मुद्रा भद्राय राजते

कुमार केतकर म्हणतात की प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा शिवाजीने स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळेस सुरू केली. विकिपीडियावर मात्र येथे असे दिले आहे की शिवाजी लहान असतानाच शहाजीने ती राजमुद्रा बनविली होती. अधिकृत इतिहासानुसार सत्य काय आहे?
--
केतकर यांच्या मते 'मुद्रा भद्राय राजते' या विधानावरून असे सिद्ध होते की शिवाजीचे राज्य हे जगातील पहिले कल्याणकारी राज्य होते.

अशोक, अकबर, इ. सम्राटांची राज्ये शिवाजीच्या राज्याप्रमाणेच कल्याणकारी नव्हती काय?
'मुद्रा भद्राय राजते' या विधानाचा अर्थ 'राज्य लोककल्याणासाठी आहे' असा होतो की 'मुद्रा शिवाजीच्या शुभशकुनासाठी आहे'?

लेखनविषय: दुवे:

Comments

नेमके कुठे?

विकिपीडियावर मात्र येथे असे दिले आहे की शिवाजी लहान असतानाच शहाजीने ती राजमुद्रा बनविली होती.

मला असे वाक्य आढळले नाही (माझी पाहण्यात चूक झाली असेल, तेव्हा नेमके कुठे आहे? सेक्शन?)

शहाजीला संस्कृत भाषेचे प्रेम होते ही गोष्ट खरी आहे. त्याची पाळेमुळे खणली तर श्रेय मालोजीराजांना जाते. आपले कुळ आणि मुले खानदानी मराठ्यांप्रमाणे नावारूपाला यावीत म्हणून त्यांनी शहाजींना चांगले शिक्षण दिले होते. त्यात संस्कृताचा समावेशही होता.

अशोक, अकबर, इ. सम्राटांची राज्ये शिवाजीच्या राज्याप्रमाणेच कल्याणकारी नव्हती काय?

होती ना पण ते आधी राजे होते, नंतर त्यांना उपरती झाली आणि त्यानंतर त्यांची राज्ये कल्याणकारी झाली. तोपर्यंत ती कल्याणकारी नव्हती असेच म्हणावे लागेल. महाराजांचे तसे झाले नाही. त्यांचे "ट्रान्सफॉर्मेशन" झाल्याचे दाखले नाहीत.

केतकर यांच्या मते 'मुद्रा भद्राय राजते' या विधानावरून असे सिद्ध होते की शिवाजीचे राज्य हे जगातील पहिले कल्याणकारी राज्य होते.

हे जरा अतिच झाले पण मला सध्यातरी संपूर्ण जगाचा इतिहास माहित नाही पण हरून अल-रशिदबद्दलही असंच काहीसं म्हटलं जात असेल. स्वतः अकबरही हरून अल-रशिदच्या कहाण्या ऐकून प्रभावित होता. वेश बदलून रात्री फेरफटका मारत असे.

बाकी चंद्रगुप्त, हर्षवर्धन, कनिष्क, गुप्त राजे, शालिवाहन आणि अगदी शेरशाह सुरी कल्याणकारी राजे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;-)

सहमत

प्रियाली ह्यांचाशी सहमत.

होती ना पण ते आधी राजे होते, नंतर त्यांना उपरती झाली आणि त्यानंतर त्यांची राज्ये कल्याणकारी झाली. तोपर्यंत ती कल्याणकारी नव्हती असेच म्हणावे लागेल. महाराजांचे तसे झाले नाही.

+१. नक्कीच.

पहिलेच कल्याणकारी राज्य होते हा संदर्भ कदाचित मागच्या ६०० वर्षातला असावा, अन्यथा प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे चंद्रगुप्त वगरे राजांची राज्ये देखील कल्याणकारी होतीच.

मुद्रा कधी बनवली किंवा कोणी बनवली ह्यापेक्षा शिवरायांनी त्यातील अर्थ कृतीत आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचे श्रेय त्यांना अधिक जाते, नक्कीच असे स्वराज्य हवे ही शहाजी आणि जिजाऊंची इच्छा असावी.

तसेच ही मुद्रा शुभ शाकुनापेक्षा त्यांचे राज्याविषयक धोरण दर्शवते.

चांगला दाखला

विकी दुव्यात 'मुद्रा' शोधले तर लगेच उल्लेख मिळाला. लेख आवडला.
मागे एकदा आरोप झाला होता की कुमार केतकरांचा डुआयडी रिकामटेकडा आहे. त्याला हा लेख छेद देतो! कदाचित तो छेद देण्यासाठी लिहिला असावा :)

मुद्रा भद्राय राजते म्हणजे काय हे मला कळले नाही. विशेषतः मागील शब्दांशी संबंध लावून.

