सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
![]() |
(४८व्या ’एकदिवशीय’ शतकानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना सचिन)
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.
सध्या जोरात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतसुद्धा सचिनने दोन शतके ठोकली-एक इंग्लंडविरुद्ध व एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध! पहिल्या सामन्यात धावांची बरोबरी झाली तर दुसर्या्त दक्षिण आफ्रिकेऐवजी आपणच 'गुदमरलो' आणि २९ धावात ९ बळी देऊन विजयाच्या जबड्यातून पराजयाला खेचून आणले! तसे पहिले तर सचिन तर वारंवार शतकी खेळी करतो, मग आपण सगळे सामने धडाधड हरतो कीं काय? आकडे काय बोलतात याबद्दल?
नुकताच "क्रिकबझ्झ" या संस्थळावर नेमक्या याच विषयावर एक मस्त लेख प्रसिद्ध झाला. लेखक आहेत गोकुळ गोपाळ. त्यांनी दिलेली आकडेवारी आणखीच कांहीं सांगून जाते. सध्या विश्वचषक स्पर्धेचा हंगाम असल्याने त्यानी या लेखात फक्त एकदिवशीय सामन्यांचाच विचार केलेला असावा. पण आमचे "आनंदजी डोसां" (माझे सहकारी श्री नाफडे) यांच्याकडे कसोटीची आकडेवारीही आहे. पणे तिकडे हा हंगाम झाल्यानंतर वळू.
सचिनचे हितशत्रू साधारणपणे "सचिनने शतक = भारताची हार" असे वाक्य समीकरणच असल्याच्या आविर्भावात 'सोडून' देतात! पण आकडे कांहीं दुसरीच हकीकत सांगतात! सचिनच्या एकूण ४८ एकदिवशीय सामन्यांतील शतकात फक्त तेरा वेळा भारत हरला आहे. तर चक्क ३३ वेळा त्याला विजय प्राप्त झाला आहे. २००२ मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाल लागला नाहीं तर अलीकडचा इंग्लंडबरोबरचा सामना बरोबरीत संपला. म्हणजे विजय-पराजयाचे प्रमाण जवळ जवळ ३:१ किंवा अगदी समीकरणाच्या भाषेत सांगायचे तर भारताचे विजय = ३(भारताची हार)!
आता जरा खोलात जाऊन पाहू!
सचिनने शतक केले तरी भारत हरला असे सामने
धावा धावगती विरुद्ध मैदान कधी?
१३७ १०० लंका दिल्ली मार्च ९६ *१
१०० ९० पाक सिंगा. एप्रि. ९६ *२
११० ८० लंका कोलंबो ऑग ९६ *३
१४३ १०९ ऑस्ट्रे. शारजा एप्रि ९८ *४
१०१ ७२ लंका शारजा ऑक्ट०० *५
१४६ ९५ झिंबा. जोध. डिसें ०० *६
१०१ ७८ द. आ. जो.बर्ग ऑक्टो०१ *७
१४१ १०४ पाक रा.पिंडी मार्च ०४ *८
१२३ ९५ पाक अहमदा. एप्रि ०५ *९
१०० ८८ पाक पेशावर फेब्रू. ०६ *१०
१४१* ९५ विंडीज क्वाला सप्टे. ०६ *११
१७५ १२४ ऑस्ट्रे. हैद्राबाद नोव्हे०९ *१२
१११ १०१ द.आ. नागपूर मार्च ११ *१३
या १३ पराजयातल्या शतकाखेरीजच्या उर्वरित ३५ षटकात भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.
आता या १३ सामन्यांत इतर फलंदाजांच्या "पराक्रमा"कडे एक नजर टाकू!
*१: या श्रीलंकेविरुद्धच्या ९६च्या विश्वचषक स्पर्धेतील 'लीग' सामन्यात भारताच्या ५० षटकांतल्या २७१ धावांत सचिनने १००च्या धावगतीने १३७ चेंडूंत १३७ धावा काढल्या होत्या. फक्त अझारुद्दीनने अर्धशतक केले. श्रीलंकेने आपल्या धावसंख्येचा पाठलाग करीत ४९व्या षटकात २७२ धावा केल्या. या सामन्यावरील अनुभवावरून अझारुद्दिनने नाणेफेक जिंकूनही क्षेत्ररक्षण निवडल्याचा उल्लेख माझ्या "पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!" या लेखात आला आहेच.
*२ पाकिस्तानविरुद्ध सिंगापूरला झालेल्या एप्रिल ९६च्या या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज ४८व्या षटकात २२६ धावात गारद झाले त्यात सचिन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या होती १८६/४. त्यानंतरच्या पराक्रमींनी मिळून ३८ धावा केल्या यात आश्चर्य ते काय? कारण त्यात ३ खेळाडू 'मॅच-फिक्सिंग'वाले होते.
