खासगी आणि सार्वजनिक/सरकारी : काही प्रश्न

अलिकडील काही क्रिकेट विषयक चर्चांमधे सचिन/धोनी आणि इतर खेळाडू खेळत असलेला संघ हा "भारत" देशाचा नसून , बीसीसीआय् चा आहे अशा स्वरूपाची विधाने झाली आणि त्याला सहमतीही मिळालेली दिसते.

या बाबतीत मी थोडा गोंधळलेला आहे. बीसीसीआय् ही संस्था निमसरकारी संस्था आहे असे मी मानत होतो. भारतातल्या शहराशहरामधल्या आणि राज्याराज्यामधल्या सर्व संघटनांची ही "आई"संस्था आहे. ठिकठिकाणच्या स्टेडीयम्सची मालकी स्थानिक संस्थांची. या सर्व संस्थांना आणि खुद्द बीसीसीआय ला मिळालेला महसूल यावरचा कर त्या त्या संस्था भरतात. या सर्व संस्थांच्या निवडणुका होतात. असा एकंदर मला माहिती असलेला भाग.

तर असे असेल तर कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यामधे (उदा. आयसीसी विश्वचषक २०११) जे संघ खेळतात ते त्यांच्या त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करतात या गृहितकाला धक्का कधीपासून बसला ? या न्यायाने ऑलिंपिक्स् मधे भाग घेणारे खेळाडूही सुरेश कलमाडीसारख्यांचे प्रतिनिधित्व करतात अशी विधाने ग्राह्य धरायची का ? नसल्यास का नाही ?

असो. या धाग्याचा उद्देश खरोखरच मला नवीन माहिती करून घेण्याचा आहे हे नमूद करतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

आश्चर्य

उपक्रमावर आलेल्या प्रतिसादांमुळे आणि सहमतीमुळे मलाही साधारण असाच प्रश्न पडला होता.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे संघ खेळतात ते आपली ओळख सर्वसामान्यांना संस्थेने (१ उदा. बीसीसीआय) न देता देशाच्या नावाने देतात. स्कोरबोर्डसही तसेच दाखवतात. इंडिया २६०/९, गुणांकन तक्त्यात जे संघ दिसतात तेही आपल्या देशांचीच नावे दाखवतात तर मग क्रिकेट संघ देशाचे प्रतिनिधित्व करत नाही हे कधीपासून झाले? इथे लोकांची (क्रिकेटप्रेमींची) फसवणूक होते आहे असे तर नाही?

बीसीसीआयनेच तसे सांगितले

सुमारे ८-१० वर्षांपूर्वी एका कोर्ट केसमध्ये बीसीसीआय ने असे प्रतिपादन केले होते असे स्मरते. दुवा सापडल्यास देईन.
माझ्या लहानपणी (१९७०-७५) इंग्लंडचा संघ एमसीसी चा संघ म्हणून भारतात येत असे. टाइम्स सारख्या वर्तमानपत्रात धावफलकावर "एमसीसी (पहिला डाव)" असा उल्लेख असे मात्र भारतीय संघाच्या बाबतीत "भारत" असाच उल्लेख असे.

नितिन थत्ते

दुवा खाली दिला आहे

बीसीसीआयने कोर्टात केलेल्या प्रतिपादनाच्या वृत्ताचा दुवा खाली दिला आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माहिती

बीसीसीआय् ही संस्था निमसरकारी संस्था आहे असे मी मानत होतो.

BCCI is a society, registered under the Tamil Nadu Societies Registration Act. It often uses government-owned stadiums across the country at a nominal annual rent. It is a "private club consortium". संदर्भ
क्ष्

प्रकाटाआ

प्रकाटाआ

दुवा

बीसीसीआयचे स्पष्टीकरण

दुवा

EVEN as the Government today backed Zee, supporting its stand that the Indian cricket board is a `State' within the meaning of Constitution, counsel for the Board of Control for Cricket in India (BCCI) said that players like Sachin Tendulkar, Sourav Ganguly and Rahul Dravid play for the official team of the Board and are not the official team of India.

"If India plays England, it is a match played by the official team of BCCI and not the official team of India," BCCI counsel and senior advocate, Mr K.K. Venugopal, said in the Supreme Court on Wednesday. He said that the activities of the board including the selection of the Indian team had nothing to do with the Government of India.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

मग

"If India plays England, it is a match played by the official team of BCCI and not the official team of India,"

मग भारतीय संघ कुठला असतो का? का असा काही प्रकारच नाही? बिसिसिआयच्या संस्थळावरील त्यांचा इतिहास एकदम औरंगजेब १७०७ साली गेला आणि १७२१ साली राजकीय बदल घडले वगैरे पासून सुरू आहे आणि मधे भरपूर लिहून झाल्यावर, "रेस्ट इज हिस्ट्री" म्हणत शब्द बापुडे... सिद्ध केले आहे. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

देश म्हणजे देशातली माणसे

मी या प्रश्नाचा विचार करताना 'देश म्हणजे देशातली माणसे' हे साधं तत्व वापरतो. क्रिकेट या खेळाबद्दल, भारताची टीम म्हणून आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या टीमबद्दल जनमानसांत आपुलकी आहे का? ती टीम जिंकावी या आशेने लोक मॅच बघतात का? ती टीम जिंकली तर देशव्यापी जल्लोष साजरा होतो का? शत्रुराष्ट्राच्या म्हणून आलेल्या टीमचा विजय झाल्यावर भारतातल्या कोणी फटाके वाजवले तर त्यावर टीका होते का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असल्यामुळे ही भारताची टीम. उगाच कुठच्या पुस्तकात काय लिहिलं आहे आणि टीमला पैसे कुठून मिळतात किंवा टॅक्स कुठच्या नावाखाली भरला जातो याच्याशी काय देणं घेणं आहे? त्या सर्व तांत्रिक बाबी झाल्या.

