शिवाजी राजांचे गुरू कोण?

विशेष सूचना: खालील चर्चा जातीयवादावर जावी या हेतूने सुरू केलेली नाही. विषयाला धरून तसे प्रतिसाद आल्यास सदस्य संयमित शब्दांत ते व्यक्त करतील अशी आशा आहे.

खुलासा: खालील अटकळी केवळ आठवणीतील माहितीतून बांधल्या आहेत. त्या चुकीच्या असण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन चुका सुधाराव्या आणि चर्चा चालवावी.

शिवाजीराजांचे गुरू कोण? हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा तेव्हा एक मोठे प्रश्नचिन्ह डोक्यात उभे ठाकते. बरेच लोक या प्रश्नाचे उत्तर रामदासस्वामी असे देतात. काही लोक तुकाराममहाराज असेही देतात. शालेय इतिहास अभ्यासला असेल तर दादोजी कोंडदेवांचे नावही आठवते. जिजाबाईही आठवून जातात.

मध्यंतरी एका लेखात रामदासस्वामींसारखे गुरू लाभल्याने शिवाजीराजे घडले असे विचित्र वाक्य वाचनात आले. त्यानंतरही मिसळपावावरील एका लेखात यासारखेच (शब्दश: असे नाही) वाक्य वाचनात आले.

अशाप्रकारचे अनेक लेख वाचनात येताना, शहाजी राजांची आठवण कधीच होताना दिसत नाही. मराठ्यांचा फारच त्रोटक इतिहास मी वाचला असल्याने खालील परिच्छेदांत त्रुटी असण्याची शक्यता आहे.

शहाजीराजे निजामशाहीचे सेवक होते तेव्हा निजामशाही मलिकअंबर या हबशी वजिराच्या हातातील बाहुले होती. फोडा आणि (मराठ्यांवर) राज्य करा हा बाणा मलिकअंबरने चातुर्याने स्वीकारला होता. इतर मराठ्यांचे आणि जाधवांसारख्या नातलगांचे सहाय्य नसल्याने, निजामशाहीचे फोडाफोडीचे राजकारण आणि मोघलांचा संधीसाधू कावेबाजपणा यांत शहाजीराजांच्या पदरी इथून तिथून दल बदलत राहणे आले तरी मराठ्यांचे वेगळे राज्य स्थापन व्हावे ही प्रथमतः त्यांची इच्छा होती असे सांगितले जाते. शहाजीराजे किंवा वेरूळच्या भोसल्यांनी मराठा राजकारणात केलेली प्रगती पाहून त्यांची स्वप्ने इतर मराठ्यांपेक्षा वेगळी होती हे म्हणण्यास जागा वाटते. (बाबाजी भोसले हे फक्त वेरूळ गावचे पाटील होते, मालोजी भोसले जाधवांकडे प्रथम शिलेदार म्हणून भरती झाले आणि वर चढत गेले. शहाजी अदिलशाहीत सर-लष्कर होते. या चढत्या क्रमात शिवाजी राजे स्वतंत्र राजे न होते तर नवल वाटते.)

शिवाजी राजांचे गुरू त्यांचे आई-वडिल आणि त्याहीपेक्षा अधिक तत्कालीन राजकारण असावे असे वाटते. तरी खाली काही प्रश्न आहेत -

१. पुणे-जुन्नर भागातील शहाजी राजांची जहागिर अदिलशाही आणि मोघलांनी बेचिराख करून टाकली होती. त्या भागातच जिजाबाईंना पाठवण्यात शहाजीराजांचे कोणते राजकारण असावे?

२. जिजाबाईंशी जाधव घराण्यामुळे त्यांचे विशेष सख्य नव्हते म्हणावे की जिजाबाईंचा मुत्सद्दीपणा पाहून त्या आणि लहान राजे लांब राहून आपले स्वप्न पुढे चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता हे कळत नाही. जिजाबाई पुण्यात स्थायिक होत असता त्यांच्यासह हुशार सल्लागार आणि अमात्य देण्यात शहाजी राजांचे डावपेच होते काय?

३. तरूण वयात दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने राज्य उभारण्याचे स्वप्न पहाणे शक्य असले तरी साकारणे कठिण होते. शहाजीराजांचा याला अव्यक्त पाठिंबा होता काय?

४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?

लेखनविषय: दुवे:

Comments

काही मते

प्रियाली,
चर्चाविषय चांगला आहे. इतिहास डोळ्यासमोर ठेवून सदस्य आपली मते मांडतील आणि चर्चा योग्य मार्गानेच पुढे जाईल असे वाटते.

मी इतिहास तज्ञ तर नाहिच पण याबाबतीतले वाचन सुद्धा अत्यंत प्राथमिक दर्जाचे आणि सीमितआहे. पण तरी सुद्धा मत मांडतो आहे.
शहाजीराज्यांचा पाठिंबा आणि त्यांचे मुत्सद्दीपण पाठीशी असणे हे तर महाराजांचे महत्त्वाचे पाठबळ होते असे वाटते. शहाजींबद्दलचे तू वर मांडलेले मत अतिशय योग्य वाटते. त्यांचे पुढचे पाउल महाराजांनी टाकले असेच मला वाटते. ते अतिशय मातबर, धोरणी असले पाहिजेत. जीजाबाईंनीसुद्धा या मध्ये योग्य सहभाग घेउन शिवाजीवर योग्य संस्कार करुन त्यांच्यात स्फुल्लींग चेतवले असणार. या कामी ददोजी हे त्यांना राजकारण, शस्त्र-युद्धनीति वगैरे सांगायला सोबत होते ही पण शहाजींचीच योजना असणार. कुणाला जवळ करायचे, कुणाला लांब ठेवायचे, कधी योग्य पाऊल टाकायचे हे सर्व दादोजींनीच राजांना सांगितले असणार. वास्तविक त्याचसाठी दादोजी महाराजांसोबत असणार. म्हणजे शहाजी, जीजाई, दादोजी हे त्यांचे गुरु होत यात शंकाच नाही.

महाराष्ट्रातल्या भोळ्याभाबड्या चार पोरांना एकत्र करुन शिवाजींनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग सेना उभारली हे मला थोड्याशा वाचनानंतर आणि विचाराअंती फारसे योग्य वाटत नाही. हे थोडे कल्पनारम्य वाटते. महाराष्ट्रामध्ये त्याकाळी असलेल्या लढवय्यांकडे असे म्हणताना दुर्लक्ष केल्या सारखे होईल. नुकत्याच वाचनात आलेल्या द.ग्. गोडश्यांच्या एका पुस्तकात त्यांनी असेच मत मांडलेले दिसते. त्यांच्या मते त्या काळी महाराष्ट्रात जे वतनदार होते त्यांच्याकडे अतिशय बळकट, काटक आणि निपुण असे स्थानिक सैनिक असत. ही मराठी सेना महाराजांनी आपल्याकडे वळवून घेतली असावी. आठवा- जेधे, खोपडे, चंद्रराव मोरे इत्यादी. बाजीप्रभूंसारखी रत्ने त्यांचे पदरी असत ! या वतनदारांकडे अनेक पिढ्यांची सेना असे आणि ते स्थानिक पातळीवर अतिशय दाब-जोर राखून असत असेच दिसते. त्यातील काहिंना महाराजांनी स्वराज्यस्थापनेनंतर शिलेदार केल्याचे वाचलेले स्मरते. म्हणजे स्वतःचे सैन्य बाळगणारे आणि वेळप्रसंगी राजाला मदतीला जाणारे. महाराजांचा मुत्सद्दीपणा, धोरण यामुळे या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य उभारणीसाठी त्यांनी त्यांचा सुयोग्य उपयोग करुन घेतला. त्यांना अधिक मोठे श्रेयस असे ध्येय दिले आणि अत्यंत गरजेचे जे स्वराज्य उभारणीचे काम होते ते करुन दाखवले.

रामदास, तुकाराम त्यांना थोडे नंतर भेटले असावेत. पण रामदासांच्या धोरणाचा, रामदासीलोकांचा त्यांना नक्की उपयोग झाला असणार. तुकोबांची आणि त्यांची किती सल्लामसलत झाली असेल याचा अंदाज नाही. पण अध्यात्मिक बाजूने त्यांचा महाराजांवर प्रभाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मी याबद्दल काहीच वाचन केले नसल्याने मत नोंदवता येत नाही.

शहाजींचा पाठिंबा, दूरदृष्टी, धोरण हे महाराजांसाठी फार महत्त्वाचे वाटते.
अभ्यासकांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.
--लिखाळ.

धन्यवाद

प्रतिसादात मांडल्याप्रमाणेच मला म्हणायचे आहे.

महाराष्ट्रातल्या भोळ्याभाबड्या चार पोरांना एकत्र करुन शिवाजींनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग सेना उभारली हे मला थोड्याशा वाचनानंतर आणि विचाराअंती फारसे योग्य वाटत नाही.

चमत्कार वगैरे खरे नाहीत असे समजले तर वरील वाक्यच खरे वाटते.

परंतु, कथा कादंबर्‍यांतून शहाजीने शिवाजीकडे दुर्लक्ष केल्याचे वगैरे दाखले दिले जातात आणि फारशी माहिती हाती लागत नाही. म्हणून चर्चा प्रपंच.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

लेखाचा रोख वेगळा हवा होता.

लेखाचे विषय शिवाजी अथवा त्यांचे गुरु असा वाटतो, ( यातुन काही निष्पन्न होइल असे वाटत नाही). लेखाचा विषय / रोख मराठ्यांनी सर्व अडचणी असूनही आपले साम्राज्य कसे निर्माण केले असा हवा. त्यात शिवाजी एक नायक म्हणून राहील आणि त्याचे महत्त्वही अमान्य करण्याचे कारण नाही.

शहाजी, लखुजी, मोरे, भागवत धर्माची परंपरा, रामदासांचे संघटनाचा वेगळा प्रयत्न अश्या उभ्या आणि आडव्या गोष्टीचा आढावा घेतला तर मराठ्यांचे साम्राज्य निर्माण होणार होतेच असे वाटल्याशिवाय राहत नाही.

माझ्या वर या विचारांचा ठसा नाथमाधवांच्या अनेक कथानकातुन पडला आहे हे मी मान्य करतो.

याही पलीकडे काही कल्पना करावयाची असल्यास, शिवाजीची सर्वच भांवंडे जीवंत असली असती तर काय झाले असते यावर विचार करावयाल हरकत नसावी किंवा शिवाजी अजूनही १५/२० वर्ष राहता तर काय झाले असते असाही ( रम्यपणे) करता येऊ शकतो.

शिवभक्त ( द्वारकानाथ)

नाही, हाच रोख आहे

लेखाचा विषय / रोख मराठ्यांनी सर्व अडचणी असूनही आपले साम्राज्य कसे निर्माण केले असा हवा. त्यात शिवाजी एक नायक म्हणून राहील आणि त्याचे महत्त्वही अमान्य करण्याचे कारण नाही.

हा रोख नाही. शिवाजी महाराज घडले ते कोणामुळे हा विषय आहे. इथे, जिजाबाई, शहाजी, दादोजी, रामदास, तुकाराम, तत्कालीन राजकारण सर्वांवर चर्चा व्हावी असा हेतू आहे. शहाजी त्यामानाने नेहमीच उपेक्षित दिसतात म्हणून त्यांच्याबद्दल जास्त लिहिले इतकेच.

शहाजी, लखुजी, मोरे, भागवत धर्माची परंपरा, रामदासांचे संघटनाचा वेगळा प्रयत्न अश्या उभ्या आणि आडव्या गोष्टीचा आढावा घेतला तर मराठ्यांचे साम्राज्य निर्माण होणार होतेच असे वाटल्याशिवाय राहत नाही.

हा वेगळा विषय आहे आणि तोही चांगलाच आहे. यावरही विस्तृत चर्चा करता येईल.

चर्चेचे शीर्षक असे देण्याचे कारण की काही व्यक्तींशी यावरून इतरत्र आधी चर्चा झाली होती. तोच धागा पकडून चर्चा पुढे चालू रहावी हा हेतू होता.