*३ श्रीलंकेविरुद्धच्या ऑगस्ट ९६च्या या सामन्यात भारताच्या एकूण २२६-५ धावांपैकी सचिनने ८०च्या धावगतीने (त्याच्या नेहमीच्या मानाने अंमळ मंदगतीने) १३८ चेंडूंत ११० धावा केल्या. फक्त अझारुद्दीनने ९९ चेंडूत ५८ धावा काढल्या होत्या (धावगती ५९). शिवाय गोलंदाजीतही सचिनने ६ षटकात २९ धावा देऊन श्रीलंकेचा एकुलता एक बळी घेतला (श्रीलंकेने १ बळीच्या मोबदल्यात २२६ धावा केल्या होत्या.) श्रीनाथच्या गोलंदाजीनंतर 'काटकसरी' गोलंदाजीतही सचिन दुसरा होता.
*४ शारजाला झालेल्या या अविस्मरणीय 'लीग'मधील दिवस-रात्र सामन्यात प्रकाशझोतात खेळत सचिनने १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. सचिन बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ५ बाद २४२. ४३ षटके झाली होती. उरलेल्या ३ षटकात ३२ धावांचे लक्ष्य पार करताना भारताच्या इतर फलंदाजांनी फक्त ८ धावा केल्या (२५०-५)
*५ शारजाला २००० साली झालेल्या या सामन्यात भारताच्या २२४-८च्या धावांपैकी सचिनने ७२च्या धावगतीने १४० चेंडूंत १०१ धावा केल्या. इतर कुणीही अर्धशतकाचा पल्लाही ओलांडला नाही. श्रीलंकेने ४४व्या षटकात २२५-४ धाव करून सामना जिंकला. सचिनने ५ षटकात २२ धावा देत काटकसरी गोलंदाजीही केली. त्याच्यापेक्षा जास्त काटकसरी गोलंदाजी फक्त श्रीनाथची होती.
*६ डिसेंबर २००० साली झिंबाब्वेविरुद्ध जोधपूरला झालेल्या या सामन्यात भारताच्या २८३-८ या धावसंख्येत सचिनच्या १५५ चंडूंत १४६ धावा होत्या. तो बाद झाला त्यावेळी साडेशेहेचाळीस षटके झाली होती. उरलेल्या साडेतीन षटकात आगरकर व जहीर या जोडीने ४८ धावा फटकारल्या. साडेशेहेचाळीस षटकात सचिनने २३५ पैकी १४६ धावा केल्या होत्या. मग इतरांनी काय पराक्रम केला असेल ते लक्षात येईलच. सचिनच्या पाठोपाठ जास्तीत जास्त धावा केल्या होत्या जहीरने (३२). सचिनने ६ षटकात ३५ धावा देत १ बळी घेतला. झिंबाब्वेने शेवटच्या षटकात २८४ धावा करत सामना जिंकला.
*७ द. आफ्रिकेविरुद्ध ऑक्टो २००१ च्या या सामन्यात भारताच्या २७९-५ च्या धावसंख्येत गांगुलीने १२६ चेंडूंत १२७ धावा केल्या होत्या तो बाद झाला तेंव्हा धावसंख्या होती १९३-१. सचिन २६३च्या धावसंख्येवर ७८च्या धावगतीने १०१ धावा काढून सर्वात शेवटी बाद झाला. द. आफ्रिकेने २८० धावा करत हा सामना जिंकला.
*८ मार्च २००४ मध्ये रावळपिंडीला झालेल्या या सामन्यात भारत पाकिस्तानची ३२९ ची धावसंख्या ओलांडू पहात होता पण ४९व्या षटकात ३१७ धावांवर भारताचा डाव आटोपला. सचिनने १३५ चेंडूंत १४१ धावा केल्या व तो बाद झाला तेंव्हां भारताची धावसंख्या होती ३८.४ षटकात २४५-४. ६८ चेंडूंत ८५ धावा करायचे हे आव्हान ६ फलंदाज हातात असूनही भारताला पेलले नाहीं. इतर कुणीही अर्धशतकही केले नाही!
*९ एप्रिल २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादला झालेल्या ४८ षटकांच्या या सामन्यात भारताने ३१५-६ अशी धावसंख्या रचली. त्यात सचिनचा वाटा होता १३० चेंडूंत १२३ धावा. त्यानंतरच्या दोन सर्वोच्च धावसंख्या होत्या ६४ चेंडूत ४७ धावा (धोनी) आणि अवांतर धावा ३९! पाकिस्तानने ४८ षटकात ३१९ धावा केल्या. बालाजी, नेहरा आणि जहीर या तीन शीघ्रगती गोलंदाजांनी २६ षटकांत १८८ धावा दिल्या आणि केवळ २ बळी घेतले. सचिनच्या गोलंदाजीचे पृथःकरण होते ६-०-३६-१.
*१० फेब्रूवारी २००६मध्ये पेशावरला झालेल्या या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्व बाद ३२८ धावांपैकी सचिनने ११३ चेंडूंत १०० धावा केल्या. पठाण आणि धोनी यांनीही प्रत्येकी ६० धावा केल्या. ४५ षटकांनंतर सचिन ३०५-५ या धावसंख्येवर बाद झाला त्यानंतर इतरांनी ५ षटकात केवळ २३ धावा केल्या. सामना ४७ षटकात संपवावा लागला व ३११-७ या धावसंख्येवर डकवर्थ-लुईस कायदा वापरून या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाक विजयी झाला.