या वाक्यावरून 'पहिलेच' असा बोध होणे अगम्यच. 'कल्याणकारी राज्य' म्हणजे काय हे पण समजले नाही. रयतवारी पद्धत हा त्या राज्याचा एक वेगळा गुण होता. न्यायव्यवस्था, रस्ते, बांध, कालवे, गरिबांना दानधर्म, असे गणले गेले तर हे करणारे पूर्वीचे राजे अनेक असावेत. बहुतेक प्रत्येक राजाने युद्धप्रसंग नसताना विकासाची कामे केली असावी. रयतवारीचे मात्र तसे नसावे. मी वाचल्या प्रमाणे रयतवारी मलिक अंबरच्या राज्यात होती. मलिक अंबरचा प्रभाव शहाजीवर मोठ्या प्रमाणात होता.

रयतवारी ही पद्धत कदाचित अकाउंट पद्धतीस जड जाणारी असल्याने मोठ्या राजांनी त्याचा त्याग केला असावा. पुढील कालखंडात तिचा त्याग केल्याचे दिसते.

प्रमोद
प्रमोद

गफलत असावी

वयाच्या चौदाव्या वर्षी राजे (जे तेव्हा राजे नव्हतेच) आपल्या वडलांकडून (तेही राजे नव्हते) "राज"मुद्रा घेऊन आले असतील असे वाटत नाही. मुद्रा मात्र घेऊन आले असावेत कारण त्यांना जहागिर मिळाली होती. विकीवरील संदर्भ थोडा चुकीचा असावा.

विश्वकोश

विश्वकोषात आताच बघितले. त्यातही ही मुद्रा वयाच्या पंधराव्या वर्षापासून वापरल्याचा उल्लेख आहे.
मुद्रा वापरण्यासाठी सार्वभौम राजा असणे गरजेचे नसावे. पूर्वी सहीच्या ऐवजी मुद्रा वापरीत असत. काही अधिकार्‍यांना अशा मुद्रांची गरज पडत असावी.

प्रमोद

शिक्का

मुद्रा वापरण्यासाठी सार्वभौम राजा असणे गरजेचे नसावे. पूर्वी सहीच्या ऐवजी मुद्रा वापरीत असत. काही अधिकार्‍यांना अशा मुद्रांची गरज पडत असावी.

म्हणूनच वर म्हटले की राजे जहागीर सांभाळण्यासाठी मुद्रा घेऊन आले असावेत. मुद्रा या शिक्का (सिल) म्हणून वापरल्या जात. अधिकार्‍यांकडे अर्थातच मुद्रा असत. मुद्राराक्षस प्रसिद्ध आहेच.

प्रश्न हा आहे की बालपणी राजे घेऊन आलेली मुद्रा आणि राजमुद्रा या एकच आहेत का वेगळ्या आहेत? विश्वकोषात ही मुद्रा म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी वापरात आलेली मुद्रा आहे असे स्पष्ट म्हटले आहे का? जयराम पिंड्ये शहाजींच्या पदरी होते आणि नंतर शिवाजीच्या. मुद्रा त्यांनी बनवली असे वाचण्यास मिळाले पण ती केव्हा बनवली हे कळले नाही.

पण समजा गफलत नसेल आणि खरेच शहाजींनी असा शिक्का बनवून दिला असेल तर स्वराज्याचा पाया शहाजींनी घालायचे ठरवले होते असे म्हणता येईल. :-) 'प्रतिप्रदेच्या चंद्रासारखी वाढत जाणारी' हे शब्द पुरेसे वाटतात.

राज्याभिषेकापूर्वीची शिवाजीराजांची कागदपत्रे असल्यास मुद्रा तपासणे सहज सोपे आहे. इथे विश्रामबागवाड्यातील एका पत्रात "राज"मुद्रा दिसते आणि पत्र १६४७ मधील असल्याचे म्हटले आहे.

हो

विश्वकोशात त्याच मुद्रेचे चित्र आहे. आणि तसे स्पष्ट म्हटले आहे. विश्वकोशातील वाक्य 'शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृत श्लोकबद्ध असीन ती बहुधा शहाजींनी घडवली असावी' हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी कायम राहिली असे ही पुढे म्हटले आहे.
प्रमोद

अर्थ

कुमार केतकर म्हणतात की प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा शिवाजीने स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळेस सुरू केली.

केतकरांशी येथे देखील असहमत. :(

विकिपीडियावर मात्र येथे असे दिले आहे की शिवाजी लहान असतानाच शहाजीने ती राजमुद्रा बनविली होती.

शहाजीराजांनी बनवली का ते माहीत नाही, पण अगदी असली तरी ती शिवाजीसाठीची होती, शहाजीची नाही.

'मुद्रा भद्राय राजते' या विधानाचा अर्थ 'राज्य लोककल्याणासाठी आहे' असा होतो की 'मुद्रा शिवाजीच्या शुभशकुनासाठी आहे'?
लहानपणापासून ऐकलेला अर्थ काहीसा, "शहाजीपुत्र शिवाजीची ही राजमुद्रा ही लोककल्याणार्थ शोभत आहे" असा असल्याचेच आठवते...

