मेंदूला चुका करण्याची 'क्षमता' असते' अशा शब्दांत सांगितली आहे. (अशा चुकाच अनेक क्रांतिकारक शोध लागण्यास कारणीभूत झाल्याचे आढळून आले आहे.)
पुरावे
Edward De Bono यांच्या Serious Creativity पुस्तकांतील Sources of Creativity प्रकरणांत Chance, Accidents, Mistakes and Madness या परिच्छेदांत असे म्हंटले आहे की कल्पनांचा इतिहास हा नवीन कल्पना योगायोग, अपघात, चुका व वेडगळपणा यांतून कशा निर्माण झाल्या याबद्दलच्या उदाहरणांनी भरलेला आहे. कोणाच्या तरी चुकीमुळे नवीन शोध लागल्याची खालील उदाहरणे त्यांत दिली आहेत.
१) लुई पाश्चरच्या सहाय्यकाने प्रयोगासाठी घेतलेल्या कोंबड्यांना कॉलर्याच्या जंतूंचा चुकून ठरलेल्या डोसापेक्षा Weak Dose दिला. ती चूक सुधारण्यासाठी नंतर Strong Dose दिला पण त्याचा इच्छित परिणाम झाला नाही. त्यावरून इम्युनॉलॉजीच्या प्रक्रियेचा शोध लागला.
२) कोलंबस (पृथ्वी गोल आहे हे माहीत असल्यामुळे) पश्चिमेकडून भारताला यायला निघाला. त्यावेळी त्याने Ptolemy चे पृथ्वीच्या परीघाचे चुकीचे मोजमाप हिशेबांत घेतले. त्याऐवजी जर त्याने Ptolemy अगोदरच्या Eratosthenes ने दिलेले खरे मोजमाप घेतले असते तर तो सफरीवर निघालाच नसता. कारण जहाजांत खाण्यापिण्याची तेवढ्या अंतरासाठी तरतूद करणे शक्य नाही हे त्याच्या लक्षांत आले असते. या चुकीचा परिणाम अमेरिकेचा शोध लागण्यांत झाला.
३) संपूर्ण इलेक्ट्रॉनिक् उद्योग हा Lee de Forrest ने प्रयोग शाळेंतील एका निरीक्षणाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे उदयाला आला. (याबद्दलची तपशीलवार माहिती वरील संदर्भांत दिली आहे. तिचे सुलभ भाषांतर करणे अवघड आहे - निदान मला तरी. )
संगणक लटकतो!
माझा असा अनुभव आहे की जर संगणकाशी बुद्धीबळ खेळताना सुरुवातीला नेहमीच्या पारंपारिक चाली(उदा. राजाचे अथवा वजिराच्या पुढचे प्यादे,घोडे बाहेर काढणे वगैरे) न करता मनाला येईल तशा (उदा. हत्तीच्या पुढचे प्यादे किंवा असेच काही जरा हटके)चाली केल्या तर संगणक पुढची चाल करायला खूप वेळ घेतो. कधी कधी लटकतोही असा माझा स्वत:चा अनुभव आहे(इथे चांगल्या दर्जाचा बुद्धीबळाचा प्रोग्रॅम गृहित धरला आहे). म्हणजेच मानवी मेंदूची बरोबरी करायला अजून तरी त्याला शक्य नाही असे वाटते. खरे तर एखादा सांगकाम्या आणि संगणक ह्यांच्या बुद्धीची कदाचित बरोबरी होऊ शकेल.मात्र स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या व्यक्तीच्या मेंदूची तो बरोबरी करु शकेल असे आजमितीला तरी शक्य नाही.
जसे गणितात कच्च्या असलेल्या व्यक्तीला तेच गणित थोडेसे बदलून घातले तर तो जसा अडखळतो तद्वतच संगणक अडखळतो(काय सांगू पुर्षोत्तम!इथे पुरावा आहे!.....हरितात्या!)