*११ सप्टेंबर २००६मध्ये क्वाला लुंपूर येथे विंडीजविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ५० षटकात ३०९-५ अशी धावसंख्या रचली. सचिन नाबाद राहिला, पण सचिनच्या १४९ चेंडूत १४१च्या डावानंतर फक्त पठाणचेच अर्धशतक होते, विंडीजला फक्त २० षटके मिळाली व त्यात १४१-२ अशा धावा करून डकवर्थ-लुईस कायद्यानुसार या अत्यंत चुरशीच्या सामन्यात वींडिज विजयी झाला.
*१२ नोव्हेंबर २००९मध्ये हैद्राबादला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारताला ३५१ धावा करायच्या होत्या. सचिनने केवळ १४१ चेंडूंत १७५ धावा केल्या. भारत तीन धावांनी सामना हरला. सचिनखेरीज ५९ धावा करत फक्त रैना चांगला खेळला. बाकीच्यांनी चैन केली!
*१३ २०११च्या विश्चचषक स्पर्धेतील १२ मार्चला झालेल्या या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने १०१ चेंडूंत १११ धावा काढल्या. तो बाद झाला त्यावेळी १ बाद २६७ या धावसंख्येवर सचिन बाद झाला. त्यानंतरच्या फलंदाजांनी फक्त २९ धावा केल्या व भारताची धावसंख्या झाली सर्व बाद २९६! दक्षिण आफ्रिकेने नेहराच्या शेवटच्या षटकात चार चेंडूंत १४ धावा फटकावत आपली धावसंख्या पार करून सामना जिंकला!
सचिनच्या शतकी खेळीने भारताला पराजयापेक्षा विजयच जास्त मिळवून दिले आहेत हेच वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता सचिनने अर्धशतक साजरे केलेल्या पण शतकापर्यंत न पोचलेल्या खेळींत काय झाले ते पाहू.
आजपर्यंत सचिनने ९३ वेळा सचिनने अर्धशतक साजरे केले आहे त्यापैकी ५६ वेळा भारताला विजय मिळाला असून ३५ वेळा त्याचा पराजय झालेला आहे. दोन सामन्यात निकाल लागू शकला नव्हता. याहून अधीक खोलात जाऊन अभ्यास केल्यास त्याने ७० ते ९९ धावा काढलेल्या खेळींत २८ वेळी भारत जिंकला आहे असे लक्षात येईल.
आता इतर शतकवीरांबरोबर सचिनच्या शतकांची तूलना आणि किती फलंदाजांच्या शतकी खेळींचे विजयात परिवर्तन झाले आहे हे पाहू. इथेही तेंडुलकर आपल्या टीकाकारांची तोंडे बंद करून टाकतो. कारण सगळ्यात जास्त विजय मिळवून देणारा शतकवीरही सचिनच आहे. खाली जी यादी दिलेली आहे ती आहे विजय किती वेळा मिळविला आणि किती शतके केली याची! शिवाय आपला संघाला विजयी करून खेळीत जास्तीत जास्त वेळा नाबाद राहिलेला फलंदाजही सचिनच आहे!
फलंदाज देश शतके नाबाद सर्वोच्च
सचिन भारत 33 13 200*
जयसूर्या लंका 24 5 189
पॉंटिंग ऑस्ट्रे. 25 8 145
सौरव भारत 18 10 183
लारा विंडीज 16 3 169
गिलख्रिस्ट ऑस्ट्रे. 16 1 172
डे. हेन्स विंडीज 16 10 152*
सईद पाक 16 6 194
मार्क वॉ ऑस्ट्रे. 15 4 173
ह. गिब्ज द. आ. 15 1 175
सचिनची १४ शतके दुसर्या) डावात प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या ओलांडताना केलेली आहेत. आता त्याच्या तुलनेत इतरांची कामगिरी पाहू.
फलंदाज देश शतके
सचिन भारत १४
पॉंटिंग ऑस्ट्रे. ८
लारा विंडीज ७
इंजमाम पाक ३
रिचर्ड्स** विंडीज ३
द्रविड भारत २
(** सर व्हिवियन रिचर्ड्स)
वरील पराक्रमाबरोबरच एकदिवशीय सामन्यांत सचिनने सामनावीराचा आणि स्पर्धावीराचा सन्मान इतर कुणाहीपेक्षा जास्त वेळा मिळविलेला आहे.
या सर्व आकडेवारीवरून भारताच्या विजयात तेंडुलकरचा असामान्य हिस्सा होता हेच सिद्ध होते. भारताच्या विजयाचा तो नेहमीच एक मोठा शिल्पकार ठरलेला आहे.