चांगला लेख/चर्चा

चर्चेचा विषय आवडला आणि विविध माहीती यातून बाहेर येईल अशी आशा आहे. जमेल तसे प्रतिसाद देईनच. येथे काही त्रोटक मुद्दे, आठवणींच्या आधारे मांडतो तसेच त्यात कधी लिहायचे राहीले तरी, "मला वाटते" हे आहेच :) :-

सर्व प्रथम गुरू, शिक्षक आणि घडवणारे अशी तीन व्यक्तिमत्वे सर्वत्र असतात. गुरू हा शब्द मी भारतीय संस्कृतीत ज्या अर्थे वापरला जातो त्या अर्थे वापरत आहे. जीवनात केवळ एकच गुरू सर्व देऊ/शिकवू शकत नाही तसेच कायम आपण व्यक्तीकडूनच शिकतो अशातला भाग नाही, तर अनुभव देखील आपले गुरू असतात. शिक्षक हे व्यावहारीक जगातील गोष्टी शिकवतात मग ते आत्ताच्या जगात भाषा आणि गणित असेल तर शिवाजीच्या काळात ते तलवार युद्ध असू शकेल. घडवणारे जे असतात ते बर्‍याचदा गुरू सारखेच चांगल्या व्यक्तिमत्वाच्या शोधात असतात आणि दृश्यादृश्यपणे ते त्या व्यक्तिमत्वास पुढे जाण्यासाठी लागणारी मदत कधी कधी, तशी परीस्थिती निर्माण करणे या अर्थी असते. एकंदरीत शिक्षक आणि घडवणारे हेत्यांच्या त्यांच्या लायकीने गुरू होऊ शकतात. पण नाथ संप्रदाय म्हणते तसे आणि एकनाथांनी तेच ओवीबद्ध करून सांगीतलेले गुरू कोण या संदर्भात म्हणजे "कुणाचाही गुरू कोण" लागू होते:
" जो जो जयाचा घेतला म्या गूण, तो तो म्या गुरू केला जाण | गुरूसी झाले अपारपण जग संपूर्ण गुरू दिसे ||"

वरील परीच्छेदातील, नमनाचे घडाभर तेल वाचले आणि त्या अर्थाने आता प्रियालीच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला की, "शिवाजीचे गुरू कोण?" तर उत्तर आहे कोणी एक व्यक्ती त्याचे गुरू नव्हती. अर्थात तरी देखील तसे १००% गुरूस्थानी त्याला कोणी असतीलच तर ती त्याची आई जिजाबाई (आणि आपल्याकडे आईला "आद्यगुरू" असेच म्हणतात!) जीने त्याला लहानपणी शिकवले सुद्धा आणि घडवलेपण. दादोजी कोंडदेव यांचा पण त्यात हातभार मोठा असावा. याचा अर्थ त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवली असा घेऊ नये तर त्यांनी शिवाजीला घडवताना कशाची गरज आहे हे ओळखून त्याला योग्य ते वातावरण, शिक्षक दिले असे वाटते.

आता रामदास आणि तुकाराम या संतांविषयी: त्यांची नावे त्या काळात पण मोठी होती आणि त्यांचा संप्रदाय पण मोठा होता. दोघांनी निव्वळ भक्तीमार्गावर भर दिला नाही. एकाने राजकारण कसे करावे हे सांगितले तर दुसर्‍याने प्रपंचातील व्यावहारीक गोष्टी देखील ओवीबद्ध केल्या.
शिवाजी हा रामदास आणि तुकारामांना भेटल्याच्या कथा आहेत. त्यात तो पाया पडला, त्याने त्यांना गुरू मानले अथवा तसे काहीसे तो म्हणाला वगैरे म्हणतात. मी काही त्या प्रसंगाला हजर नव्हतो! तसे अगदी तो म्हणाला असला तरी त्याचा भावार्थ लक्षात घ्यावा असे वाटते. त्यांची आणि शिवाजीची गाठ पडली होती का नव्हती, ह्याने ह्या तिन्ही व्यक्तींचे माहात्म्य कमी होणार नाही. हे दोन्ही संत शिवाजीमुळे झाले नाहीत आणि शिवाजी ह्या संतांमुळे झाला नाही. मात्र ह्या दोन्ही संतांचा आणि मुख्यत्वे त्यांच्या विचारांचा उपयोग हा "कॅटॅलीस्ट" प्रमाणे आदर्श शिवशाही तयार करण्यात झाला असावा इतके नक्की वाटते.

तुकाराम हे १६५०च्या सुमारास म्हणजे शिवाजी २०शीत असताना नाहीसे झाले (सदेह वैकुंठ अथवा बाकी अनेक कथा आहेत). त्यामुळे दुर्दैवाने त्यांचा सहभाग राज्याभिषेकाच्या सुमारास नव्हता. तरी देखील त्यांची भेट झाली असेल असे मला पुणे-देहू यातील अंतर लक्षात घेता म्हणावेसे वाटते. सज्जनगड हा शिवाजीनेच समर्थांना त्याच्या राज्याभिषेकाच्या जवळपास दिला असे वाचल्याचे आठवते. "आनंदवनभूवनी" अथवा "निश्चयाचा महामेरू" सारख्या रचना या त्यांना शिवाजी भेटला अगदी नसला तरी माहीती असल्या शिवाय सुचल्या असतील असे वाटत नाही. शिवाय "शिवरायासी आठवावे, जिवीत तृणवत मानावे..." असे संभाजीला त्यांनी अधिकारवाणीने सांगीतले याचे कारण पण काहीतरी एकमेकांविषयी माहीती असणे असेच वाटते.

आता सरते शेवटी शहाजी महाराजांबद्दल: असे म्हणतात एक पिढी खचता खाते दुसरी पिढी उपभोग घेते. शहाजी महाराज ही पहीली पिढी होती. ती ही अशा काळातील जेंव्हा आधी २५० - ३०० वर्षे महाराष्ट्रच काय महाराष्ट्राच्या वर संपूर्ण काळरात्र आल्यासारखी अवस्था होती. आपलीच माणसे आपलीच वैरी होते. शहाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले आणि त्यांच्यात ते कर्तुत्व देखील होते. पण नशिबात साटेलोट्याची मारामारी होती... त्यांचे स्वप्न त्यांच्या ह्याच "साट्यालोट्यातून" आलेल्या सहचारीणीत पुढे नेण्याची धमक असेल असे त्यांना अर्थातच माहीत असेल, तशी जाणीव असेल. म्हणून कदाचीत त्यांनी तो निर्णय घेतला असल्यास आश्चर्य वाटायला नको. तरी देखील मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे त्यांची भूमिका कमीजास्त फरकाने शक्य तितके अनुकूल वातावरण देणार्‍याची या अर्थाने "घडवणार्‍याची" असावी असे वाटते. पण घडवून आणून तसे नेतृत्व देणे हे जिजाबाईचे आणि सभोवतालच्या परीस्थितीचे ज्यात केवळ दादोजी, तुकाराम, रामदासच नाही तर सारं मावळ खोरं पण येते, जास्त वाटते.

आणि अर्थातच ते घडू शकले कारण ते, म्हणजे शिवाजीचे व्यक्तिमत्व तसे होते. त्या जागी जर अजून कोणी असते, तर ३०० वर्षाची काळरात्र कदाचीत अजून काही शतके पुढे गेली असती. अथवा आज आपण पण अफगाण झालो असतो... कारण एक शिवाजी तयार होयला, जसे शिवाजी लागतो, तसेच त्याचे आई-वडील, गुरू आणि सभोवतालपण लागतो. आणि तो काही एका पिढीत तयार होत नाही...

चर्चेतुन माहिती मिळेल

प्रियाली यांचा चर्चा विषय ज्ञानात भर घालणाराच असतो ,इतिहासातील काही सत्य समोर येतील. किमान चिंतन तर होत राहील या आशेने चर्चा प्रस्तावाचे स्वागत !!! :)

४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?

गुरूस्थानी त्याची आई जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु या ऐकीव इतिहासाबद्दल फार दुमत होऊ नये. मात्र चर्चाप्रस्तावातील रोख शिवाजींचे राजकीय मार्गदर्शक कोण ? ( आणि त्यांनाच गुरु म्हणावे असे गृहीत धरुन आमचे मत मांडतो ) याबाबतीत समर्थ रामदासांकडे आम्ही संशयाने पाहु. शिवकालीन प्रवृत्तींशी आकांशाशी समरस झालेला कवी म्हणजे रामदास. रामदासांच्या राजकारणावर अनेकदा साहित्यविश्वात चर्चा झालेली दिसते. ( प्रा. न. र. फाटकांच्या समर्थचरित्र व रामदाचरित्र आणि वाड;मय या पुस्तकात रामदासांच्या राजकारणावर भरपूर् वाद आहेत म्हणतात )
शिवाजी व रामदास यांची भेट कधी झाली, दोघांमधील संबध कशा स्वरुपाचा होते याचे उत्तर कदाचित चर्चाप्रस्तावाच्या अनुषंगाने येतीलही. मात्र ' रामवरदायिनी' या स्तोत्रात राजे शिवाजींच्या उत्कर्षासंबंधी (१) केलेली प्रार्थना. राजे शिवाजींना उद्देशुन लिहिलेला 'सावधानता'( २) हा दासबोधातील समास, व पुढे संभाजीस लिहिलेली उपदेशपर (३) पत्र या वरुन इतर संताच्या तुलनेत रामदास हे अधिक जागरुक होते ,राजकीय विचारांपेक्षा त्यांचा सांस्कृतिक, वैचारिक वाटा मोठा होता. धर्मरक्षण आणि स्वातंत्र्य हे ध्येय समोर त्यांनी ठेवले इतकाच मुद्दा राजेंच्या समकालीन म्हणुन आम्हाला महत्वाचा मानावा असे वाटते. राजे शिवाजी आणि समर्थ रामदास वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्यामुळे कर्तुत्व आणि ध्येयाच्या बाबतीत त्यांच्यात एक वाक्यता दिसते म्हणुन त्यांनी योजनापुर्वक काहीकार्य केले असतील यावर मात्र आमचा विश्वास नाही आणि ते राजेंचे राजकीय गुरु असतील इतके पुरावे इतिहासातही नसतील असेही वाटते.

संत तुकारामांच्या बाबतीत एका संताच्या भेटीची ओढ, इतकाच राजेंच्या भेटीचा अर्थ आम्ही घेतो. अर्थात त्याबद्दलही इथे मत-मतांतरे येतील तेव्हा बराच खुलासा होईलच असे वाटते.


(१) येक चि मागणे आतां ! द्यावे ते मजकारणे !
तुझा तू वाढवी राजा ! सीघ्र आम्हां चि देखतां !!
दृष्ट सम्व्हारिलें मागें ! ऐसे उदंड ऐकतो !!
परंतू रोकडे कांही !! मूळ् सामर्थे दाखवी !!
(२) समर्थाकडून राजे शिवाजींना गेलेले पत्र ( इ. स. १६४९)
' निश्चयाचा महामेरु ! बहुत जनांसी आधारु....
या भूमंडलाचे ठायी ! धर्म रक्षी ऐसा नाही !
महाराष्ट्र धर्म राहिला काही ! तुम्हाकरिता !!
.......धर्मस्थापनेची कीर्ती ! सांभाळली पाहिजे !
(३) समर्थांचे संभाजीस जे पत्र -
अखंड सावधान असावे ! दुश्चित कदापि नसावे
काही उम्र स्थिति सांडावी ! काही सौम्यता धरावी.....
..........
..........
शिवरायाचे आठवावे रुप......
शिवरायाचा आठवावा साक्षेप ! भुमंडळी !!

काव्य संदर्भ : प्राचीन मराठी वाडःमयाचे स्वरुप : ह. श्री. शेणोलीकरांच्या पुस्तकातून घेतले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं व्यक्तिगत मत!

माझं व्यक्तिगत मत -

स्वत: महाराज हे व्यक्तिमत्वच मुळी अक्षरश: 'एकमेवाद्वितीय' असे व्यक्तिमत्व होते, स्वयंभू होते! याचा अर्थ त्यांना कुठल्याही गुरुंची आवश्यकता नव्हती असे मला बिलकूल म्हणायचे नाही. अत्त्युत्तम संस्कारांचे बाळकडू पाजणार्‍या त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, लहानपणी जे काही एक फॉर्मल शिक्षण आवश्यक असते ते देणारे दादोजी, ह्यांना महाराजांचे गुरू निश्चितच मानता येईल.

परंतु वर म्हटल्याप्रमाणे स्वत: महाराजच इतक्या अफाट अन् कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते की त्यांना अनेक गोष्टी न सांगताही कळल्या असाव्यात! त्यांच्या आजूबाजूचा जमाना, गुलामगिरीचा तो काळ - त्यांच्या अफाट निरिक्षण शक्तिला, त्यांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेला, त्यांच्यातील सेन्सेटिव्हिटीला (सिक्स्थ सेन्स!) केव्हाच दिसला असेल/असावा! सांगायचा मुदा इतकाच की तत्कालीन भोवतालच्या परिस्थितीतूनच महाराज खूप काही शिकले असावेत!

भोवतालची गुलामगिरीची परिस्थिती पाहून 'गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वत:चंच राज्य व्हावं' अश्या ठाम निश्चयाप्रत माझ्या मते कुठलाही माणूस शिकवून येऊ शकत नाही! आणि याच अर्थाने मी वर त्यांचा उल्लेख 'स्वयंभू व्यक्तिमत्व' असा केला आहे!

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्वत:चे स्वतंत्र गुप्तहेर खाते निर्माण करणारे व्यक्तिमत्व, 'आरमार' या प्रकाराचे अनन्यसाधारण महत्व ओळखून वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वत:चे आरमार स्थापन करणारे व्यक्तिमत्व हे कुणाचेही शिष्य असण्यापेक्षा स्वयंभूच अधिक होते/असावे असे माझे वैयक्तिक मत आहे!

सबब, मी तरी त्यांच्यातले शिष्यत्व थोडेसे गौण मानून त्यांच्यातील स्वयंभूत्वलाच अधिक मानतो. "शिवाजी राजांचे गुरू कोण?" या प्रश्नाचे उत्तर निदान मी तरी, "ते स्वतःच गुरुंचे गुरू होते!" असे देईन!