भारताच्या मातीत जन्मलेल्यांनी काही कामगिरी करून दाखवली तर आपल्याला कौतुक वाटतं. हा भारतीय असण्याचा भाग आहे. गेले कित्येक वर्षं अस्तित्वात असलेली क्रिकेट टीम ही भारतीय परंपरांचा भाग आहे. अशा परंपरांचा पाईक होण्याची आपण शपथ घेतो. त्यामुळे ती भारताची टीम. 'ऑफिशियल' आहे की नाही याला काय अर्थ आहे?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कारण आणि परिणाम

जिंकण्याची आशा, जल्लोष, फटाक्यांवर टीका, या सार्‍यांमागे मुळात आपुलकीची भावना असावी लागते. आमचे असे प्रतिपादन आहे की ते खेळाडू देशासाठी खेळत नाहीत, त्यांच्या विजयाला देशाचा विजय मानू नका. मुद्दा बेगडी राष्ट्रभावनेचा आहे.
झुंडीला भुलविणार्‍यांविषयी आपण तिरस्कार बाळगू नये काय?

भारताच्या मातीत जन्मलेल्यांनी काही कामगिरी करून दाखवली तर आपल्याला कौतुक वाटतं. हा भारतीय असण्याचा भाग आहे. गेले कित्येक वर्षं अस्तित्वात असलेली क्रिकेट टीम ही भारतीय परंपरांचा भाग आहे.

खुराणा, चंद्रशेखर, वेंकी, नायपॉल यांच्या नोबेल पारितोषिकांबद्दल भारतीयांनी भारतीय म्हणून जल्लोष केला असला तर तोही बिनडोकपणाच म्हणावा. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासाठी भारतीयांनी भारतीय म्हणून आनंद/दु:ख मानणेही बिनडोकच आहे.

आपुलकीची भावना

आमचे असे प्रतिपादन आहे की ते खेळाडू देशासाठी खेळत नाहीत, त्यांच्या विजयाला देशाचा विजय मानू नका.

आपुलकीची भावना ही दोहोंबाजूंनी असावी असे तर काही नाही. अन्यथा एकतर्फी प्रेमप्रकरणे इ. इ. अस्तित्वातच नसते. :-)

तुमची मुले तुमच्यावर प्रेम करत नाहीत म्हणून तुम्हीही त्यांच्यावर प्रेम करू नका हे वाक्य तांत्रिक दृष्ट्या योग्य असले तरी अनेकजण त्याला स्वीकारणार नाहीत आणि त्यांना स्वीकार न करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासाठी भारतीयांनी भारतीय म्हणून आनंद/दु:ख मानणेही बिनडोकच आहे.

मानवी भावना या अनेकदा बिनडोकच असतात किंवा डोके बाजूला ठेवून निर्माण झालेल्या असतात तेव्हा यात नवीन ते काय?

माझ्यामते एखाद्याला कल्पना चावला ही भारतीय, हरयाणवी असल्याबद्दल गर्व वगैरे वाटत असेल तर वाटू द्या. गर्व वाटल्याने तो आनंदी. त्याच्याकडे पाहून हसल्याने तुम्ही आनंदी. ;-) आनंदी आनंद गडे! सर्वांचे आरोग्य ठीक राहिल. ;-)

बाकी, बेगडी देशप्रेमाशी सहमत आहे.

गाडीमागे घोडा

'देशात व्यक्त होणारा जल्लोष होता कामा नये कारण ती आपली टीम नाही' असं तुम्ही म्हणत आहात.
'ज्याअर्थी जल्लोष होतो त्याअर्थी लोकांनी ती टीम आपली मानली आहे' असं मी म्हणतो आहे.

तुमच्या मते आपलेपणा कुठच्याशा निकषांनी आधी ठरतो व ते ठरवल्यानंतर त्या आपलेपणाचा परिपाक दाखवावा, दाखवायची परवानगी असावी.
माझ्या मते ज्या गोष्टींनी माणसांना, समाजाला एखाद्या संघाविषयी किंवा व्यक्तीविषयी वाटते त्या नेहेमीच कुठे लिहिलेल्या नसतात. संघ जिंकल्यानंतरचा मनापासून झालेला जल्लोष हा आपलेपणा मानल्याचा आविष्कार आहे. हा धूर दिसल्यावर आपलेपणाचा वह्नि आहे. वह्नि असताना धुराला आक्षेप घेऊन कसं चालेल?