त्याचे टीकाकार कांहींही म्हणोत, पण भारताच्या आणि एकंदरच क्रिकेटच्या खेळाच्या संदर्भात पहायचे झाल्यास सचिनचे योगदान अतीशय उच्च प्रतीचे आहे यात शंका नाहीं. आपल्या झंझावाती खेळाने सचिनने भारतीयांना क्वचितच मनस्ताप दिला असेल. जास्तीत जास्त वेळा त्याने भारतीय प्रेक्षकांना आनंद मिळवून दिला आहे. परवाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही हेच पुन्हा दिसून आले. तो बाद झाल्यावर बाकीचे "भले-भले शिपाई ढळाढळा रडले" हेच आपण पाहिले! पण असल्या भल्या-भल्या शिपायांच्या अपयशाचे खापर सचिनच्या डोक्यावर का फोडायचे?
जय सचिन!
Comments
श्री. नाफडे व श्री. धोंगडे यांचे आभार
मूळ लेखात ऋणनिर्देश करायचा राहून गेला. या लेखासाठी माहिती पुरविल्याबद्दल श्री. नाफडे व श्री. धोंगडे यांचे आभार!
___________
जकार्तावाले काळे
खेळातील अंधश्रद्धा निर्मूलन
लेख वर वर चाळला पण आशय लक्षात आला. :-)
मान्य. यात काहीही तथ्य नाही पण वरील वाक्य लय भारी आहे असे मला आपले वाटते. ;-) त्यातून बाकी काही नाही तरी "सचिन सेंच्युरी मारतो आणि बाकी ढेपाळतात." असे प्रतीत होते म्हणून. (अर्थात त्यातही तथ्य नाहीच म्हणा)
अवांतरः अशाचप्रकारे आमच्या कोल्ट्सच्या फूटबॉलटीमबद्दल एखादा म्हणाला 'तुमची टीम चांगली आहे. उत्तम आहे' तर आम्ही त्याला "पण आमच्या टीमच्या नावातच 'इंडिया' आहे. तेवढे पुरेसे आहे." असे उत्तर देतो.
टक्केवारी
ह्याचा अर्थ कळला नाही.
तसेच आकडेवारी टक्केवारीत द्या. सचिनची किती टक्के शतके पराजयाच्यावेळी झाली. आणि इतर खेळाडूंची किती टक्के झाली.
सचिनच्या शतकाने भारत हरतो असे मानणे ही अंधश्रद्धाच आहे, पण सचिनला पर्सनल रेकॉर्डस बनवण्यात रस असतो हे नाकारता येत नाही. आणि स्वतः सचिन प्रचंड अंधश्रद्धाळू असल्याने (कालसर्प योग/नागबळी विधी इ.) क्रिकेटच्या कक्षेबाहेर मला तो बिनडोक वाटतो.
नजरचुकीने 'शतक' लिहायच्याऐवजी 'षटक' लिहिले गेले.
नजरचुकीने 'शतक' लिहायच्याऐवजी 'षटक' लिहिले गेले. आता अर्थ उघड झाला असेल.
___________
जकार्तावाले काळे
??
क्रिकेट मध्ये येण्याचा निर्णय क्रिकेटच्या कक्षेबाहेरुनच घेतला गेला होता.
मग?
.
बिनडोक
मग बिनडोकपणा करून सचिन क्रिकेट मध्ये आला काय? असा त्या वाक्याचा अर्थ होता.
.
मी बिनडोक म्हणालो मतिमंद नाही.
:)
मंद-मती न म्हणता बिन-डोक म्हणता :) पण हे तुमचे म्हणणेच आमची चिकित्सा आहे. आता त्यात फरक नाही हे आमच्यासाठी तात्पुरते सिद्ध झाले.
:))
बिनडोक आणि मतिमंद ह्यातील फरक तुम्हाला कळणार नाही ह्याची कल्पना होतील. तो प्रतिसाद बाकीच्या उपक्रमींसाठी आहे.
खूप गति
--क्रिकेटच्या कक्षेबाहेर मला तो बिनडोक वाटतो.---
प्रसिद्ध व्यक्तिंबद्दल अशी वाक्ये टाकली की आपल्याला ह्या विषयात खूप गति आहे हे समजते.
डार्क मॅटर ह्यांना...........
....विषय काय ..प्रतिक्रिया काय ????? मी ही नागबळी विधी केला आहे.... ह्या नवीन माहितीमुळे मला तेंडुलकर अजुन जास्त आवडू लागला आहे...........
तर?
"ईश आपटे (आयडी ३६१२) इतका हुशार" ही स्तुती नव्हे.
बरं
ह्या वर्षीचा नोबेल पुरस्कार तुम्हाला आणि आजुनकोणमी ना विभागून देऊया.
बिनडोक सचिन
पूर्णपणे सहमत. सचिनचे समकालीन असलेल्या अनेक चतुर खेळाडूंनी मॅच फिक्सिंग (अझर व कंपनी), दारूच्या जाहिराती (धोणी व ग्यांग), लैंगिक साहसे (टायगर वूड्स) वगैरे डोकॅलिटीवाले प्रकार केले आहेत. [ही केवळ वानगीदाखल उदाहरणे झाली] अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता बाद असल्यास स्वतःहून क्रीज सोडणारा सचिन, उद्दाम पॉँटिंगच्या तुलनेत बिनडोक वाटणारच.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
?
दारूच्या जाहिराती करणे ह्यात काय गैर बॉ?
