क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ४: सचिनचा स्वार्थीपणा आणि तत्सम श्रद्धा
क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ४: सचिनचा स्वार्थीपणा आणि तत्सम अंधश्रद्धा
सचिन तेंडुलकर. नाव घेतलं की एक असामान्य व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहातं. गेली वीस वर्षं, प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल टाकताना, शंभर कोटींच्या आशा, अपेक्षांची धुरा खांद्यावर वहाणारं. आदर्श फलंदाजी म्हणजे काय याचा नमुना म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेटच्या पिचवरचं सळसळतं चैतन्य. तंत्रशुद्धता आहे, पण बॉयकॉटसारखा कंटाळवाणा खेळ नाही, चौफेर फटकेबाजी आहे पण युसुफ पठाणसारखा धर की हाण असा एकांगीपणा नाही. बुद्धी आणि शक्ती, लालित्य आणि निर्घृणपणा यांचं अचूक मिश्रण. सचिनविषयी मी कोण लिहिणार - खुद्द ब्रॅडमनला सचिनमध्ये आपलं रूप दिसलं. युगात एकदाच येणारा खेळाडू.
सचिनच्या या कर्तृत्वामुळे अर्थातच जवळपास सर्व क्रिकेट खेळणाऱ्या, पहाणाऱ्या विश्वात त्याचे चहाते आहेत. बुकीदेखील तो खेळत असताना आपली बुकं बाजूला ठेवून त्याचा खेळ बघत बसतात. त्याच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीमचे समर्थकही त्याची सेंचुरी होण्याची वाट बघतात. अशा चहात्यांमध्ये अर्थातच सचिनचा खेळ आवडणारे काही असतात, तर काही त्याला देव मानणारे असतात. सचिनविरुद्ध एक अक्षरही बोललेलं त्यांना खपत नाही. याउलट सचिनला दिलेलं हे देवपण न आवडणारेही काही असतात. सचिन चांगला खेळाडू आहे हे मान्य करतील. पण शेवटी तो माणूसच आहे असं ते सांगतात. तेही चुकीचं नाही. पण काहींना सचिनला मिळणाऱ्या या वलयालाच आक्षेप असतो. का कोण जाणे पण 'सचिन चांगली बॅटिंग करतो पण तो केवळ आपल्या रेकॉर्ड्सच्या मागे असतो' 'संघाचं हित कशात आहे याचा विचार करण्यापेक्षा आपल्या रन्स सर्वाधिक कशा होतील हेच पहातो' असं म्हणणारेही अनेक असतात. यात अर्थातच 'सचिनमुळे टीमचा फायदा होतो तितकाच तोटाही होतो' हे अध्याहृत असतं. सचिनला देव म्हणणं हे भक्तिपोटी होतं. त्याला स्वार्थी म्हणणं कशापोटी होतं? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सत्य या दोन टोकांमध्ये नक्की कुठे आहे? सचिन स्वार्थी आहे की नाही हे कसं सिद्ध करणार?
सर्वसामान्य माणसाप्रमाणे क्रिकेट बघणाराच्याही अनेक क्रिकेटविषयक श्रद्धा असतात. 'राव, सचिनने सेंचुरी मारली भारत हारतोच' असा विश्वास व्यक्त केलेला दिसून येतो. नुकताच सुधीर काळे यांनी एक लेख लिहून (मिसळपाववरील लेख, उपक्रमवरील लेख) या दाव्यातला फोलपणा सिद्ध केला. थोडक्यात सचिनने केलेल्या सेंचुरींपैकी ३३ वेळा भारत जिंकलेला आहे व १३ वेळा भारत हरलेला आहे. (निकाली सामन्यांत) सचिनने सेंचुरी केल्यावर सुमारे ७२% वेळा भारत जिंकलेला असतानाही असा समज का रहातो? कुणीतरी म्हटलं होतं की विदा नसतानाही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हणावी, व विरुद्ध विदा असतानाही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला अंधश्रद्धा म्हणावी. या व्याख्येनुसार ही अंधश्रद्धा म्हणायला हरकत नाही.