आपला,
(थोरल्या आबासाहेबांचा भक्त!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चरीत्र घडण -

http://www.scribd.com/doc/2627443/- इथे आपल्याला एक शिव चरित्र आढळेल. पुस्तक फार जुने आहे आणि शिवकालीन डायर्‍यांच्या साहाय्याने लिहिल्याचे कळते. अवास्तव पाल्हाळ वा कल्पनाशक्ति द्वारे अनावश्यक विस्तार आढळत नाही म्हणून विश्वसनीय वाटते. चाणक्याला चंद्रगुप्तामध्ये जे पाणी आढळले तद्वतच बाळपणीच जिजामातेला शिवाजीची योग्यता कळली. अथवा तिने शिवाजीच्या आधी संभाजीला तयार करणे नैसर्गिक होते (हा शिवाजीचा मोठा भाऊ, इतिहासात त्याच्यासंबंधी जरा कमी उल्लेख आढळतात. संभाजीवर शाहाजीराजेंची शिवाजीपेक्षा विशेष मर्जी. तेव्हां शहाजीला स्वातंत्र्यलढ्याचा निग्रह असता तर त्यांनी ह्या कामी शिवाजीऐवजी संभाजीला तयार करणे/ करवून घेणे संयुक्तिक होते) . माझ्यामते इतर कोणत्याही मातब्बर मराठ्यापेक्षा स्वातंत्र्याचा तीव्र निग्रह फक्त जिजामातेपाशीच होता. अफझलखान भेटायला येत आहे हे कळल्यावर शिवबा आपल्या सहचार्‍यांशी जे बोलले त्यात त्यांनी एका नीतिवचनाचा उल्लेख केला - जितेन लभते लक्ष्मीं मृत्युनापि सुरांगनाः । क्षण विध्वंसिनी काया का चिंता मरणे रणे ? - अशा प्रकारचे शिक्षण जिजाईनेच दिले, अशा प्रकारची मानसिक घडण जिजामातेनेच केली. तेव्हां माझ्यामते चरीत्र घडवणारी गुरू तीच. अर्थात ह्या कार्याला शहाजींचा पाठिंबा मदत ही होतीच. त्याशिवाय शिवाजीलाही इतकी जमवाजमव करणे शक्य झाले असते असे वाटत नाही.

दहा पंधरा मावळे हाताशी घेऊन राज्याची स्वप्ने पाहणे इत्यादि गोष्टी साहित्यातच वाचायला ठीक. वास्तवातल्या नाहीत हे सर्वमान्यच आहे. ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये जशी सैनिक, सैनिकी शिक्षण याची आवश्यकता होती - जी सुभाष, सावरकर प्रभृतींनी जनतेला ब्रिटीश आरमारात भरती होऊन, शिक्षण घेऊन, शस्त्रास्त्रे मिळवून वेळप्रसंगी ती त्यांच्यावरच उलटवायची; एवढा खटाटोप करावा लागला - तशी परिस्थिती शिवकालीन नसावी. तेव्हां लढवय्ये, लढाईचे शिक्षण देणारे हे होतेच, पण होते ते मुसलमान राजवटीत. असे जे विखुरलेले होते त्यांना एका छत्राखाली आणून त्यांना एक दिशा देणे आवश्यक होते. ते काम शहाजी, जिजाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबा करण्यास समर्थ होते म्हणून शिवाजी यशस्वी झाले.

एकोहम् -

स्वतः राजेच्...

मलातरी शहाजी राजे किंवा दादोजी कोंडदेव यांपेक्षा स्वत: शिवाजीमहाराजांची इच्छाशक्ती आणि जिजाबाईंचा प्रभाव/शिकवण या गोष्टी कारणीभूत वाटतात. भले शहाजी राजांनी चांगले कारभारी दिमतीस पाठवले तरी जिजाबाईंनी परिस्थितीची करुन दिलेली जाणीव आणि जागवलेला आत्मविश्वास, अभिमान महत्त्वाचा वाटतो. शिवाय परिस्थिती माणसाला शहाणं बनवते असं म्हणतात, त्यादृष्टीने लहान वयातच शिवाजी महाराजांपुढे स्वतंत्र राज्याचं चित्र उभं राहिलेलं असेल.

दादोजी कोंडदेव यांनी कारभारातल्या खाचाखोचा समजावल्या, न्यायदान वगैरे शिकवलं तरी स्वयंप्रेरणेने राजांनी स्वराज्य घडवले असे मला वाटते. मागे पहिल्या वर्षाला इतिहास विषय असताना 'शिवाजी राजांनी हे राज्य का घडवले? त्याची प्रेरणा त्यांना कोठून मिळाली? त्यांनी स्वतःला राज्याभिषेक का करुन घेतला? या विषयावर राजवाडे आणि इतर इतिहासकारांची मते अभ्यासली होती. त्यात देखील जिजाबाई, कोंडदेव, शहाजी आणि इतर कारणे दिली असली तरी शेवटी राजांची स्वतःची इच्छा, पाहिलेलं स्वप्न आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न याच गोष्टी प्रमुख आहेत असे मत वाचले होते.

म्हणून रामदास, कोंडदेव हे त्यांचे गुरु असूही शकतील पण एकूणच साम्राज्याचे स्वप्न ही त्यांची (इतर कारणांपेक्षा) स्वयंप्रेरणा होती असे वाटते.

-सौरभदा

==============

Some have been thought brave because they didn't have the courage to run away.

सहमत..

शिवाय परिस्थिती माणसाला शहाणं बनवते असं म्हणतात, त्यादृष्टीने लहान वयातच शिवाजी महाराजांपुढे स्वतंत्र राज्याचं चित्र उभं राहिलेलं असेल.

तरी स्वयंप्रेरणेने राजांनी स्वराज्य घडवले असे मला वाटते.

तरी शेवटी राजांची स्वतःची इच्छा, पाहिलेलं स्वप्न आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न याच गोष्टी प्रमुख आहेत असे मत वाचले होते.

म्हणून रामदास, कोंडदेव हे त्यांचे गुरु असूही शकतील पण एकूणच साम्राज्याचे स्वप्न ही त्यांची (इतर कारणांपेक्षा) स्वयंप्रेरणा होती असे वाटते.

सौरभदांच्या वरील सर्व वाक्यांशी पूर्णत: सहमत! आम्हीही आमच्या प्रतिसादात थोड्या वेगळ्या शब्दात हेच सांगायचा यत्न केला आहे!

आपला,
(शिवबाचा भक्त) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

धन्यवाद

सर्वांच्या प्रतिसादांसाठी धन्यवाद. विकास, बिरूटे, एकोहम् या सर्वांच्या प्रतिसादांतून अधिक माहिती मिळाली.

विकास आणि बिरूटे यांनी रामदास आणि तुकाराम यांच्याबद्दल प्रकट केलेले मत पटण्यासारखे आहे. रामदास स्वामीं आणि इतर रामदासींचा स्वराज्यस्थापनेच्या कार्यात खारीचा वाटा असल्यास त्याबद्दल नवल नाही. तुकाराम १६५० नंतर नसल्याने आणि तत्पूर्वी महाराजांची आणि त्यांची गाठभेट नाकारली नाही तरीही ते राजांचे अध्यात्मिक गुरू असावेत हा निष्कर्ष मला अतिशयोक्तीपूर्ण वाटतो परंतु महाराजांचा पिंड अध्यात्मिक असावा असे मला वाटते आणि त्यामुळे विकास म्हणतात तसे,

दोन्ही संतांचा आणि मुख्यत्वे त्यांच्या विचारांचा उपयोग हा "कॅटॅलीस्ट" प्रमाणे आदर्श शिवशाही तयार करण्यात झाला असावा इतके नक्की वाटते.

यांत तथ्य वाटते.

एकोहम् यांचा प्रतिसाद पटण्याजोगा आहे. त्यांनी दिलेला दुवा मी अद्याप वाचला नसला तरी पुढे जाऊन त्यांच्या प्रतिसादातील काही भागावर माझे मत असे की -

माझ्यामते इतर कोणत्याही मातब्बर मराठ्यापेक्षा स्वातंत्र्याचा तीव्र निग्रह फक्त जिजामातेपाशीच होता.

हे थोडेसे बदलून (किंचित असहमती) असे म्हणता येईल की जिजाबाईंचा "स्वतःचा" असा निग्रह असण्याचे सयुक्तिक कारण इतिहासात नाही. त्यांना राजकारणाचे शिक्षण, धडे लहानपणापासून मिळाले असेही नसावे. तत्कालीन मराठा स्त्रिया, त्यांचा राजकारणातील सहभाग, त्यांचे कारभारातील लक्ष वगैरे लक्षात घेता केवळ एक जिजाबाई वेगळी असण्याचे फारसे कारण नाही परंतु जो अनुभव मिळाला तो भोसल्यांच्या आणि निजामशाहीच्या राजकारणातून. स्वतंत्र राज्याची कल्पना त्यांच्या मनात रूजवायला शहाजीराजांचे राजकारण हीच एकमेव घटना आहे. शहाजींनी त्यांना आपल्यापासून वेगळे करून त्यांना योग्य अधिकार आणि चतुर माणसे पुरवून स्वराज्याचा पाय रचण्यास मदत केली. दुर्दैवाने, शिवाजीराजांवरील सर्व कथा कादंबर्‍यांतून शहाजीराजांना उपरेपण दिल्याचेच दिसून येते. जिजाबाईंना माहेर नव्हते. जाधवांचे आणि भोसल्यांचे पराकोटीचे शत्रुत्व होते. संभाजीवर शहाजींची अधिक मर्जी असण्यालाही कारण एवढेच की तो ज्येष्ठ पुत्र होता आणि शहाजींच्या सान्निध्यात अधिक राहिला. आपण सरलष्कर आहोत आणि आपला पुत्र आपल्यापेक्षाही मोठा बनावा हे शहाजींचे स्वप्न संभाजीबाबत असणे योग्यच आहे. परंतु, संभाजीच्या अकाली मृत्यूने जिजाबाईंनी हे स्वप्न साकार केले असावे असे वाटते.

शहाजींना जिजाबाईंपासून केवळ दोन पुत्र आणि आठ कन्या असल्याचे कळते. (चू. भू. दे. घे.) व्यंकोजीराजे धरले तरी शहाजींना औरस पुत्र कमी असल्याने राजांबाबत ते दुर्लक्ष करून असतील असे वाटत नाही.

अर्थातच यामुळे जिजाबाईंचे महत्त्व एका अंशाने कमी होते असे म्हणायचा हेतू नाही. राजांना घडवण्यात आणि त्यांची शेवटपर्यंत साथ देण्यात त्यांचा जेवढा सहभाग आहे तेवढा कोणा इतराचा नाही.

असो, दुव्याबद्दल धन्यवाद. वेळ मिळताच त्याचा फडशा पाडायला हवा.

सौरभदा आणि विसोबा खेचर म्हणतात - स्वतः राजाच राजांचे गुरू होते. याला हसून माझे मत नाही असे म्हणावेसे वाटते.

राजकारण राजा घडवतो. आई-बाप, शिक्षक, अध्यात्म, गुरू इ. इ. केवळ निमित्त असते. वेळ-काळ आणि परिस्थितीसारखा दुसरा गुरू नाही. राजे घडले ते तत्कालीन राजकारणामुळे असे मला वाटते.

लाख मोलाचे वाक्य

राजकारण राजा घडवतो. आई-बाप, शिक्षक, अध्यात्म, गुरू इ. इ. केवळ निमित्त असते. वेळ-काळ आणि परिस्थितीसारखा दुसरा गुरू नाही. राजे घडले ते तत्कालीन राजकारणामुळे असे मला वाटते.

हे सर्वात महत्वाचे आहे. :)
इतिहास कोणी लिहिला, कसा लिहिला आणि का लिहिला या बद्दल वर्तमान काय उत्तर देणार. नात्यांकडे पहायचे दृष्टीकोन काळापरत्वे बदलत जातात. त्यामुळे आई, शिक्षण देणारे गुरु आणि पिता या नात्यांकडे पहायचा समाजाचा / इतिहास कारांचा नजरिया नेहमीच बदलत राहाणार. शिवाजी म्हणजे जिजाबाई आणि शहाजी यांचा मुलगा हे मान्य केले तर गुलामीतुन बाहेर पडायचा मनसुबा जो शहाजीराजे साधु शकले नाहिते तो आपल्या मुलाला डोळ्यासमोर ठेवुन साध्य केला म्हणायला काहीच हरकत नाही.

मला सर्वात जास्त पटते ते वरचे वाक्य. ज्या व्यक्तिमध्ये जन्मजात (अनुवंशिक) नेतृत्वाचे गुण आहेत, तो गरजे नुसार प्रत्येक गुरुचे मार्गदर्शन घेणारच. बाकी सगळे निमित्त्य मात्र आहेत.

स्वयंभू

परंतु, कथा कादंबर्‍यांतून शहाजीने शिवाजीकडे दुर्लक्ष केल्याचे वगैरे दाखले दिले जातात आणि फारशी माहिती हाती लागत नाही. म्हणून चर्चा प्रपंच

शाजीराजांने शिवाजीराजांकडे दुर्लक्ष केले ते जाणूनबुजून. निदान सगळीकडे तसा समज पसरेल याची दक्षता घेतली. त्यामुळे शहाजीराजांना त्यांच्या शहाने(आदील/निजाम) शिवाजीराजांबद्दल "कारणे दाखवा" नोटीस दिली तर त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी टाळता यावी.