स्वतः सचिन प्रचंड अंधश्रद्धाळू असल्या...
सहमत आहे!!!
बिनडोकच आहे तो.. उगाच जगभरातल्या बोलर्सना बडवत, नवनवीन विक्रम घडवत राहिला, त्याने विज्ञानवादी होऊन इथे कळ्फलक बडवत काथ्या कुटायला हवा होता. आयुष्य सार्थकी लागलं असतं.
धोनी
बीसीसीआय संघाचे कप्तान श्री. धोनी यांनी विजयानंतर मुंडन केले आणि ते केस बालाजीला अर्पण केले. दोन तीन दिवस वाट पाहूनही याबाबत डार्क मॅटर यांची काहीही प्रतिक्रिया आली नाही हे थोडेसे रोचक वाटले. यावरून अशा प्रसंगांत केवळ सचिनलाच टारगेट करायचे असे डार्ट मॅटर यांचे धोरण असावे अशी शंका आली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धोनी
१. धोनीने मुंडन का केले ह्याचा खूप शोध घेऊनही कारण सापडले नाही. तुम्हाला सापडले असल्यास कृपया दुवा द्या.
२. धोनीची भक्ती करणारा धागा भक्त मंडळींनी काढला तर तिथेही नक्की मत व्यक्त करु.
खूप शोध?
नक्की कसला खूप शोध घेतला हे कळाल्यास बरे होईल. कारण Dhoni+Shave+Balaji असे तीन शब्द टाकले तरी हवे तेवढे दुवे मिळतात
हे पाहा
माहितीबद्दल आभारी आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
खूप
धोनीने स्वतःहून कसलेही स्पष्टीकरण नाकारले आहे. त्याने बालाजीसाठी मुंडन केले हे त्याच्या सहकार्यांमुळे कळले असे तुम्ही दिलेल्या दुव्यांचा शोध घेतला असता समजले. मी ह्या विषयीचे धोनीचे वक्तव्य शोधत होतो म्हणून मला खूप शोध घेउनही काही सापडले नसावे.
बाकी धोनी दारूच्या जाहिराती करतो तर त्यात आक्षेपार्ह काय हे तुम्ही सांगीतले नाहीत.
चुकीची दुरुस्ती
<<या १३ पराजयातल्या शतकाखेरीजच्या उर्वरित ३५ षटकात भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.>> हे वाक्य <<या १३ पराजयातल्या शतकाखेरीजच्या उर्वरित ३५ शतकात भारताने ३३ सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व एकात बरोबरी झाली हे आपण वर पाहिले आहेच.>>
संपादकांपैकी कुणी वरील दुरुस्ती केल्यास आणि ऋणनिर्देशाचे राहून गेलेले वाक्य मूळ लेखात घातल्यास माझे दोन्ही प्रतिसाद उडवायला हरकत नाहीं.
___________
जकार्तावाले काळे
ओके
समजले! पण टक्केवारी? उदा. जयसुर्याने केलेल्या २४ शतकांपैकी किती सामन्यात श्रीलंकावाले हारले? अशी आकडेवारीही द्या ना.
(मीच थोडा शोध घेतला. इथे जयसुर्याची शतके आहेत. जयसुर्याच्या २४ शतकांपैकी फक्त ३ सामन्यांत श्रीलंका हारले म्हणजे १२.५%. हीच टक्केवारी सचिनची काढल्यास २७% निघते {४८ शतके १३ पराभव}. दुप्पटीहून जास्त!..आता बोला!)
वेगळा मुद्दा
मूळ लेखात जो मुद्दा मांडला आहे त्यापेक्षा वेगळा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे.
'सचिनने शतक केल्यावर भारत हरतो' हे विधान खोडून काढण्यासाठी लेखात दिलेली आकडेवारी पुरेशी आहे. तेवढाच लेखाचा उद्देश आहे.
'सचिनने शतक केल्यावर भारत जितक्या वेळा हरतो तितक्याच वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा इतर खेळाडूंनी केलेल्या शतकांनंतर त्यांचे संघ हरतात' हे वेगळं विधान आहे. चर्चा विस्तृत करायला हरकत नाही, पण मूळ लेखकाने दिलेला विदा मूळ लेखात नोंदलेला गैरसमज खोडून काढायला पुरेसा आहे हे ध्यानात ठेवणं योग्य. अंधश्रद्धा खोडून काढणं मुळातच सोपं नसतं... अंधश्रद्धा बाळगणारे बहुतेक वेळा सादर केलेला विदा नाकारताना अशी चर्चेची दिशा वळवतात, म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
सचिन भारतासाठी पुरेसं करत नाही, किंवा स्वतःसाठीच खेळतो ही दुसरी, जास्त व्यापक अंधश्रद्धा वाटते. ती खोडून काढण्यासाठी काय काय सिद्ध करावं लागेल माहीत नाही. सिद्ध करूनही श्रद्धावंतांचा विचार बदलू शकेल की नाही याबद्दल मी कोण बोलणार?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
विस्तृत
सचिनने शतक केल्यामूळे भारत हरतो असे मूळ विधान असेल तर ती अंधश्रद्धाच आहे असे मी पहिल्याच प्रतिसाद लिहिले आहे. मुद्दा हा आहे की सचिन संघापेक्षा स्वतःची रेकॉर्डस बनवायला अधिक प्राधान्य देतो का? तसे करत असेल तर त्याचे लक्ष शतके ठोकण्यावरंच केंद्रित होऊन संघाच्या विजयासाठी तो कमी पडणार आणि त्यामूळे काही प्रसंगी संघ हारणार.