काळेंच्या लेखामध्ये श्रद्धेचा एक छोटा भाग खोडून काढलेला आहे. पण सचिन स्वार्थी आहे ही श्रद्धा कशी खोडून काढायची? पण कधीकधी यापेक्षाही व्यापक श्रद्धा असतात. आपण 'सचिन संघापेक्षा स्वतःची रेकॉर्डस बनवायला अधिक प्राधान्य देतो' हा एक वर्किंग हायपोथिसिस घेऊ. तो सिद्ध करणं हे खरं तर तो हायपोथिसिस मांडणाऱ्याची जबाबदारी असते. म्हणूनच शशिकांत ओकांच्या 'तुम्ही प्रत्यय घेऊन बघा, नाहीतर या शास्त्रात खोट काढून दाखवा' या आवाहनाला 'तुम्हीच ते शास्त्र सत्य आहे हे सिद्ध करून दाखवा' असं म्हणावं लागतं. पण या बाबतीत आपण हा हायपोथिसिस असिद्ध करण्याची संख्याशास्त्रीय पद्धत पाहूया.
'क्ष बाबतीत विशेष काहीतरी आहे' असा हायपोथिसिस सिद्ध करायचा असेल तर 'क्ष मध्ये विशेष काही नाही' (किंवा क्ष हा इतर सर्वसामान्य पदार्थांसारखाच आहे) हे असिद्ध करावं लागतं. 'विशेष काही नाही' या हायपोथिसिसला नल हायपोथिसिस म्हणतात. समजा 'क्ष पदार्थात लोखंडाला आकर्षित करण्याचा गुणधर्म आहे' असा हायपोथिसिस आहे. हे सिद्ध करण्यासाठी क्ष पदार्थ व चुंबकीय गुणधर्म नसलेला पदार्थ (इतर सर्वसाधारण पदार्थ) यांची वागणूक वेगळी आहे हे दाखवावं लागतं. क्ष शेजारी ठेवलेलं बॉलबेअरिंग हे क्षच्या दिशेने येतं. इतर वस्तूंशेजारी ठेवलेलं बॉलबेअरिंग त्यांच्याकडे खेचलं जात नाही. दुर्दैवाने जग इतकं सोपं नसतं. कधी कधी वस्तुंशेजारी ठेवलेलं बॉलबेअरिंग काही इतर कारणाने (जमीन थोडीशी कलती असल्यामुळे) त्या दिशेने घसरेलही. कधीकधी क्ष च्या विरुद्ध उतार असल्याने बॉलबेअरिंग तिथेच राहू शकेल. त्यामुळे 'सर्वसाधारणपणे' 'बहुतेक वेळा' 'सरासरी' अशी मापनं वापरावी लागतात. म्हणजे अनेक वेळा प्रयोग केल्यावर क्ष कडे जाणारी बॉलबेअरिंगची संख्या, त्यांचा वेग इ. गोष्टी या इतर वस्तूंशेजारी ठेवलेल्या बॉलबेअरिंग्सच्या संख्या व वेग यापेक्षा अधिक प्रमाणात आहे हे दाखवावं लागतं. या सरासरी जर विशेष वेगळ्या नसल्या तर क्ष मध्ये चुंबकीय गुणधर्म आहे हे सिद्ध करता येत नाही. कारण क्ष मध्ये विशेष काही तसा गुणधर्म नाही हा नल हायपोथिसिस खोडून काढला जात नाही.
सचिनच्या बाबतीतही हीच पद्धत वापरता येईल. 'सचिन स्वार्थी आहे' किंवा 'संघ जिंको अथवा हरो सचिन सेंचुरीच्या मागे असतो' हे खोडून काढण्यासाठी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सचिनच्या सेंचुऱ्या व त्यातून उद्भवणारी संघाची हार वा जीत ही इतर सेंचुऱ्या करणाऱ्या बॅट्समनप्रमाणेच आहे हे असिद्ध करावं लागेल. ते कसं करणार? त्यासाठी सचिन सोडून इतर बॅट्समनच्या सेंचुऱ्या तपासून बघायच्या. त्यापैकी हार व जीतीचं प्रमाण तपासून बघायचं. ते विशेष वेगळं असेल तर काही निष्कर्ष काढता येतो. नसल्यास तो स्वार्थी आहे हे सिद्ध करता येत नाही.