अवांतरः गुगलून बघत असताना एका हिंदी ब्लॉगवर दिलेला खालील (अन्)अर्थ वाचल्यावर हताश होयला झाले... ;)

उसकी मुद्रा के माध्यम से, शिवाजी महाराज अपनी प्रजा को आश्वासन दिया है कि 'कभी चंद्रमा, शिवाजी की किंगडम, शाहजी का बेटा, जैसे बढ़ाने से हमेशा लोगों के कल्याण की तलाश करेंगे.'

मुद्रा

शिवाजी लहान असताना या सरदारपुत्राच्या चेहऱ्याचं कौतुक करणारी कोण्या संस्कृत कवीने लिहिलेली ही ओळ तर नव्हे?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

राजस मुद्रा वेष मुनींचे

हा गीतरामायणातील उल्लेख नक्कीच लव - कुशांच्या चेहर्‍याबद्दल आहे. शब्दकोशात नसला तरी "मुद्रा" शब्द "चेहरा" या अर्थाने मराठीत वापरलेला अनेकदा वाचलेला आहे. उदा. त्याच्या मुद्रेवरील भाव झरझर बदलले. संस्कृतात किंवा मराठीत त्याकाळी वापरीत किंवा नाही कल्पना नाही. तरीही घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे बाल शिवाजीला पाहून जयराम पिंड्यांनी हा श्लोक लिहिलेला असणे आणि तोच पुढे "राजमुद्रा" म्हणून मान्यता पावणे अशक्य कोटीतले नसावे.

विश्ववंदिता|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शिवाजी लहान असताना या सरदारपुत्राच्या चेहऱ्याचं कौतुक करणारी कोण्या संस्कृत कवीने लिहिलेली ही ओळ तर नव्हे?


कोणत्याही गोष्टीकडे इतरांहून भिन्न दृष्टीने पाहायचे,वेगळा विचार करायचा हे श्री.राजेश यांचे वैशिष्ट्य आहे.असा अर्थ असू शकतो हे सहसा कुणाच्या लक्षात येत नाही.या अर्थात विश्ववंदिता हा शब्द तितकासा बसत नाही.तसेच मुद्रा शब्दाचा अर्थ चेहरा असा होत नाही.भुवया, डोळे,नाक,आदींच्या द्वारे विशिष्ट भावाची अभिव्यक्ती म्हणजे मुद्रा असा अर्थ प्रचलित आहे.

चंद्र वाढतो कले कलेने

विश्ववंदिता पुढे येते पण प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखा वाढत जाणारा चेहरा???

चंद्र वाढतो कले कलेने
"चेहरा" वाढतो किलो किलोने

आम्ही शाळकरी असताना वर्गातल्या जाड्यांना हा फिशपाँड मिळायचा. चेहरा शब्दा ऐवजी पोरांची नावे असायची इतकेच.

असा काही फिशपाँड या मुद्रेद्वारे करण्याचा हेतू नसेल. ;-)

बाकी, चेहरा म्हणजे मुद्रा नाही हे बरोबर.

असहमत

या अर्थात विश्ववंदिता हा शब्द तितकासा बसत नाही. तसेच मुद्रा शब्दाचा अर्थ चेहरा असा होत नाही.भुवया, डोळे,नाक,आदींच्या द्वारे विशिष्ट भावाची अभिव्यक्ती म्हणजे मुद्रा असा अर्थ प्रचलित आहे.

विश्ववंदिता हा शब्द अगदी चपखल बसतो. जहागिरदार म्हणजे राजाच त्या प्रदेशाचा. आणि राजपुत्राला त्याच्या आसपासचं सगळंच विश्व वंदन करतं. कदाचित त्या कवीला म्हणायचं असेल की आत्ता त्याचं राज्य या चिमुकल्या परगण्याचं असलं तरी सगळं विश्व म्हणजे पातशाहीदेखील वंदन करते (करो हे अभिप्रेत). आणि शब्द तसे स्वस्त असतात. कोपऱ्यावरचा चहावालासुद्धा आपल्या टपरीला विश्वश्रेष्ठ चहावाला म्हणवून घेऊ शकतो.

विश्ववंदिता पुढे येते पण प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखा वाढत जाणारा चेहरा???

लहान मुलाचा चेहरा वाढतच जातो. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी चुणूक ही मोठेपणी कर्तृत्वशाली माणसाची करारी नजर बनते. याला वाढणाऱ्या चंद्रकलेची उपमा सुंदर आहे असंच मी म्हणेन.

बाकी, चेहरा म्हणजे मुद्रा नाही हे बरोबर.