मग इतर खेळाडूंची आकडेवारी ह्या लेखात देण्याचे प्रयोजन काय समजले नाही.
एकदिवसीय सामन्यात जेव्हा एकच खेळाडू १०० धावा ठोकतो तेव्हा अर्थातच त्या संघाच्या खूप धावा होतात आणि जिंकण्याचे ऑड्स आपोआप खूप वाढलेले असतात.असे असूनही संघ २५% इतकक्या मोठ्या प्रॉबॅबीलीटीने हारत असेल तर संशय घेण्यास जागा आहे. म्हणून बाकीच्या शतकविरांची ही आकडेवारी काढली पाहिजे असे माझे मत आहे.
सचिनला देवंच मानायचं असलं तर कुठल्याच आकडेवारीची गरज नाही.
फरक पडत नाही
एका खाजगी संघाच्या एका खाजगी खेळाडूने स्वतःसाठी खेळले तर त्यात नक्की वावगे काय आहे हे समजले नाही. बीसीसीआयच्या संघाच्या पराभवाचा किंवा विजयाचा भारत देशाशी नेमका काय संबंध आहे?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
संघाला फरक पडतो
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. बीसीसीआयचा संघ असो की भारताचा. स्वत:साठी खेळणे हे संघाच्या हितासाठी चांगले नाही.
मग ठीक आहे
बीसीसीआयच्या संघाशी आमची विशेष इमोशनल अटॅचमेंट नसल्याने सचिनने स्वतःसाठी खेळून आम्हाला आनंद दिला तरी बरे वाटते.
शिवाय सचिनने शतक करूनही इतर 'सांघिक' खेळाडूंनी काय दिवे लावले आहेत हे जाकार्तावाल्या काळेकाकांनी स्पष्ट केलेच आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
फॉल्सिफायेबिलिटी
'सचिन संघापेक्षा स्वतःची रेकॉर्डस बनवायला अधिक प्राधान्य देतो' हा तुमचा वर्किंग हायपोथेसिस आहे का? तो या लेखाच्या कक्षेच्या बाहेरचा आहे एवढंच म्हणायचं होतं. ती श्रद्धा नसेल, तर काय आकडेवारी, किंवा विदा दिल्यास तो चुकीचा आहे हे मान्य कराल ते सांगा. फॉल्सिफायेबिलिटीची काय टेस्ट आहे?
सचिनला देव मानण्याचा प्रश्न नाही, या लेखात सचिनला पनवती मानणं खोडण्याचा प्रयत्न आहे. मी तर म्हणेन 'सचिन हा उपयुक्त खेळाडू आहे'. तुम्ही जर त्याला स्वार्थी म्हणत असाल तर काही तरी विदा द्या, व फॉल्सिफायेबिलिटीचे निकष द्या. नाहीतर ती अंधश्रद्धाच. अंधश्रद्धा असायला हरकत नाही, प्रत्येकाच्याच काही ना काही असतात.
'खूप' हा अशास्त्रीय शब्द झाला. 'खूप' खोलवर अभ्यासातून आला असावा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
मला वाटते
उपांत्य फेरीत आलेल्या इतर संघांचे कप्तान सर्वाधिक बळी (आफ्रिदी), भरपूर धावा (संगकारा आणि टेलर) करत असताना, बीसीसीआयच्या संघाच्या कप्तानाला बोंबलत अजून एक अर्धशतकही करता आलेले नाही. स्पर्धेतील त्याच्या एकूण धावांनी शंभरी ओलांडलेली नाही.
मला वाटते सचिनने देखील धोन्याप्रमाणेच काहीही कॉन्ट्रिब्युशन न करता संघात राहावे म्हणजे संघाचा विजयपथ सुकर होईल व सचिनवर निष्कारण होणारे आरोप थांबतील.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शंका
???
:)
हा आपला माझा समज आहे. पण माझ्याकडे काही विदा नाही बरंका... ;) हघ्याहेवेसांन
माझा मुद्दा असा आहे, की एखादी छोटीशी अंधश्रद्धा असेल डार्क मॅटर यांची तर ते मी काही त्यांच्या विज्ञानवादी प्रवृत्तीच्या विरोधात मानणार नाही. ;)
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
:)
'छोटीशी' हा अशास्त्रीय शब्द झाला. 'छोट्याश्या' अभ्यासातून आला असावा.
प्रति
होय.
पूर्णपणे आहे असे मला वाटत नाही. बाकीच्या खेळाडूंची तुलनात्मक आकडेवारी देण्याचे प्रयोजन काय ते समजले नाही.