...................सचिनच्या सेंचुऱ्या.............इतरांच्या सेंचुऱ्या
जीत.................३३.....................................८०७
हार..................१३.....................................२६३
एकूण................४६....................................१०७०
जीत-टक्केवारी...७१.७%..................................७५.४%
हार-टक्केवारी....२८.३%..................................२४.६%
आता कोणी म्हणेल की २८.३ हे २४.६ पेक्षा निश्चितच मोठे आहेत. बरोबर. पण प्रश्न असा आहे की ते पुरेसे मोठे आहेत का? त्यांमधला फरक हा विशेष फरक आहे का? त्यासाठी काही उत्तम टेस्ट्स असतात. पण इतकं तांत्रिक विश्लेषण इथे करण्याची इच्छा नाही. समजा दोन नाणी दहावेळा उडवली - एकाला पाच वेळा छापा आला व दुसऱ्याला चारच वेळा आला तर त्या दोन नाण्यांना खूप वेगळं म्हणाल का? अर्थातच नाही. कारण एक वेळा नाणं वेगळं पडलं इतकंच. इथे आपण टाय झालेल्या इंग्लंडच्या मॅचचं उदाहरण घेऊ. त्या मॅचमध्ये केवळ एका रनने हार किंवा जीत ठरली असती. त्या एका कमी किंवा जास्त रनने ही आकडेवारी १४ व ३३ किंवा १३ व ३४ अशी होऊ शकली असती. म्हणजे २८.३% ऐवजी २७.७% किंवा २९.७%. एका सामन्यातल्या एका रनने जर २ पर्सेंटेज पॉइंटचा फरक पडत असेल तर इथे दिसणारा ३.७ पर्सेंटेज पॉइंटचा फरक नगण्य आहे असं सहज सिद्ध करता यावं.
या आकडेवारीवरून दिसून येतं की सचिनने सेंचुरी करणं व भारताची हारजीत हे इतर कुणाही बॅट्समनने सेंचुरी करणं व त्या संघाची हारजीत यापेक्षा वेगळं नाही. (सचिन व इतर बॅट्समन्सचा दर्जा सारखाच आहे असा चुकीचा अर्थ काढू नये) याचाच अर्थ सचिन स्वार्थीपणे खेळतो हे सिद्ध करता येत नाही. बाजूने विदा नसल्याने हा हायपोथिसिस म्हणजे एक विश्वास, एक श्रद्धा रहाते. ज्यांना तशी श्रद्धा बाळगायची असेल तशी खुशाल बाळगावी.
Comments
निष्कर्ष पटण्यासारखा आहे
निष्कर्ष पटण्यासारखा आहे.
(हायपोथेसिस टेस्टचे गणित, जर इच्छा असेल तर बघण्यासाठी : नल हायपोथेसिस - सचिनची हार/जीत टक्केवारी अन्य सर्वांपेक्षा वेगळी नाही. कुठल्याही फलंदाजाची हार-टक्केवारी २४.७% च्या आसपास असेल. कमी असेल किंवा अधिक असेल, कुठलाच कल नाही. असे असता वरील तक्त्यात सांगितलेला जो फरक आहे, म्हणजे ३.७%, इतका किंवा याहून अधिक फरक यदृच्छेने दिसण्याची संभवनीयता किती आहे? गणित करता असे दिसते - ~६०%. म्हणजे इतका फरक यदृच्छेने दिसायची संभवनीयता "पुष्कळ" आहे. "पुष्कळ" म्हणजे किती हे वेगवेगळे लोक आपापल्या मनानुसार ठरवतील. पण ५०%पेक्षा अधिक म्हणजे "पुष्कळ"च असे आपल्यापैकी बहुतेक लोक म्हणतील. यदृच्छेने इतका फरक दिसण्याची इतकी "पुष्कळ" शक्यता असताना उगाच "सचिन मुद्दामून हरवतो" हा किडा वळवळून करून डोके खपवायला नको.)
खूप छान
मुद्दा निर्विवाद पटवला.
एवढी सगळी सरासरी काढणे फारच कौतुकास्पद.
प्रमोद
एवढी सरासरी
+१. एवढा डेटा कुठून जमवलात?
बाकी, मुद्दा पटला हे. वे. सां. न.
उत्तम
क्या बात है :) उत्तम विश्लेषण.
वाचून हे कळत नाही कि तुम्हाला सचिनचा खेळ आवडतो म्हणून तुम्ही एवढी मेहनत करून विश्लेषण केले कि विश्लेषण आवडते म्हणून ह्या ज्वलंत विषयाला हात घातलात :) काहीही असले तरी विश्लेषण आणि हायपोथिसीस सिद्धता दोनीही आवडले.
असहमत
सर्व मुद्यांवर असहमत. सांखिकीने काहीही सिद्ध करता येते पण वानगीदाखल आजच्या सामन्याचे उदाहरण घेऊ.