वेळ-काळ आणि परिस्थितीसारखा दुसरा गुरू नाही. हे वाक्य आणि स्वतः राजाच राजांचे गुरू होते हे वाक्य मला समान अर्थाचे वाटते. वेळ-काळ-स्थिती पाहून स्वतःच निर्णय घेणे यालाच स्वतः स्वतःचे गुरु असणे म्हणत असावेत. यात धोका एकच असतो काही वेळा अपयशातून धडे मिळतात.

गुरु कोणीही असला नसला तरी शिवाजीराजांनी त्यांच्या आयुष्यात पूर्वमार्गदर्शनाशिवाय बर्‍याच गोष्टी केलेल्या दिसतात. सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे जलदुर्ग आणि आरमार.

राजे स्वयंभू होते. हे माझे मत. बालपणात झालेले जिजाई, दादोजींचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहेच पण परिस्थितीत बदल घडवून आणायची जबाबदारी माझीच आहे ही स्वयंप्रेरणा, पदोपदी "हे राज्य झालेच पाहिजे" हा ध्यास राजांचा होता. आंतरिक इच्छाशक्ती असणे हे सर्वात जास्त गरजेचे आहे.

अवांतरः त्याकाळी मुद्दाम वंदता पसरवणे ही एक युद्धातली मुख्य चाल असायची. राजे गायब होतात, एका वेळी चार चार ठिकाणी असतात, देवी दृष्टांत देते वगैरे. आपल्या सैन्याचे मनोबल वाढवणे आणि दुसर्‍याचे खच्ची करण करणे हा उद्देश.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

शहाजी आणि स्वराज्यस्थापना

शहाजीने प्रकटपणे स्वराज्य स्थापण्याचा पहिला प्रयत्‍न १६२९ मध्ये लोदीच्या बंडाच्या वेळी केला तो शहाजहान आणि आदिलशहाच्या एकत्रित विरोधामुळे विरघळला. दुसरा प्रयत्‍न १६३३ साली. निजामशाही पुनरुज्जीवित करून तिची पेशवाई करताकरता ते राज्य ताब्यात घेण्याचा इरादा असताना तो हेतू शहाजहानच्या प्रखर विरोधामुळे महमदशहाच्या नरमपणामुळे साधला नाही. त्यानंतर दहा वर्षे खटपट आणि सैन्याची जुळवाजुळव करून शहाजीने अखेर कर्नाटकात स्वराज्य स्थापले. या अनुभवांचा फायदा शहाजीने शिवाजीला करून दिला.
शहाजीच्या हयातीत पाच मोगल राज्ये होती. दिल्लीची मोगलाई, दौलताबादची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बेदरची बेरीदशाही. त्या आपाआपसात भांडणे करून एकमेकांचे बल क्षीण करत होत्या. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ निजामशहाने लढवय्या मालोजी भोसले यांना पंचहजारी मनसबदारी दिली. ही पुढे शहाजीला मिळाली आणि त्याने प्रत्येक लढाईच्या निमित्ताने सैन्यभरती करून ती वाढवली. शहाजीला मलिकंबर आणि मूर्तिजाशहा यांनी दुखवले आणि त्याने निजामशाही कायमची सोडून आदिलशाही धरली. (यापूर्वी त्यांच्या अशा दोनतीन येरझार्‍या झाल्या होत्या.)
प्रकट स्वराज्य, प्रच्छन्‍न स्वराज्य, मांडलिकी स्वराज्य आणि शेवटी स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा शहाजीचा सतत प्रयत्‍न होता. यासाठी प्रसंगाला अनुकूल दिसेल त्याप्रमाणे शत्रुत्वाचे, मित्रत्वाचे किंवा तटस्थतेचे धोरण त्याने ठेवले आणि हवे तेव्हा बदलले. पोर्तुगीज आणि इंग्रज व्यापार्‍यांकडून त्याने अनेक शस्त्रास्त्रे मिळवली आणि आपल्या सैन्याला पुरवली. सैनिकांशी त्याचे संबंध अतिशय चांगले होते आणि तो त्यांना पगार देत असे.
पिंगळे, अत्रे, दादाजी, पानसंबळ, रोझेकर, जेधे, बांदल ह्या आपल्या जहागिरीत असलेल्या मुत्सद्दी सरदारांची शिवाजीला मदत देऊ केली. शहाजीच्या ताब्यात असलेल्या तोफा, घोडे, हत्ती, किल्ले व शस्त्रसाठा शिवाजी साठी सदैव लभ्य होता. आपल्या निंबाळकर, मोहिते, जाधव, महाडीक, गायकवाड इत्यादी नामांकित मराठ्यांचे साहाय्य शिवाजीला शहाजीनेच मिळवून दिले. बापाच्या खांद्यावर उभा राहून शिवाजी पहिल्यान्‌दा उच्चासनावर बसला.
शिवाजी आणि जिजाबाईला दूर ठेवून शहाजीने जे आपल्याला जमू शकत नाही ते शिवाजीकडून करवून घेतले. शिवाजी स्वयंभू नव्हता.
शहाजीच्या सैन्यात मराठा, पुरभय्या, पंजाबी, मुसलमान वगैरे सर्व लोक होते. अशा सैन्याकडून प्रसंगी धोका होऊ शकतो हे जाणून रामदासांनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा असा गुरुमंत्र शिवाजीला दिला. राष्ट्रीयत्वाची जाणीव जी शहाजी-जिजाबाई-शिवाजीत होतीच ती रामदासांनी अख्ख्या महाराष्ट्रात रुजवली. तसे केले म्हणूनच शिवाजीनंतर धनी नसतानाही मराठ्यांनी औरंगजेबाला मट्ट्यास आणले.
स्वराज्यस्थापनेचा खरा पाया शहाजीनेच घातला. तोच शिवाजीचा आद्य गुरू. --वाचक्‍नवी

अगदी मनातला प्रतिसाद :-)

वाचक्नवी यांचा प्रतिसाद अगदी माझ्या मनासारखा असल्याने तो निश्चितच आवडणारा आहे. (ह. घ्या.)

चर्चेचा उद्देश एवढाच होता की राजांच्या इतिहासाकडे आपण दैवी इतिहास, अचाट-अशक्य घटनांचा इतिहास म्हणून पाहतो. भविष्यात हा इतिहास महाभारत-रामायणासारखी चमत्कृतीजन्य पौराणिक कथा बनून न राहो.

शिवाजी आणि जिजाबाईला दूर ठेवून शहाजीने जे आपल्याला जमू शकत नाही ते शिवाजीकडून करवून घेतले. शिवाजी स्वयंभू नव्हता.

लहानपणी आपल्या मुलाने केवळ बारगीर न राहता खूप मोठे व्हावे या स्वप्नातून मालोजींनी त्यांना भाषा, काव्य, संस्कृत शिक्षण दिल्याचे सांगितले जाते. (चू. भू. दे. घे)यापुढे शहाजीराजांची हयात मुसलमानी संस्कृतीत गेलेली. त्यांचे छंद तसे होणे स्वाभाविक वाटते. राजांना आपल्यापासून दूर, आईच्या कडक शिस्तीत ठेवून शहाजींनी मराठी साम्राज्यावर अनेक उपकार केले असेच म्हणायला हवे.

निंबाळकर हे आधीपासून भोसल्यांचे व्याही होते. शहाजींच्या आई दिपाबाई या निंबाळकर. जातीवंत मराठ्यांत आपली वर्णी लागावी या हेतूने मालोजींनी जाधवांशी मलिकअंबरच्या राजकारणाचा फायदा उठवून सोयरिक साधून घेतली. शहाजींच्या काळात त्यांना शह देऊ शकेल असे केवळ जाधव होते बाकीचे बरेचसे मराठे स्वतंत्र रित्या शहाजींना तोंड देण्याच्या हिंमतीचे नव्हते. अदिलशाहीला मिळाल्याने महाराष्ट्रातील राजांचे प्रस्थ कमी होण्याचा धोका होता. मुरार जगदेवांनी पुणे-जुन्नर भागांत गाढवाचा नांगर चालवून त्याची सुरूवात करूनही दिली होती. स्वतः शहाजीराजांना पुन्हा महाराष्ट्रात येऊन वसणे शक्य नव्हते. थोरला संभाजी, शहाजीराजांचे राजकारण लढण्यास तयार झाला होता आणि लोकांच्या नजरेत होता. अशावेळी आपल्या बायकोला आणि लहान मुलाला बाजूला करून, शत्रूला गाफिल ठेवून स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्याजोगे दुसरे शहाणपणाचे राजकारण नाही असे वाटते. दहा-पंधरा मावळे गोळा करून राजांनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रचली या केवळ शाहिरी कल्पना आहेत हेच यावरून दिसते.

सुंदर प्रतिसाद

स्वराज्यस्थापनेचा खरा पाया शहाजीनेच घातला. तोच शिवाजीचा आद्य गुरू

शहाजींच्या मुत्सद्देगिरीचा योग्य आढावा घेतला आहे. फक्त शेवटच्या एकदोन वाक्यात रामदासांचा समावेश समर्पक उदाहरणाशिवाय केल्यासारखा वाटला.

शहाजीच्या सैन्यात मराठा, पुरभय्या, पंजाबी, मुसलमान वगैरे सर्व लोक होते. अशा सैन्याकडून प्रसंगी धोका होऊ शकतो हे जाणून रामदासांनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा असा गुरुमंत्र शिवाजीला दिला.

पण शिवाजीराजांच्या सैन्यातही असे सर्व लोक होतेच की. शिवरायांना धोका देण्यात घोरपडे, शिर्के, पिसाळ वगैरे मराठी मंडळीही अग्रेसर होती.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

चांगला प्रतिसाद

प्रतिसाद आवडला आणि त्यातील काही माहीती लहानपणी वाचली असली तरी "डिटेल" म्हणून लक्षात नव्हती. शिवाजी हा "स्वयंभू" नव्हता हे रुढार्थाने मान्य आहे आणि तसे ते माझ्या पण प्रतिसादात आले आहे. पण त्याच्याजवळ जे गूण होते ते असामान्य होते आणि म्हणूने केवळ भोसल्यांचे पोर म्हणून तो स्वराज्य स्थापू शकला असे वाटत नाही. तसेच शहाजीची मदत ही स्वराज्यस्थापनेच्या संदर्भात नक्कीच झाली असली तरी त्याचा कुठे कसा वापर करणे हे मात्र त्याला शिकवायला ते हजर नव्हते/राहणे शक्यही नव्हते. यात त्यांचे कमी पण येत नाही अथवा इतरांचे जास्तपण होत नाही.

म्हणूनच आता चर्चेचा मूळ प्रश्न जरा वेगळा असावा असे वाटते - "शिवाजी राजांचे कोण कोण गुरू होते?" , असे म्हणले तर ते जास्त योग्य होईल असे वाटते का?

कोण कोण गुरू आणि गुरू कोण

म्हणूनच आता चर्चेचा मूळ प्रश्न जरा वेगळा असावा असे वाटते - "शिवाजी राजांचे कोण कोण गुरू होते?" , असे म्हणले तर ते जास्त योग्य होईल असे वाटते का?

