हे रामदेव नक्की कोण?

रामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत. भ्रामरी, कपालभाती, अनुलोम, विलोम आदी प्राणायमप्रकारांबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिके देत असत. हे योगशिक्षक नंतर हळूहळू इतिहासतज्ज्ञ झाले आणि इतिहासावरही बोलायला लागले.(गौरवशाली इतिहास ते ब्रिटिशांची गुलामगिरी वगैरे वगैरे...) कालांतराने ते भाषाशास्त्राचे किती गाढे अभ्यासक आहेत हे त्यांच्या भाषणातून कळू लागले. ( म्हणजे संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे वगैरे वगैरे...)

तसे ते सुरवातीपासूनच ऍलोपथीला विरोध करायचे. (म्हणजे हे रोग म्हणजे फार्मा कंपन्यांचे कटकारस्थान. प्राणायाम केल्याने सगळे रोग छूमंतर होतात वगैरे वगैर). ते अर्थशास्त्री झाल्याचेही हल्लीच निदर्शनास आले आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून अनेक उपाय सुचवत असतात. [म्हणजे काळे धन भारतात आणणे किती सोपे आहे आणि सरकारची इच्छाशक्तीच नाही. विदेशी (किंवा बहुराष्ट्रीय) कंपन्याची उत्पादने विकत घेऊ नका. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीयांना लुटताहेत वगैर वगैरे...]

कधी कधी वेळ मिळाला तर शिक्षणतज्ज्ञही असतात. (म्हणजे मॅकोलेपासून सुरवात...) ह्याशिवाय बाबाजी एक यशस्वी उद्योजकही आहेत. त्यांचे एक बिझनेस एम्पायरच आहे. पातंजली ह्या छापाखाली आयुर्वैदिक औषधांपासून, जामज्यूस ते सौंदर्यप्रसाधने अशी पातंजलीची प्रॉडक्ट रेंज आहे.

पातंजली उत्पादने
पातंजली उत्पादने

आयुर्वेदाचा, योगाभ्यासाचा ते प्रचार करीत असतातच. पण भारताला रोगमुक्त, सुदृढ करण्याचा वसा घेतलेल्या बाबाजींना आता राजकारणात शिरून भारताला अधिक समृद्धशाली, वैभवशाली करायचे वेध लागले आहेत.

असो. तर प्रश्न पडतो की बाबा योगशिक्षक आहेत, की भाषाशास्त्री आहेत, की अर्थशास्त्री आहेत, की शिक्षणतज्ज्ञ आहेत, की समाजसेवक आहेत की दुकानदार आहेत की राजकारणी? बाबा रामदेव आहेत तरी कोण? कुणी सांगेल का? (बाबांकडे तरी ह्या प्रश्नाचे उत्तर आहे काय?) उपक्रमी सांगतील अशी अपेक्षा आहे.

आणि असेच प्रश्न इतर बाबांबद्दल पडत असल्यास तेही सांगावे.

Comments

शास्त्रीय ?

अलोपाथी, प्रयोगाने केलेले निरिक्षण, यावर आधारित असल्याने ती जास्त शास्त्रीय आहे

शास्त्रीय म्हणजे खात्री असयला हवी , इथे तर हात वर् करणारे, जबाबदारी टाळणारेच अधीक आढळले (पैसे घ्यायला मात्र हात पुढे).

होमिओपथी किंवा आयुर्वेद

होमिओपथी किंवा आयुर्वेद हे केवळ अनुभव सिद्ध आहेत.

म्हणूनच ब्रीटनमधे डॉक्टर यांना वीचक्राफ्ट् म्हणतात.

वीचक्राफ्ट्

पण काही उपक्रमी त्यामुळे हाडे जुळुन येतात असे म्हणतात.