आज सचिनने ८५ धावा केल्या - का? कारण त्याला आणखी एक शतक करायचे होते. स्वार्थीपणा.
खरे तर त्याला ३०च्या आत बाद होऊन आपला निस्वार्थीपणा सिद्ध करता आला असता पण शतकाचा आणि म्यान ऑफ द म्याचचा मोह सुटला नाही. म्हणूनच एकदा बाद असूनही रिव्ह्यू मागून तो खेळपट्टीला चिकटून राहीला. किमान गंभीर, धोनी, युवराज यांचे उदाहरण तरी घ्यायचे पण नाही. का? स्वार्थीपणा.
फिल्डींग करत असताना एक झेलही घेतला आणि स्वतःच्या वैयक्तिक झेलसंख्येमध्ये एकाची भर घातली. का? स्वार्थीपणा.
आज योगायोगाने भारत जिंकला पण त्या विजयाला सचिनच्या स्वार्थीपणाचे गालबोट लागले आहे.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
सहमत
हो, एवढे वय झाले असताना केवळ "मी सगळ्यात जास्त विश्वचषक सामने खेळलो" हे बिरूद पण पाहिजेच आहे त्याला. - स्वार्थी :). घरी बसावे, अक्याडमी उघडावी, मटार उसळ खावी वगैरे.
हलके घेण्याबद्दल लिहायचे राहून गेले काय?
ह.घ्या. असे लिहायचे राहून गेले काय?
सामन्याची ताजा खबर क्रिकइन्फोवर घेत होतो. तेथेसुद्धा "आज सचिनचे शतक झाले नाही म्हणून भारत जिंकेल" असे "गमतीने" म्हटले गेले. मला थोडेसे वाईट वाटले. कॉमेंटेटरांनी असे पुन्हापुन्हा म्हटले की मस्करीची कुस्करी होते.
- - -
सचिन तेंडुलकर (किंवा कोणीही) स्वार्थी आहे हे बिगरतुलनात्मक विधान बहुधा खरे आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळण्यासाठी पैसे घेतो, म्हणजे अगदी "ऍब्लोल्यूट" स्तरावर तो स्व-अर्थी/स्वार्थी आहे. आपण सगळेच आहोत. आपल्या हौशी खेळातही आनंद मिळत असेल, तर तो आनंद मिळण्याबाबत आपण स्वार्थी आहोतच ना!
वरील लेखात सचिन तेंडुलकर आणि अन्य शतकवीर खेळाडूंची तुलना केलेली आहे.
मला वाटते वरील प्रतिसादातील विनोद अधिक गंमतशीर व्हावा म्हणून आजच्या सामन्याबद्दल कुठलेतरी सांख्यिकी विश्लेषण करायला हवे होते (मुद्दामून चुकवलेले का होईना), आणि त्यातून चुकीचा आणि धमाल गमतीदार निष्कर्ष काढायला हवा होता. मात्र वरील तीन अधोरेखित वाक्यांत एकही स्टॅटिस्टिकल वाक्य नाही.
ह घ्या
प्रतिसादातील अतिशयोक्ती सेल्फ्-एक्सप्लेनटरी असावी असे वाटले म्हणून ह घ्या लिहीले नाही.
सांख्यिकीनेही करता आले असते पण वेळ लागला असता. आणि कुठेतरी डोक्यात साइनफेल्डचा हा डायलॉक होता. कोणत्याही वर्तनातून आपल्याला हवा तो निष्कर्ष कसा काढायचा याबद्दल.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......
अतिपरिचय
वरचा प्रतिसाद हघ्या होता. हा गंभीर आहे.
मुळात हा मुद्दा चर्चेला येतो या गोष्टीचे वाइट वाटते. आजवरच्या क्रिकेटच्या इतिहासात कुणालाही जमली नाही अशी कामगिरी एका भारतीयाने आणि त्यातही मुंबईच्या मराठी बोलणार्या खेळाडूने केली आहे. जोवर क्रिकेट अस्तित्वात आहे तोपर्यंत सचिन तेंडुलकर या नावाचा विसर कुणालाही पडणे शक्य नाही. असे असताना त्यावर प्रतिक्रिया काय? तर तो स्वार्थीपणे खेळतो. अतिपरिचयामुळे अवज्ञा म्हणतात ती याला. सचिन रोज दिसतो, मराठी बोलतो, अरे-तुरे करतो म्हणून याचा अर्थ त्याला किराणा दुकानातल्या पोर्यासारखे वागवावे असा नाही. त्याने जे केले आहे ते अतुलनिय आहे. He deserves respect. आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे त्याची कदर आपल्यालाच नाही याहून दुसरी शोकांतिका नाही.