"कोण कोण गुरू होते?" आणि "गुरू कोण कोण?" हे सारखेच प्रश्न आहेत. चर्चेचा रोखही हाच होता. फक्त शहाजींना झुकते माप दिले कारण त्यांचा विचार चटकन झाल्याचे सहसा दिसत नाही एवढेच. :-)

जिजाबाईंचे स्वप्न

'राधामाधवविलासचंपूत' चा खाली एका प्रतिसादात उल्लेख आलाच आहे. शहाजी ऐश्वर्यात राहण्याची इच्छा करणारा व रसिक होता एवढे समजते ; पण त्याने हिंदु धर्माचे रक्षण व प्रसार यासाठी काही खास प्रयत्न केल्याचे उदाहरण सापडत नाही. तो व्यक्तिश: तत्कालीन स्वरुपाच्या हिंदुधर्माचा आचार करीत असेल, पण हिंदु धर्माचे सामुहिक आचार पाळले जावे यासाठी शहाजींचे प्रयत्न दिसत नाही. जिजाबाईचे तारुण्य आटत चालल्यावर कदाचित इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात तसे तेव्हाच्या सरदारांप्रमाणे अन्य स्त्रियात गुंतले असतील किंवा नसतीलही गुंतले. परंतू शिवबाला घडवण्यात राजकीय,सांस्कृतिक, किंवा स्वराज्याचे संस्कार शहाजींनी केले ते पटत नाही. निजामाच्या वारसाला घेऊन निजामशाहीची घडी बसवण्याचा शहाजींनी प्रयत्न केला याचा अर्थ पेशवाईचा प्रयत्न केला हे म्हणजे काहीच्या काहीच आहे. स्वतः स्रुरक्षीत राहण्यासाठीचा तो एक भाग होता. मुळात वेगवेगळ्या शाह्यांच्या ठिकाणी एका महत्वाकांक्षी सरदार म्हणुन शहाजीची नोंद घेता येते, मात्र त्यांना एकाही शाहिने मान दिला नाही. सोबत अनेक मराठी माणसं असतांना स्वतंत्र राज्याचा विचारही त्यांना करता आलेला नाही. स्वतःच्या हिमतीवर औरंगजेबाच्या राज्याच्या सरदार बनण्याची इच्छाच मात्र सतत होत असायची तीही इच्छा, वेगवेगळ्या शाह्यांच्या भांडणामुळे महत्वाकांक्षी शहाजींची पुर्ण झाली नाही. आणि हे सर्व जिजाबाईंच्या समोर घडत होते. एका मानी, शुर, सरदार असूनही स्वराज्याचा विचार ज्यांना करता आला नाही. त्याबाबतीत तसे स्वप्न जिजाबाईंनी पाहिले, ते स्वप्न शिवबाला दाखवले आणि त्याच्याकडून ते पुर्णही करुन घेतले. जिजाबाई नंतर शिवबांना उभे केले ते दादाजी कोंडदेव यांनीच.शिवाजीच्या शिक्षणासाठी त्यांनी खास व्यवस्था केली. शिवाजीला एकाद्या राजपूत्राप्रमाणे त्यांनी वाढविले. त्यांना उत्तमोत्तम सुख-सोयीबरोबर राजकारणाचे व न्यायव्यवस्थेचे शिक्षण देण्यासाठी दादाजी कोंडदेव विजापुरचे सुभेदार असल्यामुळे शिवबाला ते आपल्या जहागिरीत घेऊन जात असत, लोकांशी , प्रदेशाची ओळख करुन देतांना लोकांमधे शिवबाद्दल अनुकूल मत करण्यासाठी दादोजीने प्रचंड मेहनत घेतली. त्याचाच फायदा राजेंना स्वराज्याचे तोरण उभारतांना झाला.

शहाजींच्या बाबतीत, मुसलमानी सत्तेमधे कितीही कर्तबगारी दाखवली तरी तिला अनुरुप फळ मिळण्याची शक्यता नव्हती. त्यांचा सत्तेच्या बाबतीत सतत कोंडमारा झाला. त्यांना कैदेतही राहावे लागले होते. मात्र सततच्या संकटातून सूटका करुन घ्यावी आणि एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे वागावे, हे त्यांना जमलेच नाही. त्यामुळे शेवटी कान्होबा जेधे आणि मंडळींना शिवबाच्या दिमतीस पाठवले ,शहाजींची कारकिर्द शेवटपर्यंत एक श्रेष्ट दर्जाचा सरदार म्हणूनच राहिली. बापाला जे जमले नाही ते मुलाने करुन दाखवले आणि हे करतांना केवळ आणि केवळ जिजाबाई, दादाजी कोंडदेव, हेच त्यांचे मार्गदाते होते असे आम्हास वाटते.

अवांतर : रामदासासंबधी आम्ही वर उल्लेखलेल्या रचनासंबधी आमचा इतिहासाचा प्राध्यापक मित्र म्हणतो. सर, ही सर्व रचना नंतर घुसवलेली आहे. राजेंची त्यांच्याशी भेट झालीच नाही,तत्कालीन एका वर्गाने ही सर्व रचनांची घुसखोरी केली आहे. रामदास गोसावी आलेले आहेत त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करावी इतकाच इतिहासात संदर्भ येतो म्हणे :(

बहुतांशी सहमत

अवांतर सोडल्यास बिरुटेसरांच्या प्रतिसादाशी बहुतांशी सहमत. अवांतरातील मुद्दा संशोधना अभावी अमान्य. संशोधन असल्यास वेगळ्या चर्चेत अवश्य मांडावे. इतकेच म्हणून सोडतो..

मला शहाजींसंदर्भात जास्त ऐतिहासीक माहीती इथे (सर्व प्रतिसाद) वाचे पर्यंत नव्हती. पण एकंदरीत "मला वाटते" संदर्भात राहून राहून इतकेच म्हणावेसे वाटते की माहेर-सासरच्या अत्यंत दुर्दैवी पद्धतीने मारामारीचा ते ही दुसर्‍यासाठी चवर्‍या ढाळताना, पाहून जिजाबाईचा मूळ स्वभाव "अधिकच" जागृत झाला आणि तिने ते जागेपणचे स्वप्न शिवाजीकडून घडवून आणले. अर्थातच शहाजीराजांचा त्याला विरोध नव्हता/नसावा पण शिवाजी या यशस्वी पुरूषामागे जिजाबाईच जास्त करून होती असे वाटते.

अवांतरः धार्मिक आणि अर्वाचीन इतिहासात अशा अनेक जागा आहेत जिथे बाईची जिद्द ही पुढच्या यशस्वी अथवा क्रांतिकारी घटनांना मार्गदर्शक ठरलेली दिसते. वस्त्रहरणाच्या प्रसंगानंतर कौरवांचा नाश करण्याचा पण करणारी द्रौपदी ही सातत्याने पांडवांना आठवण करून देयची. कृष्णाला शिष्ठाईला जायच्या आधी तिने खडसावले होते की गरज पडली तर माझी पाच मुले आणि अभिमन्यूला घेउन मी युद्धावर जाईन... तसेच मुक्ताबाईने वेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वरांना समजावून सांगितले (नुसतेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा संदभात नाही)...येसू वहीनींना तर सावरकरांनी "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी माझी स्फुर्ती" असे संबोधिले होते... थोडक्यात जिजाबाई ही शिवाजीची स्फुर्ती होती आणि त्या अर्थी देखील (वन ऑफ दी पण प्रॉमिनंट) गुरू होती असे वाटते.

हम्म!

हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार शहाजींनी केला नाही हे खरेच परंतु हिंदु धर्माबद्दल अनास्था भोसले कुटुंबियांत होती असे दिसत नाही. शहाजींच्या सवयी मुसलमानी संस्कृतीला साजेशा होत्या हे खरेच परंतु शहाजी काही इतर मराठा सरदारांपेक्षा वावगे करत होते अशातला भाग नाही किंवा जिजाबाई स्वतः कोणत्या वेगळ्या खानदानातून आलेल्या होत्या असेही नाही. त्यामुळे शहाजींच्या वृत्तीला कंटाळून जिजाबाई पुण्यास परतल्या वगैरे केवळ विपर्यस्त कल्पना वाटतात.

तत्कालीन पुरूषांनी एकापेक्षा जास्त विवाह करणे ही तर संस्कृतीच होती असे वाटते त्यामुळे सवत आल्याने जिजाबाईंत आणि शहाजी राजांत वितुष्ट आले हे ही संपूर्णतः ग्राह्य मानता येत नाही. (नाकारताही येत नाही)

मुळात वेगवेगळ्या शाह्यांच्या ठिकाणी एका महत्वाकांक्षी सरदार म्हणुन शहाजीची नोंद घेता येते, मात्र त्यांना एकाही शाहिने मान दिला नाही.

यावर विचार करण्याजोगे आहे. जर महत्त्वाकांक्षी आणि शूर सरदार होते तर मान का नाही? मान नाही कारण ते मुसलमानी नाहीत आणि मान देऊन शिरजोर करण्यापेक्षा मानहानी करून दाबून टाकणे उत्तम. मुळात हेच कारण स्वराज्याच्या स्थापनेला कारणीभूत ठरणारे आहे. सोबत मराठी माणसे होती हे विधान थोडेसे धाडसी आहे कारण शहाजींच्या सोबत फारशी मराठी माणसे नव्हती हेच सत्य आहे. याची कारणे विविध आहेत. मराठी माणसांची "खेकडा" वृत्ती, भोसल्यांचे खानदान कमी असल्याचे मानणे, शहाजींनी स्वत:ने निर्माण केलेला दबदबा यांतून कोणीही मान्यवर मराठा सरदाराने शहाजींना पाठिंबा दिल्याचे आठवत नाही.

जिजाबाईंवरचा विश्वास शहाजीराजांना त्यांना आपल्यापासून वेगळे करून पुण्याला पाठवण्यास कारणीभूत ठरला असावा. मी हा प्रश्न अनेकदा विचारला आहे की शहाजींनी शिवाजी आणि जिजाबाईंना पुण्यालाच का पाठवले? याचे समाधानकारक उत्तर मला मिळालेले नाही. (वेरूळला का नाही गेले?) परंतु असे वाटते की पुणे हे त्यामानाने महाराष्ट्रात आतवर असल्याने सतत स्वार्‍यांचा धोका कमी, पुण्याची अवस्था इतकी वाईट होती की त्याहून काही वाईट होण्याची शक्यता नसावी , तेव्हा तिथे बस्तान बांधून जन-मानसाचा पाठींबा मिळवणे सर्वात सोपे.

राजकारणात, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासारखे दुसरे शहाणपण नाही. शहाजी ते करू शकले म्हणून शिवाजी पुणे-जुन्नरचे जहागिरदार होऊ शकले हे विसरण्यासारखे नाही. जिजाबाईंनी स्वप्न जरूर पाहिले असावे, त्यांची हुशारी, धोरणीपणा, शहाणपण याला अजिबात तोड नाही परंतु शहाजींवर राग धरून किंवा त्यांनी हाकलले म्हणून बंगळुरावरून पुण्याला येऊन राहिल्या असत्यातर कोणाचीही मदत नसलेल्या या बाईला आणि तिच्या मुलाला स्वराज्य स्थापन करता आले असते असे वाटणे म्हणजे निव्वळ शाहिरी कल्पना आहेत असे मला वाटते. शहाजी राजांनी एक से एक माणसे शिवाजी बरोबर पाठवली (केवळ दादोजीच नाहीत) हे विसरण्याजोगे नाही.

शहाजींच्या काळात औरंगझेबाचे राज्य नसावे. शहाजहानचे असावे.

बापाला जे जमले नाही ते मुलाने करुन दाखवले आणि हे करतांना केवळ आणि केवळ जिजाबाई, दादाजी कोंडदेव, हेच त्यांचे मार्गदाते होते असे आम्हास वाटते.

यांतील केवळ आणि केवळ या भागाशी सहमती नाही.

एक खुलासा

वरील प्रतिसाद वाचताना, एक खुलासा/मुद्दा माझ्या आधीच्या प्रतिसादात देण्याचा राहीला तो लिहीतो:

जिजाबाईंत आणि शहाजी राजांत वितुष्ट आले हे मला देखील पटत नाही. अशा पद्धतीच्या जर-तरच्या गोष्टी जेंव्हा तथाकथीत इतिहासकार (यदुनाथ तथाकथीत होते असे वाटत नव्हते पण बाकी माहीती वाचल्यावर वाटते) बुद्धिवाद दाखवत घालतात तेंव्हा शंका येते. तसेच काहीही असले तरी त्याचा संबंध हा शिवशाहीशी आणि शिवाजीने जो काही पराक्रम केला त्याच्याशी आहे असे वाटत नाही हा वेगळाच मुद्दा. पण असे जेंव्हा लिहीले जाते तेंव्हा कुठेतरी कमीपणाची भावना जनसामान्यात निर्माण करण्याचा प्रयत्न असतो असे वाटते.

नवरा बायकोंचे न पटणे

लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा बायकोंचे न पटणे ही काही विशेष बाब नाही. ;-) आणि याचा अर्थ त्यांचे संबंध बिघडलेले आहेत किंवा वैराचे आहेत असेही नाही. दोन महत्त्वाकांक्षी माणसे एकत्र आल्यावर ठिणग्या उडायच्याच परंतु अशी माणसे दूर राहून प्रेमाने राहू शकतात हे ही सत्यच आहे. असो - यासर्व शक्यता झाल्या.

मूळ मुद्दा इतकाच आहे की जर वितुष्ट असते तर जिजाबाईंसोबत शहाजी इतकी विश्वासाची माणसे देते का? (बायकोला टाकणे, तेही माहेर नसलेल्या ही किती क्षुल्लक गोष्ट आहे याचा विचार करता यावाच.) जिजाबाई, शहाजींच्या मृत्यूनंतर स्वराज्याची काळजी सोडून सती जायला निघाल्या असत्या का? असे अनेक प्रश्न उभे राहतात.

