शिवाजी राजांचे गुरू कोण?
विशेष सूचना: खालील चर्चा जातीयवादावर जावी या हेतूने सुरू केलेली नाही. विषयाला धरून तसे प्रतिसाद आल्यास सदस्य संयमित शब्दांत ते व्यक्त करतील अशी आशा आहे.
खुलासा: खालील अटकळी केवळ आठवणीतील माहितीतून बांधल्या आहेत. त्या चुकीच्या असण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन चुका सुधाराव्या आणि चर्चा चालवावी.
शिवाजीराजांचे गुरू कोण? हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा तेव्हा एक मोठे प्रश्नचिन्ह डोक्यात उभे ठाकते. बरेच लोक या प्रश्नाचे उत्तर रामदासस्वामी असे देतात. काही लोक तुकाराममहाराज असेही देतात. शालेय इतिहास अभ्यासला असेल तर दादोजी कोंडदेवांचे नावही आठवते. जिजाबाईही आठवून जातात.
मध्यंतरी एका लेखात रामदासस्वामींसारखे गुरू लाभल्याने शिवाजीराजे घडले असे विचित्र वाक्य वाचनात आले. त्यानंतरही मिसळपावावरील एका लेखात यासारखेच (शब्दश: असे नाही) वाक्य वाचनात आले.
अशाप्रकारचे अनेक लेख वाचनात येताना, शहाजी राजांची आठवण कधीच होताना दिसत नाही. मराठ्यांचा फारच त्रोटक इतिहास मी वाचला असल्याने खालील परिच्छेदांत त्रुटी असण्याची शक्यता आहे.
शहाजीराजे निजामशाहीचे सेवक होते तेव्हा निजामशाही मलिकअंबर या हबशी वजिराच्या हातातील बाहुले होती. फोडा आणि (मराठ्यांवर) राज्य करा हा बाणा मलिकअंबरने चातुर्याने स्वीकारला होता. इतर मराठ्यांचे आणि जाधवांसारख्या नातलगांचे सहाय्य नसल्याने, निजामशाहीचे फोडाफोडीचे राजकारण आणि मोघलांचा संधीसाधू कावेबाजपणा यांत शहाजीराजांच्या पदरी इथून तिथून दल बदलत राहणे आले तरी मराठ्यांचे वेगळे राज्य स्थापन व्हावे ही प्रथमतः त्यांची इच्छा होती असे सांगितले जाते. शहाजीराजे किंवा वेरूळच्या भोसल्यांनी मराठा राजकारणात केलेली प्रगती पाहून त्यांची स्वप्ने इतर मराठ्यांपेक्षा वेगळी होती हे म्हणण्यास जागा वाटते. (बाबाजी भोसले हे फक्त वेरूळ गावचे पाटील होते, मालोजी भोसले जाधवांकडे प्रथम शिलेदार म्हणून भरती झाले आणि वर चढत गेले. शहाजी अदिलशाहीत सर-लष्कर होते. या चढत्या क्रमात शिवाजी राजे स्वतंत्र राजे न होते तर नवल वाटते.)
शिवाजी राजांचे गुरू त्यांचे आई-वडिल आणि त्याहीपेक्षा अधिक तत्कालीन राजकारण असावे असे वाटते. तरी खाली काही प्रश्न आहेत -
१. पुणे-जुन्नर भागातील शहाजी राजांची जहागिर अदिलशाही आणि मोघलांनी बेचिराख करून टाकली होती. त्या भागातच जिजाबाईंना पाठवण्यात शहाजीराजांचे कोणते राजकारण असावे?
२. जिजाबाईंशी जाधव घराण्यामुळे त्यांचे विशेष सख्य नव्हते म्हणावे की जिजाबाईंचा मुत्सद्दीपणा पाहून त्या आणि लहान राजे लांब राहून आपले स्वप्न पुढे चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता हे कळत नाही. जिजाबाई पुण्यात स्थायिक होत असता त्यांच्यासह हुशार सल्लागार आणि अमात्य देण्यात शहाजी राजांचे डावपेच होते काय?
३. तरूण वयात दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने राज्य उभारण्याचे स्वप्न पहाणे शक्य असले तरी साकारणे कठिण होते. शहाजीराजांचा याला अव्यक्त पाठिंबा होता काय?
४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?
Comments
माझेही मत :)
शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या परीने वर उल्लेखलेले बरेच अयशस्वी प्रयत्न केलेत, पण शेवटचा, निजामशाही पुनरुज्जीवीत करण्याचा त्यांचा प्रयत्न शहाजहानने हाणून पाडल्यावर शहाजीराजे परत आदिलशाहीमधे गेले. त्यावेळेस शहाजहानच्या प्रखर विरोधाने त्यांना महाराष्ट्रात न राहू देता आदिलशाहीने कर्नाटकात (म्हणजे महाराष्ट्र अन् सह्याद्रीपासून शक्य तेवढे दूर) पाठवले. त्याचवेळी त्यांच्याकडे अगोदरची असलेली पुण्याची जहागीर परत चालू करण्यात आली. त्यावेळेस शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवबा यांस पुण्याच्या जहागीरीच्या देखरेखेसाठी म्हणून पुण्यास पाठवले व दादोजींना त्यांच्यासोबत दिले. (संदर्भ: बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती).