बाकी बिनडोकपणाविषयी थोडं अधिक सविस्तर लिहावं ही विनंती. तुमच्या मते जगातले साधारण किती लोक बिनडोक असतात?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खुलासा

आपलेपणा आहे हे तर दिसतेच आहे. त्याला देशप्रेम ठरविणे चूक आहे इतकेच माझे मत आहे. याच न्यायाने, पाकिस्तानच्या विजयासाठी कोणी आवर्जून फटाके फोडत असेल तर तेही चूकच आहे. कोणते खेळाडू, संघ आवडावेत तो वैयक्तिक निर्णय असावा. विशिष्ट परंपरेचा अभिमान सर्वांनाच वाटला पाहिजे अशी लोकांची मागणी असेल तर मी त्या परंपरेचाच तिरस्कार करतो. माझा असाही संशय आहे की आज अनेक लोकांचे क्रिकेटप्रेम हे मला "परंपरेचा अभिमान वाटलाच पाहिजे" या कर्तव्यभावनेतून, पिअर प्रेशरमधून आहे.

बिनडोकपणाविषयी थोडं अधिक सविस्तर लिहावं ही विनंती. तुमच्या मते जगातले साधारण किती लोक बिनडोक असतात?

व्याख्येत समाविष्ट होणार्‍यांची संख्या अतिप्रचंड आहे इतक्याच कारणास्तव व्याख्येवर संशय घेण्यात येऊ नये असे मला वाटते.

A person is smart. People are dumb, panicky dangerous animals and you know it. Fifteen hundred years ago everybody knew the Earth was the center of the universe. Five hundred years ago, everybody knew the Earth was flat ... - Kay

विसंगती.

प्रतिसादातल्या पहिल्या चार वाक्यांत काही विसंगती ठासून भरलेल्या आहेत. कुठलाही संघ आवडण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य असेल तर पाकिस्तानच्या विजयासाठी फटाके फोडणं चूक कसं? तेही पाकिस्तानच्या संघाविषयीच्या आपलेपणाला पाकिस्तान देशाविषयीचं प्रेम ठरवणं चूक असं पहिल्या दोन वाक्यातच आलं असताना.

माझा असाही संशय आहे की आज अनेक लोकांचे क्रिकेटप्रेम हे मला "परंपरेचा अभिमान वाटलाच पाहिजे" या कर्तव्यभावनेतून, पिअर प्रेशरमधून आहे.

इतर पोरं क्रिकेट खेळताना तुम्ही ते हस्तिदंती मनोऱ्यातून बघत होतात का? हा दृष्टीकोन 'ग्राउंड रिआलिटी' नसल्यासारखा वाटतो म्हणून म्हटलं.

व्याख्येत समाविष्ट होणार्‍यांची संख्या अतिप्रचंड आहे इतक्याच कारणास्तव व्याख्येवर संशय घेण्यात येऊ नये असे मला वाटते.

संशय नाही घेतला. आपल्या व्याख्या वेगळ्या असाव्यात असं वाटल्यामुळे आपलं तुम्हाला विचारलं. मी ज्याला सामान्य मनुष्य म्हणतो (सुमारे ९५%) त्यांच्यासाठी तुम्ही बिनडोक हा शब्दप्रयोग वापरता आहात का, याची खात्री करायची होती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

संघ आवडण्याचं स्वातंत्र्य

पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणे* हे कोणताही संघ आवडण्याच्या स्वातंत्र्याशी इक्वेट केले जात आहे तसे ते नाही. याचे कारण भारत - इंग्लंड मॅचमध्ये इंग्लंड जिंकल्यावर भारतात फटाके वाजवले गेल्याची उदाहरणे नसावीत. भारत - इंग्लंड मॅचमध्ये भारत जिंकल्यावर इंग्लंडमध्ये फटाके उडवले जाण्याची उदाहरणे आहेत.

भारत श्रीलंका मॅचमध्ये भारत जिंकल्यावर जाफन्यात फटाके उडवल्याची उदाहरणे आहेत की नाही हे माहिती नाही.

*सदर घटना घडत असत असे येथील काही सदस्यांकडुन कन्फर्म केले गेले आहे.

नितिन थत्ते

खुलासा

कुठलाही संघ आवडण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य असेल तर पाकिस्तानच्या विजयासाठी फटाके फोडणं चूक कसं?

'आवर्जून' या शब्दाला मी (आवर्जून) अधोरेखित केले आहे. भेंडीबाजारात फोडले जाणारे फटाके खेळाडूंविषयीच्या प्रेमापोटी नसून खोडसाळपणाने/धार्मिक बांधिलकीमुळे फोडले जात असल्याचा आरोप मला निराधार वाटत नाही.

इतर पोरं क्रिकेट खेळताना तुम्ही ते हस्तिदंती मनोऱ्यातून बघत होतात का? हा दृष्टीकोन 'ग्राउंड रिआलिटी' नसल्यासारखा वाटतो म्हणून म्हटलं.

:)

थोडासा असहमत

"देश म्हणजे देशातील माणसे" या तत्त्वाशी सहमत आहे.

पण या तत्त्वाचे खाजगी संस्थांनी केलेल्या जाहिरातीशी सामान्यीकरण परमार्थाने करता येणार नाही. टाटा किंवा बजाज कंपनीने म्हटले "आपण भारताची कंपनी म्हणून भारतीयांनी विशेष आत्मीयतेने आमचा माल खरेदी करावा..." आता टाटा कंपनीच्या उज्ज्वल यशाबद्दल भारतीय म्हणून आनंद वाटेलसुद्धा. पण तरी जाहिरातीला भुलून, भारतीय अस्मितेलाच प्राथमिकता देऊन, मग मालाची चाचणी करायला कमी केली... असे होऊ नये.