पण म्हणून मूळ मुद्दा खोडला जात नाही. विशिष्ट अविर्भावदेखील विश्ववंदित असतात - गौतम बुद्धाची शांत मुद्रा वंदनीय आहे. राजाची मुद्रा पाहून नतमस्तक होणारं विश्व हे कुठच्याही राजाला (आपल्या पोराच्या बाबतीत) सुखावणारं वाटणारच. शहाजीने चांगली भरपूर बिदागी दिली असेल त्या कवीला.

बरं, मुद्रा या शब्दाचा अर्थ सतराव्या शतकाच्या सुरूवातीला चेहरा असा नव्हता, हे आपल्याला खात्रीलायकरीत्या माहीत आहे का? नाहीतर आजचे निकष वापरून इतिहासाकडे बघणं होईल, ते तर फारच वाईट.

फिशपॉंड वगैरे अवांतराकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे, उपक्रमावर कुठे मारणं वगैरे करत नाहीत म्हणून. ;)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विचारा वेळ द्या थोडा

मुद्रा या शब्दाचा अर्थ सतराव्या शतकाच्या सुरूवातीला चेहरा असा नव्हता, हे आपल्याला खात्रीलायकरीत्या माहीत आहे का?

सतराव्या शतकाच्या सुरूवातीला मुद्रा या शब्दाचा अर्थ चेहरा असा होता हे तरी आपल्याला खात्रीलायकरीत्या माहीत आहे का? आपल्या डोक्यातून काहीतरी सुपीक कल्पना निघाली ती खरी आहे हे दर्शविण्यासाठी उगीच वाद कशाला बरे? (राज)मुद्रा या शब्दाला जो पूर्वापार अर्थ आहे - शिक्का - तोच येथे घेतलेला आहे. इतर कोणतीही काव्यात्मक कल्पना नाही.

नाहीतर आजचे निकष वापरून इतिहासाकडे बघणं होईल, ते तर फारच वाईट.

आजचे निकष वगैरे कुठून आले बरे? हे आजचे निकष आहेत असे म्हणण्याला काही संदर्भ आहेत का? नसलेले संदर्भ ओढूनताणून लावणेही फारच वाईट. ;-)

पण म्हणून मूळ मुद्दा खोडला जात नाही.

नाही, उलट त्यात काही तथ्य नाही हे जाणवत असतानाही उगीच जपला जातोय. ;-)

लहान मुलाचा चेहरा वाढतच जातो. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी चुणूक ही मोठेपणी कर्तृत्वशाली माणसाची करारी नजर बनते. याला वाढणाऱ्या चंद्रकलेची उपमा सुंदर आहे असंच मी म्हणेन.

हाहाहा! "फक्त" चेहरा वाढत जातो वगैरे संकल्पना छान आहेत. आपल्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटले.

फिशपॉंड वगैरे अवांतराकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे, उपक्रमावर कुठे मारणं वगैरे करत नाहीत म्हणून.

दुर्लक्ष करायला हरकत नाही, त्यात प्रगल्भता वाटते. बाकी "कुठे मारणं" वगैरे शब्दही चांगलीच प्रगल्भता दाखवून गेले. ;-)

असो. कितीही भलावण केली तरी मुद्रा म्हणजे चेहरा यावरून स्फुरलेले काव्य वगैरे संदर्भ पटलेले नाहीत.

मुद्रा वाढत जावो

आताच मुद्रा शब्दाचा अर्थ शब्दरत्नाकर मधे पाहिला. त्यात 'चर्चा' असा एक अर्थ आहे. पण चेहरा वा त्यावरील हावभाव असा अर्थ नाही.
तेव्हा चर्चा कलेकलेने वाढत जावो. :)

कदाचित तो 'चर्या' चा मुद्रणदोष असावा.
प्रमोद

हाहाहा!

आताच मुद्रा शब्दाचा अर्थ शब्दरत्नाकर मधे पाहिला. त्यात 'चर्चा' असा एक अर्थ आहे.

हाहाहा! तो टंकनदोष नसून सतराव्या शतकात मुद्राचा अर्थ 'चर्चा' असा होता असेही असेल. ;-)

सोडून द्या...

कल्पना खरी आहे म्हणण्यापेक्षा आक्षेप पुरेसे भक्कम नाहीत एवढंच दाखवायचं होतं.

(राज)मुद्रा या शब्दाला जो पूर्वापार अर्थ आहे - शिक्का - तोच येथे घेतलेला आहे. इतर कोणतीही काव्यात्मक कल्पना नाही.

राज हा शब्द गृहित धरण्यात लॉजिकल गोंधळ आहे, पण त्यावर वाद घालत नाही. काव्यात्मक कल्पना नाकारणं यात कल्पकतेचा अभाव वाटतो. आता समजा शहाजीला शिवाजीचं बारसं (किंवा पहिला वाढदिवस) धूमधडाक्याने साजरा करायचा असेल तर रिटर्न गिफ्टचे खलिते सील करून त्या सीलवर शिक्का मारण्यासाठी ही कविता बनवून घेतली असू शकेल...