योग-आयुर्वेद्-ज्योतिष ह्यांकडे ह्या दृष्टीने पाहायचे असते

निदान आयुर्वेद अनुभव सिध्द आहे हे आपल्याला मान्य आहे हे ऐकून संतोष जाहला.
समजा १०० व्यक्ती आहेत ज्या स्वाईन फ्लू च्या विषाणूंच्या संपर्कात आल्या. त्यातील ज्यांची प्रतिकारक्षमता चांगली आहे अशा ८० जणांना रोगाची बाधा झाली नाही. उरलेल्या २० जणांना बाधा झाली. त्यातील ५ मृत्युमुखी पडले.
वरील उदाहरणातील जे ५ दुर्दैवी आहेत त्यांची जबाबदारी विज्ञानवादी योगायोगावर ढकलतात . बाधा होऊन जे वाचले असे १५ जण आमच्या अलोपेथीमुळे वाचले असे डॉक्टर समजतात. मग जे ५ मेले ते ही डॉक्टरांमुळे मेले असे ठरवून अलोपथीला दोष दिला पाहिजे.
योगायोग, जबाबदारी हवामान्,विषाणू,प्रतिकारक्षमता इ. ढकलणे हा विज्ञानाचा आवडता उद्योग आहे.
भारतीय विचार ती जबाबदारी त्याच ५ जणांवर टाकतो ज्यांच्या अशुभ कर्मांमुळे त्यांना मरावे लागले. व १५ जण जे बाधा होऊन ही वाचले ते त्यांच्या पुर्वजन्मातील शुभ कर्मांमुळे वाचले. अर्थात तुमच्या बर्‍या वाईटाची जबाबदारी तुमच्या वरच पडते.
ह्यालाच कर्मसिध्दान्त् म्हणतात , जो चार्वाकवाद्यांच्या समजण्याच्या पलीकडे आहे.
योग-आयुर्वेद्-ज्योतिष ह्यांकडे ह्या दृष्टीने पाहायचे असते.

बुद्धीजीवी

बुद्धीजीवींना कशातही चांगले दिसत नाही- उणीवा काढल्या की, आपल्याला ह्यातले काहीतरी जास्त कळले आहे असा आव आणता येतो.
मी आजवर जी काही कमाई केली आहे ती डोक्याचा वापर करूनच झाली असे समजत होतो. पण मी कोणाच्या उणीवाही काढल्या नाहीत की कसला आवही आणला नाही म्हणजे मी बुद्धीजीवीही नाही. मग "मी नक्की कोण?" असा नवा प्रश्न पडला आहे. तो सुटला तर रामदेव बाबा कोण यावर विचार करता येईल

प्रेफिक्स

ठिक आहे, "काही" असे प्रेफिक्स बुद्धीजीवींना लावावे

बायदवे

मागे कधीतरी रामदेवबाबांना "ठंडा मने टॉयलेट क्लिनर" असे म्हणताना पाहिले/ऐकले होते. कोणा उपक्रमीने कोकाकोला किंवा पेप्सीने आपले टॉयलेट/ कमोड धुवून पाहिले आहे काय?

तसे बाबा रामदेव यांच्या कपालभातीमुळे अनेकांना फायदा झाल्याचे ऐकले आहे. माझ्याकडे विसिडी आहे पण करून बघायला वेळ नाही. :-(

माहिती

अर्बन लीजंडसाठी स्नोप्स खूपच विश्वासार्ह आहे. येथे टॉयलेट क्लीनरविषयीच्या अफवेचा उल्लेख आहे.
शीतपेयांचा सामू फळांच्या रसापेक्षा फारसा कमी नसतो, उदा., फँटा आणि संत्र्याचा रस यांच्यात साधारण समानच आम्लता (आणि साखर) असते.

लिंबू

"लिंबाची शक्ती" असलेल्या डिटर्जंट आणि टॉयलेट क्लीनरच्या जाहिराती आम्ही नेहमी पाहतो ब्वॉ.

नितिन थत्ते

माहिती

बाबांविषयीच्या वादविवादांविषयीची माहिती अर्थातच येथे मिळेल.

रामदेवबाबा

भ्रष्टाचार करत नाहीत तोपर्यंत ठीक. किंवा त्यांच्या भ्रष्टाचाराचे सामान्य लोक शिकार होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे..बाकी या देशात भरपूर कलमाडी-राजावर्गीय रक्तपिपासू मच्छर लोक आहेत. त्यांचा नायनाट होईपर्यंत रामदेवबाबाकडे दुर्लक्ष करतो..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

रामदेव बाबा

मला वाटते रामदेवबाबा हा उद्योजक आहे. आणि राजकारणात येऊन तो पक्का राजकारणी बनू पाहतो आहे. उद्या त्याने त्याचे उमेदवार जिंकून येण्यांसाठी पैसे वाटले तर आश्चर्य वाटायचे काही कारण नाही. त्यावर त्याचे उत्तर आधीच तयार असेल की राजकारणात ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि हे जनतेच्या भल्यासाठीच तर आहे. अन्ना हजारे तेव्हा तुरुंगात असण्याची शक्यता जास्त आहे.

दु:ख

दु:ख हे आहे, की हा धागा विणला गेला तेव्हा मी इथे नव्हतो.

रोज इतके पेशंट बालाजी तांबे अन् रामदेव बाबाचे टीव्हीवरील/पेपरातील दाखले देऊन जीव खातात.. नशीब माझं, मी 'नेट् सॅव्ही' आहे.

 
^ वर