सर यदुनाथ सरकार

>>यदुनाथ तथाकथीत होते असे वाटत नव्हते पण बाकी माहीती वाचल्यावर वाटते<<
यदुनाथच नव्हे तर सर्वच बंगाली आणि ग्रॅन्ट डफसारखे इतिहासकार शिवाजीला नेहमीच कमी लेखत आले आहेत. (अफ़झुलखान वॉज़ मर्डर्ड.- इति ग्रॅन्ट डफ़च्या इतिहासाचा चौथा व नववा भाग.) यदुनाथांनी शिवाजीला "ऑब्स्क्युअर, ऑफ़ नो हाय फ़ॅमिली इन्फ़्लुअन्स' आणि "ऑफ़ व्हेरी स्मॉल मीन्स" असे म्हटले आहे. या तुटपुंजी साधनसामुग्री असणार्‍या क्षुद्र इसमाने गडामागोमाग गड जिंकण्याचा सपाटा लावला म्हणून त्यांची तक्रार होती.
हयात असलेले बहुतेक बंगाली इतिहासकार कम्युनिस्ट असल्याने त्यांचे लिखाण अजूनही देशद्रोही स्वरूपाचे असते.--वाचक्‍नवी

बंगाली इतिहासकार

हयात असलेले बहुतेक बंगाली इतिहासकार कम्युनिस्ट असल्याने त्यांचे लिखाण अजूनही देशद्रोही स्वरूपाचे असते.--

बॉस्टन मध्ये रहात असल्याने याची चांगलीच कल्पना आहे...:-) त्यात कुणाशी मैत्री आहे (म्हणजे शेजारच्या देशातील) हे अजून एक तिखट मिठ लावले तर नवनवीन शोधप्रबंध तयार होणार्‍या शोधनिबंधांच्या संदर्भात अजूनच काळेबेरे दिसू लागते. त्यात फक्त हिंदूत्वाला झोडपणे नसते तर शिवाजी आणि इतर अनेक भारतासंदर्भात गोष्टी येतात... आश्चर्य इतकेच वाटते की इतके सहजसुलभतेने या अशा संशोधनाला अनुदान कसे लाभते...

सहमत आहे

सर यदुनाथ(जदुनाथ?) सरकार यांनी शिवाजीबाबत केलेले लेखन हे बहुतांशी इंग्रजी दस्तऐवजांवरून केले आहे. त्या दस्तऐवजांपेक्षाही अस्सल पुरावे मराठीत उपलब्ध असतानाही त्याचा आधार घेण्यास किंवा ते मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचे शिवाजीबाबतचे लेखन हे एकांगी व पूर्वग्रहदूषित झाले आहे असे मत शेजवलकरांच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते. वाचक्नवींच्या प्रतिसादाशी सहमत आहे

आपला,
(सहमत) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

केवळ आणि केवळ का वाटते !

केवळ आणि केवळ या भागाशी सहमती नाही.

सहमती नसू द्या !!! :) पण, जिजाबाई स्वभावाने अत्यंत मानी, कर्तबगार, व दोन्ही घराण्यांचा अभिमान बाळगणार्‍या होत्या. लखूजी जाधवासारख्या पराक्रमी सरदाराची कन्या, शहाजीसारख्या पराक्रमी सरदाराची पत्नी असे पद भुषवित होत्या. जिजाबाई धार्मिक प्रवृत्तीची होत्या. सरदार घराण्यात किर्तन प्रवचनाद्वारे ज्ञानदानाचे कार्य चाललेले असायचे. रामायण, महाभारत, पुराण याचे ज्ञान त्यांना मिळत असायचे. त्याच्याबरोबर कला, शास्त्र, राजनिती, याबाबतीतचे ज्ञानाबरोबर अशा गुणी लोकांचा आदर सत्कार आणि संग्रह त्यांना आवडायचा. अफझलखानाच्या वधाच्या पोवाड्यावर खूश होऊ अज्ञानदास नावाच्या शाहिराला एक शेर वजनाचा तोडा बक्षीस दिल्याचा इतिहासात उल्लेख आहेच. थोरला मुलगा जाणता झाल्याबरोबर शहाजींबरोबर स्वार्‍या, शिकारीला, जात होता. त्याचबरोबर परप्रांतात राहत असल्यामुळे जिजाबाईंची या मुलाशी गाठभेट तशी कमीच.

राजे शिवाजी, मात्र सतत जिजाबाईंबरोबर असल्यामुळे वरील उल्लेखलेले सर्व संस्काराबरोबर, आईची माया आणि वडिलांची कडक शिस्त जिजाबाईंनीच लावली. राजे शिवाजींवर सर्व चांगले संस्कार रुजविण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. शिक्षण, योग्य वाढ व जोपासना या संबधी त्यांनी फार काळजी घेतलेली दिसते. आपल्या पराक्रमी पित्याची झालेली वाताहात. कर्तबगार पराक्रमी नवर्‍याचा मुसलमान पादशाहीत झालेला कोंडमारा, अपमान त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला होता. वेगवेगळ्या शाह्यांमधे दोन्ही घराण्याचाकर्तबगार पुरुषांना आलेला अनुभव लक्षात घेऊन त्यांनी बाळ शिवबाच्या मनात स्वातंत्र्याच्या बिजाचे रोपण केले. आईंनी जे जे सांगितले त्या त्या सर्व आशा-आकांक्षा पुर्ण करुन राजेंनी त्यांचे पांग फेडले. राज्यभिषकानंतर अतिशय समाधानाने खर्‍या अर्थाने योग्य ठिकाणी जिजाबाईंनी आपले कार्य संपवले असे म्हणने वावगे ठरु नये. राजेंच्या बाबतीत आई वडील, भाऊ, बहिण, शिक्षक ही सर्व नाती जिजाबाईंनीच वठवली असे म्हणता येते. म्हणुन केवळ आणि केवळ जिजाबाईच....आम्हाला खर्‍या मार्गदर्शक वाटतात.

शहाजींच्या काळात औरंगझेबाचे राज्य नसावे. शहाजहानचे असावे.

करेक्ट !!! पण आमचा मुद्दा यासंबधी होता की, शहाजी जेव्हा कैदेतुन सुटले तेव्हा उत्तरेत मुघल बादशाह शहाजहान राज्य करीत होता. तेव्हाच दक्षिणेत औरंगजेब त्याचा प्रतिनिधी म्हणुन वावरत होता. शहाजहांचे 'दारा' वर 'औरंगजेबापेक्षा' अधिक प्रेम होते. आणि एकुणच रागरंग पाहता दाराच गादीवर येणार होता. निजामशाही डळमळत्या अवस्थेत असतांना मुघलांचे विजापूर आणि गोवळकोंड्यावर आक्रमण होणार होते. पण, गोवळकोंड्याचा मीरजुमला नावाचा एक महत्त्वकांक्षी सरदार होता. औरंगजेबाने मीरजुमल्याचा साह्याने दक्षीणेत मुघली साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. निजामशाही बुडण्याच्या वेळी मुघल व अदिलशाहात जो तह झाला त्यात मुघलांनी शहाजीला आपल्या नोकरीला घेऊ नये अशी एक अट घातली होती. त्यामुळे शहाजीला अदिलशाहीत जाणे भाग पडले. पुढे विजापुरांच्या मिळणार्‍या वागणुकीने शहाजी समाधानी नव्हते म्हणुन तो मीर जुमल्याच्या साह्याने तर कधी स्वतःच्या हिमतीवर औरंगजेबाच्या मुघली राज्याचा सरदार बनण्याचे स्वप्न पाहात होता पण अदिलशाही व कुतूबशाही यामधील विंतुष्ट आणि औरंगजेब व मीरजुमला यांच्यापुढे शहाजीचे काहीच चालले नाही हा इतिहास आहे. त्यास शेवटपर्यंत विजापुरांच्या दरबारात समाधानी राहावे लागले. (चुभुदेघे)

शिवभारतात उल्लेखात शहाजीबरोबर अनेक मराठी सरदार होते त्यांची नावेही आहेत. मात्र ते शहाजीला मानत होते का ? संघटनाच्या बाबतीत त्यांच्यात कौशल्याचा अभाव होता का ? या बाबतीत मात्र आम्हाला काहीही सांगता येणार नाही. शहाजी, जिजाबाईं, राजे शिवाजी यांचा सदरील चर्चेच्या निमित्ताने मराठ्यांचा बराच इतिहास चाळावा लागेल असे वाटायला लागले आहे. झाला तो इतिहासाचा अभ्यास पुरा झाला वाटत आहे. :)

रामदासांची राजेंशी भेट झाली का या बाबतीत नवीन चर्चा प्रस्तावाची तजवीज करावी असे वाटत आहे.

उत्तम

उत्तम चर्चा. बरीच चांगली माहिती मिळाली.
----

असेच म्हणतो

बरीच चांगली माहिती मिळाली.

असेच, आणि...

सुंदर आणि खूप माहितीदायक चर्चा.

एक प्रश्न : "प्रकट स्वराज्य, प्रच्छन्‍न स्वराज्य, मांडलिकी स्वराज्य आणि शेवटी स्वतंत्र स्वराज्य " हे क्रमवार चढ्या पातळीने आहेत का? कारण मांडलिकी स्वराज्य ही सर्वात पहिली पायरी वाटते, नंतर पुढील पायर्‍या, असे असावे असे वाटते. दुसरे, प्रकट, प्रच्छन्न व स्वतंत्र ह्यात नक्की फरक काय?

"प्रसंगाला अनुकूल दिसेल त्याप्रमाणे शत्रुत्वाचे, मित्रत्वाचे किंवा तटस्थतेचे धोरण त्याने ठेवले आणि हवे तेव्हा बदलले.." हे खासच वाटले. आपले 'भारत शासन' हे गेल्या साठ वर्षात अजून शिकलेले दिसत नाही.

प्रच्छन्‍न, प्रकट इ.

>>प्रकट स्वराज्य, प्रच्छन्‍न स्वराज्य, मांडलिकी स्वराज्य आणि शेवटी स्वतंत्र स्वराज्य " हे क्रमवार चढ्या पातळीने आहेत का? <<
नाहीत, लिहिताना काहीतरी चूक झाली असावी. पहिली पायरी मांडलिकी स्वराज्य--म्हणजे कुठल्यातरी सार्वभौम राजाच्या हाताखालचे मांडलिकत्व. पुढची पायरी-प्रच्छन्‍न स्वराज्य. म्हणजे फार गाजावाजा न करता थोडासा भूभाग जिंकून घेऊन त्यावर आपली हुकुमत चालवणे. नंतर प्रकट, म्हणजे असे स्वराज्य असल्याचे जाहीर करणे. पुढची पायरी स्वतंत्र मोठे राज्य. आणि शेवटी राज्य फार मोठे झाले की राज्यकारभाराच्या सोईसाठी काही अधिकार्‍यांना किंवा छोट्या राजांना मर्यादित स्वातंत्र्य देऊन चालवायचे ते सार्वभौम राज्य. असे राज्य अशोकाचे होते, किंवा पेशव्यांचे होते.--वाचक्‍नवी

+१

चर्चा आवडली.

महाराष्ट्रातील जेष्ठ इतिहासकारांचे याबाबत काय म्हणणे आहे याला दाखला कोणी देउ शकेल काय?

भविष्यात हा इतिहास महाभारत-रामायणासारखी चमत्कृतीजन्य पौराणिक कथा बनून न राहो.
पूर्ण सहमत.

ओके!

प्रियाली, राजे स्वतःच स्व:तचे गुरु होते असे माझ्या प्रतिसादात मी म्हटलेले नाही. वर वाचक्नवी यांनी शहाजीच्या योगदानाबाबत पुष्कळ माहिती दिली आहे. त्यावरुन शहाजींचा सहभाग किती होता यावर बराच प्रकाश पडला आहे.
तरीदेखील राजांच्या आयुष्यातील कित्येक गोष्टींमध्ये (अफजल खान प्रकरण, लाल महालावर हल्ला, आग्र्यावरुन सुटका, राज्याभिषेक, आरमाराची स्थापना, सूरतेची लूट, दक्षिण दिग्विजय ) या आणि अशा कित्येक गोष्टींमध्ये त्यांना कुणाकडून सल्ला मिळाला होता?
तरी तुम्ही हा चर्चाविषय जरा अधिक स्पष्ट करुन द्या. राजांच्या कारकीर्दीतील सर्व प्रसंगांसाठी त्यांचा गुरु तुम्ही शोधत आहात का केवळ स्वराज्याची प्रेरणा कुणी दिली यावर चर्चा अपेक्षित आहे?
राजकारण राजा घडवतो. आई-बाप, शिक्षक, अध्यात्म, गुरू इ. इ. केवळ निमित्त असते. वेळ-काळ आणि परिस्थितीसारखा दुसरा गुरू नाही. राजे घडले ते तत्कालीन राजकारणामुळे असे मला वाटते. हे वाक्य आणि परिस्थिती माणसाला शहाणं बनवते या वाक्याचा तसा एकच अर्थ निघतो. शहाजी राजांच्या योगदानाबद्दल माझे दुमत नाही. 'राजे स्वतःच त्यांचे गुरु होते' हे मत तुम्हाला पटले नसल्याचे देखील मान्य. पण म्हणून शहाजी राजांनाच आद्य गुरु मानण्याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देण्यातही अर्थ नाही.
पूर्वी वाचलेले संदर्भ (विसरलो!) देऊ शकलो असतो तर चर्चेत बरीच भर घालता आली असती. (हे वाक्य नेहमी उपयोगी पडते. ;-) !

बाकी 'भविष्यात हा इतिहास महाभारत-रामायणासारखी चमत्कृतीजन्य पौराणिक कथा बनून न राहो.' हे आपले विधान पटले.

-सौरभदा.

==============
Having one child makes you a parent; having two makes you a referee. ;-)

स्वयंप्रेरणेने

क्षमस्व! तुम्ही तसे म्हटलेले नाही. स्वयंप्रेरणेने राजांनी स्वराज्य घडवले असे म्हटल्याने मी सरसकट विधान केले.