शत्रुराष्ट्राच्या म्हणून आलेल्या टीमचा विजय झाल्यावर भारतातल्या कोणी फटाके वाजवले तर त्यावर टीका होते का?

शत्रुराष्ट्राची म्हणून आलेली टीम कुठली? जमल्यास आता चालू असलेल्या वर्ल्डकपचे उदाहरण घेऊया. जर शत्रुराष्ट्र नसते, तर ती टीम खेळायला गेलीच नसती, अशी कुठली टीम या मालिकेत उतरलेली आहे? कित्येक देशांत वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भात फटाके वाजवणार्‍यांना शत्रू ठरवण्याची जनरीत आहे. ही जनरीत जर दबाव म्हणून परिणामकारक असेल, तर घातक आणि निंदनीय आहे. कुठली टीम जिंकली तर फटाके उडवायचे की नाही हे स्वातंत्र्य व्यक्तीपाशी असलेच पाहिजे. त्या व्यक्तीविषयी दुखापत-न-होईल-असा-दु:स्वास करण्याचे सुद्धा आपणा सर्वांना स्वातंत्र्य आहे.

भारताच्या मातीत जन्मलेल्यांनी काही कामगिरी करून दाखवली तर आपल्याला कौतुक वाटतं.

सहमत. हे वाक्य निरीक्षित-तथ्य सांगते.

हा भारतीय असण्याचा भाग आहे.

नाही. भारताच्या राज्यघटनेत जितक्या काय अटी आहेत तेवढ्या पुरतात. जर त्या अटी पुर्‍या होत असून वरच्या अटीमुळे कोण्या एका व्यक्तीलासुद्धा भारतीयत्व नाकारले जात असेल तर ते अमान्य.

गेले कित्येक वर्षं अस्तित्वात असलेली क्रिकेट टीम ही भारतीय परंपरांचा भाग आहे.

सहमत. हे वाक्य निरीक्षित-तथ्य सांगते.

अशा परंपरांचा पाईक होण्याची आपण शपथ घेतो.

अशी कुठलीही शपथ मी घेतलेली नाही. कित्येक परंपरांबद्दल मला आत्मीयता आहे, हे जरी खरे असले, तरी शपथ-वगैरे काही घेतलेली नाही. म्हणूनच कित्येक नावडत्या परंपरांबद्दल आत्मीयता नसण्याचे स्वातंत्र्य मी स्वतःपाशी राखून ठेवलेले आहे. तुम्ही शपथ घेतली असेल तर ते तुमचे स्वातंत्र्य आहे, हे मान्य आहे. पण या शपथेच्या आधारावर माझे किंवा कोणाचेही भारतीयत्व दुय्यम लेखण्याचा विरोध आहे.

त्यामुळे ती भारताची टीम. 'ऑफिशियल' आहे की नाही याला काय अर्थ आहे?

"ऑफिशियल" नसली तर अन्य कुठली टीम या "देशातील माणसांना प्रिय" पदाला पोचू शकते. हा फरक आहे. पण सध्या एकच टीम आहे, म्हणून डीजूरे नाही तरी डीफॅक्टो पर्याय नाही. म्हणून तात्पुरता सहमत.

उगाच कुठच्या पुस्तकात काय लिहिलं आहे आणि टीमला पैसे कुठून मिळतात किंवा टॅक्स कुठच्या नावाखाली भरला जातो याच्याशी काय देणं घेणं आहे? त्या सर्व तांत्रिक बाबी झाल्या.

कायद्याच्या पुस्तकात लिहिले गेले असेल, त्याच्याशी आपले देणेघेणे आहे. टॅक्स कुठल्या नावाखाली भरला जातो, याच्याशी देणेघेणे आहे. जर भारत सरकारची टीम असेल, तर क्रिकेटप्रेमी लोक टीमवर लोकशाही पद्धतीने - विधिमंडळात कायदे करून - दबाव आणू शकतात, बदल घडवू शकतात. करदाते-मतदार म्हणून लोक टीमचे मालक असतात. निमसरकारी किंवा बिगरसरकारी नफा-तत्त्वावर चालणारी संस्था असेल, तर "खरेदी-न-करणे" हे तत्त्व क्रिकेटप्रेमी ग्राहकाला बाजारात उपलब्ध असते. लोक टीमचे मालक नसतात. मालक असणे किंवा नसणे हा मोठाच फरक आहे. या चर्चेत काणाडोळा करण्याइतका हा मुद्दा असंबद्ध नाही.

आमच्या पणजोबांच्या घरची नवरात्र मोठी छानछोकीची असे. गल्लीतल्या सर्व लोकांना तिच्याबद्दल आत्मीयता असे. गल्लीतली ती एकमेव मोठी नवरात्र असे, गल्लीतले बहुतेक लोक घरी येत, आनंदाने सण साजरा करीत. पण खर्च करणारे माझे पणजोबाच होते, आणि महत्त्वाचे निर्णय घेणारे तेच. त्यांच्या घरची नवरात्र, आणि गल्लीत वर्गणी फिरवून बसवलेला गणपती यांत फरक होताच.

खुलासा

तुमचे बहुतांश मुद्दे बरोबर आहेत, पण मी म्हणतो त्याच्या विरुद्ध फारसं नाही.