'ती' म्हणजे तुम्ही दिलेले वर्किंग हायपोथेसीस का? तसे असेल तर, १. ही श्रद्धा आहे असे तुम्हाला का वाटले? २. कशाप्रकारची आकडेवारी हवी हे मी वरती दिलेले आहे.
जे टिकाकार सचिनने शतक आणि तरीही भारत जिंकण्यास असफल ह्यावर बोट ठेवतात ते सगळेच सचिन हा पनवती आहे अधोरेखित करत नसतात. (जे कुणी करत असतील तर ते मूर्खच आहेत.) सचिनच्या फ्यान्सना माझ्यामते अधिक काय बोचते तर ते म्हणाजे स्वार्थीपणाचा आरोप. सचिनच्या स्वार्थीपणामूळे शतक होऊनही भारतीय संघ विजयासाठी असफल ठरला ही खरी टोचणी आहे.
माझे असे म्हणणे नाही की हे सिद्ध झालेले आहे (किंवा माझी तशी 'श्रद्धा' आहे) वरील लेख त्याविषयी काहीही माहिती पुरवत नाही इतकेच मी सुरुवाती पासून म्हणत आहे.
पुन्हा तेच. मी सचिनला कुठे स्वार्थी म्हंटले आहे ते दाखवून द्यावे. सुरुवातीपासून मी ही अजून विदा द्या असेच म्हणत आहे. पण् सचिनला देव मानणार्यांना तीही ब्लास्फेमी वाटत आहे.
खूप म्हणजे सरासरीपेक्षा जास्त.
निकष स्पष्ट हवेत
विदा नसताना एखादा वर्किंग हायपोथिसिस सत्य मानत राहाणं यापेक्षा श्रद्धा वेगळी कशी?
ती खरी तर तुमच्या हायपोथिसिसच्या समर्थनार्थ दिलेली प्राथमिक आकडेवारी वाटते... हायपोथिसिसच्या फॉल्सिफायेबिलिटीचे निकष थोडे अधिक काटेकोर आणि नेटके असायला हवे.
अरेच्च्या, मग तुमच्या वर्किंग हायपोथिसिसचा नक्की दुसरा अर्थ काय?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हायपोथेसीस
मी हायपोथेसीस आहे असे म्हंटले आहे. (वर्किंग हायपोथेसीस म्हणजे 'अपुर्या माहितीवरचा अंदाज' असे काही असते असे मला वाटते) ते सत्य आहे असे कुठे म्हंटले आहे? प्राथमिक आकडेवारीवरुन असे हायपोथेसीस मांडायला हरकत नाही. ते सिद्ध करण्यासाठी आणखी आकडेवारी हवी. फॉल्सिफायेबिलिटीचे निकष कशाप्रकारचे असावेत ह्यासाठी प्राथमिक निकष दिला आहे. जो कठोर नसला तरी मूळ लेखापेक्षा नक्कीच अर्थपूर्ण आहे. जाकार्तावाले काळे ह्यांनी त्यावर आणखी आकडेवारी देण्याचे सुचित केले आहे.
हा दुवा पउघडून पहा
राजेश,
हा दुवा मला माझ्या लेखाच्या एका वाचकाने आताच पाठविला. अजून उघडून अभ्यास केलेला नाहीं पण प्रथमदर्शनी सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील असे वाटते!
http://www.sachinandcritics.com/
___________
जकार्तावाले काळे
गरज नाही
बापरे. एवढी मोठी साईट. पण खरे तर सचिनप्रेमींनी एवढे डिफेन्सिव होऊ नये. सचिनच्या खेळाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांकडे सरळ दुर्लक्ष करावे. सचिनचा खेळ समोर पाहत असताना मिळणारा आनंद लाखमोलाचा आहे. बीसीसीआयचा संघ जिंकतो किंवा हारतो यावर त्याच्या खेळाचे मूल्यमापन होऊ नये असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पटले नाही
'सचिनने शतक केल्यास
भारतत्याचा संघ हरतोच (संघ हरण्याची शक्यता १ असते)' असा दावा कोणीच केला नसावा (केला असल्यास सचिनच्या शतकानंतरही त्याचा संघ जिंकल्याचे एक उदाहरणही त्यांना अंधश्रद्ध ठरविण्यास पुरेल). त्यामुळे, 'सचिनने शतक केल्यास त्याचा संघ हरण्याची शक्यता मोठी (परंतु १ पेक्षा छोटी) असते' या विधानालासुद्धा असिद्ध करण्यासाठी धागा काढण्यात आलेला असावा. 'सचिनने शतक केल्यास त्याचा संघ हरण्याची शक्यता (जयसूर्याने शतक केल्यास त्याचा संघ हरण्याच्या शक्यतेपेक्षा) मोठी असते' हे विधान अंधश्रद्धा नाही. त्या विधानाला असिद्ध करण्यासाठी, 'सचिनचे शतक हा घटक परिणामकारक (सिग्निफिकन्ट) नाही' असे सिद्ध करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी इतर खेळाडूंशी तुलना उपयुक्त ठरू शकेल.याचा अर्थ श्रीलंका 'एकखांबी तंबू' नाहींय्!