तरीदेखील राजांच्या आयुष्यातील कित्येक गोष्टींमध्ये (अफजल खान प्रकरण, लाल महालावर हल्ला, आग्र्यावरुन सुटका, राज्याभिषेक, आरमाराची स्थापना, सूरतेची लूट, दक्षिण दिग्विजय ) या आणि अशा कित्येक गोष्टींमध्ये त्यांना कुणाकडून सल्ला मिळाला होता?

अशा प्रकारचे कोणतेही मोठे निर्णय राजांनी एकट्याने घेतलेले नसावेत. अमात्य, सल्लागार, कारभारी, सेनापती आणि इतर खाजगी सल्लामंडळाकडून सल्ले घेऊनच केलेले असावे. राजांचे ते एकट्याचे निर्णय नसावेत परंतु राजे म्हणून श्रेय त्यांचेच आहे आणि मोहिमा फत्ते करण्याची जबाबदारीही राजांचीच. त्यामुळे राजांचे महत्त्व सर्वाधिकच आहे.

तरी तुम्ही हा चर्चाविषय जरा अधिक स्पष्ट करुन द्या. राजांच्या कारकीर्दीतील सर्व प्रसंगांसाठी त्यांचा गुरु तुम्ही शोधत आहात का केवळ स्वराज्याची प्रेरणा कुणी दिली यावर चर्चा अपेक्षित आहे?

नाही राजांच्या कारकिर्दीतील प्रसंगांसाठी गुरू शोधत नाही. गुरू तुम्हाला एका इप्सित मार्गावरून चालण्याचा सल्ला देतो, वाट दाखवतो, तुमचे मनोबळ वाढवतो. स्वराज्य स्थापनेची ही वाट राजांना कोणी दाखवली, त्यामार्गावरून चालण्यास राजे उद्युक्त कसे झाले अशा तर्‍हेची चर्चा आहे. त्यात थोडी वेगळी मते, स्वतःची मते मांडण्यास काहीच हरकत नाही.

एकदा राजांनी त्या मार्गावरून चालण्यास सुरुवात केल्यावर कारकिर्दीतील प्रसंग हे नैमित्तिक आहेत.

तुम्हाला अधिक संदर्भ मिळाले, चर्चेशी संबंधित किंवा थोडेफार अवांतर तर अवश्य द्या!

शिवाजीचे गुरू

या विषयावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या व्याख्यानमालेत उत्तर दिले आहे. मी लहान असताना मला ही व्याख्यानमाला ऐकण्याची संधी मिळाली. यात त्यानी "शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पार्श्वभूमी शहाजी राजांनी तयार केली व वेळोवेळी ते या कामाचा आढावा घेत होते" असा संदर्भ दिला.

शहाजी राज्यांच्या बेंगलूर येथील दरबारात जयराम पिंड्ये नावाचे एक कवी होते . या जयराम पिंड्यांनी शहाजी राज्यांचे चरित्र असलेले राधामाधव विलासचंपू एक कवन केले. हे मूळ काव्य खूप छोटे आहे. या कवनाला इतिहाचार्य वि. का. राजवाडे यांनी २०० पानी प्रस्तावना लिहिली आहे.

या प्रस्तावनेमध्ये वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन राजकीय व्यवस्थेचा उहापोह केला आहे. सर्व प्रस्तावनेमध्ये हे उघड होते की शिवाजी राज्यांना पुणे येथे पाठविण्यात व त्यांना स्वराज्यासाठी उद्युक्त करण्यात स्वतः शहाजी राजे यांनी खूप मदत (अर्थात अप्रत्यक्षपणे) केली.

स्वतः शहाजी राजे आपली नोकरी सोडून स्वतंत्र राज्य स्थापन करू शकत होते परंतू वाढते वय व इतर काही कारणांमुळे ते या कार्यात स्वतः उतरू शकले नाहीत.

इछुकांनी हे पुस्तक स्वतः वाचावे.

ह. अ. भावे यांच्या वरदा प्रकाशनाने याची आवृत्ती छापली आहे.
पुस्तकाचे नावः राधामाधव विलासचंपू.
लेखकः जयराम पिंड्ये.

प्रस्तावना: इतिहाचार्य वि. का. राजवाडे

नितीन

शहाजी आणि शिवाजी : काही अवांतर मते

चर्चा माहितीप्रद झाली आहे.
अवांतरः
राजे शहाजी आणि बाल शिवाजी यांचे संबंध चांगले होते. जिजाबाईंशी पटत नसल्याने शहाजीराजांनी त्यांना पुण्याला पाठवले हे पटत नाही. (कारण त्यांना एकूण ६ मुले झाली. त्यातली शिवाजी आणि संभाजी ही दोन वाचली. शिवाय संभाजी हा ज्येष्ठ पुत्र शहाजी राजांनी स्वतःजवळ ठेऊन घेतला होता.) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत(१६३० ते १६४२) बालशिवाजी जिजाऊंसह बंगलोर(बंगरूळ) येथे होते. तेथे त्यांनी रीतसर संस्कृताचे शिक्षण घेतले होते.
(शिवाजी महाराज संस्कृतचे जाणकार होते. तसेच त्यांना फारसी लिहिता-वाचता येत होते(हे वाक्य माझे मत). सूरत वखारीत सापडलेल्या पत्रांवरून (गिफर्ड) असे दिसते की शिवाजी महाराज स्वतः पत्रे लिहित असत. बेंगरूळात त्यांचे गुरू कोण होते त्याचा शोध नाही. पण शहाजीराजांच्या पदरी असलेले संस्कृतपंडित असावेत असा अंदाज बांधता येतो.)
दादोजी कोंडदेवांचा मृत्यू १६४७ साली झाला. त्यावेळी युवा शिवाजी १६-१७ वर्षांचा होता. दादोजींनी शिवाजीला ४-५ वर्षेच शिक्षण दिले. हे सर्व शिक्षण राज्यकारभार कसा चालवावा याबद्दल प्रामुख्याने असावे. म्हणजेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा-भाला-तलवार चालवणे अशा प्राथमिक गोष्टी त्यांना अगोदरच माहित असाव्यात.
यावरून दादोजी कोंडदेवांचे महत्व कमी होत नसले तरी शहाजी राजांनी शिवाजीची पूर्वतयारी करून घेतली होती हे स्पष्ट होते.
संदर्भ : जेधे शकावली, शिवभारत, पत्रसारसंग्रह,सभासदाची बखर,इंग्रजी पत्रव्यवहार इ.

अवांतर नाही

जेवढी माहिती पुढे येईल ती सर्वच हवी असणारी आहे तेव्हा अवांतर वाटले नाही. संदर्भ आणि माहितीबद्दल धन्यवाद.

वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत राजे बंगळूरास होते ही माहिती थोडीशी नवी आहे. ते एकेरी वयात पुण्याला आले अशी माझी समजूत होती. :-)

गिफर्डला लिहिलेल्या पत्रावरून महाराज स्वतः पत्रे लिहित हे मान्य आहे. संस्कृताचे शिक्षणही झाले असावे परंतु काव्य-शास्त्र-विनोदात राजे रमले नाहीत हे आपले भाग्यच. :-)

माझीही समजूत -

हे मात्र पूर्ण अवांतर -

ते एकेरी वयात पुण्याला आले अशी माझी समजूत होती.

माझीही. मला असेही वाटत होते की जिजाबाईस शहाजीने टाकले होते. पण हे सर्व ग्रँट डफ आणि जदुनाथ सरकारांच्या इतिहासातून आले आहे. या जदुनाथ महाशयांनी 'शिवाजीच्या अनिर्बंध वर्तनास कंटाळून दादोजी कोंडदेवांनी वीषप्राशन करून आत्महत्या केली' असाही शोध लावला आहे.
(१९२० - जदुनाथ सरकार इंग्रजी सरकारच्या इंडियन एज्युकेशनल सर्विसमध्ये नोकर होते. इंग्रजांनी भारतीय मानबिंदूंवर शिंतोडे उडवण्यासाठी असे लेखन करवणे सहज शक्य आहे.)

पण भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष सी.व्ही. वैद्य यांनी १९३१ साली लिहिलेल्या पुस्तकात त्याचे खंडन केलेले आहे.
(सी.व्ही.वैद्य देशी बाजू मांडणार हेही स्पष्ट आहे. आपण कोणावर विश्वास ठेवावा? ते आपण ठरवावे.)

शहाजी कोणी गयागुजरा माणूस नव्हता हे तर स्पष्ट आहे. त्याची राजधानी बेंगरुळ होती हेही स्पष्ट आहे. पातशाह्या त्याला घाबरत होत्या हेही. मग असा माणूस असे अशोभनीय वर्तन करेल असे वाटत नाही.

१६३६, वयाच्या सहाव्या वर्षी.

>>ते एकेरी वयात पुण्याला आले अशी माझी समजूत होती. <<
ही माहिती बरोबरच आहे. शिवाजी, जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव १९३६ मध्ये पुण्यात आले. त्यावेळी शिवाजीचे वय अर्थात सहा वर्षे होते.--वाचक्‍नवी

४-५ नाही तर ११ वर्षे.

>>दादोजी कोंडदेवांचा मृत्यू १६४७ साली झाला. त्यावेळी युवा शिवाजी १६-१७ वर्षांचा होता. दादोजींनी शिवाजीला ४-५ वर्षेच शिक्षण दिले.<<
शिवाजी १९३६ मध्ये पुण्यात आला, बरोबर दादोजी कोंडदेव होतेच. त्याही वेळेला त्यांचे 'वय झाले होते'. तरीसुद्धा त्यांनी शिवाजीला कमीतकमी ११ वर्षे शिक्षण दिले. शेवटच्या दुखण्यात दादोजी अंथरुणाला खिळले होते. असे असून त्यांची सल्लामसलत शिवाजीला शेवटपर्यंत होती.--वाचक्‍नवी

पण चिंतामणराव वैद्य -

यांच्या 'शिवाजी - द फाऊंडर ऑफ मराठा स्वराज 'या पुस्तकात सातव्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे (किंवा विकीवरही म्हटल्याप्रमाणे) शिवाजी जिजाऊंसह १९४२ साली परत पुण्याला आले.
शिवाजी आणि जिजाबाईंचे वास्तव्य :
१९३० ते १९३३ -जुन्नर
१९३३ ते १९३६ - माहुली
१९३६ ते १९३९ -पुणे आणि विजापूर
१९३९ ते १९४२ - बेंगलोर
यातील १९३६ ते १९३९ या काळात शिवाजी पुण्याला / विजापूरला होता. पण या काळात दादोजी कोंडदेवांकडे माता-पुत्रांची देखरेख होती असा उल्लेख नाही. परंतु १९४२ नंतर मात्र नि:संशयपणे दादोजी कोंडदेव पुण्याच्या जहागिरीचे कारभारी होते. १९४२ साली ते बेंगलोरास जाऊन जिजाऊ-शिवबा यांना पुण्यास घेऊन आले.
शिवाजी १९३६ साली पुण्यात आला तरी तो विजापूरला येत जात होता. वगैरे...

लोच्या!

नाना, माफ करा, खूप दिवसांनी उकरून काढले, पण आज हा धागा प्रथम वाचतो आहे.
म्हणजे हा गोंधळ कुणाच्या ध्यानी आला नाही की येऊनही दुर्लक्षित केला गेला ठाऊक नाही, पण वरील प्रतिसादातले शतक् १९ नसून १६वे हवे ना? (विकीचा दुवा पाहिला नाही, पण तिथून चोप्य्-पस्ते केले असल्यास तिथेही दुरुस्ती केली जायला हवी असे वाटते)

तसेच वर २-३ ठिकाणी बेंगळूरा जागी बेंगरूळ झाले आहे. हे जरा बेंगरूळ ध्यान असे दिसते.

छान चर्चाप्रस्ताव

आणि प्रतिसाद. इतिहासातील व्यक्ती या शेवटी व्यक्ती असतात, त्यांच्यातील परस्परसबंध हे आपल्याइतकेच गहन किंवा सोपेही असू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. शक्यता अनेक असाव्यात. त्यांचा उहापोह बर्‍यापैकी झाला आहे, म्हणून अधिक लिहीत नाही. फक्त वर प्रियालीच्या एका प्रश्नाबद्दल -
शिवाजी आणि जिजाबाई पुण्यालाच का आले? - मला असे आठवते की तेथे त्यांची जहागीर होती. कदाचित ही जहागीर नवीन असेल, कदाचित तिचा सांभाळ करणे सोपे असावे. शिवाय भौगोलिक दृष्ट्या पुणे हे पुढच्या राहण्याच्या दॄष्टीने चांगले वाटले असावे. वेरूळला त्याकाळी राहण्यात कदाचित काही तोटे असावेत (भौगोलिक आर्थिक, भविष्याच्या दॄष्टीने -वेरूळ कदाचित पाणीपुरवठा, शेतीवाडी इत्यादी दृष्टीने जाचक असावे). आता हे सर्व अंधारात चाचपडण्यासारखे आहे, कारण हे सर्व खात्रीने सांगण्यासाठी लागणारे कागदपत्र आपल्याकडे नाहीत. मला असे वाचताना वाईट एवढेच वाटते की कोणाही इतिहासकाराचे म्हणणे मुळातून कसे आहे आणि का आहे हे आपण वाचलेले नसते (मी तरी नाही). सांगोवांगीच्याच बर्‍याचशा गोष्टी असतात.