शत्रुराष्ट्राची म्हणून आलेली टीम कुठली?

मी पाकिस्तानविषयी बोलत होतो. त्याला शत्रुराष्ट्राचा 'अधिकृत' दर्जा आहे की नाही माहीत नाही (अधिकृत युद्ध चालू नाही). पण दोन देशांतली तेढ उघड आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर जर कोणी फटाके फोडले तर तो देशाचा अपमान काही लोक समजतात.

भारताच्या राज्यघटनेत जितक्या काय अटी आहेत तेवढ्या पुरतात.

राज्यघटनेतल्या अटी मनुष्याच्या शरीराच्या वर्णनासारख्या आहेत. हात, पाय, डोळे, मेंदू आहेत वगैरे. पण मनुष्य असणं यात यापलिकडचंही येतं. इतकंच म्हणायचं होतं. क्रिकेट आवडत नाही म्हणून भारतीयत्व नाकारण्याचा प्रश्न नाही.

अशी कुठलीही शपथ मी घेतलेली नाही.

जाणत्या वयात नसेल कदाचित. पण शालेय पुस्तकांत ही शपथ लिहिलेली असते. 'भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. .... अशा उज्वल परंपरांचा पाईक होण्याचा मी प्रयत्न करेन...' वगैरे वगैरे.

कायद्याच्या पुस्तकात लिहिले गेले असेल, त्याच्याशी आपले देणेघेणे आहे.

अर्थातच. पण कायद्याच्या पुस्तकात, राज्यघटनेत न लिहिलेल्या अनेक गोष्टी आपण प्राणपणाने जपतो. जवळपास सगळे भारतीय त्या मानतात. क्रिकेटची टीम ही त्यापैकीच एक. रामायणाचा सांस्कृतिक संदर्भ ही दुसरी. अशा अनेक सांगता येतील. म्हणून त्या राष्ट्रीय अस्मितेचा भाग असतात.

तुमच्या पणजोबांकडचा नवरात्रोत्सव हा गल्लीच्या अस्मितेचा भाग होताच. यावेळी रोषणाई कशी केली, प्रसादाला काय होतं, कोण काय नेसून आलं होतं याची आनंददायी चर्चा होत असावी. त्यांनी उत्सव करणं बंद केलं तर हळहळही होईल. कदाचित त्या लोकांचा जीव गुंतला असेल तर तो उत्सव चालू ठेवण्यासाठी गल्ली पुढे येऊही शकेल. भारताच्या टीमचा खर्च परवडत नाही, तेव्हा क्रिकेट बंद करू असं बीसीसीआयने म्हटलं (हे शक्य वाटत नाही, पण घटकाभर धरून चाला) तर ती जबाबदारी सरकारने घ्यावी असा ओरडा होईलच की.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

फक्त "समृद्ध परंपरांचा... पाईक" ही पळवाट

ती प्रतिज्ञा शाळेत वाचत असू - कुठल्या इयत्तेत, ते आठवत नाही.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.

प्रतिज्ञा लिहिणार्‍यांनी चांगली पळवाट आधीच रचलेली आहे, हे बरे केले.
फक्त समृद्ध (आणि विविधतेने नटलेल्या) परंपरांचा पाईक होण्याबाबत उल्लेख आहे. आणि साक्षात् पाईक होण्यापेक्षा पाईक होण्याची पात्रता अंगी यायचा प्रयत्न करण्याविषयी प्रतिज्ञा आहे. कुठल्याही नावडत्या परंपरेचा "समृद्ध नसलेली दळभद्री" म्हणून विरोध करायला जागा दिली त्या सुजाण लेखकांनी. आणि कुठल्याही समृद्ध पण कालबाह्य परंपरेबद्दल - उदाहरणार्थ अडीचकी-औटकीचा पाढा पाठ येणे - "प्रयत्न केला पण पाईक होणे जमले नाही" अशी पळवाट दिली! :-)

ती प्रतिज्ञा तशी छानच आहे, पण ती गंभीर चर्चेत न आठवणेच बरे. (छिद्रान्वेश : प्रतिज्ञा आणि शपथ मध्ये फरक असा, की प्रतिज्ञाभंग दंडनीय नसतो, तर शपथभंग दंडनीय असतो. छान-छान प्रतिज्ञा करणे चांगलेच - "मी संकेतस्थळांवर वेळ वाया घालवणार नाही..." वगैरे. पण शपथ फक्त दंडनीयता मान्य असल्यासच घ्यावी - "साक्षीमध्ये मी सत्य बोलेन...", वगैरे.)

हात, पाय, डोळे, मेंदू आहेत वगैरे. पण मनुष्य असणं यात यापलिकडचंही येतं.