माणूसही
माणसानेही अडखळणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने तो अडखळत नाही. संगणकालाही तुम्ही ०/१=अनंत असे सांगून टाका एकदाचे. मग तोही '०/१ आणी ०/२ ...एकच कसे?' या फंदात न पडता 'अनंत' हे 'एकमेव' उत्तर देऊ लागेल. ;)
भावना
चांगला विषय आहे, शैलेश. वर मांडलेले सर्व मुद्दे महत्वाचे आहेत. मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो.
यंत्रे कितीही प्रगत झाली तरी त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाल्याशिवाय ती माणसांवर कुरघोडी करणार नाहीत असे मला वाटते. किंवा त्याच्याही पलिकडे जाउन असे म्हणता येईल की त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव होण्याची (कॉन्शसनेस) आवश्यकता आहे. इथे आपल्याला मानसशास्त्र किंवा तत्वज्ञान यांची मदत घ्यावी लागते. अजूनही माणसामध्ये स्वत्वाची जाणीव येते म्हणजे नेमके काय होते हे समजलेले नाही. मॅट्रीक्स, टर्मिनेटर किंवा २००१ : स्पेस ओडीसी या सर्व कथांमध्ये या प्रश्नाचे उत्तर खुबीने टाळले आहे.
या संदर्भात प्रोफेसर नारळीकर यांचे गुरू फ्रेड हॉइल यांची द ब्लॅक क्लाउड ही कथा वाचण्यासाखी आहे.
राजेंद्र
टर्मिनेटर
टर्मिनेटर ३ - राइझ ऑफ द मशीन्स या चित्रपटात स्कायनेट हा महासंगणक तयार करण्यात येतो. त्याबद्दल 'अभिनयसम्राट' अर्नोल्ड श्वाट्झनेगरचा एक संवाद आहे, "स्कायनेट हॅज बिकम सेल्फ अवेअर."
अवांतर : टर्मिनेटर १ आणि २ ची सर ३ ला येत नाही.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
टर्मिनेटर
अवांतर : टर्मिनेटर १ आणि २ ची सर ३ ला येत नाही.
एकदम बरोबर बोललात...
मराठीत लिहा. वापरा.
इच्छा/आज्ञावल्या
राजेंद्र यांचे म्हणणे बरोबर आहे. भावना निर्माण झाल्याशिवाय इतरांवर राज्य करण्याची 'इच्छा' होणे शक्य नाही.
या यंत्रांची बुद्धिमत्ता म्हणजे मनुष्याने तयार केलेल्या आज्ञावल्याच असल्याने फारतर काही लोक प्रगत तंत्राच्या साहाय्याने इतर मनुष्यांवर राज्य करू शकतील. (ते आजही होत आहेच. असो.) आज्ञावल्या म्हणजेच यंत्रांची बुद्धिमत्ता असल्याने यंत्राचा वेग किंवा आकडेमोडी करण्याची क्षमता या गोष्टींनी काही फरक पडू नये. अतिशय शक्तीशाली यंत्राची आज्ञावली जर २+२ इतकेच करणारी असेल तर ते यंत्र तितकेच करेल. त्यामुळे स्वतःला हव्या तश्या आज्ञावल्या लिहू शकणारी आज्ञावली (?) तयार झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही असे वाटते.
२५ वर्षांपूर्वी
आज्ञायन लिहिणारे आज्ञायन, आज्ञायन तपासून सिद्ध करणारे आज्ञायन, या गोष्टी २५ वर्षांपूर्वीच, प्राथमिक अवस्थेत का होईना, चालू होत्या असे मला आठवते. माझा एक मित्र (जो पुढे समांतर प्रक्रियणातला एक गुरू बनला) त्या काळात "कृत्रिम बुद्धिमत्ते"च्या विषयात उत्साही असे त्याच्याकडून हे कळले होते.
नंतर माझा या क्षेत्राशी/मित्राशी फारसा संबंध/संपर्क राहिला नाही. त्यामुळे आतापर्यंत या क्षेत्रात आणखी काय काय विकास झाला आहे हे युयुत्सु किंवा अन्य तज्ज्ञांनी सांगितले तर बरे.
पण स्वयं-निर्णय घेण्यासाठी भावनेची आवश्यकता आहेच हे मात्र मला पटत नाही.