कल्पना आवडली नसेल तर सोडून द्या.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सोडून दिले... :-)

आता समजा शहाजीला शिवाजीचं बारसं (किंवा पहिला वाढदिवस) धूमधडाक्याने साजरा करायचा असेल तर रिटर्न गिफ्टचे खलिते सील करून त्या सीलवर शिक्का मारण्यासाठी ही कविता बनवून घेतली असू शकेल...

अरेरे! (कपाळावर हात) इतिहासाची वाट लावणार्‍या "कल्पक" कवी आणि भाटांच्या नादी न लागलेलं बरं! तेव्हा मीच माघार घेते. ;-)

बाकी, शिवाजीच्या जन्मावेळी शहाजींची परिस्थिती काय होती हे वाचण्याजोगे आहे.

वेगळा पर्याय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विश्ववंदिता,मुद्रा हे शब्द अणि त्यांचे अर्थ यांची समर्पकता सोडा.त्याला फारसे महत्त्व नाही.
अर्थासाठी एक सर्वस्वी वेगळा पर्याय सुचणे महत्त्वाचे.ते कौतुकास्पद आहेच.
आपण लावलेला अर्थच बरोबर आहे असा दावा श्री.राजेश यांनी केलेला नाही.त्यांनी एक पर्याय मांडला एव्हढेच.

अकबराची उपरती

सहजच म्हणून थोडासा अवांतर प्रतिसाद लिहित आहे. सध्या मुद्दा आठवला म्हणून आणि भविष्यात गरज पडल्यास वापरता यावा म्हणून.

१३-१४ वर्षांच्या अकबराच्या हाती आलेले राज्य बैरामखानाच्या पद्धतीने चालत होते. आपल्या नातेवाइकांशी वाकडेपणा घेणे, पुढे बैरामखान शिरजोर बनतोय हे कळल्याने त्याला दूर सारणे पण आगीतून फुफाट्यात पडल्याप्रमाणे महमअंगाच्या 'परकरी शासना'पुढे मान तुकवणे, अधमखानाचा शिरजोरपणा वगैरे अशा आप्तांनी केलेल्या राजकारणातून अकबर खूप शिकला.

अकबराच्या रक्तात मंगोल क्रौर्य साठलेले होते असे अनेकजण म्हणतात परंतु यापेक्षा त्याच्या सोबत असणारे इतर सरदार ज्याप्रमाणे व्यवहार करतात तसाच व्यवहार अकबराने अक्कल येईपर्यंत केला. यात शिकारीपासून शत्रूच्या निरपराध बायकामुलांची कत्तल करणे इ. इ. सर्व सामील आहे.

सलीम चिश्तीवरील श्रद्धेमुळे अकबराची हळूवार बाजू प्रकाशात आली असे म्हणण्यास जागा आहे. ती प्रथमतः दिसून येते ती एका प्रवासाप्रसंगी त्याला मंदिराबाहेर ताटकळणारे हिंदू लोक दिसले आणि चौकशी करता कर भरल्याशिवाय त्यांना आत प्रवेश नाही हे कळल्यावर अकबर खंतावला. देवदर्शनाला उत्सुक असणार्‍यांना असे काही करावे लागू नये या भावनेतून त्याने तीर्थक्षेत्रांवरचा कर वगळला. अनेक लहान मोठ्या प्रसंगांतून अकबराचे मनपरिवर्तन झाल्याचे दिसून येते आणि या गोष्टीला काही वर्षे लागली. बहुधा काळानुसार, राजकारणाची अक्कल आल्यावर तो अधिकाधिक मॅच्युअर्ड होत गेला.

मुघलांची शिकार हा एक भयंकर प्रकार होता. जंगलातील काही मैल क्षेत्राला वेढा घालून वाद्ये वाजवून त्या वेढ्यातील प्राण्यांना घाबरवले जाई आणि मग पुढले काही दिवस त्यांची क्रूरपणे कत्तल केली जाई. १५७७-७८ साली अशाच एका शिकारीप्रसंगी दहा दिवस तयारी चालली होती. वाद्ये वाजवणारे लोक सर्वत्र नेमले होते. जनावरे आत कोंडली गेली होती. याप्रसंगी अकबराला साक्षात्कार झाला असे अबु'ल फज़ल आणि बदायुनी म्हणतात. त्याने सर्व आज्ञा मागे घेतल्या आणि अशाप्रकारच्या शिकारींवर बंदी घातली. असे होण्याचे नेमके कारण काय ते माहित नाही. कदाचित, रक्तसंहाराला अकबर कंटाळला असावा परंतु त्याला साक्षात्कार झाल्याचे, देवदूत भेटल्याचे दाखले (तेच, देवानाम् प्रिय) येथे दिले जातात. अकबराचे या प्रसंगातून ट्रान्सफॉर्मेशन झाले आणि यानंतर त्याच्या शासनात बराच बदल घडला. एक चांगला सहिष्णू राजा म्हणून प्रसिद्ध झाला.