भारतीयत्वात यापलिकडचे काहीतरी येत असेल असा जर अभिप्राय असेल, तर त्याच्याबद्दल मी थोडासा संभ्रमात आहे. आता तरी त्या व्याख्येबाहेर असलेले भारतीयत्वाचे कुठलेही गुण सुचत नाहीत. पण कोणी असे गुण सांगितल्यास विचार करायला तयार आहे.
अगदी थोडे का असेनात, भारतात अजूनही काही आदिवासी समाज आहेत ज्यांचा नागरी/ग्रामीण समाजाशी घनिष्ट संबंध नाही. (अंदमानात काही हंटर-गॅदरर समाजांत कोणीही कुठलाही हस्तक्षेप न-करण्याबाबत कायदा आहे. बस्तरमध्ये सुद्धा अशी क्षेत्रे आहेत.) हे मतिमंद वगैरे नसले, तरी उर्वरित/एकसंध भारताबद्दल त्यांना फारशी माहिती नसण्याची शक्यता खूप आहे. भारतीयत्वात बाकी जे काय येते, ते यांनाही लागू असलेच पाहिजे अशी माझी (आणि घटनेची) अट राहील.

काही का असेना, पण "या क्रिकेटसंघाविषयी आत्मीयता" हा गुण त्यांच्यापैकी मुळीच नाही - अगदी "जवळजवळ"सुद्धा नाही.

पण कायद्याच्या पुस्तकात, राज्यघटनेत न लिहिलेल्या अनेक गोष्टी आपण प्राणपणाने जपतो. जवळपास सगळे भारतीय त्या मानतात.

होय हे निरीक्षणसिद्ध तथ्य आहे. या वाक्याचा माझ्या आदल्या वाक्याशी कुठलाच विरोध नाही. उदाहरणार्थ जवळजवळ सगळे दिल्लीकर हिंदी भाषा बोलू शकतात हे निरीक्षणसिद्ध तथ्य आहे. पण दिल्लीकरत्वासाठी अशी भाषा बोलता येणे हा गुण "जवळजवळ"सुद्धा आवश्यक नाही.

क्रिकेटची टीम ही त्यापैकीच एक. रामायणाचा सांस्कृतिक संदर्भ ही दुसरी. अशा अनेक सांगता येतील. म्हणून त्या राष्ट्रीय अस्मितेचा भाग असतात.

असतील बुवा. मुक्तसुनीत यांच्या चर्चेचा संदर्भ नसता तर सहज "होय" असे म्हटले असते. सामान्यपणे "अस्मिता" या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी गुळगुळीत आणि ढगळ आहे. (अगदी काटेकोर अर्थाने "अस्मिता" ही फक्त एका-कातडीमध्ये-मर्यादित मानव-व्यक्तीला असते.) गोव्यातले बहुतेक लोक घरी मासे खातात, वैशिष्ट्यपूर्ण पाककृती बनवतात. हा गोवेकरांच्या "अस्मिते"चा भाग आहे, बहुधा. ही "अस्मिता"विषयक माहिती मला कित्येक कामांसाठी साठी उपयोगी आहे : (१) गोव्यांतील गावांत मत्स्याहारी खाणावळी जास्त असतील, हे ओळखून असणे (२) परदेशस्थ गोवेकराशी बोलताना "आपल्या बांगड्याच्या हुमाणाची चव इथे नाही!" असे म्हणून सलगी साधायचे तंत्र फसायची शक्यता फार कमी. वगैरे.
परंतु या ढगळ "अस्मिता" संकल्पनेचे फारसे मूलभूत महत्त्व नाही, असे मला वाटते. गोव्यात थोड्या बिगरमत्स्याहारी खाणावळी सापडतात. आणि सलगी साधण्याचा प्रयत्न कधीकधी बिगरमत्स्याहारी गोवेकर भेटल्यास फसतो.
(काटेकोर अर्थाने "अस्मिता" शब्द घेतल्यास, जर कोणी व्यक्ती मला म्हणाला "गोवेकर/डावखुरा/मत्स्याहारी/पोर्तुगीजद्वेष्टा असणे या सर्व गोष्टी माझ्या 'अहम् अस्मि'पणात अंतर्भूत आहेत" तर ती त्या व्यक्तीची अस्मिता होय. त्या व्यक्तीने 'मी' म्हटल्यास त्या गोष्टी अभिप्रेत असू शकतील हे ऐकणार्‍याने लक्षात ठेवलेले बरे, हा त्या संकल्पनेचा उपयोग.)

"बहुसंख्य भारतीय लोकांना क्रिकेटचा खेळ फार आवडतो, आणि या अमुक संघाबाबत प्रेम आहे" हे तथ्यात्मक वाक्य क्रिकेटप्रेमींविषयी पुरेसे बंधुभावाचे नाही का? त्या वाक्याहून वेगळी अशी डोळे-हात-पायांवेगळा-भारताचा-आत्मा ही मूलभूत संकल्पना कशाकरिता निर्माण केली जात आहे? ढोबळमानाने "अस्मिता" म्हणून सांगितलेले सर्वच गुण "बहुसंख्यांचे गुण" म्हणून वर्णिता येतात. या वर्णनात बहुसंख्यांचा कुठलाच अपमान नाही. आणि अंदमानातल्या आदिवाशांची सोय उर्वरित टक्केवारीत आपसूखच होते.
- - -