त्या जुन्या काळातही "शिकणारी यंत्रे" ही कल्पना अभ्यासात आली होतीच.
एक संकल्पना म्हणून प्रत्यक्ष संगणक न वापरता एका काडेपेटीत दोन रंगांचे मणी ठेवून त्याच्या सहाय्याने साधे खेळ खेळण्याचे यंत्र कसे बनवावे याविषयीचा तेव्हाचा लेख मी स्वतः वाचलेला आहे. अशा अनेक काडेपेट्या ठेवायच्या आणि प्रत्येक डावाच्या निकालाप्रमाणे त्यात्या वृक्षशाखेतील पेट्यांमधील काही पांढरे किंवा काळे मणी काढून टाकायचे व अशा रीतीने डाव जिंकण्याला अनुकूल अशी सांख्यिकी परिस्थिती काडेपेटीनिर्णययंत्रात निर्माण करायची अशी काहीतरी रीत त्यात वर्णिलेली होती.
(जाता जाता: इतकेच काय सार्वजनिककुंजीकूटीकरण या आताच्या हॉट विषयावर त्या काळीसुद्धा लिखाण होत असे.गंमत म्हणजे त्यावरील तेव्हाचा एक तपशीलवार लेख वाचून त्यावर आधारित आज्ञावली मी स्वतः लिहिली होती व माझ्या दुसर्या एका मित्राने बाजारात काहीशे रुपयांना खपवलीही होती. किती भाबडे होतो तेव्हा आम्ही! असल्या गोष्टींना आम्ही हौशी पातळीवरच्या समजायचो. आणि कालांतराने जगात त्यावर एवढा मोठा धंदा उभा राहिला.)
यावरून मला अंदाज करावासा वाटतो की आतापर्यंत सॉफ्टवेअर(प्रतिशब्द?)च्या या क्षेत्रात सततोद्योगी पाश्चात्यांनी निश्चितच खूप प्रगती केली असेल. हार्डवेअर(प्रतिशब्द?)मध्ये झालेली प्रगती तर सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे स्वयंचलित/स्वयंनिर्णयी यंत्रमानव आता वास्तवापासून दूर नाही असे मला वाटते.
आता हा जो काही भावनाशून्य सांख्यिकी निर्णय यंत्रमानव घेईल त्याला त्याचा स्वतःचा निर्णय म्हणायचे किंवा तो केवळ कोणीतरी लिहिलेल्या आज्ञावलीचे रँडमली (प्रतिशब्द?) पालन करतो आहे असा कीस काढण्यात फक्त स्वतःच्या मनाचे समाधान करून घेणे एवढाच लाभ होईल असे वाटते.
म्हणजे कदाचित् प्रत्यक्ष संगणक राज्य करू शकेल फक्त आपण तसे फार तर मानू नये एवढी मॅट्रिक्सी मुभा आपल्याला राहील अशी कल्पना मी करू शकतो.
या क्षणीच अशी परिस्थिती आहे की संगणकाने दिलेली माहिती सतत तपासून पाहण्याइतका वेळ आणि तितकी बुद्धी बहुतांश संबंधित माणसांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत अमुक निर्णय माणसाने घेतला आहे असे म्हणणे काहीसे धार्ष्ट्याच्चे होत नाही काय? त्याची स्वतःची अक्कलहुषारी त्यात कितपत आली?
- दिगम्भा
स्वयंनिर्णय
आपले म्हणणे बरोबर आहे. स्वयंनिर्णयासाठी भावनेची आवश्यकता असतेच असे नाही. आणि यावर आधारीत अनेक यंत्रे वापरात आहेत, जसे की विमानातील ऑटो-पायलट यंत्रणा.
इथे मुद्दा थोडा वेगळा आहे. यंत्रांची माणसांवर कुरघोडी. कुणावर कुरघोडी करण्याची इच्छा होणे यासाठी भावनेची आवश्यकता आहे असे मला वाटते. उदा. मॅट्रीक्स चित्रपटात एजंट आणि मॉर्फियसचा जो संवाद आहे, त्यात एजंटला मानवजातीबद्दल घॄणा असल्याचे दिसून येते. आणि ही एक भावना आहे. जर भावना नसतील तर यंत्रे कितीही प्रगत झाली तरी माणसांना इजा पोचवणार नाहीत. (इथे ऍझिमॉव्हच्या यंत्रमानवाचे तीन नियम आठवतात.)