कारण

याप्रसंगी अकबराला साक्षात्कार झाला असे अबु'ल फज़ल आणि बदायुनी म्हणतात. त्याने सर्व आज्ञा मागे घेतल्या आणि अशाप्रकारच्या शिकारींवर बंदी घातली. असे होण्याचे नेमके कारण काय ते माहित नाही.

आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात अकबर 'दीन-ए-इलाही' हा नवा पंथ- ज्यात इस्लामसह अन्य धर्माची तत्त्वे समाविष्ट असतील- स्थापन करण्याच्या खटपटीत होता. त्यासाठी आपल्या सम्राटपणाच्या पुढे जाऊन आपण 'प्रेषित' असल्याचे ठरवणे त्याला अत्यावश्यक होते. म्हणून त्याने असे अनेक साक्षात्काराचे/चमत्काराचे प्रसंग घडवून आणले, असा तर्क केला जातो.
अर्थात, त्याचा हा प्रयोग फसला आणि त्याच्या या नव्या धर्माला फक्त डझनभर अनुयायी मिळाले. (ज्यात बिरबलसुद्धा होता.)
उपक्रमावर या घटनाक्रमाबद्दल एखादी चर्चा घडावी असे वाटते.*

(*ही अक्षरं अदृष्य कशी करतात?
असो.)

"भद्राय राजते"चा अर्थ काय आहे?

मला शब्दार्थात "कल्याणकारी" असा मुख्य अर्थ कळत नाही :-(

"एषा मुद्रा भद्राय राजते" वाक्याचा थेट अर्थ "हा शिक्का शुभ/चांगल्याला शोभतो" असा आहे ना?

मोनिएर विल्यम्सच्या शब्दकोशात उल्लेख आहे, की याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये चांगल्या आणि ऋजु (गुड अँड ग्रेशियस) राजाला "भद्र" म्हटलेले आहे. याबद्दल अधिक तपशीलवार संदर्भ कोणी देऊ शकेल काय? "गुड अँड ग्रेशियस" संदर्भात राजा कल्याणकारी असल्याबद्दल तपशील आहेत काय? थोडक्यात हे विचारायचे आहे : राजव्यवहारकोशामध्ये "भद्र"चा तांत्रिक अर्थ "कल्याणकारी" असा होतो काय?

की "भद्राय" मध्ये चतुर्थी विभक्तीचा असा काही अर्थ काढायचा आहे?
"हा शिक्का शुभाकरिता [शुभ व्हावे अशाकरिता] शोभतो."
म्हणजे "भद्र"="शुभ" असा नेहमीचाच अर्थ घ्यायचा. शुभ म्हणजे कल्याणकारी असे आहे काय?

भारतातल्या आणखी एका सम्राटाचा लेख या दुव्यावर वाचावा. यात कल्याणकारी (धर्माचरण आणि शील यांची वृद्धी हा हेतू) असण्याबद्दल अधिक स्पष्ट वाक्ये सम्राट अशोकाकरवी लिहिलेली आहेत.

धन्यवाद

चर्चेत रोचक माहिती मिळाली. धन्यवाद.
'शिवस्य भद्राय' असा अर्थच मला योग्य वाटतो आहे.
--
धाग्यात आलेला रयतवारी (विरुद्ध वतनदारी) राजवटींच्या कल्याणकारीपणातील फरकाचा उल्लेख याआधीही कोठेतरी वाचला होता असे स्मरते.
--
शेजारी राज ठाकरे बसलेले असताना केतकर, "मुद्रा भद्राय राजते" ऐवजी "राज भद्राय राजते" असे वारंवार म्हणतात हा योगायोग असावा की 'ब्रिगेडपेक्षा मनसे मऊ' असा हिशोब?
--
शिवाजीचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याचे राज्य तीन जिल्ह्यांतच होते असा उल्लेख केतकरांनी केला आहे. तोही आश्चर्यकारक वाटतो.

शिवाजीचे राज्य

शिवाजीचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याचे राज्य तीन जिल्ह्यांतच होते असा उल्लेख केतकरांनी केला आहे. तोही आश्चर्यकारक वाटतो.

खालील नकाशा हे शिवाजीचे राज्य असे एनसायक्लोपिडीया - ब्रिटानिका म्हणतो.

केतकर बरोबर असावेत. तुम्हाला आश्चर्य कसले वाटले? :-)

शक्य

शक्य, हे शिवरायांच्या राज्यविस्ताराचे आत्ताच्या महाराष्ट्रावरचे मॅपिंग बरोबर असावे, पण त्यांची अवघी ४० वर्षाची खरतड कारकीर्द पाहता ते एवढे असणे देखील विशेष वाटते.
त्याच्या विस्तारापेक्षा त्याचा प्रभाव जास्त महत्वाचा होता, आत्ताचा नकाशा पाहता शिवाजीचे राज्य पूर्ण देशाच्या ५%(!!) होते, मुद्दा हा कि संख्येच्या दृष्टीने त्याला फारसे महत्व नव्हते.