बीसीसीआय बुडीत खात्यात गेली तर सरकारने साहाय्य करून पुन्हा उभी करावी असा कोलाहल होईल - तुमचा कयास पटण्यासारखा आहे. "टू बिग टु फेल", "जनरल मोटर्स म्हणजे अमेरिकेच्या यंत्रयुगाची अस्मिता", "अर्थसंकल्पाची ऐशीतैशी पण आपल्या शहराची बेसबॉल टीम स्थलांतरित व्हायला नको - शहराची अस्मिता आहे", वगैरे उदाहरणे तर आपण बघितलेलीच आहेत. पण हे सगळे राजकीय-व्यापारी डावपेच होत. काही व्यापारी भावुकतेमुळे बेसावध झालेल्या बहुसंख्यांना गंडवण्यात अधिक तरबेज असतात, काही व्यापारी अकुशल असतात. बीसीसीआय किंवा मेजर-लीग-बेसबॉल संस्था जर "आम्ही भारताची/अमेरिकेची अस्मिता" म्हणून शासकीय पैसे लाटण्याची संभवनीयता लक्षणीय असेल, तर कदाचित त्या संस्थांचे राष्ट्रीयीकरण होण्याबाबत चर्चा झाली पाहिजे. (जर जीव-की-प्राण असेल, तर पणजोबा वाटेल तेव्हा नवरात्रोत्सव बंद पाडण्यापूर्वीच गल्लीत वर्गणीने नवरात्रोत्सव सुरू करायला पाहिजे. वाटल्यास पणजोबांना पहिल्या वर्षी मानाचे शालश्रीफळ द्या.) "फायद्यात खाजगी, तोट्यात राष्ट्रीय" असे धोरण गळी उतरवायला जर "अस्मिता" संकल्पना वापरली जाणार असेल, तर ती संकल्पना धोकादायकच होय.

बाउंडरी कंडिशन्स

तुम्ही व मी एकाच विषयाच्या दोन भिन्न टोकांच्या बाउंडरी कंडिशन्सबद्दल बोलत आहोत.

तुम्ही फॉल्स पॉझिटिव्ह टाळणारी अतिशय रेखीव व्याख्या वापरत आहात. त्यामुळे या व्याख्येच्या आत येणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना भारतीय न म्हणणं अन्याय्य होईल. याउलट मी फॉल्स निगेटिव्ह टाळणाऱ्या, व्यापक व्याख्येविषयी बोलत आहे. ज्यायोगे सर्व भारतीयत्व असलेल्या व्यक्ती, संस्था सामावल्या जातील. कदाचित त्या दोनना तांत्रिक भारतीयत्व व सांकल्पिक भारतीयत्व म्हणू. म्हणजे घोटाळा व्हायचा नाही.

मला वाटतं याच धर्तीचा संवाद आपला आधीही कधीतरी झाला आहे....

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रतिज्ञा

अहो घासकडवी,

त्या प्रतिज्ञेतच 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असे म्हटले आहे. प्रतिज्ञा शब्दबरहुकूम पाळायची म्हटले तर लोकांनी लग्ने कशी करायची?

सांकल्पिक भारतियत्वाला विरोध

फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह यांची अदलाबदल झालेली आहे, बहुधा.

किमान अटी असलेल्या व्याख्येत सर्वाधिक व्यक्ती समाविष्ट होतील. घटनेतील व्याख्येत किमान अटी आहेत. त्यामुळे फॉल्स निगेटिव्ह कमीतकमी होतील. त्यात "अस्मिता" ही अट घातली, तर थोडे तरी लोक वगळले जातील. हे लोक वगळले जाण्यात मला काहीएक फायदा वाटत नाही.

भारतात पंजीकृत झालेल्या सर्व खाजगी कंपन्यासुद्धा भारतीयच आहेत. भारतात पंजीकृत झालेल्या सर्व सेवाभावी संस्थासुद्धा भारतीयच आहेत. या सर्वांना "भारतीय" म्हणण्याबाबत माझी कुठलीच ना नाही. मग यात बीसीसीआय येते आणि गल्लीमधली खानावळ येते. या माझ्या (कायदेशीर) व्याख्येत अस्मितेची कुठलीच अट नाही. त्यामुळे कायदेशीर व्याखेतही सर्वाधिक संस्था समाविष्ट होतात. आमच्या गल्लीतल्या खानावळीवरोबरबीसीसीआयसुद्धा समाविष्ट होते.

तुमच्या निकषांच्या अनुसार बीसीसीआय ही "सांकल्पिक भारतीय" मानली जाते, पण आमच्या गल्लीतली खानावळ मात्र नाही. (गल्लीतल्या खानावळीच्या कंपूचे कोणाशी भांडण झाले, आणि कोणी फटाके फोडले, तर काय होईल? त्याचे हो-नाही उत्तर सुस्पष्ट नाही. वगैरे.) संस्थांच्या बाबतीतही तुमची व्याख्या कायदेशीर व्याखेपेक्षा अरुंद आहे. अस्मितेची अट घातली तर काही संस्था वगळल्या जातात. त्या वगळण्यात मला काहीही फायदा वाटत नाही.

बीसीसीआय ही प्रचंड मोठी संस्था आहे, आणि तिचा भारताच्या अंतर्गत बाजारात एकाधिकार आहे, ही साधी तथ्ये आहेत. रुपयांच्या उलाढालीचा आकडा आणि एकाधिकार या इतक्याच संकल्पना वापरून गल्लीतली खानावळ आणि बीसीसीआय यांच्यात स्पष्ट फरक होतो. "सांकल्पिक भारतीयत्व" नाकारले, म्हणून काही बीसीसीआय आणि खानावळ यांच्यात मी गोंधळ करणार नाही. म्हणजे ही संकल्पना न मानल्यामुळे माझा कुठलाही तोटा होणार नाही. तुमची तीन निकषांची व्याख्या वापरून आमच्या गल्लीतल्या खानावळीपाशी नसलेले आणि बीसीसीआयपाशी असलेले "सांकल्पिक भारतीयत्व" मी नाकारतो.