या चर्चेत खरे तर काही पुस्तकांचे/पत्रांचे उल्लेख (*ज्यांची नावे फारशी प्रसिद्ध नाहीत अशी पुस्तके) आले आहेत. अशी या संदर्भातील कुठची पुस्तके उपक्रमींना माहिती असल्यास त्यांची माहिती (लेखक, प्रकाशक, उपलब्धता) येथे द्यावीत असे एक सुचवावेसे वाटते.

पुण्यालाच का?

>>शिवाजी आणि जिजाबाई पुण्यालाच का आले? - मला असे आठवते की तेथे त्यांची जहागीर होती. कदाचित ही जहागीर नवीन असेल, कदाचित तिचा सांभाळ करणे सोपे असावे. शिवाय भौगोलिक दृष्ट्या पुणे हे पुढच्या राहण्याच्या दॄष्टीने चांगले वाटले असावे. << "उदेपूरचा राणा भीमसिंगाचा बागसिंग नावाचा दासीपुत्र होता. राण्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊबंद सिसोदे रजपूत, त्यास कडू समजू लागले. म्हणून तो प्रथम खानदेशात आला व नंतर पुण्याजवळ जमीन विकत घेऊन तेथील जमीनदार झाला. त्याच्या चार मुलांपैकी मालोजी व बंबोजी हे दोन होत. " --बुंदेल्यांच्या बखरीमधून

नवी जहागीर नाही

पुण्याची जहागीर नवी नक्कीच नव्हती. शहाजींच्या महाराष्ट्रातील जहागिरी किती होत्या याची मला नक्की कल्पना नाही परंतु अदिलशाहीतील एक अमात्य/ प्रधान/ सेनापती यांनी शहाजींच्या पुणे, जुन्नर, इंदापूर येथी जहागिरी नष्ट केल्या होत्या. पिकांना आगी लावणे, घरांची जाळपोळ करणे इ. करून त्यांनी पुण्यात गाढवाचा नांगर चालवल्याचे सांगितले जाते. पुण्याची इतकी दुर्दशा होती की भर गावात निवडुंग वाढले होते आणि लांडगे वगैरे श्वापदे फिरत.

म्हणून प्रश्न उद्भवतो की, अशा जहागिरीत राणीला आणि लहान मुलाला पाठवून ते पुन्हा वसवण्यात कोण कोणते राजकीय स्वार्थ/ खेळी/ चाली होत्या? (हा प्रश्न मूळ चर्चेशी थोडा अवांतर असू शकेल.)

पुस्तक

या चर्चेत खरे तर काही पुस्तकांचे/पत्रांचे उल्लेख (*ज्यांची नावे फारशी प्रसिद्ध नाहीत अशी पुस्तके) आले आहेत. अशी या संदर्भातील कुठची पुस्तके उपक्रमींना माहिती असल्यास त्यांची माहिती (लेखक, प्रकाशक, उपलब्धता) येथे द्यावीत असे एक सुचवावेसे वाटते.

मराठ्यांचा इतिहास
खंड पहिला
शिवाजी आणि शिवकाळ
(१६००-१७००)

संपादक
अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त चर्चा

चांगली चर्चा चालु आहे. वेळे अभावी फार भर घालु शकत नाहि. पण माझे मत असे आहे की शिवराय हे जिजाबाईमुळेच घडले. ती जर मुलाला उत्तम घडवतेय तर कशाला मधे या इतका(च) सुज्ञ विचार शहाजीराजाने केला. यापलिकडे (जिजाईच्या मार्गामधे न येण्याच्या पलिकडे) शहाजी राजांनी मुद्दामहून प्रयत्न केल्याचे दिसत नाहि. बरोबर दिलेली योग्य माणसं म्हणाल तर प्रत्येक माणूस योग्य/अयोग्य नसतो त्याचा योग्य रीतीने वापर करून घ्यावा लागतो. (कदाचित तत्क्षणी असणार्‍या हुद्द्यावर न चालणार्‍या व्यक्ती जिजाईबरोबर पाठवल्या व त्यांचा जिजाबाईंनी मात्र वेगळ्या कामासाठी उत्तम वापर करून घेतला असेही असु शकते. अर्थात हे जर तर झाले ठोस काहिच नाहि). मला गंमत वाटते की जर दादोजी कोंडदेवांना शहाजीराजांनी एखाद्या योजनेच्या अंतर्गत पाठवले होते तर त्यांचे नाव आधी कसे येत नाही?

बाकी रामदासांबद्दल म्हणाल तर ते व शिवराय यांची भेट झाली असण्याची शक्यता दाट वाटते. शिवथर घळ ही दासबोधाच्या उगमस्थानाबरोबर राजकीय खलबतांसाठीही प्रसिद्ध आहे. याविरुद्ध मत येथे वाचले

अवांतरः रामदास ब्राह्मण असल्याने शिवरायांचा त्यांच्याशी संबंध असणे अथवा ते शिवरायांचे गुरू असणे सध्या राजकीय गैरसोयीचे आहे काय? ;)

जाता जाता: दादोजी कोंडदेव हे कोण? कुठले? यांच्या आयुष्यावर भाष्य शिवरायांच्या शिक्षणानंतरच चालु होते का? त्याआधी ते कोण होते? त्यांच्यावर काहि पुस्तक आहे का?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

शिवरायांचे पूर्वज,शहाजी, दादोजी कोंडदेव इत्यादी..

भोसला वंश -सिसोदिया वंशापासून उत्पत्ती असावीच असे निश्चितपणे सांगता येत नाही. या सिसोदिया वंशावळीत 'भोसाजी' असे नाव आढळत नाही. परंतु वेरूळच्या भोसला घराण्याचा मूळ पुरुष 'देवराज' हा भोसाजीचा पुत्र होता असे प्रवाद आहेत. दुसरीकडे देवराज वेरूळजवळील 'भोसा' या गावी स्थायिक झाल्याने त्याच्या वंशाला 'भोसला' असे नाव पडले असावे असाही प्रवाद आहे. दुर्गा देवी महादुष्काळ (इ.स. १३९२ ते १४०४) या काळात उत्तरेतले अनेक ब्राह्मण/क्षत्रिय दक्षिणेकडे सरकले. त्या काळात हे वेरूळला आले असावेत.

बाबाजी भोसला - इ.स. १५९७ मध्ये निजामशाही सनद मिळून मनसबदार झाले. निजामशाही त्यावेळी दौलताबाद किल्ल्यातून चालत असे.अहमदनगर निजामशहाने वसवले आणि नंतर त्याची राजधानी झाली.

मालोजी आणि विठोजी -निजामशाहीतले सनदशीर मोकाशी. वेरूळ, दर्‍हाडी,कन्नड, वाकडी (ही सर्व औरंगाबाद जवळील गावे)
आणि लासुर, आधारसुल, पोर्ले, पिंपळवाडी, गौडगाव, जतेगाव ही काहीशी दूरची गावे त्यांच्या ताब्यात होती.
मालोजीराजांनी वेरुळ येथे शिवलिंगाची स्थापना केली. (घृष्णेश्वर - बारावे ज्योतिर्लिंग). हे देऊळ कालौघात नष्ट झाले असावे. सांप्रत अस्तित्वात असलेले मंदिर हे अहल्याबाई होळकरांनी १८ व्या शतकात बांधविले आहे.
मालोजींची पत्नी फलटणच्या निंबाळकर घराण्यातली होती. याचा अर्थ भोसले घराणे वांशिक दृष्ट्या मान्यता पावलेले होते.
मालोजींना लवकर अपत्यप्राप्ती झाली नाही. तेव्हा 'शाह शरीफ' नामक सूफी संताला नवस बोलून झालेल्या पुत्रांची नावे त्याने शहाजी(जन्म इ.स.१६०१), शरीफजी अशी ठेवली. मालोजींचा मृत्यू - इ.स. १६०६ मध्ये इंदापूरच्या लढाईत अदिलशाही सैन्याकडून मारले गेले.
त्यानंतर काका विठोजी यांनी त्यांचा सांभाळ केला.

याचाच अर्थ असा की शहाजीपूर्वीही भोसले घराण्यात मर्दुमकीची परंपरा होती. या सार्‍या घराण्याच्या इतिहासाचा परिणाम शिवाजी राजांच्या वर्तनावर झाला असणारच. (हेही सबकॉन्शली - अंतर्मनात शिवरायांचे गुरू ठरू शकतात.)

शहाजी - शहाजी जुलै १६२५ मध्ये अहमदनगर निजामशाहीत होता तो डिसेंबर १६२५मध्ये विजापूर अदिलशाहीत गेला. त्यानंतर तो अदिलशाही, निजामशाही, मुघल अशा वार्‍या करीत राहिला. त्याकाळात पुणे परगणा त्याला मिळणे आणि मर्जी फिरल्यावर तो काढून घेतला जाणे हे सातत्याने होत राहिले.
शहाजीच्या अनुभवात निझामशाही, अदिलशाही, कुतुबशाही आणि मुघलशाही अशा सर्व शाह्या आल्याने आणि आपल्याच जिवावर राज्य करणारे हे शहा आपल्याला किंमत देत नसल्याचे कळून आल्याने त्याच्या मनात स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे असे आले असणे शक्य आहे.
मणून त्याने स्वतःच्या बळावर एका मुस्लिम शाहीची निर्मिती केली. (पेमगिरी किल्ला १६३२). पूर्वीच बुडालेल्या निजामशाहीची पुनर्निर्मिती करण्याचे धाडस त्याने दाखवले यावरून त्याची मनिषा जाहीर होते. या निझामशाहीने प्रबळ मुघल आणि अदिलशाही यांच्याशी तब्बल ३ वर्षे टक्कर दिली. पण त्य्चा पुढे निभाव लागला नाही.
(अनेक कंपन्यांत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलेल्या आणि स्वतः कंपनी काढण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेल्या एखाद्या अधिकार्‍यास आपल्या मुलाने स्वतःचीच कंपनी काढावी, आपण त्याला मदत करू असे येणे स्वाभाविक आहे.;))

दादोजी कोंडदेव - (ज्यांच्या नावाचा उल्लेख जदुनाथ सरकारांनी सातत्याने 'दादाजी कोंडदेव' असा केला आहे..) दादोजी कोंडदेव हे शहाजी राजांच्या पदरी नोकर होते असा समज आहे. पण तो तितकासा खरा नाही. दादोजी कोंडदेव हे स्वतः कोंडाणा किल्ल्याचे थेट (निजामशहाने नेमलेले - नामजद) किल्लेदार होते आणि पुणे जिल्ह्याचे सुभेदार होते. हा कर्तबगार पुरुष स्वतंत्रपणे (शहाजीच्या अखत्यारीत नव्हे) न्यायदानाचे काम करत असे उल्लेख आहेत. त्यांची कर्तबगारी पाहूनच शहाजीराजांनी त्यांना आपल्या जहागिरी(मोकसा?) वर कारभारी म्हणून नेमले. (हे तिहेरी काम आहे. - कोंडाण्याचे किल्लेदार, निजामशहाचे सुभेदार आणि शहाजीराजांचे कारभारी)

(वर केलेले एकेरी उल्लेख कोणाच्या भावना दुखावत असतील तर क्षमा करावी. तसा हेतू नाही.)

भोसला वंश

रियासतकार सरदेसायांचे "मराठी रियासत-शहाजी" हे पुस्तक हल्लीच वाचून काढले. त्यात भोसले हे सिसोदियाकडूनच आलेले आहेत असे दिले आहे तसेच पूर्ण नावांसहीत वंशवृक्ष दिला आहे.
सजनसिंह-->कर्णसिंह आणि शुभकृष्ण--->कर्णसिंहापासून घोरपडे आणि शुभकृष्णापासून भोसले झाले असे म्हटले आहे. कर्णसिंह एक किल्ला घोरपड लावून जिंकला म्हणून त्यांस घोरपडे बहाद्दर असा किताब निजामाने (!) दिला. पुस्तक सध्या सोबत नसल्याने अधिक माहिती देता येत नाहीये.

वरील चर्चेच्या निमित्ताने झालेल्या वाचनामुळे शहाजी आणि शिवाजीराजांबद्दल आदर दुणावला आहे. शिवाजीराजे दक्षिणेश्वर रुपात दिसत आहेत. रियासतीत एक वाक्य आहे. जर शिवाजीराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटले तर शहाजीराजांना स्वराज्य-संकल्पक म्हटले पाहिजे.

मराठी रियासत- शहाजी- गो. स. सरदेसाई(ढवळे प्रकाशन, गिरगाव)
निवडक शेजवलकर- राजा दिक्षित
शिवशाहीचा शोध- वसंत कानेटकर
परकियांच्या दृष्टीकोनातून शिवाजी- ..जोशी

मराठी रियासतीचे सर्व (८)खंड कुठे विकत मिळत असल्यास कळवावे. पुण्यात रसिक मध्ये शेवटचे ३ मिळताहेत.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

सहमत

जर शिवाजीराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटले तर शहाजीराजांना स्वराज्य-संकल्पक म्हटले पाहिजे.

सहमत आहे.

पुस्तक मिळाले तर आणखीही माहिती द्यावी.

 
^ वर