मस्त चालू आहे.
शैलेशराव,
लेख छान आहे.प्रतिसाद ही वाचतो आहे.पण आम्ही यंत्र,तंत्र,चीप,विदा,डीप ब्लू ,हे आम्हाला कळत नाही. पण जी माहिती आहे ती अचंबीत करणारी नक्कीच आहे. ही प्रगती म्हणजे भावनाशुन्य मानवाची निर्मिती , असे वाटते आहे.
भावनाशून्य माणसाच्या कविता कशा असतील या विचारात गूंतून गेलेला.
भावनाशून्य मानव्!
'भावनाशून्य मानव' ही कल्पना 'भावनाशील संगणका' पेक्षा भयानक आहे. आपली वाटचाल त्याच दिशेने तर होत नाही आहे?
द्वैत-अद्वैत
दोने परस्परांना छेद देणारे विचार एकाच वेळी मनात आले... आणि सुखाने नांदतही आहेत. दोन्हीही थोडक्यात मांडतो.
(१) शक्य नाही हे पटत नाही.
(विशेषतः संगणक (चिप्स्) क्षमता वगैरे वाढीस खूप मर्यादा आहेत या संकुचित अर्थाने शक्य नाही हे विधान घेण्याची मुभा स्वतःहून घेऊन माझा विचार मांडला आहे. )
शक्य नाही हे आपले विधान खरे आहे ते आज आपल्याला ज्ञात असणार्या जगाबद्दल झाले. जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात्या काळी अस्तित्वात परंतु अज्ञानात असणार्या जगातून आलेली आहेत. द्विमितीय जगात अशक्य सुटणे अशक्य असणारी गाठ त्रिमितीय जगात गाठ मुळी राहतच नाही.
(२) राज्य करण्याइतपत संगणाकाची ताकद वाढणे निव्वळ अशक्य आहे हे पटण्यासारखे वाटते.
मानवी मेंदूच्या क्षमता आणि संगणाकाच्या क्षमता यामध्ये काही अगदी मूलभूत फरक आहेत. "त्या" फरकांचा परिणाम राज्यकर्ते आणि गुलाम या वर्गभेदास कारणीभूत होईल.
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणे -
अर्भकालाही अगदी थोड्या काळात माणसांच्या चेहर्यांची ओळख लागायला लागते. ते संगणकाला शिकविणे महाकठीण -- अशक्य नाही -- आहे. क्षणार्धात अंकाची सारणी करणे, बेरजा करणे एका विशिष्ट मर्यादेपलिकडे संगणकाचीच मक्तेदारी आहे... ते मानवाचे कामच नव्हे!
बुद्धिबळपटूंची ताकद पॅटर्न ओळखण्यामध्ये असते तर संगणकाची बहुतेकवेळा अनेक डाव माहित असण्यावर असते.
* अवांतर - संगणकांमध्ये स्वयंभू राज्य करण्याची क्षमता भले येवो वा न येवो... माणसे मात्र कळत नकळत, रडत खडत किंवा हसत खेळतही गुलामगिरी केव्हा स्वीकारून बसतील याचा भरवसा नाही.
बरोबर
* अवांतर - संगणकांमध्ये स्वयंभू राज्य करण्याची क्षमता भले येवो वा न येवो... माणसे मात्र कळत नकळत, रडत खडत किंवा हसत खेळतही गुलामगिरी केव्हा स्वीकारून बसतील याचा भरवसा नाही.
हे एकदम बरोबर बोललात.. त्यात आम्ही भारतीय तर सर्वात पुढे...
मराठीत लिहा. वापरा.
आभार
सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक आभार! चर्चा पुढे सुरू ठेवू या आणि जसा सुचेल तसा त्यात नवीन मुद्यांचा ऊहापोह करू या, :)
स्नेहांकित,
शैलेश