"माझे मत" चा उपयोग करून खालील गोष्टी मांडतो :) -
वरील प्रसंगाच्यावेळेस त्यांनी शिवरायांनी मावळे गोळा करून पुढे स्वराज्य स्थापावे या हेतूने असे केले असे म्हणणे धाडसाचे वाटते. त्यापेक्षा असा विचार केला तर पचनी पडतो कि त्यांची स्वत:चीच परत असा प्रयत्न करण्याची पुढेमागे इच्छा असावी व त्यादृष्टीने मुलुखबांधणी करण्याची त्यांची योजना असावी. कारण स्वराज्य स्थापायचे झाले तर शक्य तेवढा मोठा लोकसमुदायाचा पाठींबा मिळणे आवश्यक हे त्यांना त्यांच्या अपयशाने शिकवले असणार. पण पुढे मुलाची प्रगती पाहून त्यांनी स्वत: पडद्यामागची भुमिका घेणे जास्त योग्य समजले असावे. याचा अर्थ ते केवळ हातावर हात ठेवून बसून राहीलेत असे नाही. आदिलशाहीकडून लढताना त्यांनी दक्षिणेतील तत्कालीन छोटी-छोटी हिंदू राज्ये वाचवण्याचेच धोरण ठेवले होते.(संदर्भ: बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती). ते कशासाठी? त्यांचे राजकारण खूप विचारपुर्वक केलेले होते. एका बाजूला शिवाजी महाराष्ट्रात तर शहाजी कर्नाटकात यामधे फसलेली आदिलशाही पुन्हा कधी डोके वर काढू शकली नाही. हे एका परीने दिल्लीच्याही फायद्याचेच असल्याने त्यांनीही याबाबतीत दुर्लक्ष केले. एकुणात, प्राप्त परिस्थितीचा योग्य वापर करून संयमाने अन् सावधपणे स्वत:चे लक्ष्य साधणार्या बाप-लेकाच्या या अत्यंत कर्तबगार जोडीने इतिहास निर्माण केला.
गुरू कोण यासंदर्भात मत व्यक्त करायचे झाले तर अत्यंत चलाख डोके, दूरदृष्टी, बाणेदारपणा, कर्तबगारपणा, माणसे हेरण्याची व जोडण्याची कला, मर्दुमकी, जाज्वल्य देशभक्ती या गोष्टी शिवरायांना शहाजीराजे-जिजाऊंकडून वारशाने आल्यासारख्या वाटतात. तर चांगले-वाईटाची जाण, न्यायदानातल्या खाचाखोचा, राज्यकर्तव्ये हे सर्व ते जिजाऊ व दादोजींच्या सान्निध्यात शिकत गेलेले दिसतात. मूळचे अत्यंत हुशार असल्यामुळे त्याचा उपयोग कसा व कुठे करायचा हे उत्तरोत्तर अधिकाधिक वृद्धिंगत होत गेले.
(चांगले ते शिकत पुढे जाण्याचा प्रयत्न करणारा) मुमुक्षू
अवांतर:
मान्यवर इतिहासकार श्री. सेतू माधवराव पगडी यांचे यासंदर्भात काही लेखन वाचण्यास मिळालेले नाही. कुणास माहिती असल्यास कृपया सांगावे.
श्रीमान योगी.
कालपरवाच श्रीमानयोगी ची प्रस्तावना वाचण्यात आली.
शिवाजीच्या अगोदर आणि नंतरही अनेक राजे, युगपुरुष झाले. अनेकांनी राज्ये निर्माण केली . त्यात आणि शिवाजीत मुख्य फरक असा होता की अनेक राज्ये काही राज्य पोकळ झाली म्हणून इतरांचा उदय झाला असे म्हणता येइल. परंतु शिवाजीच्या वेळीस निजामशाही, विजापुरशाही, कुतुबशाही आणि मोगल हे वैभवाच्या परमसिमेवर असताना शिवाजीने राज्य संपादन केले हे निर्विवाद.
शिवाजीचा मोठेपणा समजुन घ्यावा असे वाटले म्हणून हे मत.
शिवरायांचे शिक्षण...डॉ. पवारांच्या लेखाचा दुवा.
शिवरायांचे शिक्षण कोणी केले? डॉ. जयसिंगराव पवारांचा लेखाचा दुवा माहीतीस्तव या चर्चेत टाकून ठेवतो.
दुवा रोचक आणि माहितीपूर्ण
दुवा निश्चितच रोचक आणि माहितीपूर्ण आहे. मात्र प्रस्तुत चर्चेबरोबरच याही चर्चेच्या दृष्टीने त्यात मांडलेली माहिती आणि मतप्रदर्शन प्रस्तुत (relevant) असल्याकारणाने कृपया हा दुवा त्याही चर्चेत द्यावा, ज्यायोगे त्या चर्चेच्या विषयाच्या अनुषंगानेही त्यावरअधिक टीकाटिप्पणी करता येणे सुलभ होईल, असे सुचवावेसे वाटते.