सहमत

उत्तरेला मुघल आणि पूर्वेला अदिलशाही यासारख्या दोन शक्तीमान राजवटींच्या नाकावर टिच्चून केलेली एका स्वतंत्र राज्याची स्थापना व राखण ही अत्यंत असामान्य अशीच कामगिरी म्हणावी लागते. शिवाजीचे राज्य नामशेष करताना शेवटी आदिलशाहीच मुघलांच्याकडून नष्ट पावली तर एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याच्या सम्राटाला स्वत: दख्खनच्या स्वारीव्वर यावे लागले आणि तरीही शिवाजीचे राज्य अस्तित्वात राहिले ते राहिलेच यावरूनच शिवाजीच्या कार्याचे महत्व जाणता येते. शिवाजीचे राज्य काय आकाराचे होते ते 3 जिल्ह्यात होते का 10 वगैरे मुद्दे पूर्णपणे गैरलागू वाटतात.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चढता क्रम आणि थोडीशी असहमती.

मागे या चर्चेत शिवाजीच्या राज्याविषयी (मूळ विषय तो नव्हता) थोडीफार चर्चा झाली होती. त्यात म्हटल्याप्रमाणे बाबाजी भोसले हे फक्त वेरूळ गावचे पाटील होते, मालोजी भोसले जाधवांकडे प्रथम शिलेदार म्हणून भरती झाले आणि वर चढत गेले. शहाजी अदिलशाहीत सर-लष्कर होते. या चढत्या क्रमात शिवाजी राजे स्वतंत्र राजे न होते तर नवल वाटते. तरीही, शहाजीने पुण्याची"च" जहागिरी शिवाजीला का द्यावी हा प्रश्न पडतो. याचे कारण, पुण्याची इतकी दुर्दशा झाली होती की तिथे प्रजेसाठी काहीही बरे केले तर प्रजेचा पाठिंबा मिळाला असता असे होते की पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून झाल्याने पुणे बेचिराख आणि दुर्लक्षित झाले होते म्हणून हे माहित नाही. परंतु यामुळे महाराजांच्या नशिबी अतिशय खडतर कार्य आले हे खरे. यांत पळालेल्या जनतेला पुन्हा बोलावून प्रस्थापित करणे, शेतीची कामे, सैन्याची जमवाजमव, शासनव्यवस्था, आपला अंमल बसवणे, वतनदारी नष्ट करणे वगैरे अशा अनेक बाबींचा समावेश आहे. यासर्वांमुळे शिवाजीला राज्यविस्तार करण्यास फारशी संधी मिळाली नाही. हातपाय पसरता आले आणि पाया बांधता आला हेच महत्त्वाचे. (शहाजीनेही कारभारासाठी राजांबरोबर लोक पाठवले पण एखादा दमदार आणि इन्फ्लुएन्शिअल (मराठी गंडलं!) सेनापती का नाही बरे पाठवला? तो तसा नव्हता की काय कोणजाणे?)

आत्ताचा नकाशा पाहता शिवाजीचे राज्य पूर्ण देशाच्या ५%(!!) होते, मुद्दा हा कि संख्येच्या दृष्टीने त्याला फारसे महत्व नव्हते.

तरीही शिवाजीचे राज्य ५% किंवा तीन-चार जिल्ह्यांचे होते हा मुद्दा गैरलागू किंवा महत्त्वाचा नाही असे वाटत नाही. ते ऐतिहासिक सत्य आहे आणि महत्त्वाचेच आहे. यावरून राज्यविस्तार पाहता शिवाजी हा एक लहान राजा होता असे म्हटले तरी ते मला योग्य वाटते.

अवांतरः नेमाड्यांनी हल्लीच एका लेखात मलिक अंबरचे गुणगान केले आहे. मलिक अंबर हा हुशार आणि धूर्त होता यात शंकाच नाही. सोबत त्याने मराठा सरदारांना बाहुल्यांसारखे हलवले आणि फोडीचे राजकारण केले हे ही सत्य आहे.