मुक्तसुनीत यांचा चर्चाविषय काय आहे? बीसीसीआय ही टाटा कंपनी किंवा नागपूर गोरक्षण संस्था यांच्यापेक्षा वेगळी आहे ती कशी? त्या सर्व संस्था भारतीयच आहेत. पण बीसीसीआय ही "लोकांची/सरकारची" आहे काय? हा चर्चाप्रस्तावातला प्रश्न आहे. तिला अन्य भारतीय संस्थांपेक्षा वेगळे स्थान देण्यासाठी जर "सांकल्पिक भारतीयत्व" निर्माण होत असेल, तर त्यास मी विरोध करतो.

राष्ट्रभावना!

मुद्दा बेगडी राष्ट्रभावनेचा आहे.

मुद्दा बरोबर आहे. बेगडी राष्ट्रभावना हा शब्दप्रयोग अगदी उचित आहे. (उपरोध नाही.)

भारताच्या मातीत जन्मलेल्यांनी काही कामगिरी करून दाखवली तर आपल्याला कौतुक वाटतं.

पद्मश्री सारखा गौरव मिळाल्यानंतर त्या देशभावनेचा आदर न राखता राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी वेळ नसण्याइतक्या जाहिराती करण्याची कामगिरी करणार्‍यांचेही कौतुक वाटले पाहिजे.

दुटप्पी भुमिका

याबाबत आमची अगदी स्पष्ट दुटप्पी भुमिका असते.
भारतीय संघ जिंकला की आम्ही "भारत जिंकला" असे म्हणतो.
भारतीय संघ हारला की आम्ही "भारतीय संघ हारला " असे म्हणतो.

"यशाला अनेक बाप असतात मात्र अपयशाला एकही बाप नसतो" ही म्हण आम्ही अशावेळी लक्षात ठेवतो.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

__

"यशाला अनेक बाप असतात .........

संस्थळावरील एखादा यशा तुमच्यावर अब्रुणुकसाणीचा दावा करणार नाही अशी शुभेच्छा . :)

- गद्दाफी

मला वाटते...

एक प्रश्न पडला: इतर कुठल्या (भारतसदृश अथवा त्याहून मोठ्या - लोकशाही आणि प्रगत) देशात क्रिडासंस्था ह्या सरकारी असतात? कदाचीत नसाव्यात. अमेरिकेत तर नक्कीच नाहीत. संस्थात्मकदृष्ट्या विनानफा तत्वावरील असल्या तरी सगळ्याच खाजगी आहेत. अगदी युएस ऑलिंपिक कमिटी देखील. तरी देखील ऑलिंपिक्समधे मिळणारी मेडल्स ही त्या संस्थेशी निगडीत होत नाहीत तर राष्ट्राशीच होतात. भारतीय हॉकीसाठी पण "हॉकी इंडीया" नामक नवीन संस्था चालू केली गेली आहे. ज्याला सरकारी मदत आहे पण असे दिसते की ती स्वतंत्र आहे. (त्यात कदाचीत जास्त पैसे नसल्याने, राजकारणी घुसलेले दिसले नाहीत!)

मला वाटते आपल्याकडे स्वातंत्र्यानंतरच्या काळात एकूणच समाजवादी राज्यपद्धती असल्याने आपसुक हे सरकारीच असणार/असले पाहीजे असे गृहीत तर धरत नाही आहोत ना?

बाकी विशेषकरून भारत-पाक खेळासंदर्भात. जे काही पुर्वी बघितलेले आहे भारतात अथवा पाकीस्तानात, तेंव्हा पुर्वीच्या पाकीस्तानी खेळाडूंचा, पंचांचा, आणि जनतेचा रोख असायचा तो "भारताला" हरवणे असाच. तेंव्हा त्याला अनुसरून ही रिऍक्शन जास्त होत असावी. नाहीतर, कधी काळी (आठवते त्याप्रमाणे) टॉनी ग्रेग हा भारतीय जनतेची खिलाडू वृत्ती पाहून येथे खेळायला आवडते असे म्हणला नसता. असो.

या न्यायाने ऑलिंपिक्स् मधे भाग घेणारे खेळाडूही सुरेश कलमाडीसारख्यांचे प्रतिनिधित्व करतात अशी विधाने ग्राह्य धरायची का ? नसल्यास का नाही ?

असे म्हणणार नाही, तर, "सुरेश कलमाडींसारखी व्यक्ती ही ऑलिंपिक्स कमिटी (अथवा जे काही असेल त्याचे) प्रतिनिधीत्व करते," असे म्हणेन. पुढे, "ऑलिंपिक्स (/सिडब्ल्यूजी) मधे देशाचे प्रतिनिधित्व ही कमिटी आणि त्याद्वारे खेळाडू करतात," असे म्हणेन. आता कलमाडींसारखी व्यक्ती तेथे असावी का प्रश्न नक्की आहे. पण खेळाडू हे काही कलमाडींचे नोकर नाहीत अथवा प्रतिनिधी नाहीत.

 
^ वर