अशा आक्षेपांना फारसे गंभीरपणे घेऊ नये असे माझे मत आहे. काहीतरी करून स्वतःचे महत्व वाढवणे हा उद्देश या आक्षेपांमागे असू शकतो. आणि आक्षेपांना अंत नाही. साचिन बेटींग करतो, सचिन मॅच फिक्सिंग करतो, प्रत्येक शतकासाठी विरोधी संघाला पैसे देतो. याचे खंडन कुठपर्यंत करणार?
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
+१
साचिन बेटींग करतो, सचिन मॅच फिक्सिंग करतो, प्रत्येक शतकासाठी विरोधी संघाला पैसे देतो. याचे खंडन कुठपर्यंत करणार?
असेच म्हणते.
?
असे आरोप झालेले मी ऐकले नाहीत. फार तर शतकासाठी खेळतो असा आरोप ऐकला आहे. फिक्सिंग वगैरेचा आरोप/ संशय कधीच ऐकला नाही.
नितिन थत्ते
आरोप
असे आरोप झालेले नाहीत हे खरे आहे. पण आरोप करायला काहीच लागत नाही हे दाखवायचे होते. म्हणूनच अशा आरोपांचे खंडन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी पुरावे सादर करावेत. इनोसंट टिल प्रूव्हन गिल्टी.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
:)
एकदा आरोप केले की संशय निर्माण व्हायलाही फारसे काही लागत नाही.
शंका
कोणीच शतक केले नाही तरीही संघ जिंकण्याच्या शक्यता सचिन असलेल्या संघांच्या बाबतीत आणि सचिन नसलेल्या संघांच्या बाबतीत कितीकिती असतात?
पुढचा विचार म्हणून चांगला
पुढचा विचार म्हणून चांगला. माझ्यापाशी साधनसामग्री नाही.
देश/जिंकले/हरले/टाय
भारत/३७९/३५५/४ (जिंकण्याचा दर ५१.६%)
...
...
कमीतकमी १०० सामने खेळलेल्या देशांपैकी
जिंकायचा दर सर्वाधिक दक्षिण आफ्रिका ६४.७%, ऑस्ट्रेलिया ६४.६%
सर्वात कमी दर बांगलादेश २७.७%, केनिया २७.७%, झिंबाब्वे २७.५%
बाकी ६ देशांचे जिंकायचे दर ४५% ते ५५%च्या मध्ये आहेत
(माझ्या मते या विश्लेषणानंतरही फारसा फरक पडणार नाही.)
स्टॅटिस्टिक्सची गणिते करताना हा विचार करायचा असतो : "अमुक निष्कर्ष सांगताना कुठले एकक कम्यूटेटिव्ह मानता येते?" (येथे "कम्यूटेटिव्ह" हा शब्द मी "एकके एकमेकांच्या जागी अदलली-बदलली तर निष्कर्षाच्या संदर्भापुरते चालेल" या अर्थी वापरलेला आहे.) अशी एकके मग सरासरी काढण्याकरिता, किंवा संख्या मोजण्याकरिता (काउंट्स्) त्या संदर्भापुरती ठीक असतात.
येथे सचिन तेंडुलकरबद्दल जो निष्कर्ष लोकांनी काढलेला आहे, तो "कुठल्याही अन्य फलंदाजाच्या कुठल्याही सामन्यातल्या शतकी कामगिरीबाबत" असल्यासारखा वाटतो. म्हणून त्याकरिता वरील लेखातील विश्लेषण पुरेसे आहे.
वेगवेगळ्या देशाच्या संघाच्या जिंकण्याच्या संभवनीयतेमधील फरक हा रँडम इफेक्ट मानलेला आहे.
नाहीतर अगदी सूक्ष्म तुलना करायची असेल, तर सचिन तेंडुलकरच्याच सारख्या तंतोतंत सर्व संधी आलेला=सामने खेळलेला फलंदाज आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना करावी लागेल. मात्र तंतोतंत तुलनीय, पण सचिन तेंडुलकर नाही असा व्यक्ती सापडत नाही. म्हणून त्याच्यापेक्षा वेगळ्या संघात खेळलेले (अर्थात संघाची जिंकण्याची संभवनीयता वेगळी असणार) आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या संधी आलेले (म्हणजे विरोधी संघाची कुवत सचीन खेळलेल्या सामन्यापेक्षा कमी-अधिक असल्यामुळे बल्ला घुमवायची कमी-अधिक संधी मिळालेले फलंदाज) यांच्याशी तुलना करून आपण काम भागवतो. मग आपण म्हणतो - अशी तुलना करायची ठरवल्यास, या संदर्भापुरते सर्व शतकवीर फलंदाज सारखेच.