शिवाजीचे राज्य

शिवाजीचे राज्य लहान होते व त्यामुळे तो लहान राजा होता याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. परंतु ज्या प्रतिकूल (जवळ जवळ अशक्य) प्रतिस्थितीत हे लहान राज्य शिवाजीने स्थापले व राखिले ते बघता त्याचे कर्तुत्व आभाळाएवढेच होते असे मला तरी वाटते. मुघल आणि अदिलशाहीत बगावत हा एक अतिशय गंभीर गुन्हा मानला जात असे. अशा परिस्थितीत बगावत किंवा त्याच्या बरेच पुढे जाऊन स्वतंत्र राज्य स्थापणे ही अशक्य गोष्ट शिवाजीने करून दाखवली. शहाजी राजे ज्या वेळी निझामशाही मधे चाकरी करत होते त्यावेळी ते एवढे शक्तीमान मानले जात असत की मुघल व आदिलशाही यांनी मिळून जेंव्हा निझामशाही संपवली तेंव्हा झालेल्या तहात शहाजी राजे अदिल शहाकडे चाकरी करतील असा उल्लेख केला गेला होता. तरीसुद्धा शहाजी राजांना स्वतंत्र राज्य स्थापन करणे काही जमले नाही. त्यानंतरच्या काळात दख्खनमधे अदिलशाही अतिशय मोठी शक्ती बनली होती. अशा परिस्थितीत सुद्धा शिवाजीला स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यश मिळाले यातच त्याचे मोठेपण आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

शंका?

शिवाजीचे राज्य तीन जिल्ह्यांएवढेच होते असे म्हणण्याने शिवाजीच्या कर्तृत्वाबाबत शंका घेतली जात आहे असे (उपक्रमावर) का वाटावे? आपण जास्तच हळवे झालो आहोत का?

नितिन थत्ते

गुणवत्ता

साधारणपणे कर्तुत्वाची मोजदाद संख्येत झाली तर गुणवत्ता कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी शंका येते...त्यामुळे दिशाभूल होऊ नये ह्यासाठी प्रयत्न.

@प्रियाली - लहान राजा हे विस्ताराच्या स्वरूपावर मांडले तर १७६० मधले मराठा साम्राज्य हे सर्वात मोठे होते, त्यामुळे ते राज्यांच्या साम्राज्यापेक्षा भारी होते असा अर्थ निघेल. त्यामुळे आकड्यांचा संदर्भ इथे फारसा महत्वाचा नाही हे मला सांगायचे होते. इंग्रजी सत्तेचा विस्तार बघता शिवाजीचे राज्य अगदीच किरकोळ होते, त्यामुळे शिवाजी किरकोळ राजा होता हे विधान देखील सत्यच होते पण ते तसे निरर्थक आहे.

छोटे पण सामर्थ्यशाली

I remembered Israel.
Its a small country.
But it has its influence on and around the territory it is situated in.
It is the effect of political will power, its attitude.
भारत आज जगातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक मोठा देश असला तरी आपले परराष्ट्र धोरण मला नेभळट वाटते. नेमका हाच फरक शिवाजीच्या छोट्या राज्याच्या संबंधी आहे असे माझे मत आहे. लहान असले तरी शेजारी राजांच्या धोरणांना सणसणीत चपराक असलेले त्यांचे राज्य होते.
space starts space stops

राज्य विस्तार

नकाशात दिलेले राज्य बरोबर आहे. त्यातले बंगळूर, तंजावरचे राज्य सोडल्यास. यात बंगळूरचे राज्य शाहजीने आदिलशाहीत असताना मिळवले. तर तंजावरचे राज्य व्यंकोजीने मिळवले.
दोन भावांचा संघर्ष याच मुद्यावर झाला होता. शिवाजीमहाराजांचे म्हणणे होते की वडिलांनी कमावलेल्या राज्यातील माझा वाटा दे. तर व्यंकोजीचे म्हणणे होते की तंजावरचे राज्य मी कमावले आहे त्यामुळे वाटा देण्याची गरज नाही. तर उलटे शिवाजीकडील राज्य हे मूळ जहागिरीतले असल्याने त्यातील् वाटा हवा.

शिवाजीमहाराजांचे मुख्य कर्तृत्व म्हणजे पुणे, मावळ, जावळ, कोल्हापूर येथे लोकांना लुभावणारे राज्य स्थापन केले. ते एवढे की तेथील जनसामान्यातून नेहमीच लष़्क्रर भरती होत राहिली. खर्‍या अर्थाने ती राष्ट्रनिर्मिती होती. कोकणात पोर्तुगिज गोवा आणि शिद्दीकडच्या मुलुख सोडल्यास राज्य होते. पण तेथील राजे/सावंत हे नेहमीच अनुकुल होते असे नाही. कदाचित एवढेच दुसरे मोठे काम म्हणजे दक्षिणप्रांतातली मोहिम. या मोहिमेला प्रचंड यश मिळाले. या मोहिमेतला प्रदेश या नकाशात दाखवला नाही.

राज्याच्या सीमा सतत बदलत्या असणे हा त्या काळचा स्थायी भाव होता. मोगलांच्या स्वार्‍यांदरम्यान त्यांचे तळ पुण्यात असायचे. (शाहिस्तेखान). अफझलखानाची स्वारी सहजपणे सातारा/प्रतापगड/जावळी पर्यंत झाली होती. तर शिवाजीच्या दक्षिणेतल्या स्वार्‍या या मुलुखाच्या कितीतरी जास्त ठिकाणी होत्या. नकाशा वाचताना याची आठवण ठेवणे महत्वाचे.

प्रमोद

 
^ वर