याचा अर्थ श्रीलंका 'एकखांबी तंबू' नाहींय्! त्यांचे इतर फलंदाजही चांगले खेळतात.
___________
जकार्तावाले काळे
दोन एप्रिलनंतर जरा अभ्यास करून आकडे देण्याचा प्रयत्न करेन.
दोन एप्रिलनंतर जरा अभ्यास करून आकडे देण्याचा प्रयत्न करेन.
___________
जकार्तावाले काळे
धन्यवाद!
त्यावर चर्चा करायला नक्कीच आवडेल.
शंका
त्याने शतक बनविल्यामुळे इतरांना मत्सर वाटून ते हरतात, असा आरोप "सचिनने शतक बनविले की भारतीय संघ (म्हणजे काय? ऑलिंपिकप्रमाणे देशाचे प्रतिनिधित्व तर क्रिकेटमध्ये सचिन करीत नाही! फुकाचा अभिमान कशाला?) हरतो" या विधानात दडलेला नसावा काय? त्याला तशा पराभवाबद्दल कोणी 'जवाबदार' मानतात काय?
--
विषय आवडीचा/ओळखीचा नसल्यामुळे आधीच 'पास' म्हणून टाकतो.
धन्यवाद
काळे साहेब, आपल्या ह्या अमुल्य माहितीसाठी मनापासून धन्यवाद!.
सचिन वर होणाऱ्या या आरोपाचा दुसरा अर्थ "सचिन शतकी खेळी करत नाही तेंव्हा (बऱ्याच) वेळेस भारत जिंकतो" असा अंधश्रद्धाळूपणे काढला जाऊ शकतो, तसे केल्यास त्याचे शतक न करणे देखील महत्वाचे होते. म्हणजे तो खेळला काय आणि नाही काय त्याचे असणे विजयासाठी गरजेचे आहे. :)
क्रिकेटप्रेमी
जाकार्तावाले काळे साहेब क्रिकेटप्रेमी आहेत हे नक्की.
तोच तर फरक आहे राजे
जयसुर्याने जरी शतक केले किंवा सचिनने जरी शतक केले तरी दुसर्या टीमच्या १० विकेट काढणे किंवा त्यांना रोखणे हेही महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शतक काढणार्या फलंदाजाला अजून किमान दोन जणांनी ५०-५० धावा काढून साथ द्यावी लागते.
असं भारतीय(किंवा बीसीसीआयच्या) संघात होत नाही. पण श्रिलंकेच्या संघात होतं हेच सिद्ध होत नाही का? मग अशा वेळी शतक काढणारा फलंदाज दोषी की बाकीचे दोषी?
जयसुर्याला रणतुंगा, डिसिल्वा, संगक्कारा, जयवर्दने वगैरे फलंदाज आणि मुरली, चमिंडा वास असे बोलर आणि असंख्य अष्टपैलू खेळाडूंची साथ मिळायची. सचिनला कोणाची साथ मिळायची हे वर काळेंनी सविस्तर सांगीतले आहेच.
हा प्रतिसाद डार्क मॅटर यांच्या जयसुर्या संबंधी प्रतिसादाला होता. चुकुन इकडे पडला.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
दोषी
अर्थातच शतक काढणारा फलंदाज दोषी. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इतर संघसदस्य नेमाने पॅव्हिलिअनची वाट चालत असताना सचिनसारखे खेळाडू स्वतःसाठी खेळतात म्हणजे काय!!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
काही बोलतात राव हे ........चे.
सचिनने शतक केले की भारत हरतो, म्हणजे सचिन संघात असायला हवा आहे परंतु त्याने शतकी खेळी करु नये असेच या "अंधश्रधेचे" उत्तर असावे असे वाटते, आपल्या कडे निवडुंग किंवा तत्सम काटेरी झुडपे विपुल प्रमाणात मिळतात त्याची एक जाडजुड फांदी काढुन एकदा या अंधश्रध्दाळु लोकांच्या .....भागावर त्याचा शिक्का उमटवावा म्हणजे यांना या प्रश्नाचे उत्तर मिळेल, सचिन काही दिवसातच निवृत्त होईल त्यानंतर काय आपला संघ प्रत्येक सामना जिंकणार आहे ? काही बोलतात राव हे ........चे.
वा!!
काहीही म्हणा, पण चर्चेमधे हा प्रतिसाद आपल्याला सर्वात आवडला ;)
(सचिनचा फॅन)
- सूर्य.
चांगला लेख
सचिनची फलंदाजी संपली की आमच्यासाठी सामना संपतो. बीसीसीआयच्या इतर दिवट्यांच्या पराक्रमाकडे लक्ष द्यायला फुरसत नसते. सचिनने शतक केल्यानंतर धोन्यासारख्या अनेक खेळाडूंच्या पोटात दुखत असल्याने हे सामने हरण्याचे प्रकार हल्ली अधोरेखित होऊ लागले आहेत.
बाय द वे भारताचा पराभव म्हणजे काय? बीसीसीआयचे अध्यक्ष भारताचे राष्ट्रपती आहेत का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