विश्लेषण
प्राथमिक विश्लेषण चांगले आहे. काळेंच्या लेखनात अश्याच प्रकारचे विश्लेषण अपेक्षीत होते. अजून कशाप्रकारची आकडेवारी हवी हे इथे जमल्यास देइनच. पण तोपर्यंत वरील आकड्यांचा संदर्भ दिल्यास उत्तम!
हे वाक्य मात्र भातात खडा लागावा तसे ह्या लेखात खटकले. बाजूने विदा नसल्यास हायपोथेसीस रिजेक्ट होते. विश्वास/श्रद्धा वगैरेचा इथे काय संबंध? विश्वास/श्रद्धा वगैरे बाळगणार्यांसाठी कसल्यास विद्याची गरज नसते कारण विदा काहीही दाखवो आमची अशी श्रद्धा आहे ह्यावर ते ठाम असतात. लेखाचे सार हेच होते तर इतका खटाटोप कशाला हा प्रश्न पडला.
सचिनची शतके आणि जयपराजय
आपले शतक पूर्ण व्हावे या उद्देशाने सचिन संथगतीने खेळला आणि त्यामुळे संघाच्या एकूण धावा कमी झाल्या असे मला तरी कधीसुद्धा जाणवले नाही. ज्या सामन्यांमध्ये त्याने शतक काढूनसुद्धा संघ हरला अशा सामन्यामध्ये सचिनने काढलेल्या धावांची गती, विशेषतः नव्वदीमध्ये गेल्यानंतर पुढील दहा धावा काढण्यासाठी त्याने घेतलेला वेळ आणि त्या सामन्यातील इतर फलंदाजांची धावा काढण्याची गती वगैरे विदा कोणाकडे असेल तरच अशा आरोपात काही तथ्य दिसेल.
संदर्भ
मूळ लेखात गोळा केलेल्या विद्याचा संदर्भ द्यायचा राहिला. क्रिकइन्फो.कॉम वर स्टॅट्सगुरू नावाचा सर्चेबल डेटाबेस आहे. तिथे आपल्याला हवं तसं विश्लेषण करून घेता येतं.
एखाद्या फलंदाजाने सेंचुरी केली व मॅच जिंकली याची इनिंग प्रमाणे यादी
एखाद्या फलंदाजाने सेंचुरी केली व मॅच हरली याची इनिंग प्रमाणे यादी
ते वाक्य श्रद्धेची व्याख्या आहे. आपल्याला समाजात असे अनेक विश्वास अपुऱ्या माहितीवर, पूर्वग्रहांवर आधारलेले दिसतात. बऱ्याच वेळा ते सत्य असल्याची खात्री करून घेतल्याच्या अविर्भावात मांडले जातात. सगळेच देवाविषयीच असतात असंही नाही. जर अशा विश्वासांना विद्याचा आधार नसेल तर तो श्रद्धेच्या जवळ जातो. बाजूने विदा नसल्यास हायपोथेसिस रिजेक्ट होतो हे अर्थातच बरोबर आहे. रिजेक्ट झालेला हायपोथेसिस बाळगून रहाणे याला मी अंधश्रद्धा म्हणेन. हायपोथेसिस रिजेक्ट झाला असतानाही तो झालाच नाही असं म्हणत राहाणं याला काय म्हणायचं हे माहीत नाही.
साराबरोबर चावायला थोडा भात नको का? (ह. घ्या.) स्टॅटिस्टिक्स व क्रिकेट याबद्दलच्या लेखमालेतला हा एक लेख आहे. क्रिकेटची उदाहरणं घेऊन स्टॅटिस्टिक्सच्या कल्पना (तांत्रिक भाषा न वापरता) समजावून सांगणं असा लेखमालेचा हेतू आहे. नल हायपोथिसिस, हायपोथिसिस सिद्ध करणं किंवा रिजेक्ट करणं, सिग्निफिकन्स, सरासरी, विदा या कल्पनांचा आढावा घ्यायला या लेखाने मदत झाली असं वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी